Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सेलू तहसीलवर मोर्चा

$
0
0

परभणी - गेल्या दीड महिन्यांपासून परभणी जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा असून पावसाअभावी शेतातील पिके वाळून गेली आहेत. शेतकरी मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. याच मागणीसाठी बुधवारी (१६ ऑगस्ट) सेलू तहसील कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्हा परिषदेचे सभापती अशोक काकडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, अॅड. बालासाहेब रोडगे, पंचायत समितीचे सभापती पुरूषोत्तम पावडे, उपसभापती गोरख भालेराव, डॉ. संजय रोडगे, सारंगधर महाराज, विनायक पावडे, तालुकाध्यक्ष माऊली ताटे, भारत इद्रोके, सचिन शिंदे, गौस लाला, गौतम साळवे, अज्जू कादरी, मीनाताई घोगरे, पंचायत समिती गटनेते आनंद डोईफोडे आदींसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर बोलताना भांबळे म्हणाले, ‘सरकारने शेतकरी तोंडाला पाने पुसली आहेत. फसवी कर्जमाफी केल्याने बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहणार आहेत.’ जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजाणी दुर्राणी म्हणाले, ‘शेतकयांच्या प्रती सरकारची दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे निसर्ग साथ देत नाही तर दुसरीकडे सरकार जगू देत नाही, अशी परिस्थिती शेतकयांची झाली आहे. केवळ आश्वासनाशिवाय मुख्यमंत्री काहीच करत नाहीत. शेतीला हमी भाव नाही शेतकरी माल विकल्यावर शासन भाववाढ करत आहे, अशी विचित्र भूमिका राज्य सरकारची आहे.’
यावेळी सारंगधर महाराज, रोडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. हा मोर्चा टिळक पुतळ्यापासून शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले.

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुका तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकरी मोर्चा काढून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात गणेशमूर्तींचे बुकिंग जोरात

$
0
0

शहरात गणेशमूर्तींचे बुकिंग जोरात
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाने बाजारात हळुहळु उत्साहाचे वातावरण तयार केले आहे. ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे बुकिंग सुरू झाले असून पर्यावरणपूरक आणि शाडूच्या मूर्तींकडे यंदाही कल आहे. शहरात यंदा ४०-५० हून अधिक ठिकाणी मुख्यत्वेकरून शाडूच्या मूर्तींची विक्री सुरू झाली असून, बुकिंग करून ठेवली जाते व गणेश चतुर्थीला मूर्ती नेली जाते. बाजाराचा कल पाहता अनेकांनी हा एक ‘सिझनल बिझनेस’ही सुरू केला आहे.
औरंगपुरा, जिल्हा परिषद मैदानासमोरील दुकाने, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, हडको परिसर, उस्मानपुरा, उल्कानगरी, गजानन महाराज मंदिर परिसर, शिवाजीनगर या भागात यंदा शाडूच्या मूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. बाजारात चैतन्याचे वातावरण येऊ लागले आहे. यंदा जीएसटीमुळे प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू मातीच्या मूर्तींच्या किंमती वाढल्या आहेत. तरीही पर्यावरणपूरक दालनं आणि शाडूमातीच्या मूर्तींवर प्रेम करत असलेल्या दालनांनी मूर्तींच्या किंमती आटोक्यात आहेत. औरंगाबादमध्ये पेण, रत्नागिरी, चिपळूण या गावातून विक्रेत्यांनी स्थानिक विक्रेत्यांशी करार करून विविध मूर्ती पाठविल्या आहेत. कमीत कमी २७५ ते जास्तीतजास्त १० हजार रुपयांपर्यंत मूर्तींच्या किंमती आहेत.
सोशल मीडियाचा पुरेपूर वापर
श्रींची मूर्ती बुकिंग करण्यासाठी आता कार्यशाळेत किंवा दालनांमध्ये जाण्याऐवजी घरबसल्या व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून बुकिंग करण्याची सुविधाही शहरात अनेकांनी उपलब्ध करून दिली आहे. घरगुती गणेशोत्सवासाठीही हल्ली दोन फुटांहून अधिक उंचीच्या गणेशमूर्तींना मागणी आहे. घरबसल्या मूर्ती बुक करता येत असल्याने सर्वच स्तरातून या संकल्पनेचे स्वागत होत असून महिन्याभरात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेकडो मूर्ती बुक झाल्याचे उल्कानगरी येथील मोरया फाउंडेशनचे प्रभू इंगळे यांनी सांगितले. मेसेजमध्ये मूर्तीची उंची, हवा असलेला विशेष अवतार आणि रंगरूप याविषयी माहिती टाकून मूर्ती बुक केल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलावात बुडून दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कन्नड
शिवकालीन तलावात बसलेल्या म्हशींना बाहेर काढण्याच्या नादात तोल जाऊन पडलेल्या तरुणाचा व त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्न करणाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील उंबरखेडा गावाच्या शिवारात बुधवारी सायंकाळी घडली आहे.

विष्णू बद्रीनाथ चव्हाण (वय २६) व रवींद्र विजय चव्हाण (रा. उंबरखेडा) अशी मृतांची नावे आहेत. अंपग असलेला रवींद्र चव्हाण हा बुधवारी सायंकाळी गावाजवळील शिवकालीन तलावाजवळ असलेल्या म्हशी आणण्यासाठी गेला होता. सुमारे आठ ते दहा फूट पाणी असलेल्या तलावाच्या भिंतीवरून तो पाय घसरून पडल्याचे विष्णू चव्हाण याने पाहिले. रवींद्रला वाचवण्यासाठी विष्णूने तलावात उडी मारली. त्यावेळी दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना गावात कळाल्यानंतर गावकऱ्यांनी पिशोर पोलिसांच्या मदतीने बुधवारी रात्री नऊच्या सुमारास मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

चार महिन्यात आठ मृत्यू
३० ऑक्टोबर २०१६ रोजी आदर्श वसाहत येथील चिलारदरा तलावात चार शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून अंत झाला होता. या पंचक्रोशीतील गावावर दुसऱ्यांदा शोककळा पसरली. कन्नड तालुक्यात गेल्या चार महिन्यांत तलावात बुडून मृत्यू झाल्याची चौथी घटना असून, यात आठ जणांना मृत्यूने गाठले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेन डेड पेशंट ५०; ट्रान्स्प्लान्ट एखादेच

$
0
0

औरंगाबाद ः शहरामध्ये १९ महिन्यांमध्ये १३ ब्रेन डेड रुग्णांकडून अवयवदान झाल्याबाबत कौतुक होत असले तरी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील केवळ दोन जिल्ह्यातच आतापर्यंत अवयवदान झाले असून, तब्बल सहा जिल्ह्यांत एकही अवयवदान झालेले नाही आणि अवयवदानासाठी आवश्यक ‘नॉन-ट्रान्स्प्लान्ट ऑर्गन रिट्रॅव्हल सेंटर’देखील (एनटीओआरसी) एकही नसल्याची वस्तुस्थिती आहे. एकट्या औरंगाबाद शहरात महिन्याभरात ब्रेन डेड होणाऱ्यांची संख्या किमान १० ते १५, तर संपूर्ण मराठवाड्यात ब्रेन डेड होणाऱ्यांची संख्या किमान ५० आहे. या पार्श्वभूमीवर अवयवदानाचे प्रमाण महिन्याला एकसुद्धा नसल्याचे स्पष्ट झाल्याशिवाय राहात नाही.

औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी मराठवाड्यातील पहिले अवयवदान झाले. त्यानंतरच्या झपाट्याने अवयदान झाले; परंतु सहा महिन्यांत अवयवदान मंदावले व साडेतीन महिन्यांनी १५ ऑगस्ट रोजी १३ वे अवयवदान झाले. आतापर्यंत हृदयासह सुमारे ५० अवयवांचे दान झाले असले तरी ते केवळ औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यातच झाले आहे. इतर सहा जिल्ह्यांमध्ये एकही अवयवदान झालेले नाही. अवयवदानासाठी आवश्यक असलेले ‘एनटीओआरसी’ केंद्रदेखील या सहा जिल्ह्यांत नसल्याची वस्तुस्थिती आहे. धक्कादायक बाब म्हणजेच राज्य सरकारकडून अवयवदानाचा प्रचार-प्रसार जोशात केला जात आहे; परंतु मराठवाड्यातील केवळ दोनच शासकीय रुग्णालयांना रिट्रॅव्हल सेंटरची मान्यता आहे. अवयवदानाची चळवळ पुढे नेण्यासाठी सर्व जिल्हा सामान्य रुग्णालये व मोठी-मध्यम खासगी रुग्णालये रिट्रॅव्हल सेंटर व्हावीत, असे आवाहन औरंगाबाद ‘झेडटीसीसी’ने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना लेखी पत्राद्वारे केले होते, मात्र पुढे काहीही झालेले नाही.

सेंटरअभावी लातूरची संधी हुकली
अलीकडे लातूरच्या खासगी रुग्णालयात ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. मात्र संबंधित रुग्णालय रिट्राव्हल सेंटर नसल्याने अवयवदान होऊ शकले नाही. ‘झेडटीसीसी’मार्फत अवयवदानाची शस्त्रक्रिया होऊ शकते; परंतु रिट्राव्हल सेंटरशिवाय शस्त्रक्रिया होऊ शकत नाही, असे ‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी ‘मटा’ला सांगितले.

मराठवाड्यात महिन्याला ब्रेन डेड होणाऱ्या रुग्णांची संख्या नक्कीच पन्नासच्या पुढे आहे व त्यांचे अवयवदान झाले तर शेकडो लोकांना जीवनदान-दृष्टिदान मिळेल. त्यामुळे रिट्राव्हल सेंटरसाठी रुग्णालयांनी पुढे आले पाहिजे.
- डॉ. मिलिंद दुनाखे, न्युरोसर्जन, औरंगाबाद

मराठवाड्यातील ब्रेन डेड रुग्णांची महिन्याभरातील संख्या हमखास पन्नासच्या पुढे असली तरी गैरसमज व मानसिकतेचा मोठा अडसर अवयवदानात आहे. हे अडथळे पार केल्याशिवाय अवयवदान वाढणे शक्य वाटत नाही.
- डॉ. भावना टाकळकर, न्युरोसर्जन, औरंगाबाद

‘रिट्राव्हल सेंटर’सह डॉक्टरांमध्ये अवयवदानाविषयी जनजागृती वाढण्यासाठीच प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ‘नोटो’तर्फे निधी दिला जाणार आहे. समन्वयकही दिले जातील. त्यामुळे काही वर्षांत अवयवदानाचे प्रमाण उल्लेखनीरित्या वाढेल.
- डॉ. अविनाश सुपे, सल्लागार समिती अध्यक्ष, रोटो, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासनाची केली फसवणूक; वकिलास ठोकल्या बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाच्या ताब्यात असणाऱ्या भागीरथी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या नक्कल अर्जात खाडाखोड करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी वकील राहुल एकनाथ शिंदे (रा. भीमनगर, भाऊसिंगपुरा) याला गुरुवारी (१७ ऑगस्ट) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता शनिवारपर्यंत (१९ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी. बी. पवार यांनी दिले.

या प्रकरणात न्यास नोंदणी कार्यालयातील अधीक्षक संजय सुरेशचंद्र जोशी यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, हे बनावट कगादपत्र आरोपी वकील राहुल शिंदे, धमार्दाय सहआयुक्त कार्यालयातील अधीक्षक ल. प्र. थोरात व कनिष्ठ लिपिक सागरसिंग गुसिंगे यांना हाताशी धरून बनविल्याचे धमार्दाय सहआयुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी वकील राहुल शिंदे याला गुरुवारी अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील बी. एन. कदम यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईचे वेळापत्रक आज कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धार्मिक स्थळांवरील कारवाईचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, ते शुक्रवारी हायकोर्टात सादर केले जाणार आहे. हायकोर्टाने त्यावर दिलेल्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. कायदा सुव्यवस्थेबद्दल पोलिसांचा पुन्हा एकदा अभिप्राय मागवला आहे, असे त्यांनी सांगितले.

धार्मिक स्थळांवरील कारवाईसंदर्भात महापालिकास्तरीय समितीची बैठक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर मुगळीकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘धार्मिक स्थळांवरील कारवाईसंदर्भात आम्ही आमचे वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक शुक्रवारी हायकोर्टाच्या समोर सादर केले जाईल. हायकोर्टाने या वेळापत्रकाला मान्यता दिली, तर या वेळापत्रकानुसार कारवाई केली जाईल. अन्यथा हायकोर्ट जे वेळापत्रक ठरवून देईल त्यानुसार कारवाई करण्याची महापालिकेची तयारी आहे. प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार करणे, त्यावर निर्णय घेण्याबद्दलही वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. ते देखील हायकोर्टात सादर करण्यात येईल.’

सार्वजनिक जागा व शासकीय जागेवरील धार्मिक स्थळे आणि खासगी जागवरील धार्मिक स्थळे अशा दोनच गटांत धार्मिक स्थळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुगळीकर यांनी दिली. शासकीय कार्यालयांच्या जागेवर बांधलेल्या धार्मिक स्थळांबाबत संबंधित कार्यालयाचे काय म्हणणे आहे, हे देखील मागवले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

११०० धार्मिक स्थळांबद्दल पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करा, असे पोलिसांना कळविण्यात आले आहे. धार्मिक स्थळे नियमित करण्याचा निर्णय घेतला, तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते. कायदा सुव्यवस्थेबद्दल काय स्थिती निर्माण होऊ शकते, याबाबत धार्मिक स्थळनिहाय अहवाल द्या, असे पोलिसांना कळविल्याची माहितीही त्यांनी दिली.

नवीन ५५० आक्षेपांची भर
धार्मिक स्थळांसंदर्भात यापूर्वी ८०६ आक्षेप दाखल झाले आहेत. आता नव्याने ५५० आक्षेपांची त्यात भर पडली आहे, अशी माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. १८ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत आक्षेप अर्ज स्वीकारले जातील. पूर्वीच्या आक्षेपांची छाननी करून, स्थळ पाहणी करून त्याची वर्गवारी करण्याचे काम केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाताला काम मिळेना, मजुरीही नि‌म्म्यावर

$
0
0

औरंगाबाद ः भर पावसाळ्यात रखरखीत ऊन... चाऱ्याअभावी जनावरांची खपाटीला गेलेले पोट... आणि पेरणीसाठी रानात पैसे फेकून आभाळाकडे नजरा लावलेला शेतकरी... असे विषण्ण चित्र पैठण तालुक्यात दिसते. स्वतःच्या शेतात पेरणी केली, पण पावसाअभावी पिकांची वाढ खुंटलेली. हाती फार काही लागणार नाही, याची मनोमन खात्री पटल्याने डोक्यावर कर्जाचा डोंगर वाहणारे असंख्य हात बागायतदारांची मजुरी करण्यात गुंतले आहेत. मागेल तेवढी मजुरी मिळण्याचे दिवसही आता सरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्या मजुरीवर काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस पैठण तालुक्यात आहे. धरण उशाला असताना तालुक्यातील शेतकरी तहानलेले आहेत. तालुक्यातील बालानगर, खेर्डा, पारुंडी, पारुंडी तांडा, सुंदरवाडी, तुपेवाडी, आडूळ खुर्द, दरेगाव आदींसह परिसरातील १५ ते २० गावांमध्ये खरिपाची राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांवर बागायतदारांकडे कामाला जाण्याची वेळ आली आहे. बड्या शेतकऱ्यांकडे फवारणी, खुरपणी अशी कामे त्यांनी करावी लागत आहेत. गेल्यावर्षी एका पुरुषाला दिवसाकाठी २५० ते ३०० रुपये, तर महिलांना १५० ते २०० रुपयांपर्यंत मजुरी मिळत होती. आता पुरुषांना केवळ २०० रुपये व महिलांना १०० रुपये मजुरी मिळत आहे.

मनरेगाची कामे मिळेनात
बालानगरपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर सुमारे साडेसातशे मतदारसंख्या असलेल्या पारुंडी तांड्यावरील स्थितीही वेगळी नाही. करपलेल्या पिकांमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी मिळेल ते काम करायला तयार आहेत. गावामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून देण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली, मात्र गावात एकही काम सुरू करण्यात आले नसल्याचे उपसरपंच बाजीराव राठोड यांनी सांगितले. मागेल त्याच्या हाताला काम देण्याचा प्रशासनाचा वायदा गावकऱ्यांपर्यंत पोचलाच नसल्याचे चित्र गावामध्ये आहे.

मजुरांची स्थिती बिकट
लहान शेतकरीच आठवड्याचा बाजार होईल, या आशेने बड्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मजुरीच्या कामावर जात आहेत, मात्र संसाराचा गाडाच मजुरीवर असलेल्यांची अवस्था बिकट झाली आहे. पारुंडी तांड्यावरील शेतमजूर विजय राठोड म्हणाले की, दीडशे ते दोनशे रुपये मजुरीवर शेतीत काम मिळते, मात्र पाऊस नसल्याने काम मिळवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. शासनाने मजुरांच्या हाताला दिल्यास मुलाबाळांना सुखाचे दोन घास देऊ शकू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत अनधिकृतपणे राहणाऱ्यांवर गुन्हे

$
0
0

औरंगाबाद ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय निवासस्थानांमध्ये वर्षानुवर्षे अनधिकृतपणे राहणाऱ्या आठ व्यक्तींवर पहिल्या टप्प्यात फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. या संदर्भात घाटी प्रशासनाच्या वतीने बेगमपुरा पोलिस ठाण्याला पत्र देण्यात येणार असून, लवकरच ही कारवाई होऊ शकते.
घाटीच्या सेवेत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी घाटी परिसरातच शासकीय निवासस्थाने आहेत. मात्र, या निवासस्थानांमध्ये वर्षानुवर्षे अनधिकृतपणे राहणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. त्यातच अनेक कर्मचाऱ्यांनी ही निवासस्थाने भाड्याने दिली आहेत व भाडेकरुंनीदेखील चक्क पोटभाडेकरू ठेवले आहेत, तर काही कर्मचारी निवृत्त होऊनदेखील त्यांनी निवासस्थाने सोडलेली नाही. तसेच घाटीशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींचे वराह पालनापासूनचे अनेक प्रकारचे ‘उद्योग’ शासकीय निवासस्थान परिसरात वर्षानुवर्षे सर्रास सुरू आहेत. परिणामी, घाटीचा निवासस्थान परिसर हा अनधिकृत व्यक्तींचा व व्यवसायांचा अड्डा बनला आहे. या प्रकारांवर यापूर्वी कधीच कठोर कारवाई न झाल्यामुळे हे अनधिकृत प्रकार बोकाळत गेले. मात्र, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी अनधिकृत व्यक्तींविरुद्ध मोहीम सुरू केली असून, अनधिकृतपणे राहणाऱ्यांची छाननी करुन त्यांना नोटिस बजावण्यात आली आहेत. घाटीचे एकूण कर्मचारी किती, त्यातील किती कर्मचाऱ्यांनी निवासस्थानांचा लाभ घेतला आहे, प्रत्यक्षात कोणता कर्मचारी कोणत्या निवासस्थानामध्ये राहतो आणि कोणत्या निवासस्थानामध्ये कोण अधिकृतपणे आणि कोण अनधिकृतपणे राहतो, याची तपासणी घाटी प्रशासनाने मुळातून सुरू केली आहे. यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये ६४ निवासस्थानांपैकी ८ निवासस्थानांमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या व्यक्ती आढळून आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्वीन समजूनच रॅम्पवर उतरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपण ज्या व्यक्तीवर, ज्या गोष्टीवर प्रेम करतो. त्या व्यक्तीची खूप काळजी घेतो. आजपासून ही सुरुवात स्वतःपासून करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणार नाही. तोपर्यंत इतरांवर प्रेम कसे कराल? स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या आवडी जोपासा, स्वतःला क्वीन समजूनच रॅम्पवर उतरा तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमचे उपजत सौंदर्य खुलेल, असे असा सल्ला रेणुका पांडे यांनी दिला. ‘मटा मिसेस औरंगाबाद’ स्पर्धेच्या स्पर्धकांना ग्रुमिंग सेशनमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र टाइमच्या वतीने घेण्यात येत असलेल्या या स्पर्धेचे प्रेझेंटिंग स्पॉन्सरर सानिया डिस्ट्रीब्युरर्स हे आहेत. या उपक्रमाचे रेडिओ पार्टनर आहेत रेडिओ मिर्ची ९८.३, तर व्हेन्यू पार्टनर आहेत हॉटेल मॅनोर. सृष्टी अॅग्रो टुरिझम सेंटर हे स्पर्धेचे अॅग्रो टुरिझम स्पॉन्सरर आहेत तर गोल्ड जिम हे स्पर्धेचे फिटनेस पार्टनर आहेत. ब्युटी वर्ल्ड या स्पर्धेचे ब्युटी पार्टनर आहेत.
‘मटा मिसेस औरंगाबाद’ स्पर्धेचा उत्साह शिगेला पोचला असून गुरुवारी झालेल्या ग्रुमिंग सेशनमध्ये स्पर्धकांनी तज्ज्ञांकडून सौंदर्य स्पर्धेतील बारकावे समजून घेतले. मार्गदर्शक चेतन कांबळे व रेणुका पांडे या दोघांनी महिलांचा आत्मविश्वास तर उंचावलाच. शिवाय सौंदर्य स्पर्धा ही स्पर्धेपेक्षाही स्वःची ओळख आहे असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला. ‘मटा’च्या मिसेस औरंगाबाद स्पर्धेला महिलांनी अक्षरक्षः उचलून धरले असून गृहिणींपासून ते नोकरदार, शिक्षिका, डॉक्टर, ब्युटीशियन अशी सर्वांचीच पसंती मिळाली आहे. ग्रुमिंग सेशनमध्ये प्रत्येकीने रॅम्प वॉकचे बारकावे समजून घेतले आणि रॅम्प वॉक करुनही बघितला. सुरुवातीला कोपऱ्या कोपऱ्यात, एकटीने बसलेल्या महिला ग्रुमिंग सेशननंतर आश्वासक दिसल्या. साडी नेसून आलेल्या लाजणाऱ्या गृहिणी नंतर इतक्या मनमोकळ्या बोलत होत्या की, त्यांची भीती कुठल्या कुठे पळाली होती. आता आम्ही रविवारची वाट पाहतोय, अशी प्रतिक्रिया देत सौंदर्यस्पर्धेत आम्हीच बाजी मारू हा विश्वास घेऊनच बाहेर पडल्या.
‘मटा मिसेस औरंगाबाद’ ही अनोखी स्पर्धा २० ऑगस्ट रोजी क्रांती चौक येथील हॉटेल मॅनोर येथे सकाळी नऊ वाजता सुरू होईल. आज (१८ ऑगस्ट) निराला बाजार येथील ‘ब्युटी वर्ल्ड’ येथे ग्रुमिंग सेशन दुपारी १२ ते ५ या वेळेत घेतले जाणार आहे. स्पर्धकांचे वेगवेगळे ग्रुप केले असून त्यांना वेळा दिल्या आहेत. दिलेल्या सूचनेनुसारच स्पर्धक महिलांनी ग्रुमिंगसाठी उपस्थ‌ित राहावे. कोरिओग्राफर चेतन पाटील, रेणुका पांडे आणि ब्युटी वर्ल्डच्या अंजली सामनगावकर या स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेत.

लग्न झाल्यावर महिला आपल्या आवडी-निवडी, त्यांना येत असलेली कला सर्व बाजुला ठेवतात आणि संसारासाठी पूर्ण वेळ देतात. त्यांच्यातली कला जागी ठेवण्यासाठी, त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी ‘मटा’ने ही स्पर्धा आयोजित केली आहे. गृहिणींना याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास वाटतो.
- करण आव्हाड, संचालक गोल्ड जिम
सौंदर्य स्पर्धेमध्ये रॅम्प वॉक अतिशय महत्त्वाचा असतो. रॅम्प वॉक तुमचा अॅटिट्यूड दर्शवतो. रॅम्प वॉकमध्ये खूप काही वेगळे करण्याची गरज नसते. बस तुम्ही आहे ते दाखवतच वॉक पूर्ण करा. रॅम्प वॉक व्यक्तिमत्वाची ओळख असून तो परफेक्ट असण्याचा प्रयत्न करा.
- चेतन पाटील, मार्गदर्शक
स्पर्धेमध्ये सहभाग महत्त्वाचा आहे. कारण कधी कधी इच्छित स्थळापर्यंत पोचण्याचा प्रवास सुंदर ठरतो. मटा मिसेस औरंगाबाद स्पर्धाही असाच सुंदर प्रवास आहे. मला जमेल की नाही, मी भाग घ्यायला हवा का, असा विचार करण्यापेक्षा चलो करके तो देखते है हा अॅटिट्यूड ठेवा. ज्या महिलांनी सौंदर्यस्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला त्यांच्यासाठी ही स्पर्धा नक्कीच सुखद प्रवास असणार आहे.
- रेणुका पांडे, मार्गदर्शिका
​ सौंदर्य स्पर्धेमध्ये तुमचे सौंदर्य सादर करता यायला हवे. हेअरस्टाईल पण तुमचे व्यक्तिमत्व व तुमच्या ड्रेसिंगला साजेशी असावी. केसांचा टेक्चर, ड्रेसिंग यानुसार ओपन अप किंवा अप टू हेअर स्टाईल करता येईल. फॅन्सी ड्रेस असेल तर मेकअप पण फॅन्सी हवा.
- अंजली सामनगावर, संचालक ब्युटी वर्ल्ड
मटा मिसेस औरंगाबाद सौंदर्य स्पर्धा विवाहित महिलांसाठी माईलस्टोन ठरणार आहे. या स्पर्धेमुळे महिलांना व्यासपीठ मिळाले आहे. रोजच्या व्यापातून बाहेर पडून स्वतःचे कलागुण जोपासण्याची संधी आम्हाला मिळाली. मला विश्वास आहे औरंगाबादमधली एक स्मरणीय स्पर्धा म्हणूनच या कार्यक्रमाची ओळख होणार आहे.- प्रणाली चौधरी, स्पर्धक
ग्रुमिंग सेशन खूप उपयोगी ठरले. आत्मविश्वास वाढवण्यासाठी व स्वतःचे व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी नक्कीच मदतच होईल.
- पल्लवी महालकर, स्पर्धक
स्पर्धा कोणतीही असली तरी भीती वाटते. ग्रुमिंग सेशनमुळे भीती काही प्रमाणात कमी झाली. सर्वांसमोर रॅम्प वॉक करता आल्याने आत्मविश्वास वाढला आहे.
- उर्मिला देशपांडे, स्पर्धक
महिलांसाठी स्पर्धा तशा खूप असतात. मात्र, विवाहित महिलांसाठी सौंदर्य स्पर्धा, त्यांची कला दाखविण्याची स्पर्धा घेतली जात नाही. शहरातील महिलांना ही खूप मोठी संधी आहे.
- प्रतिभा सानप, सृष्टी अॅग्रो टुरिझम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णालय नव्हे; भंगाराचे गोदाम

$
0
0



चंदन लक्कडहार, पैठण
दहा एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर वसलेल्या पैठणच्या ग्रामीण रुग्णालयाचे सध्या भंगाराच्या गोदामामध्ये रूपांतर झाले असून, तज्ज्ञ डॉक्टर, औषधींचा तुटवडा व बंद असलेल्या विद्युत उपकरणामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तत्कालीन राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या हस्ते १० नोव्हेंबर १९९४ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत ८० खाटांच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. १० एकर ३३ गुंठे एवढ्या विस्तीर्ण जागेवर हे रुग्णालय बांधण्यात आले, मात्र जेवढ्या मोठ्या जागेवर हे रुग्णालय बांधलेले आहे तेवढ्या सुविधा या रुग्णालयाकडून कधीच रुग्णांना देण्यात आलेल्या नाहीत.

मागच्या अनेक वर्षांपासून येथे बालरोग, त्वचारोग व डोळ्याचे तज्र् डॉक्टर नाहीत. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एका पुरुष डॉक्टराची नियुक्ती केली आहे. रुग्णांना नेहमी औषधांचा तुटवडा सहन करावा लागतो. सध्या तर परिस्थिति अत्यंत भयावह झाली असून, रुग्णालयातील बहुतांश पंखे, ट्यूबलाइट बंद आहेत. नूतनीकरणाच्या नावाखाली मागच्या सहा महिन्यांपासून अतिदक्षता विभाग बंद आहे. रुग्णालयात जागोजागी तुटलेल्या फर्निचरचे ढीग पडले असून, रुग्णालयाच्या बाहेर तुटलेल्या फरश्या, खडी व वाळूच्या साठ्यामुळे रुग्णालयाचे भंगाराच्या गोदामात रूपांतर झाल्याचे जाणवते. मागच्या काही दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या परिसरातील सर्व झाडे तोडून या ठिकाणी मोठ मोठे खड्डे खोदले असून, या परिसरात केलेली नांगरणी संशोधनाचा विषय ठरत आहे.

रुग्णालयाच्या झालेल्या दुरवस्थेविषयी केंद्राचे प्रपाठक डॉ. भारत चव्हाण यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते मागच्या तीन दिवसांपासून रजेवर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. दरम्यान, पैठण शहर व तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या या शासकीय रुग्णालयाच्या झालेल्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी शहरातील दिनेश पारीख, बंडेराव जोशी, महेश पाठक, गणी बागवान यांनी केली आहे.

शहराच्या शेवटच्या टोकावरल्या रुग्णालयात ना डॉक्टर, ना औषधी, ना लाइट असते. आता तर जागोजागी पडलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे भंगाराचे गोदाम झाले आहे. हे रुग्णालय आमच्यासाठी असून अडचण नसून खोळंबा झाले आहे. - कपिल पहिलवान, सामाजिक कार्यकर्ते

पैठणच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या केंद्राचा काही दिवसापासून माझ्याकडे चार्ज असून, तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मला देता येणार नाही. वरिष्ठ आल्यानंतर ते तुमच्या प्रश्नांचे उत्तरे देतील. शंकांचे निरसण करतील. - डॉ. शैलेश साळवे, प्रभारी प्रपाठक, पैठण ग्रामीण रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ ठेवा

$
0
0

रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ ठेवा; कारवाई टाळा
आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी केले आवाहन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः
रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या प्रवाशांनी परिसराची स्वच्छता आपल्यामुळे बिघडू नये, याची काळजी घ्यावी. कारवाईची भीती मनात बाळगण्यापेक्षा रेल्वे आपली आहे, ही भावना असू द्या, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे सहाय्यक निरीक्षक दिलीप कांबळे यांनी रेल्वे प्रवाशांना केले.
स्वच्छ रेल्वे अभियानांच्या दुसऱ्या दिवशी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालक तसेच रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागरण अभियान राबविण्यात आले. या अभियान प्रसंगी रेल्वे विभागाचे अधिकारी विक्रम शेखावत, रेल्वे स्टेशन व्यवस्‍थापक लक्ष्मीकांत जाखडे, आरोग्य अधिकारी आशुतोष गुप्ता यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशनच्या इमारतीसमोर रिक्षा चालकांना बोलावून त्यांना प्रवाशांसोबत चांगले व्यवहार करावे. तसेच पार्किंग शिवाय रिक्षा इतरत्र लावू नये, अशीही माहिती दिली. तसेच प्रवासी विश्राम कक्षात बसलेल्या प्रवाशांनाही स्वच्छता ठेवण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाकडून करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुउद्योग भारतीच्या अध्यक्षपदी रायठठ्ठा

$
0
0

लघुउद्योग भारतीच्या अध्यक्षपदी रायठठ्ठा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लघुउद्योग भारती या उद्योजकांच्या संघटनेचे मराठवाड्यातील प्रभारी व राष्ट्रीय उपाध्यक्ष आबासाहेब देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संघटनेची मराठवाड्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उद्योजक सुनील रायथट्टा यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष - रवींद्र वैद्य (वाळुूज), ब्रिजलाल खुराना (हिंगोली) पारस छाजेड (औरंगाबाद) प्रवीण काळे (उस्मानाबाद) सरचिटणीस-आनंद देशकर (औरंगाबाद) सहसचिव : संतोष शेटे (उस्मानाबाद) विजय बिहाणी (सेलू), सुनील भालेराव गिरीश झाल्टे (औरंगाबाद) कोषाध्यक्ष - अविनाश ओक, कोषाध्यक्ष - विश्वेश्वर जोशी आणि श्याम राठी (औरंगाबाद) यांची निवड झाली. याशिवाय अन्य कार्यकारी समिती सदस्यात अंजली कुलकर्णी, प्रमोद झाल्टे, नितीन शेटे, भगवानराव देशमुख, निखिल भट, दिलीप चौधरी, जितेंद्र राठी, रमेशचंद बागिया बागिया, राजेंद्र पोकरेना, दिलीप कुलकर्णी यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज चोरीविरुद्ध कारवाई; शहरात २४८ आकडे जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंबेडकरनगर, सिद्धार्थनगर, सीताबडीनगर भागात वीज चोर आणि थकबाकीदारांविरुद्ध गुरुवारी राबविलेल्या मोहिमेत वाहिन्यांवर वीज चोरीसाठी टाकलेले २४८ आकडे काढण्यात आले. वीज चोरी करण्यासाठी पुन्हा आकडे टाकल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महावितरणने दिला आहे.

औरंगाबाद शहरात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर थकबाकीही मोठ्या प्रमाणात आहे. महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया व मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहरात गुरुवारी वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. औरंगाबाद शहर विभाग-दोनमधील आंबेडकरनगर, सिद्धार्थनगर, सीताबडीनगर या भागांत वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत वीज चोरीसाठी टाकण्यात आलेले २४८ आकडे काढून जमा करण्यात आले. त्याचबरोबर ७८ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

विद्युत कायदा २००३च्या कलम १२६अंतर्गत शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी विजेचा अनधिकृत वापर करणे आदी बाबींचा समावेश होतो. कलम १३५अंतर्गत वीज मीटरमध्ये फेरफार करणे, आकडे टाकून विजेचा वापर करणे आदी बाबींचा समावेश होतो. महावितरणने शहरात वीज मीटर तपासणी मोहिमेत वीज चोरी आढळून आल्यास कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँक्रिट बेसमेंटशिवाय केले काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जमिनीच्या खालून ड्रेनेज लाइन अंथरताना अगोदर काँक्रिटचे बेसमेंट करणे गरजेचे होते, पण संपूर्ण कामात कुठेही काँक्रिटीकरण आढळून आले नाही असे निरीक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपल्या अहवालात नोंदवले आहे. भूमिगत गटार योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच चेंबर्सची वाट लागली आहे, असे ताशेरे देखील या अहवालात ओढण्यात आले आहेत. त्यामुळे ‘भूमिगत’ च्या एकूणच कामाबद्दल आता शंका व्यक्त केली जात आहे.
भूमिगत गटार योजनेच्या कामाचे थर्डपार्टी इन्सपेक्शन करण्यासाठी महापालिकेने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती केली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमने भूमिगत गटार योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामापैकी बहुतांश कामाचे इन्सपेक्शन केले व आपला अहवाल कार्यकारी अभियंत्यांच्या नावे महापालिकेला सादर केला. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमने ३१ मे २०१७ या एकाच दिवशी भूमिगत गटार योजनेच्या सात ठिकाणच्या कामांना भेट देऊन तपासणी केली. ज्या कामांची तपासणी या टीमने केली त्यात सिल्कमील कॉलनी, एमआयटी सिडको पोलिस स्टेशन - पुंडलिकनगर ते सिडको एन ४ येथील हनुमान मंदिर, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन, कटकटगेट, जटवाडा रोड, बीएमसी बँक कबाडीपुरा, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट झाल्टा या कामांचा समावेश आहे. तपासणीच्या नंतर काही गंभीर स्वरुपाचे आक्षेप ‘अभियांत्रिकी’ च्या टीमने घेतले आहेत.
घेण्यात आलेल्या आक्षेपांमध्ये सर्वत्र सामाईक असलेला आक्षेप काँक्रिटीकरणाचा आहे. जमिनीच्या खालून ड्रेनेज लाइन अंथरताना प्रत्येक ठिकाणी अगोदर काँक्रिटचे बेसमेंट करणे गरजेचे होते, परंतु कुठेही काँक्रिटचे बेसमेंट करण्यात आले नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मोठ्या व्यासाच्या आणि वजनाने जड असलेल्या ड्रेनेज लाइन टाकताना काँक्रिटचे बेसमेंट न केल्यामुळे जमीन खचून ड्रेनेज लाइन जमिनीमध्ये दबली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध ठिकाणी करण्यात आलेली जोडणी निखळून भविष्यात संपूर्ण योजना संकटात सापडू शकते.
भूमिगत गटार योजनेच्या काही साइटस् वर तुटलेल्या अवस्थेतील ड्रेनेज लाइन ‘अभियांत्रिकी’ च्या टीमच्या निदर्शनास आल्या. तुटलेल्या ड्रेनेज लाइनबद्दल चिंता व्यक्त करताना या ड्रेनेज लाइन भूमिगत गटार योजनेसाठी वापरू नका, अशी सूचना या टीमने केली आहे. योजनेसाठी विविध ठिकाणी मेनहोल आणि चेंबर्सचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यांची अवस्था फारच वाईट असल्याचा उल्लेख या अहवालात आहे. मेनहोल आणि चेबर्स फुटलेले असून, अनेक चेंबर्स वापर सुरू होण्यापूर्वीच चोकअप झाल्याचे आढळले आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक साहित्याचे परीक्षण झाले पाहिजे. त्याचा अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला सादर झाला पाहिजे. असा अहवाल अद्याप सादर झालेला नाही, असा आक्षेप देखील घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा सुरळीत, उपकेंद्राचा वाद उफाळला

$
0
0

पाणीपुरवठा सुरळीत, उपकेंद्राचा वाद उफाळला
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
जायकवाडी येथील महापालिकेच्या मुख्य पंपहाऊसच्या शेजारील महावितरणच्या उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. दुरुस्तीनंतर गुरुवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला. पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी उपकेंद्राचा वाद मात्र उफाळला आहे. रविवारी आपण स्वतः या उपकेंद्राला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेणार आहोत, असे महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले.
पंपहाऊसच्या शेजारी असलेल्या महावितरणच्या उपकेंद्रात वारंवार तांत्रिक बिघाड होतो. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा देखील विस्कळीत होतो. बुधवारी हीच स्थिती निर्माण झाली. महापालिकेने बिघाडाचे खापर महावितरणवर फोडले. महावितरणने मात्र हात वर करीत ते उपकेंद्र महापालिकेच्याच ताब्यात आहे, त्यांनी यासाठी स्वतंत्र अभियंता नियुक्त करून उपकेंद्राची नियमीत देखभाल दुरुस्ती केली पाहिजे, असे म्हटले आहे. या संदर्भात आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘उपकेंद्र महापालिकेच्या ताब्यात आहे व त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी देखील महापालिकेची आहे ही बाब खरी आहे. रविवारी आपण स्वतः या उपकेंद्राची पाहणी करणार आहोत. वारंवार बिघाड होण्याचे कारण काय याचा शोध घेतला जाणार आहे. देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र अभियंता देण्याचा निर्णय देखील लवकरच करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान बुधवारी खंडीत झालेला पाणीपुरवठा गुरुवारी सुरू झाला, परंतु पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले. शहराच्या ज्या भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात आज गुरुवारी पाणीपुरवठा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ अखेर बसस्टॅँड दुरुस्ती सुरू

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, खुलताबाद
प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ असलेल्या खुलताबाद येथील गेल्या २० वर्षांपासून बंद असलेल्या बसस्थानकाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर एसटी महामंडळा मुहूर्त सापडला आहे. ‘मटा’ने बसस्थानकाची दुर्दशा मांडल्यानंतर यंत्रणेने हालचाल करून काम सुरू केले आहे.

एसटी महामंडळाने बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी सात लाख रुपये मंजूर केले असून, यात बसस्थानकाची दुरुस्ती, उपहारगृह, कंट्रोलरसाठी खोली आदी सुविधा देण्यात येणार आहेत. बसस्थानकावरील जुने पत्रे बदलून त्या ठिकाणी नवीन पत्रे बसविण्यात येणार असून, प्रवासी निवारा व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

खुलताबाद, वेरूळमध्ये बारा महिने पर्यटक व भाविकांची गर्दी असते. या दोन्ही ठिकाणी एसटीचे बसस्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच बसला हात दाखवून थांबवावे लागत होते. या त्रासाला कंटाळून प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत होता. एसटी महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी भद्रा मारूती मंदिर परिसरात पत्र्याचे तात्पुरते शेड उभारून व्यवस्था केली, असली तरी या बसस्थानकात डुकरे, कुत्रे, बकऱ्या, गाय यांचा मुक्तसंचार असतो. पर्यटकांमुळे महामंडळाला लाखोंचे उत्पन्न मिळूनही बसस्थानक दुरुस्तीसाठी जाणूनबुजून उशीर लावण्यात येत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

बसस्थानकाचा वापर होत नसल्याने शहरात लांब पल्ल्याच्या बस येत नाहीत. औरंगाबाद येथून खुलताबादच्या प्रवाशांना बसवून घेतले जात नाही. घेतले तरी बसेस शहरात येत नसल्याने त्यांना बायपासवर उतरावे लागते. त्यामुळे महिला, लहान मुले, वृद्धांची गैरसोय होते. याकडे लक्ष देवून बसस्थानकावर बस येणे सक्तीचे करा, अशी मागणी प्रवासी महासंघाने केली आहे.

कोट्यवधींच्या मालमत्तेकडे दुर्लक्ष
खुलताबादमध्ये महामंडळाची कोट्यवधींची मालमत्ता पडून आहे. स्वतःच्या मालकीचे बसस्थानक, जमीन आहे. याकडे महामंडळाने पुरते दुर्लक्ष केल्यामुळे बसस्थानकाची प्रचंड वाताहत झाली आहे. टिनपत्रे, उपहारगृह, कंट्रोलर रूम, शौचालय, बसस्थानकातील खुर्च्यांची तोडफोड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ परभणीत चार महिन्यात ७० आत्महत्या

$
0
0

परभणी - परभणी जिल्ह्यात पावसाने तब्बल दीड महिन्यांहून अधिक काळ ओढ दिल्यामुळे पिकांची परिस्थिती भयावह झाली आहे. परिणामी, शेतकरी चिंतेत असून याच चिंतेचे परिवर्तन आत्महत्येत होऊ लागले आहे. जिल्ह्यात साडे चार महिन्यांत तब्बल ७० शेतकऱ्यांनी आत्महत्येला कवटाळले आहे. तर पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथील काका-पुतणीच्या आत्महत्येनंतर आठच दिवसांत आणखी एका युवा शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या निम्म्याहून कमी म्हणजेच ४७.१९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ २६.९६ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात सरासरी ७७४.६२ मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. यातील १६ ऑगस्टपर्यंत ४४२.४८ मिलीमीटर पाऊस पडायला हवा. मात्र, केवळ २०८.८२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. एकूण तालुक्यांचा विचार केला असता पाथरी तालुक्यात भयावह परिस्थिती असून केवळ ३३ टक्के पाऊस पडला आहे. याप्रमाणेच पूर्णा तालुक्यात मात्र ६०.८७ टक्के असा सर्वसाधारण पाऊस झाला आहे. याशिवाय, परभणी तालुक्यात ४९ टक्के तर पालम ३६.६१, गंगाखेड ४२.१६, सोनपेठ ५१.७६, सेलू ५८.३०, जिंतूर ४०.४५ आणि मानवत तालुक्यात ५०.५५ टक्के पाऊस पडल्याने परिस्थिती गंभीर आहे.
दरम्यान, जिल्ह्याने २०१२ ते २०१५ असा सलग तीन वर्ष भयंकर दुष्काळ झेलला आहे. त्यानंतर २०१६ ला सुगी आली. मात्र, या सुगीचा आनंद क्षणीक ठरला. कारण भरघोस पिके होऊन देखील पिकांना भाव न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारीच राहिला. याच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या वाढत असल्याने कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला होता. शासनाने तत्वतः आणि निकष लावून कर्जमाफी केली देखील. मात्र, परिस्थिती फारशी बदलली नाही. कारण एक वर्षाचा अपवाद वगळता चौथ्यावर्षी देखील शेतकर्यांना अवर्षणाचा सामना करावा लागत असल्याने दुष्काळी परिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. मृगाच्या मुहूर्तावर जोरदार बरसलेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र, जून महिन्याच्या शेवटी खंड दिलेल्या पावसाने ऑगस्टच्या मध्यापर्यंत रजा घेतली होती. जेव्हा पिकांच्या वाढीसाठी पाऊस अत्यावश्यक होता, नेमका त्याच काळात पावसाने दगा दिला. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिके करपून गेली आहेत. सोयाबीन, कापूस, मुग, उडीद आदींसह फळबागा देखील जळून जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी उभ्या पिकात नांगर फिरवत आहे.
अनेकांनी शेतात जनावरे सोडून दिली. पिकांचा भरवसा न राहिल्याने शेतकरी हा निर्णय घेत आहेत. मात्र, सोबतच पेरणीसाठी केलेला खर्च शिवाय महागडी औषधे आणि खतांसाठी काढलेले कर्ज कसे फेडावे ही चिंता त्यांना सतावत असल्याने ते आत्महत्यासारखा विचार करू लागले आहेत. यातूनच एप्रिल महिन्यापासून १७ ऑगस्टपर्यंत जवळपास ७० शेतकरी आत्महत्या केल्या आहेत.

झुटा येथे तिसरी आत्महत्या
पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चंडीकादास झुटे या कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि पिकांचा भरवसा न राहिल्याने आत्महत्या केली. त्याचीच पुनरावृत्ती वडील अर्थात चंडीकादास झुटे यांचे भाऊ सुरेश झुटे यांच्याकडून होऊ नये या चिंतेत सारिका झुटे या वीस वर्षीय तरूण मुलीने आत्महत्या केली होती. या घटनेमुळे राज्यभर हळहळ व्यक्त झाली. त्याच काळात पूर्णा, मानवत या तालुक्यात देखील काही तरूण शेतकयांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येनंतर जवळा झुटा येथील चंडीकादास सुखदेव एडके ( वय ३५) यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. १३ ऑगस्टपासून गायब होते. कर्ज काढून शेतात दुबार पेरणी केली. मात्र, पावसाअभावी पीक वाळून गेल्याने कर्ज कसे फेडावे, या चिंतेत ते सतत राहत होते. त्याच चिंतेत त्यांनी १३ ते १७ ऑगस्ट दरम्यान परमेश्वर गणपतराव झुटे यांच्या शेतातील विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार पाथरी पोलिसात दाखल झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरात दोन दिवसीय कर्करोग जागृती परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
झपाट्याने वाढत असलेल्या विविध प्रकारच्या कर्करोगाबाबत सर्वसामान्याप्रमाणेच जनरल प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरामध्ये ही जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने १९ आणि २० ऑगस्ट अशी दोन दिवसाची राज्यस्तरीय परिषद लातूरात होणार असल्याची माहिती कॅन्सर सर्जन डॉ. ब्रीजमोहन झंवर आणि डॉ. अजय पुनपाळे यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ सर्जन डॉ. अशोक कुकडे उपस्थित होते.
कर्करोगासारख्या विषयाच्या परिषदा महानगरातच होत असतात. परंतु आता लातूरातही महानगराच्या तोडीस तोड कर्करोग उपचार केंद्र विकसित झाल्यामुळे प्रथमच लातूरसारख्या शहरात ही परिषद होत असल्याचे डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी सांगितले. या परिषदेत प्रामुख्याने जे डॉक्टर सर्वसाधारण प्रॅक्टीस करतात त्या डॉक्टरामध्ये जागृती करून रुग्णांना वेळच्या वेळी विविध चाचण्या करण्याविषयी प्रवृत्त करणे, कर्करोगाचे वाढत असलेले प्रमाण, कारणे समजून घेण्यासाठी ही परिषद होणार आहे. या परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी दिल्ली, भोपाळ, मुंबईतून कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ही डॉ. झंवर यांनी दिली.
ग्रामीण भागातील महिलामध्ये ही स्तनाचा कर्करोग होण्याच प्रमाण वाढत असल्याची माहिती देऊन डॉ झंवर म्हणाले, ‘प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निदान झाले तर लातूरात ही जगातिक दर्जाची उपचार सुविधा असल्यामुळे रुग्णाला बरे करता येऊ शकते.’
कर्करोगा संबंधीच्या अवघडातील अवघड म्हणजे सलग बारा बार तास चालणाऱ्या शस्त्रक्रियाही लातूरात यशस्वीपणे होत असून अत्यंत अवघड प्रकारच्या शस्त्रक्रिया पुण्यापेक्षा लातूरात जास्त होत असल्याची माहिती डॉ. अजय पुनपाळे यांनी दिली.
विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ सर्जन डॉ. अशोक कुकडे म्हणाले, ‘विवेकानंद कर्करोग केंद्राला केंद्र सरकारने संशोधन केंद्राचा दर्जा दिला आहे. येत्या तीन महिन्यात अजून अद्यावत यंत्रसामुग्री लातूरात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या टाटा मेमोरीअस सेंटरची प्रतिकृती कॅन्सर उपचाराची लातूरात निर्माण होणार आहे. या परिषदेला डॉ. कैलाश शर्मा, डॉ. पुरवेश पारीक, यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी डॉ. मिरा नागवकर यांनी कर्करोग होऊ नये यासाठी घ्यावयाच्या काळजी विषयी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद शहरातील सर्वाधिक रहदारीचा आणि महत्वाचे रस्ते म्हणून शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा मार्गे जिजाऊ चौक, शिवाजी पुतळा ते सेंट्रल बिल्डिंग, जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान ते काळा मारुती मार्गे नेहरू चौक, स्टेडियम मार्गे नगरपालिका, तसेच शिवाजी पुतळा ते देशपांडे स्टँड या रस्त्यांची ओळख आहे. मात्र, या रस्त्यावर शिवाय मोक्याच्या ठिकाणी चार चाकी वाहने बिनधास्तपणे लावून तसेच फळांचे गाडे रस्त्याच्या मध्यभागी उभारून वाहतूक कोंडी केली जाते. मात्र, याकडे पोलिसांच्या वाहतूक शाखेचे साफ दुर्लक्ष आहे. परिणामी नागरिकांचे तसेच वाहनचालकांचे मोठे हाल होता आहेत. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याकामी वाहतूक विभागाचे अधिकारी कुचकामी ठरत आहेत.
शहरातील स्टेडियमच्या भोवतालचे सर्व रस्ते प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांनी तसेच सहा आसनी ऑटो रिक्षा, काळी-पिवळी प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांनी व्यापलेली असतात. स्टेडियम सभोवतालचे रस्ते हे पार्किंगसाठी नसून ते रहदारीसाठीचे आहेत. याकडे या मंडळींचे साफ दुर्लक्ष
असते. वाहतूक पोलिसांच्या संबंधामुळे हे वाहन चालक बिनधास्तपणे आपली वाहने रहदारीच्या मुख्य रस्त्यावर वेडीवाकडी लावतात. या सर्व परिसरात वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सतत वावर असतो. परंतु, या बेशिस्त वाहनचालकांना हटकन्याकामी पोलिसांचा वाहतूक विभाग कमी पडत
असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
चारचाकी वाहनांच्या बिनधास्त पार्किंग बरोबरच फळविक्रेत्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण देखील वाहनधारकांच्या मुळावर येऊन ठेपले असून, यानिमित्ताने होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीने अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे वाहतूक
पोलिस अधिकाऱ्यांचे व नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकाबरोबरच नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. शिवाजी पुतळा ते जिल्हा न्यायालय दरम्यान (विशेष करून बस स्टँड परिसर) पदपथाचा कब्जा फळ विक्रेत्यांनी केला आहे. हातगाड्यावरून फळे विकणारे विक्रेते रस्त्यावरच शिवाय बस स्टँड समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गेटवरच फळविक्रीचे गाडे बिनधास्तपणे लावतात. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन धारकांना याचा त्रास होतो. शिवाय शॉपिंगसाठी जाणाऱ्यांची मोठी अडचण होते. यातूनच वाहनांची कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे.

बस स्टँडसमोर फळविक्रेत्यांचे अतिक्रमण
बस स्टँड समोरील तुळजाभवानी शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या परिसरात फळविक्रेत्यांनी व हातगाडीवाल्यांनी तसेच वडापाव, राईस, भेळपुरी विकणाऱ्या
हातगाड्यांनी धुमाकूळ घालत या भागावर आपला कब्जा केला आहे. फळविक्रेत्यांनी तर हळूहळू पाय पसरत येथे दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी फळे घेण्यासाठी तसेच अल्पोपहार करण्यासाठी अनेक वाहने रस्त्यावर थांबतात. त्यातून वाहनांची कोंडी होऊन या परिसरात अपघाताचा धोका वाढला आहे. या स्थितीत येथे धक्काबुक्कीचे प्रकार घडतात व त्यातून संघर्ष ही निर्माण होतो. मात्र, याकडे वाहतूक पोलिस, पोलिस विभाग, नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन यांचे हेतुतः दुर्लक्ष होत आहे. राजकीय दबावापोटी हे सर्व विभाग या अतिक्रमण बाबीकडे दुर्लक्ष करताहेत. याचा फटका मात्र, वाहनधारक व पादचारी मंडळींना बसतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘कट प्रॅक्टिस’ कायद्याला डिसेंबरचा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कट प्रॅक्टिस’ विरोधातील कायद्याचा मसुदा अपेक्षेप्रमाणे पावसाळी अधिवेशनात ठेवण्यात आला नसून, हा मसुदा आता येत्या डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याचवेळी या कायद्यासंदर्भातील अभिप्राय, हरकती, आक्षेप नोंदविण्यासाठी आणि कायद्याच्या मसुद्यामध्ये अधिकाधिक सुधारणा करण्याच्या हेतुने हा मसुदा लवकरच जनतेसाठी खुला केला जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.

मुंबईतील ‘एशियन हार्ट इन्स्टिट्यूट’ने काही महिन्यांपूर्वी मुंबईतील रस्त्यांवर ‘ऑनेस्ट ओपिनियन. नो कमिशन टू डॉक्टर्स’ असे बॅनर लावले आणि संपूर्ण वैद्यकीय वर्तूळ ढवळून निघाले. अनेक डॉक्टर तसेच वैद्यकीय संघटनांनी ‘एशियन’सह ‘एशियन’चे नामांकित हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांना मोठा विरोध केला; तरीदेखील डॉ. पांडा यांनी आरोग्यमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना ‘कट प्रॅक्टिस’विरोधात कठोर पावले उचलण्याबाबत लेखी पत्र दिले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी ‘कट प्रॅक्टिस’विरोधात कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आणि समितीने अल्प कालावधीत राज्य सरकारकडे मसुदाही सादर केला. दरम्यान, कायद्याचा मसुदा हा पावसाळी अधिवेशनात सादर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात मसुदा सादर करण्याची तयारी सुरू असल्याचे खुद्द वैद्यकीय मंत्र्यांनी ‘मटा’कडे मागच्या महिन्यात स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरच्या काही दिवसांतच संबंधित कायदा अधिकाधिक पारदर्शी तसेच सक्षम होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या सुधारणांसह मसुदा पुढच्या अधिवेशनात म्हणजेच डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशात सादर करण्याची तयारी सुरू झाली आणि याकडेही ‘मटा’ने लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात मसुदा सादर झाला नाही, ही आता वस्तुस्थिती आहे.

अधिकाधिक सुधारणा शक्य
आता या कायद्याचा मसुदा लवकरच जनतेसाठी खुला होणार असून, जनतेला हरकती, अभिप्राय, हरकती नोंदविता येणार आहेत. त्यातूनच हा कायदा अधिकाधिक पारदर्शी, सक्षम व व्यापक होण्याची संधी मिळणार आहे, असे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी ‘मटा’ला सांगितले. अर्थात, शहरी-ग्रामीण आरोग्याचा साधक-बाधक व सर्वांगीण विचार करुनच कायद्याची निर्मिती व्हावी, अशीही तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

डॉक्टर-तज्ज्ञ-विविध संघटनांसह सर्वांची मते जाणून घेऊन कट प्रॅक्टिस विरोधातील कायदा अधिकाधिक भक्कम, सक्षम व पारदर्शी करतानाच, त्याचा त्रास प्रामाणिक डॉक्टरांना होणार नाही, याचाही विचार करुन मसुद्यामध्ये सुधारणा करण्यात येतील. यासाठीच हिवाळी अधिवेशनात मसुदा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images