Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जुगार अड्ड्यावर छापा; शिऊरमध्ये खळबळ‍

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी रात्री आठच्या सुमारास तालुक्यातील शिऊर येथे सरपंच नितीन चुडीवाल यांच्या घरासमोरील शंकरस्वामी मंदिराजवळच्या मोकळ्या जागेत छापा मारून जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पकडले. या कारवाईत रोख १२ हजार १८० रुपये, १४ हजार ५०० रुपये किंमतीचे सहा मोबाइल व जुगाराचे साहित्य, असा २६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपींमध्ये शिऊर येथील तंटामुक्त समितीचा उपाध्यक्ष व उपसरपंच सय्यद जाकीर सय्यद सलीम, पक्षाचा कार्यकर्ता सुनील अशोक देशमुख, पुंडलिक बाजीराव जाधव, प्रा. शेखर सोन्याबापू देशमुख, माजी उपसरपंच नाना माणिकराव साळुंके, व्यापारी रणजित प्रभाकर श्रीवास्तव, माणिक शंकरलाल कायस्थ, दत्तात्रय परसराम सूर्यवंशी व राजू चंद्रकांत सदावर्ते यांचा समावेश आहे. हा छापा पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल रतन वारे, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमूख, किरण गोरे व सागर पाटील यांनी मारला. रतन वारे यांच्या फिर्यादीवरून शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बड्यांना वगळले ?

जुगार अड्ड्यावर छापा पडल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच वृत्तपत्राचा प्रतिनिधी व शिक्षकांसह शिऊर येथील काही प्रतिष्ठित लोक असल्याचे माहिती सोशल मीडियावर पसरली होती. शिवाय या कारवाईतून बड्यांना वगळल्याची तालुक्यात चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलनीतील गणेशोत्सवः साई दयावान गणेश मंडळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टीव्ही सेंटर चौकातील साई दयावान गणेश मंडळ विविध उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. विविध उपक्रम राबवण्यासाठी मंडळाच्या गोविंदा पथकाकडून बक्षिस जिंकून निधी उभारला जातो.
साई दयावान गणेश मंडळाची स्थापना २० वर्षांपूर्वी बाल गणेश मंडळ म्हणून सुरुवात करण्यात आली. या बाल गणेश मंडळाची स्थापना विवेक भांगे, नितेश साळवे, भाऊसाहेब पाले, श्रीकांत सूर्यवंशी यांनी स्‍थापना केली, तेव्हापासून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. मंडळाने सात वर्षांपूर्वी साई दयावान दहीहंडी पथकाची स्‍थापना केली. या पथकाच्या नावे मंडळाचे नामकरण साई दयावान गणेश मंडळ, असे करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील भांगे यांनी दिली.
गणेशोत्सवादरम्यान, सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावर्षी पाणी वाचवा, बेटी बचाव, संदेश देण्यात आला आहे. या उपक्रमात सुदर्शन मोरे, शुभम दाभाडे, आकाश थोरात, ओकांर भाले, केदार पठाडे, महेश काळे, सोनू खरात, विकास भाले, चेतन घोडके, अमोल जायभाये, अल्केश जाधव, शेखर काथार आदींचा सहभाग आहे.

गोविंदा पथक

मंडळाच्या गोविंदा पथकात ३०० ते ४०० गोविंदांचा समावेश आहे. हे पथक शहरात विविध ठिकाणी पाच ते सहा थर लावून दहीहंडी फोडते. त्यातून मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा उपयोग विविध उपक्रमासाठी खर्च करण्यात येतो. दानशूर मंडळीही मदत करतात. काही रक्कम या भागातील गणेश मंदिराला दिली जातो, असे मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील भांगे यांनी सांगितले.

ढोल पथकाचा सराव

मंडळाच्या ढोल पथकात सुमारे ६० जण असून त्यापैकी २५ महिला आहेत. गणेशोत्सवाच्या दहा दिवसआधीपासून पथकाचा सराव सुरू होतो. हे पथक विसर्जन मिरवणुकीत सादरीकरण करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर पावसात घुमला ढोल ताशांचा गजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
युवा सेनेतर्फे मंगळवारी दुपारी औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावर ढोल पथक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धक संघानी भर पावसात उत्कृष्टपणे कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत २५ संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
युवा सेनेचे कॉलेज कक्ष प्रमुख ऋषिकेश जैस्वाल यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. सहाय्याक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक अनिल आडे, समीर राजूरकर व अनिल पौलकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये आऊसाहेब गणेश मंडळ, साईच्छा गणेश प्रतिष्ठाण विष्णुनगर, जागृत हनुमान ढोलपथक, मोरया ढोलपथक म्हाडा कॉलनी, मराठी बाणा प्रति‌ष्ठाण एन ७, विघ्नहर्ता ढोलपथक दशमेशनगर, धर्मसंग्राम गणेश मंडळ जुना मोंढा, गुलमोहर कॉलनी गणेश मंडळ पडेगाव, विघ्नहर्ता ढोलपथक औरंगपुरा, ब्रह्मगर्जना ढोलपथक राजाबाजार, महाकाल ढोलपथक नागेश्वरवाडी, पावण गणेश मंडळ दिवाणदेवडी, अनिरुद्ध क्रीडा मंडळ गवळीपुरा छावणी, आमची संस्कृती ढोलपथक प्रतापनगर, आपलच पथक सुभाष पेठ छावणी, श्री नादब्रह्म गणेश मंडळ फकीरवाडी, शिवशक्ती गणेश मंडळ श्रीनिकेतन कॉलनी, पंचमुखी गणेश मंडळ जाधवमंडी, पतित पावन संघटना दर्जीबाजार, साईकृपा क्रीडा मंडळ छावणी, श्री पावन गणेश मंडळ नारळीबाग, अविघ्न प्रतिष्ठाण, कैलासनगर या पथकांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी दर्शन सेठिया, संदीप लिंगायत, शुभम अग्रवाल, कुणाल तायल, रोहित फुलवाणी, संजय राखुंडे, निखील चव्हाण, धीरज पवार, ऋषिकेश भवर, गणेश शर्मा, गणेश गावंडे, रुचित जैन आदींनी परिश्रम घेतले.

आकर्षक वेशभूषा

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांनी ड्रेस कोडवर भर दिला होता. विविध रंगाचे आकर्षक कुर्ते, फेटे घालून ते सहभागी झाली होती. स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाल्याने मैदानावर वाहने उभी करण्यास देखील जागा उरली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता सर्वेक्षणात आठ कोटींचा घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील वनगाव येथे साठवण तलावासाठी भूसंपादन करताना झाडे दाखवून आठ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. भूसंपदनासाठी वन विभाग, लघुपाटबंधारे आणि कृषी विभागातर्फे मालमत्ता सर्वेक्षण करण्यात आले. या बद्दल संशय आल्याने तत्कालीन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार संतोष गोरड यांनी फेरसर्वेक्षण केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
या प्रकरणी माहिती अशी की, वनगाव शिवारात साठवण तलावासाठी १४८ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादन प्रक्रियेत जमिनीवरील झाडे, फळबागा, इमारती यांची मोजणी आणि मूल्यांकन केले जाते. मूल्यांकनाची जबाबदारी सोयगाव कृषी विभाग, वनविभाग आणि लघु पाटबंधारे विभागाला देण्यात आली होती. त्यानुसार अस्तित्वात नसलेली झाडे, फळझाडे, विहिरी, बागा, इमारतीची संख्या मोठ्या प्रमाणात दाखविण्यात आली. तसेच त्याचे मूल्य १६ कोटी रुपये असल्याचे दाखवले होते. हा अहवाल तत्कालीन उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्याकडे देण्यात आला. अहवालाचा अभ्यास केल्यानंतर गोरड यांना शंका आली. त्यांनी फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले व ३ ऑगस्ट रोजी स्थळ पाहणी केली. त्यांच्यासोबत सोयगावचे नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, पेशकार संतोष परदेशी, लिपिक विजय येवले यांनी मूल्यांकन केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
खोटे मूल्यांकन दाखवून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे संतोष गोरड यांनी सांगितले.

असा झाला घोळ

पूर्वीच्या सर्वेक्षणात दाखवलेल्या मालमत्तेपैकी बऱ्याच मालमत्ता अस्तित्वातच नसल्याचे गोरड यांच्या सर्वेक्षणातून समोर आले. मोठे वृक्ष दाखविले तेथे रोपटे होते. अनेक ठिकाणी विहीर नसतांना विहीर नोंद केली होती. शंभर झाडे असताना ४००ची नोंद केली. घर नसलेल्या जमिनीवर घर दाखवले. त्यामुळे मूल्यांकनाचा अाकडा १६ कोटी रुपये झाला होता. फेरसर्वेक्षणात ८ कोटींची मालमत्ता आढळून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड तालुक्यात ९६ गावांत एक गणपती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यात ९६ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. शहरासह तालुक्यात २३९ गणेशोत्सव मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.
गावात अनेक मंडळांनी गणपती बसविले, तर वाद होऊन शांतता धोक्यात येऊ शकते यामुळे पोलिस व प्रशासनातर्फे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवली जाते. पोलिसांनी गावांमध्ये बैठका घेऊन आवाहन केले होते. त्यानुसार, ९६ गावात ‘एक गाव एक गणपती’ बसविण्यात आले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५२, अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४१, वडोद बाजार ठाण्याच्या हद्दीत तीन गावांत ‘एक गाव एक गणपती’ बसविण्यात आला. अन्वी, आसडी, पालोद येथे दोन, रेलगाव, रहिमाबाद, घाटनांद्रा येथे तीन, भराडी येथे चार, अंधारीत नऊ, भवन येथे दहा, अजिंठ्यात १४, शिवना येथे चार, उंडणगाव येथे पाच, अंभई येथे नऊ, हट्टी येथे तीन व इतर वाड्या वस्त्यांवर १३, सिल्लोड शहरात ३७ गणपती बसविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझा बाप्पाः गणेशोत्सवाचे चैतन्य सुखावणारे !

$
0
0

हैदराबाद शहरावर मराठी संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. माझे बालपण हैदराबाद शहरात गेल्यामुळे गणेशोत्सव माझ्यासाठी आत्मियतेचा उत्सव आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्यामुळे अगदी वर्षभर आम्ही गणेशोत्सवाची वाट पाहत असायचो. या उत्सवात पहिल्यांदा भरतनाट्यम सादरीकरणाची संधी मिळाली होती. हैदराबाद शहरातील आकर्षक विसर्जन मिरवणूक पाहणेसुद्धा संस्मरणीय अनुभव होता. पुढील शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर गणेशोत्सवाचे विराट रूप अनुभवले. लेझीम नृत्य व विविधरंगी नृत्याचा आविष्कार पाहिला. कोकण भागातील गणेशोत्सव आगळावेगळा असतो. माझे सासर वैभववाडी आहे. दरवर्षी कोकणातील गणेशोत्सव पाहता आला. हरतालिका ते गणेशोत्सव उत्साहाचा काळ असतो. यानिमित्त उकडीचे मोदक बनवायला शिकले. मागील दोन वर्षांपासून कोकणात जाणे शक्य झाले नसल्यामुळे औरंगाबाद येथील घरी गणेशाची स्थापना केली. प्रत्येक शहरातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये वैविध्यपूर्ण आहेत. या उत्सवात पावित्र्य आणि शिस्त यांचा मिलाफ असतो. काही ठिकाणी उत्सवाचे सवंग स्वरूप चिंताजनक वाटते. आरती झाल्यानंतर फिल्मी गाण्यांवर होणारे नृत्य पाहून आश्चर्य वाटते. भडक गाणी वाजवून गणेशोत्सवाचे पावित्र्य आपण गमावतो की काय अशी भीती वाटते. या उत्सवाचे चैतन्य व पावित्र्य कायम रहावे एवढीच मनोमन प्रार्थना.
- व्ही. सौम्याश्री
संचालक, देवमुद्रा नृत्य संस्था
(शब्दांकनः तुषार बोडखे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण-शहागड रस्‍त्याची चाळण; वाहनधारक त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला जोडणारा व नेहमी वर्दळ असलेल्या पैठण-शहागड रस्‍त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. या रस्त्यांवरुन प्रवास करताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.
पैठण ते शहागड या सुमारे ३९ किलोमिटर रस्‍त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वीच बुजवण्यात आले होते. मात्र आता पावसाळा संपण्यापूर्वीच रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. विषेश म्हणजे सत्ताधारी पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे तसेच आमदार संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे. ३९ किलोमिटर प्रवास करण्यासाठी किमान दोन ते अडीच तास लागतात.
या प्रकरणी बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या वतिने तसेच इतर संघटनांच्या वतिने सार्वजनिक बांधकाम विभागासोबत अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला मात्र त्याचा उपयोग झाला नाही, असे बुलंद छावाचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींमध्ये कुळांचा उद्धार करण्याची क्षमता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्त्रीभ्रूण हत्या हे मोठे आव्हान आहे. काही लोक मुलींना ओझे समजतात मात्र, मुलीच वृद्धापकाळाचा आधार आहे. माहेर आणि सासर अशा दोन्ही कुळांचा उद्धार करण्याची क्षमता मुलींमध्ये आहे,’ असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
श्री गणेश महासंघातर्फे आयोजित छावणी महोत्सवात शनिवारी सत्यपाल महाराज चिंचोळकर यांनी कीर्तन केले. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष रखमाजी जाधव, उपाध्यक्ष अॅड. ओमप्रकाश साबू, कार्याध्यक्ष अॅड. सुरेश वर्मा, कोषाध्यक्ष विजयन स्वामी, सचिव मनोज बडजाते, मार्गदर्शक अशोक सायन्ना यांची उपस्थिती होती.
सुमारे तीन तास रंगलेल्या कीर्तनाला छावणीसह शहरातील नागरिकांनीही हजेरी लावली. सत्यपाल महाराजांनी दिमडीच्या तालावर विनोदी शैलीत सामाजिक विषयांवर भाष्य केले. त्यांनी कीर्तनातून व्यसनमुक्ती, दारूमुक्तीवर जागृती केली. ते म्हणाले, स्त्रीयांनी जीवनात शिक्षणाला महत्त्व द्यावे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाई, भीमाई, राजमाता जिजाऊ यांनी स्त्रियांनी कसे जगावे हे शिकविले. त्यांच्या विचारांची महिलांना आज गरज आहे. त्यांचा आदर्श घेऊन आजच्या स्त्रियांनी कलयुगात वावरावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशहितासाठी जगा, व्यसन करू नका, प्रेम करा पण शिक्षणावर, देशावर, असा उपदेश त्यांनी तरुणांना केला. त्यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजीवर कठोर शब्दात टीका केली. यज्ञ, होम-हवनात तूप जाळण्यापेक्षा गरीब गरजूंना जेवण द्या. आज समाज फक्त आणि फक्त अंधश्रद्धेमुळे मागास राहत आहे. जाती-धर्मावर वाद घडविले जात आहेत. देवधर्माची व्याख्याच बदलली आहे. देवधर्म म्हणजे पवित्र, स्वच्छ, निर्व्यसनी व्हा. त्याचबरोबर मनात दुसऱ्यांविषयीचा आदर बाळगणे हाच धर्म आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

विटी-दांडू स्पर्धेला प्रतिसाद

गणेशोत्सवानिमित्त पहिल्यांदाच आयोजित विटी दांडू स्पर्धेत परिसरातील ८ संघ सहभागी झाले. रखमाजी जाधव यांनी विटी उडवून स्पर्धेची सुरुवात केली. ही स्पर्धा तब्बल ४ तास चालली. विस्मृतीत चाललेल्या खेळाला जीवदान देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलनीतील गणेशोत्सवः राजयोध्दा गणपती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवशंकर काँलनी परिसरातील राजयोद्धा गणेश मंडळाने आकर्षक देखावे सादर करण्याची पंरपरा कायम ठेवत यंदा गणरायाला बाहुबली रुपात सादर केले आहे. ‘बाहुबली टू’ हा देखावा पाहण्यासाठी आणि रथावर स्वार झालेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
शिवशंकर कॉलनीतील तरुणांनी एकत्र येत सहा वर्षांपूर्वी राजयोद्धा गणेश मंडळाची स्थापना केली. शुभम कावडे हे मंडळाचे अध्यक्ष असून निखील धनगर, सागर जाधव, रवी भिसे, आकाश जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते मंडळाचे कार्य करतात. आकर्षक देखावे सादर करण्याची पंरपरा हे मंडळ जोपासत आले आहे. यापूर्वी मंडळाने लाल किल्ला, साई दरबार, बाजीराव मस्तानी आदी विविध देखावे सादर केले आहेत. यंदा रथावर स्वार झालेले बाहुबली रुपातील गणेशाची मूर्ती व देखावा सादर केला आहे. महेशमती महालातून युद्धावर निघालेला बाहुबली हा प्रसंग या देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी अजय दहिफळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळा उभारणीची बैठक लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय वादात अडकला आहे. विद्यापीठात पुतळा उभारणीबाबत बुधवारी होणारी अधिसभा सदस्यांची बैठक पुढे ढकलली असून, बैठक पुढील आठवड्यात होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मेमोरियल सेंटर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळा उभारण्याचा निर्णय अधिसभा व व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. याबाबत अधिसभा सदस्य आमदार अतुल सावे व आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बुधवारी होणारी बैठक विद्यापीठ प्रशासनाने पुढे ढकलली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे कुलदैवत आहेत. यापूर्वी जातीय दंगलीने होरपळलेल्या औरंगाबाद शहरातील विद्यापीठात पुतळ्यांचे राजकारण करून मराठा आणि बौद्ध समाजात तेढ निर्माण करण्याचा ‘आरएसएस’ व भाजपचा सुनियोजित प्रयत्न आहे,’ असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांनी केला आहे. कुलगुरू चोपडे ‘आरएसएस’चे हस्तक असून त्यांनी तात्काळ कुलगुरुपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भुईगळ यांनी केली. कुलगुरू चोपडे यांची भेट घेऊन भुईगळ यांनी चर्चा केली.

सध्या विद्यापीठाची शिक्षण, अध्यापन आणि संशोधन या सर्वच आघाड्यांवर पिछेहाट सुरू आहे. प्रशासनावरील कुलगुरूंची पकड ढिसाळ आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या विद्यापीठात त्यांनी गुरू मानलेल्या गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांचे पुतळे उभारून विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण करा, अशी मागणी फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेने केली. याबाबत परिषदेचे अॅड. रमेश खंडागळे, भीमराव सोनवणे, कबिरानंद राजहंस, माणिक पगडे, मधुकर घोरपडे यांनी कुलगुरूंना निवेदन दिले. आंबेडकरदी संघटनांनी पुतळा उभारणीला विरोध केल्यामुळे विद्यापीठ प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

बैठक पुढील आठवड्यात
पुतळा उभारणीबाबत बुधवारी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, असे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी कळवले आहे. हा निर्णय तांत्रिक कारणामुळे घेतल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. आमदार विनायक मेटे, अतुल सावे आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या उपस्थितीत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवणी परीक्षेचा निकाल २७ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०१७मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून १३ हजार १७२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तीन हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण २७.०७ इतके आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालाचे प्रमाण ४.९२ टक्क्यांनी घसरले आहे. याच परीक्षेचा राज्याचा निकाल २४.४४ टक्के लागला आहे.
दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १३ हजार २६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिला व तीन हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षा दिलेल्यांमध्ये मुलांची संख्या नऊ हजार ८७५, तर मुलींची संख्या तीन हजार २९७ होती. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६.१७ टक्क्यांनी जास्त आहे.
ही परीक्षा एकूण ४९ केंद्रांवर घेण्यात आली. त्यासाठी २२ परीरक्षक, ४९ केंद्र संचालक, ५३२ पर्यवेक्षक, ११ मुख्य नियामक, २०९ नियामक, १०५० परीक्षक कार्यरत होते. परीक्षेसाठी दोन भरारी पथकांची स्थापना करण्यात आली होती. या पथकांना १८ विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करताना आढळून आले. गुणांची पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर ३० ऑगस्ट ते आठ सप्टेंबरदरम्यान विभागीय मंडळाकडे शुल्कासह अर्ज करावेत. अर्जासोबत ऑनलाइन निकालाची प्रत जोडणे अनिवार्य असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

राज्यात ३० हजार ४८८ विद्यार्थी उत्तीर्ण
दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागातून एक लाख २५ हजार ६२० विद्यार्थींनी नोंदणी केली होती. यापैकी एक लाख २४ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ३० हजार ४८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाच्या उत्तीर्णतेची टक्केवारी २४.४४ इतकी आहे. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीच्या वर्गात नियमित प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंद्राबादजवळ अपघात; दोन ठार, सात जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
तालुक्यातील नंद्राबाद जवळ दोन मोटारसायकल व एक काळी-पिवळी यांच्या अपघातात दोन जण ठार व सात जखमी झाले. दोन्ही मृत मोटारसायकलवरील असून चार गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त काळी-पिवळी (एम एच २० बी टी ७१२४) ही औरंगाबादहून खुलताबादकडे येत होती. यावेळी औरंगाबादकडून खुलताबादकडे जाणारी व खुलताबादकडून औरंगाबादकडे मोटारसायकली जात होत्या. या तीन वाहनांची तलत डी. एड्. कॉलेजसमोर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास धडक झाली. या अपघातात दोन्ही मोटारसायकलवरील व्यक्ती ठार झाले आहेत. त्यापैकी एकाची ओळख पटली. रामदास लक्ष्मण काळे (वय २६, रा. पळसवाडी, ता. खुलताबाद), असे त्याचे नाव आहे. दुसऱ्या मृताची ओळख पटलेली नाही. त्याच्या खिशात मनमाड-नाशिक रेल्वे प्रवासाचे तिकीट सापडेल असून ओळखीचा पुरावा नव्हता.
काळी-पिवळीमधील जखमी राजू तुपे, शेख शोएब, शेख फरजाना शेख मजीद, मोहम्मदी बेगम, अब्दुल हमीद, मुजाहिद इसाक कुरेशी, अजीज खान (सर्व रा. खुलताबाद) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत व एकनाथ पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर दोन्ही मोटारसायकलींचा चक्काचूर झाला आहे. काळी-पिवळी अपघातानंतर उलटली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवसाला पावणारा बिनछताचा गणपती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगपुरा परिसरात बसैये तालीमजवळ गणपतीचे छोटेसे उघडे मंदिर आहे. हा बिनछताचा गणपती नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरावर छत टाकल्यास ते उडून जाते, असा समज आहे.
बाराभाई ताजीयाकडून औरंगपुरा पोलिस चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यवर कोठावाला बिल्डिंगजवळून एक गल्ली जाते. या गल्लीत प्रसिद्ध बसैये तालीम आहे. या तालमीच्या ओट्यावर गणपती व हनुमानाचे उघडे मंदिर आहे. येथील जेष्ठ नागरिकांना देखील मंदिराविषयी जास्त माहिती नाही. परंतु, या मूर्ती शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीच्या असाव्यात, असा अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला. ही मूर्ती सुमारे दीड फूट उंच व डाव्या सोंडेची आहे. या परिसरातील भाविक मंदिरात दर्शन करून कामावर जातात. येथे चतुर्थीला दर्शनासाठी होते. या मूर्तीवर छत बांधल्यास ते उडून जाते, यापूर्वी अनेकांनी छत बांधण्याचा प्रयत्न केला, पण अयशस्वी झाला, त्यामुळे ही मूर्ती उघड्यावर असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

या मंदिराचा इति‌हास शंभर वर्षांचा आहे. मंदिरावर छत टिकत नाही अशी आख्यायिका असल्याने तसा प्रयत्न आता कोणी करत नाही. मात्र, नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्धी आहे.
-बिपीन बचाटे, स्थानिक नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशासाठी पाचपट शुल्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण भागातील महाविद्यालये एम.एस्सी प्रवेश प्रक्रियेत पाचपट शुल्क वसूल करीत असल्याचा प्रकार घडत आहे. स्पॉट अॅडमिशनच्या दिवशी विद्यार्थी व पालकांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना हा अनुभव सांगितला, तर बदनापूर येथील महाविद्यालयात मनमानी शुल्क आकारून लूट सुरू असल्याचे निवेदन विद्यार्थ्यांनी कुलगुरू चोपडे यांना दिले.

बदनापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एम.एस्सी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ८० हजार ते एक लाख रुपये शुल्क आकारले जात आहे. कॉलेजने मागितलेले शुल्क दिले तरच प्रवेश मिळेल, असे सांगून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. नियमबाह्य शुल्क वसूल करताना कॉलेज प्रशासन मनमानी करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्याची बॅग व मोबाइल जमा करून प्रवेश प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने केली जात असल्याचे विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कॉलेजच्या प्राचार्य एम. डी. पाथ्रीकर व उपप्राचार्य देवेश पाथ्रीकर यांच्या आदेशावरून शुल्क घेत असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे, पण प्राचार्यांना भेटण्यास मज्जाव केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. या निवेदनावर गणेश पवार, रवी शिंदे, अमोल फोके, योगेश मेटे, मनोज ढोले, नीलेश कळंबे, नंदकिशोर चौथमल, अमोल चव्हाण, अमर पाटील आदी विद्यार्थ्यांची स्वाक्षरी आहे.

शिक्षण विभाग उदासीन
बदनापूर, पैठण, सिल्लोड येथील कॉलेजात भरमसाठ शुल्क आकारल्याचे प्रकार घडले आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या नियमानुसार एम.एस्सी (फिजिक्स) विषयासाठी १६ हजार ८०० रुपये शुल्क आहे, मात्र बदनापूरच्या कॉलेजात ५० हजार रुपये शुल्क मागितले जात आहे. एका विद्यार्थ्यांने सोमवारी विशेष प्रभारी अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे यांची भेट घेऊन तक्रार सांगितली; तसेच उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात तक्रार करणार असल्याचे संबंधित विद्यार्थ्याने सांगितले. पाचपट शुल्क घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची लूट सुरू असूनही शिक्षण विभाग उदासीन आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने
विद्यापीठाच्या पत्रानुसार महाविद्यालयांनी ३० ऑगस्ट रोजी प्रवेश यादी जाहीर करून प्रवेश निश्चित करण्याचे नियोजन आहे, मात्र महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. या प्रकारामुळे बहुतेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मंगळवारी विद्यापीठात जोरदार निदर्शने केली. यावेळी शहर अध्यक्ष मयूर सोनवणे, शहर कार्याध्यक्ष अमोल दांडगे, अक्षय पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनवाढ नसल्याने शिक्षक नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्हा शिक्षक पुरस्कार दरवर्षी दिले जातात. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार दिले जातात. यंदा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना बक्षीसरुपात दिली जाणारी वेतनवाढ दिली जणार नाहीत, त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. परिणामी आतापर्यंत फक्त १९ शिक्षकांनीच प्रस्ताव सादर केले आहेत.

‘झेडपी’ प्रशासनाकडून दरवर्षी माध्यमिक, प्राथमिक विभागात कार्यरत शिक्षकांमधून उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. यासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले जातात. प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षक निवडला जातो. दिव्यांग, चित्रकला, क्रीडा शिक्षकांमधून जिल्ह्यातून एका शिक्षकाची निवड करण्यात येते. माध्यमिक, प्राथमिक व विशेष अशा तीन गटांत मिळून जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतून १९ प्रस्ताव आजवर ‘झेडपी’कडे प्राप्त झाले आहेत. सोयगाव तालुक्यातून अद्यापही एकही प्रस्ताव आलेला नाही. प्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद दोन, वैजापूर दोन, कन्नड तीन, खुलताबाद पाच सिल्लोड एक, फुलंब्री एक, गंगापूर दोन, तर माध्यमिकसाठी पैठण एक, गंगापूर तीन, वैजापूर एक, कन्नड दोन, खुलताबाद दोन, फुलंब्री एक आणि विशेष शिक्षक पुरस्कारासाठी पैठण तालुक्यातून फक्त एकच प्रस्ताव दाखल झाला आहे. प्रस्ताव दाखल करण्याची ३१ ऑगस्ट अंतिम मुदत आहे. तोपर्यंत आणखी प्रस्ताव येऊ शकतात. त्यानंतर मंजुरीसाठी हे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविले जातील, असे प्रभारी शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी सांगितले.

दरम्यान, उत्कृष्ट शिक्षकांना बक्षीसरुपात दिली जाणारी एक वेतनवाढ दिली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिक्षकांनी एवढ्या कमी संख्येने प्रस्ताव दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीला चिरडणारे टँकर अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या आठवड्यात सिडको एन पाचमध्ये लहान मुलीला चिरडणाऱ्या टँकरचा कंत्राटदार महापालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याचा नातेवाईक आहे. त्यामुळे हे अपघात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

महापालिकेत काही अधिकाऱ्यांची विविध कामांमध्ये भागिदारी असल्याचा आरोप सातत्याने केला जातो, पण त्याकडे पालिकेची यंत्रणा दुर्लक्ष करीत आली आहे. काही विशिष्ट कामांसाठी आपल्या कंत्राटदारांनाच पुढे करण्याचा प्रघात देखील पालिकेत असल्याची चर्चा आहे. विशिष्ट कंत्राटदारासाठी टेंडर प्रक्रिया करण्यात आल्याचे प्रकरण चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या टँकरच्या कंत्राटदाराचे प्रकरण आता उघड झाले आहे.

पाण्याच्या टँकरचे शहराच्या काही भागासाठीचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. त्या कंत्राटदाराने उपकंत्राटदार नियुक्त केल्याचे बोलले जात आहे. उपकंत्राटदारांपैकी एका कंत्राटदाराच्या टँकरने सिडकोत एका मुलीला चिरडले. हा उपकंत्राटदार पालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याचे पालिकेत आता उघडपणे बोलले जात आहे. त्या अधिकाऱ्याने आपल्या नातेवाईकाला कंत्राटासाठी पुढे केले, आता टँकरचा अपघात झाल्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी उच्चस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ महापौर-सभापती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापौर-सभापतींच्या पाठशिवणीचा खेळ मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी अनुभवला. एकमेकांना चेकमेट देण्यासाठी राजधानीत पोचलेले हे दोघेही एकाचवेळी मुख्यमंत्र्यांच्या दारी होते.

शासनाच्या शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून शहरात ३१ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय महापौर भगवान घडमोडे यांनी घेतला आहे. त्यांनी तयार केलेल्या व शासनाने मान्यता दिलेल्या रस्त्यांच्या यादीवर अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. स्थायी समितीच्या बैठकीत देखील नगरसेवकांनी रस्त्यांच्या यादीबद्दल रोष व्यक्त केला व पुन्हा यादी तयार करण्याची मागणी केली. त्यानुसार सभापती गजानन बारवाल यांनी रस्त्यांची यादी पुन्हा तयार करण्याबद्दल आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे जाहीर केले होते. रस्त्यांबद्दलचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन त्यांच्याशी विभागीय आपतकालीन केंद्राबद्दल चर्चा करण्यासाठी बारवाल मंगळवारी मुंबईत पोचले. त्यांच्यापाठोपाठ महापौरही मुंबईत पोचले. दोघे एकाच वेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. महापौर सोबत असल्यामुळे सभापतींना रस्त्यांबद्दलचे पत्र मुख्यमंत्र्यांना देता आले नाही. विभागीय आपतकालीन केंद्राबद्दल मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यासोबत या केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल जोडला व केंद्रासाठी शंभर कोटी रुपयांचे अनुदान देण्याची मागणी केली. या केंद्रासाठी करोडी येथे जागा घेण्यात आली आहे असेही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले, असे बारवाल यांनी सांगितले.

दोघेही आज परतणार
औरंगाबादेत नऊ व दहा सप्टेंबर रोजी अखिल भारतीय महापौर परिषद होणार आहे. या परिषदेच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी महापौर मुंबईत आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी महापौरांचे निमंत्रण स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर आता उद्या बुधवारी महापौर व सभापती औरंगाबादेत परतणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ घरगुती गॅस भरला रिक्षांमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरगुती गॅस रिक्षामध्ये भरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सिल्लेखाना व कोकणवाडी भागात सोमवारी पुरवठा विभागाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून इलेक्ट्रिकल मोटार, दोन रिक्षा, सिलिंडर, नोझल, रेग्युलेटर आदी एक लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हे शाखेचे पीएसआय नंदकुमार भंडारे यांना सिल्लेखाना व कोकणवाडी परिसरात विद्युत मोटारीचा वापर करून घरगुती गॅस अवैधरित्या रिक्षामध्ये भरून देत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पुरवठा अधिकारी संतोष अनर्थे व बबन आवले यांच्यासह दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला. यावेळी सिल्लेखाना येथील कुरेशी मशिदीच्या मागे महापालिकेच्या गाळ्यात संशयित आरोपी आफताब अल्ताफ कुरेशी (रा. सिल्लेखाना) हा रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरताना आढळला. पोलिसांनी कुरेशीला अटक करीत रिक्षासह ७० हजारांचा ऐवज जप्त केला. तसेच कोकणवाडी येथील काही मशिदीजवळ पत्र्याच्या शेडवर छापा टाकून आरोपी इमादखान उमरखान (रा. कोकणवाडी) याला रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरताना अटक करण्यात आली. आरोपी इमादखानच्या ताब्यातून रिक्षासह ८४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नंदकुमार भंडारे, जमादार फारूख देशमुख, संजय धुमाळ, ओमप्रकार बनकर, शिवाजी भोसले, विकास माताडे, संजय जाधव व ‌राहुल हिवाळे यांनी पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बिल्डर कासलीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा

$
0
0

बिल्डर कासलीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील प्रख्यात बिल्डर संजय कासलीवाल यांच्याविरुद्ध पाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा येथील महिलेकडून घर बुकिंगचे पाच लाख घेत ही रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्याने हा गुन्हा दाखल झाला.

प्रतिभा रत्नदीप खोब्रागडे (रा. बुलढाणा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, खोब्रागडे बुलढाणा येथे वास्तव्यास असून त्यांचे पती अबुधाबी येथे पेट्रोलियम इंजिनियर म्हणून काम करतात. सप्टेंबर २०१४मध्ये खोब्रागडे यांनी वर्तमानपत्रात कासलीवाल निवारा, जालना रोड विमानतळासमोर या रहिवाशी प्रकल्पाच्या बुकिंगची जाहिरात वाचली. २५ सप्टेंबर २०१४ रोजी प्रतिभा या आई-वडिलांसोबत औरंगाबादला आल्या. त्यांना कासलीवाल निवाराची साइट पसंत पडली. त्यांना बुकिंगसाठी आकाशवाणी चौकातील अपना बाजार येथील कासलीवाल कंस्ट्रक्शनच्या कार्यालयात नेण्यात आले. या ठिकाणी थ्री बीच के रो बंगलोजची किंमत ७१ लाख सांगण्यात आली. यासाठी पाच हजार रुपये भरावे लागतील. हा प्रकल्प सहा महिन्यांत पूर्ण होईल असे सांगण्यात आले. प्रकल्पाचे मालक संजय कासलीवाल यांची त्यांनी क‌ेबिनमध्ये भेट घेतली. यावेळी कासलीवाल यांनी त्यांना घर रोख घेणार की कर्ज काढून, अशी विचारणा केली. कर्ज काढून घर घेणार असल्याचे सांगितल्यावर कासलीवाल यांनी बुकिंगचे पाच लाख भरा, कर्ज मंजूर करून बाकीचे पैसे‌ दिल्यानंतर घराची रजिस्ट्री चालू बांधकामामध्ये करून देतो. तसेच सहा महिन्यात घराचा ताबा देतो असे आश्वासन दिले. यावेळी खोब्रागडे यांनी ऑफिसमधील कर्मचारी बेडेकर यांच्याकडे पाच लाख रुपये जमा केले. त्याची पावती देखील कासलीवाल यांनी दिली होती, मात्र ना घर मिळाले ना बुकिंगचे पैसे, असे तक्रारीत म्हटले आहे.

पैसे देण्यास टाळाटाळ
घराच्या बुकिंगनंतर सहा महिने, वर्ष उलटले. तरीही रो बंगलोज पूर्ण झाले नाहीत. त्याचा ताबा मिळत नसल्याने खोब्रागडे पतीपत्नी यांनी बुकिंगचे पैसे परत घेण्यासाठी कासलीवाल यांच्याकडे चकरा मारल्या, मात्र दरवेळी त्यांना आश्वासन देत कासलीवाल यांनी टाळाटाळ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ कोटींची फसवणूक; बिल्डर मेहताला बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गृहप्रकल्प योजनेत जमीन मालकाची २७ कोटी १३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आर. के. कॉन्स्ट्रोचा बिल्डर समीर मेहता याला आर्थिक गुन्हेशाखेने सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या. मेहतावर सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिकलठाणा भागातील हिरापूर शिवारात विजय मदन अग्रवाल यांची पाच एकर जमीन आहे. मेहताने १५ फेब्रुवारी २०११ रोजी अग्रवाल यांच्याशी या जमिनीवर गृहप्रकल्प उभारण्यासाठी संपर्क साधला होता. यानंतर २५ फेब्रुवारी रोजी ह‌ी जमीन विकसित करण्यासंदर्भात सिद्धीविनायक इंटरप्रायजेसचे विजय अग्रवाल, कमलकिशोर तायल व गोपाळ अग्रवाल (रा. एन ३, सिडको) यांच्यात लेखी करारनामा झाला. या करारनाम्यामध्ये या पाच ‌एकर जमिनीवर मेहता याची आर. के. कॉन्स्ट्रो फ्लॅटचे बांधकाम करून देईल. त्या फ्लॅट विक्रीची जबाबदारीही आर. के. कॉन्स्ट्रोवर असेल. या फ्लॅट विक्रीतून जी रक्कम येईल ती सिद्धीविनायक व आर. के. कॉन्स्ट्रोच्या संयुक्त बँक खात्यात जमा होईल. या रक्कमेपैकी ४५ टक्के रक्कम सिद्धीविनायक एंटरप्रायजेसच्या नावे, तर ५५ टक्के आर. के. कॉन्स्ट्रोच्या खात्यात जमा होईल असे ठरले. फ्लॅटस विक्री तसेच इतर व्यवहार करताना सह्यांचे सर्व अधिकार मेहताला देण्यात आले होते, मात्र मेहताने ग्राहकांना कर्ज देणाऱ्या बँकाना स्वतःच्या अधिकारात बनावट पत्र दिले. उर्वरित कर्जाच्या रकमेचे चेक स्वतःच्या आर. के. कॉन्स्ट्रो चार डी पीएलसी व आर. के. कॉन्स्ट्रो प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या खात्याच्या नावावर देण्याचे लेखी कळवले होते. या कर्जाच्या रकमेचे ग्राहकांनी दिलेले चेक मेहताने स्वतःच्या दोन्ही खात्यावर परस्पर जमा करून घेत रक्कम स्वतः वापरली. तसेच ३० ऑक्टोबर २०१४ रोजी अग्रवाल यांच्यासोबत झालेला मुख्त्यारनामाही रद्द केला. या गृह प्रकल्पातील सर्व ४७२ फ्लॅटची अंदाजे दहा ते सोळा लाख रुपये अशा किमतीत विक्री केली. यामध्ये अग्रवाल यांची सुमारे २७ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

मध्यरात्री आला जाळ्यात
अग्रवाल यांनी सोमवारी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेत तक्रार दिली. यादव यांच्या आदेशाने सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल सातोदकर, पीएसआय सुभाष खंडागळे, जमादार विलास कुलकर्णी, प्रकाश काळे, गणेश शिंदे, दत्तू गायकवाड, सुनील फेपाळे आदींनी मेहताला मध्यरात्री अटक केली.

दोन वर्षांपासून ग्राहक त्रस्त
हिरापूर येथील प्रोजेक्टमध्ये सुमारे ३८८ ग्राहकांनी बुकिंग केली आहे, मात्र त्यांना फ्लॅटस ताबा मिळाला नसल्याने त्यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे दाद मागितली होती. या संदर्भात मेहतावर अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

करार रद्द केल्यानंतरही व्यवहार
या प्रकरणी आरोपी मेहताला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीने ज्या बनावट कागपत्रांच्या आधारे व्यवहार केला व सदनिकांची रजिस्ट्री केली, ती कागदपत्रे जप्त करणे बाकी आहे. तसेच आरोपी-फिर्यादीचा करार रद्द झाल्यानंतरही आरोपीने ग्राहकांशी व्यवहार कसा काय केला, याबरोबरच २७ कोटी १३ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी सखोल तपास करणे बाकी आहे. त्याचवेळी आरोपीने एवढ्या रकमेची विल्हेवाट कशी लावली किंवा आरोपीने या रकमेतून कुठे गुंतवणूक केली आहे का किंवा आरोपीने कुठे मालमत्ता खरेदी केली का याचाही तपास करावयाचा आहे. तसेच आरोपीने नेमक्या किती सदनिकांची विक्री केली व कितीजणांची फसवणूक केली, याचाही शोध घ्यावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील झरीना दुर्राणी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी आरोपीला बुधवारपर्यंत (३० ऑगस्ट) पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images