Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ शिवसेना कर्जमाफीवर असमाधानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले ही आनंदाची बाब आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे, पण सरकारने २०१७ पर्यंत कर्जमाफी करायला हवी होती. यामुळे शिवसेना या कर्जमाफीवर पूर्ण समाधानी नाही,’ असे खडेबोल पालकमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी राज्य सरकारला सुनावले.

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’च्या अंमलबजावणीचा शुभारंभ कदम यांच्या हस्ते झाला. लाखो शेतकरी लाभार्थी असताना प्राथमिक स्वरुपात जिल्ह्यातील केवळ २१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, ‘शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २०१७पर्यंत कर्जमाफी मिळावी, अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी आजही कायम आहे. या कर्जमाफीमुळे सरकारवर भार पडेल. राज्याच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो, मात्र शिवसेनेची शेतकऱ्यांशी बांधिलकी आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलो.’ यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, ‘जिल्ह्यातील दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना निश्चित कर्जमाफी मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी या कालावधीत नियमित कर्ज भरले आहे, अशा शेतकऱ्यांनाही १५ ते २५ हजारापर्यंतचा लाभ मिळेल.’

‘जिल्ह्यात कर्जाची ६० टक्के यादी अपडेट झाली असून, येत्या १५ दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांची यादी अपडेट होईल,’ असे प्रास्ताविकात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, अब्दुल सत्तार, प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजेआर्दड उपस्थित होते.

वेळ आल्यावर बोलेन
शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापला आहे. त्यामुळे शिवसेनेला डावलले काय, असा प्रश्न कदम यांना विचारले असता त्यांनी ‘वेळ आल्यावर नक्की बोलेन,’ असे म्हणत उत्तर देणे टाळले. या कर्जमाफीचे यश कुणाचे आहे असे विचारले असता, ‘यश कुणाचे आहे हे सर्वांना माहित आहे,’ अशी टिपण्णीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ चंद्रकांत पाटील यांना ‘उपसमिती’तून काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठा आरक्षणासह समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने नेमलेली मंत्रिमंडळाची उपसमिती एकप्रकारे ढोंग आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून नेमलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच मराठा मोर्चे हाणून पाडण्याचे काम केले. त्यांची या उपसमितीतून हकालपट्टी करा,’ अशी मागणी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा महासभा समन्वयक समितीने केली.

मराठा महासभा समन्वयक समितीचे समन्वयक रवींद्र काळे-पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाने राज्यात शांततेत ५८ मोर्चे काढल्यानंतरही शासनाकडून आश्वासनांशिवाय काही मिळाले नाही. त्यामुळे सरकारच्या धोरणावर सविस्तर चर्चा व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी २९ ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये मराठा महासभाचे आयोजन केले आहे. सिडकोतील संत तुकाराम महाराज नाट्यगृहात दुपारी १२ वाजता महासभा सुरू होईल. मराठा क्रांती मोर्चा, समन्वयक, राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुढील आंदोलन औरंगाबादमधून सुरू होणार असून, त्याचाच भाग म्हणून गुरुवारी (१९ ऑक्टोबर) शहरात एक दिवसीय सत्यागृह आंदोलन शहागंज येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर करण्यात येणार आहे,’ असेही समन्वय समितीने स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला रमेश केरे-पाटील, प्रा. माणिक शिंदे-पाटील, किशोर चव्हाण, सुनील कोटकर, अशोक वाघ, सतीश वेताळ, प्रशांत इंगळे, अंकीत चव्हाण, परमेश्वर नलावडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्कळीत पाणीपुरवठ्याला पालिका प्रशासन जबाबदार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘विस्कळीत पाणीपुरवठ्याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. जलवाहिनीचा एकदा का स्फोट झाला, तर शहराला सहा महिने पाणी मिळणार नाही, हे लक्षात घेत आयुक्तांनी कार्यवाही केली पाहिजे. अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचे आयुक्तांचे धोरण शहरासाठी घातक आहे,’ असा सूर ‘मटा’ तर्फे आयोजित केलेल्या राउंड टेबलमध्ये बुधवारी मान्यवरांनी व्यक्त केला.

दोन महिन्यांपासून शहरात सातत्याने पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जायकवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. धरण शंभर टक्के भरलेले असताना शहर मात्र तहानलेलेच आहे. सध्या तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. समान पाणी वाटपाचे कारण पुढे करून पालिका प्रशासन चार दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करीत आहे. चार दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात आला, तर आठवड्यातून एकच दिवस पाणी मिळणार आहे. विस्कळीत झालेला पाणीपुरवठा, पाणीपुरवठ्याचा खंड वाढवण्याचा केला जाणारा प्रयत्न व पाणीपुरवठ्याच्या संबंधी विविध प्रश्नांवर साधकबाधक चर्चा व्हावी या उद्देशाने ‘मटा’ ने बुधवारी राउंड टेबलचे आयोजन केले होते. यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, सीमा खरात, अब्दुल नाईकवाडे, माजी नगरसेवक समीर राजूरकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. उमेश कहाळेकर सहभागी झाले होते.

‘पाणी वितरणाचा मुख्य प्रश्न आहे. उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करून वाटप केले, तर बऱ्याच प्रमाणात हा प्रश्न सुटण्यास मदत होईल. पाणी प्रश्नामुळे सिडको - हडकोतील नागरिक व नगरसेवक वैतागले आहेत. त्यातून योग्य मार्ग काढण्याची गरज आहे,’ असे मत राउंड टेबलमध्ये सहभागी झालेल्यांनी व्यक्त केले. ‘ज्या वॉर्डात मालमत्ता कर व पाणीपट्टीची जास्त वसुली होते, त्या वॉर्डांना प्राधान्याने पाणीपुरवठा करावा. अनधिकृत नळ कनेक्शनवर अंकुश ठेवावा. ‘समांतर जलवाहिनी’ या नावाभोवती वेगळाच अर्थ गुंतलेला आहे. त्यामुळे ‘वाढीव पाणीपुरवठा योजना’ असे नामकरण करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर करावे. तत्कालीन आयुक्तांनी पर्याय उपलब्ध करून न देता समांतर जलवाहिनीचा करार रद्द केला, त्याचा परिणाम आता शहराला भोगावा लागत आहे,’ अशा भावना देखील यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल प्रत्येक वेळी महावितरणवर खापर फोडणे योग्य नाही. महावितरणचे सहकार्य घेऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत, पंरत हे प्रयत्न न करता आयुक्त पाणीपुरवठा विभागावर मेहरबान आहेत, असे लक्षात येते. - गजानन बारवाल, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शेतकऱ्यांना कर्जमाफीची दिवाळी भेट

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्यभरातील शेतकरीवर्गाला दिवाळीची भेट म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली. बुधवारी मराठवाड्यात सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रतिनिधीक स्वरुपात काही शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

‘कर्जमाफीशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही’
म. टा. प्रतिनिधी, नांदेड
दिवाळीच्या मुहर्तावर बळीराजाला दिवाळीची भेट म्हणून राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून दिवाळी गोड केली. सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केल्याशिवाय उद्धव ठाकरे व शिवसेना स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील-आष्टीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांची उपस्थिती होती. यावेळी खोतकर म्हणाले, ‘निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे त्यांना बँकांचे कर्ज फेडण्यास तसेच नव्याने कर्ज घेण्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक वर्ष तो कर्जाच्या ओझ्याखाली राहतो. त्यामुळे सन २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याबाबीकडे लक्ष वेधले व एकमताने शेतकऱ्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी कर्जमाफीचे नियोजन करण्याबाबत ठरविले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा राज्यस्तरावरील शुभारंभ मुंबई येथे होत आहे. संपुर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लाखो पात्र शेतकरी लाभार्थ्यांना कर्जमाफीबाबतचे तसेच कर्ज भरलेल्यांना प्रोत्साहनपर लाभ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत आहे. या वेळी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या २५ शेतकरी बांधवांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचे वाटप
लातूर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणीची सुरुवात पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून करण्यात आली.
यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार विनायक पाटील, आमदार सुधाकर भालेराव, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष मिल‌िंद लातूरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उपमहापौर देविदास काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बी. एल. वांगे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यु. एल. पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव, अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय बोराडे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, सहकार विभागातील अधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबातील रघुनाथ चव्हाण, शांतीनाथ नाथबोने, गोपाळ दंडीमे, भालचंद्र सोनकांबळे आणि नागनाथ मिटकर यांचा प्रातिनिधीक स्वरुपात पाच शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र, साडीचोळी, पेहराव देवून यथोचित सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

कर्जमाफीची दिवाळी भेट
उस्मानाबाद - राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने सरकारने कर्जमाफीची भेट दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री
महादेव जानकर यांनी केले.
यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक जगदाळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजयकर, तहसीलदार सुजित नरहरे, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांच्यासह पदाधिकारी तसेच विविध विभागांच्या विभागप्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती. उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पात्र लाभार्थी कुटुंबांपैकी २३ लाभार्थ्यांचा सत्कार उस्मानाबाद जिल्ह्याचे सहपालकमंत्री महादेव जानकर, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत शेतकऱ्यांसाठीची सर्वात मोठी कर्ज माफी आहे. दीड लाखापर्यंतचे कर्ज माफी झाल्याचेही यावेळी पालकमंत्री जानकर यांनी सांगितले.

कर्जमाफीपात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप
बीड - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आली. जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र असलेल्या प्रातिनिधिक शेतकरी कुटुंबाना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, औरंगाबाद विभागाचे सहनिबंधक जी. पी. परतूरकर, जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार भीमराव धोंडे, आमदार आर. टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी केले तर आभार अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण यांनी मानले.

परभणीत कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वितरण
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना बुधवारी परभणी येथे कर्जमुक्तीच्या लाभाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय जाधव होत तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला राठोड, उपाध्यक्षा भावता नखाते, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. जी. जाधव, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, अग्रणी बँक अधिकारी राम खरटमल, जिल्हा विशेष लेखा परीक्षक एस. आर. कांबळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार जाधव हे होते. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करुन दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. शेतक-यांच्या पाठीशी शासन सदैव राहिल याची दक्षता आपल्या सर्वांनी घेतली पाहिजे, असे सांगून अलिकडे झालेल्या पिक नुकसानीचा आढावा घेऊन प्रशासनाने नूकसानग्रस्त शेतक-यांचा अहवाल शासनाकडे पाठवावा आणि त्यांना मदत करावी, असेही आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतक-यांना कर्जमुक्तीचा सोहळा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या सोहळयाचे थेट प्रक्षेपण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व अधिकाऱ्यांनी पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग २१ दिवसांनंतर जायकवाडीची दारे बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
आवक बंद झाल्याने गुरुवारी दुपारपासून जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. दोन टप्प्यात व जवळपास २४ दिवसांमध्ये धरणातून एकूण साडेबारा टीएमसी पाणी सोडण्यात आले, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.
जायकवाडी धरण तब्बल नऊ वर्षानंतर शंभर टक्के भरल्याने २१ सप्टेंबर रोजी धरणातून पाणी सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान धरणातून तीन टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाल्यानंतर २४ सप्टेंबरला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक जिल्हा व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यावर जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली होती.
धरणात पाण्याची आवक सुरू होताच २९ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. कमी अधिक प्रमाणात व सलग २१ दिवस जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येत होते. १९ ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणातील पाण्याची आवक पूर्णपणे थांबल्याने गुरुवारी दुपारी जायकवाडी धरणाचे दरवाजे बंद करून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला.
२१ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात व जवळपास २४ दिवसांमध्ये जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात एकूण ३४८ दशलक्ष घनमीटर म्हणजे जवळपास साडेबारा टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. सध्या, धरणाच्या उजव्या कालव्यातून ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असून धरणात अत्यल्प पाण्याची आवक सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
परतीच्या पावसाने राज्यात सगळीकडे जोरदार हजेरी लावल्याने जायकवाडी धरण शंभर टक्के भरले. धरणातून जवळपास साडेबारा टीएमसी पाणी गोदापात्रात सोडण्यात आले. मात्र, आता परतीचा पाऊस थांबला आहे. यापुढे पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्याची गरज पडणार नाही, असा अंदाज शाखा अभियंता चव्हाण यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिटेक्निकचे महत्त्व शाळांतून सांगणार

$
0
0

औरंगाबाद : यावर्षी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ५७ टक्के जागा रिक्त असल्याने या शाखेकडे विद्यार्थ्यांना वळवण्यासाठी तंत्रशिक्षण मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची उपयुक्तता सांगण्यासाठी मंडळातर्फे शाळांमधून प्रबोधन मेळावे घेण्यात येणार आहेत.

राज्यातील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यानच मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. औरंगाबाद विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५९९ प्रवेश अर्ज कमी आले. अभियांत्रिकीची पदवी घेऊनही बेरोजगार राहत असल्याची चर्चा असल्याने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण मंडळातर्फे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. अभ्यासक्रम, त्यातील संधी, अभ्यासक्रमातील बदल, प्रात्यक्षिक याची माहिती नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. हे मेळावे औरंगाबाद विभागातील ४०० शाळांमध्ये घेण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यंदा विभागातील पॉलिटेक्निक अभ्याक्रमांच्या जागांची उपलब्धता कमी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी २६ हजार ९४६ जागा होत्या, त्या यंदा २५ हजार ६३ एवढ्या झाल्या. फक्त ८ हजार जागांवर प्रवेश झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अभियांत्रिकीला फटका
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमावर अनेक अभियांत्रिकी कॉलेजांचे भवितव्य अवलंबून असते. दोन वर्षापासून पॉलिटेक्निककडे कल कमी झाल्याचा थेट फटका द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशाला बसला आहे. दरवर्षी राज्यभरात एक लाख विद्यार्थी ‌डिप्लोमानंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात.

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. आम्ही मार्गदर्शन मेळाव्यात अभ्यासक्रमातील बदल, रोजगाराच्या संधी सांगणार आहोत. आर्थिक परिस्थतीमुळे अनेकांना पदवीचे शिक्षण परवडत नाही. त्यांना या अभ्यासक्रमाकडे वळण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- मोहन मानकर, सहाय्यक सचिव, तंत्रशिक्षण मंडळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पो अपघातात दाेन ठार; दहा जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी कामगारांच्या संपामुळे टेम्पोतून दिवाळीकरिता चाकण येथून बुलडाणा जिल्ह्यातील गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या टेम्पोला अपघात होऊन दोन जण ठार व दहा जण जखमी झाले. हा अपघात जालना रोडवरील गोलटगावजवळ गुरुवारी पहाटे साडेपाच्या सुमारास झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीमधील महिंद्रा कंपनीत कामगार बुलडाणा जिल्ह्यातील खळेगाव (ता. लोणार) येथे दिवाळीसाठी जात होते. संपामुळे एसटी बंद असल्याने ते टेम्पोमधून (एम एच २० बीटी १११३) प्रवास करत होते. टेम्पोत मुलांसह सुमारे २० ते २२ जण होते. हा टेम्पो गुरुवारी पहाटे करमाडजवळील गोटगाव फाटा येथे पोहचला असता दुचाकीस्वाराला वाचविताना टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटले व टेम्पो कठड्यावर जाऊन आदळला. त्यानंतर टेम्पो उलटला. या अपघातात टेम्पोचालक पुरूषोत्तम किसन वायाळ (वय ४०, रा. खळेगाव, ता. लोणार), प्रकाश शंकर भुतेकर (वय ३६, रा. आंळद, ता. देऊळगावराजा) हे जागीच ठार झाले. भगवान दिंगबर वायाळ (वय २८, रा. खळेगाव, ता. लोणार) हे कॅबीनमध्ये दबले, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. टेम्पोत बसलेले दहा जण जखमी झाल्याचे करमाड पोलिसांनी सांगितले.
टेम्पो उलटल्यानंतर महिला व मुलांच्या आरोळ्यांनी आसपासचे लोक मदतीला धावले. जखमींना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके यांनी दिली.

आयशर धडकून एक ठार

गोलटगाव जवळील अमृतसर पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसवर (एम एच १२ एस बी ५५७) मागून येणारा आयशर ट्रक (एम एच ११ सी एच १९०९) धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणे सहा वाजता झाला. प्रकाश कृष्णा ओगळे (वय ३२, रा. बोधनवाडी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा), असे मृत क्लिनरचे नाव आहे. ट्रव्हल्स बस पुण्याकडे जात होती. पण, झोप येत असल्याने चालकाने बसही उभी केली होती. या बसवर आयशर ट्रक वेगाने येऊन धडकला. या अपघातात आयशरमधील क्लिनर प्रकाश जखमी होऊन मरण पावला, तर चालक संदीप वसंत कांबळे (वय ३९, रा. सातारा ) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी दरम्यान करमाड पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट मधून वगळण्याचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट मधून वगळण्याचा स्थायी समितीने मंजूर केलेला प्रस्ताव महापालिका प्रशासनाने विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवला आहे, अशी माहिती मिळाली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे येत्या काळात अधिकारी-लोकप्रतिनिधी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीने यापूर्वी घेतलेले दोन निर्णय देखील आयुक्तांनी ऐकलेले नाहीत.
महापालिका युक्त डी.एम. मुगळीकर आणि पदाधिकारी यांच्यात निर्णयाच्या अंमलबजावणीवरून शीतयुद्ध सुरू झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांच्या कार्यपद्धतीवर महापौर, सभापती, पदाधिकारी व नगरसेवकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. चहेल यांना शासनाकडे पाठवा, असे आदेश महापौरांनी दिले होते. हे आदेश आयुक्त पाळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर चहेल यांना जायकवाडी येथील पंपहाउसचेच काम द्या, असे महापौरांनी आयुक्तांना सांगितले होते. पण, आयुक्तांनी हे सुद्धा ऐकले नाही.
स्थायी समिती बैठकीत भूमिगत गटार योजनेच्या कामावर वादळी चर्चा झाली. या योजनेच्या लेखा परीक्षण अहवालाचा आधार घेत सभापती बारवाल यांनी योजनेचे नोडल ऑफिसर अफसर सिद्दिकी यांना निलंबित व फोट्रेस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. आयुक्तांनी या आदेशाचेही पालन केले नाही. अफसर सिद्दिकी यांच्यासह चार अधिकारी व फोट्रेस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली.
तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी रस्त्यांचे काम करणाऱ्या जीएनआय या कंत्राटदार कंपनीला कामातील त्रुटींमुळे ब्लॅकलिस्ट केले होते. जीएनआयला ब्लॅकलिस्ट मधून वगळण्याचा निर्णय स्थायी समितीने काही दिवसांपूर्वी घेतला व त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांनी या आदेशाचे पालन करण्याऐवजी स्थायी समितीने मंजूर केलेला प्रस्ताव विखंडित करण्यासाठी शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. त्यावर शासनाकडून उत्तर येईपर्यंत जीएनआय महापालिकेच्या ब्लॅकलिस्ट मध्येच राहील, असे बोलले जात आहे. पदाधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय तत्काळ अंमलात न आणता नियम, अटींच्या कसोटीवर आयुक्तांकडून छाननी केली जात आहे. त्यामुळे नजिकच्या काळात आयुक्त व पदाधिकारी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

डोळ्यासमोर शंभर कोटी

जीएनआयला ब्लॅकलिस्ट मधून वगळण्याचा निर्णय स्थायी समितीने शासनाने दिलेले शंभर कोटी डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचे बोलले जात आहे. शासनाने यापूर्वी २४ कोटींचे अनुदान दिले होते. या अनुदानातून पाच रस्त्यांची कामे जीएनआयने केली आहेत. आता शंभर कोटींच्या अनुदानातूनही याच कंपनीने जास्तीत जास्त कामे करावीत यासाठी प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुरखाधारी तरुणाचा वृद्धावर अचानक हल्ला

$
0
0

बुरखाधारी तरुणाचा वृद्धावर अचानक हल्ला
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जेष्ठ नागरिकाला घराच्या बाहेर बोलावून त्याच्यावर सोमवारी रात्री साडे नऊ वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा प्रकार गारखेडा भागात घडला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वीच जवाहरनगर हद्दीतील मयूरबन कॉलनी येथे ८४ वर्षाच्या जेष्ठ नागरिकावर हल्ला करण्यात आला होता.
तुलसीदास थावरदास ठक्कर (वय ७१ रा. शीतल अपार्टमेंट, गारखेडा) असे या नागरिकाचे नाव आहे. ते सोमवारी रात्री घरी असताना रात्री साडेनऊच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने घराचा दरवाजा वाजवला. ठक्कर हे बाहेर आले असता तोंडाला रुमाल बांधलेल्या एका व्यक्तीने त्यांना जोरात धक्का दिला. ठक्कर यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांची पत्नी व सून बाहेर आली. पळून जायच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ठक्कर यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने धारदार शस्त्राने ठक्कर यांच्या पायावर वार केले. तसेच त्यांच्या सुनेला धक्का देत पळून गेला. याप्रकरणी पीएसआय महांडूळे या प्रकरणी तपास करीत आहेत.

आठ दिवसातील दुसरी घटना

मयूरबन कॉलनी येथे आनंद श्रीकृष्ण चौबे (वय ८४) यांच्यावर ११ ऑक्टोंबर रोजी अज्ञात आरोपीने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. ते सायंकाळी पाच वाजता फिरण्यासाठी बाहेर पडले असता हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी देखील जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणप्रश्नी औरंगाबादेत सत्याग्रह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य सरकारवर संतापले आहेत. त्यांनी गुरुवारी शहागंज येथील गांधी पुतळ्यासमोर शासनाच्या भूमिकेविरुद्ध सत्याग्रह आंदोलन केले.
‘मराठा समाजाने राज्यात शांततेत ५८ मोर्चे काढले. पण, आरक्षण, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा आदी मागण्यांवर शासनाकडून आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. या मागण्यांकडे कानाडोळा करण्यात येत असून ठोस कार्यवाही केली जात नाही’ असा आरोप आंदोलकांनी केला. शासनाच्या या भूमिकेच्या विरोधात हा सत्याग्रह आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे पाटील यांनी सांगितले.
यावेळी रमेश केरे पाटील, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, प्रा. माणिकराव शिंदे, अॅड. स्वाती नखाते, अशोक वाघ, अशोक खानापुरे, योगेश केवारे, राजेंद्र चव्हाण, लक्ष्मण मोटे, नंदकुमार जाधव, अॅड. गुंगे पाटील, वैभव घुले, सोमेश बिराजदार, प्रकाश बिराजदार आदी उपस्थित होते. मागण्या मान्य होत नसल्याने उमटणारा रोष रोखण्यासाठी राज्य शासन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू पहात आहे, असा आरोप काळे पाटील यांनी केला. यापुढील राज्यव्यापी आंदोलनाची तयारी व दिशा ठरविण्यासाठी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता संत तुकाराम नाट्यगृहात मराठा महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक व मान्यवरांना निमंत्रित केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकी वसुलीसाठी शेती पंपाची वीज तोडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट असताना महावितरणने शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे.
सिल्लोड तालुक्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला आहे. जोरदार पाऊस पडला नसल्यामुळे पाणी जमिनीत मुरले नाही, नदी-नाल्यांंतून पाणी वाहिले नाही. परिणामी, भूजल पातळी वाढली नाही. मात्र शासन दरबारी सरासरीच्या जवळपास पावसाची नोंद झाली आहे. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी कापूस, गहू, हरबरा पेरला असून या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी झगडत आहेत. दिवाळी साणाच्या काळातच महावितरणने थकबाकी वसुलीसाठी शेतीचा पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.
पावसाळ्यात पिकांना गरज असताना पाऊस पडला नाही. त्यामुळे उत्पादनावर ५० टक्के परीणाम होणार आहे. विहिरींना पाणी नसल्यामुळे रब्बी येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यातच शेती मालाला भाव नाही या संकटाला शेतकरी तोंड देत असताना थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने तालुक्यात बुधवारपासून शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. कमी पाण्यावर उपलब्धेनुसार शेतकऱ्यांनी मका पिकाची सोंगणी केलेल्या शेतात गहू, हरबरा पेरणीला सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी कापसाला पाण्याच्या पाळ्या देण्यास सुरूवात केलेली आहे. महावितरण कंपनीने वीज पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.
वरिष्ठ कार्याल आदेशानुसार शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक अभियंता संतोष अधिकार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी संपामुळे खासगी वाहनांचे भाडे तिप्पट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
एसटी कामगारांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे सिल्लोड आगाराचा तीन दिवसांत १८ लाख रुपयांचा महसूल बुडला. संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे आतोनात हाल होत असून अवैध प्रवाशी वाहतूकदारांची चांदी होत आहे. संपामुळे प्रवासी भाड्यात तिपटीने वाढ झाली आहे.
संपामुळे सिल्लोड आगारात गुरुवारी शुकशुकाट होता. बस स्थानकात एकही आली नाही व आगारातून एकही बस बाहेर निघाली नाही. ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे ते संपाबाबत तोडगा निघतो का याकडे लक्ष ठेऊन आहेत. काळी-पिवळी, जीप, कमांडर, खासगी गाड्या, अॅपेरिक्षा, स्कूलबस आदी वाहनांतून तालुक्यातील प्रवासी प्रवास करत आहेत. काही जण नाईलाजाने मोटार सायकलवरून लांबचा प्रवास करत आहेत. एसटीच्या संपामुळे तालुक्यातील मुख्य रस्त्यावरील पट्रोल पंपावर दुचाकीच्या रांगा लागत आहेत. पेट्रोलचा खप तीन दिवसात वाढला आहे. सिल्लोड आगारात ६७ बस असून त्या दररोज २२ हजार किलोमीटर चालतात. त्यापैकी ग्रामीण भागात १४ हजार व पुणे, अकोला, मालेगाव, बीड, बुलडाणा, जळगाव या मार्गावर आठ हजार किलोमीटर चालतात. यातून दररोज सुमारे सहा लाखांचा महसूल मिळतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा एसटी कामगारांवर मारहाणप्रकरणी गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संपात सामील न होता एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत काम करणाऱ्या कामगाराला मारहाण केल्याच्या आरोपावरून सहा संपकरी कामगारांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी मध्यवर्ती कार्यशाळेत १७ ऑक्टोबर रोजी पवन बाबासाहेब शेळके (रा. म्हाडा कॉलनी) हे ड्युटी करत होते. त्यावेळी महेश टेभरे, पप्पु कोटूरवार, शेख तालेब, जगदीश जाधव, विशाल तुपे, पांडूरंग पोतदार हे एस. टी. कामगार तेथे आले. त्यांनी शेळके यांना काम करण्यास मज्जाव केला. त्यांनी व इतरांना शेळके व इतर दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. शेळके यांच्या अंगावर जळालेले ऑइल टाकले. या मारहाणीत शेळके यांच्या उजव्या डोळ्यास जखम झाली आहे, या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शेळके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सरकारी कामात अडथळा आणणे याप्रकरणी संपात सहभागी असलेल्या सहा कामगारांविरुद्ध गुन्हे दाखल केले. याप्रकरणा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक केदारे हे करीत आहेत. दरम्यान, संपात सामील असलेल्या कामगारांना विचारले असता त्यांनी घटनेचा इन्कार केला. संंघटनांच्या अंतर्गत वादातून संबंधितांनी गुन्हे नोंदवल्याचा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी परीक्षेचे अर्ज सुट्यांमध्ये भरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याचे तारखा मंडळाने जाहीर केल्या. या तारखा ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये आहेत. त्यामुळे सुट्यांमध्ये अर्ज कसे भरायचे, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे.

मंडळाने फेब्रुवारी-मार्च परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे, तर परीक्षेचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. प्रक्रियेत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १६ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. याचदरम्यान शाळांना सुट्या आहेत. शाळांच्या सुट्या सहा नोव्हेंबरपर्यंत आहेत. सुट्यांमध्ये शाळाच बंद आहेत. अशावेळी नियमित शुल्क भरण्याची मुदत सहा नोव्हेंबरपर्यंत कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विलंब शुल्कासह सात ते १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळा सात नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासहच अर्ज भरावा लागणार आहे. त्यामुळे हा आर्थिक भुर्दंड पालकांच्या खिशाला पडणार आहे. अर्ज सात नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत. याचदरम्यान दिवाळी आल्याने सुट्यामध्ये अर्ज कसे भरणार, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. दहावी, बारावीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जातात. शाळांना शुल्क भरल्याच्या चलनासह याद्या मंडळाकडे २७ नोव्हेंबरपर्यंत याद्या जमा करायची मुदत आहे.

आधार कार्डही लागणार
अर्जासोबत जन्म ठिकाण व आधार कार्ड नमूद करावा लागणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे आधारकार्ड नसेल, तर निकालापर्यंत कार्ड काढण्यात येईल, असे विद्यार्थ्यांने प्राचर्य, मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र देणे आवश्यक आहे. त्याबाबत सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्याची पैसेवारी संशयास्पद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
‘तालुक्यात पाऊस नसतानाही पैसेवारी ५३ दाखवून सर्व परिस्थिती उत्तम असल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात तालुक्यातील शेतकरी प्रत्यक्षात प्रचंड अडचणीत आहेत. जाहीर झालेली पैसेवारी संशयास्पद असून ती बदलण्यासाठी लढा पुकारण्यात येईल,’ असा इशारा माजी अामदार डाॅ. कल्याण काळे यांनी दिला.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे व सदस्यांच्या मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. काळे हे बोलत होते. नवनिर्वाचित १७पैकी पाच सरपंच व ७४ सदस्य काँग्रेसचे आहेत, असे सांगण्यात आले होते. पण सत्कार कार्यक्रमाला तीनच सरपंच उपस्थित हाेते.
डाॅ. काळे म्हणाले की, तालुक्यातील नदी-नाले, धरण-तलाव काेरडे अाहेत. उपलब्ध पाणी व तुरळक पावसावर काही उत्पादन हाती येणार होते. पण, शेवटच्या टप्प्यातील पावसामुळे उत्पादन वाया गेले. या स्थितीत ५३ पैसेवारी कशी काढली हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्यक्षात तालुक्याची पैसेवीर ३३ आहे, असा दावा डॉ. काळे यांनी केला.
‘येथील आमदार हरिभाऊ बागडे हे विधानसभा अध्यक्ष अाहेत, मात्र ते आमदारांसारखेच वागतात,’ अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचे सरपंच कमी असले तरी ग्रामपंचायत सदस्यांची संख्या माेठी अाहे. यामुळे काँग्रेस पक्ष बळकट झाला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, सुदाम मते, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, अजगर पटेल, गंगाधर सोनवणे, मनोज शेजुुळ, कचरू मैद, रंगनाथ कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सुभाष गायकवाड, देविदास गाडेकर, लहू मानकापे, शंकर उबाळे, विठ्ठल लुटे, संतोष मेटे, आजिनाथ शेळके, कैलास तायडे, शामराव साळुंके, नदीम मुलतानी, विजय जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनसुब जाधव यांनी केले, तर शेख रज्जाक यांनी आभार मानले.
सदाशिव विटेकर (मुर्शिदाबादवाडी), अमोल डकले (गेवराई गुंगी), भारती शळके (आळंद) या तीन सरपंचांचा सत्कार करण्यात आला. काही ग्रामपंचायत सदस्यांचाही यावेळी सत्कार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जमाफीचा खुलताबादेत भाजपतर्फे जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास प्रारंभ केल्याने तालुका भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करून आनंद साजरा केला. कर्जमाफी देऊन थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची सूचना आमदार प्रशांत बंब यांनी राज्य सरकारकडे केली होती, असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, पंचायत समिती सभापती अर्चना अंभोरे, उपसभापती गणेश अधाने यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. नलावडे म्हणाले, कर्जमाफीची अंमलबजावणी करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. ऐन सणासुदीत कर्जमाफीची रक्कम मिळत असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘बुथ जीता चुनाव जीता’ या मोहिमेत तालुक्यात बुथ तेथे कार्यकर्ता नेमण्यात आला आहे. या मोहिमेत तालुका जिल्ह्यात प्रथम व मराठवाड्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाने तालुका भाजपचे विशेष अभिनंदन केल्याची माहिती नलावडे यांनी दिली.
यावेळी माजी सभापती भीमराव खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड, सुरेश सोनवणे, हिंदवी खंडागळे, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक अविनाश कुलकर्णी, परसराम बारगळ, योगेश बारगळ, कविता लिंगायत, पंचायत समिती सदस्य युवराज ठेंगडे, प्रभाकर शिंदे, रेखा चव्हाण, आशिष कुलकर्णी, प्रकाश वाकळे, रमेश नागे, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बारगळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठा मार्ग रुंदीकरण; शेकडो वृक्ष धाराशाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
औरंगाबाद-सिल्लोड-अजिंठा हा राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केंद्रीय रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याने १५ दिवसांपासून कंत्राटदाराकडून रस्त्याकडेची शेकडो झाले कापण्यात येत आहेत.
औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या दोन्ही बाजुला अनेक वृक्ष १५ ते २० वर्षे किंवा काही त्यापेक्षा जुने आहेत. मोठे डेरेदार, हिरव्यागार वृक्षांची कटाई होताना पाहून सामान्य नागरिक हळहळत आहेत. काही झाडे मागील पाच वर्षांत लावलेली आहेत. त्यामुळे ती अद्याप लोखंडी जाळ्यांतच आहेत. झाडांची बेसुमार कटाई होत असल्याचे पाहून वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, वनीकरण विभागाने असंख्य झाडे लावली आहे, त्यापैकी अनेक वृक्षांचे संगोपन नागरिकांनीही केले आहे. त्यांना वृक्षकटाई पाहवत नाही. या भागातून प्रवास करणारे प्रवासी व वाहनचालकांना पुढील १० ते १५ वर्षे वृक्षांच्या सावलीपासून वंचित राहावे लागणार आहे. झाडे कापली जात असल्याने सध्या ५० ते ६० फुटांचा रस्ता आता उघडा बोडका दिसत आहे. या रस्त्याने प्रवास करताना झाडे दिसत नाहीत. झाडे कापणाऱ्या टोळ्यांनी रुंदीकरणात येणाऱ्या झाडांसोबतच त्याशिवायची झाडेही कापली, असा नागरिकांचा आरोप आहे. झाडे तोडत असताना कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित राहत नाही, परिणामी मनमानी पद्धतीने झाडे कापली जात आहेत.
सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस ३० ते ४० फुटांपर्यंतची झाडे कापली जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असल्याने त्याचा पर्यावरणावर व शेजारच्या गावांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे अनेक नागरिक काळजी व्यक्त करत आहेत. शिवाय या रस्त्यावर त्वरित नवीन झाडे लावून जोपासणा करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
या रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे, हे सार्वजनिक बांधकाम विभागाला माहीत होते. एकीकडे महाराष्ट्र सरकार शतकोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करते. त्यामुळे या मार्गावरील वृक्षारोपण का केले नाही, असा प्रश्न भाऊसाहेब बलांडे यांनी उपस्थित केला आहे. या रस्त्याचे सौंदर्य वृक्षतोडीमुळे हरवले गेले असून रस्ता विद्रुप दिसत आहे. शासनाने रस्त्याचे काम सुरू होण्याआधी दोन्ही बाजुने वृक्षरोपण करावे. या झाडांचे संगोपन करावे, अशी मागणी मंगेश शेटे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कामगारांना हाकलण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी कामगारांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळाने तिसऱ्या दिवशी संपकरू कामगांरांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली. संपामुळे मुक्काम कराव्या लागलेल्या परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना विश्रामगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी केली. दुसरीकडे परिवहन मंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याने एसटी चालकांनी काळे आकाशदिवे लावून काळी दिवाळी साजरी केली.
संप सुरू झाल्याने सिडको बस स्‍थानकात बस उभ्या करून मराठवाडा, विदर्भ आणि इतर जिल्ह्यांतून आलेले १४० चालक व वाहक यांनी तीन दिवसांपासून विश्रामगृहात मुक्काम केला आहे. संपामुळे हे कामगार बस रस्त्यावर आणू शकत नाहीत. त्यांच्या भोजनाची व्यवस्था स्थानिक कामगारांनी केली आहे. उपयंत्र अभियंता एस. ई. खडसे आणि स्‍थानकप्रमुख घोलप हे गुरुवारी सकाळी सिडको बस स्थानक येथील विश्रामगृहावर पोलिसांसह जाऊन ना घेऊन विश्रामगृहात दाखल झाले. त्यांनी चालक व वाहकांना विश्रामगृह सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे या कामगारांनी आम्ही कोठे जायचे, असा सवाल करत कारवाईला विरोध केला. त्यांच्याकडे असलेला तिकिटाचा ट्रे, तिकिटांची रक्कम व इतर बाबींची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, मध्यवर्ती बस स्थानकावरील विश्रामगृह सोडण्याचे आदेश विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार व इत अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर कामगारांचा रोष वाढत असल्याने अधिकाऱ्यांनी माघार घेतली.
तीन दिवसांपासून एसटी बस स्‍थानकावर मुक्काम करावा लागलेल्या कामगारांसाठी स्थानिक कामगारांनी लक्ष्मीपूजनानिमित्त गोड जेवणाची तयारी केली. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात ताटावर बसल्यावर अश्रु आले. प्रशासनाच्या अटेलतट्टू भूमिकेमुळे कुटुंबापासून दूर राहून दिवाळी साजरी करावी लागत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. संपादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाल्याने यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला. सिडको बस स्‍थानकावर मुक्काम केलेल्या चालक-वाहकांना हुसकवून देण्यासाठी पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत. यामुळे कामगारांना आंघोळीसाठी पाणी मिळाले नाही. पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागले. दरम्यान, एसटी महामंडळाला तीन दिवसात पावणे दोन कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. संपाची संधी साधून खासगी वाहतूकदारांची जादा दर आकारणी सुरूच ठेवली आहे. गुरुवारी रेल्वेला प्रचंड गर्दी होती.

कामगारांचे प्रश्न
- खासगी शिवशाही बस चालकाला १८ हजार पगार आहे. मग, एसटी कामगाराला पगार का नाही.
- कोर्टाने संप कायदेशीर ठरवल्यानंतरही कामगारांना विश्रामगृहातून बाहेर का काढले जात आहे.
- एसटी तोट्यात असताना वायफाय सुविधेवर शंभर कोटींपेक्षा जास्त खर्च कशाला
- मराठी दिनावर शंभर कोटीचा खर्च का
- स्वच्छतेसाठी कोटयवधीचे कंत्राट एकाच कंपनीला का दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेसोबत करार तरही भाजपकडून बैठकीचा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी महापौर निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी, मुख्यमंत्री काय म्हणाले हे माहिती नाही, असे सांगत शिवसेनेसोबत बैठक घेऊनच निर्णय सांगू, अशी भूमिका घेतली आहे. यावरून भाजपमध्येच एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे. पद वाटपाचा युतीत करार झालेला असताना भाजपने चर्चेचा घाट घातला आहे. बैठक कधी होणार, महापौरपदाची निवडणूक लढविणार का, या प्रश्नांना बगल देत दानवे यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.
येत्या २८ ऑक्टोबर रोजी भाजपचे भगवान घडमोडे यांची महापौरपदाची मुदत संपत असल्याने २९ ऑक्टोबर रोजी महापौरपदाची निवडणूक होत आहे. शिवसेनेने उमेदवार जाहीर केला असून युतीमधील करारानुसार हे पद शिवसेनेकडे व भाजपकडे पुढील अडीच वर्ष उपमहापौर राहणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष दानवे यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेसोबत बैठक घेऊन चर्चा करून निर्णय जाहीर करू, असे उत्तर दिले. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत जाण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या होत्या. याची आठवण करून दिल्यानंतर मुख्यमंत्री काय बोलले माहिती नाही, प्रदेशाध्यक्ष म्हणून शिवसेनेसोबत चर्चा करूनच निर्णय जाहीर करू, असा पुनरुच्चार त्यांनी केला. बैठक केव्हा होणार, स्वबळावर निवडणूक लढविणार का, आदी प्रश्न उपस्थित होताच त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.
दरम्यान, एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. पुन्हा चर्चा करून संपाबाबत मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेशाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रवक्ते शिरीष बोराळकर, महापौर भगवान घडमोडे, कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, राजु शिंदे आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकीत अव्वल

ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात भाजपच अव्वल पक्ष ठरला आहे. भाजपचे सरपंच तीन हजार ८५ ठिकाणी असून दुसऱ्यास्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ८२० सरपंच विजयी झाले. काँग्रेसने ७२० सरपंच निवडून आलले तर, शिवसेना ६२६ सरपंच निवडून आणत चौथ्या स्थानी आहे, असा दावा प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी केला. इतर पक्षांकडून दावे-प्रतिदावे होत असल्याने त्यांना उत्तर देण्यासाठी पुणे येथील बालेवाडीत लवकरच राज्यातील सरपंचाची परिषद आयोजित केली जाणार आहे. नांदेड महापालिकेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पण, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मागील वर्षीपेक्षा चांगली मत मिळाली व जागा वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाकरी, चटणी खाऊन गटसचिवांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वेतन थकबाकी व इतर मागण्यांसाठी तालुक्यातील ५४ गटसचिवांनी येथे धरणे आंदोलन केले. ऐन दिवाळीत पगार न मिळाल्याने गटसचिवांनी आंदोलनाच्या ठिकाणी भाकरी व चटणी खाऊन शासनाच्या धोरणाचा निषेध करत शासनाविरुद्ध घोषणा दिल्या.
गटसचिवांचे थकित वेतन त्वरित मिळावे, वेतनाबाबत हायकोर्ट व सहकार आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन व्हावे, संस्थांना एक टक्का सानुग्रह अनुदान द्यावे या मागणीसाठी तालुक्यातील ११५ विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या गटसचिवांनी गुरुवारी वैजापूर येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी सहकार अधिकारी एम. एम. गढवे यांनी आंदोलकांची भेट घेतली. वैजापूर तालुक्यातील ११५ विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा कारभार ५४ गटसचिवांकडे आहे. पण मागील तीन ते सहा वर्षांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. हायकोर्टाने गटसचिवांच्या पगारापोटी पगार वर्गणी जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याने सचिवांचे पगार थकले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष शेकनान निघोटे, उपाध्यक्ष अशोक साळुंके, सहचिटणीस मधुकर वाणी, एस. एस. नागमवाड, एस. आर. घोडके, एम. एस. पगार, बी. बी. सोमवंशी, भगवान उगले, ए. आर. बरबडे, एस. एम। सोमवंशी, एल. के. डोंगरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

शासनावर आरोप

सचिवांनी कर्जमाफीचे सर्व काम केले असून जिल्हा बँकेला हवी असलेली सर्व माहिती सादर केली आहे. त्यानंतरही शासन पगारासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images