Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

चीनसारखे पाणी व्यवस्थापन राबवू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चीनमधील पाणी व्यवस्थापनासारखा प्रकल्प औरंगाबादमध्ये राबवण्याची तयारी चीनच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (४ ऑगस्ट) दाखवली. पाणी व्यवस्थापनासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे सादरीकरणही त्यांनी केले.

चीनमधील चार सदस्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी महापालिकेत आले होते. शिष्टमंडळात ओरिसी डिपार्टमेंटचे संचालक ली सियुआन, बास्को कंपनीचे भारतातील प्रतिनिधी अभिजित चौधरी, केमिकल विभागाचे व्यवस्थापक हुआंग बिंगुई, व्यवसाय व्यवस्थापक लिऊ क्रियाहोन्ग यांचा समावेश होता.

शिष्टमंडळातील सदस्यांनी सकाळी महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची भेट घेतली. चीनमध्ये पाणी व्यवस्थापनासाठी कार्यरत असलेल्या प्रकल्पांची माहिती या सदस्यांनी मुगळीकर यांना दिली. प्रकल्पांच्या कामकाजाचे सादरीकरण देखील त्यांनी केले. तशाच प्रकारचे प्रकल्प समन्वयाने औरंगाबादमध्ये देखील राबवता येतील, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले.

महापालिका प्रशासनाने या संबंधीच्या करारासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. शिष्टमंडळातील सदस्यांनी दिल्लीगेट परिसरातील डॉ. सलीम अली सरोवराची पाहणी केली. पर्यटकांना आकर्षित करणारे काही प्रकल्प या ठिकाणी राबवता येतील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नारेगाव येथील कचरा डेपोला देखील या सदस्यांनी भेट दिली.

‘ते’ कार्यकर्ते ताटकळले
शिष्टमंडळआतील सदस्य आयुक्तांशी चर्चा करीत होते तेव्हा आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर संविधान बचाव युवा परिषदेचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांना आयुक्तांनी भेटण्याची वेळ दिली होती, पण चीनचे शिष्टमंडळ आल्यामुळे युवा परिषदेच्या कार्यकर्त्यांना दोन तास ताटकळत बसावे लागले. त्यामुळे त्यांनी दालनाच्या बाहेर ठिय्या दिला व घोषणाबाजी सुरू केली. आयुक्तांशी चर्चा करून शिष्टमंडळातील सदस्य बाहेर पडले तेव्हा त्यांना ठिय्या आंदोलनातून वाट काढत पुढे जावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ कन्हैय्या कुमारांचा कार्यक्रम संत तुकाराम नाट्यगृहातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कन्हैय्या कुमार यांचा सोमवारी होणारा कार्यक्रम सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहातच होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. महापालिकेच्या मालमत्ता अधिकाऱ्यांनी परवानगीचे तसे पत्रच दिले.

संविधान बचाव युवा परिषदेतर्फे कन्हैय्याच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी परिषदेने संत तुकाराम नाट्यगृह मिळावे म्हणून पालिकेकडे अर्ज केला होता. पालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी संत तुकाराम नाट्यगृहात कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली, पण सकाळी दिलेले परवानगीचे पत्र सायंकाळी रद्द केले. त्यामुळे परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पालिकेसमोर उपोषण केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी परिषदेच्या शिष्टमंडळाने आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची भेट घेतली. यावेळी प्रा. राम बाहेती, अॅड. मनोहर टाकसाळ, अॅड. अभय टाकसाळ, भास्कर लहाने, शेखर जगताप, अय्यास शेख, विकास गायकवाड, अमरदीप वानखेडे उपस्थित होते. परिषदेच्या कार्यक्रमासाठी संत तुकाराम नाट्यगृह मिळावे अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी आयुक्तांनी मान्य करून तसे आदेश मालमत्ता अधिकाऱ्याला दिले. मालमत्ता अधिकाऱ्याने पवन इव्हेंटस् या संस्थेचे पवन गायकवाड यांच्या नावे पत्र दिले.

'बिहार ते तिहार'चे सोमवारी प्रकाशन
जेएनयू छात्रसंघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्या 'बिहार ते तिहार' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन कन्हैया कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (७ ऑगस्ट) होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भालचंद्र कानगो असतील. तापडिया नाट्यगृहात सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम होणार आहे. या पुस्तकाचा अनुवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्राध्यापक आणि प्रगतिशील लेखक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रो. सुधाकर शेंडगे यांनी केला आहे. याप्रसंगी कवी आणि अनुवादक गणेश विसपुते हे पुस्तकावर भाष्य करतील. कन्हैया कुमार आपल्या शैक्षणिक व चळवळीतील वाटचालीविषयी मुक्तसंवाद साधणार आहे. प्रगतिशील लेखक संघ आणि लोकवाङ्मय गृह, मुंबई यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम फक्त प्रवेशिका असणाऱ्या निमंत्रितांसाठी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बजेटमधील कामे पूर्ण; ३० कोटींचे देणे थकित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अर्थसंकल्पातून (बजेट) मंजूर झालेली कामे पूर्ण होऊन दीर्घ कालावधी उलटून गेला. यातून तब्बल ३० कोटींची कामे शहर व परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने केली, पण त्याची देयके देण्यात मात्र वरिष्ठ कार्यालयात हाथ अखडता घेतला आहे. त्यामुळे उर्वरित कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दरवर्षी रस्ते, पूल, सरकारी इमारती, सरकारी निवासस्थाने बांधकाम, देखभाल, दुरुस्ती, डागडुजीसाठी ठराविक निधीची तरतूद केली जाते. त्यासाठी कामेनिहाय स्वतंत्र हेड असतात आणि प्लॅनमधून (बजेट) कामांची मंजुरी दिली जाते. गेल्यावर्षी बजेटमधून रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केली गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मार्ग, जिल्हा मार्ग व इतर मार्ग दुरुस्तीसाठी ५० हून अधिक कामांचा समावेश केला गेला होता. यापैकी अनेक कामे पूर्ण झाली, पण त्याची देयके मात्र देण्यात आलेली नाहीत. पैठण रस्त्याच्या मजबुतीकरणाचा दुसरा टप्पा महानुभाव चौक ते वाळूज लिंक रोड या रस्त्याच्या कामाचाही त्यात समावेश आहे. या कामासाठी मंजूर केलेल्या रकमेपैकी कामाच्या पूर्णत्वानुसार टप्प्याटप्प्याने निधी दिला जातो. या कामासाठीही पैसा न आल्याने हे काम सुद्धा रखडण्याची भीती आहे. दुसरीकडे अनेक कामे पूर्ण होऊनही त्याची बिले न निघाल्याने स्थानिक कार्यालय अडचणीत सापडले आहे. जुन्याच कामांना अद्याप न्याय मिळालेला नाही त्यामुळे नवीन कामांचे प्रस्ताव पाठवून उपयोग होणार की नाही ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

सव्वाकोटींचे काम पूर्ण, अद्याप एक रुपयाही दिला नाही: औरंगाबाद तालुक्यात एक रस्त्याचे काम या बजेटमधून मंजूर झाले होते. १ कोटी ३५ लाखांचे काम पूर्ण झाले आहे. या कामापोटी अद्याप एक रुपयाही दिला गेला नाही. काम पूर्ण होऊनही पैसे दिले जात नसल्याने कंत्राटदारांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अवीट स्वरांची मैफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्रीनिवास जोशी यांचे भारदस्त शास्त्रीय गायन, पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे सुश्राव्य व्हायोलिनवादन व नवोदित गायिकांच्या गायनाने स्वरमल्हार मैफल श्रवणीय ठरली. शास्त्रीय गायन, बंदिश, भजन यांचा आनंद रसिकांनी घेतला.

व्हायोलिन अकादमी आणि अमेरिकेतील फिनिक्स घराना म्युझिक स्कूल यांच्या वतीने ‘स्वरमल्हार’ मैफल घेण्यात आली. संत एकनाथ रंगमंदिरात शुक्रवारी रात्री ही मैफल रंगली. शास्त्रीय संगीतावर आधारीत संगीतमय मैफलीत राग, बंदिश, सरगम, आरोह, अवरोह, गायन असा अप्रतिम मिलाफ होता. मैफलीची सुरुवात फिनिक्स घराण्याची शिष्या निशा कुलकर्णी हिच्या ‘राग मिया मल्हार’ने झाली. हा राग पावसाला साद घालण्यासाठी गायला जातो. त्यानंतर श्रीनिवास जोशी यांनी विलंबित एकताल व द्रुत एकताल प्रकारात ‘राग मिया मल्हार’ सादर केला. पारंपरिक हिंदी भजन ‘बाजे मुरलीया बाजे’ त्यांनी तन्मयतेने गायले. युवा गायिका नंदना लाहोटी हिने ‘राग हंसध्वनी’ आणि ‘राग गौड मल्हार’ सादर करून रसिकांना खिळवून ठेवले.

या मैफलीची सांगता व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या वादनाने झाली. त्यांनी व्हायोलिनवर 'राग मेघ' सादर केला. त्यानंतर 'राग भैरवी'ने समारोप झाला. तबल्यावर पं. मुकेश जाधव यांनी साथसंगत केली. तर मैफलीत तबल्यावर प्रशांत पांडव, हार्मोनियमवर उदय कुलकर्णी यांनी कलावंतांना साथसंगत केली. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४३४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम घेण्यात आली. शनिवारी सकाळी विनातिकिट तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत ४३४ विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करून एक लाख ४६ हजार रुपयांचा निधी वसूल करण्यात आला.
शनिवारी सकाळी पाच वाजता विशेष तिकिट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. यात परभणी ते परळी या भागात धावणाऱ्या रेल्वेची तपासणी करण्यात आली. विशेष तिकिट तपासणी मोहीम राबविण्यासाठी बस, जीपचा वापर करण्यात आला. या मार्गावर चालत असलेल्या रेल्वे थांबवून तिकिट तपासणी अधिकारी यांनी विनातिकिट प्रवासी, तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगी शिवाय जास्त समान घेऊन जाण्यामुळे काही प्रवाशांवर कारवाई केली. प्रवाशांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या कारवाईत ४३४ विनातिकीट प्रवाशांकडून एका दिवसातच एक लाख ४६ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईत सहायक कार्मिक अधिकारी, नांदेड त्यासोबतच २३ तिकीट तपासनीस, ६ कार्यालयीन कर्मचारी, १३ रेल्वे पोलिस फोर्सचे जवान सहभागी झाले होते.

अनाधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई
या तिकीट तपासणी मोहिमेत दिवसभरात धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. तपासणी अनधिकृत फेरीवाले बऱ्याच रेल्वेने प्रवास करीत असल्याचेही स्पष्ट झाले. अशा १६ अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करण्यात आली. त्यांना रेल्वे न्यायाधीशांकडे समोर उभे करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. यात ११ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.


प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि अशा कारवाईला टाळावे. गेल्या आठवड्यात कार्यवाही करूनही विनातिकिट प्रवाशांची संख्या कमी होत नाही. यामुळे अशा कारवाई वारंवार कारवाई लागणार आहे.
डॉ. अखिलेश कुमार सिन्हा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येडशी अभयारण्य ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येडशी रामलिंगघाट अभयारण्याभोवती पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अधिसूचना पर्यावरण व वन मंत्रालयाने जारी केली आहे. अभयारण्याच्या सर्व बाजूने ०.१ ते ३.२४० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्राचा यात समावेश राहणार असून नवीन हॉटेल, रिसोर्ट उभारणी, प्रदूषण होणाऱ्या उद्योगास बंदीसह अन्य काही निर्बंध या क्षेत्रात राहतील. दरम्यान, काही निर्बंध असले तरी स्थानिक ग्रामस्थांच्या दैनदिन जीवनावर परिणाम होणार नाही, असा दावा केला जात आहे.
येडशी रामलिंगघाट अभयारण्य हे उस्मानाबाद जिल्ह्यात असून पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे स्थळ आहे. ते २२.३७. वर्ग किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले आहे. हा परिसर हिरवागार आणि जैवविविधतेने संपन्न आहे. त्याचे रक्षण व्हावे म्हणून शासनाने १९९७ मध्ये हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केले. येथे पक्ष्यांच्या १०० पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, खोकड, रानमांजर, काळवीट, ससे, रानडुक्कर, माकडे, मोर असे वन्यजीव येथे आहेत. पर्यावरण, वन व जलवायू परिर्वतन मंत्रालयाने अभयारण्य आता ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित केले आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यासंदर्भात पुढील कार्यकाही सुरू असल्याचे मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन यांनी सांगितले.

उद्योगांवर निर्बंध
अधिसूचना जारी झाल्याने आता या झोन क्षेत्रात सॉ मिलला तसेच हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर बंदी राहिल, परंतु कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल. नवीन मुख्य जलविद्युत प्रकल्प आणि सिंचन प्रकल्पांची स्थापना लागू कायद्यांनुसार प्रतिबंधित असणार आहे. ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये कोणत्याही घातक पदार्थांचा वापर किंवा उत्पादन किंवा प्रक्रिया या प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. स्थानिकांना पशुधन पालन तसेच कुक्कट पालनास बंदी नाही पण, व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकदृष्टीने पशुधन आणि पोल्ट्री शेतीची स्थापना करता येणार नाही. इको-टुरिझमच्या काही तात्पुरत्या बांधकामाशिवाय नवीन व्यावसायिक हॉटेल आणि रिसॉर्ट्सला परवानगी देण्यात येणार नाही. व्यावसायिक बांधकामास परवानगी नाही. पण, स्थानिक लोकांना त्यांच्या वापरासाठी बांधकाम परवानगीने करता येईल, आदी निर्बंध असून यासाठी केंद्राने राज्याला दोन वर्षांत इको सेन्सिटिव्ह झोनसंबंधीचा झोनल मास्टर प्लॅन तयार करण्याची सूचना केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची सनियंत्रण समिती
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष तर जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पर्यावरण तज्ज्ञ, राज्य जैवविविधता बोर्डाचे सदस्य सचिव किंवा सदस्य, वन अधिकारी, असे एकूण ९ सदस्य यात असतील. वन विभागाचे अधिकारी सदस्य सचिव असतील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सिमेंटच्या जंगलात माणुसकी हरवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
‘मामाच्या गावाला जावूया म्हणत आम्ही महिनाभर मामाकडे राहायचो. गरीब आजोळी मामीने कधीच विचारले नाही, भाचे किती दिवस राहणार. आता सख्ख्या पोरालाही विचारावे लागते येऊ का चार दिवस. वेळ आहे न तुला. हे कोणते शिक्षण, ही कोणती प्रगती,’ असा रोकडा सवाल करून शनिवारी समाजसेविका अॅड. अपर्णा रामतीर्थकर (सोलापूर) यांनी सर्वांना अंर्तमुख केले.

सकल मारवाडी युवा मंचच्या मिडटाऊन शाखेने तापडिया नाटय मंदिरात आयोजित ‘गुंफन नात्यांचे’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रामतीर्थकर म्हणाल्या, ‘भारतीय कुटुंबव्यवस्था आज शेवटच्या घटिका मोजत आहे. सिमेंटच्या जंगलात मामा तेराव्या मजल्यावर राहतो आणि कामावरुन थकून आलेल्या मामीकडे पाहून वडापाववर काम भागवतो. आम्हाला कोणत्याच नात्यावर विश्वास नाही, कारण आम्ही बदललो. आजची आई व शिक्षक बदलले आणि समाज बिघडला. आई फॅशनमध्ये रमली आणि वेतन आयोग लागू होताच शिक्षक परमिट रूममध्ये गेले. आजच्या आईला मी दिसते कशी याची फार चिंता. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याचे भान तिला नाही. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढा दिला, पण ‘शिकलेली आई घरादारास पुढे नेई’ म्हणण्याऐवजी ‘घरदार वाचवा’ अशी म्हणण्याची वेळ आली. महिलांना कायद्याची ढाल दिली. महिलांनी त्याचा तलवारीसारखा उपयोग केला. म्हणूनच कोर्टात आज तीन लाख ४० हजार खटले केवळ घटस्फोटाचे आहेत. याला केवळ स्त्री जबाबदार नसून पुरुषही आहेत. मुलींसोबत मुलांनाही शिकवा. त्यांनाही स्त्रीचा सन्मान करणे शिकवा. एकत्र कुटुंबपद्धती आपली शक्ती असून ती टिकवा,’ असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रेखा राठी, विमलारानी बाफना, सावित्री बाफना, मिडटाऊन शाखेच्या अध्यक्ष सुप्रिया सुराणा उपाध्यक्ष पूनम सारडा, सचिव ममता तिवारी, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष आशिष अग्रवाल आदी उपस्थित होते.

आईला कुणाकडे ठेवायचे?
रामतीर्थकर यांनी व्याख्यानात कोर्टातील खटल्याचे उदाहरण दिले. ‘आईला सांभाळायला दोन्ही मुले तयार नव्हती. अखेर कोर्टाने सांगितले एक महिना एका मुलाकडे दुसरा महिना दुसऱ्याकडे. तरीही एका मुलाचे समाधान झाले नाही. त्याने प्रश्न केला. महिन्यात कधी ३० येतात तर कधी ३१ दिवस. मग अतिरिक्त एक दिवस आल्यावर कुठे ठेवायचे. कोर्टाने सांगितले आईला अर्धा दिवस एकाच्या उंबऱ्या झोपवा अर्धा दिवस दुसऱ्याच्या. तिने तुम्हाला जन्म दिला आहे. त्यांचे पांग फेडायला नको का?’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादमध्ये जनजागृती रॅली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
राज्यात शांततामय मार्गाने मोर्चे काढुनही सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता संतप्त मराठा समाजाने मुंबईत ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी मराठा क्रांती महामोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शनिवारी उस्मानाबादसह तुळजापूर व कळंब येथे
काढण्यात आलेली भव्य दुचाकी वाहनफेरी काढण्यात आली.
उस्मानाबाद शहरात जिजाऊ चौकातून या फेरीची सुरुवात करण्यात आली. ही फेरी आर्यसमाज मंदिर, पोस्ट ऑफिस, काळा मारुती चौक, बाजार चौक, शिवाजी चौक मार्गे जाऊन जिजाऊ चौक येथे या दुचाकी वाहन फेरीचे विसर्जन करण्यात आले. या मराठा समाजातील युवकांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुट्टेंची मालमत्ता जप्त करा

$
0
0



म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

गंगाखेड शुगर अँड एनर्जी फॅक्टरीच्या पीककर्ज घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार रत्नाकर गुट्टे याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. सुनील के. कोतवाल यांनी विशेष तपास पथकाला दिले आहेत. ही मालमत्ता जप्त नाही तर, पथकातील अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद दिली आहे.
गंगाखेडमधील गिरीधर केशव साळुंके, नंदकुमार गणपतराव भालके, वामन मारुती नागरगोजे, अविनाश चौधरी, पांडुरंग राठोड व अन्य दोन शेतकऱ्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड व अकोला जिल्ह्यातील अंदाजे २९ हजार शेतकऱ्यांच्या नावे तब्बल ३२८ कोटींचे पीककर्ज उचलण्यात आल्याचे उघड झाले आहे. बोगस कागदपत्रे जोडून शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खाईत लोटण्यात आले. याप्रकरणी खंडपीठात सुनावणी झाली असता या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले होते. २५ जुलैपर्यंत यासंबंधी अहवाल सादर करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी अहवाल सादर केला. याचिकाकर्त्यांची बाजू प्रल्हाद बचाटे यांनी मांडली. सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी काम पाहिले. याचिकेची सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

तपासावर ताशेरे
विशेष पथकाच्या अहवालावर कोर्टाने असमाधान व्यक्त केले. आरोपीची मालमत्ता शोधण्यासाठी तपास अधिकारी पूर्णपणे महसूल अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. ही सार्वजनिक मालमत्ता चोरलेली आहे. त्यामुळे ती शोधण्याचे काम तपास यंत्रणेचे आहे. ती शोधून जप्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. पथक निःपक्षपणे तपास करीत नसल्याचा ठपका कोर्टाने ठेवला आहे. ते कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. यामध्ये चालढकल केली तर खपवून घेणार नाही अशी सक्त ताकीदही कोर्टाने पथकाला दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब वाशी व उस्मानाबाद या तीन तालुक्यात मुलींच्या जन्मदारात कमालीची घसरण झाली आहे. जन्मदर ९१३ वरून ८७५ इतका झाला आहे. महिलांच्या गर्भातील लिंग तपासणी व गर्भपात ही यामागची मुख्य करणे असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजेच्या अंमलबजावणीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचा प्रश्न गंभीर झाला असून जिल्ह्यातील जन्मदर झपाट्याने कमी होत आहे. प्रशासन मात्र स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सन २०१४ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा मुलींचा जन्मदर प्रति हजार मुलांमागे ८८३ इतका होता. मात्र, तो सध्या ९११ वर गेला असला तरी जिल्ह्यातील उस्मानाबाद व कळंब या २ तालुक्यात मात्र जन्मदर तब्बल ३८ ने कमी झाला आहे. वाशी तालुक्यात हीच स्थिती असून जन्मदर ९३१ वरून ९०९ वर आला आहे. इतर तालुक्यात समाधानकारक स्थिती नसली तरी जन्मदर कासवगतीने वाढत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारी कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्याची सीमा आहे. त्यासोबतच कळंब व वाशी तालुक्याला लागून बीड जिल्हा आहे. जिथे मोठ्या प्रमाणात गर्भलिंग तपासणी व गर्भपात केले जातात, हे वारंवार समोर आले आहे. या सर्व गोष्टींचा फटका या तालुक्यांना बसत असून परिणामी जन्मदर कमी होत आहे. प्रशासनाने अद्याप याबाबत ठोस पावले उचललेली दिसत नसून केवळ बैठका व शासकीय कागदोपत्री आकडेवारी यात समाधान मानले जात आहे. प्रशासनाकडे सर्व गोपनीय माहिती असतानाही जिल्ह्यात मागील ३ वर्षांत एकही धडक मोहीम व स्टिंग ऑपरेशन या संदर्भाने करण्यात आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचार्यांच्या प्रयत्नांची गरज

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नॅक, एनआयआरएफ यासह विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानांकनात महाविद्यालयाचा क्रमांक आणण्यासाठी प्राचार्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. प्राचार्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्रात प्राचार्यांची कार्यशाळा झाली. या कार्यक्रमाला संचालक डॉ. आर. जी. मार्टीन, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे, अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, डॉ. मजहर फारुकी, डॉ. दिलीप खैरनार, सहसंचालक डॉ. मोहम्मद अब्दुल राफे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. चोपडे म्हणाले, ‘विद्यापीठ अनुदान आयोगाने जागतिक स्पर्धेत आपल्या संस्था टिकवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. ‘नॅशनल इन्स्टिटयूशनल रँकींग फ्रेमवर्क ही राष्ट्रीय मानांकन संस्था सुरू आहे. गुणवत्ता, नवोन्मेष व दर्जेदार संशोधनाला प्राधान्य दिले आहे. आपल्या विद्यापीठानेही ‘इंटर्नल क्वालिटी अ‍ॅश्यूरन्स सेल‘च्या माध्यमातून मानांकनासाठी प्रयत्न केले आहेत. शिक्षणासाठी प्राचार्यांनी ‘माहिती-तंत्रज्ञान’ वापरावे’.

सकाळच्या सत्रात डॉ. विजयकुमार फड, प्रा. पुरुषोत्तम राव, डॉ. अर्चना ठोसर, डॉ. एल. एस. मातकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत १८० प्राचार्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेसाठी नितीन गायकवाड, अशोक ठोंबरे अर्चना येळीकर, राजू कणीसे, मदन गहिरे, गौरव जाधव यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौलाना, मोईन संघ विजेते

$
0
0

मौलाना, मोईन संघ विजेते
विभागीय सुब्रतो करंडक फुटबॉल स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना येथे झालेल्या विभागीय सुब्रतो करंडक फुटबॉल स्पर्धेत औरंगाबादच्या मौलाना आझाद कनिष्ठ कॉलेजने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात, तर मोईन उल उलूम हायस्कूलने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटाकाविले.
जालन्यातील जिल्हा क्रीडा संकुलावर शनिवारी या स्पर्धेचा समारोप झाला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मौलाना आझाद कॉलेज संघाने अंतिम सामन्यात खुलताबादच्या अल इरफान हायस्कूल संघाचा २-१ असा पराभव केला. मौलाना आझादच्या अब्दुल फहादने पेनल्टीवर गोल करून संघाचे खाते उघडले. अल इरफानतर्फे मोहंमद दानिसने पेनल्टीवर गोल करण्याची संधी दवडली. दुसऱ्या सत्रात अब्दुल फहादनेच फ्री कीकवर मौलाना संघाचा दुसरा गोल नोंदवला. अखेरच्या काही मिनिटांत अल इरफानच्या मोहंमद मुदस्सीरने मैदानी गोल केला. मौलाना संघाच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा फातेमा झकेरिया, प्राचार्य डॉ. मकदूम फारूकी, उपप्राचार्य फौजिया मंसूर, राशीद खान, अब्दुल रऊफ यांनी अभिनंदन केले. या संघास अकबर खान, डॉ. मोईनोद्दीन फारूखी यांचे मार्गदर्शन लाभले.
मुलांच्या १४ वर्षांखालील गटात औरंगाबादच्या मोईन उल उलूम हायस्कूल संघाने अंतिम सामन्यात औरंगाबादच्याच स्टेपिंग स्टोन हायस्कूल संघावर ३-० अशी मात केली. मोईन संघातर्फे रिजवान पठाणने गोल हॅटट्रिक नोंदवत अंतिम सामना गाजवला. शेख अदनान, फहाद, अतिक, शेख फैजान, मीर मरामत अली, नवीद, आमेर, अरबाज, मोहंमद मुस्तकीम, अबुजर या खेळाडूंनी स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी बजावली. त्यांना क्रीडा विभाग प्रमुख महंमद बदरोद्दीन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विजेत्या संघाचे संस्थेचे अध्यक्ष खान मुजतबा महेमूद, सचिव जिया अहेमद खान, मुख्याध्यापिका यास्मीन फरजाना, उपमुख्याध्यापक शहेजाद खान यांनी अभिनंदन केले.
राज्य सुब्रतो करंडक फुटबॉल स्पर्धा पुणे येथे होणार आहे. या स्पर्धेत मौलाना आझाद व मोईन उल उलूम हायस्कूल हे विजेते संघ औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडला दोन दिवसाआड पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
गेल्या पंधरा दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने चिंतातूर झालेल्या शेतकरी व नागरिकांना अडचणीतून सोडविण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, उपलब्ध असलेले पाणीसाठे राखीव करावेत तसेच नांदेड शहराला होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यात यावा, अशा सूचना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी शनिवारी येथे दिल्या.
नांदेड येथे एक दिवसाच्या दौयासाठी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. विष्णुपूरीसह अन्य प्रकल्पातील पाण्याचा साठा अत्यंत कमी झाला असून, याबाबतचा आढावाही त्यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी उपस्थित होते.
येत्या काळात निर्माण होणारी पाणीटंचाई तसेच शेतकयांना येत असलेल्या अडचणी याबाबत प्रशासनाने सतर्क रहावे, अशा सूचना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या. खोतकर म्हणाले, ‘हवामानाचा अंदाज तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानी दिलेली हुलकावणी यामुळे परिस्थिती बिकट बनण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत आहे, तसेच पाण्याच्या प्रश्नासंदर्भात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. येत असलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, ग्रामीण भागातील शेतकरी तसेच नागरिकांच्या अडचणी सोडवितांना मंडळ अधिकारी, तलाठी तसेच तहसीलदार यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने देखील सतर्कता बाळगावी.’
नांदेड जिल्ह्यात असलेले पाण्याचे साठे तसेच तलावातील पाणी, छोटे व मध्यम प्रकल्प यांचे पाण्याचे आरक्षण आजपासूनच करण्याची गरज आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या विष्णुपूरी प्रकल्पांत केवळ १५ टक्के साठा राहिल्याने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा, नागरिकांनी देखील त्याबद्दल सतर्क राहून पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहनही खोतकर यांनी यावेळी केले.
महापालिकेने पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सतर्कता बाळगावी, असेही खोतकर यांनी सांगितले. जिल्हाधिकायांनी जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती यावेळी पालकमंत्र्यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी चिनी कंपनीचा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी औरंगाबादमध्ये प्रकल्प उभारण्यास पुढाकार घेण्याची तयारी चिनी कंपनीने दाखवली आहे. या कंपनीतर्फे चीनमध्ये उभारलेल्या प्लांटची पाहणी करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या शिष्टमंडळाने शनिवारी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्याशी चर्चा करताना सांगितले.

चीन मधील गोआक्सी बास्को कंपनीचे शिष्टमंडळ दोन दिवसांपासून शहरात आहे. शुक्रवारी या शिष्टमंडळातील काही सदस्यांनी आयुक्त व महापौरांची भेट घेतली. त्यानंतर आज पुन्हा काही सदस्य आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल माहिती देताना आयुक्त म्हणाले, ‘शिष्टमंडळातील सदस्यांनी नारेगाव येथील कचरा डेपोची पाहणी केली. गोआक्सी बास्को या कंपनीने चीन मधील नानीयाँग शहरात कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे. तशाच प्रकारचा प्रकल्प औरंगाबादमध्ये महापालिकेच्या मदतीने उभारण्याची त्यांची इच्छा आहे. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने या कंपनीने प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प पाहण्यासाठी कंपनीतर्फे पालिकेच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीसाठीचा खर्च पालिका व कंपनी या दोन संस्थांनी विभागून घ्यावा, अशी त्या शिष्टमंडळातील सदस्यांची इच्छा आहे. त्या कंपनीचे निमंत्रण आल्यावर या संदर्भात विचार करता येईल. चीनच्या कंपनीबरोबर शहरात कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभा करायचा असेल, तर त्याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या परवानगी बरोबरच राज्य व केंद्र सरकारची देखील परवानगी घ्यावी लागेल,’ असे मुगळीकर यांनी स्पष्ट केले.

महापौरांची खासगी संस्थांबरोबर चर्चा
शहरात रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापौर भगवान घडमोडे यांनी काही खासगी संस्थांशी चर्चा केली आहे. झोन कार्यालयनिहाय या संस्थांनी प्रक्रिया प्रकल्प उभे करावेत. शहरात रोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी. कचऱ्यापासून खत किंवा गॅस निर्मिती त्या संस्थांनी करावी. त्याची विक्रीही त्याच संस्थांनी करावी. पालिकेला त्याच्या मोबदल्यात रॉयल्टी द्यावी, असा महापौरांचा त्या संस्थांसाठी प्रस्ताव आहे. येत्या काही दिवसांत यावर निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या टप्प्यात माघार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैठण गेट येथील दर्ग्यावरील कारवाईत महापालिकेच्या पथकाने शेवटच्या टप्प्यात माघार घेतली. दर्ग्याचे बांधकाम स्वतःहून पाडून घेण्यासाठी नागरिकांना एक दिवसाची मुदत देण्यात आली.

हायकोर्टाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची मोहीम महापालिकेच्या प्रशासनाने सुरू केली आहे. कारवाईच्या नवव्या दिवशी शनिवारी उपायुक्त रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखालील पथक दुपारी एकच्या सुमारास पैठण गेटला लागून असलेल्या लिंबाच्या झाडाखाली दर्गा हटविण्यासाठी दाखल झाले. सोबत मोठा पोलिस बंदोबस्त होता. पालिकेचे पथक दर्गा पाडण्याची कारवाई सुरू करणार असल्याचे लक्षात आल्यावर मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा झाले. त्यांनी पालिकेच्या पथकाला विरोध केला. दर्गा रस्त्यावर बाधीत नाही, आमच्या भावना या धार्मिक स्थळाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे दर्गा पाडू नका, आम्ही दर्गा पाडू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. नागरिकांनी उपायुक्त निकम यांच्याशी वाद घातला, पण निकम यांनी त्यांचे काहीच ऐकून घेतले नाही. कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करावीच लागेल असे स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांच्या विरोधाची धार वाढली. दर्गाच्या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक गोळा होण्यास सुरुवात झाली. त्यांनी या परिसरात नमाज अदा केला. त्यानंतरही पालिकेचे पथक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे लक्षात आल्यावर स्वतःहून दर्ग्याचे बांधकाम पाडून घेण्याची तयारी दाखवली. सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ द्या, आम्ही बांधकाम पाडून घेतो, असे नागरिकांनी सांगितले. निकम यांनी त्यास मान्यता दिली. त्यानंतर सुमारे दोन तास प्रार्थना केल्यावर दर्गा भोवतीची भिंत पाडून घेण्यास त्यांनी सुरुवात केली.

याचवेळी नगरसेवक अफसर खान व सय्यद मतीन त्या ठिकाणी आले. दर्गा पाडून घेण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून द्या, अशी विनंती त्यांनी निकम यांना केली. निकम यांनी ही विनंती धुडकावून लावली. कोर्टाच्या आदेशानुसार काम सुरू आहे, त्यात बाधा आणू नका असे आवाहन केले.

अखेर कारवाई थांबवली
अफसर खान व सय्यद मतीन आयुक्तांना भेटण्यासाठी महापालिकेत गेले. तेथे त्यांनी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची भेट घेतली. ‘धर्मगुरू येणार आहेत, त्यांच्या हस्ते पूजा करून आम्ही रविवारी दर्गा हटवतो,’ असे त्यांनी मुगळीकर यांना सांगितले. एक दिवस मुदत वाढवून द्या अशी विनंती त्यांनी केली. मुगळीकर यांनी ही विनंती मान्य केली. तसा निरोप निकम यांना पाठवण्यात आला. आयुक्तांच्या निरोपामुळे दर्गा हटविण्याची कारवाई शेवटच्या टप्प्यात आलेली असताना थांबवावी लागली. महापालिका व पोलिसांचे पथक माघारी फिरले.

क्रांती चौकात कारवाई अटळ
‘अनधिकृत, बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याचे हायकोर्टाचे आदेश आहेत. त्यानुसार क्रांती चौकातील मशिद अनधिकृत धार्मिक स्थळ आहे. हे स्थळ हटविणारच,’ असे स्पष्ट संकेत महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

क्रांती चौक मशिदीच्या परिसरातील जागेचे भूसंपादन झाले आहे, त्यामुळे भूसंपादन झालेली जागा महापालिका ताब्यात घेणार आहे, असे मुगळीकर यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर महापालिका क्रांती चौकातील मशिद हटविणार अशी चर्चा सुरू झाली. मशिदीच्या समोरील रस्ता शंभर फुटांऐवजी ७० फूट करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे महापालिका आता काहीच कारवाई करू शकत नाही असेही बोलले जाऊ लागले. यासंदर्भात पत्रकारांनी मुगळीकर यांना विचारले असता त्यांनी हे संकेत दिले.

आयुक्त म्हणाले, ‘त्या मशिदीच्या समोरील रस्ता सत्तर फुटाचाच असावा असा कोर्टाचा निर्णय आहे. ही वस्तूस्थिती आहे आणि ते धार्मिक स्थळ ‘ब’ वर्गात आहे ही देखील वस्तूस्थिती आहे. सध्या ‘ब’ वर्गातील धार्मिक स्थळांवरच कारवाई केली जात आहे. मशिदीच्या परिसरातील १७९७ चौरस मीटर जागा महापालिकेने संपादीत केली आहे. त्याचा मोबदला देखील मंजूर केला आहे. वक्फ बोर्डाने मंजूर केलेला मोबदला घेतला नाही ही वस्तूस्थिती आहे. वक्फ बोर्डाने मोबदला घेतला नसला, तरी तो मंजूर करण्यात आलेला असल्यामुळे संपादीत केलेली जागा ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मशिदीचे संपादीत क्षेत्र मोकळे करून द्या असे मशिदीच्या कमिटीला सांगितले आहे. त्यासाठी त्यांना दोन दिवसांचा वेळ दिला होता. त्या जागेवरील धार्मिक स्थळाचे बांधकाम अनधिकृत आहे व अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत ते ‘ब’ वर्गात आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार या धार्मिक स्थळावर देखील कारवाई करावीच लागेल. सध्यातरी क्रांती चौक मशिदीचे संपादीत क्षेत्र ताब्यात घेतले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित धार्मिक स्थळाचे बांधकाम अनधिकृत असेल, तर ते देखील काढून घेतले जाईल,’ असे मुगळीकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘जीएसटी’मुळे कंत्राटदारांसमोर पेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीमुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एक जुलैपूर्वी कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) मि‍ळालेल्या कामांच्या अंदाजपत्रकात मूल्यवर्धित कर (व्हॅट) भरावा, अशी तरतूद होती. त्यावेळी १३.५ टक्के ‘व्हॅट’ भरावा लागत होता, आता १८ टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याने कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. सिंचन, बांधकामसह अन्य विभागांच्या सुमारे १०० कोटी रुपयांची कामांच्या एक जुलैपूर्वी ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आली आहे. या कामांच्या बिलांतून ‘जीएसटी’ वजा करू नये, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.

‘जीएसटी’ एक जुलैपासून लागू झाला आहे. ‘जीएसटी’मुळे सगळे अप्रत्यक्ष कर संपुष्टात आले आहेत. व्यापाऱ्यांच्या दृष्टनी सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्याची गरज भासणार नाही, असे जीएसटी विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ‘जीएसटी’बाबत करदात्यांचे मेळावे, बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. नव्या कर प्रणालीमुळे बांधकाम, जिल्हा परिषद, सिंचनसह विविध सरकारी कार्यालयांतील कामे घेणारे कंत्राटदार मात्र सध्या अडचणीत सापडले आहे. ‘जीएसटी’ला विरोध नाही, पण सध्या पडत असलेल्या अतिरिक्त कराचा बोजा नफ्यातून का द्यावा, असा सवाल कंत्राटदारांनी केला आहे.

काय आहे पेच
एक जुलै २०१७ पूर्वी वर्क ऑर्डर मिळालेल्या कामांच्या अंदाजपत्रकामध्ये ‘व्हॅट’ची तरतूद होती. आता मात्र संबंधित कंत्राटदारांच्या बिलातून जीएसटी कर वजा केला जात आहे, असे फेडरेशन ऑफ इंजिनिअर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. ‘व्हॅट’ १३.५ टक्के होता. तो गृहीत धरून अंदाजपत्रक तयार करण्यात आले. कामाची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया करून वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. आता थेट १८ टक्के ‘जीएसटी’ भरावा लागत आहे. ही बाब अन्यायकारक असून, यातून मार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी केली. अशा कामांच्या देयकातून ‘जीएसटी’ कपात करू नये व पुढील सर्व अंदाजपत्रकामध्ये जीएसटी कर तरतूद केल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

पावणे तीन हजार करदात्याची नोंदणी
जीएसटी नोंदणीसाठी करदात्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून २५ जूनपासून नव्याने सुमारे पावणेतीन हजार करदात्यांनी नोंदणी केली आहे. करदात्यांना संक्षिप्त विवरण पत्र (प्रथम रिटर्न जीएसटीआर-३) पाच ऑगस्टपासून भरावे लागणार असून, २० ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती जीएसटी विभागाच्या सहआयुक्त दिपा मुधोळ मुंडे यांनी दिली. विवरणपत्र भरणासंदर्भात जीएसटी अधिकाऱ्यांना मुंबई येथील तज्ज्ञ अधिकारी शशीभूषण सिंग, राजेशकुमार, भुवन पाटील यांनी 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे प्रशिक्षण दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जीएसटी लागू करण्यात घाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जीएसटीला विरोध नाहीच, पण तो लागू करण्याची घाई केली. जीएसटी दोषरहित असेल याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत,’ असे मत अर्थविषयक सल्लागार व सी. ए. अजित जोशी यांनी शनिवारी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्र संवाद कॉलेजतर्फे आईनस्टाइन सभागृह, जेएनईसी कॉलेज ‘जीएसटी: काही अनुत्तरीत प्रश्न’ या विषयावर जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला नीलेश राऊत, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव, रेणुका कड आदी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, ‘जीएसटी लागू होऊन एक महिना झाल्यानंतरही संबंधित विभागाकडे रोज शेकडो प्रश्न येत आहेत. त्यांची उत्तरे सोशल मीडियातून मिळत असतील तर त्यास कायदेशीर मान्यता कशी मानावी. जीएसटी दर वेगवेगळे आहेत. सोबतच सीजीएसटी, आयजीएसटी आणि एसजीएसटी लागू करण्यात आले आहे, असे असतानाच वन नेशन, वन टॅक्स् असे कसे म्हणता येईल. ही फसवी घोषणा आहे. कायदा लागू झाल्याच्या सव्वा महिन्यानंतरही रोज नवीन अध्यादेश येणे सुरू आहे. कोण कोणत्या वस्तू, सेवावर किती कर आहे, हे सांगण्यास १९ मे नंतर सुरुवात होते. त्यातही अनेकदा बदल केले जात आहे. ही घिसडघाई का?

देशात दररोज कोट्यवधी विक्री बिले तयार होतात. एवढा मोठा बोजा ‘जीएसटीएन’च्या सर्व्हरवर लोड होईल का, क्रॅश होणार तर नाही ना, याचा विचार झाला पाहिजे. २० लाख पेक्षा कमी उलाढाल आहे, तो जीएसटीत समाविष्ट नाही. त्याच व्यापाऱ्याने अन्य राज्यात माल विक्री केल्यास त्यास नोंदणी करावी लागेल. मग २० लाखांची मर्यादा कशासाठी,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मंदीचे सावट
‘रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आकारण्याची तरतूद फसवी आहे. अर्थ व्यवस्था तेजीत असताना तयारीनिशी जीएसटी लागू करायला हवा होता, पण त्यासाठी घाई करण्यात आल्याने मंदीचे सावट निर्माण होईल की काय,’ अशी भीती जोशी यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुमीत राघवनने दाखवली नाट्यगृहाची दुरवस्था

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

गेल्या वर्षी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या दुरवस्थेचं दर्शन घडवणारा लोकप्रिय अभिनेता सुमीत राघवनने आज औरंगाबादमधील संत एकनाथ रंगमंदिरातून 'फेसबुक लाइव्ह' करत प्रशासनाच्या आणि सत्ताधारी शिवसेनेच्या ढिसाळ कारभाराची पोलखोल केली आहे.

'एक शून्य तीन' या नाटकाच्या प्रयोगासाठी १२ तासांचा प्रवास करून सुमीत राघवन, स्वानंदी टिकेकर यांच्यासह संपूर्ण टीम संत एकनाथ रंगमंदिरात पोहोचली, तेव्हा तिथलं भीषण दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. रंगमंचावरील मोडक्या लाकडी फळ्या, फ्लोरिंगला पडलेल्या भेगा, मेक-अप रूममधील अस्वच्छता आणि दुर्गंधीनं त्यांची सगळ्यांची 'सटकली'च. सुमीतनं तातडीने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हे विदारक दृश्य चाहत्यांसोबत शेअर केलं आणि प्रशासनाचंही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

हे नाट्यगृह औरंगाबाद महानगरपालिकेचं असून तिथे शिवसेनेची सत्ता आहे. ज्येष्ठ शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांचा औरंगाबादमधील दबदबा सगळ्यांनाच परिचित आहे. त्यामुळेच रंगमंदिराच्या दुरवस्थेचं दर्शन घडवताना सुमीतने शिवसेनेला चिमटे काढलेत. आता शिवसेना या टीकेची दखल घेते का आणि काही करून दाखवते का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, यापुढे औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरात नाटकाचे प्रयोग न करण्याचा पवित्राही सुमीत राघवननं घेतला आहे. याच रंगमंदिरात गेल्या वर्षी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी स्वतः हातात झाडू घेऊन साफसफाई केली होती. त्यानंतरही तिथली परिस्थिती 'जैसे थे' असल्याचं सुमीतच्या व्हिडिओतून समोर आलंय.

दरम्यान, गेल्याच महिन्यात अभिनेत्री मुक्ता बर्वेनं पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील भीषण अस्वच्छतेवर सडकून टीका केली होती.

सुमीत राघवनचं फेसबुक लाइव्ह



मुक्ता बर्वेची फेसबुक पोस्ट



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्झरी बस उलटली; १४ प्रवासी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादहून मुंबईला जाणारी खासगी लक्झरी बस सुलतानाबाद शिवारात उलटून अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली.
मुंबईला जाणारी लक्झरी बस (एम एच २० ई जी ५५६६) ही शनिवारी रात्री साडेआठ वाजता शहरातून निघाली. ती गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव शिवारात मध्यरात्री साडेबारा वाजता पोहचली असता समोरून येणाऱ्या ट्रकचालकाने हुलवणी दिल्याने बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस काही अंतरावर जाऊन उलटली. यावेळी प्रवासी आदळून जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी मदत करून बस बाहेर काढले व अॅम्ब्युलन्स मागवून पुढील उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. दीपक वारे, संगीता कळसकर, मोहम्मद हानिफ, कृष्‍णा कळसकर, मोहसीन मोहम्मद हनीफ, गीता वारे, ज्ञानेश्वरी वारे, किरण सोनवणे, वामन गवळे, इस्माईल भाई, शेख असद, अनिल राठोड, योगेश राजपूत आणि शेखर कळसकर हे अपघातात जखमी झाले आहेत. यापैकी काही प्रवाशांना उपचारासाठी घाटी व काही जणांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. वेळीच उपचार मिळाल्याने जीव बचावल्याची माहिती काही जखमी प्रवाशांनी दिली.

एक्स-रे बंद

अपघातामधील जखमींना मध्यरात्री अडीच वाजता उपचासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, प्रवासी जास्त व डॉक्टरची संख्या कमी अशी अवस्था सुरुवातीला होती. त्यावेळी घाटी हॉस्पिटलमधील एक्स-रे विभाग बंद होता. यामुळे काही जखमींनी प्राथमिक उपचारानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग, गत‌िमंद मुलांची लगबग

$
0
0


दिव्यांग, गत‌िमंद मुलांची लगबग
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी सणाच्या तयारीला आपण साधारण एक एक महिना आधी तयारीला लागतो. मात्र, दिव्यांग व गत‌िमंद मुले जुलै महिन्यापासूनच दिवाळी सजावटीचे साहित्य तयार करायला सुरुवात करतात. आरंभ ऑट‌िझम सेंटरमधील आर्ट झोनच्या या मुलांच्या या तयारीला सुरुवात झाली असून त्यांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूंना बाहेरगावावरून देखील मागणी होत आहे.
आरंभ ऑट‌िझम सेंटरच्या संचालिका अंबिका टाकळकर यांच्या संकल्पनेतून चार वर्षांपूर्वी आर्ट झोनला सुरुवात करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये गत‌िमंद मुलांना शिकविण्यात येते. दिवाळी सणासाठी लागणारे सजावटीचे साहित्य ही बच्चे कंपनी तयार करतात. येथील पालक प्रगती बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी साहित्य बनवायला सुरुवात केली आहे. आपल्या कौशल्याला वाव देत ही मुले आकर्षक पणत्या, दिवे, ग्रिटिंग कार्ड, तोरण, ‌गिफ्ट आर्टिकल, बुक मार्क्स, कोयरी, पेटिंग्स, दिव्याचे स्टँड, पेपर बॅग, लिफाफे तयार करतात.
बाहेरगावावरून मागणी
गेल्या चार वर्षांत या दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूंची माहिती बाहेरगावच्या नागरिकांपर्यंत पोहचली आहे. गेल्यावर्षी या मुलांनी दोन हजार पणत्या तयार केल्या होत्या. औरंगाबादसह सोलापूर, नांदेड, धुळे, मुंबई, पुणे, नाशिक येथील नागरिकांनी देखील या मुलांच्या कलेचे कौतुक करीत या पणत्या मागवल्या होत्या.
सर्वांना समान नफा
पहिल्या वर्षी पाच हजार रुपयांपासून या कामाला सुरुवात करण्यात आली होती. गेल्यावर्षी या मुलांनी केलेल्या मेहनतीचे चीज होऊन एक लाख रुपयापर्यंत व्यवसाय झाला. विशेष बाब म्हणजे हे साहित्य तयार करणाऱ्या मुलांना यातील नफा हा समान वाटप करण्यात येतो. यावेळी स्वकमाईचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतो.
या मुलांना या वस्तू तयार करण्यास थोडा वेळ लागतो. तसेच प्रत्येक वस्तू हँडमेड आहे. यामुळे जुलै महिन्यापासूनच ही मुले सजावटीचे साहित्य तयार करायला सुरुवात करतात. यासाठी मुलांचे पालक असलेल्या प्रगती बागूल यांचे यामध्ये मोलाचे सहकार्य लाभत आहे.
- अंब‌िका टाकळकर, संचालिका, आरंभ ऑटीझम सेंटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images