Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ पाण्याचा खेळखंडोबा; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात चार दिवसांपासून पाणी पुरवठ्याचा खेळखंडोबा झाल्याने नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत धारेवर धरले.
राजू वैद्य, स्वाती नागरे, सीताराम सुरे, संगीता वाघुले यांनी पाण्याचा प्रश्न मांडला. राजू वैद्य म्हणाले, ‘महापालिकेने २० लाख रुपये खर्च केले, तर पाणी पुरवठा योजनेला अखंड वीज मिळेल असे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांचे म्हणणे आहे. हे पैसे पैसे खर्च न करता शहराला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. टँकरच्या कंत्राटदाराचे बिल देण्यासाठी आयुक्तांचा विशेषाधिकार वापरला जातो, मग वीस लाख रुपये भरण्यासाठी विशेषाधिकाराचा वापर का केला जात नाही,’ असा सवाल त्यांनी केला. ‘कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल काहीच कामाचे नाहीत. त्यांची नियुक्ती जायकवाडीला करा, शहरातील पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेसाठी सक्षम अधिकारी नियुक्त करा,’ अशी मागणी त्यांनी केली.

सभापती गजानन बारवाल यांनी चहेल यांना योग्य प्रकारे काम करण्याचे निर्देश दिले. ‘विशेषाधिकारासंदर्भात आयुक्तांची दिशाभूल करू नका, यापुढे विशेषाधिकाराचा वापर झाला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील,’ असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ रजिस्ट्रीसाठी ‘आधार’ची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘येत्या १५ ऑक्टोबरपासून प्लॉट, फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहाराची रजिस्ट्री करण्यासाठी साक्षीदाराची गरज राहणार नाही. त्या ऐवजी खरेदी-विक्री करणाऱ्यांचे आधार कार्ड आवश्यक ठरेल,’ अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

कवडे म्हणाले, ‘विभागात संगणकीकृत प्रणाली आणण्यात आली असून आय-सरिता, ई सर्च, ई रजिस्ट्रेशन, ई म्युटेशन, ई मॅरेज रजिस्ट्रेशन, दस्त पडताळणी-एसएमएस सेवा, ई पेमेंट, स्टॅम्प ड्युटी कॅल्युलेटर अशा विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा आढावा घेतला. रजिस्ट्री करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कमीत कमी वेळ कार्यालयात लागेल अशी यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांच्या सोयीसाइी ई व्हॅल्यूवेशन, ई मॅरेज रजिस्ट्रेशन या सुविधा येत्या महिनाभरात सुरू होतील. नोंदणी पद्धतीने विवाह करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना ऑनलाइनद्वारेच अर्ज करता येईल. यासाठी नियोजित वधू–वर संकेतस्थळावरून नोटीसची डेटाएन्ट्री करतील. स्वतःचे फोटो, अंगठ्याचे ठसे देऊन कागदपत्रे अपलोड करतील. तसेच ऑनलाइन फी, नोटीस भरून देतील. ही नोटीस विवाह अधिकाऱ्यांना ऑनलाइन मिळेल. ई व्हॅल्युवेशनद्वारे एखाद्या गटातील जागेची, प्लॉटची व्हॅल्यू काय आहे, त्यासाठी किती शुल्क भरावे लागेल याची माहिती घेता येईल. शिवाय रजिस्ट्रीसाठी आगाऊ नोंदणी करून वेळ व तारीखही घेता येणार आहे. या सुविधांचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा,’ असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेला नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामणी भुरकुंडे, सहजिल्हा निबंधक प्रकाश खोमणे, डी. जे. माइणकर, जी. एस. कोळेकर यांची उपस्थिती होती.

राज्यात यंदा २१ हजार कोटी रुपये मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट असून २० ऑगस्टपर्यंत आठ हजार कोटी रुपयांची वसुली झाली आहे. औरंगाबाद विभागात आतापर्यंत १७६ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षी ही वसुली १७९ कोटी इतकी होती. - अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाधार महिला केंद्र बंद करण्याचे आदेश​

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद येथील स्वाधार महिला केंद्रात २ महिला गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हे आधार केंद्र तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. उस्मानाबाद येथील स्वाधार केंद्रातील सहा पीडित महिलांना लातूर येथील शासकीय स्वाधार केंद्रात पाठवून त्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश दिले आहेत. त्याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यात पीडित महिलांना आधार मिळावा यासाठी चांगली संस्था नेमावी असे सांगत बदामे यांच्या संस्थेतील अनैतिक प्रकाराची माहिती केंद्र सरकारला कळवली आहे.

‘मटा’ने स्वाधार केंद्रातील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आणले होते.
उस्मानाबाद येथील एमआयडीसी येथील स्वाधार केंद्राच्या परिसरात कंडोम व दारुच्या बाटल्या आढळल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्याशिवाय या केंद्रातील २ महिला ४ महिन्याच्या गर्भवती असल्याचे स्त्री रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत उघड झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल तपास व कारवाईस सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून तिच्या अहवालाची वाट न पाहता तात्काळ हे केंद्र बंद कंरण्याचे आदेश दिले आहेत.
स्वाधार केंद्रातील निवास, स्वच्छता गृहची दुरावस्था झाली असून ही संस्था श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ लातूर येथील आहे. भागवत बदामे या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या राज्यात अनेक ठिकाणी संस्था आहेत. उस्मानाबाद येथील प्रकारामुळे त्यांच्या संपूर्ण संस्थांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सखोल चौकशीची मागणी होत आहे.

चौकशीची गरज
स्वाधार केंद्रात अत्याचारातील पीडित मुलींना व महिलांना न्यायालयाच्या आदेशाने सुरक्षित गृह म्हणून ठेवले जाते. मात्र, या केंद्रांतून मुली बाहेर कशा जातात याबाबत राज्यातील सर्व महिला स्वाधार केंद्राची चौकशी होणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप पिकांच्या उत्पादनात घट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
यंदा उस्मानाबाद जिल्ह्यात मान्सूनने दगा दिला आहे. पावसाच्या खंडाचे प्रमाण अधिक राहिल्याने खरिपातील मुग, उडीद, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल ही
पिके कोमजून गेली तर, तुरीच्या पिकाचीही वाढ खुंटली आहे. त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे. ही घट मुग, उडीद या पिकांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत तर सोयाबीनमध्ये ६० ते ७० टक्के थेट येणार असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य कृषी आयुक्तांकडे पाठविला आहे. तूर पिकांची
परिस्थितीही फारशी समाधानकारक नसल्याचे या अहवालात नमूद केले असल्याची माहिती सुत्रांने दिली.
यंदा रोहिणी व मृग नक्षत्रात पाऊस चांगला झाल्याने या नक्षत्रात खरीप पिकाच्या बहुतांश पेरण्या उरकल्या. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ४ लाख ७२ हजार हेक्टर असताना पेरणी ५ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उडीद व मूग या पिकांचा पेराही वाढला आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर आहे. पेरणी मात्र २ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली. मात्र, पेरणीनंतर पावसाचा सहा आठवडयाहून अधिकचा खंड पडला. जुलै महिन्यात पावसाने दगा दिला आहे.
पावसाअभावी जिल्ह्यातील उडीद, मूग व सोयाबीनचे पीक उद्धवस्त झाले आहे. आता पावसाचे झाले तरीही कोरडवाहू क्षेत्रातील सोयाबीन, उडीद व मूग या पिकांना याचा कोणताच फायदा होणार नाही. पावसाअभावी हलक्या व माळरान जमिनीवरील खरीप पिकांचे पुर्णतःच नुकसान झाले. तर, मध्यम परतीच्या जमिनीवरील पिकांच्या उत्पादनात सुमारे ६० टक्के घट येणार असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसमध्ये तालुकाध्यक्ष नियुक्त्यांवरून मतभेद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखिल भारतीय कॉँग्रेस समितीला अंधारात ठेवून, जिल्हा काँग्रेस समितीने केलेल्या सहा तालुकाध्यक्षांच्या निवडीला प्रदेश कॉँग्रेस समितीने असहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष सिंह यांनीही या नियुक्त्या आमच्या मान्यतेने झाले नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेस पक्षाची अंतर्गत पदाधिकारी निवड प्रक्रिया गेल्या महिन्यात सुरू झाली. काँग्रेस पक्षाच्या आचारसंहितेनुसार, जिल्ह्यातील पदाधिकारी निवडीसाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून जिल्हा निवडणूक अधिकारी नियुक्त केला जातो. तो जिल्हाभर फिरून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतो. ज्या तालुक्यात एकच नाव आले आहे, त्याठिकाणी ही निवड बिनविरोध मानली जाते. जिथे एकापेक्षा जास्त नावे आली आहेत, तिथे चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, तर मतदान करून निवड केली जाते. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तालुका निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेमणुका करतात. तालुका निवडणूक अधिकारी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अहवाल सुपूर्द करतात. तो अहवाल दिल्लीत पाठवून तिथून तालुकाध्यक्षांची निवड जाहीर केली जाते.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी झारखंड येथील संतोष सिंह यांची नियुक्ती जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून केली होती. सिंह गेल्या आठवड्यात औरंगाबादेत आले होते. त्यांनी काही तालुक्यांचा दौरा केला आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमधून काही तालुक्यांत अध्यक्षपदासाठी एकेक नावे पुढे आली, मात्र काही ठिकाणी मतभेद होते. दरम्यान प्रकृती अस्वास्थामुळे सिंह झारखंडला परतले. दरम्यान, जिल्हा काँग्रेस समितीच्या पुढाकाराने सिल्लोड, सोयगाव, औरंगाबाद, फुलंब्री, पैठण, कन्नड आणि वैजापूर येथील तालुकाध्यक्षांच्या निवडी केल्या गेल्या. या प्रक्रियेत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. काही ठिकाणी सदस्यांची मते जाणून न घेता नियुक्त्या केल्या गेल्या. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष सिंह यांच्याकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन प्रदेश काँग्रेसने औरंगाबाद जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांच्या निवडी झाल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कोणतीही निवड नाही
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काही काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या निवडी झाल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेश निवडणूक अधिकारी महेश जोशी यांनी स्पष्ट केले आहे, की निवडणूक प्रक्रिया अद्याप सुरू असून तालुकाध्यक्षांची नावे जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाध्यक्षांना नसून ते अधिकार जिल्हा निवडणूक अधिकारी व प्रदेश निवडणूक अधिकारी यांनाच आहेत. सध्या राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असून राज्यात कोणत्याही ठिकाणी तालुकाध्यक्षांची निवड झाली नाही.

निवडलेले अध्यक्ष
रामराव शेळके (औरंगाबाद), संदीप बोरसे (फुलंब्री), देविदास लोखंडे (सिल्लोड), प्रभाकर काळे (सोयगाव) विनोद तांबे (पैठण), प्रशांत सदाफळ (वैजापूर), बाबा मोहिते (कन्नड).

काँग्रेसच्या परंपरेनुसार तालुकाध्यक्षांच्या निवडी होत असतात. मी काही तालुक्यांत जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. काही ठिकाणी एकेक उमेदवाराचे नाव आले, पण काही ठिकाणाहून तक्रारी आल्या. तालुका निवडणूक अधिकाऱ्यांच्या निवडी दोन तीन दिवसांत होतील. त्यानंतर तालुकानिहाय नियुक्त्या केल्या जातील. आवश्यक तिथे निवडणुका घेतल्या जातील. सध्या कोणत्याही तालुकाध्यक्षांची निवड केलेली नाही. - संतोष सिंह, जिल्हा निवडणूक अधिकारी, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारी पार्कसाठी आणखी ५० एकर जागा

$
0
0

सफारी पार्कसाठी आणखी ५० एकर जागा
औरंगाबाद : मिटमिटा येथे महानगरपालिकेला सफारी पार्कसाठी १०० एकर जागा देण्यात आल्यानंतर आता आणखी ५० एकर जागा देण्यात येणार असून या जागेच्या मोजणीचा प्रस्ताव तहसील कार्यालयाने भूमीअभिलेख कार्यालयाला पाठवला असल्याची माहिती तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिली.
मिटमिटा येथे सफारीपार्क उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेला १०० एकर जागा याआधीच दिली असून जिल्हा नियोजन समितीतून या जागेवर कंपाउंड तयार करण्यासाठी निधीही दिला आहे. महापालिकेने सफारी पार्कसाठी आणखी ५० एकर जागेची आवश्यकता असल्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. जिल्हा प्रशासनाने त्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या असून मिटमिटा येथील ५० एकर जमीन मोजणीसाठी तहसील विभागाकडून पत्र भूमीअभिलेख कार्यालयाला पाठवण्यात आले आहे. मोजणी झाल्यानंतर ही जमीन महापालिकेला हस्तांतरित केली जाईल. सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात जागा अपुरी पडत असल्याने बऱ्याच दिवसांपासून हे प्राणिसंग्रहालय इतरत्र हलविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय शहराच्या मध्यवर्ती भागात असून या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना जागा अपुरी पडत आहे. सर्व वन्यप्राण्यांना पुरेशी जागा, नैसर्गिक वातावरण मिळू शकेल अशा ठिकाणी प्राणिसंग्रहालय स्थलांतरित करण्याचे सेंट्रल झू ऍथॉरिटीने निर्देश दिले होते. यानंतर पालिका प्रशासनाने सफारी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या प्रवेशाकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरी सुरू आहे. ऑनलाइन प्रक्रियेला झालेला विलंब, इतर अभ्यासक्रमांची झालेली प्रक्रिया. त्यामुळे विशेष फेरीकडे विद्यार्थी फिरकलेच नाहीत. शहरात अकरावीचे आठ हजार ३९० प्रवेश रिक्त आहेत.

शहरात अकरावीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. तीन महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. चार फेऱ्या, त्यानंतर विशेष फेरी आता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरी सुरू आहे. त्यात शंभरपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. ऑनलाइनची प्रक्रिया नऊ जूनपासून सुरू आहे. लांबलेल्या प्रक्रियेमुळे विद्यार्थी ग्रामीण भागातील कॉलेजांकडे वळले; तसेच दहावीनंतरच्या इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे फेरीसाठी विद्यार्थीच नसल्याचे कॉलेज व्यवस्थापनांचे म्हणणे आहे.

‘प्रथम येण्याऱ्यास प्रथम प्राधान्य’ची प्रवेश फेरीमध्ये गट-तीन शेवटच्या फेरीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये १७५ ते ५०० गुणांच्या विद्यर्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. ही प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. २४ हजार ११०पैकी आजपर्यंत १५ हजार ७२० जागांवर प्रवेश झाले आहेत.

शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक नाही
शिक्षण विभागाने शाळांना नऊ ऑगस्टपासून वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यंदा फेरी लांबल्याने १९ ऑगस्टपासून सांगण्यात आले. त्यानंतर ‘प्रथम येण्याऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरीचे नियोजन जाहीर झाले. प्रक्रियेनंतर अकरावीचे वर्ग कधी सुरू करायचे असे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून अद्याप देण्यात आलेले नाही.

ऑनलाइन प्रक्रियेत शिक्षण विभागाने वेळोवेळी बदल केले. प्रक्रिया तब्बल तीन महिने सुरू राहते आहे. विद्यार्थी, पालक किती वेळ प्रतीक्षा करणार? अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात असतात. अशा प्रकारची प्रक्रिया पहिल्यांदा विद्यार्थी अनुभवत आहेत. त्याचा परिणाम अनेक कॉलेजांमध्ये जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. आता ही फेरीही ऑगस्टपर्यंत चालणार. त्यामुळे अभ्यासक्रम कधी पूर्ण करायचा, असा प्रश्न आहे.
- भगवान इंगळे, विवेकांनद कॉलेज.

ज्युनिअर कॉलेज : ११६
झालेले प्रवेश : १५७२०
प्रवेश क्षमता : २४११०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटकर यांच्यावरील गुन्हे मागे घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अहिंसक व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर लावलेले अजामीन पात्र गुन्हे तत्काळ मागे घ्या, नर्मदा सागर प्रकल्पात विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करा, या मागणीसाठी स्वराज अभियान, जय किसान आंदोलनातर्फे गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केले.
मेधा पाटकर यांच्यावर खोटे आरोप करत, गुन्हे दाखल करत बेमुदत उपोषणाच्या १२व्या दिवशी अटक केली व जेलबंद करण्यात आले. जिल्हा कोर्टापर्यंत जामीन मिळणार नाही, अशी व्यवस्था सरकारने पोलिसामार्फत केली आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. मात्र, त्यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यातील फोलपणा व खोटेपणा लक्षात आल्यानंतर इंदुर येथील कोर्टाने बुधवारी पाटकर यांना जामीन दिला, असे आंदोलकांनी सांगितले. खोटे गुन्हे दाखल करणे, हे कोणत्या लोकशाहीत बसते, हे जाहीरपणे विचारण्यासाठी आंदोलन करत असल्याचे सांगण्या आले. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना विभागीय आयुक्तामार्फत पत्र पाठविण्यात आले आहे. शिष्टमंडळात स्वराज इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अण्णा खंदारे, भाकपचे ज्येष्ठ नेते अॅड. मनोहर टाकसाळ, श्रमिक मुक्ती दलाचे सुखदेव बन, अॅड. विष्णू ढोबळे, समिंद्रा कासारे, शेख अन्वर आदी उपस्थित होते. आंदोलनानंतर झालेल्या सभेत सुभाष लोमटे, प्रा. एम. एच. देसरडा, प्रा. इंद्रजित झाल्टे, बुद्धप्रिय कबीर, अजमल खान, छगन गवळी, रमेश खंडागळे यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवेश प्रक्रियेचा फज्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केंद्रीय पद्धतीने राबवलेल्या पदव्युत्तर वर्गाची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे फसली. विद्यापीठाशी संलग्न चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ परिसरात गुरुवारी दिवसभर ‘स्पॉट अॅडमिशन’ प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र रिक्त जागांची आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे संध्याकाळपर्यंत अंतिम यादी जाहीर झाली नाही. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्यानंतर कुलगुरूंना मध्यस्थी करावी लागली; तसेच विद्यापीठातील विभाग आणि महाविद्यालयांना ३१ ऑगस्टपर्यंत रिक्त जागा भरण्याची सूचना तातडीने काढण्यात आली.

पदव्युत्तर वर्गाची ‘स्पॉट अॅडमिशन’ प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये होईल, असे परिपत्रक काढण्यात आले होते. चार जिल्ह्यांत कोणत्याही कॉलेजात पदव्युत्तर वर्गात प्रवेश घ्यायचा असेल, तरी विद्यापीठ कॅम्पसमध्ये अर्ज भरणे बंधनकारक होते. या नियमामुळे गुरुवारी कॅम्पस गर्दीने फुलला, पण विद्यापीठ प्रशासनाची यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली नाही. अर्जांची दुपारी दोनपर्यंत छाननी करून सायंकाळी चार वाजता यादी जाहीर करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात सायंकाळी सातपर्यंत यादी जाहीर झाली नाही. या प्रकारामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. प्रत्येक विभागात संबंधित विषयाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. विभागातील प्राध्यापकांसह अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले होते, मात्र कॉलेजातील रिक्त जागांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठे प्रवेश देणार, असा प्रश्न निर्माण झाला. हा सावळागोंधळ सायंकाळपर्यंत कायम होता. रसायनशास्त्र विभागात तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी गर्दी केली. विद्यार्थ्यांना सूचना देण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीकर लावण्यात आले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रत्येक विभागात प्रत्यक्ष भेट देऊन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली, मात्र कॉलेजात प्रक्रिया राबवणे शक्य असताना विद्यापीठात घेण्याचा अट्टाहास कशासाठी या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कुलगुरूंना देता आले नाही.

दरम्यान, बाहेरगावचे विद्यार्थी खासगी बस आणि वाहनांनी विद्यापीठात आले. विद्यापीठात जाण्यासाठी शहर बस नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागली. महिलांसोबत आलेल्या लहान मुलांची विस्कळीत प्रक्रियेमुळे गैरसोय झाली. ‘स्पॉट अॅडमिशन’मध्ये प्रवेश पूर्ण झाले नसल्यामुळे अखेरीस विद्यापीठाने परिपत्रक काढले. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत विभाग आणि महाविद्यालयांनी प्रवेश क्षमतेनुसार रिक्त जागा भरण्याची सूचना करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचा गोंधळ
सायंकाळी सहापर्यंत गणित विभागात यादी जाहीर झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरू केला. विद्यार्थी जुमानत नसल्यामुळे विभागप्रमुखांनी थेट कुलगुरूंच्या दालनात धाव घेतली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंवर प्रश्नांची सरबत्ती केली. बस व रेल्वे गेल्यामुळे रात्री आम्ही कुठे थांबणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. प्रवेश प्रक्रिया लवकर झाली असती तर विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नसती. केमिस्ट्री विभागात दोन हजार विद्यार्थी आल्यामुळे नियोजन कोलमडले. यादीचा फलक विद्यार्थ्यांनी अक्षरशः उचलून रस्त्यावर आणला, तर रात्री आठ वाजता विद्यार्थ्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भेदरलेल्या प्राध्यापकांनी खोलीत कोंडून घेतले.

अधिष्ठाता निरुत्तर
विद्यापीठातील पदव्युत्तर वर्गाच्या एकूण जागांबाबत अधिष्ठातांना माहिती नव्हती. पहिल्या यादीत आणि ‘स्पॉट अॅडमिशन’मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळाली नाही. विशेष प्रभारी अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे, अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, डॉ. दिलीप खैरनार यांना पत्रकारांनी प्रवेशाच्या आकडेवारीबाबत माहिती विचारली, मात्र एकाही अधिष्ठाताला माहिती सांगता आली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून राबवण्यात येत असलेल्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेची स्पष्ट आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे गोंधळात भर पडली.

पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया पारदर्शी आणि विद्यार्थ्यांच्या हिताची होती. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा फायदा झाला. अनेक मुले पहिल्यांदाच कॅम्पसमध्ये आले. काही त्रुटी असल्या तरी काही जमेच्या बाजू आहेत.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाच्या टँकरने विद्यार्थिनीला चिरडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या पाण्याच्या टँकरने मोपेडस्वार तरुणीला धडक देत दुचाकीसह फरफटत नेले. या अपघातात ही तरुणी गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सिडको एन ५ भागातील केंद्रीय सेवा शुल्क विभागासमोर झाला. या तरुणीवर एमजीएम हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पायल वसंत राठोड (वय २० रा. तोरणागडनगर, एन २ सिडको), असे या जखमी तरुणीचे नाव आहे. पायल ही गुलमोहर कॉलनी येथील होमीयोपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्गात शिक्षण घेत आहे. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार पायल ही एन ५कडून जालना रोडवर अॅक्टिव्हा दुचाकीवरून जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या मनपाच्या पाण्याच्या टँकरच्या पुढील टायरचा धक्का तिला लागला. या अपघातात पायल खाली कोसळली, हे टँकरचालकाच्या लक्षात आले नसल्याने पायल टँकरसोबत ३० ते ३५ फूट फरफटत गेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर टँकरचालकाने टँकर थांबवला. रिक्षाचालकाच्या मदतीने तिला तातडीने जवळच असलेल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सिडको पोलिसांनी पाण्याचा टँकर आणि अपघातग्रस्त दुचाकी जप्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या यादीवरून भाजपमध्ये घमासान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाने मंजूर केलेल्या रस्त्यांच्या कामाच्या यादीवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षात घमासान सुरू झाले आहे. यादीमधील चांगले रस्ते वगळून त्याऐवजी शहरातील मुख्य रस्त्यांचा समावेश करावा, अशी मागणी करणारे पत्र स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत. यामुळे काम सुरू होण्यापूर्वीच रस्ते वादात अडकल्याचे चित्र आहे.
शहरातील विविध सोयीसुविधांसाठी शासनाने औरंगाबाद महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे. या अनुदानातून रस्त्यांचीच कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. शंभर कोटी रुपयांमधून किती रस्त्यांची कामे करायची याची यादी तयार करून सविस्तर प्रकल्प अहवाल व तांत्रिक मान्यतेच्या अहवालासह शासनाकडे पाठवण्यात आली. शंभर कोटी रुपयांच्या मर्यादेत राहून शासनाने ३१ रस्त्यांच्या कामाला मान्यता दिली व या रस्त्यांची यादी जाहीर केली. यादी जाहीर झाल्यावर आता भाजपमध्येच संघर्ष सुरू झाला आहे.
औरंगाबाद शहरातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या परिसरातील काही रस्त्यांची सूचना केली होती. शासनाकडून आलेल्या यादीमध्ये नेमके हेच रस्ते उडविण्यात आले. ज्या रस्त्यांचा शहराशी फारच कमी संबंध येतो अशा रस्त्यांचा समावेश यादीमध्ये करण्यात आला. त्यात प्रामुख्याने फुलंब्री व औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील रस्त्यांचा अंतर्भाव आहे. यादीमधील काही रस्ते चांगल्या स्थितीत आहेत. थोड्याशा डागडुजीनंतर हे रस्ते सुस्थितीत येऊ शकतात. त्यामुळे हे रस्ते यादीतून वगळण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. काही नगरसेवकांनी ही मागणी केली असली तरी भाजपमध्ये या मागणीला जोर चढला आहे. भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी महापौर भगवान घडमोडे यांच्याकडे रस्त्यांच्या यादीबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांचा समावेश रस्त्यांच्या यादीत करायला हवा होता, पण तसे झाले नाही. काही अनावश्यक रस्ते यादी मध्ये घेण्यात आले आहेत, अशा भावना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महापौरांकडे व्यक्त केल्या. या प्रकरणाला महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी दुजोरा दिला आहे.

आणखी ५० कोटी द्यावेत

रस्त्यांच्या यादीत काही अनावश्यक रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे रस्ते वगळून त्यांच्या जागी मुख्य रस्त्यांचा, पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश करण्यात यावा असे पत्र आपण मुख्यमंत्र्यांच्या नावे देणार असून त्याच्या प्रति महापौर, आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांच्या यादीत बदल करावा किंवा जास्तीच्या अत्यावश्यक रस्त्यांसाठी आणखीन पन्नास कोटींचे अनुदान द्यावे, अशी मागणी करणार आहे, अशी माहिती सभापती गजानन बारवाल यांनी पत्रकारांची बोलताना दिली.

जीएसटीचा बोजा

शासनाने शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचे अनुदान मंजूर केले असले तरी ही कामे जीएसटीच्या बोजाखाली दबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जीएसटीची वाढीव रक्कम कुणी आणि कशी भरायची, असा प्रश्न निर्माण होणार आहे.
शासनाने १ जुलै पासून जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू केला आहे. त्यामुळे १ जुलैनंतर ज्या कामांच्या वर्कऑर्डर दिल्या जातील त्यांना जीएसटी लागू होणार आहे. काम करणाऱ्या कंत्राटदाराला कामाच्या किंमतीच्या १८ टक्के कर भरावा लागणार आहे. ही रक्कम किमान १८ कोटी रुपये होते. म्हणजे रस्त्यांच्या कामावर ११८ कोटी रुपये खर्च होतील. हे जास्तीचे १८ कोटी रुपये महापालिकेने भरायचे की कंत्राटदाराकडून वसूल करायचे याबद्दल प्रशासकीयस्तरावर खल सुरू आहे. रस्त्यांची निविदा काढण्यात आली असून जीएसटीमुळे कितपत प्रतिसाद मिळेल याबद्दल शंका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुवार ठरला आंदोलनाचा दिवस

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
श्रीगणेशचतुर्थी, चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळे गुरुवारी (२३ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चार आंदोलनांनी दुमदुमून गेला. अखिल भारतीय कैकाडी महासंघ, महाराष्ट्र सेना, अॅड. रमा कांबळे, मूल निवासी संघ या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी, विविध मागण्यांचे फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले होते.
कैकाडी जातीवरील क्षेत्रीय बंधन उठवावे, वसंतराव नाईक महामंडळाकडून समाजातील युवकांना कर्ज मंजूर करण्यात यावे. कैकाडी समाज कसत असलेल्या गायरान जमिनी त्यांच्या नावे करून देण्यात याव्यात, मुद्रा लोन विनाअट समाजातील युवकांना मंजूर करुन देण्यात यावा, कैकाडी समाजावरील वाढते अत्याचार व हल्ले थांबवण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी अखिल भारतीय कैकाडी महासंघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सचिव शरद माने, रोहिदास जाधव, संस्थापक अध्यक्ष संजय मेडे, जिल्हाध्यक्ष संपत जाधव, रमेश गायकवाड, किसन जाधव यांच्यासह कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अतिक्रमणधारक बेघर नागरिकांना म्हाडा, सिडको व हडकोमार्फत अतिक्रमित जागेवर बेघरांच्या कुवतीप्रमाणे अल्पदारात घरे द्यावी, हा निर्णय होईपर्यंत अतिक्रमण धारकांना हुसकावून लावू नये आदी मागण्यांसाठी मूलनिवासी संघातर्फ जिल्हाधिकारी कार्यालायसमोर आंदोलन केले. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व रोजगार मिळण्याचा हक्क कायदा करावा. मौजे हर्सूल येथील गट नंबर २१६ व २१७ आणि चिकलठाण्यातील गट नंबर ४७२ येथील अतिक्रमणधारकांना हुसकावून लावू नये. हर्सूल येथील अतिक्रमणधारकांना मुलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर अ‍ॅड. विजय वानखेडे, संदीप जाधव, संतोष बोरडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सरकारी नोकरीची खासगीकरण करू नये, मागासवर्गीयांना नोकऱ्या द्याव्या, शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्तीत वाढ करावी, आरोग्य सेवा मोफत द्यावी, गोरगरिबांना घरे आणि रस्‍त्यासाठी जमीन द्यावी, पदोन्नतीमधील मागासवर्गियांचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करावी, गायरान-जमीन धारकांना व अशा जमीनी कसणाऱ्यांना त्यांच्या नावे सातबारा देण्यात यावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मिलिंद मोकळे, शहराध्यक्ष सुनील खरात, जगन साळवे, राजू त्रिभुवन, मीनाक्षी शिरसाठ, मंगला पंदीकर, जिल्हाध्यक्षा वर्षा वर्धे, ज्ञानेश्‍वर घोरपडे, पंडित राठोड आदींचा यावेळी सहभाग होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्यावरील भाषणात देशाला हिंदुस्थान संबोधून संविधानाचा अनादर केला आहे, त्यांच्याविरुद्ध देशद्रोह व इतर योग्य त्या कलमान्वये कार्यवाही करावी, या मागणीसाठी अ‍ॅड. रमा काळे यांनी उपोषण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाडू मातीच्या गणपतींसाठी कार्यशाळांमधून जनजागृती

$
0
0

शाडू मातीच्या गणपतींसाठी कार्यशाळांमधून जनजागृती
विविध संस्थांनी चिमुलक्यांना दिले पर्यावणपूरक गणपतीचे प्रशिक्षण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाडू मातीच्या गणपतींची घरोघरी स्थापना करा, असे आवाहन करत शहरातील काही संस्था गेल्या आठवड्यांपासून गणेशमूर्ती निर्मितीच्या कार्यशाळा घेत आहेत. ‘सहयोग’ फाउंडेशन, ‘बी-पॉझिटिव्ह फाउंडेशन’, ‘अंबलोहल प्रशाला’, ‘रोहित हाऊस ऑफ आर्टस’ या संस्थांनी गेल्या दोन आठवड्यात विविध ठिकाणी सहा कार्यशाळा घेऊन सुमारे शाडूच्या-मातीच्या शेकडो गणपती मूर्ती बनविल्या आहेत. शुक्रवारी या गणेशांची त्या-त्या घरी प्रतिष्ठापना होईल.
प्रशाला अंबेलोहळ
जिल्हा परिषदेच्या प्रशाला अंबेलोहळ येथे शाडू मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी १०० विद्यार्थ्यांनी शाडू मातीचे १०० गणपती बनविले. गणेशोत्सवाचा खरा आनंद घेण्यासाठी आणि प्रदूषण थांबण्यासाठी अंबेलोहळ शाळेतील शिक्षकांनी शाडू मातीचे गणपती बनविण्यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गणपती कसा तयार करायचे याचे मार्गदर्शन संदीप मुंडल‌िक, रेणुका अंकुश आणि अरुण प्रधान यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्याहाळकर आणि पर्यवेक्षक लोसरवार यांनी सर्व विद्यार्थांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदय बक्षी, अजय डोणगावकर, संजय कुलकर्णी, दिगंबर अवसरमल, प्रकाश जिलेवाड, स्मिता दीक्षित, आशा प्रधान यांनी परिश्रम घेतले.
रोहित हाऊस ऑफ आर्ट
व्यंकटेश नगर येथील रोहितस हाऊस ऑफ आर्टतर्फे आयोजित इकोफ्रेंडली गणपती बनवा कार्यशाळेसाठी मोरया फाउंडेशनचे सहकार्य मिळाले. या कार्यशाळेत ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात वर्ष ४ ते २० वयोगटातील मुलामुलींनी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेत पर्यावरणपूरक गणपती बनवून त्यांना विसर्जित कसे करायचे व पर्यावरणाबाबत दक्ष कसे राहायचे यासंबंधी श्वेता रोहित गिरी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत श्वेता गिरी, रोहित गिरी, नीता चौहान यांचे मार्गदर्शन लाभले.
सहयोग फाउंडेशन
सहयोग फाऊंडेशनच्यावतीने पैठण गेटजवळील मडिलगेकर कलादालनात आयोजित शाडू मातीच्या गणेश मूर्ती आणि इको फ्रेंडली मखर तयार करण्याच्या कार्यशाळेत २५ जणांनी सहभाग घेतला. यात चिमुकल्यांसह ज्येष्ठांचीही मोठी संख्या होती. बाहेर जोराचा पाऊस सुरू असताना तब्बल तीन तास चाललेल्या कार्यशाळेत उपस्थितांनी एकाहून एक सुंदर, आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणपती बाप्पा तयार केले. सहयोग फाऊंडेशनच्यावतीने ‘माझा बाप्पा पर्यावरणपूक बाप्पा’ या उपक्रमाअंतर्गत झालेल्या कार्यशाळेत शिल्पकार बलराज मडिलगेकर आणि वास्तूविशारद स्नेहा बक्षी यांनी प्रशिक्षण दिले
बी-पॉझिटिव्ह फाउंडेशन
झांबड इस्टेट हॉलमध्ये तसेच सिडकोतील एन-८ मधील शांतीनिकेतन शाळा येथे बी-पॉझिटिव्ह फाउंडेशनच्या वतीने दोन कार्यशाळा घेण्यात आल्या. दोन्ही कार्यशाळा मिळून सुमारे १८० मुलांनी स्वतःच्या हाताने गणपती बनविण्याचा आनंद घेतला. कलाशिक्षक स्वाती एरंडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शांतीनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिकांसह शिक्षकांचीही यावेळी उपस्थिती होती. तर झांबड इस्टेट येथील कार्यशाळेसाठी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी पुढाकार घेतला. कार्यशाळेत फाउंडेशनचे पदाधिकारी आणि टीमने परिश्रम घेतले.
प्रयास युथ फाउंडेशन
शारदा मंदिर शाळेत प्रयास युथ फाउंडेशनद्वारे इको-गणपती निर्मिती या विषयावर मार्गदर्शंन करण्यात आले. गणेशमूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण देऊन शाळेत मुलींनी गणेशमूर्तीही बनवल्या. यात ७५ जणींचा सहभाग होता. ७५ गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या. यासाठी प्रयास फाउंडेशनचे रवी चौधरी आणि टीमने परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालवाडीच्या विद्यार्थ्यांना इस्कॉनची खिचडी

$
0
0

बालवाडीच्या विद्यार्थ्यांना इस्कॉनची खिचडी
महापालिकेने केली ४५ लाखांची तरतूद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालवाडींमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून इस्कॉनची खिचडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३३०० विद्यार्थ्यांना ही खिचडी मिळणार असून त्यासाठी पालिकेच्या फंडातून ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळतो, पण बालवाडीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. या विद्यार्थ्यांसाठी शासनाची कोणतीही योजना नाही. महापालिकेच्या शालेय इमारतीत बालवाडीचे वर्ग चालतात. जे विद्यार्थी अनुपस्थित राहतात त्यांची शिल्लक राहिलेली खिचडी बालवाडी मधील विद्यार्थ्यांना दिली जाते. महापालिकेतर्फे १३७ बालवाड्या चालवल्या जातात. त्यातून ३३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांना देखील पोषण आहाराचा लाभ मिळाला पाहीजे या उद्देशाने बालवाडीच्या विद्यार्थ्यांना इस्कॉन फूड रिलीफ फाऊंडेशनचा पोषण आहार मिळावा यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला. तसा प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीच्या बैठकीत मांडला. स्थायी समितीने त्याला मान्यता दिली.
महापालिकेच्या बालवाडीमध्ये ३३०० विद्यार्थी आहेत. त्यांना शालेय पोषण आहार देण्यासाठी एका विद्यार्थ्यामागे रोज ६ रुपये २० पैसे खर्च येतो, म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोज २० हजार ४६० रुपये महापालिकेला खर्च करावे लागणार आहेत. सुट्ट्यांचे दिवस वगळता २२० दिवस शाळा सुरू राहते. या दिवसांचा शालेय पोषण आहाराचा एकूण खर्च ४५ लाख १ हजार २०० रुपये इतका येतो. हा खर्च महापालिकेच्या फंडातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ६६ (१)(३) मध्ये महापालिकेस स्वेच्छा निर्णयानुसार तरतूद करता येईल अशा बाबींमध्ये शाळकरी मुलांसाठी दुधाची तरतूद करण्याचा समावेश आहे. महापालिकेने त्यात सुधारणाकरून दुधाऐवजी बालवाडीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना इस्कॉनची खिचडी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवाना आर्किटेक्ट देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तुम्हाला दोन हजार चौरस फुटांपर्यंत बांधकाम करायचे असेल, तर आता परवानगीसाठी महापालिकेत चकरा मारण्याची गरज नाही. आर्किटेक्टच्या माध्यमातून बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम करता येईल. बांधकाम परवानगी देताना आवश्यक ते नियम पाळण्याची जबाबदारी आर्किटेक्टवर असेल. महापालिकेत चकरा न मारता ‘जी प्लस वन’ एवढे बांधकाम नागरिकांना करता येणार आहे.

आर्किटेक्टच्या माध्यमातून बांधकाम परवानगी देण्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली. त्यानुसार; अधिसूचनेच्या प्रती महापालिकांना व संबंधित यंत्रणांना पाठवल्या आहेत. औरंगाबाद महापालिकेला देखील या अधिसूचनेची प्रत मिळाली आहे. शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार दोन हजार चौरस फुटांच्या बांधकामासाठी आर्किटेक्टने दिलेली बांधकाम परवानगी आता ग्राह्य धरली जाणार आहे. आर्किटेक्टने आपल्या स्तरावर बांधकाम परवानगी द्यावी व बांधकाम परवानगीचे शुल्क महापालिकेत भरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परवानगी देताना बांधकामाची संपूर्ण जबाबदारी आर्किटेक्टची असेल.

बांधकाम परवानगी देताना आर्किटेक्टनी संबंधित जागेच्या मालकीहक्काची खात्री करून घेतली पाहिजे. महापालिकेने तयार केलेले विकास आराखड्याचे झोनिंग व मंजूर ले आउट यांची मर्यादा पाळूनच आर्किटेक्टला बांधकाम परवानगीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. बांधकाम परवानगी देताना आर्किटेक्टनी सामासिक अंतर, एफएसआय (चटईक्षेत्र), पार्किंगचे क्षेत्र याचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. आर्किटेक्टच्या माध्यमातूनच नागरिकांना महापालिकेत बांधकाम परवानगीचे शुल्क भरावे लागणार आहे.

मर्यादा वाढवावी ः ठाकूर
यासंदर्भात आर्किटेक्ट अजय ठाकूर म्हणाले, ‘आर्किटेक्टच्या माध्यमातून बांधकाम परवानगी देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. छोट्या शहरांत आजही प्लॉटवर घराचे बांधकाम करण्याचा कल आहे. त्यांना महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळवताना त्रास होतो. आता हा त्रास कमी होईल. दोन हजार चौरस फुटांची मर्यादा फारच कमी वाटते. ती तीन हजार चौरस फुटांपर्यंत वाढवली पाहिजे. त्याचबरोबर बिल्डर्सच्या छोटे गृहनिर्माण प्रकल्पांनाही याचप्रकारे बांधकाम परवानगी देण्याची तरतूद करण्यात यावी. पार्किंगसह पाच मजल्याची बांधकाम परवानगी देण्याची तरतूद त्यात असावी.’

शुल्कभरणाही आर्किटेक्टच्या माध्यमातून
आर्किटेक्टच्या माध्यमातून बांधकाम परवानगी देण्याची अधिसूचना महापालिकेला प्राप्त झाली आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू केली जाईल. बांधकाम परवानगीचे शुल्क भरण्याचे प्रस्ताव आर्किटेक्टनी महापालिकेच्या नगर रचना विभागात सादर करावेत. आम्ही ते प्रस्ताव स्वीकारू. ज्यांना आर्किटेक्टच्या माध्यमातून बांधकाम परवानगी घ्यायची नाही, ते नागरिक स्वतंत्रपणे बांधकाम परवानगीचा प्रस्ताव महापालिकेत दाखल करू शकतात, असे नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक ए. बी. देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औषधांचे साडेसहा कोटींचे बिल थकले

$
0
0

घाटी रुग्णालय व्हेंटिलेटरवर, प्रत्येक वेळी मागणी करुनही मिळतो निम्माच निधी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) औषधी व वैद्यकीय साहित्यासाठी प्रत्येक वर्षी गरजेच्या जवळजवळ निम्माच निधी देण्यात आल्यामुळे मागच्या दोन-अडीच वर्षांत थकीत रक्कम वाढून सद्यस्थितीत तब्बल साडेसहा कोटींचे औषधांचे बिल थकले आहे. एकीकडे थकीत बिल वाढत असतानाच औषधांचे बजेट काही केल्या वाढत नसल्याने घाटी व्हेंटिलेटरवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, औषधी कंपन्यांकडून पुरवठ्यावर गंभीर परिणाम होत असून, मागच्या कित्येक महिन्यांपासून अगदी सलाईन, छोटी-मोठी औषधे, महत्वाची इंजेक्शन्स, प्रतिजैविके, जीवरक्षक औषधे, वैद्यकीय साहित्य गोरगरीब रुग्णांना विकत घेण्याची वेळ येत आहे.
घाटी रुग्णालय हा गोरगरीब रुग्णांचा आधारस्तंभ असून, तब्बल १२-१४ जिल्ह्यातील रुग्ण फार मोठ्या संख्येने दररोज घाटीमध्ये उपचारासाठी येतात. एकट्या घाटीच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी तीन हजार रुग्ण उपचारासाठी येतात, तर घाटीच्या आंतररुग्ण विभागामध्ये म्हणजेच १ ते ३० वॉर्डांमध्ये कोणत्याही क्षणी दीड हजारांपेक्षा जास्त रुग्ण दाखल असतात. रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागामध्ये नैसर्गिक तसेच सिझेरियन प्रसुतींचा दररोजचा आकडा हा सत्तरच्या घरात आहे. केवळ स्त्रीरोग विभागामध्ये नव्हे तर प्रत्येक विभागामध्ये व प्रत्येक वॉर्डामध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. ही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना, त्या प्रमाणात औषधांचे व वैद्यकीय साहित्याचे बजेट मात्र अजिबात वाढत नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. किमान गरजेइतकाही निधी मिळत नसल्याचे प्रत्येक वर्षीच्या आकड्यांवरुन निष्पन्न होत आहे. २०१५-१६ मध्ये औषधी खरेदीसाठी ३ कोटी ८ लाख ९ हजार रुपयांचा निधी मिळाला व ३१ मार्च अखेर हा निधी पूर्णपणे खर्च झाला; तरीदेखील ३ कोटी २० लाख ६१ हजारांची देयके प्रलंबित राहिली होती. २०१६-१७ मध्ये औषधांसाठी ४ कोटी ८ लाख ८१ हजार रुपयांचा निधी घाटीला मिळाला व ३१ मार्च अखेर निधी पूर्णपणे खर्च झाला; तरीदेखील ६ कोटी २ लाख ७३ हजार रुपयांची देयके प्रलंबित राहिलेली होती. २०१७-१८ मध्ये औषधांसाठी ८ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र केवळ ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता व त्यातून ४ कोटी २० लाख ७४ हजार रुपयांची देयके देण्यात आली होती. सद्यस्थितीत औषधी तसेच वैद्यकीय साहित्याची एकूण ६ कोटी ५१ लाख २८ हजार रुपयांची देयके थकली आहे. त्याचा फटका दररोज बहुतेक रुग्णांना बसत आहे.
‘ऑक्सिजन’चे साडेचार लाखही बाकी
घाटी रुग्णालयाला पुरवठा होणाऱ्या प्रत्येक प्रकारातील देयके थकली आहेत. यामध्ये अर्थातच औषधांची सर्वाधिक ४ कोटी २२ लाख ९१ हजार रुपयांची देयके थकली आहेत. तसेच ‘सर्जिकल’ची ९१ लाख ९६ हजार रुपये, ‘लिनन’ची २४ लाख ७९ हजार रुपये, ‘किरकोळ भांडार’ची ६६ लाख ३७ हजार रुपये, तर ‘केमिकल’ची ४० लाख ५६ हजार रुपयांची देयके थकली आहे. एवढेच नव्हे तर प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्यांची ४ लाख ६९ हजार रुपयांची देयके थकली आहेत. त्याचवेळी दैनंदिन गरजेनुसार घाटी रुग्णालयाला डिसेंबरपर्यंतच्या औषधांसाठी पूर्वीच्या देयकासह किमान ८ ते १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही निधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय पातळीवर कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याची दुर्दैवी स्थिती कायम आहे.

डिसेंबरपर्यंत औषधांसाठी पूर्वीच्या देयकांसह ८ ते १० कोटींचा खर्च अपेक्षित असून, सरकारकडून सर्व कंपन्यांची देयके मिळण्याची शाश्वती असल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होत नाही. निधी मिळाल्यानंतर पूर्वीची देयके आधी दिली जातात. अर्थात, ‘ऑक्सिजन’च्या पुरवठादारांची देयके आधी देण्याचे आदेश नुकतेच मिळाले आहेत.
– डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुत्थूट फायनान्स दरोडा; तपासाचा धागा गवसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना रोडवर गेल्या वर्षी पडलेल्या मुत्थूट फायनान्सवर पडलेल्या दरोडाप्रकरणी पोलिसांना तपासाचा धागा गवसला आहे. आंध्र प्रदेश येथील सायबराबाद पोलिसांनी तेथे पडलेल्या मुत्थूट फायनानसवरील दरोड्यात चार जणांना अटक केली आहे. या संशयितांना औरंगाबाद पोलिस ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.
जालना रोडवरील महर्षि दयानंद चौकातील मुत्थूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर १३ मे २०१६ रोजी भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांच्या वेशात आलेल्या टोळीचा दरोड्याचा प्रयत्न महिला कर्मचाऱ्यांमुळे फसल्यानंतर आरोपी पसार झाले होते. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्ष उलटले तरी आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. या दरोड्याच्या तपासासाठी विशेष पथके देखील निर्माण करण्यात आली होती.

सायबराबाद येथे ही पुनरावृत्ती

दरम्यान, ४ जुलै २०१७ रोजी सकाळी आंध्र प्रदेश येथील सायबराबाद शहरातील मार्लादेवपल्ली येथील मुत्थूट फायनान्स कंपनीच्या शाखेवर दरोडा टाकण्यात आला होता. मात्र येथील कर्मचाऱ्यांच्या सर्तकतेमुळे हा दरोडा देखील फसला होता. साबयराबाद पोलिसांनी एका चिवडयाच्या पिशवीवरून उस्मानाबाद गाठले. येथून संशयितांना अटक करीत गुन्हा उघडकीस आणला. सायबराबाद पोलिसांनी अर्शद फुल्लोद्दीन खान (वय २८ रा. मुंबई), शफियोद्दीन नवाजोद्दीन सय्यद (वय ३०), संतोष दशरथ वीरकर (वय ३५ दोघे रा. उस्मानाबाद) आणि मोहम्मद दस्तगीर मोहम्मद यासीन (वय ५५ रा. हैदराबाद) यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील शरीफ, अण्णा आणि फारूख हे तीन संशयित पसार झाले आहेत.

संशयितांना ओळखले

औरंगाबाद येथील गुन्ह्यामध्ये सायबराबाद पोलिसांनी पकडलेल्या आरोपींचा समावेश आहे का याची चाचपणी शहर गुन्हे शाखेने केली. सीसीटीव्हीमध्ये आलेले आरोपींचे छायाचित्र व पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या चेहऱ्यात साम्य आढळले आहे. शहरातील गुन्ह्यातील साक्षीदाराने या संशयिताला ओळखले असून लवकरच त्यांना हस्तांतर करून घेणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायगावच्या शाळेला अधिकाऱ्यांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
औरंगाबाद तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या छताचे प्लास्टर पडून बुधवारी तीन विद्यार्थी जखमी झाल्यानंतर जागे झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी शाळेत धाव घेतली. या अधिकाऱ्यांनी गुरुवारी शाळेची पाहणी करून जीर्ण खोल्यात विध्यार्थी बसवू नये, असे बजावले आहे.
हर्सूल सावंगी जवळच असलेल्या नायगाव येथील उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे . शाळेला नवीन इमारत बांधण्यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे लेखी निवेदने दिली होती. त्याचा पाठ पुरावा देखील केला होता. परंतु, झोपी गेलेले शासकीय अधिकारी यांनी या शाळेकडे ढुंकूनही पाहिले नाही. इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने बुधवारी अचानक छताचे प्लास्टर कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाले. याबद्दलेचे वृत्त मटात छापून आल्यानंतर शासकीय अधिकारी खडबडून जागी झाले आणि गुरुवारी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांना सुस्थितीतील खोल्यांत बसवावे अशी सूचना मुख्याध्यापक केली आहे. तीन नवीन खोल्याचे बांधकाम निधी प्राप्त होताच सुरू करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उर्वरित खोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. या पथकात जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियानचे कार्यकारी अभियंता बी. आर. गौतम, कनिष्ठ अभियंता बी. ए. सिद्दीकी, एम. एम. बडवे, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. पी. दुतोंडे, जिल्हा परिषद सदस्य संतोष शेजुळ हे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेजस्विनीचे सामुदायिक हरतालिका पूजन

$
0
0

तेजस्विनीचे सामुदायिक हरतालिका पूजन
म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
उल्कानगरीतील ओंकारेश्वर मंदिरामध्ये पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी एकत्र येत हरितालिका पूजा केली. पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली ​हरतालिका पूजेचा शास्त्रशुद्ध विधी पार पडला तेव्हा एक मंगलमय वातावरण पसरले होते. तेजस्विनी समुहाच्या वतीने गुरुवारी सामुदायिक ‌हरितालिका पूजन कार्यक्रमघेण्यात आला.
सुरेख उखाणे घेत २२ महिलांनी सामुदायिक पूजेचा आनंद घेतला. तेजस्विनी समूहातर्फे सलग तीन वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. ह‌रितालिकेची पूजा घरोघरी केली जाते. मात्र, ही पूजा का केली जाते याविषयी अनेकींना पुरेशी माहिती नसते. पूजेचा शास्त्रशुद्ध विधी व अन्य आवश्यक माहिती महिलांना मिळावी. एकटीने पूजा करण्याऐवजी महिलांना एकत्र आणून तेजस्विनीने ही पूजा करुवून घेतली. मंदिराच्या प्रसन्न वातावरणात इतर महिलांसोबत हरितालिकेची पूजा करताना सर्वजणी मोठ्या उत्साही होत्या. एकमेकींना हळदी-कुंकू देत, उखाणे घेत मोठ्या खेळीमेळीच्या वातवरणात पूजा संपन्न झाली. यावेळी पुरोहित बबन गुरुजी जोसाळकर यांनी या पूजेचे महत्त्व सांगितले. हरितालिका पूजेवेळी वातावरणाशी समरुप सामग्रीचवापरली जाते. ‌
निसर्गाच्या सान्निध्यात महिलांना एकरुप होता यावे हा या पूजेचा उद्देश आहे. पूजेमध्ये थंड फळे जसे बेलपत्रे, बेलफळ, काकडी, कौठ, मुळा आदी वापरले जाते. उपवास सोडतानाही दहीभाताचा नैवैद्य दाखवला जातो, असे ते म्हणाले.
यावेळी पारंप‌ारिक वेशभूषा व उखाणे स्पर्धाही घेण्यात आली होती. पूर्वा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या पायल घाग परीक्षक होत्या. उत्कृष्ट वेशभूषा करून रुपाली पाठाडे, भारती जोशी व रंजना देशपांडे विजेत्या ठरल्या. तर उखाणे स्पर्धेत रेखा बारहाते व दीपाली मुळे यांनी बाजी मारली. सुनीता पेंडभाजे व अश्विनी मुळे प्रकल्पप्रमुख ​होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैशाली लांबे, सीमा गावरस, संगीता वाणी, गंगा अग्रवाल, रेखा हिवरे, शिवकन्या पाटील, शिरीष आमले आदींनी परीश्रम घेतले. सुचिता लिगदे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकारेश्वर मंदिराच्या प्रमुख स्नेहलता ठाकूर यांनीहीस‌हकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाचा खून; पाच जणांना जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बाळाला पाहण्यासाठी आलेल्या जावयाला बेदम मारहाण करणाऱ्या व यात जावयाचा मृत्यू झाल्याप्रकरणी सासू-सासऱ्यासह तीन मेव्हण्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी गुरुवारी जन्मठेप ठोठावली. तसेच सर्व पाच आरोपींना सहा महिने सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी कोर्टाने मंगळवारी पाचही आरोपींना दोषी ठरवले होते.
औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील खेडी येथील वाहनचालक सय्यद अजीम सय्यद सलीम (वय २५) याचे शेजारच्या शमिमा या तरुणीशी मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये होऊन दोघांनी पळून जाऊन नोंदणी पद्धतीने लग्न केले होते. मात्र दोघांच्या लग्नाला शमिमाच्या घरच्यांचा विरोध होता. लग्नानंतर शमिमा सासरी राहू लागली असता, घरगुती कार्यक्रमासाठी शमिमा हिला माहेरी नेण्यात आले होते. दरम्यान, शमिमाचे आई-वडील व मेहुण्यांनी क्षुल्लक कारणावरून सय्यद अजीम व त्याच्या आई-वडिलांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तसेच अजीमने मुलीला पळवून नेऊन लग्न केल्याची तक्रारही शमिमाच्या आईने पिशोर पोलिस ठाण्यात दिली होती. १९ जानेवारी २०१४ रोजी शमिमाने मुलीला जन्म दिला व २२ फेब्रुवारी रोजी शमिमा मुलीला पोलिओ डोस पाजण्यासाठी घेऊन गेली असता, सय्यद अजीम हा तिथे आला. त्यावेळी अजीमने बाळाला पाहिल्याचे लक्षात येताच शमिमाच्या आईने सय्यद अजीमला शिविगाळ करत मारहाण केली. त्याचवेळी शमिमाचे वडील, भाऊ, वहिनी, मेहुणा, बहीण धावत आले आणि त्यांनीही लाठ्या काठ्या, कुऱ्हाडीने अजीमला बेदम मारहाण केली व यात अजीमचा मृत्यू झाला होता. मृत अजीमचे वडील सय्यद सलीम सय्यद अली यांच्या तक्रारीवरून पिशोर पोलिस ठाण्यात कदीर खान मजीद खान (वय ७०), अश्रफ खान कदीर पठाण (वय २८), मुश्रफ खान कदीर पठाण (वय ३२), शकीला बी कदीर खान पठाण (वय ६५), जोहर खान कदीर खान पठाण, मृताची पत्नी शमिमा बी सय्यद अजीम, रिजवान बी मुश्रफ (वय २५), जावेद शेख आयुब (वय २६) व जहीरखान कदीर खान पठाण या नऊजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तिन्ही मेहुण्यांना शिक्षा

खटल्यावेळी सासरा कदीर खान मजीद खान, सासू शकिला बी कदीर खान पठाण, अश्रफ खान कदीर पठाण, मुश्रफ खान कदीर पठाण व जोहर खान कदीर खान पठाण या तीन मेहुण्यांना कोर्टाने मंगळवारी दोषी ठरवून निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होऊन, कोर्टाने दोषी ठरवलेल्या वरील पाच आरोपींना कलम ३०२ सह कलम १४९ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला. तसेच कलम १४३ व १४७ अन्वये आरोपींना सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंडही ठोठावला. सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images