Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अजुनी अनाथ एकनाथ; नूतनीकरण रखडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला जिल्हा प्रशासनाने खोडा घातला असून जिल्हा नियोजन समितीतून अशा कामांसाठी निधी देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उस्मानपुऱ्यातील संत एकनाथ रंगमंदिर हे महापालिकेचे शहरातील सर्वात जुने नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने पालिकेच्या कारभाराची लक्तरे राज्यपातळीवर टांगली गेली आहेत. सुप्रसिद्ध कलावंतांनी नाट्यगृहाची लक्तरे सोशल मीडियावर टांगल्यानंतर पालिकेच्या कारभाराची चिरफाड करणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. त्याची दखल थेट मातोश्रीने घेतली आणि स्थानिक आमदार, खासदारांना संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीत लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले. मातोश्रीचा आदेश असल्याने शिवसेनासुद्धा सक्रीय झाली. आमदार संजय शिरसाट यांनी संत एकनाथ रंगमंदिराला भेट देऊन आमदार विकास निधीतून नाट्यगृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी भेट देऊन २० लाखांचा निधी जाहीर केला. त्याचवेळी खासदार खैरे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांना दूरध्वनीवरून संपर्क करून नाट्यगृहाची अवस्था लक्षात आणून देत मातोश्रीचा आदेश असल्याचेही सांगितले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून नाट्यगृहाच्या नुतनीकरणासाठी दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
हा निधी दोन महिन्यानंतरही मिळालेला नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत संत एकनाथ रंगमंदिराचे नूतनीकरण व पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या दोन कोटींचा विषय खासदार खैरे यांनी उपस्थित केला. त्यावेळी नूतनीकरणाकरिता या पद्धतीने निधी देता येत नाही, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मधला मार्ग काढता येतो का यावर विचार करण्यात आला. नुतनीकरणाच्या ऐवजी देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी वापरता येणे शक्य असल्याचे लक्षात आले. देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने अंदाजपत्रक तयार करून दिले, तर निधी लगेच मिळू शकणार आहे. महापालिका प्रशासन त्वरेने अंदाजपत्रक देऊन निधी मंजूर करून घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौरांचे प्रशासनाला आदेश

संत एकनाथ रंगमंदिराच्या नुतनीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालिकेला देखभाल दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे लागणार आहे. खुर्च्या बदलणे, रंगरंगोटी, वातानुकूलीत यंत्रणा लावणे, रंगमंचाच्या तुटलेल्या फळ्या बदलणे आदी कामांचे एकत्रित अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना दिले आहेत.

यामुळे आली होती जाग

२० जुलै २०१६
संत एकनाथ रंगमदिरात नाट्यप्रयोगानिमित्त आलेले सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले नाट्यगृहाची अवस्था पाहून धक्काच बसला होता. दामले व सहकारी कलावंतांनी नाट्यगृहाची झाडलोट केली, जळमटे काढली, फाटलेल्या खुर्च्या सुईदोऱ्याने शिवून काढल्या. नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर जाहीर खंत व्यक्त केली होती. यावरून मोठे वादळ उठले होते. पण, त्यानंतरही पालिकेला जाग आली नाही.

५ ऑगस्ट २०१७
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुमीत राघवन यांनीही संत एकनाथ रंगमंदिराची लक्तरे सोशल मीडियावर टांगली. त्यांनी फेसबूक लाइव्ह करत नाट्यगृहाची अवस्थाच जगभरच्या नाट्यरसिकांसमोर मांडली. हा व्हिडिओ सुमारे सहा मिनिटांचा होता. यानंतरही पालिकेला गाढ निद्रेत राहिली पण, मातोश्रीला मात्र जाग आली. मातोश्रीवरून आदेश सुटल्यावर खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट आदींनी धाव घेतली. पालकमंत्री रामदास कदम यांनी नुतनीकरणासाठी दोन कोटींचा निधी जाहीर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रीय एकतेसाठी औरंगाबादकरांची धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी आयोजित राष्ट्रीय एकता दौडमध्ये शहरातील नागरिकांनी उस्ताहात सहभाग घेतला. ‘भारत माता की जय,’ ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषात राजकीय नेते, अधिकारी, शालेय विद्यार्थ्यांनी रॅलीमार्ग दणाणून सोडला.
राष्ट्रीय एकता दौडमध्ये सामील होणाऱ्यांच्या घोषणांनी मंगळवारची क्रांती चौक परिसरातील सकाळ घोषणांनी दुमदुमली. सुरुवातील विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. देशाची एकता, अखंडता, सुरक्षा अबाधित राहण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प करत सर्वांनी शपथ घेतली. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडले, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, अपर आयुक्त प्रल्हाद कचरे, उपायुक्त वर्षा ठाकूर, पारस बोथरा, सरिता सुत्रावे, रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, देवेंद्र कटके, शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसीलदार सतीश सोनी आदी उपस्थित होते.
या दौडमध्ये एसबीओए, होलीक्रॉस, लिटल फ्लॉवर, सेंट फ्रान्सिस, आयकॉन शाळेच्या विद्यार्थ्यांसह देवगिरी कॉलेज, पीइएस इंजिनीअरिंग, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काउट गाइडचे विद्यार्थी सामील झाले. ही दौड क्रांती चौक ते महावीर चौकपर्यंत काढण्यात आली. दौड संपल्यानंतर पालिकेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना पाणी, बिस्किटे देण्यात आली. दरम्यान, यावेळी वाहतूक वळ‍ण्यात आली होती.
भाजपतर्फे एकता दौड

भारतीय जनता पक्षातर्फे पैठण गेट येथून सकाळी एकता दौडचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, कचरू घोडके, अनिल मकरिये, उपमहापौर विजय औताडे, प्रमोद राठोड, जालिंदर शेंडगे, जगदीश सिद्ध, मनीषा भन्साली, अमृता पालोदकर, स्मिता दडवंते, ज्ञानेश्वर भंडारकर, अनंत भालकीकर आदींसह कार्यकर्ते सामील झाले.
पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक मार्गाने काढण्यात आलेल्या या एकता दौडची सांगता शहागंज परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेमुक्तीसाठी आता नोव्हेंबरअखेरचा वायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात मागविण्यात आलेल्या निविदांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने अनेक ठिकाणच्या निविदा दुसऱ्यांदा मागविण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर अखेरपर्यंत रस्ते खड्डेमुक्त होतील, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी पीडब्ल्यूडीने मागवलेल्या एकूण ८२ कोटी रुपयांच्या निविदांसाठी एकही परिपूर्ण प्रस्ताव आला नव्हता. दरम्यान, जीएसटी आणि डीएसआरच्या मुद्यावरून राज्यभरातील कंत्राटदारांनी बहिष्कार आंदोलन सुरू केले असून तीन महिन्यांपासून सरकारी कामे बंद आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामालाही याचा फटका बसला आहे. पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद विभागात दिवाळीपूर्वी कंत्राटदारांची बैठक घेतली, त्यात समाधान झाल्याचा दावा करून लवकरच खड्डे भरण्याची कामे सुरू होतील, असे सांगण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निविदा प्रक्रिया पुन्हा राबवली जात आहे, त्यानुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान औरंगाबाद व जालना जिल्ह्यात पाच रस्त्यांवर खड्डे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित कामेही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल आणि नोव्हेंबरअखेरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे भरले जातील, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना केला.

आदेशपूर्ती होईना

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन राज्यातील रस्त्यांसाठी एक हजार १८७ कोटी रुपये जाहीर केले होते. त्यातून ५२ हजार २३४ किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त केले जातील, असा दावा केला गेला. दोन टप्प्यांतील या कामांसाठी वेळापत्रक तयार केले होते. राज्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे १५ नोव्हेंबरपर्यंत आणि राज्य महामार्गावरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत भरण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, या आदेशाची पूर्ती नियोजित वेळापत्रकानुसार होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला रुग्णालयाच्या जागेसाठी पुन्हा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिकलठाणा परिसरातील केंब्रिज शाळेमागील जागा ही २०० खाटांच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आली होती; परंतु ही जागा स्मार्ट सिटीसाठी राखीव असल्याने पुन्हा एकदा जागेसाठी शोधाशोध सुरू झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी जिल्हा महिला रुग्णालय मंजूर होऊन तब्बल चार-साडेचार वर्षे लोटली आहेत. मात्र हॉस्पिटल सुरू होणे दूरच, जागासुद्धा मिळवता आलेली नाही. मिळालेली जागा नाकारण्याशिवाय आणि कागदी घोडे नाचविण्याशिवाय आरोग्य विभागाने काहीही केले नाही.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिला रुग्णालय कार्यरत आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी तसे हॉस्पिटल नसल्याने त्यास चार-साडेचार वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली. हॉस्पिटलसाठी जागा व ते सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नाहीत. विशेष म्हणजे, राज्य शासनालादेखील त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांमध्ये अनेकदा हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न निघाला आणि पालकमंत्र्यांनीही हा प्रश्न तात्काळ सोडवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतरही प्रश्न जैसे थे आहे.
सातारा व बीबी का मकबऱ्याजवळील जागा आरोग्य विभागाने नाकारल्यानंतर केंब्रिजशाळेमागील गायरान जमीन घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु संबंधित जागा स्मार्ट सिटीसाठी राखीव असल्याने मिळू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जागेसाठी शोधाशोध करण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत वाळूज परिसरात जागेसाठी आरोग्य विभागाचा ‘शोध’ सुरू असल्याचे समजते आणि हा शोध कधी ‘सार्थकी’ लागेल, हे आरोग्य विभागानुसार ‘यथावकाश’ कळेल, तोपर्यंत काही महिने-वर्ष लोटतील व जबाबदार अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील. त्यानंतर पुन्हा एकदा जबाबदार अधिकारी हात वर करण्यासाठी मोकळेच राहतील, अशी चिन्हे आहेत. शासनाची इच्छा असेल, तर जागा कोणत्याही क्षणी उपलब्ध होऊ शकते; परंतु शासनानेही कानाडोळा केल्याचे समोर येत आहे.

या जागा नाकारल्या

सातारा परिसरातील राज्य राखीव पोलिस दलाची सात एकर जागा देण्यासाठीही प्रयत्न झाले होते; परंतु ती जागा योग्य नसल्याचे कारण देत आरोग्य विभागाने नाकारली होती. त्याशिवाय शहरातील एका उद्योजकाने बीबी का मकबरा जवळील स्वतःची अधिकृत जागा देण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला होता. मात्र त्या जागेलाही आरोग्य विभागाने नकार दिला. त्यानंतर

‘मिनी घाटी’ निर्णयाविनाच
चिकलठाणा परिसरात टोलेजंग इमारत बांधून तयार असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) कधी सुरू करणार, याविषयी अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही. नोव्हेंबर सुरू झाला तरी ना ओपीडी सुरू झाली ना हॉस्पिटल. नोव्हेंबरअखेरपर्यंत मिनी घाटी सुरू करा, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिले असले तरी सध्यातरी कोणतीही हालचाल सुरू नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चिकलठाणा परिसरातील जागा राखीव असल्याने दुसऱ्या जागेचा शोध सुरू झाला आहे. हा प्रश्न लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडून जागा मिळवण्याचा प्रयत्न असेल.
– डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबससाठी २३ जानेवारीचा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका शंभर सिटीबसची खरेदी करून त्या चालवण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडरला देणार आहे. येत्या २३ जानेवारीला सिटीबस सेवा सुरू करण्याचे नियोजन असून, त्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.

‘अर्बन ट्रान्स्पोर्ट मोबिलिटी’ हा स्मार्टसिटी योजनेतील कामांचा एक भाग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरात सिटीबस सेवा सुरू करणे बंधनकारक आहे. महापौरपदी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांची निवड झाली. त्यांनी काही संकल्प जाहीर केले. त्यात सिटीबसचा समावेश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन आहे. या मुहूर्तावर ही सेवा सुरू करणार, असे त्यांनी आपल्या संकल्पात नमूद केले आहे. पालिका प्रशासनाला देखील त्यांनी या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या. पत्रकारांशी मंगळवारी बोलताना ते म्हणाले, ‘अर्बन ट्रान्स्पोर्ट मोबिलिटीसाठी १६८ कोटी रुपयांचा निधी आहे. त्यातून शंभर सिटीबस खरेदी करण्याचे नियोजन आहे. सिटीबस चालवण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्यामुळे या बस चालवण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडरकडे सोपविल्या जातील. सिटीबस चालवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सर्व्हिस प्रोव्हायडरच उभी करेल. त्यासाठी महापालिका आणि सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यात करार केला जाईल. बस खरेदी, सर्व्हिस प्रोव्हायडरची नियुक्ती व अन्य बाबींबद्दल प्रशासन योग्यती कार्यवाही करेल. सिटीबस सेवा २३ जानेवारी रोजी सुरू झालीच पाहिजे, असे टार्गेट ठेवण्यात आले आहे.’

पोरवालांना वेळ नाही
स्मार्टसिटी प्रकल्पासाठी शासनाने उद्योग खात्याचे सचिव सुनील पोरवाल यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे, पण त्यांच्या उपस्थितीत ‘एसपीव्ही’ची एकही बैठक अद्याप झालेली नाही. पोरवाल यांना वेळ मिळत नाही, असे कळाले आहे. पोरवाल एसपीव्हीच्या बैठकीला वेळ देत नाहीत ही बाब मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून देणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेयसीच्या पतीचा खून

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उमरगा शहरानजीक आढळलेल्या मृतदेहाचा २४ तासांच्या आत उलगडा झाला आहे. पोलीस तपासात त्या तरुणाचा खूनच झाला असल्याचे समोर आले. प्रियकरानेच साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केल्याची फिर्याद मृत व्यक्तीच्या पत्नीने दिल्यामुळे या कृत्याचा छडा लागला. या प्रकरणी चौघाविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून तो सासवड पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील सासवड येथील सचिन अरविंद चौधरी (वय २५) व पत्नी अर्चना हे दाम्पत्य २६ ऑक्टोबरच्या सायंकाळी बेपत्ता झाले होते. याप्रकरणी सचिन याचे वडील अरविंद यांनी मुलगा व सून हरवल्याची तक्रार सासवड पोलिसांत दिली होती. दरम्यान अर्चना ही २७ तारखेला उमरगा तालुक्यातील कडदोरा येथे नातलगाकडे आल्याचे समजताच सचिन याचे वडील अरविंद व सासवड पोलीस ठाण्याचे फौजदार बंडोपंत भागवत तेथे दाखल झाले. दरम्यान, रविवारी उमरगा शहरातील जकेकुर चौरस्त्यालगत तुरीच्या शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची उमरगा पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक माधव गुंडिले यांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे मयताची ओळख पटविली. सचिन याच्या डोक्यावर व कपाळावर गंभीर जखमा असल्याने हा खूनच असल्याचा पोलिसांना संशय होता. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर, त्याच्या अहवालानुसार सचिनच्या डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले. पोलिसांनी अर्चनाची चौकशी केली असता आरोपी विक्रांत जाधव (पुणे), शब्बीर, सलीम व आरिफ सर्व (रा. हैदराबाद) यांनी सचिनचा काटा काढल्याची कबुली दिली.
सचिन हा अरविंद चौधरी यांना एकुलता एक मुलगा होता. यापूर्वी एका मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता. तर एका मुलीने आत्महत्या केली होती. अर्चना हिचे विक्रांत याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, अर्चनाने विक्रांतशी बोलणे बंद केले. याचा राग मनात धरून सचिन व अर्चना या दोघांना सासवड येथून गुरुवारी सायंकाळी विक्रांत व त्याचे साथीदार शब्बीर, सलीम, आरिफ यांनी मारहाण करून कारमध्ये घालून पळवून नेले. रस्त्यात सचिनच्या डोक्यावर बाजूस, कपाळावर डाव्या बाजूस लोखंडी पाईपने मारले. त्याचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमधून उमरगा शहराजवळील तुरीच्या शेतात फेकून दिला. आरोपींनी अर्चनालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसआयपीतून लागला गुंतवणुकीचा लळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्वसामान्यांपासून उद्योजकांपर्यंत गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’चा (सिस्टिमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) पर्याय स्वीकारला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून दरमहा ६० कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली जात आहे. जिल्ह्यातील गुंतवणुकीदारांची संख्या अंदाजे एक लाख झाली आहे.
‘गेल्या वर्षी नोटबंदी, जीएसटी, रेरा आदी आर्थिक सुधारणा लागू झाल्यानंतर नागरिक, व्यापारी, उद्योजक, महिला व तरुणांचा गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. गुंतवणूक करताना आरटीजीएस, एनईएफटी आणि प्राप्तीकर विभागाचे निकष पाळले जात आहेत. फक्त औरंगाबादच नव्हे तर टीअर टू शहरांतून गुंतवणूक वाढत आहे,’ अशी माहिती गुंतवणूक सल्लागार राजेंद्र परोपकारी यांनी दिली. गुंतवणूकदारांमध्ये सेवानिवृत्त, नोकरदारांची संख्या अधिक आहे. सेवानिवृत्त मंडळी ‘बॅलन्स्ड फंड’द्वारे दरमहा उत्पन्न मिळ‍वत आहेत. तरुणांनीही टॅक्स सेव्हिंग्ज फंड, इक्विटी लिंक्ड सेव्ह‌िंग्ज स्कीम्स, म्युच्युअल फंडाची वाट धरली आहे. गुंतवणूकदार तरुणांची संख्या वाढत आहे. सध्या ४०हून अधिक कंपन्यांचे ९००हून अधिक योजना, शेकडो म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत, अशी माहिती परोपकारी यांनी दिली.

यामुळे गुंतवणुकीत वाढ

-एफडी, आरडीचे कमी व्याजदर
- बँकांपेक्षा फंडातून जादा परतावा
- ऑनलाइन सुविधांचा फायदा
- गुंतवणूकीचे पर्याय अधिक
- शेअरमार्केट, फंडांविषयी जागृती
- गुंतवणुकीच्या हमीसह शाश्वत परतावा

एसआयपीतून दोन-तीन वर्षांत गुंतवणूक वाढत आहे. जिल्ह्यात एक लाख गुंतवणूकदारांची नोंदणी असून त्यातून ६० कोटींची गुंतवणूक होत आहे. या एक लाख गुंतवणूकदारांपैकी सुमारे १० ते १५ टक्क्याहून अधिकजण एसआयपीद्वारे गुंतवणूक करत असतील, पण हा आकडा आणखी मोठा होतो.
-राजेंद्र परोपकारी, गुंतवणूक सल्लागार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तनीषा, अर्णवला विजेतेपद

$
0
0

तनीषा, अर्णवला विजेतेपद
राज्य बुद्धिबळ स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना येथे झालेल्या ११ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या तनीषा बोरामणीकर व रायगडच्या अर्णव नेहते यांनी अनुक्रमे मुलींच्या व मुलांच्या गटात विजेतेपद पटाकाविले.
या स्पर्धेत मुला-मुलींच्या गटात २१० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात साठ आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त खेळाडूंचा समावेश होता. जालना नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. दयानंद भक्त, मनीष बगडिया, विजय देशपांडे, मिलिंद देशपांडे, संजीव देशपांडे, शोभराज खोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रत्नाकर कुलकर्णी, सतीश ठाकूर, शाम काबुलीवाले, आत्मानंद भक्त, भिक्कुलाल सले, गोपाल काबलिये, गजानन जगताप आदींनी पुढाकार घेतला. पंच म्हणून अभिजीत वैष्णव, अमरीश जोशी, केशव लहाने, केदार कल्याणकर, दिपक कुमठाकर, नंदलाल बठेजा, प्रशांत नवगिरे, विनोद कदम, अमित तारे, धनराज पाटील, नीलेश बहाळकर आदींनी काम पाहिले. प्रशांत नवगिरे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य दयानंद भक्त यांनी आभार मानले.
अंतिम निकाल ः मुले - १. अर्णव नेहते (रायगड), २. अंश धनवीज (नागपूर), ३. अक्षित झा (ठाणे), ४. कौस्तुभ माकोने (पालघर), ५. प्रेरक दारवेकर (नागपूर), ६. नेगी ऑगस्तिया (पुणे), ७. व्यंकटेश धांडे (नागपूर), ८. अथर्व बंग (मुंबई), ९. कार्तिक टेटवार (औरंगाबाद), १०. श्लोक चंद्रानी (अकोला).
मुली - १. तनीषा बोरामणीकर (औरंगाबाद), २. समृद्धी कुलकर्णी (कोल्हापूर), ३. विहा शाह (मुंबई), ४. सिया कुलकर्णी (नाशिक), ५. सौख्या सावंत (ठाणे), ६. दिव्या पाटील (कोल्हापूर), ७. दिशा पाटील (कोल्हापूर), ८. हर्षिता काटे (कोल्हापूर), ९. आरना चौघ (मुंबई), १०. वृंदा राठी (नाशिक).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिया, संदेश, मानवचे सनसनाटी विजय

$
0
0

रिया, संदेश, मानवचे सनसनाटी विजय
राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संदेश कुरळे, मानव जैन, रिया भोसले यांनी मंगळवारी चौदा वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सनसनाटी विजयाची नोंद केली.
विभागीय क्रीडा संकुलातील एन्ड्युरन्स टेनिस सेंटरमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. मुलांच्या गटात संदेश कुरळेने आठव्या मानांकित विश्वेश पटेलचा ६-०, ५-७, ६-२ असा पराभव केला. मानव जैनने पंधराव्या मानांकित हसित गुम्मउलुरूवर ६-२, ६-४ अशी मात केली. चौदाव्या मानांकित सन्मय गांधीने प्रणव हेग्गरीला ६-१, ६-१ असे पराभूत केले. अनुप बंगार्गीने चुरशीच्या सामन्यात फरहान पत्रावालाला टायब्रेकमध्ये ४-६, ७-६, ६-४ असे हरवले. दहाव्या मानांकित यशराज दळवीने साहिल तांबटवर ६-१, ६-३ अशी मात केली.
मुलींच्या गटात रिया भोसलेने सोळाव्या मानांकित साई भोयरचे आव्हान ६-४, ६-३ असे संपुष्टात आणले. अव्वल मानांकित सुदिप्ता कुमारने अॅना जेकबचा ६-०, ६-१ असा सहज पराभव केला. तेराव्या मानांकित सानिया मसंदने हितवी चौधरीला ७-५, ६-१ असे नमवले.
अन्य निकाल ः मुले - क्रिशन हुडा वि. वि. दक्ष अगरवाल (६-२, ६-१), रोनिन लोटलीकर वि. वि. आकर्ष गावकर (६-१, ६-३), अजय सिंग वि. वि. प्रेमकुमार अर्जुन (६-३, ६-०), धन्या शहा वि. वि. फैज नस्याम (६-२, ६-२), चिराग दुहान वि. वि. जस्मित दुहान (६-०, ६-२).
मुली - रेनी सिंग वि. वि. नंदिनी दीक्षित (६-४, ६-३), रेनी सिंगला वि. वि. हर्षिता बांगेरा (६-४, ६-२), संजना सिरीमल्ला वि. वि. कशिश बोटे (६-०, ६-०).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सिनेटसाठी २६१ अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी विद्यापीठ विकास मंचने फेरी काढून उमेदवारी अर्ज भरले. क्रांती चौक ते विद्यापीठापर्यंत निघालेल्या फेरीत विविध शैक्षणिक संघटना आणि राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले. या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत २६१ उमेदवारांनी अर्ज भरले.

अधिसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सोमवारी विशेष गर्दी झाली. निवडणूक विभागात दिवसभर इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले. विद्यापीठ विकास मंचने क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरी काढली. विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरीचा समारोप करण्यात आला. चार जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विकास मंचाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या फेरीत स्वाभिमानी मुप्टा, बामुक्टा, माफ्टा, सेट-नेट संघर्ष समिती आणि शैक्षणिक महासंघ या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत उमेदवारांनी विचार मांडले. विद्यापीठाच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी आमदार अतुल सावे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, रमेश पोकळे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरूळे, डॉ. सचिन कंदले, व्यंकटेश लांब, संजय सांभाळकर, डॉ. गजानन सानप, डॉ. किशोर वाघ आदी उपस्थित होते.

दरम्यान, सिनेट निवडणुकीच्या पाच गणासाठी २६१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दोन दिवस छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. काही उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार राहतील याची उत्सुकता वाढली आहे.

विविध गणात अर्ज
अध्यापक गणात डॉ. अशोक कोर्डे, डॉ. तात्याराव सोंडगे, डॉ. भगवान डोभाळ, डॉ. सिद्दीकी, डॉ. सर्जेराव जिगे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. कालिदास भांगे, डॉ. सुहास मोराळे, डॉ. बापूराव धोंडे, डॉ. महानंदा दळवी, डॉ. गोविंद काळे व डॉ. राजेंद्र मोरे यांनी अर्ज भरला. विद्या परिषद गणात डॉ. काका पोकळे, डॉ. सत्यप्रेम घुमरे, डॉ. दया पाटील, डॉ. जितेंद्र अहिराव, डॉ. किशोर साळवे, डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. विक्रम दहीफळे, डॉ. सुहास मोराळे, डॉ. किसन लोहार, डॉ. रमेश मंझा आणि डॉ. भालचंद्र वायकर यांनी अर्ज दाखल केला. प्राचार्य गणात डॉ. मकदूम फारूकी, डॉ. सुभाष टकले, डॉ. आर. एस. पवार, डॉ. जयसिंगराव देशमुख, डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. रामचंद्र इप्पर, डॉ. उत्तम पाथरे, डॉ. कविता पराशर, डॉ. हरिदास विधाते व डॉ. दिलीप गरूड यांनी अर्ज भरला. विद्यापीठ अध्यापक गणात डॉ. सतीश पाटील, डॉ. सतीश दांडगे, डॉ. वैशाली खापर्डे आणि संस्थाचालक गणात डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर, बस्वराज मंगरूळे, संजय निंबाळकर, चंद्रकांत मुळे आणि संजय अग्रवाल यांनी अर्ज दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत गुटख्याचे अर्धेपोते जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आली असून, रुग्णालयात जाणाऱ्या-येणाऱ्यांकडून तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत गुटखा-तंबाखू-बिड्या-सिगारेटचे अर्धेपोते जमा झाले आहे. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात थुंकणाऱ्यांवरही शंभर रुपये दंडाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

घाटी परिसरात दररोज किमान चार ते पाच हजार रुग्ण-नातेवाईक व इतर नागरिकांचा राबता असतो. यामध्ये गुटखा-तंबाखू-बिड्या-सिगारेटचे व्यसन असणाऱ्यांचीही फार मोठी संख्या असते आणि त्यामुळेच रुग्णालय परिसरात गुटखा-पान-मसाला-तंबाखू-बिड्या-सिगारेटचा शौक पूर्ण करणारे शौकीन जागोजागी दिसतात. अर्थातच, जागोजागी वाट्टेल तसे थुंकणारेही कमी नाहीत. थुंकण्यामुळे गंभीर जंतुसंसर्गाचा तसेच धुम्रपानाचा वेगळा धोका लक्षात घेतला जात नाही. परिणामी, रुग्णालयाच्या प्रत्येक कोपऱ्यात, बहुतेक सर्व वॉर्डांच्या आसपास, जिन्यांमध्ये भिंती व परिसर घाणेरड्या रंगांमध्ये रंगलेले दिसतात. त्याचाच परिणाम म्हणून किळसवाण्या दुर्गंधीचा मारा सहन करावा लागतो, तो वेगळाच. हे लक्षात घेऊनच उशिरा का होईना घाटी प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेऊन थेट करावाई सुरू केली आहे.

सद्यस्थितीत बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीसह ‘सर्जिकल बिल्डिंग’मध्ये ही कारवाई केली जात असून, सर्व गेटवर तंबाखुन्य पदार्थ जमा केले जात आहेत. लवकरच इतर विभाग व इमारतींमध्येही ही कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर थुंकणाऱ्यांवर १०० रुपये दंडाच्या शिक्षेची कडक अंमलबजावणी होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या तंबाखुजन्य पदार्थांची शासकीय नियमानुसार विल्हेवाट लावली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मनपा उपायुक्त खान, लाहोटीला सशर्त जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दैनिक वेतनावरील लिपिकांचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये आणण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता घेणाऱ्या अस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक दादाराव लाहोटी व उपायुक्त अय्युब खान याला प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी सशर्त जामीन मंजूर केला.

गारखेडा परिसरातील कृष्णा परभतराव ठोकळ यांना कामावर नियमित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत घेण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना या दोघांना २७ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीदरम्यान उपायुक्त अय्युब खानच्या बंगल्यातून दीड किलो सोने, दोन किलो चांदी, रोख ४ लाख १९ हजार ६५० रुपये जप्त करण्यात आले होते. अय्युब खानच्या अवाजाची तपासणी करावयाची असल्यामुळे त्याच्या संभाषणाचे नुमने घेण्यात आले. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे दोघांना सोमवारी कोर्टात हजर केले असता, तपास अधिकाऱ्यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केल्यामुळे कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दोघांनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, गुन्हा गंभीर असून तपास प्राथमिक अवस्थेत आहे व आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती अतिरिक्त लोकअभियोक्ता सतीश मुंडवाडकर यांनी कोर्टात केली. त्यामुळे कोर्टाने दोन्ही आरोपींना सिटीचौक पोलिस ठाण्यात आठवड्यातून दोनदा हजेरी द्यावी, पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करावे, जिल्हा कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय जिल्ह्याबाहेर जाऊ नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये आदी अटींखाली व प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर दोघांना जामीन मंजूर केला.

पथक आले पालिकेत
अय्युब खान व लाहोटी संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक सोमवारी सायंकाळी महापालिकेत आले होते. या पथकाने अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेतली. चौकशीसाठी ताब्यात घेतलेली फाइल पथकाने भालसिंग यांना परत केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर देखील परत केला. नव्याने काही कागदपत्रांची मागणी पथकातील अधिकाऱ्यांनी केली. मागणीनुसार कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भालसिंग यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शंभर चहामुळे जुगारअड्डा उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अंगुरीबाग, मोतीकारंजा येथील ‘आज की अदालत’ साप्ताहिकाच्या कार्यालयात शंभरावर चहा मागवल्याच्या संशयावरून सोमवारी रात्री पोलिसांना छापा टाकला आणि त्या ‌ठिकाणी जुगारअड्डा सुरू असल्याचे दिसून आले. या प्रकरणी साप्ताहिकाच्या संपादकासह आठ जणांना अटक करण्यात आली असून, एक लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मोतीकारंजा भागात सय्यद शफियोद्दीन वहियोद्दीन यांचे ‘आज की अदालत’ नावाच्या साप्ताहिकाचे कार्यालय आहे. या कार्यालयातील एका खोलीत हा जुगार अड्डा सुरू होता. पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात साप्ताहिकाचा संपादक सय्यद शफियोद्दीन, विजय कांतीलाल सूर्यवंशी (विद्यानिकेतन कॉलनी), आवेजखान दस्तगीरखान पठाण (रा. नागसेन कॉलनी, रोषणगेट), सय्यद शौकत अली ख्वाजा कलंदर अली (रा. बुढीलेन), लियाकत अली युसूफ अली (रा. किराडपुरा), किरीट दामोधर सोनी (रा. एन १), फझलखान वजीरखान पठाण (रा. कैसर कॉलनी), बिट्टू सिमरन पाल (रा. सिंधी कॉलनी), अशोक टिकमदास कपाडिया (रा. पानदरीबा) यांचा समावेश आहे.

आरोपींच्या ताब्यातून रोख ५१ हजार रुपये, मोबाइल व जुगाराचे साहित्य असा एक लाख नऊशे रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, एपीआय घनश्याम सोनवणे, पीएसआय अनिल वाघ व पथकांनी ही कारवाई केली.

तल्लफ पडली भारी
जुगार अड्डयावर येणाऱ्या मंडळीची चहा व नाष्ट्याची जबाबदारी अड्डाचालकाची असते. या अड्ड्यावर देखील चहा मागवण्यात येत होता. दुपारपासून सुमारे शंभरावर चहाचे कटींग मागवण्यात आले होते. नेमकी हीच बाब पोलिसांच्या खबऱ्याने हेरली व टिप दिली. या टिपमुळे या जुगार अड्डयाचे बिंग फुटून कारवाई करण्यात आली.

माझा काही सबंध नाही
पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी शफियोद्दीन टीव्ही पाहत होता, तर आतल्या रूममध्ये जुगारी पत्ते खेळत होते. शफियोद्दीनने जुगाराशी माझा काही सबंध नाही, असे म्हणत हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी ‘तुझ्यासमोर सगळे सुरू असताना सबंध कसा नाही,’ असे म्हणत त्यालाही अटक करण्याचे आदेश दिले.

रुग्णालयात जाणाऱ्यांकडून तंबाखू-गुटखा जप्त केला जात आहे. तसेच थुंकणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाणार आहे. आपण आपल्या स्वतःच्या घरात थुंकतो का, मग रुग्णालयदेखील हजारो रुग्णांचे घरच असते, याचा विचार नातेवाईक-नागरिकांनी केला पाहिजे. – डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बलात्कारी निघाला कुख्यात गुन्हेगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुकुंदवाडी भागातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आ‌मिष दाखवून अपहरण करीत बलात्कार करणारा सत्यपाल वाकोडे कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर चिखली, बुलडाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत.

मुकुंदनगर भागातील सतरा वर्ष दहा महिने वय असलेली मुलगी २१ ऑक्टोबर रोजी कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. याप्रकरणी तिच्या वडिलांनी संशयित आरोपी सत्यपाल भीमराव वाकोडे (रा. चिखली, बुलडाणा) याच्याविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुकुंदवाडी पोलिस व गुन्हे शाखेच्या वतीने या जोडप्याचा युद्ध पातळीवर शोध सुरू होता. चार दिवसांपूर्वी या दोघांना सुरत येथील अमरोली भागातून ताब्यात घेण्यात आले. सत्यपालला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. या मुलीची व सत्यपालची फेसबुकवर ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सत्यपालने तिला जाळ्यात ओढले. तिला भेटण्यासाठी तो औरंगाबादला येत होता. लग्नाचे आमिष दाखवून त्याने महिन्याभरापूर्वी पलायन केले. सुरुवातीला पुणे, बुलढाणा येथे काही दिवस राहिल्यानंतर सुरत येथे एका नातेवाईकाकडे ते आश्रयास गेले. या ठिकाणी व्हिडीयो शुटींग, फोटोग्राफीचे काम सत्यपालने केले.

असा सापडला जाळ्यात
सत्यपाल हा चिखली, बुलढाणा येथील रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. चाणाक्ष असलेला सत्यपाल हा बारा सिमकार्ड वापरत होता. त्यामुळे त्याचा शोध लागणे अवघड झाले होते. पसार असताना त्याने एका सिमकार्डवरून आईला कॉल केला. हा कॉल सायबर सेलकडून ट्रेस झाल्याने पोलिसांना त्याचा माग सापडला. सुरत गाठून त्याला अटक करीत या मुलीची सुटका केली. पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल वाघ, हेमंत तोडकर व पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ साडेसात लाखांची घरफोडी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समतानगर येथील नगरसेविका रेश्मा अशफाक कुरेशी यांच्या दिराचे घर फोडून चोरट्यांनी रोख साडेचार लाखांसह सोन्याचे दागिने लंपास केले. सोमवारी सायंकाळी सहा ते दहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समतानगर भागात अशफाक कुरेशी सहा भावांच्या कुटुंबासह एकत्र राहतात. अशफाक यांच्या लहान बहिणीचा सोमवारी बीड बायपासवरील फातेमा लॉन येथे विवाह सोहळा होता. कुरेशी कुटुंबीय सायंकाळी सहा वाजता घराला कुलूप लावून विवाहासाठी गेले होते. रात्री दहा वाजता त्यांचा एक भाऊ मसिलोद्दीन घरी परतला तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी पाहणी केली असता चोरट्याने घरफोडी केल्याचे दिसले. हा प्रकार कळताच कुरेशी कुटुंबीयानी घरी धाव घेतली. पोलिसांनी श्वान पथक व फिंगर प्रिंटस तज्ज्ञासह घटनास्थळ गाठले. एसीपी गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी देखील धाव घेतली. चोरट्यानी मसिलोद्दीन यांच्या घरातील कपाट फोडून आतमधील रोख चार लाख ६८ हजारांची रोकड तसेच सोन्याचे विविध दागिने असा अंदाजे सात लाख चाळीस हजारांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी काही पुरावा सोडला नसल्याने श्वानाला माग काढता आला नाही. कुरेशी यांच्या इमारतीला दोन बाजूने रस्ता आहे. या दोन्ही बाजूला शेजाऱ्यांकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यात संशयितांचे फुटेज आले असल्याची शक्यता असून या फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.

साधेपणाने गेले; अन् दागिने नेले
मसिलोद्दीन हे कुरेशी कुटुंबीयातील सहाव्या क्रमांकाचे भाऊ आहेत. शहरातील मटण शॉपला जनावरे पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीचा पंधरा दिवसांपूर्वी आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे बहिणीच्या लग्नात मसिलोद्दीन व त्यांची पत्नी कोणतेही दागिने न घालता साधेपणाने गेले होते. त्यामुळे घरीच कपाटात असलेले दागिने सहज चोरट्यांच्या हाती लागले. चोरट्यानी मसिलोद्दीन यांच्या यांचे भाऊ एजाज यांचे देखील घर फोडले. आतमधील कपाटाचे एक ड्रॉवर देखील त्यांनी उघडले.यामध्ये त्यांना काही आढळले नसल्याने ते निघून गेले. मात्र याच कपाटातील दुसऱ्या ड्रॉवरमध्ये एजाज यांची रोख रक्कम होती. ती बचावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ तोतया डीन गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घाटीमध्ये शिपाई, लिपिक पदावर नोकरी लावून देतो म्हणून बेरोजगारांना गंडविणाऱ्या आरोपी राजेंद्र पोहालसह बनावट नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांची बनावट सही करणाऱ्या शिपाई सुनील बन्सीलाल डोणगावकर याला अटक करून सोमवारी (३० ऑक्टोबर) कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने दोघांना शनिवारपर्यंत (४ नोव्हेंबर) पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, तपासामध्ये दोघांनी ६८ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी किशोर चंद्रभान देहाडे (रा. हर्सूल, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नातेवाईकाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बनावट नियुक्ती आदेशाद्वारे आरोपी राजेंद्र चरणसिंग पोहाल (रा. घाटी क्वार्टर) याने फिर्यादीकडून दोन लाख रुपये घेतले होते. मात्र नियुक्ती आदेश बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्यावरुन आरोपीविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पोहाल याला २४ ऑक्टोबरला अटक करुन ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, पोलीस कोठडी दरम्यान राजेंद्र पोहाल यांच्या घरातून ९८ जणांचे बनावट नियुक्तीपत्र, एक डायरी, त्या डायरीमध्ये पैसे घेतलेल्यांच्या नोंदी मिळून आल्या. बनावट लेटरहेड तयार करण्यात आलेल्या दुकानांची चौकशी करण्यात आली असता, त्याने दुकान दाखविल्यामुळे त्या दुकानातील हार्डडिस्क, पेनड्राइव्ह जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, बनावट नियुक्त्तीपत्रांवर अधिष्ठाता म्हणून सुनील बन्सीलाल डोणगावकर याने सह्या केल्याचे तपासात उघड सांगितल्यामुळे त्याला रविवारी (२९ ऑक्टोबर) रात्री अटक करण्यात आली. त्यालाही आरोपी पोहाल याच्यासोबत सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश?
पोलिस तपासामध्ये दोघांनी ६८ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यांनी या रकमेची विल्हेवाट कशी लावली, मालमत्ता खरेदी केली का, या फसवणुकीमध्ये अन्य कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे का, कक्षसेवक पदासाठी ४८ आणि लिपिक पदासाठी ५० असे ९८ बेरोजगारांना गंडविल्यामुळे त्या बेरोजगारांची आणि आरोपीची समोरासमोर चौकशी करणे बाकी आहे, त्यांचे हस्ताक्षरांचे नुमने घ्यावयाचे असल्यामुळे दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘सीसीटीव्ही’मुळे मिळाली बॅग अन् अंगठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिक्षात विसरलेल्या प्रवाशाची बॅग व सोन्याची अंगठी ‘सीसीटीव्ही’च्या फुटेजमुळे मिळाल्याची घटना रेल्वे स्टेशन ते वाळूज महाराणा चौक रोडवर घडली.

केरळमधील अन्जोम जोर्स हा सध्या शहरात वास्तव्यास आला असून, रेल्वे स्टेशन येथील प्रेम पाप्युलर पंजाब हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. २० सप्टेंबर रोजी रेल्वे स्टेशनवरून वाळूज येथील महाराणा चौक येथे जोर्स रिक्षाने जाण्यासाठी निघाला होता, मात्र रिक्षाचालकाने रेल्वे ओव्हर ब्रिजवर त्याला रिक्षातून उतरून देत दुसऱ्या रिक्षात बसवले. या रिक्षामध्ये जोर्सची बॅग तशीच राहिली. बॅगमध्ये सोन्याची अंगठी व इतर ऐवज होता. जोर्सने तात्काळ छावणी पोलिस ठाणे गाठून ही माहिती दिली. पोलिसांनी त्याला सेफसिटी प्रोजेक्टच्या कार्यालयात पाठवले. येथील महिला कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्टेशन ते वाळूज मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी केली. यामध्ये त्यांना हवी असलेली संशयित रिक्षा आढळली. या रिक्षाचालकाचा उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे चार्ली व्ही. एस. जाधव व व्ही. आर. भवटे यांनी शोध घेतला. त्याच्या रिक्षामध्ये राहिलेली बॅग व सोन्याची चार ग्रॅमची अंगठी ऐवज सुखरूप होता. जोर्सला हा ऐवज परत करण्यात आला. यावेळी एसीपी रामेश्वर थोरात, पीएसआय स्नेहा करेवाड, व्ही.एस. जाधव, भवटे, नजमा तडवी, रेखा गोठवाल उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका राजकारणात खैरे पर्व सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तब्बल पावणेतीन वर्षानंतर महापालिकेच्या राजकारणात खासदार चंद्रकांत खैरे यांनी पालकमंत्री रामदास कदम व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना आऊट करून शिरकाव केल्याने खैरे पर्वाला सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

महापौरपदी निवड झालेले नंदकुमार घोडेले खासदार चंद्रकांत खैरे यांचे एकनिष्ठ आहेत. खैरे यांनी सुमारे तीस दिवसांपूर्वीच महापौरपदासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून घोडेले यांच्या नावाची घोषणा करून घेतली. त्यामुळे पालकमंत्री रामदास कदम यांना देखील घोडेलेंचे समर्थन करावे लागले. ज्या दिवशी महापौरपदासाठी घोडेले यांच्या नावाची घोषणा ठाकरे यांनी केली, त्या दिवशी कदम नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीत गुंतले होते. त्यामुळे त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी त्यावेळी मिळाली नाही. घोडेले यांची महापौरपदावर निवड झाल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी देखील कदम औरंगाबादेत आले नाहीत. घोडेले यांची महापौरपदी वर्णी लावल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी खैरे यांनी महापालिकेच्या सभागृहनेतेपदी विकास जैन यांची वर्णी लावून घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकास जैन यांना सभागृहनेते करायचे असे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार संजय शिरसाट यांच्यात अगोदरच ठरले होते. सोमवारी नवनिर्वाचित महापौरांसह सर्वच पदाधिकारी ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले. त्यात जैन देखील होते. ठाकरे यांच्या दरबारात पोहचेपर्यंत सभागृहनेता कोण याची चर्चा खैरे यांनी घडवून आणली नाही. नवनिर्वाचित महापौर व ठाकरे यांची भेट झाल्यावर सभागृहनेत्याचा विषय खैरे यांनी काढला. विकास जैन यांना सभागृहनेता करा, अशी गळ त्यांनी घातली. त्याला संजय शिरसाट यांनीही अनुमोदन दिले. संपर्कनेते विनोद घोसाळकर देखील त्यांच्या बाजूने होते. सभागृहनेता बदलला जाणार, हे लक्षात आल्यावर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्याशी संपर्क साधला. विद्यामान सभागृहनेते गजानन मनगटे यांचा कार्यकाळ दीड ते दोन महिने शिल्लक आहे, यापूर्वीचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांना १८ महिन्याचा काळ देण्यात आला होता. त्यामुळे मनगटे यांना एकवर्षाचा कार्यकाळ तरी पूर्ण करू द्या, अशी गळ त्यांनी पालकमंत्र्यांना घालूनही उपयोग झाला नाही.

अशी फिरली चक्रे
गजानन मनगटे हे अंबादास दानवे यांचे कार्यकर्ते आहेत. जंजाळही दानवे यांच्या गटाचे असल्याचे मानले जाते. जंजाळ यांचे पालकमंत्र्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. दानवे यांनी गळ घातल्यानंतर कदम यांनी ‘मातोश्री’ वर फोन केला, पण त्यांना नेहमी प्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या फोन येईपर्यंत विकास जैन यांच्या नावाला सभागृहनेतेपदासाठी मान्यता मिळाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ५०० बैलगाड्यांतून वाळू तस्करी

$
0
0

चंदन लक्कडहार, पैठण
महसूल प्रशासनाच्या हातावर तुरी देत तस्करांनी गोदापात्रातून चक्क रोज पाचशे बैलगांड्यामधून वाळू तस्करी सुरू केली आहे. दरम्यान, शहरात जनावराचा कोंडवाडा नसल्याचे सांगत प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत आहे.

महेश सावंत यांनी पैठण तहसीलदार पदाचा कार्यभार हाती घेताच अवैध वाळू उत्खनन व चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली होती. परिणामी वाळूचोरी बऱ्याच अंशी कमी झाली, मात्र एक महिन्यापासून वाळूचोरांनी चोरीची नवीन शक्कल शोधून काढली. शहरात नगर पालिकेचा कोंडवाडा नसल्याने महसूल प्रशासन बैलगाडीवर कारवाई करू शकत नाहीत, हे हेरत त्यांनी चक्क बैलगाडीच्या सहाय्याने वाळू तस्करी सुरू केली. सध्या नाथ समाधी मंदिराच्या पाठीमागील गोदावरी नदीच्या पात्रातून रात्री दोन ते सकाळी नऊच्या दरम्यान जवळपास पाचशे बैलगाड्याच्या सहाय्याने वाळूचोरी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बैलगाड्याच्या सहाय्याने चोरलेल्या वाळूचा यात्रा मैदानात साठा करून सदरील चोरीची वाळू ट्रॅक्टर, ट्रक, हायवा व लहान वाहनधारकाना विकण्यात येत आहे. शहर हद्दीतील नदीपात्रातून व शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यातून बैलगाड्या चोरलेल्या वाळूची वाहतूक करत असल्याने बैलगाड्यातील वाळू रस्त्यावर पडत आहे. यामुळे, छोटी वाहने रस्त्यावर घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत.

अन् बैलगाड्या खरेदी
चोरीची वाळू वाहतूक करण्यासाठी तस्करांनी वाहनांची विक्री करून चक्क बैलगाडया खरेदी केल्या आहेत. सध्या शहरात जवळपास पाचशे बैलगाड्यांमधून चोरीची वाळू वाहतूक सुरू असल्याचा अंदाज आहे.

भाविकांना धोका
नाथ समाधी मंदिराच्या पाठीमागील नदीपात्र व दशक्रिया घाट या भागातील नदीपात्रात भाविक व वारकरी स्नान करतात. वाळू चोरणारे बैलगाडीधारक याच परिसरातील नदीपात्रातून जवळपास वीस ते पंचवीस फूट खोल खड्डे खोदून वाळू चोरत असल्याने भाविक व वारकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

शहरहद्दीत मोठ्याप्रमाणात बैलगाड्याच्या माध्यमातून वाळूचोरी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे, मात्र नगरपालिकेचा जनावराचा कोंडवाडा नाही. त्यामुळे बैलगाड्यावर कारवाई केल्यावर जप्त केलेले बैल कुठे ठेवायचे, हा प्रश्न आहे.
- महेश सावंत, तहसीलदार

रात्रभर शहरात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू सांडत आहे. तस्करांनी नदीपात्रात मोठे खड्डे केले आहेत. यामुळे शहरातील नागरिकांना धोका निर्माण झाला असून सबंधित प्रशासने यावर योग्य ती कारवाई करावी. - विजय चाटुपळे, शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन पेरणीत शेतकऱ्यांना शॉक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतीमालाला नसलेला भाव, दुष्काळी अनुदानाचे पदरी न पडलेले पैसे आणि ऐन पेरणीत महावितरणने जवळपास १५ हजार कृषिपंपाची वीज तोडून शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. त्यामुळे हरबरा, गव्हाच्या पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न उभा टाकला आहे.

औरंगाबाद - जालना परिमंडळातील तीन लाख शेतकऱ्यांकडे दोन हजार ३८७ कोटी रुपयांचे वीजबिल थकित आहे. या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. कृषी पंपांना दिली जाणारी वीज ही सामान्य वीजदरापेक्षा कमी भावाने दिली जाते. तरीही शेतकरी वीजबिल भरत नाही. त्यामुळे महावितरण कार्यालयाला पायाभूत सुविधांसाठी निधी मिळणार नाही, असे संकेत प्रकाश गडावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरणने ही कारवाई तीव्र केली आहे. या कारवाई अंतर्गत ओरंगाबाद ग्रामीण एकमध्ये दोन हजार १२५, औरंगाबाद ग्रामीण दोन १७२५, कन्नड विभागात सता हजार ५३५, जालना एक भागात दोन हजार ५१४, जालना दोन एक हजार २८९ असा एकूण १५ हजार १८८ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही कारवाई सुरू होताच औरंगाबाद मंडळातील २७२३ शेतकऱ्यांनी एक कोटी ३४ लाख ३६ हजार रुपये वीज बिलापोटी भरले आहेत, अशी माहिती महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली.


१८३ कोटी १२ लाख थकबाकी
कन्नड तालुक्यातील कन्नड आणि पिशोर या उपविभागात २९ हजार ८६३ अधिकृत कृषिपंप वीज जोडण्या असून, एकूण १८३ कोटी १२ लाख रुपये थकबाकी रक्कम आहे. कन्नड उपविभागाचे कार्यकारी अभियंता विजय दुसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नड उपविभागात कृषिपंप वीज बिलापोटी १२४ कोटी रुपये थकबाकी आहे. दोन दिवसांत २७२ वीज ग्राहकांनी १० लाख ५० हजार रुपयांचा भरणा केला आहे.

३३ हजार वीज मीटरची तपासणी
शहरात वीज बिल, वीज चोरीविरोधात सुरू केलेल्या कारवाईत सात दिवसांत ३३ हजार ३२१ वीज मीटरची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ३४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४१३ वीज ग्राहकांचे वीज जोडणी तोडण्यात आली. याशिवाय १६५० वीज ग्राहकांचे वीज मीटर बदलण्याची कारवाई करण्यात आली.

शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी
थकबाकी असलेल्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ‘मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना’ जाहीर केली आहे. यात थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दंड आणि व्याज बाजूला ठेवून मूळ थकबाकी पाच समान हप्त्यात थकबाकी भरण्याची देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीज बिल नोव्हेंबर २०१७पर्यंत भरून डिसेंबर २०१७पासून मूळ थकबाकीपैकी २० टक्क्यांचा पहिला हप्ता थकबाकीदारांना भरावा लागेल. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये २० टक्के, जून २०१८ मध्ये २० टक्के, सप्टेंबर २०१८ मध्ये २० टक्के व डिसेंबर २०१८ अखेरीस २० टक्क्यांसह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावयाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images