Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करूः मंत्री महाजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठवाड्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पू्र्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून मार्च २०१९ पर्यंत मोठे प्रकल्प पूर्ण होतील. या प्रकल्पांसाठी चार हजार ८०० कोटी रूपये उभे करण्यात येणार आहेत. विशेष तरतूद करण्याचा विचार करीत आहोत’ अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सिंचन भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पैठण येथील जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी महाजन यांनी सपत्नीक जलपूजन केले. या दौऱ्यानंतर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सिंचन विभागाच्या नवीन प्रस्तावांची माहिती दिली. ‘जायकवाडी धरण पूर्ण भरल्यानंतर कालवे दुरूस्तीचा मुद्दा समोर आला आहे. मागील अनेक वर्षे कालवे दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. राज्यात धरणे झाली, पण सिंचन व्यवस्था नाही. गोदावरी जल आराखडा तयार झाल्यानंतर इतर आराखडे चार महिन्यात तयार करण्याचे उद्दिष्ट आहे’ असे महाजन यांनी सांगितले. मराठवाड्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. राज्यपालांची परवानगी घेऊन विशेष निधी उभा केला जाईल असे महाजन म्हणाले. कालव्यात पाणी सोडण्याच्या बैठकीचा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रात संवेदनशील होतो. अनेक नेते हातघाईवर येतात असे महाजन यांनी नमूद केले.

पाणी वाटप पद्धत बदलणार

‘सध्या कालव्याने सिंचनासाठी पाणी दिले जात असले तरी शेवटच्या टोकापर्यंत जेमतेम पाणी पोहचते. खुल्या पद्धतीने पाणी देण्याची पद्धत बदलून पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा धोरणात्मक निर्णय कॅबिनेटमध्ये घेणार आहोत. या नियोजनामुळे ४० टक्के पाणी बचत होईल. गळती, तूट याच्यावर मात करण्यासाठी बंदिस्त पाणी पद्धती गरजेची आहे’ असे महाजन यांनी सांगितले. राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. पाच प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून आकडेवारी मोठी असल्यामुळे उशीर लागत असल्याचे महाजन म्हणाले.

वाद होणार नाहीत

जायकवाडी धरणाला शास्वत पाणी मिळावे व धरणात नेहमी समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध राहावा, यासाठी राज्यशासन नदीजोड सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणार आहे. यामुळे भविष्यात नाशिक, अहमदनगर व मराठवाड्यात पाण्यावरून वाद होणार नाही, असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी पैठण येथे बोलताना केला. जलसंपदा मंत्री महाजन यांनी गुरुवारी धरणातील पाण्याचे सपत्निक पूजन केले. यावेळी जायकवाडी धरणावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील बहुतांश प्रकल्पामध्ये चांगला पाणीसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी विक्रमी पाणीपट्टी जमा झाली आहे, असे त्यांनी सांगितले. जलपूजनावेळी आमदार संदीपान भुमरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता तांदळे, अधीक्षक अभियंता स्वामी, कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड, भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, विजय चाटुपळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रक, दुचाकी अपघात; दोन शालेय विद्यार्थी ठार

$
0
0

खुलताबाद : फुलंब्री-खुलताबाद रस्त्यांवरील सुलतानपूर जवळील पुलावर झालेल्या अपघातात ट्रक व मोटारसायकलच्या अपघातात दोन मोटारसायकलस्वार शालेय विद्यार्थी जागीच ठार झाले. समी कम्मू शेख (वय १५) व शुभम अण्णा साळुंके (वय १६, दोघे रा. देवळाणा), अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक (आर. जे. ०५ जी ए ५४३७) व मोटारसायकलचा (एम एच २० व्ही ए ३५३३) गुरुवारी दुपारी चार वाजता अपघात झाला. समी कम्मू शेख हा खुलताबाद येथील मौलाना आझाद उर्दू हायस्कूलमध्ये, तर शुभम अण्णा साळुंके हा गदाना येथील न्यू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होते. हे दोघे मोटारसायकलवर बसून सुलतानपूरकडून देवळाणाकडे जात होते. ट्रक फुलंब्रीकडून खुलताबादकडे येत होता. खड्डे चुकवण्यात अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला होता. नागरिकांनी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून ट्रक ताब्यात घेतला.

गावावर शोककळा
समी शेख व शुभम साळुंके हे जागीच ठार झाल्याची बातमी देवळाणामध्ये शोककळा पसरली. देवळाणा गावात ७ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रचार थंडावला आहे. समी हा शेख कम्मू यांचा एकुलता एक मुलगा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धाश्रमात अतिक्रमण; उपोषणाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समर्थनगर येथील मुक्तिसोपान न्यास संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या आवारातील अनाधिकृत बांधकामाविरोधात तातडीने कारवाई करा, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा ‘यंग सिनियर्स’नी दिला आहे. ही सेवानिवृत्त मंडळी या विषयासाठी काही महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत.
समर्थनगर परिसरात प्लॉट नंबर १७८ मध्ये मुक्तिसोपान न्यास संस्थेमार्फत वृद्धाश्रम चालविले जाते. येथे २४ वृद्ध महिला व ६ पुरूष वास्तव्य करतात. संस्थेचे कामकाज समाजसेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मंडळीमार्फत केले जाते. संस्थेचे अध्यक्ष शामसुंदर नाईक असून मालती करंदीकर या सचिव आहेत. काही महिन्यापासून संस्थेच्या आवारात एका अनोळखी व्यक्तीने अतिक्रमण करत काही भागात पक्के बांधकाम केले आहे. त्यास विरोध केला असता त्या व्यक्तीने दादागिरी केली. त्याच्या आरेरावीमुळे वृद्धाश्रमात दहशत निर्माण झाली असून सर्व वृद्ध भयभीत झाले आहे, असा आरोप कार्यकारणी सदस्यांनी केला आहे.
मालकी नसतानाही त्या व्यक्तीने संस्थेच्या जागेत अनाधिकृत बांधकाम केल्याने संस्थाचालकांनी त्या विरोधात मार्च २०१७ मध्ये महापालिका आयुक्ताकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली. पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली आहे. अनाधिकृत बांधकाम करणाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेजही असल्याचे संस्थेने पोलिसांना लेखी कळविले. पण, त्यावर अद्याप ठोस कारवाई झाली नाही, अशी माहिती अध्यक्ष नाईक यांनी दिली. अनाधिकृत बांधकामामुळे संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करता येत नाही, आश्रमातील उद्यानाचे काम रखडल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत वारंवार पाठपुरावा करुनही न्याय मिळत नसल्याने खंत व्यक्त करण्यात आली. महापालिका व संबंधित विभागाने येत्या आठ दिवस अनाधिकृत बांधकामाविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा साखळी उपोषण करू, असा निर्णय घेण्यात आल्याचे करंदीकर यांनी सांगितले.
या बैठकीला अध्यक्ष नाईक, सचिव करंदीकर, सहसचिव पद्माकर बावस्कर, कोषाध्यक्ष दिनेश कापडिया, सदस्य ओमप्रकाश भारतीया, मधुकर तांदळे, लक्ष्मण अय्यर, निवृत्त न्यायधीश चारुलता पटेल, भास्कर पटेल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्ग पर्यटन वाढीसाठी वन विभागाचे प्रयत्न

$
0
0

निसर्ग पर्यटन वाढीसाठी वन विभागाचे प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इको टुरिझम राज्य योजनेंतर्गत सारोळा निसर्ग पर्यटन केंद्र तसेच दौलताबाद वनउद्यान येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वन विभागाने भर दिला आहे. यात बालोद्यान सुशोभीकरण, निरीक्षण मनोरा, माहिती फलक, रोपांची लागवड करणे यासह अन्य कामे करण्यात येणार असून यासह पर्यटनांना अधिकाधिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचे वन विभागाचे उप वनसंरक्षक एस. पी. वडस्कर यांनी मटाशी बोलताना दिली.
औरंगाबाद-अजिंठा मार्गावरील व शहरापासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर असलेले सारोळा हे छोटेस गाव. चौका घाटापासून अवघ्या ६ ते ७ कि.मी अंतरावर असून घनदाट झाडाझुडपांनी आणि डोंगरमाथ्याने वेढलेल्या या गावाची निसर्ग किमया वेगळीच आहे. निसर्गाचे देणे लाभलेला हा परिसर गेल्या काही वर्षांत पर्यटकांचे हे आवडते ठिकाण झाले आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा, पर्यटन उद्योगास चालना मिळावी यासाठी वन विभागाने गेल्या काही वर्षांत सारोळा निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर दिला आहे. इको टुरीझम राज्य योजनेंतर्गत वनक्षेत्रातील पयगटन स्थळांचा विकास या योजनेंतर्गत यंदाही पायाभूत सुविधांसाठी शासनाने सोराळा केंद्रासाठी पावणे तीन लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यात बांबू रोपवन घेणे, मिश्र रोपवन, गवत रोपवन आदी कामे केली जाणार आहेत. यासह अन्य विकासनिधीच्या माध्यमातून बालोद्यान सुशोभीकरण, निरीक्षण मनोरा, माहिती फलक आदी कामेही हाती घेण्यात येणार आहेत.
सारोळा प्रमाणेच दौलताबाद वनउद्यान परिसरातही अनेक कामे हाती घेण्यात आल्याचे उप वनसंरक्षक एस. पी. वडस्कर यांनी सांगितले. वनउद्यानात नैसर्गिक पाऊलवाटेच्या दुतर्फा लहान, मध्यम आकाराच्या सुमारे २ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यासह बालोउद्यानमध्ये दुरुस्तीची कामे, मुरूम टाकणे, बारुदखाना साफसफाई यासह अन्य कामे हाती घेण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रास दांडियानंतर तरुणाई सुसाट

$
0
0

रास दांडियानंतर तरुणाई सुसाट
वाहतूक शाखा निद्रीस्त
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात सध्या नवरात्रोत्सवानिमित्त विविध ‌ठिकाणी रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने तरुण याचा आनंद लुटत आहे. मात्र, दांडिया संपल्यानंतर ही मंडळी दुचाकीवर सुसाट वेगाने वाहने चालवत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकडे मात्र वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे.
शहरात बीड बायपास, जालना रोड, अदालत रोड, औरंगपुरा, एन ३ या परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यवसायिक दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. या दांडियामध्ये सहभागी होण्यासाठी तरुण तरुणींची मोठी गर्दी होत आहे. मित्र मैत्रीणींच्या दुचाकीवर गटाने ही मंडळी येतात. जल्लोष साजरा केल्यानंतर ही मंडळी घराकडे रवाना होतात. मात्र जल्लोषाची ‌झिंग कायम असल्याने ही मंडळी वेगवान पद्धतीने ट्रिपलसीट वाहने चालवत असल्याचे दृष्य सध्या रात्री दिसून येत आहे.
दहा नंतर हजारो वाहने रस्त्यावर
रात्री दहा वाजता दांडिया संपल्यानंतर ही मंडळी एकत्रच बाहेर पडत असल्याने जालना रोड, अदालत रोडवर एकाच वेळी हजारो वाहने येतात. यामध्ये दुचाकींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी या रस्त्यावर निर्माण होते. विशेष बाब म्हणजे दांडिया खेळण्यासाठी येत असलेल्या तरुणाईला हेल्मेटचे वावडे दिसून येते. यामुळे अपघात झाल्यास डोक्याला मार लागल्यास गंभीर ईजा होण्याची शक्यता नाकारात येत नाही.
वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
वाहतूक शाखेच्या वतीने दिवसा हेल्मेट सक्तीची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येते. सध्या रात्रीच्या काळात काही तासापुरती दुचाकी वाहने रस्त्यावर जास्त दिसून येतात. वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकांकिका स्पर्धेत ‘मॅट्रिक’ प्रथम

$
0
0

एकांकिका स्पर्धेत ‘मॅट्रिक’ प्रथम
दाजीकाका गाडगीळ एकांकिका स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्यासाठी धडपडणाऱ्या मुलीची संघर्षमय कथा उलगडणारी ‘मॅट्रिक’ एकांकिका दाजीकाका गाडगीळ एकांकिका स्पर्धेत प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली. पुणे येथे मंगळवारी राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. प्रवीण पाटेकर लिखित-दिग्दर्शित ‘मॅट्रिक’ एकांकिकेने सांघिकसह सहा पारितोषिके पटकावली.
पुणे येथे दाजीकाका गाडगीळ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जवळपास ५० एकांकिका सादर झाल्या. विभागीय प्राथमिक फेरी झाल्यानंतर पुण्यात अंतिम स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत औरंगाबाद येथील ‘नाट्यवाडा’ प्रस्तुत व प्रवीण पाटेकर लिखित-दिग्दर्शित ‘मॅट्रिक’ एकांकिकेने सांघिक प्रथम पारितोषिक पटकावले. रोख एक लाख रुपये, करंडक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. खेडेगावातील मुलींची दहावी उत्तीर्ण होण्याची ही कथा आहे. मुलीने तालुक्यात पहिला क्रमांकाने उत्तीर्ण व्हावे अशी आई-वडिलांची इच्छा असते. मात्र, लोडशेडिंग नेहमी अडथळा ठरते. अडथळ्यांवर मात करताना कोणकोणत्या प्रसंगांना कुटुंब सामोरे जाते याची ही संवेदनशील कथा आहे. खेडेगावातील मुलींच्या शिक्षणाची आबाळ दाखवत सामाजिक प्रश्नांवर ‘मॅट्रिक’ एकांकिकेत सडेतोड भाष्य आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीताच्या माध्यमातून सामाजिक वास्तव अधिक भेदक स्वरूपात दाखवले आहे. या स्पर्धेचे परीक्षण अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि नाट्य लेखक अद्वैत दादरकर यांनी केले. मराठवाड्यातील भाषा आणि सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन एकांकिकेने घडवले असे कौतुक परीक्षकांनी केले. यापूर्वी ‘नाट्यवाडा’ची ‘पाझर’ एकांकिका राज्यभरात ५० पेक्षा जास्त स्पर्धेत पारितोषिके पटकावून चर्चेत होती.

ग्रामीण भागातील शिक्षणाची सद्यस्थिती दाखवण्यासाठी ‘मॅट्रिक’ एकांकिका लिहिली. मागील दोन महिन्यांपासून एकांकिकेची तालीम सुरू आहे. ‘मॅट्रिक’चा पहिलाच प्रयोग परीक्षक आणि रसिकांना आवडल्याचा सर्वाधिक आनंद आहे.
- प्रवीण पाटेकर, लेखक-दिग्दर्शक
‘मॅट्रिक’ एकांकिका ग्रामीण पार्श्वभूमीवर घडत असल्यामुळे अस्सल बोलीभाषा तिचे बलस्थान आहे. शेतकऱ्याची भूमिका परीक्षकांना आवडल्याचे समाधान आहे.
- जगदिश जाधव, कलाकार
पारितोषिके
- सांघिक प्रथम पारितोषिक - ‘मॅट्रिक’
- अभिनय (प्रथम) - जगदिश जाधव
- अभिनय (तृतीय) - शिवानी नाईक, मुग्धा देशकर
- प्रकाशयोजना (प्रथम) - चेतन ढवळे
- नेपथ्य (तृतीय) - गणेश मुंढे
- संगीत (तृतीय) - रोहित कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस तोळे सोने घेऊन कारागीर पसार

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका सराफा व्यापाऱ्याने दागिने बनवण्यासाठी दिलेले चारशे ग्रॅम शुद्ध सोन्याच्या लगडी घेऊन पश्चिम बंगाल येथील कारागीर पसार झाला. सराफ्याने त्याला २ ऑगस्ट रोजी पावणे बारा लाख रुपयांचे सोने दिले होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेश उत्तमराव बोकडे (रा. एन अकरा, नवजीवन कॉलनी, हडको) यांचे सराफा परिसरात मानसी गोल्ड वर्कशॉप आहे. बोकडे यांनी २ ऑगस्ट रोजी गौतम त्रिलोचन सी (वय ३५ रा. अंजुदिया, दासपूर, पश्चिम मैदिनीपूर, पश्चिम बंगाल, हल्ली मुक्काम, बारूदनगर नाला परिसर) याला चारशे ग्रॅमच्या दोन वेगवेगळ्या शुद्ध सोन्याच्या लगडी दिल्या होत्या. यावेळी उमेश जाधव व प्रशांत कुलथे यांची उपस्थिती होती. या लगडीचे झुमके, पदक, एअरिंग व टॉपस, असे दागिने तयार करून ते २० ऑगस्टपर्यंत देण्याचे काम कारागीर गौतमला सोपवले होते. मात्र, मुदत उलटली तरी दागिने किंवा लगडी गौतमने बोकडे यांना परत न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी बोकडे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय योगेश धोंडे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौलाना आझादच्या प्राचार्यावर फसवणुकीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मौलाना आझाद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मकदुम फारुकी यांच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी मिळवण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्राचा वापर करीत शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
डॉ. शेख सलीम शेख चांद (रा. मौलाना आझाद हौसिंग सोसायटी) यांनी ही तक्रार दिली आहे. त्यानुसार, डॉ. मकदुम मोईयोद्दीन फारुकी हे हे खुल्या प्रवर्गातील असून त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी बेलदार जातीचे प्रमाणपत्र तयार करून सादर केले. कॉलेजमधील आरक्षित पदे भरण्यासाठी १९९३मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यावेळी डॉ. फारूकी यांनी नौकरी मिळवण्यासाठी बेलदार जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्यावर तहसील कार्यालयाचे शिक्के मारल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. फारुकी यांच्याविरुद्ध १९९३पासून शासनाकडून पगार व इतर सवलती मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागतिक वारशांचे मार्केटिंग आवश्यक

$
0
0

म. टा. प्र‌ति‌निधी, औरंगाबाद
‘जागतिक पातळीवर आपल्या वारशाचे तितक्याच समर्थपणे मार्केटिंगची झाले पाहिजे. पर्यटनाला प्रोत्साहन देणारे, पर्यटकांना समाधान आणि आनंद देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वच घटकांनी मनापासून प्रयत्न केले तर या शहरातील पर्यटन उद्योग खूप मोठी उंची गाठू शकेल,' असे प्रतिपादन सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी केले.
हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे आशुतोष बडवे यांनी स्वीकारली. यावेळी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे प्रादे‌शिक संचालक अण्‍णासाहेब शिंदे, विमानतळ संचालक डी. जी. साळवे, ट्रॅव्हल्स एजंट असोसिऐशनचे उपाध्यक्ष अमित जैन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
‘ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनच्या माध्यमातून पर्यटन विकासासाठी आगामी काळात जागतिक दर्जाची पर्यटन परिषद शहरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ट्रॅव्हल्स मार्ट, रोड शो, डेस्टिनेशन अवेरनेस, पर्यटन क्षेत्राची परिपूर्ण माहिती असलेले कर्मचारी निर्माण करणे, हे कार्य केले जाणार आहे, ’ अशी माहिती नूतन अध्यक्ष आशुतोष बडवे यांनी यावेळी सांगितले.
‘पर्यटनाच्या दृष्टीने सकारात्मक बाबी जगासमोर जोरकसपणे मांडायला हव्यात. पर्यटन व्यवसायात भविष्यात होऊ घातलेल्या बदलांची दखल घेत आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायला हवे. त्या दृष्टीने नव्याने स्थापन झालेली संघटना अत्यंत मोलाची भूमिका बजावू शकते,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे यांनी केले.
यावेळी जेट एअरवेजचे अहेमद जलील, उपाध्यक्ष झाकीर हुसैन, सचिन कुलकर्णी, कोषाध्यक्ष अतुल गुगळे, मंगेश कपोते, मार दाक्षिणी, मंगेश कपोते, नितीन ठक्कर, राजेंद्र देशपांडे, वेदांत रत्नपारखी अादींची उप‌स्थिती हाेती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलपूजनात शिवसेना-भाजपचा बेबनाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील बेबनावाचे दर्शन पुन्हा एकदा जायकवाडी धरणाच्या जलपूजन कार्यक्रमात घडले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी एकत्र जलपूजन टाळत स्वतंत्र कार्यक्रम घेतला. विशेष म्हणजे शिवतारे यांचा दौरा आठ दिवसांपूर्वीच निश्चित असताना महाजन यांनी बुधवारी रात्री घाईत दौरा जाहीर केला. दोन्ही पक्षांनी जायकवाडीच्या श्रेयवादात बाजी मारण्याचा प्रयत्न केला.
नऊ वर्षानंतर पूर्ण भरलेल्या धरणाचा ‘इव्हेंट’ करण्याचे काम राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर पद्धतशीरपणे राबवले जात आहे. प्रकल्पाची पाहणी करून बैठक घेण्याचे नियोजन शिवसेनेचे आमदार व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आठ दिवसांपूर्वी केले होते, मात्र शिवतारे गुरुवारी पैठण येथे जलपूजनासाठी येणार, असे समजल्यानंतर भाजपच्या वर्तुळात हालचालींना वेग आला. जळगाव दौऱ्यावर असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ऐनवेळी पैठण दौरा जाहीर केला. महाजन यांच्या दौऱ्याची माहिती बुधवारी रात्री उशिरा देण्यात आली. विशेष म्हणजे दोघे मंत्री शहरात असूनही दोघांनी वेगवेगळ्या वेळी जायकवाडीचे जलपूजन केले. शिवतारे यांनी सकाळी जलपूजन करीत दुपारी पत्रकार परिषद घेतली, तर महाजन यांनी दुपारी जलपूजन करून सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. सरकार एक असताना दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे दौरे वेगवेगळे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असताना दोघांनी सारवासारव केली. ‘जळगाव येथील दोन कार्यक्रम रद्द झाल्यामुळे पैठणला आलो,’ असे महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, जायकवाडी धरणाचे जलपूजन करून शिवसेना आणि भाजप श्रेय घेण्यासाठी सरसावले आहेत. दोन्ही पक्षांच्या या श्रेयवादाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सत्ता सोडणार नाही
‘सत्तेतून बाहेर पडायचे नाही, असे मराठवाड्यातील शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. त्यामुळे अनेकदा ‘अल्टिमेटम’ देणारी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आमच्यात प्रेमाचे संबंध आहेत. त्यामुळे आम्ही कुणाला जवळ घ्यायचे आणि कुणाचे लाड करायचे हा प्रश्नच उरत नाही,’ अशी उपरोधिक टीका महाजन यांनी केली.

पक्ष निराळे असल्यामुळे मतमतांतरे वेगवेगळी असू शकतात, मात्र राज्यमंत्री शिवतारे आणि माझ्यात उत्तम समन्वय आहे. पैठणला वेगळ्या हेतूने आलो नाही.
- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी समन्वय असल्यामुळे दौऱ्याची माहिती दिली. माझा दौरा आठ दिवसांपूर्वीच निश्चित होता. पक्ष म्हणून नव्हे, तर सरकार म्हणून जायकवाडी प्रकल्पाची पाहणी केली.
- विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाढी, कटिंगच्या दरात ‘जीएसटी’मुळे वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
‘जीएसटी’चा परिणाम दाढी-कटिंगवरही झाला आहे. सलून साहित्याच्या दरात वाढ झाल्याने दाढी व कटिंगच्या दरात प्रत्येकी दहा रुपये वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या फुलंब्री शाखेच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात अाला. त्यानुसार अाता फुलंब्रीमध्ये दाढी करण्यासाठी ३० रुपये व कटिंगला ४० रुपये द्यावे लागतील, अशी माहिती अध्यक्ष संजय पंडित यांनी दिली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाची विशेष सभा संत सेना मंदिराच्या नियाेजित जागेवर घेण्यात आली. ही दरवाढ एक अाॅक्टाेबरपासून लागू करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देतांना संजय पंडित म्हणाले की, सलून व्यवसायिकांची आर्थिक स्थिती जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने संकटात आहे. त्याचप्रमाणे सलून व्यवसायासाठी लागणारे काॅस्मेटिक मेकअप कीट, शेविंग क्रीम, पावडर व इतर वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. या वाढीव खर्चाला तोंड देणे यापुढे शक्य होणार नसल्याने दरवाढ करावी लागली. दाेन वर्षे दुष्काळ, त्यानंतर नाेटबंदी व अाता ‘जीएसटी’मुळे दरवाढ यामुळे आर्थिक गणित डळमळीत झाले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी बैठकीला भाऊसाहेब नाईक, अजिनाथ शिंदे, प्रविण नाईक, शरद पंडित, रुपेश नाईक, विजय शिंदे, चंद्रकांत बाेर्डे, रामेश्वर नाईक, सतीश वखरे, नारायण नाईक, साईनाथ बाेर्डे यांच्यासह सलून व्यावसायिक, पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालवे दुरूस्तीसाठी विशेष निधीः मंत्री शिवतारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जायकवाडी धरण शंभर टक्के भरूनही शेतीसाठी पाणी देणे कठीण आहे. डाव्या आणि उजव्या कालव्याची वहनक्षमता निम्मी घटल्यामुळे तातडीने दुरूस्ती आवश्यक आहे. या कामासाठी मंगळवारी मुंबईत बैठक घेऊन निधीची तरतूद करण्यात येईल’ अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. सिंचन भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जायकवाडी धरण पूर्ण भरल्यानंतर मराठवाड्यातील बहुतांश भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटल्याची चर्चा सुरू आहे. नऊ वर्षानंतर धरण भरल्यामुळे शासकीय पातळीवर समाधानाचे वातावरण आहे. राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी पैठण येथे जायकवाडी धरणाची पाहणी करून बैठक घेतली. बैठकीत डावा आणि उजवा अशा दोन्ही कालव्यांच्या घटलेल्या क्षमतेवर चिंता व्यक्त करण्यात आली. ‘उजव्या कालव्याची वहनक्षमता ३६०० क्यूसेक असून प्रत्यक्षात १८०० क्यूसेक वहनक्षमता आहे. डाव्या कालव्याची वहनक्षमता १८०० क्यूसेकवरून ८०० क्यूसेकपर्यंत घटली आहे. लायनिंगसाठी वापरलेले सिमेंटचे स्लॅब सरकून कालव्यात गेले. त्यामुळे पाण्याची वहनक्षमता घटली. कालव्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात येईल’ असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. मुंबईत येत्या मंगळवारी बैठक घेऊन निधीचे नियोजन करण्यात येणार आहे. ‘सीएसआर’ निधीतून १६०० किमीचे खोलीकरण झाले. आता मोठ्या प्रकल्पाशी निगडीत कामे या निधीतून करण्याचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करू असे शिवतारे म्हणाले. ‘मराठवाडा कृष्णा स्थिरीकरण’ प्रकल्पाबाबत फेरविचार करण्यात आला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात वाहून जाणारे १८.३३ टीएमसी पाणी अडवण्याची गरज आहे. अडवलेले पाणी कागदावर दिसत असले तरी परिस्थिती वेगळी असते. माजलगाव, मांजरा या धरणांची स्थिती लक्षात घेता धरणांचे पुनर्नियोजन करावे लागेल. पाण्याची तूट भरून काढणे प्रथम उद्दिष्ट आहे असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार सुभाष साबणे उपस्थित होते.

विशेष निधीची तरतूद

ब्रह्मगव्हाण (ता. पैठण) योजनेसाठी ३५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात जास्तीच्या निधीसाठी प्रयत्न करण्यात येतील. नीरा नदीतून उजनीत पाणी आणण्यासाठी २५ किलोमीटरचा बोगदा पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच ‘वाल्मी’ येथील जलसंधारण आयुक्तालयात महिनाभरात कर्मचारी नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती शिवतारे यांनी दिली. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी अनाठायी ११०० कोटी रूपये खर्च करण्यात आला. आता राज्यपालांच्या सूत्राच्या बाहेर जाऊन २५० कोटी रूपयांची तरतूद केली आहे असे शिवतारे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार चव्हाण यांना मंदिर प्रवेश रोखला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
घटस्थापनेपासून सुरू असलेली महसूल आणि पोलिस प्रशासनाची मनमानी नवरात्र उत्सव संपण्याच्या मार्गावर असूनही संपताना दिसत नाही. पहिल्या दिवसापासून कधी महसूल तर कधी पोलिस प्रशासन सातत्याने आडमुठी भूमिका घेत आहे. पत्रकारांशी अडेलतट्टू भूमिका घेत अरेरावी, सामान्य भाविकांची हेळसांड, सुरक्षेच्या नावाखाली मनमानी अशा नित्य प्रकारानंतर गुरुवारी चक्क आमदार मधुकरराव चव्हाण यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले.
आमदार चव्हाण हे तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त आहेत. तुळजाभवानीच्या नवरात्रीतील आठव्या माळेला गुरुवार सकाळी १० : ३० च्या सुमारास आमदार चव्हाण देवीदर्शनासाठी आले असता त्यांना शहाजीराजे महाद्वाराजवळच येथे एका पोलिस कर्मचारी, अधिकारी यांनी मंदिर प्रवेश नाकारत रोखले.
यावेळी मंदिर संस्थानचे सुरक्षा रक्षकांनी आमदार चव्हाण हे मंदिर संस्थानचे विश्वस्त सदस्य आहेत. पोलिसांनी आडमुठी भूमिका घेत शहाजीराजे महाद्वारातून मंदिर प्रवेश देण्यास नकार दिला. यावेळी आमदार चव्हाण यांनीही स्वतः ची ओळख करून देत मंदिर समितीचे विश्वस्त सदस्य असल्याचे सांगूनही त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे आमदार चव्हाण यांना ताटकळत थांबावे लागले. त्यांचे स्वीयसहाय्यक बबन जाधव यांनी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांना संपर्क साधला. त्यानंतर फोनाफोनी होऊन सदर पोलिस कर्मचारी, अधिकारी यांना आदेश दिल्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासाने त्यांना मंदिरात प्रवेश दिला गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न कराः बागडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी बाजार समिती आवारात व्यवसायवृद्धी आवश्‍यक आहे. त्यासाठी रस्ते, स्वच्छता यासह आवश्‍यक सोयीसुविधा देण्याकडे विशेष लक्ष द्या, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
औरंगाबाद उच्चतम बाजार समितीची सर्वसाधारण सभा गुरुवारी घेण्यात आली. या सभेत ते बोलत होते.
या सभेला सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, संचालक रघुनाथ काळे, राम शेळके, दामोदर नवपुते, गणेश दहिहंडे, अलकाबाई दहिहंडे, संगीता मदगे, शिवाजी वाघ, हरिशंकर दायमा, प्रशांत सोकिया, बाबासाहेब मुदगल, देविदास किर्तीशाही, नारायण मते, विकास दांडगे, बाजार समिती सचिव विजय शिरसाठ यांची उपस्थिती होती.
विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले, बाजार समितीची आजवरची वाटचाल पाहता उत्पन्नाचे स्त्रोत व व्यवसाय वाढविणे आवश्यक आहे. दोन गोदाम, पेट्रोल-ड‌िझेल पंप माध्यमातून व्यवसायवृद्धी होऊ शकते. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही. त्यासाठी शासनाच्या अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून बाजार समिती व कर्मचाऱ्याने स्वत: काही वाटा उचलून कर्मचाऱ्यांचे साठीनंतरचे भविष्य सुरक्षितता करता येवू शकते, याचाही विचार व्हावा असे बागडे म्हणाले.
सभापती राधाकिसन पठाडे यांनी बाजार समितीचा अहवाल सादर केला. शेतकऱ्यांसह बाजारातील ओट्यावर शेडनिर्मिती, शासन व प्रशासनाच्या निर्देशानुसार कारभार अधिकाधिक लोकाभिमिमुख करण्याचा प्रयत्न राहील, असे पठाडे म्हणाले.

पाच रुपयांत जेवण

बाजार समितीमध्ये शेतमाल विकण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्याला पाच रुपयात जेवण देण्याच्या उपक्रमाचे यावेळी उद्‍घाटन करण्यात आले. सोबतच उत्पन्नवाढीसाठी पिसादेवी मार्गावर बाजार समितीचा पेट्रोल पंप व धान्य साठवणुकीसाठी दोन गोदामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याचा झाला सत्कार

विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या हस्ते आदर्श खरेदीदार, आदर्श हमाल, संशोधन करणारी शेतकऱ्यांची मुले, आदर्श कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यात कृष्णा बारबैले (लामकाना), भरत आहेर (टोणगाव), विठ्ठल भोसले (जडगाव), शेषराव दौड (भांबर्डा), भाऊसाहेब देवकर (भालगाव), जगन्नाथ दहिहंडे (चिकलठाणा), मदन चौधरी, नबी पटेल (दुधड), हरिभाऊ पवार, नागेश वाढकर (धान्य अाडतदार), अहमद जफर अहमद रहीम बागवान, अर्जून येवले (फळे भाजीपाला अाडतदार), मुकेश कासलीवाल, ऋषीकुमार साहुजी (धान्य खरेदीदार), ईसाकखान हबीखान, मोहसीन चौधरी (फळे भाजीपाला खरेदीदार), प्रशांत सोक‌िया, कीर्तीकुमार पारख (राज्याबाहेर जावून खरेदी विक्री), दामोदर नवपुते, नारायणराव मते (आदर्श संचालक) शंतनू राणे, संतोष दांडगे (आदर्श कर्मचारी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटीआय’चा निकाल रखडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा होऊन ६० दिवस उलटले, तरी निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. निकाल लांबल्याने विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकला प्रवेशाच्या संधीवर पाणी सोडावे लागले.
आयटीआय अभ्यासक्रमांची परीक्षा १८ जुलै ते दहा ऑगस्ट यादरम्यान घेण्यात आली. मराठवाड्यातून विविध ३६ ट्रेडमधून ४० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर राज्यातील चार लाख विद्यार्थी आहेत. देशपातळीवर नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) यांच्यामार्फत परीक्षा घेतली जाते. निकालही देशपातळीवरच जाहीर केला जातो. परीक्षा आणि निकालासाठी ‘ओएमआर शीट’ (ऑप्टिकल अॅन्सर शीट) पद्धती वापरली जाते. त्यामुळे निकाल लवकरच जाहीर होणे अपेक्षित अाहे.

अशी होते प्रक्रिया
देशपातळीवर विविध राज्यामध्ये एकत्र परीक्षा होते. परीक्षेनंतर ‘ओएमआर शीट’ स्कॅन करून विभागीय पातळीवरून ती राज्याच्या कौशल्य विकास विभागाकडे जातात. त्यानंतर त्या ‘एनसीव्हीटी’कडे पाठविल्या जातात. ही प्रक्रिया आठ दिवसांत होते. ओएमआरशीट सह एक्सल शीटही स्वतंत्रपणे पाठविली जाते. निकालाची ही सगळी प्रक्रिया देशपातळीवर एकत्रित ऑनलाइन पद्धतीने होते. २०१३पूर्वी पारंपारिक पद्धतीने उत्तरपत्रिका तपासल्या जात होत्या. त्यावेळी ४५ दिवसांत निकाल जाहीर केला जात असे.

पुढील शिक्षणाच्या संधी हुकल्या
आयटीआयला दोन वर्षांपासून सत्र पद्धती लागू झाली. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. निकाल जाहीर होण्यापूर्वीच पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. पदवी अभ्यासक्रमाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. निकाल नसल्याने यंदा हजारो विद्यार्थ्यांची संधी हुकली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायतीच्या आखाड्यात चार हजार उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामपंचात निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदाच्या तब्बल ३८६ व सदस्यपदाच्या १३९३ सदस्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतींच्या आखाड्यात ४०३३ उमदेवार लढणार आहेत. त्यापैकी ६१२ उमेदवार संपरपंचपदासाठीचे आहेत.
बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. यावेळी एकुण १९६१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अर्ज माघारी घेतल्यानंतर प्रशासनाने अंतिम उमदेवारांची नावे जाहीर केली. यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कन्नड तालुक्यातील सर्वाधिक ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून याच तालुक्यात सर्वाधिक ८९० उमेदवारांची संख्या आहे. जिल्ह्यातील सर्व २१३ ग्रामपंचायतीमध्ये ७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान आणि ९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
सरकारने घोषित केलेली कर्जमाफी वाढती महागाई व भारनियमन, वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नांवर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जालना शहरातून मोर्चा काढला. या मोर्चात शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचे पैसे दिवाळीपूर्वी देऊन त्यांची दिवाळी गोड करा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली.
जालना शहरातील मामा चौकातून निघालेल्या मोर्चात माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, सभापती भानुदास घुगे, पांडूरंग डोंगरे, भरत मदन यांच्यासह उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, भगवान कदम, रावसाहेब राऊत, रमेश गव्हाड, परमेश्वर जगताप, मनिष श्रीवास्तव, माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, अ‍ॅड. भास्कर मगरे, सविता किवंडे यांच्यासह हजारो पदाधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
मोर्चासमोर डिझेल, पेट्रोल दर वाढीचा निषेध म्हणून सायकल व बैलगाडीवर शिवसैनिक बसलेले होते. तर मागे शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. सावरकर चौक, फुलबाजार, कादराबाद या मार्गावरुन मुथ्था बिल्डींग येथे पोहोचतांना रस्त्यावर अनेक व्यापारी व जनतेने मोर्चेकरांचे स्वागत केले. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भगवे झेंडे-टोप्या- रुमाल यामुळे संपुर्ण वातावरण भगवेमय झाले होते. शहरातील मोठ्या संख्येने मुस्लीम शिवसैनिकही मोर्चोत सहभागी झाले होते. अंबिका मार्केट, महाविर चौकात मोर्चा आल्यावर त्याचे रुपांतर सभेत झाले.
यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी राज्यात विरोधी पक्ष असून नसल्या सारखा झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले दिवसा एक तर रात्री भाजपांच्या नेत्यांच्या भेटीगोटी घेतात व जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याची जबाबदारी असणारे विरोधी पक्ष व नेते आम्हाला सत्तेत राहून विरोध का करता असे विचारतात. राज्यात विरोधी पक्षच राहिला नसल्याने शिवसेनेलाच विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागत आहे. प्रशासनावरील वचक कमी झाल्यामुळे राज्यासह जिल्ह्यात गुन्हेगारींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
तसेच काही शेतकरी व व्यापारी वर्गावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी अंबेकर यांनी केली.
यावेळी शिवाजीराव चोथे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी दीड लाखांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर करुनही अद्यापही हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. या कर्जमुक्तीवर सरकारने पाच वेळा जीआर बदलला. ऑनलाईनमुळे शेतकऱ्यांना याचा फार मोठा त्रास झाला. त्यात आता चावडी वाचन हा नवीनच प्रकार सुरू केला आहे.’
वाढती महागाई, भारनियमन व वाढती गुन्हेगारी या प्रश्नांवर भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी हा मोर्चा आयोजित केला खर तर हा मोर्चा काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी काढायला पाहिजे होता. मोर्चाच्या शेवटी शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार पाटील यांना सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख संतोष मोहिते, हरिभाऊ पोहेकर, जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, बजरंग बोरसे, पंकज सोळंके, उद्धव मरकड, बाबासाहेब तेलगड, प्रसाद बोराडे, शहरप्रमुख विष्णु पाचफुले, बाळा परदेशी, बाबुराव पवार, भरत सांबरे, सर्व आघाड्याचे प्रमुख, जि. प. सदस्य बबनराव खरात, यादवराव राऊत, कैलास चव्हाण, गणेश डोळस, कैलास पुंगळे, उत्तमराव वानखेडे, संजय राठोड, कुरेशी व सर्व पं.स. सदस्य, न.प. सदस्य विजय पवार, संदीप नाईकवाडे, गोपी गोगडे, निखिल पगारे, माजी नगरसेवक विजय जाधव, मुरलीधर थेटे, मुरलीधर शेजुळ, बाबा मोरे, गणेश कदम, रामकिसन कायंदे, बाबुराव कायंदे, सर्जेराव शेवाळे, निवृत्ती साबळे, घनश्याम खाकीवाले, परमेश्वर शिंदे, गणेश शिंदे, विठ्ठलराव खरात, रामचंद्र वाघमारे, कडूंबा इंदलकर, दर्गेश काठोठीवाले, भरत कुसंदल यांच्यासह महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी महामंडळातील संप अटळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती हालाखीची असून आठ कर्मचाऱ्यांची आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. एसटी कामगार संघटना आणि इंटक यांच्याकडून २९ सप्टेंबर रोजी संपाची अधिकृत नोटीस दिली जाणार आहे. त्याची दखल घेतली नाही, तर १७ ऑक्टोबर पासून कामगार संपावर जाणार आहेत,’ अशी माहिती इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षी होणाऱ्या वेतन करारात वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना, इंटकसह इतर संघटनांनी केली आहे. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने कायद्यानुसार संघटनेने मतदान घेतले असता ९९.९० टक्के कामगारांनी संपाच्या बाजुने कौल दिला आहे. त्यामुळे कृती समितीने संपाचा निर्णय घेतल्याची माहिती छाजेड यांनी दिली. सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळाल्यास एसटीच्या ड्रायव्हराला मंत्री दिवाकर रावते यांच्या शासकीय वाहनाच्या चालकाएवढा पगार मिळेल, असे त्यांनी सांगितले. राज्य कर्मचारी संघटना, अंगणवाडी सेविका, शेतकऱ्यांचा संप यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्‍थी केली. संपामुले दररोज ६५ लाख प्रवाशांची अडचण होणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी मध्यस्‍थी केल्यास हा प्रश्न निकाली लागू शकतो, असे मत त्यांनी मांडले.
गुजरात स्टेट रोड कॉर्पोरेशनच्या कामगारांना वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. एसटीमध्ये १९९५ पर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पगार होता. एसटी महामंडळाने सातवा वेतन आयोग लागू केल्यास १२०० कोटीचा बोझा पडेल. त्यासाठी इतर राज्यांप्रमाणे महामंडळाला राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘शिवशाही’चा फटका

कंत्राटदारांमार्फत १५०० शिवशाही बस चालविण्यात येत आहेत. बस कंत्राटदाराची, प्रवासी एसटीचे आणि कमी उत्पन्न मिळाल्यास ते उत्पन्न भरून देण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली आहे. हा निर्णय महामंडळाला मारक आहे, अशी टीका जयप्रकाश छाजेड यांनी केली. देशातील इतर राज्यांत वाहतूक महामंडळांकडून साडे सात ते नऊ टक्के, तर महाराष्ट्रात साडे सतरा टक्के रोड टॅक्स घेतला जातो. त्यामुळे एसटीचे प्रवास दर जादा आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नांदेड जिल्हा नियोजन समितीमध्ये काँग्रेसचे बहुमत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
जिल्ह्याच्या विकासाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ३५ पैकी तब्बल २० जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत यापूर्वीच तब्बल १८ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १७ जागांसाठी २७ रोजी मतदान घेण्यात आले. त्याचा निकाल जाहीर झाला. या निकालात सुद्धा काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसचे संजय बेळगे, राम नाईक, सुशीला बेटमोगरेकर, मंगाराणी अंबुलगेकर, अरुणा कल्याणे यांच्यासह बारा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर आजच्या निकालात १७ पैकी आठ जागांवर काँग्रेसने ताबा मिळविल्याने काँग्रेसची जिल्हा नियोजन व विकास समितीत २० संख्या झाली आहे. ३५ पैकी तब्बल २० जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाल्यामुळे या समितीची काँग्रेसकडे एकहाती सत्ता आली आहे.
निवडणुकीच्या निकालावर दृष्टीक्षेप टाकला असता राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा वरचष्मा स्पष्ट दिसतो. जिल्हा परिषदेच्या २८ जागापैकी काँग्रेसने १६ जागा जिंकल्या आहेत, तर भाजपला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यासोबत फरफटत गेलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांच्या हाती केवळ भोपळा लागला आहे. तर शिवसेना चार, प्रदीप नाईक गटाचे राष्ट्रवादीचे दोन उमेदवार तर चिखलीकरांचा एक उमेदवार या गटातून विजयी झाला.
नगर पालिकेच्या चार जागांपैकी काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी एक तर भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. नगर पंचायतच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ही जागा आपल्या ताब्यात ठेवली आहे. तसेच महापालिकेच्या दोन पैकी दोन जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत.
निकालानंतरच्या आकडेवारीवर दृष्टीक्षेप टाकला असतांना काँग्रेस २० , भाजप ७, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, शिवसेना चार व प्रताप पाटील चिखलीकर गटास दोन जागा मिळाल्याचे लक्षात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार निविदांना सरकारची परवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील रस्त्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १०० कोटींच्या निधीच्या चार निविदा काढण्यास सरकारने गुरुवारी परवानगी दिली. यासंदर्भातील पत्र सायंकाळी प्राप्त झाले. त्यामुळे टेंडरच्या लढाईत महापौरांचा विजय झाल्याचे मानले जात आहे.

रस्ते कामासाठी सरकारने १०० कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. यातून ९९ कोटी ८७ हजारात ३१ रस्त्याची कामे करा, असे आदेश सरकारने दिले होते. त्यानंतर टेंडरवरून वाद निर्माण झाला. महापौरांनी २५ कोटींच्या चार टेंडरचा आग्रह धरला, तर आयुक्त दोन टेंडरवर अडून होते. काही नगरसेवकांनी १०० कोटींचे एकच टेंडर काढा किंवा ३१ रास्त्यांसाठी ३१ टेंडर काढा, अशी भूमिका घेऊन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सरकारने पैसे देऊनही ते खर्च करता येत नाहीत, अशी टीका महापालिकेवर करणे सुरू झाले होते.

महापौरांचा मुंबईत तळ
महापौर भगवान घडामोडी यांनी दोन दिवस मुंबईत तळ ठोकला आणि २५ कोटींच्या चार निविदा काढू द्या, अशी गळ मुख्यमंत्र्यासह नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना घातली. त्यानंतर गुरुवारी २५ कोटींच्या चार निविदा काढण्याची परवानगी देणारे पत्र नगर विकास विभागाने आयुक्तांच्या नावे पाठवले. आता टेंडरचा मार्ग मोकळा झाला आहे. दसऱ्यानंतर टेंडर काढले जातील, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images