Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ओडिसी नृत्यातून गुरुवंदना

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ओडिसी नृत्याचे विलोभनीय दर्शन घडवणारा ‘तस्मै श्री गुरवे नमः’ नृत्य कार्यक्रम लक्षवेधी ठरला. महागामी नृत्य संस्थेच्या विद्यार्थिनींचे पदलालित्य कार्यक्रमांची उंची वाढवून गेले. गुरू पार्वती दत्ता यांच्या एकल नृत्याला रसिकांचा प्रतिसाद मिळाला.

महागामी गुरुकूल संस्थेने गुरू-शिष्य परंपरेला समर्पित ‘तस्मै श्री गुरवे नम:’ नृत्य महोत्सव आयोजित केला आहे. रुक्मिणी सभागृहात शनिवारी सायंकाळी महोत्सव सुरू झाला. पहिल्या दिवशी ओडिसी नृत्य सादरीकरण झाले. ‘गुरुश्लोक’ रचनेतून विद्यार्थिनींनी रसिकांना आदर्श परंपरेची महती सांगितली. त्यानंतर ‘बट्टू’, ‘सर्पजनन’, ‘नागबंध’, ‘जलबिंदू’ रचना सादर झाल्या. लक्षवेधी पदलालित्य आणि मुद्राभिनयाने नृत्य अधिक उठावदार झाले. दुसऱ्या सत्रात पार्वती दत्ता यांनी एकल नृत्य सादर केले. ‘झिंजोटी पल्लवी’, ‘अभिनय’, ‘शिवस्तुती’ या रचनेतून त्यांनी रसिकांना शास्त्रीय नृत्याच्या परंपरेची अनुभूती दिली. ‘मोक्ष’ रचनेने सांगता झाली. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कथ्थक नृत्याविष्कार आज
नृत्य महोत्सवाचा रविवारी सायंकाळी समारोप होणार आहे. दत्ता यांच्या शिष्या कथ्थक सादरीकरण करणार आहेत. आरंभ, उद्भव व समर्पण प्रकारातून महोत्सव उठावदार केला जाणार आहे. रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘अभाविप’च्या यादीनंतर ‘भाजयुमो’ची बंडखोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिनेट निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठ विकास मंच पॅनलमधील उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घोषित करताच, भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मयूर वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचा झेंडा फडकावला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी शनिवारी ‘भाजयुमो’चे सरचिटणीस मयूर वंजारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भटक्या विमुक्त प्रवर्गातून शहरातील भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी अर्ज देण्याबाबत पक्ष वरिष्ठांकडे विनंती केली होती, मात्र पक्षश्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांच्या विनंतीला बगल देऊन आपली स्वतंत्र यादी घोषित केली. ‘अभाविप’ने घोषित केलेल्या यादीत भटक्या विमुक्त प्रवर्गातून ‌बीड जिल्हयातील भाजयुमो पदाधिकारी चंद्रकांत शिवाजीराव फड यांना उमेदवारी दिली. या उमेदवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज दाखल केला.

सिनेट निवडणुकीत ‘अभाविप’च्या यादीत एकही स्थानिक नसल्याने भाजयुमोच्या मयुर वंजारी यांनी बंडखोरी करून उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठया शक्तीप्रदर्शनासह विद्यापीठ गेट येथून पदयात्रा काढून त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युवा क्रांती चे अध्यक्ष नीलेश शिंदे, भाजपचे पदाधिकारी नारायण आल्हाड, नंदलाल गवळी, भाऊसाहेब गारुळे, मयूर विधाते, अविनाश पवार, बापू सोनवणे, अजय शिंदे आदी उपस्थित होते.

‘भाजप’चा अंतर्गत पाठिंबा
‘भाजयुमो’च्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी केलेले प्रयत्न कमी पडले. वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे बाहेरच्या कार्यकर्त्यांची नावे घुसविण्यात आली, अशी चर्चा स्थानिक भाजप नेत्यांमध्ये केली जात आहे. यामुळे ‘भाजयुमो’चे वंजारी यांच्यामागे स्थानिक पुढारी रसद उभी करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्रेस्ट कॅन्सर’वर त्वरित उपचार हीच मात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतामध्ये दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाचे (ब्रेस्ट कॅन्सर) एक लाख ५४ हजार २६१ नवे रुग्ण आढळतात. त्यापैकी दरवर्षी तब्बल ७६ हजार महिलांचा मृत्यू होतो. तसेच देशातील ७० टक्के घटना कर्करोगाच्या तिसऱ्या व चौथ्या पायरीवर आढळून येतात. त्यामुळेच लवकर निदान-उपचार, त्रिस्तरीय तपासणी (ट्रिपल असेसमेंट) आणि सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ‘ब्रेस्ट क्लिनिक’च्या सुविधा उपलब्ध होणे काळाची गरज आहे, असा सूर घाटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय परिषदेत व्यक्त झाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) शल्यचिकित्साशास्त्र विभागातर्फे ‘ब्रेस्ट कॅन्सर व ब्रेस्ट डिसिसेज’ याविषयी रविवारी सूक्ष्मजीवशास्त्र विभागात परिषद पार पडली. उद्घाटन कार्यक्रमाला इंग्लंडच्या रॉयल स्टॉक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. शंकरन नारायणनन व डॉ. मिहिर चंदराणा, घाटीच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. सईदा अफरोज, विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, ‘एमजीएम’च्या ब्रेस्ट सर्जन कन्सल्टंट डॉ. अरुणा कराड, प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विजय बोराळकर, घाटीच्या रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे, प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. जी. जी. गुमास्ते, शासकीय कर्करुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अजय बोराळकर, घाटीचे शल्यचिकित्सक डॉ. आनंद बीडकर, घाटीचे माजी अधिष्ठाता डॉ. आनंद मलिक, डॉ. प्रवीण वासाडीकर, डॉ. जुनैद शेख, डॉ. सुरेश हरबडे आदींची उपस्थिती होती.
डॉ. कराड यांनी ‘पीपीपी’द्वारे ब्रेस्ट कॅन्सरची देशातील स्थिती मांडली. २० वर्षांत अडीच पटींने प्रमाण वाढलेल्या ब्रेस्ट कॅन्सरला ‘त्सुनामी’ असे संबोधित डॉ. कराड म्हणाल्या, १९९० मध्ये भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या ५७,३७४ केसेस आढळल्या होत्या. सद्यस्थितीत १,५४,२६१ केसेस आढळल्या आहेत. २००८ मध्ये ब्रेस्ट कॅन्सरमुळे ५३ हजार रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर २०१२ मध्ये ७० हजार रुग्णांचा मृत्यू झाला. २००८ मध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण २६ टक्के व ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण २२ टक्के होते. आता गर्भाशयाचे कॅन्सरचे प्रमाण २२ टक्के व ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण २७ टक्के आहे. सद्यस्थितीत निम्म्या केसेस या पन्नाशीच्या आतील महिलांच्या असतात. तरूण वयात हा आजार जास्त आक्रमक असतो. महिला तक्रार घेऊन येते, त्याच दिवशी सर्व तपासण्या होणे गरजेचे असताना त्या होत नाहीत, हे वास्तव आहे. मार्गदर्शकतत्वांनुसार केली जाणारी तपासणी (क्लिनिकल एक्झामिनिनेश), मॅमोग्राफी-सोनोग्राफी-एमआरआय तपासणी व कोअर बायोप्सी ही तिहेरी तपासणी (ट्रिपल असेसमेंट) आवश्यक असल्याचे मत डॉ. कराड यांनी नोंदविले. या परिषदेत कॅन्सर सर्जन डॉ. राजेश सावजी, डॉ. जाधव, डॉ. बीडकर, डॉ. बोराळकर, डॉ. रोटे आदींनी विविध विषयांवर सादरीकरण केले.

वेदनारहित गाठ असू शकते कॅन्सरची

ब्रेस्ट कॅन्सरची गाठ ही वेदनाविरहित असते, असा समज आहे; परंतु प्रत्येक गाढ ही वेदनाविरहित असेलच असे नाही. माझ्या पत्नीला वेदनाविरहित गाठ होती व नंतर ती गाठ कॅन्सरची असल्याचे बायोप्सी व इतर तपासण्यांमध्ये स्पष्ट झाले, असा अनुभव डॉ. मलिक यांनी सांगितला.

जीवनशैलीत कारणे दडलेली

ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे अजूनही निश्चित कारण सापडले नसले तरी चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, स्थूलता, उशिरा लग्न व उशिरा मूल होणे, कमी स्तनपान आदी बाबींचा समावेश होतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. जनुकीय कारणे ५ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त नाहीत. प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

अमेरिकेमध्ये ‘ब्रेस्ट कॅन्सर’च्या १० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो, तर भारतामध्ये ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. उशिरा निदान व उपचारांमुळे मृत्युचे प्रमाण भारतामध्ये जास्त असून, पहिल्या पायरीतच उपचार होण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- डॉ. शंकरन नारायणन, शल्यचिकित्सक विशेषज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंगळुरू, पुणे मॅरेथॉन; औरंगाबादचा झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरातील मॅरेथॉनमध्ये औरंगाबादकर एकाहून एक सरस कामगिरी करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादेत मॅरेथॉन संस्कृती चांगलीच रुजली आहे. शनिवारी बंगळुरू आणि पुणे येथे मॅरेथॉन मालिकेतील अवघड अशी अल्ट्रा मॅरेथॉन झाली. त्यात औरंगाबादचे धावपटू मयुरेश डबरी आणि नितीन घोरपडे यांनी तब्बल १०० किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. डॉ. अजित घुले यांनी पुण्यातील स्पर्धेत ७५ किलोमीटर स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. बंगळुरू येथे औरंगाबादच्या नऊ धावपटूंनी ५० किलोमीटरची अवघड स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
मॅरेथॉन संस्कृती रुजविण्यात औरंगाबाद ब्लॅक बक्सने (एबीबी) काही वर्षांपासून शहरात पुढाकार घेतला आहे. हौशी धावपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ५, १० आणि १५ किलोमीटरची मॅरेथॉन आयोजित केली जाते. बंगळुरू येथे शनिवारी अल्ट्रा मॅरेथॉन झाली. ५०, ७५ आणि १०० किलोमीटरची ही मॅरेथॉन देशातील अवघड मॅरेथॉन मानली जाते. या स्पर्धेत एबीबीचे सदस्य मयुरेश डबरी यांनी १०० किलोमीटर धाव यशस्वीपणे पूर्ण केली. विशाल राठी यांनी ७५ किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली. याच स्पर्धेत ५० किलोमीटर मॅरेथॉन नऊ जणांनी पूर्ण करून औरंगाबादला यश मिळवून दिले. पुणे येथेही शनिवारी अल्ट्रा मॅरेथॉन झाली. औरंगाबादचे धावपटू नितीन घोरपडे यांनी १०० किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. घोरपडे यांनी खरदुंगला पास येथील अवघड मॅरेथॉन काही महिन्यांपूर्वी यशस्वीपणे पूर्ण केली होती. पुण्यातील मॅरेथॉनमध्ये डॉ. अजित घुले यांनी ७५ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेची तयारी आम्ही गेल्या काही महिन्यांपासून केली. ३० किलोमीटरपर्यंत धावण्याचा सराव चांगलाच केला होता. दर रविवारी आयोजित लाँग रनचा खूप फायदा झाला.
- डॉ. संदीप मुळे, धावपटू

बंगळुरू मॅरेथॉनमधील धावपटू

- मयुरेश डबरी - १०० किलोमीटर
- विशाल राठी -७५ किलोमीटर
- भूपेश मिश्रा - ५० किलोमीटर
- शेखर सांगवीकर - ५० किलोमीटर
- विजय आघाव - ५० किलोमीटर
- वैशाली आघाव - ५० किलोमीटर
- अक्षय राठी - ५० किलोमीटर
- प्रशांत गाडगीळ - ५० किलोमीटर
- डॉ. संदीप मुळे - ५० किलोमीटर
- किरण शेट्टी - ५० किलोमीटर

पुणे मॅरेथॉनमधील धावपटू

- नितीन घोरपडे - १००
- अजित घुले - ७५ ( तृतीय)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध‌िसभेसाठी चार पॅनलची लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी १४२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तुल्यबळ उमेदवारांना पॅनलमध्ये स्थान देऊन निवडणूक जिंकण्याची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विद्यापीठ उत्कर्ष पॅनल, विद्यापीठ विकास मंच, परिवर्तन पदवीधर आघाडी आणि युवा सेना पॅनल या प्रमुख चार पॅनलमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. स्वतंत्र अर्ज भरणारे काही उमेदवार पुढील तीन दिवसांत अनुकूल पॅनलमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकीची चुरस वाढली आहे. पदवीधर गणात १४२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी चार दिवसांची मुदत असल्यामुळे उमेदवारांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. आमदार सतीश चव्हाण यांचे पाठबळ असलेले विद्यापीठ उत्कर्ष पॅनल आणि ‘अभाविप’चा पाठिंबा असलेल्या विद्यापीठ विकास मंचला तुल्यबळ प्रतिस्पर्धी मानले जात होते. मात्र, आणखी दोन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे लढत रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राहुल तायडे, ‘एनएसयूआय’चे नीलेश आंबेवाडीकर, ‘एसएफआय’चे सुनील राठोड, सम्यक आंदोलनचे प्रकाश इंगळे आणि ‘एमआयएम’चे डॉ. मोहम्मद फैजुद्दीन सिद्दिकी यांनी एकत्रितपणे परिवर्तन पदवीधर आघाडी पॅनल जाहीर केले. या पॅनलमध्ये तीन दिवसानंतर सक्षम उमेदवारांचा समावेश करून पॅनलची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. पदवीधर निवडणुकीसाठी युवा सेनेकडून डॉ. तुकाराम सराफ, अॅड. विजय सुबुकडे, पूनम सलामपुरे, सचिन वाहूळकर, अनघा देशमुख यांच्यासह इतर उमेदवारांनी शनिवारी अर्ज दाखल केले. युवा सेना-भारतीय विद्यार्थी सेना दहा जागांच्या निवडणुकीसाठी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. स्वतंत्र पॅनल जाहीर करून युवा सेनेने चुरस वाढवली आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. स्वतंत्र अर्ज भरणारे काही उमेदवार अनुकूल पॅनलमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. प्रत्येक पॅनलने सर्वाधिक मतदार नोंदणी असल्याचा दावा केला आहे. प्रस्थापित उमेदवारांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी मतदारांना मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचून मतदानाची विनंती करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. येत्या चार डिसेंबर रोजी पदवीधरचे मतदान असून, सहा डिसेंबरला मतमोजणी आहे.

उढाण यांची स्वतंत्र लढत
विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या हितासाठी सिनेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करीत माजी सिनेट सदस्य डॉ. उल्हास उढाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विद्यापीठ ही महत्त्वाची संस्था आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी विधायक विचारांची सिनेट व व्यवस्थापन परिषद स्थापन होणे आवश्यक आहे असे डॉ. उढाण यांनी सांगितले. प्रस्थापित पॅनलमध्ये उढाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती प्रत्यक्षात त्यांनी स्वतंत्र अर्ज भरला आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य राहिलेल्या उढाण यांनी अर्ज भरून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

प्रचाराला वेग
प्राधिकरण निवडणुकीसाठी उत्कर्ष पॅनल, विद्यापीठ विकास मंच, बामुक्टो यांनी प्रचार सुरू केला आहे. प्रत्येक महाविद्यालयात बैठक घेऊन प्राध्यापकांच्या प्रश्नांवर काम करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे. काही संस्थांनी प्रचार बैठका घेण्यास नकार दिला आहे. संस्थाचालक कोणत्या गटाचे आहेत, यावर प्रचाराचे नियोजन ठरवण्यात येत आहे. भक्कम यंत्रणा असलेल्या उमेदवारांना सर्वत्र कमी वेळेत पोचणे सहजशक्य झाले आहे. कमी कालावधीत सर्वांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद पाचशे डीपींमुळे पिके संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कृषी पंपांची वीज थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे सोमवारपासून पुन्हा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या १५ दिवसांच्या मुदतीत औरंगाबाद आणि जालना विभागात पाचशेपेक्षा जास्त डीपी जळाल्या आहेत. या डीपी दुरुस्त करून दिल्या जात नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
औरंगाबाद आणि जालना ग्रामीण भागात तीन लाख ५७ हजार ७९१ ग्राहक असून त्यांच्याकडे एकूण २३५६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत पाच कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी कृषी संजिवनी योजना जाहीर केल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई थंडावली होती. मात्र, महावितरणाच्या धोरणामध्ये बदल झालेला नाही. थकबाकी न भरल्यास जळालेल्या डीपी बदलून देणार नाही, असा स्पष्ट पवित्रा महावितरणने घेतला आहे.
सध्या पिकांना पाणी देण्याची वेळ असल्याने कृषी डीपींवर लोड वाढला आहे. परिणामी, औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पाचशेच्या वर डीपी जळाल्या आहेत. याबाबत महावितरणकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही. तक्रार करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना आधी बिल भरा नंतर दुरुस्ती केली जाईल, असे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. एका गटातील दोन ते तीन शेतकऱ्यांनी वीजबिल भरले व इतरांनी भरले नसल्यास अधिकारी डीपी दुरुस्त करत नाहीत. यामुळे ऐन हंगामात पिके हातची जाण्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सन्मानार्थ

मुख्यमंत्री कृषी संजिवनी योजना घोषित करण्यात आली असून या योजनेचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागात दवंडी देऊन केला आहे. तरीही शेतकरी स्वतःहून योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाहीत. यामुळे बिल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची नावे योजनेत समाविष्ट करून मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाचविण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे.

औरंगाबाद परिमंडळात २३ हजार कोटींची थकबाकी कृषीपंपाकडे आहे. ती वसूल करणे गरजेचे आहे. शेतक्यांनी स्वतःहून बिल भरले, तर कारवाईची गरज पडणार नाही. सोमवारपासून कृषी पंपाचे कनेक्‍शन तोडण्याची कारवाई सुरू करणार आहोत.
-सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी रुग्णालयात गॅस्ट्रोचे शेकडो रुग्ण

$
0
0

छावणी परिसरातील सामान्य रुग्णालयात दाखल होत असलेल्या गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, सद्यस्थितीत शेकडो रुग्णांवर उपचार करण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत रुग्णालयामध्ये सुमारे पाचशे रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
छावणी परिसरात मागच्या काही दिवसांपासून दुषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहे. उलट्या, जुलाब व त्यामुळे येणारा अशक्तपणा या तक्रारींसह अनेक महिला-पुरुष रुग्णालयामध्ये दाखल होत आहे. रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी क्षमतेपेक्षा जास्त वाढल्यामुळे अनेक रुग्णांना जमिनीवर उपचार घेण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयामध्ये जिथे जमेल तिथे रुग्णांवर सलाईन देण्यासह इतर उपचार करण्यात येत आहेत. उपचार करुन अनेकांना सुटी देण्यात येत असली तरी नव्याने तेवढेच रुग्ण दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. दुषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोचा त्रास झाल्याचे नागरिकांनी सांगितले. रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत असलेल्यांमध्ये तरुण-ज्येष्ठ असा सर्वांचा समावेश आहे. काही प्रमाणात लहान मुलांवरही उपचार केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५५० मालमत्ताधारकांना सिडको देणार नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रहिवासी क्षेत्र म्हणून घेण्यात आलेल्या सिडकोच्या प्लॉटमध्ये दुकाने टाकणाऱ्या मालमत्ताधारकांना सिडकोने नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत सुमारे साडेपाचशे मालमत्ता धारक नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या सूत्रांनी दिली.

सिडकोकडून निवासी वापरासाठी देण्यात आलेल्या प्लॉटचा वापर वाणिज्यिक कारणांसाठी केला जात आहे. याबाबत व्यावसायिक कारणांसाठी प्लॉट घेणाऱ्या ग्राहकांनी यासंदर्भात सिडकोकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत तत्कालीन प्रशासक केंद्रेकर यांच्या कार्यकाळात सिडको एन-पाच येथील सर्व्हिस रोडवर असलेल्या घरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानंतर केंद्रेकर यांची बदली झाली. त्यामुळे हा विषय मागे पडला होता. सध्याचे सिडको प्रशासक ओमप्रकाश बकोरिया यांच्यासमोर हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी अन्य भागात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या सर्वेक्षणात अंतर्गत मुख्य रस्त्यांवरील रहिवासी वापराच्या निवासस्थानामध्ये असलेल्या दुकानांचा शोध घेण्यात आला.

सुमारे ५५० मालमत्ताधारकांनी सिडकोबरोबर केलेल्या कराराच्या अटींचा भंग करून मालमत्तांचा वाणिज्यिक वापर सुरू असल्याची माहिती या सर्वेक्षणात समोर आली आहे. या मालमत्ताधारकांना नोटीस देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५० मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. आगामी काळात या सर्व मालमत्ताधारकांना नोटीस देऊन त्यांच्याकडून वाणिज्यिक दरानुसार रक्कम भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर या मालमत्ता नियमित करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या सूत्रांनी दिली.

सिडकोच्या कराराचा भंग करून रहिवासी क्षेत्राचा वाणिज्यिक वापर करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीस देणे सुरू आहे. या मालमत्ता नियमित करून घेण्यासाठी मालमत्ताधारकांनीच पुढाकार घ्यावा.
- ओमप्रकाश बकोरिया, प्रशासक, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या तीन महिन्यांपासून औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची गाडी अडखळली असून, या कालावधीत एक हजार २४७ हेक्टरपैकी केवळ १९६ हेक्टरचे संपादन झाले आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर १५ दिवसांत उर्वरित सुमारे एक हजार हेक्टर भूसंपादन करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.
समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील ६२ गावांमधील तीन हजार ५४ शेतकऱ्यांच्या एक हजार २४७ हेक्टर जमिनीचे संपादन प्रशासनाला करायचे आहे. वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींची नोंद कोरडवाहू करण्यात आल्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे. नोंदीतील चुका दुरुस्तीचे प्रशासनामोर मोठे आव्हान आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी येत्या १५ दिवसांमध्ये तब्बल एक हजार हेक्टर भूसंपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला असला, तरी प्रशासलाना त्यासाठी अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

कर्जमाफीचा अडथळा

राज्य सरकारने घोषणा केल्यानंतरही कर्जमाफीचा संभ्रम कायम आहे. समृद्धीसाठी भूसंपादनासाठीही कर्जमाफीची अडचण ठरत असल्याचे चित्र अाहे. बहुतांश शेतकऱ्यांची जमीन देण्याची तयारी आहे, मात्र यापैकी बहुतांश जमिनींवर कर्ज काढण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत कर्जाचा बोजा कमी होत नाही, तोपर्यंत समृद्धीसाठी जमिनीची विक्री न करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे खरेदी व्यवहारासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

भूसंपादनाची स्थिती

तालुका... शेतकरी ..रजिट्री झाल्या......उर्वरित खरेदी

औरंगाबाद.......१४५८.............११८.................१३४०

वैजापूर...........११३०..............१६०................९७०

गंगापूर............४६६..............३९...................४२८

एकूण.............३०५४............३१६.................२७३८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावरील मंदिर वैजापुरात हटवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वैजापूर
सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारी वैजापूर शहरातील गंगापूर रस्त्यावरील लक्ष्मीमाता मंदिराचे अतिक्रमण जेसीबीने हटवले. त्यामुळे या भागातील रस्त्याचा श्वास मोकळा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूल अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पोलिस बंदोबस्तात मंदिर पाडण्याची कारवाई केली.
सुप्रीम कोर्टाने रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, उपअभियंता पी. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता नारायण शेवारे, महसूल विभागाचे जितेंद्र चापानेरकर, मनोज जगताप, नगरपालिकेचे प्रमोद निकाळे यांच्या उपस्थितीत मंदिराचे अतिक्रमण पाडण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. जाधव, प्रतापसिंह बहुरे, संजय घुगे, दिलीप वेलगुडे, उपस्थित होते. दरम्यान, मंदिर पाडल्यामुळे येथील भाविकांच्या सोयीसाठी माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप व मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांच्यासोबत बैठक घेऊन मंदिरातील लक्ष्मीमाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मुरारी पार्ट भागात जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. या ठिकाणी मंदिराचे बांधकाम करण्यात येणार आहे.

वीजखांब कायम

रस्त्यावरील मंदिराचे अतिक्रमण काढले असले तरी या रस्त्याच्या दोन्ही बाजुला महावितरणचे रोहित्र व खांब कायम आहेत. ते कधी काढणार, असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. खांब काढण्यासाठी बांधकाम विभागाला महावितरणकडे ४५ लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. त्याची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ हज यात्रेचे विमान बंद होणार?

$
0
0

हज यात्रेचे विमान बंद होणार?

औरंगाबादहून यात्रेला जायचे की नाही हा निर्णय प्रवाशांवर सोपविला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेकरुंना घेऊन जेद्दाहकडे जाणारे एकमेव विमान बंद होण्याची शक्यता आहे. हज ‌कमिटीने यंदा हज यात्रेकरुना इन्बारकेशन पॉइंट ठरविण्याचा अधिकार दिला आहे. मुंबईपेक्षा औरंगाबादहून विमान प्रवास महाग असल्याने प्रवासी मुंबईला अधिक पसंती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात हज यात्रेसाठीचे विमान सुरू राहणार की नाही, हे प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून राहणार आहे.

हज यात्रेसाठी शासनाकडून दिले जाणारे अनुदान पाच वर्षात संपविण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहे. या आदेशाप्रमाणे हज कमिटीनेही तयारी सुरू केली आहे. शासकीय अनुदानामुळे देशभरात विविध विमानतळावरून हज यात्रेकरूंना जाण्यासाठी इन्बारकेशन पॉईंट देण्यात आले होते. मध्य महाराष्ट्रात औरंगाबाद शहराच्या विमानतळावरून औरंगाबाद शहरासह जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नगर भागातून प्रवासी हज यात्रेसाठी रवाना जात असता. यंदाच्या हज यात्रेकरूंवर इन्बारकेशन पॉईंटचा निर्णय़ सोपविण्यात आला आहे.

हाजींनी जर मुंबईहून विमान घेण्याचे निश्चित केले तर त्यांना मुंबईहून थेट जेद्दाहला जाता येईल. यामुळे हज यात्रेकरूंच्या प्रवास खर्चात २० ते ३० हजार रुपयांचा फरक पडू शकतो. औरंगाबादपेक्षा मुंबईतून हजसाठीचा खर्च कमी लागणार असल्याने यात्रेकरून प्रवासासाठी मुंबईला पसंती देण्याची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीत औरंगाबादहून विमानासाठी आवश्यक ती प्रवासी संख्या न मिळाल्यास येथून जाणारे विमान रद्द होऊ शकते.

२००५ पासून सुरू झाले होते विमान

औरंगाबाद विमानतळावरून वर्ष २००५ पासून हज यात्रेकरुंसाठी विमान जेद्दाहला जात आहे. सलग १३ वर्षे ही सेवा सुरू आहे. दरवर्षी तीन हजार प्रवासी येथून हजला जातात. यंदा मात्र हे विमान उडणार की नाही ते प्रवाशांवर अवलंबून असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होय, सरकारवर मी नाराज : ठाकरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
‘होय, मी सरकारवर नाराज आहे, असे जाहीर सभेत बोलतो. कोपऱ्यात जाऊन कशाला बोलेल,’ अशी टिप्पणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या कथित गौप्यस्फोटावर केली. पवार हे पंतप्रधानांचे गुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. आमदार जाधवांना सबुरीचा सल्ला देत, ‘चांगले काम करा शिवसेना निश्चित पाठीशी असेल,’ असे त्यांनी सांगितले.

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मातुःश्री माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी लिहिलेल्या ‘रायभानजी जाधव ः व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी, ‘शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली. ही योजना पूर्ण झाली पाहिजे. अटीच्या कर्जमाफीपेक्षा सपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे,’ अशी मागणी केली. गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘जीएसटी’चे दर कमी केल्याचे त्यांनी सांगत, सिंचन, नोटाबंदीवर सडकून टीका केली.

आमदार जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कवी ना. धों. महानोर यांनी स्व. रायभान जाधव यांच्यासोबत केलेल्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे यांचीही भाषणे झाली.

सुमारे दोन तास चाललेल्या कार्यक्रमासाठी तालुकाभरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी बाबा वाघमारे, विनोद घोसाळकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, आमदार निलम गोऱ्हे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संजना जाधव, विकास जैन, आण्णासाहेब माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रज्ञा शोध परीक्षेत साउंडचा व्यत्यय!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रज्ञा शोध परीक्षेदरम्यान शाळेत चक्क लाउड स्पीकरवर प्रार्थना सुरू होती. पालकांनी त्यावर आक्षेप घेतला, परंतु शाळा प्रशासन जुमानत नसल्याचे लक्षात येत पालकांनी थेट पोलिसांकडे दाद मागितली. पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाला समज दिल्यानंतर विद्यार्थ्यांनां शांततेत पेपर देता आला. यामध्ये मुलांचा अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वाया गेल्याचा आरोप पालकांनी केला. सिडको बसस्थानका समोरील सेंट लॉरेंस शाळेत हा प्रकार घडला.

सेंट लॉरेंस शाळेत ऐन परीक्षेदरम्यान प्रार्थना सुरू झाली. पालकांनी शाळा व्यवस्थापना लाउड स्पीकर बंद करावा व शांततेत विद्यार्थ्यांना परीक्षा देऊ द्यावी, अशी विनंती केली. परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करू दिला जात नसल्याचे अाणि प्रशासन दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांना पोलिस कंट्रोल रूमला ही माहिती कळविली. त्यानंतर पोलिस, चार्ली परीक्षा केंद्रावर पोचले. तोपर्यंत पालकांचा शाळा प्रशासनाशी याबाबत चर्चा सुरू होती. पोलिसांनी हस्तक्षेप करत, शाळा व्यवस्थापनाला समज दिली अाणि पेपर सुरळीत होऊ द्यावा, असे सांगितले. त्यानंतर शाळा व्यवस्थापनानेही याची दखल घेत साउंड सिस्टीम बंद केली. त्यानंतर परीक्षा सुरळीत सुरू झाली.

तीन पेपर, दोन सत्र
परीक्षा परिषदेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रज्ञा शोध परीक्षा शहरातील १४ केंद्रावर घेण्यात आली. तीन हजार ९३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन हजार ८२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सकाळी साडेदहा ते सव्वाअकरा, सकाळी साडेअकरा ते दुपारी बारा आणि आणि दुपारीअडीच ते पावणेचार अशा तीन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. बौद्धिक क्षमता, भाषा चाचणी व शालेय क्षमता चाचणी असे तीन पेपर होते.

परीक्षा सुरू झाल्यानंतर याबाबत मला फोन आला. त्यानंतर मी शाळा व्यवस्थापनाकडे विचारणा केली. त्यांना सांगितल्यानंतर शाळेने साउड बंद केला.
- वाय. एस. दाभाडे, परीक्षा समन्वयक, शिक्षण विभाग.

विद्यार्थी परीक्षा देत असतानाच शाळेत लाउड स्पीकरवर प्रार्थना चालू होती. त्याला आम्ही आक्षेप घेतला. शाळा प्रशासन आम्हाला तक्रारही मांडू देत नव्हते. त्यानंतर कंट्रोल रूमशी संपर्क साधला. या प्रकरणाची शिक्षणाधाऱ्यांनी चौकशी करावी व शाळा प्रशासनावर कारवाई करावी.
- संतोष सोमाणी, पालक

प्रार्थना घेण्यास आमचा विरोध नाही, परंतु शाळेने परीक्षेदरम्यान अशाप्रकारे साउंड लावणे योग्य नाही. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. पोलिस आल्यानंतर हा प्रकार थांबला. ही परीक्षा राज्य पातळीवरील असल्याचा विसर शाळा प्रशासनाला पडता कामा नये.
- अनिल क्षीरसागर, पालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात हजार गावांत टंचाईचे संकट

$
0
0

औरंगाबाद : पाऊस कमी पडल्यामुळे महाराष्ट्रातील सात हजार १३९ गावांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील ३५३पैकी २४१ तालुक्यांत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यापैकी २३० गावांत भूजल पातळीत घट झाल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने (जीएसडीए) ऑक्टोबर महिन्यात केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.

‘जीएसडीए’ने पावसाळा संपल्यानंतर, ऑक्टोबर महिन्यात भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या आहेत. भूजल पातळीतील घट आणि पर्जन्यमान यांचा अभ्यास करून संभाव्य टंचाईचा अहवाल तयार करण्यात आला आहे. राज्यात ३५३पैकी ९७ तालुक्यांतील पावसात २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहेत. त्याचबरोबर ४५ तालुक्यांत २० ते ३० टक्क्यांदरम्यान, ८० तालुक्यांत ३० ते ५० टक्क्यांदरम्यान आमि १९ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्याच्या नोंदी आहेत. राज्यातील तीन हजार ९२० निरीक्षण विहिरी आहेत. या विहिरींतील पाणी पातळीचा गेल्या पाच वर्षांच्या पातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या पाहणीत २३० तालुक्यांतील दहा हजार १६७ गावांत भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून आले. त्यातील एक हजार ९९५ गावांतील भूजल पातळीत तीन मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. त्याशिवाय दोन हजार ५८७ गावांत दोन ते तीन मीटर आणि पाच हजार ५८५ गावांतील भूजल पातळीत एक ते दोन मीटर घट झाल्याचे ‘जीएसडीए’च्या अहवालात म्हटले आहे.

पर्जन्यमानात २० टक्क्यांपेक्षा जास्त तूट आणि भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त घट झालेली राज्यात सात हजार १३९ गावे आहेत. या गावांत पाणी टंचाई भासणार आहे. ८४ तालुक्यांतील एक हजार ५४६ गावांतील भूजल पातळीत तीन मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. या गावांत ऑक्टोबर महिन्यापासून पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर १०५ तालुक्यातील एक हजार ९३३ गावांत भूजल पातळीत दोन ते तीन मीटर घट झाली आहे. तेथे जानेवारी २०१८पासून पाणी टंचाई जाणवेल आणि १३२ तालुक्यातील तीन हजार ६६० गावांत भूजल पातळी एक ते दोन मीटरदरम्यान कमी झाली आहे. तेथे एप्रिल २०१८पासून पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

भूजल पातळीत एक मीटरपर्यंत घट झालेल्या गावांत पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता कमी असते. या गावांतील टंचाई नियंत्रणात ठेवता येण्यासारखी असते. त्याचबरोबर पर्जन्यमानात २० टक्क्यांपेक्षा कमी तूट असलेल्या गावांत पाणी टंचाई भासण्याची शक्यता नसते, असेही या अहवालात नमूद केले आहे.

विदर्भातील स्थिती चिंताजनक
या वर्षी विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होते. मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद व बीड वगळता अन्य जिल्ह्यांत कमी पाऊस पडला. त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. मराठवाड्यातील ७६पैकी केवळ १६ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. विदर्भातील ११९पैकी केवळ चार तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पडल्याची नोंद आहे. भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या दहा हजार १६७ गावांमध्ये अमरावतील विभागातील चार हजार ४० आणि नागपूर विभागातील दोन हजार ७६६ गावांचा समावेश आहे. मराठवाड्यातील एक हजार ६१६ आणि नाशिक विभागातील एक हजार ३९३ गावांतील भूजल पातळी एक मीटरपेक्षा जास्त घटली आहे. अमरावती (११०८ गावे), यवतमाळ (११७४), चंद्रपूर (८५५), अकोला (७९२) नांदेड (७६०), जळगाव (६९४), वाशीम (६७१), गोंदिया (५३५ गावे) या तालुक्यांतील स्थिती चिंताजनक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी पाहुण्यांची न्यारी दुनिया

$
0
0

परदेशी पाहुण्यांची न्यारी दुनिया
पक्षी निरीक्षण उपक्रमाला प्रतिसाद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगभरातील पक्ष्यांवर अभ्यासपूर्ण संशोधन करणारे विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती पक्षी निरीक्षण आणि पक्षीगणना या अभिनव उपक्रमांनी साजरी झाली. शहरात सलीम अली सरोवर आणि सुखना धरण परिसरात पक्षी निरीक्षणासाठी पक्षीमित्रांची गर्दी झाली. तर तंत्रनिकेतन संस्थेत अली यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांबाबत पक्षीमित्रांमध्ये नेहमीच कुतूहल असते. देशभरातील पक्ष्यांवर संशोधन आणि लेखन करणारे डॉ. सलीम अली यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरक आहे. या विख्यात पक्षीतज्ज्ञांची जयंती चाकोरीबाह्य पद्धतीने साजरी झाली. एनव्हॉयर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अॅकॅडमीने सलीम अली सरोवर परिसरात रविवारी पक्षी निरीक्षण उपक्रम घेतला. निसर्ग मित्रमंडळाने सुखना धरण परिसरात पक्षीगणना व निरीक्षण असे दोन उपक्रम राबवले. पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आबालवृद्ध दंग झाले. सलीम अली यांच्या कार्याला उजाळा देत तंत्रनिकेतन संस्थेत जयंती कार्यक्रम झाला.
सुखना परिसरात गर्दी
निसर्ग मित्रमंडळाने रविवारी महाराष्ट्र पक्षीमित्र व बी. एन. एच. एस. मुंबई यांच्या सहकार्याने सुखना जलाशय परिसरात स्थानिक व स्थलांतरीत पक्ष्यांचे निरीक्षण व पक्षीगणना उपक्रम घेतला. यावेळी निसर्ग मित्रमंडळाचे पक्षीमित्र किशोर गठडी, नागेश देशपांडे, केदार चौधरी, महेंद्र देशमुख यांनी मार्गदर्शन केले. तिबेट, रशिया, सैबेरिया, दक्षिण आफ्रिका, इराण, अमेरिका या देशांसह हिमालय पर्वत आणि भारताच्या विविध भागातील पक्षी दाखल झाले आहेत. या परिसरातील जैवविविधता आणि मुबलक खाद्यामुळे वर्षानुवर्षे स्थलांतरित पक्षी वास्तव्यास असतात. पाणकावळा, भारद्वाज, व्हाईट ब्रेस्टेड, वॅाटरहेन, जांभळी पाणकोंबडी, ब्लॅक विंग स्टिल्ट, सँडपायपर, नदीसुरय, शिक्रा, वेडा राघू, स्नेक बर्ड, निलपंख, कोतवाल, खाटिक,पर्पल सनबर्ड, सुगरण, लालबुडी बुलबुल, सातभाई, गुलाबी मैना, मार्श हॅरियर, कापशी घार, रंगीत करकोचा, कांडेसर करकोचा, स्पूनबिल, ब्लॅक आयबीज, ग्लॅासी आयबीज, पर्पल हेरॅान, ग्रे हेरॅान या पक्ष्यांनी पक्षीमित्रांना आकर्षित केले. बदकातील शॅावेलर, स्पॅाट बील डक, कॅामन टिल, कूट, रेड क्रेस्टेड पोचार्ड, गढवाल पक्षी पाणवठ्यावर आहेत. मागील ३२ वर्षांपासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या जातात. सुखना, हर्सूल तलाव, हिमायतबाग, सलीम अली सरोवर, जायकवाडी अभयारण्य, ढेकू जलाशय, ब्रह्मगव्हाण, भिगवण, हतनूर जलाशय, नांदूर मधमेश्वर येथे फेब्रुवारीपर्यंत उपक्रम राबवला जाणार आहे अशी माहिती निसर्ग मित्रमंडळाचे किशोर गठडी यांनी दिली. या उपक्रमात प्राजक्ता चौधरी, मोहन शिकरे, सुधीर खुस्तुले, बाळासाहेब देशपांडे, प्रशांत वडगावे, सचिन काळे, संदीप मोकाडे, संदीप जाधव, गणेश नरसाळे, रवींद्र बिंदू आदी सहभागी झाले.
यंदा धरणात भरपूर पाणी असल्यामुळे पक्षी विखुरलेले आहेत. एकाच ठिकाणी पक्ष्यांचा थवा क्वचितच दिसतो. दरवर्षीप्रमाणे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या भरपूर आहे.
- किशोर गठडी, पक्षीमित्र
पक्ष्यांचा किलबिलाट
प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त एनव्हॉयर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अॅकॅडमीने पक्षी निरीक्षण उपक्रम राबवला. सलीम अली तलाव परिसरात रविवारी शेकडो पक्षीप्रेमींनी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. तलाव परिसरातील पक्ष्यांची माहिती घेत उपस्थितांनी जैवविविधता समजून घेतली. या ठिकाणी विविध जातीचे शंभरपेक्षा जास्त पक्षी आढळले. पक्ष्यांच्या निसर्ग संवर्धनाबाबत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी डॉ. दिलीप यार्दी, अमेय देशपांडे, प्रिती शाह आणि प्रसाद गुरू यांनी परिश्रम घेतले.
छायाचित्रांचे अनावरण
शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत पक्ष्यांबाबत वैविध्यपूर्ण माहिती देणाऱ्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राचार्य एफ. ए. खान, उपवनसंरक्षक सतीश वडस्कर, प्रा. पवन लाहोटी, कृष्णा पठाडे, सुरभी नामवाड, रमेश राऊत, युवराज पाटील, नितीन बुगदे, विजय मोहिते, त्र्यंबक जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सलीम अली यांच्या कार्याला उजाळा देऊन पक्ष्यांबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी सिताराम शेळके, सुभाष काकडे, प्रल्हाद तेलंग यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हॉइटनरची नशा; अल्पवयीन ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संग्रामनगर रेल्वे गेटजवळ व्हाइटनरची नशा करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला विशेष पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसाच्या स्वाधीन केले. हा मुलगा तीन महिन्यांपासून नशा करत होता.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार उस्मानपुरा भागात राहणारा एक १४ वर्षीय मुलगा संग्रामनगर रेल्वे गेटजवळ व्हाइटनर (फेविस्टिक) रुमालात टाकून तोंडाने ओढून नशा करत होता. विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील, उमेश डोंगरे, स्वराज पाटील, राहुल सोनकांबळे, विनोद सोनवणे यांनी त्याला ताब्यात घेऊन एक तास नशेचे दुष्परिणाम सांगितले. या मुलाची आई भंगार जमा करते, तर वडील मजुरी करतात. नशा करणाऱ्या मुलांच्या संगतीमुळे त्याला ही सवय लागली. तीन महिन्यापूर्वी हा मुलगा पोटभर जेवत होता, आता तो अर्धी पोळीच खातो. त्याचे पोट व पोटाच्या उजव्या बाजुला दुखायला लागले. या मुलाला उस्मापुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग्य दरात भाजी दारात

$
0
0

योग्य दरात भाजी दारात

शहरात ऑनलाइन भाजीविक्रीचा ट्रेंड; शेतकरींचा माल थेट ग्राहकांपर्यंत; वेबसाइटद्वारे रजिस्ट्रेशन

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजी खरेदी हा खरं तर गृहिणींना रोज पडणारा प्रश्न. गृहिणींसह सर्वांनाच पडणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर देत शहरात आता घरपोच भाजी विक्री सुरू झाली आहे, ती देखील ऑनलाईन. ऑनलाइन तुम्ही बुकिंग कराची आणि भाजी तुमच्या दारात असते. ऑनकॉल भाजीविक्रीचा हा ट्रेंड शहरात जोर धरू लागला आहे. विशेष म्हणजे असा व्यवसाय सुरू करणारे सर्व तरुण असून त्यांनी भाजीविक्रीसारख्या पारंपरिक व्यवसायातही आधुनिकतेच कास धरली आहे. तेव्हा घरबसल्या साध एक ‘क्लिक’ करा किंवा ‘कॉल’ करा.

शहरात ‘ऑनलाइन’ भाज्यांसाठी किमान ८/१० वेबसाइट सुरू झाल्या आहेत, ऑन कॉल भाजी सेंटरही सुरू झाले आहेत. यातून आठवड्याला लाखोंचा व्यवहार होत असल्याने हा बिझनेस सुरू करणारेही खूष असून ग्राहक ही खूष आहेत. विशेष म्हणजे हा बिझनेस सुरू करणारे सर्व तरुणच असून ते उच्च शिक्षित आयटी तज्ज्ञ किंवा इंजिनीअर्स आहेत.

'ई-कॉमर्स', तसेच वेबसाइट व मोबाइलद्वारे वस्तू विकणं हे समीकरणं सध्या शहरात रूजू लागले आहे. मुंबई-पुण्याकडे हा प्रकार फारच पूर्वी रुजला असला तरी औरंगाबादेत तसा अलीकडील दोन-तीन वर्षांत आलेला प्रकार आहे. यात भाजीपाला विक्रीला अधिक मागणी आहे, तो व्यवसाय जोरात होऊ लागला आहे. यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. ग्रीनलीफ कंपनी आणि देवगिरी व्हेंचर्स या माध्यमातून तर शहरातील तरुण जे नामांकित आयटी आणि टेलिफोन-मोबाइल कंपन्यांमध्ये होते त्यांनी ती नोकरी सोडून हा ऑनलाइन बिझनेसचा व्यवसाय सुरू केला आहे. स्मार्टफोन, अॅप, फोन आणि अर्थात इंटरनेट डाटा याद्वारे आता भाजी खरेदीही होऊ लागली आहे.

हे आहेत व्यावसायिक गुपित

इ-कॉमर्समागची तांत्रिक संकल्पना वरकरणी क्लिष्ट वाटत असली तरी, त्यातून प्रत्येक प्रकारचा बिझनेस व रेव्हेन्यू मॉडेल समोर येत आहे. नवनवीन भाज्या त्यात सेंद्रीय भाज्या, गावातील माणसांना शेतकऱ्यांना थेट रोजगार, आकर्षक पॅकेजिंग, आक्रमक व इनोव्हेटिव्ह मार्केटिंग, स्टोरेज व डिलिव्हरी आणि ठराविक इकॉनॉमिक क्लासमधील ‘टार्गेट कस्टमर’ हे प्रत्येकाचे काही ठरलेले व्यवसायिक गुपित असल्याचेही समोर आले आहे.

बोलकी आकडेवारी
या व्यवयसायातून रोजगार मिळालेले तरुण - ५०० ते ७००
जोडले गेलेले ग्रामीण भागातील शेतकरी - १०० ते १५०
वेबसाइटस आणि ऑनकॉल सेवा देणारे तरुण व्यावसायिक - १० ते १२ जण
या व्यवसायात जोडले गेलेले बचतगट - ४० ते ५०
कुठल्या ग्रामीण भागांना वाव - खुलताबाद, कन्नड, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड
आयटीतील रोजगार - या व्यवयसायाला लागत असलेल्या वेबसाइट निर्मिती आणि बॅक ऑफिस पुणे, मुंबई औरंगाबादहून हाताळले जाते. यामुळे आयटीतील किमान ४० ते ५० तरुण या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. यांचाही सहभाग - शहरातील अनेक कंपन्यांच्या फाउंडेशनद्वारेही अशा प्रकारच्या व्यवसायांना चालना देण्यात येत आहे. यात फार्मा, ऑटो कंपन्यांचा समावेश आहे.

सेंद्रीय भाजी आणि तीही ऑनलाइन आम्ही देतो. एक बास्केटभर भाजी घरपोच देऊन आम्ही यात वेगळेपण सिद्ध केले आहे. हा टीमवर्कमधून झालेला बिझनेस आहे. आम्ही कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथून सेंद्रीय भाजी औरंगाबाद शहरात आणतो. याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.

योगेश बिडवई, ग्रीनलिफ, पारिजात, परिपूर्ती शेती समूह

आम्ही वेवबसाइट आणि ऑनकालद्वारे भाजी देतो. वेबसाइटवर आठवड्यातून २ ते ४ जण ऑर्डर देत असतात, पण ऑनकॉलद्वारे रोज किमान २० आणि आठवड्यात सुमारे १५० जण भाज्या घेतात. आता हा ट्रेंड लोकांना आवडू लागला आहे. नोकरदार महिला, वृद्ध किंवा बिझनेस वुमन्स यांनाही यातून दिलासा आहेच.

-अमोल गोखले, संचालक, अॅग्र‌िकल्चर देवगिरी व्हेंचर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीत बागायतीच्या नोंदी कोरडवाहू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करत संमती मिळवली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत.
बागायती जमीन कोरडवाहू दाखवल्याप्रकरणी वैजापूर तालुक्यातील आगर सायगाव येथील प्रतापसिंग डुमाले, रामेश्वर जाधव, संतोष डेंगळे आणि शेहरे या शेतकऱ्यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन कैफियत मांडली. प्रतापसिंग डुमाले यांची १६ एकरपैकी सहा एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी जाणार आहे. बागायती असलेल्या या जमिनीची नोंद सर्व्हेक्षणामध्ये हंगामी बागायती करण्यात आली आहे. त्यांच्या शेतामध्ये पाइपलाइनही गेली असून सर्व्हेक्षण करण्यात आले त्यावेळी बागायती पीक घेण्यात आले होते. तरीही जमीनीची नोंद हंगामी बागायती केल्यामुळे मावेजावर परिणाम होणार असल्याचे डुमाले यांनी सांगितले. रामेश्वर जाधव यांच्या ३७ गुंठे जमिनीपैकी २८ गुंठे जमीन समृद्धी महामार्गात जाणार आहे. त्यांच्या शेतात पाइपलाइन आहे, तसेच संतोष डेंगळे यांचे संपूर्ण दोन एकर क्षेत्र समृद्धीमध्ये गेले. त्यांच्या नावावर कोरडवाहू जमीन असल्याची नोंद लागली आहे.शेहरे यांची ३९ गुंठे जमीनही कोरडवाहू दाखवण्यात आली आहे. त्यांच्या जमिनीवर साडेपाच हजार फूट लांब पाइपलाइन असूनही जमिनीची नोंद कोरडवाहू प्रकारात केल्याचे सांगण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा करणाचे आश्वासन दिले.
समृद्धी महामार्गासाठी जमीन मोजणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी जमीन खरेदीचे व्यवहारही सुरू झाले आहेत. गेल्या काही वर्षांत दुष्काळामुळे काही शेतकरी बागायती करू शकले नाहीत. शेतामध्ये विहीर, पाइपलाइन असताना प्रशासने या जमिनी कोरडवाहू दाखविल्याचे बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याच प्रश्नावर काही दिवसांपूर्वी वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बाधित शेतकऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.

३०० जमिनींची खरेदी

एकीकडे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात आतापर्यंत तीनशेवर शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी हनमंत अरगुंडे यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी समृद्धी महामार्गाच्या कासवगतीचे खापर अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर फोडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजनकोच्या परीक्षेत हायटेक कॉपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाजनकोच्या ऑनलाइन परीक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करणाऱ्या चौघांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. मयूरनगर (हडको) भागात रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून मोबाइल, ब्लू टूथ, कार्ड रिडर, मायक्रोफोन आदी साहित्य जप्त करण्यात आले.

मुकुंदवाडी पोलिसांना, अर्जुन कारभारी घुसिंगे हा संशयिताने महावितरणाच्या रविवारी दुपारी होणाऱ्या महाजनकोच्या ऑनलाइन परीक्षेचे पेपर हॅक केले आहेत. लॅपटॉपवर प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांना ब्लू टूथ व मायक्रोफोनच्या मदतीने उत्तर सांगणार आहे; तसेच एका विद्यार्थ्याला जयभवानीनगर येथे कार्डलेस मायक्रोफोन व डिव्हाइस देण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी जयभवानीनगर येथे सापळा रचला. साडेबाराच्या सुमारास एक संशयित जयभवानीनगर येथे आला, मात्र त्याला पोलिस असल्याचा संशय आला. त्यामुळे तो दुचाकीवर पसार झाला. या व्यक्तीचा पोलिसांनी पाठलाग केला असता मयूरनगर येथील मित्राच्या खोलीवर हा तरुण जाऊन बसला. तेथे ऑनलाइन पेपर सोडवून त्यांची उत्तरे सांगण्यात येत होती. पोलिसांनी छापा टाकून या संशयिताची चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांना धक्का देत हा तरुण पुन्हा पसार झाला, मात्र त्याचा मोबाइल त्या ठिकाणी पडला.

पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त राहूल श्रीरामे, पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हारुण शेख,असलम शेख, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, कैलास वळेकर, विजय घोरपडे, गोवर्धन उगले, दिलीप डुकरे, कैलास मते यांनी ही कारवाई केली.

प्रश्नपत्रिका, पुस्तके सापडली
पोलिसांनी चार संशयित विद्यार्थी जीवन गिरजाराम जघाळे (वय २१, रा. पाचपीरवाडी, ता. गंगापूर), निलेश कपुरसिंह जोनवाल (वय २३, रा. डोंगरगाव, ता. फुलंब्री), पवन कचरू नलावडे (वय २२, रा. गेवराईवाडी) व दत्ता कडुबा नलावडे (वय २२, रा. आपत भालगाव, ता. औरंगाबाद) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या रुममधून पोलिसांनी एक लॅपटॉप, सहा मोबाइल, कार्ड रीडर, ब्लू टूथ डिवाइस, मायक्रोफोन, परीक्षेसंदर्भातील पुस्तके, हॉलतिकीट, प्रश्नपत्रिका आदी साहित्य जप्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरेंनी बदलला मार्ग; शिवसैनिकांची धावाधाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विमानतळातून बाहेर पडण्याचा मार्ग ऐनवेळी बदलल्याने त्यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या शिवसैनिकांना भेटीसाठी धावपळ करावी लागली. त्यावेळी शिवसैनिकांना सुरक्षा जवानांनी रोखल्याने किरकोळ वादावादी झाली. हा प्रकार रविवारी चिकलठाणा विमानतळावर घडला.
कन्नड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विमानतळावर आगमन झाले. ते दुपारी तीन वाजता येणार असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक चिकलठाणा विमानतळावर उपस्थित होते. विमानतळाच्या नेहमीच्या प्रवेशद्वारासमोर महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, भाविसेचे राज्य निमंत्रक राजेंद्र जंजाळ यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांना आगमनानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी विमानतळावर फ्रेश होऊन जाण्याचे सूचवले. ठाकरे काही मिनिटात फ्रेश होऊन निघाले. त्यांना शिवसैनिक थांबलेल्या प्रवेशद्वाराऐवजी दुसऱ्या प्रवेशद्वारे नेण्यात आले यामुळे स्वगतासाठी थांबलेल्यांना दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे धावावे लागले. त्यांना सुरक्षा जवानांनी अडविण्याचा प्रयत्न करत असताना काही शिवसैनिकांची वादावादी झाली. यावेळी राज्यमंत्री अर्जून खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कनेते विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images