Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मृताच्या वारसांना ९२ लाख भरपाई

$
0
0

आैरंगाबाद : जळगाव रस्त्यावर मित्राची वाट पाहत थांबलेल्या अनिल लोखंडे यांचा ट्रकमधील साखरेचे पोते अंगावर पडल्याने २०१३मध्ये मृत्यू झाला होता. लोखंडे यांच्या वारसांनी दाखल केलेल्या नुकसान भरपाई दाव्याच्या निकालात मोटार अपघात न्यायाधीकरणाचे सदस्य सईद मकसूद अली यांनी ट्रकचालक, मालक आणि श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीस ९२ लाख ७५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. मृत लोखंडे हे प्राप्तिकर परतावा अर्ज भरत होते. यासंदर्भातील कागदपत्रे निर्णायक ठरली.

सिडको एन-७, पारिजातनगर येथील अनिल भुजंगराव लोखंडे (वय ४०) व्यावसायिक होते. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी पहाटे पाच वाजता चतुर्थीनिमित्त राजूर येथे लोखंडे दर्शनासाठी कारमध्ये निघाले होते. आंबेडकरनगर चौकात मिसारवाडी येथून त्यांचा एक मित्र राजूर येथे दर्शनासाठी येणार होता म्हणून त्याची वाट पाहत ते थांबले होते. लोखंडे कारमध्ये बसले असताना सिडको बसस्टॅँडकडून हर्सूलकडे ट्रक साखरेची पोती घेऊन जात होता. कारजवळ आल्यानंतर ट्रकचा एक्सल रॉड तुटला. वेगाने असलेला हा ट्रक एका बाजूने खाली कारवर कोसळला. ट्रक व साखरेच्या पोत्याखाली कार दबल्याने लोखंडे यांचा मृत्यू झाला. नुकसानभरपाईसाठी अनिल भुजंगराव लोखंडे यांची पत्नी प्रतिभा लोखंडे (३४), मुलगा प्रतीक (१२) आणि आई कलाबाई (७५) यांनी दावा दाखल केला. लोखंडे २००७पासून प्राप्तिकर भरत होते. त्यांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत होती. सरासरी वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये असल्याचे कोर्टाने मान्य केले होते. मृत लोखंडे यांच्या पत्नीस ५० लाख २५ हजार, मुलास ३० लाख, तर आईस १२ लाख रुपये नऊ टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले. लोखंडे यांच्या वारसांच्या वतीने अण्णासाहेब मुळे (शेकटेकर) यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शैक्षणिक बंदला संमिश्र प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर-मुंबई एक्स्प्रेसपुर्वी प्रमाणेच सुरू ठेवावी त्या रेल्वेचे बिदर पर्यंतचे विस्तारीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी रेल्वे बचाव कृती समितीने आयोजित शैक्षणिक बंदला अंशतः प्रतिसाद मिळाला. महाविद्यालय बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समितीच्या कार्यकर्त्या पोलिसांनी ताब्यात घेतले.
लातूरकरांच्या अस्मितेची लातूर-मुंबई ही रेल्वे बिदरपर्यंत विस्तारीत केल्यामुळे लातूर आणि परिसरातील प्रवाशांना मुंबई प्रवासासाठी अनेक अडचणी येत आहेत. ही रेल्वे पुन्हा पुर्ववत सुरू करण्याच आश्वासन खासदार डॉ. सुनील गायकवाड आणि पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिले आहे. खासदार आणि पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन हे भूलथापा असल्याचा आरोप आंदोलक अॅड. प्रदिप गंगणे यांनी केला आहे.
बुधवारी सकाळपासूनच समितीचे कार्यकर्ते शाळा महाविद्यालयात जाऊन बंदचे आवाहन करीत होते. दयानंद महाविद्यालयात बंदचे आवाहन करीत असतानाच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे शहरातील इतर शाळा महाविद्यालय सुरळीत सुरू होती.

शांततेत सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आम्हाला अटक केली. परंतु, येत्या काळातही लातूरच्या अस्मितेच्या रेल्वेसाठी आंदोलन सुरूच राहील.
अॅड. प्रदिप गंगणे,
आंदोलक रेल्वे बचाव समिती, लातूर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड तालुक्यात दोन अपघात; दोन ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
धुळे महामार्गावर पाणपोई फाटा व भांबरवाडी गावाजवळ झालेल्या दोन अपघातात दोन ठार व एक जखमी झाला. या दोन्ही घटना बुधवारी सायंकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान घडल्या.
पाणपोई फाटा येथे औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच २० बीटी३१४०) कन्नडकडे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच २० ईएम १५७३) धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संतोष पाडूरंग वाघ (वय ४५, रा. औराळा) यांना हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. चाळीसगावकडून कन्नडकडे येणाऱ्या ट्रकने (जीजे यू ६८३९) चाळीसगावकडे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच २० डीएस ६१३२) भांबरवाडीजवळ धडक दिली. या अपघातात प्रल्हाद वाल्मिक राठोड (वय २८) हे जागीच ठार, तर नारायण नरसिंग राठोड (वय ३० दोघेही रा. हिवरखेडा गौताळा) हे गंभीर जखमी झाले. ग्रामीण पोलिस ठाण्याचे फौजदार रोहित बेंबरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जखमीला ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे प्राथमिक उपचार करून घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परप्रांतीय मंगळसूत्र चोरास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिखली येऊन येऊन शहरातील मंगळसूत्रे तोडून पळणाऱ्या परप्रांतीय वाहनचालकाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या चिखली येथील तीन सराफा व्यावसायिकांनाही अटक करण्यात आली. संशयित आरोपीने प्रेयसी व तिच्या अल्पवयीन मुलासह शहरात सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या टोळीकडून १४ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.
वेदांतनगर येथील पगारिया रो हाउस समोरून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या सुजाता मदनलाल पगारिया यांचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघांनी २८ जुलै रोजी पळवले होते. त्याचे चित्रीकरण पगारिया यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले होते. दरम्यान, रेल्वे स्टेशन येथील एका लॉजमधून दोन संशयित तातडीने लॉज सोडून जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना गुप्त बातमीदाराने दिली होती. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात संशयित आरोपी योगेश उर्फ राहुल गिरी उर्फ भुऱ्या यादव (वय २७, रा. भिलवाडा, राजस्थान, दुसरा पत्ता जि. सावेर, मध्यप्रदेश) याला १७ वर्षांच्या मुलासह ताब्यात घेतले. भुऱ्या हा सध्या चांधई (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथे दोन वर्षांपासून राहत आहे. त्याने शहरात केलेल्या सात गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचे सोने चिखली येथील सराफांना विकले होते. पोलिसांनी हे सोने खरेदी करणारे सराफा व्यावसायिक संशयित आरोपी राजू नामदेव देशमुख, अजय विनोद टेहरे व अमित वर्धमान डहाळे (सर्व रा. चिखली) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून १४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, लगड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व दोन मोबाइल जप्त करण्यात आले.
ही कामगिरी पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल वाघ, जमादार संतोष सोनवणे, नितीन मोरे, सुधाकर राठोड, मनोज चव्हाण, भगवान शिलोटे, सिद्धार्थ थोरात, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, लालखाँ पठाण, संतोश सूर्यवंशी, संजय खोसरे व शेख बाबर यांनी केली.

माय-लेकाची मदत, गुन्हा करताच पसार

भुऱ्या यादव हा वाहनचालक असून त्याची इंदुर येथून येताना चांधई येथील एका महिलेसोबत ओळख झाली होती. तो दोन वर्षांपासून या महिलेकडे राहत होता. चिखली येथून ते मंगळसूत्र चोरीसाठी शहरात येत होते. ही महिला एकट्या महिलेच्या गळ्यात किती तोळ्याचे मंगळसूत्र आहे याचा अंदाज करून भुऱ्याला इशारा करून योग्य सावज असल्याची माहिती देत होती. मंगळसूत्र चोरीवेळी तिचा मुलगा दुचाकी चालवत होता. ते रेल्वे स्टेशनजवळील कोणत्याही लॉजमध्ये मुक्काम करत असत. गुन्हा करण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी ते लॉजचे भाडे देऊन खोली सोडत, पण सामान लॉजमध्ये ठेवत असत. मंगळसूत्र चोरी केल्याबरोबर ते ताबडतोब शहर सोडून चिखलीला जात होते.

भुऱ्याकडे दोन आधार कार्ड

पोलिसांना भुऱ्याकडे दोन आधारकार्ड सापडली आहेत. त्यापैकी एक राहुल रमेश गिरी (रा. वॉर्ड क्रमांक खडापूर, चिखली) या नावे आहे. दुसरे आधारकार्ड योगेश यादव (रा. इंदुर, मध्यप्रदेश) या नावाने केलेले आहे. या आधारकार्डचा देखील तपास करण्यात येत असल्याची माहिती एसीपी रामेश्वर थोरात यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालय अनुदानात गैरव्यवहाराचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
निर्मल ग्राम पुरस्कार मिळवलेल्या तालुक्यातील हनुमंतगाव येथे २००९ मध्ये तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांनी गैरव्यवहार करून ५५ शौचालयांचे अनुदान लाटल्याचा आरोप झाला आहे. याबाबत चौकशी करून १० अॉगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी पुष्पा मनचंदा यांना दिले आहेत. या प्रकरणावरून गावात फूट पडली आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हनुमंतगाव येथे सरपंच, उपसरपंच विरुद्ध ग्रामसेवक व गावकरी अशी फूट पडली आहे. ग्रामसेवक बारसे हे काम करत नसल्याचा आरोप करत सरपंच व उपसरपंचांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी बुधवारी वैजापूर येथे पंचायत कार्यालयात येऊन ग्रामपंचायत कार्यालय उघडावे, शौचालय बांधकाम प्रकरणातील गैरव्यवहाराची चौकशी करावी यामागणीसाठी गटविकास अधिकारी पुष्पा मनचंदा यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. परंतु, मनचंदा या शासकीय कामासाठी औरंगाबाद येथे गेलेल्या असल्याने त्यांची भेट झाली नाही. यावेळी रामदास फुलारे, दीपक भांडे, दीपक चौभे, एकनाथ सावंत, छाया जांदराव, संगीता फुलारे, रुपाली त्रिभुवन, द्वारकाबाई त्रिभुवन, हिराबाई फाळके, संगीता इंगळे, सुमन आपटे, सरिता फुलारे, सुशीला फुलारे, सुंदरबाई फुलारे, अलका धनवट, परिगा धनवट, विमल बनकर, जनाबाई बनकर, कल्याबाई त्रिभुवन यांनी सहायक गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

बदली करू नका

ग्रामसेवक बारसे हे गावात दवंडी देऊन ग्रामगीता वाचतात व त्यांनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. गरीब महिलांचे बचत गट स्थापन रोखलेले शौचालयाचे अनुदान मिळवून दिले. त्यामुळे त्यांची बदली न करता कायम ठेवावे, अशी मागणी विश्वकर्मा महिला बचत गटाच्या शोभाबाई आपटे, आश्विनी त्रिभुवन, छायाबाई जानराव, सुशीला फुलारे, मंदा भांड आदी महिलांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजारांची लाच घेताना वॉर्ड बॉय अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पीएफ ऑफीसमधून अग्रीम मंजूर केल्याप्रकरणी सहकारी कर्मचाऱ्याकडून तीन हजाराची लाच घेणाऱ्या धूत हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. शकील शेरखान पठाण (वय ३७, रा. करमाड) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी हॉस्पिटलच्या अपघात विभागात करण्यात आली.
या गुन्ह्यातील तक्रारदार हे सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय असून ते २००८ पासून पीएफ खात्यावर रक्कम जमा करतात. त्यांना प्लॉट घेण्यासाठी पैशाची गरज असल्याने पीएफ ऑफिसमध्ये अर्ज केला होता. यावेळी त्यांचा सहकारी आरोपी शकील पठाण याने तुझा अर्ज मंजूर करून आणतो, मला पाच हजार रुपये दे, अन्यथा अर्ज नामंजूर होईल, अशी भिती घातली. पठाण याला पैसे दिले नसल्याने तक्रारदाराचा अर्ज नामंजूर झाला. त्यानंतर १२ जुलै २०१७ रोजी तक्रारदाराने पुन्हा अर्ज केला तेव्हा देखील पठाणने पीएफ ऑफीसमधील लोकांना तीन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराने पीएफ मंजूर होऊ दे, नंतर पैसे देतो असे आश्वासन दिले. दरम्यान, २९ जुलै रोजी तक्रारदार वॉर्ड बॉयचा अर्ज मंजूर होऊन त्याला रक्कम मिळाली. यानंतर पठाणने तीन हजारांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून बुधवारी सकाळी धूत हॉस्पिटलच्या अपघात विभागात सापळा रचून बक्षिसाच्या स्वरुपात लाच घेताना शकील पठाण याला अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक किशोर चौधरी, पोलिस निरीक्षक विकास पाटील, सीताराम शेगोकार, विजय ब्राह्मंदे, गोपाल बरंडवाल, अश्वलिंग होनराव, सुनील पाटील, राजपूत आदींनी केली.

पीएफचा कर्मचारी कोण

संशयित आरोपी शकील पठाण याने पीएफ ऑफिसमधून तक्रारदाराचा अर्ज सुरुवातीला नामंजूर व नंतर मंजूर करून घेतला. यामागे पीएफ ऑफिसमधील कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. कोणत्या कर्मचाऱ्यासाठी पठाण दलाली करीत होता, याचा तपास करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ जणांची फसवणूक; सायबर ठकास बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एटीएम सेंटरमध्ये पैसे काढणाऱ्या व्यक्तीचा पासवर्ड पाहून त्याची रक्कम लांबवणाऱ्या आरोपीला पकडण्यात मुकुंदवाडी पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद सलीम हजीरखान, असे त्याचे नाव आहे. तो हरियाणा राज्यातील रहिवासी असून १४ जणांची फसवणूक करत पाच लाख ६० हजार रुपये पळ‍वल्याची कबुली दिली आहे.
विनायक पुंडलिक मेळगावे (रा. रामनगर, सिडको) यांचे ३५ हजार रुपये २८ मे २०१६ रोजी मुकुंदवाडी भाजी मंडई येथील एसबीआय बँकेच्या एटीएममधून अज्ञात व्यक्तीने काढले होते. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात आढळले होते. त्यानंतरही मुकुंदवाडी व एपीआय कॉर्नर येथील एटीएम सेंटरमधून कार्डधारकांचे पासवर्ड हेरत, मोठ्या रक्कमा लंपास करण्यात आल्या. या गुन्ह्यातील आरोपीचा मुकुंदवाडी पोलिस एक वर्षापासून शोध घेत होते. पोलिसांनी गुन्हा घडलेल्या वेळेतील मोबाइल क्रमांकाचे लोकेशन, डमडाटा व सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा माग काढला. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकच संशयित दिसून आला. त्यावरून शोध घेऊन पोलिसांनी मोहम्मद सलीम हाजीरखान (वय ३३ रा. सुनारी गाव, तहसील तौर, जिल्हा मेवात, हरियाणा) याला खोडेगाव, कचनेर येथून अटक केली. त्याने या प्रकारे १४ गुन्ह्यांची कबुली देत पाच लाख ६० हजार रुपये लांबवल्याची माहिती दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त राहुल श्रीरामे, एसीपी गायकवाड, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल खटावकर, उपनिरीक्षक बनसोडे, शेख अस्लम, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, विष्णू हगवणे यांनी केली.

कचनेर येथे महिलेसोबत वास्तव्य

आरोपी सलीम हा ट्रकचालक असून खोडेगाव येथील एका महिलेसोबत त्याची ओळख आहे. या महिलेसोबत तो राहत होता. मुकुंदवाडी परिसरात एटीएम सेंटरमध्ये तो पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना लक्ष्य करायचा. त्यांचा पासवर्ड पाहून झाल्यानंतर तो त्यांची रक्कम निघाल्यानंतर त्यांना मशीनपासून दूर करण्यासाठी घाई करायचा. कार्डधारक बाहेर पडल्यानंतर तो हातचलाखीने जुन्याच पासवर्डवर व्यवहार करीत त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेत होता.

गेल्या दोन दिवसात दोन गुन्हे

संशयित आरोपी सलीम याने सोमवारी दुपारी मुकुंदवाडी भाजी मंडईतील एटीएममध्ये गुन्हा केला. या ठिकाणी त्याने संभाजी नाताजी लहाने या ज्येष्ठ नागरिकाचा पासवर्ड हेरून १५ हजार रुपये काढले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी पुन्हा त्याने याच एटीएममध्ये स्वाती विनायक बोदरे या तरुणीचे पाच हजार रुपये पळवले. लागोपाठ दोन गुन्हे केल्याने पोलिसांनी तातडीने हालचाल करीत त्याला अटक केली.

यांना फसवले

१५ जुलै २०१६ : रामचंद्र उकरडा तायडे - २० हजार
२० जुलै २०१६ : योगेश पोपटराव ठाकरे - २० हजार
३ आॅगस्ट २०१६ : सुनील भिकन भगोरे - १० हजार
८ सप्टेंबर २०१६ : संगीता हर्षल आवळे- एक लाख ८५ हजार
१४ फेब्रुवारी २०१७ : बाबासाहेब नाना ससाणे - एक लाख ७५ हजार
२७ मार्च २०१७ : बाबासाहेब मोहनराव साळवे - एक लाख ५१ हजार ४००
३ एप्रिल २०१७ : संजय जगन्नाथ भोकरे - २० हजार
३ एप्रिल २०१७ : प्रदीप मोहनराव मनोहर - १२ हजार ५००
२१ एप्रिल २०१७ : बालाजी विक्रम तोरकड - २० हजार
२४ एप्रिल २०१७ : भरतसिंग काशीराम पाटील - आठ हजार
२७ एप्रिल २०१७ : राजेश जगनारायण चौधरी - ४० हजार
१ आॅगस्ट २०१७ : स्वाती विनायक बोदरे - ५ हजार
१ आॅगस्ट २०१७ः संभाजी नाथाजी लहाने - १५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायली औरंगाबादची श्रावणक्वीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भरतनाट्यममधील पदलालित्य, अर्थपूर्ण मुद्राभिनय, घेरदार घागऱ्यातील ठसकेबाज नृत्य, कुणी बॅले डान्स, तर कुणी मिनीस्कर्टमध्ये आपल्या सौंदर्याने उपस्थित रसिकांना घायाळ करीत परीक्षकांची मने जिंकत होतं. प्रचंड आत्मविश्वास अन् जिंकण्यासाठीची जिद्द हे सर्व दृष्य होते बुधवारी झालेल्या महाराष्ट्र श्रावणक्वीन स्पर्धेच्या औरंगाबादमधील श्रावणक्वीन स्पर्धेचे. बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा मिलाफ घडविलेल्या या स्पर्धेत औरंगाबादची श्रावणक्वीन ठरली सायली बाभुळगावकर. द्वितीय क्रमांक पटकावला अक्षरा चौधरी हिने.

क्रांतीचौक येथील हॉटेल मॅनोर येथे अत्यंत दिमाखदार पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. सकाळी दहा वाजता उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद‍्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे रेडिओ पार्टनर रेडिओ मिर्ची ९८.३, तर व्हेन्यू पार्टनर होते हॉटेल मॅनोर. अल्पना बुटिकतर्फे अर्चना चौधरी यांनी सर्व विजेत्यांना पारितोषिके दिली.

उद‍्घाटनाची औपचारिकता पूर्ण होताच श्रावणक्वीच्या एकापेक्षा एक दिलखेचक परफॉर्मन्स सुरू झाले. प्राथमिक फेरीत स्पर्धकांमध्ये प्रचंड चढाओढ लागली होती. परीक्षकांनी यात पहिल्या १३ उत्कृष्ट स्पर्धकांची निवड केली. त्यानंतर या १३ जणींचा पुन्हा प्रश्नोत्तराचा राउंड झाला. त्यातून अंतिम पाच जणींची निवड करण्यात आली. या स्पर्धेचे बहारदार सूत्रसंचालन केले गेल्या वर्षीची औरंगाबाद श्रावणक्वीन ठरलेली स्वाती खरात आणि आर. जे. निमी यांनी. प्रसिद्ध गायिका आरती पाटणकर आणि नाट्यकर्मी सुजाता पाठक यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. महाराष्ट्र टाइम्सचे सिनीअर असिस्टंट एडिटर प्रमोद माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

सायली, अक्षरा अंतिममध्ये
या प्राथमिक फेरीतून प्रथम आलेली सायली बाभुळगावकर आणि दुसरा क्रमांक मिळविलेली अक्षरा चौधरी या दोघी पुण्यात १० ऑगस्ट रोजी होत असलेल्या अंतिम फेरीत औरंगाबादचे प्रतिनिधित्व करतील.

प्राथमिक फेरीचा निकाल
- प्रथम : सायली प्रमोद बाभुळगावकर
- द्वितीय : अक्षरा आनंद चौधरी
- तृतीय : अनुष्का जयंत करपे
- चतुर्थ : ऋत्विका गायकवाड
- पाचवी : अंकिता अकोलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पालिकेचे ९२ कोटींचे वीज बिल केले माफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या महापालिकेचे तब्बल ९२ कोटींचे वीज बिल माफ करून वीज नियामक आयोगाने मोठा दिलासा आहे.

शहराचा पाणी पुरवठा औरंगाबाद वॉटर युटीलिटी या खासगी कंपनीकडे सोपवल्यानंतर महावितरणने व्यावसायिक दरानुसार वीज आकारणी सुरू केली होती. त्यापोटी महावितरणने पालिकेला अतिरिक्त ९२ कोटींचे बिल दिले होते. त्याला पालिकेने वीज नियामक आयोगात आव्हान दिले. याप्रकरणी आयोगाने हे ९२ कोटी रुपयांचे वीज बिल रद्द करण्याचा आदेश दिला.

महापालिकेने शहरात समांतर पाणी पुरवठा योजनेसाठी औरंगाबाद युटिलिटी कंपनीची नेमणूक करून २०११मध्ये करार केला. प्रत्यक्षात युटिलिटी कंपनीने सप्टेंबर २०१४मध्ये काम सुरू केले. आयोगाच्या निर्देशानुसार पाणी पुरवठा यंत्रणा महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आदी मालकीची असेल तर त्यांना सामान्य दरानुसार वीज आकारणी केली जाते, मात्र खासगी व्यक्ती किंवा संस्थेकडून होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला व्यावसायिक दरानुसार वीज बिलाची आकारणी केली जाते. त्यामुळे औरंगाबाद युटिलिटी कंपनीला महावितरणने व्यावसायिक दराने ग्रामीण व शहरी विभागातील कनेक्शनपोटी अनुक्रमे ७२ कोटी व २० कोटी असे ९२ कोटींचे वीज बिल दिले होते. दरम्यान, औरंगाबाद वॉटर युटिलिट कंपनीशी असलेला महापालिकेचा करार मोडला. त्यामुळे या वीज बिलाला महापालिकेने वीज नियामक आयोगाकडे दाद मागितली होती. या प्रकरणात आयोगासमोर हेमंत कापडिया यांनी महापालिकेची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पाच धार्मिक स्थळे हटविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या पथकांनी बुधवारी (२ ऑगस्ट) माँ - बाप दर्ग्यासह पाच धार्मिक स्थळे हटविली. क्रांती चौकातील प्रार्थनास्थळाचे मोजमाप करण्यासाठी गेलेल्या पथकाला काही नगरसेवक व नागरिकांनी पिटाळून लावले.

अवैध व बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईत सकाळी नऊच्या सुमारास करमूल्य निर्धारक व संकलक वसंत निकम यांच्या नेतृत्वाखालील पथक पैठण रोडवरील माँ - बाप दर्गाजवळ पोचले. यावेळी सहाय्यक पथक अधिकारी महावीर पाटणी, शाखा अभियंता संजय चामले, सुहास जोशी, नानासाहेब साळवे, आदी उपस्थित होते. पोलिस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर होता. या पथकाने दर्गा हटविण्यास सुरुवात केली. नागरिकांनी प्रारंभी विरोध करण्याता प्रयत्न केला, पण त्याला न जुमानता पथकाने दर्गा कारवाई पूर्ण केली. यानंतर हे पथक एकनाथनगरात आले. याठिकाणी लक्ष्मीमाता मंदिर हटविण्यात आले. उपायुक्त अय्युब खान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महूनगर येथील जलमंदिर - बौद्धविहारावर कारवाई केली. उदयकॉलनी - भोईवाडा येथील तुळजाभवानी मंदिर देखील पथकाने हटवले.


पथकाला पिटाळले
उपायुक्त रवींद्र निकम यांनी सायंकाळी क्रांती चौक येथील प्रार्थनास्थळाला भेट दिली. निकम यांच्या नेतृत्वाखालील पथक या ठिकाणी मोजमाप करणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे काँग्रेस व एमआयएमचे काही नगरसेवक या ठिकाणी आले. दरम्यानच्या काळात मोठा जमाव देखील जमा झाला होता. त्यांनी निकम यांना पिटाळून लावले.

कारवाई करणार
‘हायकोर्टाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाईल. क्रांती चौकातील कारवाईत अडथळा आणण्याचा प्रकार घडल्याचे समजले. त्याचा उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडून अहवाल मागवला जाईल. त्यावर कोणी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे आयुक्त डी. एम. मुगळीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसटी’ नव्हे कोंडवाडा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गंगापूर ते सावखेडा मार्गावर प्रवास करताना विद्यार्थ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा येतो. फक्त ६६ प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये चक्क सव्वाशे जण कोंबलेले असतात. शाळा सुटत नाही, अन् एसटीत जागा भेटत नाही अशी गत या विद्यार्थ्यांची झाली आहे.

गंगापूरहून सावखेड्याला जाण्यासाठी सकाळी आठ वाजता गाडी निघते. या गाडीत जागा मिळवण्यापासून विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू होतो. ज्या विद्यार्थ्यांना बसमध्ये उभे राहण्याची जागा मिळाली त्यांचेच भले, मात्र ज्यांना उभे राहायलाही जागा मिळत नाही त्यांचा दिवस घरात जातो. विशेष म्हणजे जे विद्यार्थी बसमधून प्रवास करतात त्यांचा प्रवासही तितकाच वेदनादायी असतो.

या मार्गावर गंगापूर ते ढोरेगाव या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थींची संख्या दीडशेच्या वर आहे. यामुळे गंगापूर बस स्थानकावरून सुटणाऱ्या या बसमध्ये प्रवाशांना जागा मिळविण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतात. हा त्रास संपणार कधी, असा सवाल विद्यार्थ्यांसह प्रवासी करत आहेत.

केबिनमधून प्रवास; विद्यार्थिनी त्रस्त
बसमध्ये जागा मिळत नसल्यामुळे काही विद्यार्थी ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये बसून त्रासदायक प्रवास करतात. या जागेतही आठ ते दहा जण कोंबलेले असतात. अनेकदा विद्यार्थ्यांचा जीव गुदमरतो. बसायला जागा न मिळाल्यामुळे विद्यार्थिनींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गर्दीत अनेकदा एका पायावर सिटच्या आधाराने हा प्रवास पार पाडावा लागतो.

वेगळ्या बसची मागणी
गंगापूर-सावखेडा बसमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता गंगापूर आगाराने गंगापूर ते कोडापूरपर्यंत शाळेच्या वेळेप्रमाणे वेगळी बस सोडावी. त्यामुळे प्रवाशांचे हाल कमी होतील, अशी मागणी आगार प्रमुखांकडे ग्रामस्थांनी केली होती. याबाबत अद्याप तरी कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्रास मात्र दिवसेंदिवस वाढतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलीनीकरणाचे पुन्हा वारे!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्मचाऱ्यांना हवालदिल करून त्यांच्यात असंतोषाची खदखद निर्माण करणाऱ्या विलीनीकरणाचे पुन्हा एकदा स्टेट बॅँक ऑफ इंडियात वारे सुरू आहे. बॅँकेच्या शहरातील सहा शाखा सहा ऑगस्टपासून इतर शाखांमध्ये वर्ग होणार असून, ५६ शाखांची संख्या विलीनीकरणानंतर ५० होईल.

स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणामुळे शहरातील एसबीआयच्या शाखांची संख्या वाढली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शाखांच्या विलीनकरणासंबंधीचे सूचना फलक त्या-त्या शाखांमध्ये लावण्यात आले आहेत. ग्राहकही यासंबंधी विचारणा करत आहेत.

विलीनीकरणानंतर त्या-त्या शाखांतील कर्मचारी विविध शाखांमध्ये नेमले जातील किंवा पुनर्नियुक्ती केली जाईल, मात्र कोणत्याही कर्मचाऱ्यास नोकरीवरून कमी केले जाणार नाही. तब्बल ६० हजारहून अधिक खातेधारकांवर याचा परिणाम होणार आहे. दरम्यान शाखा विलीनकरणाचा ग्राहकांवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही, याचा दावा स्टेट बँकेच्या वरिष्ठ सूत्रांनी केला आहे.

या शाखा वजा
भाग्यनगरची स्टेट बँक शाखा (पूर्वीची स्टेट बँक ऑफ पतियाळा) एसबीआयच्या बाबा पेट्रोलपंप शाखेत विलीन होईल. स्टेट बँक गुरूद्वाराची शाखा (पूर्वीची स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर) एसबीआयच्या संत एकनाथ रंगमंदिराजवळच्या शाखेत (पूर्वीची स्टेट बँक ऑफ हैदराबाद) विलीन होईल. स्टेट बँक शहागंजची शाखा (पूर्वीची स्टेट बँकच) आता स्टेट बँक शहागंजच्या (पूर्वीची स्टेट बँक ऑफ हैदराबाद) शाखेत विलीन होईल. स्टेट बँक पुंडलिकनगरची शाखा (पूर्वीची स्टेट बँक ऑफ पतियाळा) स्टेट बँक ऑफ इंडिया एन-४ शाखेत विलीन होणार आहे.

सूचना फलक लावले
‘आमची गुरुद्वारा शाखा उस्मानपुरा शाखेत विलीन होणार आहे. याचा मार्गदर्शक फलक आम्ही लावला असून ग्राहकांना आता व्यवहार उस्मानपुरा शाखेतून करावे लागेल,’ अशी माहिती गुरुद्वारा येथील एसबीआय बॅँकेच्या शाखेचे व्यवस्शापक सुरेंद्रकुमार वर्मा यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदतवाढीस तांत्रिक बाबीचा अडसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी उस्मानाबाद
राज्य सरकारने पीक विमा भरण्याची मुदत वाढवली असली तरी अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ३१ जुलै पूर्वीचा पीक पेरा प्रमाणपत्र असल्याशिवाय पीक विम्याच्या लाभ मिळणार नसून, तलाठी जुन्या तारखेचा पीक पेरा देण्यास नकार देत असल्याने मुदतवाढीची घोषणा केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे.
राज्य सरकारने ५ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र, २ दिवस झाले तरी बँकांना आदेश मिळाले नसल्याने जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँक पीक विमा घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची होत आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ ऑगस्ट तर कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना ५ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत दिली आहे. शेतकरी ऑनलाइन पद्धतीने जनसेवा केंद्राच्या माध्यमातून पीक विमा भरू शकतात असे सरकारने घोषित केले आहे. या नियमाचा आधार घेत बँका पीक विमा स्वीकारण्यास नकार देत आहेत. बँका नकार देत असल्याने शेतकरी जनसेवा केंद्राकडे धाव घेत असले तरी अनेक ठिकाणी वेबसाईट स्लो असल्याने व इंटरनेटचा खोळंबा होत असल्याने पीकविमा भरणे कठीण झाले आहे.
राज्य सरकारने पीक विमा मुदतवाढ देताना त्यात ३१ जुलै किंवा त्यापूर्वीच पीक पेरा प्रमाण पत्र जोडणे बंधनकारक केले आहे. अनेक शेतकऱ्यांना या जाचक अटीची अडचण होत असून सध्या कोणताही तलाठी मागच्या तारखेचा पीक पेरा प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पीक पेरा प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांनी मोठी धावपळ होत असून चालू तारखेतला पीक पेरा मिळाला तरी त्याचा उपयोग होईल असे वाटत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
राज्य सरकार अनेक घोषणा करते. मात्र, त्यातील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना फायदा होत नाही. हा आरोप पीक विम्याच्या या घोळामुळे सिद्ध झाला आहे. जिल्ह्यातील अनेक बँकांनी शेतकऱ्यांना हाकलून देत जबाबदारी टाळली तर जनसेवा केंद्रावर शेतकऱ्यांची पीक विमा भरताना मोठी आर्थिक पिळवणूक होत असून एका शेतकऱ्यांकडे किमान २०० च्यावर रक्कम वसूल केली जात आहे. यावर महसूल विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास २ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून अद्याप ६० ते ७० हजार शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित आहेत.


शेतकरी पीक पेरा प्रमाणपत्र मागत आहेत. त्यांना चालू तारखेत प्रमाणपत्र तात्काळ दिले जात आहे. मात्र, ३१ जुलै म्हणजे मागच्या तारखेत पेरा देणे आता शक्य नाही.
गणपत खोत, तलाठी, उस्मानाबाद




जिल्हा बँकेत ऑनलाइन सुविधा नसल्याने आणि शासनाने ऑफलाइन विमा स्वीकारण्यास संमती न दिल्याने आम्ही १ तारखेपासून पीक विमा स्वीकारण्यास बंद केले आहे.
विष्णुदास चांडक, कार्यकारी संचालक, उस्मानाबाद जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीकविमा स्वीकारण्यास नकार; शेतकऱ्यांत संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
शासनाने मुदतवाढ देऊनही खुलताबादेत कोणतीच बँक पीकविमा स्वीकारत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने केली. महा ई सेवा केंद्रातही तांत्रिक कारणामुळे पीकविमा भरला जात नसल्याने शेतकऱ्यांच फरफट होत आहे. शेतकऱ्यांची अचानक आंदोलन केल्याने तहसील कार्यालयात खळबळ उडली.
तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकरी पीकविमा भरण्यासाठी बँकेसमोर गर्दी करत आहेत. मात्र बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहत आहेत. शेकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून बँकेत गर्दी केली. परंतु, बँक कर्जाचे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा पीकविमा भरून घेत नसल्याने ते आक्रमक झाले व थेट तहसील कार्यालय गाठून गाठले. त्यांनी मुख्य दरवाजासमोर ‘बँकेने पीकविमा स्वीकारलाच पाहिजे,’ अशा घोषणा दिल्या. यावेळी तहसीलदार डॉ. अरूण जऱ्हाड यांनी निवेदन स्वीकारले. शिवसेना तालुकाप्रमुख राजू वरकड, भाऊसाहेब जाधव, सांडू जाधव, बंडू जाधव, केशव लहोळकर, दत्ता मालोदे, साईनाथ मातकर, मनोज मालोदे, अरूण गोल्हार, रंगनाथ मालोदे, पंडित मोरे, उत्तम चव्हाण, किसन जाधव, सुभाष जाधव, संजय काळे, महादू मालोदे, नवनाथ गोरे, रोहिदास वाकळे, भाऊसाहेब वाघचौरे, सखाहरी जाधव, रामचंद्र जाधव, साहेबराव जाधव आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते.

मुदतवाढ फक्त बिगर कर्जदार शेतकऱ्यांना

वैजापूरः पीकविमा भरण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली असून तो ऑनलाइन भरायचा आहे. शेतकऱ्यांनी जनसुविधा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रातून विमा भरावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी केले आहे. ही मुदतवाढ केवळ बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी असून प्रस्तावास ३१ जुलै किंवा त्यापूर्वीचे पीक पेरा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे मंडळ कृषी अधिकारी सी. एम. जवणे यांनी सांगितले. दरम्यान, बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलैपर्यंत तालुक्यातील १५ हजार १४८ शेतकऱ्यांनी एक कोटी सहा लाख ९ हजार ९०७ रुपयांचा पीकविमा भरला आहे. वाढीव मुदतीत पीक विमा भरण्यास शेतकरी उत्सुक असून ते जनसुविधा व सेतू सुविधा केंद्रावर गर्दी करत आहेत. तालुक्यातील लोणी खुर्द येथील जनसुविधा केंद्रावर बुधवारी ९३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन विमा भरला.

जिल्हा बँकेला फुलंब्रीत टाळे

फुलंब्रीः येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीकविमा घेण्यास नकार दिल्याने गुरुवारी काँग्रेसतर्फे बँकेला टाळे ठोकण्यात आले. तालुक्यातील शेतकरी पीकविमा भरण्यास तयार असताना बँकानी नकार दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकरी हवालदिल झाल्याने शुक्रवारी तहसील कार्यालयाला कुलूप लावण्यात येणार आहे, असा इशारा देणारे पत्र काँग्रेसने पोलिस ठाण्याला दिले आहे. तालुक्यात खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या असून पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच पीकविमा भरण्यासाठी बँकांनी दारे बंद केली आहेत. काँग्रेसतर्फे गुरुवारी पीरबावडा येथे पीकविमा भरण्यासाठी सहायता केंद्र सुरू करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँक पीकविमा स्वीकारत नसल्याने बँकेला टाळे लावून ऑनलाइन प्रक्रियेत अडथळे असतील, तर ऑफलाइन अर्ज घ्यावेत, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर काँग्रेस तालुकाध्यक्ष सुदाम मते, बाजार समिती सभापती संदीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, माजी उपसभापती अजगर पटेल, रंगनाथ शिरसाठ, जनार्धन तुपे, अंबादास गायके, रामेश्वर गाडेकर, बाबुराव डकले, नदीम मुलतानी, शिवाजी खरात यांच्या सह्या आहेत.

सोयगावात शेतकऱ्यांचे उपोषण

औरंगाबादः सोयगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पीकविमा भरण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांनी सोयगाव तहसील कार्यलायसमोर उपोषण सुरू केले होते. तहसील प्रशासनातर्फे अव्वल कारकून बी. एन. समिंद्रे यांनी उपोषणार्थी शेतकऱ्यांची भेट घेऊन उपोषण सोडवले. तालुक्यातील शेतकरी दोन्ही बँकांच्या शाखेत विमा भरण्यासाठी खेट्या घालत आहेत. पम व्यवस्थापक त्यांना दाद देत नव्हते. बँकांतून ऑनलाइन अर्ज भरण्यात चुकारपणा करण्यात येत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. विकास काळे, विठ्ठल आगे, धनंजय चौधरी, रामदास पवार, साईंदास राठोड, देवीदास पवार, सांडू मंडवे, रानिदा चव्हाण, कडुबा गाडेकर, सुभाष पवार, गीताबाई राठोड आदी शेतकऱ्यांनी उपोषण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्या प्राधिकरण देणार शिक्षकांना धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विज्ञान विषय शिकताना उपलब्ध साधणांचा प्रयोगासाठी कसा वापर करायचा, छोट्या-छोट्या प्रयोगांतून विषय कृतीशील करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान शिक्षकांना धडे देण्यात येणार आहेत. विभागीय विद्या प्राधिकरण त्यासाठीची तयारी करते आहे.

शालेय स्तरावर कृतीयुक्त शिक्षण पद्धतीवर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून विज्ञान विषय शिकविताना शिक्षकांनी प्रयोग विद्यार्थ्यांसमोर मांडावेत, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. त्यासाठी विज्ञान शिक्षकांना प्रयोग सादरीकरण, उपलब्ध साधनसामग्रीतून वैज्ञानिक प्रयोग करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दैनंदिन उपयोगातील साधनांचा वापर या प्रयोगांसाठी कसा करावा, हे सांगण्यात येणार आहे. छोटे-छोटे प्रयोग शिकविले जाणार आहेत. विभागीय विद्या प्राधिकरणात हे प्रशिक्षण शुक्रवारपासून सुरू होणार आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांपर्यंत प्रयोगशाळा कशी नेता येईल, यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशिक्षणात पाचवी ते दहावी या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांचा त्यात समावेश आहे.

४६५ शिक्षकांना प्रशिक्षण
प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात चार व पाच ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ४६१ विज्ञान विषयाचे शिक्षक प्रशिक्षण घेणार आहेत. विद्या प्राधिकरणात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ३० शिक्षकांची टीम असणार आहे. त्यांनी राज्यपातळीवर प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. हे शिक्षक जिल्ह्यातीलच असून, सध्या विविध शाळांमध्ये कार्यरत आहेत.

शिक्षण पद्धतीत होत असलेल्या महत्त्वाच्या बदलांमध्ये कृतीतून शिक्षणावर सध्या भर दिला जात आहे. शिक्षकांनी विज्ञान विषय कसा शिकवावा, महागडे साहित्य न वापरता सहज उपलब्ध साहित्यामधून विद्यार्थ्यांसमोर छोटे-छोटे प्रयोग कसे सादर करावे, यांचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे.
- सुभाष कांबळे, संचालक, विभागीय विद्या प्राधिकरण, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बावीस औद्योगिक क्षेत्रांच्या कायापालटासाठी कटिबद्ध

$
0
0

बावीस औद्योगिक क्षेत्रांच्या कायापालटासाठी कटिबद्ध
Dhananjay.kulkarni@timesgroup.com
@dhananjaykMT
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचा (एमआयडीसी) वर्धापन दिन यंदा मोठ्या उत्साहात झाला. १ ऑगस्ट १९६२ नंतर विभाग निहाय प्रादेशिक कार्यालयांची राज्यात निर्मिती झाली. औरंगाबाद एमआयडीसी क्षेत्रात सध्या विस्तारीकरण आहे हे डीएमआयसी आणि ऑरिक सिटीच्या माध्यमातून स्पष्टच आहे. नवे एमआयडीसी क्षेत्रही निर्माण होत आहेत या. पार्श्वभूमीवर औरंगाबाद, ‌बीड, जालना या प्रादेशिक विभागातील २२ एमआयडीसी क्षेत्र आहे. याच्या विकासासाठी सध्या शासन विविध पावले उचलत आहे. यासंदर्भात प्रादेशिक अधिकारी तथा उप-जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्याशी झालेला संवाद...
प्रश्न - प्रादेशिक विभागात किती औद्योगिक क्षेत्र येतात, त्यासाठी काय करणार?
- औरंगाबाद प्रादेशिक विभागात औरंगाबाद, बीड, जालना हे तीन जिल्हे येतात आणि यात २२ औद्योगिक क्षेत्र असून प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि नव्याने डीएमआयसी प्रोजेक्ट व ऑरिक सिटी येणार आहे. अतिरिक्त शेंद्रा, लाडगावर-करमाड, औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा १, बिडकीन क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ तसेच जालना जिल्ह्यामध्ये जालना टप्पा-१, टप्पा-२, टप्पा ३ असे औद्योगिक क्षेत्र आहेत. बीड जिल्ह्यात बीड आणि माजलगाव हे औद्योगिक क्षेत्र आहेत.
प्रश्न- आज डीएमआयसीच्या विविध टप्प्यातील काय स्थिती आहे?
- डीएमआयसीच्या टप्पा १ व २ चे काम आता वेगाने सुरू आहे. तिसरा टप्पाही सुरू झाला आहे. ऑरिकचे काम एआयटीएल कंपनीने सुरू केले आहे. बिडकीन येथे एल अँड टीने कंत्राट घेऊन काम करण्यास प्रारंभ केला आहे. दोन-तीन महिन्यात दृष्य स्वरुपात कामे‌ दिसायला लागतील. महामंडळाने वेळोवेळी बदलत्या काळानुरूप लोकांच्या गरजा ओळखून तेथे पायाभूत सुविधा दिल्या ओहत. डीएमआयसीत पहिल्या टप्प्यात ८४७ हेक्टर क्षेत्र संपादित करून औरंगाबाद इंडस्ट्रीअल टाऊनशिपला जागा दिला आहे. शापूर्जी पालमजी कया कंपनीस ७८६ कोटीं रुपयांचे विकासाच्या कामांचे टेंडर दिले आहे. टप्पा २ साठी १०१४ हेक्टर क्षेत्र हस्तांतर करण्यात आले आहे. अंदाजे १३०० कोटींच्या विकास कामांचे कंत्राट एल अँड टीला दिले गेले आहे. जालना हायवे वरून डीएमआयसीला जाण्यासाठी रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम प्रगतीपथावर करण्यात येत आहे. बिडकीन टप्पा २ मध्ये ३१७६ हेक्टर क्षेत्राची भूसंपदानाची कार्यवाही झाली आहे.
प्रश्न- औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांविषयी काय सांगाल?
-ई-गर्व्हनन्स, सिंगल विंडो (एकल खिडकी) याबाबत प्रतिसाद मिळत आहे. पारदर्शकता आली आहे. ऑनलाइन सिस्टीमद्वारे ईआरपी, एलएमएस सिंगल विंडो, आयएफएमएस या प्रणाली लागू करण्यात आल्या आहेत. एका क्लिकवर या सुविधा मिळत आहेत. शहरातील नामांकित कॉलेजेस आणि उद्योग, औद्योगिक संघटना यांचाही या उद्योगक्षेत्रात फायदा मिळत आहे. रोजगार वाढीसाठी पायाभूत सुविधा देत सर्व परिवर्तन हळुहळु होऊ लागले आहे.
प्रश्न- यंदा एमआयडीसीने वृक्षलागवडीसाठी काय योजना आखल्या. वृक्षारोपण किती झाले?
-शासन नियमाप्रमाणे सोडाव्या लागणाऱ्या १० टक्के जागांवर विविध प्रकारची वृक्षलागवड केली जात आहे. याला उद्योजकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.
प्रश्न- भूखंडधारकांकडून, गाळेधारकांकडून, भाडेकरूंकडून वसुली किती? संजीवनी योजनेंतर्गत किती फायदा झाला.
-ज्या भूखंडधारकांनी दिलेल्या मुदतीत उद्योग थाटला नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ८७ भूखंडधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. संजीवनी योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये ८१ भूखंडधारकांकडून २,६६,६३,४५२ रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे. २०१६-१७ मध्ये एकूण १५,१५५६१७ तसेच विनापरवाना पोटभाड्याच्या संजीवनी योजनेंतर्गत ५० टक्के सूट देऊन २५.००.००० इतका महसूल गोळा करण्यात आला आहे.
प्रश्न- नव्याने औद्योगिक क्षेत्र निर्मिती होणार आहे का? त्याचे स्वरुप कसे असेल?
- विभागांतर्गत नव्याने औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये कन्नडमध्ये २९६.९१ हेक्टर क्षेत्राच्या व गेवराई भूसंपादनाची कार्यवाही सुरू असून शासनाने नुकत्याच झालेल्या अधिवेशनात कन्नड आणि माजलगाव येथे टेक्सटाइल पार्क करण्याची घोषणा केली आहे. जालना येथे ड्रायपोर्टसाठी जागा देण्यात आली असून औद्योगिकरणामुळे याचा मराठवाड्याच्या विकासाला फायदा होणार आहे. उद्योजकांना भविष्यात सेवा-सुविधा पुरविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लॉ’चे प्रवेश रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विधी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या निकालानंतर अद्यापही प्रवेशाला मुहूर्त लागलेला नाही. बारावीनंतरच्या बीएसएल अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या तारखांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली, तर पदवीस्तरावरील प्रक्रियेत गुणवत्ता यादी जाहीर न करता कॉलेजांचे पर्याय देण्याची वेळ राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षावर आली आहे.

विधी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी २० आणि २१ मे रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीनंतरा पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी २७ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार होती. त्यात बदल करून नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आठ ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर होईल, असे वेळापत्रक नमूद केले होते. वेळापत्रक बदलण्यात आल्यामुळे विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत. नेमकी प्रक्रिया केव्हा सुरू होणार, असा प्रश्न पडला आहे.

सत्र केव्हा सुरू करायचे, असा प्रश्न कॉलेज व्यवस्थापनासमोर आहे. प्रांरभी १५ जूनला वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार २० जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा वेळापत्रक बदलण्यात आले. २० जून रोजी नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २७ जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर होईल व त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल, असे या वेळापत्रकात म्हटले होते. ऑगस्ट महिना संपला, तरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया कक्षाने नवीन वेळापत्रक कक्षाने जाहीर केले आहे. त्यानुसार आठ ऑगस्ट रोजी यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजांचे पर्याय द्यायचे आहेत. वारंवार वेळापत्रक बदलत असल्याने प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया केव्हा होणार, हा प्रश्न कायम आहे.

सत्र लांबणार
गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. दोन वेळा वेळापत्रक बदलण्यात आल्याने प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का? असा प्रश्न आहे. या प्रक्रियेसाठी ऑगस्ट महिना जाईल व त्यानंतर सप्टेंबरमध्ये कॉलेज सुरू होतील. त्यामुळे शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

ऑप्शन फॉर्मची प्रक्रिया
पदवीनंतर तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेसाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. यादी जाहीर न करता विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना सात ऑगस्टपर्यंत कॉलेजांचे पर्याय द्यायचे आहेत. मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्यामुळे पदवी स्तरावरील प्रक्रियेला विलंब होत असल्याचे मानले जात आहे.

प्रक्रियेला विलंब होत असल्याने शैक्षणिक सत्र कोलमडले आहे. परत वेळापत्रक बदलण्यात आले. आता गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यात ऑगस्ट महिना जाईल. सप्टेंबरनंतर कॉलेज सुरू होतील.
- डॉ. सी. एम. राव, प्राचार्य, एम. पी. लॉ. कॉलेज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑपरेशन मुस्कानमध्ये आढळली २८ बालके

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर पोलिस दलाने एक जुलै ते ३१ जुलै या कालावधीत हरवलेल्या, पळून गेलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविली. त्यात १५ मुले व १३ मुली असे २८ जण पोलिसांना सापडले. या पालकांचा शोध लागला नसल्याने नऊ मुला-मुलींची रवानगी बालगृहात करण्यात आली.

हरवलेल्या, पळवून नेलेल्या मुलामुलीच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवण्याचे गृह विभागाचे पोलिसांना दिले आहेत. औरंगाबाद पोलिसांनी जुलै महिन्यात ही मोहीम राबवली. मुलांची आश्रयगृहे, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, बसस्टँड, रस्त्यावर भीक मागणारी, वस्तू विकणारी, कचरा गोळा करणारी मुले अशा बालकांच्या पालकांचा शोध घेण्याचे काम या मोहिमेत करण्यात आले. या मोहिमेसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक अधिकारी व पाच कर्मचारी यांची बाल सहाय्य पोलिस पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाला मुलांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते.

पोलिसांच्या लेखी नोंदनुसार तीन मुले व चार मुली बेपत्ता होत्या. या सात जणांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांकडे लेखी नोंद नसलेले १२ मुले व नऊ मुली देखील पोलिसांना या मोहिमेत आढळल्या. यामध्ये या बालकांच्या पालकांचा शोध लागला नसल्याने त्यांना सध्या बालगृहात ठेवण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

नऊ मुले बालगृहात
या मोहिमेत पोलिसांना हरवल्याची नोंद नसलेली २१ बालके आढळली. त्यात १२ मुले व नऊ मुली होत्या. त्यापैकी आठ मुले आणि चार मुली यांच्या पालकांचा शोध लागला. या मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. चार मुले व पाच मुली यांना बालगृहात ठेवण्यात आले आहे.

हरवलेल्या मुला, मुलींची शोधमोहीम ऑगस्ट महिन्यातही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
- डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्त.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनरेगाची थकबाकी १५ ऑगस्टपूर्वी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मनरेगा योजनेच्या लाभार्थ्यांचे पगार वेळेवर दिले पाहिजेत. अन्यथा खरा मजूर कामावर येण्यास उत्सुक राहणार नाही व योजनेला खीळ बसते. योजनेतून प्रत्येक गरजुला व्हावा यासाठी येत्या १५ ऑगस्टपूर्वी मजुरी अदा करा,’ असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विलंबाने मजुरी अदायगी संदर्भात भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत नागपूर मनरेगा आयुक्त शरद भगत, अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपायुक्त पारस बोथरा, अनंत कुंभार, विभागातील सर्व उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. भापकर म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही शेतीपूरक योजना आहे. या योजनेकडे अधिक संवेदनशीलपणे पाहणे गरजचे आहे. मनरेगा योजनेत तसेच राज्यात केंद्रपुरस्कृत नरेगा २०१६ पासून टप्या टप्प्याने सुरू आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याचा खर्च कमी आहे, म्हणूनच यंत्रणा अधिकाऱ्यांना प्रेरणा देणे, त्यांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले.
गावागावात स्वच्छतागृहांचे बांधकाम, प्रत्येक गावात फिरून किमान ५० शेततळी पूर्ण कराणे (विभागात पाच हजार शेततळी), मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड, प्रत्येक शेतकऱ्यांकडे गांडूळ खत युनिट, तुतीची लागवड आदी कामे येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मे विद्यार्थी गणवेशाविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास बँकांनी सहकार्य नसल्याने महापालिका शाळेतील निम्मे टक्के विद्यार्थी अद्याप गणवेशाविना आहेत. येत्या दहा ते बारा दिवसांत त्यांना गणवेश मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे पालिकेच्या बहुतेक शाळांमध्ये १५ ऑगस्ट रंगीबेरंगी कपड्यात साजरा केला जाण्याची शक्यता आहे.

महापालिका शाळेतील सर्व मुलींना आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी यांना शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश उपलब्ध करून दिले जातात. गेल्यावर्षीपर्यंत शाळेतूनच या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जात होते. यंदा शासनाने गणवेशासंदर्भात नवीन अध्यादेश काढला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला बँकेत खाते उघडणे सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या बँकेतील खात्यावर ४०० रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खात्यावर ४०० रुपये जमा करून घेण्यासाठी विद्यार्थ्याला प्रथम बँकेत खाते उघडावे लागणार आहे. त्यानंतर दोन गणवेश खरेदी करून त्याची पावती मुख्याध्यापकांकडे सादर करावी लागणार आहे. पावती सादर केल्यावर त्या विद्यार्थ्याला ४०० रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे.

धनादेशाच्या कचाट्यात अडकलेल्या गणवेशांबद्दल बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर शिक्षणाधिकारी म्हणाले, ‘शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या नावे बँकेत खाते उघडावे लागणार आहेत. झिरो बॅलेन्सच्या आधारे खाते उघडून घेण्यास बँका तयार नाहीत. काही बँकांनी सहकार्य केल्यामुळे ४० ते ५० टक्के विद्यार्थ्यांची खाती उघडण्यात आली आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांची खाती अद्याप उघडण्यात आलेली नाहीत.’

सभापती गजानन बारवाल यांनी, १५ ऑगस्टपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून द्या, असे आदेश दिले, परंतु विद्यार्थ्यांचे खाते बँकेत उघडले नसल्याने गणवेश कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या शाळांमधून सुमारे १७ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी शाळेमध्ये रंगीबेरंगी कपड्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या शाळा ः ७७
विद्यार्थ्यांची संख्या ः सुमारे १७ हजार
शासनाच्या योजनेतून गणवेश मिळण्यास पात्र असलेले विद्यार्थी ः १०,४६८
महापालिका फंडातून गणवेश मिळण्यास पात्र असलेले विद्यार्थी ः ६५३२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images