Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

यशवंत विद्यालातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
येथील नांदेड रोड परिसरात असलेल्या यशवंत शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे मृतदेह सारोळा शिवारातील पाझर तलावात तरंगताना आढळून आले. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. लातूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताचे मृतदह बाहेर काढले.
यशवंत शाळेमध्ये मंगळवारी पायाभूत चाचणी परीक्षा चालू होती. सुमीत दयानंद खंडागळे (वय १३ रा. बरकत नगर, लातूर), बालाजी सहदेव डोंगरे (वय १४ रा. विठ्ठल नगर, लातूर) या दोघांनी ही दुपारपर्यंत परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर ते घरी परत न जाता ते थेट सारोळा (ता. लातूर) येथील शिवारात असलेल्या पाझर तलावाकडे गेले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ते तलावाच्या आसपास गेले असावेत. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास तलावाच्या पाण्यावर दोन विद्यार्थ्यांचे प्रेत तरंगत असल्याचे लक्षात आले. लातूर ग्रामीण पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचली. या तलावाच्या शेजारी या दोन्ही विद्यार्थ्यांचे दप्तर होते. त्यावरून त्यांची ओळख पटली. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांकडे खात्री केली. तेंव्हा ही दोन विद्यार्थी सुमीत दयानंद खंडागळे व बालाजी सहदेव डोंगरे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसांत पोलिस जमादार दयानंद आरदवाड यांनी आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना तात्पुरता दिलासा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना दिलेले नामनिर्देशन रद्द करण्याच्या बीड जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट) उपाध्यक्ष न्या. एम. टी. जोशी यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. राज्य शासन, बीडचे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत नोटीस बजावली आहे. शासनाला उत्तरासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.
स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नसताना खोटे पुरावे सादर करून बोगस स्वातंत्र्यसैनिकांनी पाल्यांना शासकीय सेवेत रुजू केले होते. जिल्ह्यातील अशा १०६ पाल्य कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही कारवाई संबंधित विभागप्रमुख करणार आहेत. अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या आदेशाला सुनील साखरे, सखाराम वनवे, गणपत वनवे, भाऊसाहेब राख, सुरेश बांगर, मोहन नागरे, राजेंद्र सानप, भगवान जायभाये, अशोक राख, कैलास सोनवणे, जनार्दन भोसले, तुकाराम ननावरे, लहू पंडित व विष्णू सानप यांनी आव्हान दिले होते.
न्या. जोशी यांच्यासमोर झालेल्या प्राथमिक सुनावणीत सहा सप्टेंबरच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडली. राज्य शासनातर्फे मिलिंद महाजन काम पाहत आहेत.
---------------------
काय आहे प्रकरण
२६ नोव्हेंबर २००२-भाऊसाहेब परळकर यांची बोगस स्वातंत्र्यसैनिकांवर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका
१४ ऑगस्ट २००३- बीड जिल्ह्यातील ३४९ स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्ती वेतन बंद करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
१९ मार्च २००४-माने समितीचा अहवाल रद्दबातल ठरवून संबंधितांचे निवृत्ती वेतन पुन्हा सुरु
२२ ऑगस्ट २००५-फेरपडताळणीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पालकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोगाची स्थापना करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
६ सप्टेंबर २०१७- १०६ पाल्य कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश
१३ सप्टेंबर -पाल्यांची मॅटमध्ये धाव, अंतरिम स्थगिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते टेंडर गुपचूप नको

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाने दिलेल्या शंभर कोटीतून केल्या जाणाऱ्या रस्ते कामाच्या टेंडरमधील अटी-शर्ती मंजुरीसाठी ‘स्थायी’समोर आणा आणि त्यानंतरच टेंडर काढा, असे आदेश बुधवारी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी महापालिकेच्या शहर अभियंत्यांना दिले.

एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी आज झालेल्या बैठकीत रवींद्रनगर ते कटकटगेट रस्त्याचा समावेश शंभर कोटींच्या कामात केला आहे का, सवाल केला. राजगौरव वानखेडे, रेणुकादास वैद्य यांनी या अनुदानातून नेमके कोणती कामे सुरू केली, याचा खुलासा करण्याची मागणी केली. टेंडर निघाले का, केव्हा निघणार, एकत्रित टेंडर काढणार की विभाजन करून काढणार असे प्रश्न उपस्थित केले. सभापतींनी शहर अभियंता सखराम पानझडे यांना या संदर्भात खुलासा करण्यास सांगितले. पानझडे म्हणाले, एक टेंडर काढायचे, दोन टेंडर काढायचे की चार टेंडर काढायचे याबद्दल चर्चा सुरू आहे. अद्याप निर्णय झालेला नाही. यावर वैद्य म्हणाले, महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मॅन्युअलनुसार काम करते. त्यानुसार अनुदानाचे विभाजन किंवा एकत्रिकरण करता येत नाही. शंभर कोटींची एकच निविदा काढता येणे शक्य आहे किंवा ३१ रस्त्यांसाठी ३१ निविदा काढाव्या लागतील. डिफर्ड पेमेंटची कामे शासकीय अनुदानात मिसळता येणार नाहीत. यावर पानझडे म्हणाले, शंभर कोटींच्या कामांना शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अद्याप निधी मिळाला नाही. ठेकेदाराला कार्यादेश दिल्यानंतर शंभर कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. टेंडर डाक्युमेंट तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. टेंडर कसे आणि किती काढायचे याचा निर्णय आपण सर्वांना मिळून करायचा आहे. यावर वैद्य म्हणाले, या प्रक्रियेशी आमचा संबंध येत नाही. योग्य प्रकारे काम व्हावे, अशी आमची भावना आहे. ‘२४ कोटींचा’ अनुभव आम्ही घेतला आहे. एकाच कंत्राटदाराला काम दिल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मॅन्युअल नुसार एकत्रित टेंडर काढता येते किंवा ३१ टेडर्स काढणे शक्य आहे. टेंडरमधील अटी शर्ती स्थायी समितीसमोर ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

डावलने झाले अवघड
सभापतींनी या संदर्भात शहर अभियंत्यांना आदेश देताना टेंडरमधील अटी शर्ती स्थायीसमिती समोर ठेवा असे सांगितले. स्थायी समितीच्या मान्यतेशिवाय टेंडर काढू नका असेही बजावले. त्यामुळे स्थायी समितीला डावलून रस्त्यांचे टेंडर निघण्याची शक्यता आता मावळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना झेडपीत रणकंदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जिल्हा परिषदेचे सभागृह भाजपच्या सदस्यांनी गुरुवारी अक्षरशः डोक्यावर घेतले. जोरदार घोषणाबाजी, महिला सदस्यांनी पदाधिकाऱ्यांना घातलेला घेराव, ठिय्या आंदोलन आणि शेवटी सभेच्या कामकाजाच्या इतिवृत्ताच्या फाडून चिंधड्या केल्या. त्यामुळे ही सभा चांगलीच गाजली.
२२ जून रोजी सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेतील ठराव प्रोसिडींग बुकमध्ये घेतले नाहीत. त्यात बदल केल्याच्या मुद्दयावरून भाजपच्या सदस्यांनी सभेच्या सुरूवातीला आक्षेप नोंदवत घोषणाबाजी सुरू केली. हे आंदोलन सुरू असतांना अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी विषय पत्रिका वाचन करून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांकडून मंजुरी घेऊन अवघ्या काही मिनिटात वंदे मातरम सुरू केले.
सभेच्या प्रारंभी स्व. बद्रीनारायण बारवाले यांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. राहुल लोणीकर यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. सभेला प्रारंभ होताच भाजपचे सदस्य राहूल लोणीकर व शालीकराव म्हस्के यांनी मागील सभेच्या वृतांतामधील अनेक मुद्दे ठरावात आले नसल्याचा आक्षेप करून संबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्याने येथूनच संघर्षाला सुरूवात झाली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहातील स्थायी समिती व सर्व साधारण सभांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याची मागणी भाजपच्या सदस्यांनी एका निवेदानाद्वारे आयुक्तांकडे केली. जालना जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २२ जून रोजी झाली होती. या सभेत चर्चा सत्रात ज्या चर्चा झाल्या व सदस्यांनी ज्या सूचना सभागृहात मांडल्या त्या सूचना व संबधीत चर्चेचे विषय १४ सप्टेंबर रोजीच्या आयोजीत सर्व साधारण सभेच्या प्रोसीडीन बुकमध्ये येणे अपेक्षित होते. परंतु जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासनाने प्रोसिडींगमध्ये बदल करून २२ जून रोजी आठ तास झालेल्या सभेचे प्रोसिडींग केवळ आठ पानाची केली. त्यामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सूचनांना बगल देण्यात आली. या आनुषंगाने आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये आक्षेप घेतला असता, सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी व प्रशासनाने बहुमताच्या जोरावर पंधरा मिनिटात सभा संपवून सभागृह सोडले. जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासावर चर्चा करण्यासाठी तीन महिन्यातून एकवेळेस होणाऱ्या सर्व साधारण सभेमध्ये विषय मांडले जातात, परंतू पदाधिकारी व प्रशासन ही सभा दडपशाहीने व चुकीची भूमीका घेतली असून, या सर्व साधारण सभेत विषयांची मंजुरी ही नियमबाह्हय आहे. यामुळे ही सभा रद्द करावी त्या सर्व विषयांना नव्याने सर्वसाधारण सभा बोलावून त्यामध्ये ठेवावे, व भविष्यात होणाऱ्या सर्व साधारण सभेमध्ये आशा प्रकारे कामकाज चालविण्यात येऊ नये त्या करिता व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे अशी मागणी राहूल लोणीकर, लता चव्हाण, महेंद्र पवार, चंद्रकात साबळे, शालीकराम म्हस्के, आशा पांडे, सुनिता सपकाळ, गंगासागर पिंगळे, रेणुका हनवते, अरुणा वाघ, उषा तोडावत, रोहिणी बोराडे, कुर्शीवर्ती जाधव, शैला पालकर, वैजयंती प्रधान, छाया माने, सुभाष देशमुख, विठ्ठल चिंचपुरे, गणेश फुके, नीला लोखंडे, विष्णू फुटाटे, अवधूत खडके यांनी केली. या निवेदानावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्हा परिषदेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी आहे. भाजप सदस्यांचा विरोध नोंद करण्यात यावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही असा काही प्रकार झाला असून तो चुकीचा आहे.
अनिरुद्ध खोतकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, जालना.


भाजप सदस्यांच्या एकजुटीची वेगळीच चर्चा
जिल्हा परिषदेच्या राजकारणात पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या गटातील सर्व सदस्यांनी सभागृहामध्ये गुरुवारी एकजूट दाखवली. राहूल लोणीकर यांच्या बरोबरीने आशा पांडे अगदी सरसावून पुढे होत्या. भाजपच्या सदस्यांच्या एकजूटीची वेगळीच चर्चा या आंदोलनानंतर सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना लढवणार सर्व ग्रामपंचायती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात होत असलेल्या २१६ ग्रामपंचायत व सरपंचपदाची निवडणूक शिवशाही ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून शिवसेना लढवणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपासून विनोद घोसाळकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या काळात त्यांनी पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या बैठका घेतल्या. ग्रामपंचायतींचा आढावा घेतला. त्यानंतर गुरुवारी पत्रकार परिषदत घेऊन शिवसेनेच्या तयारीची माहिती दिली. घोसाळकर म्हणाले, आता सरपंचांची थेट निवडणूक होणार असल्याने ग्रामपंचायतींना महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेतर्फे शिवशाही विकास पॅनलच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविल्या जाणार आहेत. सरपंचपदाची निवडणूक देखील याच पॅनलतर्फे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या गावाने निर्णय घेतला किंवा विनंती केली, तर त्या गावात शिवसेना निवडणूक लढवणार नाही; पण बहुतेक ठिकाणी उमेदवार उभे केले जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या ७५ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आहेत. निवडणुकीनंतर त्यात वाढ होईल, असा दावा त्यांनी केला. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे संघटक राजू वैद्य उपस्थित होते.

कर्जमुक्तीचा मुद्दा

ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, नुकतेच सुरू झालेले भारनियमन हे मुद्दे असल्याची माहिती संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दिली. भारनियमनामुळे कर्जमुक्तीचे अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने करार मोडला, तरी महापौर शिवसेनेचाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद महापालिकेतील विविध पदांच्या निवडणुकीसाठी शिवसेना व भारतीय जनता पक्षाचा करार झाला आहे. भारतीय जनता पक्षाने हा करार मोडला, तरी आगामी महापौर शिवसेनेचाच असेल, असा दावा शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महापौरपदाची निवडणूक होणार आहे. शिवसेना - भाजपमध्ये झालेल्या करारानुसार पुढील अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेकडे असेल. सध्या भाजपचा महापौर आहे. पुढील अडीच वर्षे महापौरपदाचा कार्यकाळ देखील भाजपलाच मिळावा या दृष्टीने भाजप नेते, पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पत्रकारांनी घोसाळकर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘महापालिकेसंदर्भात शिवसेनेचा भाजपबरोबर पाच वर्षांचा करार झाला आहे. या करारानुसार आगामी महापौर शिवसेनेचाच होणार आहे. भाजपने करार मोडला तरी शिवसेनेचाच महापौर होईल. त्यासाठी काही जणांची मदत घ्यावी लागेल.’

आमदार हर्षवर्धन जाधव, प्रताप पाटील चिखलीकर यांना समज देण्यात आली आहे, तरीपण आम्ही आमची तयारी ठेवली आहे, असे सूचक विधान घोसाळकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखभर नागरिक अवयवदानास सज्ज

$
0
0

लाखभर नागरिक अवयवदानास सज्ज
अवयवदानाच्या फॉर्ममधून अवयवदानाची सुप्तेच्छा नातेवाईकांसाठी उघड; ‘नोटो’च्या वेबसाईटवरही थेट नोंद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागच्या दीड-पावणेदोन वर्षांपासून औरंगाबाद शहरात सुरू झालेल्या अवयवदान मोहिमेत आतापर्यंत १३ ब्रेन डेड रुग्णांनी हृदय, यकृत, मूत्रपिंड, बुब्बुळ आदी ४५ अवयवांचे दान केले आहेच; शिवाय तब्बल दीड लाखापेक्षा जास्त नागरिक अवयवदानासाठी इच्छुक असून, त्यांनी ‘झेडटीसीसी’मार्फत, वेगवेगळ्या शासकीय-खासगी रुग्णालयांमार्फत अवयवदानाचे फॉर्म भरले आहेत. काहींनी ‘नोटो’च्या वेबसाईटवर अवयवदानाची नोंद करुन अवयवदानाची इच्छा व्यक्त केली आहे. फॉर्म भरले म्हणजे अवयवदान झालेच, असे नसले तरी नागरिक अवयवदानासाठी इच्छुक आहेत आणि त्यांची अवयवदाची सुप्तेच्छा नातेवाईकांना सर्वश्रुत होऊन वेळ आल्यावर त्यांची अखेरची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता नक्कीच वाढते, असेही मानले जात आहे.
मागच्या वर्षी म्हणजेच १५ जानेवारी २०१६ रोजी मराठवाडा-विदर्भ-खान्देशातील पहिले अवयवदान औरंगाबादेत झाले आणि त्या दिवसापासून अवयवदानाविषयी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली. त्याच सुमारास स्थापन झालेल्या ‘झोनल ट्रान्स्प्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी’मार्फतही (झेडटीसीसी) अवयवदानाचा प्रचार-प्रसार सुरू झाला. मराठवाडा-विदर्भ-खान्देशातील पहिला अवयवदाता राम मगर याच्या अवयवदानानंतर हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे झालेल्या अवयवदात्याच्या कुटुंबियांच्या सत्कारावेळी अवयवदानाविषयी खास कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी अवयवदानाविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली होती. त्यानंतरही वेळोवेळी विविध शाळा-महाविद्यालयांमधून तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय स्तरावरही मागच्या वर्षापासून महाअवयवदान उपक्रम राबविण्यात येत आहे. अलीकडे प्रत्येक कार्यक्रमाअंतर्गत अवयवदानाचे फॉर्म वाटप मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून आतापर्यंत १३ ब्रेन डेड रुग्णांकडून सुमारे ४५ अवयवांचे दान झाले आहे.
प्रमाण ०.०५ वरुन ०.०१ टक्क्यांवर
भारतामध्ये साधारणतः एक ते दीड दशकापासून ब्रेन डेड रुग्णांकडून अवयवदान होत आहे. त्यामध्ये तमीळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा या सहा राज्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणात ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान होत आहे. जनजागृतीमुळेच अवयवदान वाढत असून, मागच्या काही वर्षांत अवयवदानाचे प्रमाण ०.०५ टक्क्यांवरुन ०.०१ टक्क्यांवर म्हणजेच दुपटीने वाढले आहे. देशातील अवयवदान दुपटीने वाढल्याचा आनंद असला तरी प्रगत देशांच्या तुलनेत हे प्रमाण अतिशय कमी आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये अवयवदानाचे प्रमाण २० टक्क्यांवर पोहोंचले आहे. एवढेच नव्हे तर ब्रेन डेड रुग्णांच्या तुलनेमध्ये मृत्युपश्चात केले जाणारे नेत्रदान अतिशय सोपे-सुटसुटीत आहे; तरीदेखील देशातील नेत्रदान काही मोजक्या टक्क्यांच्या पुढे जात नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर अवयवदानाच्या बाबतीत आपल्याला फार मोठा पल्ला गाठायचा आहे, असेही ‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी म्हणाले.
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जनजागृती
सद्यस्थितीत काही औद्योगिक कंपन्यांमध्ये अवयवदानाविषयी जनजागृती केली जात असून, अवयवदानाची शास्त्रशुद्ध माहिती देणे, शंकांचे निरसन करणे, अवयवदानाचे कार्ड वाटप करणे, फॉर्म भरुन घेणे किंवा ‘नोटो’च्या बेवसाईटवर नोंद करण्यास प्रोत्साहन देणे, असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे, असे ट्रान्स्प्लान्ट को-ऑर्डिनेटर मनोज गाडेकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

एखाद्या व्यक्तीने अवयवदानाचा फॉर्म भरला म्हणजे संबंधित व्यक्तीने अवयवदानाची इच्छा प्रकट केली आहे आणि अशी इच्छा फॉर्मच्या किंवा ‘डोनर कार्ड’च्या निमित्ताने संबंधितांच्या नातेवाईकांना स्पष्ट झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे तशी वेळ आल्यास नातेवाईकांना अवयवदानाचे स्मरण राहू शकते किंवा अवयवदानाबाबत सुचविल्यास नातेवाईकांची तशी मानसिकता तयार होऊ शकते. त्यामुळे फॉर्म भरणे-भरुन घेण्यातून जनजागृती नक्कीच होत आहे.
– डॉ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, झेडटीसीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा कारमधून कारटेपची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कारच्या काचा फोडत चोरट्यानी १५ कारमधील महागडे कार टेप लंपास केले. हा प्रकार मंगळवारी रात्री वेदांतनगर, समर्थनगर भागात घडला. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
समर्थनगर येथील प्रकरणात दिनेश शरदचंद्र अभंग (वय ४२ रा. समर्थनगर) यांनी तक्रार दाखल केली. अभंग यांनी त्यांची कार घरासमोर उभी केली होती. त्यांच्या शेजारी इतर शेजाऱ्यांच्या सहा कार उभ्या होत्या. यावेळी चोरट्यानी चालकाच्या बाजुच्या डाव्या साइडच्या काचा फोडल्या, यानंतर सोनी, पायोनेर, जेवीसी आदी कंपनीचे सात कार टेप चोरले. समर्थनगर प्रमाणेच चोरट्यांनी वेदांतनगर, बन्सीलालनगर भागात देखील धुमाकूळ घातला. वेदांतनगर, कोकणवाडी व बन्सीलालनगर भागात सहा कारच्या काचा फोडून टेप पळवण्यात आले. या प्रकरणी काकासाहेब रामनाथ कोरडे बोराडे (रा. वडगाव ता. गंगापूर) या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाईच्या आवाजाची जादू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘हवां के झोके’, ‘बस मुझे सुनते रहना’, ‘इश्क सुफियाना’ अशा नव्या गीतांपासून ते ‘आईए मेहरबां’ अशी बहारदार गाणी आपल्या आवाजात गात तरुणाईने रोटरी युवक महोत्सवाचा पहिला दिवस गाजवला. ‘सोलो सिंगिंग’मध्ये ५०पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेत आपल्या आवाजाची जादू पेरली.
संत एकनाथ रंगमंदिरात हा महोत्सव सुरू आहे. उद्‍घाटन सोहळ्यानंतर पहिल्या दिवशी स्पर्धक अधिक असल्यसाने सायंकाळी उशिरापर्यंत सोलो सिंगिंगचीच स्पर्धा रंगली. एकाहून एक सरस हिंदी, पॉप गीते आपल्या आवाजात सादर केली. विविध कॉलेजच्या या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. ‘सोचा है’, ‘हस मत पगली’ सारख्या नवनवीन चित्रपटातील गीतांसह जुन्या काळातील बहारदार हिंदी गीतातून महोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेले. १६ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात सोलो डांस, ग्रुप डान्स, रॉक बँड अशा स्पर्धांमधून ५००पेक्षा अधिक तरुण-तरुणी आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. स्पर्धेचे आकर्षण असते ते मिस्टर व मिस. रोटरी इलाइट

नवे मार्ग शोधून सर्वांगीण विकास घडवा ः वैद्य
चाकोरीबद्ध मार्गाने वाटचाल करून स्वतःमधील प्रतिभेला पुरेपूर वाव मिळण्याच्या संधी आपण मर्यादित करीत असतो. तारुण्य म्हणजे उत्साह, उल्हास, नाविन्याचा खळाळता प्रवाह. याला योग्य दिशा देऊन स्वतःचा, समाजाचा देशाचा सर्वांगीण विकास घडवू शकतो, असे प्रतिपादन रोटरीचे प्रांतपाल सुहास वैद्य यांनी केले. ते उद्‍घाटनाच्या सोहळ्यात बोलत होते. व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष नरेंद्र खंडेलवाल, नितीन कंधारकर, प्रकल्प प्रमुख अमित कोरडे, मिलिंद सेवलीकर, अजिंक्य उजळंबकर, शैलेश तुळजापूरकर आदी उपस्थित होते. वैद्य यांनी आपल्या मार्गदर्शनात विविध क्षेत्रांतील संधींबाबत माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावाचा खून; नियमित जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भावाचा गळा दाबून खून करणाऱ्या आरोपी भावाचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी फेटाळला.
योगेश रामलाला पाटील व त्याचा लहान भाऊ धनराज रामलाल पाटील हे दोघे वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये कामाला होते. २० मे २०१७ रोजी दोघे कंपनीत काम करत होते. योगेश हा रात्री कंपनीत पलंगावर झोपलेला असताना धनराज याने त्याचा गळा आवळून खून केला. मुख्य जमादार समशोद्दीन सिद्दीकी यांच्या तक्रारीवरुन धनराज पाटील याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांनी तपास करून धनराज पाटील याला २५ मे रोजी अटक केली. त्याचबरोबर योगेशच्या शवविच्छेदन अहवालामध्ये गळा आवळलाच्या व गळ्यावर अनैसर्गिक जखमा आढळून आल्या. तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दोषरोपपत्र दाखल केले. दरम्यान, धनराज पाटील याने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी, आरोपीला नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील ज्ञानेश्वरी नागुला यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळळा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर तिढा सुटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास आंबेडकरी पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. दोन समाजातील तेढ टाळण्यासाठी गुरूवारी सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांचे निलंबन पंधरा दिवसात मागे घेणार आणि अधिसभा निवडणुकीनंतर शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी नियोजित आंदोलन रद्द केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला होता. समर्थक आणि विरोधकांचा दबाव वाढल्यामुळे विद्यापीठात तणाव निर्माण झाला होता. काही आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर मराठा संघटनांनी आंदोलनाची तयारी केली होती. या संघटना शुक्रवारी विद्यापीठावर मोर्चा काढणार असल्यामुळे परिस्थिती चिघळली होती. पोलिस प्रशासनानेही अधिक खबरदारी घेतली होती, मात्र विद्यापीठ प्रशासन आणि आंबेडकरी संघटनांनी समन्वयाने तोडगा काढत हा तिढा मिटवला. आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि नेत्यांची ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार यांच्या अध्यक्षतेखाली सुभेदारी विश्रामगृहात गुरुवारी दुपारी चार तास बैठक झाली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे समर्थन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवराय समस्त बहुजनांचे प्रेरणास्त्रोत आहेत, मात्र काही लोकांनी जाणीवपूर्वक दोन महापुरूषांच्या आडून जातीय तेढ वाढवली आहे. हा वाद टाळत आंबेडकरी जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे समर्थन केले आहे. पुतळ्याचा वाद निर्माण करून दंगली पेटवण्याचे कारस्थान संघ-भाजप, शिवसेना यासारख्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या पक्ष-संघटनांनी आखले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या वादात हात धुवून घेत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. आंबेडकरी जनतेचे विद्यापीठाशी भावनिक नाते असून, नामांतर लढ्याच्या जखमा सुकलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत आंबेडकरी जनतेला भडकावण्याचे काम काही संघटना करीत आहेत. ५७ मोर्चे काढूनही मागण्या मान्य न झालेल्या मराठा समाजाचा रोष सरकारवरून दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप-सेना वादाला खतपाणी घालत असल्याचे मत कार्यकर्त्यांनी मांडले. मराठा विरुद्ध बौद्ध वाद पेटवण्याचा राजकीय डाव हाणून पाडण्यासाठी दोन्ही समाजाने सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे (डेमोक्रेटीक) प्रदेश अध्यक्ष रमेश गायकवाड, मुकुंद सोनवणे, साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे, रिपाइं (ए) श्रावण गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष के. व्ही. मोरे, माजी नगरसेवक कृष्णा बनकर, नगरसेवक कैलास गायकवाड, भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, माजी पोलिस अधिकारी दौलतराव मोरे, भारतीय महासभेचे अध्यक्ष अशोक कांबळे, भीमसेन कांबळे, प्रा. विजयकुमार घोरपडे, सिद्धार्थ मोकळे, मेघानंद जाधव यांच्यासह आंबेडकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचा शुक्रवारचा नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. चोपडे यांनी मोर्चा समन्वयकांशी सायंकाळी चर्चा करून मागण्या मान्य केल्या, अशी माहिती समन्वयक किशोर चव्हाण यांनी दिली. येत्या १५ दिवसांत जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांचे निलंबन मागे घेण्यात येईल आणि दोन महिन्यांनंतर शिवरायांच्या पुतळ्याचे काम सुरू होईल, असे चोपडे म्हणाले.

स्मारकाचे काम सुरू करा
विद्यापीठ प्रशासनाने तातडीने नामांतर शहिदांचे स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरू करावे, मात्र यानंतर विद्यापीठ परिसरात कुठल्याही पुतळ्याची स्थापना करण्यात येणार नाही, असा ठराव विद्यापीठाने जाहीर करावा, अशी भूमिका बैठकीचे अध्यक्ष दिनकर ओंकार यांनी मांडली. दोन्ही समाजाने अस्तित्वाचे आणि विकासाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे. भावनिक राजकारणात तरूणांना अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संधीसाधू पक्ष-संघटनांचा धिक्कार करावा, असे आवाहन आंबेडकरी नेते व कार्यकर्त्यांनी केले.

‘एसएफआय’चे समर्थन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास विरोध नाही, मात्र हा मुद्दा अस्मितेचा करून दोन समाजात वितुष्ट पसरवल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे समाजविघातक शक्तींनी जातीचे राजकारण विद्यापीठाबाहेर करावे. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नये, अशी भूमिका स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड यांनी मांडली. विद्यापीठात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुतळ्याच्या राजकारणामुळे विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण कलुषित झाले आहे, असे राठोड म्हणाले. राजकीय हस्तक्षेप रोखण्यात अपयश आल्यामुळे शैक्षणिक वातावरण गढूळ झाले आहे. या प्रकाराला कुलगुरू जबाबदार असल्याचा आरोप ‘एसएफआय’ने केला. यावेळी जिल्हा सचिव अभिमान भोसले, उपाध्यक्ष स्टॅलिन आडे, प्राजक्ता शेटे, सत्यजीत मस्के, लोकेश कांबळे, ओम पुरी, रेखा काकडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या अंतिम फेरीला प्रतिसाद कमी

$
0
0

अकरावीच्या अंतिम फेरीला प्रतिसाद कमी
प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक आज
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अंतिम फेरी गुरुवारपासून सुरू झाली. ‘एटीकेटी’ विद्यार्थ्यांसह सर्वांनाच संधी असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. अंतिम फेरीला प्रतिसादच नसल्याने शिक्षण विभाग शुक्रवारी उच्चमाध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापक, प्रााचर्यांची बैठक घेणार आहे. अद्यापही शहरातील १० हजार १६ जागा रिक्त आहेत.

यंदा औरंगाबाद महापालिका हद्दीत प्रथमच अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. ९ जूनपासून प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रियेत अंतिम फेरीला गुरुवारपासून सुरुवात झाली. प्रारंभी चार नियमित फेरी, समुपदेशन फेरी, प्रथम येणाऱ्या प्राधान्य यानंतर मागील आठवड्यात विशेष फेरी-१ आणि २ अशी घेण्यात आली. त्यानंतर या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या फेरीत १६ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जातील बदल करता येईल. गुरुवारी पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रवेशासाठी फिरकलेच नाहीत. १८ ला रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांना १९ ते २५ पर्यंत फेरीमध्ये ऑनालाइन क्लिक करून अॅलोकेशन मिळवता येणार आहे. तर, प्रत्यक्ष प्रवेशासाठी १९ ते २५ पर्यंत विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली आहे. अंतिम फेरी असली तरी, सध्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. फेरी लांबल्याने विद्यार्थी इतरत्र वळाले. एवढ्या फेरीनंतरही शहरातील १० हजार १६ जागा अद्याप रिक्त आहेत.

मुख्याध्यापक, प्राचार्यांची बैठक आज

ऑनलाइन प्रवेशाची ही फेरी अंतिम आहे. रिक्त जागांचा आकडाही मोठा आहे. या फेरीबाबत मुख्याध्यापक, प्राचार्यांना माहित व्हावे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगावे याबाबत शिक्षण विभाग शुक्रवारी बैठक घेणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकारी सुत्रांनी ‘मटा’ला सांगितले. प्रक्रियेतील अडचणी, प्रवेश रिक्त जागा याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे रिक्त जागांचा आकडा वाढला. त्यामुळे मुख्याध्यापक, प्राचार्यांमध्ये रोष आहे.

प्रवेशाची स्थिती

कॉलेज......... १०२

प्रवेश क्षमता.... २६४२५

अर्ज............. १६४९३

केंद्रीय प्रवेशातून प्रवेशित विद्यार्थी...१३४६५

कोट्यातील प्रवेश.....२९४४

एकूण प्रवेश घेतलेले विद्यार्थी.....१६४०९

रिक्त जागा.............१००१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयित दहशतवाद्यांना कोर्टात करणार हजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‌हिमायतबाग येथील चकमक प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या तीन संंशयित दहशतवाद्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. २६ मार्च २०१२ रोजी घडलेल्या या घटनेत एक संशयित दहशतवादी ठार व पोलिस जमादार जखमी झाला होता. सिमीचा संशयित अबरारखानला आणण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक अहमदाबादला रवाना झाले आहे.
२६ मार्च २०१२ रोजी हिमायतबाग परिसरात दहशतवाद विरोधी पथक व सिमीच्या तीन संशयित दहशतवाद्यामध्ये चकमक झाली होती. खंडवा, मध्यप्रदेश येथून ते शहरातील एकाला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. तत्कालीन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी व पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. यामध्ये संशयित दहशतवादी अझर कुरेशी याचा मृत्यू झाला होता. मोहम्मद अबरारखान उर्फ मुन्ना व खलील खिल्जीला ताब्यात घेण्यात आले होते. या वेळी अबरारच्या गोळीबारात दंडाला जखम झाल्याने एटीएसचे जमादार शेख आरेफ हे गंभीर जखमी झाले होते, तर निरीक्षक ठाकरे यांच्या गोळीबारात खलील खिल्जीच्या दोन्ही पायात गोळ्या लागल्या होत्या. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी जखमी खलील खिल्जीचे वडील अखील खिल्जी यांना बुलडाणा येथील सैलानी बाबा दर्गा परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. या चारही संशयित आरोपींवर पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी तसेच जमादार आरेफ गंभीर जखमी झाल्यामुळे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच वर्षानंतर या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. या आरोपींपैकी अखील खिल्जी व खलील खिल्जी हर्सूल कारागृहात असल्याची माहिती एसीपी रामेश्वर थोरात यांनी दिली.

पथक रवाना

संशयित आरोपी अबरारखान हा गुजरात पोलिसांना देखील वाँटेड असल्याने त्याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अबरारखान हा सध्या अहमदाबाद येथील जेलमध्ये आहे. शुक्रवारी या आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. संशयित अबरारखानला आणण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक अहमदाबाद येथे पाठवण्यात आल्याची माहिती एसीपी रामेश्वर थोरात यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीत बाजरी, मुगाची आवक वाढली

$
0
0

बाजार समितीत बाजरी, मुगाची आवक वाढली
शेतकऱ्यांना दिलासा
म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद जाधववाडी येथे गेल्या चार दिवसांपासून बाजरी आणि अख्खे मुग यांची आवक तिपटीने वाढली आहे. रोज सरासरी १५६ ते १६० क्विंटल बाजरी तर रोज सरासरी ५६ ते ६० क्विंकल मूग येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला याचा दिलासा मिळाला आहे. अडत्यांनी बाजरीला ११२५ ते ११३० रुपये क्विंटल भाव दिला आहे. मूग ४००० ते ५००० रुपये क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा, जालना, जळगाव, वैजापूर, औरंगाबाद जिल्हयासह काही प्रमाणात नाशिक-नगरहून मुगाची आवक होत आहे. मराठवाडा आणि विदर्भातून आलेल्या अख्ख्या मुगाला चांगल्या व उच्च दर्जाचे मूग मानले जाते. रोज किमान १२५ क्विंटलच्या वर माल येत आहे. बाजरीची आवक मराठवाड्यातून होत आहे. काही प्रमाणात सोयगाव, जळगाव या पट्ट्यातूनही बाजरी येत असल्याचे अडत व्यापारी हरीष पवार यांनी सांगितले. शेतकरी वर्गाला बाजरीसाठी मात्र ११२५ ते ११३० रुपये क्विंटल या भावानेच विकावे लागत आहे. बाजरीची व मुगाची आवक या सप्टेंबर महिन्यात वाढत असते. यानंतर ज्वारी आणि गहू काही प्रमाणात येणे सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५० बँक कर्मचारी जाणार दिल्लीला

$
0
0

१५० बँक कर्मचारी जाणार दिल्लीला
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज‌ असोसिएशन आणि बँक कर्मचारी फेडरेशनद्वारे १५ सप्टेंबरला ‘मार्च ऑन पार्लमेंट’ होणार आहे. एआयबीईएने घेतलेल्या निर्णयानुसार यात ५० हजार बँक कर्मचारी सहभागी होतील. ज्यात महाराष्ट्रातून २००० बँक कर्मचारी अधिकारी जाणार अाहेत. या ‘मार्च ऑन पार्लमेंट’साठी औरंगाबाद शहरातून सुमारे १५० कर्मचारी जाणार असल्याची माहिती एआयबीईएचे राष्ट्रीय सचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली.
तुळजापूरकर म्हणाले, ‘सरकारच्या बँकिंग विषयक धोरणांच्या विरोधात लढाईचा हा टप्पा आहे. महाराष्ट्र स्टेट फेडरेशनने सध्याच्या परिस्थितीत बँकिंग विषयक धोरणाचा विचार गांभिर्याने करायचा ठरवला आहे. यानुसार महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या जनरल कौन्सिलची बैठक जून महिन्यात अहमदनगर येथे पार पडली होती. बैठकीत सरकारच्या बँकिंग विषयक धोरणाविरोधात यल्गार पुकारण्यात आला होता. यानुसार हा ‘मार्च ऑन पार्लमेंट’ होत आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात थकित कर्जाच्या विरोधात अभियान राबविण्यात आले आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात करण्यात आली होती. ज्यात त्या-त्या जिल्ह्यातून मोठ्या १० थकित कर्जदारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. त्यांच्या घरासमोर, कार्यालयासमोर निदर्शने, धरणे, मोर्चे आदी कार्यक्रम झाले. दरम्यान स्टेट फेडरेशनच्या वतीने बँकिंग विषयावर मुंबई येथे शिखर परिषद झाली असून यानंतर हा ‘मार्च ऑन पार्लमेंट’ होत आहे. शहरातील एसबीआय, बँक ऑफमहाराष्ट्रसह नामांकित राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी दिल्लीस जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जमाफी अर्जासाठी आज शेवटचा दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरण्याचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. शेतकऱ्यांकडे अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस राहिल्याने गुरुवारी तालुक्यातील सर्व अर्ज भरणा केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेचे दिसून आले.
राज्य शासनाने शेतकरी संपानंतर शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी शेतकरी दाम्पत्याला १५ सप्टेंबरपर्यंत सेतू केंद्र, ऑनलाइन सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्रातून अर्ज भरावा लागणार आहे. पण, सर्व्हर डाउन, आधार क्रमांक नमूद न होणे, बोटांचे ठसे न उमटणे, कागदपत्रे, केंद्रावरील गर्दी, बायोमेट्रिक मशीन-संगणकात बिघाड, विजेचा लपंडाव यामुळे शेतकऱ्यांसमोर सुरुवातीपासून अर्ज भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानंतरही शेतकरी सहकुटुंब पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत केंद्रावर हजेरी लावून अर्ज भरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आता एकच दिवस राहिल्यामुळे रांगा वाढल्या आहेत.

शेतकऱ्यांना चिंता

कर्जमाफीसाठी केलेल्या अर्जांपैकी दहा लाख शेतकरी बोगस असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. अर्जाचे जिल्हापातळीवर ऑडिट केले जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना चूक झाली काय, अशी शंका शेतकऱ्यांना येत आहे. शिवाय अर्ज नामंजूर होण्याची चिंताही त्यांना सतावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तहसीलदाराला अपमानास्पद वागणूक प्रकरणी चौकशी व गंगाखेड येथे तलाठ्याला मद्यधुंद अवस्थेत मारहाण करणाऱ्या पोलिस निरीक्षकास परभणी पोलिस मुख्यालयात हलवण्यात आल्याने महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुकारलेले लेखणीबंद आंदोलन गुरुवारी मागे घेतले. ही माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे डी. एम. देशपांडे व महेंद्र गिरगे यांनी दिली.
राहुल गांधी यांच्या दौऱ्याप्रसंगी कर्तव्यावर असलेले परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडकर यांना अपर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी धक्काबुक्की करून अपमानास्पद वागणूक दिली. तसेच गंगाखेड येथील कर्तव्यावर असणारे तलाठी शिवाजी मुरकुटे यांना मद्यधुंद अवस्थेत मारहाण करणारे पोलिस निरीक्षक गंगाखेडे, सोपान शिरसाठ यांना तत्काळ निलंबित करावे व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी यामागणीसाठी बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले होते.
दरम्यान, परभणी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आठ दिवसांत चौकशी करून विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर करावयाचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ भारनियमनामुळे पाण्याचे वेळापत्रक कोलमडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरणने सुरू केलेल्या भारनियमनामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा एकदा कोलमडणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. पंप हाउस परिसरातही भारनियमन सुरू केल्याने पाणीबाणी अटळ आहे.

शहरात सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी सलग २४ तास वीज पुरवा, अशी मागणी करत महापालिकेचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी आज महावितरणला साकडे घातले. मात्र, आम्ही फक्त सलग आठ तास वीज पुरवू शकतो, असे म्हणत अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी हतबलता व्यक्त केली.

भारनियमामुळे पाणी पुरवट्यावर परिणाम होत असल्याने चहल यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत त्यांना पाण्याचे वेळापत्रक सादर केले. पंप हाउसला चोवीस तास वीज पुरवठा करण्याची मागणी केली. अन्यथा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली. ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतले फिडर वगळता सी ते जी तीन दरम्यान असणाऱ्या पंप हाउसवर भारनियमन सुरू आहे. मात्र, या भागात सलग चोवीस तास वीज पुरवठा शक्य नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

१४ कोटी युनिटचा रोज वीज तुटवडा
‘राज्यात वीज निर्मितीसाठी कोळशाचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने शहराला रोज १४ कोटी युनिटचा वीज तुटवडा भासत आहे,’ अशी माहिती अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिली. अग्रवाल म्हणाले, ‘औरंगाबादला रोज दोनशे मेगा युनिट म्हणजेच २० कोटी युनिट विजेची गरज आहे. सध्या फक्त सहा कोटी युनिट म्हणजेच साठ मेगा युनिटमध्ये ही गरज भागवावी लागत आहे. शहरात दोन लाख ८२ हजार वीज ग्राहक आहेत. त्यांना दररोज २०० ते २१० मेगा युनिट वीजेची आवश्यकता असते. मागील चार दिवसांपासून हा पुरवठा कमी झाल्याने जवळपास अडीच लाख ग्राहकांना चार ते सात तासांच्या भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उद्योगापासून सर्व क्षेत्राला फटका बसत आहे. आगामी दोन दिवसांत वीज पुरवठ्याची परिस्थिती अधिक गंभीर होईल,’ अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विद्यापीठाला जागा ‘वाल्मी’ परिसरातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद विधी विद्यापीठ ‘जल आणि भूमी व्यवस्थापन’च्या (वाल्मी) जागेवर उभारण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ४२ एकर जागेसाठी विद्यापीठ शुक्रवारी रितसर प्रस्ताव सादर करणार आहे. विद्यापीठ वसतिगृहताच्या लगत असलेली महसूल विभागाची नऊ एकर जागाही देण्याचे विभागाने संमती दिली. ६० एकर जागेवर अत्याधुनिक विद्यापीठ उभारणार आहे.
विधी विद्यापीठ प्रशासनाला विद्यापीठ उभारणीसाठी कांचनवाडी पसिरात जागा हवी आहे. यापूर्वी विद्यापीठ उभारणीसाठी करोडी येथे ५५ एकर जागा निश्चित करण्यात आली होती. २०१०मध्ये ही जागा महसूल विभागाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे वर्ग ही केली, परंतु कांचनवाडी परिसरात विद्यापीठाचे वसतिगृह आहे. याच परिसरात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने कांचनवाडी परिसरातच जागेची चाचपणी केली. परिसरात जागा उपलब्ध असल्याने आणि शासन, प्रशासन त्यासाठी सकारात्मक आहे. जागा निश्चिती ही प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण होईल त्यानंतर उभारणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

प्रस्ताव आज देणार
औरंगाबादमधील विधी विद्यापीठाचे वर्ग या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहेत. हे निवासी स्वरुपाचे विद्यापीठ असून, सुरुवातीला दोन वर्षे विद्यापीठाचे वर्ग पद्मपुऱ्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयात भरणार आहेत. वसतिगृह कांचनवाडीत आहे. आठ एकर जागेवर शासकीय अधिकाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या निवासस्थाने वसतिगृहाला देण्यात आली. याच परिसरात महसूल विभागाची नऊ एकर जागा उपलब्ध आहे. ती देण्यास जिल्हा प्रशासनाने सहमती दर्शविली आहे; तसेच वाल्मीकडे उपलब्ध असलेल्या जागेपैकी ४२ एकर जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाने पाऊले उचलले आहेत. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, शुक्रवारी रितसर हा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले.

विद्यापीठ ६० एकर जागेवर
करोडीतील पाणी पुरवठा, ड्रेनज व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. भूजल सर्वेक्षणात भूजल पातळी कमी असल्याचे समोर आले होते. भविष्यातील गरज लक्षात घेत कांचनवाडी परिसरातच विद्यापीठ असावे, असे विद्यापीठ प्रशासनाचे मत आहे. वसतिगृहाची नऊ, महसूल प्रशासनाची नऊ आणि वाल्मीची ४२ एकर अशा ६० एकर जागेवर अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे विद्यापीठ उभारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शासनही त्यास अनुकूल असल्याचे कळते. जागा उपलब्ध झाल्यानंतर लगेच विद्यापीठ उभारणीसाठी प्रस्ताव शासनाला पाठविला जाणार आहे. निवासी विधी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, अत्याधुनिक क्लास रूम, वसतिगृह, कुलगुरू, अधिकारी, प्राध्यापकांचे निवासस्थान, विश्रामगृह, जीम अशा अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध असतील.

कांचनवाडी पसिरातच जागा पाहण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा प्रशासनानेही मदतीचे आश्वासन दिले आहे. वाल्मीकडे असलेल्या जागेसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो सादर केला जाणार आहे. प्रशासनाकडून आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत.
- डॉ. एस. जी. गुप्ता, समन्वय, विधी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पंजाब नॅशनल बँकचे सेवा शुल्क वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्टेट बँक ऑफ इंडियानंतर आता पंजाब नॅशनल बँकेने सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, एटीएम वापरासंबंधी सर्वात मोठे बदल करायचे ठरवल्याचे सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

देशभरातील सर्व बँकांनी या आधीच एटीएमद्वारे पैसे काढण्यावर सेवा शुल्क आकारणे सुरू केले होते. आता पंजाब नॅशनल बँकेनेही हाच कित्ता गिरवत येत्या एक ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पंजाब नॅशनल बँकच्या एटीएममधून एका महिन्यात पाचपेक्षा अधिक वेळा रक्कम काढली, तर त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणार आहे. यासह बचत खात्यात किमान रक्कम ठेवणे, डी. डी. काढणे आदी सेवांच्या शुल्कातही वाढ होणार आहे. पूर्वी पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना, बचत खातेदारांना एटीएम वापरावर कोणतेही शुल्क नव्हते. ते एटीएमद्वारे कितीही वेळा आणि केव्हाही रक्कम काढू शकत होते. एटीएम वापरावर इतर राष्ट्रीयकृत बँका मात्र शुल्क घेत असून त्याची सुरुवात गेल्या काही वर्षांपासूनच सुरू झालेली आहे. शुल्क वाढीसंबंधी पंजाब नॅशनल बँकेने सर्व ग्राहकांना एक नोटीस काढून तसे सूचित करणेही सुरू केले आहे. याची कल्पना देशभरातील बँकांच्या शाखांमधील ग्राहकांना देण्यात याव्यात अशा सूचना शाखाधिकारी व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांसाठी जारी करण्यात आलेल्या नोटीसीत स्पष्ट म्हटले आहे की, ‘जर पाच पेक्षा अधिक वेळा एटीएमने पैसे काढले, तर पुढील प्रत्येक व्यवहारावर किमान १० रुपये आकारले जाणार आहेत. याशिवाय मिनी स्टेटमेंट काढणे यावरही शुल्क आकारले जाईल. मात्र ग्रीन पीन अप्लाय करणे, बॅलन्सची माहिती विचारणे, गैरआर्थिक लेनदेन यासाठी मात्र कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.’

‘त्या’ पोस्ट खऱ्या
पंजाब नॅशनल बॅँकेच्या या निर्णयाबाबत सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. हा निर्णय लागू होणार आहे. त्याबाबतच्या पोस्टही खऱ्या आहेत, अशी माहिती स्थानिक पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी व काही बँक असोसिएशनच्या नेत्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images