Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

६९८ गणेश मंडळाची नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये आतापर्यंत ६०८ गणेश मंडळानी एक खिडकी योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. गेल्यावर्षी शहरात १०६८ मंडळाची नोंदणी पोलिसांकडे झाली होती. यावर्षी दौलताबाद, वाळूज व वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्वतंत्र नोंदणी करण्यात आली. त्यामुळे मंडळांची विभागणी झाल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहरात गणेश मंडळाच्या नोंदणीसाठी एक ‌खिडकी योजना सुरू करण्यात आली होती. पोलिस आयुक्तालयातील अलंकार हॉल येथे एकाच छताखाली पोलिस, महावितरण, महापालिका व धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी ही नोंदणी करून घेत होते. यामुळे गणेश मंडळाचे काम सुखकर झाले होते. गेल्या वर्षी शहरात १०६८ मंडळाची नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये १५ पोलिस ठाण्यांचा समावेश होता. यावर्षी दौलताबाद, वाळूज व वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यांनी त्यांची स्वतंत्र नोंदणी करून घेतली आहे. त्यामुळे गणेश मंडळाच्या नोंदणीमध्ये विभागणी झाली आहे. शहरात एकूण किती गणेश मंडळानी नोंदणी केली, याचे चित्र सोमवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. एक खिडकी योजनेंतर्गत पोलिस प्रशासनाच्या वतीने विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शरद इंगळे व पीएसआय गोरख चव्हाण काम पाहत आहेत.

‘धर्मदाय’कडे ऑनलाइन नोंदणी
यंदा पोलिस आयुक्तालयात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे जागा उपलब्ध नाही ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या आवारात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. या एक खिडकीमध्ये पोलिस, महावितरण व महापालिकेचे प्रतिनिधी मंडळाच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ऑनलाइन नोंदणी पद्धत सुरू केल्याने यावेळी त्यांचा या ‘एक खिडकी’मध्ये समावेश नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडोद पोलिसांकडून २५ बैलांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलब्री
औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरून गोवंशाची वाहतूक करणारे दोन ट्रक वडोद बाजार पोलिसांनी बोरगाव सारवाणी (ता. सिल्लोड) येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी २५ बैलांची सुटका केली असून पाच जणांना ताब्यात घेतले.
काही बैल खरेदी करून ते कत्तलखान्यात पाठवले जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यावरून २४ ऑगस्टच्या रात्री रस्त्यावर पाळत ठेवण्यात आली होती. आळंदपासून काही अंतरावरील पेट्रोल पंपाजवळ आयशर टेम्पो (एम एच ०४ पी एस ६५०७) तपासला असता त्यात अंदाजे दहा वर्षे वयाचे १२ आमदाबादी बैल सापडले. बैलाची किंमत तीन लाख ६० हजार रुपये आहे. टेम्पोचालक शेख बशीर शेख मुनीर, जनावरे हाकणारा जाकेर महमद हनीफ (रा. बोरगाव सारवाणी) याला ताब्यात घेतले. सोबतच असलेल्या पिकअप व्हॅनचा (एम एच ०४ एफ पी ५८११) चालक सरोवर शहा फकीर शहा (रा. आशानगर मालेगाव, नाशिक, हमु. बोरगाव सारवाणी) जनावरे हाकणारा शेख नाजीम शेख पटेल व जाकेर शहा अब्दुल शहा (रा. सर्व बोरगाव सारवाणी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून अंदाजे तीन लाख ९० हजार रुपये किंमतीचे १३ बैल ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी बैल व दोन वाहने असा १७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बैलांनी गोशाळेत पाठवले आहे. दोन्ही वाहन व २५ बैलांच्या अज्ञात मालकांविरुद्ध वडोद बाजार पोलिस ठाण्यात सय्यद मुजोद्दीन सय्यद रफियोद्दीन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार वसंत शंकर साळवे हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपती बाप्पा पावला, मेघगर्जनेसह पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
गेल्या आठ दिवसांपासून केवळ रि‌मझिम पावसावर समाधान मानत असलेल्या शहरवासियांना रविवारी पावसाने चिंब केले. सायंकाळी सात वाजता मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. चिकलठाणा वेधशाळेत साडेआठपर्यंत ४६.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
तब्बल दीड महिन्यांच्या खंडानंतर गेल्या शनिवारी पावसाने पुनरागमन केले. त्यानंतर किरकोळ स्वरुपाचा पाऊस वगळता पावसाने पुन्हा दडी मारली होती. लाडक्या गणरायाच्या आगमनाला पावसाची चाहुल लागली होती, मात्र गणेशचतुर्थीच्या दिवशी मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला. आता औरंगाबाद शहरात पाऊस सुरु झाला असून रविवारी आठवड्याभरानंतर शहरवासियांना पावसाने चिंब केले.
शहरासह परिसरामध्ये सायंकाळी सात वाजता सुरू झालेला पाऊस रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत सुरू होता, सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाचा अंदाज होता.

आज मध्यम, उद्या दमदार

औरंगाबादे शहरातील येत्या दोन दिवसाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार, सोमवारी मध्यम, मंगळवारी दमदार पावसाचा अंदाज आहे. यासह ३० रोजी मध्यम स्वरुपाचा, तर ३१ ऑगस्ट ते २ सप्टेबरपर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडले, असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मानवी जीवनातील प्रत्येक अवयव बहुमोल आहे. मृत्यूनंतर या अवयवांमुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. जीवनोपयोगी काम करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे,’ असा सूर शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी शनिवारी व्यक्त केला.
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ‘अवयवदान’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. सरोजिनी जाधव, ‘झेडटीसीसी’ चे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी, सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. मिलिंद दुनाखे, डॉ.रमाकांत बेंबडे यांनी चर्चासत्रात भाग घेतला. डॉ. सरोजिनी जाधव म्हणाल्या, आपल्याकडे मृत्यूनंतर महत्त्वाचे अवयव नष्ट केले जातात. वास्तविक त्याचा समाजाला खूप फायदा होऊ शकतो. ‘ब्रेन डेड’ व्यक्‍तीच्या अवयवाने अनेकांना जीवनदान मिळू शकते. जगात केवळ स्पेनमध्येच अवयवदानाचे सर्वाधिक ४३ टक्के प्रमाण आहे. आपल्याकडे मात्र उणे एक टक्का सहभाग आहे. अवयवदानात कुठेच जात, धर्म, पंथ आड येत नाही.
डॉ. सुधीर कुलकर्णी म्हणाले, पुरातन काळात दधिची ऋषींनी अवयवदान केल्याचे दाखले दिले जातात. गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे अवयवदानासंदर्भात जनजागृती झाली आहे. औरंगाबादच्या झेडटीसीसी सेंटरकडे जागा व सुविधा उपलब्ध आहेत. झेडटीसीसीला अवयवदानात महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. डॉ. रमाकांत बेंबडे यांनी त्वचादानाची माहिती दिली. जळालेल्या रुग्णाला त्वचेची अत्यंत आवश्यकता असते. त्वचेचा छोटासा भाग, जर गेला असेल तर या व्यक्‍तीच्याच शरीरातील त्वचा काढून लावली जाते. मात्र मोठ्या प्रमाणावर त्वचा निघालेली असेल, तर बाहेरून त्वचेची आवश्यकता भासते. यावेळी त्वचा बँकेचे महत्त्व अधोरेखित होते. मृत्यूनंतर सहा तासांत त्वचा दान करता येते. जळून खोलवर जखमा झालेल्या पेशंटमध्ये त्वचादानाने ५० टक्के मृत्यूचे प्रमाण रोखता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. झेडटीसीसीचे समन्वयक मनोज गाडेकर यांनीही मार्गदर्शन केले. आयएमए अध्यक्ष डॉ. रमेश
रोहिवाल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. यशवंत गाडे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. दुनाखेंची शंका

पेशंटच्या अपघाताने नातेवाईकांच्या मनावर आघात झालेला असतो. अशा परिस्थितीत त्यांना अवयवदानाबाबत सांगणे जिकिरीचे असते. त्यामुळेच कदाचित रुग्णालये यासाठी पुढाकार घेत नसावेत, असे डॉ. मिलिंद दुनाखे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ परभणीत राहुल गांधींची ८ सप्टेंबरला शेतकरी सभा

$
0
0


परभणी - काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ८ सप्टेंबर रोजी परभणीत आयोजित शेतकरी सभेस प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील दर्गा परिसरातील मास्टर कॅफेत रविवारी (२७ ऑगस्ट) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधी यांच्या सभेची माहिती दिली.

उपमहापौर सय्यद समी उर्फ माजू लाला, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, गफार मास्टर, भगवान वाघमारे, रामभाऊ घाडगे, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार यावेळी उपस्थित होते.
वरपूडकर पुढे म्हणाले, ‘सध्या युवकांपासून ते शेतकयांपर्यंत सर्वस्तरातील नागरिक सरकारवर नाराज आहेत. शेतकरी वर्गावर कर्जाचा बोजा, फसवी कर्जमाफी, दुष्काळ परिस्थिती, शेतमालास भाव नाही, शेतकरी आत्महत्या होत आहेत. तरीही शासनाचे उदासिन धोरण असून त्यावर लोक नाराज असल्याचे ते म्हणाले.
परभणीची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असून सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. दुसरीकडे जीएसटीमुळे व्यापारी आणि ग्राहकही गोत्यात आले असल्याचे वरपूडकर यांनी सांगितले. भाजप सरकारने आरक्षणाचे खोटे आश्वासन देवून धनगर, मुस्लिम, मराठा समाजाची फसवणूक केली. दलितांवर अन्याय, शिष्यवृत्ती कपात केली, असहिष्णूता, राज्यातील महामंडळांना निधी नाही आदी विषयावर सर्व समाज व सर्व वर्गाच्या प्रश्नावर राहुल गांधी ऊहापोह करणार आहेत. त्यांच्या सोबत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, मोहन प्रकाश आदी उपस्थित राहणार आहेत.
८ सप्टेंबरला शहरातील सावली विश्रामगृहावर दुपारी २ वाजात राहूल गांधी येतील. येथून सभेच्या ठिकाणापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान, काही समाजाच्या ठराविक कार्यकर्त्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत. अशा शंभर लोकांची यादी काढण्यास सांगितली असल्याचेही वरपूडकर म्हणाले. याबाबत कार्यकर्त्यांसोबत दोन बैठकाही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.




परभणीत अप्सराच्या
अदाकारीने श्रोते मंत्रमुग्ध
परभणी - महाराष्ट्राला परिचित असलेली लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत व संचाच्या अदाकारीने परभणीकर श्रोते मंत्रमुग्ध झाले. मनपाच्या गणेश फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ‘अप्सरा आली’ लावणी शो शनिवारी रात्री उशिरा सादर झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार संजय जाधव यांच्या हस्ते झाले. माजी मंत्री सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, गटनेते भगवानराव वाघमारे, आयुक्त राहुल रेखावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, सभापती गणेश देशमुख, गटनेते चंदु शिंदे, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, युनियन नेते के. के. आंधळे, विजय ठाकूर, सचिन अंबिलवादे, लावणी सम्राज्ञी वैशाली जाधव, विनोद कदम, प्रविण गोमचाळे, अमोल जाधव आदी उपस्थित होते.


सोनपेठमधील वाळू तस्कर
वर्षभरासाठी स्थानबद्ध
परभणी - सोनपेठ तालुक्यातील गोदावरीमधून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत होता. यावर सोनपेठ तालुक्यातील युवासेनेने वेळोवेळी या वाळू माफीयावर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोनपेठच्या पोलिस प्रशासनाने रेती तस्कराविरुद्ध मोहीम छेडली. एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करुन रेती तस्करास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याची शिक्षा देण्यात आल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले. वाळू तस्करावंर सातत्याने कारवाया करून ही वाळू तस्करी व चोरी कमी होत नसल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. गेल्या महिनाभरांपासून वाळू चोरी व तस्करीविरुद्ध सोनपेठ पोलिसात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले व मोठा दंड ही वसूल केला. तरीसुद्धा रेती चोरीत फरक पडत नसल्याने प्रशासनाने वाळू तस्करांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद जवान हाके अनंतात विलिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
‘वीर जवान रामनाथ हाके अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या जय घोषात भूमिपुत्रास जडअंतकरणाने तालुकावासीयांनी निरोप दिला. हाके यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात आले.
चाकूर तालुक्यातील मष्णेरवाडी येथील सैन्य दलातील जवान रामनाथ माधव हाके (वय २४) हे भारत-चीन सीमारेषेवर नथुला येथे कर्तव्य बजावत असताना मेंदूत रक्तस्राव होवून उपचारादरम्यान शहीद झाले. त्यांच्यावर रविवारी (ता.२७) सकाळी शोकाकुल वातावरणात शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मष्णेरवाडी येथील रामनाथ माधव हाके हे दोन वर्षांपूर्वी सैन्य दलात दाखल झाले होते. सध्या भारत-चीन सिमारेषेवरील मॉगपांग येथे कार्यरत होते. जमिनीपासून १८ हजार फुट उंचीवर असलेल्या नथुला जवळील टेकडीवर कर्तव्यावर असताना ६ ऑगस्ट रोजी ऑक्सीजन कमी पडल्यामुळे मेंदुत रक्तस्त्राव झाला होता. पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (२५ ऑगस्ट) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. शहीद जवान हाके यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक विवाहीत बहीण असा परिवार आहे. रामनाथ यांचा नुकताच विवाह ठरला होता. रामनाथ यांचे पार्थिव रविवारी सकाळी नऊ वाजता मष्णेरवाडी गावात आणण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव ठेवण्यात आला होता. तालुक्यातील हजारो महिला, पुरुषांनी त्याचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर गावाजवळील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद रामनाथ यांचे भाऊ सचिन हाके यांनी पार्थिवास भडाग्नी दिली. सैन्य दलाच्यावतीने कर्नल जे. पी. महाडीक, नायब सुभेदार अवधेश सिंह, राजकुमार, भीमराज पायल, अजय प्रताप यांनी श्रद्धाजंली अर्पण केली. सैन्य दल व जिल्हा पोलिस दलाच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
यावेळी आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, गोविंद केंद्रे, उपनगराध्यक्ष विलासराव पाटील, अॅड. भारत चामे, राधाकिशन तेंलग, अॅड. युवराज पाटील, बालाजी पाटील, सुभाष काटे, अॅड. आण्णाराव पाटील, पोलिस उपअधिक्षक विकास नाईक, तहसीलदार भरत सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक विकास जाधव, किसन वडारे यांनी श्रद्धाजंली अर्पण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बिंदुसरा नदीला पूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात काही भागात रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारी साडेचारनंतर पावसाला सुरुवात झाल्याने डोकेवाडा प्रकल्प पूर्ण भरला. त्यामुळे बिंदुसरा नदीला पूर आला असून या पावसाने आलेल्या पुरात पाटोदा तालुक्यातील बेलखंडी पाटोदा येथील महिला वाहून गेली.
अन्नपुर्णा सखाराम माने (वय ५९) असे मृत महिलेचे नाव आहे. बीड तालुक्यातील कर्जणी येथील तळे भरून त्यातील पाणी बीड शहरातील
बिंदुसरा नदीपात्रात आल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. औरंगाबाद - सोलापूर महामार्गावरील बीड शहरातल्या बिंदुसरा नदीच्या पर्यायी पुलावर पाणी
आल्याने या पूलावरुन पाणी वाहत असल्याने हा पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे पोलिसांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
औरंगाबाद - सोलापूर महामार्गावरील अवजड वाहने गढी येथून वळवण्यात आली आहेत. बिंदुसरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
प्रशासनाकडून दिल्या असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्याच्या पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिलिमीटर असताना
आतापर्यंत सरासरीच्या साठ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील नद्या, नाले,
ओढ्यांना पाणी आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू आलेल्या पावसाने जिल्ह्यातील लहान मोठे सिंचन प्रकल्पाच्या पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांनीच केला रस्ता खुला

$
0
0

नागरिकांनीच केला रस्ता खुला
पैठण रोडवरील कोंडी संपली; बांधलेल्या अर्ध्या सिमेंट रोडचा दिलासा
म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वेस्टेशन उड्डाणपूल ओलांडल्यानंतर पैठण-गोलवाडीकडे जाताना पैठण रोडवर गेल्या तीन-चार महिन्यांपासून काम सुरू होते. अर्धा रस्ता सिमेंटने तयार करण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी, अर्धा तयार झालेला पक्का रस्ता मात्र तो रिकामाच असल्याचे पाहून नागरिकांनीच अखेर तो खुला केला. अर्धा रस्ता खुला झाल्याने वाहतुकीला काहिसा दिलासा मिळाला आहे.
पैठण रोडवरील वाहतुकीची कोंडी या खुल्या झालेल्या रस्त्यामुळे संपली असून वाहतूक पोलिसांवरील ताणही कमी झाला आहे. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याचे क्रांकिटीकरण करण्यात आले होते. यासाठी रोज संबंधित कंत्राटादाराकडून रस्त्याची देखभाल करणे सुरू होते. असे असले तरी या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी काही फुटत नव्हती. या रस्त्याचे बांधकाम गेल्या चार महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. अर्धा रस्ताही तयार झाला आहे.
शहरात सद्यस्थितीला सर्वाधिक रहदारीचा असलेला औरंगाबाद-पैठण रस्ता खड्ड्यात गेला होता. दोन वर्षांपूर्वी तर दोन किलोमीटर अंतराच्या या रस्त्याच्या साइडपट्ट्या करून रस्ता रुंद करण्यात आला, पण दुरुस्त न केलेल्या रस्त्यावर आणखी खड्डे पडले होते. यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. हा रस्ता संपूर्णपणे कधी दुरुस्त होणार याबाबत मात्र प्रश्नचिन्ह होते, परंतु आता अर्धा रस्ता तयार झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लव‌ित झाल्या आहेत.
औरंगाबाद-पैठण या ५० किलोमीटरच्या रस्त्यावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून महानुभाव चौक ते पैठण लिंक रोड हा रस्ता ओळखला जातो. शहराच्या हद्दीत असलेला हा रस्ता २४ तास वर्दळीचा आहे. या संपूर्ण रस्त्याचे क्राँकिटीकरण लवकर व्हावे आणि दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ महापौरांच्या वॉर्डात आठवड्यापासून पाणी नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘माझ्या वॉर्डात आठवड्यापासून पाणी नाही. पाणी पुरवठा विभागात मनमानी कारभार सुरू आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्याशी अधिकाऱ्यांना काहीही देणे घेणे नाही. पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करा. कामात मनमानी कराल तर काढून टाकू,’ असा इशारा देत महापौर भगवान घडमोडे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

खंडित वीज पुरवठा, फुटलेली जलवाहिनी यामुळे आठ दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात पाच - सहा दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. गौरी - गणपतीच्या सणासुदीच्या दिवसात हे संकट उभे ठाकल्याने महापौरांनी सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीला उपमहापौर स्मिता घोगरे, विरोधीपक्षनेता फेरोज खान, नगरसेवक नंदकुमार घोडेले, भाऊसाहेब जगताप, दिलीप थोरात, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, सुरेंद्र कुलकर्णी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता, वॉर्ड अभियंता उपस्थित होते.

विस्कळीत पाणी पुरवठ्याबद्दल महापौरांनी चहेल यांची खरडपट्टी काढली. ‘वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होतो. पैठण व नक्षत्रवाडी येथील वीज पुरवठा खंडित होतो. जलवाहिनी फुटते. याची माहिती आम्हाला का दिली जात नाही. आयुक्तांइतकेच पदाधिकारीही महत्त्वाचे असतात. महापौर व पदाधिकाऱ्यांना अंधारात का ठेवता. तुमचे मालक आयुक्त नाहीत, आम्ही आहोत. पाणी आले नाही की नागरिक आम्हाला फोन करतात. आम्हाला काहीच माहिती नसते. तेव्हा आम्ही तोंडावर पडतो. ही मनमानी चालणार नाही. मनमानी करणारच असाल, तर कामावरून काढू टाकू. आता सगळे दिवस सण व उत्सवाचे आहेत. या दिवसात पाणी पुरवठा विस्कळीत झालेला चालणार नाही,’ असा इशारा चहेल यांना दिला.

प्रशांत देसरडा, नंदकुमार घोडेले, सुरेंद्र कुलकर्णी यांनीही पाणी पुरवठ्याबद्दल व्यथा मांडल्या. स्मिता घोगरे यांनी त्यांच्या वॉर्डातील समस्या अद्याप सुटलेली नसल्याचे लक्षात आणून दिले. यावर महापौरांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेत लक्ष घालण्यास सांगितले.

महापौर बैठकीत हतबल
बैठकीत महापौर घडमोडे म्हणाले, ‘माझ्या वॉर्डात सात दिवसांपासून पाणी आलेले नाही. सात-सात दिवस पाणी येणार नसेल, तर नागरिकांनी काय करायचे. एखाद्या वॉर्डात सात दिवस पाणी येत नाही आणि अधिकाऱ्यांना त्याचे काहीच वाटत नाही ही दुर्देवी बाब आहे. यापुढे असे प्रकार सहन करणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.

दूषित पाण्यामुळे आयुक्त आजारी
‘पाणी पुरवठ्याची यंत्रणा विस्कळीत तर झालीच आहे, पण अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. आयुक्त डी. एम. मुगळीकर दूषित पाण्यामुळे आजारी आहेत,’ असा गौप्यस्फोट प्रशांत देसरडा यांनी केला. ‘महापालिकेचे आयुक्तच दूषित पाण्यामुळे आजारी पडत असतील तर सर्वसामान्यांचे काम होणार,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


फिडरसाठी पैसे भरण्यास टाळाटाळ
नक्षत्रवाडी येथील पंप हाऊसवर इन्हरटर एक्स्प्रेस फिडर लावण्यासाठी वीस लाखांचा रक्कम महावितरणकडे भरण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

नक्षत्रवाडीच्या पंपहाऊसवर वीस लाख रुपये खर्चून एक्स्प्रेस फिडर लावण्याचा प्रस्ताव महावितरणने महापालिकेला आठ दिवसांपूर्वीच दिला होता. महावितरणकडे वीस लाख रुपये भरण्याची तयारी आयुक्तांनी देखील दाखवली होती. या संदर्भात महापौरांनी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, ‘या संबंधिची फाइल सध्या सुरू आहे.’ चहेल यांच्या उत्तरामुळे नगरसेवक नंदकुमार घोडेले संतापले. ‘कंत्राटदाराच्या फाइल हँट टू हँड चालवता आणि शहरवासीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या एक्स्प्रेस फिडरची फाइल सुरू आहे असे सांगता,’ असा सवाल त्यांनी केला. महापौरांनी देखील नाराजी व्यक्त केली. ‘विशेषाधिकारातल्या फाइल तुम्ही स्वतः घेवून फिरता आणि महावितरणची महत्त्वाची फाइल घेवून जाण्यास तुम्हाला वेळ नाही ही बाब नागरिकांची चेष्टा करणारी आहे,’ असे महापौर म्हणाले. घोडेले यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना फोन लावला. महापौर व मुख्य अभियांत्यांचे त्यांनी फोनवर बोलणे करून दिले. त्यानंतर उद्या सकाळी वीज लाख रुपये महावितरणला भरा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ रस्त्यांची यादी बदला; अन्यथा कोर्टात जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘रस्त्यांची यादी बदला आणि त्यात जुन्या शहरातील प्रमुख पाच रस्त्यांचा समावेश करा, अन्यथा आम्ही कोर्टात जावू,’ असा इशारा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी महापौर भगवान घडमोडे यांना दिला.

जलील यांनी एमआयएमच्या नगरसेवकांसह महापौरांची भेट घेतली व चर्चा केली. महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सविधांचा विकास करण्यासाठी शासनाने शंभर कोटींचे अनुदान दिले आहे. यातून रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ऐतिहासिक वास्तूंकडे जाणारे रस्ते, सिडको आणि जुने शहर यांना जोडणारे रस्ते, प्रशासकीय कार्यालये - बाजारपेठा यांना पूरक असलेले रस्ते याचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी पंचायत समिती - पीरगैब साहेब दर्गा - नवीन पूल, पोलिस मेस - वीर सावरकर चौक या रस्त्याचा समावेश शंभर कोटींच्या यादीत करावा. महापालिका मुख्य कार्यालय ते आझाद चौक, नेहरू भवन ते औरंगपुरा, पंचायत समिती ते रेंगटीपुरा, शहागंज - नवाबपुरा ते मोंढानाका या रस्त्यांचा समावेश यादीत करावा, असे जलील यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीच बंद करताना आग; वीज तंत्रज्ञाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील माणिकनगर (भवन) येथील महावितरण वीज तंत्रज्ञ जितेंद्र उत्तमराव काकडे (वय ३२, रा. धानोरा) यांचा सोमवारी विजेच्या लोळात भाजून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
दोन वर्षांपासून भवन येथे कार्यरत असलेले काकडे हे नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेपाच वाजता माणिकनगर येथील लक्ष्मीनगर भागातील शिवनेरी हॉटेल परिसरातील ११ केव्हीच्या वाहिनीवरील एबी स्वीच बंद करण्यासाठी गेले होते. त्यांनी जमिनीवर उभे राहून हाताने स्वीच ओढले असता अचानक वीज वाहिनीतून बाहेर पडलेल्या अग्निलोळात भाजले. येथे उपस्थितांनी त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचार सुरू असताना तासभरात मृत्यू झाला.
स्वीच बंद करण्यासाठी ते मित्रासोबत गेले होते. आगीचा लोळ उठून त्यात ते भाजत असताना मित्राने बाजूला धाव घेऊन आपला जीव वाचवला. पण, त्यात सापडून जितेंद्र भाजून जमिनीवर पडले. हे अग्नितांडव सुमारे पाच ते सात मिनिटे सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

वडिलांप्रमाणेच मृत्यू

जितेंद्र काकडे यांनी पात्रता प्राप्त केल्यानंतर अनुकंपा कोट्यातून महावितरणमध्ये नोकरीस लागले. त्यांचे वडील २००२ मध्ये औरंगाबाद शहरात काम करताना विजेचा धक्क्याने मरण पावले होते. वडील आणि मुलांचा कर्तव्य बजावतानाच सारख्याच पद्धतीने मृत्यू झाला. सतत हसतमुख असलेल्या काकडे यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व एक लहान भाऊ, असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन महिन्यांतून एकदा पेन्शन अदालत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सेवानिवृत्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे दर तीन महिन्यांनी पेन्शन अदालत घेण्यात येईल, अशी घोषणा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नुकतीच केली.

औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष वसंत सबनीस, कार्याध्यक्ष के. जी. शेरे, चिटणीस जी. एम. शिंदे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. सबनीस यांनी प्रास्ताविक केले. दरमहा एक तारखेस पेन्शन व्हावी, जिल्हा कार्यालयासाठी भूखंड मिळावा आदी मागण्या मांडल्या. मराठवाडा अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील पेन्शनरांचे प्रश्न मांडले. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पेन्शन अदालत सुरू करावी, अशी मागणी केली.

डॉ. भापकर यांनी वय झाले कुणाचे या कविता गायनाने भाषणाची सुरवात करून उपस्थितांचे मने जिंकली. आठवडाभरात पेन्शन सेल सुरू करण्यात येईल. तीन महिन्यांतून एकदा पेन्शन अदालन घेण्यात येईल, मराठवाडाभर हा उपक्रम राबविला जाईल, असे आश्वासन दिले.

भापकर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गोकुळ पाटील, कुंभकर्ण, पद्मे, रामदास वल्ले, जनार्धन शिंदे, अब्दुल शेख काम, एस. टी. पवार, पी. टी. पवार, केवट आदींचा सत्कार करण्यात आला. संस्थेस देणगी दिलेल्या गाडेकर, कृष्णा कुलकर्णी यांनाही पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमास रखमाजी जाधव, गौतमकुमार जैन, राधेश्याम वैष्णव, डॉ. शामराव पिसोळकर, के. बी. लोहाडे, प्रभा कुलकर्णी, जफर अली, डी. एम. होळकर, जी. एम. गोदे, आर. एल. वैष्णव आदींनी पुढाकार घेतला.

‘पेन्शन सेल’ बंद केल्याने अडचणी
औरंगाबाद येथील कोषागार कार्यालयात ३३ हजार सरकारी सेवानिवृत्त व झेडपीचे साडेसहा हजार पेन्शनर्स आहेत. कोषागारातून एक तारखेला शासकीय सेवानिवृत्तांची पेन्शन दिली जाते, पण झेडपीच्या पेन्शनरांना अडचणी येतात. तत्कालीन सीईओ अभिजीत चौधरी यांनी ‘पेन्शन सेल’ सुरू केला होता. त्यावेळी वर्षभर एक तारखेला पेन्शन मिळाली, पण जानेवारी २०१७पासून अचानकपणे हा सेल बंद केला गेला. त्यामुळे अडचणी येत असल्याबद्दल सभेत प्रकाश टाकण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झालरपट्टा आराखडा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा

$
0
0

औरंगाबाद : सिडकोच्या अख्त्यारीतील २६ गावांसंदर्भातील झालर विकास प्राधिकरणाची याचिका मागे घेण्यात आली आहे. ही याचिका मागे घेतल्यामुळे झालरचा विकास आराखडा प्रसिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ढवळाबाई पवार यांनी ही याचिका केली आहे. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. मंगेश पाटील यांच्यासमोर सोमवारी या याचिकेची सुनावणी होती. झालर आराखडा प्रसिद्ध करण्याची परवानगी द्यावी किंवा याचिकेची अंतिम सुनावणी घ्यावी, अशी विनंती करणारा दिवाणी अर्ज राज्य शासनातर्फे दाखल करण्यात आला. हा दिवाणी अर्ज निकाली काढण्यात आला. सिडको प्रशासनाने २६ गावांतील प्रारूप विकास आराखडा २०११मध्ये प्रसिद्ध केला. सिडकोने हरकती व सूचना मागवून आराखडा अंतिम केला आणि तो राज्य शासनाला पाठविला. या याचिकेची सुनावणी २४ ऑगस्टला ठेवण्यात आली होती, परंतु याचिकर्त्याचे वकील व्ही. डी. सपकाळ यांनी २१ ऑगस्ट रोजीच याचिका मागे घेण्याची विनंती खंडपीठाकडे केली होती. याप्रकरणात सिडकोची बाजू अनिल बजाज यांनी तर शासनाची बाजू सिद्धार्थ यावलकर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय कार्यकर्त्यांवर गणेशोत्सवात नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणेशोत्सवात उपद्रवी ठरू शकणारे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विविध राजकीय पक्षांचे ५२ कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर आहेत. यापैकी १८ जण हिटलिस्टमध्ये असून त्यांच्यावर कडक नजर ठेवण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी दिली.
शहरात गणेशोत्सवाच्या काळात समाजकंटकाकडून अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दक्ष आहेत. अनेक समाजकंटकावर यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या गणेशोत्सवाच्या काळात उपद्रवी ठरू शकणाऱ्या ५२ समाजकंटकाची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यात राजकीय पक्षांशी सबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांच्या वर्तणुकीवर पोलिसांची करडी नजर आहे.

बंदोबस्तासाठी चार्ली

गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला, तरुणींची गर्दी होते. त्यांची गर्दीमध्ये छेड काढण्याचे प्रकार घडतात. त्याला लगाम लावण्यासाठी चार्ली पथकांची नेमणूक केली आहे. त्यात ३० पुरूष व १० महिला, अशा ४० जणांचा समावेश राहणार आहे. शहरातील गर्दी असलेल्या २० मंडळात प्रत्येकी दोन चार्लीची नेमणूक केली जाणार आहे. महिला व तरुणीची छेड काढल्यास तातडीने कारवाई करणार असल्याचे उपायुक्त डॉ. धाटे घाडगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारकरी संघटनांचे मुंबईत १० ऑक्टोबरला आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिनी मंदिर व्यवस्थापन व अस्थायी समितीवर फक्त वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनाच घेण्यात यावे, या वारकरी संघटनाच्या मागणीकडे राज्य शासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप बंडातात्या कराडकर यांनी केला. याबद्दल निर्णय न घेतल्यास १० ऑक्टोबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर टाळ-भजन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात सोमवारी विविध वारकरी संघटनाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर महाराज जळगावकर हे होते. या बैठकीत कराडकर म्हणाले, राज्य शासनाच्या ताब्यातील पंढरपूर येथील मंदिराच्या व्यवस्थापन व अस्थायी समितिवर बहुतांशी राजकीय नेत्यांची निवड केली आहे. हा निर्णय सर्व वारकरी संघटनांना मान्य नाही. या दोन्ही समित्यांवर केवळ वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींना स्थान मिळावे यासाठी आषाढी एकादशी दरम्यान पंढरपूर येथे आंदोलन केले होते. त्याला दोन महिने उलटूनही राज्य शासनाने मागणीचा सकारात्मक विचार केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. पैठण येथील संतपीठ तत्काळ सुरू करा व राज्यातील नद्या प्रदूषणमुक्त करा या मागण्याही त्यांनी केल्या.
बैठक यशस्वी करण्यासाठी सुधाकर वाघ, सुभाष पाटील, भगवान मापारी, महेश खोचे, मारुती वाणी, मच्छिंद्र निवारे, विष्णू ढवळे, रमेश पाठक, एकनाथ सोनवणे, सोनाजी घाटोळे, रामचंद्र तुळसे, ज्ञानेश्वर पहिलवान, भागवत ऊगले, नामदेव पोकळे यांनी परिश्रम घेतले.
या बैठकीत नरहरी महाराज चौधरी, रामभाऊ महाराज चोपदार, भागवत महाराज चवरे, रघुनाथ महाराज गोसावी, रामभाऊ महाराज सानप, रख्माजी महाराज नवले, सदानंद महाराज मगर, सामाजिक कार्यकर्ते बंडेराव जोशी, दिनेश पारीख, अॅड. माधवी निगडे यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेश महासंघातर्फे बेगमपुऱ्यात वृक्षारोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा गणेश महासंघांतर्फे वृक्षसंवर्धन संकल्प करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत २५ हजार झाडे लावण्यात येणार असून या मोहिमेचे प्रारंभ सोमवारी बेगमपुऱ्यात करण्यात आला. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष राजू शिंदे, कार्याध्यक्ष अभिजित देशमुख, सचिन खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिवाय सिडको एन ५, गुलमोहर कॉलनी येथे वृक्षारोपण करून ट्री गार्ड लावण्यात आले.
मकाई गेट ते बिबी का मकबरा मार्ग, हनुमान टेकडी, बौद्ध लेणी आदी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संभाजी अतकरे, संदीप शेळके, धीरज पाटील, अनिकेत पवार, विशाल दाभाडे, रवी कावडे, अनिल मानकापे, दिग्विजय पाटील, कृष्णा पवार, अण्णासाहेब पवार, हिरा सलामपुरे, ज्ञानेश्‍वर जाधव, सुरेश पवार, अरूण शेळके, राजू कोकणे, राजू पठारे, गणेश पेरे, विलास संभारे, अमोल झळके, गणपत पवार, रोहित ढोकरट, अशोक विधाते, योगेश पवार, सतीश पाटील, इंदर फतेलष्कर, दिनेश ढवळे आदींची उपस्थिती होती.
वार्ड क्रमांक ६४ एन-५ गुलमोहर कॉलनी येथे महासंघाचे अध्यक्ष राजू शिंदे, कार्याध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ट्री गार्ड लावण्यात आले. यावेळी नगरसेवक शिवाजी दांडगे, माजी नगरसेविका रेखा जैस्वाल, विलास कोरडे, चंद्रकांत गिरी, नितीन अजमेरा, दिगंबर खरात, नितीन खरात, रवी पाठक, अरूण पालवे, अरूण राऊत, अतिक पठाण, सुभाष लोखंडे, नरेश वानखेडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा जोर कायम, नऊ मंडळांत अतिवृष्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तब्बल दीड महिन्यांपासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने मराठवाड्यात १९ व २० ऑगस्ट रोजी दमदार पुनरागमन झाले. यानंतरही विभागागात पावसाची हजेरी कायम असून सोमवारी (२८ ऑगस्ट) सकाळपर्यंत नऊ मंडळात अतिवृष्टी झाली.
यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल (९४ मिलीमीटर), चिकलठाणा (७६ मिमी), हिंगोली जिल्ह्यातील साखरा (९४ मिमी), हत्ता (९८ मिमी), तर बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा (७८ मिमी), नेकनूर (७२ मिमी), थेरला (८५ मिमी), अंमळनेर (७६ मिमी), धामनगाव मंडळामध्ये (७६ मिमी) अतिवृष्टी झाली.
अवघ्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीड, लातूर जिल्ह्यांनी आजपर्यंत अपेक्षित असलेल्या पावसाची सरासरी ओलांडली असून, आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही ९१ टक्के पाऊस झाला आहे. विभागात सोमवारी सकाळपर्यंत पावसाने सर्व तालुक्यांमध्ये हजेरी लावली. या पावसामुळे पिकांनाही जीवदान मिळाले असून लहान मोठ्या प्रकल्पातही पाणी आल्यामुळे येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिळण्याची शक्यता आहे यामुळे पावसाचे हे पुनरागमन मराठवाड्यातील नागरीकांसाठी दिलासादायक आहे. मराठवाड्यात सोमवारी सकाळपर्यंत २४ तासांत एकूण १७.६६ मिलिमीटर पाऊस झाला असून, यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १९.२९, जालना १३.१२, परभणी १०.६७, हिंगोली ३१.१७, नांदेड ९.९९, बीड २१.११, लातूर १२.३७, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २३.५५ मिलिमीटर पाऊस झाला.

सरासरीत परभणी, ‌हिंगोलीची पिछाडी
निम्म्या मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात सातत्याने दमदार पाऊस होत असताना दुसरीकडे उर्वरित जिल्ह्यांमध्ये केवळ रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्ये सरासरीत पिछाडीवर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना रोड नव्हे खड्डा रोड

$
0
0

जालना रोड नव्हे खड्डा रोड
दुरुस्ती रखडल्याचा नागरिकांना फटका; वाहनचालकांत संताप
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील सर्वाधिक रहदारीच्या जालना रस्त्यावर गेल्या दोन महिन्यांपासून खड्डेच खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याची दुरुस्ती रखडल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. खड्डे चुकवून जाणाऱ्या वाहनचालकांचे अनेक छोटे मोठे अपघात दैनंदिन घडत असल्याने संतापाचे वातावरण आहे.
जालना रस्त्याची दोन वर्षांपूर्वी डागडुजी करण्यात आली होती. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जालना रस्त्याच्या दुरुस्तीला सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी उपलब्ध करून दिला. जुन्या सरकारने निधी मंजूर केला पण तो देण्यास विलंब केला. त्यामुळे रस्त्याची पहिल्या टप्प्यात अर्धीच दुरुस्ती झाली होती. दरम्यान कंत्राटदारांनी असहकार आंदोलन केले. त्याचा फटका रस्ता दुरुस्त होण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागली. कसेबसे काम झाले होते. रस्त्यावरची प्रचंड रहदारी, दोन्ही बाजूंना झालेली अतिक्रमणे, त्यामुळे गायब झालेल्या नाल्या यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. बाबा पेट्रोलपंप, क्रांतिचौक, अमरप्रीत चौक, सेव्हन हिल, मुकूंदवाडी चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहते. हे डबके महिनोनमहिने कायम आहेत. डांबरावर जास्त काळ पाणी राहिले तर त्यातील एकसंधपणा कमी होऊन खडी मोकळी होण्यास सुरवात होते. या प्रक्रियेमुळे जालना रस्त्यावर पाऊस आणि जडवाहतुकीमुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळा संपेपर्यंत डागडुजी करता येत नाही त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यातून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अदालत रस्त्यावरून समर्थनगरकडे जाताना दोन्ही रस्त्याचा जोड मजबूत केलेला नाही. तिथे भलामोठा खड्डा वाहनधारकांसाठी कर्दनकाळ आहे. बाबा पेट्रोलपंप ते क्रांतिचौक दुतर्फा रस्ता उखडला आहे. हा रस्ता महापालिकेच्या ताब्यात आहे. क्रांतिचौक ते चिकलठाणा रस्त्याही उड्डाणपुलांच्या दोन्ही बाजूंनी पुरता उखडून गेला आहे. अमरप्रीत चौकात तीन बाजूला जीवघेणे खड्डे आहेत. शहरातील प्रमुख रस्त्याकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही यंत्रणांचे होणारे दुर्लक्ष नागरिकांना मात्र त्रासदायक ठरत आहे.

‘‘ रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजविण्यासाठी लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल. वार्षिक दुरुस्ती कंत्राटातून या रस्त्याचे काम पुढे केले जाईल पण पावसाळा संपेपर्यंत त्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे.’’
- ऋषीप्रसाद खंडेलवाल, प्रभारी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव २१ सप्टेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास २१ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने सुरुवात होईल. तत्पूर्वी देवीजीची मंचकी निद्रा ही १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत असेल. २१ सप्टेंबर रोजी पहाटे मंचकी निद्रा संपल्यानंतर देवीजीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होऊन शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी देवस्थान समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी दिली.
१३ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री देवीजींच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होईल. २१ सप्टेंबर रोजी बुधवारी पहाटे श्री देवीजीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापना, ब्राह्मणास अनुष्ठानाची वर्णी व रात्री छबिना अशा कार्यक्रमाने नवरात्र महोत्सवाला सुरुवात होईल. यानंतर २७ सप्टेंबरपर्यंत दररोज नित्योपचार पूजा, विविध अलंकार पूजा व रात्री छबिना असे कार्यक्रम असतील. २८ सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी आहे. यादिवशी देवीजीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा, होम, पूर्णाहुती व रात्री छबिना.
२९ सप्टेंबर रोजी शुक्रवारी महानवमी आहे. यादिवशी दुपारी होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक. ३० सप्टेंबर रोजी शनिवारी विजयादशमी (दसरा) उष:काली श्री देवीजींचे शिबिकारोहन, सीमोल्लंघन, मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा, शमीपूजन
व सार्वत्रिक सीमोल्लंघन. ५ ऑक्टोबर रोजी गुरुवारी पहाटे ( ४ ऑक्टोबर चे
उतररात्री ) देवीजीची सिंहासनावर प्रतिष्ठापना कोजागिरी व मंदिर पौर्णिमा व रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबिना. ६ रोजी शुक्रवारी देवीची नित्योपचार पूजा, अन्नदान, महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबिना असे धार्मिक
कार्यक्रमाने शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकी संस्थानचे नारायण देव बाबा यांचे देहवासन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यातील वाकी देवस्थानाचे शिवस्वरूप सदगुरु नारायण देव बाबा (वय ८५) यांचे सोमवारी पहाटे चार वाजता देहवासन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकृती खालावल्याने त्यांना २१ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नारायण बाबा (नारायण आश्रुबा पल्हाळ) यांचा जन्म १९३२ मध्ये खुलताबाद तालुक्यातील पाडळी येथे झाला होता. पण, वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे निधन झाल्याने वाकी येथील नातेवाईकांनी त्यांचा सांभाळ केला. मेंढपाळाचा पारपंरिक व्यवसाय करताना त्यांना परमार्थाचा लळा लागला. त्यांनी प्रपंच सांभाळून भक्ती मार्गात झोकून दिले व वाकी येथील शिवेश्वर मंदिराचा जीर्णोद्वार करत संस्थानाची स्थापना केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीतील भाविकांनी वाकीकडे धाव घेतले. वाकी, नेवपूर, चिंचोली येथील ग्रामस्थांनी व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या अत्यसंस्कारप्रसंगी शोक व्यक्त करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महामंडलेश्वर शांतिगिरी महराज, परमानंदगिरी महाराज, दयानंद महाराज शेलगाव, सुखदेव महाराज वाकी, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार नितीन पाटील, किशोर पाटील व नामदेव पवार, वैजयंती खैरे, संजना जाधव, अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर, उदयसिंग राजपूत, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, तहसीलदार महेश सुधळकर आदींनी उपस्थिती लावली.

वाहनांची रिघ

बाबांचे पार्थिव वाकी येथे सोमवारी सकाळी आणण्यात आले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी वाकीकडे वाहनांची रिघ लागली होती. त्यामुळे ही वाहने चिंचोली लिंबाजी, टाकळी अंतूर, नेवपूर येथे थांबवण्यात आली. या गावांपासून वाकीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांना बंदी करण्यात आली. बंदोबस्तासाठी एक उपविभागीय पोलिस अधिकारी, दोन पोलिस निरीक्षक, तीन सहपोलिस निरीक्षक, आठ उपनिरीक्षक, ७५ पोलिस, १५ महिला पोलिस, १९ होमगार्ड व स्वयंसेवक तैनात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images