Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ढोल ताशेः शिव स्वराज्य प्रतिष्ठाण पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणेशोत्सवात लक्षवेधक ठरते ते ढोल-ताशा पथक. महाराष्ट्राची ही वैभवशाली परंपरा जपण्यासाठी अनेक ढोल पथक मंडळे तीन-तीन महिन्यांपासून तयारी करतात. शहरातील ‘शिव स्वराज्य प्रतिष्ठाण’ सुद्धा ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहे. २५० जणांच्या पथकात बालकांपासून सत्तरी ओलांडलेल्यांचा सहभाग आहे.
तरुणाईचा डीजेकडे कल वाढत असताना परंपरा जतन करण्याच्या हेतून शिव स्वराज्य प्रतिष्ठाणने २०१२ मध्ये ढोल पथक स्थापन केले. या मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापणा औरंगपुऱ्यातील बाळकृष्ण मंदिर परिसरात केली जाते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुमित नामदेव पवार हे असून सदस्यसंख्या ७०० आहे. हे मंडळ दरवर्षी एक विषय ठरवून काम करते. यंदा ‘पाणी बचत’ या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
अतिशय लयबद्ध, विविध चालींवर वादन करणारे पथक म्हणून या पथकाची ओळख आहे. त्यासह दोरी मॅनेजमेंटकरिता स्वतंत्र स्वयंसेवक असतात. गणेशोत्सवाच्या दीड महिना आधीपासून वादनाची तालीम जिल्हा परिषद मैदानावर सुरू होते. अजय-अतुल ढोल जनरेशनमधील प्रशिक्षित प्रशिक्षक रमेश वाघ हे पथक प्रमुख आहेत. प्रत्येकाला शिस्त, वादनातील प्रकार, ताल याचे प्रशिक्षण दिले जाते. पथकात एक हजेरी मास्तरही आहे. सकाळी सहा ते नऊ यावेळेत तालीम होते. मंडळाची स्वतःचे साउंड सिस्टिम, वाहतूक व्यवस्था आहे. पथकातील २५० पैकी ८७ मुली आहेत, त्यापैकी ४० शालेय विद्यार्थी आहेत.
चाल वाजवण्याची तयारी ही टाळीवर केली जाते. प्रात्यक्षिकानंतर प्रत्यक्ष वादनाला सुरुवात होते. ‘रेल्वे’, ‘लावणीचा ढेका’, ‘संदल’, ‘सिंगल डंका’, ‘डबल डंका’, ‘उडती चाल’, ‘गरबा’, ‘भांगडा’, ‘चित्रपट गाण्यांवरील चाली’, ‘श्री मारुती स्त्रोत्र’, ‘शिवमंत्र’ अशा विविध चालींवर वादन केले जाते. पथकातील प्रत्येकाचा विचार करून ढोल उपलब्ध करून दिले जातात. लहान मुलांसाठी ‘नादी’, मुलींसाठी ‘मिनी ढोल’ यासह ‘जम्बो ढोल’, ‘दंबग’, ‘महादबंग’ ढोल आहेत. खास पाच फुटाचा परिघ असलेला ‘बजरंगी ढोल’ हे पथकाचे वैशिष्ट आहे. ताशामध्ये साधे, गंगा-जमुना, तडम ताशा, टोल, बिगूल, नगाडे, कच्छी अशी पारंपरिक वाद्ये आहेत.

आपल्या वैभवशाली परंपरेचे जतन व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत. मैदानी खेळांकडे लक्ष जावे, तरुणांमध्ये जनजागृती व्हावी या हेतुने आम्ही काम करतो. आमच्या पथकात तीन वर्षांपासून ते ७० वर्षे वयाचे सदस्य सहभागी झालेले दिसतील.
-रमेश वाघ, प्रशिक्षक

ढोल ताशांची परंपरा कशी जतन करणे व तिला बळ देणे हा प्रयत्न आहे. आमच्या पथकातील सदस्याला प्रशिक्षण असो की त्याची सुरक्षा याबाबत तेवढेच दक्ष असतो. या प्रयत्नामुळे सर्वसमान्यांमध्ये परंपरा जपणुकीची भावना निर्माण होते याचा आनंद आहे.
-सुमित पवार, संस्थापक अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवेश प्रक्रियेच्या सूचनांचे उल्लंघन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर ‘स्पॉट अ‍ॅडमिशन’चा गोंधळ कायम आहे. विद्यापीठाच्या सूचनांचे उल्लंघन करून महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया केल्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ‘स्पॉट अॅडमिशन’चा अर्ज भरूनही यादीत नाव नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठाचे विशेष प्रभारी अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. दोन दिवस नोंदणी करून ३० ऑगस्टला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सूचना डॉ. सरवदे यांनी महाविद्यालयांनी केली.
पदव्युत्तर प्रवेशाचे नियोजन महाविद्यालयीन पातळीवर फसल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. देवगिरी कॉलेज, विवेकानंद कॉलेज, मौलाना आझाद कॉलेज, गंगापूर येथील मुक्तानंद कॉलेज, सिल्लोड येथील यशवंत कॉलेजात रसायनशास्त्र विषयाला प्रवेश मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गाठले. ‘स्पॉट अॅडमिशन’ला अर्ज करूनही प्रवेश यादीत नाव नसल्याचे विद्यार्थ्यांनी प्रभारी अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे यांना सांगितले. विद्यापीठ परिपत्रकानुसार प्रवेश देण्याची सूचना असूनही महाविद्यालयांनी अगोदरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. दोन दिवस नोंदणी करून ३० ऑगस्ट रोजी प्रवेश देण्याचे परिपत्रकात म्हटले आहे. या सूचनेनुसार प्रवेश द्या, असे डॉ. सरवदे यांनी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सांगितले. रसायनशास्त्र, गणित, समाजकार्य व विधी अभ्यासक्रम वगळता सर्व विषयांच्या याद्या महाविद्यालयनिहाय प्रसिद्ध केल्या आहेत. या महाविद्यालयांनी ३१ ऑगस्टपर्यंत गुणवत्तेनुसार प्रवेश देणे बंधनकारक आहे.

नवीन यादी
‘स्पॉट अॅडमिशन’च्या प्रक्रियेत अर्ज करूनही यादीत नाव नसलेल्या ४५ विद्यार्थ्यांची नवीन यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, मात्र यादीत नाव नसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे प्रश्न कायम आहेत. कॉलेज आणि विद्यापीठाच्या टोलवाटोलवीत विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अमोल दांडगे यांनी विद्यार्थ्यांसह सरवदे यांनी भेट घेतली. यावेळी प्रवीण काळे, अमोल केतके, समाधान साबळे, साईनाथ साबळे, विलास जरारे, गणेश सुरडकर यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या कंटाळवाण्या प्रवासाला करा आता राम राम

$
0
0

एसटीच्या कंटाळवाण्या प्रवासाला करा आता राम राम
एसटीतही मिळणार वायफाय
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
एसटीचा प्रवास म्हणजे कंटाळवाणा हे तुमच्या मनात असलेले समीकरण आता बदलावे लागणार आहे. आधुनिकतेची कास धरत एसटी महामंडळानेही आता एसटीमध्ये प्रवाशांसाठी वायफाय सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे एसटीमध्ये प्रवास करतानाही प्रवाशांना इंटरनेटचा वापर करता येणार आहे.
औरंगाबाद विभागातील विविध बसस्थानकांच्या बसमध्ये वायफाय सुविधा बसविण्याचे काम आठ दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाच्या ८२ बसमध्ये वायफाय किट बसविण्यात आला आहे. सिडको बसस्थानकाच्या ५०, गंगापूर ४०, पैठण २४, सोयगाव १३, सिल्लोड येथे २६ बसमध्ये वायफाय सुविधा देण्यात आली आहे.
विभागात ५९० बसपैकी २५१ बसमध्ये ही सुविधा आतापर्यंत देण्यात आली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व बसमध्ये वायफाय सुरू होईल. वायफाय असल्याने प्रवाशांना बसमध्येही इंटरनेट वापरता येणार असल्याने त्यांचा प्रवास कंटाळवाणा होणार नाही, असे विभाग नियंत्रक रा. ना. पाटील यांनी सांगितले.
पासवर्डची गरज नाही
प्रवासी बसमध्ये बसताच त्यांना वायफाय सुविधा मिळू शकेल. त्यासाठी कोणत्याही पासवर्डची आवश्यकता नाही. मोबाइलवर वायफायचे बटन ऑन करताच वायफाय सुरू होईल. एसटीच्या वायफायची सुविधा घेतल्यानंतर प्रवाशांना कॉमेडी एक्सप्रेस, मराठी चित्रपट, मराठी गाणे तसेच मराठी नाटकेही पाहायला मिळणार आहेत. या मनोरंजनासाठी असलेल्या पॅकेजशिवाय अन्य वेबसाईट किंवा सोशल मीडियाचा वापर या वायफायद्वारे करता येणार नाही.
बसच्या स्विचवर वायफाय ऑन ऑफ
एसटीमध्ये लावण्यात आलेले वायफाय यंत्र हे बॅटरीला जोडण्यात आले आहे. यामुळे एसटी ड्रायव्हरने बसचे सुरू करताच वायफाय सुरू होईल. साहजिकच बस बंद केल्यावर वायफाय सुविधा बंद होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझा बाप्पाः १८ वर्षांपासून निर्माल्य संकलन

$
0
0

१९७६ ते १९९७ अशी २१ वर्षे नांदेड शहरातील भाग्यनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सक्रीय सहभाग घेतला. पण, १९९९ पासून २०१६ पर्यंत नांदेड येथील महात्मा गांधी मिशनचे खगोलशास्त्र व अंतराळ संशोधन केंद्र सुरू झाल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘टेकलाइफ’ या पर्यावरण संवर्धन करणाऱ्या क्लबमार्फत, मराठी विज्ञान परिषद व नांदेड महापालिका व लोकमान्य प्रतिष्ठान यांच्या गणेशोत्सवात निर्माल्य संकलन कार्याला सुरुवात केली. शहरातून वाहणाऱ्या गोदावरी व आसना या दोन नद्यांच्या काठावर निर्माल्य टाकले जात होते. ‘टेकलाइफ’च्या ६० विद्यार्थ्यांसोबत निर्माल्य संकलन करून ते कंपोस्ट खत तयार करण्यासाठी महापालिकेला दिले. यातून नदीचे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला. हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. क्लबतर्फे गेल्या चार वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा घेतल्या. गणेशोत्सवात देखावा सादर करताना तत्कालीन भारतीय व जागतिक खगोलिय घटनांवर भर दिला. रोहिणी उपग्रह, अंतराळ दुर्बिण, रोबोट, कोणार्क सूर्यमंदिर, अष्टविनायक दर्शन, सुपरनोव्हा, १९९७ मध्ये मंगळ ग्रहावर उतरलेले मार्स पाथफाइंडर याचे लाइव्ह डेमो मॉडेल सादर केले. काही देखावे गणेशोत्सव संपल्यानंतर देखील सुरू ठेवावे लागले होते. त्यामागे नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढला पाहिजे, हा उद्देश राहिला. हे देखावे तयार करून सादर करण्यात भाग्यनगर मधील मित्र, वडील व तिन्ही भावांचे सहकार्य मिळाले.
-श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक
(शब्दांकनः रामचंद्र वायभट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानाचा गणपतीः श्री संस्थान गणपती

$
0
0

औरंगाबाद शहराचे ग्राम दैवत म्हणून राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती प्रसिद्ध आहे. शहरातील कोणत्याही सार्वजनिक महत्त्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात संस्थान गणपतीची पूजा करून केली जाते. हे ऐतिहासिक मंदिर सुमारे पावणेदोनशे वर्ष जुने आहे. श्री संस्थान गणपती मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती पूर्वाभिमूख, दोन फूट बाय दोन फूट या आकाराची डाव्या सोंडेची आहे. काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्ती शेंदुराच्या तीन इंच थरात स्थिरावली आहे. पूर्वी मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नव्हती, १९६०मध्ये मंदिराची व्यवस्था ट्रस्टकडे आली. ट्रस्टतर्फे १९८२मध्ये लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, बाबुलाल पराती, बजरंगलाल शर्मा, लक्ष्मण शिंदे, नंदलालसेठ जैस्वाल, माणिकचंद गंगवाल, लखन पैलवान, बाबू उस्ताद यांच्या पुढाकाराने जीर्णोद्धार करून संगमरवरी सुंदर छोटेसे मंदिर उभारण्यात आले आहे. येथे दर्शन घेऊनच जुन्या शहरातील नागरिक दिवसाची सुरुवात करतात. श्री संस्थान गणपतीकडे मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. गणेशोत्सवात दररोज सकाळी अथर्वशीर्ष स‌हस्त्रावर्तन पठण व दुपारी भंडाऱ्याचे आयोजन होते. गणेशोत्सवात राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात. सध्या श्री. संस्थान गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोभागचंद चोरडिया असून, प्रफुल्ल मालाणी, नंदकुमार घोडेले, संतोष चिचाणी हे विश्वस्त आहेत.

शिवसेनाप्रमुखांकडून मुकुट

औरंगाबाद महापालिकेची पहिली निवडणूक मे १९८८ मध्ये झाली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेला जाण्यापूर्वी येथे दर्शन घेतले. बहुमत मिळाले, तर सोन्याचा मुकुट अर्पण करीन, असा नवस केला. शिवसेनेला सत्ता मिळाली व शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबाद येथे येऊन सोन्याचा मुकुट अर्पण करून नवस फेडला होता.

-विजय देऊळगावकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाधिकारी कार्यालयात भरली शाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शिक्षक नसल्याने तालुक्यातील भिंगी येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी गट शिक्षणाधिकारी अधिकारी कार्यालयात शाळा भरवली. या शाळेसाठी दोन शिक्षक मंजूर असून एक शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
सध्या शिक्षण विस्तार अधिकारी के. ई. चंदिले यांच्याकडे गट शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आलेल्या योगेश घायवट, संजय घायवट, वसंत घायवट, ज्ञानेश्वर शिंदे, नामदेव घायवट यांच्यासोबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील भिंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत ३८ विद्यार्थी शिकतात. आंतरजिल्हा बदल्यामुळे शिक्षकाची एक जागा रिक्त झाली आहे. तेव्हापासून शालेय व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु, शिक्षक मिळत नसल्याने जवळपास २५ विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय गाठून शाळा भरवली. निवेदनावर शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘योग्य मार्गदर्शनामुळे शेअरमध्ये नफा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेअर बाजारात गुंतवणूक ही धोक्याची असली, तरी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळाल्यास शेअर बाजारातील गुंतवणूक ही फायदेशीर ठरू शकते, असे मत युवा गुंतवणूकदार वेदांत काळे यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले.

ते अमेरिकेच्या ओहायो या प्रांतात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. कमी वयातच वेदांत काळे यांनी अमेरिकेत अकिलिस होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड शेअर बाजारात गुंतवणूक करणारी नवीन फर्म सुरू केली आहे. औरंगाबाद शहरात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ते वाणिज्य विषयाचे उच्चशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले आहेत. भारतात शेअर मार्केटमध्ये गुतंवणुकीचे प्रमाण आता वाढत आहे. गुंतवणुकीमध्ये धोकेही प्रचंड वाढलेले आहे. अल्पकालीन गुंतवणूक धोकादायक ठरू शकते, मात्र दीर्घ काळासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरत असते, असे त्यांनी सांगितले.

दीर्घ कालावधीसाठी शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. कंपनीला भविष्यात असलेल्या संधी, संबंधित कंपनी किंवा उद्योगाचे स्थैर्य अशा काही गोष्टींचा विचार करून गुंतवणूक केल्यास ती फायदेशीर ठरू शकते. काही कंपन्या विशिष्ट प्रकल्प आणून आपला नफा वाढविणार असल्याचा बनाव निर्माण करत असतात. त्यापासून गुंणतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे. नवीन गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांच्या ठेवी चांगल्या कंपनीत गुंतविल्या जाऊ शकतात. याशिवाय शेअर बाजारात केलेली गुंतवणूक भविष्यासाठीही चांगली असू शकते. याचा विचार करून व योग्य सल्ला घेऊनच बाजारात गुंतवणूक करावी, असे मत काळे यांनी मांडले.

मानसशास्त्रीय अभ्यास
शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेक जण कंपन्यांचा आलेख बघत असतात. त्याद्वारे एखाद्या कंपनीचा शेअर किती वर गेला आणि कधी खाली आला, याची माहिती मिळत असते. असे आलेख तयार करताना संबंधित ग्राहकांचा मानसशास्त्रीय अभ्यास करण्यात येत असतो. यामुळे अनेकदा अशा आलेखांना पाहून केलेली गुंतवणूक धोकादायक ठरू शकते, असेही मत वेदांत काळे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बीड जिल्ह्यात २२ प्रकल्प ओव्हरफ्लो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली . त्यामुळे बिंदुसरासह अनेक छोटी मोठी सिंचन प्रकल्प भरून वाहू लागली आहेत. जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासात पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. तर जिल्ह्यात आतापर्यंत सहासष्ट टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे चार मध्यम प्रकल्पांसह १८ लघुप्रकल्प असे एकूण २२ प्रकल्प तुडूंब भरले असून सदरील प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. माजलगाव व मांजरा या दोन मोठ्या प्रकल्पातही बऱ्यापैकी पाण्याची आवक सुरू झाली आहे.
बीड जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरूवातीला पाऊस पडला त्यानंतर जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात जवळपास वीस दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीप पिके संकटात आली होती. त्यानंतर या आठवड्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले. दरम्यान, रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली व संध्याकाळी उशिरापर्यंत पाऊस रमला. बीड जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत एकवीस मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६६६ मिलीमीटर असताना आतापर्यंत ४४० मिलीमीटर पाऊस झाला. रविवारी जिल्ह्यातील बहुतेक भागात पाऊस झाला. यामध्ये मांजरसुंबा, नेकनूर, थेरला, अंमळनेर, धामणगाव या पाच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मांजरसुंबा मंडळात ७८ मिलीमीटर, नेकनूरमध्ये ७०, पाटोदा तालुक्यात थेरला येथे ८३, अंमळनेर येथे ७६, आष्टी तालुक्यात धामनगाव येथे ७६ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे बीड तालुक्यातील बिंदुसरा नदीला पूर आला. बीड शहरातील औरंगाबाद सोलापूर महामार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला. त्यामुळे अनेक ओढे, नद्या यांना पुराचे स्वरूप आले होते. बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा तलाव रविवारच्या पावसाने भरला.
गेल्या दहा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील महासांगवी, कांबळी, बिंदुसरा, अप्पर कुंडलिका या चार मध्यम प्रकल्पांसह १८ लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. पावसात सातत्य राहिल्याने जमिनीतील ओल खोलवर जाण्याबरोबरच बिंदुसरा, सिंदफणा, डोमरी, तलवार, खटकळी, विद्रुपा, कर्परा आदी नद्या तसेच इतर छोट्या नद्या, ओढे, जलयुक्तमधील बंधारे तुडूंब भरले. याशिवाय गोदावरी नदीपात्रावरील पाचही उच्चपातळी बंधारे तुडूंब भरल्याने या बंधाऱ्यातील पाणी सोडावे लागले.
माजलगाव प्रकल्पात १८ ऑगस्टपर्यंत केवळ १४.८० दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ ४.७४ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मात्र यानंतर माजलगाव प्रकल्पाला मिळणाऱ्या बिंदुसरा व कुंडलिकासह सिंदफणा या प्रमुख तीन नद्या वाहिल्याने धरणात पाण्याची आवक झाली. यामुळे सोमवारी सकाळपर्यंत माजलगाव धरणातील पाणीसाठा ३६.४० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ११.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय मांजरा या दुसऱ्या मोठ्या प्रकल्पात १८ ऑगस्टपर्यंत ३६.९३० दशलक्ष घनमीटर म्हणजेच २०.८७ टक्के इतकेच उपयुक्त पाणी राहिले होते. हा पाणीसाठा आता ५७.४२६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३२.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. अद्यापही या दोन्ही धरणातील पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाण्याची आवक होत सुरूच आहे.
जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम व १२६ लघु असे एकूण १४४ प्रकल्प आहेत. यापैकी महासांगवी, कांबळी, बिंदुसरा व अप्पर कुंडलिका असे चार मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत. याशिवाय भायाळा, कटवट, सुलेमान देवळा, मुंगेवाडी, शिवणी, पांढरी साठवण तलाव, पांढरी लघुपाटबंधारे तलाव, खटकाळी, मोरझलवाडी, धामणगाव, भंडारवाडी, डोकेवाडा, करचुंडी, ब्रम्हगाव, इंचरणा, लांबरवाडी, वडगाव व चारदरी आदी १८ लघुप्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले असून सध्या या सर्व प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. सोमवारी ही दिवसभर आभाळ भरून आले होते. संध्याकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे धरणात पाणी वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ खड्ड्यांबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील खड्ड्यांवर औरंगाबाद महापालिका, सार्वजनिक बांधकाम आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. शंतनू केमकर व न्या. नितीन सांबरे यांनी दिले आहेत.

खंडपीठातील वकील रूपेश जैस्वाल यांनी सप्टेंबर २०१३मध्ये शहरातील खड्डे बुजवावेत, अशी विनंती करणारी याचिका केली आहे. औरंगाबादला ऐतिहासिक महत्त्व आहे. अजिंठा, वेरूळ या जागतिक वारसास्थळांमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. औरंगाबाद हे औद्योगिक क्षेत्रही आहे. या याचिकेबरोबर खंडपीठातील दुसरे वकील नरसिंह जाधव यांचीही जनहित याचिका जोडली आहे. या याचिकांची सुनावणी सोमवारी झाली. सध्या रस्त्यांची काय अवस्था आहे, याची माहिती खंडपीठाने मागवली आहे.

याचिकाकर्त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कॅन्टोनमेंट यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले आहेत. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे जाताना सातत्याने वाहतूक कोंडी होते, याशिवाय दुसरा मार्ग नाही का? अशी विचारणा कोर्टाने खंडपीठातील सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांच्याकडे केली. दुसरा रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अख्त्यारीत येतो. तसेच बाबा पेट्रोल पंप ते नगर नाका हा रस्ता कॅन्टोनमेंटच्या अख्त्यारीत येतो, असे गिरासे यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने या दोन्ही संस्थांना प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमसीए’तर्फे तीन मैदानांची पाहणी

$
0
0

‘एमसीए’तर्फे तीन मैदानांची पाहणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाज बागवान यांनी औरंगाबादला भेट देऊन शहरातील तीन प्रमुख क्रिकेट मैदानांची पाहणी केली.
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे मैदान, गरवारे क्रीडा संकुल आणि एमजीएम क्रीडा संकुल या तीन क्रिकेट मैदानांची पाहणी रियाज बागवान यांनी केली. यंदाच्या क्रिकेट हंगामात १४ वर्षे, १६ वर्षे, १९ वर्षे, २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा, तसेच निंबाळकर क्रिकेट स्पर्धेतील सामने औरंगाबादेत खेळवण्याची योजना आखण्यात येत आहे, असे सचिव सचिन मुळे यांनी सांगितले. एडीसीए मैदानावर मुळे यांनी रियाज बागवान यांचे स्वागत केले. यावेळी विभागीय सचिव प्रदीप देशमुख, राजू काणे, कर्मवीर लव्हेरा, संजीव बालय्या यांची प्रमुख उपस्थिती होती. या दौऱ्यात बागवान यांनी नांदेड, तसेच अहमदनगर येथील मैदानांचीही पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘समृद्धी’ तक्रारींचा तिढा सुटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जमीन मोजणीच्या तक्रारींमुळे अडखळलेली समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाची गाडी सुसाट धावण्याची शक्यता असून, प्रशासनाला बहुतांश तक्रारींचा निपटारा करण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील १४ गावातील मोजणी अहवाल दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याबाबत सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत जिल्ह्यातील सातशेवर शेतकऱ्यांची नाराजी दूर करत संमती मिळवली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते, मात्र गेल्या महिन्याभरपासून केवळ दोन रजिस्ट्रींवर महामार्गाची गाडी अडखळली होती. शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत असलेल्या अनेक तक्रारींचा निपटारा करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते.

आता येत्या आठवड्याभरात मोजणी अहवाल दुरुस्त करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य असून सप्टेंबरनंतर समृद्धीच्या खरेदी प्रक्रियेला आणखी गती येणार आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल म्हणाले की, ‘जिल्ह्यात समृद्धी महामार्गाबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे अंतिम मोजणी अहवाल तसेच लिगल सर्च रिपोर्ट आदींचे काम सुरू आहे. यामध्ये मुर्शिदकुली, शेंद्राबन, बनगाव, कोलठाण, पोखरी, बेंदेवाडी, कोनेगाव, करंजगाव, शेवगा, बकापूर, शरणापूर, दौलताबाद, जागेवाडा तसेच माळीवाडा या गावात मोजणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणांमध्ये काही शेतकऱ्यांमध्ये जमिनीचे वाद, तर काही शेतकऱ्यांमध्ये जमीनीचे क्षेत्र चुकीचे दाखवणे, बागायत जमीनीचे जिरायत नोंद आदी तक्रारी होत्या. त्यामुळे जमीनीची प्रतवारी निश्चित करण्याचे काम देखील करण्यात येत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच सप्टेंबर महिन्यात खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.’

दोन रजिस्ट्री
सोमवारी बेंदेवाडी येथील दोन शेतकऱ्यांनी समृद्धीसाठी जमीन दिली. यामध्ये कडूबाई विजय शिंदे (०.५३ हेक्टर) आणि विजय भिकाजी शिंदे (०.४८ हेक्टर) या पती पत्नीने जवळपास एक हेक्टर जमिनीची विक्री केली. त्यांना या विक्रीचे ८४ लाख रुपये मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मंडळ अधिकारी बागडेंविरुद्ध तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नक्षत्रवाडीतील सिलिंग जमिनीचा विकास करारनामा करून भावाच्या नावे, तर तीसगाव शिवारातील मयताची जमीन स्वतःच्या मुलाच्या नावे करून घेतल्याच्या तक्रारी कांचनवाडीचे मंडळ अधिकारी आर. पी. बागडे यांच्याविरोधात विभागीय आयुक्‍तांकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांकडून प्रकरणनिहाय चौकशी अहवाल मागवला आहे.

बागडे यांनी कांचनवाडी, शरणापूर, गेवराई या ठिकाणी तलाठी म्हणून काम केलेले आहे. याठिकाणी कार्यरत असताना त्यांनी जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार केले आहेत. राजकीय वरदहस्तांमुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशिररित्या हस्तांतर व्यवहार होत असून या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

बागडेंविरोधात नक्षत्रवाडीतील गट क्रमांक ८६ मधील सिलिंग जमिनीचा विकास करारनामा करून ही जमीन स्वतःच्या भावाच्या नावे केली. नक्षत्रवाडीतील गट क्रमांक ३४ मधील वाढीव १२ गुंठे क्षेत्र विक्री करणे, तीसगाव येथील गट नंबर १४० मधील मयत तुकाराम प्रधान यांच्या वारस फेरफार करून स्वतःच्या मुलाच्या नावे २० आर जमीन करून घेतली. मौजे करोडी येथील जमीन पंडित मल्हारी काळे यांना मिळालेली आदिवासी जमिनीची बेकायदेशीररित्या आदलाबदल पत्र केले, अशा प्रकरणात शासनाची परवानगी आवश्यक असते. यासह इतर गटांमधील तक्रारी सचिन पळणीटकर यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. या तक्रारीची शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सोन्याचे दर दोनशे रुपयांनी उतरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधि, औरंगाबाद
मंगळवारी घरोघरी महालक्ष्म्यांचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी. सोन्याचे दर २०० रुपयांनी उतरले असून, सोमवारी प्रतितोळे ३० हजार २७० रुपयांनी विकले अशी माहिती सोने-चांदी व्यापारी नम्रता पुणेकर यांनी दिली.

पुणेकर म्हणाल्या, ‘गेल्या आठवड्यात ३१ हजारापर्यंत सोने होते. क्रूड ऑइलच्या क‌िमतीत अस्थिरता आणि नंतर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने दर उतरले आहे. हे दर २०० ते ३०० एवढ्यानेच उतरले असले तरी खरेदीदारांसाठी दिलासा आहे. सोने खरेदीवर सध्या फक्त तीन टक्के जीएसटी आहे. चांदीलाही जीएसटी लागू आहे. सोमवारी किलोमागे चांदीचा दर जीएसटीसहित ४१ हजार रुपये होता. यंदा चार दिवसांत गणपती आणि गौरी उत्सवात सोन्याचे मुकूट, सोन्याचे मोदक, चांदीचे मोदक, अकरा पिरॅमिडस, चांदीच्या ‌जास्वदांच्या फुलांचे हार आदींना चांगला उठाव होता. अनेक जणांनी गणेशोत्सव आणि गौरी आगमनानिमित्त सोन्या-चांदीच्या वस्तूंची खरेदी केली. मागील वर्षीपेक्षा यंदा अॅडव्हान्स बुकिंग आणि सोने खरेदी चांगली होती. उद्या परवा आणि गौरी विसर्जनादरम्यान ही सोने खरेदी वाढेल,’ असेही पुणेकर म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी, लोकप्रतिनिधींचा फुटबॉल सामना

$
0
0

अधिकारी, लोकप्रतिनिधींचा फुटबॉल सामना
क्रीडा कार्यालयाचे मिशन फुटबॉल
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे मिशन फुटबॉल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात शहराचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, खेळाडू, क्रीडा संघटकांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.
विभागीय क्रीडा संकुलात मिशन फुटबॉल हा उपक्रम राबवण्यात आला. यात महापौर भगवान घडामोडे, आमदार विक्रम काळे, पोलिस उपायुक्त दीपाली घाटे-घाटगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, पोलिस उपअधीक्षक अशोक आमले, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण, कृष्णा पाटील डोणगावकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. उदय डोंगरे, दिनेश वंजारे, रणजित पवार, अझर पठाण, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, शिक्षणाधिकारी गजानन सुसर, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, आदिती निलंगेकर, डॉ. सुनील देशमुख, डॉ. विजय व्यवहारे, डॉ. प्रफुल्ल जटाळे, डॉ. सुमित झाडे, डॉ. शिवाजी पोले, विजय देव, शामकुमार सोनवणे, चरणजित संघा, जगदीपसिंग संघा, कुमार भारत सोनवणे, भाऊसाहेब मोरे, सतीश मोरे, ऋषिकेश पटकुले, डॉ. दयानंद कांबळे आदींनी सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी गोकुळ तांदळे, गुरूदीपसिंग संधू, चंद्रशेखर घुगे, संजय मुंडे, कृष्णा केंद्रे, तनुजा गाढवे, सदानंद सवळे, भागवत मोरे, विलास चंदने, मोहंमद रियाजोद्दीन, अरुण पवार, राहुल तांदळे, मिलिंद काटमोरे, डॉ. बदरोद्दीन सिद्दिकी, अझहर बाबर, मोहंमद एजाज, आशिष कान्हेड, शामसुंदर भालेराव, राजू कणिसे, उमाकांत शिराळे, डी. आर. खैरनार, गणेश बेटुदे, सचिन बोर्डे, संतोष अवचार, दिनेश जायभाये, डॉ. डोईफोडे आदींनी पुढाकार घेतला.
या उपक्रमात सहभागी होताना महापौर भगवान घडामोडे म्हणाले, ‘फुटबॉल हा कमी पैशांत खेळला जाऊ शकतो. कमी जागेतही सराव करणे शक्य होते. कोणत्याही ठिकाणी कमीतकमी खेळाडूंतही फुटबॉल खेळता येते.’ आमदार विक्रम काळे म्हणाले, ‘खेळामुळे सांघिक भावना वाढते आणि विद्यार्थी जीवनात ही आवश्यक बाब आहे.’ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर म्हणाल्या, ‘शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.’ पोलिस उपायुक्त दीपाली घाटे-घाटगे म्हणाल्या, ‘देशाचा आदर्श नागरिक हा विद्यार्थ्यांमधूनच घडतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायामाची गरज आहे आणि त्यासाठी फुटबॉलसारखे मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे.’
मोईन उल उलुम, झिया उल उलुम, ज्ञानदीप विद्यामंदिर, वंडर गार्टन स्कूल, शिशुविकास मंदिर, गुरूतेग बहादूर हायस्कूल, पोदार स्कूल, शंकरसिंग नाइक हायस्कूल, माँटेसरी बालक मंदिर, नागसेन विद्यालय व क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी या उपक्रमात सहभाग घेतला. ऊर्मिला मोराळे यांनी स्वागत केले. अमृत बिऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. गोकुळ तांदळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ घाटीत गुप्तधनाची अफवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घाटीमध्ये चार हंडे गुप्त धन सापडल्याची अफवा सोमवारी दुपारी व्हॉटस् अॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याने काही मिनिटांत रुग्णालय परिसरात बघ्यांची एकच गर्दी उसळली. शेवटी गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देत शहानिशा केली. त्यानंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले.

घाटी ‌‌हॉस्पिटलमध्ये एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकही नेमले आहेत. रविवारी या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी खोदकाम करताना पाइप लाइन फुटली होती. यामुळे घाटी परिसरातील काही घरांना पाणी पुरवठा झाला नाही. परिणामी नागरिकांनी या खोदकामाच्या ठिकाणी धाव घेतली. यापैकी कोणीतरी खोडसाळपणे या ठिकाणी खोदकामात चार हंडे गुप्त धन भेटल्याची पोस्ट व्हॉटस अॅपवर व्हायरल केली. या पोस्टमुळे सोमवारी गुन्हेशाखेच्या पथकाने या ठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच येथील सुरक्षारक्षकांची देखील चौकशी केली, मात्र असे कोणतेही खोदकाम झाले नसून गुप्तधन सापडल्याची अफवाच असल्याचे‌ निष्पन्न झाले.

पोस्ट करणे महागात
दरम्यान, व्हॉटस् अॅप ग्रुपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी बिडकीन येथील सुदाम कागदे याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना नुकतीच घडली होती. बिडकीन येथील काही गावकऱ्यानी ‘बिडकीन मामा’ नावाने व्हॉटस अॅप ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपवर पोस्ट केल्यावरून हा प्रकार घडला होता. त्यानंतर सोमवारी ‘घाटी’तील अफवा व्हायरल झाल्याचा प्रकार घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीची वेणी कापली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहानूरमिया दर्गा परिसरात कुटुंबीयासोबत झोपलेल्या सात वर्षांच्या मुलीची वेणी कापल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. बंद घरात ही घटना घडल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

समश कॉलनीमध्ये सय्यद अल्ताफ अली यांची दोन मजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शेख युनूस हे मिस्त्री काम करणारे मजूर पत्नी व दोन मुली (वय ७ आणि १२) तसेच तीन मुलांसह राहतात. रविवारी रात्री शेख कुटुंब घराच्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये झोपलेले होते. रात्री अकरा वाजता त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला होता. पहाटे पाच वाजता शेख यांच्या पत्नीला जाग आली. त्यावेळी त्यांनी सात वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला असता तिचे केस कापलेले आढळले. या प्रकाराने शेख कुटुंब हादरून गेले. ही माहिती कळताच काही वेळात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पीएसआय कल्याण शेळके, जमादार संजयसिंह डोभाळ व कर्मचारी अमोल निकम यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.

कीडा केला जप्त?
दरम्यान, या घटनेने मुलीची आई हादरून गेली असून त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या घरासमोरच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा असून या कॅमेऱ्याचे फुटेज तपासणार असल्याची माहिती पीएसआय कल्याण शेळके यांनी दिली. हा प्रकार घडल्यानंतर नागरिकांना घराच्या बाहेर एक कीडा आढळून आला. हा कीडा पकडून देत या किड्यानेच मुलीचे केस कापल्याचा दावा नागरिकांनी केल्याने पोलिसांनी तो कीडा जप्त केल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरणतर्फे वारंवार विशेष मोहिमा राबविल्यानंतरही वीज बिलाची पुरेशी वसुली होत नाही. थकबाकी वाढल्याने, वसुली न झाल्याने महावितरणने औरंगाबाद प​िरमंडळातील तिन्ही अधीक्षक अभियंत्यांसह सहा कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. वसुलीचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण न केल्यास निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे या ‌अभियंत्यांना दिलेल्या पत्रात सूचित केले आहे.

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद शहर व ग्रामिण आणि जालना शहराचा सामावेश आहे. मार्च २०१७च्या तुलनेत जूनमध्ये वीज बिलाची वसुली कमी झाली आहे. यामुळे तोटा वाढलेला आहे. गेल्या तीन महिन्यांचा आढावा घेतल्यास १०० कोटी रुपये वसुली अपेक्षित होती, मात्र केवळ ६० कोटी रुपयांची वसुली झाल्याची माहिती समोर आली आहे. वसुली घटल्याने थकबा‌कीही वाढली आहे.

औरंगाबाद शहर विभागात मार्च ते जून २०१७या काळात २४ कोटींची थकबाकी वाढली आहे. औरंगाबाद ग्रामीण विभाग-एकमध्ये १९ कोटी ५१ लाख, तर औरंगाबाद ग्रामीण-दोनमध्ये १५ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. जालना शहरात १२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत थकबाकी वाढल्याने मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी तीन अधीक्षक अभियंते आणि तीन कार्यकारी अभियंते यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या १५ दिवसात वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे अन्यथा निलंबनाला सामोरे जावे लागेल, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.

रिडिंग एजन्सीवर गुन्हा दाखल
हर्सूल भागातील तीन वीज ग्राहकांना शून्य वीज बिल देणाऱ्या रिडिंग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज ग्राहकांसह महावितरणाची फसवणूक केल्याप्रकरणी महावितरण कार्यालयाने व्हिजन इन्फोटेक एजन्सीच्या विवेक कुलकर्णी, अमित धाकरस, कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत पाठक यांच्यासह शेख तौफिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानाचा गणपतीः राक्षसभुवन येथील श्री विज्ञान गणेश

$
0
0

बीड जिल्ह्यातील गणेशाची अनेक स्थान प्रसिद्ध आहेत. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन हे ऐतिहासिक गाव धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. येथील विज्ञान गणेश मंदिराला पौराणिक परंपरा आहे. गोदावरी काठावरील या मंदिराचा गणेश कोषात उल्लेख आहे. साक्षात अनुसयासूत दत्तात्रयांनी या गणेशाची आराधना व स्थापना केली, त्यांना गणपत्य सिद्धांताचा उपदेश येथेच मिळाला. या ठिकाणी अत्री ऋषि आणि अनुसयामाता यांचा आश्रम होता. दत्तात्रयांना वडील व गुरू अत्री ऋषि यांच्याकडून मुंज झाल्यानंतर विधी विधानपूर्वक अत्रीकुळाचे कुलदैवत श्री गणेश यांची एकाक्षर महामंत्राची दीक्षा मिळाली. त्यांनी श्री गणेश सिद्धांताप्रमाणे सांगोपांग अनुष्ठान करण्यासाठी गोदावरी दक्षिण तीरावर योगाश्रम स्थापन केला. या आश्रमात साक्षात्कार होईपर्यंत तपश्चर्या केली. त्या एकाक्षर गणेश मंत्राची महासिद्धी म्हणून विज्ञान गणेश प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. येथे दत्तात्रयांनी गणेश उपासना करून स्वानंद समाधीसुखाचा अनुभव घेतला. गुरू संप्रदायानुसार येथे त्यांनी श्री विज्ञान गणेशाची स्थापना केली आणि उपासना करून वास्तव्य केले. साक्षात दत्तात्रयांनी सेवा केल्यामुळे या गणेशाचे महत्त्व वेगळे आहे. शनी महाराज आणि त्यांचे गुरू बृहस्पतीचे मंदिर याच ठिकाणी आहे. गावाच्या एका कडेला गोदावरी नदीच्या काठावर हे मंदिर दुर्लक्षित राहिलेले आहे. अहल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. या गणेशाच्या क्षेत्रास सिद्धाश्रम क्षेत्र असेही म्हणणात. मात्र सध्या हे एवढे पौराणिक महत्त्व असेलेले गणेशस्थान दुर्लक्षित आहे.
-अतुल कुलकर्णी, बीड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात इतिहास विभागाच्या अमोल काकडे या विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहातील खोली क्रमांक ७६मध्ये अमोल रघुनाथराव काकडे (वय २३) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी मित्रांनी खोलीबाहेरून आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने बेगमपुरा पोलिस ठाण्याला कळवण्यात आले. पोलिस कर्मचारी आणि विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी दार तोडले. यावेळी अमोलने वायरने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. विशेष म्हणजे अमोलच्या कानात मोबाइलचे हेडफोन चालू होते. व्हिडिओ कॉलिंग करून त्याने आत्महत्या केल्याची विद्यापीठात चर्चा आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यावर्षी एम.ए. (इतिहास) उत्तीर्ण झालेला अमोल हा काकडे कंडारी (ता. घनसावंगी) येथील रहिवासी होता. नुकतेच एम.ए. (मराठी) प्रवेश प्रक्रिया त्याने पूर्ण केली होती. घाटी हॉस्पिटल पोस्टमार्टेम करून मृतदेह कुटुंबीयांकडे देण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास बेगमपुरा पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत असून, बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद साखर कारखाना; २१ जागांसाठी ६३ अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
तालुक्यात सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेला पण एकदाही गळीत हंगाम न झालेल्या शरद सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारांनी गर्दी केली आहे. अर्ज छाननीनंतर २१ जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात आहेत, आठ जणांचे अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली.
तालुक्यातील विहामांडवा येथे माजी आमदार चंद्रकांत घोडके यांनी हा कारखाना स्थापन केला आहे. ते कारख्यान्याचे संस्थापक चेअरमन आहे. या कारखान्याची २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. यापूर्वी इतर नेत्यांचे दुर्लक्ष राहिल्याने घोडके यांचेच वर्चस्व राहिले. यावेळी मात्र आमदार संदीपान भुमरे यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाचा राजीनामा देवून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल, माजी जिल्हा परिषद सभापती विनोद तांबे, माजी आमदार संजय वाघचौरे व भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांनीही या निवडणुकीत रस दाखवला आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ७१ अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी झालेल्या छाननीमध्ये पांडुरंग काळे, ज्ञानेश्वर खैरे, बाबासाहेब बडे (दोन अर्ज), ज्ञानेश्वर टेकाले, अनिल घोडके, मुकेश भटाने, गंगाधर तांबे असे आठ उमेदवारी अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, सहाय्यक निबंधक श्रीराम सोन्ने, नायब तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, आनंद बोबडे यांनी दिली.

येथेही भुमरे विरोधाची शक्यता

आमदार संदीपान भुमरे यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाचा राजीनामा देवून शरद साखर कारखान्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे अनिल पटेल, विनोद तांबे, भाजपचे तुषार शिसोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाघचौरे व विद्यमान चेअरमन चंद्रकांत घोडके हे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images