Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ प्रत्यक्ष प्रवेशाची मुदत वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयटीआय प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना तीन ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, तर दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ट्रेड व संस्थेचे पर्याय देण्याची मुदत एक ते तीन ऑगस्टपर्यंत आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया १९ जूनपासून सुरू झाली. अंतिम गुणवत्ता यादी १५ जुलै रोजी जाहीर झाली. त्यानंतर पहिल्या फेरीसाठी २८ जुलै रोजी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी वेबसाइटवर जाहीर झाली. विद्यार्थ्यांना २८ ते ३१ जुलैदरम्यान प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत होती. सोमवारी मुदत संपत असताना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या वेळापत्रकानुसार तीन ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अॅलॉटमेंट लेटर व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी निवड झालेल्या संस्थेत प्रवेशाची प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने २० ते ३० टक्के जागांवरच प्रवेश पूर्ण झाले आहेत.

पुढचे वेळापत्रक
दुसऱ्या फेरीची प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरू होत आहे. तीन ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीसाठी प्राधान्यक्रम भरता येणार आहे. सहा ऑगस्ट रोजी जागा वाटपाची यादी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये जाऊन सात ते दहा ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल. तिसरी फेरीसाठी सात ते दहा ऑगस्ट दरम्यान प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया. १३ ला जागा वाटपाची यादी जाहीर होईल. १४ ते १७ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया होईल. चौथी फेरीसाठी प्राधान्य सादर करण्याची प्रक्रिया १४ ते १७ ऑगस्ट पर्यंत चालेल. २० ऑगस्टला जागा वाटपाची यादी जाहीर होईल. २१ ते २४ ऑगस्ट पर्यंत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर शासकीय संस्थांमधील रिक्त जागांसाठी समुपदेशन फेरीची प्रक्रिया होणार आहे.

३० टक्के प्रवेश
प्रवेशाचे वेळापत्रक लांबल्याने प्रवेश प्रक्रियेत सोमवारपर्यंत ३० टक्केच प्रवेश झाले. औरंगाबादमध्ये मुलांच्या आयटीआयमध्ये १ हजार १२६ प्रवेश क्षमता आहे. सोमवार सायंकाळपर्यंत ३८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मुदतवाढ मिळाल्याने फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादला जेतेपद

$
0
0

औरंगाबादला जेतेपद
तलवारबाजी स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बुलडाणा येथे झालेल्या सबज्युनिअर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबाद संघाने एकूण १४ पदकांसह विजेतेपद पटाकाविले. त्यात सहा सुवर्ण, तीन रौप्य व चार ब्राँझपदकांचा समावेश आहे.
वैयक्तिक प्रकारात प्रणव महाजन, निखिल वाघ, रोहन शहा, कशिष भराड वेदांत खैरनार, वेदांत महामुनी, अब्रोकांती वडनेरे, आदित्य वाहुळ यांनी सहभागी प्रकारांत पदके जिंकली. तसेच सिद्धिका थोरात, वैदेही लोहिया, स्नेहल पाटील, साहिल काथारवाणी, संस्कार देशमाने, सुशांत पंडित, अथर्व कंठाळे, मोहित राठोड यांनीही उत्कृष्ट कामगिरी बजावली. या खेळाडूंना डॉ. दिनेश वंजारे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कामगिरीबद्दल राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, मंजु खंडेलवाल, संजय भुमकर, गोकुळ तांदळे, शंकर पतंगे, चंद्रशेखर पाटील आदींनी पदकविजेत्यांचे अभिनंदन केले.
अंतिम निकाल ः सांघिक प्रथम : फॉइल प्रकार मुले - (रोहन शहा, प्रणव महाजन, कृष्णा भालेराव, वेदांत खैरनार). इप्पी प्रकार मुले - (वेदांत खैरनार, कृष्णा भालेराव, प्रथमेश पळसकर, रोहन शहा). सेबर प्रकार मुले - (निखिल वाघ, वेदांत महामुनी, कृष्णा मगर).
सांघिक प्रथम : सेबर मुली - (अपूर्वा रसाळ, कशिष भराड, श्रावणी आहेर).
सांघिक द्वितीय : सेबर मुले - (श्रेयस जाधव, आदित्य वाहुळ, श्रीकांत डिघुळे).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ संयमाने श्रद्धेला निरोप!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेकायदा धार्मिक स्थळ हटाव कारवाईत सोमवारी (३१ जुलै) शहराच्या विविध भागातील सात स्थळे हटविण्यात आली. काही ठिकाणी भाविक आक्रमक झाले, पण पथकाने त्यांची समजूत काढताच त्यांनीच सामोपचारात आपल्या श्रद्धास्थानाला निरोप दिला.
हायकोर्टाच्या आदेशानंतर २८ जुलैपासून शहरातील धार्मिक अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली. या कामासाठी पालिकेने चार पथकांची नियुक्ती केली आहे. या कारवाईबाबत माहिती देताना आयुक्त डी. एम. मुगळीकर म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात २० धार्मिक स्थळे हटविण्यात आली. सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील २४ धार्मिक स्थळ हटविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यात नारळी बागेतील हनुमान मंदिर, जळगाव रोडवरील मांगीरबाबा मंदिर, दर्गा काचीवाडा, बाळापूर परिसरातील मांगीरबाबा मंदिर, ठाकरे नगरमधील दुर्गामाता मंदिर, एन-५ मधील श्रीकृष्ण मंदिर, आविष्कार कॉलनीतील हनुमान मंदिर हटविण्यात आले.’

नागरिकांचे आंदोलन
धार्मिक स्थळावरील कारवाईत सोमवारी आविष्कार कॉलनीत महापालिकेचे पथक पोहचले. तेथील नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या सूचनेनंतर नागरिकांनी स्वतः मंदिर हटविण्याचे कबूल केले. विविध ठिकाणच्या धार्मिक स्थळाबाबत शिष्टमंडळांनी महापौर, आयुक्तांची भेट घेत निवेदने सादर केली. काही धार्मिक स्थळ खासगी जागेत असल्याची चर्चा आहे. त्याला काही ठिकाणी विरोध झाला. कोणाच्या खासगी जागावर धार्मिक स्थळ असेल, तर एक-दोन दिवस कागदपत्र दाखविण्यासाठी मुदत दिल्याची माहिती आयुक्तांनी दिली. अशा स्थळांची संख्या तीन असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीकृष्ण मंदिर हटवले
सिडको एन सात भागात महापालिकेच्या मोकळ्या जागेवर बांधलेले श्री‌कृष्ण मंदिर अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी हटवले. सुरुवातीला परिसरातील नागरिकांनी कारवाईला विरोध केला, मात्र पथकाने आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे नागरिकांनी भावनांना आवर घालत श्रीकृष्ण मूर्तीची विधिवत पूजा केली व मंदिर हटविण्यास सहकार्य केले. पोलिस‌ निरीक्षक श्रीपाद परोपकारी व कैलास प्रजापती यांच्यासह मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.

दुर्गा माता मंदिर
एन २ परिसरातील महालक्ष्मी चौकात दुर्गा माता मंदिर हटविताना भाविकांनी मोठी गर्दी केली. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. मोठा पोलिस बंदोबस्त, राज्य राखीव दलाची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली होती. अतिक्रमण हटाव मोहीम पथकातील अधिकारी व पोलिस अधिकारी यांनी नागरिकांची समजूत काढली. त्यांनीही सामंजस्याची भूमिका घेत पूजा, आरती करून मूर्ती काढून घेतली. मंदिर हटविताना अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, शिवाजी कांबळे, भारत काकडे यांच्यासह दीडशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

‘वरखेडी’ कारवाईला स्थगिती
महालक्ष्मी चौकाच्या पुढे असलेल्या गल्लीत वरखेडी मातेचे मंदिर आहे. या मंदिराचा देखील अनधिकृत मंदिराच्या यादीत समावेश आहे. या ठिकाणी पालिकेच्या पथकाने भेट दिल्यानंतर हे मंदिर खासगी जागेवर असून, या भागात मंदिराच्या मालकाची शेती आहे. ती शेती असल्यापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली. याचे पुरावे देण्याची तयारी सबंधित मालकाने दर्शवली. त्यामुळे या कारवाईला दोन दिवसांची स्थगिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शिवसेना, अल्पसंख्याक ट्रस्टची हायकोर्टात धाव

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
सोमवारी महापालिकेची धार्मिक स्थळे पाडण्याची मोहीम चालू असतानाच शिवसेना आणि ‘अल्पसंख्याक कल्याण ट्रस्ट’ यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

२००८मध्ये खंडपीठाने स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेत २१ जुलै रोजी औरंगाबाद महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळे पाडावीत, असे निर्देश दिले होते. शिवसेनेच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. जय हनुमान सेवाभावी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नीळकंठ निवृत्ती मुसाने यांनी सोमवारी हस्तक्षेप अर्ज केला आहे. औरंगाबाद महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत १९६० पूर्वीच्या आणि शतकापूर्वीच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. काही धार्मिक स्थळे शहराच्या विकासाच्या आड येत नाहीत. रस्ता रुंदीकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही, असा आक्षेप या अर्जात घेण्यात आला आहे. महापालिका स्वतःची मालमत्ता असलेल्या धार्मिक स्थळांवरही हातोडा घालत असल्याचे मंडळाचे वकील संदीप राजेभोसले यांनी सांगितले.

अल्पसंख्याक कल्याण ट्रस्टचे सचिव नासेर खान यांनीही हस्तक्षेप अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. औरंगाबाद महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांसंदर्भात हरकती व सूचना मागविलेल्या नाहीत किंवा त्यांची बाजूही ऐकून न घेता यादी अंतिम करण्यात आली आहे, असे या अर्जात म्हटले आहे.

पालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये १९६० पूर्वीचे आणि वक्फ बोर्डाची मान्यता असलेल्या धार्मिक स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. याला वक्फ बोर्डाने आक्षेप घेतला आहे. वक्फ बोर्डही औरंगाबाद खंडपीठात धाव घेणार आहे. या यादीत वक्फ बोर्डाकडे नोंदणी असणाऱ्या १३८ धार्मिक स्थळांचा समावेश अनधिकृत म्हणून करण्यात आला आहे. त्यात पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या दर्गा व मशिदींचाही समावेश आहे. वक्फ बोर्डाकडे नोंद असलेल्या धार्मिक स्थळांची नावे वगळण्यात यावी व या स्थळांवर कारवाई करू नये, अशी विनंती वक्फ बोर्ड आपल्या अर्जात करणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष एम.एम. शेख यांनी म.टा.शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ उत्तरपत्रिका न तपासता अधिकारी रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. निश्चित कालावधीत निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पाच हजार उत्तरपत्रिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे तपासणीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तीन दिवस तांत्रिक अडचणींचा सामना केल्यानंतर उत्तरपत्रिका न तपासता मुंबई विद्यापीठाचे अधिकारी रवाना झाले.

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाने विद्यार्थी व पालक हवालदिल झाले आहेत. राज्य विधिमंडळात विद्यापीठाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठाने ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्याकडे उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी पत्र पाठवून विद्यापीठाला विनंती केली होती. त्यानुसार ग्रंथालयात २५ संगणक उपलब्ध करण्यात आले. ऑनलाइन पेपर तपासणीसाठी विद्यापीठ कॅम्पसमधील तीन प्राध्यापक व दुसऱ्या कॉलेजचे १७ प्राध्यापक नियुक्त केले होते. ‘लॉ बिझनेस’ विषयाच्या पाच हजार उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्याचे आव्हान होते. या कामाच्या समन्वयासाठी मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. मृदूल निळे आले होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे तपासणीचे काम झाले नाही. अखेर रविवारी डॉ. निळे मुंबईला रवाना झाले. या प्रकारामुळे संबंधित विद्यापीठाचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्फोन्सा हायस्कूल संघास विजेतेपद

$
0
0

अल्फोन्सा हायस्कूल संघास विजेतेपद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मदर तेरेसा अकादमीतर्फे आयोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत अल्फोन्सा हायस्कूल संघाने चुरशीच्या झुंजीत सरस्वती भुवन हायस्कूलचा ११ धावांनी पराभव करून विजेतेपद पटाकाविले.
अल्फोन्सा हायस्कूल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकाराली. त्यांनी २० षटकांत ९ बाद १६० अशी धावसंख्या उभारली. त्यात सौरभ चौधरी व जहांगिर हकीम यांनी आक्रमक फलंदाजी करून डावास आकार दिला. मंदार कुलकर्णीने ४ विकेट्स घेतल्या. सरस्वती भुवन संघाला धावांचा पाठलाग करताना २० षटकांत ८ बाद १४९ धावांपर्यंतच मजल मारता आली. आदित्य राजहंसने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. उत्सव सिन्हा, सुमित सिंग यांनी दोन विकेट घेतल्या.
विजेत्या, उपविजेत्या संघांना बिशप अँब्रोज रिबोलो, शिला डॅन, अकादमीचे अध्यक्ष निकोलस अँथनी, अॅड. बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी पॅट्रेशिया अँथनी, बिंदू अँटोनी, सुदीप शहा, बळवंत चव्हाण, विद्याधर पांडे, पी. मॅथ्यू, राजगुरू, प्रशांत कदम, अजय हिवाळे आदी उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक ः सेंट अल्फोन्सा हायस्कूल - २० षटकांत ९ बाद १६० (सौरभ चौधरी नाबाद ३४, जहांगिर हकीम ३२, यश बरडे २३, उत्सव सिन्हा २१, मंदार कुलकर्णी ४ विकेट्स, कृष्णा पवार २ विकेट्स) विजयी विरुद्ध सरस्वती भुवन हायस्कूल - २० षटकांत ८ बाद १४९ (आदित्य राजहंस ३९, चैतन्य वाघमारे २९, कृष्णा पवार २२, अवांतर ३७, उत्सव सिन्हा, सुमित मिश्रा प्रत्येकी २ विकेट्स).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्षास घाटीत मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घाटी हॉस्पिटलमध्ये प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला सुरक्षारक्षकांनी काठीने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. या घटनेनंतर तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात सुरक्षारक्षकाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी विश्वनाथ गाडे (वय ४० रा. वडवाळी ता. पैठण) हे प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते मंगळवारी सकाळी सुशीलाबाई सोनवणे या अपंग महिलेचे अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये आले होते. वॉर्ड क्रमांक ११७ येथे सुशीलाबाईंना मदत करत होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दोन सुरक्षारक्षकांनी त्यांना येथे थांबता येणार नाही, असे सांगत धक्काबुक्की केली. गाडे त्यांना समजावून सांगत असताना या सुरक्षारक्षकांनी काठीने मारहाण केली. गाडे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला काठीचा वार लागून डोके फुटले, त्यांचा चार टाके पडले आहेत. संघटनेच्या इतर सदस्यांनी मध्यस्थी करून गाडे यांची सुटका केली. या प्रकरणी गाडे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे गार्ड संजय सातव व विकास काळदाते यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘घाटी’त तणाव

अपंग प्रहार संघटनेतर्फे मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेसमोर ‘झोपा काढो’ आंदोलन आयोजित केले होते व त्यासाठी गाडे जाणार होते. पण, त्यांना मारहाण झाल्याचे समजताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घाटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यांनी सुरक्षारक्षकांवर कारवाईची मागणी केल्यानंतर काही काळ तणाव होता. पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्यानंतर काही वेळाने तणाव निवळला.

चौकशी समिती नियुत्त

या प्रकरणानंतर चौकशी समिती नेमण्यात आली असून, दोन दिवसांत समिती अहवाल सादर करणार आहे. त्याचवेळी सुरक्षा रक्षक दोषी आढळला, तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सुपरवायझर सत्यनारायण जैस्वाल यांनी घाटी प्रशासनाला दिल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ‘मटा’ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॅमेज कंट्रोलसाठी सेना नेते उद्या नांदेडमध्ये

$
0
0

डॅमेज कंट्रोलसाठी सेना नेते उद्या नांदेडमध्ये

नांदेड ः नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षात कोणतीही उलथापालथ होऊ नये तसेच शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते गुरुवारी (दि.३) नांदेडला येणार आहेत.
शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकमंत्री अर्जुन खोतकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते आदी नेते मंडळी नांदेडला येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दोन दिवस नांदेडच्या दौऱ्यावर होते. वसंतनगर येथे शिवसेना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या राजकीय घडामोडी व बंद खोलीतील चर्चेच्या वेळी शिवसेनेचे महापालिकेतील काही विद्यमान नगरसेवक हजर होते. त्याची गंभीर दखल घेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ नेत्यांना तातडीने नांदेडला पाठविल्याचे सांगण्यात येते. या सर्व पार्श्वभूमीवर दोन दिवसांनी होणाऱ्या बैठकीकडे शिवसेना कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक बुधवारी (दि.२) सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारावार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जायकवाडी प्रकल्पातील जलसाठा ५० टक्क्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
मराठवाड्याची भाग्यरेषा असलेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा सोमवारी ५० टक्क्यांपर्यंत पोचला. प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचा ओघ शनिवारपासून कमी झाला आहे. ऊर्ध्व खोऱ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नाथसागरातील पाणीसाठ्यात वेगाने झाली. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जायकवाडीतील जलसाठा दिलासा देणारा ठरणार आहे.

यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला व जुलै महिन्याच्या दुसऱ्या, शेवटच्या आठवड्यात नगर, नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे आतापर्यंत जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत जवळपास साडेबारा फुटांची वाढ झाली आहे. मागच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने गोदावरी नदीला पूर आला होता. परिणामी, जायकवाडी धरणात ५० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होती.

मागच्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील पाण्याची आवक १४ हजार क्युसेकवर आली आहे. आवक कमी झाली तरी सोमवारी संध्याकाळी जायकवाडी धरणात ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाल्याची माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. १५२१ फूट क्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची सध्याची पाणीपातळी १५११.४३ आहे. धरणात १८२३.२०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. यापैकी १०८५.००९ दशलक्ष घनमीटर (५० टक्के) उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती अभियंता चव्हाण यानी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ये तो बस झांकी है.. मुंबई अभी बाकी है..’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘ये रॅली तो बस झांकी है.. मुंबई अभी बाकी है’, ‘जय भवानी जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणा देत मंगळवारी शहरातून सकल मराठा समाज तसेच विविध संघटनांतर्फे मंगळवारी भव्य मोटारसायकल फेरी काढण्यात आली. ९ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच समाजबांधवांनी सहभागी व्हावे, यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
हातात भगवे झेंडे आणि गळ्यात भगवे रुमाल परिधान करून अत्यंत शिस्तीत काढण्यात आलेल्या या फेरीने शहरवासियांचे लक्ष वेधले.
गारखेडा परिसर, हर्सूल, मयूरपार्क, पडेगाव, सावंगी, एन १३, हडको, मुकूंदवाडी या भागातील नागरिकांनी आपापल्या भागामध्ये वाहनफेरी काढल्या. त्यानंतर सर्व फेऱ्या मंगळवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र झाल्या. तेथून मुख्य वाहनफेरीला सुरुवात झाली. शहरातील विविध भागातील नागरिकांनी या वाहनफेरीमध्ये सहभाग नोंदवला.
वाहनफेरीत समोर एका वाहनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता, तर फेरीच्या पहिल्या टप्पयामध्ये युवती व महिला त्यानंतर महाविद्यालययीन तरूण व शेवटी इतर नागरिक असे नियोजन होते. शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणातून फेरीला प्रारंभ झाल्यानंतर जयभवानीनगर, पुंडलिकनगर, गजाजननगर, गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्ती चौक, आकाशवाणी, क्रांती चौक, पैठणगेट, सिटी चौक पोलिस ठाणे, किलेअर्क, कलेक्टर ऑफिस, टीव्ही सेंटर, बळीराम पाटील शाळा, बजरंग चौक, ‌चिश्तिया कॉलनी मार्गे कॅनॉट प्लेस येथे वाहन फेरीचा समोरोप करण्यात आला. वाहनफेरी दरम्यान क्रांती चौक, पुंडलिकनगर व बजरंग चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. फेरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात आल्यानंतर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास तसेच टीव्ही सेंटर चौकात आल्यानंतर संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. वाहनफेरीतील वाहनांची शहरात सलग दोन ते अडीच किलोमीटर रांग लागली होती. मात्र, यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही याचेही नियोजन समन्वयक व स्वयंसेवकांनी केले होते.
वाहनफेरी कॅनॉट प्लेस येथे आल्यानंतर मुंबईच्या मोर्चात येणार ना..? असे आवाहन करताच, होय अशी गगनभेदी उत्तर वाहनफेरीत सहभागी झालेल्यांनी दिले. या ठिकाणी राष्ट्रगीतानंतर वाहनफेरीचा समारोप करण्यात आला.

शहरात वातावरण निर्मिती

अत्यंत शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या वाहनफेरीने शहरात वाहनफेरीमार्गात वाहनांचा जाम लागला होता. भगवे रुमाल, अन् झेंडे हातात घेऊन एकापाठोपाठ एक अशी दोन ते अडीच किलोमीटर सलग वाहनांची रांग लागल्याने रस्त्यांवर केवळ भगवी लाट पसरल्याचा अनुभव होता. रस्‍त्यावरून चालणारे प्रत्येक वाहनधारक रॅलीकडे कुतुहलाने पाहत होते. मुंबई येथील मोर्चाची वातावरण निर्मिती या फेरीमुळे झाली आहे.

गगनभेदी घोषणा

वाहनफेरीमध्ये जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो, अशा घोषणांसह, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोपर्डी घटनेत न्याय मिळालाच पाहिजे, येतो बस झांकी है मुंबई अभी बाकी है, या सरकारचे करायचे काय आदी घोषणा देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानीची पूजा महागली

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील विविध पूजविधींच्या दरात मोठी वाढ केली असून, याची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. नऊ वर्षांनंतर दरवाढ करण्यात आली असून, देवस्थानने भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
तुळजापूरमध्ये विविध भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असून, वेगवेगळ्या पूजाही करण्यात येतात. यापूर्वी या पूजाविधीच्या दरात २००८ मध्ये अल्पसा बदल करण्यात आला होता. यानंतर नऊ वर्षानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वीचे देवस्थानच्या विविध पूजेचे दर हे नाममात्र अशा स्वरूपाचे होते. त्यामुळे आता आकारण्यात येणाऱ्या पूजेसाठीच्या दरामुळे येथील पूजा महागड्या झाल्या असून, याचा फटका भाविकांना बसणार असल्याची ओरड पुजारी मंडळींनी सुरू केली आहे.
यापूर्वी देवस्थान कडून आकारण्यात येणारे पूजेचे दर आणि भाविकांकडून पुजारीकडून पूजेसाठी वसूल केली जाणारी रक्कम यात मोठी तफावत होती. त्याचाही विचार प्रशासनाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी देवस्थान समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी नवे दर जाहीर केले आहेत. हे बदल एक ऑगस्टपासून लागू होणार आहेत. ‘देवस्थानच्या उत्पन्नात भर पडावी यासाठीचा हा उद्योग नाही. तर, भाविकांची होणारी लूट थांबविण्याबरोबर येथील सोयी-सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठीचा देवस्थानचा हा प्रयत्न आहे. देवस्थानने केलेली दरवाढ ही सर्वसामान्य भाविकांना झेपेल अशीच आहे,’ असे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णा भाऊंनी साहित्यातून क्रांती घडवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नायकाशिवाय कोणाताही समाज उभा राहू शकत नाही आणि साहित्याशिवाय क्रांती घडत नसते. या गोष्टीचे भान अण्णा भाऊ साठे यांना होते. पुढील काळात किमान दलित नेत्यांनी जातीच्या पलीकडे जाऊन परिवर्तनवादी नेतृत्व स्वीकारावे’ असे प्रतिपादन डॉ. धम्मसंगिनी रमा गोरख यांनी केले. त्या विद्यापीठात बोलत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मंगळवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर येथील डॉ. धम्मसंगिनी रमा गोरख आणि प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी ‘अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि दलित चळवळीची वाटचाल’ विषयावर व्याख्यान झाले. महात्मा फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व डॉ. बी. एस. वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. साठे यांच्यावर साहित्यावर डॉ. धम्मसंगिनी यांनी भाष्य केले. ‘अण्णा भाऊ साठे यांचे आयुष्य अत्यंत हलाखीत गेले. मात्र त्यांनी साहित्यातून नेहमी जीवनाविषयक आशावाद मांडला. जातीअंत, स्त्रीदास्य व वर्गव्यवस्था नष्ट करण्यासाठी लेखन केले. नायकाशिवाय कोणाताही समाज उभा राहू शकत नाही आणि साहित्याशिवाय क्रांती घडत नसते, याचे भान अण्णाभाऊ यांना होते. त्यामुळे आगामी काळात किमान दलित समाजातील नेत्यांनी जातीपलिकडे जाऊन परिवर्तनवादी नेतृत्व स्वीकारावे’ असे धम्मसंगिनी म्हणाल्या.
डॉ. कमलाकर कांबळे यांनी अण्णा भाऊ यांच्या चळवळीवर प्रकाश टाकला. ‘दीड दिवसांची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊ यांनी मोठी साहित्य निर्मिती केली. वाटेगाव ते माटुंगा हा प्रवास परिवर्तनशील चळवळीचा इतिहास आहे. फडके-खांडेकरांच्या साहित्यातून त्या काळात कल्पनेच्या भराऱ्या व शृंगारीक वर्णन प्रसविली जात होती. या काळात अण्णा भाऊंनी ‘फकिरा’सह दर्जेदार साहित्यकृतीत माणसाला केंद्रबिंदू मानले. देशाचे स्वातंत्र्य, स्त्रियांचे चारित्र्य आणि पुरुषांचा स्वाभिमान या विषयांना साहित्यात स्थान दिले. आंबेडकरी चळवळी व साहित्याचा पाया अण्णा भाऊचे साहित्य आहे. तथापि, आंबेडकरी चळवळीतील मंडळीनी अन्यायाचा विचार नीट समजून घेतलेला नाही. त्यामुळे पुढील काळात सर्वांनी भान ठेवावे’ असे डॉ. कांबळे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. एस. वाघमारे यांनी केले. नागेश गवळी याने सूत्रसंचालन केले आणि डॉ. हणमंत सोनकांबळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या ९६ कुटुंबांना घरे सोडण्याचे आदेश

$
0
0

एसटीच्या ९६ कुटुंबांना घरे सोडण्याचे आदेश

एसटीच्या सहा इमारती धोकादायक; अधिकाऱ्यांचे घरांचे ऑडीटच नाही

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सहा इमारती धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. एका खासगी संस्थेमार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या ९६ कुटुंबीयांना घर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीर आला आहे.

मुंबईतील ३० वर्षांपूर्वीची इमारत पडल्याच्या घटनेनंतर राज्यातील सर्व विभागातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. या स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालात या इमारती जीर्ण झाल्याचे म्हटले आहे.

एसटी महामंडळातील कमी उत्त्पन्न गटांतील कर्मचाऱ्यांसाठी १९८२ मध्ये विभाग नियंत्रक कार्यालयाच्या मागील बाजूस या इमारतींसह अधिकाऱ्यांचीही निवासस्थाने बांधण्यात आली होती. मुख्य बसस्टँड जवळही दोन इमारती बांधण्यात आल्या होत्या. चंपक, अबोली, मोगरा अशी या इमारतींची नावे आहेत. एका इमारतीमध्ये १६ अशी सहा इमारतींमध्ये कर्मचाऱ्यांची ९६ कुटुंबे रहात आहेत.

या इमारतींची तपासणी केल्यानंतर त्या राहण्यायोग्य नसल्याचा अभिप्राय संबंधित एजन्सीने दिला आहे. या अहवालानंतर विभाग नियंत्रक कार्यालयाच्या मागील बाजूस राहणाऱ्या सी बिल्डिंगमधील रहिवाशांना पंधरा दिवसांत निवासस्थान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढ्या कमी वेळात नवे घर शोधणे अत्यंत अवघड बाब असल्याने या सर्वांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या कुटुंबीयांची झोप उडाली आहे.

अधिकाऱ्यांच्या निवासस्‍थानाचे ऑडीट नाही

राज्य शासनाकडून आदेश येताच एसटीने कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे ऑडीट केले, परंतु त्या शेजारीच असलेल्या अधिकाऱ्यांच्या घरांचे ऑडीट मात्र केलेले नाही. विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्‍थापक, सुरक्षा अधिकारी, तसेच कार्यशाळा व्यवस्‍थापक यांची ही निवासस्थाने आहेत. अधिकाऱ्यांच्या घरांची तपासणी का झाली नाही, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी आता केला आहे.

३० वर्षांपूर्वीच्या या इमारती आहेत. त्या जीर्ण झाल्याचा अहवाल संबंधित एजन्सीकडून प्राप्त झाला आहे. कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वीच त्या रिकाम्या करून पाडण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घरे सोडण्याची नोटीस दिली जात आहे.

रा. ना. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

काय आहे कर्मचाऱ्यांचे म्हणणे

निवासस्‍थानांची दुरुस्ती करून द्यावी.

कर्मचारी निवासस्थानावरील सिमेंटची टाकी काढून प्लास्टिकची टाकी बसवावी, जेणेकरून टाकीचे ओझे कमी होईल व इमारतीला धोका राहणार नाही.

निवासस्थान रिकामे करण्यापूर्वी प्रशासनाने नवीन घरे बांधून कर्मचाऱ्यांची सोय करून द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू-प्राध्यापकात भिंत नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व प्राध्यापकांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व दर्जेदार संशोधनाबाबत अजिबात तडजोड केली जाणार नाही,’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुलगुरू आणि प्राध्यापकात भिंत उभी केली, अशी व्यथा प्राध्यापकांनी मांडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्याकांशी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी मंगळवारी संवाद साधला. यावेळी १६० प्राध्यापक उपस्थित होते. २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षातील ‘शैक्षणिक व संशोधनविषयक नियोजन’ याविषयी आढावा बैठक झाली. यावेळी डॉ. चोपडे म्हणाले, ‘विद्यापीठ अनुदान आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय, नॅक, एनआयआरएफ, राज्य शासन, उच्च शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठानेही या दिशेने पावले उचलली असून, पदव्यूत्तर अभ्यासक्रम, संशोधनात बदल केले आहेत. चालू वर्षातील अर्थसंकल्पात शैक्षणिक विभागात भरीव तरतूद केली आहे. ऑनलाइन सीईटी, ‘आयसीटी’चा वापर, ‘पेपरलेस ऑफिस’बाबत प्रयत्न केले जात आहेत.’ या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. विभागप्रमुख व प्राध्यापकांशी नियमित संपर्क ठेवण्यात येईल असे कुलगुरुंनी सांगितले. या बैठकीसाठी प्रोग्रामर रवींद्र बनकर, योगेश थोरात, शीतल तेलभरे, पंकज बेडसे यांनी प्रयत्न केले.

दरम्यान, अॅकॅडमिक स्टाफ कॉलेजमध्ये विद्यमान संचालक मनमानी करीत आहेत. या प्रकाराची नोंद घेऊन कुलगुरूंनी कारवाई करावी, अशी तक्रार डॉ. फराह गौरी व डॉ. मेहेरुन्निसा पठाण यांनी केली.

दिरंगाईबद्दल जाब विचारा
कुलगुरू डॉ. चोपडे अत्यंत तळमळीने विद्यापीठाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत, पण प्रभारी अधिकारी व प्रशासनातील काही मंडळी कुलगुरू व प्राध्यापकात भिंत निर्माण करीत आहेत, असे मत डॉ. राम चव्हाण व कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी मांडले. या प्रकारची भिंत आपल्यामध्ये येऊ देणार नाही, असे कुलगुरू म्हणाले. ‘पदव्युत्तर सीईटी’ व अन्य विषयातील दिरंगाईबद्दल तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यांना जाब विचारावा, असे डॉ. गायकवाड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ अधिकाऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवीन विद्यापीठ कायद्यात ‘प्रभारी अधिकारी’ पद नसूनही नियमबाह्य ठरलेले प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांनी अखेर राजीनामा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला. डॉ. पाटील यांच्याविरुद्ध राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. श्रीराम निकम यांनी सोमवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रारीमुळे पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
पीएच. डी. प्रवेश पूर्वपरीक्षेतील वजा गुणांकन पद्धतीचा (निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम) मुद्दा चर्चेत आहे. हा निर्णय ऐनवेळी घेतल्यामुळे नुकसान झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून ‘पेट’ परीक्षेमुळे प्रभारी अधिकाऱ्यांविरुद्ध वातावरण तापले होते. विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करून नियमबाह्य पद्धतीने प्रभारी अधिकारीपदी नेमलेले डॉ. सतीश पाटील यांना हटवण्यासाठी विद्यार्थी संघटनांचा दबाव वाढला होता. पाटील यांच्याविरुद्ध प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर चोपडे यांनी पाटील यांचा राजीनामा घेतला. पर्यावरणशास्त्र विभागात पाटील मूळ पदावर रुजू झाले. राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. श्रीराम निकम यांनी अकोले (जि. अहमदनगर) येथील कॉलेजमध्ये प्राचार्यपदासाठी अर्ज केला होता. या पदाला पात्र ठरण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून अर्जदाराचा ‘एपीआय’ प्रमाणित करणे बंधनकारक होते. तातडीचे काम असल्यामुळे कुलसचिवांनी प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांना सांगितले होते, मात्र वारंवार भेट घेऊनही पाटील यांनी निकम यांचे काम केले नाही. फाइल अंगावर फेकून ‘तुम्हाला जे करायचे ते करा’ असे म्हणत अपमानास्पद वागणूक दिली. याप्रकरणी निकम यांनी कुलगुरू, राज्यपाल, उच्च शिक्षणमंत्री यांना पत्र पाठवले. कुलगुरूंना पाच स्मरणपत्रे पाठवूनही पाटील यांच्यावर कारवाई झाली नसल्यामुळे निकम यांनी अखेर बेगमपुरा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार दाखल केली. समान संधी नाकारल्यामुळे हे पाऊल उचलले असे निकम यांनी सांगितले. विशेष म्हणजे सोमवारी दुपारी बारा वाजता तक्रार दाखल केली. तर सायंकाळी सहा वाजता पाटील यांनी राजीनामा दिला. या तक्रारीमुळे विद्यापीठाची नाचक्की होईल या भितीने कुलगुरूंनी राजीनामा घेतल्याची विद्यापीठात चर्चा आहे.

साळुंके आज पदभार घेणार

प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांचा राजीनामा घेऊन अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. कुलसचिव डॉ. प्रदीप जबदे रजेवर असल्यामुळे डॉ. साळुंके यांनी पदभार स्वीकारला नाही. ही प्रक्रिया बुधवारी होण्याची शक्यता आहे. अधिष्ठाता साळुंके यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑरिकने करमाडला तर डीएमआयसीने लाडगाववासीयांना दिलासा

$
0
0

ऑरिकने करमाडला तर डीएमआयसीने लाडगाववासीयांना दिलासा
उद्योगनिर्मितीचे स्वप्न पूर्ण; एआयटीएल कंपनीकडेही जमीन हस्तांतर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औद्योगिक क्षेत्र वाढवfताना दिल्ली मुंबई इंडस्ट्र‌िअल कॉरिडोर (डीएमआयसी) आणि ऑरिक सिटी स्थापन करण्याच्या निर्णयामुळे औरंगाबादलगतच्या करमाडला व लाडगावच्या शेतकऱ्यांना आणि भूधारकांना दिलासा मिळाला आहे. योग्य मोबदला देत फेज वन आणि टू मध्ये जमीन हस्तांतर करण्याची प्रक्र‌िया करण्यात आली आहे. ९ जून २०१७ रोजी या जमिनींचे हस्तांतरण करण्यासाठी विक्री करार करून एआयटीएलला (औरंगाबाद इंडस्ट्र‌िअल टाऊनशीप लिमिटेड) ही जमीन देण्यात आली आहे.
औरंगाबादच्या लाडगाव येथील गट नंबर १५ मधील ६ हेक्टर ५० गुंठे क्षेत्रातील भूधरकांनी जमिनीचा मोबदला स्विकारला असून त्यांच्या वस्तीसाठी वगळण्यात आलेल्या ०.७१ हेक्टर क्षेत्राची हद्द या भागातील शेतकऱ्यांशी चर्चा निश्चित करून दिलेली आहे. त्याप्रमाणे पंचनामा करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी एक विशेष पत्र देऊन येथे रबर इंडस्ट्रिज असल्याने कारखान्याची जमीन वगळण्याची मागणी केली आहे. याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. महामंडळाच्या ताब्यात आलेल्या जमिनीपैकी पहिल्या टप्प्यात ३४७.८० हेक्टर जमीन २०१५च्या मार्चमध्ये तर दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर २०१५मध्ये ४९१ हेक्टर जमीन एआयटीएलला देण्यात आली आहे. यादृष्टीने त्याच काळात विक्री करारही होऊन ८३९ हेक्टर जमिनीचा ताबा देण्यात आला आहे. याशिवाय ९ जून २०१७ रोजी बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी (फेज टू) साठी संपादित केलेल्या क्षेत्रापैकी १०१४.२४ हेक्टर जमीन ऑरिकसाठी देण्यात आली आहे. शेकडो शेतकऱ्यांना याचा मोबदला देण्यात आला आहे.

ऑरिक आणि डीएमआयसी फेज टू मुळे शासनास जमीन मिळाली असून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. यामुळे ऑरिकसिटीच्या वाढीसाठीचा असलेला मार्ग मोकळा झाला आहे. डीएमआयसीच्या फेज थ्रीचे कामही मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे.
सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी,

२६ हेक्टर जमीन संपादन ‘सक्ती’ने ?
महामंडळाच्या ताब्यात न आलेल्या जमिनीपैकी ज्या शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिलेली नाही अशा शेतकऱ्यांचे क्षेत्र २६ हेक्टर आहे. या जमिनीच्या सक्तीच्या भूसंपादनासाठी १९ मे २०१७ ला उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री यांनी महामंडळाच्या मुख्यालयास प्रस्ताव सादर केला आहे. ही ‌जमीन पैठणमधील चिंचोली, जांभयी, मेहरबान नाईकतांडा निजलगाव या भागातील आहे. या परिसरातील शेतकऱ्यांसाठी ५१२ कोटीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ४५० कोटी मोबदला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून ७७९.२१ हेक्टर जमिनीचा ताबा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग प्रवेशात तांत्रिक अडचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय, अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी रिक्त जागांसाठी विशेष फेरी राबविली जात आहे. रिक्त जागांच्या यादीनंतर पर्याय भरण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत तीन फेऱ्या २९ जुलै रोजी पूर्ण झाल्या. त्यानंतर राज्यातील शासकीय, अनुदानित कॉलेजांमधील रिक्त जागांसाठी विशेष फेरीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील १२ कॉलेजांमधील सुमारे दीडशेपेक्षा अधिक रिक्त जागांसाठी ही फेरी सुरू आहे. रिक्त जागांची यादी जाहीर केल्यानंतर सोमवार, मंगळवार असे दोन दिवस कॉलेज व शाखा निश्चितीसाठी मुदत देण्यात आली होती. त्यात सोमवारी काहीवेळ वेबसाइट सुरळीत होती. काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन भरल्यानंतर ही वेबसाइट हँग झाली. वेबसाइट मंगळवार दुपारपर्यंत वारंवार हँग होत होती. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची फरफट झाली. मंगळवारी दुपारपर्यंत वेबसाइट ओपन होत नव्हती. त्यामुळे पर्याय भरण्याची संधी हुकेल, अशी भीती विद्यार्थी, पालकांना होती. दुपारनंतर ही वेबसाइट सुरळीत झाली. त्यानंतर पाचपर्यंत ‌विद्यार्थी, पालकांनी ऑप्शन फॉर्म भरले. तंत्रशिक्षणच्या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थी, पालकामध्ये नाराजी होती.

उद्या जागा वाटपाची यादी
तांत्रिक गोंधळामुळे विशेष फेरीत विद्यार्थी, पालकांची परीक्षा पाहिली. ऑप्शन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेनंतर गुरुवारी जागा वाटपाची यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर शुक्रवार ते रविवार या कालावधीच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावे लागतील.

शासकीय, अनुदानित कॉलेज....१२
प्रवेश क्षमता...........................५०९०
मराठवाड्यातील कॉलेज...........२
प्रवेश क्षमता...........................११८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालाची प्रतीक्षा कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी, औषधशास्त्र, विधी शाखेचे निकाल रखडल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. परीक्षेनंतर ४५ दिवसांत निकाल लावण्याचा नियम असताना निकाल लांबणीवर पडले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागात पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे निकाल रखडले आहेत. येत्या आठ दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभाग रखडलेल्या निकालामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. तब्बल १५ अभ्यासक्रमांचे निकाल रखडल्यामुळे हजारो विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. वारंवार बदल्यांचे प्रयोग सुरू असल्यामुळे परीक्षा विभागाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यात ३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय कुलसचिवांनी घेतला होता. या प्रकारामुळे निकाल आणखी उशिरा लागतील, असे कर्मचारी संघटनेने निदर्शनास आणून दिल्यानंतर बदल्यांचा निर्णय रद्द करण्यात आला. या प्रकारात विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहे.
साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या मास कॉपी प्रकरणानंतर परीक्षा विभागात फेरबदल करण्यात आले. विद्यापीठातील बहुतांशी कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असून, परीक्षा विभागाचाही त्यात समावेश आहे. सध्या मोजकेच कर्मचारी असल्यामुळे निकाल उशिरा लागत असल्याची स्थिती आहे. निश्चित कालावधीत निकाल लागले नसल्यामुळे विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत आहेत. पदवी परीक्षेचे निकाल लवकर लावण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा अर्ज दाखल करणे या प्रक्रियेसाठी अंतिम वर्षाचे निकाल लवकर जाहीर करण्यात आले, मात्र अभियांत्रिकी, औषधीशास्त्र, विधी शाखेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या निकालासह जवळपास पंधरा अभ्यासक्रमांचे निकाल रखडले आहेत. निकाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. पुढील वर्षांचे वर्ग सुरू होणे अपेक्षित असताना प्रलंबित निकालामुळे कॉलेज अडचणीत सापडले आहेत. तांत्रिक कारणांमुळे निकाल रखडले आहेत. पूर्ण निकाल लावण्यासाठी प्रयत्न सुरू असून या आठवड्यात निकाल जाहीर होतील असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

अभियांत्रिकी शाखेचे निकाल लवकर लावण्याची गरज आहे. अंतिम वर्षाचे निकाल जाहीर झाले असले, तरी इतर निकाल प्रलंबित आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थी कॉलेजला येतील.
- डॉ. आर. एस. पवार, प्राचार्य, श्रीयश इंजिनिअरींग कॉलेज

निकाल लागले नसल्यामुळे प्रवेश निश्चितीची सर्वात मोठी अडचण आहे. तिसऱ्या वर्षाचा निकाल जाहीर झाला नसल्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दाखला निघत नाही. जून महिन्यात परीक्षा संपली आहे, मात्र अद्याप निकाल लागलेला नाही.
- डॉ. अभिजीत वाडेकर, प्राचार्य, पीईएस इंजिनिअरिंग कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंग संघटनेचे झेडपीत ‘झोपा काढा’आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अपंगांच्या ३ टक्के निधीसह विविध योजनांची अमंलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ‘झोपा काढा’ आंदोलन करण्यात आले.
अपंगाच्या पुनर्वसनासाठी शासनाने १९९५मध्ये कायदा केला आहे. त्यानुसार विविध योजना जिल्हा परिषदांमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नाही, झोपेचे सोंग घेतले आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. अपंग बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे, कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशा घोषणा देत जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला. प्रशासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्यास प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा दिला.

संघटनेच्या मागण्या

- ३ टक्के अपंग निधी खर्च करण्याचे आदेश पंचायत समिती व ग्रामपंचायतीला द्या.
- जिल्हा परिषदेचा ३ टक्के निधी त्वरीत खर्च करा, निधी नियोजन समिती स्थापन करा.
- ऑनलाइन अपंगत्व प्रमाणपत्रधारकांच्या नोंदी ग्रामपंचायतीने कराव्यात.
- अपंग व्यक्तीसाठी १५ ऑगस्टच्या आत विशेष ग्रामसभा घ्या.
- व्यवसाय गाळे अपंगांना वाटप करावे.
- घरकुल योजनेत प्राधान्य द्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परराज्यांतील तूर ८४ लाखांचीच

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना

राज्यात काही महिन्यांपूर्वी तूर खरेदीवरून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना, जालन्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रांवर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील तूर खरेदी झाल्याचे समोर आले होते. मात्र, या सर्व घोटाळ्यात ९२ लाख ५७ हजार रुपयांचीच परराज्यातील तूर खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये ४९ शेतकरी आणि १८ व्यापारी दोषी असून, ८४ लाख नऊ हजार रुपये बँक खात्यांवर टाकण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.
जालन्यातील हा प्रकार ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उघडकीस आणला होता. त्यामुळे, मराठवाड्यात खळबळ उडाली होती आणि पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तूर खरेदी घोटाळाप्रकरणी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे चांगलेच अडचणीत आले होते. तर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे तसेच बाजार समितीचे संचालक आणि अनेक राजकीय नेत्यांवरही आरोप झाले होते. लोणीकर यांनी हा विषय लावून धरल्यानंतर जालन्यातील बाजार समितीच्या आवारातील ३५०० क्विंटल तूर बेवारस सोडून तूर माफीयांनी अक्षरशः पळ काढला होता. याच्या बातम्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एका रात्रीत या बेवारस तुरीपैकी १८०६ क्विंटल तूर गायब झाली होती. सुरुवातीच्या काळात चौकशीसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर यांना नियुक्त करण्यात आले होते. मात्र, गौर यांनी तपासातून माघार घेतली आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपवण्यात आली.
जिल्ह्यातील परतूर आणि तब्बल तूर खरेदी केंद्रावरील चौकशी उद्याप चालू आहे. मात्र जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केन्द्रावरील साधारणपणे आठशे शेतकऱ्यांच्या तूर विक्रीचे व्यवहार उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सचिन बारी, सहायक सहकार निबंधक, संबंधित तालुक्यातील तहसीलदार व जिल्हा मार्केटिंग व्यवस्थापक भारतभूषण पाटील यांच्या समितीने तपासणी केली असता वरील निष्कर्ष काढला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे आणि संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आता या दोषींवर काय कारवाई होणार, याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images