Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेशीम शेतीतून हमखास उत्पन्न

$
0
0

फुलंब्री : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला रेशीम शेतीची जोड द्यावी. हा हमखास मासिक उत्पन्न देणारा उद्योग असल्याचे प्रतिपादन जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक एम. पी. साळुंके यांनी सोमवारी पिंपळगाव गंगादेव येथे केले.

महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे रेशीम संचालनालय, जिल्हा रेशीम कार्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातर्फे जिल्ह्यात महारेशीम अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान एक नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सोमवारी तालुक्यातील पिंपळगाव गांगदेव येथे महारेशीम अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी साळुंके म्हणाले की, रेशीम शेती उत्तम शेती तर आहेच, त्याबरोबर हा पर्यावरण पूरक व्यवसाय आहेे. रेशीम शेती केल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक प्रगती नक्की होईल. रेशीम शेतीची कास धरा, ल‌क्ष्मी येई तुमच्या घरा.

यावेळी समतादूत शाम गरूड यांनी, तरुणांनी रेशीम शेतीकडे वळण्याचे असे आवाहन केले व त्यांनी रेशीम शेतीच्या शासकीय योजनांविषयी माहिती दिली. यावेळी रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी सरपंच गणेश काळे, चेअरमन पंढरीनाथ काळे, लक्ष्मण काळे, अंबादास गायके, संदीप थोरात, ज्ञानेश्वर वाघ, रमेश दहिहंडे, रामू काळे, अप्पा काळे, जगदिश लोखंडे, रमेश थोरात यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेगळ्या राज्याचा अजेंडा शिवसेनेमुळे मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यात काही पक्ष-संघटना वेगळ्या विदर्श व मराठवाडा राज्याची भाषा करतात, पण फक्त शिवसेनेमुळे हा अजेंडा मागे पडला आहे, असे शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. याशिवाय कर्जमुक्तीचा निर्णय व जीएसटीच्या बदल्यात सर्व महापालिकांना थेट निधी मिळवून देण्याचा निर्णय केवळ शिवसेनेमुळेच झाल्याचा दावा त्यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मराठवाडा हे महाराष्ट्राचे हृदय असल्याचे सांगत आमदार डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, काही पक्षांचा विदर्भ वेगळा करण्याचा अजेंडा होता, दबक्या आवाजात मराठवाडाही वेगळा करण्याची मागणी होती. मात्र सध्या हे प्रकरण शिवसेनेमुळे बॅकफूटवर गेले आहे. जीएसटी लागू करताना महापालिकांना थेट निधी मिळावा, अशी भूमिका शिवसेनेने प्रत्येक सभागृहात लावून धरली. कर्जमुक्तीच्या मागणीबद्दल ‘देता की जाता’ अशी भ‌ूमिका घेतली. यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला. आम्ही सत्तेत असलो तरी जनतेशी बेईमानी केली नाही, असे त्यांनी सांगितले. कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नसल्याबद्दल त्या म्हणाल्या, या विषयावर कृषीमंत्र्यांशी संवाद होत असला तरी एकूणच कृषी विभागाच्या कामांची अंमलबजावणी होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेससोबत पक्षाचे मतभेत असल्याचे सांगत, ममता बॅनर्जी यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होत्या याकडे लक्ष वेधले. प्रत्येक चार ते सहा महिन्यांत राजकीय परिस्थितीत बदलते. २०१९ पर्यंतही परिस्थितीत बदल होऊ शकतो, असे सांगत राणे यांचा विषय नगण्य असल्याचे सांगत त्यावर अधिक बोलणे डॉ. गोऱ्हे यांनी टाळले.

फोन सुरू करा

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील सुसंवाद, समन्वयाला प्राधान्य द्यावे, असे सांगत अनेक कार्यालयातील बंद असलेले फोन महिन्याभरात सुरू करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषद विशेषाधिकार समितीच्या बैठकीत दिले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे दोन्ही घटक विकासकामे करतात. त्यामुळे त्यांच्यात सतत सकारात्मक संवाद महत्त्वाचा आहे. विविध विभागांकडे प्राप्त लोकप्रतिनिधींच्या पत्रांना सात दिवसांत पोच देऊन योग्य ती कार्यवाही दोन महिन्यांत करून अहवाल द्यावा, असे त्यांनी सांगितले.

थकीत अनुदान मिळवून देऊ

विधानसभा विशेष हक्क समितीच्या प्रमुख, आमदार नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी पालिकेत बैठक घेतली. शासनाकडे पालिकेचे थकीत अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, त्याबाबत प्रशासनाने सविस्तर अहवाल द्यावा, असे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार गोऱ्हे सायंकाळी साडेचार वाजता पालिकेत दाखल झाल्या. त्यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. पालिकेच्या कोणत्या विभागाचे किती अनुदान शासनाकडे थकीत आहे, शासनस्तरावर काय प्रयत्न केले, याची विचारणा त्यांनी केली. शासनानकडे थकित अनुदानाची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. शिक्षण विभागाचे ८३ कोटी, तसेच आरोग्य व इतर विभागांचेही अनुदान शासनाकडे अनेक वर्षांपासून थकीत आहे. याबाबत सविस्तर अहवाल, कागदपत्रे पाठवावेत हा निधी मिळविण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीदरम्यान वारंवार माइक बंद पडत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे भरण्यासाछी जेट पॅचर मशीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी गेल्यावर्षी जेट पॅचर मशीनचे प्रात्यक्षिक राज्यभर दाखवण्यात आले होते. यंदा ही कामे करण्यासाठी राज्यात औरंगाबाद, नांदेड आणि नाशिक येथे जेट पॅचर मशीनचा वापर करण्यात येत आहे. एकेका टप्प्यात १५ किलोमीटर रस्त्यावरील खड्डे भरण्याची क्षमता या यंत्रात असल्याने कामे अधिक सोपी होणार आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न राज्यात सध्या गाजत आहे. पावसाळ्यानंतर लगेच खड्डे भरणे अपेक्षित असताना कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे अनेक विभागातील कामे थांबली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे राज्यभर फिरून जिल्हानिहाय कामांचा आढावा घेत आहेत. खड्डे भरण्यासाठी पीडब्ल्यूडीकडून जेट पॅचर या मशीनचा उपयोग करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पाटील यांनी औरंगाबाद दौऱ्यात केले होते. जेट पॅचर मशीनमुळे रस्त्यांवरील खड्डे भरण्यास अधिक सुलभता येणार असून १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे भरणे शक्य होणार आहे. भविष्यात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर निघणार असून मशीनमुळे खर्चाची बचत होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते.
राज्यात औरंगाबाद, नांदेड आणि नाशिक या तीन ठिकाणी जेट पॅचर मशीन आणले असून त्याद्वारे कामे सुरू झाली आहेत. औरंगाबाद ते शिऊर बंगला रस्त्यावरील कामांसाठी या मशीनच उपयोग केला जात आहे.

असे चालते काम

जेट पॅचर मशीनच्या सहाय्याने हवेचा दाब देऊन खड्ड्यातील धूळ काढून प्रेशरने डांबर सोडले जाते. त्यावर हॉटमिक्स पद्धतीने मटेरिअल ओतून सफाईदारपणे खड्डा बुजविला जातो. या यंत्रणेद्वारे एवढे प्रेशर निर्माण केले जाते की खड्ड्यातील मटेरिअल आपसूकच एकसंध होऊन जाते. खडी, डांबर उखडू नये, यासाठी त्यावरून रोलर फिरविले की खड्डा बुजतो. प्रमुख राज्य महामार्ग, रहदारीचे रस्ते याच्या डागडुजीच्या वेळी अनेक अडचणी येतात. प्रसंगी वाहतूक थांबवून खड्डे बुजविले जातात. आता या मशीनचा वापर केला तर कामात दर्जा टिकेल आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, असा दावा पीडब्युडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसासाठी ‘रास्ता रोको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
उसाला ७० -३० या तत्त्वाप्रमाणे किंवा ३१०० रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन करणारे ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे. कृती समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी पैठण-शेवगाव रस्त्यावर सुमारे पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. आमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.
उसाला ३१०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळावा या व अन्य मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून पैठण शेवगाव रस्त्यावर पैठण व शेवगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कृती समिती वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे. पैठण, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, पाथर्डी, अंबड तालुक्यातील साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने सोमवारपासून कृती समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पैठण - शेवगाव रस्त्यावरील पाटेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले.
रास्ता रोको आंदोलनाला दुपारी एकच्या सुमारास सुरुवात करण्यात आली. आंदोलन सायंकाळी सहापर्यंत सुरूच होते. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम्ही गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन करत आहोत. आंदोलनादरम्यान काही साखर कारखान्याच्या प्रतिनिधिनी आम्हाला तोंडी आश्वासने दिली आहेत, मात्र ती पूर्ण होत नसल्याचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत किंवा ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ऊस उत्पादक शेतकरी चंद्रकांत झारगड यांनी दिली.
या आंदोलनात माउली मुळे, चंद्रकांत झारगड, ‘स्वाभिमानी’चे पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अमरसिंह कदम, पुणे शहर युवा अध्यक्ष दुष्यंत जगताप, जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, राजपाल लिबिकाई, वसंत चोरमले, नवनाथ मुंडे, अमोल कानडे, राजेंद्र झारगड, पवन शिसोदे, खलील पठान, गणेश खेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

काय आहे ‘७० - ३० तोडगा’
साधारणतः एक टन उसापसून एक क्विंटल साखरेचे उत्पादन होते, असा ढोबळ अंदाज आहे. ७- - ३० तत्त्वानुसार साखरेच्या बाजार भावाच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या एक टन उसाला द्यावी. ऊस उत्पादक शेतकरी या तत्त्वानुसार उसाच्या भावाची मागणी करत आहे.

पैठण, शेवगाव व नेवासा तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखाने लूट करत आहे. ही लूट थांबवण्यासाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या शेतकऱ्यासोबत आंदोलनात सहभागी झाली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार.
- प्रकाश बालवडकर, अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना, पश्चिम महाराष्ट्र, अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळालेले जोडपे पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्नाची फूस लावून १४ वर्षांच्या मुलीला पळवून आणणाऱ्या २१ वर्षांच्या तरुणाला सिडको एमआयडीसी पोलिसांनी मुलीसह ताब्यात घेतले. सिडको बसस्टँड परिसरात रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. या मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल असून, दोघांना सोमवारी सकाळी बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सिडको बसस्टँडच्या आवारात रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास एक अल्पवयीन मुलीसह एक तरुण बसलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी दोघांनी संशयास्पद उत्तरे दिली. नागरिकांनी ही माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप शिंदे यांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी तरुणाचे नाव गुलाब अजबराव साळवे (वय २१, रा. सावित्रीबाई फुलेनगर, बुलडाणा) असल्याची माहिती समोर आली. बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी चौकशी केली असता, आरोपी गुलाबवर अल्पवयीन तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.

बुलडाणा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईकरमेश लक्ष्मण वाघ व महिला पोलिस सुवर्णा अरुण गोलांडे हे सोमवारी सकाळी शहरात दाखल झाले. आरोपी गुलाबसह या अल्पवयीन मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चों की दुनियात रमतात उर्दू भाषक विद्यार्थी

$
0
0

औरंगाबादः केंद्रीय मनुष्यबळ वि‌कास मंत्रालयातंर्गत येणाऱ्या उर्दू भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ‘बच्चों की दुनिया’ हे मासिक प्रकाशित केले जाते. या मासिकाचा राज्यात सर्वाधिक खप औरंगाबाद जिल्ह्यात असून दर महा सात हजार प्रति विकल्या जातात. ‘बच्चों की दुनिया’ या मासिकाची उर्दू भाषक विद्यार्थ्यांना गोडी लागली आहे.
मिल्लत शाळेत शिकणारी मरियम जमिला प्रत्येक महिन्याला ‘बच्चों ‌की दुनिया’ची वाट पाहते. अशीच स्थिती इब्तेसाम नूर खानची सुद्धा आहे. तिला या मासिकाने लळा लावला आहे. नॅशनल कॉन्सिल फॉर प्रमोशनतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या या मासिकात प्रामुख्याने वैज्ञानिक शोधांची सविस्तर माहिती असते. शिवाय त्या त्या महिन्यातील देशातील सर्वाधिक मोठ्या सणाची माहिती, तो का साजरा केला जातो, हे सांगितलेले असते. त्यात रमजान ईद, बकरी ईदपासून दिवाळी, दसरा, होळी आणि केरळ राज्यातील कोलम सणाचीही माहिती देण्यात आलेली आहे. याशिवाय चित्रकला, गणित आणि इतर विषयांवरील लेख असतात. यामुळे हे मासिक मुलांसाठी वाचनीय ठरले आहे.
या मासिकाची शहरातील विक्री मिर्झा वर्ल्ड बुक सेंटरचे मिर्झा कय्यूम नदवी हे करतात. ते म्हणाले, शहरात २०१३मध्ये या मासिकाचा खप फक्त ५० होता. शहरातील उर्दू शाळांत जाऊन त्याची माहिती दिल्यानंतर हा खप यावर्षी सात हजारांपर्यंत वाढला आहे. मालेगावमध्ये पाच हजार प्रति विकल्या जातात. शिवाय राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत औरंगाबादेतील मुलांनी या मासिकाला जादा पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.

५७ हजार प्रतिंचे वाटप

‘बच्चों की दुनिया’ या मासिकाच्या विक्रीबद्दल माहिती अधिकारातून विचारणा करण्यात आली. त्यानुसार, ५७,७०० प्रती छापल्या जातात. त्यापैकी ५५ प्रति महाराष्ट्रात विकल्या जातात. त्यापैकी ५० हजार प्रति औरंगाबादमधून मराठवाड्यातील आठ जिल्हे, खान्देश आणि विदर्भात पाठवली जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंजाब विजयाच्या उंबरठ्यावर

$
0
0

पंजाब विजयाच्या उंबरठ्यावर
महाराष्ट्राची स्थिती बिकट; दुसऱ्या डावात ९ बाद १८९

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पंजाबचा संघ २३ वर्षांखालील सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पंजाबने दुसऱ्य डावात ३३० धावा पहिल्या डावातील आघाडीसह महाराष्ट्रासमोर विजयासाठी ४३३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सोमवारी तिसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राची अवस्था दुसऱ्या डावात ९ बाद १८९ अशी झाली आहे. मंगळवारी सामन्याचा अखेरचा दिवस असून पंजाबला विजयासाठी केवळ एका विकेटची गरज आहे.
एडीसीए मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पंजाबने दुसऱ्या डावात ३३० अशी भक्कम धावसंख्या उभारली. पंजाबच्या निखिल चौधरीने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावत डावास आकार दिला. कर्णधार करण कैला (३६), अकुलप्रताप पांडव (नाबाद ५५), अर्पित पन्नू (३८) यांनी चिवट फलंदाजी करून महाराष्ट्राच्या गोलंदाजांची कठीण परीक्षा घेतली. अर्पित पन्नू व अकुलप्रताप पांडव या तळाच्या फलंदाजांनी नवव्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. महाराष्ट्रातर्फे जगदीश झोपे व शुभम कोठारी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
पंजाबकडे पहिल्या डावात १०२ धावांची आघाडी असल्याने महाराष्ट्रासमोर विजयासाठी ४३२ धावांचे आव्हान होते. दुसऱ्या डावातही महाराष्ट्राचे फलंदाज अपयशी ठरले. पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावणाऱ्या निखिल नाईकला दुसऱ्या डावात सलामीला पाठवण्यात आले. त्याने हा विश्वास सार्थ ठरवताना ७६ धावांची खेळी केली. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला समर्थपणे साथ मिळू शकली नाही. जय पांडे (८) हा लवकर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार विजय झोल (२६), प्रशांत कोरे (१२) हे भरवशाचे फलंदाज तंबूत परतले. कर्णधार करण कैलाने झोलला पायचित टिपून यजमानांना मोठा धक्का दिला. या धक्क्यातून महाराष्ट्र संघ अखेरपर्यंत सावरू शकला नाही. अर्पित पन्नूने प्रशांत कोरेला १२ धावांवर बाद केले. शमशुझमा काझी (२४), ऋषिकेश काळे (२४) यांनी काही षटके झुंज दिली. उसामा पारकर (०), शुभम कोठारी (०), जगदीश भराडे (४), पियूष साळवी (१०) हे फलंदाज एका पाठोपाठ बाद झाल्याने ४ बाद १५२ या धावसंख्येवरून महाराष्ट्राची अवस्था ९ बाद १७० अशी झाली. खेळ थांबला, तेव्हा महाराष्ट्राच्या ९ बाद १८९ धावा झाल्या होत्या. विजयासाठी महाराष्ट्राला आणखी २४४ धावांची गरज असून महाराष्ट्राचा अवघा एक फलंदाज बाकी आहे.
पंजाबतर्फे अकुलप्रताप पांडवने ४ विकेट्स घेऊन महाराष्ट्र संघाची दाणादाण उडवून दिली. महाराष्ट्र संघास स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी या सामन्यात निर्णायक विजयाची गरज होती. मात्र, त्यांच्यावर निर्णायक पराभवाचे सावट आहे.
संक्षिप्त धावफलक ः पंजाब ः पहिला डाव २१६ आणि दुसरा डाव - १०१.४ षटकांत सर्वबाद ३३० (अकुलप्रताप पांडव नाबाद ५५, निखिल चौधरी ५२, अर्पित पन्नू ३८, प्रभज्योतसिंग ३४, सनवीर सिंग २५, तलविंदर सिंग २४, हिमांशू शर्मा २७, करण कैला ३६, जगदीश झोपे ३-६०, शुभम कोठारी ३-१२१, शमशुझमा काझी २-४५) विरुद्ध महाराष्ट्र ः पहिला डाव ११४ आणि दुसरा डाव - ६१ षटकांत ९ बाद १८९ (निखिल नाईक ७६, विजय झोल २६, शमशुझमा काझी २४, ऋषिकेश काळे २४, प्रशांत कोरे १२, जय पांडे ८, निखिल चौधरी २-८, करण कैला १-४६, मनप्रीत सिंग १-२८, अर्पित पन्नू १-४०, अकुलप्रताप पांडव ४-४८).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ कॅम्पस करणार ‘वाय-फाय’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘विद्यापीठ यंत्रणा गतिमान करण्यासाठी पेपरलेस कामकाज सुरू करण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांशी संपर्क साधण्याचे नियोजन आहे. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी विद्यापीठ कॅम्पस ‘वाय-फाय’ करणार आहे,’ असे प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.

कुलसचिवपदी रुजू झाल्यानंतर सोमवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. साधना पांडे रुजू झाल्या आहेत. विधी विभागाच्या विभागप्रमुख असलेल्या पांडे प्रथमच मोठी प्रशासकीय जबाबदारी सांभाळत आहेत. या पदावर महिला कुलसचिव आल्यामुळे कॅम्पसमधील महिला प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना विशेष आनंद झाला. त्यांच्या काही अपेक्षा आहेत. त्यानुसार काही चांगले निर्णय घेणार आहे, असे डॉ. पांडे यांनी सांगितले. विद्यापीठातील प्रशासकीय कामातील शिथिलता नेहमीचा वादग्रस्त विषय आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे, असे पांडे यांनी स्पष्ट केले. ‘एखादे पत्र कॅम्पसमध्ये दोन-तीन दिवस संबंधित व्यक्तीला मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या पद्धतीचा ढिसाळपणा टाळण्यावर भर दिला आहे. सर्व कर्मचारी आणि प्राध्यापकांचा व्हॉटसअॅप ग्रुप तयार करून तातडीने निर्णय कळवण्याचा पायंडा पाडणार आहे. माझ्यामुळे कोणतेही काम खोळंबून राहणार नाही याची काळजी घेईल. सध्या सर्व फाइल्स क्लिअर करीत आहे’ असे पांडे यांनी सांगितले. विद्यापीठाची प्रतिमा उज्ज्वल करण्यासाठी कॅम्पस वाय-फाय करण्यात येणार आहे. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असे त्यांनी सांगितले.

‘क्लिन कॅम्पस ग्रीन कॅम्पस’
या विद्यापीठासारखा निसर्ग सौंदर्याने नटलेला कॅम्पस राज्यातील कोणत्याच विद्यापीठात नाही. अनेकांना त्याचे नेहमी अप्रूप वाटते. कॅम्पसचे वेगळेपण टिकवण्यासाठी ‘क्लिन कॅम्पस ग्रीन कॅम्पस’ संकल्पना राबवणार आहे. सर्वांचा सहभाग असल्यास कॅम्पस अधिक सुंदर होईल’ असा विश्वास डॉ. पांडे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ भाग्यश्री योजना घराघरात पोचावी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कालबाह्य विचारांच्या परिणितीमुळे आजही स्त्रियांवर अत्याचार होतात. वर्तमानातील भांडवलशाहीच्या युगात स्त्रीचा सुद्धा वापर होतो. अशावेळी माझी कन्या भाग्यश्री योजना सकारात्मक पाऊल असून या योजनेचा प्रचार व प्रसार होणे अत्यंत गरजेचे आहे,’ असे विचार निवृत्त व साहित्यिक ग. ह. राठोड यांनी व्यक्त केले. ते सोमवारी मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे महिला व बालविकास आयुक्त बी. टी. पोखरकर होते. निवृत्त सहआयुक्त महिला व बालविकास जी. आर. शिंदे, अमरावती महिला व बालविकास विभागीय उपायुक्त माधव बोरखडे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर औरंगाबाद विभाग महिला व बालविकास उपायुक्त एम. के. शिरसाट व भगवानबाबा बालिकाश्रमाच्या संचालिका कविता वाघ होत्या. यावेळी माझी कन्या भाग्यश्री या सुधारित योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी राज्यस्तरीय स्पर्धा कार्यक्रम घेण्यात आला. राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचा बहुमान औरंगाबाद विभागाला मिळाला आहे. यावेळी ग. ह. राठोड म्हणाले, ‘शासकीय योजनांचा प्रचार होणे आवश्यक असून स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध प्रत्येक व्यक्तीने संवेदनशील असणे गरजेचे आहे. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध करणे आवश्यक आहे, मात्र आपल्याकडे नेमकी तिची जात पाहली जाते. यासाठी सर्व शिक्षणसंस्था व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. शासनाने अधिक कडक व त्वरित कारवाई करावी,’ असे आवाहन त्यांनी केले.

जी. आर. शिंदे म्हणाले, ‘भाग्यश्री योजना ही संपूर्ण महिला व बालविकास विभागाची जबाबदारी असून, यासाठी संपूर्ण टीम काम करेल तेव्हाच ही योजना तळागाळापर्यंत पोचेल,’ असे आवाहन केले. माधव बोरखडे यांनी योजनेची प्रक्रिया सांगितली. अध्यक्षीय समारोप करताना बी. टी. पोखरकर यांनी शासकीय योजना व कायदे लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही असे विचार व्यक्त केले. यावेळी औरंगाबादसह नाशिक, अमरावती, कोकण, नागपूर, पुणे विभाग सहभागी झाले होते. यामध्ये औरंगाबाद विभागाचे सर्वाधिक २३ स्पर्धक होते. वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य, पथनाट्य, रांगोळी, चित्रकला, चित्ररथ स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये राज्यभरातील स्वयंसेवी संस्था, शाळा,महाविद्यालये सहभागी झाले होते. नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. बाल विकास प्रकल्प अधिकारी हर्षा देशमुख यांनी प्रास्ताविक केले. बाल विकास नागरी प्रकल्प अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती ढेरे, महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद संजय कदम, जिल्हा परीविक्षा अधिकारी विजय देशमुख, दीपक जयवळ, भारत सावंत, गजेंद्र औटी, खुशाल दराडे आदींसह ग्रामीण प्रकल्प कार्यालायने परिश्रम घेतले.
-
भाग्यश्रींचा जयजयकार
-
‘प्रथम बोट धरलेस
मग कडेवर, छातीशी
मग खांद्याला,
अन आता सदैव पाठिशी..."
या शब्दांमध्ये विजय देशमुख यांनी स्वरचित कविता सादर केली. तर, 'स्त्री शक्तीचा विजय असो' असा नारा देत संपूर्ण राज्यातून आलेल्या विद्यार्थीनींनी मोठ्या आत्मविश्वासाने भाग्यश्री योजना व स्त्री हक्कावर परखड भाष्य केले. सावित्रीबाई फुले, जिजाऊ, कल्पना चावला आदींच्या वेशभूषा व मंगळागौरीच्या खेळांद्वारे मांडलेले विषय कौतुकाचे ठरले. योजनेच्या प्रचारासाठी तयार केलेला चित्ररथही तितकाच देखणा होता. भगवानबाबा बालिकाश्रमाच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले.

स्पर्धेतील विजेते
- वक्तृत्व - गायत्री देशमुख(अकोला), वैष्णवी सहस्रबुद्धे(पुणे)
- निबंध - अवंती पवार (कोकण), नेहा गजभिये( नागपूर)
- चित्रकला - गायत्री ढोले (अकोला), सिद्धांत मालुसरे(पुणे)
- घोषवाक्य - सुनयना वाढे ( अमरावती), सविता बागुल (नाशिक)
- रांगोळी - पूनम कंधारकर (जालना)
- चित्ररथ - शिक्षण विभाग, पंचायत समिती रत्नागिरी, कलावती चव्हाण माध्यमिक विद्यालय, औरंगाबाद
- पथनाट्य- कलावती चव्हाण माध्यमिक विद्यालय, औरंगाबाद, शालेय गट रत्नागिरी(मंगळागौर खेळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सैनिकाच्या वारसास पेन्शन देण्याचे आदेश

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
सैन्यात कार्यरत असलेल्या मृत सैनिकाच्या वारसास कौटुंबिक निवृत्ती वेतनाची पूर्ण रक्कम देण्याबाबत चार महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी दिले आहेत. सैनिक विभागाच्या मुख्य अभिलेख अधिकाऱ्यास कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
रेणापूर तालुक्यातील सिंदगाव येथील पूनम गायकवाड या मृत सैनिकाच्या मुलीने याचिका केली होती. याचिकाकर्त्याचे वडील भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना मृत झाले. त्यांच्या मृत्यूनंतर लातूर तालुक्यातील मौजे बोडका येथील जयश्री उर्फ संगिता घाटगे यांनी मृत सैनिकाची दुसरी पत्नी असल्याचा दावा करून स्वत:च्या नावे निवृत्ती वेतनाची पन्नास टक्के रक्कम दरमहा तिच्या नावे मिळत होती. मात्र घाटगे व मृत सैनिकाचे काहीएक संबंध नसल्याने याचिकाकर्ती पूनम आप्पाराव गायकवाड हिने लातूर येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. जयश्री उर्फ संगिता ही याचिकाकर्त्याची सावत्र आई नाही, असे आदेश पारीत करावे अशी विनंती केली. दिवाणी न्यायालयाने २० जानेवारी २०१० रोजी याचिकाकर्त्याचा दावा मंजूर केला. जयश्री उर्फ संगिता ही याचिकाकर्तीची सावत्र आई नाही किंवा त्यांचे कुठलेही नातेसंबंध नाही असे जाहीर केले. पुणे येथील सैनिक विभागाच्या कार्यालयात ११ जानेवारी २०१६ रोजी दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करून कौटुंबिक निवृत्ती वेतनाची पूर्ण रक्कम याचिकाकर्तीस देण्याची विनंती केली. मात्र यावर कसलीच कार्यवाही झाली नसल्याने त्याविरोधात खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. खंडपीठाने याचिकाकर्तीस पेन्शन देण्यासंबंधी आदेश दिले. पूनमची बाजू डी. बी. पवार-पाथरेकर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातांचा अनियंत्रित मधुमेह शिशुंच्या मुळावर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशातील ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंतच्या गरोदर मतांमध्ये नऊ ते २२ टक्क्यांपर्यंत मधुमेहाचे प्रमाण आढळून आले आहे. गरोदर मातांमधील अनियंत्रित मधुमेहामुळेच जन्माला येणाऱ्या शिशुंमध्ये तब्बल २५ ते ३० टक्क्यांपर्यंत व्यंगत्व राहू शकते, असेही सिद्ध झाले आहे. त्यामुळेच मधुमेहापासून दूर राहा, बालवयापासून स्थूलत्वाशी काडीमोड घ्या, असा सल्ला शहरातील तज्ज्ञांनी दिला आहे.

केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मधुमेहाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच जागतिक मधुमेह दिनाची यंदाची संकल्पना ही महिलांचे आरोग्य व मधुमेह अशी जाहीर करण्यात आली आहे. ‘इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन’नुसार दहापैकी एका महिलेला मधुमेह आहे आणि सद्यस्थितीत जगातील १९९ दशलक्ष महिलांना मधुमेह असून, २०४० पर्यंत ३१३ दशलक्ष महिलांना मधुमेह होण्याचा धोका आहे. त्याचवेळी पाच मधुमेही महिलांपैकी प्रजननक्षम वयातील दोन महिलांना म्हणजेच जगातील ६० दशलक्ष महिलांना मधुमेह असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या संदर्भात शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्त्रीरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, गरोदरपणामध्ये महिलांना जडणाऱ्या मधुमेहाला ‘जेस्टेशनल डायबेटिस’ (जीडीएम) म्हटले जाते आणि तमिळनाडूमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, ग्रामीण भागात ‘जीडीएम’चे प्रमाण हे नऊ ते १२ टक्के, निमशहरी भागांमध्ये १२ ते १८ आणि शहरी भागांमध्ये १८ ते २२ टक्क्यांपर्यंत आढळून आले आहे; म्हणजेच देशातील नऊ ते २२ टक्के गरोदर मातांना मधुमेह असल्याचे पुरते सिद्ध होते व पुढच्या पाच वर्षांत हेच प्रमाण दुपटीने वाढण्याची भीती आहे. घाटीच्या अभ्यासात ‘जीडीएम’चे प्रमाण १०.२ टक्के इतके आढळले आहे. त्याचबरोबरच गरोदर मातांचा मधुमेह नियंत्रणात राहिला तर जन्मलेल्या तीन शिशुंमध्ये व्यंगत्व राहू शकते आणि मातांचा मधुमेह अनियंत्रित राहिला तर व्यंगत्वाचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. मातांमधील मधुमेहामुळेच मुदतपूर्व प्रसुती, गर्भपात होऊ शकतो. त्यामुळेच देशातील सर्व शासकीय-खासगी रुग्णालयांमध्ये ‘जीडीएम’च्या व्यवस्थापनाची मार्गदर्शकतत्वे जाहीर झाली असली तरी त्या मार्गदर्शकतत्वांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची वस्तुस्थिती आहे, असेही डॉ. गडप्पा म्हणाले.

१४० पेक्षा जास्त रक्तशर्करा निदर्शक
मार्गदर्शकत्वांनुसार गरोदरपणातील रक्तशर्करा १४० पेक्षा जास्त असेल तर ‘जीडीएम’ व २०० पेक्षा जास्त असेल तर संबंधित गरोदर मातेला थेट मधुमेह असल्याचे स्पष्ट होते. एका छोट्या चाचणीमध्ये हे स्पष्ट होते व घाटीमध्ये ही चाचणी होते. संबंधित गरोदर मातेला ‘जीडीएम’ असेल किंवा महिला थेट मधुमेही असेल तर त्याचे वैद्यकीय व्यवस्थापन वेगवेगळे करावे लागते व योग्य औषधोपचारांमुळे जन्मणाऱ्या शिशुंमधील व्यंगत्व मोठ्या प्रमाणावर रोखता येऊ शकते, असेही डॉ. गडप्पा यांनी ‘मटा’ला सांगितले.

…तर कावीळ, हृदयरोग, मेंदूविकार
मधुमेही गरोदर मातांमुळे किंवा गरोदर मातांचा मधुमेह अनियंत्रित राहिल्यास शिशुंना ‘हायपोग्लॅसेमिया’, दुखपती, बोन फ्रॅक्चर, हृदयरोग, कावीळ होऊ शकतो, असे निओनॅटॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. देशमुख म्हणाले. मधुमेही मातांमुळे जन्मलेल्या शिशुंचे वजन जास्त असते व त्यांच्यामध्ये फुफ्फुसांचे विकार उद्भवू शकतात. कॅल्शिम-साखरेच्या असंतुलनामुळे मेंदुला धोका निर्माण होऊन झटकेही येऊ शकतात, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे म्हणाले.

स्थुलत्व, मधुमेहावर मात
बालवयापासूनच वजन नियंत्रणात राहिले, स्थलत्वावर मात करता आली तर मधुमेहापासून दूर राहता येऊ शकते, असे आंतरग्रंथीविकारतज्ज्ञ डॉ. हेमंत फटाले म्हणाले. स्थुलत्वामुळेच अलीकडे ‘पीसीओडी’चे प्रमाण खूप वाढले असून, स्थुलत्वामुळेच भविष्यात मधुमेह होण्यासह उच्चरक्तदाब, हृदयरोग, सांधेदुखी व इतर अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात, असे मधुमेहविकारतज्ज्ञ डॉ. संजीव इंदूरकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महती नेहरूंची

$
0
0

देशाच्या उभारणीमध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान मोठे आहे. नेहरू यांची आज (१४ नोव्हेंबर) जयंती, त्यानिमित्त...

महात्मा गांधी यांनी ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालियां टँक मैदानावर ब्रिटीश सरकारला ‘चले जाव’ चा निर्वाणीचा इशारा दिला. यावर्षी या आंदोलनाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईच्या गवालियां टँकवर सरकारने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या ‘चले जाव’ आंदोलनातील योगदानाबद्दल कृतज्ञतापूर्वक आवर्जून उल्लेख करण्यात आला. मात्र, दोन्ही नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा नामोल्लेख करण्याचे हेतूपुरत्सर टाळले. वास्तवात, ‘चले जाव’चा ठराव पंडित नेहरूंनी मांडला व सरदार पटेल यांनी ठरावाला अनुमोदन दिले. तरीही वर्तमानकाळातील सत्ताधाऱ्यांनी ‘नेहरू’ यांच्या ऑगस्ट क्रांतीमधील योगदानाबद्दल बोलण्याचे टाळले. असे असले, तरीही इतिहासातून नेहरू यांचे नाव पुसले जाणार आहे का, हा प्रश्न समोर येतो.

नेहरू यांनी पंतप्रधान असताना मुस्लिमांचे तुष्टीकरण केले आहे, असा प्रमुख आरोप त्यांच्यावर आहे. नेहरू यांच्या कृतीशील विचारामुळे आणि धर्मनिरपेक्ष वैचारिक अधिष्ठानामुळे हिंदूराष्ट्र निर्माण होऊ शकले नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. घडला नाही तोच इतिहास, अशी आता इतिहासाची नवी व्याख्या झाली आहे.

ब्रिटिशांनी ५६० संस्थानिकांचा तिढा कायम ठेवून देश हवाली केला आणि अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले. हिंदू-मुस्लिमांमधील तणाव, दारिद्य्र, निरक्षरता, अन्नधान्याचे दुर्भिक्ष्य, पायाभूत सुविधांचा अभाव आणि बाल्यावस्थेतील स्वातंत्र्यावर टपून असलेली बडी राष्ट्रे असा असंतोषाचा ज्वालामुखी धगधगत असताना, आधुनिक भारताची निर्मिती करणे अवघड होते. त्यासाठी दूरदृष्टी आणि बौद्धिक चातुर्य असावे लागते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नवराष्ट्राची बांधणी करताना राजकीय सत्तेचा सामाजिक पाया विस्तारित केला. नेहरू या नेत्याचे द्रष्टेपण यामध्ये असे होते की, देशाच्या विकासाची लांब पल्ल्याची धोरणे आखताना लोकजागरण आणि लोकप्रबोधन झाले. समकालीन परिस्थितीचे पूर्वग्रह विरहित प्रामाणिक आकलन असल्याशिवाय आपल्याला नेहरू समजणार नाहीत. त्यांची ग्रंथसंपदा वाचल्यावर त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य परंपरा यांची केलेली चिकित्सा वाचल्यावर स्वतंत्र विचाराचा चिंतक अनुभवायला येतो. भारतातील लोकशाही राज्यव्यवस्था प्रभावीपणे आगेकूच करीत आहे. त्याचे सर्व श्रेय नेहरूंना जाते.

त्यांच्या काळात पायाभूत, महत्त्वाचे उद्योग सार्वजनिक क्षेत्रात उभे केले. १९५६ सालापासून आर्थिक धोरण आखताना स्वावलंबन हे सूत्र स्वीकारले. सिंचनाच्या क्षेत्रात भाक्रा-नांगल, दामोदर, हिराकुंड, कोयना यासारखी भव्य धरणे आणि जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केले. १९५९ साली नेहरूंनी थोर वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली अणु व अवकाश संशोधनाला दिशा दिली, आयआयटीची स्थापना करण्यात आली. नेहरूंनी देशात विज्ञाननिष्ट दृष्टिकोन रुजवला. त्यांनी कधीही वैज्ञानिकापुढे अश्मयुगातील प्लास्टिक सर्जरी अगर रामायण कालखंडातील पुष्पक विमानाचा गौरव केला नाही.

१५ ऑगस्ट १९४७ ला लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाचे पहिले भाषण करताना ते म्हणाले, मध्यरात्री सारे जग झोप घेत असताना भारतात स्वातंत्र्याचा सूर्योदय होत आहे. प्रत्येक भाषणात ‘हमें क्या करना हैं’ याची जंत्रीच श्रोत्यांपुढे ठेवीत. नरहर कुरुंदकरांच्या शब्दांत ‘इतिहास नेतृत्व निर्माण करतो आणि नेतृत्व इतिहास घडविते’ या अर्थाने नेहरू इतिहासाचे अपत्य होते.

प्रा. उत्तम सूर्यवंशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ६४ घरांतील अकरा वर्षांच्या वजिराची गगनभरारी!

$
0
0

Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
Tweet : @SudhirbMT

औरंगाबाद : शाळेतला अभ्यास शाळेतच आणि घरी आल्यावर बुद्धिबळचा सराव अशी दैनंदिनी ठेवत ११ वर्षीय तनीषा बोरामणीकरने राज्य विजेतेपद पटाकावले आहे. भारतीय संघातून आशियाई यूथ आणि जागतिक यूथ बुद्धिबळ स्पर्धेतही तिने दाखविलेली चमक कौतुकास्पद आहे.

क्यूट डकलिंग्स पब्लिक स्कूलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असणाऱ्या तनीषाला प्रारंभी नृत्य आणि चित्रकलेची आवड होती. भाऊ जतीनमुळे ती बुद्धिबळ खेळू लागली आणि अल्पावधीतच बुद्धिबळाच्या डावपेचांत माहिर झाली. उझबेकिस्तान, मंगोलिया, जॉर्जिया व दर्बन (दक्षिण आफ्रिका) या देशांमध्ये झालेल्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तनीषाला मिळाली आहे. सात वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिने जेतेपद मिळविले आहे. अलीकडच्या काळात तनीषाने तीन राज्य बुद्धिबळ स्पर्धांमध्ये डावपेचांनी गाजवल्या. जालन्यात झालेली राज्य बुद्धिबळ स्पर्धा तिने जिंकली. पुण्यात झालेल्या तेरा वर्षांखालील राज्य बुद्धिबळ स्पर्धेतही अजिंक्यपद पटाकावले. अकोला येथे झालेल्या राज्य स्पर्धेत तिने तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत ती अखेरपर्यंत अपारजित राहिली हे विशेष. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतही तिने दोनदा उपविजेतेपद संपादन केले आहे.

पुण्यात २२ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या अकरा वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेची तयारी तिने कसून केली आहे. त्यासाठी मुंबईत ग्रँडमास्टर आर. बी. रमेश यांच्याकडे आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतले आहे. तिला नियमितपणे सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन असते. तसेच कम्प्युटरवर तनीषा नियमित बुद्धिबळाचे डाव खेळते आणि त्याचे विश्लेषणही करते. याचा तिला विविध स्पर्धांमध्ये फायदा झालेला आहे.

बुद्धिबळ आणि अभ्यास यात दोन्ही गोष्टींमध्ये तनीषा आघाडीवर आहे. इतिहास, विज्ञान व गणित हे तिचे आवडीचे विषय आहेत. अभ्यास आणि बुद्धिबळ याचे ती कधीही टेन्शन घेत नाही. शाळेतच अभ्यास पूर्ण करते आणि घरी आल्यावर पूर्णवेळ बुद्धिबळाला देते. तिने ट्युशन कधीही लावलेली नाही. असे असले तरी तिने गतवर्षी पाचवीत ९८ टक्के गुण मिळवले. एक आवड म्हणून ती बॅडमिंटनही खेळते. मोबाइल व टीव्हीवर काही कार्यक्रम ती आवडीने पाहते, परंतु अधिक वेळ ती संगणकावर बुद्धिबळ खेळण्यात घालवणे पसंत करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्काराच्या ‘शिदोरी’ची रौप्य महोत्सवी वाटचाल

$
0
0



विजय कमळे, जालना
शालेय विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या हेलस (ता. मंठा) येथील चळवळ आता रौप्य महोत्सवाच्या टप्प्यावर पोहोचली. साने गुरूजींच्या विचारांची प्रेरणा घेत हेलस येथे सुरू करण्यात आलेले अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचे बालसंस्काराच्या या चळवळीतून अनेक विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी मिळाली असून, ही वाटचाल अशीच पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. संस्कार वर्ग, वसा शिक्षणाचा, सुसंस्कारित व्हा अभियान, साने गुरूजी पुरस्कार यांसह विविध उपक्रमातून कार्य चालू आहे.
मंठा तालुक्यातील हेलस येथे १९९४मध्ये दिवंगत शिक्षक दत्तात्रय हेलसकर यांनी जन्मगावी साने गुरूजी कथामाला शाखेची स्थापना केली होती. अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेच्या ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे तत्कालीन झालेल्या एका वार्षिक अधिवेशनात हेलसकर गेले होते. यदुनाथ थत्ते यांची स्वाक्षरी घेण्यासाठी पुढे गेलेल्या हेलसकरांना साने गुरूजी कथामाला चालवावी, अशी जणू सूचनाच त्यांना देण्यात आली. तेव्हापासून साने गुरूजी कथामाला शाखा सुरू झाली. हेलस गावातील कालिंकादेवी मंदिरात शाखा चालत असत. राजा मंगळवेढेकर, प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या प्रेरणेने दुर्गाताई कुलकर्णी यांच्या हस्ते शाखा सुरू झाली होती. वसा शिक्षणाचा, बालमेळावा, दर्पण दिन, सामान्य ज्ञान स्पर्धा, गुणवत्तेचा गौरव, कथाकथन, सुसंस्कारित व्हा अभियान, संस्कारवर्ग, आपद्ग्रस्तांना मदत आदी उपक्रम शाखेच्या वतीने सातत्याने चालविले जातात.
कथामाला शाखेने बालकांसाठी २००५मध्ये मराठवाडाभर शाहीर भारत मुंजे यांचा जनजागृती कार्यक्रम ११८ शाळांमधून १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. संस्कार वर्ग ही गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने कथाकार सतीश कुलकर्णी चालवित आहे. कथामाला शाखेने १९९८पासून सामान्य ज्ञान स्पर्धा सातत्याने घेण्यात येत होती. हेलस येथे बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी २००० मध्ये सातशे विद्यार्थ्याचा बालमेळावा ही शाखेने घेतला होता. कथामाला शाखेने अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर मराठवाड्यात संस्काराचा जागर कार्यक्रम ४२ दिवस चालविला होता. यात श्यामची आई या संस्काररूपी ग्रंथातील कथांचे सामूहिक अभिवाचन करण्यात आले होते.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कथामालेच्या वतीने बालमहोत्सव, मराठवाडा विभागीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, आंतरभारती कविसंमेलन, ज्ञानप्रकाश यात्रा, एक सूर एक ताल, अभिनय-संवाद स्पर्धा, चित्रप्रदर्शन, कथाकथन, बालवीर पुरस्कार आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू झालेले कथामालेचे कार्य अनेक वर्षापासून दत्तात्रय हेलसकर हे अनेक संकटांवर मात करीत उपक्रम घेत असत. स्वत: आर्थिक भार सहन करीत कुठलेली शासकीय अनुदान न घेता चाललेली ही बालकांसाठीची चळवळ प्रेरणादायी अशीच म्हणावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिन्सी ठाण्यासमोर जळ‌ितकांड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिन्सी पोलिस ठाण्यासमोर असलेल्या गिरणी मैदानावर मंगळवारी पहाटे आगीत तीन वाहनांसह भंगार साह‌ित्यातील फ्रिज आदी साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकले नसून, जिन्सी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

जिन्सी पोलिस ठाण्यासमोरच गिरणी मैदान आहे. या मैदानातून एक रस्ता संजयनगर भागाकडे जातो. या रस्त्याच्या कडेला येथील स्क्रॅप विक्रेत्यांचे भंगार सामानातील तीस ते चाळीस डीप फ्रिज, फ्रिज ठेवण्यात आले होते; तसेच एक टेंपो, लोडिंग रिक्षा व अॅपे रिक्षा या ठिकाणी उभी होती. पहाटे दोन ते अडीचदरम्यान येथील भंगार साहित्याला अचानक आग लागली. यानंतर तेथील वाहनांनी देखील पेट घेतला. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना व अग्निशमन दलाला माहिती कळविली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग एका तासात आटोक्यात आणली. या आगीत शेख अब्दुल सलीम यांची ६० हजारांची लोडिंग रिक्षा, शेख इम्रान या भंगार व्यवसायिकाचे फ्रिज व इतर भंगार साहित्य, टेम्पो, अॅपे रिक्षा आदी वस्तू जळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी जिन्सी पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या खासगेट येथे चार दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. हा प्रकार देखील पहाटेच घडला होता. या प्रकरणाचा देखील तपास लावण्यात अद्याप जिन्सी पोलिसांना यश आलेले नाही.

आगीचे गूढ कायम
या ठिकाणी कचरा देखील टाकण्यात येतो. परिसरातील मद्यपी, नशेखोर या भागात नेहमीच नशा करण्यासाठी येतात. त्यानी फेकलेल्या थोटकामुळे कचऱ्याला आग लागून ही घटना घडली असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टार्ट-अप वीकएंडचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील विद्यार्थी, बेरोजगार आणि उद्योजक होण्याची आकांक्षा असणाऱ्यांसाठी जीआयझेड व सीएमआयए यांच्यातर्फे औरंगाबादेत एक ते तीन डिसेंबर यादरम्यान स्टार्ट-अप-वीकएंडचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ आणि जीआयझेडचे तसव्वर अली यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

तसव्वर अली म्हणाले, ‘उद्योग सुरू करण्याची कल्पना असणाऱ्यांसाठी स्टार्ट-अप वीकएंड उपक्रम आहे. हा उपक्रम उद्योजकांसाठी खुला आहे. या उपक्रमाची व्याप्ती मोठी असून, डिजिटायझेशन, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आदींसारख्या नवीन तंत्रज्ञानाची कल्पना सक्षम उद्योजकांना द्यावी; तसेच एक उद्योग निर्माण करून तो चालवण्यास त्यांना पाठिंबा, मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्य देता यावे असा प्रयत्न आहे. शहरात यासाठी दोन इन्क्युबेटर्स तयार करण्यात आले आहेच. त्याला जर्मन फेडरल एंटरप्राइज जीआयझेडचे (डॉइश गेझलशाफ्ट) सहकार्य लाभले आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरशी हे संलग्न केले आहे. या दोन्ही संस्था मराठवाड्यातील स्टार्ट-अपला चालना देण्यासाठी, संयुक्तरीत्या स्टार्ट-अप वीकएंडचे आयोजन करीत आहेत.

कोकीळ म्हणाले, ‘हा तीन दिवसांचा कार्यक्रम असेल, शुक्रवारी त्याची सुरुवात होईल आणि रविवारी समारोप होईल. उत्तम कल्पना मांडणीसाठी पुरस्कार सोहळ्यात परितोषिक प्रदान केले जाईल. नाव नोंदणीसाठी व किंवा अधिक माहितीसाठी सीएमआयए कार्यालयाशी संपर्क साधवा. नावनोंदणी २२ नोव्हेंबरपर्यंत करता येईल. हा वीकएंड कार्यक्रम सीएमआयएच्या रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील कार्यालयात होणार आहे. त्यासाठी प्रवेश मर्यादित आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्टःमहिन्यात धावणार झुकझुक गाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडकोतील बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डनमधील मुलांसाठीची रेल्वे येत्या महिन्याभरात सुरू करू, अशी ग्वाही महापौर नंदकुमार घोडेले यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. यासंदर्भात संबंधित विभागाकडून माहिती मागवून अडचण दूर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सिडकोतील बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन हे सिडकोवासींसाठी एक प्रमुख पर्यटनस्थळ झाले आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या उद्यानाची ओळख ऑक्सिजन हब म्हणूनही होत आहे. याच गार्डनमधील टॉय ट्रेन (रेल्वे गाडी) अनेक वर्षांपासून बंद आहे. ही रेल्वे ट्रायल म्हणून काही दिवस धावली, पण त्यानंतर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ती बंद पडली. यासह देखभाल दुरुस्तीअभावी गार्डनची झालेली दुरावस्था याबाबत महाराष्ट्र टाइम्सने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतली. मुलांसाठीची रेल्वे का बंद आहे, अडचण काय आहे, याची माहिती संबंधित विभागाकडून मागवून अडचण तातडीने दूर केली जाईल, येत्या महिन्याभरात रेल्वे सुरू होईल, अशी माहिती त्यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस स्टँडचे रूप बदलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उदगीर शहरातील जुनाट बस स्थानकाकडे अखेर मायबाप एसटी प्रशासनाचे लक्ष गेले. उदगीर बस स्थानकाच्या फेरबांधकाम करण्यासाठी वास्तूविशारदाची (आर्किटेक्ट) नेमणून करण्यात आली आहे. त्यांनी उदगीर बसस्थानकाचे नकाशे एसटी महामंडळाला सादर केले. येत्या वर्षभरात ‌उदगीरसह मराठवाड्यातील २३ महत्त्वाच्या बसस्थानकांची फेरबांधणी करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. त्याचबरोबर ७५ स्थानकाचेही नूतनीकरण करण्याचा निर्णय एसटीने घेतला.

मराठवाड्यात १२२ बसस्थानके आहेत. अनेक बसस्थानकने २० ते ३० वर्षांपूर्वीची आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नूतनीकरण किंवा फेरबांधणीकडे लक्ष देण्यात येत नव्हते. एसटीच्या विविध योजनांतून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील बस स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले. काळ्या झालेल्या टाइल्स, पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती, गळके छत अशी मराठवाड्यातील बस स्थानकांची दुरवस्था झाली आहे.

एसटी प्रशासनाने आता विभागातील बस स्थानकांचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २३ बस स्थानकांची फेरबांधणी केली जाणार आहे. येत्या २० वर्षांत वाढणाऱ्या बसची आणि प्रवाशांची संख्या, त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविध यांचा विचार करून या बस स्थानकांचे नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील २३ स्थानकांसाठी खास आर्क‌िटेक्टची नियुक्ती करण्यात आली आहे.

या २३ बस स्थानकांसह सुस्थितीत असलेल्या, मात्र काही समस्या असलेल्या ७५ बस स्थानकांचे नूतनीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, गंगापूर, फुलंब्री, पाचोड, देवगाव रंगारी, शिऊर, औराळा, करंजखेडा, खुलताबाद आणि शेकटा बस स्थानकांचा समावेश आहे. यातील खुलताबाद आणि शेकटा बस स्थानकांचे काम सुरू करण्यात आले आहे.

२३ मालमत्तांना भिंत
यापूर्वीच्या सरकारने आणि महामंडळाने दुर्लक्ष केल्याने मराठवाड्यातील बहुतांश बसस्थानकांची दुर्दशा झाली आहे. यातील अनेक बसस्थानकांच्या सरंक्षण भिंतीही जमीनदोस्त झाल्या होत्या. याशिवाय अनेक मालमत्ताही उघड्या आहेत. या मालमत्ता आणि स्थानकांच्या सरंक्षणाचेही काम हाती घेण्यात आले आहे. त्यात २३ मालमत्तांचा समावेश आहे.

ही स्थानके होणार चकाचक
- औरंगाबाद ः पैठण आणि सिडको (आगार)
- परभणी ः परभणी, कळमनुरी, वसमत.
- बीड ः बीड, अंबेजोगाई, नेकनुर, आष्टी आणि केज (कामाला प्रारंभ)
- हिंगोली ः हिंगोली, कळमनुरी, वसमत.
- लातूर ः औसा, उदगीर
- नांदेड ः कुंडलवाडी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद (काम सुरू)
- जालना ः मंठा, आष्टी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासूर शाळेची गुणवत्ता ढासळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या लासूर स्टेशन (ता.गंगापूर) प्राथमिक व माध्यमिक शाळेस जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी मंगळवारी दुपारी भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासाळल्याचे त्यांना दिसून आले. इंग्रजीचे स्पेलिंग देखील लिहिता न आल्याचे त्यांना दिसून आले. महिनाभरात गुणवत्तेत सुधारणा करा, असे आदेश अध्यक्षांनी दिले.

अॅड. डोणगावकर यांनी मंगळवारी लासूर स्टेशन (ता.गंगापूर) झेडपी शाळेस भेट दिली. नववी व दहावीच्या वर्गास भेट दिली असता विद्यार्थ्यांना इंग्रजीचे स्पेलिंग लिहिता येत नसल्याचे दिसून आले. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीपासून शालेय पोषण आहार मिळाला नसल्याचे भेटीदरम्यान दिसून आले. माध्यमिक प्रशालेस पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराची चव घेतली असता दर्जा चांगला असल्याचे दिसून आले. शालेय विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवणाऱ्यांविरुद्ध तत्काळ नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश अध्यक्षांनी दिले. राज्य सरकारने निश्चित केलेल्या शतकोट वृक्षलागवड मोहिमेनुसार शालेय स्तरावरील वृक्ष लागवड व संगोपन करण्यात न आल्याचे दिसून आले. शालेय स्तरावरील गुणवत्तेच्या बाबतीत महिनाभरात सुधारणा करा, असे आदेश झेडपी अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी दिले. याप्रसंगी शाखा अभियंता अनिल मुंगीकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर पाणी योजनेचे काम लवकर सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीच्या प्रकरणात तोडगा काढा आणि लवकर काम सुरू करा, अशी सूचना शिवसेना संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना केली आहे. जनतेचे हित लक्षात घेऊन समांतर जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले.
घोसाळकर यांनी मंगळवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते. या भेटीबद्दल घोसाळकर यांनी ‘मटा’ शी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले, आयुक्तांची सदिच्छा भेट घेतली. या दरम्यान काही प्रश्नांवर चर्चा झाली. प्रामुख्याने पाणीपुरवठा योजनेवर चर्चा झाली. समांतर जलवाहिनीच्या प्रकरणात आयुक्तांना आम्ही तोडगा सुचवला आहे, तो तोडगा दृष्टीक्षेपात देखील आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा निधी मिळाला असल्याने या प्रकल्पाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. करारातील अटींचा फेरविचार करून, जनतेचे हित लक्षात घेवून समांतर जलवाहिनीचे काम होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने तोडगाही सूचवण्यात आला आहे. तोडगा काढून लवकर काम सुरू करा, अशी सूचना आयुक्तांना केली आहे.
भूमिगत गटार योजनेचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून ते लवकर पूर्ण करा, अशी सूचना आयुक्तांना केल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.

रस्त्याकडेला नाल्या बांधा

शहरात आता बहुतेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार केले जात असून त्यामुळे रस्त्यांची उंची जास्त व घरे खड्ड्यात अशी परिस्थितीत निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाचे व सांडपाणी घरांत घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्याच्या बाजूने सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या बांधण्याची सूचना आयुक्तांना केली आहे, अशी माहिती घोसाळकर यांनी दिली. शहरातील कोणत्याही रस्त्याशेजारी नाली नाही, हे गंभीर आहे. रस्ता बांधतानाच सर्वात आधी सुरूवातीलाच नाल्या बांधल्या पाहिजेत, हे आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images