Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घाटी हॉस्पिटलमधून मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घाटी हॉस्पिटलमध्ये मामासोबत आलेल्या एका दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न सोमवारी फसला. नागरिकांनी संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दोन वर्षांचा मुलगा मामासोबत सोमवारी सायंकाळी घाटी हॉस्पिटलमध्ये आला होता. मामाने अपघात विभागासमोरील फुटपाथवर एक पिशवी, बॉटल ठेवून तेथे भाच्याला उभे केले होते, त्यावेळी बाजुला असलेल्या काही व्यक्तींनी मुलासोबत बोलण्यास सुरुवात केली, त्याकडे मामाचे दुर्लक्ष केले. मात्र काही वेळानंतर भाचा दिसत नसल्याचे मामाच्या लक्षात आले, शिवाय भाच्यासोबत बोलणारेही तेथे नसल्याने मामाने हाका मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथे गर्दी झाली, दरम्यान एक व्यक्ती गर्दीतून पळताना नागरिकांना दिसला. नागरिकांनी त्याला पकडून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. जमावाने त्याला चोप दिल्यानंतर त्याने दुसऱ्या साथीदारांची माहिती दिली. त्याला घाटीतील सुरक्षारक्षकांनी अधीक्षक कार्यालयात नेवून चौकशी केली. पण तो काहीच सांगत नसल्याने जमावाने पुन्हा चोप देऊन बोलते केले. पळ‍वण्याचा प्रयत्न केलेला भाचा सुरक्षित आहे. तो घाटी परिसरात जागेवरच सापडला. त्याला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात त्याच्या दुसऱ्या साथीदाराला पकडण्यात आले, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. जमावाने दोघांना बेगमपुरा पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोशल मिडियावर पोस्ट; दोन तरुणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
व्हॉट्सअॅप ग्रुपवर धार्मिक भावना दुखावणारा संदेश पोस्ट केल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सम्राट संजयसिंह राजपूत, संतोष बबन गायकवाड व धनंजय शेटे (सर्व रा. वैजापूर) अशी त्यांची नावे आहेत. तिघांपैकी सम्राट राजपूत व संतोष गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे.
सम्राट राजपूत याने रविवारी (१५ ऑक्टोबर) मध्यरात्री त्याच्या मोबाइलवरून एका समाजाच्या भावना दुखावणारा मजकूर अभय पाटील चिकटगावकर मित्रमंडळ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केला. संतोष गायकवाड याने हाच मजकूर दुसऱ्या ग्रुपवर पोस्ट केला. धनंजय शेटे याने हा संदेश लाइक करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संदेशाला प्रोत्साहन दिले, अशी तक्रार शहरातील सुंदळ गणपती भागातील रहिवासी शेख शकिल शेख लाल तांबोळी यांनी दिली पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डांगे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगरच्या फटाका व्यापाऱ्यांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परवागनी नाकारण्यात आलेल्या मुकुंदवाडी व शिवाजीनगर येथील फटाका मार्केटमधील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त विनंती केली. त्यावर आयुक्तांनी उपायुक्तांना पुन्हा एकदा स्थळपाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
शहरात दहा ठिकाणी फटाका मार्केट थाटण्यात येते. पण, गेल्या वर्षी औरंगपुरा येथे घडलेल्या अग्नितांडवानंतर निवासी भागात फटाका विक्रीला बंदी घालण्याचे आदेश हायकोर्टाने शासनाला दिले आहेत. या आदेशानुसार निवासी भागात फटाक्यांच्या दुकानांना परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी फक्त आयोध्यानगरी व वाळूज एमआयडीसी भागातील फटाका मार्केटला परवानगी दिली आहे. इतर ठिकाणी परवानगी मिळत नसल्याने फटाका व्यापारी हवालदिल झाले आहे. या व्यापाऱ्यांनी सोमवारी या व्यापाऱ्यांनी आयुक्त यादव यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यानंतर परवानगीचे संकेत देण्यात आले आहेत. मुकुंदवाडी व शिवाजीनगर भागातील फटाका मार्केटला परवानगी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

जागा बदलली

शिवाजीनगर भागातील फटाका व्यापारी असोसिएशनने नेहमीची जागा बदलून ‌बीड बायपासवरील रेणुकामाता मंदिर कमानीसमोरच्या पटांगणात मार्केटची उभारणी केली असल्याची माहिती नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक प्रक्रियेत गटबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा निवडणूक पक्षपातीपणे सुरू आहे. एका गटाच्या हितासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रदिप जबदे व निवडणूक अधिकारी डॉ. सुनील देशपांडे निवडणूक प्रक्रियेत व मतदारयादीत जाणीवपूर्वक चुका करीत आहेत. या दोघांना यंत्रणेतून बाजूला करून निःपक्ष अधिकारी नियुक्त करा,’ अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची सोमवारी भेट घेऊन चव्हाण यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा निवडणूक वादग्रस्त ठरली आहे. मतदारयादीत महिला मतदार आणि तदर्थ प्राध्यापकांना वगळल्यामुळे प्राध्यापक संघटनांनी कुलगुरूंची भेट घेऊन चर्चा केली. विद्यापीठ विकास मंच, विद्यापीठ उत्कर्ष पॅनेल व ‘बामुक्टो’ संघटनेने सोमवारी कुलगुरूंसमोर कैफियत मांडली. आमदार चव्हाण यांनी कुलगुरूंची भेट घेऊन निवडणूक यंत्रणेचे वाभाडे काढले. विद्यापीठाने निवडणुकीचे नियोजन केले नसल्याची टीका चव्हाण यांनी केली. ‘निवडणूक प्रक्रिया व यादीतील चुका जाणीवपूर्वक आहेत. विशिष्ट गटाच्या सांगण्यावरून निवडणूक अधिकारी डॉ. जबदे व डॉ. देशपांडे त्यांच्या हिताच्या व्यक्तींना मदत करीत असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला. विद्यापीठाच्या निवडणुकीच्या इतिहासात कोणतेही अधिकारी इतक्या पूर्वग्रहदूषितपणे वागले नाहीत. ही निवडणूक निःपक्षपाती व पारदर्शक होण्यासाठी निःपक्ष व्यक्ती नियुक्त करा आणि जबदे व देशपांडे यांना त्वरित निवडणूक यंत्रणेतून बाजूला करा,’ अशी मागणी चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली.

पदवी माहेरच्या नावे असल्याने व पत्ता सासरच्या नावाने असल्याने महिला मतदारांची नावे अपात्र ठरविली. परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याचा पत्ता आधारकार्डावर असलेल्या मतदारांना अपात्र ठरवले. विद्यापीठ निवडणूक अधिनियमातील कोणत्या कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवले, त्याची माहिती द्या, अशी मागणी चव्हाण यांनी केली. निवडणूक प्रक्रियेच्या गलथानपणाबाबत त्यांनी कुलगुरूंवर प्रश्नांचा भडिमार केला. या प्रकारामुळे कुलगुरू काही वेळ निरूत्तर झाले.

दरम्यान, कुलगुरूंची भेट घेतल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. विद्यापीठाच्या गलथानपणामुळे सात हजार महिला मतदार अवैध ठरल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या तक्रारी आल्यानंतर कुलगुरूंची भेट घेतली. एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्यांनी दिले नाही असे चव्हाण म्हणाले. बाहेरील प्राध्यापकाच्या सांगण्यावरून विद्यापीठातील प्राध्यापकांना मतदारयादीतून वगळले आहे. हा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा. अनेक निवृत्त प्राध्यापक अधिकारी पदावर येऊन विद्यापीठाचे वेतन घेत आहेत. हा प्रकार थांबला नाही तर कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. यावेळी डॉ. शिवाजी मदन, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. भारत खैरनार, डॉ. उल्हास शिवूरकर, डॉ. राजेश करपे आदी उपस्थित होते.

‘बामुक्टो’कडून निषेध
तदर्थ प्राध्यापक आणि महिला मतदारांना अवैध ठरवू नये, अशी मागणी ‘बामुक्टो’ने केली होती. ही मागणी मान्य करीत मतदारांना डावलणार नसल्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिले होते. प्रत्यक्षात मागण्या डावलणारे पत्र काढल्यामुळे ‘बामुक्टो’च्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कुलगुरूंची भेट घेऊन विचारणा केली. काही मुद्द्यांवरील चर्चेमुळे तणाव निर्माण झाला. या शिष्टमंडळात डॉ. बप्पासाहेब मस्के, डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. शफी शेख, डॉ. पुरुषोत्तम जुन्ने यांचा समावेश होता. कुलगुरूंच्या भूमिकेचा निषेध करून ‘बामुक्टो’चे पदाधिकारी बाहेर पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेणारा पीआय हाश्मीचा जामीन मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ३५ हजारांची लाच घेणाऱ्या बेगमपुरा पोलिस ठाण्याचा तत्कालीन पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यास ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर नियमित जामीन मंजूर करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी सोमवारी दिले.
अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात हायकोर्टाने बेगमपुरा पोलिसांना फक्त जबाब नोंदवण्याचे आदेश दिलेले असतानाही पोलिस निरीक्षक वसीम हाश्मीने चक्क गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ४० हजारांची मागणी केली होती. तसेच पोलिस ठाण्याच्या केबिनमध्ये सायंकाळी ३५ हजारांची लाच घेताना हाश्मीला १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडण्यात आले होते. हाश्मी याच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १३ ऑक्टोबर रोजी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने रविवारपर्यंत (१५ ऑक्टोबर) पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे सोमवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, हाश्मी याने नियमित जामीन अर्ज दाखल केला असता, त्याला कोर्टाने नियमित जामीन मंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन अपघातात चार मृत्युमुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात रविवारी मध्यरात्री व सोमवारी सायंकाळी झालेल्या दोन अपघातात चार ठार, तर चारजण जखमी झाले. सिडको बसस्टँड चौकात सोमवारी सायंकाळी एसटी बसने चार वाहनांना चिरडले. यामध्ये विद्यार्थी सेनेच्या माजी शहरप्रमुखासह एका मिस्त्रीचा मृत्यू झाला; तसेच बीड रोडवरील भालगावजवळ रविवारी मध्यरात्री ट्रकने कारला चिरडले. यामध्ये भावी डॉक्टरासह एकाचा मृत्यू झाला.

सिडको बसस्टँडमधून सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रवाशांना घेऊन औरंगाबाद-बीड बस बाहेर पडली होती. अवघ्या काही अंतरावर असलेल्या सिग्नलवर बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस समोर असलेल्या वाहनांचा चिरडत पुढे गेली. यामध्ये तीन रिक्षा व एका कारसह बुलेटस्वार बसखाली चिरडले गेले. यामध्ये एका रिक्षा चाकाखाली पूर्णपणे दबली होती. या घटनेत बुलेटवर असलेले चालक संजय जाधव (वय ४६, रा. बेगमपुरा) आणि त्यांच्या पाठीमागे बसलेले बालाजी गणपती डवारे (वय ४२, रा. पिसादेवी रोड) चाकाच्या खाली चिरडून जागीच ठार झाले. अपघातानंतर बसचालक पसार झाला. या घटनेत इतर तीनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जमावाला पांगवत वाहतूक सुरळीत केली.

कारची धडक; दोघांचा मृत्यू
अपघाताची दुसरी ‌घटना रविवारी मध्यरात्री चिकलठाण्यापुढील भालगावजवळ घडली. दिवाळीच्या सुट्यानिमित्त गावाकडे जात असलेल्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात डॉक्टर हरिकिशन दयानंद पाटील (वय ३५, रा. आटरगा, ता. भालकी, जि. बिदर) आणि अमीत युद्धवीर पाटील (३०, रा. मुगाव, ता. निलंगा जि. लातूर ) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा एक मित्र गंभीर जखमी झाला. जखमीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हैसमाळ रस्त्यासाठी ४० कोटी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्याच्या कामांसाठी ४० कोटी रुपये, जटवाडा ते काटशिवरी फाटा रस्त्यासाठी २५ कोटी मंजूर झालेले आहेत. या रस्त्याच्या कामाचे उद्‍घाटन १२ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.
खुलताबाद येथे रविवारी तालुक्यातील तरूण व तरुणींचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर आरित फाउंडेशनचे सीईओ अनिल घुगे, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, माजी सभापती भीमराव खंडागळे, पंचायत समिती सभापती अर्चना अंभोरे, उपसभापती गणेश अधाने, जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड, सुरेश सोनवणे, हिंदवी खंडागळे, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, माजी उपसभापती दिनेश अंभोरे हे होते. या निमित्त दहा नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार करण्यात आला. शिवाय उज्ज्वल योजनेतून गॅस कनेक्शन वाटप, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व शेती अवजारे वाटप करण्यात आले.
पुढे बोलतांना आमदार बंब म्हणाले, २०१९ पर्यंत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. शेवटच्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. खुलताबाद येथे बचतगट भवन उभारणार असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. खुलताबाद, सुलीभंजन, वेरूळ, म्हैसमाळ पर्यटन विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हेवा वाटेल असा पर्यटन विकास साधणार आहे, असे आमदार यांनी सांगितले. आमदार बंब यांनी नवनिर्वाचित सरपंचांना कानमंत्र दिला. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांनी भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभार करावा, महिला सरपंचांच्या पतींनी कामकाजात हस्तक्षेप करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

सांस्कृतिक सभागृहाचे भूमीपूजन

नगर पालिकेच्या सांस्कृतिक सभागृहाचे भूमीपूजन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले. या कामावर ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. यावेळी नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दिन, नगरसेवक अविनाश कुलकर्णी, योगेश बारगळ, परसराम बारगळ आदी नगरसेवक, मुख्याधिकारी मोहनलाल हरणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतापूरच्या पिण्याच्या पाण्यात सांडपाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यातील शिवना-टाकळी प्रकल्पासाठी विस्थापित गाव अंतापूर येथील पाणीपुरवठाच्या विहिरीत सांडपाणी पाझरत आहे. त्यामुळे गावचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही परिस्थिती सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे काम पूर्ण न झाल्याने निर्माण झाली आहे. नाल्यांचे काम पूर्ण न झाल्याने शेतातून आलेले पावसाचे पाणी नाल्यांमधून वाहत घरांशेजारी तुंबत आहे.
आलापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेली गावे अंतापूर, अालापूर, केसापूर, या गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. लघु पाटबंधारे विभागातर्फे पुनर्वसित गावांमध्ये पूर्ण सुविधा दिल्याचे भासवून त्या २०११ मध्ये ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करण्यात आल्या. पण या गावामध्ये द्यावयाच्या १८ प्रकाराच्या सोयीसुविधामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. त्याचा ग्रामस्थ व ग्रामपंचायती प्रशासनाला त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत पूर्नवसन उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांच्यासोबतची बैठकही निष्फळ ठरली. प्रामुख्याने गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, स्वच्छ पाणीपुरवठा, वीज, रस्त्यांचे डांबरीकरण, सर्व समाजाच्या स्मशानभूमी, अलापूर ग्रामपंचायत इमारत, अनेक प्रकल्पग्रस्तांना भूखंड न मिळणे, मिळालेल्या भूखंडाच्या सीमेवरून होणारे वाद आदी तीव्र समस्या आहेत, असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे मत आहे. या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु, याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आहे. परिणामी, अंतापूर येथील ग्रामस्थाने भूखंडावर पाणी तुबंते म्हणून पाणी काढण्यासाठी उपसरपंच मोनिका सुनिल बोडखे यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रर्यत्न केला होता. शिवना-टाकळी प्रकल्पाने बाधित झालेल्या पाच गावांना लघु पाटबंधारे विभागांकडून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतर करण्याचा प्रश्न सुमारे बारा वर्षांपासून रखडला आहे. प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना, स्थानिक पदाधिकाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लघु पाटबंधारे विभाग व पूनर्वसन विभागाने पूर्ण केलेली कामे दाखवावी किंवा तत्कालील ग्रामपंचायतकडे कामे हस्तांतर केलेल्या अधिकारी व तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
‘आलापूर गुप ग्रामपंचायत अंतर्गत केसापूर, अंतापूर व आलापूर गावांचे प्रश्न प्रलंबित आहेत. यावर अनेक बैठकाही झाल्या. ही कामे मार्च २०१७पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन पुनर्वसन उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनी एक वर्षांपूर्वी दिले होते. परंतु, अद्याप कोणतीही कामे झालेली नाहीत. त्यामुळे आमच्याकडे उपोषण करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही,’ अशी माहिती आलापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच हिराबाई रवींद्र हार्दे यांनी दिली. या गावांमधील भूखंडाची अंतिम यादी व १८ प्रकारच्या सुविधांबाबत प्रश्न तीव्र आहेत, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघात पाहणारे हादरले; हळहळ आणि संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दररोजच्या रुटीननुसार वाहनधारक दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सिडको बसस्टँड चौकात सिग्नलवर थांबले होते. यावेळी सिडको बसस्टँडमधून काळाच्या रुपात औरंगाबाद-बीड बस बाहेर पडली. बसने वळण घेतल्यानंतर ब्रेकफेल असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. काही समजण्याच्या आत या बसने चार रिक्षा, एक बुलेटस्वार व एका कारला चिरडले. यामध्ये दोघेजण जागीच ठार झाले. या थरारक घटनेमुळे अनेक प्रत्यक्षदर्शी हादरून गेले.
सिडको बसस्टँड चौक हा वर्दळीचा चौक असून बसने धडक दिल्याचा मोठा आवाज आल्याने त्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. बसच्या समोरच बुलेटवर कंत्राटदार संजय जाधव व मिस्त्री बालाजी डवारे होते. त्यांना बसने चिरडले. त्यानंतर दोन रिक्षाला उडवत बसने एका रिक्षाला फरफटत नेले. या सिग्नलच्या बाजुलाच काही रिक्षाचालक उभे होते. या घटनेने ते हादरून गेले. हा अपघात होताच अनेक जण येथून पळून गेले. येथे वाहतूक शाखेचे कर्मचारी इंगळे व त्यांचे सहकारी वाहतूक नियमन करत होते. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत ‌रिक्षाला चिरडून ट्रॅफीक सिग्नलच्या खांबाला धडक देऊन बस थांबली. बसच्या चाकाखाली आलेल्या डवारेचे डोके‌ चिरडल्याने मेंदूचे अवशेष रस्त्यावर विखूरले गेले होते. या अपघातात संजय दशरथ सिरसाठ (रा. जयभवानीनगर) व रेवनाथ भागीनाथ नरोडे (रा. चिकलठाणा) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
गजानन चौकात गस्त घालणारे सिडको वाहतूक शाखेचे पोलिस‌ निरीक्षक हनुमंत गिरमे हे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवले. डवारे यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. वाहतूक शाखेचे एसीपी सी. डी. शेवगण, सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाले, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर येथे हजारोंचा जमाव जमला होता. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी काही मिनिटात वाहतूक सुरळीत करत क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटवली.

हॉस्पिटलमध्ये गर्दी

संजय जाधव हे शिवसेनेचे माजी कार्यकर्ते व पदाधिकारी होते. त्यांच्या अपघाताची बातमी कळताच सिडको एन चार भागातील खासगी हॉस्पिटलमध्ये हितचिंतक व नातेवाईकांनी गर्दी केली. त्यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतर तेथेही शिवसेनेचे पदाधिकारी, तरुणांनी गर्दी केली. त्यांचे पोस्टमार्टम सोमवारी सायंकाळी करण्यात आले.

चौकशी समिती नियुक्त

सिडको चौकात घडलेल्या अपघात वाईट आहे. अपघातानंतर संबंधित ड्रायव्हरवर योग्य ती कारवाई होणारच आहे. ब्रेक निकामी होणे किंवा अन्य कारणे सांगितली जात आहेत. पण, त्याची सत्यता पडतळण्यासाठी यंत्रचालन अभियंता लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती दोन ते तीन दिवसांत अहवाल सादर करेल. समितीच्या अहवालानुसार तांत्रिक दोष असेल तर संबंधितांवरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक रा. ना. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज धनत्रयोदशी; सराफा बाजारपेठ सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धनत्रयोदशीनिमित्त मनमोहक पणत्या, तोरण, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा आणि आरास याने शहरातील अनेक भागातील घरे व दुकाने सजली आहेत. वैद्यकीय सेवा देणाऱ्यांनी धन्वंतरीची, तर काही व्यापाऱ्यांनी कुबेर पूजनाची तयारी केली आहे. दरम्यान, धनत्रयोदशीनिमित्त सोने खरेदी करण्यात येते. त्यानिमित्त सराफा बाजारपेठ सज्ज झाली आहे.
धनत्रयोदशीनिमित्त घरातील धन धान्य आणि धन्वंतरी पूजन करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी व्यापारी नवीन वर्षाची वही खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या पूजेसाठी सोमवारी फूल बाजारात शेवंती आणि झेंडुच्या फुलांना मागणी होती. सध्या बाजारात फुलांचे भाव २०० रुपये किलोपर्यंत आहेत. दीपपूजनासाठी पणत्या, दिवे यांची दुकाने सोमवारी सजविण्यात आली. बाजारपेठांतून विष्णू, कुबेर, लक्ष्मी, गणेशनाग या देवतांच्या प्रतिमांना मागणी होती. कर्मचाऱ्यांच्या हाती आलेला बोनस व अग्रीम यामुळे विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे.

आभुषणांना मागणी

सोने खरेदीत प्रामुख्याने चिंचपेटी, ठुशी, तन्मणी, कंठा, राणीहार, बाजूबंद, जोंधळी हार, तोडे यांना मागणी राहण्याचा अंदाज आहे. या दागिन्यांसह राजस्थानी परंपरेतील कुंदन वर्कची ज्वेलरी, साउथ इंडियन ज्वेलरींना मागणी आहे. हे सर्व दागिने लाइटवेटमध्ये उपलब्ध आहेत. मंगळसूत्रांमध्ये नवनवीन प्रकार उपलब्ध आहेत. सध्या खडा व हिऱ्याच्या अंगठ्यांची क्रेझ आहे. शुद्ध सोने खरेदीकडेही नागरिकांचा कल आहे. भेट देण्यासाठी देवदेवतांची चित्रे असलेल्या सोने-चांदीच्या नाण्यांना चांगली मागणी राहील, अपेक्षा सराफा व्यापाऱ्यांना आहे. सध्या सोने प्रति तोळा २९ हजार ४०० रुपये व चांदी ४२ हजार रुपये प्रति किलो, असा भाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी ७५ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी ७५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी दुपारी ३.३० पर्यंत सरासरी ६६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर उर्वरित दोन तासात मतदानासाठी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने सरासरी ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली. जिल्ह्याती १६५ ग्रामपंचयातीसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी ४ ग्रामपंचयाती बिनविरोध निघाल्याने १६१ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. किरकोळ बाचा-बाचीत प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ग्रामपंचायतीसाठी पहिल्यांदाच सरपंच पदाची निवडणूक जनतेतून होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ४४, उमरगा तालुक्यातील ४७, लोहारा तालुक्यातील १३, उमरगा २०, कळंब ३०, वाशी ४, भूम २, परंडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आली माझ्या घरी ही दिवाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूपाळी, अभंग, भावगीत, प्रार्थना, युगूलगीत, लावणी, सूफी रचना अशा वैविध्यपूर्ण सुश्राव्य संगीत प्रकाराने दिवाळी पहाट कार्यक्रम श्रवणीय ठरला. प्रत्येक गीताच्या सादरीकरणात उत्कटता जपत गायकांनी रसिकांचा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित केला.

रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद यांच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम घेण्यात आला. हॉटेल किज येथे सोमवारी सकाळी सहा वाजता ही संगीत मैफल रंगली. ‘सूरताल ग्रुप’च्या कलाकारांनी बहारदार गाणी सादर करून पहाट श्रवणीय केली. ‘उठी उठी गोपाळा’ भूपाळीने गायक नीरज वैद्य यांनी मैफलीला सुरुवात केली. ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ या अभंगातून नीरज यांनी रसिकांना आध्यात्मिक अनुभूती दिली. मृणालिनी वहाने यांनी ‘गगन सदन तेजोमय’ प्रार्थना सादर केली. ‘मलमली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे’ या सदाबहार गीताला रसिकांचा उत्तम प्रतिसाद
मिळाला. दिवाळी सणाचे औचित्य साधणारे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ गीत संगीता भावसार यांनी गायले. नीरज वैद्य यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने मैफल लक्षवेधी ठरली. ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘मैं शायर तो नही’, ‘माझे जीवनगाणे’, ‘मोरे सैय्या’ अशी गाण्यांची शृंखला रसिकांना विशेष आनंद देऊन गेली. ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’, ‘शुक्रतारा’, ‘धुंदीत गाऊ मस्तीत राहू’, ‘बाबूजी धिरे चलना’, ‘नका सोडून जाऊ रंगमहाल’ या लोकप्रिय गाण्यांनी दिवाळी पहाट उत्तरोत्तर रंगत गेली. नीरज यांच्या ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’, ‘लागा चुनरी में दाग’ या गीतांच्या भैरवीने
सांगता झाली. संगीत साथसंगत जीवन कुलकर्णी, राजेश देहाडे, राजेश भावसार, समीर पाटील यांनी केली. मैफलीचे निवेदन विनय याडकीकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ औरंगाबादचे अध्यक्ष नरेंद्र खंडेलवाल यांनी केले आणि दीपक पवार यांनी आभार मानले. यावेळी अमित वैद्य, मिलिंद सेवलीकर, सुहास वैद्य, प्रफुल्ल मिरजगावर, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे ‘मीडिया पार्टनर’ ‘महाराष्ट्र टाइम्स’ होते.

व्यापक उपक्रम
रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद ६३ वर्षे जुनी संस्था असून सातत्याने सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवत असते. दरवर्षी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता. यावर्षीपासून उपक्रमात बदल करून ‘दिवाळी पहाट’ उपक्रम सुरू करण्यात आला. पुढील वर्षी नामवंत कलाकारांना निमंत्रित करून मोठा कार्यक्रम घेण्यात येईल असे ‘रोटरी’चे पदाधिकारी दीपक पवार यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पालिकेच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू असताना एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी सय्यद मतीन व जफर बिल्डर यांचे नगरसेवकपद महापौरांनी कायमचे रद्द केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.

पाणी प्रश्नावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू होती. काही वसाहतींमध्ये पाच - सहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे संपूर्ण शहरात समान पाणीवाटप करा, अशी मागणी एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी, विरोधीपक्षनेता फेरोज खान, जमीर कादरी, समीना शेख यांनी लावून धरली. काँग्रेसचे अफसर खान यांनीही समान पाणीवाटपाची मागणी केली. भाजपचे शिवाजी दांडगे, मनीषा मुंडे, शिवसेनेच्या सीमा खरात, सीताराम सुरे आदींनी पाण्याचा प्रश्न मांडला व यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी केली. शिवसेनेचे राजू वैद्य यांनी पाणीपट्टी वसुलीच्या तुलनेत पाणीपुरवठा करा, अशी मागणी केली. ज्या वॉर्डात जास्त वसुली होते, त्या वॉर्डात जास्त पाणीपुरवठा करा, असे ते म्हणाले. भाजपचे राजगौरव वानखेडे यांनी या मागणीला पाठिंबा दिला. एमआयएमचे नगरसेवक मात्र त्याविरोधात होते. समान पाणीपुरवठा करा, या मागणीवर ते ठाम होते. हीच मागणी घेवून एमआयएमचे नगरसेवक महापौर भगवान घडमोडे यांच्या डायससमोर जमा झाले. सय्यद मतीन, आजीम यासह काही जणांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. राजदंडाच्या संरक्षणासाठी सुरक्षारक्षक धावले. सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणारे बाबू जाधव यांनी राजदंड धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना अजीम यांनी हाताने ढकलले. त्यामुळे जाधव खाली पडले. त्यांच्या डोक्यावरची टोपीही पडली. खाली वाकून टोपी घेत असताना मतीन यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकारामुळे महापौरांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली.

दरम्यानच्या काळात जफर बिल्डर यांनी सभागृहात कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी देण्यात आलेली प्लास्टिकची खूर्ची उचलली आणि जाधव यांच्या दिशेने भिरकावली. तोपर्यंत अन्य कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी जाधव यांना महापौरांच्या अँटीचेंबरमध्ये नेले. त्यामुळे जफर बिल्डर यांनी फेकलेली खुर्ची अँटीचेंबरच्या दारात उभे असलेल्या महापौरांना लागली. जफर बिल्डर यांनी लगोलग दुसरी खुर्ची फेकून मारली.

या प्रकारामुळे महापौर भगवान घडमोडे संतापले. तहकूब केलेली सर्वसाधारण सभा त्यांनी लगेचच सुरू केली. सय्यद मतीन व जफर बिल्डर या दोघांचेही नगरसेवकपद कायम स्वरूपी रद्द केल्याची घोषणा त्यांनी केली. या दोन्ही नगरसेवकांच्या सभागृहातील वर्तनाचा अहवाल शासनाला पाठवा आणि पोलिसात तक्रार देवून गुन्हा दाखल करा, असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले. त्यानंतर सभागृहात पोलिसांना पाचारण करण्यात आले. सय्यद मतीन, जफर बिल्डर यांना पोलिस सभागृहाबाहेर घेवून गेले.

वंदेमातरम् प्रकरणी झाले होते निलंबित
दोन महिन्यापूर्वी वंदेमातरमवरून पालिकेच्या सभेत सय्यद मतीन व जफर बिल्डर यांनीच गोंधळ घातला होता. तेव्हाही त्यांच्याविरुध्द एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

महापौरांना पोलिस संरक्षण
सर्वसाधारण सभा सुरू असतानाच एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील महापालिकेत आले. विरोधीपक्षनेता फेरोज खान यांच्या दालनात त्यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. सर्वसाधारण सभा संपल्यावर ते महापौर भगवान घडमोडे यांनाही भेटले. त्या दोन नगरसेवकांवरची कारवाई रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पालिकेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शीघ्र कृती दलाचे जवान देखील उपस्थित होते. घडमोडे मात्र घेतलेल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे त्यांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला. त्यांच्या गाडीच्या पुढे आणि मागे पोलिसांच्या गाड्या ठेवण्यात आल्या. महापौर बंगल्यालाही पोलिस संरक्षण देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रंथालयाच्या समस्या साोड‌विण्‍ाार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून या संदर्भात दिवाळीनंतर राज्य संघाचे पदाधिकारी यांची मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे अश्वासन राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५४ व्या अधिवेशनाचे अनोपचारिक उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला आले नाहीत. त्यामुळे त्यांनी पाठवलेल्या संदेशाचे पालकमंत्र्यांनी वाचन केले.
ग्रंथालय संघाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आणि इतर मागण्या बाबत दिवाळी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत एक तासाची बैठक घेण्यात येईल त्यास मुख्यमंत्र्यानीही मान्यता दिली असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, ‘लातूरचा एक कार्यकर्ता म्हणून मी नियोजित बैठक होण्यासाठी, त्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठीची सर्व जबाबादारी मी घेत आहे.’
उदघाटन समारंभाला काँग्रेसचे आमदार, महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी मार्मिक टीका केली. ग्रंथाला जात धर्म पक्ष नसतो आणि ही लातूरची संस्कृती नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लातूरच्या व्यापाऱ्यांचा एलबीटीचा प्रश्न सोडवल्याबद्दल व्यापारी महासंघाचे पदाधिकारी मनीष बंडेवार, प्रदीप सोळंकी आदींनी पालक मंत्र्यांचा सत्कार केला.
अधिवेशनाचे संयोजक अॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी राज्यातील ग्रंथालया समोरील समस्याचा आढावा घेतला. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अशोकराव कुकडे यांनी राज्य सरकारने ग्रंथालय कर्मचाऱ्यांची अस्वस्था कमी करण्यासाठी तातडीने बैठक घेऊन निर्णय करण्याचे आवाहन केले.
यावेळी महापौर सुरेश पवार यांनी स्वागतपर भाषण केले. माजी खासदार डॉ. जनार्धन वाघमारे, माजी आमदार गंगाधर पटणे, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जी. श्रीकांत, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, सहायक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, लातूर मनपाचे पदाधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. काँग्रेसचे पदाधिकारी मात्र पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. सी. पाटील यांनी तर आभार रामचंद्र तिरुके यांनी मानले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे, सुनील हुसे, विजय शिंदे, नंदू बनसोड, गुंगे, डॉ. बालेकर, राज्य ग्रंथालय संघाचे मनोज गोगटे, जिल्हा - विभाग ग्रंथालय संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपुत्रांकडूनच ग्रंथालय क्षेत्राला न्याय
प्रास्ताविकात अॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी लातूरच्या भूमिपुत्रांकडूनच ग्रंथालय क्षेत्राला न्याय मिळत गेला असल्याचे सांगताना दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदावर असताना एकदा व तत्पूर्वी तीनदा एकूण चार वेळा सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात दुप्पटीने वाढ केली होती. विलासराव देशमुखांचे ग्रंथालय क्षेत्रासाठीचे योगदान कायम स्मरणात राहणारे असेच राहिले आहे. युती सरकारच्या काळात लातूर जिल्हा कर्मभूमी राहिलेले स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी ग्रंथालयाचे अनुदान दुप्पट केले होते. आज होत असलेल्या या राज्यस्तरीय अधिवेशनात मुखमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सरकारचे प्रतिनिधित्व करत असलेले पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर हेही लातूरचेच भूमिपुत्र आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रंथालय क्षेत्राला न्याय लातूरच्य्या भूमिपुत्रांकडूनच मिळणार असल्याचे सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वीडन’समोर मराठवाड्याचे मार्केटिंग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जगाच्या पाठीवर कुठेही नाही इतके कुशल मनुष्यबळ भारतात आहे. त्यातही महाराष्ट्रतील मराठवाड्यात सर्वा‌धिक कुशलता आहे. यामुळे या मराठवाड्याचे एकूण मार्केटिंग स्वीडनसमोर झाले आहे. भविष्यात त्याचा फायदा होऊन उद्योगाचा विकास आणि प्रगती नक्कीच होईल,’ असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी व्यक्त केला.

शेंद्रा औद्योगिक वसाहतीत चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्र‌िज अँड अ‍ॅग्र‌िकल्चर (सीएमआयए)च्या वतीने आयोजित देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, सुरेश तोडकर, संजीव केसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे उपस्थित होते.

देसाई म्हणाले, ‘व्हेंडर एकोसिस्टीम विकसित करून नवी ओळख निर्माण करणारी औरंगाबादसारखी औद्योगिक वसाहत कुठेही नाही. प्रत्यक्ष मेहनत घेणारे उद्योजक, उद्योग-व्यवसायासाठी अनुकूल वातावरण येथे आहे. येथे उद्योगवाढीसाठी स्वीडनमधील कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. मराठवाड्याची पुरेपुर मार्केटिंग त्यांच्यासमोर झाली आहे. सीड पार्क तयार करण्यासाठी सरकारने जालना येथे पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद आणि लगतच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये एकोसिस्टिम आणि व्हेंडरची यंत्रणा उत्तमरितीने विकसित झाली आहे. येथील विकास पाहून मोठ्या उद्योगांना नक्कीच यावेसे वाटेल. स्वीडन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात दोघांनी मराठवाड्यासाठी पुरेपुर मार्केटिंग केली आहे. स्वीडनमधील उद्योजकांच्या एक हजार कंपन्या भारतात आहेत. त्यातील ४०० उद्योग महाराष्ट्रात आहेत. यातील बहुतांश जणांना उद्योग व्यवसायाचा विस्तार करायचा आहे. तूर्तास कोणत्या कंपन्या विस्तार करतील हे सांगणे योग्य ठरणार नाही, परंतु त्या कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. त्याचा संपूर्ण आराखडा आणि पाठपुरावा करून तो मार्गी लावणार आहोत. आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अपरिहार्य होणार आहे. ई वाहनांच्या संशोधनात सध्या कंपन्यांनी मोठे संशोधन केले आहे, त्यांची संपूर्ण ताकद लावली आहे. या वाहनांसाठी लागत असलेल्या सुट्या भागांसाठी ऑटो उद्योगात आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगाला मोठी संधी आहे. येथील उद्योजक ऑटो क्लस्टरप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरही यशस्वी करतील. इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर हे मेक इन इंडियाचा भाग आहे,’ असे ते म्हणाले.

कामगार हितांच्या योजना राबवाव्यात
विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले, ‘शेती मालावरील उद्योग यावेत, सौर ऊर्जेठी लागणारी किट, प्लेट यांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांची गरज आहे. कामगारांच्या हितासाठी अटल पेन्शन आणि विमा योजना उद्योजकांनी सक्तीने राबवायला हव्यात,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘औरंगाबादमध्ये किया मोटर्ससारखे उद्योग यायला हवेत. त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू,’ असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विस्कळीत पाणीपुरवठ्याची चौकशी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात विस्कळित झालेल्या पाणीपुरवठ्याची चौकशी करा. योग्य प्रकारे पुरवठा व्हावा या दृष्टीने नियोजन करा, असे आदेश महापौर भगवान घडमोडे यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले.

सभेत नगरसेवकांनी पाणीप्रश्न उपस्थित केला. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ म्हणाले, जायकवाडीहून पुरेसे पाणी येत नसेल तर शहराला पाणी कसे मिळणार ? जलवाहिन्यांची स्थिती कशी आहे, हे एकदा सभागृहाला कळू द्या. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल म्हणाले, रविवारी जायकवाडी येथील वीज पुरवठा चार तास खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित झाले. जलवाहिन्यांची स्थिती नाजूक आहे. जलवाहिन्यांना वेल्डिंग करून पाणीपुरवठा केला जात आहे. समांतर जलवाहिनीचे काम करण्याबद्दल शासनाकडून परवानगी मिळाली तरच काम सुरू करता येणे शक्य आहे. सिडको - हडको भागासाठी रोज ५५ ते ६० एमएलडी पाणीपुरवठा होतो, असा उल्लेख त्यांनी केला. शिवसेनेचे सीताराम सुरे यांनी त्याला आक्षेप घेतला. सिडको - हडको भागात ३० ते ३५ एमएलडी पाणीपुरवठाच होतो, सभागृहात चुकीची माहिती देऊ नका असे ते म्हणाले. भाजपचे दिलीप थोरात म्हणाले, पाणीप्रश्नाबद्दल खूप वेळा चर्चा झाली आहे. परंतु या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन विचार होत नाही. जास्तीत जास्त प्रश्न वीज पुरवठा खंडित झाल्यामुळेच निर्माण झाला आहे. यावर महापौर भगवान घडमोडे म्हणाले, विद्युत पुरवठा विशिष्ट वसाहतींसाठीच खंडित होतो का ? विस्कळित होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल अनेक दिवसांपासून नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. पालिकेचे प्रशासन काय करते, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे रेणुकादास (राजू) वैद्य म्हणाले, समांतर जलवाहिनीचे काम होईपर्यंत योग्य प्रकारे पाणीपुरवठा होणार नाही. या योजनेचे काम सुरू होण्यासाठी प्रशासनाने काय केले याची माहिती द्या. भाजपचे राजू शिंदे म्हणाले, विस्कळित पाणीपुरवठ्यासाठी दरवेळी वीज पुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगितले जाते. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी काय केले याचा खुलासा झाला पाहिजे. लाइनमन उद्यापासून संपावर जाणार आहेत. सुटीच्या दिवशी काम केल्याचा १०५ दिवसांचा पगार त्यांना मिळाला नाही. त्यांच्या पगाराचे काय केले, असा प्रश्नही शिंदे यांनी विचारला. चहेल म्हणाले, लाइनमनच्या पगाराची फाइल पुढील कारवाईसाठी लेखा विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. या उत्तरामुळे राजू शिंदे संतापले. ते म्हणाले, इतके दिवस फाइल लेखा विभागाला का पाठवली नाही. महापौरांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी सूचना त्यांनी केली.

माधुरी दीक्षित पाण्याच्या टाकीवर!
विस्कळित झालेल्या पाणीपुरवठ्याबद्दल नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल गोंधळले. गोंधळलेल्या परिस्थितीच ते म्हणाले, रविवारी सिडको एन पाच येथील पाण्याच्या टाकीवर माधुरी दीक्षित आल्या होत्या. त्यांच्याबरोबर नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. चहेल यांनी माधुरी दीक्षित असा उल्लेख केला आणि सभागृहात हशा पिकला. रविवारी पाण्याच्या टाकीवर नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत नागरिकांसह गेल्या होत्या. त्यांनी चहेल यांना जाब विचारला होता. चहेल यांनी आदवंत यांच्या ऐवजी दीक्षित असा उल्लेख केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेसाठी सोडले हेलिकॉप्टर

$
0
0

सुरेश कुलकर्णी, जालना
शेतकरी आणि शेती हाच या राज्यांमध्ये आमच्या सरकारच्या सर्वाधिक प्राधान्याचा विषय आहे. देवळेगव्हाणच्या या आदर्श गटशेतीच्या मॉडेलचा संपूर्ण महाराष्ट्रात सरकारच्यावतीने पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी देवळेगव्हाण ( ता . जाफ्राबाद) येथे सांगितले. मुख्यमंत्री गटशेतीच्या प्रकल्पाच्या विविध शेतातील पिकांची, शेततळ्यांची आणि जलसंधारणाच्या कामांची पाहणी आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात इतके रमले की सायंकाळचा अंधार पडायला लागला आणि त्यांनी औरंगाबादला परतीच्या प्रवासासाठीचे त्यांचे हेलिकॉप्टर देवळेगव्हाणलाच सोडून दिले. सायंकाळी सात वाजता ते देवळेगव्हाणहून निघून रस्त्याने राजूर जालना औरंगाबादच्या दिशेने गेले.
सोमवारचा साधारणपणे संपूर्ण दिवस मुख्यमंत्री जालना जिल्ह्यात होते. कृषीभूषण विजयअण्णा बोराडे यांनी विकसित केलेल्या कडवंची या आदर्श पाणलोट क्षेत्राची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा फडणवीस यांचा हा सहावा दौरा होता. तीन वर्षात मुख्यमंत्री या नात्याने सहावेळा येण्याचा त्यांचा एक वेगळा विक्रम झाला. जाफ्रराबाद तालुक्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन वर्षात सोमवारी दिलेली दुसरी भेट होती. भगवानराव कापसे यांच्या नेतृत्वाखालील गटशेतीच्या उपक्रमातील सहभागी शेतकरी दर महिन्याच्या व्दादशीला एकत्र येतात. याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्यासोबत सोमवारी भेटीचा मुहूर्त साधून द्वादशी सोडली.
कडवंची, जालना आणि देवळेगव्हाण या तिन्ही कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांची भाषणे शेतीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामाची शेतकऱ्यांना माहिती देणारी होती.
जालन्यातील राजकारणात खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी राबवलेल्या विकास आघाडीच्या संमेलनात मुख्यमंत्री सहभागी झाले. यापूर्वीच्या पहिल्या संमेलनात सर्वपक्षीय नेते फिरकले नव्हते. सिमेंटच्या रस्त्याच्या भूमीपूजन समारंभात खासदार दानवे एकटेच होते. आता मात्र याच सिमेंटच्या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात आणि त्याला जोडून घेतलेल्या विकास परिषदेत त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले. जालन्याच्या विकासाच्या योजनेच्या चर्चा व्यासपीठावरून सगळ्यांनी एकसुरात केल्या हे विशेष असले तरी प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील राजकारणात जिल्हा परिषद, नगर परिषदा, पंचायत समित्या आणि जिल्हा बँक या संस्थेच्या कामकाजात याच नेत्यांच्या परस्परांना छेद देत असलेल्या भूमिका जिल्ह्याच्या मागासपणाला भरीव मदत करणाऱ्या असतात हे वास्तव आहे. जालना नगर परिषद आणि जिल्हा परिषद केवळ अंतर्गत गटबाजीच्या खेळातून हातातून घालवण्याचे राजकारण भाजपाच्या प्रगतीपथावरील मोठा अडथळा निर्माण करणारे सिद्ध झाले असताना विकास परिषदेच्या माध्यमातून सगळ्या बदलेल्या वातावरणात सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी, काँग्रेससह शिवसेना व भाजपचे नेते एकत्र एका व्यासपीठावर उपस्थित दिसतात हे जालन्यातील एक क्वचित प्रसंगी दिसणारे चित्र सोमवारी दिसले.
फडणवीस सरकारच्या कारभाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. जालना जिल्ह्याला पहील्यांदा भरभरून जे काही मिळाले आहे, ते खरोखरच आजपर्यंतच्या एकाही सरकारच्या काळात मिळाले नाही. ही वस्तुस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या जबाबदारीत आता मोठी वाढ झालेली आहे. ड्रायपोर्ट, सीडपार्क, डीएमआयसी, आयसीटीच्या उभारणीच्या कामाला गती येण्यासाठी राजकीय मतभेद विसरून चालावे लागणार आहे. सोमवारच्या कार्यक्रमात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी खासदार रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. ही एक चांगली घटना घडली आहे. हे सगळे वातावरण सकारात्मक राहिले तरच जालन्याच्या प्रगतीला चालना मिळेल. अन्यथा निव्वळ व्यापारी व धंद्यात नफा नुकसान बघणारे जालनेकर ज्यांचे मुख्यमंत्र्यांनी भले मोठे कौतुक केले ते सगळे मागास राहण्यातच समाधान मानणारे लोक आहेत हेच वास्तव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला लोकशाही दिनाचा फार्स

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा महिला व बालविकास विभागाचा महिला लोकशाही दिन केवळ फार्स ठरला असून, सोमवारी एकही तक्रार आली नाही. विधी सल्लागार, समाजकल्याण अधिकाऱ्यांनी दांडी मारली, तर पोलिसांनी अधिकाऱ्यांना न पाठवता लिपीक पाठवला. कहर म्हणजे लोकशाही दिन नियोजित वेळेपेक्षा सव्वातास उशीरा सुरू झाल्याने प्रलंबित प्रकरणातील तक्रारकर्त्यांवरही संतापून हात चोळत बसायची वेळ आली.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भूसंपादन अधिकारी मंजूषा मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या लोकशाही दिनाला जिल्हा परिविक्षा अधिकारी विजय देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम उपस्थित होते. गेल्या महिन्याप्रमाणे यंदाही विभागाला एकही नवी तक्रार मिळाली नाही, तर प्रलंबित प्रकरणांमध्ये संबंधित विभाग ना उपस्थित राहतात ना अहवाल पाठवतात. त्यामुळे तक्रारकर्तेही कंटाळून जातात. या लोकशाही दिनात पुन्हा प्रलंबित प्रकरणांचाच आढावा घेण्यात आला. चार-चार महिन्यांपासून तक्रारी निकाली नसल्याचे यावेळी पहायला मिळाले. एका लोकशाही दिनी तक्रार प्राप्त झाल्यावर दुसऱ्या लोकशाही दिनी संबंधित विभागास अहवालासह प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते, मात्र या लोकशाही दिनीही ना लेखी अहवाल मिळाले ना संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोकशाही दिन नियोजित वेळापेक्षा एक तास उशीरा सुरू झाल्याने तक्रारकर्ते चिडले होते. महिला व बालविकास विभागाचे विधी सल्लागार, समाजकल्याण अधिकारी अनुपस्थित होते, तर पोलिसांनी अधिकाऱ्यांना न पाठवता लिपीक पाठवले. लोकशाही दिनाविषयी जनजागृती न होणे आणि दिलेल्या तक्रारींना गती नसल्याचा फटका लोकशाही दिनास बसला आहे. यावेळी वरिष्ठ संरक्षण अधिकारी नीलेश दहीकर, ए. पी. जोशी उपस्थित होते.

विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारी
मार्च २०१७ - २
एप्रिल २०१७ - ५
मे २०१७ - ३
जून २०१७ - २
जुलै २०१७ - ७
ऑगस्ट २०१७ - ३
सप्टेंबर २०१७ - ०
ऑक्टोबर २०१७ - ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘तीन दिवसीय अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन येत्या तीन ते पाच नोव्हेंबरदरम्यान पनवेल येथे होणार आहे,’ अशी माहिती मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. मिन्ने म्हणाले, ‘नियोजित संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विख्यात मराठी स्त्री गझलकार प्राचार्या बीबी फातिमा बालेखा म‌ुजावर यांची निवड झाली आहे. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस संमेलनाचे उद्घाटन करतील. यावेळी अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट प्रमुख अतिथी, तर स्वागताध्यक्ष म्हणून रामशेठ ठाकूर असतील. या संमेलनासाठी देशभरातून सुमारे बाराशे मुस्लिम मराठी साहित्यिक, अभ्यासक, संशोधक, रसिक सहभागी होणार आहेत. औरंगाबादहून या संमेलनाला सुमारे ६० जण जाणार आहेत. मुस्लिम मराठी साहित्य चळवळ संघटित होऊन २५ वर्षांहून अधिक काळ लोटला. हे यंदाचे अकरावे साहित्य संमेलन आहे. या काळात दोन संमेलनात मुस्लिम महिलांनाही अध्यक्षपद मिळाले, मात्र अजूनही मुस्लिम मराठी साहित्यिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. संमेलनात कवी संमेलन, परिसंवाद, महापरिसंवाद होणार असून आजपर्यंत २५ वर्षांत एकदाही सरकारी अनुदान घेतले नाही. हे संमेलन साहित्यप्रेमींच्या अनुदानावर भरते,’ असे मिन्ने यांनी स्पष्ट केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅसेंजर रेल्वेमधून साठ टक्के फुकटे प्रवासी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड विभागात धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेतून ६० टक्के व एक्स्प्रेसमध्ये २० टक्के प्रवासी फुकटे असतात. त्यामुळे प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न मिळत नसेल, तर सुविधा कशा देणार, असा सवाल नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्‍थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी उपस्थित केला.
रेल्वे कर्मचारी अधिकारी तक्रार निवारणासाठी विशेष बैठक घेण्यासाठी ते मंगळवारी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ‘नांदेड विभागात सध्या चालणाऱ्या रेल्वेची संख्या व प्रवासी यांचा ताळमेळ घातल्यास अनेक जण विनातिकिट प्रवास करत असल्याचे स्पष्ट होते. प्रवासी संख्या वाढल्याने धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसला चेअरकार जोडण्यात आली होती. पण, तिला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. २४ वेटिंग तिकिट असल्यामुळे मराठवाडा एक्स्प्रेसला कोच जोडण्याचा निर्णय बदलावा लागला आहे. अंजनी-कुर्ला रेल्वेसुद्धा प्रतिसाद कमी असल्याने बंद करावी लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करून ते मंगळवारी औरंगाबादला आहे. ही रेल्वे वेळेत आणल्यामुळे डॉ. सिन्हा यांनी लोको पायलट प्रशांत पी आणि लोको ड्रायव्हर जितेंद्र कुमार यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस, तर एका दिवसात १८ हजार रुपये विनातिकिट प्रवाशांकडून वसूल करणारे अशोक टी यांनाही बक्षीस दिले. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलेल्या सूचनेनुसार रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्‍वे रूळ निरीक्षण वाढवण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

ज्युनिअरपेक्षा पगार कमी ?

माजी स्टेशन मॅनेजर पदावरील अधिकारी ज्युनीअर असताना, त्यांचा पगार माझ्यापेक्षा जादा कसा,अशी तक्रार रेल्वे स्टेशन मॅनेजर एल. के. जाखडे यांनी कर्मचारी अदालतमध्ये मांडली. याशिवाय अडीच महिन्यांपूर्वी महाव्यवस्‍थापक विनोद कुमार यांनी विविध कर्मचाऱ्यांना जीएम पुरस्कार जाहीर केले. ही रक्कम अद्याप मिळाली नाही, सर्व्हिस बुकमध्ये पुरस्काराची नोंद केली नाही, अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित अदालतकरिता दमरेचे आस्‍थापना विभागप्रमुख रामन्ना रेड्डी, डीआरएम डॉ. ए. के. सिन्हा यांची उपस्थिती होती. यावेळी कर्मचाऱ्यांनी ३६ तक्रारी मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images