Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बसच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
रस्ता ओलांडताना बसच्या चाकाखाली येऊन एकाचा मृत्यू झाला. हा अपघात सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील म्हसला फाटा येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजता झाला. दत्तू महादू सोळुंके (वय ५०, रा. म्हसला खुर्द ता. सिल्लोड), असे मृताचे नाव आहे.
दत्तू सोळुंके सिल्लोड येथून मोटारसायकलवरून आले व म्हसला फाटा येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. मोटारसायकल उभी करून ते रस्ता ओलांडताना कन्नड आगाराची कन्नड-सिल्लोड (एम एच २० बी एल ०९६३) बस आली. सोळुंके हे बसच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाले. त्यांना घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने सिल्लोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण गंभीर जखमांमुळे त्यांचा वाटेतच भराडीजवळ मृत्यू झाला झाला. अपघातानंतर बसचालक रामहरी रामकिसन सोनवणे (वय ४३, रा. निभोंरा ता. कन्नड), हे बस सोडून सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून बस सिल्लोड येथे आणली. या प्रकरणी बसचालक सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वाचकोत्सवाची परंपरा सुरू करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव भरवणे हा स्तुत्य उपक्रम आहे. यातून वाचक चळवळ वाढले, पण यापुढे वाचकोत्सवही सुरू करावेत. गावागावांतून यासंबंधी दवंडी पिटून तेथील ग्रंथालयात ही चळवळ रुजवावी. नागरिकांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करावे, असे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे नूतन कॉलनीजवळील समर्थनगर येथे असलेल्या शासकीय विभागीय ग्रंथालय परिसरात दोन दिवसांच्या ‘औरंगाबाद ग्रंथोत्सव-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक ना. वि. देशपांडे, ग्रामीण साहित्यीक धोंडिरामसिंह राजपूत, धर्मदाय आयुक्त श्रीकांत भोसले यांच्यासह निवासी ‌उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावडे व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बागडे म्हणाले, ‘लहान मुलांनी अवांतर वाचनावर भर द्यावा. शास्त्रज्ञ, लेखक, साहित्यिक व्हावे. यासाठी भरपूर वाचन, जनरल नॉलेज मिळवणे आवश्यक आहे.’ ‘उपस्थित असलेल्या कोणाकोणाला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव माहिती आहे,’ असे विचारून बागडे यांनी लहान मुलांची परीक्षा घेतली. ‘वाचनसंस्कृती, ग्रामीणसंस्कृती आणि सध्या बदलत चाललेल्या टीव्ही, इंटरनेटच्या युगात स्वत:ला सिद्ध करा,’ असे आवाहन केले.

प्राचार्य बोराडे यांनी, वाचनंस्कृती वाढावी यासाठी मी काही बक्षिस योजनाही सुरू केल्याचे सांगून आता बालकांसाठी लिखाण करत असल्याचे सांगितले. बाबा भांड, विश्वंभर गावंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. अशोक गाडेकर यांनी प्रस्तावना केली. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.

लोकप्रतिनिधींची पाठ
ग्रंथोत्सवाच्या प‌त्रिकेत छापलेल्या व उ‌पस्थित राहतील, असा उल्लेख केलेल्या प्रमुख पाहुण्यांनी मात्र या ग्रंथोत्सवाकडे पाठ फिरवली. यात खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, महापौर, जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश होता. या ग्रंथोत्सवात २१ प्रकाशकांची दालने आहेत.

भजनीमंडळ आणि मुले
ग्रंथोत्सवाचे उदघाटन सकाळी १०.३० वाजता करण्यत आले. तत्पूर्वी ९ ते १० यावेळेत क्रांती चौक ते समर्थनगर ग्रंथोत्सव स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सामील झाले होते. त्यांच्याशिवाय शहरातील काही भजनीमंडळांनी सहभाग नोंदवला.

आज समारोप
शनिवारी सकाळी ११ ते दुपारी दोन यावेळेत ‘ग्रंथाने मला काय दिले’ या विषयावर परिसंवाद होईल. डॉ. दिलीप यार्दी अध्यक्षस्थानी असतील. यानंतर ग्रंथ वाचक गौरव, ग्रंथोत्सव सहभाग प्रमाणपत्र वाटप होईल. दुपारी तीन ते चारदरम्यान काव्यवाचन होईल. रामदास गवळी अध्यक्षस्थानी असतील. समारोप कार्यक्रम सायंकाळी चार वाजता सुरू होईल, यावेळी अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, सहायक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल र. सु. ठाकूर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुभाष सोळंके आदींची उपस्थिती असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट औरंगाबाद’साठी डिसेंबरचा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्टसिटी प्रकल्पाची कामे डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहेत. शासनाने या कामांसाठी डिसेंबर अखेरची डेडलाइन दिली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीत स्मार्टसिटीचे काम सुरू करावे लागणार आहे. दरम्यान, स्मार्टसिटी प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘पीएमसी’ने (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट) पाच प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपाआर) तयार केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी योजनेत औरंगाबाद शहराचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला. स्मार्टसिटीसाठी महापालिकेच्या माध्यमातून ग्रीन फिल्ड आणि पॅनसिटी ही कामे केली जाणार आहेत. या कामासाठी स्पेशल पर्पज व्हेकलची (एसपीव्ही) देखील स्थापना करण्यात आली आहे. ‘एसपीव्ही’चे अध्यक्ष म्हणून राज्य शासनाने सचिवस्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाणार आहे. शासनाने उद्योग खात्याचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली होती. एक महिन्यापूर्वी चंद्रा यांच्या जागी सुनील पोरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रा यांच्या उपस्थितीत ‘एसपीव्ही’च्या दोन बैठका झाल्या, पण त्यातून स्मार्टसिटीच्या कामांना गती मिळाली नाही. पोरवाल यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांच्या उपस्थितीत ‘एसपीव्ही’ची अद्याप बैठक झालेली नाही. मुंबईत शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) मुंबईत बैठक होणार होती, पण ती रद्द झाली. नोव्हेंबर महिन्यात ‘एसपीव्ही’ची बैठक होईल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; स्मार्टसिटी प्रकल्पातील कामांना डिसेंबरअखेरपर्यंत सुरुवात करा, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात स्मार्टसिटी योजनेच्या कामांचा नारळ फुटण्याची शक्यता आहे. स्मार्टसिटी योजनेची कामे करताना ग्रीन फिल्ड प्रकल्पाला दुय्यम स्थान दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे साडेपाचशे एकरात ग्रीन फिल्ड विकसित केली जाणार आहे. त्यासाठी ‘एसपीव्ही’ला भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादनाचा तपशील अद्याप ठरलेला नसल्यामुळे स्मार्टसिटी योजनेचे काम पॅनसिटी प्रकल्पापासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पॅनसिटीमध्ये प्रामुख्याने ट्रॅफिक मोबिलिटी (शहरबस सेवा), घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट सिग्नलिंग, सोलार पॅनल्स या पाच कामांना डिसेंबरमध्ये सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. स्मार्टसिटी योजनेसाठी ‘सीएचटूएमएल’ या कंपनीची पीएमसी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, कंपनीने या पाचही कामांसाठीचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एसपीव्हीच्या बैठकीत डीपीआरला मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे.

२७६ कोटी मिळाले
स्मार्टसिटी प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी महापालिकेला २७६ कोटी रुपये दिले आहेत. या निधीतून ग्रीन फिल्ड आणि पॅनसिटी ही कामे करण्यात येणार आहेत.

ट्रॅफिक मोबिलिटी ः औरंगाबादेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. स्मार्टसिटी प्रकल्पात शहर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

घनकचरा व्यवस्थापन ः रोज जमा होणाऱ्या सुमारे ३५० ते ४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प स्मार्टसिटीअंतर्गत उभारण्याचे नियोजन आहे. शहरातील कचऱ्यापासून खतनिर्मिती किंवा वीजनिर्मितीचे नियोजन आहे.

स्मार्ट पार्किंग, स्मार्ट सिग्नलिंग ः वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी, वाहततळाचा प्रश्न सुटावा म्हणून पोलिसांच्या मदतीने प्रमुख बाजारपेठा, मुख्य रस्ते, वर्दळीचे चौक याठिकाणी स्मार्ट पार्किंग व सिग्नलिंगची व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

सोलार पॅनल ः स्मार्टसिटी प्रकल्पात सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह पाणीपुरवठा योजनेतील पंप हाउस, जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करण्याचे नियोजन आहे. सध्या पाणीयोजनेचे वीज बील सुमारे ७० कोटींपर्यंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील अनेक व्हेंटिलेटर गतप्राण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) २५पेक्षा जास्त व्हेंटिलेटर नादुरुस्त झाले असून, अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यातील अनेक व्हेंटिलेटर चालू-बंद स्थितीत असतात आणि कधी बंद पडतील, याची कोणतीही शाश्वती नसल्याने गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी शल्यचिकित्साशास्त्र (सर्जरी) विभागाच्या ‘एसआयसीयू’तील आठपैकी तब्बल सात व्हेंटिलेटर अर्धवट स्थितीत कसे-बसे सुरू आहेत आणि एक व्हेंटिलेटर पूर्णपणे नादुरुस्त झालेले आहे. वार्षिक देखभालीचे पैसे थकल्यामुळे कंपनीने दुरुस्तीसाठी चक्क हात वर केल्याची स्थिती अनेक महिन्यांपासून कायम आहे.

घाटी ही संपूर्ण मराठवाड्याची ‘मदर इन्स्टिट्यूट’ आणि गोरगरीबांचा मोठा आधारस्तंभ मानला जातो. तब्बल १२ ते १४ जिल्ह्यांतील रुग्ण घाटीमध्ये दररोज उपचारासाठी येतात. घाटीच्या बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या दररोजच्या रुग्णांचा आकडा हा सुमारे तीन हजार आहे आणि रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागात कधीही दीड ते दोन हजार रुग्ण दाखल असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयातील जीवनदायी उपकरणांची अवस्था मात्र अतिशय गंभीर आहे. कृत्रिम श्वसनयंत्रणेचे म्हणजेच प्राण शाबूत ठेवण्याचे महत्त्वाचे काम करणारे सुमारे २५ ते ३० टक्के व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सद्यस्थितीत बहुतेक विभागांमध्ये व्हेंटिलेटरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यातही औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, बालरोगशास्त्र, नवजात शिशू अतिदक्षता विभाग व इतर विभाग-वॉर्डांमध्ये व्हेंटिलेटरचा मोठा वापर होतो आणि त्यांच्याशिवाय या विभागांमध्ये रुग्णांवर उपचार करणे शक्य नसल्याचेही सांगण्यात आले.

‘टर्न-की-प्रोजेक्ट’चा बोजवारा
‘सर्जरी बिल्डिंग’मध्ये ‘एसआयसीयू’ म्हणजेच शल्यचिकित्साशास्त्र विभागाचा अतीव दक्षता विभाग हा ‘टर्न-की-प्रोजेक्ट’अंतर्गत उभा करण्यात आला खरा, परंतु विविध कारणांमुळे सुरुवातीची काही वर्षे हा विभागच कुलूप बंद अवस्थेत होता. त्यानंतर हा विभाग सुरू झाला, पण मेंदूशल्यचिकित्सक व अपेक्षित पायाभूत सुविधा नसल्याने मेंदूच्या मोठ्या शस्त्रक्रिया घाटीमध्ये कधीच झाल्या नाही व सध्याही तिच परिस्थिती कायम आहे. मात्र त्याशिवाय वेगवेगळ्या शस्त्रक्रिया विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर होतात आणि शस्त्रक्रियेपूर्वी, नंतर रुग्णांना ‘एसआयसीयू’मध्ये ठेवावे लागते. त्याशिवाय अपघातांतील गंभीर रुग्णांनाही ‘एसआयसीयू’मध्ये दाखल करावे लागते. अशा सर्व रुग्णांना व्हेंटिलेटर व विविध उपकरणांची फार मोठी गरज असते. ‘टर्न-की-प्रोजेक्ट’अंतर्गत उपकरणांची वॉरंटी दोन वर्षांची असते व नंतरच्या आठ वर्षांचा वार्षिक देखभालीला कंपनीशी करार करण्यात येतो, मात्र करार करण्यात आलेल्या कंपनीची २० लाखांपेक्षा जास्त रक्कम थकल्यामुळे कंपनीने दुरुस्तीच्या सेवा देणे बंद केले आहे. परिणामी, आठपैकी एक व्हेंटिलेटर पूर्णपणे बंद असून, इतर सात व्हेंटिलेटरलाही घरघर लागली आहे.

‘मेडिसिन’ला मोठा फटका
घाटीच्या औषधवैद्यकशास्त्र विभागामध्ये ५६पेक्षा जास्त व्हेंटिलेटर आहेत. त्यातील २० उपकरणे कायमस्वरुपी नादुरुस्त झाली आहे, परंतु तेवढ्या प्रमाणात विभागाला नवीन उपकरणे उपलब्ध झालेली नाहीत. यापैकी १७-१८ व्हेंटिलेटर एकट्या ‘एमआयसीयू’मध्ये आहेत, तरीही तेथे कायम वेटिंग असते. ‘आयसीयू’मध्ये दोन, डायलिसिस विभागात दोन, स्वाइन फ्लू वॉर्डात पाच आणि प्रत्येक वॉर्डात दोन अशी उपकरणे ठेवण्यात आली आहे, मात्र ही उपकरणे कमी पडतात. या विभागाला आणखी किमान २० उपकरणांची गरज आहे, असेही समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टापरगाव पुलावरून पडून दोन मित्रांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यातील टापरगाव येथील पुलावरील कठड्याला मोटारसायकल धडकून पुलाखाली फेकले जाऊन दोन जिवलग मित्र ठार झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान झाला. प्रकाश विठ्ठल बर्डे (वय २३) व श्याम किशन भगत (वय २२, रा. दोघेही माळीवाडा, ता. औरंगाबाद), अशी मृत तरुणांची नावे आहेत.
कन्नड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळीवाडा (दौलताबाद) येथील प्रकाश विठ्ठल बर्डे व श्याम किशन भगत हे दोन तरूण पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून (एम. एच. २० सी. पी. ७८४८) औरंगाबादकडे जात होते. यावेळी टापरगाव पुलाच्या कठड्याला जोरदार धडक बसल्याने दोघे पुलाखालील शिवना नदीपात्रात फेकले जाऊन मरण पावले, असा अंदाज आहे. ते पुलावरून खाली पडल्याने जागीच ठार झाले. या अपघातातील मोटारसायकल रस्त्याच्या मधोमध पडली असल्याने नंतर ती वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाजुला करण्यात आली.
अपघात झाला तेव्हा अंधार असल्याने पुलावरून खाली पडले तरूण कोणाच्याही नजरेस पडले नाहीत. त्यामुळे त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत. हा अपघात झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांच्या पहाटे लक्षात आले. त्यांनी हतनूरचे पोलिस पाटील, प्रकाश पवार व पोलिस मित्र संतोष ढोले यांना अपघाताची माहिती दिली. या मंडळीकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
अपघातातील धडकेमुळे मोटारसायकलच्या पुढच्या चाकाचे तुकडे झाल्याचे आढळून आले. हा भीषण अपघात पाहण्यासाठी टापरगाव पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली, अवैध जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक शाखेचे कर्मचारी एम. एम. माळी व वाहतूक पोलिस मित्र शांताराम सोनवणे यांनी वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळाला सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित वेंबरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. या दोन्ही मृत तरुणांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी केले, नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास बीट जमादार जयंत सोनवणे हे करत आहेत.

मृत तरूण नातेवाईक

अपघातातील मृत तरूण जिवलग मित्र हाते. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश बर्डे हे वाळूज एमआयडीसीमधील एका कपंनीत काम कर होते, तर श्याम भगत यांचे माळीवाड्यातच मोबाइल शॉपीचे दुकान होते. दोघे एकमेकांचे जवळचे नातेवाईक होते. श्याम हा एकुलता एक होता.

घाटातून अवैध जडवाहतूक
चाळीसगाव घाटातील जड वाहतूक जळगाव जिल्हा प्रशासनाने घाटातील खचलेला रस्ता दुरुस्तीसाठी जड वाहतुकीकरिता एक नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. घाटातून वेगमर्यादा ठरवून दुचाकी व हलक्या चारचाकी प्रवाशी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. पण, नियम डावलून घाट व महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवैध जड वाहतूक सुरूच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेक बाउन्सप्रकरणी उद्योजकाला कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कामगारांच्या कर्जाच्या थकीत रकमेची परतफेड करण्याच्या उद्देशाने दिलेला धनादेश न वटता परत आल्याने उद्योजक प्रकाश ज्ञानदेव घोगरे यास तीन महिन्यांचा कारावास व दहा लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला-अल-अमोदी यांनी ठोठावली.
वाळूजमधील ‘मे. घोगरे पाटील इंटरप्रायजेस’मधील कामगारांनी विश्वकर्मा नागरी सहकारी बँकेकडे घरगुती फर्निचर घेण्यासाठी कर्जाची मागणी केली होती. संबंधित कर्जासाठी ‘मे. घोगरे पाटील इंटरप्रायजेस’चा मालक प्रकाश घोगरे याने त्याच्या कामगारांना वेतन प्रमाणपत्रासह इतर दस्तावेज देऊन त्यांच्या कर्जाच्या परतफेडीसंदर्भात हमीपत्र दिले होते व २० कामागारांच्या कर्ज परतफेडीची जबाबदारी घोगरे याने घेतली होती. कामगारांनी कर्ज घेतले; परंतु कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र कर्ज घेतलेल्या कामगारांनी ‘घोगरे पाटील इंटरप्रायजेस’ची सेवा सोडल्याचे बँकेच्या निदर्शनास आले व त्यांचा ठावठिकाणा लागला नाही म्हणून बँकेने कर्जाचे हमीदार घोगरे याला कर्ज फेडीची नोटीस बजावली. कर्जफेडीसाठी घोगरे याने धनादेश दिला; परंतु तो वटला नाही. बँकेने घोगरे यास अॅड. रामनाथ चोभे यांच्या वतीने सूचनापत्र पाठवले. त्यानंतरही घोगरेने धनादेशावरील रक्कम परत केली नाही म्हणून बँकेने कलम १३८ अन्वये फौजदारी प्रकरण कोर्टात दाखल केले.

तर आणखी महिन्याची शिक्षा

खटल्यावेळी, बँकेकडून पुसाराम आवटे यांची साक्ष नोंदविण्यात आली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला तीन महिने कारावासाची शिक्षा व तीन महिन्यात दहा लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी अड. रामनाथ चोभे यांना अड. किर्ती इंगोले व अॅड. शीतल अनवडे-कुमावत यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाहीचा पुणेमार्गे मुंबईला जाणार

$
0
0

शिवशाहीचा पुणेमार्गे मुंबईला जाणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
औरंगाबाद ते मुंबई मार्गावर शिवशाही बस सुरू करण्यात आल्यानंतर अवघ्या २० दिवसांच्या आत या बसचा मार्ग बदलावा लागला. ही बस आता पुणेमार्गे धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. गुरुवारी रात्री ही बस पुणेमार्गे पाठविण्यात आली.
गेल्या ५ ऑक्टोबर रोजी औरंगाबादला नवीन शिवशाही बस देण्यात आली. ही बस नाशिकमार्गे धावत होती. पाच ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत या बसला प्रवासी कमी मिळाले. त्यामुळे या मार्गावर बस चालविणे तोट्याचे ठरेल हे लक्षात आल्याने बसचा मार्ग पुण्याकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद - नाशिक - मुंबई जाणाऱ्या ६११ रुपये तिकिट ठेवण्यात आले होते. गुरुवार (२६ ऑक्टोबर) रात्री ही बस औरंगाबाद - पुणे- लोणावळा - दादर - मुंबई सेंट्रल या मार्गे धावली. या मार्गावर प्रवासी जास्त मिळतील, नियमित बसवरील भारही काहीसा कमी होईल, हे लक्षात घेऊनच शिवशाही बस पुणे मार्गावरून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विभाग नियंत्रक रा. ना. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कट्ट्याने खुनाचा प्रयत्न; व्यापाऱ्यास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रोड रोलर खरेदीचा सौदा हातातून गेल्याच्या रागातून एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सुपरवायझरचा देशी कट्ट्याने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्याला पाच वर्षे सक्तमुजरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजान यांनी शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) ठोठावली.
या प्रकरणी अरोरा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर राजेश रामगोपाल भाटिया (३७, रा. श्रीराम रेसिडेन्सी, सातारा, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादी व आरोपी दिलीप आत्माराम खत्री (वय ४१, रा. सिंधी कॉलनी, औरंगाबाद) हे दोघेही मूळ उत्तर प्रदेशातील असून, खत्री हा पूर्वी अरोरा कन्स्ट्रक्शनमध्ये नोकरीला होता. नोकरी सोडून खत्रीने स्वतःचा रोड रोलरचा व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान, वाशिमचे कंत्राटदार कपूर यांनी विक्रीसाठी काढलेले रोड रोलर खरेदी करण्यासाठी अरोरा कन्स्ट्रक्शनतर्फे फिर्यादीला वाशिम येथे पाठवले होते. ते १८ जुलै २००७ रोजी तेथे पोहोचले असता, आधीपासूनच खत्री रोड रोलर खरेदीचा सौदा करत होता. पण, फिर्यादी पोहोचल्यानंतर आरोपीचा सौदा फिसकटला आणि फिर्यादीने रोड रोलर खरेदी केला. ते घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीने आरोपीने घरी येऊन फिर्यादीची चौकशी केल्याचे सांगितले. थोड्यावेळाने आरोपी हा आरोपी गिरीश तेजवाणी (रा. मूळचा गाझियाबाद) याच्यासह दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादीला घराबाहेर बोलावले. ते घराबाहेर आल्यानंतर, ‘रोड रोलरचा सौदा तोडून चांगले केले नाही’, असे म्हणत शिविगाळ केली. त्याचवेळी खत्रीचा साथीदार तेजवाणीने कमरेला लावलेला देशी कट्टा काढून फिर्यादीच्या दिशेने ताणला आणि खटका ओढणार तोच दोघांत झटापट झाली आणि त्यात देशी कट्टा खाली पडला. फिर्यादीने आरडाओरड सुरू केल्याने परिसरातील नागरिक जमा झाल्याने आरोपी पळून गेले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यामध्ये कलम ३०७, ३४ सह आर्म्स अक्टच्या कलम ४, ५, २५, २७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागून यांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

कट्टा होता गोळ्यांनी भरलेला

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. आरोपींनी फिर्यादीच्या दिशेने रोखलेला देशी कट्टा गोळ्यांनी भरलेला होता, हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यावरून आरोपी हे खून करण्याच्या तयारीने आल्याचे स्पष्ट होत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी खत्री याला कलम ३०७ अंतर्गत पाच वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुनावणीदरम्यान आरोपी तेजवाणी याचे निधन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रो-कबड्डीच्या मैदानात औरंगाबादकर पंच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रो-कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून सरस्वती मुंडे हा चेहरा घरोघरी पोचला आहे. महिला पंच म्हणून सक्षमपणे भूमिका बजावणारी सरस्वती मुंढे ही औरंगाबादची तसेच मराठवाड्यातील पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे.

औरंगाबादेतील वसंतराव नाईक महाविद्यालयात बीएचे शिक्षण घेतल्यानंतर सरस्वती मुंढेने बीपीएडचे शिक्षण घेतले. दहावीपर्यंतचे तिचे शिक्षण उद्धवराव पाटील शाळेत झाले. नागेश्वरवाडीतील उदय कॉलनीत २१ वर्षे वास्तव्यास असलेली सरस्वती मुंढे ही सध्या राजस्थानातील चुरू येथे एनआयएस कबड्डी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या कबड्डी संघातून खेळताना सरस्वतीने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत नाईक कॉलेजला दोन वेळेस विजेतेपद मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा राहिला आहे. आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेतही तिने दोनदा सहभाग घेतला. सात वर्षे तिने कबड्डी खेळाचे मैदान गाजवले.

एक खेळाडू म्हणून नावारूपास आल्यानंतर तिने कबड्डी खेळातच करिअर करण्याच्यादृष्टीने एनआयएसचे प्रशिक्षणही घेतले. प्रो-कबड्डी स्पर्धेत यंदाच्या हंगामात सरस्वती मुंढेला प्रथमच पंच म्हणून भूमिका बजावण्याची संधी मिळाली. या प्रवासाबद्दल ‘मटा’शी संवाद साधताना सरस्वती मुंढे म्हणाली, ‘प्रो-कबड्डीत पंच म्हणून निवड होणे ही सोपी गोष्ट नव्हे. तीन-चार वेळेस चाचणी होते. लेखी परीक्षा व प्रात्यक्षिक घेतले जाते. यातून उत्तीर्ण झाल्यानंतर शिबिर होते. फिटनेस टेस्टही पास होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रो-कबड्डी स्पर्धेमुळे कबड्डीपटूंसोबत अन्य गोष्टींतही करिअर करण्याची संधी वाढल्या आहेत.’

कबड्डीचे सामने बहुतांश ठिकाणी मातीच्या मैदानावर होतात, परंतु दर्जेदार स्पर्धा आता मॅटवर होतात. त्यामुळे खेळाडूंचा कस लागत आहे. स्पर्धात्मक वातावरण अधिक चुरशीचे झालेले आहे. मॅटवरील कबड्डी ही अतिशय आव्हानात्मक आहे. प्रो-कबड्डीमुळे कबड्डी खेळाला एक ग्लॅमर प्राप्त झाले आहे. त्यामुळेच कबड्डीपटू आता करिअरच्यादृष्टीने या खेळाकडे पाहात आहेत, असे सरस्वती मुंढेने सांगितले.

औरंगाबादेत कबड्डी खेळत असताना वसंतराव नाईक महाविद्यायाचे प्रा. युवराज राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. मराठवाड्यात अद्यापही खेळापेक्षा शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते. खेळाबरोबरच शिक्षणही तेवढेच आवश्यक आहे. नोकरी मिळवताना खेळातील कौशल्याबरोबरच शिक्षणातील प्रगतीही महत्त्वाची ठरते. प्रगतीसाठी आपला प्रदेश सोडून जाण्याचीही तयारी ठेवावी लागते. त्यासाठी इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक झाले आहे, असे तिने आवर्जून सांगितले.

प्रो-कबड्डीत महिला पंच म्हणून सरस्वती मुंढे ही सुरेख कामगिरी करीत आहे. औरंगाबादच्यादृष्टीने ही अभिमानाचीच गोष्ट आहे. कबड्डीपटू म्हणून तिने सलग तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये औरंगाबादेच प्रतिनिधीत्व केले आहे. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून तिचा नावलौकिक होता. लेफ्ट साइड राइड करणारी ती खेळाडू होती. प्रो-कबड्डी स्पर्धेत तिला प्रथमच संधी मिळाली आहे. पंच म्हणून तिची कारकीर्द मोठी असेल यात शंकाच नाही.
- प्रा. युवराज राठोड, वसंतराव नाईक कॉलेज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाज परिवर्तनाची नांदी साहित्यातूनचः धानोरकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘साहित्य हा प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. माणूस घडविण्याचे कार्य साहित्य करते. पर्यायाने संपूर्ण समाजच साहित्यातून घडत जातो. परिवर्तनाची नांदी साहित्यातूनच होते. साहित्य, संस्कृतीचा हा वारसा जतन करून पुढील पिढीला द्यायला हवा,’ असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले.
‘साहित्य काव्यगंध’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून शुक्रवारी आयोजित पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात धानोरकर बोलत होत्या. हे संमेलन मौलाना आझाद संशोधन केंद्रात घेण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर हे संमेलनाध्यक्ष होते. पत्रकार पवन देशपांडे, साहित्यिका कांचन वीर यांच्यासह डॉ. दादा गोरे, विजयकुमार गवई, उर्मिला बांदीवडेकर, हरिदास कोष्टी, मदन देगावकर, यशवंत गायकवाड, शैलजा करोडे, उत्तरा अकोलकर, रमेश ठाकूर, गायिका सरिता नाईक, पूजा देडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ‘नव्या संवादाचा सेतू साहित्यातूनच होतो. साहित्यिक म्हणून आपण अधिक जबाबदार होणे ही काळाची गरज आहे,’ असे मत डॉ. तौर यांनी अध्यक्षीय भाषणातून मांडले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कविता वाचन, गायन, गझल, मुशायरा करण्यात आले. सागर काकडे, भूषण कटककर, सायराबानू चौगुले यांनी विविध सत्रांचे अध्यक्षस्थान भुषविले. गिरीश जोशी आणि कस्तुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले.

ई-बुकचे प्रकाशन

२०१६ मध्ये गजेंद काळे ढवळापुरीकर आणि राजेश खाकरे यांच्या पुढाकाराने ‘साहित्य काव्यगंध’ हा ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. या संमेलनाला राज्यातील साहित्यिकांनी उपस्थिती लावली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ओंजळ शब्द फुलांची’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनापूर्वी चारोळी, कवितालेखन, कथालेखन अशा आॅनलाइन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात सहभागींच्या साहित्याचे ‘चारोळी स्पर्धा’, ‘कविता स्पर्धा’, ‘कथा स्पर्धा’, ‘काव्यांजली’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय कुस्ती स्पर्धेत वाद

$
0
0

विभागीय कुस्ती स्पर्धेत वाद
खेळाडू, पालकांचा बाहेरगावच्या खेळाडूंवर आक्षेप
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विभागीय आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचा सलामीचा दिवस वादाने गाजला. विभागाबाहेरच्या गावातील खेळाडू स्पर्धेत खेळवल्यामुळे आमच्या मुला-मुलींवर अन्याय होत असल्याचा आक्षेप घेत पालकांनी शुक्रवारी कुस्त्या थांबवल्या. याबाबतचा निर्णय शनिवारी घेतला जाणार आहे.
विभागीय क्रीडा संकुलात विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. सायंकाळच्या सत्रात पालकांनी बाहेरगावच्या खेळाडूंना खेळवण्यावर जोरदार आक्षेप घेतला. या वादामुळे संयोजकांना कुस्त्या थांबवाव्या लागल्या. ही विभागीय स्पर्धा औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली व परभणी या पाच जिल्ह्यांपुरतीच मर्यादित असताना कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत.
या वादाबद्दल अनेक पालकांनी ‘मटा’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या. पालक रमेश थोरवे म्हणाले, ‘या स्पर्धेत माझे वैभव व गौरव हे दोन मुलगे खेळत आहेत. बाहेरगावच्या कुस्तीपटूंमुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांनी वर्षभर केलेली तयारी वाया जात आहे.’ शेख आझम यांचा शेख अरमान, तर गजानन यज्ञेकर यांचा सुरेश हा मुलगा या स्पर्धेत खेळत आहे. ७४ किलो, ६६ किलो या वजन गटात बाहेरगावच्या खेळाडू सहभागी झाले असल्याचा आरोप आहे. बाहेरगावच्या खेळाडूंचे आधारकार्ड हे त्यांच्या जिल्ह्यातील आहेत. आधार कार्ड नोंदणी घेण्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. परभणीचा कुस्तीपटू सोमनाथ श्रीखंडे म्हणाला, ‘मी ८४ किलो वजन गटात सहभागी झालो आहे. या गटात पहिल्याच फेरीत माझ्याविरुद्ध कोल्हापूरचा मल्ल होता. त्याविषयी मी आक्षेप घेतला. वर्षभर मी कठोर मेहनत घेतो. स्पर्धेच्यावेळी असा अनुभव आल्यास माझ्या तयारीवर पाणी पडत आहे. हा प्रकार बंद होण्याची गरज आहे.’
राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव डॉ. दयानंद भक्त यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भक्त म्हणाले, ‘माझ्यासमोर पालकांनी आक्षेप घेत कुस्त्या थांबवल्या. बाहेरगावच्या खेळाडूंना शाळा, कॉलेजात प्रवेश देऊन पदके जिंकता येतील. परंतु, मराठवाड्यातील कुस्तीपटू पुढे आला पाहिजे, त्याला पदके जिंकता आली पाहिजे, या विचारालाच हरताळ फासला जात आहे. नियम बरोबर असेलही. परंतु, मराठवाड्यात कुस्तीच्या सुविधा या पुणे, कोल्हापूरपेक्षा अपुऱ्याच आहेत. स्थानिक कुस्तीपटूंवर हा अन्यायच आहे. बाहेरगावच्या खेळाडूंवर निर्बंध टाकण्यासाठी नवा नियम करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने गांभीर्याने विचार व्हायला हवा. आर्थिक बिकट परिस्थितीशी सामना करीत अनेक खेळाडू वर्षभर कठोर मेहनत घेतात. या स्पर्धेत मोठ्या अपेक्षेने उतरतात. अशा प्रकारामुळे मराठवाड्यातील क्रीडा विश्वच धोक्यात आले आहे.’
जालन्यातील रामचरण पहेलवान आखाड्याचे १५ खेळाडू या स्पर्धेत खेळत आहे. त्यांना अशा प्रकाराचा सामना करावा लागत आहे ही दुर्देवी गोष्ट आहे. स्थानिक कुस्तीपटूंवर अन्याय होणार नाही असा सकारात्मक निर्णय संयोजक घेतील, अशी अपेक्षा गोपाल काबलिये यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन फिरकी गोलंदाजांची खेळी यशस्वी

$
0
0

तीन फिरकी गोलंदाजांची खेळी यशस्वी
कर्णधार अंकित बावणेची प्रतिक्रिया
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र संघासाठी रणजी स्पर्धेतील उत्तर प्रदेश संघाविरुद्धचा विजय अत्यंत मोलाचा आहे. या सामन्यात तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन खेळण्याचा निर्णय निर्णायक ठरला. महाराष्ट्र संघाचे प्रथमच नेतृत्व करताना मिळविलेला हा विजय माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणेने व्यक्त केली.
लखनौ येथे झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेश संघावर ३१ धावांनी विजय नोंदवला. या विजयानंतर ‘मटा’शी संवाद साधताना अंकित म्हणाला, ‘यंदाच्या रणजी स्पर्धेत महाराष्ट्राला पहिल्या सामन्यात अवघा एकच गुण मिळाला होता. त्यामुळे महाराष्ट्राला विजय हवा होता. लखनौच्या खेळपट्टीचा रागरंग पाहून मी तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश संघाने तीन वेगवान गोलंदाज खेळवले. या सामन्यात फिरकी गोलंदाजांनीच वर्चस्व गाजवले. तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन खेळण्याचा निर्णय यशस्वी ठरला, असे अंकितने सांगितले.
‘सामन्याच्या पहिल्या दिवशी शतकी खेळी करतानाच मला खेळपट्टीचा अंदाज आला होता. कर्णधार म्हणून मला जसे अपेक्षित होते, तसेच प्रत्येक सत्रातील खेळात घडत गेले. चिराग खुराणाने दोन्ही डावांत प्रत्येकी सहा विकेट्स घेत विजयात मोलाची कामगिरी बजावली. पहिलाच सामना खेळणाऱ्या जगदीश झोपेने लक्षवेधक गोलंदाजी केली. अक्षय दरेकरची कामगिरीही चांगली ठरली. रणजी हंगामातील प्रारंभीच्या टप्प्यात मिळालेला हा विजय संघाचे मनोबल उंचावणारा आहे. कर्नाटकविरुद्धच्या पुढील लढतीत याचा आम्हाला फायदा होईल, असे अंकित म्हणाला.
अंकितने या सामन्यात प्रथमच महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवताना संघाला विजय मिळवून दिला. ही माझ्यासाठी अत्यंत आनंददायी घटना आहे. माझ्या कारकीर्दीतील हा एक उत्कृष्ट विजय आहे. माझ्या वैयक्तिक शतकापेक्षा संघाचा विजय माझ्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. शुक्रवारी अखेरच्या सत्रात उत्तर प्रदेशला जिंकण्याकरिता ८५ धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे पाच विकेट्स होत्या. त्यावेळी मी अनुपम संकलेचाला गोलंदाजी दिली. त्याने एक विकेट घेतली. त्यानंतर मी पुन्हा फिरकी गोलंदाजांकडे चेंडू सोपवला. फिरकी गोलंदाजांनी उत्तर प्रदेशचे तळाचे फलंदाज झटपट गुंडाळून महाराष्ट्राला एक शानदार विजय मिळवून दिला, असे अंकितने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोव्हेंबरमध्ये चलो दिल्ली!

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘किमान वेतन १८ हजार, पेन्शन तीन हजार रुपये द्या यासह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत संसदेसमोर ९ ते ११ नोव्हेंबर रोजी लाखो कामगार धरणे आंदोलन करतील. याचाच भाग म्हणून शनिवारी बजाजनगर येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे,’ अशी माहिती कामगार नेते उद्धव भवलकर, सुभाष लोमटे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दहा मध्यवर्ती कामगार संघटना आणि ६५ विविध व्यवसायातील फेडरेशन यांनी एकत्र येत हे देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. केंद्र सरकार कामगार विरोधी व मालकधार्जिण धोरण राबवित आहे. कामगारांचा संपाचा अधिकार संपुष्टात आणण्याचा डाव आखला जात असून, नवीन धोरणात कामगारांना केव्हाही कामावरून काढून टाकणे, असंघटित क्षेत्रातील कामगार संघटित होऊच नये, युनियन बरोबर वाटाघाटी न करण्याचे एकतर्फी अधिकार मालकांना बहाल करणे अशा जाचक तरतुदी सरकार नव्या बिलात आणू पाहात असल्याचा आरोप कामगार नेत्यांनी केला. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे खासगीकरण केले जात आहे, त्यास विरोध म्हणून देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून समितीतर्फे शनिवारी बजाजनगर येथील शहीद भगतसिंग स्कूल मैदान येथे सायंकाळी चार वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे. यात सीटूचे राज्य अध्यक्ष अॅड. डी.एल. कराड, आयटकचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भालचंद कानगो, कष्टकऱ्यांचे नेते सुभाष लोमटे, इंटकचे नेते एम.ए. गफ्फार यांची भाषणे होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला कामगार नेते भीमराव बनसोड, सुभेदार सुखदेव बन, दामोधर मानकापे, बी. एल. वानखेडे, प्रकाश बनसोड, लक्ष्मण साक्रुडकर, रमेश हाके, मंगल ठोंबरे, देविदास कीर्तीशाही आदी उपस्थित होते.

तीन नोव्हेंबरला धडक मोर्चा
‘कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ तीन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांतीचौक येथून दुपारी १२ वाजता मोर्चास सुरुवात होईल,’ अशी माहिती भवलकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एएमआरडीए’साठी नागपूर पॅटर्न

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘औरंगाबाद महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात ‘एएमआरडीए’साठी एनएमआरडीएकडून (नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) माहिती घेण्यात येऊन त्याप्रमाणे मांडणी करण्यात येणार आहे. मुंबई येथील कार्यकारी समितीच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय झाला,’ अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

एएमआरडीएच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा गृहनिर्माण विभागाचे सचिव संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतील चर्चेची माहिती देताना डॉ. भापकर म्हणाले, ‘नागपूरसाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणाप्रमाणे काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद, नाशिक हे नागपूरनंतर घोषित झालेले प्राधिकरण आहे. त्यामुळे लोकसंख्या, कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध, गावांबाबत बैठकीत चर्चा झाली. नागपूर पॅटर्ननुसार काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, कारभार, नियंत्रण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चालणार असून, शहर परिसरातील ३१३ गावांचे नियंत्रण प्राधिकरणाकडे राहणार आहे. यासाठी नगररचना विभागाकडे कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे,’ असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. मुंबई येथे झालेल्या बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. भापकर, आयुक्त डी. एम. मुगळीकर, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, सिडकोचे मुख्य प्रशासक ओमप्रकाश बकोरिया, अर्थ, नगरविकास, गृहनिर्माण आदी विभागांचे सचिव उपस्थित होते.

नियोजनबद्ध विकासासाठी
सिडको झालर क्षेत्र, शेंद्रा औद्योगिक वसाहत, डीएमआयसी प्रकल्प, स्मार्ट सिटी योजनेत झालेल्या शहराच्या समावेशामुळे नियंत्रण प्राधिकरण महत्त्वाचे आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकनंतर औरंगाबाद शहर मेट्रोसिटीच्या दिशेने सरकत आहे, मात्र झपाट्याने वाढत असलेल्या शहरीकरणाचा नियोजनबद्ध विकास होत नाही. त्यामुळे एमएमआरडीए, पीएमआरडीएच्या धर्तीवर प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे.

३१३ गावांपर्यंत कार्यक्षेत्र; अतिक्रमणांचा शोध सुरू
‘महापालिका हद्द वगळून शहर परिसरातील ३१३ गावांपर्यंत प्राधिकरणाची हद्द राहणार आहे. या गावातील विकासावर प्रा‌धिकरणावर नियंत्रण राहणार असून, प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये झालेल्या अतिक्रमणांचा शोध घेऊन त्याची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे,’ असे डॉ. भापकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांना खैरे, सावेंनी घेतले फैलावर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘दोन वर्षांपासून स्मार्ट सिटीच्या कामांना गती नाही. शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही,’ असे म्हणत जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत समिती अध्यक्ष चंद्रकांत खैरे आणि आमदार अतुल सावे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी फैलावर घेतले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीसाटी आमदार अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर भगवान घडमोडे तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्यासह विविध विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

केंद्र शासनाच्या २८ योजनांचा आकृतीबंध विकास आणि समन्वय साधण्यासाठी दिशा या समितीची स्थापना करण्यात आली असली तरी शुक्रवारच्या बैठकीमध्ये बहुतांश विषय हे नागरी समस्येसंदर्भात होते. स्मार्ट सिटीसाठी २८१ कोटी रुपये आले, मात्र या प्रकल्पाची काहीच प्रगती झाली नाही. एप्रिल महिन्यापासून मिटींग झाली नाही. एकीकडे पैसा नाही असे म्हणायचे आणि पैसा असला तरी कामे करायची नाही असा प्रकार सुरू असल्यामुळे खासदार खैरे यांनी नाराजी व्यक्त करत स्मार्टसिटीचा पैसा वापरण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शहरात पाण्यासाठी नागरिकांची ओरड आहे. काही ठिकाणी एका आठवड्यानंतर पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. शहरात समांतर जलवाहिणी सुरू करण्याची गरजही खैरे यांनी व्यक्त केली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आमदार अतुल सावे यांनी एसटीपी प्लांटवरुन धारेवर धरले. शहरात सहा प्लांट तयार करण्याचे नियोजन होते. दोन प्लांट रद्द झाल्याने चार प्लांट उभारण्यात आले, मात्र यातून केवळ सव्वा कोटी रुपये शिल्लक राहिले यावर सावे यांनी आक्षेप घेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. यावेळी महापालिकेचे अधिकारी अफसर सिद्दीकी तसेच शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी उत्तर देत इतर प्लांटची क्षमता वाढवल्यामुळे खर्च वाढला असल्याचे सांगितले, मात्र यावरही सावे यांचे समाधान झाले नाही.

दांडीबहाद्दरांकडून मागवला खुलासा
शहरात भूमिगत गटार योजनेमुळे रस्ते खोदण्यात आले आहेत. हे खड्डे कोण बुजवणार असा सवाल करत खैरे यांनी शहरात केवळ खड्ड्यांसाठी एक अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले. बैठकीसाठी बहुतांश नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली व गैरहजर अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्याचे निर्देश दिले. यावेळी बैठकीच्या अखेरच्या टप्प्यात ग्रामीण भागातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आदर्श सांसद ग्रामसाठी निवडलेल्या वेरूळ, आडगाव, पालखेड व गाडे पिंपळगाव या गावातील कामांचा आढावाही घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीजबिलाची ३८ कोटींची थकबाकी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची ३८ कोटींची वीजबिल थकबाकी आहे. कित्येक महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झालेला आहे. जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यास अद्याप यश न मिळाल्याने शेकडो नागरिक त्रस्त आहेत.

महावितरणकडून ग्रामपंचायतींना वीजपुरवठा केला जातो. वीजबिलाची देयके ग्रामपंचायत प्रशासनाने भरणे अपेक्षित आहे, मात्र नऊ तालुक्यांमधील १३८७ कनेक्शनपोटी सुमारे ३८ कोटींची वीजबिल थकबाकी कित्येक वर्षांपासून थकित आहे. काही ग्रामपंचायतींकडून थोडीफार रक्कम भरून तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा सुरळीत करून घेतला, पण थकबाकीच्या रकमेबाबत मात्र काहीच तोडगा निघाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विभाग मिळून ३८ कोटी ४ लाख २३ हजार २३२ रुपये थकबाकी आहे. यापोटी महावितरणे अनेक ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झालेला आहे.

हा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत चर्चिला जात आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना झेडपीच्या अधिकाऱ्यांनी पत्र लिहून तोडगा काढण्याचे सूचविले होते, पण थकित रकमेच्या ठराविक रक्कम भरण्याबाबत पर्याय सूचविला गेला. ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या करातून ही रक्कम भरण्याबाबत चर्चा झाली, पण अद्याप काहीच निष्पन्न झालेले नाही. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पुरते कोलमडले आहे. याबाबत प्रशासनाच्या पुढाकाराने तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावज टप्प्यात आल्यास गारद करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
घोडा मैदान समोर आहे. सावज टप्प्यात आल्यास गारद केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला काविळ झाली आहे, असे म्हणतात तर भविष्यात कोण घाबरते ते बघा या शब्दांत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपच्या नेत्यांवर हल्ला केला.
शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार शुक्रवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफीच्या याद्या मोबाइलवर आहेत असे म्हणत शेतकऱ्यांना मुर्ख समजणाऱ्यांनी दाखवून द्यावे, आज देखील कोणत्याही प्रकारची यादी तयार नाही मग कोण मुर्ख आणि महामुर्ख आहेत हे सगळेच चांगले ओळखतात. शेतकऱ्यांना दिवाळीच्यापूर्वी कर्जमाफी देण्यात येईल असे जाहीरपणे सांगत फिरणाऱ्यांनी कोणाला तरी कर्जमाफी झाल्याचे दाखवून द्यावे, असेही खोतकर यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळाले असून जालना जिल्ह्यात ७० सरपंच तर ७१७ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे यांनी आयोजित केला होता. यावेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा भगवे फेटे बांधून संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये शिवसेनेला चांगले यश मिळाले असून गावा-गावांतून शिवसेना रुजली आहे. नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांची जबाबदारी वाढली असून ग्रामपंचायतीच्या कारभाराचा अभ्यास करून सरपंचांनी अधिकाराबरोबरच कर्तव्य पालन ही करावे. नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य हे शिवसेनेचे दुत आहेत. पवित्र भगव्या झेंड्याचा आणि शिवसेनाप्रमुखांच्या विचाराचा विसर पडू देऊ नका. निवडून आलेल्यांना खूप चांगली संधी मिळाली असून विरोधाच्या भानगडीत न पडता लोकांच्या कामाकडे लक्ष देऊन प्रतिमा स्वच्छ ठेवा.’

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर निकालावर दावे-प्रतिदावे करण्यात आली. १८८१ ग्रामपंचायत सदस्यांत शिवसेनेचे ७१७ आहेत तर ७० सरपंच आहे. हा आकडा खरा असून इतरांसारखा फुगवलेला नाही. जिल्ह्यातील दोन्ही जिल्हाप्रमुखांनी पक्ष संघटन मजबुत ठेवले. शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली. विविध लोकोपयोगी सामाजिक कार्यक्रम राबविले, असेही राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले.

यावेळी सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे यांनी सर्व सरपंच व सदस्यांना शुभेच्छा देत मनापासून काम करण्याचा सल्ला दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी सरपंचांनी नियोजनबद्ध काम करून विकास घडवून आणावा, तर माजी आमदार संतोष सांबरे यांनी जबाबदारी खूप वाढली असून जनतेने टाकलेल्या विश्वासाला पात्र व्हावे, असे सांगतिले.
प्रास्ताविक करतांना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले, ‘शिवसेना हा खेड्या-पाड्यात रुजलेला पक्ष असून सर्वसामान्यांसाठी धावणारा शिवसैनिक आहे. या पक्षात फाटक्या तुटक्या व सर्वसामान्यांना सत्तेत सहभागी होता.’ विभागप्रमुख यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सूत्रसंचलन जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ रस्त्यांसाठी मंत्रालयात लॉबिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्त्यांच्या टेंडरसाठी महापालिकेतील काही पदाधिकारीच लॉबिंग करीत असल्याचे वृत्त आहे. मर्जीतील कंत्राटदाराला घेऊन एका बड्या पदाधिकाऱ्याने मुंबईत मंत्रालयात जावून मनधरणी केल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शंभरपैकी पन्नास कोटींची कामे तरी पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील कंत्राटदाराला मिळतील असे मानले जात आहे.
राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून शहरात फक्त रस्त्यांचीच कामे करायची असा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांच्या कामाचे टेंडर महापालिकेने काही दिवसांपूर्वी काढले. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी प्री - बीड बैठक देखील झाली. या बैठकीला सुमारे पन्नास इच्छुक कंत्राटदार उपस्थित होते. त्यांनी काही सूचना केल्या. त्यांच्या सूचनांचा विचार पालिकेचे प्रशासन कितपत करणार हा प्रश्नच असल्याचे मानले जात आहे. दरम्यान प्री - बीड बैठकीला उपस्थित नसलेला, पण बड्या पदाधिकाऱ्यांच्या मर्जीत असलेल्या कंत्राटदाराने या बैठकीनंतर उचल खाल्ली आणि त्याच्यावर करण्यात आलेली कारवाई रद्द व्हावी यासाठी ‘त्या’ पदाधिकाऱ्यासह मुंबई गाठली. मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेवून कारवाई शिथिल करण्यासाठी मनधरणी देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मर्जीतल्या त्या कंत्राटदाराला रस्त्याचे टेंडर भरून काम करता आले नाही, तर ‘त्या’ पदाधिकाऱ्याने आणखीन दोन कंत्राटदार या कामासाठी तयार ठेवले आहेत. टेंडर भरण्याची शेवटची तारीख सात नोव्हेंबर असल्यामुळे अखेरच्या टप्यात ‘त्या’ पदाधिकाऱ्याच्या मर्जीतले कंत्राटदार आपले पत्ते उघड करण्याची शक्यता आहे.

...अन् चित्र बदलणार
दरम्यान रविवारी नवीन महापौरांनी निवड होणार आहे. त्यामुळे रस्ते कामांच्या टेंडर प्रक्रियेचे समीकरण या निवडीनंतर बदलेल असे मानले जात आहे. अनुभवी कंत्राटदारांनी टेंडर प्रक्रियेत सहभागी व्हावे, असा प्रयत्न काही अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना किती आणि कसे यश मिळेल याबद्दल पालिकेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ २०२०मध्ये चीन भारताशी युद्ध करेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘विविध छुप्या पद्धतीने त्रास देत, दमदाटी करून चीन २०२०मध्ये जगाला दाखविण्यासाठी भारताशी युद्ध करेल,’ असा दावा निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केला. ते शनिवारी प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात बोलत होते.

तापडिया नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर लष्करी अधिकारी जयंत महाडिक, संजय गायकवाड, रत्नाकर कुलकर्णी यांची उपस्थिती होती. ‘भारतासमोरील चीनचे आव्हान,’ या विषयावर बोलताना महाजन म्हणाले, ‘चीन भारताला आज विविध पातळीवर दमदाटी, धमकावण्याचा प्रयत्न करतो आहे. वेगवेगळ्या पातळीवर आव्हाने देत असलेल्या चीनशी दोन हात करण्याची भारताची ताकद आहे. आपली सुरक्षा व्यवस्था वेगवेगळ्या पातळीवर लढण्यास सज्ज असली तरी युद्धाचा विचार करता आपण अधिक सहज आणि सक्षम असणे महत्त्वाचे असते. सैन्यादलाचे बजेट वाढविण्याची गरज आहे. ज्यातून पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्यावर भर दिला जाईल. हवाई दलात अधिकाधिक विमानांची भर पडणे गरजेचे आहे.

चीनशी आर्थिक पातळवीर आज आपण कमी पडतो. अशावेळी आपल्याला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याचा आपल्या प्रगतीसाठी अधिक चांगला वापर करावा लागेल. त्याला सुरक्षेची जोडही गरजेची आहे. त्यातूनही आपण चीनवर मात देऊ शकतो. चीनचे आव्हान केवळ सीमेवर आहे असे नाही. याच बाबी लक्षात घेत प्रत्येक नागरिकानेही सैनिक बनून आपापल्या पातळीवर सजग असण्याची गरज आहे. खोट्या नोटा, अमली पदार्थांचा होणारा काळा बाजार, चीनी वस्तूंची खरेदी थांबवणे अशाबाबींमध्ये नागरिकाने आपली जबाबदारी ओळखत त्यांना रोखायला हवे.’
अध्यक्षीय भाषणात महाडिक म्हणाले, ‘चीन स्वतःला जगाचे सेंटर मानतो. जागाचे राजा असा अविभार्व आहे. अशा या देशाबाबत भारताने सजग, सबल रहायला हवे.’ प्रास्ताविक संजय गायकवाड यांनी केले.

घुसखोरी भारताला लागलेला कॅन्सर
ब्रिगेडियर महाजन म्हणाले, ‘भारतासाठी बांगलादेशी घुसखोरी चिंतेचा विषय आहे. हा देशाला लागलेला कॅन्सर आहे. आजपर्यंत सहा कोटी बांगलादेशीयांनी घुसखोरी केली आहे. येत्या काहीकाळात आणखी दोन कोटी बांगलादेशी भारतात येण्याची शक्यता आहे. कारण तेथील सुंदरबन हे पाण्याखाली जाण्याचे भाकित व्यक्त करण्यात आले आहे. तेथे राहणारे बांगलादेशी इकडेच स्थालांतरित होऊ शकतात. आज कोकणात मासेमारीच्या जहाजांवर काम करणाऱ्यांमध्येही नेपाळ, बांगालादेशींची संख्या वाढते आहे, ही बाब गंभीर आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर-उपमहापौर पदासाठी आज निवडणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक रविवारी (२९ ऑक्टोबर) रोजी होत आहे. या निवडणूकीत शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार नंदकुमार घोडेले व भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार विजय औताडे यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे बहुमत असून युतीला काही अपक्ष नगरसेवकांचा देखील पाठिंबा आहे.
महापालिकेचे विद्यमान महापौर भगवान घडमोडे व उपमहापौर स्मिता घोगरे यांचा कार्यकाळ शनिवारी (२८ ऑक्टोबर) संपला. त्यामुळे नवीन महापौर-उपमहापौरपदासाठी रविवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने महापौरपदासाठी नंदकुमार घोडेले यांना, तर भाजपने उपमहापौरपदासाठी विजय औताडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना-भाजपशिवाय एमआयएम व काँग्रेसने देखील आपले उमेदवार उभे केले आहेत. एमआयएमने महापौरपदासाठी अब्दुल नाईकवाडी यांना, तर उपमहापौरपदासाठी संगीता वाघुळे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने नगरसेवक अय्युब खान यांना महापौरपदाची तर अफसर खान यांना उपमहापौरपदाची उमेदवारी दिली आहे. याशिवाय रिपाइंच्या (डेमॉक्रेटिक) कैलास गायकवाड यांनी देखील उपमहापौरपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महापौर-उपमहापौरांच्या निवडीसाठी रविवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा सुरू होणार आहे. सभा सुरू झाल्यावर लगेचच उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यावर प्रथम महापौरपदासाठी आणि त्यानंतर उपमहापौरपदासाठी नगरसेवकांचे हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे. मतदान झाल्यावर लगेचच निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या सचिव विभागातून देण्यात आली.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना : २८
भाजप : २३
एमआयएम : २४
काँग्रेस : ११
बहुजन समाज पार्टी : ०५
राष्ट्रवादी काँग्रेस : ०४
रिपाइं (डेमॉक्रेटिक) : ०२
अपक्ष : १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images