Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पीक पाहणीसाठी संयुक्त पथकाची स्थापना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
पावसाने ओढ दिल्याने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी संयुक्त पथकाची स्थापना केली आहे. हे पथक येत्या आठ दिवसांत अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहे. या पथकात कृषी, महसूल, बँक व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस न पडल्याने खरीप पिके करपू लागली असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अनुषंगाने पिकाचे पंचनामे करून अर्थसहाय्य करण्याची मागणी जोर धरू लागल्याने शिवाय जिल्ह्यातील पिकांची गंभीर स्तिथी पाहता याची जिल्हाधिकरी यांनी तातडीने दखल घेत संयुक्त पाहणी पथकाची स्थापना केली.
पाच वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांमागील संकटाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. खरीप हंगामात मोठ्या मेहनतीने केलेली पेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दीड महिन्यांपासून वरुणराजाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या आहेत.
महागडी खते, बी-बियाणे, कीटकनाशकांसह मशागतीवर हजारो रुपये खर्चूनही सोयाबीन, मूग, उडीद, तूर या नगदी पिकांना तडाखा बसला आहे. नुकसानीचे पंचनामे आणि मदतीवरच आता रब्बीची मदार आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीच्या रब्बी आणि खरीप हंगामातील नुकसानीपोटी मिळालेल्या रकमेचा आधार मिळेल असे वाटत होते. चलन तुटवड्याअभावी ही रक्कम वेळेवर हाती आली नाही. तसेच बँकेकडूनही कर्ज न मिळाल्याने अखेर उसनवारी, प्रसंगी सावकाराचे उंबरठे झिजवून पेरणीसाठी रक्कम जमा करुन मातीतला जुगार खेळण्यासाठी शेतकरी सज्ज झाला. रोहिण्यापाठोपाठ मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील ५ लाख १ हजार ८०९ हेक्टरवर पेरणी केली. जून महिन्यात झालेल्या जेमतेम पावसांवर पिकांची वाढ चांगली झाली. मात्र, दीड महिन्यांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. परिणामी लाखो हेक्टर वरील पिकांनी माना टाकल्या आहेत. तर अनेक शिवारात पिकांची वाढ झाली असली तरी अळ्यासह रोगाचा प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. ऑगस्ट महिना उजाडल्यानंतर जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण झाल्यामुळे आता दुबार पेरणीही करणे शक्य नाही. त्यामुळे अवर्षण स्थितीचा जबर फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. उस्मानाबादसह तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, भूम, कळंब, वाशी तालु्नयातही अशीच भयंकर स्थिती बनल्याने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७२ हजार ६०० हेक्टर एवढे आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी ५ लाख १ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. जिल्ह्याचे सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर असून प्रत्यक्षात २ लाख २४ हजार ९०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तुरीचे सरासरी क्षेत्र ९७ हजार हेक्टर असून प्रत्यक्षात पेरणी ८६ हजार ३०५ हेक्टर, उडिदाच्या ४१ हजार ५०० पैकी ६० हजार २३७, मूग १५ हजार ८०० पैकी प्रत्यक्षात ३१ हजार ७५, मका १८ हजार ५०० पैकी २१ हजार ८७७, कापूस सरासरी २४ हजार ६०० पैकी २२ हजार ६९२ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

संयुक्त पथकाची स्थापना
पावसाने ओढ दिल्याने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी संयुक्त पथकाची स्थापना केली असून या पथकात जिल्हा कृषी अधीक्षक, महसूल विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, बँकांचे व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असून हे पथक प्रत्यक्ष उद्यापासून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेटी घेऊन पिकांची पाहणी करणार आहेत. याव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसानीची तक्रार नोंदवायची असेल त्यांनी बँकेमार्फत अर्ज करून नोंदवावी किंवा तक्रार अर्ज कृषी अधीक्षक कार्यालयात, जिल्हा परिषद कृषी, विस्तार अधिकारी कार्यालयात, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या तक्रार पेटीमध्ये टाकावा असे आवाहन राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धार्मिक स्थळे नियमित करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करा

$
0
0

जागा लिजवर देऊन धार्मिक स्थळे नियमित करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करा
स्थायी समितीच्या सभापतींचे पालिका प्रशासनाला आदेश
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
महापालिकेच्या मालकीच्या जागा लीजवर देऊन धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबतचे शपथपत्र हायकोर्टात सादर करा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी गुरुवारी महापालिकेच्या प्रशासनाला दिले. सिडको प्रशासनाने अशाच प्रकारची भूमिका घेतली आहे. महापालिकेला देखील त्याच पद्धतीने निर्णय घेण्यास काहीच हरकत नाही, असे ते म्हणाले.
स्थायी समितीच्या बैठकीत धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या संदर्भात चर्चा झाली. शिवसेनेचे राजू वैद्य म्हणाले, सिडको प्रशासनाने त्यांचे विक्री योग्य प्लॉटस् धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना देण्याचे ठरविले आहे. एकूण किंमतीच्या २० टक्के शुल्क भरून प्लॉट घ्या, असे सिडकोच्या संचालक मंडळाने जाहीर केले आहे. त्यामुळे सिडको भागातील धार्मिक स्थळे अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे ‘ब’ वर्गातील सिडको भागातील धार्मिक स्थळे नियमित होतील. महापालिकेने देखील अशाच प्रकारचे धोरण अवलंबले पाहिजे. महापालिकेच्या मालकीच्या जागा, खुल्या जागा त्या त्या धार्मिक स्थळांसाठी भाडेतत्वावर देता येणे शक्य आहे. महापालिकेच्या नियमात तशी तरतूद आहे. नियमातील तरतुदींचा वापर करून ३४२ धार्मिक स्थळे नियमित होऊ शकतील, ही धार्मिक स्थळे नियमित करा आणि त्यानंतर उर्वरित धार्मिक स्थळांबद्दल सुनावणी घ्या, अशी मागणी वैद्य यांनी केली.
महापालिकास्तरीय समितीच्या बैठकीत काय निर्णय झाला याची माहिती द्या, असे राजू वैद्य म्हणाले. विधीसल्लागार अपर्णा थेटे म्हणाल्या, कोर्टाच्या आदेशाची लिखीत प्रत न मिळाल्यामुळे उद्या पुन्हा बैठक होणार आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग म्हणाले, धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, त्याचा निर्णय उद्या घेतला जाईल. यावर प्रशासनाला आदेश देताना सभापती गजानन बारवाल म्हणाले, सिडकोच्या निर्णयानुसार धार्मिक स्थळांना महापालिकेच्या जागा भाडेपट्ट्यावर देता येणे शक्य आहे, असे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल करा व त्यादृष्टीने कार्यवाही करण्यासाठी पावले उचला.
राजू वैद्य यांच्या अभिनंदनाचा ठराव
राजू वैद्य यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेऊन हायकोर्टाने धार्मिक स्थळांची सुनवणी घ्यावी, असे आदेश दिले. त्यामुळे वैद्य यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात यावा, असा प्रस्ताव शिवसेनेचे सीताराम सुरे यांनी मांडला. त्याला सर्वच सदस्यांनी अनुमोदन दिले. सभापतींनी हा प्रस्ताव मंजूर केला.
शिवसेनेचा महापौरांकडे प्रस्ताव
सिडको प्रशासनाप्रमाणे महापालिकेच्या मालकीच्या जागा धार्मिक स्थळांसाठी भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांकडे सादर केला आहे. प्रस्तावावर राजू वैद्य यांच्यासह नंदकुमार घोडेले, स्मिता घोगरे, गजानन मनगटे, ऋषीकेश खैरे, सीताराम सुरे, स्वाती नागरे, रुपचंद वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पाईस-अॅग्रो-इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर्सने होणार विकास

$
0
0

स्पाईस-अॅग्रो-इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर्सने होणार विकास
शेंद्रा, जालन्यातील औद्योगिक वसाहतीत निर्मिती
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छोट्या-छोट्या क्लस्टर्सच्या निर्मितीतून औद्योगिक विकास साधण्याच्या उद्योजकांच्या निर्णयावर आता शासनही सकारात्मक झाले आहे. जमीन, पायाभूत सुविधा आणि एकंदरीतच गुंतवणूक पाहता जसा औरंगाबाद औद्योगिक परिसरात क्लस्टर्सद्वारे विकास होत आहे तसाच विकास आता जालना औद्योगिक वसाहत आणि औरंगाबादनजिक शेंद्रा वसाहतीत होत आहे. स्पाईस-अॅग्रो-इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर्सच्या निर्मितीसाठी शासनाने जागा उपलब्ध केली आहे. या तीनही ठिकाणी कोट्यवधींच्या उलाढालीस सुरुवात झाली आहे.
जालना औद्योगिक वसाहतीत स्पाईस क्लस्टरमध्ये सम्यक स्पाईस क्लस्टरच्या माध्यमातून शासनाकडून उद्योजकांना भूखंड मिळाला आहे. मे. सम्यक स्पाईस क्लस्टर यांनी जालना अंतिम टप्पा क्रमांक ०३ मध्ये ३००० चौरस मीटर जागा क्लस्टरसाठी मागितली होती. याचा सविस्तर अभ्यास करून गुंतवणूक, लाभार्थी आणि एकदंरित विकास लक्षात घेऊन एक रितसर पत्र ३० सप्टेंबर २०१६ रोजी मंजुरीकरिता सादर करण्यात आले होते. त्यावर विचार होऊन ३००० चौरस मीटर जागा मंजूर करण्यात आली. अर्जदारांना भूखंड क्रमांक पी-२ अंतर्गत तेवढी जागा देण्यात आली. हे क्लस्टर जालन्याच्या डाळींचा उद्योग, उलाढाल, नव्याने होणारा उद्योग आणि रोजगार हे पाहून करण्यात आले आहे. याचा फायदा मराठवाड्याला होणार आहे.
अॅग्रो क्लस्टरमध्ये मे. पूर्णा अॅग्रो क्लस्टर अँड अॅग्रिकल्चर यांनी जाफ्राबाद औद्योगिक क्षेत्रामध्ये ८००० चौरस मीटर जागेची मागणी केली आहे. सविस्तर टिपणी मुख्यालयास २२-९-१६ ला मंजुरीकरिता सादर करण्यात आली. औद्योगिक मंडळात याविषयी ३ जानेवारी २०१७ ला विशेष बैठक झाली. यात या क्लस्टरसाठी ६००० चौरस मीटर जागेचे वाटप करावे अशी मंजुरी देण्यात आली. यानुसार क्लस्टरसाठी रितसर आदेश काढण्यात आले आहेत. या क्लस्टरसाठी वाटप करायवयाच्या जाफ्राबाद आद्योगिक वसाहतीतील भूखंडाचे रुपांतर औद्योगिक सुविधा भूखंडात करण्याचा प्रस्ताव ४ मे २०१७ ला देण्यात आला आहे. यानुसार आता या क्लस्टरसाठीही मार्ग मोकळा झाला आहे.
शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसाठी काम सुरू झाले आहे. मेसर्स देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर यांना इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसाठी या भागातील पी-३० मधील ८००० क्षेत्र चौरस मीटर भूखंड देण्यात आला आहे. याचा ताबा २ फेब्रुवारी २०१६ ला देण्यात आला असून भूखंडाचा प्राथमिक करारनामा २० एप्रिल २०१६ ला कार्यान्वित करण्यात आला आहे. यासाठी सध्या काम सुरू झाले आहे.
लाभार्थी, गुंतवणूक मोठी
या तिन्ही क्लस्टर्सचे लाभार्थी हे औरंगाबाद आणि जालन्यातील आहे. एकंदरीतच कोट्यवधींची गुंतवणूक होणार असून यात उलाढालही कोट्यवधींची असणार आहे. औरंगाबाद-जालना मिळून सध्या ६/७ क्लस्टरचे जोरात काम होणार आहे. यातून जालना आणि औरंगाबादचा विकास होणार आहे.
बिमॅट क्लस्टरची नाराजी
बिमॅट इंजिनिअरिंग क्लस्टरसाठी वाळूजमध्ये ८००० चौरस मीटर जागेची मागणी करण्यात आली आहे परंतु तेवढी जागा उपलब्ध नसल्याने तसे रितसर या क्लस्टर उद्योजकांना ११ मे २०१७ ला कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदाराचा खून; एक वर्षानंतर अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेपत्ता बांधकाम कंत्राटदाराच्या खून प्रकरणात छावणी पोलिसांनी एक वर्षानंतर दोन संशयितांना अटक केली आहे. जालिंदर त्रिभुवन यांचा मृतदेह २३ मे २०१६ रोजी छावणी ओव्हरब्रिज जवळ सापडला होता. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद छावणी पोलिस ठाण्यात आली होती. मृत त्रिभुवन यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी आरोपींविरुद्ध खुनाचा व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालिंदर त्रिभुवन (रा. कबीरनगर, उस्मानपुरा) हे बांधकाम पाडण्याचे काम घेणारे कंत्राटदार होते. ते २० मे २०१६ पासून बेपत्ता होते. या प्रकरणी त्यांची पत्नी विजयमाला त्रिभुवन यांनी २१ मे २०१६ रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात ते हरवल्याप्रकरणी नोंद ‌केली होती. दरम्यान, २३ मे १६ रोजी छावणी रेल्वे ओव्हरब्रिजजवळ त्यांचा मृतदेह सापडला होता. प्राथमिक पोस्टमार्टम अहवालात त्यांचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाला असल्याचा उल्लेख होता, मात्र त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. ७ जुलै २०१७ रोजी याप्रकरणी डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंतीम अहवाल प्राप्त झाला. डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे समोर आले. या प्रकरणी विजयामाला त्रिभुवन यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांच्या पतीने भास्कर कोल्हे नावाच्या व्यक्तीच्या बिल्डिंगचे बांधकाम पाडण्याचा ठेका मटेरियलसह तीन लाख रुपयांना घेतला होता. बांधकाम पाडण्यास सुरुवात केल्यानंतर कोल्हे यांनी मटेरियल उचलून देण्यास नकार देत आणखी एक लाखांची मागणी केली. त्रिभुवन यांनी एक लाख रुपये दिले नाही म्हणून त्यांना भास्कर कोल्हे व त्यांचा वॉचमन बागुल यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत कामावरून हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला. जालिंदर त्रिभुवन बेपत्ता असताना या काळात कोल्हे व बागुल यांनी त्यांना मारून त्यांचा मृतदेह ओव्हरब्रिज जवळ टाकल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला.

अॅट्रॉसिटीचा गुन्हा

मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून भास्कर कोल्हे व वॉचमन बागुल विरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोल्हे व बागुल यांना अटक करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण तालुक्यात हजारो हेक्टरवरील पीक मोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पावसाच्या गुंगाऱ्यामुळे मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात खरीप पिकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. आता पाऊस पडला तरी पीक उत्पादनात सुमारे ४५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात पीक उत्पादनात सुमारे ६० ते ८० टक्के घट होण्याची भीती कृषी विभागाने वर्तवली आहे. पैठण तालुक्यात मूग पिकाचे १२२६ हेक्टर, उडीद ३९, तर कापूस पिकाचे २२०० हेक्टर पीक शेतकऱ्यांनी मोडून टाकले आहे.
मराठवाडा विभागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७७७.०० मिमी असून ८ ऑगस्टपर्यंत २४८ मिमी पाऊस झाला आहे, तो वार्षिक सरासरीच्या ३१.८ टक्के आहे. विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र ४९.११ लाख हेक्टर असून ४७.१६ हेक्टर क्षेत्रावर (९६.०४ टक्के) प्रत्यक्ष पेरणी झाली. दरम्यान, जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात पाऊस अत्यंत कमी झाला. १४ जुलैच्या दरम्यान काही भागात पावसाने हजरी लावल्याने पिके वाढीस लागली होती. पण, २२ जुलैपासून विभागात बहुंताश ठिकाणी पाऊस पडला नसल्याने सर्व पिकांची वाढ खुटली. हलक्या जमिनीवरील सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके सुकत आहेत.

औरंगाबाद जिल्हा
जिल्ह्यातील २० महसूल मंडळातील खरीप पिकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, आता पाऊस पडल्यानंतरही पीक उत्पादनात सुमारे ६० ते ८० टक्के घट होण्याची भीती कृषी विभागाने वर्तवली आहे. या प्रामुख्याने पैठण, गंगापूर, खुलताबाद व सोयगाव या तालुक्यातील काही मंडळाचा समावेश आहे. पैठण तालुक्यात शेतकऱ्यांनी मूग १२२६ हेक्टर, उडीद ३९ व २२०० हेक्टरवरील कापूस मोडला आहे.

बीड जिल्हा
बीड जिल्ह्यातील आष्टी, माजलगाव, अंबेजोगाई या तालुक्यात काही महसूल मंडळात पीक परिस्थिती चिंताजनक आहे. आष्टीतील पिंपळा, टाकळासिंग, कडा, धानोरा, दौलावडगाव या मंडळातील मूग, उडीद व सोयाबीन पिकांच्या उत्पादनात सुमारे ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता आहे.

जालना जिल्हा
जालना, अंबड, घनसावंगी व बदनापूर या तालुक्यांमध्ये मूग, उडीद व सोयाबीन पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे.

नांदेड व उस्मानबाद जिल्हा
कंधार, नायगाव, धर्माबाद व मुखेड या तालुक्यातील पीक परिस्थिती चिंताजनक आहे. पेठवडज, कौरुळ, करखेली, जाहूर, येवती, चांडोळा, मुखेड आदी मंडळातील उडीद, मूग, सोयाबीन क्षेत्र पावसाअभावी बाधित होत आहे. उस्मानबाद जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्यामुळे वाशी, परंडा, तुळजापूर तालुक्यात हलक्या व मध्यम जमिनीवरील मूग, उडीद पिके सुकत असून उत्पादनात सुमारे २५ ते ३० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य भरतीप्रकरण; ३७ जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट रहिवासी प्रमाणपत्र व राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या ३७ उमेदवारांना छावणी पोलिसांनी बुधवारी (९ ऑगस्ट) अटक केली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता शनिवारपर्यंत (१२ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले.
या प्रकरणी छावणीचे कर्नल मोहनपाल सिंग यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २०१५ मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात औरंगाबाद येथे भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा झाला होता. या मेळाव्यात फिर्यादीकडे औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, जळगाव, नांदेड, नंदूरबार, परभणी अशा ९ जिल्ह्यांचा पदभार होता व २१ जुलै २०१५ ते ६ ऑगस्ट २०१५ रोजी सैन्य भरती प्रक्रिया सुरू होती. त्यात प्रथम लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेमध्ये १ हजार ५० उमेदवार उत्तीर्ण झाले होते. उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रे तपासणीत उमेदवारांना वयाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्र (टी.सी), अविवाहीत प्रमाणपत्र, वर्तणुक प्रमाणपत्र आदी कागपत्रांच्या सत्यप्रती उमेदवारांकडून घेण्यात आल्या होत्या. तपासणीमध्ये ४३ उमेदवारांच्या अधिवास प्रमाणपत्रांबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे अधिवास प्रमाणपत्र संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असता संबंधित उमेदवारांनी दिलेली अधिवास प्रमाणपत्रे ही बनावट असून त्यावर संबंधीत तहसिलदारांची बनावट सही व शिक्के असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन ४३ जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटक झालेले आरोपी असे

या प्रकरणी राहुल पांडुरंग यादव (जठारवाडी, कोल्हापूर), अक्षय बाळासाहेब गोसावी (शाहुवाडी, कोल्हापूर), विकास भोसले (राधानगरी, कोल्हापूर), रोहित सर्जेराव नीले (करवीर, कोल्हापूर), आशुतोष अरूण कोरे (हातकंगले, कोल्हापूर), अमित तानाजी मुलिक (हातकंगले, कोल्हापूर), नामदेव शिवाजी साळुंके (वालेखिंडी, सांगली), संदीप तानाजी गायकवाड (आटपाडी, सांगली), विशाल दिलीप शिरसोडे (खानापूर, सांगली), भारत लक्ष्मण माळी (कवळापूर, सांगली), सागर सावता येयगारे (भिरज, सांगली), गणेश रामदास खिल्लारे (करमणी, सांगली), सागर जितेंद्र सपकाळ (अंबाडे, सातारा), रोहित शिवाजी यादव (खटाव), शुभम अविनाश कर्पे (खोरजईवाडी, सातारा) यांच्यासह ३७ आरोपी उमेदवारांना अटक करण्यात आली, तर उर्वरित सहा जणांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बनावट प्रमाणपत्रांचा शोध सुरू

आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींनी बनावट प्रमाणपत्र कुठून व कोणाकडून तयार केले, याचा तपास करणे व बनावट कादपत्रांवर मारलेले शिक्के व संगणक जप्त करणे बाकी आहे. आरोपींच्या साथीदारांना अटक करावायची आहे. तसेच पुरावे हस्तगत करावयाचे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपींना शनिवारपर्यंत (१२ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटीआय’ची परीक्षा ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या (ट्रेड) सर्व परीक्षा जानेवारीपासून ऑनलाइन घेतल्या जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्याची पूर्व तयारी म्हणून सध्या सुरू असलेल्या परीक्षेतील एका अभ्यासक्रमाची परीक्षा प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन घेतली जाणार आहे.
आयटीआयच्या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी राज्यभरात विद्यार्थ्यांची मोठी स्पर्धा असते. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी २०१३ पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. नव्या वर्षात परीक्षाही ऑनलाइन घेण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले. जानेवारी २०१८ पासून या निर्णयाची अमंलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. सरकारी आयटीआयच्या आधुनिकीकरणाच्या कामाबाबत केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी कौशल्य विकास विभागाची जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे जाहीर केले होते. प्रायोगिक तत्त्वावर ऑगस्टपासूनच त्याची अमंलबजावणी करण्यात येत आहे. सध्या आयटीआयच्या सत्र परीक्षा सुरू आहे. २ ऑगस्टपासून सुरू झालेल्या परीक्षेत ‘इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन, टेक्नॉलॉजी सिस्टीम मेटनन्स’ या ट्रेडचे पेपर ऑनलाइन होणार आहेत. १२ ऑगस्टपासून हे पेपर होणार आहेत.

खासगी संस्थेची मदत

‘इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन, टेक्नॉलॉजी सिस्टीम मेटनन्स’ (आयसीटीएम) ट्रेडची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे पत्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडून आयटीआय प्राचार्यांना आली आहेत. हा दोन वर्ष कालावधीचा ट्रेड असून एका बॅचची प्रवेश संख्या २१ आहे. मराठवाड्यात बहुतांशी आयटीआयमध्ये हा ट्रेड शिकवला जातो. ही परीक्षा खासगी संस्थेच्या मदतीने घेतल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परीक्षा दोन दिवसावर आली तरी, परीक्षा कोणार हे अद्याप माहित नसल्याने आयटीआय प्रशासन संभ्रमात आहे.

अभ्यासक्रम.... ‘आयसीटीएम’
कालावधी.......२ वर्ष
विद्यार्थी संख्या...२१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीसाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘मेगा जॉब फेअर’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात गुरुवारी हा उपक्रम झाला. जवळपास दोन हजार उमेदवारांची मुलाखत प्रक्रियेसाठी उपस्थिती होती. दिवसभरात ५१० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान यांच्या वतीने ‘मेगा जॉब फेअर २०१७’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता. रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्यामुळे जिल्हाभरातील शेकडो उमेदवारांनी गर्दी केली. प्रथम नोंदणी करणारास प्रथम प्राधान्य असल्यामुळे सकाळीच गर्दी केली होती. ऑपरेटर, एस. आर., मॅकेनिकल इंजिनिअर, ट्रेनी, सेल्स ऑफिसर, ट्रेनी फिटर, वेल्डर प्रशिक्षणार्थी इपीपी, ऑफिसर एचआर अशा विविध पदांसाठी मुलाखती झाल्या. औरंगाबाद, पुणे आणि मुंबई येथील धूत ट्रान्समिशन, नवभारत फर्टिलायझर्स, सवेरा फार्मास्युटिकल्स, आयटीएम एज्युकेट ट्रेनिंग प्रा. लि., व्हेरॉक इंजिनिअरिंग, बडवे इंजिनिअरिंग, एनआरबी बेरिंग लिमिटेड, ऋचा इंजिनिअरिंग कंपनी, हेडगेवार रूग्णालय, व्यापारी महासंघ, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, डेटा कॅटलिस्ट, शोध अशा नामांकित कंपन्यांचा सहभाग असल्यामुळे उमेदवारांनी जास्त सहभाग नोंदवला. ‘जॉब फेअर’मध्ये एकूण एक हजार ८६० उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थिती नोंदवली. यातील ५१० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. या उपक्रमासाठी विद्यापीठाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. गिरीश काळे, जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे सहाय्यक संचालक निशांत सूर्यवंशी, विजय रिसे, सुरेश शेळके, राष्ट्रीय करिअर सर्विसचे डॉ.अनिल जाधव यांनी परिश्रम घेतले. सध्या औद्योगिक क्षेत्रात कमी रोजगार असल्याची स्थिती आहे. ‘मेगा जॉब फेअर’ची संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे संयोजकांनी सांगितले.

पॅकेजचे आकर्षण

‘मेगा जॉब फेअर’ १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठ कॅम्पस आणि जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अनुभव आणि शिक्षण या पात्रता पाहून वेतन निश्चित करण्यात आले होते. पहिलीच नोकरी असल्यामुळे अनुभवासाठी काही दिवस कमी वेतनात काम करण्याची विद्यार्थी तयारी होती. बहुतेक कंपन्यांचे वेतन ८० हजार ते एक लाख ८० हजार रूपये (वार्षिक) आहे. विशिष्ट कौशल्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सहज नोकरी मिळाली. तर इंग्रजी व हिंदी भाषा कमकुवत असल्यामुळे बहुतेक उमेदवारांना संधी मिळाली नाही. विद्यापीठाने घेतलेल्या ‘कम्युनिकेश स्किल ट्रेनिंग’ कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला.

‘मेगा जॉब फेअर’ला विद्यार्थी आणि कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्राथमिक टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांची कंपनीत पुन्हा मुलाखत होऊन अंतिम निवड करण्यात येईल. मुलाखतीत संवाद कौशल्य उत्तम असलेल्या सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- डॉ. गिरीश काळे, प्रशिक्षण व सेवायोजन अधिकारी, विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धार्मिक स्थळांबद्दलची बैठक बारगळली

$
0
0

धार्मिक स्थळांबद्दलची बैठक बारगळली
हायकोर्टाचे लेखी आदेश नाहीत, आज पुन्हा होणार बैठक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या संदर्भात महापालिकास्तरीय समितीने नेमकी कोणती भूमिका घ्यायची, आक्षेपांची सुनावणी घ्यायची की नाही याबद्दल हायकोर्टाचे लेखी आदेश प्राप्त न झाल्यामुळे समितीची गुरुवारी आयोजित करण्यात आलेली बैठक बारगळली. आता उद्या शुक्रवारी समितीची बैठक होणार आहे.
महापालिका क्षेत्रातील अवैध आणि बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार २८ जुलैपासून महापालिकेने कारवाई सुरू केली. ८ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीच्या वेळी हायकोर्टाने महापालिकेला आदेश देताना महापालिकास्तरीय समितीची बैठक घ्या, प्राप्त झालेल्या आक्षेपांबद्दल संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्या, असे स्पष्ट केल्याचे बोलले जात होते, परंतु या संदर्भात हायकोर्टाचे सुस्पष्ट लेखी आदेश मात्र महापालिकेला प्राप्त झाले नव्हते. गुरुवारी सकाळपर्यंत हे आदेश प्राप्त होतील, अशी अपेक्षा ठेऊन पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता समितीची बैठक आयोजित केली होती. बैठकीला समिती सदस्य व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीच्या संदर्भात माहिती देताना आयुक्त डी. एम. मुगळीकर म्हणाले, ‘बैठक सुरू होईपर्यंत हायकोर्टाचे लेखी आदेश पालिकेला प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे आजची बैठक स्थगित करण्यात आली. कोणताही निर्णय बैठकीत घेण्यात आला नाही. दुपारपर्यंत हायकोर्टाचे लेखी स्वरुपातील आदेश प्राप्त होतील, अशी अपेक्षा आहे. लेखी आदेश प्राप्त झाल्यावर उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता पुन्हा समितीची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार समितीच्या बैठकीत निर्णय घेतले जातील.’
बैठकीला जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार रमेश मुनलोड, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त दीपाली घाटगे यांच्यासह सिडको, म्हाडा, एमआयडीसी, वीज मंडळ, वक्फ बोर्ड आदी तेरा कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते.
आक्षेपांचा ओघ सुरू
धार्मिक स्थळांबद्दलच्या महापालिकास्तरीय समितीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या संदर्भात आक्षेप दाखल करण्यासाठी नागरिकांची संशोधन केंद्रात गर्दी उसळली. ठोस पुरावे, नकाशे जोडून नागरिकांनी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्याकडे आक्षेप दाखल केले. मुगळीकर यांची सर्व आक्षेपअर्ज ठेऊन घेतले. हायकोर्टाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटाचे हप्ते थकले; महिलेचे अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बचत गटाचे हप्ते थकल्यामुळे घाटी हॉस्पिटल क्वाटर्स येथील महिलेचे वैजापूर येथील महिलांनी अपहरण केले. हा प्रकार बुधवारी सकाळी नऊ वाजता ‌घडला. या महिलेची वैजापूर येथून बेगमपुरा पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी सहा महिलांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटी हॉस्पिटल क्वाटर्स येथील सुनील लक्ष्मण साठे (वय ४४) यांच्या पत्नीने पाच वर्षांपूर्वी वैजापूर येथील महिला बचतगटाची सभासद होऊन कर्ज घेतले होते. बचत गटाचे दोन महिन्यांचे हप्ते थकले होते. या कारणावरून मंगळवारी सकाळी सहा अनोळखी महिला साठे यांच्या घरी आल्या. त्यांनी साठे यांच्या घरात बळजबरीने घुसून साठे यांच्या पत्नीस शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्यांना बळजबरीने रिक्षात बसवून वैजापूर येथे घेऊन गेल्या. साठे यांच्या पत्नीने साठे यांना फोनवर ही माहिती दिली. या माहितीवरून साठे यांनी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठून या महिलांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

चार तासात सुटका

गुन्हा झाल्यानंतर तपास अधिकारी राहुल रोडे यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली. मध्यरात्रीच त्यांनी पथकासह वैजापूर गाठले. तेथील समर्थनगर भागात पीडित महिलेला ठेवले होते. ही महिला मोबाइलवरून पतीच्या संपर्कात होती. पोलिसांनी समर्थनगर भागातील घराचा शोध घेत महिलेची सुटका केली. कोर्टाच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार महिला आरोपींना रात्री अटक करता येत नसल्याने त्यांना हजर राहण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोडे, शेख शकील, देवा सूर्यवंशी व महिला पोलिस शहा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’ च्या कामाची मुदतवाढ ‘जीबी’ च्या मान्यतेशिवाय

$
0
0

‘भूमिगत’ च्या कामाची मुदतवाढ ‘जीबी’ च्या मान्यतेशिवाय
स्थायी समितीच्या बैठकीत कार्यकारी अभियंत्याची कबुली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारण सभेच्या मान्यतेशिवाय कंत्राटदाराला चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली, अशी कबुली महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याने गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
भूमिगत गटार योजनेच्या कामाचे वाभाडे भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे व शिवसेनेचे नगरसेवक राजू वैद्य स्थायी समितीच्या मागील तीन बैठकांपासून काढत आहेत. आज गुरुवारी झालेल्या बैठकीत देखील त्यांनी भूमिगत गटार योजनेचा मुद्दा लावून धरला.
राजगौरव वानखेडे म्हणाले, भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ देताना सक्षम प्राधिकरण असलेल्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात आली होती का, याचा खुलासा करण्यात यावा. सभापती गजानन बारवाल यांनी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांना खुलासा करण्यास सांगितले. अफसर सिद्दिकी म्हणाले, मुदतवाढ देण्याचे काम ‘रुटीन’ काम होते. त्यामुळे आयुक्तांच्या अधिकारात कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली. सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात आली नाही, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले. या योजनेच्या कामासाठी १०० कोटी रुपये कर्ज काढण्याचा प्रस्ताव देखील सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला नाही. अशा प्रकारच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक नव्हते, का असे वानखेडे म्हणाले. यावर खुलासा करताना अफसर सिद्दिकी म्हणाले, हडकोकडून कर्ज घेण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवण्यात आला होता. २०१४ ते २०१६ पर्यंतच्या थर्डपार्टी ऑडिटचा मुद्दा वानखेडे यांनी मांडला. या काळातील थर्डपार्टी ऑडिट कुणाच्या माध्यमातून केले, असा सवाल त्यांनी केला. थर्डपार्टी ऑडिटसाठी संस्था नियुक्त करण्याची प्रक्रिया २०१५ यावर्षी सुरू झाली. वाटाघाटीत बराच वेळ गेला, जेव्हा प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा सुरुवातीपासून ऑडिट करण्याचे काम त्या संस्थेने सुरू केले, तोपर्यंत ५० टक्केपेक्षा जास्त काम झाले होते, असेही अफसर सिद्दिकी यांनी स्पष्ट केले.
पीएमसीवरील कारवाईचा अहवाल द्या

भूमिगत गटार योजनेचे काम योग्य प्रकारे सुरू आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पीएमसीची आहे. कामात ज्या काही त्रुटी आढळून आल्या. त्याची तपासणी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याचे काम पीएमसीने करायला हवे, पण पीएमसी हे काहीच करताना दिसत नाही, असा आक्षेप राजू वैद्य यांनी घेतला. जबाबदारी झटकणाऱ्या पीएमसीवर काय कारवाई केली याचा अहवाल स्थायी समितीच्या बैठकीत सादर करा, अशी मागणी त्यांनी केली. सभापतींनी देखील कारवाईचा अहवाल मांडण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्याला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या पगारासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विनाअनुदानित कॉलेजांच्या प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी विनाअनुदानित कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी शिक्षण उपसंचालक, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली.
विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेज, उच्चमाध्यमिक हायस्कूलचे शिक्षकांचे १७ वर्षांपासून प्रश्न मार्गी लागले नाहीत. मागील आठवड्यापासून या शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे, त्यामुळे कॉलेजही ठप्प आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसात होत आहे. आपल्या शिक्षकांची ही अवस्था लक्षात घेत, गुरुवारी विविध कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. शिक्षकाच्या अवस्थेला शासन जबाबदार असल्याचा आरोप करत, शिक्षकांचा हा प्रश्न मार्गी लावावा, त्यांच्या मागण्या मान्य करत त्यांना न्याय द्यावा, या आशयाचे निवेदनही विद्यार्थ्यांनी दिले. या प्रश्नी शासनाने लक्ष न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. यावेळी कृष्‍णा दाभाडे, ऋषिकेश आहेर, योगेश मेहेर, राजू मोहिते, ज्योती इंगळे, पूजा मोहिते, दीपाली भोकरे, जयश्री खरात, विश्वनाथ खरात, आकाश सातपुते, अक्षय मोहिते, भास्कर राठोड, विकास राठोड, आकाश धनवई, नंदकिशोर पवार, द्वारकादास मोहिते, निलेश फुके, अक्षय जाधव, संतोष मदन, सोपान शिंदे, दादाराव शिंदे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलास काकडे सलग दोन वर्षापासून करत होता छळ

$
0
0

विलास काकडे सलग दोन वर्षापासून करत होता छळ
शाळेतील पालकांचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना शहरातील नामांकित शाळेमध्ये घडली. विलास काकडे हा दोन वर्षापासून विद्यार्थिनींची छेड काढायचा असा आरोप पालकांनी केला आहे. पालकांनी गुरुवारी आठवी, नववी, दहावीतील विद्यार्थ्यांची चौकशी केली. अनेक मुलींनी काकडेच्या तक्रारी केल्याचे पालकांनी सांगितले.
नेहमी वर्गात येता-जाता काकडे विद्यार्थ्यांनीशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. विकृत चाळे करायचा. विद्यार्थिनींना घरी सांगू नये म्हणून दबावही आणायचा, असेही पालकांनी सांगितले. एका मुलीने आपल्या पालकांना ही बाब सांगितल्याने हा प्रकार उघड झाला. संबंधित शाळा प्रशासन पालकांवर तक्रार न करण्यासाठी दबाव आणत होते, परंतु पालकांनी पोलिसांना हा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी शाळेत धाव घेतली. त्यामुळे शाळेलाही तक्रार देणे भाग पडले. पालक, शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनंतर विलास काकडे विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकृत शिक्षक
विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेल्या की काकडे हा स्वच्छता गृहाबाहेर उभा रहायचा. ‘तू कुठे शिकवणीला जाते, सोयाडला कोण येते, घ्यायला कोण येते, तू एकटी जात असशील तर, सांग मी घ्यायला येतो, तुम्हाला शिकवणी बुडवायला आवडते का, तू माझ्यासाठी खूप काही करू शकते, असे काकडे सातत्याने मुलींना उद्देशून म्हणायचा, असे मुलींनी पालकांना सांगितले. घरी सांगू नये म्हणून मुलींना गुण कमी देईन, असा दबावही टाकायचा, असाही आरोप पालकांनी केला आहे.
गर्ल वेलफेअर कमिटी
शाळेत गर्ल वेलफेअर कमिटी असते. दर तीन महिन्याला तिची बैठक घेण्याच्या सूचना असतात. असे असतानाही या प्रकारांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अशी कमिटी केवळ नावापुरती असते काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
शाळेतील सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी केल्याचे पालकांनी सांगितले. पालकांच्या मागणीनंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शिक्षकांची पात्रता काय
शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक करण्याची पात्रता काय असावी, याचे निकष असताना शाळा त्याकडे दुर्लक्ष करतात असा पालकांचा आरोप आहे. माध्यमिक वर्गासाठी महिला शिक्षकांचीच नेमणूक करावी, शिक्षकाच्या वागणुकीची माहिती घेऊनच नेमणूक करावी, अशी मागणी पालकांनी केली.

वर्गमित्रांनी मुलींना दिला धीर

हा शिक्षक मुलींसोबत लगट करण्याचा, त्यांच्याशी अश्लिल संवाद साधायचा, याबाबत बोलू नका असा दबाव टाकायचा. या प्रकाराने घाबरलेल्या मुलींना वर्गातील मुलांनी धीर दिला. पालकांना या प्रकाराबद्दल सांगा, असे या मुलांनी सांगितल्यावर संबंधित मुलीने हिम्मत केल्याची चर्चा पालकांमध्ये होती.

शारिरीक लगट

क्लास संपल्यावर भेटायला बोलावणे, मुलीकडे एकटक पाहणे, टेबलाखालून वारंवार पाहणे, शेजारी बसून पाठीवर हात फिरवणे, वैयक्तिक माहिती विचारणे, खांद्यावर हात टाकून बोलणे, जवळ घेण्याचा प्रयत्न करणे, दूर गेल्यास माझ्यासाठी एवढेही करू शकत नाही का असे म्हणणे, असे प्रकार हा शिक्षक करीत असे, अशी मुलींची तक्रार आहे.

तात्काळ कारवाई करा - युवा सेना

या शाळेतील अश्लिल कृत्य करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. पोलिस निरीक्षकांना याबाबत त्यांनी निवेदन दिले. निवेदनावर शहर अधिकारी हनुमान शिंदे, संदीप लिंगायत, शेखर जाधव, स्वप्निल डिडोरे, विकास रायभान, सागर खरगे, संकेत डेईफोडे, विशाल गायके यांची स्वाक्षरी आहे.

तात्काळ अटक करा - मनविसे
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याप्रकरणी निवेदन देत संबंधित शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष संकेत शेटे, विशाल विराळे, गणेश ढगे, योगेश घाडे, कृष्णा भुसारे, धनंजय देशमुख यांची नावे आहेत.
संबंधित शिक्षक मुलींना छळत होता. तुझे आई-वडील काय करतात. आईचा नंबर काय, शिकवणी कोठे लावली, अशा प्रकारे बोलायचा. मुली फारसे बोलत नाहीत. आमच्या मुलीने याबाबत सांगितल्यानंतर आम्हाला संताप आला. या अगोदरही मुलींनी त्याच्याबाबत तक्रारी दिल्या होत्या, परंतु त्याला केवळ समज देण्यात आली. आम्हाला आमच्या मुलीने सांगितल्यावर आम्ही हा प्रकार बुधवारी प्राचार्यांना सांगितला. त्यानंतर अनेक विद्यार्थिनींनीही तक्रारी केल्या.
पीडित मुलीचे पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनाचा पायलट प्रोजेक्ट

$
0
0

इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनाचा पायलट प्रोजेक्ट
उद्योगजगताला मिळणार चालना; १५० विद्यार्थी, ७२ प्राध्यापक, ४० उद्योग समूह, ७२ प्रकल्प एकत्र येणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
युरोपमध्ये विविध इन्स्टिट्यूट तंत्रज्ञान विकसित करतात, त्यानंतर कंपन्या ते तंत्रज्ञान आत्मसात करतात. अशाच प्रकारचा पायलट प्रकल्प औरंगाबादेत राबवण्याचा निर्णय औरंगाबादेतील अभियांत्रिकी शैक्षणिक संस्था आणि मराठवाडा असोशिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर (मसिआ) च्या वतीने राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात कांचनवाडीतील सीएसएमएसएस कॉलेजमध्ये करण्यात आली.
कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित एका परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या प्रोजेक्टमध्ये १५० विद्यार्थी, ७२ प्राध्यापक, ४० उद्योग समूह आणि ७२ प्रकल्प आहेत. यामध्ये ऑटोमेशनचे ३५, डिजिटल टेक्नॉलॉजीच्या ११ प्रकल्पांचा समावेश आहे. पुढील २ महिन्यात हे विद्यार्थी आपल्या प्रकल्पावर काम करणार असल्याची माहिती या कार्यक्रमात तसवीर अली यांनी दिली. या कार्यक्रमाला राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य सुहास मार्कंडेय, सीएसएमएसएसचे अध्यक्ष रणजीत मुळे, मासिआचे अध्यक्ष सुनील कीर्दक, तसवीर अली, संदीप नागोरी, प्रसाद कोकीळ, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. मजहर फारुकी, अभिनव माने, तुकाराम कंदाकुरे, ज्ञानदेव राजळे, सचिव अनिल पाटील, किरण जगताप, अब्दुल शेख यांची उपस्थिती होती. स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तेची गरज असल्याचे मत तुकाराम कंदकुरे यांनी व्यक्त केले. दयानंद मोडणी यांनी आपल्या कामाची माहिती देत कमी खर्चात गुणवत्तापूर्वक उत्पादनाबाबत सांगितले. सुनील किर्दक यांनी विद्यार्थ्यांनी उद्योगांमध्ये जाऊन कार्यपद्धती अभ्यासावी आणि त्यानंतर त्यात काय बदल करता येतील याचा अभ्यास करावा असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात मार्कंडेय यांनी आपला देश उद्योगाच्या प्रगतीवर अवलंबून आहे, मेक इन इंडियाच्या माध्यमातून इथेच तंत्रज्ञान येणार असल्याने फायदा होणार आहे, ही कार्यशाळा पाहून आपण भारावून गेल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीस सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गुरुवारपासून विशेष फेरी सुरू झाली. सायंकाळी रिक्त जागांचा तपशील व कटऑफ वेबसाइटवर जाहीर करण्यात आले. चौथ्या फेरीला मुदतवाढ देण्यात आल्याने विशेष फेरीचे वेळापत्रकही बदलले. १९ ऑगस्टपर्यंत ही फेरी चालणार आहे.
औरंगाबाद शहरात अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रथमच ऑनलाइन पद्धतीने होत आहे. प्रवेश प्रक्रियेत ९ जून ते १० ऑगस्टपर्यंत प्रवेशाच्या चार फेरी पूर्ण झाल्या. त्यानंतर रिक्त जागांसाठी विशेष फेरी १० ऑगस्टपासून सुरू आहे. प्रारंभी ८ ऑगस्ट रोजी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. चौथ्या फेरीला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ९ ऑगस्टला विशेष फेरीचे वेळापत्रक बदलण्यात आले. नव्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया १० ते १६ ऐवजी १० ते १९ ऑगस्टपर्यंत असल्याचे जाहीर करण्यात आले. या प्रक्रियेत यापूर्वी एकदाही ऑनलाइन फॉर्म न भरलेल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल.

नवे वेळापत्रक

नव्या वेळापत्रकानुसार गुरुवारी सायंकाळी रिक्त जागांचा तपशील व कटऑफ संकेतस्थळ उपलब्ध केले जाईल. ११ ते १३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्जाचा भाग-२, नवीन अर्ज अपूर्ण अर्ज पूर्ण करू शकतील. ऑनलाइन पसंती क्रमांक भरता येईल. १६ रोजी सायंकाळी ५ वाजता गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. १८ ते १९ या दोन दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

एकूण कॉलेज ११६
प्रवेश क्षमता २४११०
झालेले प्रवेश ११८४४
रिक्त जागा १३२६६

हे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात

- यापूर्वी प्रवेश घेतलेले विद्यार्थी वगळून इतर सर्व विद्यार्थी
- यापूर्वी फेऱ्यामध्ये पहिला पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी (ब्लॉक)
- प्रवेश रद्द केलेले
- प्रवेश नाकारलेले
- कॉलेल अॅलॉट होऊनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी

पसंतीक्रम कसे भरावेत

- चौथ्या फेरीचा कट ऑफ व रिक्त जागा पाहून आपले पसंतीक्रम निश्चित करावेत.
- १० पसंतीक्रम भरणे बंधनकारक आहे. त्याशिवाय भाग-२ अपडेट व सेव्ह होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषी विभागात अपहार; समित्यांमार्फत चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आत्मा तसेच जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणाची कृषी खात्याच्या दोन समित्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे. ऑडिट विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर कागदपत्राची तपासणी केली असून अपहाराची रक्कम मोठी असावी, अशी शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिकाऱ्यांनी मौन बाळगले असून संशयित आरोपी सुनील जाधव याचे एकट्याचे हे काम नसावे, अशी दबक्या आवाजातील चर्चा कर्मचाऱ्यांत आहे.
आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक आणि कृषी अधीक्षक यांच्या बनावट सह्या, रोख नोंदवही, बँक पासबुक, व्हाऊचर फाइल व इतर कागदपत्रामध्ये फेरफार करीत वरिष्ठ लिपिक, रोखापाल सुनील जाधव याने ६६ लाख १९ हजारांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्या गुन्हा क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल करून अटक करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेचे (आत्मा) प्रकल्प संचालक विलास रामराव रेणापूरकर यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

कागदपत्रांची तपासणी

दरम्यान, या अपहार प्रकरणात अन्य कोणते अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत का?, अपहार नेमका किती रुपयांचा, यासह सखोल चौकशीसाठी कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने आत्माचे संचालक एस. बी. खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये यू. आर. घाडगे, आळसे, तसेच दोन लेखाअधिकारी यांचा समावेश आहे. दुसरी समिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची आहे. या समितीला सर्व फाइल देता याव्यात, यासाठी जिल्हा कृषी अधिकारी, सह संचालक कार्यालयातील अधिकारी कृषी अभियांत्रिकी परिसर कार्यालयात दिवसभर तळ ठोकून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य ग्राहक आयोगाचा निवाडा 'हेरंब'च्या बाजूने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्राहकाला उत्तम सेवा पुरवल्यावरही ग्राहक तक्रार मंचात धाव घेऊन नुकसान भरपाई मागणाऱ्या दावेदाराला चपराक देत राज्य ग्राहक आयोगाने हेरंब ट्रॅव्हल्सच्या बाजूने निवाडा दिला आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने एकतर्फी आदेश देत मंगेश कपोते यांनी तक्रादारास नुकसान भरपाई म्हणून १५ हजार व खर्चापोटी अडीच हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला कपोते यांनी राज्य आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.
यशवंत देवसिंग आहेर आणि त्यांच्या पत्नी विजया यांनी आपल्या नातवासह सिमला, मनाली व अन्य स्थळ दर्शन व पर्यटन सहलीबाबत हेरंब ट्रॅव्हल्समध्ये प्रवास खर्च आणि संपूर्ण प्रवासाची माहिती घेतली. ऐन वेळेवर आपला नातू प्रवासात येणार नसल्याचे सांगत आहेर पती-पत्नीने सचखंड एक्स्प्रेसमध्ये प्रवासाला सुरुवात करताना तोकडी रक्कम देत आल्यावर उर्वरित पैसे देऊ, असे हेरंब ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर मंगेश कपोते यांना सांगितले. ग्राहक यशवंत आहेर हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी असल्याने कपोते यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. औरंगाबाद ते सिमला, कुफ्री, मनाली, डलहौसी, अमृतसर, पठाणकोट व परत औरंगाबाद अशा प्रवासाची, तीन तारांकित हॉटेलमध्ये निवासाची व भोजनाची व्यवस्था हेरंब ट्रॅव्हल्सच्या वतीने करण्यात आली. तीस प्रवासी घेऊन हेरंबच्या प्रतिनिधीने सर्वांना ठरल्याप्रमाणे सर्व सोयीसुविधा दिल्या. सर्वांना प्रवास, स्थल दर्शन, निवास, न्याहरी, भोजन यासारख्या सुविधा चोखपणे देण्यात आल्या.
परतीच्या प्रवासात सचखंड एक्स्प्रेसने अमृतसर ते औरंगाबाद अशी व्यवस्था करूनही ग्राहकांच्या विनंतीनुसार झेलम एक्स्प्रेसने पठाणकोट ते मनमाड, असे दुसरे तिकीट काढून देण्यात आले.
हेरंब ट्रॅव्हल्सच्या वतीने ठरल्याप्रमाणे प्रवास, निवास, स्थल दर्शन, भोजन आदी प्रकारच्या सर्व सोयीसुविधा ग्राहकाला दिल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे राज्य ग्राहक आयोगाने मंगेश राजाराम कपोते यांनी हेरंब ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून तक्रारदार यशवंत आहेर व विजया आहेर यांना सेवा दिल्याचे व तक्रारदाराने केलेली तक्रार तथ्यहीन असल्याचे मत नोंदवत आहेर यांची तक्रार फेटाळून लावली. मंगेश कपोते यांची बाजू मंदार माधव दाभोळकर यांनी मांडली.

जिल्हा मंचाचा आदेश

उत्तम सेवा दिल्यावरही ग्राहक यशवंत देवसिंग आहेर यांनी आपल्याला सेवा व्यवस्थित मिळाली नसल्याचे भासवत भुसावळ ते औरंगाबाद टॅक्सी भाडे, तथाकथित मानसिक व शारीरिक त्रासापोटी भरपाई व फिर्यादीच्या खर्चापोटी दहा हजार अशी ३३ हजार २०० रुपये भरपाई मिळावी म्हणून १० ऑगस्ट २०१५ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने एकतर्फी आदेश देत मंगेश कपोते यांनी तक्रादारास नुकसान भरपाई म्हणून १५ हजार व खर्चापोटी अडीच हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युनियन बँक फोडण्याचा प्रयत्न फसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन-सहा बजरंग चौक येथील युनियन बँकेची शाखा फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. चोराने मागील शटर तोडून बँकेत प्रवेश केला. हा प्रकार सोमवारी रात्री साडेदहा मंगळवारी सकाळी सव्वासातच्या दरम्यान घडला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूचे शटरचे लॉक तोडून चोरांनी शटर अर्धवट उघडले. त्यानंतर आत प्रवेश केला. या चोराने मॅनेजरचे केबीन तसेच कॅशियरच्या केबीनमधील ड्रॉवर उघडले. तेथे त्याच्या काहीच हाती लागले नाही. त्यानंतर चोरट्याचे स्ट्राँगरुमकडे मोर्चा वळवला. या ठिकाणी येथील एक वायर त्याने ओढली. हा प्रयत्न यशस्वी होत नसल्याचे पाहून चोरटा पसार झाला. बँकेतील काहीही वस्तू त्याने सोबत नेली नाही. या प्रकरणी बँकेचे मॅनेजर नागनाथ यशवंतराव जोंधळे (वय ५५ रा. शहानगर, बीड बायपास रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार मिनिटात स्ट्राँगरुमपर्यंत

चोरट्याने बँकेत तोंडाला रुमाल बांधून प्रवेश केला. यानंतर अवघ्या चार मिनिटात शटर उघडून त्याने मॅनेजर व कॅशियरचे केबीन फोडले, स्ट्राँग रुमपर्यंत पोहचला. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाले असून हा प्रकार चार मिनिटे चालला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गाला विरोध कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी जोरदार निदर्शने करीत शेतकऱ्यांनी ‘समृद्धी’ला विरोध केला. सध्याच्या चार मार्गांपैकी एकाची ‘समृद्धी’साठी निवड करा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया शासकीय स्तरावर सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्यामुळे प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पळशी येथील शेतकऱ्यांनी निदर्शने करीत प्रशासनाला निवेदन दिले. मागील दीड वर्षांपासून आंदोलन करून बागायती शेती वाचविण्यासाठी संघर्ष करीत आहोत. ‘समृद्धी’ महामार्गासाठी नेमलेले प्रचारक कायद्याबाबत व भूसंपादनाबाबत चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला. नागपूर-मुंबई जोडणारे रस्ते सर्वप्रथम चौपदरी करा, शेतकऱ्यांच्या हिताच्या भूसंपादन कायदा २०१३ ची अंमलबजावणी करा, या मार्गांबाबत शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या हरकतीवर सुनावणी घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एका प्रकल्पासाठी एक दर द्या, ‘एमएसआरडीसी’च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा, राधेश्‍याम मोपलवार यांच्या अधिपत्याखाली नातेवाईक, अधिकाऱ्यांच्या हितासाठी अंतिम प्रकल्प आराखड्याचे री-ऑडिट करून अंतिम प्रकल्प आराखडा रद्द करावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. ‘समृद्धी महामार्ग’ हा औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून जातो. पण, शेतकऱ्यांना योग्य दर दिला नसल्याचा आरोप केला आहे. या निदर्शनात नानासाहेब पळसकर, शिवाजी पळसकर, रफिक पठाण, संजयकुमार पळसकर, काकासाहेब शेळके, राजू राठोड, सुभाष बर्डे, दामोदर शेळके, कालू भाई यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरांची हळुहळु स्टेट बँकेकडे पाठ

$
0
0

औरंगाबादकरांची हळुहळु स्टेट बँकेकडे पाठ
हजारो खाती बंद; सर्व्हिस चार्जेसमधील वाढ व ‌मर्जरचा फटका
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरातील ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाकडे डोळे वटारून पहात असताना औरंगाबादकरांनी तर या बँकेकडे हळुहळु पाठ दाखविणे सुरू केले आहे. शहरात गेल्या चार महिन्यात किमान ३ हजारांहून अधिक खाती बंद झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. खाते बंद केलेले खातेदार खाजगी बँकेकडे वळू लागले अाहेत. स्टेट बँकेच्या सर्व शाखांमधून एकूण ६५ हजाराहून अधिक खाती आहेत.
असोसिएट बँकांचे स्टेट बँकेत झालेले विलिनीकरण, सर्व्हिस चार्जेस वाढविणे, खात्यात कमीत कमी ५ हजार रुपये ठेवणे बंधनकारक करणे, कर्मचारीवर्गाची अरेरावी, खातेदारांकडे होत असलेले दुर्लक्ष अशा विविध कारणांनी ही खाती बंद झाली आहेत. एसबीआयमध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर या बँका ‌विलीन झाल्या आहेत. त्यामुळे स्टेट बँकेच्या शहरातील शाखांची एकूण संख्या ८० झाली. त्यानंतर बँकेने शाखा कमी करून त्यांची संख्या ५५-५६ पर्यंत आणली. यामुळेही अनेक खातेदारांनी आपले खाते बंद करण्याचा निर्णय घेतला.
बिझनेस खाती बंद
एसबीएच, एसबीबीजे, एसबीपी व एसबीआयमध्ये खाते असलेल्या बहुतांश बिझनेसमन, उद्योजक आणि नामांकित व्यक्तींनी स्टेट बँकेमधील आपली खाती बंद केली आहेत. याचा फटका बँकेच्या व्यवसायावर झाला आहे. कमीत कमी ५ हजार रुपये ठेवावे लागतील हे बंधन आल्यापासून तर सर्वसामान्य खातेदार, पेन्शनधारक, मायनर अकाऊंटस, सेव्ह‌िंग्ज खातीही बंद होऊ लागली आहेत.
आकडा सांगणार नाही
ज्यांची विलिनीकरणापूर्वी एसबीआयमध्ये एक किंवा दोन खाती आहेत अशा अनेकांनी एक खाते बंदच करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात ५० शाखा आहेत. प्रत्येक किमान १०० खाती जरी गृहित धरली तरी शहरात एकूण ५ हजार खाती बंद झालीच असणार असा अंदाज स्टेट बँकेच्याच वरिष्ठ सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर वर्तविला. निश्चित आकडा मात्र मिळू शकला नाही.
सध्या स्टेट बँकेमध्ये अकाऊंट बंद होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. एसबीएचमध्ये असलेले अनेक नामांकित बिझनेस अकाऊंट त्या-त्या खातेधारकांनी बंद केले आहेत, यात काही शंका नाही. आता सर्वसामान्यही खाते बंद करू लागले आहेत. हा डाटा बँकेचे अधिकारी देणार नाहीत हे उघड आहे, पण हजारो खाती बंद होत आहेत.
- जगदीश भावठाणकर, नेते, ऑल इंडिया बँक एम्प्लॉई‌ज असोस‌िएशन
मी स्वत: स्टेट बँक ऑफ इंडियातील माझे खाते बंद केले आहे. माझ्याकडील कर्मचारी वर्गाचीही खाती बंद केली आहेत. खात्यात ५ हजार रुपये ठेवा हे बंधन असल्याने माझ्यासह अनेकजण खाती बंद करत आहेत. इतर बँकांचे पर्याय खुले आहेत. मी दुसऱ्या बँकेत खाते सुरू केले आहे.
- रोहन आचलिया, नामांकित खातेदार, स्टेट बँक ऑफ इंडिया
आमच्या बँकेतील किती बँक खाती बंद झाली याचा एकूण डाटा आमच्याकडे नाही. आम्ही या विषयी काहीही सांगू शकत नाही.
- सुनील शिंदे, एजीएम, स्टेट बँक ऑफ इंडिया

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images