Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शुभेच्छापत्रांची मागणी ओसरली

$
0
0

शुभेच्छापत्रांची मागणी ओसरली
सोशल मीडियाच मुक्त वापर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शुभेच्छापत्रे देऊन मित्र परिवारासोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा संपली आहे. सोशल मीडियाचे विनाखर्चिक माध्यम शेकडो मित्रांपर्यंत आकर्षक संदेश पोचवत असल्यामुळे शुभेच्छापत्रांची खरेदी थंडावली आहे. शुभेच्छापत्रे खरेदी करणारा मोजकाच वर्ग असल्यामुळे दोन वर्षांत शुभेच्छापत्र निर्मिती बंद होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या दिवाळीनिमित्त मोजकीच वैविध्यपूर्ण शुभेच्छापत्रे बाजारात उपलब्ध आहेत.
दिवाळी किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुण वर्गाकडून ‘ग्रिटींग कार्ड’ अर्थात शुभेच्छापत्रांना मोठी मागणी होती. प्रेयसी, शिक्षक, नातेवाईक, व्यावसायिक मित्र, वडीलधारी व्यक्ती अशा प्रत्येकासाठी वेगळी शुभेच्छापत्रे मिळतात. शुभेच्छापत्रे खरेदी करून उत्सवाचा आनंद घेणारा मोठा वर्ग होता. सुंदर काव्य रचना आणि चित्रांची सुसंगत मांडणी असलेली शुभेच्छापत्रे आकर्षक असत. मात्र, ‘एसएमसएस’ सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शुभेच्छापत्रांची मागणी घटली. फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्विटर अशा सोशल मीडियाने शुभेच्छापत्रांचे बहुतेक ‘मार्केट’ संपवले. या माध्यमात स्वतः आकर्षक संदेश तयार करणे आणि पाठवणे उत्सुकतेचे ठरले आहे. औरंगाबाद शहरात निराला बाजार, औरंगपुरा, कॅनॉट प्लेस, उस्मानपुरा, सिडको भागात शुभेच्छापत्रांची किमान ३० ते ४० दुकाने होती. सद्यस्थितीत दुकानांची संख्या घटली असून व्यावसायिकांनी शुभेच्छापत्रांऐवजी भेटवस्तू विकण्यावर भर दिला आहे. शुभेच्छापत्रांना मागणी नसल्यामुळे ही गंभीर परिस्थिती ओढावल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
यंदाचे आकर्षण
थ्री-डी शुभेच्छापत्रे यंदाच्या दिवाळीचे आकर्षण आहे. रंगीबेरंगी आणि आकाराची शुभेच्छापत्रांना जेमतेम मागणी आहे. या शुभेच्छापत्रांची किंमत २५ ते २०० रुपये आहे. सोशल मीडियाच्या शुभेच्छा संदेशांच्या गर्दीत शुभेच्छापत्रे कमी झाली आहेत, असे व्यावसायिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन दिवस शहर कचरामय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सलग तीन दिवसांपासून नारेगाव कचरा डेपोवर एकही गाडी उतरली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत शहरात सर्वत्र कचरा साठल्याचे चित्र रविवार सायंकाळपर्यंत होते. नारेगाव परिसरातील १४ गावांतील गावकऱ्यांनी कचरा डेपो तत्काळ हटवावा या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन तूर्त गावकऱ्यांनी मागे घेतले. आंदोलनादरम्यान, प्रशासनाचा कांचनवाडी, सातारा परिसरासह आडगाव परिसरात कचरा टाकण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे चार महिन्यात डेपोसाठी जागा शोधण्याचे महापालिकेसमोर आव्हान आहे.
नारेगाव येथे तब्बल ४४ एकरवर कचऱ्याचे महाकाय डोंगर उभे राहिल्यामुळे परिसरातील १४ गावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावकऱ्यांनी शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले होते. मांडकी, गोपाळपूर, महापिंप्री, कच्चीघाटी, रामपूर, पिसादेवी, पोखरी, पळशी, हिरापूर, वरूड, सुलतानपूर, वरझडी, वडखा, नारेगाव अशी गावे कचरा डेपोमुळे प्रभावित झाली आहेत. ‘तुम्ही कचरा करणार आणि त्याचा वास आम्ही घ्यायचा का,’ असा सवाल करत एकही गाडी डेपोत गावकऱ्यांनी येऊ दिली नाही. त्यामुळे शहरातील कचरा शहरात आहे त्याच ठिकाणी राहिला. तीन दिवसांपासून शहरातून एकही ट्रक कचरा बाहेर गेलेला नाही. शुक्रवारी पहाटेपासून भरलेल्या ट्रक सेंट्रल नाका येथे उभ्या होत्या. रविवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्ती करत चार महिन्याची मुदत प्रशासनाला द्या, प्रश्न निकाली निघेल, असे आश्वासन दिले. त्यामुळे तीन दिवसापासून आंदोलन थांबले. महापौर भगवान घडमोडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, नगरसेवक नंदकुमार घोडेले, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, गोकुळ मलके यांची उपस्थिती होती. हा प्रश्न रविवार सायंकाळपर्यंत सुटला. ऐन सणात वॉर्डा-वॉर्डामध्ये कचरा तसाच पडून राहिला. त्यामुळे कचरा सडण्यास सुरुवात झाली व दुर्गंधी पसरली

बाराशे टन कचरा, २५० वाहने रस्त्यावर

आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून (शुक्रवारी सकाळी) महापालिकेचे कचरा उचलणारी २५० ट्रक, टॅक्टर गावकऱ्यांनी परत पाठवले. कचऱ्याने भरलेले हे ट्रक नाक्यावर उभे आहेत. एकही वाहन रिकामे न झाल्याने डंपिंग ग्राउंडवरील कचरा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन दिवसांचा कचरा तसाच शहरातील छोट्या-छोट्या डंपिंग ग्राउंडवर पडून आहे. हा कचरा सोमवारपासून कचरा नियमितपणे उचलला जाणार आहे. शहरातून दररोज ३८० मेट्रीक टन कचरा डेपो पाठवला जातो. तीन दिवसात सुमारे साडेअकराशे टन कचरा रस्त्यावर, वाहनांमध्ये पडून आहे.

शहर कचरामय

शहरातील स्वामी विवेकानंदनगर, रोजाबाग, सिडको, हडको, हर्सूल, आझाद चौक, शहागंज, शहाबाजार, भडकल गेट, छावणी, पडेगाव, सातारा, हनुमाननगर, पुंडलिकनगर, म्हाडा कॉलनी, गजानन महाराज चौक, एपीआय कॉर्नर व इतरत्र कचरा साचून आहे. कचरा उचलण्यासाठी वाहने येत नसल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. दिवाळीच्या काळात पैठण गेट, औरंगपुरा आणि गुलमंडी या व्यापार पेठांतही कचरा पडून आहे. अनेक ठिकाणी कचरा जाळण्यात आला.

प्रश्न १४ वर्षांपासून प्रलंबित

कचरा डेपो हलविण्याबाबत कोर्टाने २००३मध्ये निर्णय घेतला आहे. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने हा प्रश्न सोडवला नाही. नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना चार महिन्यात पर्यायी जागा शोधू असे, आश्वासन पालिका प्रशासनाने दिले. त्यामुळे चार महिन्यात जागा शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिझायनर ज्वेलरी’चा ट्रेंड जोरात

$
0
0

‘डिझायनर ज्वेलरी’चा ट्रेंड जोरात
पारंपरिक दागिन्यांची मागणी घटली; तरुणांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन खरेदी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी म्हटले की दागिन्यांची भरभरुन खरेदी ठरलेलीच; परंतु नोटबंदी, जीएसटीमुळे इतर व्यापार-उद्योगांप्रमाणेच सराफ सुवर्णकार व्यापार तसेच व्यापाऱ्यांनाही फटका बसलाच. मात्र, आता ज्वेलरी मार्केट स्थिरावत असल्याचे चित्र असून, दिवाळीच्या खरेदीला सुरुवातही झाली आहे. सद्यस्थितीत दरवर्षीप्रमाणे मार्केट नसले तरी येत्या आठवडाभरात दरवर्षीप्रमाणेच खरेदी-विक्री होईल, असेही संकेत आहेत. त्याचवेळी यंदा पारंपरिक दागिन्यांची मागणी कमी झाली आहे आणि पारंपरिक दागिन्यांची जागा डिझायनर दागिन्यांनी घेतली असल्याचे जाणवत आहे. तसेच तरुणाईचा विचार करुन पालक मंडळींचा खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे.
दिवाळीला विशेषतः पाडव्याला नवीन दागिन्यांची खरेदी ही प्रथा-परंपरा अजूनही कायम आहे. मात्र नोटबंदी, जीएसटीच्या धक्क्यातून सावरण्यासाठी ज्वेलरी मार्केटला मोठा कालावधी जावा लागला. त्यातच पूर्वी ५० हजारांवर दागिने खरेदी करणाऱ्यांना प्राप्तीकर कार्यालयाकडून नोटिसा गेल्यामुळे ग्राहकांमध्ये एक प्रकारच्या भीतीचे वातावरण होते. या सगळ्याचा प्रतिकुल परिणाम मार्केटवर नक्कीच झाला. त्यातून मार्केट सावरताना दिसत असून, पुन्हा एकदा मार्केटकडे ग्राहक वळत असल्याचे चित्र आहे. त्यातच ग्राहकांच्या आवडीनिवडीदेखील बदलत असल्याचे दिसून येत आहे. ‘अक्षदा ज्वेलर्स’ व ‘पुणेकर ज्वेलर्स’च्या नम्रता पुणेकर म्हणाल्या, सध्या डिझायनर दागिन्यांचा स्पष्ट ट्रेंड आहे. दुकानांमध्ये उपलब्ध असणाऱ्या ८० टक्के डिझाईनला फाटा देत स्वतःच्या आवडीचे डिझाईन तयार करुन घेण्यामध्ये ग्राहकांचा कल दिसून येत आहे. शोरुममध्ये उपलब्ध डिझाईनमध्ये वेगवेगळे बदल सुचवून ‘ट्रेंडी लुक’चे दागिने करुन घेण्यामध्ये अर्थातच तरुणाई पुढे आहे. त्याचबरोबर अतिशय वेगळ्या व नवनवीन प्रकारच्या डिझाईनला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, असेही लक्षात येत आहे. उदाहरणार्थ ब्रेसलेटप्रमाणे हातातील मंगळसूत्र एका प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते. त्याला तरुणाईकडून मोठा प्रतिसाद मिळाला आणि आता हा ट्रेंड येऊ घातला आहे. एकतर तीन ते चार ग्रामपर्यंत हातातील मंगळसूत्र तयार होते. त्याऐवजी गळ्यात घालण्याच्या मंगळसूत्राची किंमत तुलनेने बरीच झास्त असते. त्यामुळे हातातील मंगळसूत्राची मागणी वाढल्याचे दिसून येत असून, डायमंडच्या दागिन्यांचीदेखील क्रेझ तरुणाईमध्ये वाढल्याचे जाणवत आहे. नेहमीच्या पारंपरिक अंगठ्यांपेक्षा डिझायनर अंगठ्यांकडेही कल वाढला आहे. परदेशातील अनेक भारतीयांकडून दिवाळीत दागिन्यांची हमखास खरेदी केली जाते, असेही आवर्जुन लक्षात येत असल्याचे पुणेकर म्हणाल्या.
चांदीच्या भेटवस्तुंची खरेदी वाढली
काही वर्षांपूर्वी चांदीच्या दागिन्यांची खरेदी जास्त होती. मधल्या काळात ती कमी झाली आणि आता पुन्हा एकदा चांदीच्या भेटवस्तुंची खरेदी वाढल्याचा ट्रेंड आहे. मुळात चांदीची किंमत कमी असल्यामुळे चांदीच्या भेटवस्तू सामान्यांच्या बजेटमध्ये बसते. त्यामुळे सोन्याऐवजी चांदीचाही पर्याय स्वीकारणारे ग्राहक उल्लेखनीय प्रमाणात वाढल्याचे सराफांनी सांगितले. प्रॉपर्टी खरेदीची क्षमता सगळ्यांमध्ये नसते; परंतु त्याऐवजी कमी बजेटमध्ये दागिने खरेदी होऊ शकते आणि प्रापर्टी खरेदी ही बहुतेक महिलांच्या आवाक्याबाहेर असते, असेही निरीक्षण पुणेकर यांनी नोंदविले.
किंमतीमध्ये बदलांची शक्यता कमी
सध्या शुद्ध सोन्याचा भाव ३०,९०० रुपये प्रती १० ग्राम, तर चांदीचा भाव ४२००० रुपये प्रती १ किलो असून, या किंमतीमध्ये दोन-पाचशेपेक्षा जास्त बदल होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी किंमती कमी होण्याची वाट पाहू नये, असे महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे सल्लागार दत्ता सावंत हे ‘मटा’शी बोलताना म्हणाले. सराफ व्यवसायावर अजूनही काही प्रमाणात मंदी असली तरी येत्या दोन ते तीन महिन्यांत मार्केटमध्ये पुन्हा तेजी येईल, अशी आशा आहे. ‘व्हॅट’नंतरही काही प्रमाणात मार्केटमध्ये स्लोडाऊन होते. त्यामुळे लवकरच ज्वेलरी मार्केट पुन्हा एकदा गजबजेल, असेही सावंत म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चे कंपनीवर ‘बाबा सूट’, ‘शेरवाणी’ची भुरळ

$
0
0

बच्चे कंपनीवर ‘बाबा सूट’, ‘शेरवाणी’ची भुरळ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळीसणाचे सर्वाधिक आकर्षण लहानमुलांना असते. दिवाळीत लहानमुलांची हौस यावर कुटुंबात लक्ष दिले जाते. विशेषतः कपड्यांबाबत बच्चे कंपनीचा उत्साह अधिक असतो. कपडाबाजारपेठेत यंदा सर्वाधिक छोट्या दोस्ताच्या कपडा बाजारपेठेला आशा आहे. लहान मुलांना बाजारात आलेल्या बाबा सूट, शेरवाणीची भुरळ आहेच यासह ‘टी-शर्ट’, ‘जॅकेट’ असे काँम्बीनेशन असलेल्या ‘श्रग’चे मुलांना आकर्षण आहे.
दिवाळी सणांमध्ये सर्वाधिक कपडे खरेदीवर भर असतो. त्यामुळे कपडा मार्केट दिवाळीच्या महिनाभर आधीच सजते. कपडा बाजारपेठेत यंदा मेन्सवेअर, सुटिंग-शर्टिंग बाजारपेठ कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे, विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यात नोटबंदी, जीएसटीचा परिणाम अधिक जाणवला. दिवाळीसणाचे सर्वाधिक आकर्षण लहानमुलांना असते. त्यामुळे कुटुंबात लहानमुलांच्या कपडे खरेदीवर अधिक लक्ष असते. यंदा या बाजारपेठेत नवनवीन कपड्यांच्या प्रकारांनी मुलांसह पालकांचे लक्ष वेधले आहे. मुलांच्या कपड्यांच्या दुकानांमध्ये ब्रँडेड कपड्यांपेक्षा फॅन्सी कपड्याना मागणी सर्वाधिक असते. त्यामध्ये शेरवाणी, धोती पॅर्टन, जॅकेट, टी-शर्ट, जीन्ससह, बाबा सूट, टू इन वन, बटरफ्लाय, वेस्टर्न, शार्ट कर्ट, पंजाबी, घागर, बीचकटर्स, साधे शर्टही मुलांसाठी आवडीचे ठरत आहेत. आकर्षक रंगसंगतीसह ‘टू इन वन’ घेण्यावर बच्चेकंपनीचा आग्रह असतो. मुलांच्या आग्रह, आवडीनुसार खरेदीवर पालकांचाही कल आहे.
‘श्रग’चीही जादू
बाबा सूट, शेरवाणीसह मुलांमध्ये ‘श्रग’ची क्रेझ वाढते आहे. आकर्षक अशा रंगामध्ये हे श्रग बाजारपेठेत उपलब्ध आहेत. जॅकेट त्यामध्ये टी-शर्ट, त्यातही विविधता आहे. ज्याचा जॅकेट स्वतंत्र इतर शर्टवरही वापरता येते. मुलांच्या कपड्यांची रेंज पाचशे रुपयांपासून सुरू होते ते दीड, दोन हजारपर्यंत आहे.
दिवाळीत नवनव्या वैविध्यपूर्ण कपड्यांची बाजारपेठ सजली आहे खरी, परंतु बाजारपेठेत तसा प्रतिसाद फारसा कमी आहे. नोटबंदीचा, जीएसटीचा बहुधा हा परिणाम असेल. आणखी दोन दिवसात बाजारपेठ अधिक वेग धरेल.
आशा भादवे
कपड्यांच्या बाजारपेठेत लहान मुलांच्या कपड्यांची खरेदी अधिक होते. यात फॅशनेबल प्रकारच्याच कपड्यांनची मागणी असते. औरंगाबादमध्ये चांगले मार्केट आहे. दुकानांची संख्या वाढल्याने बाजारपेठही विस्तारित होते. परंतु, नोटबंदी, जीएसटीमुळे उत्पादन कमी झाल्याचे चित्र आहे. त्याचे परिणाम बाजारपेठेवर दिसतात.
विकास गुणवाणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अवैध’ यादीवरून वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा निवडणूक मतदारयादीमुळे वादग्रस्त ठरली आहे. नाव जुळत नसल्यामुळे जवळपास तीन हजार महिला मतदारांना अवैध ठरवले आहे. महिलांचे विवाहापूर्वी आणि नंतर नाव वेगळे असल्यामुळे अवैध ठरवू नये अशी मागणी संघटनांनी केली होती. याबाबत कुलगुरूंनी आदेश देऊनही दुरूस्तीपत्रकात जुनाच नियम कायम ठेवल्याने महिला मतदार वैध ठरण्याची शक्यता नाही.
विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या पदवीधर गणाच्या मतदारयादीत नोंदणी करण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांचे अर्जावरील नाव, पदवी प्रमाणपत्रावरील नाव आणि रहिवासी पुराव्यावरील नाव जुळत नसल्याने अवैध ठरवण्यात आले आहे. विवाहापूर्वी महिला मतदाराचे नाव आणि विवाहानंतरचे नाव वेगळे असते. पदवी प्रमाणपत्रावरील नाव आणि रहिवासी पुरावाव्यावरील नाव जुळणे शक्य नसल्याचे प्राध्यापक संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला वारंवार सांगितले. याबाबत बामुक्टो, बामुक्टा, विद्यापीठ उत्कर्ष पॅनेल यांनी गुरुवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली होती. केवळ नाव जुळत नसल्याचे कारण दाखवून महिला मतदारांना अवैध ठरवणे योग्य नाही. मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवू नका, अशी मागणी संघटनांनी केली होती. शिष्टमंडळ दालनात असताना कुलगुरूंनी मागणी तात्काळ मान्य केली; तसेच दुरुस्तीपत्रक काढण्याचे सूचित केले. विशेष म्हणजे कुलगुरूंचे आदेश असूनही दुरुस्तीपत्रकात जुनाच नियम प्रसिद्ध करण्यात आला. पदवी प्रमाणपत्रावरील नाव, अर्जावरील नाव आणि रहिवासी पत्त्यावरील नाव जुळत नसल्यास संबंधित अर्ज अवैध ठरतील, असे त्यात नमूद करण्यात आले. दुरुस्तीपत्रक पाहिल्यानंतर संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणूक निर्णय अधिकारी खोडसाळपणा करीत आहेत. कुलगुरूंनी आश्वासन देऊनही चार हजार महिला मतदारांना अवैध ठरवण्यात आल्याची टीका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान, मतदारयादीवर आक्षेप मागवण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्र किंवा विवाह प्रमाणपत्र सादर केल्यास नाव वैध होऊ शकते, मात्र दिवाळीच्या सुटीत प्रक्रिया करणे अवघड झाले आहे. सर्व कागदपत्रे जमा करून पुन्हा एकदा विद्यापीठ प्रशासनाला देणे जिकीरीचे असल्यामुळे काही मतदारांनी नोंदणीस नकार दिला आहे. महिला मतदारांच्या नावाबाबत अभ्यास करूनच विद्यापीठाने नियमावली तयार करणे अपेक्षित होते.

वेळापत्रक कायम
तदर्थ प्राध्यापक, विद्यापीठ अध्यापक आणि महिला मतदारांना अवैध ठरवल्याच्या मुद्द्यावर प्राध्यापक संघटनांनी कुलगुरूंची भेट घेतली होती. नियमानुसार आणि नियमात काही बदल करून सर्वांना मतदानाचा हक्क देण्यात येईल, असे चोपडे यांनी सांगितले. या प्रकारामुळे निवडणूक वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणूक निश्चित वेळापत्रकाप्रमाणेच होईल. दुरुस्तीपत्रक आणि इतर तांत्रिक प्रक्रियेचा वेळापत्रकावर परिणाम होणार नाही असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाचे दुरुस्तीपत्रक महिला मतदारांचा हक्क डावलणारे आहे. पदवी प्रमाणपत्रवरील नाव आणि रहिवासी पुराव्यावरील नाव कसे जुळणार याचा खुलासा विद्यापीठानेच करावा.
- डॉ. उल्हास उढाण, माजी सदस्य, व्यवस्थापन परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर इंडियाची विमान प्रवासावर दहा टक्के सूट

$
0
0

एअर इंडियाची विमान प्रवासावर दहा टक्के सूट
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
एअर इंडिया कंपनीने दिवाळी धमाका म्हणून विशेष योजना जाहीर देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिटांवर दहा टक्के सूट देण्यात आली आहे. एअर इंडियाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
देशात कोणत्याही शहरात एअर इंडियाच्या विमानाने १३ ते १५‌ डिसेंबर या काळात प्रवास करण्यासाठी ‘दिवाळी धमाका’ ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत औरंगाबाद ते दिल्ली विमान प्रवास बुकिंग केल्यास ८०० रुपयांपर्यंत बचत होणार आहे. मुंबईला जाण्यासाठी ६०० रुपयांपर्यंत सूट घोषित करण्यात आली आहे.
ही विशेष योजना एअर इंडियाच्या वेबसाईट किंवा मोबाइल अॅपद्वारे तिकिट बुकिंग करणाऱ्यांसाठीच लागू करण्यात आली आहे. सध्या या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळत असल्याची माहिती एअर इंडियाच्या सूत्रांनी दिली. या योजनेत २१ ऑक्टोबर, २२ ऑक्टोबर आणि २३ ऑक्टोबरला बुकिंग होणार नाही. दिवाळीनिमित्त तिन्ही दिवस विमानांची तिकिटे बुक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एअर इंडियाच्या सूत्रांनी दिली.
जेट प्रोमोचीही योजना
विमान प्रवाशांना विशेष आकर्षक योजना जाहीर करण्यात जेट एअरवेजनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. जेट एअरवेजने अॅडव्हान्‍स बुकिंगवर ५० टक्के तर जेट प्रोमो या योजनेत बुकिंग केल्यास दोन हजार रुपयांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना मर्यादित सीटसाठी लावण्यात आली असल्याचीही माहिती जेट एअरवेजने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादच्या नगारखाना दरवाजाला ‘चार चाँद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे दीड कोटी रुपये खर्च करून खुलताबाद शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेले ऐतिहासिक नगारखाना दरवाजाचे संवर्धन करण्यात आले. हा दरवाजा आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते लोकार्पण करून रविवारी नागरिकांसाठी खुला करण्यात आला.
नगारखाना दरवाजाच्या संवर्धनास फेब्रुवारी २०१६मध्ये सुरुवात करण्यात आली. या कामाचा आराखडा आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी तयार केला आहे. हे काम मुंबई येथील मे. वसंत कन्स्ट्रक्शन कंपनीने १८ महिन्यात काम पूर्ण केले. नगारखाना दवाजाच्या दुरावस्थेकडे ‘मटा’ ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधून दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता.
औरंगाबाद मेगा सर्किटकरिता केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे मंजूर करण्यात आलेल्या २३ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून या कामावर ८४ लाख २८ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी एक कोटी ५० लाख चार हजार १६ रुपये अंदाजपत्रक करण्यात आले. कंत्राटदार कंपनीने दहा टक्के कमी दराने निविदा घेऊन काम पूर्ण केले. या कामावर एक कोटी ३४ लाख ९१ हजार ६११ रुपये खर्च करण्यात आला. दगडाचे कोरीवकाम करणाऱ्या अहमदनगर येथील कारागिरांनी अथक परिश्रम करून नगारखाना दरवाजाचे रुपडे बदलले आहे.
लोकार्पण कार्यक्रमाला नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, माजी नगराध्यक्ष अॅड कैसरोद्दिन, दर्गा कमिटीचे अध्यक्ष मुनिबोद्दिन, नगरसेवकांची उपस्थिती होती.

तीनशे वर्षानंतर संवर्धन

मोगल सम्राट औरंगजेब यांचा मुलगा सुलतान मोहंमद आजमशाह याने खुलताबाद शहराच्या संरक्षणार्थ सन १६९८ ते १७१० या दरम्यान ४७२० फूट लांब, सहा फूट रुंद, १५ ते २० फूट उंच तटबंदी, सहा दरवाजे, दोन खिडक्या बांधल्या. या तटबंदीत नगारखाना भव्य दरवाजा उभारण्यात आला. या नगारखाना दरवाजावर नगारे वाजविले जात होते. नगारखाना दरवाजा नगर पालिकेचे बोधचिन्ह आहे. या दरवाजाचे संवर्धन पहिल्यांदाच करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलमुळे मणक्यांवर संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तरुणांमध्ये व अगदी शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्येही मणक्यांचे विकार मोठ्या प्रमाणावर वाढले असून, सद्यस्थितीत तिशीमध्ये सर्वाधिक रुग्ण दिसून येत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मोबाईल-टॅबच्या अतिवापरामुळे तरुणांना ‘टेक्स्ट नेक सिन्ड्रोम’ भेडसावत असून, अशा तरुणांना गंभीर स्वरुपाच्या स्पॉन्डेलिसिसशी सामना करावा लागू शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्येही (घाटी) आता बिनाटाक्याची मणक्याची शस्त्रक्रिया होत असून, सर्वाधिक ७३ वर्षीय वृद्धावरदेखील ही शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी झाली आहे.

घाटीमध्ये मागच्या दीड-दोन वर्षांपासून या प्रकारच्या बिनाटाक्याच्या शस्त्रक्रिया होत असल्या तरी ७३ वर्षीय व्यक्तीवर शस्त्रक्रिया होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, शेंदूरणी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील पांडुरंग शंकर इखणकर यांना अनेक दिवसांपासून उजव्या हाताला मुंग्या येणे, हातातील शक्ती कमी होणे, हाताने काम करता न येणे असा त्रास होत होता. त्यांना खासगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला; परंतु त्यांना मोठा खर्च करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी घाटीत धाव घेतली. घाटीतील अस्थिरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल धुळे यांनी एमआरआय व इतर तपासणी केल्यानंतर पांडुरंग यांचा सी-पाच व सी-सहा क्रमांकाच्या मणक्यातील गादी दबल्यामुळे मज्जारज्जूवर (स्पायनल कॉर्ड) दबाव येऊन उजव्या हाताची शक्ती गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्यावर बिनाटाक्याची (एन्डोस्कोपी) शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. यात त्यांच्या गळ्यावर ०.५ सेंटिमीटर लांबीचा बारीक छेद देऊन दुर्बिणीद्वारे संबंधित दोन मणक्यांमधील दबलेली गादी मोकळी करण्यात आली. त्यामुळे स्पायनल कॉर्डवरील दाब कमी झाला आणि रुग्णाच्या हातामध्ये शक्ती आली. दुसऱ्याच दिवसापासून रुग्णाला हाताची हालचाल करणे, हाताने काम करणे शक्य झाले; तसेच मानेजवळ अतिशय छोटा छेद असल्यामुळे काही तासांत मानेचीही हालचाल करणे शक्य झाले. आता पांडुरंग इखणकर यांचे बहुतांश त्रास कमी होऊन त्यांना स्वतःचे काम स्वतः करणे शक्य झाल्याचे डॉ. धुळे यांनी सांगितले.

‘कॉम्पिकेशन रेट’ सर्वांत कमी
मणक्यांच्या पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर चिरफाड करावी लागते. त्यासाठी भूल द्यावी लागते. तसेच पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुंत निर्माण होऊन रुग्णाला विशेषतः ज्येष्ठ-वृद्ध रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटर लागू शकते. अपवादात्मक स्थितीत रुग्णाच्या जिवालाही धोका होऊ शकतो व शस्त्रक्रियेनंतर किमान काही महिने काळजी घ्यावी लागते. मधुमेही रुग्णांना गुंतागुंत होऊ शकते. त्याऐवजी एन्डोस्कोपीमुळे कमीत कमी छेद द्यावा लागतो व गुंतागुंत होण्याची शक्यता सर्वांत कमी असते. तसेच दुसऱ्याच दिवशी रुग्णाला सुटी मिळू शकते, असेही डॉ. धुळे म्हणाले.

२५ टक्के व्यक्तींना त्रास
वयोवृद्ध व्यक्तींना मणक्यांचा त्रास होऊ शकतो. मात्र अलीकडे चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, बसण्याची चुकीची सवय, ताठ न बसणे, रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास आदींमुळे मणक्यांचे विकार तरुण वयामध्येही दिसून येतात. अपघातामध्येही मणक्यांना गंभीर दुखापत होऊ शकते व अशा एका १८ वर्षांच्या युवकावर घाटीत बिनाटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. हा युवक पुन्हा एकदा काम करू लागल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइलने मानेचे गंभीर दुखणे
मोबाइल-टॅबच्या अतिवापरामुळे मान विचित्र कोनात सातत्याने वाकल्यामुळे मानेचे गंभीर दुखणे निर्माण होत असून, अगदी शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्येही हा त्रास दिसून येत आहे. तिशीच्या आतील व्यक्तींमध्ये मानेचे दुखणे सर्वाधिक प्रमाणात आढळून येत आहे, ज्याला ‘टेक्स्ट नेक सिन्ड्रोम’ असे नाव देण्यात आले आहे. मोबाइल-टॅबच्या अतिवापरामुळे गंभीर स्वरुपाचा स्पॉन्डेलिसिस होतो, याची तरुणांना जाणीवच नाही, असे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश पानट म्हणाले. डेटा स्वस्त किंवा ‘फ्री’ झाल्यामुळे सोशल मीडियाचा अतिवापर होत आहे. मोबाइलऐवजी कम्प्युटरवर सोशल मीडियाचा वापर केला व महत्त्वाच्या कामासाठीच मोबाइल वापरला तर हे दुखणे कमी होऊ शकते. रस्त्यांवरील खड्ड्यामुळेही हा त्रास वाढला आहे. आयुर्मान वाढल्यामुळे हाडे ठिसुळ होऊन त्याच्या विविध समस्या ज्येष्ठांमध्ये दिसून येत आहे. त्याचवेळी व्यायामाचा अभावही मोठ्या प्रमाणावर असून, त्याचा फटका मणकेविकार वाढीत होत असल्याचे डॉ. पानट म्हणाले.

सूर्यनमस्कार, पोहणे सर्वोत्तम
‘स्पायनल कॉर्ड’साठी सूर्यनमस्कार व पोहणे सर्वोत्तम आहे. त्याचवेळी शाळेत शिकवले जाणारे ‘पीटी’चे व्यायामही उपयुक्त ठरतात. आतातर इयत्ता आठवीनंतर फाऊंडेशनचे क्लास लावले जातात. त्यामुळे मैदानी खेळही आपोआप बंद होतात. बहुतांश सर्व प्रकारच्या कार्यालयांमध्ये एकाच ठिकाणी अनेक तास बसून राहणे, व्यायाम-हालचाल नसणे, चुकीच्या बसण्याच्या सवती यामुळेही मणकेविकारांमध्येही मोठी वाढ दिसून येत असल्याचेही डॉ. पानट म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिल्या ई-रिक्षाची औरंगाबादेतून सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रदूषण नियंत्रणाबरोबर स्वस्तात प्रवासाची सोय आता औरंगाबादकरांना ई-रिक्षाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. विजेवर चालणाऱ्या ई-रिक्षा औरंगाबादेत सुरू करण्यासाठी चार तरुणांनी पुढाकार घेतला असून, पहिल्या ई-रिक्षाला मंगळवारी हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.

जाधववाडी येथील सनी सेंटरमध्ये अथर्व आणि श्री ई-रिक्षाच्या केंद्राची सुरुवात होणार आहे. देशातील पहिले ई-रिक्षा चार्जिंग सेंटर आणि राज्यातील पहिले ई-रिक्षा ट्रेनिंग सेंटर औरंगाबादमध्ये मंगळवारपासून (१७ ऑक्टोबर) सुरू होत आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे शहरातील पहिल्या ई-रिक्षाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, महापौर भगवान घडमोडे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, प्रशांत बंब, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, भाजप राज्य कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय केनेकर, माजी आमदार प्रदीप जैसवाल, भाजप शहराध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवाणी हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण होते. त्यामुळे ई-रिक्षा येणाऱ्या काळामध्ये प्रदूषण रोखण्यास मदत करणार आहेत. ई-रिक्षा यंत्रणेच्या प्रणालीची अमंलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागानेही परवानगी दिली आहे. अत्यंत कमी खर्चात या ई-रिक्षा चालणार असल्याने देशभरातील काही मोठ्या शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. ही रिक्षा केवळ तीन युनिट चार्जिंगवर म्हणजेच २० ते २५ रुपयांत जवळपास १०० किलोमीटर चालते. या रिक्षामुळे प्रदूषणाला मोठा आळा बसणार आहे, शिवाय डिझेल, पेट्रोलला एक स्वस्त पर्याय रिक्षाच्या माध्यमातून उभा राहणार आहे. राजसाहेब पाटील, डॉ. विक्रांत जैस्वाल, आत्माराम वाघ आणि सुनील जगदाळे या औरंगाबादकर तरुणांनी पुढाकार ई-रिक्षासाठी पुढाकार घेतला आहे. जाधववाडी येथील सन्नी सेंटरमध्ये अथर्व आणि श्री ई-रिक्षाच्या केंद्रात विक्रीसोबत ट्रेनिंग दिली जाणार आहे. देशातील पहिले ई-रिक्षा चार्जिंग सेंटर आणि राज्यातील पहिले ई-रिक्षा ट्रेनिंग सेंटर औरंगाबादमध्ये होणार अाहे. त्यामुळे ई-रिक्षाचे हब म्हणून औरंगाबादची ओळख होणार आहे.

औरंगाबादसाठी ई-रिक्षाची गरज का?
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे दिवसेंदिवस वाहन खरेदी करण्याचा आलेख वाढला आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे
- ई-रिक्षा बॅटरीवर चालणाऱ्या असतील. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा बसेल
- १८ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती ई-रिक्षाद्वारे व्यवसाय करू शकते. शिवाय त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी औरंगाबादेत सुविधाही करण्यात आली आहे.
- या रिक्षातून प्रवासाचा खर्च कमी असेल.
- कमी खर्चात व्यवसाय सुरू करून तरुणांना रोजगार मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात खरेदीचा सुपर संडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रकाशोत्सव अर्थातच दीपावली... मराठी माणसाचा सर्वांत मोठा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, त्याची चाहूल शहराच्या प्रत्येक बाजारपेठेवर आणि प्रत्येक काना-कोपऱ्यात जाणवली नसती तरच नवल. त्यातच दिवाळीआधीचा शेवटचा रविवार. त्यामुळे फुल-टू-दिवाळी धमाल ही १५ ऑक्टोबरच्या ‘सुपर संडे’ला प्रकर्षाने दिसून आली. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील बाजारपेठेमध्ये चैतन्य दिसून आले आणि अर्थातच या सुपर संडेच्या मूडमध्ये तरुणाई उधळली नसती तरच आश्चर्य!

मागच्या वर्षीची नोटबंदी, त्यानंतर जीएसटी आणि त्याचबरोबरच अनेक कडू-गोड निर्णयांमुळे वर्षभर सर्व प्रकारच्या मार्केटवर स्लोडाउनचे सावट होते. त्यातही नोटबंदी-जीएसटीबद्दलच्या नाराजीचे पडसाद सर्वच बाजारपेठांवर दिसून आले. त्यानंतरही सर्व बदल पचवून दसऱ्यापासून बाजारपेठ खुलण्यास सुरुवात झाली, तर दिवाळीनिमित्त बाजारपेठ पूर्ण क्षमतेने फुलली, असे रविवारी (१५ ऑक्टोबर) स्पष्टपणे जाणवले. पैठणगेट, औरंगपुरा, गुलमंडी, निराला बाजार, समर्थनगर, रंगारगल्ली, कुंभारवाडा आदी परिसर औरंगाबादकरांनी शब्दशः वाहात असल्याचे उत्साहवर्धक चित्र कितीतरी दिवसांनी बघायला मिळाले. अर्थातच, सर्वाधिक गर्दी ही कपड्यांच्या दुकानांमध्ये दिसून आली. लहान-मोठ्या-मध्यम, ब्रँडेड, नॉन-ब्रँडेड अशा सगळ्याच प्रकारच्या दुकानांमध्ये खचाखच गर्दी दिसून आली आणि त्यातही लहान-मोठ्या मुलांच्या कपड्यांच्या दुकानांमध्ये लक्षणीय गर्दी होती, हेही प्रकर्षाने जाणवले. पैठणगेटपुढील रस्ता तर वाहनांसाठी बंद करण्यात आला असून, पुढे माणसांची मुंग्यांप्रमाणे गर्दी वाहताना दिसत होती. कपड्यांप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्येही धूम होती.

मॉल्समध्येही शहरवासीयांचा पूर
शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या मॉल्समध्येही गर्दीचा पूर ओसंडून वाहात होता. अर्थात, बहुतांश मॉल्समध्ये पार्किंगची सोय असूनही ती अपुरी पडत असल्याचे स्पष्टपणे जाणवले, तर जुन्या शहरामध्ये मात्र जवळजवळ माणसांइतक्याच वाहनांमुळे जिथे-तिथे वाहतूक कोंडीचे फटके जवळजवळ प्रत्येकाला सहन करावे लागत असल्याचे चित्र उशिरापर्यंत कायम होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकोंडी अखेर फुटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नारेगाव कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून १४ गावांतील नागरिकांनी सुरू केलेले आंदोलन रविवारी मागे घेण्यात आले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी केली. प्रशासनाला चार महिन्यांचा वेळ द्या, प्रश्नातून मार्ग काढू असे, आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

तब्बल ३५ वर्षांनंतर शहराचा कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला होता. डेपोतील दुर्गंधी, प्रदूषण त्यामुळे कंटाळलेल्या परिसरातील गावकऱ्यांनी १३ ऑक्टोबरपासून डेपोवर एकही गाडी येऊ न देत आंदोलन सुरू केले होते. १४ गावांतील गावकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी एकही गाडी डेपोवर उतरू दिली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत शहरात ठिकठिकाणी कचरा साचला. या प्रकरणावर तोडगा निघत नव्हता. प्रशासनालाही गावकऱ्यांनी पिटाळून लावले होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (१५ ऑक्टोबर) आंदोलन गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या, जागेचा शोध घेण्यासाठी चार महिने प्रशासनाला वेळ द्या, पालिका प्रशासनानेही तसे कबूल केले. चार महिन्यांनंतर गाड्या आल्या, तर तुम्ही गाड्या रोखू शकता. सध्या वेळ द्या, असे बागडे म्हणाले. काहीवेळ नागरिकांनी आपसात चर्चा केली आणि सायंकाळी अध्यक्षांच्या विनंतीला मान देत आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे शहरातील कचराकोंडी फुटली आहे. यावेळी महापौर भगवान घडमोडे, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची उपस्थिती होती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका मार्केटमधील व्यापारी हवालदिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील आठ फटाका मार्केटला पोलिस आयुक्तांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे फटाका व्यापारी हवालदिल झाले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी कर्ज घेऊन व्यवसायात गुंतवणूक केली असल्याने दुकाने सुरू होणार नसतील, तर फटाक्याचे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने फटाका मार्केटला परवानगी मिळवण्याचे प्रयत्न व्यापारी रविवारी दिवसभर करत होते.
शहरात एकूण दहा ठिकाणी अनेक वर्षांपासून फटाका मार्केट सुरू करण्यात येते. गेल्या वर्षी औरंगपुरा येथील मुख्य फटाका मार्केटमध्ये भीषण आग लागली. या आगीत १४० दुकानांची राख झाली, कोट्यवधींचे नुकसान झाले. जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे देशभरात फटाका मार्केटच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला. कोर्टाच्या आदेशामुळे निवासी भागात फटाके विकण्यास परवानगी देता येणार नाही. परिणामी, शहरातील फटाका मार्केटच्या उभारणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात औरंगपुरा, सिडको-हडको, टीव्ही सेंटर, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, राजीव गांधी स्टेडियम, मुकुंदवाडी, वाळूज, वाळूज एमआयडीसी, चिकलठाणा आदी भागात फटाका मार्केट उभारण्यात येत होते. यावर्षी औरंगपुरा येथील मार्केट आयोध्यानगरीच्या मैदानावर स्थलांतरित करण्यात आले आहे. तेथे फक्त ५० दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. आठ फटाका मार्केटला परवानगी नाकारण्यात आल्याने विक्रेते हवालदिल झाले आहेत.

पर्यायी मैदानांचा शोध

पोलिसांनी परवानगी नाकारलेली फटाका मार्केट शासनाच्या नियमानुसार निवासी भागात असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. पोलिसांनी या व्यापाऱ्यांना पर्यायी जागा शोधण्यास सांगितले होते. त्यामुळे व्यापारी पर्यायी मैदानांच्या शोधात आहेत.

सिझनल व्यवसाय

फटाके विक्रीचा व्यवसाय सिझनल आहे. या व्यवसायात अनेक नवीन व्यापारी येतात. शिवाय गटाने माल खरेदी करून व्यवसाय करणारे अनेक जण आहेत. काही जण व्यवसायासाठी कर्ज काढतात, सिझन संपल्यानंतर कर्ज फेडतात.

शिवाजीनगर भागातील मार्केटमध्ये १८ दुकाने लावली जातात. अनेक बेरोजगार तरूण एकत्र येऊन हा व्यवसाय करतात. त्यांनी फटाके मागवले आहेत. पण, दुकाने थाटण्यास परवानगी नाकारल्याने त्यांच्यासमोर कर्ज परतफेडीचा प्रश्न उभा राहिला आहे.
-राजेंद्र जंजाळ, नगरसेवक, शिवाजीनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीटिंग, पणती सजावटीत रमली बच्चे कंपनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळीसणात लखलखत्या पण्यात, आकाशदिव्याची झगमग. अशा या सणाला आपल्या मित्रांना, नातलगांना स्वतःच्या हाताने तयार केलेले ग्रीटिंग कार्ड देणे म्हणजे एक वेगळा आनंद. असाच आनंद रविवारी बच्चे कंपनीने घेतला तो ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ग्रीटिंग कार्ड व पणती सजावट कार्यशाळेत‌. गरवारे कम्युनिटी सेंटर व्हेन्यू पार्टनर कार्यशाळेचे होते.

दिवाळीत आकाशदिवा, ग्रीटिंग स्वतःच्या हाताने तयार करण्याची काही मजा औरच. लखलखत्या प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीसाठी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक पणती बनविण्याचे तंत्र आपल्याला आवगत झाले तर, बात काही औरच. कार्यशाळेत प्रशिक्षक शुभांगी कुलकर्णी यांनी शनिवारी आकाशदिवा कसा तयार करायचा हे शिकवले. कार्यशाळेच्या समारोपात रविवारी त्यांनी घरातील छोट्या-छोट्या टाकाऊ वस्तू कशा प्रकारे उपयोगात आणता येतात. त्यामाध्यमातून पणती सजावट कशी करता येऊ शकते, याचे तंत्र शिकवले.

तुटलेल्या सीडी, राखी, खराब झालेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू, चमचे यातून एकाहून एक आकर्षक पणत्या त्यांनी तयार करून दाखविल्या व त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. शालेय विद्यार्थ्यांची सर्वाधिक उपस्थिती होती. त्यासह पालकांनीही कार्यशाळेत सहभाग नोंदवित मुलांचा उत्साह वाढवला. नक्षीदार, सुबक, आकर्षक पणती सजावट मुलांनी केली. घरातील टाकाऊ वस्तू फेकून न देता कशा प्रकारात उपयोगात येऊ शकतात हे कार्यशाळेतून समोर आले. त्यानंतर मुलांनी ग्रीटिंग तयार केली. त्यामध्ये ट्यूलिंग, थ्री-डी इफेक्ट कसे देतात हेही मार्गदर्शन सहभागी असलेल्यांना करण्यात आले.

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. सणांसाठी आपल्या नातलगांना भेट देण्यासाठी आपण स्वतः ग्रीटिंग तयार केल्याचा आनंद घेता आला. मार्गदर्शकांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यामुळे सोप्या पद्धतीने पणती, ग्रीटिंग तयार करता आले.
- चैतन्य मेहेत्रे

कार्यशाळेत भरपूर शिकायला मिळाले. घरातील अनेक छोट्या-छोट्या टाकाऊ वस्तू असतात ज्या भंगारमध्ये जातात. त्याचा असाही काही उपयोग होतो. त्यामुळे त्याला नवेपण येऊन जाते.
- श्रुती पुरे

ग्रीटिंग तयार करताना काही अडचणी आल्या नाहीत. आपल्यातील कल्पकतेला वाव देणारी ही कार्यशाळा ठरली, असे मला वाटते. आम्ही अतिशय आनंदाने त्यात सहभाग घेतला.
- प्रियंका रौतल्ले

कार्यशाळेत सहभाग हा एकप्रकारचा नवीन काही शिकायला मिळण्याची संधी असते. आज आम्ही पणती, ग्रीटिंग तयार करणे शिकलो. त्यातील बारकावे कळाले. आपण स्वतः काहीतरी करतोय याचा आनंद मिळाला.
- गणेश येवले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएमच्या आदेशानंतरही भाजपचे ‘एकला चलो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी महापौर निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत जाण्याच्या सूचना दिल्या असल्यातरी पक्षातूनच महापौर आपला असावा असा ‌सूर निघत आहे. खासदार अमर साबळे यांच्या बैठकीत हाच मुद्दा मांडण्यात आला. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत ‘एकला चलो’ची भूमिका योग्य राहील की नाही, याची वैयक्तिक लेखी माहिती द्यावी, अशा सूचना खासदार साबळे यांनी दिल्या.
आगामी २८ ऑक्टोबर रोजी महापौर भगवान घडमोडे यांची महापौरपदाची मुदत संपत आहे. त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी महापौरपदाची निवडणूक होत आहे. शिवसेनेतर्फे उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. युतीमधील ठरावानुसार हे पद शिवसेनेकडे असले तरी, भाजपने महापौरपदाची निवडणूक लढवावी, असा सूर आहे. त्याबद्दल जिल्ह्याचे प्रभारी खासदार अमर साबळे यांनी नगरसेवकांच्या बैठकीत रविवारी चाचपणी केली.
खासदार साबळे हे तीन दिवसांपासून शहरात आहेत. त्यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पक्ष संघटनेचा त्यांच्याकडून आढावा घेण्यात येत आहे. रविवारी भाजप विभागीय कार्यालयात भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत फक्त नगरसेवकांसोबतच खासदार साबळे यांनी चर्चा केली. नगरसेवकांच्या बैठकीत अनेक नगरसेवकांनी थेट लढण्याचीच भाषा वापरली. नगरसेवकांमध्ये भिन्न मतप्रवाह असल्याने खासदार साबळे यांनी प्रत्येक नगरसेवकांनी त्यांचे मत पक्षाला लेखी कळवावे अशी सूचना केल्याचे सूत्रांनी सांगतिले. यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे लढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नगरसेवकांची भूमिका

भाजपने महापौरपदाची निवडणूक लढवावी का?, ही निवडणूक भाजपने स्वबळावर लढविली, तर त्याचे काय परिणाम होतील?, भाजपला यश मिळू शकेल का?, त्याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?, अशी विचारणा त्यांनी नगरसेवकांना केली. याबाबत काही नगरसेवकांनी भाजपने आपला निर्णय वेगळा घ्यावा, अशी भूमिका मांडली. काही नगरसेवकांनी जातीय समीकरण पुढे करून युती तुटल्यास इतर पक्षाला लाभ मिळेल अशी भूमिका मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायतींना निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
‘नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी तीन लाख रुपयांचा निधी देण्यात येईल,’ असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी दिले.
ग्रामपंचायत निवडणुकीतील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी सूरज लॉन्समध्ये सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील गोळवाडी, टुणकी, कोल्ही, पारळा, खरज, खिर्डी हरगोविंदपूर, भग्गाव हिलालपूर कोरडगाव, डाकपिंपळगाव, नादी महालगाव, हनुमंतगाव, वांजरगाव, रोटेगाव, बेलगाव, बाबतारा आदी गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगांवकर, अजय पाटील चिकटगावकर, भागीनाथ दादा मगर, दीपकसिंह राजपूत, बाळासाहेब भोसले, प्रभाकर बारसे, योगिता निकम, प्रताप मरमट, राजेंद्र कराळे, मंजाहारी गाढे, शैलेश सुरासे, रिखबशेठ पाटणी, विश्वजित चव्हाण, बाळू पाटील शेळके, गणेश चव्हाण, भाऊसाहेब झिजुर्डे, सुधाकर पवार आदींची उपस्थिती होती. चिकटगावकर म्हणाले की, आता गावाने तुम्हाला महत्त्वाच्या पदावर बसवले असून गट-तट सोडून गावविकासासाठी आपण सर्वांनी प्रधान्य देऊन गावचे मुलभूत प्रश्न हाती घेऊन ते लवकरात लवकर मार्गी कसे लागतील याकडे लक्ष द्यावे. तालुक्याचा आमदार या नात्याने विकास कामासाठी लागणाऱ्या मदतीस मी सदैव तुमच्या सोबत आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रेम राजपूत, रवी पाटणे, सागर गायकवाड, आनंद निकम, गणेश पवार, रमेश चोभे, बापू साळुंके, संदीप पवार, गणेश काळे, अमोल बावचे, वाल्मिक बोरनारे, संकेत चुडीवाल, किशोर जाधव, रजनीकांत नजन, बंडू आहेर, शरद बोरनारे, ईराज शेख आदीसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

विजयाची पुनरावृत्ती होईल

भाजप-शिवसेनेच्या कारभाराला जनता कंटाळली असून कर्जमाफी, लोडशेडिंग, शेतीमालाचा हमीभाव, नोटबंदी, खराब रस्ते या सर्व बाबी हाताळण्यात ते अपयशी ठरले आहे. त्याचा प्रत्यय जनतेने मतदानातून दाखवला दिला आहे. तालुक्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत दिसून येईल, असा दावा आमदार चिकटगावकर यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापारेषणमध्ये पदोन्नतीची दिवाळी भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापारेषणमध्ये नव्या अाकृतीबंधानुसार तंत्रज्ञांच्या एक हजार ९६० पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वर्ग चारमधील तंत्रज्ञांना वर्ग तीनमध्ये पदोन्नती देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे २००५मध्ये विभाजन झाले. त्यानंतर जुन्या स्टाफिंग पॅटर्ननुसार कामकाज सुरू होते. आता स्पर्धा विचारात घेऊन नवीन स्टाफिंग पॅटर्न तयार करण्याचे काम सुरू आहे. नवीन पॅटर्ननुसार तंत्रज्ञ श्रेणी-चार यांच्या उपलब्धतेनुसार ५० टक्के पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय तंत्रज्ञ श्रेणीतील एक हजार ९६० जागाही पदोन्नतीने भरण्याचा निर्णय महापारेषण कंपनीने घेतला. महापारेषणच्या प्रकाशगंगा येथील मुख्यालयात बुधवारी प्रकल्प संचालक संचलन गणपत मुंढे, रवींद्र चव्हाण, आकृतीबंध आराखड्याचे माजी अध्यक्ष, माजी संचालक संचालक ओमप्रकाश एम्पाल, कार्यकारी संचालक सूरज वाघमारे, यांच्यासह संघटनेचे सय्यद जहिरोद्दीन, पारेषण संघटनेचे बाबाजी वाकडे, बी. डी. पाटील, अजीज पठाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पदोन्नती आणि पदनिर्मितीबाबतचा निर्णय घेतला.

बैठकीतील निर्णय

- तंत्रज्ञ श्रेणी-चारची चार हजार ३०३ पदे आहेत. त्यापैकी तीन हजार ३६२ कार्यरत आहेत. त्यातील एक हजार ९६० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन तंत्रज्ञ श्रेणी-तीनची पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेतला. यावर संघटनेने दिलेल्या प्रस्तावानुसार; ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व पदोन्नती नाकारालेल्या कर्मचाऱ्यांना आदेश ७४नुसार लाभ काढून घेण्यात येत असतो. हा निर्णय रद्द करावा.

- कंपनीत समान वेतन असणाऱ्या हुद्द्यांचे एकत्रिकरण करण्याचा ठराव मंजूर झाला, परंतु मल्टी स्किल्डप्रमाणे या पदांना प्रशिक्षण दिले जाणार नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या विंगमध्ये बदली केली जाणार नाही. प्रस्तावाप्रमाणे तंत्रज्ञ श्रेणी-एक, यंत्रचालक यांची संख्या ८७४, तंत्रज्ञ श्रेणी-दोन, सहायक यंत्रचालक यांची संख्या एक हजार ५५३ एवढी आहे.

- समान वेतन असणाऱ्या पदांचे एकत्रिकरण केल्यानंतर दोन्ही हुद्यांच्या कामाचे नियम जाहीर करून प्रशिक्षण देण्याचे मान्य केले.

- चिफ फोरमन आणि चिफ ऑपरेटर ही दोन पदे निर्माण करण्याबाबत प्रस्तावित आकृतीबंध आराखडा अंमलबजावणी झाल्यानंतर संघटनेस चर्चेस बोलावण्याचे मान्य करण्यात आले. तंत्रज्ञ-चारची तंत्रज्ञ-तीनमध्ये बढती केल्यानंतर भविष्यात बढती माध्यमानेच ही पदे भरण्यात येतील. त्यासाठी भरती केली जाणार नाही. हे सध्या नवीन आकृतीबंधाप्रमाणे नऊ हजार ४८८ तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे आहेत. त्यापैकी पाच हजार ३२८ कर्मचारी कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीए मार्गदर्शन शिबिर कन्नडमध्ये उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच वाणिज्य मंडळ शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सीए क्षेत्रातील संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सीए रोहन आचलिया, मयर बंब व शशांक तोलवाणी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. एन. भोसले हे होते, तर उपप्राचार्य डॉ. बी. के. मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी श्री. आचलिया यांनी
सीए करताना अभ्यासाचे नियोजन केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सहज यश मिळवता येते. विद्यार्थ्यांनी न्युनगंड काढून टाकावा, असे मत तीनही सीएंनी व्यक्त केले. सीए परीक्षेचा अभ्यास, कोणत्या विषयावर जास्त भर द्यावा, परीक्षेतील वेळेचे नियोजन व प्रश्नाचे स्वरुप यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शीतल गोस्वामी, प्रास्ताविक प्रा. मंगेश जाधव यांनी केले, तर सागर शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. एम. एम. वडगुळे, प्रा. आर. व्ही. अहीरराव यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाला इंग्रजी विभागप्रमुख डॉ. विजय मातकर, प्रा. अशोक भोसीकर, प्रा. धनंजय देशमुख, प्रा. प्रकाश चव्हाण यांच्यासह वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधी खर्च करूनही इंग्रजी बोलणारे कमीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
‘ज्ञान व विज्ञानाने इंग्रजी भाषा ही समृद्ध असून स्वातंत्र्यानंतर कोट्यवधी रुपये खर्च करूनही भारतात अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्यांची प्रचंड वानवा आहे. पण, ताण न घेता सहजपणे इंग्रजी भाषा शिकणे अशक्य नाही,’ असे मत पुणे येथील प्राचार्य डॉ. अशोक थोरात यांनी केली.
भराडी येथील ज्ञान विकास प्राथमिक शाळा व होली फेथ शाळेत आयोजित एक दिवसाच्या कार्यशाळेत ते बोलत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्‍घाटन पिशोर येथील लेखक डॉ. संजय गायकवाड यांनी केले.
‘मानवाच्या जडणघडणीत भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विकास, संस्कृती व भाषा हे अविभाज्य भाग असून जगाला मोहिनी घालनारी इंग्रजी भाषा आत्मसात केली, तर ज्ञानाच्या जगाची सफर सहज साध्य होते. भाषा आत्मसात करायची असेल, तर बाळ जसे नैसर्गिक पद्धतीने भाषा शिकते त्यापद्धतीनेच भाषा शिकावी,’ असे मत डॉ. थोरात यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, संगणक, मोबाइल व इंटरनेटला इंग्रजी भाषेची जोड दिली, तर आपल्या आकांक्षापुढे आकाश ठेंगणे पडेल. या कार्यशाळेत प्रश्नोत्तराचा तास विद्यार्थ्यांची उत्सुकता व कुतूहलाची चुणूक दाखविणारा ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला गुणांसाठी संस्थांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लोककला, चित्रकला, शास्त्रीय कलेत सहभागी विद्यार्थ्यांना दहावीत वाढीव गुण देण्याचा निर्णय झाला आहे. २०१८मध्ये होणाऱ्या परीक्षेत वाढीव गुण देण्यासाठी शासनाने अशा क्षेत्रातील संस्थांची निवड केली आहे. त्याच संस्थांमधील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे गुण दिले जाणार आहे. वाढीव गुणांसाठी राज्यपातळीवर सुसूत्रता आणण्यासाठी अभ्यासक्रम अन् रचना लवकरच स्पष्ट केली जाणार आहे.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेतील विद्यार्थ्यांना हे गुण २०१७ परीक्षेपासून देण्यात येत आहेत. पहिले वर्ष असल्याने प्रस्तावांची गर्दी झाली होती. परीक्षेच्या काही दिवस आधी निर्णय आल्यानंतरही औरंगाबाद विभागातच तब्बल पाच हजार ८० प्रस्ताव आले होते. त्यापैकी पाच हजार २४ जणांना गुणांच्या सवतीचा लाभ मिळाला. प्रक्रियेत सुसूत्रता यावी यासाठी त्या-त्या क्षेत्रांतील संस्थांना वाढीव गुण देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आठ संस्थांचा यात समावेश आहे. त्या-त्या क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात होते. छाननी, तपासणीनंतर ही निवड झाली करण्यात आली. शास्त्रीय गायन, वादन व नृत्य क्षेत्रातील ४९ संस्था, तर लोककला प्रकारातील संस्था ४७ संस्थांचा समावेश आहे. या संस्थांमधील विद्यार्थ्यांना यंदा वाढीव गुण दिले जाणार आहेत.

नियमावली लवकरच
वाढीव गुणांबाबत निकष अाणि नियमावली अद्याप जाहीर करण्यात आली नाही. ती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत निवड केलेल्या संस्थांची बैठक मुंबईत पार पडली. प्रमाणपत्र देताना विद्यार्थी संबंधित क्षेत्रात किती परीक्षा उत्तीर्ण असावा, त्याचे निकष काय असावेत. याची नियमावली असेल. राज्यभरात सुसूत्रतता यावी या हेतूने त्यासाठी खास अभ्यासक्रमाची रचना ही केली जाण्याची शक्यता आहे.

अशी असणार प्रक्रिया
वाढीव गुणांसाठी संस्थांना नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा घ्यावी लागणार. त्यानंतर जानेवारीत हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाईल. शाळेमार्फत मंडळाकडे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मंडळस्तरावर छाननी होईल व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकते या गुणांचा समावेश होणार आहे. ही गुणपत्रिका तीन प्रतींमध्ये असणार आहे.

लोककला, चित्रकलेत अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या संस्थांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेमुळे प्रक्रियेत सुसूत्रता येणार आहे. नियमावलीही लवकरच येईल. त्यामुळे अधिक सुसूत्रता आणि स्पष्टता येईल. ज्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.
- सुनील सुतावणे, गरवारे कम्युनिटी सेंटर, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मावती साडीची महिलांना भुरळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी एक दिवसावर आल्याने कपडा बाजारपेठ गर्दीने फुलली आहे. या हंगामात फॅन्सी वर्कशीट केलेल्या साड्यांसह पद्मवाती साडीने महिलांना भुरळ घातली आहे. नोटंबदी, जीएसटीनंतर कापड उत्पादनात घट झाल्याने एकूणच व्यवसायावर परिणाम झाला आहे.
दिवाळीमध्ये प्रत्येकजण कापड खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. यंदा सुटिंग, शर्टिंग, मेन्सवेअर आजी प्रकारच्या कापड व्यवसाय काहीसा कमी झाला असला तरी, तुलनेत मुलांचे कपडे व साडी खरेदीकडे कल कायम आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा विविध प्रकारच्या साड्यांनी बाजारपेठ काबीज केली आहे. साड्या खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढली आहे. सर्वाधिक मागणी कॅटलॉगमधील साड्यांना आहे. लक्ष्मीपती, महोत्सवी साड्या, एम्ब्रॉयडरी वर्कशीट साड्या, फॅन्सीवर्क साडी, हाफ-हाफ, डिझाइन वर्कसह ब्रँडेड साड्यांना महिलांची पसंती आहे. या साड्यांची किंमत एक हजार रुपयांपासून पाच, सहा हजार रुपयांपर्यंत आहे. पैठणी, काठापदराच्या साड्यांनाही महिलांची पसंती कायम आहे. शहरातील गुलमंडी, शहागंज, टिळकरोड, चौक बाजारसह सिडको-हडको, जालना रोडवरील कापड दुकानात गर्दी आहे.
सणांच्या काळात चित्रपटातील अभिनेत्रीनी वापरलेल्या साड्यांचे आकर्षण असते. दिवाळीत पद्मावती साडी उपलब्ध झाली आहे. ही चित्रपट डिसेंबरमध्ये रिलिज होणार असला तरी दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या साडीने महिलांना भुरळ घातली आहे. या साडीला मागणी आहे.

कापड बाजारावर जीएसटीचा परिणाम थोडाफार आहे. यंदा उत्पादनही कमी आहे. शहराच्या विविध भागातील कापड दुकानांत साड्यांना विशेष मागणी आहे. यंदा पद्मवती चित्रपट आला, पाठोपठा ती साडी दाखल झाली आहे.
-दिलीप चोटलाणी, सचिव, कपडा व्यापारी संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images