Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

स्पीकरच्या आवाजवरून मारहाण; एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
गणपती मंडळा समोर सुरू असलेल्या लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या भांडणात एका ५५ वर्षांच्या नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पैठण तालुक्यातील वाहेगाव येथे घडली. श्रीधर बाबुराव भुकिले असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

वाहेगाव येथील शेतवस्तीवर काही तरुणांनी गणेश मंडळाची स्थापना केली आहे. गणेश मंडळासमोर श्रीधर भुकिले यांचे घर अाहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास भुकिले यांची मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्यावरून वाद झाला. त्यावेळी कार्यकर्ते व भुकिले यांच्यात हाणामारी झाली. शेतवस्तीवरील शेतकऱ्यांनी व भुकिले यांच्या पत्नीने मध्यस्थी करून भांडण मिटवले.

दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी सकाळी श्रीधर भुकिले यांच्या पत्नीने त्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरानी तपासून त्यांना मृत घोषित केले, असे पोलिसांनी सांगितले.

पोस्टमार्टेमनंतर कार्यवाही ः पोलिस
श्रीधर भुकिले यांचा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यावर योग्य ती कार्यवाही करणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीएसटीएनच्या तांत्रिक दोषाचा फटका करदात्यांना

$
0
0

जीएसटीएनच्या तांत्रिक दोषाचा फटका करदात्यांना
शेकडो नागरिक मासिक विवरणपत्र भरणापासून वंचित
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जीएसटी वेबसाइटमधील तांत्रिक दोषांचा फटका करदात्यांना बसला आहे. वेबसाइट हँग, चलान दाखल करण्यात अडचणी यासह अन्य कारणांनी अनेक करदात्यांना जीएसटी संक्षिप्त मासिक विवरण थ्री-बी फॉर्मद्वारे भरता आले नाही. परिणामी, आता त्यांना प्रती दिन १०० रुपये दंड भरून हा भरणा करावा लागत आहे. जिल्ह्यातील सुमारे ३० टक्के करदात्यांना हा फटका बसल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.
एक जुलैपासून सर्वत्र जीएसटी लागू झाला आहे. येथील जीएसटी विभागाकडे एकूण ३६ हजार मूल्यवर्धित कायद्यांतर्गत नोंदीत करदाते आहेत. त्यापैकी बहुतेक करदात्यांनी जीएसटी करप्रणालीसाठी नोंदणी प्रक्रिया केली आहे. नवीन करप्रणाली असल्याने व्यावसायिकांना कायदा पालन सुलभ व्हावे, म्हणून जुलैपासून दोन महिन्याचे रिटर्नस स्वयंनिर्धारणेच्या आधारे दाखल करण्याची मुभा देण्यात आली. म्हणून जुलै व ऑगस्ट २०१७ चे मासिक विवरण जीएसटीआर- ३ बी या नमुन्यात दाखल करण्याचे निर्देश होते.
हे विवरण दाखल करण्याची सुविधा ५ ऑगस्टपासून ते २५ ऑगस्टपर्यंत जीएसटीएनवर देण्यात आली होती, परंतु जीएसटी वेबसाइटमधील तांत्रिक दोषांमुळे करदाते व सल्लागारांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले. बँकेच्या ई-पेमेंटच्या माध्यमातून कर भरणा केला असता हा कर जीएसटीएनच्या खात्यात जमा न होणे, त्यामुळे विवरण पत्र भरता आले नाही. बँकेतून पैसे वळते झाले परंतु, जीएसटीएन वेबसाइटवर वर ते चलान फेल म्हणून येणे, यासह अनेक तांत्रिक अडचणी आल्याचे करदात्यांनी सांगितले. परिणामी, निर्धारित वेळेत अनेक करदाते संक्षिप्त मासिक विवरण थ्री-बी फॉर्मद्वारे भरू शकले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नाव न छापण्याच्या अटीवर काही तांत्रिक अडचणी आल्याचे मान्य केले.
आर्थिक भुर्दंड -
तांत्रिक अडचणीमुळे अनेकांना संक्षिप्त मासिक विवरण थ्री-बी फॉर्मद्वारे भरता आले नाही. मात्र, असे असतानाही आता भरणा करण्यासाठी विलंब शुल्कच्या नावाखाली प्रती दिन १०० रुपये दंड आकारला जात आहे. त्यावर व्याजही आकारले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. विभागातील सुमारे ३० टक्के करदात्यांना तांत्रिक अडचणींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
जीएसटीची वेबसाइट हँग होणे यासह अन्य तांत्रिक कारणांमुळे भरणा करताना अडचणी आल्या. जीएसटीसाठी संबंधित विभागाची गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू असताना या तांत्रिक अडचणी कशा आल्या. त्यात करदाते, व्यापाऱ्यांची चूक काय आहे ? विलंब शुल्क, त्यावर व्याज वसूल करून व्यापारी, करदात्यांवर भुर्दंड का लावला जात आहे.
- अजय शहा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळ नोंदणीत समन्वयाअभावी घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पोलिस आयुक्तालयाकडे केवळ ७३७ गणेश मंडळानी अधिकृत नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी शहरात १०६८ गणेश मंडळांनी नोंदणी केली होती. उशिरा सुरू झालेली एक खिडकी योजना व समन्वयाचा अभाव यामुळे नोंदणी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
शहरात गणेशोत्सव सार्वजनिक प्रमाणावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांपासून पोलिस आयुक्तालयात गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली होती. पोलिस प्रशासन, मनपा, धर्मादाय आयुक्त व महावितरणचे अधिकारी एकाच ठिकाणी भेटत असल्याने परवानगीची प्रक्रिया सुलभ झाली होती. गेल्या वर्षी शहरातील १५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १०६८ गणेश मंडळानी नोंदणी केली होती. यंदाच्या वर्षी मात्र आयुक्तालयात बांधकाम सुरू असल्याने ‌एक खिडकी योजनेसाठी जागा उपलब्ध नव्हती. परिणामी ही योजना बारगळणार असल्याचे चिन्ह होते. मात्र, मनपाने जागा उपलब्ध करून दिल्याने उशिरा का होईना एक खिडकी योजना सुरू झाली होती. या योजनेमध्ये दौलताबाद, वाळूज व वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या समावेश नसल्याने तेथील मंडळानी त्या पोलिस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज केले होते. तसेच धर्मादाय आयुक्तालयाच्या वतीने देखील या वर्षीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. प्रशासनात समन्वय नसल्याने मंडळाचे कार्यकर्ते देखील संभ्रमावस्थेत पडले होते.

पोलिस करणार तपासणी

या वर्षी केवळ ७३७ मंडळानीच अधिकृत परवानगी घेत गणपती बसवल्याचे दिसून येत आहे. उर्वरित मंडळांनी परवानगी घेतली आहे, अथवा नाही याची तपासणी सबंधित पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्री वेशातील इसमास जमावाचा चोप

$
0
0

मुलांना पळवल्याच्या संशयावरून स्त्रीवेशात वाहन चालवणाऱ्या एकाला जमावाने पाठलाग करून शुक्रवारी चोप दिला. ही घटना तालुक्यातील डोणगाव येथे घडली. रमेश चांगदेव थोरे (रा. गोयगाव भऊर), असे त्याचे नाव आहे. त्याला वीरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
वीरगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांनी बाभूळगाव येथून स्त्री वेशातील एक व्यक्ती भरधाव वेगाने वाहन घेऊन बाबतरा येथे येत असल्याची माहिती पोलिस पाटील गायकवाड यांना दिली होती. हे वाहन बाबतारा येथे आल्यानंतर दोन मुलांना गाडीचा धक्का लागल्याने ते रस्त्याच्या बाजुला पडले व त्यांना किरकोळ जखम झाली. हे वाहन पोलिस पाटील पती नवनाथ गायकवाड यांनी डोणगाव येथे फोन करून तेथील तरुणांना ओम्नी वाहन अडवण्याचे सांगतिले. त्यानंतर जवळपास ५० मोटारसायकलवर शंभर तरुणांनी या वाहनाचा बाबतारा ते डोणगाव असा १५ किलोमीटरपर्यंत पाठगाल करून अडवून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.

तृतीयपंथी असल्याचा दावा
वाहन थांबताच रमेश थोरे हा बाहेर आला व टाळ्या वाजवू लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याने तृतीयपंथी असल्याचे सांगून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पण, जमावाने त्याचे काहीही ऐकले नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष घोडके व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटख्याचे दोन कारखाने उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिकलठाणा परिसरातील हिनानगर भागात आणि मुकुंदवाडी परिसरातील विनायकनगर भागात असलेल्या गुटख्याच्या कारखान्यांवर छापे टाकून अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) विभागाने शुक्रवारी तब्बल १७ लाख ६६ हजार ९०० रुपयांचा माल जप्त केला. अलीकडच्या काळात अन्न औषध प्रशासन विभागाने औरंगाबाद शहराच्या परिसरात केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

हिनानगर व विनायकनगर भागात गुटखा उत्पादन करणारे दोन कारखाने सुरू आहेत, अशी माहिती ‘एफडीए’ला मिळाली. त्याआधारे सापळा रचून या कारखान्यांवर छापे टाकण्यात आले. हिनानगर येथे अझहर खान अकबर खान यांच्या मालकीच्या घराची झडती अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने घेतली. घराच्या पाठीमागच्या खोलीत गुटख्याचा साठा आढळून आला. या खोलीमध्ये हिरा ब्रँड गुटख्याची ७०० पाकिटे सापडली. त्यांची किंमत दोन लाख दहा हजार रुपये आहे. त्याचबरोबर ८५ किलो खुला गुटखा सापडला, त्याची किंमत एक लाख ७० हजार रुपये आहे. पाच लाख रुपये किंमतीचे पॅकिंग मशीन, ६० हजार रुपये किंमतीचे पॅकिंग रोल व पाऊच, पाच हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण नऊ लाख ४५ हजार रुपयांचा माल सापडला. हा सर्व माल जप्त करण्यात आला.

मुकुंदवाडी परिसरात विनायकनगर भागात राज फूड प्रोडक्ट्स या कंपनीची तपासणीदेखील ‘एफडीए’च्या पथकाने केली. या ठिकाणी देखील गुटख्याचा साठा आढळून आला. आरएमडी गुटख्याची १४ पाकिटे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत १७ हजार ५०० रुपये आहे. गोवा ब्रँड गुटख्याची ३८४ पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्याची किंमत एक लाख १५ हजार २०० रुपये आहे. हिरा गुटख्याची पाच लाख २३ हजार २०० रुपये किंमतीची एक हजार ७४४ पाकिटे जप्त करण्यात आली. एम ब्रँड सुगंधी तंबाखुची ६०० पाकिटे जप्त केली. त्यांची किंमत तीन हजार रुपये आहे. दीड लाख रुपये किंमतीचे पॅकिंग मशीन, १३ हजार रुपये किंमतीचे पॅकिंग पाऊच असा एकूण आठ लाख २१ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. दोन्ही कारखान्यांना सील करण्यात आल्याचे एफडीएच्या सूत्रांनी सांगितले.

ही कारवाई औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त सी. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अशोक पारधी, रमेश जाधव, अभिमन्यू केरुरे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दिकी, निखिल कुलकर्णी, संजय चट्टे, राम मुंडे, प्रशांत अजिंठेकर, उमेश कावळे, दयानंद पाटील, वर्षा रोडे, संतोष कनकावड यांनी केली. दोषींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असे ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखाव्यातून मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणरायाची विविध रुपे पाहण्याबरोबरच भक्तांना आकर्षण असते ते मंडळांनी सादर केलेल्या देखाव्याचे. उस्मानपुरा भागातील रहिवासी रोहन देशपांडे यांनीही घरगुती बाप्पासमोर साकारलेला देखावा चिंतन करण्यास भाग पाडत आहे. शेतीच्या दृष्टचक्राची मांडणी आणि चीनी वस्तूचे देशातंर्गत बाजारात होणारे आक्रमण, स्वदेशी वस्तूचा जागर या विषयावर त्याने मित्रांच्या सहकार्याने देखावा सादर केला आहे.
एमबीएसची विद्यार्थी असलेल्या रोहन देशपांडे यांना गणपतीसमोर आकर्षक सजावट करण्याचा छंद लहानपणापासून आहे. पण, ते चार वर्षांपासून केवळ सजावट न करता देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडून संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी यावर्षी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि चीनी बनावटीच्या वस्तूंमुळे देशातील उद्योगांची अवस्था आणि अपेक्षा हे विषय मांडले आहेत. ही संकल्पना प्रत्यक्ष उतरविण्यासाठी आकांक्षा छकडी, श्रीकर दातार आणि नितीन गायकवाड या मित्रांनी मदत केली. देखावा सादर करण्यासाठी लागणारी माहिती, वस्तूंची जमवाजमव केल्यानंतर प्रत्यक्ष देखावा सादर करण्यासाठी त्यांना १२ दिवस मेहनत घ्यावी लागली.

असा आहे देखावा

पारावर बसलेले बाप्पा व त्यांच्या दोन्ही बाजुने हायवे जात आहे. एका बाजुच्या हायवेवर चीनी वस्तूचे आक्रमण, त्याचे देशी उद्योगावर होणार परिणाम हा गंभीर विषय हाताळत स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरला आहे. दुसऱ्या बाजुला शेती मालास भाव न मिळाल्याने रस्त्यावर फेकलेला माल, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या हा ज्लवंत प्रश्न मांडला आहे. या तरुणांनी त्यावर उपाययोजनाही सूचवल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मालमत्ता करवसुलीचे खासगीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता करवसुलीचे खासगीकरण करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे गजानन बारवाल यांनी कंबर कसली आहे. ‘या संदर्भात प्राथमिक चर्चा सुरू केली असून लवकरच निर्णय घेतला जाईल,’ असे त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सभापतिपदाच्या कार्यकाळात महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे आपण लक्ष देणार आहोत, असे सांगताना बारवाल म्हणाले, ‘मालमत्ता कर वसुलीचे प्रमाण वाढले तर महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारेल. मालमत्ता कराच्या वसुलीचे खासगीकरण केले तरच हे शक्य होणार आहे, कारण महापालिकेच्या यंत्रणेकडून प्रभावीपणे मालमत्ता कराची वसुली होणे शक्य नाही असे लक्षात आले आहे. मालमत्तांचे सर्वेक्षण करून कर आकारणी करणे, कर आकारणी बरोबरच कराची वसुली करणे ही दोन्हीही कामे खासगीकरणातून करून घेण्याचा विचार आहे. जी संस्था हे काम करण्यासाठी पुढाकार घेईल त्या संस्थेकडून कमिशन पद्धतीने काम करून घ्यावे अशी कल्पना आहे. असे काम करून घेतले तर महापालिकेला खर्च करावा लागणार नाही. कमिशनच्या पैशातूनच ती संस्था काम करेल. येत्या काही महिन्यात या संदर्भात निर्णय होऊ शकतो,’ असे संकेत बारवाल यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आयुक्त शोधणार महापौर परिषदेला प्रायोजक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सप्टेंबरच्या नऊ व दहा तारखेला होणाऱ्या महापौर परिषेदचा खर्च भागविण्यासाठी स्वतः आयुक्त प्रायोजक शोधणार असून परिषदेच्या तयारीसाठी पालिकेने विविध समित्यांची स्थापना केली आहे.

महापौर भगवान घडमोडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात महापौर परिषदेच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली. बैठकीला स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासह काही नगरसेवक, गटनेते, अधिकारी उपस्थित होते. बैठकीसंदर्भात बारवाल यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘महापौर परिषद यशस्वी व्हावी यासाठी आर्थिक नियोजन, प्रसिद्धी, सत्कार, स्वागत आदी समित्यांची स्थापना केली. प्रत्येक अधिकाऱ्यांना कामाचे वाटप केले. परिषदेसाठी देशभरातील महापौर येतील त्यामुळे त्यांची निवासाची व्यवस्था चोख व्हावी याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. नऊ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर दिवसभर विविध कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी सर्व महापौरांना शहरातील व जिल्ह्यातील पर्यटनस्थळे दाखवण्यात येतील. त्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे.

महापौर परिषदेसाठी मोठा खर्च येणार आहे. या परिषदेसाठी शासनाच्या लोकल सेल्फ गव्हरमेंटच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवण्याबद्दल बैठकीत चर्चा झाली. परिषदेसाठी प्रायोजक मिळवू असे आयुक्तांनी सांगितले. सर्वांची मान्यता असेल तर प्रायोजक शोधण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे ते म्हणाले. सर्वानुमते प्रायोजक मिळवण्याची परवानगी आयुक्तांना देण्यात आली,’ असा उल्लेखही त्यांनी केला.

शिवसेना पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती
महापौर परिषदेच्या तयारीसाठी आयोजिक केलेल्या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. उमहापौर स्मिता घोगरे, सभागृहनेता गजानन मनगटे, गटनेते मकरंद कुलकर्णी हे तिघेही गैरहजर होते. त्यामुळे भाजपचीच ही परिषद आहे का, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. सभापती गजानन बारवाल यांनी मात्र सर्वांना बैठकीचे निमंत्रण दिले होते असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हत्तींच्या स्थलांतरासंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल करा

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहातील हत्तीण व तिच्या पिलाच्या स्थलांतरासंबंधी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. शंतनू केमकर व न्या. नितीन सांबरे यांनी केंद्र व राज्य शासनास दिले. ही नोटीस स्वीकारण्यात आली असून, २५ सप्टेंबरपूर्वी सादर न केल्यास स्वत: हजर राहावे लागेल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

सेंट्रल झू अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आदेशाचे पालन न करता महापालिका प्रशासनाने हत्तीण आणि तिच्या पिलास बेकायदेशीररित्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात ठेवले. हत्तीणीला साखळदंडाने बांधले हेही कायद्याला धरून नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये यासंदर्भात २५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीचे रुपांतर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिकेत केले. या जनहित याचिकेत महापालिकेचे वकील संभाजी टोपे यांनी सविस्तर शपथपत्र दाखल करून, विस्तृत माहिती खंडपीठासमोर सादर केली. याचिकेत राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान विशाखापट्टनम, आंध्रप्रदेश येथील उच्चपदस्थ वनअधिकारी व औरंगाबाद महानगरपालिका आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेत अॅमिकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून सचिन देशमुख यांना नेमले आहे.

प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सात नोव्हेंबर २००९ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार प्राणिसंग्रहालयात हत्ती ठेवणे बंदी घातली आहे. एका ठिकाणाहून दुसरीकडे करण्यात येणाऱ्या स्थलांतराचा खर्चही प्राधिकरणाने उचलावा असे स्पष्ट निर्देश आहेत. प्राणिसंग्रहालयातील हत्ती समुदाय पुनर्वसन केंद्र, जंगल, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, वाघांचे अभयारण्य आदी ठिकाणी तात्काळ स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

पालिकेच्या दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात संबंधित स्थलांतरासाठी प्रत्येक वर्षी विविध कार्यालयांच्या स्तरावर २००८पासून विविध अधिकाऱ्यांशी संपर्क केला जात आहे. प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक अधिकारी यांना लेखी स्वरूपात विनंती केल्याचे टोपे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकेस सात जानेवारी २०१४ रोजीच्या पत्राद्वारे दोन हत्तीणींना विशाखापट्टणम येथे स्तलांतरित करण्याचे सूचित केले होते. केंद्रातर्फे संजीव देशपांडे, राज्य सरकारतर्फे अमरजितसिंह गिरासे हे काम पाहत आहेत. या याचिकेची सुनावणी २५ सप्टेंबरला होणार आहे.

पालिकेची जबाबदारी फक्त विनंतीपुरती
महापालिकेची जबाबदारी हत्तींची निगा राखणे व स्थलांतरासाठी विनंती करणे एवढीच आहे. ह्त्तीण जेव्हा हिटवर येते तेव्हा तिला सांभाळणे मोठ्या जोखीमेचे होऊन जाते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत तीनवेळा हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. नियमात नसतानाही औरंगाबाद महापालिकेने त्यांना चुकीच्या पद्धतीने साखळदंडाने बांधून ठेवले. हत्तीणींना कायम बांधलेले नसून, त्यांना दिवसातून आठ तास व्यायाम व फिरण्यासाठी सोडले जाते. ह्त्तीणींना उन्हाला व पावसाळा या ऋतूमध्ये स्थलांतरीत केले जात नाही. ऑक्टोंबर- नोव्हेंबरमध्ये स्थलांतर उपयुक्त ठरते असेही टोपे यांनी निदर्शनास आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गर्दी उसळूनही विद्यापीठ भकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशात सुसूत्रता आणताना प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेऊनही क्षमतेपेक्षा फक्त निम्मे प्रवेशही झाले नाहीत. विद्यापीठ कॅम्पसमधील ५२ अभ्यासक्रमांची एकूण प्रवेश क्षमतेच्या २६३१ पैकी फक्त १२७० प्रवेश झाले नसून भाषा विषयांकडे तरी विद्यार्थ्यांनी सपशेल पाठ फिरवली आहे. त्यामुळे स्पॉट अॅडमिशनला गर्दी उसळूनही विद्यापीठातील विभाग रिकामे आहेत.

पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत विद्यापीठाने प्रथमच सीईटी घेऊन नवीन पायंडा पाडला. तीन टप्प्यात प्रवेश प्रक्रिया घेऊनही विद्यापीठातील विभागात पुरेसे प्रवेश झाले नाहीत. प्रवेश क्षमतेनुसार पूर्ण प्रवेश झालेल्या विभागांची संख्या अत्यंत कमी आहे. सामाजिकशास्त्रात इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, स्त्री अभ्यास या विषयांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. भाषा विभागांकडे यावर्षीही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. हिंदी विषयाला अवघे १७ प्रवेश झाले. विज्ञान विभागात गणित, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, झूलॉजी, फिजीक्स, पर्यावरणशास्त्र या विषयांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या विभागातील प्रवेश पूर्ण झाले आहेत. या तुलनेत बॉटनी, अप्लाइड मॅथ्स, नॅनो टेक्नॉलॉजी या विभागात कमी प्रवेश झाले आहेत. विधी विभागाचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.

मागील वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७०० होती. पीजी सीईटीच्या गोंधळामुळे प्रवेश कमी झाल्याची शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे, पण कुलगुरूंनी हा आरोप फेटाळला आहे. ‘गुणवंत विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी सीईटी प्रक्रिया राबवली. गेल्या २५ वर्षांच्या काळात सर्वाधिक प्रवेश यंदा झाले. संशोधनाची पातळी उंचावल्यास इतर विद्यापीठाचे विद्यार्थीसुद्धा इथे प्रवेश घेतील,’ असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे म्हणाले.

सीईटी आणि स्पॉट अॅडमिशन प्रक्रियेत विद्यार्थी आणि पालकांचे प्रचंड हाल झाले. रसायनशास्त्र विभागात दगडफेक करण्यापर्यंत विद्यार्थ्यांचा रोष वाढला होता. प्रचंड गैरसोयीची प्रक्रिया राबवूनही निम्मे प्रवेश झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासन कात्रीत अडकले आहे.

कॉलेजांवर कारवाई
विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार काही महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया राबवत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीत बदनापूर, सिल्लोड, पैठण आणि औरंगाबाद येथील कॉलेजांचा समावेश आहे. रसायनशास्त्र, विधी आणि समाजकार्य या विषयासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पाचपट शुल्क घेतल्याच्या लेखी तक्रारी आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने समिती नियुक्त केली आहे. या महिन्यात समिती ४५ महाविद्यालयांना भेट देऊन चौकशी करणार आहे अशी माहिती विशेष प्रभारी अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे यांनी दिली.

पीजी सीईटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाली. विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना चुकीची माहिती मिळत असल्यामुळे प्रवेश होत नसत. सीईटीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिसादात वाढ झाली. - डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सामाजिक सलोख्यासाठी शिवरायांचा पुतळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महापुरूष एका जातीचे नसतात. मानवी कल्याणासाठी सर्व भेदरेषा भेदून काम करतात म्हणून ते महापुरूष ठरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यास सामाजिक सलोखा निर्माण होईल. पुतळा उभारण्याला विरोध हा बाबासाहेबांविषयी असलेले कमालीचे अज्ञान आहे. हितसंबंध धोक्यात आल्यामुळे कुलगुरूंवर दबाव-दडपण आणण्याची दुष्प्रवृत्ती दोन्ही समाजांनी नाकारली पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी शुक्रवारी केले. ते विद्यापीठातील पुतळा वादाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला आहे. या निर्णयाला काही आंबेडकरवादी संघटनांनी विरोध केला आहे. तर काही संघटनांनी समर्थन केले आहे. सामाजिक तेढ टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिकांनी सामंजस्याची भूमिका मांडली आहे.

यावेळी डॉ. कांबळे म्हणाले, ‘विद्यापीठात शिवरायांचा पुतळा उभा करण्याला विरोध बाबासाहेबांविषयी असलेले कमालीचे अज्ञान आहे. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व भारतभर दृढ झाले. सत्याग्रहात महाड सत्याग्रह की जय या घोषणेबरोबर शिवाजी महाराज की जय, जीजामाता की जय अशा घोषणा होत्या. महाड परिषदनंतर दुसऱ्या दिवशी आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसह रायगडावर शिवरायांच्या समाधीच्या दर्शनासाठी गेले होते. १९३३मध्ये मुंबईत त्यांनी शिवरायांच्या कर्तृत्वावर जाहीर भाषण दिले होते. शिवरायांनी सर्व जातीधर्मातील पराक्रमी मावळ्यांना घेऊन स्थापन केलेल्या राज्याचा त्यांनी गौरव केला होता. शिवरायांनी १०३ पूर्वास्पृश्य महार गडकरी व किल्लेदार नेमले होते. विद्यापीठात पुतळा उभा केल्यास सामाजिक सलोखा निर्माण होईल. सामाजिक सौहार्द बिघडू नयेत अशा प्रयत्नांची गरज आहे,’ असे डॉ. कांबळे म्हणाले.

या पत्रकार परिषदेला दौलतराव मोरे, भीमसेन कांबळे, अमोल दांडगे, जयेश मोरे, सुदाम मगर, हेमंत मोरे यांची उपस्थिती होती.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती-धर्मांचे प्रेरणास्थान आहेत. विद्यापीठात तातडीने शिवरायांचा पुतळा उभारावा अशी मागणी जय शिवराय जय भीमराय फाउंडेशनने केली आहे. याबाबत शिष्टमंडळाने उपायुक्त वर्षा ठाकूर यांना निवेदन दिले. यावेळी फाउंडेशनचे धनंजय देशमुख, आकाश नरवडे, राहुल पाटील, मयूर विधाते, संदेश पवार, अमित मोरे, पवन खडके, वैभव देशमुख, विकास खरात आदी उपस्थित होते.

राज्यपालांना आमदारांचे निवेदन
विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तात्काळ उभारण्यात यावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे केली आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारीत राजेशाहीत लोकशाही व्यवस्था निर्माम करणारा हा राजा जगभरातील प्रतिभावंतांचा प्रेरणास्रोत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध योग्य नाही, असे चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे. चार-दोन लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तात्काळ निर्णय घ्यावा, असे चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयावरून तरुणाचा खून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकोणीस वर्षांच्या तरुणावर शस्त्राने वार करीत निर्घृण खून केल्याचा प्रकार चिंचोलीतांडा येथे गुरुवारी रात्री घडला. आरोपीला काही तासांत अटक करण्यात चिकलठाणा पोलिसांना यश आले आहे.

चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीत तोळानाईक तांडा, चिंचोली तांडा आहे. येथील रवींद्र कल्याण जाधव (वय १९) हा गुरुवारी रात्री भाऊ मनोजसोबत टी.व्ही. पाहत होता. यावेळी रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित आरोपी रामेश्वर शिवलाल पवार (रा. तोळानाईक तांडा) हा त्याच्या घरी आला. ‘काम आहे, बाहेर ये,’ म्हणत त्याने रवींद्रला घराबाहेर बोलावून अंधारात नेले. या ठिकाणी त्याने रवींद्रवर शस्त्राने पोटावर वार केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रवींद्रचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर रामेश्वरने मृतदेह घरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या ज्वारीच्या शेतात फेकून पलायन केले. हा प्रकार रवींद्रचा चुलत भाऊ नवनाथ याने पाहिला होता. काही वेळातच रवींद्रच्या कुटुंबियांना समजला. त्यांनी चिकलठाणा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पसार आरोपी रामेश्वरविरुद्ध पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी रामेश्वरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह‌, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर, उपअधीक्षक अशोक आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सत्यजित ताईतवाले, पीएसआय सुधाकर चव्हाण, संदीप सोळंके, तुपे, राठोड, जमादार राठोड, पोलिस नाईक गोरे आदींनी केली.

पत्नीची छेड काढल्यावरून...
याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी तपासाची चक्रे फिरवली. पसार आरोपी रामेश्वरच्या शोधासाठी तीन पथके स्थापन केली. आरोपीचा मोबाइल बंद असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचण येत होती. खबऱ्यांना यासाठी कामाला लावण्यात आले. दरम्यान पसार आरोपी रामेश्वर बाळापूर शिवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून रामेश्वरला अटक करण्यात आली. रवींद्रने रामेश्वरच्या पत्नीची छेड काढल्याच्या संशयावरून त्याने हा खून केल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सूडबुद्धीने कार, दुचाकी पेटवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जुना बाजार परिसरात गुरुवारी मध्यरात्री सूड उगवण्यासाठी कार व दुचाकी पेटविणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत पडेगाव परिसरात बेड्या ठोकल्या.

पोस्ट ऑफिससमोर सिद्दीकी मोहम्मद सिद्दीकी अब्दुल नईम व मोहम्मद समीर सिद्दीकी मोहम्मद मोइनोद्दीन हे नातलग राहतात. गुरुवारी रात्री सिद्दीकी यांनी त्यांची कार व अॅक्टिव्हा दुचाकी घरासमोर उभी केली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात आरोपीने त्यांची दोन्ही वाहने पेटवली. धुराच्या वासाने परिसरातील नागरीक व सिद्दीकी कुटुंब बाहेर आले. त्यांनी पाण्याचा वापर करीत वाहने विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पर्यंत दुचाकी जळून खाक झाली ‌होती, तर कारचे मोठे नुकसान झाले होते. सिटीचौक पोलिसांना या घटनेची माहि‌ती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गुन्हे शाखेचे पीएसआय विजय पवार व पथक रात्री गस्तीवर असताना त्यांना कंट्रोल रूमच्या वतीने माहिती मिळाली. पीएसआय पवार यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी खबऱ्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आमेरखान सलीमखान (रा. कासबंरी दर्गा, पडेगाव) याचा समावेश असल्याची माहिती दिली.

पीएसआय पवार यांनी पडेगाव गाठून बाहेरगावी पळण्याच्या तयारीत असलेल्या आमेरखानला बेड्या ठोकल्या. त्याची चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी आमेरखानला सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय पवार, जमादार मच्छिंद्र ससाणे, रामदास गायकवाड, किरण गावंडे, रमेश सातपुते, फुंदे यांनी केली.

आईला शिवी दिल्याचा राग
काही दिवसांपूर्वी सिद्दीकी व आमेरखान यांच्यात वाद झाला होता. यावेळी सिद्दीकी यांनी आमेरखानला मारहाण केली होती तसेच त्याच्या आईला त्याच्यासमोर शिवी दिली होती. या गोष्टीचा राम आमेरखानच्या मनात होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने सिद्दीकी यांची वाहने पेटवल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खड्डे उघडे पडले तर कंत्राटदारावर फौजदारी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजण्यासाठी विशिष्ट प्रकराचे साहित्य वापरा. पहिल्या पावसातच बुजलेले खड्डे उघडे पडतात. असा प्रकार औरंगाबाद शहरातील खड्ड्यांसंबंधी झाला तर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल. प्रसंगी फौजदारी कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे तोंडी आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. शंतनू केमकर व न्या. नीतीन सांबरे यांनी शुक्रवारी दिले.

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पार्टी इन पर्सन अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी २०१२मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. खड्डे बुजविण्याचा अहवाल २६ सप्टेंबर रोजी सादर करण्याचे आदेश महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले. औरंगाबाद नगर रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे अर्धवट झालेल्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने दक्षिण मध्य रेल्वेस प्रतिवादी करण्याचे आदेश कोर्टाने दिले. क्रांतीचौक ते बाबा पेट्रोल पंप या रस्त्याचे व्यवस्थापन नेमके कुणाकडे आहे यासंबंधी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

महापालिका व राज्य शासनाने शपथपत्र दाखल केले. खड्डे बुजताना वापरलेले साहित्य एवढे कमकुवत असते की, एका पावसातही ते पूर्णत: वाहून जाते. ही बाब गंभीरतेने घ्यावी. खड्डे बुजविताना पक्के साहित्य वापरावे. माती व कचखडीचा वापर करू नका असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. मुंबईत असाच प्रकार घडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. तेव्हा हायकोर्टाने सहा मोठ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी कारवाई प्रस्तावित केली होती. असा प्रकार शहरातील खड्डे बुजताना घडल्यास मुंबई पॅटर्न राबवू, असे तोंडी आदेश देण्यात आले.

पालिकेने सादर केले फोटो
महापालिकेच्या वतीने काही रस्त्यांची कामे केल्याचे फोटो खंडपीठात सादर करण्यात आले. यातील एका फोटोसंबंधी खंडपीठाने विचारणा केली. सुनावनीदरम्यान हा फोटो कुठला आहे म्हणून विचारले असता रेल्वेस्टेशन परिसरातील असल्याचे सांगण्यात आले. परंतु मनपाने सादर केलेल्या फोटोमधील एक फोटो न्यायमूर्तींना खटकला. सदर फोटो रेल्वेस्टेशन परिसरातील वाटत नाही, असे विचारताच हा फोटो बनेवाडी परिसरातील असल्याचे सांगण्यात आले.

हस्तक्षेप अर्ज दाखल
सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉईंट दरम्यानच्या आंबेडकर चौक, जैस्वाल मंगल कार्यालय चौक आणि हर्सूल टी पॉइंट येथील भूमिगत योजनेच्या कामासंबंधी गोपाल कुलकर्णी यांच्यावतीने हस्तक्षेप अर्ज सादर केला. बी. आर. कन्स्ट्रक्शन यांनी काम न करताच ७५ लाख रूपये घेतल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी २६ सप्टेंबरला होईल. पालिकेची बाजू राजेंद्र देशमुख, राज्य रस्ते महामंडळाच्या वतीने श्रीकांत अदवंत, शासनाच्या वतीने अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.

रस्त्याची देखभाल कुणाकडे?
क्रांती चौक ते महावीर चौक रस्ता कुणाच्या अखत्यारित आहे, अशी विचारणा केल्यानंतर संबंधित रस्ता महापालिकेचा नसल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता आपला नसून महापालिकेकडे हस्तांतरीत केल्याचे सांगितले. यासंबंधी महापालिकेने लेखी स्वरूपात शपथपत्र दाखल करून रस्त्याचे पालकत्व नाकारले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुठे आहेत ? अशी विचारणा खंडपीठाने केली, परंतु जबाबदार अधिकारी त्याक्षणी उपस्थित नव्हते. या रस्त्यासंबंधी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ रस्ते यादीवरून तणाव वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शंभर कोटींच्या निधीतून करावयाच्या रस्ते कामाच्या यादीवरून तणाव अधिकच वाढल्याचे चित्र आहे. यादीतील दोन तरी रस्ते बदलणारच, असा इशारा स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी शुक्रवारी पुन्हा दिला.

शासनाने दिलेल्या शंभर कोटींच्या अनुदानातून ३१ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. शासनाकडून आर्थिक तरतुदीसह रस्त्यांची यादी महापालिकेला देण्यात आली आहे. या यादीवरून महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. शासनाने जाहीर केलेली रस्त्यांची यादी बदला, अशी मागणी बहुतेक नगरसेवकांनी केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत देखील नगरसेवकांनी अशीच मागणी केली. सभापती गजानन बारवाल यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यादी बदलाबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र देण्याचे जाहीर केले, परंतु दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण त्यावेळी बारवाल यांनी रस्त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले नाही, की चर्चा देखील केली नाही. मुंबईहून परतल्यानंतर त्यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना बोलावून यादीतील रस्त्यांची पाहणी करण्याचे व त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना बारवाल म्हणाले, ‘रस्ते पाहणीचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होईल. त्यानंतर यादीतील किमान दोन तरी रस्ते बदलले जातील. ज्या रस्त्यांची स्थिती चांगली आहे ते रस्ते निश्चितपणे वगळू व त्यांच्या जागी नवीन रस्त्यांचा समावेश करू. शहराच्या हिताच्या दृष्टीने कामे झाली पाहिजेत,’ असा उल्लेख त्यांनी केला.

आ. झांबड यांचे निवेदन
दरम्यान, काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांनी विभागीय आयुक्तांना शंभर कोटींच्या अनुदानातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या संदर्भात निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘बांधकाम विभाग व अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ यांच्याकडून शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे. रस्त्यांच्या सध्याच्या स्थितीनुसार कामाचा प्राधान्यक्रम ठरवावा. त्यानंतर रस्त्यांची यादी तयार करावी. महापालिकेच्या रस्त्यांचेच काम न करता शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचा विचार करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ मानाचा गणपतीः १८९१पासून परंपरा जपणारा ‘बोधानंद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वसमत (जि. हिंगोली) येथील बोधानंद गणेश मंडळ. निजामी राजवटीत धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेणे अतिशय अवघड काम होते. अशा वेळी लोकमान्यांची प्रेरणा घेऊन १८९१ साली हे मंडळ स्थापन झाले. अंबादासराव कुरुंदकर. (नरहर कुरुंदकर यांचे वडील) पखवाजवादक दत्तागुरू बडवणे, हनुमंतराव लांडगे काशीनाथमामा, रामकृष्ण बडवणे, दत्तोपंत आगलावे, अंबादासराव लोहरेकर, गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर इत्यादी मान्यवरांच्या पुढाकाराने बोधानंद स्वामी आणि त्यांचे गुरु रामानंद स्वामी यांच्या मठावर हे मंडळ स्थापन केले. यातील बहुतेक लोक स्वातंत्र्यसैनिक होते. निजामी राजवटीत पोलिसांचा ससेमिरा असूनही वर्षभर इथे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आडून स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देणारे कार्यक्रम चालत.

गुप्त बैठका होत. गुप्त चक्रमुद्रित पत्रके वाटली जात. वैचारिक जागृतीचे साधन म्हणून व्याख्यानमाला घेणे हे बोधानंद गणेशमंडळाचे वैशिट्य आजही जपले जाते. महाराष्ट्रातील अनेक वक्ते इथे आपली विचार सेवा देऊन गेले आहेत. हयात असेपर्यंत नरहर कुरुंदकर दरवर्षी एका विषयावर इथे व्याख्यान देत. दे. ल. महाजन, नाथराव कुरुंदकर यांची रामायण महाभारतातील एकेक पात्रे घेऊन अभ्यासपूर्ण व्याखाने होत. अनंत महाराज टाकळीकर, परळीकरबुवा आणि अनेक कीर्तनकारांचे कीर्तने व्हायचे. आजही या परंपरा जपण्यात येत आहेत. १९७०पर्यंत गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर या मठाच्या इमारतीत आपले गायनाचे वर्ग चालवीत. त्यामुळे त्यांचे शिष्य व स्नेही इथे शास्त्रीय गायन, सुगम गायन या मंडळात सादर करीत. प्रल्हाद दुधगावकर गुरुजी, विश्वनाथ गिरगावकर हे विद्यार्थ्यांचे मेळ्याचे कार्यक्रम घेत. भोकरे गुरुजी मुलांची नाटके बसवीत. बोधानंद गणेश मंडळाचे सध्याचे अध्यक्ष आनंद रमेश बडवणे, उपाध्यक्ष शेखर लांडगे, कोषाध्यक्ष सुहास कुळकर्णी आणि सचिव नितीन अंबेकर आणि त्यांचे सहकारी आजही त्याच परंपरा जपत आहेत. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी फक्त कार्यक्रमापुरता माइक आणि स्पीकर वापरण्याचा दंडक पाळतात. सर्व कार्यक्रम सामूहिक प्रयत्नातून नीटनेटके केले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन धोकादायक इमारतींना पालिकेचा इशारा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धोकादायक तीन इमारतींना महापालिकेच्या प्रशासनाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. या इमारतींचा भाग एका बाजूला झुकला असून, त्या केव्हाही पडण्याची शक्यता आहे. संबंधित इमारती रिकाम्या करून देण्याच्या नोटिसा इमारतमालकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अन्य ३८ धोकादायक इमारती महापालिकेच्या रडावर असून, त्यांच्यावर केव्हाही कारवाई केली जाऊ शकते.
मुंबईत पावसामुळे भेंडीबाजारमधील एक इमारत कोसळून त्यात ३८ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापलिकेच्या क्षेत्रात असलेल्या धोकादायक इमारतींबद्दल ‘मटा’ प्रतिनिधीने माहिती घेतली असता ३८ इमारती धोकादायक असल्याची माहिती अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख एम. बी. काझी यांनी दिली. पालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींची संख्या ७७ होती. त्यापैकी ३५ इमारतींची प्रकरणे निकाली काढण्यात आली. चार प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे ही ३९ प्रकरणे वगळल्यास ३८ धोकादायक इमारती अद्यापही शिल्लक राहतात. त्यांच्यावर कारवाई करण्याचे नियोजन केले जात आहे अशी माहिती काझी यांनी दिली.
३८ इमारतींपैकी मोतीकारंजा, धावणी मोहल्ला आणि मोंढा - जाफरगेट परिसरातील प्रत्येकी एक इमारत अतिधोकादायक असल्याचे लक्षात आले आहे. या इमारती एका बाजूने झुकलेल्या आहेत. त्या केव्हाही पडण्याची शक्यता लक्षात घेवून तिन्हीही इमारतींच्या मालकांना अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. इमारत रिकामी करून देण्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. अतिधोकादायक बनलेल्या तिन्हीही इमारती पाडण्यास महापालिकेचे प्राधान्य असेल असे काजी यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पाणी पुरवठा यंत्रणा सोलारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वीज पुरवठ्यात वारंवार निर्माण होणारा व्यत्यय टाळण्यासाठी संपूर्ण पाणी पुरवठा योजनाच सोलारवर करण्याचे महापालिका प्रशासनाने ठरविले आहे. तसा प्रस्ताव औरंगाबादमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे.
औरंगाबादला जायकवाडीच्या नाथसागरातून पाणीपुरवठा केला जातो. जायकवाडीपेक्षा औरंगाबाद शहर उंचावर असल्यामुळे जायकवाडीहून औरंगाबादपर्यंत पाणी आणण्यासाठी तीन ठिकाणी उपसा करावा लागतो. त्यासाठी जायकवाडीसह ढोरकीन, नक्षत्रवाडी येथे महापालिकेने पंपहाउस तयार केले आहेत. वीज पुरवठा असेल तर हे पंपहाउस सुरळीत चालतात आणि शहराला पाणीपुरवठा होतो. गेल्या महिन्यात पंपहाउसचा वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडले. त्यामुळे जायकवाडीच्या नाथसागरात भरपूर पाणी असताना देखील औरंगाबादमध्ये पाण्याची ओरड सुरू झाली. त्यामुळे पंपहाउसच्या वीज पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार पालिका प्रशासनाच्या स्तरावर सुरू झाला आहे.
येत्या महिना - पंधरा दिवसांत औरंगाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी विविध प्रस्ताव तयार करण्याचे काम महापालिकेत सध्या सुरू आहे. विविध प्रस्तावांपैकी सोलारचा प्रस्ताव महत्त्वाचा असल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले. ‘संपूर्ण पाणीपुरवठा योजना सोलारवर करण्याचा विचार आहे, तसा प्रस्ताव तयार केला जात आहे. जायकवाडी, फारोळा, ढोरकीन या तिन्हीही पंपहाउसवर सोलार पॅनल लावण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात येणार आहे. सोलार पॅनलवर तिन्ही पंपहाउस सुरू ठेवले, तर वीज पुरवठा खंडित होऊन संपूर्ण यंत्रणा बंद पडण्याची वेळ येणार नाही. शहराला मुबलक पाणी मिळेल. यासाठी मोठा खर्च येणार असून राज्य शासनाने त्यासाठी मदत करावी,’ असे प्रस्तावात नमूद केले जाणार असल्याचे मुगळीकर यांनी सांगितले.

शाळा, रुग्णालये यांचीही शिफारस
पाणी पुरवठा यंत्रणा सोलारवर करण्याबरोबरच महापालिकेच्या सर्व शाळा आणि रुग्णालये सोलारवर करण्याचा उल्लेख देखील मंत्रिमंडळासाठीच्या प्रस्तावात करण्यात येणार आहे. औरंगाबादचा समावेश सोलार सिटी योजनेत करण्यात आला आहे. त्याचा संदर्भ देऊन शाळा, दवाखाने सोलारवर करण्याची शिफारस केली जाणार आहे.

पाणीपुरवठा योजना सोलारवर करण्याचा विचार आहे, तसा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने तयार केला जात आहे. जायकवाडी, फारोळा, ढोरकीन या तिन्हीही पंपहाउसवर सोलार पॅनल लावण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात येणार आहे.
- डी. एम. मुगळीकर, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कुलगुरुंना निलंबित करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. बी. ए. चोपडे यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे विद्यापीठ सतक बदनाम झाले आहे. पुतळा उभारण्याची घोषणा करून त्यांनी अराजक निर्माण केले. या अनागोंदी कारभाराची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करा,’ अशी मागणी पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांनी केली आहे.

‘विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केली. पुतळ्यासाठी अर्थसंकल्पात ४० लाख रूपयांची तरतूद आहे, पण पुतळा उभारणीला पँथर्स रिपब्लिकन पार्टीने विरोध केला आहे. संघटना व विद्यार्थ्यांची मागणी नसताना कुलगुरुंनी पुतळा उभारण्याची घोषणा करून मराठवाड्यातील वातावरण कलुषित केले आहे. तसेच निविदा न काढता उत्तरपत्रिका बारकोडींग छपाईत दोन कोटींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली आहे,’ असे गाडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

पँथर सेनेचा विरोध
विद्यापीठात पुतळे उभारल्यास पुतळ्यांचे वस्तूसंग्रहालय उभे राहील. या निधीतून विद्यार्थ्यांना सुविधा देण्याची गरज आहे अशी मागणी पँथर सेनेने केली आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचे निर्णय परिवर्तनविरोधी आणि विद्यार्थी विरोधी असल्यामुळे राज्यपालांनी चोपडे यांचा राजीनामा घ्यावा, असे संघटनाप्रमुख सतीश पट्टेकर व दीपक केदार यांनी म्हटले आहे.

सुमार साहित्यिकांना केले पुढे
‘तथाकथित आंबेडकरी राजकीय कार्यकर्त्यांना व सुमार दर्जाच्या साहित्यिकांना पुढे करून विद्यापीठात पुतळे उभारण्याची मागणी काही राजकीय लोक करीत आहेत. या सर्वांना विधायक मार्गाने धडा शिकवण्यात येणार आहे,’ असे गाडे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ४५ अधिकारी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरातील रस्त्यांचे जाळे विणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या ४५ अधिकाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पदस्थापनेची प्रतीक्षा आहे. या मंडळींच्या जून महिन्यात बदल्या झाल्या पण त्यांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही.

दिल्ली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांचे देखभाल दुरुस्ती तसेच नवीन प्रस्तावांना मान्यता देऊन ही कामे करून घेण्याची जबाबदारी या कार्यालयाची आहे. देशपातळीवर राज्यनिहाय एनएचएआयची कार्यालये आहेत. ज्या भागातून राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू आहेत तिथे प्रकल्प संचालक कार्यालय कार्यरत आहेत. जून महिन्यात एनएचएआयच्या देशपातळीवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात १५० हून अधिक बदल्या झाल्या. पैकी अनेकांना पदस्थापना मिळाली, पण अजून ४५ अधिकाऱ्यांना पदस्थापना मिळालेली नाही. हे अधिकारी दिल्लीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या रचनेत बदल करण्यात येणार आहे. काही ठिकाणी नवीन कार्यालये स्थापन केली जाणार आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना अद्याप पदस्थापना दिलेली नाही. तोवर वेगवेगळ्या विषयांवरील ट्रेनिंग अधिकाऱ्यांना दिले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी आहे. त्यानंतरच या प्रक्रियेला वेग येऊन सप्टेंबर अखेर या अधिकाऱ्यांना पदस्थापना दिली जाईल, असे दिल्लीतील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images