Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ बोधनकरांनी क्रांतीचे क्षण जिवंत ठेवले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘क्रांतीचे क्षण अनेक येतात, पण ते जिवंत ठेवण्याचे काम श्यामराव बोधनकर व अन्य स्वातंत्र्यसैनिकांनी केले,’ असे प्रतिपादन प्रा. जयदेव डोळे यांनी शनिवारी केले. श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्काराने महाराष्ट्र टाइम्सचे मुंबई येथील निवासी संपादक श्रीकांत बोजेवार यांचा प्रा. डोळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर स्वातंत्र्यसैनिक श्यामराव बोधनकर स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्र. दि. पाटोदेकर, सचिव डॉ. राघवेंद्र चाकूरकर उपस्थित होते. यावेळी प्रा. डोळे म्हणाले, ‘बोधनकर व त्यांच्या सारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यातील क्रांतीचे क्षण जिवंत ठेवले. महाराष्ट्राला हेवा वाटावा असाच हा लढा आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे विस्मरण आता होत आहे, तसे या संग्रामाबद्दल होणार नाही. आम्ही या संग्रामाचा विसर पडू देणार नाही. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा राजकीय दृष्ट्या मागे पडला असला, तरी साहित्यात त्याचे स्थान भक्कम आहे. बी. रघुनाथांच्या पुस्तकांमधून त्याची प्रचिती येते. साहित्याने या लढ्याची बऱ्यापैकी दखल घेतली. पत्रकारिता तर सोबत होतीच. धगधगते जिवंत विश्व या निमित्याने आम्हाला ठेव म्हणून मिळाले आहे,’ असा उल्लेख प्रा. डोळे यांनी केला.
डॉ. उर्मिला चाकूरकर व श्रीकांत उमरीकर यांनी श्रीकांत बोजेवार यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखती दरम्यान बोजेवार यांनी विदर्भातील दिग्रस गाव ते मुंबई असा प्रवास उलगडून दाखवला. ‘आई-वडिलांमुळे आपला हा प्रवास यशस्वी झाला. असे आई-बाबा मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.’ ‘तंबी दुराई’, ‘दोन फुल्ल, एक हाफ’ च्या निर्मितीबद्दलही त्यांनी विविध किस्से सांगितले. ‘आताच्या पिढीत विनोदी लिखाण करताना कुणी दिसत नाही. गंभीर लिखाणात - विनोदी लिखाणात चार - पाच नावेच दिसतात. आपल्याकडे विनोदाला प्रतिष्ठा नाही हे खरे आहे. केवळ साहित्यातच नाही, तर सर्वच बाबतीत खुजेपणा आला आहे.’
श्यामराव बोधनकरांच्या कार्याबद्दल त्यांनी गौरवोदगार काढले. ‘त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांची गरज होती. आता ती स्थिती राहिलेली नाही, पण उद्या अशी स्थिती निर्माण झाली, तर अशा व्यक्ती निर्माण होतील,’ असा विश्वास बोजेवार यांनी व्यक्त केला.

शालेय साहित्याचे वाटप
कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक ना. वि. देशपांडे, कमलाबाई चाकूरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना नारायणराव चाकूरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पाटोदकर यांनी केले. डॉ. चाकूरकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख करून दिली. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर स्वामी रामानंद तीर्थांचे स्मारक क्रांतीचौकात

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मारकाची जागा अखेर निश्चित झाली आहे. क्रांती चौकातील काळा चबुतराच्या जागेवर हे स्मारक लवकरच उभारले जाणार आहे. अनेक वर्षांपासूनची औरंगाबादकरांची ही मागणी होती; पण ती पूर्ण करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा स्वातंत्र्यसैनिकांना ठोठवावा लागला आहे.
रामानंद तीर्थ यांच्या कार्यकर्तृत्वास साजेसे स्मारक म्हणून शहरातील मध्यवर्ती जागेवर त्यांचा पुतळा उभारावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका रेणापूरचे स्वातंत्र्यसैनिक मुर्गाआप्पा काशिनाथआप्पा खुमसे यांनी औरंगाबाद खंडपीठात केली आहे. त्यांनी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात सहभाग घेतलेला आहे. भारताची गौरवशाली परंपरा व देशाचा स्वातंत्र्यलढा भारतीय नागरिकांना सदा-सर्वकाळ प्रेरणादायक रहावा म्हणून रामानंद तीर्थांचे स्मारक व त्यांच्या कार्याचा गौरव, हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीचा इतिहास व त्याची उजळण लोकांना करून देण्यासाठी ही याचिका करण्यात आली आहे. महापुरुषांच्या यादीमध्ये स्वामीजींचा समावेश करावा, केंद्र व राज्यशासनातर्फे स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे पेन्शन रामानंद तीर्थ यांच्या नावाने जाहीर करावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीचा इतिहास विविध अभ्यासक्रमांमध्ये क्रमिक पुस्तकांत करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी तत्कालीन न्या. ए. बी. चौधरी व न्या. इंदिरा जैन यांच्यासमोर झाली असताना पुतळा उभारणीसाठी योग्य जागेची पाहणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनी दिले होते. या निर्देशांनुसार क्रांतीचौकातील काळा चबुतराजवळ उभारल्या जाणाऱ्या दोनशे फूट उंच ध्वजाच्या बाजूच्या जागेची पाहणी करण्यात आली आणि त्याच जागेवर रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. २०३ फुटांचा ध्वज आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा पूर्ण झाल्यास तो मराठवाड्याचे भूषण ठरणार आहे, अशी प्रतिक्रियाही मुगळीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मार्निंगवॉकला गेलेल्या सहा वृद्धांना चिरडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नित्यप्रमाणे शनिवारी (१६ सप्टेंबर) पहाटेची मार्निंगवॉक करणाऱ्या सहा ज्येष्ठ नागरिकांना शनिवारी पहाटे स्कॉर्पियोने चिरडले. कॅम्ब्रिज शाळेच्या चौकात घडलेल्या या दुर्घटनेत चार जण जागीच ठार झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त गाडी नंतर नाल्यात अडकली. चालक फरारी आहे. भागीनाथ लिंबाजी गवळी (६०), नारायण गंगाराम वाघमारे (६५), दगडूजी बालाजी ढवळे (६०), अनिल विठ्ठलराव सोनवणे (४८) (सर्व रा. हनुमान चौक, चिकलठाणा) अशी मृतांची नावे आहेत. लहू तुळशीराम बकाल (४४), विजय दामोदर करवंदे (४०. दोन्ही रा. चिकलठाणा) यांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत चौघे व जखमी दोघे जुने मित्र होत.
औरंगाबाद जालना रोडजवळील प्रांगणात जाण्यासाठी निघालेल्या या मित्रांना पहाटे पाचला, केम्ब्रिज शाळेच्या चौकात भरधाव येणाऱ्या पांढऱ्या स्कॉर्पिओने (एम. एच. २७ ए. सी. ५२८२) मागून जोराची धडक दिली. गवळी, वाघमारे, ढवळे, सोनवणे या चौघांना चिरडून स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये जाऊन फसली. अपघातानंतर कारचालक पसार झाला. अपघाताची माहिती वाऱ्यासारखी चिकलठाणा परिसरात पसरली. गावातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ओढ्याच्या चिखलात अडकलेल्या चौघांना बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी गवळी, वाघमारे, ढवळे, सोनवणेंना मृत घोषित केले. जखमी लहू बकाळ व विजय करवंदे या दोघांना जालनारोडवरील धूत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
अपघाताची माहिती मिळताच खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राम किशोर नवल, उपायुक्त वर्षा ठाकूर, महापौर बापू घडामोडे, स्थायी सभापती गजानन बारवाल, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आदींनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कटकट गेट ढासळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सततच्या पावसामुळे ऐतिहासिक कटकटगेट ढासळले. कटकट गेटची डागडुजी काही महिन्यांपूर्वी महापालिकेतर्फे करण्यात आली होती.
गेट ढासळत असल्याने त्याला आधार देण्यासाठी दगडाचे बांधकाम करण्यात आले होते. पावसामुळे हे बांधकाम ढासळले आणि गेट धोकादायक बनले. गेट ढासळल्याचे लक्षात आल्यावर धावाधाव सुरू झाली. महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी अधिकाऱ्यांसह गेटची पाहणी केली. ‘दगडाचे बांधकाम कोसळले. गेटच्या डाव्या बाजूलाही तडा गेला आहे. त्याचीही दुरुस्ती करावी लागेल. दगडाचे बांधकाम ज्या कंत्राटदाराने केले त्याला नोटीस दिली जाईल. बांधकाम करताना त्यांनी आवश्यक काळजी घ्यायला हवी होती,’ असे मुगळीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...तर ‘महावितरण’ला टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात सुरू असलेले भारनियमन रद्द करा, अन्यथा महावितरणच्या प्रत्येक उपकेंद्राला टाळे ठोकू, असा इशारा देत शनिवारी शिवसेनेने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. एमआयएमनेही सकाळी याच कार्यालयासमोर निदर्शने केली.
शिवसेनेच्या आंदोलनामध्ये माजी आमदार प्रदीप जैस्वाल, राजू वैदय, राजेंद्र जंजाळ, नंदू घोडेले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती. आंदोलकांनी जय भवानी - जय शिवाजी, भारनियमन रद्द करा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची भेट घेत भारनियमन रद्द करा, अशी मागणी केली. शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम सुभेदारीवर थांबले असता, त्यांनाही भारनियमनाचा झटका सहन करावा लागला होता. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले, ‘कोळशाचा पुरवठा होत नसल्याने भारनियमन सुरू आहे. आगामी दोन दिवसांत ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.’

आमदारांची बैठक
एमआयएमने जिल्हाध्यक्ष अब्दुल रहिम नाईकवाडे (अज्जू लिडर) यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर धडक दिली. घोषणाबाजीने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. विरोधी पक्षनेते फेरोज खान, नगरसेवक अजीम अहेमद, सईद खान, आरेफ हुसैनी, विकास एडके, मुष्ताक सलामी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची भेट घेतली. एमआयएम नगरसेवकांनी महावितरणकडून जाणून-बुजून त्रास देणे सुरू असल्याचा आरोप केला. याबाबत शहरातील आमदारांची विशेष बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे पत्र दिल्यानंतर एमआयएमने
आंदोलन मागे घेतले.

भारनियमनात प्रामाणिक वीज ग्राहकांवर अन्याय झाल्यास शिवसेना कधीही सहन करणार नाही. जर भारनियमन बंद झाले नाही, तर सोमवारी प्रत्येक उपकेंद्रांना शिवसेना कार्यकर्ते टाळे ठोकतील. - प्रदीप जैस्वाल, माजी आमदार

केवळ महावितरणचे नियोजन चुकल्यामुळे सध्या शहरात भारनियमन सुरू आहे. त्याचा वीज वसुली किंवा गळतीशी कोणताही संबंध नाही. वीज गळती रोखण्यासाठी काय कारवाई केली ते आधी सांगा. - इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम

वीज गळतीच्या नावाखाली सामान्यांना वेठीस धरले जात आहे. बिले थकली तर वीज पुरवठा खंडित करा, पण शहागंज असो वा समर्थनगर कोणत्याही प्रामाणिक ग्राहकाला भारनियमनाचा फटका बसू नये. - अंबादास दानवे, शिवसेना जिल्हा प्रमुख

प्रत्येक डीपीला वीज मीटर बसवा. थेट वीज चोरीची माहिती मिळेल. ही उपाययोजना महावितरण करत नाही. शंभर टक्के वीज बिल भरणाऱ्या लोकांना जे बिल भरत नाहीत त्यांच्यामुळे फटका बसतो आहे. - राजेंद्र जंजाळ, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ घोसाळकरांच्या विधानाकडे भाजपचा कानाडोळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेत सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपने करार मोडला, तरी शिवसेनेचाच महापौर होईल असा दावा शिवसेनेकडून होत असताना, भाजपने मात्र या विधानकडे दुर्लक्ष केल्याने महापौर निवडणूक रंगतदार होणार अशी चिन्हे आहेत.

भाजपचे भगवान घडमोडे यांचा महापौरपदाचा कालवधी संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महापौरपदाची निवडणूक होणार आहे. शिवसेना - भाजपमध्ये झालेल्या करारानुसार पुढील अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेकडे राहणार आहे, मात्र केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने महापौरपदाचा पुढील अडीच वर्षांचा कार्यकाळ देखील मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. त्यातच शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी ‘भाजपने हा करार मोडला, तरी आगामी महापौर शिवसेनेचाच असेल,’ असा दावा पत्रकारांशी बोलताना नुकताच केल्याने युतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे समोर आले आहे.

भाजप करार मोडणार, असे चित्र सेनेकडून रंगवले जात असतानाच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र चुपी साधणेच पसंत केले आहे. त्यामुळे पडद्यामागे खरेच हालचाली सुरू आहेत की काय, असा प्रश्नही निर्माण होत असून महापौर निवडणूक रंगतदार होणार असे चिन्ह आहे.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख घोसाळकर यांनी काय विधान केले, हे माहित नाही. सध्या महापालिकेत भाजपचा महापौर आहे. अधिकाधिक विकासकामे कशी होतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राहिला प्रश्न महापौर निवडणुकीचा त्यासाठी बराच कालवधी अजून बाकी आहे. - किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणार: मुख्यमंत्री

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी राज्य सरकारने पथदर्शी कार्यक्रम आखला आहे. यासाठी दमणगंगा-पिंजाळच्या माध्यमातून मराठवाड्याला ५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे. यासाठी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच एमओयूच्या माध्यमातून केंद्राकडे योजना जाईल व त्यानंतर कॅबिनेटमध्ये मंजूर होईल. आम्ही मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठवाड्यात सर्वात आधी वॉटर ग्रीडचा आराखडा तयार करण्याचं काम सुरु असून वॉटरग्रीड पिण्यासाठी, शेती तसेच उद्योगासाठी वरदान ठरेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षात सरकारने मराठवाड्यात विशेष लक्ष दिल्याचे सांगत यामध्ये अन्नसुरक्षा योजनेत मराठवाड्यातील ४० लाख लोकांना लाभ मिळाला, सिंचानाचा प्रश्न सोडवण्यासाठी धरणांची कामे केली तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून साडेचार लाख हेक्टर शेतीला पाणी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
याशिवाय डीएमआयसी चे पहिल्या कामाची सुरुवात औरंगाबाद शहरात केली, ऑरिक सिटीच्या माध्यमातून ३ लाख रोजगारनिर्मिती करण्यात येईल असे सांगितले. मराठवाड्यात ८० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढत विभागाने आघाडी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या मुक्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी मोठे युद्ध केले, आता आजच्या पिढीला विकासाचा संग्राम करावयाचा आहे, गरिबी, भ्रष्टाचार, कर्जमुक्तीचा संग्राम एकत्रितपणे लढायचा आहे या साठी राज्यसरकार मराठवाड्याच्या पाठीशी असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी जय मराठवाडा असे म्हणत आपले भाषण संपवले.
सिद्धार्थ उद्यानात मुक्तिसंग्राम दिनाच्या झालेल्या कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर भगवान घडामोडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, सुभाष झांबड, नारायण कुचे आदींची उपस्थिती होती.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच- मुख्यमंत्री फडणवीस

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल. मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकाराला शिवीगाळप्रकरणी पाशा पटेलांवर गुन्हा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। लातूर

पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी आपण माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते पाशा पटेल यांनी घेतली आहे. काल एका पत्रकाराला शिवीगाळ केल्या प्रकरणी पाशा पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या विरोधात हे षडयंत्र रचले गेले असल्याचे सांगत पटेल यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.

काल लातूर विश्राम गृहात पत्रकार विष्णू बुरगे यांनी पाशा पटेल यांना पेट्रोल दरवाढीबाबत प्रश्न विचारले होते. त्यावेळी पाशा पटेल आपल्यावर चांगलेच भडकले. तसेच त्यांनी आर्वाच्च शब्दात आपल्याला शिवीगाळ केल्याचे बुरगे यांचे म्हणणे आहे. त्यानंतर आज पहाटे बुरगे यांच्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार बुरगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, काल पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी लातूर विश्राम गृहात पेट्रोल भाववाढीवर बुरगे यांनी पटेल यांना काही प्रश्न विचारले. पेट्रोलची भाववाढ झाली आहे, त्यामुळे शहरात येण्याबाबतही शेतकरी आता विचार करेल, सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली का?, असा प्रश्न बुरगे यांनी पटेल यांना विचारला. मात्र हा प्रश्न ऐकून पाशा पटेल चांगलेच भडकले आणि त्यांनी आपल्याला थेट शिवीगाळच सुरू केला असा दावा पत्रकार बुरगे यांनी केला आहे. मला बसून प्रश्न विचारतो का, औकात आहे का तुझी असे म्हणत पटेल यांनी बुरगे यांना शिवीगाळ केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर आणि काही शेतकरीही उपस्थित होते. हा सगळा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.

मात्र, आपल्याला बुरगे हे पत्रकार असल्याचे माहित नसल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. पत्रकार परिषद सुरू व्हायच्या अर्धा तास आधी हा प्रकार घडल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. हा मुलगा २१-२२ वर्षांचा होता. आपण आलो तेव्हा सर्वजण उठून उभे राहिले मात्र हा मुलगा मुळीच उठून उभा राहिला नाही. तो बसूनच होता. मी आल्या-आल्याच तो माझ्याशी अपमानास्पद भाषेत बोलू लागला. त्याचे हावभाव आणि आक्रमकता पाहून माझा राग अनावर झाला आणि मग आपल्या तोंडून शिवी निघाली असे पाशा पटेल यांचे म्हणणे आहे.

आपण तुझ्या वडिलांच्या वयाचे आहोत, किमान माझ्या वयाचा तरी आदर राख असे आपण त्याला समजावत होतो असेही पटेल यांचे म्हणणे आहे. बुरगे यांच्याकडे ना बूम होता, ना कॅमेरा होता, ना ओळखपत्र होते. शिवाय ते पत्रकार परिषदेचीही वेळ नव्हती. संघटनेचे कार्यकर्ते तिथे बसले होते असे वर्णनही पाशा पटेल यांनी केले.

बुरगे यांनी आपल्याला पेट्रोलविषयी कोणताही प्रश्न विचारला नसल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. ‘तुम्ही शेतकऱ्याची वाट लावली का?' असा प्रश्न विचारत छुप्या कॅमेराने हा प्रकार शूट केला गेला आणि हे पत्रकार परिषदेतच घडल्याचा बनाव केला गेला, हा माझ्या विरोधातील कट आहे असे म्हणत पटेल यांनी कथित कटाचा निषेधही केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादेत रोज ३०० जणांना पासपोर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणीतील पोस्ट मास्तर जनरल ऑफिसमध्ये सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राद्वारे रोज ३०० जणांना पासपोर्ट देण्यात येत आहे, अशी माहिती पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार यांनी दिली. अाजपर्यंत ४० हजारांहून अ‌‌धिक जणांना पासपोर्ट ‌दिला गेला अाहे.
या कार्यालयासाठी पोस्ट ऑफिस मधील आठ अधिकारी आणि टीसीएस कंपनीतील आऊटसोर्स करणारे सात ते आठ अधिकारी, असा एकूण १५ ते १६ जणांचा स्टाफ आहे. यामुळे पासपोर्ट वितरण अधिक सुकर होत आहे. यामुळे पासपोर्टसाठी मुंबईत जाण्याची गरज राहिलेली नाही. २०१७ मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज आता सुरळीत सुरू झाले आहे. उद्‍घाटनाननंतर एक दिवस कार्यालयाची वेबसाइट ‘हँग’ होत होती, परंतु आता सुरळीत सुरू झाली असून २८ ते ४ एप्र‌िल (गुढीपाडवा ते रामनवमी) या दरम्यान ४०० जणांना अपॉइमेंट देऊन त्यांचे पासपोर्टचे काम करण्यात आले होते.
पासपोर्ट कार्यालयाने घेतलेल्या पासपोर्ट शिबिरादरम्यानच पासपोर्ट कसा काढावा, त्याचीपद्धत काय, प्रक्रिया याचे रितसर प्रशिक्षण पोस्ट कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यांनाही प्रशिक्ष‌ित करून पासपोर्ट कार्यालयातील ऑफिसर येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आले आहेत.

नागरिकांना आवाहन

नागरिकांच्या सोयीसाठी ही सुविधा आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी एकदम गर्दी न करता प्राधान्यक्रम ठरवून ऑनलाइन नोंदणी करावी. सर्व कागदपत्रे योग्य त्या पद्धतीने सोबत आणली, तर त्रुटी राहणार नाहीत. मुंबईला जाण्याचा त्रास यामुळे वाचणार आहे. पण ज्यांना अतितत्काळ किंवा वैद्यकीय कारणांसाठी पासपोर्ट घ्यावयाचे आहे, अशांना मुंबईत जावे लागेल, असे पासपोर्ट केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अर्ज कसा करणार?

अर्जदारांनी passportindia.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. त्यानंतर उर्वरित तपासणीसाठी एक विशिष्ट तारीख मिळेल. त्या दिवशी ऑनलाइन अर्ज भरल्याची एक प्रत छावणी कार्यालयात सोबत आणावी. अर्जदाराचे फोटो, बायोमेट्रिक, बोटांचे ठसे, असे दररोज ५० अर्ज संगणकाद्वारे प्रमाणित केले जात आहे. कागदपत्रांची पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पूर्ण झालेले अर्ज मुंबई प्रादेशिक पासपोर्ट विभागाकडे पाठवण्यात येतील. काही मोठ्या त्रुटी असेल, तत्काळ पासपोर्ट हवा असल्यास मुंबई कार्यालयातच जावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबस तोट्याच्या गर्तेत

$
0
0


सिटीबस तोट्याच्या गर्तेत
औरंगाबाद : एसटीच्या ‌सिटीबस सेवेचा तोटा आता ११ कोटींच्या घरात आहे. शहर बस चालविण्याबाबत महापालिकेकडून आतापर्यंत कोणताच निर्णय घेण्यात घेण्यात आलेला नाही. यामुळे फक्त मोजक्या मार्गावर सिटीसेवा सुरू आहे. याचा फटका एसटी विभागाला सहन करावा लागत आहे.
२००१ पूर्वी शहरात एसटीच्या माध्यमातून १०० सिटीबस चा‌लविण्यात येत होत्या. मात्र, तोट्याचे कारण पुढे करून सिटीबस सेवा बंद केली. यानंतर महानगर पालिकेने २००६ पासून अकोला प्रवासी वाहतूक कंपनीच्या माध्यमातून एएमटी सेवा सुरू केली होती. ‘एएमटी’ सेवा २०१० मध्ये बंद झाली. त्यानंतर तत्कालीन परिवहनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन शहरात पुन्हा एसटीच्या माध्यमातून सिटीबस सुरू करण्याचा निर्णय घेतला. १५ नोव्हेंबर २०१० पासून एसटीने १३ बसच्या माध्यमातून सिटीबस सुरू केली. ती आजही सुरू आहे, पण रडतखडत. सध्या ३२ सिटीबस १३ मार्गावर धावात आहेत. या सिटीबस चालविण्यातून एसटीला मोठा तोटा
होत आहे. १५ नोव्हेंबर २०१० ते जुलै २०१७ पर्यंत सिटीबस चालविण्यातून एसटीला १० कोटी तीन लाख ३८ हजारांचा तोटा झालेला आहे. जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंत हा तोटा ११ कोटींवर गेल्याचा अंदाज आहे. शहर बस चालविण्याबाबत महापालिकेने मध्यतंरी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, महापालिकेचा निर्णय पुन्हा मागे पडला. त्यामुळे सिटीबसचे ओझे एसटीलाच वहावे लागत आहे आणि दिवसेंदिवस तोट वाढतच जात आहे.
एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ २ कोटी २३ लाख १२ हजार ९८३
एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ ८७ लाख ६४ हजार ८०३
एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ २ कोटी ९२ लाख १९ हजार ७६९
एप्रिल २०१७ ते जुलै २०१७ ७५ लाख ४४ हजार ६०८
एकूण तोटा १० कोटी ३ लाख ३८ हजार २६८

एसटीच्या सिटीबसचा तोटा वाढत आहे. याबाबत शंका नाही. महामंडळाकडे याबाबत नियमित अहवाल पाठविण्यात येतो. ही सेवा बंद करण्याबाबत अद्याप कोणतीही सूचना मिळालेली नाही.
रा. ना. पाटील, विभाग नियंत्रक औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकराकडून मालकाचा विश्वासघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विश्वासू नोकरानेच चोरीचा बनाव केल्याचे उघडकीस आले आहे. रिक्षाच्या प्रवासादरम्यान दोघांनी सिडको बस स्थानक ते मध्यवर्ती बस या मार्गावर दोन लाख ७० हजारांचे सोन्याची दागिने आणि ४० हजार रुपये रोख हिसकावून पळून गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पण, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून नोकराला अटक केली. गणेश नामदेव शेळके (रा. भडकल गेट), असे त्याचे नाव आहे.
गणेश नामदेव शेळके हा स्वामीनारायण गोल्ड पॅलेसचे मालक जिग्‍नेश भरतकुमार चंद्रनीस (रा. दिवाण देवडी) यांच्याकडे नोकर होता. मालकाच्या सांगण्यानुसार, ९० ग्रॅम सोन्याचे दागिने व ४० हजार रुपये रोख घेऊन एका ठिकाणी जात होता. त्याप्रसंगी प्रवासात रिक्षातील दोघांनी लुटल्याचा बनाव द्याने केला होता. तपास करताना ही चोरी नसून नोकराने बनाव केल्याचा संशय आला. त्यावरून शेळके याला ताब्यात घेऊन हा प्रकार उघडकीस आणण्यात आला. पोलिसांनी त्याच्या घरातून चोरीचे सोने व रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघ, नितीन मोरे, मनोज चौहान, भगवान थिलोटे, शेख हकीम, संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी, अय्युब पठाण यांनी केली. संशयित आरोपीला मंगळवापर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजाराला वेध नवरात्र उत्सवाचे

$
0
0


बाजाराला वेध नवरात्र उत्सवाचे
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शारदीय नवरात्र, दुर्गानवरात्र आणि दांडिया याचे सध्या औरंगाबादच्या बाजाराला लागले आहेत. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवामुळे बाजारात लगबग आहे. यंदा या उत्सवात कोट्यवधींची उलाढाल होईल, असे संकेत व्यापारीवर्गाने दिले आहेत.
ठि‌कठिकाणी दांडियाच्या आयोजनानासाठी तयारी सुरू झाली आहे. निरनिराळे घागरा ड्रेसेसची दुकाने सजली आहे. दांडियासाठी लागत असलेल्या टिपऱ्यांपासून देवीसजावटीच्या विविध अलंकारांपर्यंत व सजावट साहित्यांपासून खानपानापर्यंतच्या विविध दालनांत यंदा नवरात्र उत्सावाची नोंदणी होऊ लागली आहे. व्यापारावर जीएसटीचे सावट असले, तरी उत्साह कायम आहे. अजून तीन-चार दिवसांत उत्साह अधिक वाढेल, असे व्यापारी सांगत आहेत.
यंदा टिपिकल गुज‌राथी म्युझिकवर आधारित विविध गाण्यांच्या सीडी- गाणी आणि मराठमोळ्या काही गाण्यांच्या सीडीही उपलब्ध झाल्या आहेत. अनेक दांडिया रास आयोजन केलेल्या मंडळांकडून या सीडीज खरेदी करणे सुरू झाले आहे. यंदा ढोल-ताशे यांनाही मंडळांकडून मागणी आहे, असे ढोलपथक व इव्हेंट आयोजक सांगत आहेत.
कपडा मार्केट गजबजले
घागरा ओढणी व ड्रेस यंदा ५०० ते ५००० रुपयांपर्यंत उपलब्ध झाले आहेत. यंदा गुजरातमधील सुरत आणि अहमदाबाद मार्केटमधून विशेष घागरा आले आहेत. यंदा रंगारगल्ली, टिळकपथ, कुंभारवाडा, या पारंपरिक मार्केटसह मॉलमध्येही विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.
टिपऱ्या, दांडियात नवीन प्रकार
यावेळी बाजारात सेनखेडा, दोन रंग, तीन रंग, गोल्डन चुंदडी, तिरंगा-१३, रजवाडी, डायमंड अशा विविध प्रकारच्या दांडिया उपलब्ध झालेल्या आहेत. ३० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत खास आकर्षक रंगांतील दांडिया मिळत आहेत, असे व्यापारी सुभाष शहा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात सीसीटीव्ही नेटवर्किंगवर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आधुनिक काळात सीसीटीव्ही नेटवर्किंग या तंत्रज्ञानाचा लाभ होत आहे. मुंबई, पुण्याप्रमाणेच औरंगाबाद शहरात देखील सीसीटीव्ही नेटवर्किंगवर भर देणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांच्या हस्ते रविवारी वेदांतनगर व पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे लोकार्पण करण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी शहरात पुंडलिकनगर व वेदांतनगर पोलिस चौकी निर्माण करण्यात आल्या. या चौक्यांना आता पोलिस ठाणे म्हणून मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्ते या पोलिस ठाण्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर महापौर भगवान घडमोडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, सुभाष झांबड, प्रशांत बंब, राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्ह‌ाधिकारी नवलकिशोर राम, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांची उपस्थिती होती.
पुण्यामध्ये ७० मोठे गुन्हे उघडकीस येण्यामध्ये सीसीटीव्ही नेटवर्किंग कामी आले आहे. औरंगाबाद शहरात देखील सीसीटीव्ही नेटवर्किंग वाढवणार आहे. सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट करून जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांनी आता सावध होण्याची गरज आहे. कारण आता राज्यात ‘सर्ट’ची (सायबर एर्मजन्सी रिसपॉन्स टीम) नजर राहणार आहे. आयटी आणि पोलिस प्रशासन मिळून ‘सर्ट’ द्वारे राज्यात नियंत्रण कक्ष स्थापन करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी पोलिस आयुक्त यादव यांनी प्रास्ताविक करताना गेल्या चार महिन्यात पोलिसांच्या चोख व्यवस्थापनामुळे बंदोबस्ताच्या काळात कोणतीही गंभीर घटना घडली नसल्याची माहिती दिली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गुन्हेगारीमध्ये ५३ टक्के अप्रत्यक्ष घट झाल्याची माहिती दिली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात संगीता भट्टड, सुप्रिया चव्हाण, उमेश कुलकर्णी, मोबीन शेख, ‌शिवाजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे आदींची उपथ्सिती होती.

मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

शहर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष पोलिस अधिकारी, ड्रोन कॅमेरा तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या योजनेची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. या उपक्रमामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्ताफ खुनुप्रकरण; आरोपीचा जामीन मंजूर

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
भावसिंगपुरा येथील अल्ताफ शेख याचा अनैतिक संबधातून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात अडकलेल्या विराज सौदागरने नियमित जामीन मिळविण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला. न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या समोर सुनावणी झाली असता त्यांनी ३० हजार रुपयाचा जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
भावसिंगपुरा येथील अल्ताफ शेख याचा २० मार्च २०१६ रोजी अनैतिक संबधाच्या कारणावरून मुकेश लाहोट, संतोष नरवडे यांच्यासह अन्य साथीदारांनी अपहरण करुन त्याचा खून करुन मृतदेह जळगाव जिल्ह्यातील पहूर येथील पडक्या धाब्यावरील पाण्याच्या हौदात फेकला होता. छावणी पोलिस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये विराज सौदागरच्या कपड्यावर असलेल्या रक्ताचे डाग मृतकाचे नसल्याचे निष्पन्न झाले आहे. विराज सौदागरने नियमित जामीनासाठी धाव घेतली. खंडपीठाने विराज सौदागर याचा जामीन मंजूर करत प्रत्येक रविवारी छावणी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे. सौदागर याची बाजू अभयसिंह भोसले मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यादेशानंतरही अर्थसाह्याची प्रतीक्षा

$
0
0

अध्यादेशानंतरही अर्थसाह्याची प्रतीक्षा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासन आदेश येऊन सहा महिने झाल्यानंतरही नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्य खरेदीसाठी अर्थसाह्य देण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारमुळे जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार कामगार लाभापासून वंचित असून पुढील महिनाभर तरी साहित्य वाटप होईल, असे चिन्ह नाही.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लागणाऱ्या साहित्यासाठी पाच हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा शासन आदेश एक मार्चला काढण्यात आला होता. मात्र, कामगार आयुक्त कार्यालयाने अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार नोंदणीकृत कामगार अर्थसाह्यापासून वंचित आहेत.
गवंडी, सेट्रिंग, सुतार, फरशी पॉलिश, वायरमन, वेल्डर यांसह इतर बांधकाम कामगारांना साहित्य खरेदीसाठी कार्यालयाकडे नोंदणी झाल्यानंतर अर्थसाह्य देण्याची मागणी एप्रिल २०१६ मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने राज्य सरकारकडे केली होती. कामगार संघटनांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने जानेवारी २०१७ मध्ये राज्य सरकारने निर्णय घेण्याबाबत मान्यता दिली होती. त्यानुसार एक मार्च २०१७ रोजी कामगारांना साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपये देण्याचा अध्यादेश काढला गेला, परंतु अध्यादेश जारी करून तब्बल सहा महिने होऊनही याबाबतची कार्यवाही झाली नाही. परिणामी, सुमारे ४८ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभापासून दूर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्टल डीएडला मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळांमध्ये अप्रशिक्षित असलेल्या शिक्षकांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. २०१२मध्येच संपलेल्या या योजनेला सलग सात वर्षे पुढे ढकलण्याचा प्रताप शिक्षण विभागाने केला आहे. वर्षानुवर्षे संधी देऊनही अप्रशिक्षित शिक्षक प्रशिक्षित होऊ शकलेले नाहीत. २०१७-२०१९ ही शेवटची संधी असेल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले.

राज्यातील अनेक शाळांमध्ये दहावी उत्तीर्ण या शैक्षणिक अर्हतेवर नियुक्त केलेले शिक्षक आहेत. त्या शिक्षकांनी प्र‌शिक्षित व्हावे, या हेतूने २०००मध्ये पत्राद्वारे डीएड अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योजना आणली. रुजू झाल्यानंतर पहिल्या चार वर्षांमध्ये सेवांतर्गत प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित होऊन हा अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षकाला बंधनकारक होते, परंतु अद्यापही अनेक शिक्षक हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकले नाहीत. काहीजणांचे एखाद दुसरे विषय राहिले. काहीचा प्रवास दोनऐवजी चार वर्षे, आठ वर्षे असा झाला तरीही ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. २०१२पर्यंतच अप्रशिक्षित शिक्षकांनी प्रशिक्षित व्हावे, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतरही या शिक्षकांची संख्या कामय असल्याने पुन्हा संधी देण्यात आली. आता पुन्हा दोन वर्षे या शिक्षकांना प्रशिक्षिण पूर्ण करण्याची संधी देण्याचे आदेश शासनाने दिले. केंद्र सरकारने शाळांमध्ये एकही अप्रशिक्षित शिक्षक नेमण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्यात अनेकदा संधी देऊनही शिक्षकांना प्रशिक्षित होण्यास अडचणी असल्याचे समोर आले आहे.

सुटीत प्रशिक्षण
अप्रशिक्षित शिक्षकांना नियमित प्रमाणे दोन वर्षाचे डीएड असते. हे शिक्षक शाळांवरच असल्याने त्यांना सुटीमध्ये हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. मे महिन्यामध्ये २८ तर, दिवाळीच्या सुट्यामध्ये १४ दिवस हे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर परीक्षा घेतली जाते. सेवेत रुजू झाल्यापासून चार वर्षांत डीएड पूर्ण करणे अपेक्षित आहे. २०१०पासून भरतीच बंद आहे. अशावेळी ही योजना केव्हाच बंद होणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. शालेय शिक्षण, समाजकल्याण; तसेच आदिवासी विकास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये अप्रशिक्षित शिक्षकांची संख्या आहे. मराठवाड्यात अशा शिक्षकांची संख्या ही तिनशेच्या घरात आहेत. या शिक्षकांना वेतनश्रेणीही वेगळी असते.

संख्या घटली
राज्यात १८-२० वर्षांपूर्वी राज्यात दरवर्षी शिक्षकांची भरती मोठ्या प्रमाणात होत होती. दरवर्षी १४ हजार शिक्षकांची भरती होत असे. त्यावेळी कॉलेजांची संख्या कमी होती. विविध संवर्गातील शिक्षक मिळत नसल्याने अप्रशिक्षित शिक्षक घेण्याची मूभा होती.

पूर्वी अनेक शाळांमध्ये दहावी उत्तीर्णवर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या शिक्षकांनी प्रशिक्षित व्हावे म्हणून ही योजना आणली गेली. चार वर्षांत प्रशिक्षित होणे अपेक्षित आहे. आता संधी दिली तरी अशा शिक्षकांची संख्या कमी आहे.
- सुभाष कांबळे, संचालक, विद्या प्राधिकरण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पृथ्वी प्रकाशनला २७ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पृथ्वी प्रकाशन या कंपनीची अकाउंटटने २६ लाख ८९ हजाराची फसवणूक केल्याचा गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत प्रकार घडला.
संशयित आरोपी प्रशांत सुरेश मुंदडा हे जालना रोडवरील पृथ्वी प्रकाशन येथे अकाउंटट म्हणून कामाला होता. या कालावधीत त्यांनी कंपनीचे संचालक करण दर्डा यांच्या बनावट सह्या करीत बँकेत ठेव म्हणून ठेवण्यात आलेली २६ लाख ८९ हजार ५३० रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. हा प्रकार नुकताच निदर्शनास आला. या प्रकरणी मॅनेजर अमरीश मोहनलाल सराफ (वय ३७ रा. ज्योतीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मुंदडा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज न फेडणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका सहकारी पतसंस्थेचे तीन लाखांचे कर्ज न फेडणाऱ्या आरोपीला एक महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी ठोठावली. तसेच तीन लाख रुपये पतसंस्थेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे व ही रक्कम न अदा केल्यास १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षाही कोर्टाने ठोठावली.
श्री स्वामी नरेंद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव संजय म्हस्के यांनी ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट’च्या कलम १३८ प्रमाणे कोर्टात फौजदारी प्रकरण दाखल केले होते. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी कल्पेश दिनकरराव पाटील याने पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. २८ फेब्रुवारी २०१५ रोजी आरोपीने तीन लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र खात्यात रक्कम नसल्याने धनादेश न वटता परत आला. एका महिन्यानंतर आरोपीला नोटीसही बजाविण्यात आली. त्यालादेखील आरोपीने दाद न दिल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. सुनावणीअंती, कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी आरोपीला एक महिन्याची सक्तमजुरी व तीन लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश कोर्टाने दिले. ही रक्कम न अदा केल्यास आरोपीला १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणाच्या खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचेही आदेश कोर्टाने आरोपीला दिले आहेत. ही रक्कम न दिल्यास पुन्हा आठ दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे. अ‍ॅड. आर. एन. सुसलादे यांनी पतसंस्थेतर्फे बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. आर. एम. वाणी यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी स्कॅनच्या दुरुस्तीला मुहूर्त कधी?

$
0
0


सिटी स्कॅनच्या दुरुस्तीला मुहूर्त कधी?
पैसे भरल्याशिवाय कंपनीकडून दुरुस्तीला नकार?
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) क्ष-किरण विभागातील ६४ स्लाइस सिटी स्कॅन मशीन मागच्या आठवड्यापासून बंद असून, वार्षिक देशभालीचे (सीएमसी) २५ लाख रुपये भरल्याशिवाय कंपनीने दुरुस्तीला विरोध केल्याचे समजते. त्यामुळे दुरुस्ती होऊन मशीन नेमकी कधी रुग्णसेवेत येणार, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
घाटीच्या क्ष-किरण विभागामध्ये ६ स्लाईस व ६४ स्लाइस दोन सिटी स्कॅन मशीन असून, त्यापैकी ६४ स्लाइस मशीन मागच्या आठवड्यापासून बंद पडली आहे. यापूर्वी किमान महिना-दीड महिन्यासाठी ६ स्लाइस मशीनदेखील बंद होती व आता ६४ स्लाईस मशीन बंद पडली आहे. त्याचवेळी ६४ स्लाइस मशीनच्या वार्षिक देशभालीचे २५ लाख रुपये जून महिन्यापासून थकले आहेत व त्यामुळे कंपनीने दुरुस्तीस विरोध दर्शविला आहे. या संदर्भात घाटी प्रशासनाने कंपनीला थकलेले पैसे भरण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरही कंपनीने दुरुस्तीला नकार दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मशीन दुरुस्तीचा तिढा सुटत नसल्याचे सध्यातरी चित्र आहे. पैसे भरल्याशिवाय कंपनीने दुरुस्तीला विरोध केल्यास थकलेले पैसे भरण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निधी मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते, असेही सांगण्यात येत आहे. परिणामी, ६ स्लाईस मशीनवर पुन्हा ताण वाढणार व रुग्णांची प्रतीक्षाही वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची दमदार हजेरी; नाल्यांना आला पूर

$
0
0

औरंगाबाद ः दिवसभराच्या उकाड्यानंतर रविवारी रात्री औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे टाउन हॉल भागातील नाल्याच्या शेजारी असलेल्या नागरिकांच्या घरांत पाणी शिरले.

रात्री साडेआठच्या सुमारास पावसाची सुरवात झाली. सुमारे दीड ते दोन तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील नाल्यांना पूर आला. टाउन हॉलच्या मागील बाजुला नाल्याशेजारी असलेल्या वसाहतीमध्ये पाणी शिरले होते. याशिवाय टाउन हॉलच्या पुलाखालीही पाणी साचले झाले होते. जयभवानीनगर भागातही काही ठिकाणी पाणी साचल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, कन्नड, बोरगाव, हतनूर, पाणपोई परिसरातही जोरदार पाऊस पडल्याची माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images