Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भोळसर मुलाचा गच्चीवरून पडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मयूर पार्क परिसरातील मारुतीनगर येथील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शैलेश कैलास सोनवणे, असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मृत मुलाचे वडील माजी सैनिक असून, त्यांना दोन मुले आहेत. मृत शैलेश भोळसर स्वभावाचा होता, त्याच्यावर सैनिकी रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. सोनवणे हे दुसऱ्या मजल्यावर राहतात. शैलेशने शुक्रवारी सकाळी आई-वडिलांसोबत चहा घेतला. त्यानंतर दोघे कामात व्यस्त असताना शैलेश गच्चीवर बॉल खेळण्यासाठी गेला. खेळताना बॉल खाली जमिनीवर पडल्यानंतर शैलेशने थेट उडी मारली. काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने आई-वडील दोघे गॅलरीत आले असता मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला शेजाऱ्यांच्या मदतीने जवळील एम्स हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तो पर्यंत शैलेशची प्राणज्योत मालवली होती. घाटीतील डॉक्टरांनी तपासून शैलेशला तपासून मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरसकट कर्जमाफी करा : काँग्रेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार खोटारडे आहे, जनविरोधी धोरण राबवित आहेत, असा आरोप करीत काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचा काढला. पक्षाने यावेळी शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफीसह अन्य मागण्या केल्या.

औरंगाबाद तालुका काँग्रेस समितीतर्फे या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, विलास औताडे, तालुकाध्यक्ष रामराव शेळके, शहराध्यक्ष नामदेव पवार, जितेंद्र देहाडे, जगन्नाथ काळे, काकासाहेब कोळगे पाटील आदी उपस्थित होते.

सत्तेत आल्यापासून या सरकारने सतत सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटात टाकणारे धोरण स्वीकारले आहे. शेतकऱ्यांवर अन्यायाची सीमा ओलांडली आहे, असा आरोप करून कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

कार्यकर्त्यांच्या हातातही भाजपविरोधी घोषणांचे फलक होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडीत वाळलेली पिके घेऊन कार्यकर्ते आले होते. क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंजमार्गे काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रुपातंर झाले.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, भाऊसाहेब जगताप, डॉ. पवन डोंगरे, जहीरशेठ करमाडकर, मनोज शेजूळ, सर्जेराव चव्हाण, संतोष शेजूळ, रेणुका शिंदे, बबन कुंडारे, कलीम पटेल, किशोर बलांडे, ताराबाई उकिरडे, सुभाष भालेराव, किसान राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सत्तार यांनी सरकारवर तोड डागली. महागड्या कारला सहा टक्के जीएसटी आणि शेतकरी बांधवाना लागणारे बियाणे, खते, शेतीविषयक अवजारे, ट्रॅक्टर यांना मात्र १८ ते २८ टक्के जीएसटी. सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षात असताना कापसाला सात हजाराचा भाव मागणारे आता शेतकऱ्यांना तीन हजाराचा भाव देत आहे. सोयाबीनला पाच हजाराचा भाव मागणारे आता अडीच हजाराचा भाव देत आहेत, अशी टीका माजी आमदार डॉ. काळे यांनी केली. आमदार झांबड यांनी, सर्वसामान्य जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार होते, ते कुठे गेले, असा सवाल खास मोदी स्टाइलमध्ये संवाद साधत उपस्थित केला. देहाडे यांच्यासह अन्य नेत्यांनीही आपल्या भाषणात भाजप सरकारचा समाचार घेतला.

प्रमुख मागण्या
- औरंगाबाद व फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
- फसवी कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या भावनेशी व जीवाशी खेळणे बंद करून सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
- शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, शेतमालाला हमीभाव देण्यात यावा
- तोडलेले वीज कनेक्शन त्वरित जोडलेच पाहिजे
- तालुक्यांतील राज्य महामार्गाची, खराब रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ​ महाराष्ट्र-पंजाब लढत आजपासून रंगणार

$
0
0

महाराष्ट्र-पंजाब लढत आजपासून रंगणार
सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील महत्त्वपूर्ण सामन्यास शनिवारपासून (१० नोव्हेंबर) औरंगाबादेत सुरुवात होणार आहे.
एडीसीए मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या या चारदिवसीय सामन्यात महाराष्ट्र संघ डावखुरा आक्रमक फलंदाज विजय झोलच्या नेतृत्त्वाखाली उतरणार आहे. महाराष्ट्राने नुकताच विदर्भ संघाविरुद्ध विजय नोंदवला असून पंजाबविरुद्धही महाराष्ट्राला निर्णायक विजय आवश्यक आहे. फलंदाजीसाठी विजय झोलसह निखिल नाईक, जय पांडे, प्रशांत कोरे या आघाडीच्या फलंदाजांवर महाराष्ट्राची भिस्त असणार आहे. जगदीश झोपे, भरत पुरोहित, शुभम कोठारी, शमशुझमा काझी या फिरकी गोलंदाजांकडून महाराष्ट्राला अपेक्षा असतील. एडीसीएची खेळपट्टी प्रामुख्याने फलंदाजीला साथ देणारी असली तरी फिरकी गोलंदाजीसाठीही खेळपट्टी पूरक ठरू शकते. त्यामुळे महाराष्ट्र संघ तीन फिरकी गोलंदाजांसह सामन्यात उतरण्याची शक्यता आहे. सामन्याच्या दिवशी खेळपट्टीचा नूर पाहून महाराष्ट्राचा अंतिम संघ निवडला जाईल.
पंजाबचा संघ तुल्यबळ असून या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यात त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. साहजिकच महाराष्ट्र संघाविरुद्ध पंजाबचा संघ जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र संघास विजय आवश्यक असल्याने ही लढत चुरशीची होईल यात शंकाच नाही. औरंगाबाद शहरात सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेतील सामना प्रथमच होणार आहे. साहजिकच क्रिकेट चाहत्यांमध्ये या लढतीतीच मोठी उत्सुकता आहे. तसेच जालन्याचा विजय झोल या स्पर्धेत संघाचे नेतृत्त्व करीत आहे. त्याचा खेळ पाहण्याची संधीही त्यानिमित्ताने मिळणार आहे.
संघ : महाराष्ट्र - विजय झोल (कर्णधार), जय पांडे, प्रशांत कोरे, निखिल नाईक (यष्टीरक्षक), शमशुझमा काझी, उत्कर्ष अग्रवाल, ऋषिकेश काळे, एझान सय्यद, जगदीश झोपे, पियुष साळवी, जयदीप भराडे, उसामा पारकर, शुभम कोठारी, प्रणय सिंग, भारत पुरोहित.
पंजाब - करण कैला (कर्णधार), प्रभज्योतसिंग, सनवीरसिंग, हिमांशू शर्मा, अभिजित गर्ग, निखिल चौधरी, अनमोल मल्होत्रा, अकुल पांडव, मयंक मकरंद, जगजित सिंग, रमणदीप सिंग, मनसब गिल, तलविंदर सिंग, मनप्रीत सिंग, अर्पित पन्नू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ महादेव उद्यानला ‘पुरातत्व’चा खोडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्रीय पुरातत्व विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळत नसल्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषित केलेल्या वेरूळ येथील महादेव उद्यानाच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. निधी आला, पण काम करता येईना अशी वन खात्याची अवस्था झाली आहे.

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर देवस्थान असल्याने तेथे महादेव वन उद्यान उभारण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. घृष्णेश्वर मंदिराच्या धार्मिक महत्वाशी सुसंगत अशा सुमारे पाच हेक्टर परिसरात हे वन उद्यान उभारण्यात येणार असून, यानिमित्त पर्यटनाला अधिक चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उद्यानासाठी आवश्यक ती जागा ‘एमटीडीसी’कडून यापूर्वीच हस्तांतरीत करण्यात आली आहे. बांधकामासाठी निधीचा पहिला हप्ताही वनविभागाला प्राप्त झाला आहे. निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालीही जोमाने सुरू झाल्या आहेत पण, नियोजित उद्यान हे वेरूळ लेणी तसेच घृष्णेश्वर मंदिरानजीक येत असल्याने केंद्रीय पुरातत्व विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक आहे. त्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही झाली, पण त्यास अद्यापही मंजुरी न मिळाल्याने उद्यानाचे काम सुरू करता आले नाही, अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.

असे असेल उद्यान
उद्यानाच्या नियोजित जागेतून एक मोठा नाला जातो. त्यावर बंधारा तसेच एक लाकडी पूल उभारण्याचे नियोजन आहे. भव्य प्रवेशद्वार, एक हजार ७०० मीटरची निसर्ग पाऊल वाट, बसण्यासाठी ठिकठिकाणी पर्यावरणपूरक आसन, उपहारगृह, स्वच्छतागृह, खेळणी, वन्यप्राण्याचे पुतळे, पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती, कृत्रिम धबधबे, दगडाच्या कलाकृती यासह अन्य आकर्षिक बाबी या उद्यानात असणार आहेत. या उद्यानात प्रामुख्याने भगवान शंकरांना आवडणारी फुले, झाडांची लागवड केली जाणार आहे. यात रुद्राक्ष, विविध पांढऱ्या रंगाची फुले असणारी झाडे, बोगनवेली, तुळस त्याचप्रमाणे वड, पिंपळ, उंबर यांची लागवड केली जाईल, अशी माहिती वन विभागाने दिली. दरम्यान, ना हरकत प्रमाणपत्रासाठी पुरातत्व विभागाकडे रितसर वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. पत्र प्राप्त होताच उद्यानाच्या कामास अधिक वेग येईल, अशी माहिती वन विभागाचे उप वनसंरक्षक सतीश वडस्कर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठामुळे मैदानात सोडवावा लागला पेपर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यापीठाने पदवी परीक्षेसाठी अचानक शाळेचे परीक्षा केंद्र दिले आणि त्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे त्यांना कल चाचणीचा पेपर चक्क मैदानात बसून लिहावा लागला.

गारखेडा भागात शिवनेरी कॉलनीमध्ये कमलनारायण जैस्वाल कला - वाणिज्य महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला शाळा देखील जोडलेली आहे. शाळेतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाची कल चाचणीची परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली आहे. तीन दिवस म्हणजे शनिवारपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. शुक्रवारी काही विद्यार्थ्यांचा कल चाचणीचा पेपर होता. पेपरची तयारी होत होती. तेव्हा अचानक विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचे विद्यार्थी तेथे धडकले. त्यांना अचानकपणे या महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. अचानकपणे पदवी परीक्षेचे विद्यार्थी आल्यामुळे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाची पळापळ झाली. व्यवस्थापनाने आपल्या शाळेतील मुलांना वर्गखोल्यांमधून बाहेर काढले. त्यांना कल चाचणीच्या परीक्षेसाठी मैदानात बसवले आणि पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने ही समयसूचकता दाखवली असली तरी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीच्या कपड्यांना ‘जीएसटी’चा तडका

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात थंडीची चाहूल लागताच लोकरीच्या कपड्यांनी अनेक दुकानांची दालने साजली आहेत, तर तिबेटियन दुकानदारांनी मध्यवर्ती बसस्थानकाजवळ दुकाने थाटली आहेत. टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली आणि कुंभारवाडा येथील दुकानातही या कपड्यांना मागणी वाढली आहे.

औरंगाबादच्या कापड व्यावसायिकांनी पंजाब, ‌हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली येथून लोकर व लोकरीचे कपडे मागवले आहेत. यंदा जीएसटीमुळे सरासरी १५ ते २० टक्क्यांनी लोकरीच्या कपडे दरात वाढ झाली आहे, असे रंगारगल्ली येथील इक्बाल महंमद यांनी सांगितले. फर आणि चामडयाचे एकत्र जॅकेट आपण पंजाबहून आणल्याचे सांगून कमीत कमी ५०० ते १००० रुपयांपर्यंत त्याच्या किंमती असल्याचेही त्यांनी सांगितले.

घरगुती व्यवसाय करत असलेल्या खिवंसरा पार्क मधील पल्लवी कुर्डूकर यांनी सांगितले की, ‘मी छोट्या मुलांचे, महिलांचे आणि मुलींसाठी लागत असलेल्या स्वेटर्सची निर्मिती करते. लोकरीचे दर फार काही वाढले नाहीत, पण ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला आहे. स्वेटर्स, फ्रॉक, शाली, आसने, कानटोप्या, जॅकेट, आदींना नेहमी मागणी असते. यावेळी लोकरीचे स्वेटर कमीतकमी २५० ते ५५० दरम्यान आहेत. गेल्या वर्षीही जवळपास हाच दर होता. यात काही फारशी वाढ झालेली नाही.

वाहतूक खर्चात वाढ
गुलमंडीवरील काही व्यावसायिकांच्या मते जीएसटीचा परिणाम झाला असल्याने दर वाढले आहेत, पण लोकरीचे उत्पादन पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागातून होते. याशिवाय तिबेटहून काही माल आणला जातो. हा ट्रान्सपोर्टचा खर्च आहे. यामुळेही दरवाढ झाली आहे. साधारणत: दरवर्षी ८ ते १० टक्के दरवाढ होत असतेच असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ स्वच्छ अन् हरीत सिटीला प्राधान्य द्या

$
0
0

स्वच्छ अन् हरीत सिटीला प्राधान्य द्या
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सिटी बसचे ठिक आहे, पण स्वच्छ आणि हरीत शहराला प्राधान्य द्या. घनकचरा व्यवस्थापनात प्रामुख्याने काम करा,’ अशी सूचना स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एसपीव्हीचे प्रमुख मार्गदर्शक व राज्य शासनाच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी केली आहे,’ अशी माहिती महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.

आयुक्त मुगळीकर दोन दिवसांपूर्वी बैठकीच्या निमित्ताने मुंबईला गेले होते. यावेळी त्यांनी पोरवाल यांची भेट घेतली व औरंगाबादच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाबद्दल चर्चा केली. अपूर्व चंद्रा यांच्या जागी राज्य शासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पोरवाल यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. पोरवाल यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती देताना मुगळीकर म्हणाले, ‘एसपीव्हीच्या (स्पेशल पर्पज व्हेकल) माध्यमातून सोलार प्रकल्प आणि स्मार्ट लायटिंगच्या प्रकल्पांना मंजुरी द्यावी अशी विनंती पोरवाल यांना केली. सिटी बसच्या संदर्भात देखील पोरवाल यांच्याशी चर्चा झाली. सिटी बसचा विषय ठिक आहे, पण त्यापूर्वी घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ, हरीत शहराला प्राधान्य द्या, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ आणि हरीत शहराचा कृती आराखडा द्या अशी सूचना केली. सिटी बसबद्दल नेमकी काय भूमिका आहे ते स्पष्टपणे मांडा. सिटी बस कोण घेणार, घेतलेल्या सिटी बस कोण चालवणार याची माहिती सविस्तर सादर करा,’ अशी सूचना देखील पोरवाल यांनी केल्याचा उल्लेख मुगळीकर यांनी केला.

२९ नोव्हेंबर रोजी पोरवाल शहरात
‘सोलार प्रकल्प, स्मार्ट लायटिंग आणि घनकचरा व्यवस्थापन या बद्दलचे प्रकल्प अहवाल तयार आहेत. स्मार्ट सिटीच्या एसपीव्ही बैठकीसाठी पोरवाल २९ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत येणार आहेत. तयार असलेले सर्व प्रकल्प अहवाल या बैठकीत ठेवू. एसपीव्हीची मान्यता मिळाल्यावर कामांना प्रत्यक्ष सुरुवात होईल,’ असे मुगळीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय नेतृत्वामुळे ग्रंथालये बकाल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सुसंस्कृत समाज अन् चांगली पिढी अनौपचारीकरित्या घडविणारी सार्वजनिक ग्रंथालये सांस्कृतिक जान नसलेल्या राजकीय नेतृत्त्वामुळे बकाल झाली आहेत. ग्रंथपालांच्या प्रश्नांकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष केले जाते आहे,’ असे परखड मत के. द. वडजीकर स्मृती पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्याम शेलगावकर यांनी व्यक्त केले.

जीवन विकास ग्रंथालयात प्रभाकर भालेराव स्मृतिदिन, के. द. वडजीकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा झाला. व्यासपीठावर प्रा. जीवन देसाई, श्याम शेलगावकर, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांची उपस्थिती होती. ग्रंथालय चळवळीत भरीव योगदानाबाबत यंदाचा वडजीकर स्मृती पुरस्कार शेलगावकर यांना बर्दापूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, गौरवपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना शेलगावकर म्हणाले, ‘आणखी काम करण्याची स्मृती, प्रेरणा देणारा हा पुरस्कार आहे. सार्वजनिक ग्रंथालये ही अनौपचारिक शिक्षणाची केंद्र, ज्ञान मंदिर आहेत. वाचनाने ज्ञानात भर पडते, आत्मविश्वास वाढतो. वाचक व ग्रंथ यांच्यातील दुवा हा ग्रंथपाल असतो. स्पर्धेच्या युगात वाचन महत्वाचे आहे, परंतु आज सार्वजनिक ग्रंथालयांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपालांच जीवन संघर्षमय झाले आहे.’ कार्यक्रमाला भा. बा. आर्वीकर, नितीन कंधारकर, नितीन काजवे आदींची उपस्थिती होती. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले.

वाचन संस्कृतीला खीळ
बर्दापूरकर आपल्या भाषणात म्हणाले, ‘ग्रंथालयांची अवस्था बकाल झाली आहे. जागतिक पातळीवर वाचन चळवळीत होणारे बदल आपण स्वीकारले नाहीत. जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्थेत बदलणारे नवे तंत्रज्ञान वेळीच स्वीकारणे गरजेचे होते. त्यासह सर्व पातळीवरीचे नेतृत्व राजकारण्यांच्या हाती दिले आहे. आजचे राजकीय नेतृत्त्व सांस्कृतिक जान नसणारे आहे. त्यांच्या संकल्पना वेगळ्या आहेत. त्यामुळे वाचन संस्कृतीसारख्या चळवळीला बळ मिळत नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालना तालुक्यात २४ गायींचा मृत्यू

$
0
0

जालना : जालना शहरालगत असलेल्या इंदेवाडी शिवारात मारुती मंदिरासाठी सोडलेल्या ४० गायींपैकी २४ गायींचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या गायी गावातीलच मारुती मंदिर देवस्थानाच्या आहेत.
इंदेवाडी येथील मारुती मंदिरात ३५ ते ४० गायी आहेत. या गायी रात्री गाव शिवारात चरण्यासाठी जात व सकाळी मंदिर परिसरात परत येत. या गायी नेहमीप्रमाणे रात्री गाव शिवारात गेल्या होत्या. परंतु, त्यातील दोन ते तीन गायी सकाळी मंदिरासमोर मृत अवस्थेत आढळून आल्या. आणखी शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २४ गायी मृत आढळून आल्या. तसेच सात ते आठ गायी या अत्यवस्थ होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक गावात दाखल झाले. पशूवैद्यकीय पथकाने लागलीच अत्यवस्थ असलेल्या आठ गायींवर उपचार सुरू केले आहेत. सर्व मृत गायींची उत्तरीय तपासणी करून त्याचे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेनंतर ग्रामस्थांनी जालना-अंबड रस्त्यावर गायींचे मृतदेह टाकून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. दरम्यान, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी इंदेवाडी इथं जाऊन या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. काही विषारी ज्वारी खाल्ल्याने या गायींचा मृत्यू झाला असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. घातपातीचा संशय आल्यास याची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालनेकरांना मिळणार नियमित पाणी

$
0
0



म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना शहरातील जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी अद्ययावत नवी पाणीपुरवठा व्यवस्था पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित होईल आणि पुढील वर्षांपासून दररोज नियमित पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी हमी दिली आहे. या हमीची नोंद घेऊन जनहित याचिकेचा उद्देश सफल झाला असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी जनहित याचिका निकाली काढली.
जालना शहराला महिन्यातून एकदा पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत असे आणि अनेक वस्त्यांमधून तर पाणी मिळतही नव्हते. ही स्थिती लक्षात घेऊन अमितसिंग मोहने, विजय वैष्णव, अभयकुमार यादव यांनी २००८ मध्ये जनहित याचिका केली होती आणि जालना नगरपालिकेने दररोज प्रत्येक नळधारकाला १६० लिटर पाणी नियमितपणे उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली होती. नवीन पाणीपुरवठा योजना एक वर्षांत कार्यान्वित करावी, अशी विनंतीही केली होती. या याचिकेत वेळोवेळी अंतरिम आदेश देण्यात आले. बारामती आणि लातूर शहरासाठी पाणीपुरवठा योजना लवकर मंजूर करण्यात आल्या व कार्यान्वितही झाल्या. परंतु, जालना नगरपालिका विरोधी पक्षाच्या ताब्यात असल्यामुळे तत्कालीन सरकार या योजनेला मंजुरी देत नाही, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता. शेवटी न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे राज्य सरकारला जालना पाणीपुरवठा योजना मंजूर करणे भाग पडले आणि जायकवाडी जलाशयातून जालन्याला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १२३.९९ कोटी रुपयांची योजना २००५ मध्ये सादर करण्यात आली होती. ती मंजूर झाली त्यावेळी तिची अंदाजित किंमत २४२ कोटी रुपयांवर गेली. त्यानंतर देखील प्रत्यक्ष योजना कार्यान्वीत होईपर्यंत किंमत वाढली. अखेर योजना मंजुरीनंतर कार्यान्वित झाली. ही योजना मंजूर होवून कार्यान्वीत झाल्याची नोंद घेवून जालनावासियांना नियमित पाणी मिळणार या हमीची नोंद घेवून न्यायालयाने याचिकेचा उद्देश सफल झाल्याने याचिका निकाली काढली. या प्रकरणी याचिकाकर्त्याची बाजू प्रदीप देशमुख यांनी मांडली. त्यांना योगेश देशमुख यांनी सहाय्य केले. जीवन प्राधिकरणातर्फे दीपक बक्षी यांनी काम पाहिले.
लोकसहभाग महत्त्वाचा
या याचिकेचे वैशिष्ट्य म्हणजे पंचवीस हजार रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले तेंव्हा सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नादोरे यांच्यासह याचिकाकर्त्यांनी जालना शहरवासीयांकडून प्रभात फेरी काढत लोकवर्गणी जमा करून ही अनामत रक्कम न्यायालयात भरली होती. त्यासाठी जालन्यातील व्यापारी समुदायाने देखील सढळ हाताने मदत केली होती.
नऊ वर्षांचा अविरत लढा
या जनहित याचिकेत विधिज्ञ प्रदीप देशमुख यांनी कुठलीही फिस न आकारता विनामुल्य गेली ९ वर्षे काम चालवले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच जायकवाडी ते जालना पाईपलाईनचा प्रकल्प पुर्ण होवू शकला आणि आता त्यांच्याच प्रयत्नांमुळे शहरातील नव्या पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प देखील कार्यान्वीत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉलतिकीटअभावी पेपर हुकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फर्दापूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला अंधारात ठेऊन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या फर्दापूर येथील नॅशनल महाविद्यालयाच्या प्रतापामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार आली आहे. विद्यापीठाला या प्रवेशाची माहिती नसल्यामुळे पहिल्या पेपरच्या वेळी ३० ते ३५ विद्यार्थ्यांना हॉलतिकिटच आले नाही, तर ४० ते ५० विद्यार्थ्यांना हा पेपरही देता आला नाही. आता या मुलांचे वर्ष वाया जाण्याची भीती असून, विद्यापीठ प्रशासन यावर कोणती कार्यवाही करते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
फर्दापूर येथील कला व वाणिज्य नॅशनल महाविद्यालयात ५०७ विद्यार्थी शिक्षण घेतात. यात विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षाला १२०, दुसऱ्या वर्षाला ७८ आणि तिसऱ्या वर्षाला ६२ विद्यार्थी आहेत. कला शाखेला पहिल्या वर्षामध्ये १२०, दुसऱ्या वर्षाला ७० विद्यार्थी असून, तिसऱ्या वर्षासाठी पाच विद्यार्थी आहेत. या महाविद्यालयामध्ये शिक्षकांनी रिक्त जागेवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. ही संख्या महाविद्यालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त होती. मात्र, त्यांच्याकडून शुल्क भरून घेण्यात आले आणि प्रवेश नियमित करून देण्याचे त्यांना आश्वासन दिले होते. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला त्याची कोणतीच माहिती पुरवण्यात आली नाही. अखेरीस, पहिल्या इंग्रजीच्या पेपरपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटच आले नव्हते. त्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांना त्यांना पेपर देता आला नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीटची प्रत उपलब्ध नसल्याने कोऱ्या कागदावर नाव नंबर टाकून परीक्षेला बसवले. दीपक चंद्रकांत वानखेडे कला शाखेचा हिंदी विषयाचा पेपर दिल्यावर, एका प्राध्यापकाने पेपर हिसकावून खाडाखोड करून जमा करून घेतला. तर ऐनवेळी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे नॅशनल महाविद्यालयातील विद्यार्थांना एका बाकावर तीन ते चार विद्यार्थी बसून परीक्षा दिली. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी-पालकांसह विद्यालयात ठाण मांडून आहेत. आपल्या मुलाचे वर्ष वाया जातेकी काय, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात वाकोद (ता. जामनेर) येथील जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी फर्दापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...गाणं, गिटार, झोका!

$
0
0

...गाणं, गिटार, झोका!
---
कलावंतांचं आयुष्य म्हणजे स्वतःशी लढाई. कलेसह तगून राहण्याची. कधी चालता चालता वाट सापडते. कधी एखादी पायवाट तो स्वतः तयार करतो. त्यासाठी त्यानं आपल्या डोळ्यांतल्या आशा, आनंदाचे उमाळे आत जिरवलेले असतात. त्याचं हेच जगणं, त्याची प्रेरणा असतं. असंच एक कलावंत जोडपं संगीता राजेश भावसार. आजच्या अग्निपथमध्ये...
----
मनोज कुलकर्णी
Manoj.kulkarni@timesgroup.com
---
औरंगाबादच्या सिडको एन पाचमधलं तापडिया पार्क. वेळ संध्याकाळच्या सातची. घराबाहेरचीबेल वाजताच संगीता आणि राजेश भावसार यांनी हसऱ्या डोळ्यांनी स्वागत केलं. खरंतर त्यांच्याशी गप्पा मारण्याची तशी पहिलीच वेळ. मात्र, तसं अवघडलेपण जाणवलंच नाही. वाटलं आम्ही ओळखतोय खूप आदीपासून. खरं तर फक्त संगीता गायिका असल्याचं माहित होतं. मात्र, राजेश स्वतः संगीतकार आहेत, हे तिथं पोहोचल्यावरच कळलं. स्वतःला थोडं खजिल वाटलंही. मात्र, त्यांनीच आम्ही पडद्यामागची माणसं, असं बिरुद स्वतःला लावून ही औपचारिकताही संपवली.
दोघांनीही बोलायला सुरुवात केली. सुरुवात राजेश यांच्याकडून झाली. म्हणाले, ‘दहावीपासून पाश्चात्य संगीताची आवड. गुरुजी बर्नाड अन्थोनी यांच्याकडील ड्रम, कोंगू, तुंबा, बोंगो असं सारं शिकलो. घरात बाबा शिवदास, आई मंगला आणि भाऊ संतोष असे कुटुंब. बहिणी अनीता आणि सुनीता दोघींचीही लग्न झाली आहेत. माझ्यापुढं करिअरचा प्रश्न उभा राहिलाच नाही. स्वतःही ठरवलं होतं आणि घरातल्यांनीही कधीही न मागता माझ्या संगीत प्रवासाला पाठिंबा दिला. हे काम करताना आपण खरोखर जिवंत असल्याचं वाटतं. दुसरं काम मला जमलंच नसतं.’
आता संगीता यांनी बोलणं सुरू केलं. ‘मी गेवराईची. घरात बाबा शिवाजीराव जोशी आणि आई अरुणा असते. प्रसिद्ध अभिनेते नंदू माधव हे माझा मामा. लहानपणापासून मला गायनाची आवड. अगदी मेळ्यात जाऊन गाणं म्हणायचे. तेव्हा अनेकांना हे खटकायचं, पण आई-बाबांना भारी कोडकौतुक. ते ठामपणे पाठिशी ढाल बनून उभे राहायचे. पुढे कॉलेजात नाटक आणि गाणं बहरलं. कुठलाही युथ फेस्टिव्हल असो, माझा पहिला नंबर ठरलेला. हे इतकं रुळलं, की मी गायला स्टेजवर उभी राहिले, की खाली बसलेले परीक्षक गाणं सुरू करण्यापूर्वीच तुझाच एक नंबर असं हातानं खुणवायचे. त्यामुळं वाटायचं आपण जे काही करावं, ते गाण्यातच. एक संधी चालून आली. औरंगाबादच्या सरस्वती भुवन कॉलेजमध्ये संगीतकार राम कदम यांचा एक कार्यक्रम होता. तिथं मला एक गाणं म्हणायची संधी मिळाली. विशेष म्हणजे गेवराईवरून त्यावेळेस मी औरंगाबादला पहिल्यांदाच आलेले. कार्यक्रमाला अभिनेते अनिल मोरे, अभिनेत्री सीता देशमुख अशी दिग्गज मंडळी. त्यावेळेस गाणं म्हणताना खूप भीती होती. मी पिंजरा चित्रपटातलं ‘दे रे कान्हा चोळी आणि लुगडी...’ हे गाणं म्हटलं. ते राम कदमांना इतकं आवडलं, की त्यांनी त्याचक्षणी व्यासपीठावर माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. अन् इथून माझ्या गाण्यासाठी पुन्हा एक दिशा, प्रेरणा मिळाली. नंतर छोटे-छोटे गाण्याचे कार्यक्रम सुरू केले. गेवराईला राजेश यांच्या म्युझिक टाइम ग्रुपचा कार्यक्रम होता. तिथं राजेश यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या ग्रुपसोबत काही दिवस काम केलं. आमच्या ओळखीच रूपांतर प्रेमात झालं. १९९८मध्ये आम्ही लग्न केलं. अन् संगीता जोशीची भावसार झाले.’
‘राजेश माझ्या पाठिशी असल्याने गाणं थांबलंच नाही. औरंगाबादला भंडारी सर, विश्वनाथ ओक, यशवंतराव क्षीरसागर यांच्याकडं गाणं शिकले. आजवर अनेक कार्यक्रम केले. आकाशवाणीची कलावंत आहे. तिथंही गाणी गायली. एक नारी गावाला भारी, लई भन्नाट, राजा नंबर वन, खैरलांजी आणि आता तुका पाटील अशा अनेक चित्रपटात गाणी म्हंटली. पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, मिलिंद इंगळे यांच्यासोबत कार्यक्रम केले. आजवरच्या या वाटचालीत अनेक आनंदाचे अन् दुःखाचेही प्रसंग आले. पण घरातल्या सगळ्यांच्या साथीनं गात राहिले. काही वर्षांपूर्वी औरंगाबादच्या विमानतळाच्या उद्घाटनादिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपवून लगेच त्या दिवशी संध्याकाळच्या सुरेश वाडकरांसोबतच्या कार्यक्रमासाठी लातूरला निघालो. गेवराईच्या आसपास आमच्या क्वॉलिसला अपघात झाला. त्या अपघातात ड्रायव्हरचे दोन्ही पाय गेले. आमचे मित्र श्रीकांत वळसणकर यांनी एक पाय गमावला. आम्ही सगळे जखमी. आमदार अमरसिंह पंडितांनी आम्हाला गेवराईच्या रुग्णालयात नेलं. सुरेश वाडकरांसाठी दुसरे कलाकार पाठवले. आजही रात्री-अपरात्री कार्यक्रम होतात. जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात. कार्यक्रम ठरल्यापेक्षा कितीतरी उशीरा सुरू होतो. कलाकार ताटकळलेला असतो. या सगळ्यातून उभं राहयला आम्हाला गाणं आणि संगीत शिकवतं.’
आता सध्याच मला मच्छिंद्र चाटे यांच्या ‘तुका पाटील’ चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटाला राजेश सरकटे यांचं संगीत आहे. खरं तर मला क्यू ट्रॅकसाठी (गायकाला गाण्याची चाल ऐकवण्यासाठी म्हटलेलं गाणं) बोलावलं होतं, पण सगळ्यांना माझं गाणं इतकं आवडलं की त्यांनी या चित्रपटात मला चक्क पाच गाणी म्हणायला दिली. कामावर निष्ठा आणि विश्वास ठेवला की तुमच्या श्रमाचं मोल होतंच.
‘कशी जादू झाली बाई
मला माहेरी करमत नाही
हळदीचं अंग घेऊन
दोन दिस झाले येऊन
तरी परतायाची घाई
मला माहेरी करमत नाही...’
या गाण्याला सध्या यू ट्यूबवर हजारोनं हिटस् मिळतायत. राजेश सरकटे, नितीन सरकटे यांच्या पाठिंब्यामुळं खरंतर चित्रपट जगातली वाट गवसली. आमचा मुलगा फक्त सव्वा महिन्यांचा होता. तेव्हापासून आम्ही दोघंही कार्यक्रम करतो. हे केवळ राजेश यांचे आईबाबा, जे आत माझे आईबाबा झालेत त्यांच्यामुळंच शक्य झालं. त्यांनी मुलगा राहुल आणि मुलगी युगंधरा या दोघांना कधीही आमची कमतरता भासू दिली नाही. बाहेरगावी दौरे असायचो त्यावेळेस राहुलला आम्ही सोबत घ्यायचो. गाडीत एक झोळी बांधलेली असायची. त्याला दिवसभर जागं ठेवायचे. रात्री कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी खाऊपिऊ घालून झोपवायचे. कार्यक्रम सुरू असताना उठलाच, तर गाडीतलं कोणीतरी झोका देऊन त्याला शांत करायचं. आज राहुल मोठा झालाय. घरात कधी काळी राजेश यांनी आणून ठेवलली गिटार, ती ही तो इंटरनेटवर पाहून वाजवायला शिकलाय. विशेष म्हणजे त्याचं आमच्या इतकंच कलेवर प्रेम आहे. त्याची ही निष्ठा पाहून नितीन कुलकर्णी यांनी त्याला गिटार वादनाचे धडे दिले. गिटारच्या परीक्षा तो मेरीटमध्ये उत्तीर्ण झालाय. गाणं, संगीत, गाडीतला झोका आणि आता गिटार. आमची कधीच पाठ सोडणार नाही,’ हे सांगताना आजही संगीता, राजेश भावुक झाले होते. जुन्या दिसांत गेलेले. त्या झोक्यानं त्यांच्या घराच्या पायऱ्या उतरताना माझ्याही काळजाचा ठोका चुकलेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीकविमा योजनेतील खासगी कंपनी बदलू

$
0
0



म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
‘पीकविमा योजनेत सध्या खासगी विमा कंपन्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. त्याऐवजी सरकारी विमा कंपन्यामार्फत हे काम व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्याची दखल घेत तशी शिफारस करू,’ अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी दिली.

उस्मानपुरा येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, कचरू घोडके, राम बुधवंत आदी उपस्थित होते. पटले म्हणाले, ‘राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व-लावणीपूर्व नुकसान भरपाई, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतील नुकसान भरपाई, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, आदी बाबींवर विमा संरक्षण देण्यात आले आहे. विविध विमा कंपनीमार्फत ही योजना राबवली जाते, पण काही खासगी कंपन्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीत असून सरकारी विमा कंपन्यामार्फत हे काम व्हावे, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीला निश्चितच पाठिंबा असून योजनेत सरकारी विमा कंपन्यांचा सहभाग वाढायला हवा. तशी शिफारस केली जाईल,’ असे पटेल म्हणाले.

आयात शुल्क अजून वाढवणार
सोयाबीन भाव प्रश्नी उस्मानाबाद येथील शेतकऱ्याने मंत्रालय परिसर केलेल्या आंदोलनबाबत विचारले असता पटेल म्हणाले, ‘तेलबियांच्या आयात शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. काही दिवसांपूर्वीच आयात शुल्कात सुमारे १० टक्के वाढ केली. त्यात आणखी वाढ व्हावी, असा प्रस्ताव आहे. गेल्या काही वर्षातील आयात निर्यात धोरण बदलण्यासाठी काही काळ लागेल. हरबरा, मसूर डाळ यांच्या आयात शुल्क वाढीचा प्रस्तावही असून त्यासंदर्भात पुढील कार्यवाही सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठांची दैना

$
0
0

​ विद्यापीठांची दैना
----------------
इंट्रो - रखडलेल्या परीक्षा निकालाच्या मुद्द्यावरून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी करण्यात आली. मुंबई विद्यापीठ राजधानीत असल्यामुळे दररोजची टीका सरकारला असह्य झाली होती. मात्र, अत्यंत बेपर्वाईने प्रशासकीय यंत्रणा राबवून विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या इतर विद्यापीठांचे काय? शिक्षणमंत्री अशा विद्यापीठांकडे कधी लक्ष देणार?
----------
तुषार बोडखे
Tushar.bodkhe@timesgroup.com
कोणतेही काम सुरळीत करायचे नाही, असा प्रत्येकाने जणू चंग बांधलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाची पदवी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यभर जाहीर नाचक्की झाली. गोदामात परीक्षा देणारे विद्यार्थी पाहून आणि पाल्यांना घेऊन जिवाच्या आकांताने बदललेले परीक्षा केंद्र गाठण्यासाठी घायकुतीला आलेले पालक पाहून कुणाचाही उच्च शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडावा, अशी ही ढिसाळ यंत्रणा.
तीन लाख विद्यार्थी परीक्षा देणार हे ठाऊक असतानाही विद्यापीठाने परीक्षा केंद्रांचा आढावा घेतला नाही. आसनव्यवस्था कमी असलेल्या महाविद्यालयात जास्त विद्यार्थी आणि क्षमता जास्त असलेल्या केंद्रात कमी विद्यार्थी असे नियोजन करून परीक्षेचा फज्जा उडवला. दोन दिवस आधी परीक्षा केंद्र बदलून विद्यार्थ्यांना बुचकळ्यात पाडले. विशेष म्हणजे परीक्षा केंद्र बदलल्याचे नवीन हॉलतिकीट नाही आणि ‘एसएमएस’सारख्या नवीन सुविधेचा वापरसुद्धा करण्यात आला नाही. परीक्षेच्या दिवशी केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्याला केंद्र बदलल्याचे कळताच ते सैरावैरा धावत सुटले. शेकडो विद्यार्थी नवीन केंद्राच्या ठिकाणी उशिरा पोहचले आणि त्यांना पेपर लिहिण्यासाठी कमी वेळ मिळाला. या ढिसाळपणाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार असल्याने या शैक्षणिक वाताहतीची जबाबदारी कुलगुरू डॉ. बाळू चोपडे कुणावर टाकणार हा खरा प्रश्न आहे. सीईटी, परीक्षा, निकाल, अधिसभा निवडणूक, कर्मचारी भरती अशा प्रत्येक कामातील ढिसाळ नियोजनाचे ‘कर्तृत्व’ दुसऱ्यांना देण्याची चतुराई कुलगुरूंनी नेहमीच दाखवली आहे. यंत्रणेचे सर्वेसर्वा असल्याचा त्यांना अशा गोंधळात नेमका विसर पडतो आणि एखाद्या अधिकाऱ्यावर निलंबनाची तोंडदेखली कारवाई करून प्रकरण शांत करण्यात येते. अशा उपायांमध्ये तरबेज असलेल्या कुलगुरूंचे नैपुण्य गेल्या साडेतीन वर्षांत वारंवार सिद्ध झाले आहे. कधीतरी प्रशासकीय कामाचा लेखाजोखा घेऊन चोपडे यांनी स्वतःची जबाबदारी जाणून घेण्याची गरज आहे. अथवा, कुलगुरूंच्या जबाबदाऱ्या त्यांना सुज्ञांनी समजावून सांगणे क्रमप्राप्त आहे. किमान उरलेल्या दीड वर्षात प्रशासकीय कारभार सुधारलाच तर विद्यार्थ्यांचे भले होईल. विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाने त्रासलेल्या विद्यार्थ्यांची धावपळ उडालेली असताना विद्यापीठात ‘महत्त्वाकांक्षी’ बैठक सुरू होती. काय होती ही बैठक? तर पुढील २५ वर्षांचा विद्यापीठ विकास आराखडा तयार करण्यात कुलगुरूंसह विद्यापीठ प्रशासन गर्क होते. एवढी विसंगती क्वचितच पहायला मिळेल. सद्यस्थितीत उत्तम वाटचाल करणाऱ्या संस्थेने भविष्यासाठी विकास आराखडा तयार करणे अभिप्रेत आहे. मात्र, पदोपदी प्रतिष्ठेची लक्तरे वेशीवर टांगलेल्या विद्यापीठाने ‘विकास आराखडा’ हा शब्द उच्चारणेसुद्धा हास्यास्पद ठरावे. विद्यापीठाचा वर्षभराचा सांगोपांग आढावा घेतल्यास शेकडो त्रुटी समोर येतील. नियोजन हा काय प्रकार असतो, याची प्रशासनाला सुतराम कल्पना नाही. पदव्युत्तर वर्गासाठी ‘सीईटी’ राबवून आपलीच पाठ थोपटण्यात मग्न असलेल्या प्रशासनावर दिरंगाईने चिडलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘स्पॉट अॅडमिशन’च्या दिवशी दगडांचा वर्षाव झाला. ऐनवेळी मोबाईल स्विच-ऑफ करून संबंधित अधिकारी दडून बसले. खेड्यापाड्यांतून विद्यापीठात प्रवेशासाठी येऊन ताटकळलेल्या हजारो विद्यार्थी आणि पालकांनी जाब विचारायचा तरी कुणाला? ‘पीजी सीईटी’त प्रशासनाला तोंडघशी पाडण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. मग जबाबदारी आणि कारवाई या शब्दांपासून दूर असलेले अधिकारी व प्राध्यापक अधिक सुस्तावले. पदवी परीक्षेत गोंधळ होणार ही पूर्वकल्पना असूनही योग्य खबरदारी घेतली गेली नाही. ‘नियोजनात चूक झाली. मात्र, पुढील प्रक्रिया सुरळीत होईल’ असे थातुरमातूर उत्तर देऊन कुलगुरू नामानिराळे झाले. परीक्षा विभागाच्या प्रभारी संचालकांनी पूर्वीच्या संचालकांवर जबाबदारी ढकलली. विद्यापीठाचा हा खो-खो खेळ विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घातक ठरत आहे. दर्जेदार संशोधन आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा केवळ गाजावाजा करून उपयोग नाही. विद्यापीठात योग्य अंमलबजावणी होणार नसेल तर विद्यापीठाचा दर्जा उंचावणे केवळ दिवास्वप्न ठरेल.
मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाचा मुद्दा देशभर गाजला. निकालासाठी लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरलेले असताना नेमका निर्णय घेण्यात राज्य सरकार निष्प्रभ ठरले. जनरेटा वाढल्यानंतर आणि सरकारची नाचक्की दिसू लागताच कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी करून जनक्षोभ कमी करण्याचा प्रयत्न झाला. अर्थात, अशा कारवाईने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान भरून निघणार नसते. उच्च शिक्षणाकडे सरकारी पातळीवर झालेले अक्षम्य दुर्लक्ष या बेजबाबदारपणाचे खरे कारण आहे. मुंबई विद्यापीठ राजधानीत असल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले तरी गेले. पण, मराठवाड्यासारख्या अलक्षित भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे लक्ष देण्यासाठी उच्च शिक्षणमंत्र्यांना फारसे स्वारस्य नसावे. अन्यथा, प्रत्येक पातळीवर विद्यार्थ्यांची फरफट करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी एक पाऊल उचलले गेले असते. राज्य सरकारने उच्च शिक्षणाच्या दुरवस्थेवर कधीतरी विचारमंथन केल्यास त्यातील फोलपणा लक्षात येईल. रोजागरक्षम शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या बढाया मारणाऱ्या भाषणांचा विद्यार्थ्यांना उबग आला आहे. नवीन शैक्षणिक धोरण ठरवूनही दोन वर्षे उलटली आहेत. नवीन धोरणानुसार दोन वर्षांत किती आमूलाग्र बदल झाला याची पडताळणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जरूर करावी. सार्वजनिक विद्यापीठांचा दर्जा राखण्यासाठी वित्तीय तरतूद वाढवण्याचा प्रस्ताव होता. विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही अन् राहण्यासाठी स्वच्छ वसतिगृह नाही. या स्थितीत वित्तीय तरतूद वाढवून पायाभूत सुविधा वाढवण्याचा प्रस्ताव म्हणजे निव्वळ लोणकढी थाप आहे. संशोधनात्मक काम व नवीन ज्ञान क्षेत्रावर भर देणे, प्रादेशिक विषमता लक्षात घेणे, शिक्षणाला उद्योगाशी जोडणे, कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम निर्माण करणे, विद्यार्थी सहायता वाढवणे अशा अनेक प्रस्तावांना शैक्षणिक धोरणात स्थान आहे. प्रत्यक्षात चित्र अगदी टोकाचे आहे.
विद्यापीठात प्राध्यापक व कर्मचारी भरती झाली नसल्याने शेकडो जागा रिक्त आहेत. प्राध्यापक नसल्यामुळे पदविका अभ्यासक्रम बंद आहेत. एका प्राध्यापकावर विभाग कसाबसा तग धरून आहे. या दुरवस्थेची शिक्षण विभागाने दखल घेणे गरजेचे झाले आहे. संस्थाचालक आणि संस्थेच्या हितासाठी भांडणारे स्थानिक लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर कधीच विद्यापीठाला धारेवर धरीत नसल्याचा अनुभव आहे. शैक्षणिक धोरणातील विसंगती आणि वेळकाढूपणा त्यांना गांभीर्याचा विषय वाटत नाही. या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यापीठांना पुरेसा निधी मिळत नसल्याची सार्वत्रिक ओरड कायम आहे. राज्यातील कृषी आणि अकृषी विद्यापीठांचा आढावा घेतल्यास शिक्षणमंत्र्यांना विद्यापीठांची निराशाजनक कामगिरी लक्षात येईल. अन्यथा, २५ वर्षांच्या विकास आराखड्यावर काथ्याकूट करण्यात रममाण झालेल्या कुलगुरूंना परीक्षा केंद्र शोधण्यासाठी रडणारे विद्यार्थी कसे दिसतील?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत कोंडतोय श्वास

$
0
0

औरंगाबाद ः वायू प्रदुषणामुळे देशाची राजधानी असलेली दिल्ली जॅम झालेली असताना मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादची वाटचालदेखील याच दिशेने सुरू झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वायू प्रदूषणाने हद्द ओलांडली असून त्यामुळे औरंगाबादकरांचा श्वास कोंडू लागला आहे. त्याचा परिणाम एकूणच आरोग्यवर होणार आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी तत्काळ कृती आारखडा तयार करून तो सादर करण्याचा निर्वाणीचा इशारा देणारी नोटीस महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला बजावली आहे. राज्यातील १७ अति प्रदूषित शहरांमध्ये औरंगाबादचा क्रमांक लागत असल्यामुळे महापालिकेने अति दक्ष राहून प्रदूषणमुक्तीच्या क्षेत्रात काम केले पाहिजे असे मंडळाने बजावले आहे.
शिक्षण, वैद्यकीय व्यवसाय आणि उद्योगधंद्यांमुळे गेल्या काही वर्षांत औरंगाबादचा विस्तार झपाट्याने होऊ लागला आहे. विस्ताराबरोबर लोकसंख्यादेखील वाढू लागली आहे. या वाढीबरोबरच प्रदुषणाची पातळीदेखील झपाट्याने वाढू लागल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीतून लक्षात आले. प्रामुख्याने वायू प्रदूषण वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न येत्या काळात गंभीर बनेल असा इशारा मंडळाने नोटिशीतून दिला आहे.
नोटिशीबद्दल अधिक माहिती देताना मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. बी. संगेवार म्हणाले की, २०१० ते २०१५ या काळात देशातील झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमधील प्रदूषणाबद्दल अभ्यास करण्यात आला तेव्हा देशात ९४ तर, राज्यात १७ शहरांमध्ये प्रदुषणाची पातळी झपाट्याने वाढत असल्याचे लक्षात आले. त्यात औरंगाबादचा समावेश आहे. वायू प्रदुषणामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न येत्या काळात गंभीर बनणार आहे. रस्ते, दुभाजक, चौकांची नियमित न होणारी स्वच्छता व त्यामुळे निर्माण होणारे धुळीचे साम्राज्य प्रदुषणाची पातळी वाढण्यासाठी कारणीभूत आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात महापालिकेचे कोणतेच नियोजन नाही. कचरा साठवून ठेवण्यापलीकडे महापालिका काहीच करीत नाही. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरते. त्याचा परिणामही श्वसनाचे आजार बळावण्यावर होतो.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे दुचाकी वाहनांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. दुचाकीच्या माध्यमातून पर्यावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढू लागले आहे. दुचाकी वाहनांचा वापर नागरिकांनी कमीत कमी करावा यासाठी
महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचे संगेवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘त्या’ महाविद्यालयांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पदवी परीक्षेच्या गोंधळाला जबाबदार ठरवत परीक्षा केंद्र नाकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या कारणांनी काही महाविद्यालयांनी परीक्षा केंद्र देण्यास विद्यापीठ प्रशासनाला नकार दिला होता. या महाविद्यालयांवर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. पदवी परीक्षेचा दुसरा पेपर शनिवारी काही अपवाद वगळता सुरळीत पार पडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत पहिल्याच दिवशी गोंधळ उडाल्याने विद्यार्थी संभ्रमित झाले. परीक्षा केंद्र बदलल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांची धावपळ झाली. काही विद्यार्थ्यांना वेळेत पोहचता आले नसल्यामुळे पेपर लिहायला पुरेसा वेळ मिळाला नाही. शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष वाढला आहे. या परिस्थितीचा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शनिवारी आढावा घेतला. परीक्षा विभागाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दुसऱ्या दिवशीचा पेपर सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित परीक्षा केंद्रांना सूचना दिल्या. काही अपवाद वगळता परीक्षा व्यवस्थित सुरू असल्याचा दावा परीक्षा विभागाने केला आहे.

दरम्यान, काही महाविद्यालयांनी ऐनवेळी परीक्षा केंद्र देण्यास नकार दिल्यामुळे परीक्षा केंद्र बदलण्यात आले. हा बदल विद्यार्थ्यांना वेळेत समजला नसल्यामुळे गोंधळ झाला. कोणत्या कारणांमुळे परीक्षा केंद्रांनी नकार दिला या कारणांचा शोध विद्यापीठ प्रशासन घेणार आहे. काही महाविद्यालये दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. सातत्याने नियोजनात अपयशी ठरलेल्या विद्यापीठावर जोरदार टीका सुरू आहे. त्यामुळे या महाविद्यालयांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कारवाई कधी ?
अभियांत्रिकी शाखेच्या निकालांना उशीर झाल्यामुळे परीक्षा विभाग अडचणीत सापडला होता. उत्तरपत्रिका तपासणीची जबाबदारी असलेले प्राध्यापक गैरहजर असत किंवा वेळेत काम करीत नव्हते. या प्राध्यापकांमुळे निकालाला विलंब झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. मात्र, प्राध्यापकांवर अजूनही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुढील वर्षीसुद्धा निकाल उशिरा लागतील असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आमदार कुलगुरूंच्या भेटीला
फर्दापूर येथील नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज आणि शुल्क भरले नसल्यामुळे शुक्रवारी त्यांना परीक्षा देता आली नाही. संबंधित महाविद्यालयाला तातडीने शुल्क भरण्यास सांगूनही कार्यवाही केली नाही. संस्थाचालक आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबत विनंती केली. या महाविद्यालयाने तीन लाख रुपये भरणे अपेक्षित आहे. सत्तार यांनी तातडीने ५० हजार रुपये भरल्यानंतर हॉलतिकीट तयार करण्याची प्रक्रिया झाली. अखेर रात्री एक वाजता १६९ विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तयार झाले. या विद्यार्थ्यांनी शनिवारी परीक्षा दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जय भीम कॉम्रेड

$
0
0

जय भीम कॉम्रेड
........
इन्ट्रो....
विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी या आठवड्यात महाराष्ट्रात सहा सभांना हजेरी लावली. ते फक्त भाकपचे विद्यार्थी नेते राहिले नसून भाजपविरोधकांना अपिल करणारे महत्त्वाचे नेते बनल्याचे ठसठशीतपणे समोर आले आहे. कन्हय्या कुमार यांच्या निमित्ताने कम्युनिस्ट, समाजवादी, परिवर्तनवादी व आंबेडकरवादी विचारधारेतील तरुणांमध्ये संवाद होण्यास सुरुवात झाली आहे.
......
दिलीप वाघमारे
deelip.waghmare@timesgroup.com
......
देशद्रोहाचा आरोप लावून केंद्र सरकारने तुरुंगात टाकलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष कन्हय्या कुमार हे कम्युनिस्ट विद्यार्थी नेते चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. या आठवड्यात त्यांच्या महाराष्ट्रात झालेल्या सहा सभांमधून हे अधिक ठळकपणे जाणवले. विशेष म्हणजे मागील दोन दौऱ्यात त्यांच्या सभांचे आयोजन भाकपची विद्यार्थी संघटना असलेल्या ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने पुढाकार घेऊन केले होते. यावेळी सहा सभांपैकी दोन माकप, एक व्ही. एस. पँथर, एक भाकप, एक परिवर्तनवादी विद्यार्थी आघाडी व एक सभा पुरोगामी विचारसरणीच्या सर्व विद्यार्थी व तरुण संघटनांनी एकत्र येऊन आयोजित केली. नोटाबंदीची वर्षपूर्ती, रशियातील कम्युनिस्ट क्रांतीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात, सरसंघचालक मोहन भागवत यांचा मराठवाडा दौरा या पार्श्वभूमीवर झालेल्या या दौऱ्यात कन्हय्या यांच्याकडून आसूड ओढले गेले नसते, तर नवल ठरले असते.
कन्हय्या यांची लोकप्रियता लक्षात घेऊन भाजप समर्थक संघटनांकडून पोलिसांना निवेदने देऊन तणावाची परिस्थिती निर्माण केली जाते. कोणत्याही प्रकारे सभा होऊ नये, यासाठी जमेल तेवढे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळीही नाशिक व कोल्हापूरमध्ये तसे प्रयत्न करण्यात आले. पण, हे प्रयत्न अयशस्वी ठरले. उलट या विरोधामुळे त्यांच्या सभांची चर्चा होण्यास हातभारच लागला. काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या सभेवेळीही असाच प्रयत्न करण्यात आला होता. पण, त्यावेळी कम्युनिस्ट, आंबेडकरी व समाजवादी संघटनांनी एकत्र येऊन एक नव्हे, तर दोन सभांचे आयोजन करून तो प्रयत्न हाणून पाडला. त्याचे प्रत्यंतर यावेळच्या दौऱ्यातही आले. नाशिक, अंबाजोगाई, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर व कोल्हापूरमध्ये झालेल्या सभांमधून कन्हय्या यांनी विद्यमान मोदी सरकारविरोधात टीकेची राळ उठवली.
गेल्या ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी निर्णयाची वर्षपूर्ती होती. या पार्श्वभूमीवर कन्हय्या यांनी हा निर्णयाचे वर्णन ‘मोदींचे तुघलकी फर्मान’ असे केले. दिल्लीहून दौलताबादला राजधानी (जि. औरंगाबाद, तत्कालीन नाव देवगिरी) स्थलांतरित करणारा तत्कालीन सम्राट महंमद बिन तुघलक याने असेच अचानक चलन बदलले होते, तेव्हा अर्थव्यवस्था कोसळली होती. या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अराजकानंतर ‘तुघलकी’ निर्णय, असा शब्दप्रयोग निर्माण झाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त कन्हय्या यांनी हा निशाणा साधत जीएसटीवरही ताशेरे ओढले. देशातील आर्थिक परिस्थिती तरुणांसमोर मांडली. या आठवड्यात जालना येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत संघ परिवारातील संघटनांची पश्चिम विभागीय बैठक पार पडली. या बैठकीला संघ व परिवारातील संघटनांचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. त्याच दिवशी उस्मानाबादमध्ये झालेल्या सभेत बोलताना कन्हय्या यांनी ‘हिंदुत्वाला खरा धोका आरएसएसकडून आहे,’ अशी तोफ डागली. भारतीय राज्यघटनेवर विश्वास असलेले व ती मोडीत काढण्यास निघालेले यांच्यातील ही लढाई आहे. राज्यघटनेच्या संरक्षणार्थ सर्वांची एकजूट गरजेची आहे. बनावट देशभक्ताकडून देशाला वाचवले पाहिजे, असे आवाहन केले. देशद्रोहाच्या आरोप लावला पण, कोर्टात आरोपपत्र दाखल करायला सरकार का कचरत आहे, असा नेमका प्रश्न विचारून सभांना विरोध करणाऱ्यांना त्यांनी चपराक लगावली. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारकडून ‘अच्छे दिन’ आले नाहीत. पण, सरकार व त्यांच्या बगलबच्च्यांकडून जातीय तेढ वाढवण्यात आल्याची वस्तुस्थिती मांडली. रशियन राज्यक्रांतीच्या शताब्दीदिनानिमित्त सोलापूरमध्ये माजी आमदार नरसय्या आडम यांनी आयोजित केलेल्या सभेत कन्हय्या यांनी राष्ट्रवाद काय असतो, हे सांगितले. ‘सामान्य माणसाच्या सहभागाशिवाय कोणतीही बाब राष्ट्रवाद व राष्ट्रीय प्रश्न होऊ शकत नाही,’ हे त्यांनी लक्षात आणून दिले. ऊठसूठ कोणतीही गोष्ट देशप्रेम व देशद्रोहासोबत जोडण्याच्या प्रकाराला जनता कंटाळलेली आहे. त्याचेच प्रतिबिंब कन्हय्या यांच्या वक्तव्यात दिसले. सर्वात मोठा प्रहार त्यांनी नाशिकच्या सभेत ‘भक्त सैतानाला नसतात’ असे सांगत केला. हा प्रहार भक्तांवर नव्हता तर, मोदींवर होता. मोदी यांना कन्हय्या यांनी सैतान म्हटले. गॅस दरवाढ, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे उपस्थित करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घातला. कोल्हापूरच्या सभेत खरा व खोटा चहावाला अशी वर्गवारी दाखवून देताना राजर्षि शाहू महाराज यांच्या सामाजिक सुधारणेचा दाखला दिला. शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिले होते, त्याची आठवण कन्हय्या यांनी करून दिली. काँग्रेसनेते विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थित लातूरमध्ये झालेल्या सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसलाही सोडले नाही. काँग्रेसमधील भ्रष्टांना सामावून घेऊन पवित्र करायला भाजप गंगोत्री आहे का, असा सवाल केला. ‘कमल छाप साबूण से धोये, तो दाग निकल जाते है’ अशी टरही उडवली.
एकूणच या दौऱ्यात कन्हय्या यांनी चौफेर टोलेबाजी करत विद्यमान मोदी सरकारच्या कारभारावर परखड टीका केली. सरकारला टोले लगावले, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, प्रश्न विचारले, लोकांच्या मनातील राग स्वतःच्या शब्दांत व्यक्त केला. यापेक्षाही या दौऱ्याचे दुसरे महत्व आहे. एक म्हणजे, या दौऱ्याच्या आयोजनात भाकपशिवाय माकप, आंबेडकरी संघटना, समाजवादी व परिवर्तनवादी विद्यार्थी संघटनांचा सक्रिय सहभाग राहिला. त्यांच्या सभेच्या मंचावर काँग्रेस नेत्यांनाही हजेरी लावली. त्यामुळे कन्हय्या कुमार हे फक्त भाकपचे विद्यार्थी नेते राहिले नसून ते भाजपविरोधकांना अपिल करणारे महत्त्वाचे नेते बनल्याचे ठसठशीतपणे समोर आले आहे. तिहार जेलमधून सुटल्यानंतर ‘जेएनयू’मध्ये केलेल्या पहिल्या भाषणात त्यांनी,‘जेलमें खाना देते थे, उस थालीमें एक कटोरी लाल और दुसरी निली थी,’ असे वक्तव्य केले होते. म्हणजे या लढाईत लाल व निळ्या रंगाची एकजूट करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतरच्या त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात आंबेडकरी विचारधारेतील तरुणांना जोडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. रोहित वेमुला यांच्या बलिदानामुळे हा वणवा पेटला आहे, याची जाणीव कन्हय्या यांना आहे, हे आंबेडकरी विचारधारेतील तरुणांना माहित आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून कन्हय्या कुमारांना भरभक्कम पाठिंबा मिळत आहे. कन्हय्या यांच्या माध्यमातून लाल व निळ्या विचारधारेतील वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन परिवर्तनावर विश्वास असलेले तरुण एकाच व्यासपीठावर येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आंबेडकरी विचारधारेतील तरुण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा इतिहास आहे. अलिकडच्या काळात भाजप, शिवसेनेसोबतही काही पक्ष गेले आहेत. पण, कम्युनिस्ट व समाजवाद्यांसोबत त्यांची सक्रिय भागीदारी अपवादानेच राहिली. कन्हय्या कुमार यांच्या निमित्ताने कम्युनिस्ट, समाजवादी, परिवर्तनवादी व आंबेडकरवादी विचारधारेतील तरुणांमध्ये संवाद होण्यास सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सावेंसमोर महिलांनी फोडला माठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अगोदर पाणी द्या, त्यानंतर रस्त्याचे काम करा, प्यायला पाणी नाही आणि रस्त्याचे काम काय करता, असा सवाल करीत संतप्त महिलांनी शनिवारी आमदार अतुल सावे यांच्यासमोर माठ फोडला. या प्रकारामुळे सावेदेखील अवाक झाले.
पुंडलिकनगर परिसरातील वॉर्ड क्रमांक ९४ अंतर्गत असलेल्या जयगजानननगरमध्ये रस्त्याच्या कामाच्या शुभारंभासाठी सावे आले होते. आमदार येत आहेत असे कळाल्यावर या भागातील महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी जमा झाल्या. त्यापैकी काही जणांच्या हातात पाण्यासाठीचे माठ होते. जयगजानननगरमध्ये तीन-चार वर्षांपासून जलवाहिनी नाही. नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागते. नगरसेवकाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप या भागात पाण्याची व्यवस्था झाली नाही. महिलांनी सावेंसमोर पाण्याची समस्या मांडली.
नगरसेवक व महापालिका आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. तुम्ही मार्ग काढा असे महिला सावे यांना म्हणत होत्या. अचानक सुरू झालेल्या पाणी आंदोलनामुळे सावेदेखील अचंबित झाले. ‘तुम्ही असे कसे करता, निवेदन द्या’ असे ते महिलांना म्हणाले. यामुळे महिला अधिकच संतापल्या. अंजुताई माने यांनी हातातील माठ आपटून फोडला. यावेळी अन्य कार्यकर्त्यांना महिलांची समजूत काढली. त्यानंतर सावे यांनी सोमवारी तुम्ही निवेदन घेवून कार्यालयात या, मी स्वतः लक्ष घालून पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन दिले. त्यानंतर महिला निघून गेल्या. अंजुताई माने यांच्या बरोबर परिसरातील अन्य महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड पालिकेची चौकशी

$
0
0

सिल्लोड ः सिल्लोड नगर पालिका चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष विष्णु काटकर यांनी तक्रार अर्जाद्वारे केली होती. ही नगर पालिका कॉँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आहे.
विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन केली आहे. त्यात नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सुहास थत्ते, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक के. आर निसाळ, तहसीलदार संतोष गोरड यांचा समावेश आहे. समितीच्या सदस्यांनी गुरुवारी सिल्लोड नगर पालिकेच्या कार्यालयात जाऊन चौकशी सुरू केली. समितीने मुख्याधिकारी
अशोक कायदे यांना एकोणचाळीस मुद्द्याची संचिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोहालच्या नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट नियुक्तीपत्र देऊन १२ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी राजेंद्र पोहालने उमेदवारांकडून तब्बल ६८ लाख रुपये उकळल्याची कबुली दिली. आता पोलिसांनी त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या संपत्तीचीही चौकशी सुरू केली आहे.

बनावट नौकर भरती घोटाळ्यात पोहालने घेतलेल्या पैशांची माहिती पोलिसांकडून घेणे सुरू आहे. या प्रकरणात घाटीच्या काही कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. याशिवाय आरोपीने नियुक्तीपत्रात वापरलेले शिक्के कार्यालयाचे आहेत किंवा नाहीत, याचाही शोध सुरू केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३२ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. नियुक्ती पत्र तयार करण्यासाठी वापरलेले बनावट शिक्के, कम्प्युटरची हार्डडिस्क, पेनड्राइव्ह आदी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नियुक्तीपत्रावर खाली नोंद आलेल्या दोन लिपिकांची चौकशी करण्यात आली आहे. या तपासणीत संबंधित लिपिकांचे नाव नियुक्ती पत्रात देताना वापरल्याची माहिती समोर आली आहे. बनावट नियुक्तीपत्र तयार करून पैसे जमा करण्यात साथ देणाऱ्या घाटीतील कर्मचाऱ्यांचीही पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वाघ यांनी दिली.

खात्यात फक्त ३७ रुपयेच जमा
उमेदवारांना ६८ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोहालच्या एका खात्यावर ३७ रुपये तर दुसऱ्या एका खात्यात एक हजार रुपयेच आहेत. त्याने ही रक्कम नातेवाईकांच्या नावाने गुंतवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांच्या खात्यांची, खरेदीची, संपत्तीची माहिती घेण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images