Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

श्रमिक साहित्य संमेलन, अध्यक्षपदी डॉ. साळुंखे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन येत्या १० व ११ सप्टेंबर रोजी जालन्यात आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत डॉ. आ .ह. साळुंखे संमेलनाध्यक्ष आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होणार आहे. पी. साईनाथ, डॉ. रावसाहेब कसबे यांच्यासह अन्य साहित्यिक, विचारवंत उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती सीटूचे उपाध्यक्ष उद्धव भवलकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कॉ. प्रभाकर संझगिरी साहित्य नगरी, शगुन मंगल कार्यालय, अंबड नाका, जालना येथे संमेलन आयोजित केले आहे. १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथसन्मान मिरवणुकीचे उद्‍घाटन माजी आमदार नरसय्या आडाम हे करणार आहेत. त्यानंतर सकाळी दहा वाजता माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते संमलेनाचे उद्‍घाटन होईल. संमेलनाध्यक्ष डॉ. साळुंखे यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ कादंबरीकार दिनानाथ मनोहर, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (११ सप्टेंबर) श्रमिक संस्कृतीपुढील आव्हाने या विषयावरील चर्चासत्राने संमेलनाची सांगता होईल. सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या अध्यक्षतेखाली हे सत्र होणार आहे. या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, उत्तम कांबळे, साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, शेतमजूर युनियनचे संस्थापक कुमार शिराळकर उपस्थित राहणार आहेत. अॅड. एम.एच. शेख हे ठराव वाचन करणार असून ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, उर्दू शायर शम्स जालनवी यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

भरगच्च कार्यक्रम

उद्‍घाटनानंतर ‘कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यः सद्यःस्थिती’ या विषयावर विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर साहित्यिक रेखा बैजल यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. कादंबरीकार कुमार अनिल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ‘श्रमिकांचे मुक्ती लढे आणि मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद होईल. कवी समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ‘ग्रामीण कष्टकरी आणि कला साहित्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण; महिला ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दोन वर्षांच्या चिमुकलीच्या कानातले काढून तिचे अपहरण करणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडले. हा प्रकार गुरुवारी दुपारी दीड वाजता धूत हॉस्पिटल समोरील श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी येथे घडला. या महिलेला सिडको एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तिच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.
श्रद्धा कॉलनी भागात एक दोन वर्षांची चिमुकली घरासमोर खेळत होती. त्यावेळी संशयित आरोपी सुनीता (रा. प्रकाशनगर पश्चिम) हिने तिला चॉकलेट व केळीचे आमिष दाखवत सोबत नेले. तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घेतल्या. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने तिचा सर्वांनी शोध घेतला. त्यावेळी एक महिला या मुलीला घेऊन गेल्याचे सांगत एका लहान मुलीने दिशा दाखवली. तिचा परिसरात शोध घेण्यात आला तेव्हा सदाशिवनगर भागातील निर्जन ठिकाणी मुलीला घेऊन ती महिला उभी होती. मुलीच्या वडिलांनी धाव घेत तिच्या ताब्यातून मुलीला घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या नागरिकांनी महिलेला पकडले, वॉर्डाचे नगरसेवक मनोज गांगवे यांनी तेथे धाव घेऊन तिची जमावाच्या ताब्यातून मारहाण होत असताना सुटका केली. ही माहिती मिळाल्यानंतर सिडको एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेला ताब्यात घेतले. या मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले.

पोलिसांची दिशाभूल

पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता तिने सुरुवातीला मुकुंदनगर, राजनगर भागातील रहिवासी असल्याचे खोटेच सांगितले. आपल्याला एक मुलगी असून तिने शाळेचे नाव सांगितले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या नावाची मुलगी शाळेत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिने दुसऱ्या शाळेचे नाव सांगून पतीने सोडून दिल्याचे खोटेच सांगितले. दुसऱ्या शाळेत तिची मुलगी शिकत असल्याचे निष्पन्न झाले. पण, मुलीने आपल्याला वडील असून ते मजुरी करत असल्याचे सांगितल्यानंतर संशयित महिलेचे पितळ उघडे पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक करणारी आहे. मुंबई विद्यापीठाप्रमाणे या विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. या गोंधळाला जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार,’ असा सवाल पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला. ‘स्पॉट अॅडमिशन’ प्रक्रियेचा गोंधळ उडाल्यानंतर चव्हाण यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेऊन विद्यापीठ प्रशासनावर ताशेरे ओढले.

पदव्युत्तर वर्ग प्रवेशाची यंत्रणा अपयशी ठरल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. ‘पीजी’ प्रवेश सुरळीत करण्याच्या प्रश्नावर आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरूंची भेट घेतली. यावेळी कुलसचिव डॉ. प्रदीप जबदे, अधिष्ठाता डॉ. दिलीप खैरनार, डॉ. संजय साळुंके, परीक्षा मूल्यमापन संचालक डॉ. सतीश रगडे, प्राचार्य शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. विक्रम खिल्लारे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. भारत खैरनार उपस्थित होते. ‘फ्रीज’ आणि ‘फ्लोट’ प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजली नसल्यामुळे गोंधळ उडाला. या प्रक्रियेला दोन-अडीच महिने लागल्यामुळे शैक्षणिक नियोजन कोलमडले. या प्रक्रियेचे नियम दररोज बदल असल्यामुळे कॉलेज व विद्यार्थी गोंधळात पडले. दूरच्या विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस’मध्ये ‘स्पॉट अॅडमिशन’साठी बोलावणे खर्चिक प्रक्रिया आहे. हा अट्टाहास कशासाठी, असा सवाल चव्हाण यांनी केला.

यावेळी त्यांनी अधिष्ठातांना प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी विचारली, मात्र एकाही अधिष्ठाताला ठोस माहिती नव्हती. सीईटीचे खूळ कुणी काढले, असा सवाल चव्हाण यांनी केला. विशेष प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांनी सीईटीचे परिपत्रक काढले होते, असे उत्तर डॉ. खैरनार यांनी दिले. कुलगुरूंना न जुमानता परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना कोंडीत कशासाठी पकडता, असा जाब चव्हाण यांनी विचारला. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल बराच वेळ खडाजंगी झाली. पैठण, बदनापूर, खुलताबाद येथील महाविद्यालये विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी ५० हजार ते एक लाख रुपये शुल्क मागत असल्याचे पालकांनी सांगितले. कॅम्पसमध्ये स्पॉट अॅडमिशन घेतल्यामुळे ही फसवणूक टळली, असे चोपडे यांनी सांगितले.

शुल्क परत करा
‘पीजी सीईटी’साठी शुल्क आकारण्यात आले होते, मात्र सीईटी नसलेल्याकडून स्पॉट अॅडमिशनसाठी शुल्क घेऊ नका. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना शुल्क परत करा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. या प्रवेशासाठी किमान चार हजार रुपये खर्च लागल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मेटाकुटीस आले आहेत. विद्यापीठाने नवीन प्रक्रिया राबवताना पुरेशी खबरदारी घेतली असती, तर ही वेळ आली नसती असे चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोनवरून अश्लील बोलून त्रास देणारा जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मृत नातेवाईकाच्या मोबाइलमधील सिमकार्ड चोरून त्याचा वापर करून महिलांना अश्लील फोन करणाऱ्या विकृत व्यक्तीला गुरुवारी दुपारी गुन्हेशाखेने अटक केली आहे. शिवाजी देवीदास जाधव (वय २६, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे त्याचे नाव आहे. मोबाइल सिम कार्ड क्रमांक ७५०७०९१४७५ वरून महिलांना फोन करून त्रास दिला आहे. त्यावरून कॉल आले असल्यास महिलांनी तक्रार करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्तांनी केले आहे.
काही दिवसापासून शहरातील काही महिलांना अनोळखी क्रमांकावरून निनावी कॉल येत व समोरील व्यक्ती अश्लील संभाषण करत होत. यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावरून सायबर सेलच्या मदतीने त्या मोबाइलधारकाच्या पत्ता शोधून काढण्यात आला. पण, सिमकार्डधारकाचा मृत्यूचा झाला असून त्यांचा मोबाइल सिमकार्डसह हरवल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची माहिती घेतली असता शिवाजी जाधववर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने महिलांना अश्लिल फोन करत असल्याची कबुली दिली. एका महिलेच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात शिवाजी जाधव विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, डीसीपी डॉ. दीपाली धाटे-घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, गजानन मांटे, देवचंद महेर, सुनेश कुसळे, रवी दाभाडे, विशाल सोनवणे, सुनील धात्रक, प्रभाकर राऊत यांनी केली.

हेल्पर म्हणून गेले आणि पकडले

शिवाजी जाधव हा बांधकाम मिस्त्री असून त्याचे नातेवाईक पत्ता सांगत नव्हते. त्यामुळे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी शक्कल लढवून दोन पोलिसांना साध्या वेशात त्याच्या नातेवाईकाकडे पाठवून हेल्पर असून कामासाठी जाधव यांच्याकडे आल्याचे सांगितले. त्यांना नातेवाईकांनी पत्ता सांगितल्यानंतर शिवाजीला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक संघटनांचा बैठकीवर बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद प्रशासनातर्फे गुरुवारी आयोजित बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित नव्हते. हा प्रकार लक्षात येताच सर्व शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनीही घोषणाबाजी करत बैठकीवर सामुहिक बहिष्कार घातला.

यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षक संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र नियोजित अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्यासह शिक्षण विभाग प्रमुख रवींद्र वाणी, मुख्य वित्त अधिकारी जे. बी. चव्हाण; तसेच सर्व नऊ तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारीच बैठकीला गैरहजर राहिले. कोणत्याही खात्याचे प्रमुखच उपस्थित नसल्याने शिक्षक संघटनांची या बैठकीवर सामूहिक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. बैठकीत सुरवातीलाच शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी सामूहिक बहिष्कार टाकत असल्याचे स्पष्ट सांगितले. शिक्षक संघाचे प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे यांनी अनुमोदन दिले. त्यांनंतर सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत यशवंतराव चव्हाण सभागृहातून काढता पाय घेतला. जिल्हा परिषद हिरवळीवर सर्व शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी बैठक झाली. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप ढाकणे यांनी प्रास्ताविक करून गाफील प्रशासनावर ताशेरे ओढले. दिव्यांग संघटना प्रमुख आर. आर. पाटील, शिक्षक संघाचे प्रसिद्धीप्रमुख हिवाळे, शिक्षक भारतीचे प्रकाश दाणे, शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष बाबुराव गाडेकर, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष पवार आदी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे,अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, शिक्षण सभापती मीना शेळके, जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, संतोष शेजूळ यांनी या आंदोलनाची दखल घेऊन उपाध्यक्ष कार्यालयात दरबार भरवला. उपाध्यक्ष केशवराव तायडे व अन्य सदस्यांनी प्रशासनावर कारवाई करण्याचे; तसेच आठ दिवसांत पुन्हा सूत्रबद्ध नियोजनासह बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

असे आहेत प्रश्न...
- शिक्षकांचे वेतन एक तारखेला करण्याचा शासन निर्णय असताना तब्बल एक दीड महिना उशिरा पगार जमा केला जातो
- २००५ नंतरच्या शिक्षकांच्या वेतनातून दोन महिन्यांचे ‘डीसीपीएस’ हप्ते कपात होत आहेत
- गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती झालेली नाही
- केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक यांच्याही पदोन्नती रखडलेल्या आहेत
- पदवीधर शिक्षकांचे ग्रेड वेतन ४३००वरून २८०० रुपये कमी केले जात आहे
- रजा प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती, जीपीएफ प्रस्ताव मंजुरीत दिरंगाई होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन सणासुदीत ‘एटीएम’ बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँकांच्या एटीएममधील रोकड गेल्या दोन‌ दिवसांपासून संपली आहे. ऐन सणासुदीत एटीएम असल्याने नागरिकांना आर्थिक चणचण भासत आहे.

चलन पुरवठा न झाल्याने बहुतांश एटीएम बंद आहेत, असे बँक अधिकारी सांगत आहेत. याशिवाय खासगी बँकांचे सर्व्हर डाउन असल्याचे कारण समोर आले आहे. काही एटीएमवर गुरुवारी पैसे भरण्यात येतील आणि त्यानंतर सर्व यंत्रणा सुरळीत होईल, असे दावे बँकांनी केले होते ,परंतु गुरुवारीही बहुतांश एटीएम बंद होते. शहरात एकूण सुमारे ७०० एटीएम आहेत. त्यापैकी खासगी बँकांचे १०० आणि राष्ट्रीयकृत बँकांचे २०० एटीएम बंद होते. रोकड भांडारातून गुरुवारी, शुक्रवारी विविध बँकांना कमी रोकड वाटली गेली. त्याचाही परिणाम एटीएमवर झाला असल्याचे काही बँकांचे म्हणणे आहे. एटीएमऐवजी बहुतांश बँकांनी बँक काउंटरवरच रोकड उपलब्ध करून दिली होती. एचडीएफसी, स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, व काही खासगी बँकांची एटीएम बंद आहेत. उद्यापासून गणेशोत्सव आहे. पुढील आठवड्यात महालक्ष्मीची धामधूम असेल. त्याच्यापुढील आठवड्यात बकरी ईद आहे. यामुळे सणासुदींच्या काळात, तरी एटीएमवर अखंडित चलनपुरवठा असावा, अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युतीकरण समितीत खासदार खैरेंना धक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा विद्युतीकरण समितीची बैठक ही ऊर्जा विकासाबद्दलच चर्चा करण्यासाठी घ्यावी, या बैठकीत ऊर्जा विषयक कामे व विकास याबाबत चर्चा अपेक्षित आहे, असा ठराव बैठकीत घ्यावा, अशी मागणी महावितरण अधिकाऱ्यांनी जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत मांडली. वीज ग्राहकांच्या तक्रारी व त्यावरील आरोपावर चर्चा करू नये, अशी भूमिका घेत ग्राहक मंचच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या ठरावाला अनुमोदन दिले.
महावितरण कार्यालयात गुरुवारी जिल्हा विद्युतीकरण समितीची बैठक खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. या बैठकीत शिवाजीनगर येथील सुंदर सुपारे यांच्या घराचे वीजबिल वाढून येत आहे, त्या हॉस्पिटलमध्ये असताना वीज खंडित केली, संबंधित अधिकारी उद्धट वागत असल्याची तक्रार करण्यात आली. हा विषय अधिक गंभीर झाल्याने खासदार खैरे यांनी महावितरणला बिलाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अधीक्षक अभियंता दिनेश्ा अग्रवाल बैठकीत स्पष्ट भूमिका मांडली. ‘खैरे साहेब तुम्ही कधी वीजचोरांच्या बाजुने राहिला नाहीत, हे खरे आहे. पण, जिल्हा विद्युतीकरण समितीची बैठक ऊर्जा विकास प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. त्यावर चर्चा करावी व ठराव घ्यावेत,’ अशी मागणी नम्रपणे केली. या प्रस्तावाला ग्राहक प्रतिनिधी शरद चौबे यांनी अनुमोदन दिले. या बैठकीत वीज बिलासंबंधी तक्रारी किंवा आरोप ठेऊ नये, अशी भूमिका मांडली. त्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. उलट ग्रामीण नागरिकांच्या तक्रारीबद्दल सूचना दिल्या.

रिडिंग एजन्सीवर कारवाई करा ?

वीज बिल रिडिंग एजन्सीच्या चुकांमूळे तक्रारी वाढत असल्याचा आरोप शिवसेनेचे किरण गणोरे यांनी केला. गंगापूर येथील एका गावात चूक बिल दिल्याचे समोर आल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याने रिडिंग एजन्सीवर कारवाई केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यावर मुख्य अभियंता गणेशकर यांनी संबंधितांना विचारणा केली असता रिडिंग घेणारा मुलगा मेल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. रिडिंग एजन्सीवर गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब अधिकाऱ्यांना विचारला. देवगाव रंगारी येथे दीडशे विद्युत खांबावरील वीज तार चोरीस गेल्याची माहिती अण्णासाहेब शिंदे यांनी दिली. त्यानंतर खासदार खैरे यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक आरती सिंह यांना फोन करून दिली.

दूध डेअरीचा आक्षेप

एकात्मिक उर्जा विकास योजनेंतून दूध डेअरीशेजारी दोन एकरवर सबस्टेशनचा प्रस्ताव मंजूर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा मिळाल्यानंतर हे काम शासकीय दूध डेअरीने थांबवल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगतिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ लाड समिती भरती; अधिकारी रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लाड समिती अंतर्गत केलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणात महापालिकेतील किमान अर्धा डझन अधिकारी कारवाईच्या रडारवर आहेत. कर्मचारी भरती प्रकरणाचा चौकशी अहवाल विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडला जाण्याची शक्यता असून, त्यात या अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेत लाड समितीच्या अंतर्गत सुमारे २१४ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. सहा वर्षांपूर्वी या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे व विधानसभेच्या अधिवेशनात काही आमदारांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केल्यामुळे शासनाने या प्रकरणाची चौकशी विशेष अधिकाऱ्याच्या माध्यमातून करण्याची घोषणा केली व चौकशीसाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी नियुक्ती केली. मुंडे चौकशी करण्यासाठी दोनवेळा महापालिकेत येवून गेले. त्यांनी आवश्यकत्या फाइल व कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी लाड समितीमधील भरती प्रकरणाची सर्व कागदपत्रे महापालिकेने चौकशी समितीकडे मुंबईला पाठवली.

निवृत्तही कचाट्यात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, विधानसभेच्या आगामी अधिवेशनात चौकशीचा अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे. अहवाल सादर झाल्यावर काही अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यात काही निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसह काही सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचाही समावेश असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पैशावर पत्ते खेळणाऱ्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘गणेश मंडळांनी पैशावर जुगार खेळल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू,’ असा इशारा पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी गुरुवारी ‘मटा’शी बोलताना दिला.

शांतता समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये लोक प्रतिनिधींनी पोलिस आयुक्तासमोर जाहीरपणे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना जुगार खेळू देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी ‘मटा’ने पोलिस आयुक्तांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘नुसते पत्ते खेळले, तर हा काही गुन्हा होत नाही, परंतु पैशावर पत्ते खेळलेले आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणारच. तसेच मोठ्या गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. मंडळासमोर डीजे वाजवू नये. हा नियमही पाळला नाही तर पोलिस त्यांच्यावर नियमाप्रमाणे आवश्य कारवाई करतील. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
-
मटा भूमिका
-
यांची लाज वाटते
-
सणांमध्ये शांतता राहावी म्हणून पोलिस आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत आपल्या लोकप्रतिनिधींनी बेताल वक्तव्य करून लाज घालविली आहे. असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी माफी मागितली पाहिजे. हे बोलताना या सर्वांची जीभ कशी झडली नाही. जुगार खेळण्याची परवानगी मागणाऱ्या आमदार, खासदारांचे अध:पतन झाले आहे. कायदा तयार करणाऱ्यांची ही वैचारिक दिवाळखोरी आहे. आपल्या कार्यकर्त्यांना वाट्टेल ते करण्याची मुभा हे लोकप्रतिनिधी मागत आहेत. असे वक्तव्य करून त्यांनी विघ्नहर्त्याची विटंबना केली आहे. सार्वजनिक ठिकाणी पत्ते व जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे. समाज सुधारण्याची ऐवजी त्यांना जुगार खेळा म्हणून हे नेते परवानगी मागून कार्यकर्त्यांना कायदे मोडा असे सांगत आहेत. हे दुर्दैवी आहे.

तज्ज्ञ म्हणतात...
कायदे करण्यासाठी लाखो नागरिकांनी लोकप्रतिनिधींची निवड करण्यात आलेली असते व अशा लोकप्रतिनिधींकडूनच चक्क कायदे मोडण्याची भाषा जाहीरपणे व अतिशय उघडपणे केली जात आहे. नेते-लोकप्रतिनिधी अशी भाषा वापरत असतील व जुगाराला व्यासपीठावरून खुले प्रोत्साहन देत असतील, तर ते अत्यंत चुकीचे व निषेधार्ह म्हटले पाहिजे. – अॅड. राजेंद्र मुगदिया

समाज प्रबोधनासाठी गणेशोत्सवाची निर्मिती झाली आणि गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी असंख्य सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम होतात. अशा व्यासपीठावर लोकप्रतिनिधींकडून जुगारासारख्या अतिशय चुकीच्या प्रकारांना मोकळीक-प्रोत्साहन देणे सर्वथा निषेधार्ह आहे. – अॅड. बी. एल. सगरकिल्लारीकर

लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तो उद्देश केव्हाच संपला आहे. त्यामुळे आता निदान चुकीच्या प्रकारांना थारा तरी देऊ नका. – डॉ. रमेश रोहिवाल, आयएमए शहराध्यक्ष

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना पत्ते खेळू द्या, त्यातून मिळालेले पैसे कार्यकर्ते गणेश मंडळासाठीच वापरतील असे म्हणणे योग्य नाही. त्यातून गणपतीच्या मूर्तीचे पावित्र्य नष्ट होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकेल. पैसा हाच मुद्दा महत्त्वाचा नाही. गणपतीच्या मूर्तीचे पावित्र्य याला महत्त्व दिले पाहिजे. - रवींद्र देशमुख, सामाजिक कार्यकर्ते

गणेशोत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पत्ते खेळू द्या, असे म्हणणे चुकीचे आहे. मूर्तीच्या संरक्षणासाठी कार्यकर्त्यांना रात्री जागावे लागते. त्यामुळे ते एखादा खेळ खेळत असतील तर हरकत नाही, पण त्यासाठी जुगाराचे समर्थन करता येणार नाही. लोकप्रतिनिधी हे नागरिकांचे पालक असतात. पालकांनी चुकीची भूमिका घेऊ नये. - राजेंद्र दाते पाटील, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पाच वर्षांच्या प्रयासातून बाप्पा

$
0
0

पृथा वीर, औरंगाबाद
त्यांनी सलग पाच वर्षे मातीवर विविध प्रयोग केले. आणि त्यातून जैविक शाडूची निर्मिती केली. तेव्हा कुठे साकारले पर्यावरणपूरक बाप्पा. उल्कानगरीतील मंगलमूर्ती कला केंद्राचे संचालक प्रमोद डवले यांचे हे प्रयत्न फक्त निसर्गाशी इमान राखण्यासाठी आहेत. त्यामुळेच त्यांच्या मूर्तींना मुंबई, नागपूर, जालना, नेवासा, चाळीसगावहून मागणी आहे.

डवले यांना कुंभारापासून मिळाली. बाजारात शाडू मातीच्या नावाने ग्राहकांची फसवणूक होते. या मूर्तींसाठी शाडूमाती ऐवजी ‘फायर क्ले’ अर्थात वीटभटटयांवर असणाऱ्या मा​तीचा वापर होतो. कमी किंमत व मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या फायर क्लेद्वारे मूर्ती बनवताना श्वसनाचे आजार जडतात. शिवाय मूर्तीला तडे जातात. विर्सजन कुंडीतील रोपटे मरून जाते. ग्राहकांच्या अशा तक्रारी आल्यापासूनच डवले यांनी स्वत: शाडू माती म्हणजे नेमके काय, याचा पाच वर्षांपासून अभ्यास सुरू केला. लाल माती, काळी माती, भस्म्या मुरुम व कॅल्शियमयुक्त माती एकत्र करून शाडू माती तयार केली. यासाठी त्यांनी सातारा व हर्सूल भागातून माती आणली. शाडू तयार करण्यासाठी मातीच्या या प्रत्येक प्रकारांचे नेमके प्रमाण किती असावे, यासाठी याची वारंवार नोंद ते करायचे. तयार होणाऱ्या मातीचे गुणधर्म तपासण्यासाठी त्यांनी एमजीएम कृषी विज्ञान केंद्र प्रयोगशाळेकडून मृदा परीक्षण केले. त्यातून ही माती जैविक शाडू असल्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले. या मातीमध्ये गहू पेरल्यावर अंकूर निघाल्याने ही माती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे असे सिद्ध झाले. या मूर्तींना त्यांनी 'प्रथमांकूर' नाव दिले. पुढच्या वर्षी आपल्या मूर्तींसोबत या मातीचे प्रमाणपत्र देणार असल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताशा सांगितले. याशिवाय त्यांनी पेपर क्ले, डिंक, खडू पावडर व लाल मातीपासूनही मूर्ती तयार केली, मात्र यावर अजून प्रयोग करणार असल्याचे सांगितले.

प्रशिक्षण देणार
डवले यांच्या लाल मातीच्या मूर्तीचा रंग एकच असून केवळ डोळे व सोंडेला नैसर्गिक रंग दिले आहेत. याशिवाय यंदा बालगणेश, सिंहासन मूर्ती, चौरंगावर आसनस्थ व फिलिप्स हे प्रकार विशेष चर्चेत आहेत. डवले म्हणाले, ‘मातीच्या मूर्तींची संख्या कमी असते. कारण सर्वसामान्य व्यक्तींनी अवास्तव अपेक्षा करतात. ज्या कुंभाराच्या हाती हा व्यवसाय होता त्यालाच प्रोत्साहन मिळाले, तरच मातीच्या मूर्ती मुबलक प्रमाणात होतील. अशा होतकरू व्यक्तींना प्रशिक्षण द्यायला मी तयार आहे. पुढच्या वर्षी मी मूर्तींसोबतच जैविक शाडू मातीही सर्वसामान्यांसाठीही तयार करणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आणीबाणी विशेषाधिकार मजूर नियुक्तीत वापरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका प्रशासनाच्या शब्दकोषात अशक्य हा शब्दच नाही. ते काहीही करू शकतात. आता हेच पाहा, आणीबाणीसारख्या कठीण प्रसंगी वापरला जाणारा आयुक्तांचा विशेषाधिकार चक्क मजूर नियुक्तीत वापरल्याचे उघड झाल्याने पालिकेच्या कारभाराची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.
शहरात पालिका क्षेत्रात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी आयुक्तांना विशेषाधिकार वापरण्याची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका कायद्याच्या कलम ६७ (३) (सी) नुसार आयुक्त आपला विशेषाधिकार वापरून कामांना मंजुरी देऊ शकतात, परंतु महापालिकेत महत्वाच्या नसलेल्या अनेक कामांबद्दल आयुक्तांचा विशेषाधिकार वापरण्याची पद्धत रुढ होत आहे. पालिकेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत आयुक्तांच्या विशेषाधिकारात चक्क मजुरांच्या नियुक्त्या केल्याचा भांडाफोड नगरसेवकांनी केला. स्थायीच्या सभागृहात पाणीपुरवठ्यात झालेल्या खेळखंडोबाबद्दल चर्चा सुरू होती. वीज पुरवठा खंडित होणे, जलवाहिनी फुटणे या प्रकारामुळे चार - पाच दिवसांपासून शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे.
‘पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठा सुरळीत रहावा यासाठी प्रयत्न न करता कंत्राटदारांचे बिल काढण्यासाठी, मजुरांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत,’ असे शिवसेनेचे नगरसेवक राजू वैद्य यांनी स्पष्ट केले. ‘सलग आठ महिने टँकरचे बिल आयुक्तांच्या विशेषाधिकारात काढले. ११६ मजुरांची नियुक्ती देखील आयुक्तांच्या विशेषाधिकारात करण्यात आली. प्रशासनाच्या कारभाराची ही रित चुकीची आहे.’

कंत्राटदाराचे बिल काढणे, मजूर नियुक्ती या कामांसाठी महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग टेंडर काढू शकला असता, पण आयुक्तांच्या विशेषाधिकाराचा वापर केला. हे चुकीचे आहे.
- राजू वैद्य, नगरसेवक

आयुक्तांच्या विशेषाधिकाराचा वापर केला, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. कार्यकारी अभियंता (सरताजसिंग चेहल) व प्रशासनाने ही बाब समजून घ्यावी.
- गजानन बारवाल, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार अनिल गोटेंच्या बंधूंचा अपघाती मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त।नांदेड

हदगाव ते उमरखेडदरम्यान पैनगंगा नदीवरील झालेल्या अपघातात कार नदीत कोसळून आमदार अनिल गोटे यांचे बंधू ज्ञानेश्वर गोटे, त्यांची पत्नी रत्ना ज्ञानेश्वर गोटे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गोटे यांच्या फोर्डफिगो गाडीला पैनगंगा नदीच्या पुलावर मागून एका ट्रकने जोराची धडक मारल्याने कार पुलावरून थेट नदीत कोसळली. यात ज्ञानेश्वर गोटे, त्यांची पत्नी रत्ना गोटे आणि कारचा चालक यांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकांना पोलिसांनी तत्परतेने ताब्यात घेतले आहे.

गोटे यांची कार पैनगंगा नदीवरील पुलावरून जात असताना मागून 'एमएच २४ यू ८१०९' या ट्रकने जोराची धडक दिली. पुलाला कठडा नसल्याने कार थेट नदीतच कोसळली. तिघांनाही कारमधून बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि पाण्यातच तिघांचा अंत झाला.

कारला धडक देऊन ट्रक चालकाने पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली आणि ताबडतोबीने पोलिसांनी सूत्रे हलवली. पोबारा केलेल्या ट्रक चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. या अपघातात मृत्यू पावलेल्या तिघाचेही मृत्यूदेह हदगाव येथील उपजिल्हारूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. आमदार अनिल गोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते दिल्लीत असल्याचे समजले. मात्र त्यांचा मुलगा आणि भाऊ हदगावकडे निघाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानाचा गणपतीः वेरूळचा लक्षविनायक!

$
0
0

विजय चौधरी, खुलताबाद
औरंगाबादपासून अवघ्या २६ किलोमीटर अंतरावरचे जगप्रसिद्ध वेरूळ. लेणींमुळे नावाजलेले. इथेच लक्षविनायकाचे प्राचीन मंदिर आहे. गणपतीच्या २१ स्थानांपैकी हे सतरावे गणेशपीठ.

बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिराजवळच लक्षविनायकाचे छोटेसे सुंदर मंदिर आहे. गाभाऱ्यातील देखणी भव्य मूर्ती भाविकांना मोह घालते. ही मूर्ती डाव्या सोंडेची आणि उजवी मांडी करून बसलेल्या स्थितीतील आहे. या स्थानांविषयी एक दंतकथा सांगितली जाते. त्यानुसार गणेशाची स्थापना शिवपुत्र कार्तिकेयाने केल्याचे सांगितले जाते. त्याची पौराणिक कथा अशी, जेव्हा तारकासुराचे व कार्तिकेयाचे युद्ध सुरू होते. कार्तिकेयाने पराक्रमाची शर्थ करूनही तारकासुराचा वध होईना. तेव्हा भगवान शंकराच्या उपदेशावरून त्याने गणपतीची या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. गणेश प्रसन्न झाला आणि ताच्या कृपेमुळे कार्तिकेयाला तारकासुराचा वध करणे शक्य झाले. कार्तिकेयाने म्हणजेच स्कंदाने स्थापन केलेला गणेश तो हाच लक्षविनायक. भारतात अनेक ठिकाणी गणपतीची अनेक मंदिरे आहेत. काही प्रसिद्ध आहेत, तर काही अपरिचित. चला तर मग या गणेशोत्सवात वेरूळच्या लक्षविनायकाचे दर्शन घेऊ या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझा बाप्पाः समाज हिताच्या कार्यक्रमावर भर

$
0
0

​ म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘गणेशोत्सवामुळे सर्वत्र मांगल्य, चैतन्य निर्माण होते. आपणही हा उत्सव साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपला आनंद इतरांसाठी त्रासदायक ठरू नये, याची दक्षता घ्यावी,’ असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

बागडे म्हणाले, ‘गणेशोत्सवामागील उद्दिष्ट लक्षात घेता सर्व मंडळांनी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी आपल्या हातातून अधिकाधिक समाजहिताचे कार्य कसे होईल, समाजप्रबोधन कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. तशी कृती करावी व उपक्रम हाती घ्यावेत.

अनेक सामाजिक विषयावर देखावे तयार केले जातात. ही आनंदाची बाब असून, ते वाढले पाहिजेत. अपघातात अनेकांचे प्राण जातात, अनेक जखमी होतात. तर दुसरीकडे अवघ्या काही पैशांत सुमारे दोन लाख विम्याचे संरक्षण मिळते, पण या महत्वाच्या बाबींकडेच नेहमीच दुर्लक्ष होते. याविषयी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन करावे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक शहरात राहतात. त्यांनी आपल्या गावी जावून कर्जमुक्तीचे अर्ज सर्व शेतकऱ्यांनी भरले किंवा नाही हे पाहावे. काही अडचण असेल, तर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. गणेश महासंघ विविध स्पर्धा आयोजित करतात, पण बक्षीस वितरण तब्बल एका वर्षानंतर करतात. विजेत्यांना बक्षीस घेणाऱ्यांचा आनंद हा वेळीच मिळाला पाहिजे. गणेशोत्सवानंतर एक महिन्याच्या आता बक्षीस वितरण झाले पाहिजे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार कार्यालय प्रभारीच्या हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कामगारांसाठी अत्यंत महत्त्व असलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयातील उपायुक्तपद गेल्या एक वर्षापासून रिक्त आहे. पुणे येथील अधिकाऱ्याकडे येथील प्रभारी कार्यभार देण्यात आला असून, सहायक कामगार आयुक्तपदाच्या तीनपैकी दोन जागा ही रिक्त आहे. या रिक्त जागांमुळे हक्कासाठी दाद मागणाऱ्यासाठी मराठवाड्यातून येणाऱ्या कष्टकऱ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने ही रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी कामगार नेत्यांनी केली आहे.

कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्याबरोबर विविध विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कामगार विभागाकडे असते. औद्योगिक नगरी असल्याने येथील उपायुक्त कार्यालयात न्याय्य हक्कासाठी येणाऱ्या कामगारांची नेहमी गर्दी असते. त्याचबरोबर दुकान नोंदणीसह अन्य व्यवसायिक, उद्योजकांसाठी हे कार्यालय महत्त्वाचे आहे. असे असतानाही गेल्या वर्षभरापासून या विभागीय कार्यालयाचा कारभार प्रभारीच्या हाती आहे. तत्कालीन कामगार उपायुक्त एन. एन. ईटकरी सप्टेंबर २०१६मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सहायक कामगार आयुक्त अभय गिते यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आले. त्यांची गेल्या महिन्यात पुण्याला बदली झाली, पण त्यांच्याकडे येथील प्रभारी कार्यभार कायम ठेवण्यात आहे. त्यामुळे येथील कार्यालयात गिते आठवड्यातील दोन ते तीन दिवसच उपलब्ध असतात. उपायुक्त पदाबरोबरच सहायक कामगार आयुक्तांची तीनपैकी दोन पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. दुसरीकडे लिपिकांची सुमारे १५हून अधिक पदे रिक्त आहे. या सर्वांचा परिणाम कामाच्या गतीवर होत असून, येथे येणाऱ्या नागरिकांना हेलफाटे मारावे लागत आहेत.

मराठवाड्यातील अनेक कामगार येथे न्यायासाठी येतात, पण मुख्य अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. अधिकारी जागेवरच नसतील, तर पुढील कामे काय होणार. सर्व सावळा गोंधळ सुरू असून, कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रकरणे प्रलंबित असून, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरा.
- उद्धव भवलकर, कामगार नेते, सीटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीचे अपहरण; महिलेला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुकुंदवाडी परिसरतील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या अडीच वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शुक्रवारी (२५ ऑगस्ट) अटक करण्यात आली. तिला कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (२८ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. जी. एम. शेख यांनी दिले.
मुलीच्या वडिलाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ते गुरुवारी (२४ ऑगस्ट) पत्नीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात घेऊन गेले होते. त्यावेळी घरी त्यांची आई, आजी सासू व मुलगी होती. दुपारी एकच्या सुमारास ते घरी आला असता मुलगी सकाळपासून घरात दिसत नसल्याचे आजी सासूने सांगितले. त्यामुळे त्यांनी परिसरात शोध घेतला असता ती सदाशिवनगरजवळ संशयित आरोपी सुनीता दिपक लोंढे (वय ४०, रा. राजनगर, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) हिच्या सोबत दिसली. विचारपूस केली असता या महिलेने उचलून आणल्याचे मुलीने सांगितले. त्यांनी पत्नी, आई व आजी सासुला बोलावून घेत मुलगी व संशयित आरोपी महिलेस घरी आणले. मुलीच्या कानातील अडीच हजारांच्या सोन्याच्या बाळ्या नसल्याने त्यांनी महिलेकडे चौकशी केली. महिलेने समाधानकारक उत्तर दिले नसल्याने तक्रार दिली. यावरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३७९ अन्वये गुन्हा दाखल झाला. आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (२८ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांपासून महिला विहिरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
मिटमिटा येथील डिसुझा यांच्या शेतातील विहिरीत एक महिला शुक्रवारी सकाळी आढळून आली. ती गुरुवारी सकाळी ११ पासून विहिरीत होती. तिला स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल व पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले.
मिटमिटा येथील गटनंबर १४६ मध्ये डिसुझा यांचे शेत असून शुक्रवारी सकाळी सहा वाजता शेतातील विहिरीतून महिलेच्या हाकांचा आवाज शेतगडी दत्तु मुळे यांना आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एक महिला पाइपच्या आधारासाठी बांधलेल्या तारेला अडकून विहिरीत अर्धवट बुडलेली दिसली. ही महिला जीवंत असल्याने मुळे यांनी पोलिस मित्र शिवाजी गायकवाड यांना या घटनेची माहिती दिली. गायकवाड यांनी सहकाऱ्यासंह धाव घेऊन पोलिस व अग्निशमन दलाला ही माहिती दिली. अग्निशमन दल येईपर्यंत निलेश जाधव, राजेश जाधव, गोरख देवकर यांच्या मदतीने विहिरीत शिडी सोडून दिला वर काढण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल आल्यानंतर तिला वर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला दौलताबाद येथील रहिवासी आहे. ती तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. ‘गावातील एक व्यक्ती व पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता विहिरीत उडी मारली,’ असे या महिलेने मदतीसाठी धावलेल्यांना सांगितले. या महिलेचे वय अंदाजे ४० वर्षे असून तिला दोन मुली व एक मुलगा आहे. एका मुलीचे लग्न झाले असून एक मुलगी नववी व मुलगा पाचवीचा विद्यार्थी आहे. ही महिला दररोज दौलताबाद येथून तारांगण, देवगिरी व्हॅली या परिसरात धुणीभांडी करण्यासाठी येत होती. विहिरीजवळ तिची चप्पल, पर्स, स्कार्फ साडपला.
या महिलेला हुडहुडी भरल्याने शेतमालक डिसुझा व त्यांच्या पत्नीने कपडे दिले. महिलेवर घाटी हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून पतीच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई छावणी पोलिस ठाण्याचे एएसआय शेख, पोलिस शिपाई एस. एस. बाबर, एस. सी. माळी, डी. आर. टाकळकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून केली. या घटनेची नोंद छावणी पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी निधीतून स्मार्ट रोडचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्ट सिटीसाठी शासनाकडून मिळालेल्या निधीतून शहरातील एक प्रमुख ‘स्मार्ट रस्ता’ विकसित करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव महापालिका प्रशासन एसपीव्हीच्या (स्पेशल पर्पज व्हेकल) बैठकीत मांडणार आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झाल्यानंतर योजनेतील कामांसाठी शासनाने महापालिकेला आतापर्यंत २८१ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पण, अद्याप एकही काम सुरू करण्यात आलेले नाही. शासनाने या प्रकल्पासाठी अपूर्व चंद्रा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या उपस्थितीत १५ दिवसांपूर्वी एसपीव्हीची होणारी बैठक ते न आल्याने बारगळली. पुढील आठवड्यात त्यांनी शहता यावे व एसपीव्हीची बैठक घेवून कामांची दिशा ठरवून द्यावी, काही कामांचा प्रारंभ करावा, अशी विनंती चंद्रा यांना करणार आहोत, असे पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्मार्ट सिटीच्या निधीतून एक प्रमुख ‘स्मार्ट रस्ता’ करण्याची योजना आहे, तसा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले. या स्मार्ट रस्त्यावर स्मार्ट पार्किंग, स्मार्ट सिग्नलिंग आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हा रस्ता शहरासाठी आदर्श ठरेल, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी रिटर्न भरताना गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जीएसटी (गुडस अँड सर्व्हिस टॅक्स)अंतर्गत मासिक विवरण (रिटर्न) भरण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट होती. या पार्श्वभूमिवर शहरातील व्यापारी, सीए, अकाउंटंट यांचा २४ तारखेपर्यंत प्रचंड गोंधळ उडाला. वेबसाइट हँग होण्यापासून अगदी सर्व तांत्रिक बाजूसह विवरण भरण्यापर्यंत अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले.
याविषयी बोलातना सीए अतुल मोदाणी म्हणाले, करदाते व सल्लागारांना जीएसटी वेबसाइट मधील तांत्रिक दोषांमुळे खुप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. २५ ऑगस्ट ही विवरण भरण्याची शेवटची तारीख असल्याने फॉर्म ३-बी भरण्याबाबत अडचणी आल्या. हे जीएसटी मासिक विवरण थ्री-बी फॉर्मद्वारे भरणे आवश्यक आहे. पण हा फॉर्म भरण्यासाठी तांत्रिक अडचणी आल्या. या अडचणी सोडवण्याचा वस्तू व सेवा कर विभागाकडून होणारे प्रयत्न तोकडे पडत आहेत. करदाता बँकेच्या ई-पेमेंटच्या माध्यमातून कर भरणा करत आहे. पण हा कर जीएसटीएनच्या खात्यात जमा होत नाही आणि त्यामुळे विवरण पत्र भरता येत नाही. करदाता कर भरत असून बँकेतून पैसे वळते होत आहेत, परंतु, जीएसटीएन वेबसाइटवर वर ते चालान ‘फेल्ड’ दाखवत आहे. ते चालान भरलेच जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. जीएसटी-थ्रीबी भरल्यानंतर फॉर्म फाइल्स सेव्ह होत नाही व सबमिट देखील होत नाही, असे मोदाणी म्हणाले.
जीएसटी वेबसाइट हाताळणाऱ्या तांत्रिक टीमने हे मासिक विवरण भरताना येत असलेल्या अडच‌णींबाबत लवकारत लवकर निर्णय घ्यावा आणि अडचणींवर मात करावी अशी मागणी सीए मोदाणी आणि सीए रोहन आचलिया यांनी केली आहे.

लेट फी भरावी लागणार

या सर्व बाबतीत सीए मोदाणी यांनी जीएसटीएन ट्विटर हँडलवर विचारले असता तिकडून फक्त एकच उत्तर मिळाले, ‘जीएसटीएनला ही अडचण माह‌ित आहे आणि ते यावर मार्ग काढत आहेत.’ परंतु, त्यांचे हेल्पडेस्क यासंबंधी काहीही सांगण्यास तयार नाहीत. करदाते तथा सल्लागार या तांत्रिक अडचणींमुळे बेजार आहेत. वेळेत विवरण न गेल्यास लेट फी भरावी लागणार आहे. यामुळे तसाही भुर्दंड पडेल, असे अतुल मोदाणी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंधळी नगरसेवकांवर अखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मनपाच्या सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी एमआयएचे नगरसेवक शेख जफर व सय्यद मतीन यांच्या विरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी घडलेल्या या प्रकारामध्ये नगरसेवकांनी तोडफोड करीत हाणामारी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मनपाचे सुरक्षा अधिकारी बाबू सांडू जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी मनपाच्या सभागृहात वंदे मातरम् गीत सुरू असताना नगरसेवक शेख जफर व सय्यद मतीन उभे राहिले नव्हते. यानंतर या कारणावरून सभागृहात गोंधळ उडाला होता. यावेळी दोन्ही नगरसेवकांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच सभागृहात लावलेले माइक तोडून शासनाचे तीन हजारांचे नुकसान केले. या घडलेल्या घटनेची रेकॉर्डिंग सीडी मनपाने पोलिसांना सादर केली आहे. या प्रकरणी दोन्ही नगरसेवकाविरुद्ध मारहाण व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदर हरीश खटावकर हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images