Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘बर्थ डे’ पार्टीनंतर सामूहिक बलात्कार

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दारू मिसळलेले कोल्ड्रिंक्स पाजून मित्रांसोबत ‘बर्थ डे’ पार्टीला गेलेल्या विवाहितेवर चौघांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी रात्री शहराजवळील टाकळी शिवारात घडली. याप्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर अनिल वसंत ठोंबरे या नराधामाला अटक करण्यात आली असून, तिघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकुंदवाडी परिसरातील संतोषी मातानगर येथे राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेसोबत हा प्रकार घडला आहे. गुरुवारी (दोन नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास विवाहितेच्या ओळखीचा मित्र आला. त्याने ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन करण्यासाठी या विवाहितेला दुचाकीवरून बीड बायपास मार्गे झाल्टा फाटा येथे नेले. या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर दोघांनी चहा घेतला. त्यानंतर हे दोघे शेंद्रा एमआयडीसी जवळच्या देवगिरी हॉटेल जवळून तीन ते चार किलोमीटर दूर एका शेतात थांबले. त्यानंतर त्यांच्या मागून तिघे सोबत दारूच्या बॉटल्या आणि जेवण घेऊन आले.

टाळकी शिवारातील ज्वारीच्या शेतात या सगळ्यांनी पार्टी सुरू केली. विवाहितेला माहित नसताना तिच्या कोल्ड्रिंकमध्ये मिसळून दारू देण्यात आली. त्यामुळे तिला गुंगी येण्यास सुरुवात झाली. तेव्हा प्रथम विवाहितेच्या मित्राने तिच्यासोबत बळजबरी करण्यास सुरुवात केली. विवाहितेने विरोध करताच सर्वांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तिने आरडोओरड करून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र यातील एकाने तिचे तोंड दाबून तिला शांत राहण्यासाठी धमकावले. यानंतर चौघांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे विवाहिता बेशुद्ध पडली. तिला ‌तिला सोबत नेणाऱ्या तिच्या मित्राने तिला विमानतळासमोर आणून फेकून दिले. स्थानिकांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली. यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांनी महिलेला उचलून घाटी रुग्णालयात दाखल केले.

आक्षेपार्ह वस्तू जप्त
चिकलठाणा पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर टाकळी शिवारात घडलेल्या घटनास्थळाला भेट दिली. या ठिकाणी कंडोमचे पाकीट, दारूच्या बाटल्या आणि सतरंजी अशा वस्तू जप्त केल्या. या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याची म‌ाहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली.

पोलिसांचा खुलासा
अत्याचार झाल्यानंतर पीडित विवाहितेने चार वेळेस एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी चकरा मारल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. या घटनेचा एमआयडीसी सिडको पोलिसांनी खुलासा केला. या महिलेला आम्ही उपचारासाठी घाटीत दाखल केले होते व या घटनेची माहिती तपशीलासह चिकलठाणा पोलिसांना दिली होती, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदली धोरणाविरूद्ध शिक्षक रस्त्यावर

0
0

टीम मटा औरंगाबाद
राज्य सरकार शिक्षकांच्या बदलीबाबतचे धोरण राबवले आहे, ते अन्यायकारक असल्याचा आरोप करत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने जिल्हा कचेरीवर निषेध मोर्चा काढून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवेदन देवून त्यात बदली धोरणासह इतर अनेक मागण्या मांडण्यात आल्या.

परभणीत शिक्षकांचा मोर्चा
परभणी - परभणी शहरातील जिल्हा परिषदेपासून बस स्टँड, रेल्वे स्टेशन मार्गे काढण्यात आलेला हा मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. हातात विविध मागण्यांचे फलक घेवून जिल्हाभरातील शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये शिक्षिकांची संख्या मोठी दिसून आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जोरदार घोषणाबाजी करून शासनाच्या शिक्षक विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. यानंतर परभणी जिल्हा शिक्षक समन्वयक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये राज्य सरकारने २५ फेब्रुवारी २०१७ चा बदल्यांचा सुधारीत शासन निर्णय लागू केला आहे. शासनाच्या अन्यायकारक बदली धोरणामुळे शैक्षणीक सत्र अर्ध्यावरच असताना ग्रामीण भागातील शाळा विस्कळीत होणार आहेत. शैक्षणिक सत्र अर्ध्यावर असल्याने विद्यार्थी व आम्हा सर्व शिक्षकांचे पालक यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा अनिष्ट परिणाम होणार आहे. शालेय शिक्षण विभागाचा चटोपाध्याय व निवडश्रेणी संदर्भातील अन्यायकारक निर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, शिक्षकांसह सर्व कर्मचारीसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी, मुख्याध्यापक व शिक्षकांकडे असलेली सर्व ऑनलाइन कामे काढून घ्यावी, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करण्याचीही मागणी करण्यात आली.
या मोर्चात अध्यक्ष किशन इदगे, सचिव ज्ञानेश्वर लोंढे, निमंत्रक राम लोहट, मधुकर कदम, दिलीप श्रृंगारपुतळे, सोपान बने, भगवान पारवे, माधव सोनवणे, शेख नुर, शंकर खिस्ते आदींसह महिला, पुरूष शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उस्मानाबादमध्ये गुरुजींचा मोर्चा
म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
बदली व बदली प्रक्रियेस निषेध नोंदवीत, तसेच ऑनलाइन कामांना विरोध दर्शवित, शिवाय शिक्षकेतर अन्य कामे बंद करावीत, आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील गुरुजींनी गुरूनानक जयंतीचा सुट्टीचा मुहूर्त गाठत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
या मोर्चासाठी संघटनात्मक मतभेद विसरून ते एकवटल्याचे पहावयास मिळाले. या मोर्चात महिलांचा सहभाग अधिक होता. त्याशिवाय बहुतांश महिलांनी एकसारखी वेशभूषा केली होती. ग्रामविकास विभागाच्या शिक्षकांच्या बदली धोरणाविरुद्धचा हा त्यांचा एल्गार होता. गुरुजींच्या बदल्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने २७ फेब्रुवारी रोजी जो आदेश काढला तो हद्दपार करण्यात यावा, ही त्यांची प्रमुख मागणी होती. उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुजींच्या या मोर्चाला संबोधित केले. यामध्ये बाळकृष्ण तांबारे, लक्ष्मण पडवळ, बिभीषण पाटील, बळवंत घोगरे ही मंडळी अग्रभागी होती.


लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
लातूर - शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्यावतीने लातूरात ही जिल्ह्यातील शिक्षकांनी मोर्चा काढला होता. टाऊन हॉल मैदान ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. मोर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले, ‘राज्यातील ३४ जिल्ह्यात असे मोर्चे निघाले आहेत. राज्य सरकार दररोज नवे निर्णय लादत आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रथम सत्र संपत आले असताना शिक्षकांच्या बदल्या करणे हे अन्यायकारक आहे. जून महिन्यातच शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, वरिष्ठ श्रेणीची जाचक अट रद्द करावी, शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, शिक्षकांसाठीची जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागण्यासाठी हे मोर्चे आहेत.’ मोर्चामध्ये सुनील हाके, मच्छींद्र गुरमे, शिवाजी साखरे, मंगेश सुवर्णकार, नागसेन कांबळे, केशव गंभीरे, जयकुमार गाडेकर आदि नेते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजी उतरले रस्त्यावर!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शनिवारी औरंगाबादेत मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात आलेल्या मोर्चात शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिक्षक, शिक्षण व विद्यार्थी यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षक संघटनांनी सरकारशी पत्रव्यवहार करून चर्चा करूनही कोणताच निर्णय झाला नाही. प्रश्न प्रलंबित राहिल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. शालेय शिक्षण विभागाने २३ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ व निवड श्रेणीबाबतचा काढलेला शासन निर्णय रद्द करावा, एक नोव्हेंबर २००५नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शाळांमध्ये ऑनलाइन कामासाठी केंद्रस्तरावर स्वतंत्र डाटा ऑपरेटरची नेमणूक करावी, २७ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने काढलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या अन्यायकारक बदली धोरणात आवश्यक सुधारणा करून बदल्या मे २०१८मध्ये करण्यात याव्यात, राज्यातील प्राथमिक शिक्षकांना संगणक परीक्षेसाठी मे २०१८पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, वसुली थांबविण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व शिक्षण मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक भारती, जुनी पेन्शन संघटना, पदवीधर शिक्षक सभेचे पदाधिकारी, शिक्षक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगाबाद जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सुषमा राउतमारे, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, मंजुषा काळे, सुनीता उबाळे, लता पठाडे, पुष्पा दौड, शगुप्ता फारुकी, शोभा खोपडे, संगीता निकम, दीपिका एरंडे यांनी मोर्च्याला संबोधित करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ उसाच्या दरासाठी माजलगाव बाजारपेठ बंद

0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरातील कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाचा भाव जाहीर करावा या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून माजलगाव बंदचे आंदोलन केले.
शेतकरी कृती समितीचे गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी शेतकऱ्यांनी फेरी काढून शहरातील दुकाने बंद केली होती. दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ऊस लागवड वाढली आहे. पैठण, माजलगाव धरण शंभर टक्के भरल्यामुळे यावर्षी उस लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे.
परिसरातील सुंदरराव सोळंके, छत्रपती, जय महेश या तिन्ही कारखानदारांनी एकत्र येऊन आम्ही एकसारखेच भाव देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यांनी भाव जाहीर न करता कारखाने सुरू केले आहेत. यामुळे शेतकरी कृती समितीचे गंगाभीषण थावरे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत कारखाना उसाचा भाव जाहीर करणार नाही तोपर्यंत उसाला कोयता लावू दिला जाणार नाही, अशी घोषणा करून आठ दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे.
याच मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांनी माजलगाव शहर बंद केले. शेतकऱ्यांनी सकाळी आंबेडकर चौकापासून फेरी काढून दुकाने बंद केली. व्यापाऱ्यांनी तात्काळ दुकाने बंद केल्याने शहर कडकडीत बंद झाले होते. या आंदोलनात थावरे यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भयगंड वातावरणात आवाज उठवा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सध्याच्या भयगंड वातावरणात सत्प्रवृत्त माणसांना चुकीच्या मार्गाने विरोध होत आहे. या परिस्थितीची कारणे एकाच विचाराकडे जाणारी आहेत. या विचारांना विरोध करीत गाभ्याच्या प्रश्नांवर गांभीर्याने बोलणे आवश्यक आहे. आवाजाची संख्या वाढल्यास सरकारला आवाजाकडे लक्ष देणे भाग पडेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी केले. ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या.

अनंत भालेराव प्रतिष्ठानचा यंदाचा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांना प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, सचिव डॉ. सविता पानट, डॉ. प्रभाकर पानट, संजीव कुलकर्णी, अशोक भालेराव, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. मुळे यांनी हा पुरस्कार भावे यांना प्रदान केला. स्मृतीचिन्ह आणि ५० हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी ‘बोलावे कुणासाठी’ या विषयावर भावे यांनी विचार मांडले. ‘योग्य बाजूने उभ्या राहणाऱ्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी यांचा खून झाला. या घटनांवर आपण सातत्याने काही बोलणार की नाही ? माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांना नाहीसे करण्यात येत आहे. नागरिक म्हणून काही विचारण्याचा घटनेने दिलेला अधिकार आपण विसरत आहोत. सध्याच्या भयगंड वातावरणात नवीन विचार तर सोडाच, पण वैध विचारांच्या बाजुने उभी राहणारी माणसे दोन पावले मागे होत आहेत. शासन आणि शासनाच्या मागे असलेल्या लोकांना मोकळे बोलण्याचा अधिकार आहे. असहिष्णुता नाही असे म्हणत असले तरी सर्व क्षेत्रात ती दिसते. नोटबंदी निर्णय लोकांवर लादण्यात आला. आता कुठेतरी लोकांचे आवाज फुटायला लागले आहेत. या आवाजांच्या मागे आपली शक्ती उभी करण्याची गरज आहे’ असे भावे म्हणाल्या.

पुरस्कार वापसी आंदोलनाचे भावे यांनी समर्थन केले. ‘पुरस्कार वापसी चळवळ होणे महत्त्वाचे होते, पण ही चळवळ सामान्य माणसांशी जोडता आली नाही. तरीसुद्धा तिचे महत्त्व कमी होत नाही. महत्त्वाच्या प्रश्नांवर गांभीर्याने बोलणे गरजेचे आहे. आवाजाकडे लक्ष द्यायला लावणे महत्त्वाचे असते. म्हणून आवाजांची संख्या वाढवा,’ असे आवाहन भावे यांनी केले. प्रा. विजय दिवाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांची चेष्टा
‘विविध योजनांचा गाजावाजा करून जाहिरातबाजी सुरू आहे. कर्जमाफीच्या निमित्ताने शेतकऱ्यांची चेष्टा होणे दुर्दैवी प्रसंग आहे. सांगलीच्या यादीत मुंबईच्या माणसांची नावे आहेत. किती महिने हा गोंधळ चालेल ठावूक नाही. या प्रश्नाबाबत शेतकरी जागे झाले आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघाले आणि काहीच घडले नाही. मोर्चातील वैध प्रश्नांवर कुणीच बोलत नाही. मागण्या करणारे लोक मोठ्या संख्येने असूनही सरकार बोलत नाही हे विदारक आहे,’ असे पुष्पा भावे म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पोलिसांची बॅनरबाजी

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौक येथे शनिवारी स्वातंत्र्यसंग्राम लोकार्पण कार्यक्रम झाला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमानिमित्त शहर पोलिसांनी सेफ सिटी प्रकल्पाची माहिती देणारे बॅनर कार्यक्रम परिसरात झळकवून बॅनरबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे हे बॅनर पोलिसांनी लावल्याची कार्यक्रमस्थळी जोरदार चर्चा होती.
सुप्रीम कोर्टाने शहरांचे विद्रुपीकरण, बॅनरबाजी न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अनेक शहरांमधून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे; पण औरंगाबादेत पोलिस प्रशासनानेच मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे असलेले बॅनर लावून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सेफ सिटी प्रकल्पात औरंगाबाद पोलिसांनी काय कामगिरी केली आहे ? गुन्हेगारीचे कमी झालेले प्रमाण, गुन्हेसिद्धतेचे प्रमाण आदीची आकडेवारी बॅनरवर मांडली आहे. औरंगाबाद पोलिसांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही बॅनरवर आहे. बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची छायाचित्रे आहेत. आजवर पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर कधीच लावले गेले नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुब्रतो रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

सहारा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुब्रतो रॉय, स्वप्ना रॉय, जॉय ब्रोटो रॉय, सुशांतो रॉय, सीमांतो रॉय, ओमप्रकाश श्रीवास्तव यांच्याविरोधात औरंगाबाद जिल्हा ग्राहक मंचाने अटक वॉरंट बजावले आहे. त्यांना २३ नोव्हेंबर रोजी मंचासमोर हजर करण्याचे आदेश मंचाने दिले आहेत.

सहारा प्राइम सिटीच्या नावाखाली आलिशान फ्लॅट देण्याचा करार करुन मुदतीत बांधकाम न केल्याने संबंधितांनी तक्रारदाराला मूळ रक्कम (दोन लाख ८ हजार ६००रुपये) बारा टक्के व्याजासह देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष के. एन. तुंगार, सदस्य संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी ८ सप्टेंबर २०१६ रोजी दिले होते. आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे मंचाने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २७ अन्वये जामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. यात त्यांना अटक करून २३ नोव्हेंबर रोजी मंचात हजर करावे, आरोपींनी जामिनासाठी विनंती केल्यास त्यांना १५ हजाराच्या जामिनावर आणि २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीस हजर राहण्याच्या अटीवर जामीन देण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.

बीड रस्त्यावर गांधेली शिवारात दोन वर्षांपूर्वी सहारा प्राइम सिटी नावाने प्रकल्प सुरु करण्यात आला होता. त्यात आलिशान फ्लॅटची योजना होती. त्यामुळे तक्रारदार अमरजितसिंग बग्गा व अनिल मोरेश्वर सावे यांनी २० लाख ८६ हजारांचा एक फ्लॅट खरेदीचा करारनामा केला होता. यासाठी तक्रारदाराने १ डिसेंबर २०११ रोजी २ लाख ८ हजार ६००रुपये इतकी रक्कम सहाराला दिली. प्रत्यक्षात बांधकाम झालेच नाही. बांधकाम करुन फ्लॅटचा ताबा द्यावा म्हणून वारंवार विनंती करुनही प्रकल्पाचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे भरलेली रक्कम परत मिळावी म्हणून मागणी करण्यात आली. तक्रारदाराने २७ ऑक्टोबर २०१४ रोजी करारनामा रद्द केला. रक्कम परत न दिल्याने ग्राहक मंचामध्ये धाव घेऊन रक्कम व्याजासह देण्यात यावी, त्याचप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची विनंती करण्यात आली होती. ती मंचाने मान्य केली. तक्रारदारांतर्फे जगदीश तोष्णीवाल यांनी तर सहारातर्फे आर. एच. दहाट यांनी बाजू मांडली होती.

फ्लॅट न देणे अनुचित

सहारा सिटी होम्स या योजनेखाली तक्रारदारांकडून रक्कम घेऊन मुदतीत बांधकाम सुरु केले नाही. १ डिसेंबर २०११ पासून आजपर्यंत संबंधित तक्रारदारांच्या रकमेचा वापर करीत आहेत. रक्कम घेऊन कबूल केल्याप्रमाणे फ्लॅट न देता अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. योजनेच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदाराची रक्कम परत देणे आवश्‍यक होते. मात्र, त्यासाठी ग्राहक मंचात तक्रार करावी लागली होती, तक्रारदाराची चूक नसताना सहाराने रक्कम परत न देऊन आर्थिक पिळवणूक केल्याचे मंचाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राचा सौराष्ट्रावर दणदणीत विजय

0
0

महाराष्ट्राचा सौराष्ट्रावर दणदणीत विजय
बडोद्याकडून मुंबईचा पराभव
महिला क्रिकेट स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पश्चिम विभागीय महिला वन-डे क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सौराष्ट्र संघावर दहा विकेट्स राखून दणदणीत विजय साकारला. दुसऱ्या सामन्यात बडोदा संघाने मुंबई संघाचा ३३ धावांनी पराभव केला.
एडीसीए मैदानावर झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाच्या प्रभावी गोलंदाजीसमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सौराष्ट्र संघाची दाणादाण उडाली. ३१ षटकातच त्यांचा संघ अवघ्या ४९ धावांत गारद झाला. सौराष्ट्राकडून मेघना जमबुचाने सर्वाधिक १८ धावा काढल्या. सौराष्ट्राच्या अन्य कोणत्याही फलंदाजास धावांचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यांचे नऊ फलंदाज २४ धावांत माघारी परतले. कॅप्टन तान्या रावसह सहा फलंदाजांना धावांचे खातेही उघडता आले नाही. एम. डी. सोनवणेने सातपैकी पाच षटके निर्धाव टाकत दोन धावांत ४ विकेट्स घेऊन सामना गाजवला. एन. एन. नागे व आय. एम. पाठारे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. महाराष्ट्राने ३१ षटकांपैकी १५ षटके निर्धाव टाकली हे विशेष.
महाराष्ट्र संघाने आठ षटकांत बिनबाद ५२ धावा फटाकावत स्पर्धेतील पहिला विजय साकारला. एम. डी. सोनवणे (नाबाद २२), प्रियांका घोडके (नाबाद ३०) या सलामी जोडीने ५२ धावांची सलामी देत शानदार विजय साकारला.
बडोदाचा विजय
दुसऱ्या सामन्यात बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २०४ अशी धावसंख्या उभारली. बडोद्याकडून भाटिया (६०), ऋतिशा (५५) यांनी डावास आकार दिला. मुंबईच्या फातिमा जाफरने दोन विकेट्स घेतल्या. मुंबई संघासमोर विजयासाठी २०५ धावांचे लक्ष्य होते. मात्र, त्यांना ५० षटकांत ९ बाद १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. वृषाली भगतने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. आर. एस. चौधरी (३१) व एस. के. राऊत (३०) यांनी झुंज दिली. तळाचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाल्यामुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. बडोद्यातर्फे राधा यादवने २० धावांत मुंबईचा निम्मा संघ गारद करून संघाला ३३ धावांनी विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक ः १) सौराष्ट्र संघ - ३१ षटकांत सर्वबाद ४९ (मेघना जमबुचा १८,पी. कनोजिया ७, जे. एच. मकवाना ८, एम. डी. सोनवणे ४-२, एन. एन. नागे २-५, आय. एम. पाठारे २-७, एन. एस. भोर १-११, उत्कर्षा पवार १-२३). पराभूत विरुद्ध महाराष्ट्र संघ - ८ षटकांत बिनबाद ५२ (एम. डी. सोनवणे नाबाद २२, प्रियांका घोडके नाबाद ३०).

२) बडोदा - ५० षटकांत ६ बाद २०४ (यास्तिका भाटिया ६०, ऋतुशा ५५, प्रग्या रावत २५, राधा यादव १६, अमृता जोसेफ १३, फातिमा जफर २-३४, जान्हवी काटे, जेमिमा रॉड्रिग्ज, वृषाली भगत प्रत्येकी १ विकेट) विजयी विरुद्ध मुंबई - ५० षटकांत ९ बाद १७१ (वृषाली भगत ६१, आर. एस. चौधरी ३१, एस. के. राऊत ३०, जेमिमा रॉड्रिग्ज १७, पी. यादव १६, राधा यादव ५-२०, प्रग्या रावत २-३५, चार्मी, केशा प्रत्येकी १ विकेट).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऋतुजा चाफळकरला दुहेरी मुकुट

0
0

ऋतुजा चाफळकरला दुहेरी मुकुट
मुलांच्या एकेरीत क्रिशन हुडा अजिंक्य
राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित ऋतुजा चाफळकरने १४ वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत दुहेरीपाठोपाठ एकेरीत विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुटावर नाव कोरले. मुलांच्या गटामध्ये एकेरीत छत्तीसगडचा क्रिशन हुडा विजेता ठरला.
विभागीय क्रीडा संकुलातील एन्ड्युरन्स टेनिस सेंटरमध्ये या स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. मुलींच्या एकेरीत ऋतुजाने महाराष्ट्राच्याच अव्वल मानांकित सुदीप्ता कुमारचा ३-६, ६-१, ६-१ असा पराभव करून अजिंक्यपद मिळवले. हा सामना ऋतुजाने एक तास तीस मिनिटांमध्ये जिंकला. पुण्याच्या १३ वर्षीय ऋतुजाने यापूर्वी फेनेस्टा राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. दुहेरीत ऋतुजाने नैशा श्रीवास्तवसमवेत शुक्रवारी अंतिम फेरीत रेनी सिंगला व रेनी सिंग या जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव करून अजिंक्यपद मिळविले होते.
मुलांच्या गटात अव्वल मानांकित क्रिशनने आसामच्या द्वितीय मानांकित उदित गोगाईला ६-१, ७-५ असे पराभूत केले. क्रिशनचे हे या वर्षातील सातवे विजेतेपद आहे. दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत तो उपविजेता ठरला होता.
एन्ड्युरन्स ग्रुपच्या प्रमुख वर्षा जैन यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी कॉर्पोरेट अफेअर्स हेड अनिल इरावणे, हर्षल शर्मा, वैशाली शेकटकर, डॉ. अश्विनी जैस्वाल, आशुतोष मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले, वरूण मांगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतिहासाचे स्मरण करीत वाटचाल हवी

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इतिहासाचे स्मरण करीत आपण आपली वाटचाल करायला हवी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले. क्रांतिचौक परिसरातील स्वातंत्र्यसंग्राम स्मारकाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी त्यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. स्मारक परिसरात २१० फुटाचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.
राज्यपाल म्हणाले, १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम, भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम हे तीन मुक्तिसंग्राम या स्मारकातून प्रतिबिंबित होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे स्मारक महत्त्वाची भूमिका निभावेल. सध्या राष्ट्रगीत, वंदेमातरम्वरून चर्चा सुरू आहे. राष्ट्रगीत कसे म्हणायचे, राष्ट्रगीताच्या वेळी उठून उभे रहायचे की, नाही या बद्दलच्या चर्चा दुर्देवी आहेत.
मराठवाडा हैदराबाद संस्थानातून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंदतीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला होता. तो गावागावांत पोचला. मुक्तिसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भाग घेतला, अनेकांना हौतात्म्य आले. अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या गावागावांत जावून स्वातंत्र्य संग्रामाबद्दलचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार रावसाहेब दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, स्मारक समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, समन्वयक रामचंद्र भोगले, मानसिंह पवार यांच्यासह आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर याप्रसंगी उपस्थित होते.
बागडे यांचेही भाषण झाले. डॉ. भापकर यांनी स्वागत केले. भोगले यांनी प्रास्ताविक केले. स्मारकाच्या उभारणीसाठी मदत केलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार झाला. त्यात प्रामुख्याने सरस्वती भुवन शिक्षण संस्था, सारस्वत बँक, देवगिरी बँक, बजाज अॅटो, महिको सीडस् च्या प्रतिनिधींचा समावेश होता. स्मारकाचे बांधकाम केलेल्या श्रीसाई इन्फ्रास्ट्रक्चरचे मिलिंद बापट यांचा विशेष सत्कार झाला. मुकुंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मानसिंह पवार यांनी आभार मानले.

गायकवाडांची उपस्थिती
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंहराव गायकवाड यांची या कार्यक्रमातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आपल्या सोबत गायकवाड यांना घेवून आले. गायकवाड यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कोडग्या सरकारला जागा दाखवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
भाजपची धोरणे ही शेतकरी विरोधी असून शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. भाजपने सर्व घटकांची फसवणूक केली असून, या कोडग्या सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी व लोकांचा संताप सरकारपर्यंत पोचवण्यासाठी हे जनआक्रोश आंदोलन असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाधक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी येथे सांगितले.
जनआक्रोश मोर्चात त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कडाडून टीका केली. दारूच्या बाटलीला महिलेचे नाव द्या म्हणजे दारुचा खप वाढेल अशा पद्धतीचे वक्तव्य सरकारमधील मंत्री जर करीत असतील तर त्यांच्या अकलेची कीव येते, असे ते म्हणाले.
कर्जमाफी करताना जात पाहिली जात आहे. राज्यातील जनतेला हे सर्व कळत आहे, परंतु वळत नाही. राज्यातून व देशातून भाजपला हुसकावून लावण्यासाठी भाजप ‘चले जाव’चा नारा आता देण्यात येत आहे. सामान्य माणसाला अच्छे दिन यावेत, ही काँग्रेसची भावना आहे. यासाठी भाजपला बुरे दिन आले पाहिजेत. यासाठी आता मराठवाड्यातील जनतेने पेटून उठले पाहिजे. महाराष्ट्रात हवा बदलण्याची ताकद आहे. राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नांशी देणे-घेणे नसून, जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने सुरू केलेला संघर्ष या सरकारला सतेतून खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही, अशी ग्वाही यावेळी चव्हाण यांनी दिली.
मराठवाड्यातील सर्व उद्योग धंदे व प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकडे पळवल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. केवळ मराठवाड्याबाबतच नाही, तर कोकणातील स्थितीही सारखीच असून, मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राबाबत आकसाने वागत असल्याचे चव्हाण म्हणाले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून सर्वांसाठी बँकेची दालने खुली केली, तर नरेंद्र मोदी हे बँक मूठभर उद्योगपतीसाठी खुल्या करीत आहेत. सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम केवळ काँग्रेसच करू शकते. भाजप सरकारचे काम सध्या खोटे बोल पण रेटून बोल असे सुरू आहे. २०१९ मध्ये थापा चालणार नाहीत, असेही ते म्हणाले.

राज्यात आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकार विरोधात ३०२ चा गुन्हा का दाखल करू नये. आता राज्यात व देशात परिवर्तनाची लाट आहे. नांदेडपासून याचा श्रीगणेशा झाला आहे. गुजरातमध्येही सत्ता परिवर्तन होणे अटळ आहे. राज्यात सध्या संपाचा धुमधडाका सुरू आहे. काँग्रेसच्या काळात शेतकरी कधीही संपावर गेले नव्हते. राज्यातील जनतेला व विविध घटकांना न्याय देण्यास हे सरकार असमर्थ ठरले आहे. सुशासन करीत सर्व घटकांना न्याय देण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच आहे. मेक इन महाराष्ट्रसारख्या फसव्या घोषणा देऊन जनतेला झुलवण्याचे काम राज्यातील सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
यावेळी आमदार बसवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर मधुकरराव चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांची तसेच अमित देशमुख आदींची भाषणे
झाली.

कदम यांचा घरचा आहेर
महाराष्ट्रातील सरकार हे भाषणबाजी व घोषणाबाजी करणारे सरकार आहे. राज्यातील जनता युती सरकारला कंटाळली आहे. राज्यात आता काँग्रेसला पोषक वातावरण बनत चालले आहे. याचा लाभ घेण्यासाठी काँग्रेसच्या नेते मंडळींनी हालचाल करीत कामाला लागले पाहिजे, असा घरचा आहेर यावेळी काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी दिला.


सत्ता परिवर्तनासाठी तुळजाभवानीला साकडे
उस्मानाबाद येथील जनआक्रोश सभेपूर्वी काँग्रेसच्या नेते मंडळीनी तुळजापूरची वारी केली. यावेळी सर्व नेतेमंडळीनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. राज्यात व केंद्रात सत्ता परिवर्तन होण्यासाठी यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेला साकडे घातले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे औरंगाबादेत दहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने रविवारी (५ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शिवा संघटनेच्या मुख्यालय रिद्धी सिद्धी हॉलच्यामागे गारखेडा परिसर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध केला.
रविवारी (५ नोव्हेंबर) दुपारी साडेतीनच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. शिवा संघटनेच्या वतीने सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर विद्यापीठ देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनी केली नाही म्हणून हा निषेध व्यक्त करण्यात आल्याची माहिती शिवा संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. हा पुतळा जाळण्याचा कार्यक्रम प्रा. मनोहर धोंड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला असल्याची माहितीही या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. आगामी काळात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही शिवा संघटनेच्यातर्फे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानाचे‘सूक्ष्म सिंचन’

0
0

विजय चौधरी, खुलताबाद
केंद्र पुरस्कृत पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सहा हजार ९९२ देयके स्वीकृत केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ ७५५, तर खुलताबाद तालुक्यातील १४० पैकी केवळ पाच शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. २०१५-१६ चे २१५ प्रस्ताव रखडले आहेत. ऑनलाइन व ऑफलाइन अर्जांचा सावळागोंधळ आणि शेतकऱ्यांचे बँक खाते, लाभार्थ्यांचे फोटो, वरिष्ठांनी वेळोवेळी मागविलेल्या इतर माहितीमुळे अनुदान रखडले आहे.
एकीकडे सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार आल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अनुदान थेट शेतकऱ्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कृषी विभागातील गैरव्यवहाराला चाप बसला असलातरी शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. योजनांच्या अंमलबजावणीबाबत उदासीनता दिसत आहे. पूर्वी निकृष्ट दर्जाचे बियाणे, कृषी साहित्य, अवजारे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात होते. याप्रकारांना आळा घालण्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे बाजारातून दर्जेदार साहित्य खरेदी करणे शक्य झाले आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी दलाली सुररूआहे. त्यामुळे या ना त्या कारणाने अनुदान वितरणाला पद्धतशीरपणे विलंब करण्याचे प्रकार घडत आहेत.
कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन या सारख्या योजनांची अनुदाने वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सूक्ष्म सिंचन अनुदान योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे. गेल्या दोन वर्षात केंद्र शासनाने अनुदानाच्या निकषांत बदल केले आहेत. योजनेसाठी केंद्राकडून ६० टक्के, तर राज्याचा ४० टक्के हिस्सा द्यावा लागतो. त्यापूर्वी हे प्रमाण केंद्र ८० टक्के व राज्य २० टक्के, असे होते.
सुक्ष्म सिंचन योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातील १८ हजार ५८६ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ११ हजार २० शेतकऱ्यांना पूर्व संमती देण्यात आली होती. तपासणी व पूर्व संमतीनंतर यातील बहुतांश अर्ज रद्द करण्यात आले. त्यानंतर संच विक्रेत्यांकडून सहा हजार ९९२ लाभार्थी शेतकऱ्यांनी बिले कृषी विभागाकडे जमा केले आहेत. देयके जमा केलेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी जिल्ह्यातील केवळ ७५५ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले, तर सहा हजार २२३ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. सूक्ष्म सिंचन संच खरेदी करण्यासाठी काही ठराविक कंपन्याना नियुक्त करण्यात आले आहे.

सॉफ्टवेअरच्या अडचणी

कृषी विभागाने यावर्षीचा कार्यक्रम जून महिन्यात सुरू केला. एक मे पासून ज्यांनी ठिबक सिंचन बसविले त्यांना पात्र समजण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले होते. या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागतात. या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून कृषी विभागाची पूर्व संमती मिळालेल्या शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या कालावधीत सूक्ष्म सिंचन संच बसवायचे आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यांनी संचाची संपूर्ण रक्कम स्वतः भरायची असून संच बसविल्याची तपासणी झाल्यानंतर दहा दिवसांत तालुका कृषी अधिकारी यांनी अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करायची आहे. शेतकऱ्यांनी पदरचा खर्च करून मोठ्याप्रमाणात रक्कम गुंतवली आहे. मात्र अनुदानाची रक्कम अद्याप वितरीत झालेली नाही. ऑनलाइन-ऑफलाइन अर्जांचा सावळागोंधळ आहेच, कागदपत्रांची पूर्तता नसल्याने तसेच अन्य कारणांमुळे अनुदानाचे भिजत घोंगडे आहे. सॉफ्टवेअरच्या अडचणी कृषी विभागाला डोकेदुखी झाल्या आहेत. ऑनलाइनमुळे शेकडो शेतकरी लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे.

लक्षांकानुसार निधी खर्च नाही

सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन विकास व अन्य विविध योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला निधी लक्षांकानुसार खर्च करण्यात आला नाही. केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी ऑक्टोबरअखेर ६० टक्के निधी खर्च होणे अपेक्षित आहे. हा निधी खर्च न झाल्याने शासनाकडून पुढील हप्ता उपलब्ध होणार नाही. त्यामुळेच २८ व २९ ऑक्टोबरला सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवून देय असलेले अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे आदेश विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी काढले होते.

२०१५-१६ चे अनुदान नसल्याने २१५ प्रस्ताव रखडलेले आहेत. कृषि विभागाची पूर्व संमती घेऊन सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या व ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे. २०१७-१८चे वाटप सुरू आहे. कृषी विभागाने पूर्व संमतीदिल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केला नाही, तर प्रस्ताव आपोआप रद्द होतो.
- वैजनाथ हंगे , तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यावर वरुणराजाची कायम वक्रदृष्टीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्याला दुष्काळ नवीन नाही. दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदाही पावसाने सरासरी न गाठल्याने चिंता वाढली आहे. पावसाची वक्रदृष्टीच असलेल्या मराठवाड्यात गेल्या १४ वर्षांतील तब्बल आठ वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळ आणि मराठवाडा असे समीकरण रूढ झाले आहे.

दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या मराठवाड्यात गेल्या १४ वर्षांमध्ये केवळ सहा वेळा पावसाने सरासरी गाठली. यामध्ये २००५मध्ये ११८ टक्के, २००६मध्ये १०७, २००९मध्ये ११७, २०१०मध्ये १२४, २०१३मध्ये १०९ तर २०१६मध्ये सरासरीच्या तुनलेत ११२ टक्के पाऊस झाला होता. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी तीव्र उन्हाळ्यामध्ये प्रशासनाकडून काही गाव, वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागल्याची स्थिती निर्माण झाली होती. मराठवाड्यात सरासरी ७७९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे, मात्र त्या तुलनेत २०१४मध्ये ४१४.०३ मिमी ५३.१५ टक्के, तर २०१५मध्ये मराठवाड्यात केवळ ४३३.६४ मिमी (५५.६७ टक्के) पाऊस झाला.

सलग दोन वर्षे पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे संपूर्ण मराठवाड्याने पाणीटंचाई आणि दुष्काळाची भीषणता अनुभवली. २०१५मध्ये मराठवाड्यातील ४४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण आर्थिक घडी बिघडली होती. २००४ ते २०१७ या कालावधीत प्रत्येक वर्षी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने बहुतांश वेळा या जिल्ह्यांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. बीड जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस असला, तरी बहुतांश वेळी जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये टँकर सुरू करावे लागले होते. दोन वर्षांपूर्वी तर प्रशासनाला बीड जिल्ह्यात सर्वाधिक टँकर; तसेच चारा छावण्या उभाराव्या लागल्या होत्या. गेल्या दहा -बारा वर्षांपासून पावसाच्या लहरीपणा; तसेच गारपिटीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वर्षनिहाय पाऊस
२००६ : १०७.१६ टक्के
२००७ : ९०.८६ टक्के
२००८ : ८०.३७ टक्के
२००९ : ११७.७८ टक्के
२०१० : १२४.९१ टक्के
२०११ : ८४.०३ टक्के
२०१२ : ६९.१० टक्के
२०१३ : १०९.६७ टक्के
२०१४ : ५३.१५ टक्के
२०१५ : ५५.६७ टक्के
२०१६ : ११२.८८ टक्के
२०१७ : ८६.४० टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक बलात्कार; आणखी एकास अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बर्थ डे साजरा करताना कोल्ड ड्रिंकमध्ये दारू मिसळून पाजल्यानंतर विवाहितेवर सामूहिक बलात्कारप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी आणखी एकाला रविवारी अटक केली. त्याचे नाव जगदीश उत्तम ठोंबरे (वय २४, रा. आडगाव ठोंबरे), असे आहे. ही माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक साईनाथ ताईतवाले यांनी दिली.
संतोषीमातानगर येथील रहिवासी विवाहितेला बर्थ डे साजरा करण्यासाठी तिच्या मित्राने टाकळी शिवारात नेले होते. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करून विमानतळासमोरील पेट्रोल पंपजवळ फेकून दिले होते. सकाळी शुद्ध आल्यानंतर पीडिता सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेली. पोलिसांनी तिला घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवून दिले. या गुन्ह्यात चिकलठाणा पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखळ करून विवाहितेचा मित्र अनिल वसंत ठोंबरे (रा. करमाड) याला शनिवारी अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आडगाव ठोंबरे येथे संशयित आरोपींचा शोध घेतला. पण, ते पसार झाले होते. आडगाव ठोंबरे शिवारात झाडीत लपलेल्या जगदीश उत्तम ठोंबरे (वय २४, रा. आडगाव ठोंबरे) याला रविवारी सहाय्यक पोलिस निरिक्षक साईनाथ ताईतवाले, पोलिस कर्मचारी नामदेव इंद्रकंठे, संतोष तिकनीकर यांनी ताब्यात घेतले. याप्रकरणात पोलिसांनी अनिलच्या दोन मित्रांची माहिती घेतली. त्यांच्याकडे मोबाइल नसल्याने जगदीश ठोंबरे याला शोधणे कठीण झाले होते. पण, पोलिसांनी एकाला शोधले असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे.

आरोपींच्या बायका बाळंतपणासाठी

सामूहिक बलात्कार प्रकरणातील रविवारी पकडलेला संशयित आरोपी जगदीश ठोंबरे आणि व इतर एकाचे लग्न झालेले आहे. या दोन्ही मित्रांच्या ‌बायका बाळंतपणासाठी माहेरी गेल्या असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. बायको माहेरी गेल्याने ही चूक भोवली असल्याची माहिती संशयित आरोपी जगदीश ठोंबरे याने पोलिसांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक बदल्यांचा संभ्रम कायम

0
0

औरंगाबाद ः जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे भिजत घोंगडे रविवारीही कायम होते. दोन दिवसांपूर्वी ग्रामविकास विभागाने बदली प्रक्रिया राबिवण्याबाबतचे संकेत दिले होते. पण रविवारी रात्रीपर्यंत मुंबईतून काहीच माहिती प्राप्त झाली नाही. अशा संभ्रमावस्थेत सोमवारी जिल्ह्यातील शाळा दिवाळीच्या सुटीनंतर सुरू होणार आहेत. सुटीनंतर किमान पहिल्या दिवशी तरी शिक्षक आपल्या शाळेवर जाण्याचा आनंद घेतील.

शालेय शिक्षण व ग्रामविकास विभागाने यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया राज्यस्तरावर एकत्र ऑनलाइन राबविण्याचे जाहीर केले होते. एरव्ही नियमित वेळापत्रकानुसार मे महिन्यापर्यंत बदल्या पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यास प्रचंड विलंब झाला. चार संवर्ग वर्गीकरण करून शिक्षकांकडून बदल्यांचे अर्ज मागविले गेले. या प्रक्रियेविरोधात काही शिक्षक कोर्टात गेले. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

दरम्यान, दिवाळीच्या सुटीपूर्वी बदलीप्रक्रिया राबविण्याच्या हालचाली ग्रामविकास विभागाने केल्या. गेला आठवडाभर याद्या तयार असून सीइओंच्या लॉगीनवर या याद्या अपलोड केल्या जातील, अशी चर्चा शिक्षकवर्गात होती. प्रत्यक्षात रविवार उलटून गेला तरी याद्या आल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या याद्यांमध्ये त्रुटी राहिल्या आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी पुढील दोन दिवस लागणार असून त्यानंतर बदल्यांची यादी संबंधित जिल्हा परिषदांना पाठविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचनेर महोत्सवाचा उत्साहात समारोप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथील तीन दिवसांच्या वार्षिक यात्रा महोत्सवाचा रविवारी उत्साहात समारोप झाला. तीन दिवसांत देशभरातून लाखो भाविकांनी कचनेरला येऊन भगवंतांचे दर्शन घेले.

प्रबलसागर महाराज, विप्रणतसागर महाराज,गुरुनंदनी माताजी, कुलभूषमती माताजी यांच्या सानिध्यात रविवारी भगवंतांचा पंचामृत महामस्तकाभिषेक पार पडला. बोलिया होऊन भगवंतांचे इंद्र, इंद्राणी, शांती मंत्र, दुग्ध अभिषेक,सर्व औषधी आदी मान विविध भक्तांना मिळाले. यात्रेनिमित्त प्रमोद कासलीवाल, सुनील पाटणी व मनोज सावजी परिवाराच्या वतीने सलग चार दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

महोत्सव यशस्वी करण्यासाठी डी. यू. जैन, सुरेश कासलीवाल, प्रमोद कासलीवाल, भरत ठोळे, प्रकाश पाटणी, हेमंत बाकलीवाल, संतोष पाटणी, मनोज सावजी, किरण मास्ट, प्रवीण लोहाडे,कस्तुरचंद लोहाडे, प्रकाश गंगवाल, दिलीप काला, सुगंधचंद काला, प्रसिद्धी समितीचे नरेंद्र अजमेरा, पियूष कासलीवाल आदीसंह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. उपाध्यक्ष लोहाडे यांनी सूत्रसंचालन केले. अक्षदा केटरर्सचे संचालक

अमीत कासलीवाल, औरंगाबाद येथील सेवा ट्रेडर्स मंडप व कचनेर दर्शन वाहनाचे वाहक यांच्यासह गावकरी व समाज बांधवांचे विशेष सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरसिद्धी यात्रेच्या स्पर्धेत हजारावर मल्लांचा सहभाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हरसिद्धी माता यात्रेच्या निमित्ताने आयोजित कुस्‍त्यांच्या दंगलीत हरियाणाच्या ‌शिवानी चौधरी हिला औरंगाबादच्या अमरिन सय्यदने नमवले. अमरिनने शिवानीला मात देताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. या स्पर्धेत विविध राज्यातील सुमारे हजारपेक्षा जास्त महिला व पुरूष मल्लांनी शड्डू ठोकले.
हरसिद्धी मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्‍ती स्पर्धेचे उद्‍घाटन महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी स्‍थायी समिती सभापती मोहन मेघावाले, पुरवठा अधिकारी भारत कदम आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्‍घाटनाची कुस्ती औरंगाबादची मल्ल अमरिन सय्यद आणि हरियाणाची शिवानी चौधरी यांच्यात लावण्यात आली. बेगमपुरा येथील जय हनुमान व्यायामशाळेच्या अमरिनने तिच्यापेक्षा वजनाने दुप्पट असलेल्या शिवानी चौधरीला चित केले. अमरिनने स्पर्धा जिंकताच हजारो प्रेक्षकांनी जल्लोष केला. यावेळी कुस्तीशौकिनांनी दिला शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले. अमरिन सय्यदने या यशाचे श्रेय प्रशिक्षक प्रा. हंसराज डोंगरे यांना दिले.
उद्‍घाटनपर भाषणात विजय चौधरी यांनी, मल्लांनी परिश्रम कायम ठेवून चांगले कुस्तीपटू व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विजय चौधरी यांचे वडील नाथू चौधरी यांचीही उपस्थिती होती. या स्पर्धेत दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश या राज्यांसह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारासह औरंगाबादचे कुस्तीपटू सहभागी झाले होते. स्पर्धेत २५ पेक्षा जास्त महिला कुस्तीपटू सहभागी झाल्या. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे उदघाटनपर भाषणात म्हणाले की, विजय चौधरी हा तिसऱ्या वेळी महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर विधानसभेत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. यानंतर महाराष्ट्र केसरी याला पोलिस दलात सहभागी होण्यासाठी नियम बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कुस्तीपटूंनी सलग तीन वेळेस महाराष्ट्र केसरी जिंकावी व पोलिस अधिकारी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

जालन्याच्या रूद्रला चांदीची गदा
हरसिद्धी मातेच्या यात्रेनिमित्त शेवटची कुस्ती जालन्याचा रूद्र काळे आणि सिल्लोडचा प्रवीण देशमुख यांच्यात झाला. अटीतटीची शेवटची लढत झाली. प्रवीणने कुस्तीत दाखविलेल्या चाणाक्ष पेचामुळे रूद्रला आधी बांधून ठेवले होते. मात्र अखेरच्या काही क्षणात रूद्रने प्रवीणला चित केले. प्रवीण देशमुखवर विजय मिळवून जालन्याच्या अस्लम काझी यांचा पठ्ठा रूद्र काळे यांनी चांदीची गदा पटकाविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालबाह्य झालेले हजारावर कायदे बाद

0
0

औरंगाबाद ः बदलते तंत्रज्ञान, समाजातील बदल विचारात घेऊन केंद्रीय विधी आणि न्याय विभागाने एक हजार १७५ कायदे बाद केले आहेत, अशी माहिती केंद्रीय विधी आणि न्याय विभागाचे सचिव डॉ. नारायणा राजू यांनी रविवारी दिली. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमासाठी रविवारी ते औरंगाबादमध्ये आले होते.

विद्यापीठातील व्याख्यानानंतर त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. देशाच्या कायदे बनविण्यात विधी आणि न्याय विभागाचे महत्त्व विषद करताना ते म्हणाले, ‘बहुतांशी कायदे, त्यातील तरतुदी सर्वसामन्यांना माहिती नाहीत. कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचावी, त्यांना कायदा सोपा वाटावा, समजावा म्हणून कायद्यांमध्ये काळाशी सुसंगत बदल केले जात आहेत. त्यातून जुने एक हजार १७५ कायदे या सरकारने रद्द केले आहेत. कायद्यांसह स्टॅट्युटही उपलब्ध आहेत.’

सर्वसामान्यांपर्यंत कायदे पोचविण्यासाठी विभाग काम करत असून, केलेले बदल लगेचच वेबसाइटवर प्रकाशित करणे आणि प्रत्येक भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणे, असे टप्पे करण्यात आले आहेत. अनेक महत्त्वाच्या भाषांमध्ये कायद्याचे भाषांतर करण्यात आले आहे. विभागाने १९४७ ते २०१७पर्यंतचे कायदे, त्यातील बदल वेबसाइटवर उपलब्ध करून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराची रणधुमाळी सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकीत पाच गणांसाठी २६१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तीन पॅनलमध्ये निवडणूक होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून काही उमेदवार सोमवारी अर्ज परत घेणार आहेत. संबंधित गटाकडून पॅनलची अधिकृत घोषणा झाल्यानंतर विद्यापीठ वर्तुळात प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

अध्यापक, प्राचार्य, विद्यापीठ अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी, संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांचे विभागप्रमुख या निर्वाचक गणासाठी २४ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या गणांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली असून सहा नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. उत्कर्ष पॅनल, विद्यापीठ विकास मंच आणि बामुक्टो या तीन पॅनलमध्ये लढत होणार आहे, मात्र ‘बामुक्टो’च्या काही उमेदवारांना स्थान देऊन निवडणूक दोन पॅनलमध्ये होण्याची शक्यता आहे. पॅनलमध्ये स्थान देण्याच्या तडजोडीवर मागील चार दिवसांपासून चर्चा झाली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अर्ज मागे घेतल्यानंतर सर्व पॅनल आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. त्यानंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्तुळात प्रचार सुरू होणार आहे. सर्वाधिक उमेदवार विजयी करण्यासाठी प्रचाराची स्वतंत्र यंत्रणा राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांच्या गोंधळामुळे निवडणूक चर्चेचा विषय ठरली. प्रतिस्पर्धी गटाला लक्ष्य करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. या पोस्ट अत्यंत वैयक्तिक स्वरुपाच्या असल्यामुळे प्रचाराची पातळी घसरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पदवीधर निर्वाचक गण निवडणुकीचे उमेदवारी अर्ज सहा ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत निवडणूक विभागात उपलब्ध आहेत. या सहा दिवसात पदवीधर लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज भरणार आहेत. ‘पदवीधर’मध्ये प्राध्यापकांना संधी देऊन तुल्यबळ पॅनल विद्यार्थी संघटनांना डावलत असल्याने रोष वाढला आहे.

‘पदवीधर’मध्ये संघटनांचे आव्हान
उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंच यांनी पदवीधर निर्वाचक गणात दहा उमेदवार देण्याची तयारी केली आहे. या दोन पॅनलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता होती, मात्र आता विद्यार्थी संघटनांनी एकत्रितपणे स्वतंत्र पॅनल जाहीर करून आव्हान दिले आहे. एनएसयूआय, एसएफआय, मनविसे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाराज पदाधिकारी यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. मतदारांची नोंदणी करण्यात यातील काही उमेदवार सक्रिय होते. विद्यार्थी संघटनांचे आव्हान लक्षात घेऊन चर्चेअंती त्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ही निवडणूक लढवणारच असा निर्णय संघटनांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images