Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ स्वरांची सुश्राव्य मैफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पं. सुधाकर चव्हाण यांचे सुश्राव्य गायन आणि पं. राजेंद्र कुलकर्णी व कल्याण अपार यांची सनईवादन जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी ठरली. वादन आणि गायन याच्यातील तन्मयता संगीत महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.

स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय आणि शहनाई संगीत अकादमी यांच्या वतीने भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘शहनाई संगीत महोत्सव’ घेण्यात आला. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात शनिवारी सायंकाळी ही मैफल रंगली. महोत्सवाची सुरुवात पं. सुधाकर चव्हाण यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. रागदारीचे उत्कट दर्शन घडवत चव्हाण यांनी रसिकांना खिळवून ठेवले. ‘रसिया आओ ना’, ‘कैसे कैसे जाऊ मथुरानगरी’ या बंदिशीला रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘विठ्ठला रे, कंठ आळविता फुटला रे’ या अभंगाने समारोप झाला. त्यांना शिवानंद स्वामी, संजय अपार, गजानन केचे, सुप्रिया खरात, चौरे महाराज व वैभव पवार यांनी साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी (पुणे) आणि कल्याण अपार यांची बासरी-शहनाई जुगलबंदी रंगली. दरम्यान, या महोत्सवाचे उदघाटन पं. नाथराव नेरळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं. राजेंद्र कुलकर्णी, कल्याण अपार, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार व उपप्राचार्य सोनाजी ठोंबरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीपक ..... एक आठवण

$
0
0

दीपक ..... एक आठवण
~ डॉ . अजित भागवत

इंट्रो
मुंबईत २९ ऑगस्ट रोजी पावसामुळे झालेल्या हाहाकारात प्रसिद्ध यकृतविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्याविषयीच्या आठवणींना त्यांच्याच एका मित्राने दिलेला हा उजाळा.
...

३० ऑगस्टला सकाळी फोन वाजला. अच्युत गोडबोले बोलत होता. ‘अजित, आपला दीपक काल रात्रीपासून बेपत्ता आहे...’ काळजात धस्स झालं. दीपक बेपत्ता असल्याचं ऐकून पायाखालची जमीनच सरकल्यासारखं वाटलं. त्यानंतर २४ तासांनी दीपकचा दुर्दैवी अंत झाल्याचं कळलं आणि मन भूतकाळात गेलं.
बरोबर तीस वर्षांपूर्वी म्हणजे ऑगस्ट, १९८७ मध्ये डी. एम. करण्यासाठी मी मुंबईला नायर रुग्णालयात दाखल झालो. त्या काळात मुंबईत मुंबईबाहेरच्या विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असे. त्यामुळे माझ्यासारख्या मुंबईबाहेरच्या विद्यार्थ्यांना मुंबई प्रवेशाचे दडपण वाटे. अशा स्थितीत मी कोणी दुसरा मुंबईबाहेरचा गडी भेटतोय का, या शोधात होतो. ऑफिसमध्ये बोलताना एकाने सांगितलं की दीपक अमरापूरकर नावाचा सोलापूरहून आलेला मुलगा गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात काम करतो. मी तडक त्याचा शोध घेऊन त्याला कँटिनमध्ये गाठलं. अगदी जुनी मैत्री असल्यासारखं त्याने मला हॉस्टेल, मेस, ऑफिसमधले सोपस्कार याची माहिती दिली. त्याचं बोलणं आणि देहबोली माझ्यासारख्या मुंबईत आलेल्या नवख्याला खूपच आश्वासक वाटली. मग सुरुवातीला तीन महिने मी त्याच्याच खोलीवर राहिलो. ओळखीचे रूपांतर मग गाढ मैत्रीत झालं. नायर रुग्णालयातील पाच वर्षांचा सहवास आणि त्यानंतर २५ वर्षे असलेल्या ऋणानुबंधांतून आणि मैत्रीतून मला उलगडलेले त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू लोभसवाणे होते.
एका निम्नमध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबात जन्मलेल्या आणि सोलापुरात वाढलेल्या दीपकने जिद्द, कष्ट, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर पोटविकार तज्ज्ञ म्हणून केवळ देशातच नव्हे, तर साऱ्या जगात नाव कमावले. शिकत असताना आपल्या आजूबाजूला आणि जगात कुठेही वैद्यकीय क्षेत्रात लक्षणीय संशोधन करणाऱ्यांबद्दल त्याला विलक्षण प्रेम, भक्ती आणि आदर वाटत असे. त्या संशोधकांबद्दल तो भरभरून बोलत असे. एखादा जर्नलमधील शोधनिबंध आवडला, तर त्याबद्दल बोलायला, शेअर करायला तो अत्यंत उत्सुक असे. ‘...सी अजित, धिस इस सिम्पली ब्रिलिअंट...’ अशी सुरुवात करून त्या पेपरबद्दल विस्ताराने सांगत असे आणि एखादा शोधनिबंध सुमार दर्जाचा असेल तर ‘भिकार आहे’ असा निर्वाळा तो रांगड्या सोलापुरी भाषेत तात्काळ देत असे.
उत्कृष्ट आणि साधारण यामधील फरक त्याला फार चटकन कळत होता. डॉक्टर म्हणून आपण कितीही व्यस्त असलो तरी चिंतन, डाटा कलेक्शन अँड त्याचं विश्लेषण सर्वांनी करत राहील पाहिजे असा त्याचा आग्रह असे. तीच विचारधारा जोपासून त्याने वैद्यकीय पाठ्यपुस्तके आणि नियतकालिके यामधून भरपूर लिखाण केलं. विद्यार्थी असतानाच त्याच्याकडे एक डबल स्पेसचा इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर होता. त्यावर तो स्वतः टाइप करत असे. नायर हॉस्पिटलच्या मोडकळीस आलेल्या ‘डॉल्स हाऊस’मध्ये एकत्र घालवलेले दिवस आणि गप्पा विसरणे तर केवळ अशक्य.
यकृताच्या विकारावर बोलण्याकरता त्याला जगभरातून बोलावणी येत. एकदा त्याला फोन केल्यावर ‘अरे, मी लेक्चर देण्यासाठी कझाखस्तान मध्ये आलो आहे’, असं तो म्हणाला तेव्हा गंमत वाटली, पण आश्चर्य मात्र वाटलं नाही. शिवाय त्याला शिकवण्याची फारच हौस. शिक्षण संपल्यावर तो मेडिकल कॉलेजात प्रोफेसर होईल अशी मला त्या काळात खात्री होती. परंतु नंतर खासगी व्यवसायात राहूनसुद्धा संशोधन आणि ज्ञानार्जन या दोन्ही बाबतीत सजग आणि अग्रेसर राहिलेला दीपक हा एकमेव डॉक्टर माझ्या माहितीत आहे. डॉक्टर खुरू, सोहेन्द्र या पोटविकार तज्ज्ञांच्या कामाने भारावून गेल्याने विद्यार्थीदशेत असतानाच त्याने स्वतःच्या खर्चाने त्या तज्ज्ञांकडे जाऊन ज्ञान मिळवले. यकृताच्या विकारात देशात त्याचा शब्द अंतिम मानला जात होता.
गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, बंगाल, ओरिसामधून त्याच्याकडे रुग्ण येत. मागे एकदा रँडी पॉशचे ‘लास्ट लेक्चर’ हे पुस्तक वाचून त्याने भारावून मला फोन केला व ते पुस्तक प्रत्येकाने वाचलच पाहिजे, असं सांगितलं. मी अमेरिकेत असतानाच्या ६-७ वर्षाच्या कालावधीत तो जवळजवळ दर वर्षी माझ्याकडे येत असे. तिथे रोज माझ्या हॉस्पिटलमध्ये येऊन ८-९ तास हेपॅटॉलॉजी विभागात वेळ घालवत असे. ते बघून आपल्याकडे काय काय सुधारणा करता येतील याचा विचार करत असे. भारतातील वैद्यकीय शिक्षण हा आमचा जिव्हाळ्याचा विषय. त्यावर आम्ही तासंतास चर्चा करत असू. वैद्यकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार आणि अनैतिकता याबद्दल तो पोटतिडकीने बोलत असे. वैद्यकीय परिषदांमध्ये ‘एथिक्स इन मेडिसिन’ या विषयावर चर्चा वारंवार व्हावी असे त्याचे मत होते.
‘खाणे’ या विषयात त्याला अत्यंत रस होता. तो स्वतः मांसाहार करत नसला तरी इतरांना उत्तमोत्तम मांसाहारी पदार्थ खाऊ घालण्यात त्याला विलक्षण आनंद मिळत असे. मुंबईतल्या एकाहून एक रेस्टोरंन्टसची मला ओळख करून देण्यात दीपकचा मोठा वाटा आहे आणि तेथे जेवताना आता पुढच्या वेळी मी आलो की कुठे जायचं हेही तो सांगत असे.
अशा दीपकला काळाने अत्यंत क्रूरपणे आपल्यातून ओढून नेलं. दीपक ज्याप्रकारे गेला त्यामुळे तो जाण्याचं दुःख अधिक गडद झालं. मानवी जीव आणि सार्वजनिक सुरक्षितता यांना आपल्या समाजात अत्यंत गौण स्थान आहे ही खरोखरच शरमेची बाब आहे. असं तर नाही की दीपकसारखी राष्ट्रीय संपत्ती असलेली माणसे अशा प्रकारे उधळली गेल्यामुळे आपल्या देशातील सार्वजनिक सुरक्षा ऐरणीवर येऊन काही सकारात्मक बदल होतील? त्यामुळे दीपकचे अनेक जीव वाचवण्याचे कार्य मृत्यूपश्चातही चालू राहील? असा काहीसा विचार केल्याशिवाय त्याच्या अकाली मृत्यूची सल, दाहकता आणि हळहळ कमी होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील सर्व रस्ते डिसेंबरअखेर टकाटक

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील सर्व महामार्ग व अंतर्गत रस्ते डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करा. कामांच्या मंजुरीसाठी मुंबईपर्यंत येण्याची आवश्यकता नाही. अधीक्षक अभियंता पातळीवर ठराविक रकमेपर्यंतची कामे तत्काळ मंजूर होतील. ज्या जिल्ह्याचे काम लवकर संपेल त्यांना चांगल्या कामांसाठी अधिकचा निधी दिला जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली.
राज्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्डे हा चर्चेचा विषय झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, बांधकाम विभागाचे सचिव आशिषकुमार सिंह, रस्ते विभागाचे सचिव सी. पी. जोशी, सर्व मुख्य अभियंता आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची प्रक्रिया १५ नोव्हेंबरपासून सुरू केली जाते, पण यंदा त्यात बदल करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. एक महिना आधीपासून ही प्रक्रिया सुरू करावी, १५ नोव्हेंबरपूर्वी राज्यातील सर्व राज्यमार्गाचे खड्डे बुजविण्यात यावेत, त्यानंतरच्या १५ दिवसांत प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी सूचना करण्यात आली. या कामासाठी ५५० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. कामाच्या मंजुरीचे अधिकार अधीक्षक अभियंता पातळीवर देण्यात आले असल्याने कुठल्याही कामाला प्रशासकीय विलंब लागता कामा नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली. दोन्ही विभागातील रस्त्यांवरील खड्डे डिसेंबरपर्यंत बुजविणे बंधनकारक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
ज्या जिल्ह्याचे काम सर्वात लवकर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. त्या जिल्ह्याला अधिकचा निधी दिला जाईल, अशी घोषणाही पाटील यांनी केली. गेल्या वर्षी याच मोहिमेंतर्गत हिंगोली जिल्ह्याला बहुमान मिळाला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी अधिकारी कितपत योग्य पद्धतीने करतात, त्यावरच खड्डेमुक्त रस्त्यांचे भवितव्य ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खार्दुलंगा मॅरेथॉन स्पर्धेत नितीन घोरपडे चमकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगातील सर्वांत खडतर मानलेल्या खार्दुलंगा चॅलेंज मॅरेथॉन स्पर्धा औरंगाबादच्या नितीन घोरपडे या धावपटूने १२ तास ३५ मिनिटांत पूर्ण केली. अशी कामगिरी करणारे घोरपडे हे मराठवाड्यातील पहिलेच धावपटू ठरले.
खार्दुलंगा चॅलेंज ही ७२ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धा १४ तासांमध्ये पूर्ण करणे आवश्यक असते. नितीनने १२ तास ३५ मिनिटांची वेळ घेत ती पूर्ण केली. त्यात १०४ धावपटूंनी सहभाग घेतला. त्यापैकी ६३ धावपटूंनाच ती पूर्ण करण्यात यश आले. या संदर्भात ‘मटा’शी संवाद साधताना घोरपडे म्हणाले, ‘खार्दुलंगा चॅलेंज ही अतिशय खडतर मॅरेथॉन शर्यत आहे. ही स्पर्धा पूर्ण करणे हे जिंकण्यासारखेच असते. शर्यत पूर्ण केल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. यातून एक नवी ऊर्जा मिळाली.’
खार्दुलंगा गावापासून स्पर्धेला प्रारंभ झाला. हे गाव समद्रसपाटीपासून ३८७५ मीटर म्हणजे १३ हजार ४२ फुटावर आहे. धावपटूंना निसर्गरम्य वातावरणाबरोबरच विलोभनीय हिमशिखरांचेही दर्शन घडले. या स्पर्धेसाठी सहभाग घेण्यासाठी धावपटूने तीन वर्षांत किमान दोन पूर्ण अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत धावलेले असणे आवश्यक असते. अथवा ७० किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा पाच तासांच्या आत पूर्ण केलेली असावी लागते, असेही नितीन यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रयोगशील अभिनेता

$
0
0

प्रयोगशील अभिनेता
--------------------
इंट्रो - अभिनयापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता शंतनू गंगणे या उमद्या कलाकाराची कला क्षेत्रात चौफेर कामगिरी सुरू आहे. व्यक्तिमत्त्वाला साजेशा भूमिका करीत त्याने निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले. तुळजापूर ते मुंबई अशी वाटचाल करणाऱ्या कलाकाराची यशोगाथा.
-----------------
तुषार बोडखे
Tushar.bodkhe@timesgroup.com
मायानगरी मुंबईत संधीच्या शोधात कलासक्त कलाकारांची गर्दी उसळते. स्वप्नांचे गाठोडे वागवत पाच-दहा वर्षे संघर्ष करीत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश अशा वेगवेगळ्या भागांतील कलाकार स्वतःसोबत स्थानिक बोलीभाषा घेऊन पोहोचतात. नाटक, चित्रपट, मालिकांत प्रसंगानुरूप कधीतरी बोलीभाषेचा वापर असला तरी सहसा नागर भाषेवर भर असतो. प्रमाण भाषा बोलता येण्याची अट असल्याने ग्रामीण भागातील कलाकारांचा हिरमोड होतो. कामाच्या ठिकाणी भाषेवरून टोमणे ऐकवले जातात. हा प्रकार न्यूनगंड वाढवण्यास कारणीभूत असला तरी विविधरंगी भूमिका साकारण्यास आसुसलेला कलाकार भाषेच्या वारूवर सहज आरूढ होतो. तुळजापूर गावातून थेट मुंबई गाठणारा उमदा अभिनेता शंतनू गंगणे अशाच कलाकारांपैकी एक.
पुण्याच्या ललित कला केंद्रात एम. ए. (नाट्यशास्त्र) करताना कुणी एकाने शंतनूच्या ‘उस्मानाबादी’ लहेजाची टर उडवली. हा गावावरून आलाय असे थेट ऐकवले. त्याला वाईट वाटले. वयाची २१-२२ वर्षे सहज वापरत असलेली भाषा एका झटक्यात बदलणे शक्य नसल्याची जाणीव झाली. याचदरम्यान काही जिवाभावाचे मित्र भेटले. ‘तू आहेस तसा रहा. भूमिकेसाठी एखादी भाषा शिकणे शक्य असते. पण, मूळ भाषा कशासाठी विसरायची? मित्राच्या बोलण्यात तथ्य होते. भूमिकेनुसार भाषेचा लहेजा बदलणे गरजेचे असते याचे आकलन झाले. बोलीभाषा आणि प्रमाणभाषा अवगत करण्याचे आव्हान स्वीकारून काही दिवसांतच शंतनू प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर सहजतेने वावरू लागला. मालिका आणि चित्रपटात कार्यमग्न झाल्यानंतरही भाषेचा कधी अडसर आला नाही. या देखण्या व अभिनयसंपन्न कलाकाराची कला क्षेत्रातील वाटचाल तुळजापूरच्या कॉलेजातून झाली. विद्यापीठाच्या स्पर्धेत सहभागी होताना नाटकाची आवड निर्माण झाली. ‘पंचरंग प्रतिष्ठान’मध्ये सहभागी होऊन राज्य नाट्य स्पर्धा आणि खुल्या नाट्य स्पर्धेत त्याने लक्षणीय काम केले. गावापुरतेच मर्यादित राहण्याची इच्छा नसल्यामुळे पुढील करिअरचा प्रश्न उभा राहिला.
‘कलाकार व्हायचे असेल तर शिक्षण गरजेचे आहे असे मित्र उमेश जगतापने सांगितले. बरेच मित्र विद्यापीठात नाट्यशास्त्राचे शिक्षण घेत होते. माझा निर्णय निश्चित असल्यामुळे पुण्याच्या ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. नाटक, अभिनय, लेखन यांची पुरेपूर ओळख करून देणारे हे दिवस होते’ असे शंतनू सांगतो. या कालावधीत डॉ. राजीव नाईक, प्रवीण भोळे, विजय केंकरे, समर नखाते यांच्याकडून नाटकाचे बारकावे शिकलो. २००६ मध्ये विजय केंकरे दिग्दर्शित ‘ती, तिचा दादला आणि मधला’ या व्यावसायिक नाटकात भूमिका मिळाली. किशोरी अंबिये, विजय चव्हाण यांच्यासोबत नाटक करण्याचा अनुभव खूप शिकवणारा होता. ‘ती, ती आणि ती’ या नाटकाचे प्रयोग सुरू असतानाच ‘अवघाची संसार’ मालिकेत काम मिळाले. सुभाष घई निर्मित व राजीव पाटील दिग्दर्शित ‘सनई चौघडे’ चित्रपटात लहानशा भूमिकेद्वारे शंतनूचे रूपेरी पडद्यावर आगमन झाले. पुण्यातील ऑडिशनमधून शंतनूची निवड झाली होती. ‘फक्त नाटकाचा अनुभव असल्यामुळे चित्रपटाचे तांत्रिक शिक्षण या चित्रपटातून झाले. कॅमेऱ्यासमोरील अभिनयाचे प्रशिक्षण पाटील यांनी दिले. चित्रपटसृष्टीत राजीव सर माझे पहिले गुरू आहेत. तांत्रिक ज्ञानाशिवाय चित्रपटात सराईत अभिनय करता येत नाही याची जाणीव झाली’ अशी आठवण शंतनूला भावूक करून गेली. दहा वर्षांपूर्वीचा पट डोळ्यांसमोर उभा राहिला. ‘वंशवेल’ चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली. नावाजलेले कलाकार असूनही शंतनूची भूमिका रसिकांनी स्वीकारली. स्त्री सबलीकरण विषय मांडणारा ‘वंशवेल’ लक्षवेधी ठरला. ‘तुह्या धर्म कोंचा’, ‘आभरान’, ‘संदूक’, ‘बावरे प्रेम हे’, ‘धुरंदर भाटवडेकर’, ‘रिंगण’ या चित्रपटात शंतनू सहाय्यक भूमिकेत झळकला. प्रयोगशील दिग्दर्शकांसोबत काम करताना त्याचा आत्मविश्वास दुणावला.
‘आतापर्यंत सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या तरी त्यांचे महत्त्व मी मुख्य व्यक्तिरेखेइतकेच मानतो. कारण गोष्टीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत तुम्ही कसे पोहचता याला अधिक महत्त्व आहे. भूमिकेची लांबी व केंद्रस्थानी असलेली भूमिका यात गुंतणे योग्य नाही. कामाची परिणामकारकता ओळखणे कलाकाराचे बलस्थान असावे’ असे प्रांजळ मत तो मांडतो. नाटक, मालिका आणि चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका मिळाल्या तरी स्ट्रगल संपणार नसल्याची कल्पना त्याला आहे. अगदी सुपरस्टार लोकांनाही चांगल्या भूमिकांची प्रतीक्षा असते. मग आपली तर सुरूवात आहे हे लक्षात ठेवून शंतनू समंजसपणे काम करण्यावर भर देतोय. या कामाची प्रेक्षकांनीही दखल घेतली अन् इंडस्ट्रीतील दिग्दर्शक-कलाकारांनी कौतुक केले. पण, कसदार भूमिकेचा शोध संपलेला नाही. प्रादेशिक अंगाने परिपूर्ण भूमिका करण्याचे त्याचे ध्येय आहे. अलिकडेच शंतनूने प्रॉडक्शन हाउस स्थापन करून प्रायोगिक नाटक आणि शॉर्टफिल्म निर्मिती सुरू केली आहे. शार्दूल सराफ लिखित ‘रात्रंदिन आम्हा’ या प्रायोगिक नाटकाला ‘झी गौरव पुरस्कार’ आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित शॉर्टफिल्मला ‘मटा सन्मान’ मिळाला. प्रॉडक्शन हाउसच्या माध्यमातून दर्जेदार निर्मितीवर शंतूनने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. शिवाय कार्यकारी निर्माता म्हणूनही यावर्षी तो पदार्पण करणार आहे. कला क्षेत्रातच काम करण्याचा चंग बांधलेल्या मनस्वी कलाकाराला मर्यादांचा अडसर नसतोच कधी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ लाडकी ‘समांतर’ खैरैंच्या कडेवरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘समांतर जलवाहिनी योजना खासदार चंद्रकांत खैरे यांची इतकी लाडकी निघाली की, ती त्यांच्या कडेवरून खाली उतरलीच नाही. त्यामुळे ही योजना पळालीच नाही,’ असा टोला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी झालेल्या अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उदघाटन सोहळ्यात लगावला. त्यामुळे संपूर्ण सभागृहात हस्याचा स्फोट झाला.

औरंगाबादसाठी जायकवाडीपासून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी ७०० आणि १४०० मिलिमीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या टाकल्या आहेत. या जलवाहिन्यांचे आयुष्य संपल्यामुळे २००० मिलिमीटर व्यासाची नवी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय झाला. या जलवाहनीचा उल्लेख समांतर जलवाहिनी असा केला जातो. या जलवाहिनीसाठी २००६पासून महापालिकेत प्रक्रिया सुरू झाली. २०११मध्ये तिला मूर्त रूप मिळाले. सुरुवातीला ३६८ कोटी रुपयांची असलेली ही योजना आता ७८९ कोटी रुपयांची झाली. त्यातही प्रत्यक्ष काम सुरू न झा्ल्यामुळे या योजनेची किंमत आता १२०० कोटी रुपयांवर गेली आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारने या योजनेला मंजुरी दिली. या योजनेवर नियंत्रण देखील खैरे यांचेच होते. अशा समांतर पाणीपुरवठा योजनेचा उल्लेख बागडे यांनी आपल्या भाषणात केला.
ते म्हणाले, ‘सर्व महापालिकांचे प्रश्न सारखे आहेत. रस्ते, पाणी, कचरा अशा त्या समस्या आहेत. औरंगाबादसाठीची ‘समांतर’ योजना खैरे यांची इतकी लाडकी निघाली, की ती त्यांच्या कडेवरून ती खाली उतरलीच नाही. त्यामुळे ती पळायला ही लागली नाही. जोपर्यंत या योजनेला मोकळे सोडणार नाही, तोपर्यंत ती योजना पळणार नाही, पूर्ण होणार नाही.’विकास आराखड्याचा उल्लेख देखील बागडे यांनी केला. ‘विकास आराखडा रखडल्यावर अवैध वसाहती वाढतात, त्यामुळे विकास आराखड्याचा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे,’ असे ते म्हणाले.

खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार देण्याची मागणी केली. ‘महापालिका सभागृहात घेतलेल्या निर्णयाचा मान राखला गेला पाहिजे, महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत. शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटी रुपयांचे अनुदान दिले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता आणखी शंभर कोटी रुपये द्या म्हणजे शहर खड्डेमुक्त होईल. समांतर जलवाहिनीचे काम होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढावा. समांतरसह भूमिगत गटार योजनेची कार्यकक्षा वाढवून त्यात सातारा-देवळाई आणि गुंठेवारी वसाहतींचा समावेश करावा,’ अशी मागणी त्यांनी केली. खासदार रावसाहेब दानवे, विवेक सेजवळकर यांचीही यावेळी भाषणे झाली. महापौर भगवान घडमोडे यांनी प्रास्ताविक केले.

तुम्हारे खत मे हमारा सलाम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या रस्त्यांसाठी जूनमध्ये शंभर कोटींचे अनुदान मंजूर केले. शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने प्रथमच एवढी मोठी रक्कम दिली. त्यामुळे कृतज्ञतेच्या भावनेतून महापालिकेतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार होणे अपेक्षित होते, मात्र पालिकेची यंत्रणा या निधीतून कोणते रस्ते करायचे हे ठरविण्यातच तीन महिने व्यस्त राहिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा विचार देखील त्यांच्या मनात आला नाही. शेवटी महापौर परिषदेच्या कार्यक्रमातच महापालिकेतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार उरकण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ चहा तर नाहीच; जेवणाचेही हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापौर परिषदेसाठी आलेल्या काही महापौरांना चहा तर मिळालाच नाही, पण जेवणासाठीही त्यांची तारांबळ उडाली. या प्रकारामुळे काही जणांनी नाराजीही व्यक्त केली.
हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या सीता हॉलमध्ये महापौर परिषदेच्या उदघाटनाचा कार्यक्रम झाला.

परिषदेसाठी देशभरातून ३२ महापौर आले होते. काही महापौर शुक्रवारी मुक्कामासाठी न येता शनिवारी थेट उदघाटनाच्या काही मिनिटे अगोदर आले. प्रवासाहून आल्यामुळे काही जणांनी चहाची पिण्याची इच्छा व्यक्त केली. हॉलबाहेर चहा - नाष्ट्यासाठीचे स्टॉल लावले होते, परंतु काही महापौरांना तेथे चहा मिळाला नाही. त्यामुळे चहा न पिताच त्यांना कार्यक्रमात बसावे लागले. उदघाटनाचा कार्यक्रम दुपारी दोनच्या सुमारास संपला. तोपर्यंत सर्वांच्या भुकेची वेळ झाली होती. कार्यक्रम संपताच बहुतेकांनी सभागृहाबाहेर लावलेल्या जेवणासाठीच्या स्टॉलकडे धाव घेतली, पण तेथे काहीच तयारी नव्हती. काही वेळ वाट पाहून महापौर आपापल्या खोलीकडे रवाना झाले. त्यानंतर थोड्या वेळानी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीच गर्दी
महापौर परिषदेला निमंत्रित महापौर व महापालिकेशी संबंधित नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहतील अशी अनेकांची अपेक्षा होती, पण कार्यक्रमाच्या हॉलमध्ये भाजपच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांचीच गर्दी होती. सभागृहातील बहुतेक आसनव्यवस्था त्यांनी ताब्यात घेतली होती. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी होती. त्यामुळे हा कार्यक्रम भाजपचा आहे की महापौर परिषदेचा असा प्रश्न विचारला जात होता.

महापौरांचा कार्यकाळ पाच वर्षांचा करा
महापौरांचा कार्यकाळ अडीचऐवजी पाच वर्षांचा करावा, असा ठराव अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. यासह अन्यही ठराव मंजूर करण्यात आले. ते शासनाकडे पाठवले जाणार आहेत. महापौर परिषदेच्या उदघाटन सत्राच्या नंतर दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान महापौर परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची माहिती नंतर देण्यात आली. महापौरांनी निवड थेट जनतेतून करण्यात यावी, स्मार्ट सिटी प्रकल्पात महापौरांनी भूमिका महत्वाची ठेवण्यात यावी, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी महापौरांकडून देखील सल्ला घेण्यात यावा असे मंजूर करण्यात आलेल्या ठरावात नमूद करण्यात आले आहे. हे ठराव राज्य व केंद्रे सरकारकडे पाठवण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्यात मुंबई किंवा दिल्ली येथे महापौर प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. आपापल्या शहरात यशस्वीपणे राबवण्यात आलेल्या योजनांचे सादरीकरण व नवीन संकल्पनांचे आदानप्रदान महापौर करतील असे या वेळी ठरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कुपोषण मुक्तीचा विडा उचलला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातून कुपोषण हद्दपार करण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांनी वर्षभराचा प्रभावी कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून जनजागृती कार्यक्रम शुक्रवारपासून सुरू झाला. वर्षभर हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून तपासणीसाठी त्यावर स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, नेदरलँड येथील डीएसएम कंपनीच्या वतीने कुपोषण निर्मूलानाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यातील औरंगाबाद, बीड आणि नगर जिल्ह्यात पुढील वर्षभर हा कार्यक्रम राबविला जाईल. अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मदतीने जनजागृती केली जाणार आहे. आपल्याकडे मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या आहाराविषयी अनेक समज, गैरसमज आहेत. बाळाला कोणता आहार कोणत्या पद्धतीने द्यावा, याबाबत शंका आहेत. अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने पोषण आहार दिल्याने बालक कुपोषित होते. हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने अभिनेता आमीर खानची कुपोषण निर्मूलन ब्रँड अंबेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. वरील चारही यंत्रणांच्या मार्गदर्शनातून गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवशीन मुली, महिला तसेच नागरिकांना कुपोषण निर्मूलनाबाबत माहिती देणारे व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ गावोगावी दाखवून त्याद्वारे जनजागृती करण्याचा हा कार्यक्रम आहे. जिल्ह्यात ३४६५ अंगणवाड्यांमध्ये कार्यरत अंगणवाडी कार्यकर्त्यांना व्हिडिओ असलेले एसडी कार्ड वाटप करण्यात आले. या कार्डाच्या माध्यमातून ग्रामसभा, अंगणवाडी बैठक तसेच गावातील प्रमुख कार्यक्रमात हे व्हिडिओ अंगणवाडी कार्यकर्तीने दाखविणे अपेक्षित आहे. या एसडी कार्डसोबत प्रश्नावलीचे फॉर्मही दिले आहेत. राज्यातील तीन जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या नोंदीसाठी सीब्ज नावाच्या कंपनीला नियंत्रक म्हणून नेमले आहे. वर्षभरात या कंपनीतून तीन जिल्ह्यातील कुठल्याही अंगणवाडी सेविकेला संपर्क साधून या कार्यक्रमाची माहिती विचारली जाणार आहे. जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत कार्यक्रम पोचला की नाही याची तपासणी होणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. प्रकल्प संचालक दीपक मिश्रा, नागेंद्रकुमार आदींची यावेळी उपस्थिती होती.

जिल्ह्याचे चित्र
- ३४६५ जिल्ह्यातील अंगणवाडी
- ३४६५ अंगणवाडी सेविका
- २ लाख ७५ हजार
- ६ वर्षे वयापर्यंतची मुले
- २०० तीव्र कुपोषित बालके
- ९०० मध्यम कुपोषित बालके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ मुख्याध्यापकांची अनास्था भोवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शाळांची गुणवत्ता तपासणीसाठी असलेल्या ‘शाळा सिद्धी’ उपक्रमाबाबत माध्यमिक शाळांची अनास्था चिंताजनक आहे. मुख्याध्यापकांना आपल्या शाळांना अशा उपक्रमांपासून दूर ठेवता येणार नाही. मूल्यांकनावरच या शाळांचे भवितव्य टिकून आहे,’ असे खडेबोल शिक्षण विभागाने शनिवारी झालेल्या बैठकीत मुख्याध्यापकांना सुनावले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात ही बैठक झाली. यावेळी विद्या प्राधिकरणाचे संचालक सुभाष कांबळे, उपशिक्षणाधिकारी गजानन सुसर यांची प्रमुख उपस्थिती होती. १५ सप्टेंबर रोजी ‘फुटबॉल मिशन वन मिलियन’ अंतर्गत शाळांमध्ये फुटबॉल खेळ खेळणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सरल प्रणाली अशा विविध १४ विषयांवर चर्चा, मार्गदर्शन करण्यात आले. ‘शाळा सिद्धी’बाबतच्या अनास्थेबाबत कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली. शाळा सिद्धी, सरल प्रणालीमध्ये स्टुडंट पोर्टल, स्टाफ पोर्टल, स्कूल पोर्टलमध्ये ऑनलाइन नोंदी करताना शाळा व्यवस्थापनांनी योग्य माहिती भरावी. चुकीची माहिती भरू नये असे त्यांनी सांगितले. यासह एन्सपायर्ड अवॉर्ड, एनएमएसएस शिष्यवृत्तीबाबतही माहिती देत मुदतीत अर्ज सादर करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना करण्यात आल्या.

शाळांचा दर्जा तपासणीसाठी शिक्षण विभागाने मार्च २०१६मध्ये ‘शाळा सिद्धी’ उपक्रम आणला. यात सहभागी शाळांना आपला दर्जा सादर करावा लागत. ‘अ’मध्ये असलेल्या शाळांची शिक्षण विभागाकडून तपासणी करायची आणि त्यानंतर दर्जा दिला जाणार आहे. उपक्रमात शाळांची अनास्था समोर आली आहे. जिल्ह्यातील ४५० माध्यमिक शाळांपैकी केवळ ९१ शाळांनीच सहभाग घेतला आहे.

विज्ञान शिक्षकांच्या निधीवरून वादंग
विद्या प्राधिकरणाने विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले. त्यात २६ शाळांनी सहभाग घेतला नसल्याचे कांबळे यांनी सांगितले. शैक्षणिक साहित्याचे किट घेण्यासाठी निधी देऊनही शाळा येत नसल्याचे मुद्दा मांडताच मुख्याध्यापकांनी त्यावर आक्षेप घेतला. शाळांच्या खात्यावर निधी वर्ग झाला नसल्याचे सांगत निधी गेला कोठे, असा सवाल केला. मुख्याध्यापकांचा वाढता रोष लक्षात घेत, ज्या शाळांना निधी मिळालेला नाही त्यांनी अर्ज द्यावेत, याबाबत शिक्षण विभाग पाठपुरावा करेल, असे सुसर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गंगापूर कारखाना नव्याने उभारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनेक वर्षांपासून बंद पडलेला गंगापूर सहकारी साखर कारखान्याची नव्याने उभारणी करून तो सुरू करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सभासदांच्या बैठकीत घेण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष व आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत सभासदांची कारखाना परिसरात बैठक झाली. शेती महामंडळाची जमीन कराराने घेण्याचा प्रस्ताव सभेपुढे मांडण्यात आला. गंगापूर सहकारी कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर बँकेकडून कारखाना सुरू करण्यासाठी चाचपणी करण्यात आली होती. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एका गटाने हा कारखाना सुरू करण्यासाठी अभ्यास केला. जुन्या स्थितीत असलेला कारखाना व डिस्टिलरी प्लँट सुरू करणे, कारखान्याची अर्धी मशिनरी बदलून चालू करणे आणि संपूर्ण कारखाना नव्याने उभारून सुरू करणे असे तीन पर्याय या अभ्यास गटाने संचालक मंडळासमोर ठेवले होते.

या अहवालावर चर्चा करण्यासाठी ही विशेष सभा घेण्यात आली. आवाजी मतदानाने सर्वानुमते नवीन कारखाना उभारून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभासदांकडील थकित रक्कम वसूल करणे आणि नवीन सभासद नोंदणी करणे याबाबतही सभेत चर्चा झाली, अशी माहिती कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बी. एम. पाटील यांनी दिली. यावेळी अध्यक्ष प्रशांत बंब, उपाध्यक्ष लक्ष्मण भुसारे, माजी आमदार अण्णासाहेब माने, कैलास पाटील, कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यासह कारखान्याचे संचालक, सभासद यांची मोठी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंटणखान्यावर छापा; पाच महिलांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेणपुंजी रांजणगाव परिसरात चालू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेने छापा मारत एका आंटीसह पाच महिलांना अटक केली. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

शहर गुन्हे शाखेला खबऱ्यामार्फत शेणपुंजी रांजणगाव परिसरात एक आंटी पाच महिलांसह कुंटणखाना चालवत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेने तात्काळ एक बनावट ग्राहक म्हणून एका तरुणास पाठविले. तरुणाने कुंटणखाना चालू असलेल्या ठिकाणी जाऊन आंटीला ६०० रुपये देऊन तिथील एका महिलेची निवड केली. आंटीने तरुणाने दिलेल्या ६०० रुपयांपैकी ३०० रुपये स्वतःजवळ ठेवून उर्वरित ३०० रुपये महिलेला दिला. तिला त्या तरुणासह खोलीत जाण्यास सांगितले. यानंतर तरुण थुंकण्याचा बहाणा करून बाहेर आला व त्याने गुन्हे शाखेच्या पथकाला इशारा केला. पथकाने तत्काळ घरात येऊन छापा मारला.

पोलिसांनी या महिलांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन मोबाइल व बावीसशे रुपये रोख रक्कम आढळून आली. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांनी सरकारतर्फे फिर्याद देत कुंटणखाना चालवणाऱ्या या महिलांविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडही थेट जनतेतून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन-चार महापालिका सोडल्यास राज्यातील अन्य महापालिकांची निवडणूक पाच वर्षांनंतर आहे. तो पर्यंत ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेत महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा विचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या १०९ व्या संमेलनाचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, महापौरांबाबतचा निर्णय झाल्यास औरंगाबादसह नांदेड, परभणी, लातूरला फायदा होऊ शकतो.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मध्य प्रदेशचे महसूलमंत्री उमाशंकर गुप्ता, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर परिषदेचे अध्यक्ष ग्वाल्हेरचे महापौर विवेक सेजवळकर, आमदार सतीश चव्हाण, इम्तियाज जलील, महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते गजानन मनगटे, विरोधी पक्षनेते फिरोज खान, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर उदघाटन सोहळ्यास उपस्थित होते.

‘महापौरांचे अधिकार वाढवावेत, त्यांना प्रशासकीय अधिकारांसह काही मर्यादेपर्यंत आर्थिक अधिकार द्यावेत,’ अशी मागणी घडमोडे यांनी प्रास्ताविकात केली होती. सेजवळकर, खैरे यांनीदेखील त्याचा पुनरुच्चार केला. त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरपंचांची, नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता महापौरांसंदर्भातही अशीच मागणी होत आहे. सर्वच महापालिकांसाठी हा निर्णय घेता येणे शक्य होणार नाही, पण क आणि ड वर्ग महापालिकेत जनतेतून महापौर निवडण्याचा निर्णय घेण्याचा विचार केला जाईल.’ ‘महापौरांना अधिक अधिकार देण्याचाही निर्णय घेतला जाईल,’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘महापौरांना अधिकार आहेतच, त्याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. महापालिकेच्या महासभेचे अधिकार खूप आहेत, हे अधिकार जोपर्यंत समजून घेतले जात नाहीत तोपर्यंत अधिकारांची लढाई सुरूच राहील. माजी महापौरांनादेखील सन्मान मिळावा यासाठी निर्णय घेऊ.’

‘महापालिकेतर्फे करांची वसुली झालीच पाहिजे आणि त्यातूनच विकास झाला पाहिजे,’ असा आग्रह धरून मुख्यमंत्री म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करवसुलीचे प्रमाण वाढणे शक्य आहे. कोणतीही महापालिका सरकारच्या भरवशावर चालू शकत नाही. ती सक्षम झाली पाहिजे. शहर बदलण्यासाठी सुधारणांचा स्वीकार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेऊ नका, मूलभूत विचार करून निर्णय घ्या, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. आपल्या शहरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व्हावी असे वाटत असेल तर काम पारदर्शक करा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

आराखड्यातील रस्त्यांची कामे करा

विकास आराखड्यानुसार रस्त्यांची कामे होणार असतील तरच रस्त्यांसाठी शंभर कोटींचे अनुदान देऊ, असे आपण औरंगाबादच्या महापौरांना सांगितले होते असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली तरच शहर बदलेल. विकास आराखडा प्रत्येक शहरासाठी गीता-बायबल-कुराण आहे. आरक्षणांच्या विकासाचा विचार होतो तेव्हाच विकास आराखडा आठवतो. आरक्षणांना विकास टीडीआरच्या माध्यमातून, रिझर्व्हेशन अकोमडेशनच्या माध्यमातून होणे शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे सुविधा समितीही क्रॉसिंगमुळे वैतागली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नाशिक स्टेशनची पाहणी केल्यानंतर रविवारी रात्री औरंगाबादला जनशताब्दी एक्स्प्रेसने येत असताना क्रॉसिंगसाठी दोन ठिकाणी रेल्वे थांबविण्यात आली. औरंगाबाद लोहमार्ग एकेरी असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. यामुळे हा मार्ग दुहेरी व्हावा, यासाठी आपण रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती रेल्वे सुविधा समितीचे सदस्य राकेश शहा आणि अंजू मखिजा यांनी दिली.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील सुविधांची पाहणी समितीच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळी केली. रेल्वे बोर्डाकडून नियुक्‍त करण्यात आलेल्या या समितीमध्ये राकेश शहा, अंजू मखिजा, निर्मल सिन्हा, आर. एन. शर्मा यांचा समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष लाल सिंह हे दौऱ्यावर आले नाहीत. त्यांनी औरंगाबाद स्टेशनची पाहणी केली. जुन्या इमारतीच्या बाहेरील परिसर या समिती सदस्यांना ड्रेनेजमुळे अस्वच्छ दिसला; तसेच ठिकठिकाणी प्रवाशांनी केलेल्या अस्वच्छतेबाबत या सदस्यांनी सांगितले. याशिवाय तिकीट घेणाऱ्या काही प्रवाशांशीही त्यांनी चर्चा केली. या पाहणीनंतर समितीच्या सदस्यांनी रेल्वे संघटनेच्या पदाधिकारी यांची भेट घेतली. या भेटीत ओमप्रकाश वर्मा यांनी औरंगाबाद रेल्वे स्टेशन ऐतिहासिक पर्यटन स्‍थळ आहे. हे पर्यटन स्‍थळ अन्य पर्यटन स्‍थळांशी जोडण्यासाठी कोणतीही रेल्वे चालविण्यात येत नाही. याबाबत रेल्वे विभागाने लक्ष देण्याची मागणी केली.
याशिवाय येत्या अर्थसंकल्पात मनमाड - परभणी मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्यासाठी निधी देण्याची मागणी प्रल्हाद पाटकर, शिवाजी दांडगे यांनी केली. यावेळी मेट्रो औरंगाबाद असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी देवानगरी भागातील गेट क्रमांक ५४ उघडण्याची मागणी केली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राकेश शहा यांनी, ‘गेल्या वर्षभरात समितीने १५० रेल्वे स्टेशनला भेट दिली आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले,’ अशी माहिती त्यांनी दिली. औरंगाबादच्या डबलींगसह, फेज क्रमांक दोन इमारतसह अन्य सुविधांबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती राकेश शहा यांनी दिली.

स्तनपान कक्ष उभारणार
प्रवास करणाऱ्या महिलांसोबत लहान बाळ असते. स्तनपान करण्यासाठी सुरक्षित जागा मिळावी म्हणून प्रत्येक रेल्वे स्टेशन येथे ‘बेबी फिडिंग कॉर्नर’ तयार करण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये ही सुविधा नाही. नांदेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत ही सुविधा करण्यात येईल, असे आवश्सन दिले.

रेल्वे गेटबाबत विनंती
रेल्वे गेट क्रमांक ५४ बंद करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी हमीपत्र दिल्यानंतरही रेल्वे विभाग गेट उघडले नाही. याबाबत मेट्रो औरंगाबाद असोसिएशनचे श्रीमंत गोर्डे पाटील, प्रेम खर्डीकर यांनी सदस्यांना विनंती केली. राकेश शहा आणि अंजू मखिजा या सदस्यांना ही मागणी समजली, मात्र अन्य सदस्यांना ती न समजल्याने काही वाद निर्माण झाला. या प्रकरणात देवानगरी भागातील नागरिकांनी हात जोडून आमच्या मुलांसाठी भुयारी मार्ग होईपर्यंत गेट सुरू ठेवण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजांत व्हावे लोकाभिमुख संशोधन

$
0
0

मेडिकल कॉलेजांत व्हावे लोकाभिमुख संशोधन
वैद्यकीय महाविद्यालये व आरोग्य विद्यापीठे ही काही फक्त परीक्षा मंडळे नाहीत, तर त्या त्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्या त्या भागातील जनतेच्या आरोग्य समस्यांबाबत सर्व पॅथींनी एकत्र येऊन लोकाभिमुख, मूलभूत व दिशादर्शक संशोधन होणे गरजेचे आहे. या दिशादर्शक व शास्त्रोक्त संशोधनातूनच राज्याचे तसेच राष्ट्राचे आरोग्यविषयक धोरण ठरवले गेले पाहिजे आणि त्यानुसारच आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमांचे नियोजन होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचवेळी स्थानिक-प्रादेशिक आरोग्यविषयक निकड लक्षात घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये बदल झाले पाहिजेत, असे मत एपिडेमॉलॉजी विषयावर जपानमध्ये नुकत्याच झालेल्या २१ व्या आंतरराष्ट्रीय त्रैवार्षिक परिषदेत राज्याचे प्रतिनिधित्व केलेले डॉ. मोहन डोईबळे यांनी व्यक्त केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल ७२ पेपर सादर केलेल्या डॉ. मोहन डोईबळे यांनी परिषदेनिमित व वैद्यकीय संशोधनाबद्दल ‘मटा’शी मुक्त संवाद साधला.


सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयांतील संशोधनाविषयी काय वाटते?
मुळातच आपल्या देशामध्ये संशोधनाचे प्रमाण फार कमी आहे. त्याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये सध्या जे काही संशोधन होत आहे, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या संशोधनाच्या तुलनेत अगदीच सुमार दर्जाचे आहे, असे स्पष्टपणे म्हणावे लागेल. यातील फार कमी संशोधन हे गुणात्मक आहे. मुळात संशोधनाच्या बाबतीत आपण बरेच मागे आहोत, हे मान्यच करायला पाहिजे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जे काही संशोधन होत आहे, ते फार जुजबी आणि वैद्यकीय महाविद्यालयांपुरतेच मर्यादित आहे; म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आलेल्या रुग्णांच्या केस स्टडीवरुन काढण्यात आलेले ते निष्कर्ष आहेत. याचा अर्थ ते संशोधन हे काही संपूर्ण समाजाचे किंवा समुदायाचे किंवा विशिष्ट भागाचे किंवा शहरी-ग्रामीण भागाचे म्हणता येणार नाही. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या ट्रेंडच्या आधारे थेट जनतेमध्ये व तळागाळात जाऊन मूलभूत संशोधन होणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय ते संधोशन खऱ्याअर्थाने लोकाभिमुख संशोधन होणार नाही व त्याचा फारसा उपयोगदेखील होणार नाही. थेट जनतेच्या आरोग्य समस्यांवर व्यापक व मूलगामी संशोधन झाले पाहिजे आणि अशा प्रकारचे संशोधन त्या त्या भागांतील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व्हायला पाहिजे. त्याचवेळी सर्व पॅथींचा केंद्रबिंदू हा शेवटी रुग्णच असल्याने सर्व पॅथींच्या अभ्यासकांनी एकत्र येऊन असे संधोशन का करू नये? प्रत्येक पॅथीचे वेगळे वैशिष्ट्य आहे आणि जेव्हा सर्व पॅथी एकत्र येऊन संशोधन करतील, तेव्हाच खऱ्याअर्थाने बहुआयामी संशोधन सिद्ध होईल. अर्थात, याकामी आरोग्य विद्यापीठांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन घडवून आणले पाहिजे. ती विद्यापीठांची सगळ्यात मोठी जबाबदारीदेखील आहे. दुर्दैवाने, ‘वैद्यकीय शिक्षण व संशोधन’ या विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आज अत्यल्प प्रमाणात दर्जात्मक संशोधन होते; किंबहुना संशोधन हा वैद्यकीय महाविद्यालयांचा एक अविभाज्य भाग आहे, याचा जणू सर्वांना सोयीस्कर विसरच पडला आहे. अशा प्रकारच्या संशोधनासाठी विद्यापीठांनी तसेच राज्य सरकारांनी हरतऱ्हेने प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा पुरवल्या पाहिजे. मात्र आज वैद्यकीय महाविद्यालये म्हणजे फक्त रुग्णसेवा असे जणू चुकीचे समीकरण झाले आहे. उलट जनतेच्या आरोग्यविषयक समस्या-गरजा-निकड लक्षात घेऊन मूलभूत संशोधन झाले पाहिजे आणि ते राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारले गेले पाहिजे व त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. हे प्रगत देशांमध्ये कित्येक वर्षांपासून होत आहे आणि प्रगत देशांमध्ये संशोधातून ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय धोरणात सत्ताधारी-राजकारणी-नोकरशाही कुठल्याही प्रकारची लुडबुड करत नाही किंवा सरकार बदलले म्हणून धोरण बदलल्या जात नाही. हे आपल्याकडेही व्हायला पाहिजे.
जपानमध्ये कुठल्या विषयावरील पेपर सादर केला?
जपानच्या परिषदेत ‘स्टडी ऑफ रिस्क फॅक्टर्स ऑफ प्री-एक्लामशिया’वर घाटीमध्ये झालेले संशोधन सादर केले. घाटीचे संशोधन आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर झाल्यामुळे ही मराठवाड्याच्या दृष्टीने एक प्रकारे अभिमानास्पद बाब म्हणता येईल. एकूण ७२० केसेसवरुन गरोदरपणामध्ये रक्तदाब वाढून झटके येण्याच्या आजारात कोणाला जास्त धोका आहे, याचे शास्त्रीय संशोधन सादर करण्यात आले. यामध्ये संबंधित महिलेची आई, बहिणीला हा आजार असेल, गरोदरपणात रक्तदाब वाढण्याची कुटुंबियांमध्ये अनुवंशिकता असेल व ‘ट्वीन प्रेग्नन्सी’ असेल तर ‘प्री-एक्लामशिया’चा धोका वाढतो, हे सर्व शास्त्रीय निकषांच्या आधारे सिद्ध करण्यात आले आहे.
लोकाभिमुख संशोधनाचे एखादे उदाहरण देता येईल?
डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेमार्फत गडचिरोलीतील तमाम आदिवासींच्या आरोग्य समस्यांबाबत मूलभूत व दिशादर्शक संशोधन करण्यात आले आहे. हे छोटे व प्रभावी उदाहरण नक्कीच देता येईल. अशा प्रकारच्या संशोधनातून, अर्थातच सर्व प्रकारची शहानिशा करुन त्या भागातील आरोग्यविषयक धोरण ठरविता येऊ शकते; किंबहुना ते ठरवले गेले पाहिजे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्येही बदल होणे गरजेचे वाटते?
अर्थातच. अजूनही ‘एमबीबीएस’ झालेल्या डॉक्टरला लगेचच प्रॅक्टिस करण्यासाठी आत्मविश्वास नसतो. याचाच अर्थ, समाजामधील आरोग्य समस्या व गरजांपेक्षा वैद्यकीय अभ्यासक्रम अजूनही बरेच दूर आहेत. त्यामुळेच जनतेच्या आरोग्यविषयक दृष्टिकोनातून अभ्यासक्रमांची रचना झाली पाहिजे. विदेशातील उदाहरणे व स्थिती, ही आपल्या देशात-राज्यात-प्रदेशात-विभागात सारखीच असेल असे नाही. त्यादृष्टीने विचार होणे व गरजेनुसार अभ्यासक्रम बदलत राहणे खूप गरजेचे वाटते. याचा विद्यापीठांपासून ‘एमसीआय’पर्यंत सर्वच जबाबदार संस्थांनी गांभीर्याने विचार करणे खूप गरजेचे आहे, असे प्रामाणिकपणे वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा

$
0
0

आधार महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा
शहरासह मराठवाड्यातील ४० ठिकाणी सेवा उपलब्ध होणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सरकारी कार्यालय, बँका येथे आधारकार्ड वितरण आणि दुरुस्तीची सोय करू, असे सरकारने म्हटले होते. यानुसार औरंगाबादमधील बँकांमधून ही सेवा देण्यात आहे. औरंगाबाद शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या दोन शाखांसह ४० शाखांमध्ये आधार कार्ड नोंदणी केंद्रांद्वारे ही सेवा उपलब्ध केली आहे. एक ऑक्टोबरपासून ही प्रणाली कार्यरत होईल. या‌शिवाय युनियन बँकेच्या स्टेशन रोड शाखेतही ही सेवा उपलब्ध होणार आहे. या बँकांच्या व्य‌ति‌रिक्त मात्र शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ही सोय उपलब्ध होणार नसल्याचे बँकांच्या सूत्रांनी सां‌गितले. याबद्दल आर्श्चयही व्यक्त करण्यात येत आहे.
आधारकार्ड वितरण प्रक्र‌ियेतील त्रुटी दूर व्हाव्यात, तसेच गैरप्रकार थांबावेत यासाठी यूआयडीने (युनिक आयडेंटिफिकेशन अॅथोरिटी ऑफ इंडिया) डी-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केली आहे. आधारकार्ड वितरित करणारी केंद्र रद्द करण्यासारखी कठोर कार्यवाहीही सुरू झाल्या आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील बँकांना आपल्या एकूण शाखांपैकी १० टक्के शाखांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत आधार नोंदणी केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत बँकांनी आधार केंद्र सुरू न केल्यास प्रत्येक शाखेला २० हजार रुपयांप्रमाणे दंड ठोठावण्यात येणार आहे. बँकांनी शाखांमध्ये आधार नोंदणी केंद्र उभारण्यासाठी काही कालावधी मागितला होता. यापूर्वी बँकांना आधार केंद्रांसाठी ऑगस्ट अखेरपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, आता तो कालावधी सप्टेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात आला आहे. बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र कार्यान्वित झाल्यास नागरिकांना नव्याने आधार कार्ड काढणे किंवा त्यामध्ये बदल करून घेणे सुलभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औषधी फवारणीसाठी ११५ वॉर्डात ८२ कर्मचारी

$
0
0

औषधी फवारणीसाठी ११५ वॉर्डात ८२ कर्मचारी
शहरात साथीच्या आजारांना पालिकेचे निमंत्रण
म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
औषधी फवारणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे पावसाळा आणि त्यानंतरच्या हिवाळ्यात उद्‍भवणाऱ्या साथीच्या आजारांना पालिकेकडून निमंत्रणच दिले जात असल्याचे चित्र आहे. १६ लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात ११५ वॉर्ड आहेत. या वॉर्डांमध्ये औषधी फवारणी करण्यासाठी पालिकेकडे फक्त ८२ कर्मचारी आहेत. एका कर्मचाऱ्याला दीड ते दोन वॉर्डांची जबाबदारी देण्यात आलेली असल्यामुळे त्यांना फवारणी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिकेचे प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही.
महापालिकेत आरोग्य विभागाच्या अंतर्गत मलेरिया विभाग कार्यरत आहे. मलेरिया विभागामार्फत शहराच्या विविध भागात औषधींची फवारणी करून साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवले जाते. प्रामुख्याने डास निर्मूलनासाठी या विभागातर्फे फवारणी केली जाते. शहराचा विस्तार होत असताना आणि वॉर्डांची संख्या ६० वरून ११५ पर्यंत गेलेली असताना मलेरिया विभागात कर्मचारी मात्र पूर्वीचेच आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या प्रत्येक महिन्यात कमी होत आहे. सध्या फक्त ८२ कर्मचारी फवारणीच्या कामासाठी कार्यरत आहेत. सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक नेहमीच फवारणीचा विषय उपस्थित करतात. फवारणीचे काम योग्य प्रकारे होत नसल्याचा त्यांचा आरोप असतो. फवारणीसाठी केवळ ८२ कर्मचारी कार्यरत असल्याचे आरोग्य अधिकारी वारंवार महापौर, सभापतींसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देतात. कर्मचारी वाढवून द्या असे आदेश देण्यापलीकडे या पदाधिकाऱ्यांनी काहीच केलेले नाही. ११५ वॉर्डांसाठी फक्त ८२ कर्मचारी फवारणीचे काम करीत असल्यामुळे एका कर्मचाऱ्याच्या वाट्याला दीड ते दोन वॉर्ड देण्यात आले आहेत. एका वॉर्डाची लोकसंख्या पंधरा ते वीस हजारांच्या घरात आहे. घरांची संख्या किमान दोन हजार आहे. एवढ्या मोठ्या वॉर्डासह दुसऱ्या वॉर्डाच्या अर्ध्याभागात फवारणी करणे एका कर्मचाऱ्याला शक्य होत नाही. त्यामुळे कोणत्याच वॉर्डात नियमीतपणे औषधींची फवारणी होत नसल्याचे चित्र आहे. सक्षमपणे फवारणी होत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्याचा परिणाम साथीचे आजार बळावण्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
औषधी फवारणीच्या कामासाठी असलेल्या अपुऱ्या कर्मचारीवर्गाबद्दल आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे यांना संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, शहराचा वाढता विस्तार आणि त्या तुलनेत असलेले फवारणी कर्मचारी याची सांगड घालताना कसरत करावी लागते. फवारणीच्या कामासाठी जास्तीचे सत्तर कर्मचारी द्या अशी मागणी कामगार विभागाकडे केली आहे. दोन महिन्यांपासून कामगार विभागाने त्यावर निर्णय घेतलेला नाही. वाढीव कर्मचारी मिळाल्यावर फवारणीच्या कामात सुसुत्रता येईल असे वाटते.

- शहरातील वॉर्डांची संख्या - ११५

- औषधी फवारणीसाठी आरोग्य विभागाकडे असलेले कर्मचारी - ८२

- फॉगिंग मशिन्सची संख्या - २०

- व्हेकल माउंटेड मशीन्सची संख्या - २

- स्प्रे हँडपंप - ७५

- अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी - ७०
फवारणीच्या कामासाठी कर्मचारी अपुरे असल्याचे आरोग्य विभागाने निदर्शनास आणून दिले नाही. आरोग्य विभागाने ही बाब लक्षात आणून दिली असती तर कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी अस्थापना विभागाला आदेश दिले असते. आताही वेळ गेलेली नाही. फवारणीच्या कामासाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांनी करतो. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे काम तात्काळ होऊ शकेल.
गजानन बारवाल, सभापती, स्थायी समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचाला जातीय भावनेतून त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील वडोदबाजार येथील मागासवर्गीय महिला सरपंचाच्या कामात अडथळे आणून जातीय भावनेतून त्रास देऊन मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
वडोदबाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयात ३१ ऑगस्ट रोजी मासिक बैठक सुरू असतना सरपंच छायाबाई रमेश भिवसने यांना ग्रामपंचायत सदस्य अजिनाथ भिवसने, सुनिता बिलघे यांनी केवट समाजाच्या समाज मंदिराचा मुद्दा उपस्थित करून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली, असा आरोप निवेदनात केला आहे. या मंडळींना भाजप तालुकाध्यक्ष गोविंद वाघ पाठीशी घालत आहेत. या सर्वांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वडोदबाजार सारख्या मोठ्या गावाचा कारभार हा मागासवर्गीय सरपंचांकडे असल्याने जातीय भावनेतून सरपंचाला जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बहुजन समाज पक्षाचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष भगवान गंगावणे, राहुल नवतुरे, विलास जाधव, जगदीश भोसले, अनिल इंगळे, बबन गायकवाड, रवी वाहूळ, बाबासाहेब गंगावणे, संजय मोरे, रणजीत वाहूळ, जगन प्रधान, रामदास सुरडकर यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंची कोंडी सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलेल्या पत्रात औरंगाबाद शहराचा उल्लेख ‘संभाजीनगर’ करण्यात आल्यामुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना धारेवर धरले. अखेर विद्यापीठ प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करीत वादावर पडदा टाकला. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी करीत मराठा संघटनांनी कुलगुरूंना घेराओ घातला. या आंदोलनामुळे विद्यापीठात मंगळवारी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या मुद्द्यावर शिवप्रेमी संघर्ष समिती आणि मराठा क्रांती मोर्चाने कुलगुरूंना निवेदन दिले. आक्षेपार्ह व्हॉट्स अॅपच्या आरोपावरून जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना निलंबित करण्यापूर्वी सायबर सेलकडे तक्रार करणे आवश्यक होते. कोणतीही चौकशी न करता बाह्य दबावाखाली विद्यापीठाने शिंदे यांचे निलंबन केले. ही कारवाई घटनाबाह्य, बेकायदा आणि नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध असल्याचे शिवप्रेमी संघर्ष समितीने निवेदनात म्हटले आहे. याबाबत डॉ. बाळासाहेब सराटे यांनी कुलगुरू व कुलसचिव यांच्याशी चर्चा केली; तसेच विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने उभारण्याची मागणी केली. यावेळी विकास थाले, अमोल बिपटे, संभाजी धुमाळ, गोवर्धन भुतेकर, जगदीश साबळे, संदीप भैरट, दीपक बहीर, प्रशांत इंगळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारून गलिच्छ राजकारण थांबवावे व जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना दोन्ही मुद्द्यांवर विचारणा करीत कोंडीत पकडले. शिंदे यांचे निलंबन तत्काळ मागे घेण्याच्या मागणीवर कार्यकर्ते अडून बसल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांची समजूत घातली. सध्या पुतळ्याचा विरोध आणि समर्थन करीत विविध संघटनांनी कुलगुरूंवर दबाव निर्माण केला आहे.

काँग्रेसचा ‘घेराओ’
विद्यापीठात शिवरायांचा पुतळा उभारण्याबाबत कुलगुरूंनी सोमवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला पत्र दिले. या पत्रावर औरंगाबाद आणि संभाजीनगर असा दुहेरी उल्लेख आहे. या उल्लेखावरून काँग्रेसने कुलगुरूंना घेराव घातला. स्वायत्त शासकीय संस्थेत असा उल्लेख केल्याबाबत खुलासा मागितला. खैरे यांच्या निवेदनावरील पत्ता पत्रावर टाकल्यामुळे चूक घडल्याचे सांगून विद्यापीठ प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पवार, खालेद पठाण, बाबा तायडे, अनिल माळोदे, अॅड. सुभाष देवडा, इद्रीस नबाब, मोईन कुरेशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग कॉलेजांचे करणार ऑडिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी (बाटू) संलग्नित इंजिनीअरिंग कॉलेजांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार आहे. कॉलेजांना गुणवत्तेनुसार ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे ग्रेड दिले जाणार आहेत.

तंत्रशिक्षण विभागाशी निगडित अभ्यासक्रमांच्या संस्था तंत्रशास्त्र विद्यापीठाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील ७२ शैक्षणिक संस्थांनी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून संलग्निकरण स्वीकारले आहे. त्यात राज्यातील ४८ अभियांत्रिकी कॉलेजांचा समावेश आहेत. या कॉलेजांची आता गुणवत्तेच्या निकषांवर तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी विविध तज्ज्ञांमार्फत केली जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने तज्ज्ञांच्या टीम तयार केल्या आहेत. तपासणीची प्रक्रिया या आठवड्यापासून सुरू होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बाबी तपासणार
कॉलेजांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या तुलनेत पात्र शिक्षक, प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्य, विद्यापीठाला सादर केलेल्या माहिती प्रमाणे उपलब्ध सोयीसुविधा आहेत का यांची तपासणी केली जाणार आहे. विद्यापीठाने काही सूचना कॉलेजांना केल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी केली की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. अधिकाधिक कॉलेजांनी ऑनलाइन प्रक्रियेवर भर द्यावा, अशी विद्यापीठाची भावना आहे. शिक्षकांनी तासिका घेतली की त्या विषयाच्या नोट्स ऑनलाइन उपलब्ध करून देणे कॉलेजांना बंधनकारक आहे. या सूचना विद्यापीठाने केल्या होत्या.

यंदा ११ हजार विद्यार्थी
कॉलेजांना विद्यापीठाचे संलग्निकरण घेणे बंधनकारक नाही. असे असतानाही मोठ्या प्रमाणात कॉलेजांनी विद्यापीठाचे संलग्नीकरण स्वीकारले आहे. विद्यापीठांतर्गत यंदा संलग्नित झालेल्या कॉलेजांमध्ये यंदा प्रथम वर्षाला ११ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे कॉलेज प्रशासनाने ‘मटा’ला सांगितले. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने विद्यार्थ्यांना उपकेंद्रातच आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

अभियांत्रिकी कॉलेज ः ४८
प्रथम वर्ष विद्यार्थी ः ११०००

विद्यापीठाने ठरविलेल्या निकषांवर कॉलेजांची तपासणी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया येत्या एक-दोन दिवसांत सुरू होईल. गुणवत्तेचे निकष कॉलेजांनी पाळले की नाही, हे पाहून त्यांना ग्रेड दिले जातील. कॉलेज विद्यार्थीभिमुख कसे होईल, यावर भर आहे. उपक्रेंद्रातही सर्व त्या आवश्यक सोयीसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज भासणार नाही.
- डॉ. विलास गायकर, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे गट निवडणूक अधिकारी नियुक्त

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे राज्यातील सर्व तालुके व गटांमध्ये निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत सर्व तालुकाध्यक्षांची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. त्यानंतर दिवाळीपर्यंत जिल्हाध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत पदाधिकारी नियुक्ती आचारसंहितेनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी निवडीची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी राबविणे सुरू झाले. झारखंड येथील काँग्रेस नेते संतोष सिंह यांना जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. सिंह यांनी नऊ पैकी पाच तालुक्यांत जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि मते जाणून घेतली. तालुकाध्यक्षपदासाठी अनेक दावेदार असताना काही तालुक्यांमधून एकाधिकारशाही वापरून नियुक्त्या केल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेश काँग्रेस आणि सिंह यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केला. हे प्रकरण वाढल्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रसिद्धीपत्रक काढून औरंगाबाद जिल्ह्यातील एकही तालुकाध्यक्षाची निवड अधिकृत झाली नसल्याचे कळविले. त्यामुळे गटतटातील वाद वाढले आहेत. दरम्यान, तालुका निवडणूक अधिकारी नियुक्त करून त्यांच्या पाहणीनंतर निश्चित होणारी नावे केंद्रीय पातळीवर पाठविली जातील आणि तिथूनच तालुकाध्यक्षांची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील सर्व तालुका निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया प्रशासकीय अडचणीमुळे लांबली होती. मात्र आता अखिल भारतीय काँग्रेस समितीने राज्यातील सर्व जिल्हे व शहरी भागातील गट याठिकाणी निवडणूक अधिकारी नेमले आहेत. त्यामुळे महिनाखेर ही प्रक्रिया पूर्ण होऊन तालुकाध्यक्षांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तालुकाध्यक्षांच्या निवडीनंतर जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल. पुढच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या पदावर नवीन व्यक्ती येणार की आमदार अब्दुल सत्तार कायम राहणार याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

तालुकानिहाय निवडणूक अधिकाऱ्यांची नावे

औरंगाबाद - नागभूषण वारणी
पैठण - शिवाजी बेटबोगरेकर
गंगापूर - रामचंद्र मुसळे
वैजापूर - जगदीश भोसीकर
कन्नड - हनुमंत पाटील बेटमोगरेकर
सिल्लोड - रंगनाथ भुजबळ
सोयगाव - विजय चव्हाण
फुलंब्री - श्रीराम जगदंबे
खुलताबाद - रोहिदास चव्हाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images