Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्राध्यापकाचा वर्ग व्हरांड्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान विभागाचे निलंबित प्रा. डॉ. चंद्रशेखर गौरशेटे महिनाभरापूर्वी रुजू झाले, पण, केबिन ‘सील’ केल्यामुळे गौरशेटे यांच्यावर व्हरांड्यात बसण्याची वेळ आली आहे. केबिन उघडण्याच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी प्रा. गौरशेटे यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दोन पत्रे देऊनही कार्यवाही झाली नाही. प्रशासकीय दिरंगाईने प्रा. गौरशेटे तासिका न घेता केवळ व्हरांड्यात बसण्याची शिक्षा सहन करीत आहेत.

रसायन तंत्रज्ञान विभागातील मारहाण प्रकरणात प्रा. डॉ. गौरशेटे यांना ११ मार्च २०१६ रोजी निलंबित करण्यात आले होते; तसेच शिक्षिकेस धक्काबुक्की केल्याचा आरोप होता. सत्यशोधन समितीचे कामकाज पूर्ण होईपर्यंत निलंबन कालावधी होता, पण कुलगुरूंची मान्यता नसताना वैयक्तिक कक्ष ‘सील’ करून नंतर मान्यता घेतल्याचे गौरशेटे यांनी म्हटले होते. टी. बी. जाधव यांच्या अध्यक्षतेखालील सत्यशोधन समितीचे कामकाज २१ सप्टेंबर २०१६ रोजी पूर्ण झाले. अहवाल व कार्यपालन अहवालाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे गौरशेटे यांनी विद्यापीठात २४ ते २८ जुलै या कालावधीत उपोषण केले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेण्यात आले; तसेच विद्यापीठ प्रशासनाने ११ ऑगस्ट रोजी प्रा. गौरशेटे यांना रुजू करून घेतले. या प्रक्रियेपूर्वी कक्षाचे ‘सील’ उघडण्याची प्रक्रिया अपेक्षित होती, मात्र १५ मार्च २०१६ रोजी केलेले ‘सील’ अजूनही कायम असल्यामुळे प्रा. गौरशेटे यांच्यावर व्हरांड्यात बसण्याची वेळ आली. दररोज हजेरी नोंदवून प्रा. गौरशेटे कक्षासमोर मांडलेल्या टेबल-खुर्चीत बसतात. बाहेर कार्यालयीन कामकाज करणे शक्य नसल्यामुळे फक्त बसून राहतात. विद्यार्थ्यांच्या तासिका घेण्यासही त्यांना मज्जाव करण्यात आला आहे. प्रा. गौरशेटे यांच्या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे ‘सील’ उघडले नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, निलंबित प्राध्यापकाला रुजू करून घेण्यापूर्वी चौकशी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शिवाय एकसदस्यीय समितीने ३० दिवसात अहवाल सादर करणे बंधनकारक असताना आतापर्यंत अहवाल सादर का झाला नाही असा सवाल प्रा. गौरशेटे यांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत अधिक माहितीसाठी रसायन तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी दूरध्वनीवर प्रतिसाद दिला नाही.

या मानहानीचा प्रचंड मनस्ताप झाला असून, काही बोलू इच्छित नाही. विद्यापीठ प्रशासन योग्य निर्णय घेईल.
- प्रा. डॉ. चंद्रशेखर गौरशेटे, रसायन तंत्रज्ञान विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादेत फुटबॉल प्रशिक्षण केंद्र

0
0

औरंगाबादेत फुटबॉल प्रशिक्षण केंद्र
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फुटबॉल खेळाला चालना देण्यासाठी देशात कोलकाता आणि औरंगाबाद या दोन शहरांमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.
औरंगाबादेतील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात फुटबॉलचे ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याविषयीची घोषणा केली.
या संदर्भात साई केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून साईमध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण केंद्र उभारले जावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. काही महिन्यांपूर्वीच औरंगाबादेत सिथेंटिक फुटबॉल मैदान उभारणीस मंजुरीही देण्यात आली आहे. त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर होणार आहे. आता फुटबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी औरंगाबादची निवड झाल्यामुळे निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.’
‘हे केंद्र उभे राहिल्यानंतर औरंगाबादसह मराठवाड्यातील फुटबॉलला मोठी चालना मिळेल. औरंगाबाद शहरात फुटबॉलसाठी चांगले वातावरण आहे. शिवाय हवामानही पोषक असल्याने खेळाडूंना याचा निश्चितच फायदा होईल. या प्रशिक्षण केंद्रामुळे भारतीय पुरुष व महिला संघांची सराव शिबिरेही साई केंद्रात होतील. सिनिअर, ज्युनिअर फुटबॉल संघांच्या शिबिरामुळेही मोठी चालना मिळेल. खासदार चंद्रकांत खैरे यांनी फुटबॉल मैदानासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सध्या साई केंद्रात डे-बोर्डिंग व कम प्ले या योजनांअंतर्गत जवळपास ५५ खेळाडू नियमित सराव करीत आहेत. प्रशिक्षण केंद्रामुळे खेळाडूंची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यातून साहजिकच फुटबॉलचा प्रसार होणार आहे. लवकरच औरंगाबाद शहर निश्चितपणे देशाच्या नकाशात फुटबॉलचे महत्त्वाचे स्थान मिळवेल, असा विश्वासही भांडारकर यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडेंना पक्षातूनच विरोध: प्रकाश महाजन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाट्याला घरामधला आणि पक्षातला संघर्ष आल्याचं सांगतानाच पंकजाने दसरा मेळाव्याला प्रचंड मोठी सभा घेऊन भाजपला उत्तर दिलं आहे. त्यातून भाजपने बोध घ्यावा, असा टोला पंकजा यांचे मामा प्रकाश महाजन यांनी लगावला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे यांची बाजू उचलून धरली. भगवान गडावर पंकजांना दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला होता. प्रशासनानेही या मेळाव्याला परवानगी नाकारली. सत्तेत असलेल्या कॅबिनेट मंत्र्याच्या सभेला प्रशासन परवानगी नाकारतेच कसे?, असा सवाल महाजन यांनी केला. हा प्रकार लोक पाहत आहेत. त्यांना सर्व समजतं, असं सांगतानाच पंकजांना पक्षातूनच विरोध असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला. पंकजा सध्या घर आणि पक्ष अशा दोन्ही पातळीवर संघर्ष करत आहेत. प्रत्येकाला अशी परीक्षा पास व्हावीच लागते आणि दसरा मेळाव्यानंतर पंकजा ही परीक्षा मेरिटने पास झाली आहे, असं ते म्हणाले.

शपथविधीला पंकजाला टाळ्या जास्त वाजल्या त्याचा राग असणारीही लोकं आहेत, असं सांगतानाच एखादं नेतृत्त्व उभं राहत असेल तर त्याचे पाय खेचणारे चार लोक असतातच. त्यामुळे नेता व्हायचा असेल तर याला तोंड दिलंच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

पंकजांना ओबीसी मंत्रालय मिळावं अशी लोकांची भावना होती. त्यांनी या पदाला चांगला न्याय दिला असता, असं लोकांना वाटत होतं. पण त्यांना हे खातं देण्यात आलं नाही. त्यामुळे लोक नाराज आहेत. अर्थात कुणाला कोणतं मंत्रीपद द्यावं हा पक्षाचा निर्णय असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘फोट्रेस’ काळ्या यादीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी नियुक्त केलेली पीएमसी अर्थात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनी ‘फोट्रेस’ला काळ्या यादीत टाका. आयुक्तांनी आदेशाचे पालन करून त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असे आदेश बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती गजानन बारवाल यांनी दिले.

‘भूमिगत’चे काम केंद्र सरकारच्या युआयडीएसएसएमटी (अर्बन इस्फ्रास्ट्रक्टर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्माल अँड मिडीयम टाऊन्स) या योजनेतून करण्यात येत आहे. स्थायी समितीच्या गेल्या दहा बैठकीत शिवसेनेचे नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य व भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे ४६४ कोटी रुपयांच्या या कामातील अनियमितता पुराव्यासह उघड केल्या. या कामाची चौकशी करण्याची मागणी देखील केली. ‘भूमिगत’च्या कामाचा उडालेल्या फज्जा बद्दल ‘मटा’ ने एप्रिल महिन्यात पहिले वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ‘ऑडिट भूमिगतचे’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली. या सर्वाचा परिणाम म्हणून ‘स्थायी’च्या सदस्यांनी भूमिगत गटार योजनेच्या कामाचे आर्थिक व तांत्रिक लेखापरीक्षण करण्याची मागणी केली. ही मागणी सभापती गजानन बारवाल यांनी मान्य केली व पालिकेच्या सेवेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांना लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. देवतराज यांनी लेखापरीक्षण करून त्याचा अंतरिम अहवाल स्थायी समितीला सादर केला. या अहवालावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बुधवारी स्थायी समितीची विशेष बैठक झाली. या बैठकीत राजू वैद्य व राजगौरव वानखेडे यांनी लेखापरीक्षण अहवालातील विविध मुद्यांच्या आधारे ‘भूमिगत’च्या कामाचे नोडल ऑफिसर अफसर सिद्दिकी, पीएमसी फोट्रेस कंपनी व कंत्राटदार खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चरवर टिकेची झोड उठवली. राजू वैद्य म्हणाले, ‘पीएमसीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना असंख्य चुका केल्या, पण त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही. या योजनेवरील नोडल ऑफिसरने जबाबदारीने काम केले नाही. कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे. कंत्राटदाराला अतिरिक्त पैसे दिले. व्याजाचे पैसेही शासनाची मान्यता न घेता खर्च केले. या सर्व बाबी लक्षात घेता पीएमसीला काळ्या यादीत टाका. नोडल ऑफिसर अफसर सिद्दिकी यांना निलंबित करा,’ अशी मागणी केली. राजगौरव वानखेडे यांनीही व्याजाची रक्कम शासनाच्या परवानगीशिवाय खर्च केल्याचा मुद्दा मांडला. ‘भूमिगतच्या कामातील अनियमिततेबद्दल संबंधितांवर कारवाईचा निर्णय आजच्या आज घ्या. निर्णय झाला नाही तर लोक आपल्याला हासतील आणि कारवाईचा निर्णय झालाच नाही, तर यापुढे होणाऱ्या बैठकांना आम्ही येणार नाही,’ असा इशारा दिला. कीर्ती शिंदे, अजीम, सय्यद मतीन, संगीता वाघुळे, मनीषा मुंडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सभापतींनी अफसर सिद्दिकी, पीएमसीचे प्रतिनिधी आणि मुख्यलेखापरीक्षकांना म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतर ‘फोट्रेस’ला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले.

निवत्त अधीक्षक अभियंत्यांकडून चौकशी
‘भूमिगत’च्या आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निवृत्त अधीक्षक अभियंत्यांच्या माध्यमातून करण्याचे आदेश सभापतींनी दिले. तशी मागणी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी केली होती. ‘भूमिगत’च्या कामावर आता कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांनी लक्ष ठेवावे, त्यांना शहर अभियंत्यांनी सहकार्य करावे सभापतींनी स्पष्ट केले.
-
‘भूमिगत’चे सिंहावलोकन
-
- ३५४.६६ कोटी मूळ किंमत
- ४६४ कोटी टेंडरची किंमत
- १ जुलै १४ काम सुरू झाले
- ३० जून काम संपण्याची तारीख
- ४ ऑक्टोबरपर्यंतही काम सुरूच
- कंत्राटदारः खिल्लारी इनफ्रास्ट्रक्चर
- पीएमसीः फोट्रेस इन्फ्रास्ट्रक्चर अॅडव्हायजरी सर्व्हिसेस, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्यात पाण्याची चिंता तीव्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. शिवाय तालुक्यातील धरणांमध्येही पाणीसाठा नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शंभर टक्के पेरणी झाली. पण त्यानंतर जोरदार पाऊस न पडल्याने नदी-नाले कोरडेठाक असून कडधान्य पीक पाण्याअभावी वाया गेले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती २० ते ३० टक्केच उत्पन्न हाती लागणार आहे. यंदा रिमझिम पावसाच्या जोरावर तालुक्यातील पिके हिरवे राहिली. परंतु, ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेला. त्यामुळे उपलब्ध पाणी देऊन शेतकऱ्यांनी पिके वाचवली. पाणी नसलल्या शेतकऱ्यांचे पीक अद्यापही भुईला रेंगाळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसामुळे पिके हिरवी झाली आहेत पण, उत्पन्नात मोठी घट होणार आहे. तालुक्यातील नद्या दरवर्षी सप्टेंबर महिन्यात खळाळून वाहत असतात. यंदा पाणी शेतातून पाणी बाहेर पडलेच नाही. शेतकऱ्यांच्या विहिरींनाही पाणी आलेले नाही.

दहा टँकर सुरू

तालुक्यात भर पावसाळ्यातच पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली. सध्या तालुक्यातील सात गावांत दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तीन गावांत तीन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

प्रकल्प कोरडे

तालुक्यातील फुलंब्री धरणात १३ टक्के, सांजुळ लघु प्रकल्प ११ टक्के, आळंद लघु प्रकल्पात तीन टक्के पाणी आहे. जातेगाव लघु प्रकल्प, वाकोद मध्यम प्रकल्प, गणोरी लघु प्रकल्प, बाभूळगाव तरटे लघु प्रकल्प व गिरसावळी लघु प्रकल्पांत शून्य टक्के पाणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून राज्यस्तरीय मराठा उद्योग प्रदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवाई महिला मंडळ व मराठा बिझनेस नेटवर्क (एमबीएन) यांच्या वतीने तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योग महाप्रदर्शनाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. शहानूरमियाँ दर्गा परिसरातील श्रीहरी पव्हेलियनमध्ये भरणाऱ्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन गुरुवारी सकाळी १० वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे करणार असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या कार्यक्रमाला आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, माजी आमदार राजेश टोपे, डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उद्योजिका अनुश्री मुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘या प्रदर्शनाद्वारे जास्तीत जास्त महिलांना संधी देण्यात येत आहे. त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न आहे,’ असे शिवाईच्या अध्यक्ष निता देशमुख यांनी सांगितले. गृहउद्योगासोबतच कृषी, बांधकाम, ऑटोमोबाइल, हॉटेल व्यवसाय, कापड, विमा, म्युच्यअल फंड सल्लागार, वास्तू मार्गदर्शक आदी स्टॉल येथे राहणार आहेत. प्रदर्शनात १२५ स्टॉल्स असून त्यापैकी ५० टक्के मराठा उद्योजक आहेत. प्रदर्शनाचा समारोप ७ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. पत्रकार परिषदेला राम पवार, पुष्पा काळे, वृषाली देशमुख, निलेश काकडे, रंजना देशमुख, प्रदीप सोळुंके आदी उपस्थित होते.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर सुरासे, बालाजी शिंदे, राजेंद्र, प्रकाश काळे, रंगनाथ काळे, डॉ. विजय देशमुख, डॉ. मोहन देशमुख, सुभाष औताडे, अॅड. गणेश शिंदे, रोहित देशमुख, शिवदीप काळे, रोहित काळे हे परिश्रम घेत आहेत.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

५ आॅक्टोबर रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर बोडखे हे ‘एक एकरात सेंद्रीय शेती- समृद्ध कुटुंब’, ६ आॅक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता डॉ. नम्रता देशमुख (ठाणे) या ‘सिक्रेटस आॅफ बिझनेस डेव्हलपमेंट’, ७ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार विजेते मनोज कदम हे ‘यशस्वी उद्योजक बनण्याची गुरुकिल्ली’, इश्वेद बायोटेकचे संजय वायाळ पाटील हे ‘भारतीय व्यवसायाला असलेल्या आंतरराष्ट्रीय संधी’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक स्वीकारणार जर्मनीतील तंत्रज्ञान

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मेटल, कटिंग, मशीन टूल्स, ऑटोमोबाइल आदी नवीन तंत्रज्ञानाचा शहरातील उद्योजकांनी जर्मनीत जाऊन अभ्यास केला. तंत्रज्ञान, उत्पादने, यंत्रसामग्रीची माहिती घेऊन जर्मनीतील तंत्रज्ञान उद्योग समूहात आणण्याचा निर्धार काही उद्योजकांनी केला आहे, अशी माहिती ‘मासिआ’चे अध्यक्ष सुनील कीर्दक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राहुल मोगले, रवींद्र कोंडेकर उपस्थित होते.
जर्मनीमधील हँनोव्हर येथील ‘इमो २०१७’ या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनास ‘मसिआ’च्या ४५ सदस्यांनी भेट दिली. येथे मेटल, कटिंग, मशीन टूल्स, ऑटोमोबाइल, गिअर टेक्नोलॉजी, रोबोटिक, मेजरमेंट अँड इन्स्पेक्शन टेक्नोलॉजी आदी क्षेत्रातील त्रज्ञान जाणून घेतले. पाच ते सहा सदस्यांनी नवीन उत्पादनांची माहिती घेतली. पाच सदस्यांनी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन व चार सदस्यांनी अद्ययावत यंत्राची मागणी नोंदवली आहे. या दौऱ्यानिमित्त पाच ते सात सदस्यांना व्यवसायाची संधी प्राप्त झाली आहे. ज्ञानदेव राजळे, किरण जगताप, मनीष गुप्ता, सचिन गायके, शेख अब्दूल, विक्रम डेकाटे यांच्यासह ४५ जण दौऱ्यात सामील झाले होते.

‘स्कोडा’ ला भेट

जर्मनीतील स्कोडा ऑटो कंपनीला भेट देऊन माहिती घेण्यात आली. या कंपनीमधील तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाची महत्वपूर्ण माहिती मिळाली. येथील अद्यावत यंत्रांच्या साह्याने रोज साडे तीन हजार कारचे उत्पादन होते, तीन तासांत एक वाहन पूर्ण तयार होऊन बाहेर पडते, असे कीर्दक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्यातून एकदाच पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेले असताना महापालिका मात्र शहरवासीयांना आठवड्यातून एकदा म्हणजे चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करीत आहे.

शहरातील पाण्याची वाढती मागणी आणि जायकवाडी धरणातून केला जाणारा पाण्याचा उपसा याचा ताळेबंध लागावा व सर्वाना पाणी मिळावे म्हणून महापालिकेने ‌२०११पासून दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला व तेव्हापासून शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पालिकेच्या लेखी दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात असला, तरी नागरिकांना प्रत्यक्षात ७२ तासांनंतर, म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणी येते. आठवड्यातून दोन दिवसच पाणीपुरवठा होत आहे.

आता सहा वर्षांनंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील नागरिकांची काळजी आम्हालाच आहे, असा आविर्भाव आणून सर्वांना समान पाणी मिळाले पाहिजे, असा मुद्दा उपस्थित करून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; शहरातील काही वॉर्डांमध्ये चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे त्या भागातील नागरिकांची पाण्यासाठी नेहमीच ओरड असते. प्रामुख्याने जुन्या शहरातून अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. या तक्रारी दूर करण्यासाठी सर्वच वॉर्डांना तीन दिवसांआड म्हणजे चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना समन्यायी पाणीपुरवठा होईल आणि जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांवर जास्त ताण देखील पडणार नाही. दिवाळीनंतर लगेचच चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे शहरवासीयांना आठवड्यातून फक्त एकदाच पाणीपुरवठा होईल. आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा झाल्यास महिन्यांतून चार वेळा आणि वर्षातून ५२ वेळा पाणीपुरवठा होईल. पालिका पाणीपट्टी मात्र ३६५ दिवस पाणीपुरवठा केल्याबद्दल वसूल करणार आहे. दरम्यान, उपमहापौर स्मिता घोगरे यांनी आयुक्तांना पत्र देऊन, पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करू नका, अशी मागणी केली आहे.

३६ तासांचा शटडाउन
जायकवाडी धरणात साठा वाढल्यामुळे पालिकेच्या उपसा केंद्रात पाणीउपशादरम्यान मोठ्या प्रमाणात गाळ येत आहे. त्यामुळे पंप नादुरुस्त होणे, पाणीपुरवठ्याची यंत्रणा बिघडणे असे प्रकार घडू शकतात. त्याशिवाय जलवाहिनीवरील काही ठिकाणच्या गळत्या दुरुस्त करण्याचे कारण पुढे करून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे शुक्रवारपासून (सहा ऑक्टोबर) पाणीपुरवठा योजनेवर ३६ तासांचे मेगा शटडाउन घेतले जाणार आहे. या माहितीला कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दुजोरा दिला आहे. महावितरणशी यासंदर्भात संपर्क साधला आहे. या मेगा शटडाउनमुळे दिवाळीत पाणीपुरवठ्याचा त्रास निर्माण होणार नाही, असे ते म्हणाले.

समन्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी तिसऱ्या दिवशी पाणी देण्याचे नियोजन केले जात आहे. या नियोजनाची अंमलबजावणी प्रमुख पदाधिकारी, सर्वसाधारण सभा व आयुक्तांची मान्यता मिळाल्यावर केली जाणार आहे. त्यामुळे सध्या चौथ्या-पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत असलेल्या भागातील नागरिकांच्या तक्रारी बंद होतील.
- सरताजसिंग चहेल, कार्यकारी अभियंता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अफसर सिद्दिकींच्या निलंबनाची शिफारस

0
0

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेचे नोडल ऑफिसर अफसर सिद्दिकी यांना निलंबित करण्याची शिफासर बुधवारी स्थायी समितीच्या सभापतींनी महापालिकेच्या आयुक्तांकडे केली. त्यावर आयुक्त कोणता निर्णय घेणार याकडे आता महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकारच्या यूआयडीएसएसएमटी या योजनेतून भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात येत आहे. या ४६४ कोटी रुपयांच्या प्रकल्पात अनेक अनियमितता झाल्याचा आरोप केला जात होता. ‘मटा’ने यासंदर्भात वृत्तमालिका देखील प्रसिद्ध केली होती. स्थायी समितीच्या गेल्या आठ - दहा बैठकांपासून शिवसेनेचे नगरसेवक राजू वैद्य व भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे भूमिगत गटार योजनेच्या कामाचा भांडाफोड करीत आहेत. त्यांनी या योजनेच्या कामाचे आर्थिक आणि तांत्रिक लेखापरीक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकांनी आर्थिक लेखापरीक्षण केले. त्याचा अंतरिम अहवालावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सभापती गजानन बारवाल यांनी बुधवारी

स्थायी समितीची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वैद्य, वानखेडे यांच्यासह अन्यही नगरसेवकांनी पीएमसीला ब्लॅकलिस्ट करा आणि अफसर सिद्दिकी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्स अॅपने वाचवले शेतकऱ्यांचे प्राण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला सिटीचौक पोलिसांनी सतर्कतेने ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. पत्रकारांनी व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर टाकलेल्या पोस्टची पोलिसांनी तात्काळ दखल घेतल्याने शेतकऱ्याचे प्राण वाचले.

पत्रकार आणि पोलिस अधिकारी यांचा समावेश असलेल्या एका व्हॉट्स अॅपवरील ग्रुपवर एका पत्रकाराने एक मोबाइल क्रमांक टाकून, ही व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी येत असल्याची शक्यता वर्तवली होती. सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी या पोस्टची तात्काळ दखल घेतली, मात्र या व्यक्तीचे नाव किंवा ती व्यक्ती कोण आहे, याची पोलिसांना काही माहिती नव्हती. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून संशयित व्यक्तींची झाडाझडती सुरू केली. या प्रयत्नाला यश मिळाले. सदाशिव एकनाथ खिल्लारी (रा. नादी, ता. वैजापूर) हे पोलिसांना आढळले. खिल्लारी यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ विषारी किटकनाशकाची बाटली आढळली. पोलिसांनी त्यांची समजूत घालत समुपदेशन केले. पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नागरे, बांगर, सय्यद रियाज, अजिम इनामदार, सतिश बोरडे, चंद्रकांत चंदेल, जमादार कदम, शेवरे, इलग, जाधव, दापके, चव्हाण, बब्बू, शंकपाळ आटोळे आदींनी ही कारवाई करीत खिल्लारीचा जीव वाचवण्यात यश मिळवले.

जमीनप्रकरणामुळे आत्महत्येचा निर्णय
पोलिसांनी खिल्लारी यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्या गावाकडील शेत जमिनीबाबतचा खटला वैजापूर तहसीलदार यांच्या न्यायालयात सुरू होता. यामध्ये खिल्लारीच्या विरोधात निकाल लागला होता. यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या खिल्लारी यांनी न्याय मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदाराविरोधी कौल देणाऱ्या गावात चुरस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षांना संधी देणाऱ्या पैठण तालुक्यातील आडुळ ग्रामपंचायतमध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. तिन्ही उमेदवार पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरल्याने अत्यंत अटीतटीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील आडुळ व परिसरातील गावांनी वीस वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत आडुळच्या गांवकऱ्यानी समिश्र प्रतिसाद दिला आहे. बहुतांश वेळा गांवकऱ्यानी ग्रामपंचायत विद्यमान आमदाराच्या विरोधी गटाच्या ताब्यात दिलेली आहे. यंदा सरपंचपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पाच प्रभाग असलेल्या या ग्रामपंचायतीत १५ सदस्य निवडले जाणार आहेत. परिवर्तन ग्रामविकास पॅनल,
शिवशाही ग्रामविकास पॅनल व जनता जनार्धन ग्रामविकास मंच हे तीन पॅनल रिंगणात उतरले असून तीन पॅनलचे एकूण ३१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सरपंच पदासाठी परिवर्तन ग्रामविकास पॅनलकडून शेख शमीम नासेर, शिवशाही ग्रामविकास पॅनलच्या सिंधुबाई नामदेव पिवळ व जनता जनार्धन ग्रामविकास मंचच्या चंद्रकलाबाई शिवाजी वाघ रिंगणात आहेत. यापैकी सिंधुताई नामदेव पिवळ या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहे. चंद्रकला शिवाजी वाघ या माजी पंचायत समिती सदस्याच्या मातुःश्री आहेत. १७०० मुस्लिम मतदार असलेल्या आडुळच्या निवडणुकीत शेख शमीम नासेर या एकमेव मुस्लिम उमेदवार असल्याने सरपंचपदाची निवडणूक अटीतटीची होत आहे.

प्रचारासाठी घरोघरी धाव

तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत व सरपंचपदाचे तिन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने आडूळ ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, तिन्ही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून सर्व उमेदवार घरोघरी जावून प्रचार करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मगरीच्या अफवेने पैठणमध्ये खळबळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
जायकवाडी धरणासमोरील पुलावर मगर असलेले फोटो बुधवारी सोशल मिडियात वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. वन विभागाने परिसरात शोधमोहीम राबवली. पण, सायंकाळपर्यंत हे फोटो सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण, यात वन विभागाच्या यंत्रणेची नाहक धावपळ झाली.
कावसन, दक्षिण जायकवाडी व शेवगाव रस्त्याला जोडणाऱ्या जायकवाडी धरणासमोरील पुलावर सुमारे सहा फूट लांबीच्या मगरीचे फोटो बुधवारी सोशल मिडियावर वायरल झाले. पुलावरून २४ तास वाहतूक असल्याने मोठी खळबळ उडाली, दुपारी तीनपर्यंत शहरात मगरीचीच चर्चा सुरू होती. दरम्यान, वन विभागाने पूल परिसरात शोध मोहीम राबवली. या भागात मगर असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. एका यू ट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून वायरल झालेले मगरीचे फोटो सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील खटाव नांद्रे मार्गावरील येरला नदीपात्राच्या पुलावरील असल्याचे बुधवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. या सोशल अफवेमुळे शहरात तणाव होऊन वन विभागाची नाहक धावपळ झाली. धरणासमोरील नदीपात्र परिसरात मगर असण्याची शक्यता कमी असल्याची माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीची रक्कम दिवाळीपूर्वी द्यावी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून तीन महिने उलटले तरी राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात दिवाळीपूर्वी पैसे जमा करावा.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.
नांदेड-वाघाळा महापालिका निवडणूक प्रचाराला जाण्यापूर्वी त्यांनी बुधवारी राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. सरकारने निर्णय घेताना ऐतिहासिक कर्जमाफी, असे म्हटले होते. पण, तीन महिने उलटूनही गोंधळ सुरू आहे. शेतकऱ्यांना बोगस म्हटले, ही सत्तेची मस्ती, गुर्मी आहे, अशी टीका त्यांनी केली. ‘मंत्रीमंडळात शेजारी बसून निर्णय घ्यायचे आणि बाहेर आले की विरोधात बोलायचे, हा दुटप्पीपणा आहे,’ असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. राणे यांची ताकद कोकणात असून त्यांच्यामुळे केवळ काँग्रेसचे नुकसान होणार आहे, असा दावा त्यांनी केला. यावेळी आमदार सतीश चव्हाण, काशिनाथ कोकाटे, मनमोहनसिंग ओबेरॉय, सुरजितसिंग खुंगर उपस्थिते होते.
‘सिंचन प्रकल्प चौकशीसाठी तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व आपणास बोलावले होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही सहकार्य करणार असून सत्य बाहेर यावे, हीच आमची अपेक्षा आहे,’असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रपरिषद अंधारातच

लोडशेडिंगमुळे वीज गेल्यामुळे पत्रकार परिषद अंधाराच पार पडली. ही सध्याच्या सरकारची देण आहे. आमची सत्ता असताना विजेची मागणी आणि पुरवठ्याचे योग्य नियोजन केले होते, असे तटकरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑक्टोबर हिटला लोडशेडिंगचा तडका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑक्टोबर हिटमुळे अंगाची लाही लाही होत असताना शहरात मंगळवारपासून पुन्हा लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. शहरातील ए फिडरवरील दहा हजार वीजग्राहक वगळता बुधवारी उर्वरित दोन लाख ७७ हजार वीजग्राहकांना लोडशेडिंग सहन करावे लागले. बुधवारी दोन ते नऊ तासांपर्यंत लोडशेडिंग करण्यात आले.
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने राज्यात लोडशेडिंग केले जात आहे. २९ सप्टेंबरपासून तीन दिवस लोडशेडिंग नव्हते. दसऱ्याला कंपन्यांना सुटी, रविवार व सोमवारच्या सुट्या यामुळे विजेची मागणी कमी असल्याने लोडशेडिंग केले नाही. पण, मंगळवारी व बुधवारी सकाळी जी १ ते जी ३ या गटात लोडशेडिंग करण्यात आले. त्याचा फटका एक लाख ४२ हजार ग्राहकांना बसला. सी गटातील १५ हजार, डी वर्गातील १७ हजार, ई गटातील २१ हजार व एफ गटातील ३६ हजार वीज ग्राहकांनी लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागला. यामुळे शहरातील नागरिकांचे पाणी भरण्याचे नियोजन बिघडले आहे. आता ऑक्टोबर हिट सुरू झाल्याने लोडशेडिंग कायम राहिल्यास मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, पाऊस कमी झाल्याने कृषी पंप सुरू होऊन ग्रामीण भागातून विजेची मागणी वाढली आहे.

शहराची सद्यस्थिती

शहरात सध्या २५० मेगाव्हॅट विजेची मागणी आहे. उद्योगाकडून दररोज ११० मेगा युनिटची मागणी आहे. पण, शहराला फक्‍‌त १२५ ते १३५ मेगायुनिट वीज मिळत असून त्यापैकी ११० मेगायुनिट उद्योगाला पुरवल्यानंतर १५ ते २५ मेगायुनिट शहराला मिळत आहेत. यामुळे लोडशेडिंग बी ते जी ३ वीज तूट असलेल्या फिडरवर करावे लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिस कॉलनीत मीटर जप्त

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी स्थापन केलेल्या पथकाने सिडकोतील पोलिस कॉलनीमध्ये वीज मीटर तपासणी केली. यावेळी सहा ते आठ महिन्यांपासून वीजबिल थकवणाऱ्याचा वीज पुरवठा तोडण्यात आला. शिवाय वीज मीटरमध्ये फेरफार केल्याच्या संशयावरून १५ मीटर जप्त करण्यात आले. यावेळी जळालेल्या अवस्थेतील काही मीटर ताब्यात घेण्यात आले. प्रयोगशाळेत मीटर तपासणीनंतर सदोष प्रकरणात ग्राहकांवर कारवाई करण्यात येणार आहे. या पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण यांच्यासह अभियंता भीमराव कडेल, गणेश जाधव, वसुधा ऐलपुल्ला यांचा समावेश होता. या पथकाने शताब्दीनगरमध्ये कारवाई केली. महिला कर्मचारी अश्विनी देशमुख आणि वसुधा ऐलपुल्ला यांनी ३० आकडे जप्त केले. यावेळी जमलेल्या गर्दीमधील काही जणांनी महावितरणच्या वाहनाच्या टायरमधील हवा सोडली. कॉक सुरू दुचाकींचे पेट्रोल सांडण्यात आले. परिणामी, पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहने लोटत आणली. यामुळे शताब्दीनगर भागाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रामाणिक ग्राहकांसाठी सर्वेक्षण

प्रामाणिक ग्राहकांना लोडशेडिंगचा फटका बसू नये यासाठी शहराच्या विविध भागात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यात संबंधित भागात १०० टक्के वीज ग्राहक बिल भरत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना लोडशेडिंगमधून बाहेर काढण्यासाठी तां‌त्रिक कारवाई पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या सिडको एन नऊसह शहरातील इतर भागात सर्वेक्षण सुरू असल्याचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरगुती गॅस रिक्षात वापरणारे अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरगुती गॅसचा रिक्षामध्ये इंधन म्हणून वापर करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. बीड बायपासवरील अबरार कॉलनी येथे मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अबरार कॉलनी येथे घरगुती गॅस सिलिंडरमधून विद्युत मोटारीचा वापर करीत रिक्षामध्ये इंधन म्हणून भरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष अनर्थे व सुधाकर मोरे यांच्या मदतीने छापा टाकला. यावेळी दोन व्यक्ती रिक्षामध्ये गॅस भरताना आढळले. पोलिसांनी संशयित आरोपी सय्यद नसीर सय्यद खलील (वय ३८, रा. पैठण रोड) व रिक्षाचालक शांतीराम गंगाराम गांगवे (वय २८, रा. आडगाव, ता. औरंगाबाद) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक रिक्षा, भारत गॅस कंपनीचे सिलिंडर, इलेक्ट्रॉनिक काटा, विद्युत मोटार आदी साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पीएसआय नंदकुमार भंडारे, साईनाथ महाडिक, फारूख देशमुख, संजय धुमाळ, ओमप्रकाश बनकर, शिवाजी भोसले, विकास माताडे, संजय जाधव, राहुल हिवराळे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न, लघु प्रकल्प कोरडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणात ९९ टक्के पाणीसाठा असल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प कोरडे असल्यामुळे बहुतांश भाग कोरडा राहण्याची भीती आहे. जिल्ह्यातील ९० प्रकल्पांत एकूण २० टक्के पाणी आहे. परतीचा पाऊस दमदार झाल्यास मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस सुरू आहे. उर्ध्व भागातील सततच्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणी आवक कायम असल्यामुळे दरवाजे उघडून विसर्ग सोडण्यात आला होता. जायकवाडीत पाणी असल्यामुळे डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे पाच पाण्याच्या पाळ्या देण्याचे नियोजन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) केले आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. एकूण १६ मध्यम प्रकल्पापैकी आठ प्रकल्प कोरडेठाक आहेत. लहुकी, गिरणा, वाकोद, खेळणा, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, बोरदहेगाव या आठ प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. प्रकल्पांनी तळ गाठल्यामुळे या भागातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परतीच्या पावसाचे काही दिवस शिल्लक आहेत. या पावसाने प्रकल्पात भर पडण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जालना, बीड, परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांची हीच अवस्था आहे. मोठ्या प्रकल्पात पुरेसे पाणी आहे. सिद्धेश्वर धरणात ५५ टक्के, माजलगाव धरणात ६५, मांजरा ९४ टक्के आणि तेरणा प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे.

प्रकल्प कोरडेठाक

जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर आणि कन्नड तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर आहे. एकूण ९० लघु प्रकल्पात फक्त २० टक्के पाणीसाठा आहे. जवळपास ५० प्रकल्पांनी तळ गाठला आहे. मध्यम व लघु प्रकल्पात जेमतेम पाणी असून सिंचन क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. शेततळी, ‘जलयुक्त शिवार योजना’ आणि कोल्हापुरी बंधाऱ्यातही पाणीसाठा नसल्याने परिस्थिती गंभीर आहे. मध्यम प्रकल्पांची टक्केवारीः सुखना ४३, अजिंठा अंधारी १६, अंबाडी ०६, गडदगड ८२, पूर्णा नेवपूर ११, ढेकू २१, कोल्ही १९, नारंगी ०३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनधारकांकडून औट्रम घाटात एन्ट्री वसुली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
चाळीसगाव औट्रम घाटातून मंगळवारपासून दुचाकीसह चारचाकी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. पण, कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याकडून परजिल्ह्यातील वाहनांकडून वाहनांकडून शंभर रुपये घेतले जात असल्याची तक्रार आहे.
मुसळधार पावसामुळे २० ऑगस्ट रोजी रस्ता खचल्याने घाटातील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती. परंतु, खचलेल्या ठिकाणी दोनपैकी एका लेनचे काम पूर्ण झाल्याने चारचाकी हलक्या प्रवासी वाहनांसाठी मंगळवारपासून महामार्ग प्राधिकरणाने रस्ता खुला केला आहे. येथून दुचाकीसह कार, जीप आदी वाहनांची वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. परंतु, या ठिकाणी रस्ता दुरुस्ती काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामावरील कर्मचाऱ्यांकडून भरदुपारी औरंगाबाद, जळगाव व धुळे या जिल्ह्यातील पासिंगची वाहने वगळून इतर जिल्हे व परराज्यातील वाहने, टेम्पो ट्रॅव्हलर आदी चारचाकी प्रवासी वाहनांची अडवणूक करण्यात येत आहे, अशी तक्रारी आहेत. त्या वाहनांकडून संधी साधून प्रत्येकी शंभर रुपये उकळले जात आहेत. हा प्रकार बुधवारी दिवसभर सुरू होता. यामुळे हलकी चारचाकी प्रवासी वाहने घाटात येत नसल्याचे दिसून आले. चाळीसगाव वाहतूक पोलिस चेकपोस्ट घाटाच्या खाली असल्याने याकडे पोलिसांचे दूर्लक्ष होत आहे. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणच्या अधिकांऱ्यानी याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी वाहनधारक करत आहेत.

संधी साधून वसुली

रस्ता दुरुस्ती काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामावरील कर्मचाऱ्यांकडून भरदुपारी औरंगाबाद, जळगाव व धुळे या जिल्ह्यातील पासिंगची वाहने वगळून इतर जिल्हे व परराज्यातील वाहने, टेम्पो ट्रॅव्हलर आदी चारचाकी प्रवासी वाहनांची अडवणूक करण्यात येत आहे, अशी तक्रारी आहेत. त्या वाहनांकडून संधी साधून प्रत्येकी शंभर रुपये उकळले जात आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विद्यापीठाचा लढा यशस्वी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबादमध्ये व्हावे यासाठी दहा वर्षापासून औरंगाबादकरांचा लढा सुरू होता. शासन निर्णयानंतरही चार वर्षे प्रशासकीय अडथळ्यांमध्ये विद्यापीठ अडकले. अखेर या शैक्षणिक वर्षात ते सुरू होत आहे. विद्यापीठाचे वर्ग गुरुवारपासून सुरू होत असल्याने अन् उच्चशिक्षणात त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील, असे विधी विद्यापीठासाठी प्रयत्न करणाऱ्यांना विश्वास आहे.

विधी विद्यापीठ औरंगाबादमध्ये व्हावे, यासाठी विविध पातळीवर लढा औरंगाबादकरांनी दिला. शासकीय, कायदेशीर पातळीवर अनेकांनी विद्यापीठ उभारणीसाठी प्रयत्न केले. अखेर विधी विद्यापीठ सुरू होत आहे. विधी विद्यापीठाचे वर्ग सुरू होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

विधी विद्यापीठ अखेर सुरू होत आहे, याचा अतिशय आनंद आहे. विद्यापीठाला अभ्यासू कुलगुरू मिळाले आहेत. त्यांनी सहा महिन्यांत विद्यापीठाचे वर्ग सुरू करण्यापर्यंत केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. अडथळे पार करत उभा राहिलेल्या या विद्यापीठामुळे औरंगाबादच्या शिक्षणात चांगले परिणाम निश्चित दिसतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होणारे विद्यर्थी येथे घडतील; तसेच येथे आमंत्रित व्यक्तींचे होणारे लेक्चर ऐकणे हे सुवर्णसंधीच असते.
- डॉ. रत्नाकर देगावकर, माजी प्राचार्य, एमपी लॉ कॉलेज.

वकील संघांच्या माध्यमातून विधी विद्यापीठ औरंगाबादमध्ये यावे यासाठी प्रयत्न केले. व्यवस्थेच्या विरोधात लढताना अनेक ‌अडचणी, अडथळे आले. अखेर विद्यापीठ सुरू होत आहे याचा आनंद आहे. असे असले तरी, आपल्याला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. विद्यापीठातील समित्या कायमस्वरुपी आणि देशभरातील तज्ज्ञांचा त्यात समावेश करणे गरजेचे आहे. या संस्थेमुळे मराठवाड्यातील शैक्षणिक वातावरण अधिक गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल.
- अॅड. सतीश तळेकर, ज्येष्ठ विधिज्ञ.

औरंगाबादचा आता राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या यादीत समावेश झाला आहे. देशभरातील विद्यार्थी, फॅकल्टी, विषयातील तज्ज्ञ येथे येतील. त्याचा सर्वाधिक फायदा कायद्याच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. गुणवत्ता, ज्ञानाची देवाण-घेवाण शक्य होणार आहे. शैक्षणिक वातावरणही चांगले राहिल, विधी कॉलेजांमध्येही एकप्रकारे स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे त्याचे परिणाम चांगलेच दिसतील.
- अनघा पेडगावकर, विद्यार्थी याचिकाकर्ता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कमलनयन’मध्ये बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमिया यासारख्या विविध रक्तविकारांमध्ये जीवनदायी ठरणारे विविध प्रकारचे ‘बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट’ कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये सात रुग्णांवर यशस्वी झाले आहे. ही सुविधा मराठवाड्यात सर्वप्रथम उपलब्ध झाले आहे.
फ्लो-सायटोमेट्री, सायटोजेनिक्स व मॉलिक्युलर हिमॅटॉलॉजी यासह संपूर्ण चिकित्सा विभाग हॉस्पिटलमध्ये आहे. बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट करण्याचा सल्ला देऊन प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आतापर्यंत सहा रुग्णांवर त्यांच्याच स्वतःच्या पेशींसह ‘बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट’ (ऑटोलोगस) करण्यात आले. दोन रुग्णांवर ‘एचएलए मॅच’ झालेल्या दात्यांच्या पेशींसह ‘बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट’ (अलोजेनिक) करण्यात आले. या आठ रुग्णांपैकी सात रुग्णांच्या केस यशस्वी झाल्या आहेत. १८ वर्षांच्या युवकावर व ५२ वर्षांच्या व्यक्तीवर ‘अलोजेनिक’ प्रत्यारोपणाच्या केसेस यशस्वी होऊन अनुक्रमे ५२ व ४३ दिवस झाले आहेत. ५२ वर्षीय व्यक्तीच्या पोटात ‘टीबी’चा गोळा निघाला; प्रकृती स्थिरावल्यावनंतर प्रत्यारोपण यशस्वी झाले. दात्यांचे ‘एचएलए मॅच’ न झाल्याने ‘हॅप्लो आयडेन्टिकल’चे प्रमाण निम्मे असतानाही विशेष तंत्रज्ञानाद्वारे प्रत्यारोपण होऊ शकते, अशा दोन रुग्णांवर प्रत्यारोपण नुकतेच झाले. पुढील काही दिवसांत दोन्ही केस यशस्वी झाल्याचे ठामपणे म्हणता येऊ शकेल, असे केंद्राचे रक्तविकारतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश एकबोटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी रुग्णालयाचे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नताशा कौल यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्टेम सेल्सचे दान

‘बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट’साठी दात्यांच्या हाडांमधील स्टेम सेल्स काढण्याची गरज राहिली नाही. काही इंजेक्शन्समुळे स्टेम सेल्स रक्तामध्ये उतरवून शरिरातील केवळ स्टेम सेल्स काढून पुन्हा रक्त शरिरात सोडण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. या प्रक्रियेमध्ये दात्यांना केवळ ०.६ टक्के धोका असू शकतो, असेही डॉ. एकबोटे यांनी सांगितले.

योग्य वेळेत प्रत्यारोपण झाले, तर बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट यशस्वी होण्याची शक्यता वाढते व ७०-८० टक्के रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात या उपचारासाठी पीएम-सीएम फंडातून काही प्रमाणात मदत मिळते.
- डॉ. व्यंकटेश एकबोटे, रक्तविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन पर्वानिमित्त उद्या महास्वच्छता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
येत्या ५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या ‘पर्यटन पर्व’ या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शुक्रवारी शहरात राष्ट्रीय महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक सरकारी कार्यालय तसेच शाळा, महाविद्यालयांचा सहभाग राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.
यावेळी डॉ. भापकर म्हणाले, पर्यटनाला चालना मिळण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. स्वच्छ, सुंदर पर्यटनातून देशी पर्यटकांमध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल. त्या अनुषंघाने शहरातील शहागंज व महात्मा गांधी चौक परिसरात ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत महास्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुख, अधिकारी, कर्मचारी या स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत. या माध्यमातून स्वच्छतेबाबत परिसरातील आजूबाजुंच्या नागरिकांना जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे. यासाठी शहरातील ४२ ऐतिहासिक, महत्त्वाच्या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. येथे सर्व शासकीय कार्यालये, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन- शाळांचे विद्यार्थी स्वच्छता अभियानात सहभागी होतील.

स्वच्छतेसाठी पालकत्व

ज्या सरकारी कार्यालयामार्फत निवडलेल्या भागाची स्वच्छता करण्यात येईल त्या कार्यालयाला स्वच्छतेसाठी त्या स्थळाचे पालकत्व देण्यात येणार आहे. संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांना महिन्यातून किमान एक वेळेस स्वच्छ केलेल्या स्थळांना भेटी द्याव्या लागणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

पर्यटनपर्वाचे आज उद्‍घाटन

पर्यटन पर्व या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी (५ ऑक्टोंबर) दुपारी चार वाजता उद्‍घाटन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची यावेळी उपस्थिती राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images