Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

स्टेशनवरील विक्रेत्यांना‘डीजी पे’डोईजड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कॅशलेस व्यवहारासाठी रेल्वे विभागातर्फे स्टेशनवरील डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्या आली आहे. पण, आतापर्यंत मोफत असलेल्या या सेवेसाठी बँकेमार्फत आता दरमहा साडे पाचशे आकारले जाणार आहेत. हा भुर्दंड कोण भरणार, असा प्रश्न विक्रेते करत आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेतर्फे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सर्व विक्रेत्यांना स्वाईप मशीन उपलब्ध करून देऊन ‘डीजी पे’ योजना राबवण्यात आली. या सेवेचे रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. स्टेशनवरील पार्किंगपासून ज्यूस विक्रेते आदी ११ विक्रेत्यांकडे डिजिटल पेमेंटसाठी ही सुविधा उपलब्‍ध आहे. पण, गेल्या चार महिन्यात एखादा विक्रेता वगळता इतरांकडे एकही डिजिटल पेमेंट झालेले नाही. प्रवाशांना या सुविधेची माहिती दिल्यानंतरही ते स्वाइप करत नाहीत, त्यामुळे या सुविधाचा फक्त देखावा झाला आहे. याशिवाय बँकेने स्वॉइप मशीन सुविधेसाठी दरमहा साडे पाचशे रुपये आकारण्यात येणार आहे, असे कळवले आहे. त्यामुळे हा भूर्दंड कोठून भरायचा असा प्रश्न विक्रेते उपस्थित करत आहेत.

डीसीएमला भेटणार

रेल्वे स्टेशनवरील सर्व विक्रेते बँकेकडून केल्या जाणाऱ्या आकारणीबद्दल विभागीय वाणिज्यिक व्यवस्‍थापक (डीसीएम) यांना भेटणार आहे. ही सुविधा ठेवायची की नाही, याबद्दल त्यांच्याकडे विचारणा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यातही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्रीय मंत्रिमंडळाने विस्तार केल्यानंतर राज्यातही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सूचित केले. त्याचबरोबर मराठवाड्यात लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे का, असे त्यांना विचारले असता त्यांनी होकार दिला. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत त्यांनी काहीही सांगितलेले नाही. राज्यमंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांचा लेखाजोखा पाहूनच हे बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सूचित केले. ऑक्टोबर महिन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. प्रत्येक मंत्र्याला एक प्रश्नावली देण्यात आली आहे. ही प्रश्नावली त्यांच्या कामकाजावर आधारित आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. अनेक वर्षांच्या कालखंडानंतर गेल्यावर्षी फडणवीस सरकारने औरंगाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक केव्हा होणार याबद्दल त्यांनी निश्चित असे काही सांगितले नाही. या मंत्रिमंडळात नेमका कुणाचा समावेश असणार, मित्रपक्षांना मंत्रिमंडळ समावेशात स्थान असणार आहे का, या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांनी टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रानकवीच्या सहवासात रंगली मैफल

$
0
0


रानकवीच्या सहवासात रंगली मैफल
काव्य मैफलीपूर्वी युवा कवींनी पद्मश्री ना. धों. महानोर यांना शुभेच्छा दिल्या.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रानातील कवितांनी मराठी कवितेचे दालन समृद्ध करणारे ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांचा वाढदिवस नवोदित कवींनी काव्य मैफलीने साजरा केला. पळसखेड (ता. सोयगाव) येथे महानोर यांच्या शेतात ही मैफल रंगली. युवा कवींच्या आशयसंपन्न कवितांना दाद देत महानोर यांनी आठवणींना उजाळा दिला.

प्रत्येक पिढीतील कवी वैशिष्ट्यपूर्ण कवितांनी साहित्य समृद्ध करतो. जुन्या आणि नवीन पिढीचे कवी एकत्र आल्यास अस्सल काव्य मैफलीचा आविष्कार घडतो. कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या ७६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘काव्यधारा ग्रुप’ने शनिवारी युवा कवींचे महानोर यांच्या घरी कविसंमेलन घेतले. या कवींच्या सादरीकरणानंतर महानोर यांनी कवितेच्या आठवणी जागवल्या. कवी बंडू अंधेरे याने ‘फुलात न्हाली पहाट ओली क्षितिजावरती रंग झुले’ कविता गायली. या कवितेने मैफलीत खऱ्या अर्थाने रंग भरला. तर सुरेखा काळे यांनी ‘दिस आले दिस गेले’, ध. सु. जाधव यांनी ‘मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना’ ही कविता सादर केली. यामिनी दळवी हिने ‘ती साठाव्या वर्षीही तशीच तजेलदार’ ही गंभीर कविता सादर केली. ओंकार काशीदच्या ‘हे जीवन सुंदर’ या कवितेला उपस्थितांची दाद मिळाली. सुहासिनी देशमुख हिची ‘नुकत्याच न्हालेल्या केसांना बांधू कसेबसे’ ही कविता सर्वांना भावली. तुषार शिल्लक यांची ‘थरथरती दिवाभीत पणती’, शशिकांत कोळी यांची ‘झाकड पडली थांबू नकोस’ ही रचना आणि कृष्णा काळदाते यांनी ‘पक्ष्यांचे लक्ष थवे’ रचना सादर केली. शरद सांळुखे याने ‘हंगाम दाटला पिकात पिवळी छाया’ ही कविता आणि अविनाश भारती याने ‘तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ’ रचना सादर करून वातावरण भावूक केले. महानोरांच्या गाजलेल्या कविता आणि स्वलिखित कविता अशी दुहेरी पर्वणी रसिकांना अनुभवता आली. कवी नीलेश चव्हाण याचे उत्स्फूर्त निवेदनातून मैफल गुंफली गेली. ‘या नभाने या भुईला दान द्यावे’ या कवितेने सांगता झाली. रविराज काळे यांनी आभार मानले. यावेळी सुलोचना महानोर, विशाल बडे, विवेक देशमुख यांच्यासह रसिक उपस्थित होते.

मन कवितेत हरवले

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि ह्या मातीतूनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

ही कविता ऐकवत महानोर यांनी काव्य लेखनाचा प्रवास उलगडला. एखादी शब्दकळा कशी सुचली आणि कविता कशी जन्माला आली या आठवणी महानोर सांगत असताना नवोदित कवी भान हरपून ऐकत होते. तर क्षणोक्षणी महानोर यांचे मन कवितेत हरवत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमणगंगेचे ५० ‘टीएमसी’ पाणी मराठवाड्याला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी दमणगंगा-पिंजाळ नद्यांच्या माध्यमातून ५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सामंजस्य कराराच्या माध्यमातून योजना केंद्राकडे गेल्यानंतर कॅबिनेटमध्ये मंजूर होईल, असे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानात ध्वजवंदन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर भगवान घडामोडे, आमदार संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार, अतुल सावे, प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींची उपस्थिती होती.
यावेळी, ‘गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारने मराठवाड्यात विषेश लक्ष दिले,’ असे त्यांनी सांगितले. विभागातील ४० लाख शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळाला असून, सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही धरणांची कामे केली; तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून साडेचार लाख हेक्टर शेतीला पाणी मिळाले आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी विभागात सर्वप्रथम वॉटरग्रीडचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, हा प्रकल्प पिण्याचे पाणी, शेती, उद्योगांसाठी वरदान ठरेल, ‘डीएमआयसी’चे देशातील पहिले काम ऑरिक सिटीच्या माध्यमातून शहरात सुरू झाले, येत्या दोन वर्षांत पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर या ऑरिक सिटीच्या माध्यमातून तीन लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार अाहे,’ असे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा चेहरा बदलण्यासाठी राज्य शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात पीक विमा योजनेसह सरकारच्या विविध योजनांना मोठा प्रतिसाद मिळालला आहे. देशातील सर्वाधिक विमा प्राप्त केलेल्या जिल्ह्यांपैकी काही जिल्हे मराठवाड्यातील असून, राज्यातही मराठवाड्यातील आठही जिल्हे पुढे आहेत. कर्जमाफीलाही मोठा प्रतिसाद मिळाला असून, लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आता विकासाचा संग्राम

मराठवाड्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी मोठे युद्ध केले. मोठा त्याग केला आहे, आता आपल्या पिढीला विकासासाठी संग्राम करावयाचा आहे. विकासाच्या या संग्रामामध्ये गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवादपासून मुक्ती हवी आहे शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणापासून मुक्ती हवी आहे. हा मुक्तीचा संग्राम आपण एकत्रितपणे लढू, या संग्रामामध्येही मराठवाडा ‌निश्चित विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोखंडी पुलावर होणार काँक्रिटीकरण

$
0
0

लोखंडी पुलावर होणार काँक्रिटीकरण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावीर चौक ते छावणी रस्त्यावरील निजामकालीन लोखंडी पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर वर्षानुवर्षे डांबरीकरणाचे थर टाकले गेले. पण रस्त्यावरून पाणी निचरा होण्यासाठी आजूबाजूला नाल्या नसल्याने पाणी साठून डांबरीकरण उखडून खड्डे पडतात. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या कामासाठी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
सर्वाधिक रहदारीच्या या रस्त्यावरील लोखंडी पुलाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाळूज, पंढरपूर, मुंबई, पुणे, नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना खड्ड्यातून वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने हे खड्डे कायमस्वरुपी बुजविणे शक्य नाही. पण पुलावरील रस्त्याला दुसरी उपाययोजन करणेच योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. कारण दुरुस्तीच्या नावाखाली या पुलावर डांबरीकरणाचे थरच्या थर टाकले गेले. त्यामुळे रस्त गुळगुळीत झाला पण रस्त्यावर पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी काहीच सुविधा केल्या गेल्या नाहीत. परिणामी, पाणी पुलावर साठून राहते. पाण्याचा फटका डांबर मिश्रणाला बसतो आणि डांबरीकरण निखळून जाते. त्यामुळे दरवर्षी काम करूनही खड्डे पडलेले असतात. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाने एक प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पुलावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ८० मीटर लांब आणि सात मीटर रुंदीच्या या पुलावर काँक्रिटीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये लागणार आहेत. यासाठी स्वतंत्र तरतुदीची मागणी करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुलावरील खड्डे भरण्याचे जे काम सुरू आहे, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कुठल्याच प्रकारचा निधी नाही. अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कंत्राटदारास विनंती करून खड्डे भरणे सुरू केले आहे. काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव मान्य झाल्यास लोखंडी पुलाचा दीर्घकालीन त्रास बंद होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिमोग्लोबिन’च्या आकड्यांचा घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाशी अद्ययावत लॅब चाचण्यांच्या सेवांचा करार झालेल्या ‘एचएलएल’ कंपनीच्या रिपोर्टमध्ये आकड्यांचा घोळ असल्याचे ‘मटा’ला प्राप्त झालेल्या रिपोर्टवरून उघड झाले आहे. नांदेडच्या ‘एचएलएल’ प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये एका व्यक्तीचे हिमोग्लोबिन ४.९ इतके नोंदविण्यात आले आहे, तर दुसऱ्या खासगी लॅबमध्ये त्याच व्यक्तीचे हिमोग्लोबिन १३ असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन लॅबच्या हिमोग्लोबिनच्या रिपोर्टमध्ये एवढी मोठी तफावत असू शकत नाही, असे तज्ज्ञांनीही यानिमित्ताने स्पष्ट केले आहे.
राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्व गोरगरीब-सामान्य रुग्णांना अद्ययावत लॅब चाचण्यांच्या दर्जेदार सेवा मिळाव्यात, या व्यापक हेतुने ‘एचएलएल’ कंपनीशी आरोग्य विभागाचा मागच्या वर्षी करार झाला आहे. या कराराअंतर्गत अनेक ठिकाणी ‘महालॅब्स’ (हिंदलॅब्स डायग्नोस्टिक सेंटर) या नावाने लॅब चाचण्यांच्या सेवांना सुरुवात झाली आहे. करारानुसार बहुतांश प्रकारच्या अत्याधुनिक चाचण्यांच्या सेवा देणे अभिप्रेत आहे. मात्र ‘हिमोग्लोबिन’सारख्या तुलनेने अतिशय साध्या चाचणीचे आकडे भलतेच आल्याचे नांदेड येथील ‘एचएलएल’च्या लॅबमध्ये उघड झाले आहे. नांदेड येथील ‘एचएलएल’च्या लॅब रिपोर्टनुसार एका ६० वर्षीय महिलेचे हिमोग्लोबिन (एचबी) हे ४.९ असल्याचे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रिपोर्टवर एमडी पॅथॉलॉजिस्टची सहीदेखील आहे. १२ सप्टेंबर १०१७ रोजी २ वाजून १८ मिनिटांनी हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. वैद्यकीयदृष्ट्या ४.९ ‘एचबी’चे प्रमाण अतिशय कमी मानण्यात येते व ते अनेक गंभीर आजारांचे लक्षणही असू शकते. शंका आल्यामुळे संबंधित महिला रुग्णाने दुसऱ्या खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता, त्याच रुग्णाचे ‘एचबी’ हे १६ सप्टेंबर २०१७ रोजी १३ इतके दाखवण्यात आले. त्यामुळे संबंधित रुग्ण व नातेवाईकांना धक्काच बसला व ‘एचएलएल’ कंपनीच्या आकड्यांचा घोळही उघड झाला.

चार दिवसांत वाढ अशक्य

अवघ्या तीन ते चार दिवसांत कोणत्याही औषधांनी किंवा इंजेक्शनद्वारे शरिरातील ‘एचबी’चे प्रमाण ४.९ वरुन १३ पर्यंत जाणे शक्य नाही, असे काही पॅथॉलॉजिस्टनी नाव न देण्याच्या अटीवर ‘मटा’ला सांगितले. त्यामुळे संबंधित महिला रुग्णाला चुकीचा रिपोर्ट दिला, असेही स्पष्ट होत आहे.

तांत्रिक दोषामुळे एखाद्या चाचणीच्या रिपोर्टमध्ये चुकीचे आकडे येऊ शकतात. मात्र असे चुकीचे रिपोर्ट वारंवार येत असतील तर ते गंभीर आहे आणि तसे झाले किंवा तशा तक्रारी आल्या तर आरोग्य विभागाकडून कठोर कारवाई केली जाईल. त्याचवेळी, काही खासगी लॅबमध्ये चाचणी न करता रिपोर्ट दिला जातो. हेदेखील गंभीर असून, लक्षात घेतले पाहिजे.
– डॉ. सतीश पवार, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरतपासणीचे अवघड आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेच्या उत्तपत्रिका फेरतपासणीसाठी दहा हजार अर्ज आले आहेत. येत्या २० सप्टेंबरपर्यंत उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षी सर्वाधिक सहा हजार अर्ज बी.एस्सीचे आहेत.

परीक्षा विभागाच्या संथ कामकाजाने रखडलेल्या निकालानंतर आता फेरमूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी केली आहे. अभियांत्रिकीच्या निकालाची टक्केवारी घसरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते; तसेच ‘कॅरिऑन’ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन थंडावले, मात्र ‘फार्मसी’च्या निकालात परीक्षा विभागाने अनेक ‘चमत्कार’ घडवले. वेबसाइटवर निकाल जाहीर करून दोन दिवसांनी पुन्हा निकाल बदलण्यात आले. उत्तीर्ण विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगत हात झटकले. पदवी आणि पदव्युत्तर निकाल जाहीर करण्यास विलंब झाला होता. किमान तीन ते साडेतीन महिन्यांनंतर निकाल जाहीर करण्यात आले. काही विषयांचे निकाल पुन्हा पडताळून पाहण्याची गरज असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठी दहा हजार अर्ज आले आहेत. या अर्जांची येत्या २० सप्टेंबरपर्यंत तपासणी होईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी सांगितले. बी.एस्सी अभ्यासक्रमाचे सर्वाधिक सहा हजार दहा अर्ज प्राप्त झाले आहेत.

‘पेट’ची गुणपत्रिका नाही
प्रचंड वादग्रस्त ठरलेली पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा अजूनही वादात आहे. वजा गुणांकन पद्धत राबवल्यामुळे पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले होते. अवघा तीन टक्के निकाल लागल्यामुळे वाद सुरू झाला होता. विद्यार्थ्यांचा रोष वाढल्यानंतर वजा गुणांकन पद्धत रद्द करून निकाल घोषित करण्यात आले. हा निकाल वेबसाइटवर जाहीर झाला आहे, मात्र गुणपत्रिका नसल्यामुळे दीड हजार विद्यार्थी विचारणा करीत आहेत. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने अजून निर्णय घेतलेला नाही.

फेरतपासणीचे अर्ज
बी. ए. ः ११६०
विधी ः ११००
बीएड ः ८८७
एमएड ः ०५
एमएस्सी ः ९७५
बी. एस्सी ः ६०१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भैयासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष वाढवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भैयासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची मुंबई प्रदेशाची जबाबदारी स्वीकारणे ही घटना रिपब्लिकन पक्षाचा सुवर्णकाळ आहे. या पदावरून रिपब्लिकन पक्ष देशभरात बळकट केला, हे त्यांनी पंजाबमधून लढवलेल्या निवडणुकीतील मतांवरून स्पष्ट होते’ असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले. ते व्याख्यानात बोलत होते.
सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या वतीने यशवंतराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तापडिया नाट्यमंदिरात रविवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर प्रा. अविनाश डोळस, महेश भारतीय, सुनील कदम, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डांगळे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संघीकरण होत असल्याची घटना आंबेडकरी चळवळीस घातक ठरणार आहे. आंबेडकरी विचारांचा वारसा जतन करताना सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.’ तर महेश भारतीय यांनी आंबेडकर भवनावर भाष्य केले. ‘बाबासाहेबांनी ज्यांना समाजाच्या उन्नतीसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या, त्यांचे वारस आज आंबेडकर भवनाचा ऐतिहासिक वारसा नेस्तनाबूत करीत आहेत. हा चळवळीच्या केंद्राला सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे’ असे भारतीय म्हणाले. सुनील कदम यांनी तरुणांच्या कार्यावर विचार मांडले. ‘बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रात गौरवशाली कार्य केले आहे. तरी त्यांचा नामोल्लेख जाणीवपूर्वक टाळला जातो. आंबेडकरी तरुणांनी जागरुक होऊन समाजासमोर सत्य मांडावे’ असे कदम म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद चक्रनारायण यांनी केले तर रतनकुमार साळवे यांनी आभार मानले. यावेळी ॲड. बी. एच. गायकवाड, भीमराव बनसोड, पंडित तुपे, रेखा मेश्राम, अमरदीप वानखेडे, बुद्धप्रिय कबीर, सुदाम मगर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भैयासाहेबांचे कार्य मोठे

‘भैयासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य तत्कालीन नेत्यांच्या पुढारी होण्याच्या शर्यतीमुळे दाबले गेले. भैयासाहेब एक मुत्सद्दी राजकारणी, अभ्यासु पत्रकार आणि लढवय्ये नेते होते. आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला’ असे प्रतिपादन प्रा. अविनाश डोळस यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकास प्रक्रियेत मराठवाड्याचा अपेक्षाभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांनी शिफारशी केल्या, मात्र राज्य सरकारने या शिफारशींची कधीच पुरेपूर अंमलबजावणी केली नसल्यामुळे मराठवाड्यातील जनतेचा अपेक्षाभंग झाला. शिक्षण, सिंचन, उद्योग या क्षेत्राचे सक्षमीकरण आवश्यक आहे, असा सूर हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात उमटला.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाडा विकास संशोधन संस्थेने ‘मराठवाड्याचा विकास’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. संस्थेच्या सभागृहात रविवारी दोन सत्रांत चर्चासत्र झाले. यावेळी मंचावर कृषी शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. वराडे, सचिव प्राचार्य शरद अदवंत यांची उपस्थिती होती. पहिल्या सत्रात ‘दांडेकर, इंडिकेटर ते केळकर समिती, पुढे काय’ या विषयावर प्रा. डॉ. धनश्री महाजन यांनी विचार मांडले. ‘मराठवाड्याच्या विकासासाठी नागपूर कराराला कायद्याचे स्वरूप देण्याची मागणी होती. कायदा झाल्यास योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित होते, पण मागणी प्रत्यक्षात आली नाही. मागास भागाचा अनुशेष दूर करण्यासाठी एकूण ८५ टक्के निधी वापरण्याची शिफारस केल्यामुळे राज्य सरकारने दांडेकर समितीचा अहवाल स्वीकारला नाही. या विकास प्रक्रियेत मागास भागांना पुढे घेऊन जाण्याची गरज केळकर समितीने व्यक्त केली. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न ४० टक्के कमी आहे. वेगवेगळ्या समिती आणि अभ्यासगटांनी वेळोवेळी शिफारशी केल्या, मात्र अंमलबजावणी नसल्याने मराठवाडा उपेक्षित राहिला. समितीचा अहवाल सादर होईपर्यंत दोन-तीन वर्षे उलटतात. शिफारशींवर कृती करण्याचा निर्णय घेताना पाच-सात वर्षे जातात. हा काळ अपेक्षांचा असतो आणि पुढील काळ अपेक्षाभंगाचा असतो. प्रत्येक समितीला मर्यादा असल्या तरी काही कडक शिफारशी समिती करू शकतात,’ असे डॉ. महाजन म्हणाल्या.
प्राचार्य जीवन देसाई यांनी ‘मराठवाड्यातील शिक्षण’ या विषयावर भाष्य केले. ‘१६ जिल्हे असलेल्या त्रैभाषिक हैदराबाद संस्थानात उर्दू मुख्य माध्यम होते. १९३०पर्यंत मराठवाड्याच्या साक्षरतेचे प्रमाण अवघे पाच टक्के होते. १९४८पासून मराठवाड्यात शिक्षणाचे युग सुरू झाले. उर्वरीत महाराष्ट्रात शंभर वर्षांपूर्वीच शिक्षणाचे युग सुरू झाले होते. १९७५पासून मराठवाड्यात शिक्षणाचा नवीन आकृतीबंध स्वीकारला गेला, पण शिक्षणाची परंपरा नसल्यामुळे पुढील काळात गुणवत्तापूर्ण विकास झाला नाही. ‘सर्व शिक्षा अभियाना’तही शेकडो तक्रारी आल्या. बोगस पटनोंदणी, जादा तुकड्या, शालेय साहित्य वाटपात गोंधळ, अशा तक्रारीमुळे गुणवत्तेवर परिणाम झाला. नवीन शिक्षण पद्धतीमुळे सुधारणा झाली असली, तरी अधिक सुधारणेची गरज आहे. विशेषतः मराठी शाळांचे सबलीकरण आवश्यक आहे,’ असे देसाई म्हणाले.
‘सिंचन व्यवस्थापन - आज आणि उद्या’ या विषयावर प्रा. डी. एच. पवार यांनी भाष्य केले. दरम्यान, दुसऱ्या सत्रात ‘पर्जन्याधारित शेती’ या विषयावर विजय बोराडे आणि ‘मराठवाड्याचा औद्योगिक विकास’ या विषयावर मुकुंद कुलकर्णी यांनी विचार मांडले. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

समितीचे काय झाले?

‘विजय केळकर समितीच्या अहवालाचा अभ्यास करू, असे राज्य सरकारने २०१५मध्ये सांगितले, मात्र अहवालाचे काय झाले ते अद्याप माहीत नाही. यापूर्वी सत्ताधारी असलेल्या पक्षाने केळकर समिती नेमली होती. आता विरोधक असलेल्या या पक्षांनी केळकर समितीसाठी आवाज उठवल्याचे आठवत नाही. सत्ताधारी व विरोधकांच्या स्थितीमुळे भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते,’ अशी खंत डॉ. महाजन यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमन आठ दिवसांत मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सध्या सुरू असलेले भारनियमनप्रश्नी आठ दिवसात मार्ग काढण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. भाजप शहराध्यक्ष किशनचंद तणवाणी यांनी मुख्यमंत्र्यांना भारनियमन रद्द करण्यासंदर्भात मागणी करणारे निवनेद दिले. त्याप्रसंगी त्यांनी हे संकेत दिल्याची माहिती तणवाणी यांनी दिली.
हैदराबाद मु‌क्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्र्यांचे रविवारी सकाळी विमानतळावर आगमन झाले. त्याप्रसंगी तनवाणी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा केली. भारनियमनामुळे नागरिकांना पाण्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे भारनियमन रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वीज पुरवठ्याबाबत केंद्रीय उर्जामंत्री गोयल यांच्यासोबत चर्चा सुरू असून येत्या आठ दिवसात भारनियमनाचा प्रश्न तुमच्या शहरात राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती तणवाणी यांनी दिली. यावेळी आमदार अतुल सावे, आमदार नारायण कुचे, डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.

‘समांतर’ मार्गी लावा

भारनियमनावर चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी पिण्याच्या पाण्याची माहिती घेतली. शहरात पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याचे समजतात त्यांनी आश्चर्य व्यक्‍त केले. समांतर जलवाहिनी प्रकरणात संबंधित कंपनी कोर्टात गेली आहे. याबाबत शासनाने मध्यस्‍थी करून नागरिकांना पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आणण्याबद्दल निर्णय आधी घ्यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष किशचनंद तनवाणी यांनी केली. कंपनी आणि महापालिकेच्या वादात नागरिक तहानलेले आहेत, अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा

$
0
0


टीम मटा, औरंगाबाद
मराठवाड्यात सर्वत्र हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

नांदेडमध्ये खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
नांदेड : हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ मोठ्या उत्साहातपार पडला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडले. तत्पूर्वी माता गुजरीजी विसावा उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली तसेच मानवंदना देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांता पवार, महापौर शैलजा स्वामी, स्वातंत्र्य सैनिक यांच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी नारायणराव भोगावकर, माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण, आमदार अमर राजुरकर, हेमंत पाटील, डी. पी. सावंत, आमदार अमिता चव्हाण, विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त गणेश देशमुख, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे उपस्थितीत होते.



‘बलिदानाच्या प्रेरणेतून मराठवाडयाचा विकास’
उस्मानाबाद - हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झालेले उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर क्रियाशील राहिले आणि आजही क्रियाशील आहेत. ज्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची सदैव जाणीव राहील. मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ६९ व्या वर्धापनादिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी दिवाकर रावते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे उपस्थित होते.

‘सर्वांगीण विकासासाठी सहकार्य आवश्यक’

हिंगोली : मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी संपुर्ण आयुष्याची आहुती देत मराठवाड्याला निजामांच्या जोखडातून मुक्त केले. त्याची जाणीव ठेऊनच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांची उपस्थिती होती.

जालन्यात शहिदांना मानवंदना
म. टा. प्रतिनिधी, जालना
हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. जिल्ह्यात आज सर्वत्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील टाऊन हॉल जवळच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभास रविवारी मुख्य शासकीय ध्वजवंदना आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेशही दिला.
याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक रामश्वरजी दायमा, सुभद्राबाई शंकरराव देशमुख, आशाबाई मदनलाल चरमरे, प्रभावती गजानन जोशी, जानीबाई माणिकचंद कटारे, प्रयागबाई हरिशचंद्र हावळे, मालनबाई विठ्ठलराव चव्हाण, जाईबाई, खंडेराव खलसे, मालनबाई राजाराम बरवे, राणीरक्षा अब्दुल अजीज खॉ, कांताबाई विश्वंभरराव मिटकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यातआला. कार्यक्रमास आमदार राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, विलास नाईक, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी. बी. खपले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कमलाकर फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडुळकर, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे विकास’
लातूर : हैदराबाद मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात ज्या थोर विरांनी आपले जीवन समर्पित केले, आपल्या संपुर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामांच्या बंधनातून मुक्त केले. मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास झाल्याचे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वाजारोहण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे, लातूरचे महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी सुनील यादव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ ऑक्टोबरपर्यंत तरी कर्जमाफी द्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जालना
‘रावसाहेब दादा सत्ताधारी पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. ते कितीही काही झाले तुम्हाला पटवून देणार. त्यांनी १५ ऑक्टोबरपूर्वी शेतकयांना रक्कम मिळवून द्यावी,’ अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दोन्ही हात जोडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केली.

निमित्त होते ते जालना जिल्ह्यातील शिक्षण व सहकारमहर्षी स्व. अंकुशराव टोपे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात स्व. अंकुशराव टोपे यांच्या अर्धकृती पुतळ्याचे रविवारी अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे, आमदार राजेश टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल आदींची उपस्थिती होती.

आमदार राजेश टोपे यांच्या कर्जमाफी संदर्भात मुद्द्याच्या अनुषंगाने खासदार दानवे म्हणाले की, आमची इच्छा कर्जमाफी व्हायला पाहिजे अशीच आहे. आता ज्या राज्यांनी कर्ज माफ केले पंजाब, उत्तरप्रदेश, कर्नाटक यांचा समावेश आहे. त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त कर्ज महाराष्ट्र राज्याने केलय. आकडा सांगितला तर ऑबजेक्शन येईल. जे कमिटमेंट केले ते कर्जमाफ होणार आहे. १५ ऑक्टोबरच्या आत शेतकऱ्यांच्या नावावर तो पैसा जमा होणार आहे.त्यानंतर अजित पवार यांनी खासदार दानवे यांना व्यासपीठावरून जाहीरपणे दोन्ही हात जोडून १५ ऑक्टोबर रोजी पैसे देण्याची मागणी करताच उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.
दरम्यान, याच कार्यक्रमात अजित पवार यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंवर टीका करून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचीच कुलगुरूंची पाठराखण केल्याचा आरोप केला. आम्ही विनोद तावडेंना म्हटले तुम्ही मुंबई विद्यापीठाचा निकाल लावा. एक ऑगस्ट, पाच ऑगस्ट त्यानंतर गणपती, गणपती विसर्जन झाले. गणपती जावून नवरात्र आली. नवरात्रीनंतर दसऱ्यानंतर दिवाळी. बकरी ईद देखील झाली, तरी निकाल लागलेला नाही.
हे सरकार शेतकरी विरोधी असून, सहकार क्षेत्र मोडीत निघेल असे पाहत आहे. या सरकारने आता सरपंच हा डायरेक्ट जनतेतून निवडून देण्याचे जाहीर केले आहे. सरपंच जर एका पक्षाचा व सदस्य दूसऱ्या पक्षाचे असतील तर त्या ग्रामपंचायतमध्ये काय विकास होईल, लोकशाहीचा नुसताच खेळखंडोबा केला आहे. या सरकारने काळा पैसा बाहेर निघण्यासाठी नोटा बंदी केली. परंतु काळा पैसा बाहेर तर निघालाच नाही, बनावट नोटा मात्र छापल्या गेल्या. काळा पैसा बाहेर निघाल्यास देशाचा विकास दर वाढेल, ते तर झालेच नाही. यामुळे बेकारी वाढली. व्यापार धंदे तोटयात आले. प्लॉटिंग व्यवसाय बंद पडले, आता तर जीएसटीच लागू केली. यामुळे जी वस्तू गोरगरीबांना मिळणार आहे. त्या वस्तूचे दर ही वाढतील.

‘समर्थ बँक आणखी प्रगती करेल’
स्व. अंकुशराव टोपे यांच्या शिकवणीचा आदर डोळ्यासमोर ठेवून काम करा. त्यामुळे येत्या काळात समर्थ सहकारी बँक आणखी प्रगतीशील होईल, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. समर्थ सहकरी बँकेच्या नूतन वास्तू स्थलांतर आणि सभासद व शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरबस अडकली ‘फेऱ्यात’

$
0
0


शहरबस अडकली ‘फेऱ्यात’
मोजक्या मार्गावर धावते सिटीबस
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर बसचा तोटा वाढू लागल्याने सिटीबसची संख्या वाढविली जात नाही. सध्या केवळ ३१ सिटीबस १३ मार्गावर धावत आहेत. शहरातील मोजकेच कॉलेज आणि शाळा वगळता या सिटीबसचा उपयोग नागरिकांना होत नाही. याचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. सिटीबस नसल्याने खासगी वाहन संख्याही वाढली आहे.
शहरात एसटी महामंडळाची सिटीबस १५ नोव्हेंबर २०१० रोजी सुरू झाली. २०१० ते मार्च २०११ पर्यंत सिटीबसची संख्या २९ होती. याउलट महापालिकेच्या एएमटी बसची संख्या ६० च्या वर होती. तर एसटीची २००१ पूर्वी शहरात तब्बल ११० सिटीबस धावत होत्या. सात लाखांच्या शहरासाठी १०० बस होत्या. तर आता लोकसंख्या १५ लाखावर गेल्यानंतर सिटीबसची संख्या ३१ वर येऊन ठेपली आहे.
शहरात १३ मार्गांवर धावणाऱ्या ३१ सिटीबस दर २० मिनिटांनी त्या त्या मार्गांवरून जातील, असे वेळापत्रक करण्यात आले आहे. मात्र वेळापत्रक नावालाच असून बस अपवादानेच वेळेत येते असे सध्याचे चित्र आहे. दोन फेऱ्यांमधील असलेले अंतर हे जास्त असल्याने व त्यातही बस वेळेवर येत नसल्याने नागरिकांना खासगी प्रवासी वातुकीचा आधार नाईलाजाने घ्यावा लागतो. नियोजनाचा अभाव असल्याने त्याचा फटका सिटीबसला बसत असून ती तोट्यात चालली आहे.
असा आहे शहर बसचा साधा नियम
शहर बस सेवा चालविताना शहरातील जनतेच्या दृष्टीने एका मार्गावरील दोन बसच्या फेऱ्यांमध्ये अंतर कमीत कमी असणे आवश्यक आहे. हे अंतर दहा मिनिटांपेक्षा कमी वेळेचा असल्यास प्रवासी शहरबसची वाट पहातात. मात्र, औरंगाबाद शहरात एसटी महामंडळाची सिटीबस सुरू झाल्यापासून बसच्या फेऱ्या वाढवून प्रवाशांच्या दृष्टीने नियोजन अभावानाचे झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस, इंधन दरवाढी विरोधात कॉग्रेस रस्त्यावर

$
0
0

गॅस, इंधन दरवाढी विरोधात कॉग्रेस रस्त्यावर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काँग्रेस कार्यकर्त्यांनी या दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने केली. भाजपाने पेट्रोल, डिझेल व गॅसची केलेली दरवाढ ही अन्यायकारक आहे. वाहनचालकांना व सर्वसामान्य जनतेला फटका बसला आहे.
प्रत्येक वस्तूची दरवाढ व पंतप्रधानांचे परदेश दौरे याच्यात जणू स्पर्धा लागली आहे. त्याचा बोजा मात्र सर्वसामान्य जनतेवर पडत आहे. राज्यात इंधनावर वेगवेगळे सेस लावले जात आहे. या दरवाढीचा परिणाम थेट उद्योग व्यवसायावर होत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
इंधन दरवाढीमुळे महागाईचा आलेख वेगाने उंचावत असून अन्नधान्य, दुधापासून सर्वच जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत वाढ होत आहे, असा आरोप शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केला. परेशान जनता करे पुकार, मत कर मोदी अत्याचार, यासह अन्य घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. समशेरसिंग सोधी, जगन्नाथ काळे, इब्राहीम पटेल, भाऊसाहेब जगताप, अयुब खान, बाबा तायडे, खालेद पठाण, सरोज मसलगे पाटील, अनिल माळोदे, एम.ए.अजहर, सुरेखा पानझडे, आशिष पितळे, जयपाल दवणे, सुनील साळवे, किशोर ढेपे, हरचरणसिंग गुलाटी, रमाकांत मगरे, अविनाश काळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑल लेडीज लीगची शाखा औरंगाबादेत सुरू

$
0
0

ऑल लेडीज लीगची शाखा औरंगाबादेत सुरू
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
ऑल लेडीज लीग (ALL) या जागतिक पातळीवरच्या महिला समुहाच्या औरंगाबाद विभागीय शाखेचे उद्घाटन रविवारी एमजीएमच्या आईनस्टईन सभागृहात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या हस्ते पणजी प्रज्वलित करून झाले. जगभरातल्या १५० देशात कार्यरत असलेल्या या समुहाने आत्मउन्नतीने कार्य करणाऱ्या विविध देशातल्या महिलांना मैत्रीपूर्ण सहकार्याने जोडले असून एकमेकींच्या आवडी-निवडी, व्यक्तिमत्त्व आणि व्यवसाय प्रगत करण्यासाठी या समुहाचा प्रभावी उपयोग होत असल्याचे दिसून आले आहे. डॉ. निधी नावंदर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या औरंगाबाद विभागासाठी प्रमुख सहकारी म्हणून डॉ. अरुणा शहा कराड आणि डॉ. तृप्ती बोरुळकर यांची निवड करण्यात आली.
एक अभिनव सुरुवात म्हणून भाषणाऐवजी विजया रहाटकर यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून याप्रसंगी उपस्थित महिलांना प्रेरित करणारा संवाद साधण्याची कल्पकता आयोजक समितीने दाखवली. विजया रहाटकर यांनी सांगितले की, महिलांनी स्वत:मधे अंतर्भूत असलेल्या सकारात्मकतेने स्वत:ला सिद्ध करावे. त्याचप्रमाणे आपली शक्ती ओळखून कार्यरत राहिल्यास त्याचे चांगलेच परिणाम दिसून येतात. शिवाय कुटुंबाचा प्रेरणादायी सहभाग, मदत मिळाल्यास महिलांची वाटचाल अधिक सुकर, सहजसोपी होते. मनमोकळे, सहज सुलभ विचार, सकारात्मक मार्गदर्शन यामुळे रहाटकरांची ही मुलाखत चांगलीच रंजक ठरली. महिला आशावादी असतातच, पण त्यांच्यात परिणामकारक, निर्णायक कार्य करण्याची क्षमता उपजतच असते आदी वैशिष्ट्ये यावेळी दृक-श्राव्य पद्धतीने पडद्यावर दाखविण्यात येत होती. सूत्रसंचालन पूजा करवा यांनी केले.
यावेळी उपस्थित महिलांनी स्वत:चा आपला परिचय करून दिला आणि अशी संधी आपल्याला प्रथमच मिळत असल्याचे बऱ्याच महिलांनी सांगितले. यावेळी महिलांनी वाचनाने समृद्ध व्हावे आणि स्वत:चे आरोग्य जपावे या उद्देशाने उपस्थित महिलांना बुकमार्क्स आणि जवस-तिळाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालमत्ता कर वसुलीचे खासगीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कर वसुलीच्या कामाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव गुपचूप मंजूर करून घेण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या असल्यामुळे प्रस्ताव मंजूर होईल, असे मानले जात आहे. वसुलीच्या खासगीकरणाबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव देखील मंजुरीच्या मार्गावर आहे.

महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांना कर आकारणी करण्याच्या कामाचे खासगीकरण करण्याची चर्चा पालिकेत सुरू होती. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे अशा प्रकारच्या खासगीकरणाला पाठिंबा देण्याची भूमिका सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी घेतली होती. खासगीकरणास नगरसेवकांचा पाठिंबा आहे हे लक्षात आल्यावर काही पदाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण व कर आकारणीच्या सोबतच कर वसुलीचेही खासगीकरण करण्याचा उल्लेख करून एक प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावावर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; प्रस्तावावर स्वाक्षऱ्या घेण्याची प्रक्रिया १५ दिवसांपूर्वी झाली आहे. त्यामुळे यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळचा विषय मंजूर झाल्याचा उल्लेख करून या प्रस्तावाचा समावेश केला गेला असण्याची शक्यता आहे. तसे झाले नसेल, तर मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयाच्या माध्यमातून कर वसुलीच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो.

या प्रस्तावासोबतच घनकचरा व्यवस्थापनाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला असून, त्यावरही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. हा प्रस्ताव देखील ऐनवेळी मंजूर केला जाण्याची शक्यता आहे.

मालमत्तांचे सर्वेक्षण व कर आकारणीच्या कामाचे खासगीकरण करण्यास आमचा विरोध नाही, पण कराच्या वसुलीचे खासगीकरण करण्यास शिवसेनेचा विरोध आहे. वसुलीचे काम गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून केले जाते. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होईल. वसुली करणारे खासगी कर्मचारी नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत जातील आणि भविष्यात हा प्रकार तापदायक ठरेल. कर आकारणीचे काम खासगीकरणातून व्हावे, पण वसुली महापालिकेनेच केली पाहिजे. ही भूमिका आम्ही सभागृहात मांडणार आहोत.
- त्र्यंबक तुपे, माजी महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक धोरणात राजकीय हस्तक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याद्वारे आर्थिक धोरणे ठरत असल्यामुळे पुरेशी अंमलबजावणी होत नाही. नियोजन आयोग व नीती आयोगाला मर्यादा असून, धोरणाचे अवलंबित्व बंद करून राजकारणापलिकडे नवीन विकास आयोग स्थापन करण्याचा निष्कर्ष डॉ. बाळासाहेब सराटे यांनी पीएच.डी. शोधप्रबंधात मांडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच सराटे यांना अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. प्रदान केली आहे.

१५ मार्च १९५०मध्ये स्थापन झालेल्या नियोजन आयोगाने पंचवार्षिक योजनात आर्थिक वृद्धीदरावर भर दिला. देशाचा ‘जीडीपी’ वाढत असताना दारिद्र्य, विषमता, बेरोजगारी, कर्ज आणि आयातसुद्धा वाढत होती. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था प्रगत की अप्रगत असा पेच निर्माण होतो. या अनुषंगाने डॉ. बाळासाहेब सराटे यांनी ‘नीती आयोगाच्या विशेष संदर्भासह भारतीय नियोजन आयोगाचे एक चिकित्सक मूल्यांकन’ या विषयावर पीएच.डी. संशोधन केले. आर्थिक वृद्धी, कृषी धोरण आणि दारिद्र्य-बेरोजगारी या मुद्द्यांचे चिकित्सक विवेचन केले. नियोजन आयोगाच्या १०, ११ आणि १२व्या पंचवार्षिक योजनेत देशाचा सविस्तर विचार आहे. या मांडणीनंतर इतर मांडणीची गरज नाही, मात्र योजनांचा प्राधान्यक्रम चुकल्यामुळे प्रमुख योजनांची पुरेपूर अंमलबजावणी झाली नाही, असा निष्कर्ष डॉ. सराटे यांनी मांडला आहे. रोजगार निर्मिती आणि कृषी धोरणाला योजनेत पुरेसे स्थान नाही. सर्वाधिक कृषी उत्पन्न असणारा देश मागास असल्याचे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होऊन उत्पन्न ६० टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर पोचले. उत्पन्न घटले तरी शेतीवरील अवलंबून असलेली लोकसंख्या कमी झाली नाही, असे निरीक्षण सराटे यांनी नोंदवले आहे. दारिद्र्याचे प्रमाण नोंदवण्यातही गफलती झाल्या आहेत. तत्कालीन तेंडुलकर समितीने देशात दारिद्र्याचे प्रमाण २१.९० टक्के असल्याचे म्हटले होते, तर रंगराजन समितीने हेच प्रमाण २९.४९ टक्के नोंदवले आहे. या आकडेवारीत विश्वासार्हता नसल्याचे २०११च्या जनगणनेत स्पष्ट झाले. मासिक उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा कमी असलेली ७५ टक्के लोकसंख्या असल्याचे समोर आले. आकडेवारीत विश्वासार्हता आवश्यक आहे, असे सराटे यांनी सांगितले. या प्रबंधासाठी सराटे यांना डॉ. व्ही. बी. खंदारे यांनी मार्गदर्शन केले.

नीती आयोग मर्यादित
नियोजन आयोग रद्द करून केंद्र सरकारने एक जानेवारी २०१५ रोजी नीती आयोग स्थापन केला. तीन सदस्य असलेल्या नीती आयोगाकडे फक्त शिफारशीचे काम आहे. पंतप्रधान कार्यालयाची एक ‘विंग’ एवढीच त्याची मर्यादा आहे. आतापर्यंत आयोगाने सरकारला अनुकूल असलेली भूसंपादन कायद्याची एकमेव शिफारस केली आहे. आता पारदर्शी विकास आयोगाची गरज आहे असल्याचे सराटे यांनी सुचवले आहे.

भारताचा स्वातंत्र्योत्तर आर्थिक इतिहास हा नियोजन आयोगाचा इतिहास आहे. नियोजन आणि नीती आयोगाची संरचना अभ्यासल्यानंतर नवीन मॉडेलची गरज वाटते. लोकांच्या गरजा न भागवता आर्थिक वृद्धीला प्राधान्य देणे थांबवले पाहिजे.
- डॉ. बाळासाहेब सराटे, संशोधक, अर्थशास्त्र विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीकेटीसाठी विद्यापीठात निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंजिनीअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे फार्मसीच्या विद्यार्थ्यांनाही ५० टक्के एटीकेटी देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. या मागणीसाठी सोमवारी विद्यापीठात संघटनेने निदर्शने केली. विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक मतदार यादीत अपात्र प्राध्यापकांच्या समावेशावर जोरदार आक्षेप घेत ‘बामुक्टा’ने कुलगुरूंना निवेदन दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व शाखांचे निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी थांबलेल्या नाहीत. अभियांत्रिकी शाखेप्रमाणे फार्मसीला एटीकेटी देण्याची मागणी विद्यार्थी करीत आहेत. पी.सी.आय. (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया) यांच्या निर्देशानुसार फार्मसीच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम बदलला आहे. पुढील वर्षीपासून सर्व वर्षांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. बी.फार्मसी अभियांत्रिकीप्रमाणे तांत्रिक पदवी आहे. विद्यापीठाने नुकताच इंजिनीअरिंगसाठी ५० टक्के एटीकेटी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे समान दर्जा असलेल्या बी.फार्मसीला ५० टक्के एटीकेटी देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे; तसेच आर्किटेक्चर शाखेच्या विद्यार्थ्यांनाही एटीकेटी देण्याची मागणी निवेदनात आहे. याबाबत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष मयूर सोनवणे, अक्षय पाटील, दीपक बहिर, पंकज लोखंडे, अमोल दांडगे, मंगेश शेवाळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, ‘पेट-४’ परीक्षेतील वजा गुणांकन पद्धत रद्द करून नवीन निकाल जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे १४०० विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. विद्यार्थ्यांना एका महिन्यात गुणपत्रिका देण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते, पण अजूनही गुणपत्रिका मिळाली नसल्यामुळे भारतीय विद्यार्थी सेनेने सोमवारी कुलगुरूंना निवेदन दिले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ गुणपत्रिका देण्याची मागणी संघटनेचे तुकाराम सराफ यांनी केली. दोनशे विद्यार्थ्यांची स्वाक्षरी असलेले निवेदन कुलगुरूंना देण्यात आले.

निवडणूक नोंदीत अनागोंदी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक अधिसभा निवडणुकीच्या यादीत अनागोंदी झाली आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना (बामुक्टा) यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले. ‘प्रसिद्ध निवडणूक यादीत काही अपात्र प्राध्यापकांची नावे घुसवली आहेत असा आक्षेप संघटनेने घेतला. यादीतील अनुक्रमांक ४०५०, ४१९५, ४४४१ यासारख्या अपात्र प्राध्यापकांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अपात्र प्राध्यापकांची पडताळणी करून संबंधितांवर कारवाई करावी,’ अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, प्रा. अंकुश कदम, प्रा. डॉ. सदाशिव सरकटे, डॉ. फुलचंद सलामपुरे, प्रा. संदीप पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्लंडच्या पर्यटकावर घाटीत उपचार

$
0
0

इंग्लंडच्या पर्यटकावर घाटीत उपचार
पर्यटक मित्राची बीडच्या तरुणाकडून आस्थेवाईकपणे काळजी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बीडमध्ये राहणाऱ्या मित्राच्या भेटीसाठी आलेला इंग्लंडचा पर्यटक खड्ड्यात पडून पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिथून त्याला घाटी रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. सद्यस्थितीत त्याच्या पायाला फ्रॅक्चर असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते, असे डॉक्टरांनी ‘मटा’ला सांगितले. आपल्या पर्यटक मित्राची बीडमधील तरुण सध्या आस्थेवाइकपणे काळजी घेत आहे.
मूळचा बीडचा रहिवासी अंकुश दराडे हा तरुण सहा महिने बीडमध्ये शेतीचे काम करतो, तर सहा महिने गोव्यात हॉटेलमध्ये काम करतो. मागच्या अनेक वर्षांपासून अंकुश हा गोव्यात काम करत असून, १२-१३ वर्षांपूर्वी गोव्यातच फिरायला आलेल्या टिमोथी ली हम्फ्रीज या इंग्लंडच्या पर्यटकाची अंकुश याच्याशी भेट झाली. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि या मैत्रीतूनच टिमोथी हा काही दिवसांपूर्वी बीड येथे अंकुश याला भेटायला गेला होता. मात्र, बीडमध्ये धावण्याचा व्यायाम करताना त्याचा पाय खड्ड्यात पडला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, त्याला दाखल करुन घेण्यात आले आणि शस्त्रक्रियेची गरज लागू शकते, याचा अंदाज आल्यानंतर त्याला औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) पाठवण्यात आले. या संदर्भात टिमोथी याला रविवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी घाटीच्या वॉर्ड क्रमांक १३ मध्ये दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्याच्यावर फ्रॅक्चरचे उपचार सुरू असून, काही दिवसांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते, असे घाटीच्या अस्थिव्यंगोपचार विभागातून सांगण्यात आले.
टिमोथी हा एकटाच
५२ वर्षीय टिमोथी हा अविवाहित असून, इंग्लंडमध्ये एकटाच राहतो. तो एक कामगार असून, छोटे-मोठे काम करुन उदरनिर्वाह करतो आणि जमेल तसे पर्यटनही करतो. विशेष म्हणजे भारतामध्ये अधून-मधून हमखास येतो, असेही त्याचा मित्र अंकुश याने सांगितले.
बीडचा मित्र राबतोय दिवसरात्र
टिमोथी याचा मित्र अंकुश हाच त्याला बीडमध्ये उपचारासाठी घेऊन गेला आणि तिथून औरंगाबादलाही त्यानेच आणले. त्याशिवाय घाटीच्या ज्या वॉर्ड क्रमांक १३ मध्ये त्याला दाखल केले आहे, त्याच्या शेजारीच अंकुश बसून आहे. काय हवे काय नको, याची सगळी काळजी अंकुश घेत असल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडच्या मित्राची सगळी काळजी चक्क बीडचा तरुण घेत असल्याबद्दल कौतुकमिश्रित आश्चर्यदेखील व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या तिजोरीवर ४५ कोटींचा बोजा

$
0
0

आकृतीबंधाला मंजुरी, पालिकेच्या तिजोरीवर ४५ कोटींचा बोजा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
महापालिकेच्या अास्थापनेवर २११७ पदांची निर्मिती करण्याच्या आकृतीबंधाला सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी सूचविलेल्या सुधारणेसह मंजुरी देण्यात आली. महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या दैनिक वेतनावरील २०४ कर्मचाऱ्यांना देखील पालिका सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. आकृतीबंधाच्या मंजुरीमुळे पालिकेच्या तिजोरीवर सुमारे ४५ कोटींचा बोजा पडणार आहे.
आकृतीबंधाला मंजुरी देण्याचा विषय मार्च महिन्यापासून प्रलंबित होता. सर्वसाधारण सभेत या विषयावर व्यापक चर्चा करण्यात यावी व त्यानंतरच हा विषय मंजूर करावा, अशी नगरसेवकांची मागणी होती. त्यानुसार महापौर भगवान घडमोडे यांनी विषय पत्रिकेत आकृतीबंधाचा विषय समाविष्ट केला होता. भाजपचे राजू शिंदे, राजगौरव वानखेडे, शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांनी आकृतीबंधात विविध सुधारणा सुचविल्या. पालिकेच्या सेवेत सध्या असलेल्या दैनिक वेतनावरील २०४ कर्मचाऱ्यांबद्दल या नगरसेवकांनी सूचना केली. या कर्मचाऱ्यांना देखील पालिकेच्या सेवेत सामावून घेतले पाहिजे अशी मागणी केली. महापौर व आयुक्तांनी हा विषय मान्य केला. शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असे आयुक्तांनी सांगितले. आकृतीबंध मंजूर झाल्यावर पालिका अस्थापनेवरील खर्च किती वाढेल असा प्रश्न नंदकुमार घोडेले यांनी विचारला. मुख्यलेखाधिकारी आर. एम. साळुंके यांनी त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, गतवर्षी अास्थापनेवर १७८ कोटी रुपये खर्च झाले होते, नवीन आकृतीबंधाच्या मंजूरीनंतर त्यात ४० ते ४५ कोटी रुपयांचीभर पडेल, परंतु मालमत्ता कराची वसुली वाढली तर उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसू शकेल. आकृतीबंधात वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश नसल्याचा मुद्दा नगरसेवकांनी मांडला. त्याबद्दलही विचार करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
तापडिया सेंटरचा ठराव स्थगित
तापडिया डायग्नोस्टिक सेंटर संदर्भात करार करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत स्थगित ठेवण्यात आला. या ठरावाला एमआयएमच्या नगरसेविका समीना शेख यांनी विरोध दर्शवला. प्रशासनाकडून काही खुलासे मागवले. त्यानंतर ठराव स्थगित ठेवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images