Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

न झालेल्या ‘नेटक्या’ प्रतिनियुक्तीची गोष्ट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके मुंबई विद्यापीठात प्रतिनियुक्तीवर जाण्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाचे प्रकरण राज्यभर गाजले. परीक्षा विभागाचा कारभार सुरळीत करण्यासाठी राज्यातील प्रत्येक विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाचा अनुभव ‘शेअर’ करण्याची सूचना केली आहे. पत्रातील हा खुलासा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केल्यानंतर नेटके यांच्या न झालेल्या प्रतिनियुक्तीची चर्चा थांबली.

मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग विस्कळीत झाल्याचा मुद्दा राज्यभर चर्चेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके प्रतिनियुक्तीवर मुंबई विद्यापीठात रूजू होणार असल्याची चर्चा होती. याबाबत राजभवन कार्यालयातून कुलगुररू डॉ. बी. ए. चोपडे यांना पत्र प्राप्त झाले. मात्र, कुलगुरू अहमदाबाद दौऱ्यावर असल्यामुळे पत्राबाबत खुलासा होऊ शकला नव्हता. कुलगुरूंनी बुधवारी पत्र वाचल्यानंतर प्रतिनियुक्ती नसल्याचे स्पष्ट झाले. मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाचा कारभार सुरळीत करण्यासाठी राजभवनाने राज्यातील सर्व विद्यापीठांना पत्र पाठवले आहे. सर्व विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी अनुभव सांगून कामकाजात सहकार्य करावे. पंधरा दिवसातून एकदा मुंबईत काम करावे असे पत्रात म्हटले आहे. याबाबत राजभवन वेळोवेळी संपर्क साधणार आहे. कुलगुरू डॉ. चोपडे यांनी शुक्रवारी हा खुलासा केला. सध्या परीक्षा विभागाचे कामकाज सुरळीत आहे. नेटके प्रतिनियुक्तीवर गेले असते, तर काम विस्कळीत झाले असते. त्यामुळे राजभवन कार्यालय आणि डॉ. देवानंद शिंदे यांच्याशी चर्चा केली असे चोपडे यांनी सांगितले. डॉ. दिगंबर नेटके मुंबई विद्यापीठात जाणार असल्यामुळे परीक्षा विभागाचे काय होणार अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू होती. पत्रातील मजकूर माहिती नसल्यामुळे बिनबुडाची चर्चा सुरू होती. अखेरीस कुलगुरू आल्यानंतर सर्व उलगडा झाला.

निकाल लवकर लागणार
परीक्षेच्या उत्तपत्रिका तपासल्यानंतर मॉडरेशन प्रक्रिया राबवण्यात येत होती. विद्यार्थ्याला दिलेल्या गुणांची शहानिशा करून अंतिम निर्णय घेतला जात होता, मात्र लवकर निकाल लावण्यासाठी उत्तरपत्रिका तपासणी सुरू असतानाच मॉडरेशन प्रक्रियेचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. निकाल लवकर लावण्यासाठी हा बदल केला असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ अच्छे नव्हे, सर्वात बुरे दिन

$
0
0

परभणी - सत्ता मिळविण्यासाठी अनेक फसव्या घोषणा करत असलेल्या भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठली कामे केली नाही. उलट विविध जाचक अटी नियमे लादून हे सरकार शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांच्या मुळावर बसले आहे. अच्छे दिन तर कधी आलेच नाहीत, उलट स्वातंत्र्यानंतरचे सर्वात बुरे दिन आल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी जिंतूर येथील सभेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शेतकरी वर्गाच्या विविध मागण्यांसाठी जिंतूर तहसीलवर महामोर्चा काढला. या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुराणी, विजय भांबळे, मधुसूदन केंद्रे, प्रकाश सोळंके, गणेशराव दुधगावकर, फौजिया खान, सुरेश जाधव, उज्वल राठोड, रामराव वडकुते, सारंगधर महाराज, भावना नखाते, बाळासाहेब जामकर आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असलेल्यांवर पोलिस गोळ्या घालत आहेत, सरकार मात्र बघ्याची भूमिका घेते. नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल, असा कांगावा या सरकारने केला होता. प्रत्यक्षात मात्र काळा पैसा बाहेर आलाच नाही, उलट सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाले. बँकेतून पैसा मिळण्याऐवजी उद्योगपतींना कर्ज देण्यात आले. सध्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात रस्ते चांगले नाहीत. त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, हे कळायला मार्ग नाही.’

सध्या रब्बी हंगाम सुरू असून वीज नसल्याने मोठे नुकसान होत आहे. शिक्षण महागले, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले नाही. राज्यात कोणीही सुखी नाही मग हे कसले अच्छे दिन, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्याचे सरकार फोडाफोडीचे राजकारण करून भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेत आहे. ज्यांनी जिल्हा बँक खाल्ली अशांना पक्षात घेतल्याची टीका देखील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांचे नाव न घेता अजित पवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, अधिवेशनापूर्वी कर्ज माफी झाली पाहिजे, अन्यथा एक डिसेंबर पासून राज्यात हल्लाबोल मोर्चे काढण्यात येतील आणि या मोर्चांचा शेवट नागपूर अधिवेशन बंद पाडून करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी पवार यांनी दिला. सत्तेची गोड फळे चाखणारी शिवसेनेला बळीराजाचा फुकट पुळका आणत आहे. पटत नसेल तर सरकारमध्ये बसू नका, लोकांना मूर्ख बनवण्याचा खेळ बंद करा अन्यथा येत्या निवडणुकीत मतदार भाजप आणि शिवसेनेला जागा दाखवेल, असेही पवार शेवटी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नागरिकांनी टाकला मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीत कचरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
तुळजापूर नगरपालिकेला यात्रा निधीच्या नावाने भरघोस निधी मिळतो. केवळ येथील अधिकारी व पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. येथील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने भाजपचे इंद्रजित साळुंके यांनी चक्क नगरपालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या वाहनात कचरा टाकून आंदोलन केले. याप्रकरणी अरविंद मुंडे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांची भेट घेतली असून, इंद्रजित साळुंके विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
तुळजापूर शहरातील स्वच्छतेचा ठेका संपल्याने सध्या शहरात घाणीचे साम्राज्य पसरलजे आहे. कचरा कुंड्या कचऱ्याने भरल्या आहेत. बुधवारी मुख्यधिकारी अरविंद मुंडे हे मंदिरासमोर गाडी लावून दर्शनासाठी मंदिरात गेले होते. यावेळी भाजपचे साळुंके यांनी त्यांच्या गाडीत कचरा टाकून घाणीच्या साम्राज्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकाराचा पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केला.

स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
तुळजापूर शहरात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. यामुळे येथील स्वछतेवर नगरपालिकेने अधिक लक्ष केंद्रित करणे
गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी यांचीही तुळजापुरात सतत ये-जा असते. मात्र ,नवरात्रोत्सवातच ते येथील स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही असतात. अन्य वेळी मात्र त्यांचेही या विषयाकडे दुर्लक्षच असते.



तुळजापूर नगरपालिकेने स्वच्छतेचा नव्याने ठेका दिला आहे. १६ नोव्हेंबर पासून शहरातील स्वछतेचे काम पूर्ववत सुरू होईल.
अरविंद मुंडे, मुख्याधिकारी, पालिका तुळजापूर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटरग्रीडचे काम युद्ध पातळीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना, मंठा व परतूर या शहरातील दोनशे गावांना ३०० कोटी रुपये खर्चुन वॉटरग्रीडच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यासाठीच्या योजनेचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत असून येणाऱ्या काळात संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांच्या शेतीला व उद्योगाला वॉटरग्रीडच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
वाटुर येथे मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यक्रमांतर्गत वॉटरग्रीड योजनेच्या जलकुंभाचे भूमिपुजन पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, हरिराम माने, भुजंगराव गोरे, सरपंच बद्रीनाथ खवणे, बद्री ढवळे, गणपतआबा वारे, विक्रम नाना माने, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार फुफाटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता कानडे, गटविकास अधिकारी तांगडे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री लोणीकर म्हणाले, ‘निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे गतकाळात राज्यात टंचाई परिस्थितीला सामोरे जावे लागले. भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे लातुर शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याबरोबरच मराठवाड्यातील जनतेला चार हजार टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात आला. गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्याबरोबरच श्रीलंका या देशात असलेल्या वॉटरग्रीड योजनेचा संपुर्ण अभ्यास करून ही योजना साकारण्यात येत आहे. जालना, मंठा व परतूर या तालुक्यातील दोनशे गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असून येणाऱ्या काळात जालना जिल्ह्यातील जनतेसह मराठवाड्यातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीला व उद्योगांना पाणीपुरवठा एकाच योजनेतून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.’
वाटूर हे परतूर व मंठा तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेले गाव आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असुन या गावाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वॉटरग्रीड योजनेमध्ये पूर्वी या गावचा समावेश नव्हता. परंतु नागरिकांच्या मागणीमुळे या गावाचा समावेश या योजनेत करण्यात आला असुन या गावामध्ये उभारण्यात येणाऱ्या जलकुंभातुन वाटुरसह बारा गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच शेगाव-पंढरपुर हा दोन हजार कोटी रुपये खर्चुन पालखी मार्ग तयार करण्यात येत आहे. हा मार्गही वाटुर येथुन जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल बाजारपेठेमध्ये सहजरित्या नेण्याबरोबरच या रस्त्यामुळे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचे लोणीकर यांनी यावेळी सांगितले.


वॉटरग्रीडची व्यवहार्यता तपासण्यासाठी १४ संस्थाचे प्रस्ताव
जालना - कायम टंचाईग्रस्त असलेल्या मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी एकात्मिक मराठवाडा वॉटरग्रीड योजना राज्य सरकारने हाती घेतलेली आहे. या योजनेच्या कामासाठी एकूण १४ संस्थांनी स्वारस्य दाखविले होते. त्या अनुषंगाने या महत्वाकांक्षी योजनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांसाठी ४ प्रकारच्या ग्रीडच्या योजनेची व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे. व्यवहार्यता तपासण्यासाठी तांत्रिक सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या मध्ये ई-निविदा पद्धतीने १४ डिसेंबरपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत देण्यात येणार आहे. ई-निविदेतून निवडण्यात येणाऱ्या सल्लागार संस्थेला साडेतीन महिन्याच्या कालावधीत या योजनेचा व्यवहार्यता अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे. मराठवाड्यासाठी महत्वाच्या अशा या योजनेसाठी हा मैलाचा दगड असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परळी- नगर रेल्वेला ७७ कोटींचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ७७ कोटी २० लाख रुपयांचा निधी गुरुवारी रेल्वे बोर्डाला वितरित करण्यात आला. निधी मिळावा यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रयत्नशील होत्या.
परळी-बीड-नगर या रेल्वे मार्गासाठी दोन हजार ८२६ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. यातील एक हजार ४१३ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा राज्य सरकारकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ स्तरावर घेतला. त्यानुसार सदर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ऑक्टोबर २०१७ पर्यंत एकूण ६३९ कोटी ६४ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पासाठी याच कालावधीत रेल्वे विभागाने ७१६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला. राज्य सरकारच्या हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी यावर्षीचा प्रकल्पासाठी अर्थसंकल्पित झालेल्या निधीपैकी ७७ कोटी २० लाख रुपयांचा निधी गुरुवारी वितरित करण्यात आला. यामुळे केंद्र व राज्य सरकारचे मिळून आतापर्यंत १ हजार ४३३ कोटी ६८ लाख रुपये या प्रकल्पाला मिळाले आहेत. या रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून २०१९ पर्यंत रेल्वे प्रत्यक्ष धावण्याचे बीड जिल्हा वासियांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्णत्वास येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'दशक्रिया' विरोधातील कोर्टानं याचिका फेटाळली!

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी । औरंगाबाद

'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला.

पैठण येथील पुरोहित समीर शुक्ल, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी तसेच संतोष छडीदार, गोवर्धन छडीदार यांनी ही याचिका दाखल केली होती. या चित्रपटातील अनेक संवाद, उल्लेख हे मानहानीकारक, भावना दुखावणारे व संदर्भहीन असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील श्रीकांत अदवंत यांनी केला होता. घटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार आहेत. गरुडपुराण, निर्णयसंहिता, धर्मसिंधू, अंत्येष्टी संस्कार आदी ग्रंथांमध्ये याबाबत लिहिलेले आहे. हे थोतांड नसून, हिंदू संस्कृती आणि परंपरेने चालत आलेला महत्वाचा विधी आहे. हे एका वर्गाचे उपजीविकेचे साधन आहे आणि यात आक्षेप घेण्यासारखेही काही नाही, अशी भूमिका याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडली. त्यामुळं चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद, दृश्ये वगळण्यात यावीत आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनास बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.

मूळ कादंबरीत नसलेल्या गोष्टी चित्रपटात घुसवण्यात आल्या आहेत. दशक्रिया विधी करणाऱ्या पुरोहितांना धर्मभ्रष्ट ठरवण्यात आलं आहे. नाभिक समाजाबद्दलही आक्षेपार्ह उल्लेख आहेत. हे क्रियाकर्म करणारे नाभिक, पुरोहित अल्पसंख्य असून त्यांना दलाल असे संबोधण्यात आलेले आहे. हे मूलभूत अधिकारांवरील अतिक्रमण आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाक्यांच्या सफाईचा विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खाम नदीजवळ एका ठिकाणी छावणीला पाणी पुरविणाऱ्या वाहिनीत दूषित पाणी शिरल्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. छावणी परिषदेने या जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याच्या तीन टाक्याची सफाई सुरू केली. या तिन्ही टाक्यांची सफाई गेल्या तब्बल दोन वर्षांपासून करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

टाक्यांची सफाई सुरू असल्याने छावणीमध्ये एक ते दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. छावणी भागात गेल्या काही दिवसांपासून गेस्ट्रोची लागण झाल्यामुळे अनेक रुग्ण छावणी हॉस्पिटल; तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. गेल्या शुक्रवारी गेस्ट्रोचे रुग्ण आढळले. ही साथ गेल्या सहा दिवसांपासून सुरू आहे. गेल्या शुक्रवारी पेन्शनपुरा टाकीवरील दोन वॉर्डांतील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. त्यानंतर ही साथ छावणीच्या अन्य भागातही पसरली. ती आजही कायम आहे.

छावणीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; पंप हाउसहून सोडण्यात आलेले पाणी सुरुवातीला पेन्शनपुरा भागाला दिले जाते. त्यानंतर गवळीपुरा पाण्याच्या टाकीत सोडण्यात येते. सर्वात शेवटी हे पाणी कॅम्पच्या टाकीतून उरलेल्या वॉर्डांत सोडण्यात येते. यामुळे पेन्शनपुरा टाकीवरील दोन वॉर्डांतून आलेल्या रुग्णांची संख्या अधिक अाहे.

गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या साथीनंतर छावणी बोर्डाला पाणीपुरवठ्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी वेळ मिळालेला आहे. डिसेंबर २०१५मध्ये पंप हाउसची स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतर या पंप हाउसच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले नव्हते. छावणी भागातील गेस्ट्रो साथीनंतर अखेर प्रशासनाने टाकी स्वच्छ करण्यास सुरवात केली आहे.

नगरसेवकांनी खाम नदीत छावणीच्या जलवाहिनीत दूषित पाणी शिरत असल्याचे शोधून काढले. त्या ठिकाणी दूषित पाणी मिसळू नये म्हणून जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आली आहे. हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. तोपर्यंत पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यताही छावणी बोर्डाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

असा होतो छावणीला पाणीपुरवठा
औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून छावणीला पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणी मुख्य वाहिनीवरून मिल्ट्री कॅम्पाजवळील मोठ्या हौदात केला जातो. तेथून छावणी परिसरातील तीन टाक्यामध्ये पाणीपुरवठा केला जातो. त्यापूर्वी पाण्यात औषधी टाकण्यात येते. कॅम्प भागातील टाकीतून वॉर्ड क्रमांक तीन आणि चारमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो. यानंतर गवळीपुरा येथील टाकीत पाणी सोडले जाते. गवळीपुरा येथील टाकीतून वॉर्ड क्रमांक एक आणि दोनमध्ये पाणीपुरवठा केला जातो. पेन्‍शनपुरा भागातील टाकीतून वॉर्ड क्रमांक पाच आणि सहामध्ये पाणी पुरवठा केला जातो.

दोन वर्षांपासून पंप हाउसची स्वच्छता न करणे चुकीचे आहे, मात्र यामुळे किंवा अंतर्गत पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली नाही. लोखंडी पुलाजवळ खाम नदीतून येणाऱ्या जलवाहिनीत दूषित शिरत होते. ही वाहिनी बदलण्याचा प्रस्ताव तयार झालेला आहे. त्यावर सीईओंची स्वाक्षरी झालेली नाही. यामुळे तूर्तास दूषित पाणी येऊ नये. यासाठी जलवाहिनी बदलण्यात येत आहे.
- किशोर कच्छवाह, माजी उपाध्यक्ष, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाला विष पाजून रेल्वे रुळावर ढकलले

$
0
0

औरंगाबाद : पैशाच्या वादातून तरुणाला मारहाण करीत हातपाय बांधून विषारी औषध पाजून रेल्वे रुळावर टाकण्यात आले. विश्रांतीनगर भागात बुधवारी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला. या तरुणावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रवींद्र नाना दांडगे (वय २८, रा. चेतनानगर, हर्सूल) हा तरुण मजुरी काम करतो. दांडगेला बुधवारी रात्री साडेआठ वाजता गोपाल प्रकाश भुतेकर (रा. काळुबाची नळणी, ता. भोकरदन) याने फोन करून मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे बोलावले. दांगडे त्या ठिकाणी गेल्यानंतर भुतेकर याने, ‘माझे पैसे केव्हा देतो,’ असे विचारले. दांडगे याने, जानेवारी महिन्यात देतो, असे सांगितल्यानंतर भुतेकर याने दांडगेला मारहाण सुरू केली. यानंतर दांडगेचे हातपाय बांधून त्याला विषारी औषध पाजण्यात आले. यानंतर जवळच असलेल्या रेल्वे रुळावर ढकलून पुन्हा मारहाण करण्यात आली. तेथील नागरिकांनी मध्यस्थी करून दांडगेची सुटका केली. त्याला रिक्षामध्ये घाटी ह‌ॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. दांडगेवर वॉर्ड क्रमांक आठमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांच्या नाराजीने पदाधिकारी चिंताग्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या नाराजीची कोंडी सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कायम राहिली. ही कोंडी फुटत नसल्याने व मुगळीकरांनी सह्या न करता फाइली परत पाठवल्याने पालिका पदाधिकारी,नगरसेवकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सातारा-देवळाई ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या ४३ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत समावून घेण्याच्या निर्णयाच्या विरुद्ध बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृहनेता विकास जैन आणि भाजप नगरसेवक राजू शिंदे यांनी प्रशासनावर तोफ डागली होती. त्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव फिरवण्यात आला. मूळ प्रस्ताव वेगळा असताना दुसराच प्रस्ताव मंजूर करून त्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले. या सर्व प्रक्रियेत मोठा घोळ झाला असून त्याची चौकशी लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे करावी, अशी मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली होती. सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पाडल्याचे उपायुक्त रवींद्र निकम आणि विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी सभागृहात स्पष्ट केले, पण त्यावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. चौकशीच्या मागणीवर नगरसेवक ठाम राहिले. यामुळे आयुक्त मुगळीकर व्यथित झाले. नियमानुसार काम केल्यावरही नगरसेवक नियमबाह्य काम झाल्याचा आरोप करीत असल्यामुळे या महापालिकेत काम न करण्याची भूमिका मुगळीकरांनी वरिष्ठांच्या कानी घातल्याची पालिकेत चर्चा आहे.
सर्वसाधारण सभा संपल्यानंतर मुगळीकरांनी पालिकेशी संपर्क कमी केला आहे. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या फोनला त्यांनी गुरुवारी दिवसभर प्रतिसाद दिला नाही. शुक्रवारी देखील हीच परिस्थिती होती. फोन करून पदाधिकाऱ्यांनी मुगळीकर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. विविध कामांच्या सुमारे तीनशे ते पाचशे फाइल मुगळीकर यांनी सह्या न करता परत पाठवल्याची चर्चा होती. बजेटबुक न झाल्यामुळे इतके दिवस नगरसेवकांची वॉर्डातील विकास कामे होत नव्हती. गेल्या आठवड्यात बजेटबुक आले, त्यामुळे विकास कामांबद्दल नगरसेवकांच्या आशा पल्लवीत झाल्या, पण आता आयुक्तांच्या नाराजीमुळे सर्वच चिंतेत सापडले आहेत.

चूक लक्षात आली

सातारा-देवळाई ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यावरून करण्यात आलेले आरोप चुकीचे होते, असे काही पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. ज्या नियमाच्या आधारे या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले तो नियम योग्यच होता. नांदेड महापालिकेचा संदर्भ देवून नगरसेवकांनी आरोप केले, पण नांदेड महापालिकेत नवीन भरती करण्यात आली होती. सातारा-देवळाईबद्दल नवीन भरतीचा मुद्दा नव्हता. सातारा-देवळाई ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी कार्यरत होते, त्यांना फक्त पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा मुद्दा होता. सामावून घेताना त्यांना नियमानुसार पालिकेचे सर्व लाभ देणे बंधनकारक होते, असे लक्षात आल्यावर पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांशी संपर्कसाधून वस्तूस्थिती लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यालाही प्रतिसाद दिला नसल्याचे बोलले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘टिमकी बजाव’ आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
निराधार, शेतकारी व सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी ‘टिमकी बजाव’ आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी नगर पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर म्हणाले, ‘सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी आक्रमक राहणार आहे. आगामी काळात निराधार, शेतकरी तसेच सामान्यांचे प्रश्न सुटले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बीडसह जिल्हाभरात तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल.’
यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करा, बीड शहराबाहेरील सिद्धेश्वरनगर, नवनाथनगर, एमआयडीसी, गांधीनगर, प्रकाश आंबेडकरनगर, मोची गल्ली, संत नामदेवनगर, बलभीमनगर, गोरे वस्ती, बांगर नाला या भागातील दारिद्रय रेषेचा सर्व्हे करा, चलन भरलेल्या राशन कार्डचे तात्काळ वाटप करा, गॅस आणि पेट्रोल दरवाढ कमी करा, शेतकरी कर्जमाफीची याद्या जाहीर करा, संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक तात्काळ घ्या, जुने चार हजार प्रकरणे निकाली काढा, जिल्हा पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करा या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
नगर पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते अ‍ॅड. डी. बी. बागल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, शहराध्यक्ष शिवाजी जाधव, पालिकेचे गटनेते फारुक पटेल व बरकत पठाण यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वायू प्रदूषणावर ‘डस्ट क्लिनर’ची मात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वायू प्रदूषण रोकण्यासाठी महापालिका आता डस्ट क्लिनर खरेदी करणार आहे. यामुळे रस्ते आणि दुभाजकांवरील धूळ कमी होईल, असे मानले जात आहे. याशिवाय अन्यही पूरक बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने स्मार्टसिटी योजनेतून पावले उचलली जाणार आहेत.

वायू प्रदूषणावरून महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकच्या उद्यान विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा गुरुवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. दरम्यान, वायू प्रदूषण आणि मंडळाने दिलेली नोटीस यासंदर्भात आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले, ‘प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस आली, ही वस्तुस्थिती आहे. नोटीस मिळाल्यावर महापालिकेने वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृती आराखडा देखील तयार केला आहे. सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर असल्याचा मंडळाचा निष्कर्ष आहे. रस्ते आणि दुभाजकांची नियमित स्वच्छता झाले, तर धूलिकणांचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्यासाठी स्मार्टसिटी योजनेतून डस्ट क्लिनर खरेदी करण्याचा प्रस्ताव आले. स्वच्छ व हरित शहरासाठी स्मार्टसिटी योजनेत वेगळी तरतूद आहे, त्यातून डस्ट क्लिनर खरेदी करणे शक्य आहे.

‘रस्त्यांच्या कामांनंतर धूळ कमी होईल’
आगामी काळात शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. कामे पूर्ण झाल्यावर आपोआपच वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. खड्ड्यांची समस्या राहणार नाही, असा दावा आयुक्तांनी केला. स्मार्टसिटी योजनेतून सिटीबसचा प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प मार्गी लावण्याचा देखील प्रस्ताव आहे. हे प्रस्ताव एसपीव्हीच्या (स्पेशल पर्पज व्हेकल) बैठकीत मंजूर झाल्यावर प्रत्यक्ष कामांना सुरुवात करता येईल, असे आयुक्त मुगळीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दशक्रिया’वरून दोन संघटना आमने सामने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ब्राह्मण समाजाचे बदनामीकारक चित्रण असल्याचा आरोप करीत ब्राह्मण संघटनांनी ‘दशक्रिया’ चित्रपटाचा पहिला शो शुक्रवारी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाला पाठिंबा देत संभाजी ब्रिगेडने जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही गट आमनेसामने आल्यामुळे वाद निर्माण झाला. बाहेर आंदोलन सुरू असताना चित्रपटाचा शो प्रेक्षकांच्या प्रतिसादात पार पडला. शनिवारपासून चित्रपटाचे शो सुरळीत सुरू राहणार आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ कादंबरीवर आधारीत ‘दशक्रिया’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला होता. या चित्रपटात ब्राह्मण समाजाचे बदनामीकारक चित्रण असल्याचा आरोप करीत अनेक ब्राह्मण संघटनांनी चित्रपटाला विरोध केला होता. चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी पुरोहित संघटनेने केलेली याचिका खंडपीठाने फेटाळल्याने चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स चित्रपटगृहात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता ‘दशक्रिया’चा शो बंद पाडण्यासाठी ब्राह्मण संघटनांनी चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी केली. चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते दाखल झाले. दोन्ही संघटना समोरासमोर आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तिकीट काढलेले प्रेक्षक आंदोलन संपण्याची वाट पाहत होते. त्यांना आत सोडण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रा. शिवानंद भानुसे यांनी केली. त्यानुसार व्यवस्थापकांनी ८० प्रेक्षकांना आत सोडले. त्यामुळे ब्राह्मण संघटनेने घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत गर्दी पांगवली. चित्रपटाचा शो सुरू झाल्यानंतरही अर्धा तास आंदोलन सुरू होते. संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, संजय सोमवंशी, राहुल बनसोड, विजय सोमवंशी, राम भगुरे उपस्थित होते. तर ब्राह्मण संघटनेचे पंकज पाठक, आशिष सुरडकर, वनिता पत्की, सुभाष मुळे, युवराज दिवेकर, अभिषेक कादी यांची आंदोलनात उपस्थिती होती.

आज सुद्धा शो होणार
राज्यातील इतर शहरात ‘दशक्रिया’ चित्रपटाचे शो दाखवण्यात येत आहेत. औरंगाबाद शहरात फक्त एक शो असल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. चित्रपटाचे कथानक पैठणचे असल्यामुळे चित्रपटाचे शो वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढल्यास शो वाढवण्यात येतील, अशी माहिती चित्रपट वितरक शौकत पठाण यांनी दिली. ‘दशक्रिया’चा शो दाखवण्यासाठी शनिवारीसुद्धा उपस्थित राहणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींचे घाटीत देहदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) निवृत्त प्रा. डॉ. जयंत बरिदे यांच्या कुटुंबातील तब्बल सहा व्यक्तींनी देहदान केले असून, स्वतः डॉ. बरिदे व त्यांच्या पत्नी यांनीदेखील देहदानाचा संकल्प केलेला आहे. विशेष म्हणजे घाटीमध्ये शिकलेले किंवा शिकवलेल्या डझनभर डॉक्टर व त्यांच्या कुटुंबियांनीही देहदान केले आहे. अशा सर्व देहदान केलेल्या दात्यांच्या कुटुंबियांचा गौरव शनिवारी (१७ नोव्हेंबर) घाटीमध्ये पहिल्यांदाच होत आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अत्यंत महत्वपूर्ण प्रात्यक्षिक अभ्यासासाठी मृतदेहांशिवाय पर्याय नसतो व देहदानातूनच मृतदेह प्राप्त होऊ शकतात. अर्थात, देशामध्ये देहदानाचे प्रमाण अजूनही नगण्य असले तरी मागच्या काही वर्षांपासून देहदानाचे प्रमाण किंचित वाढत आहे व देहदानामध्ये डॉक्टर मंडळी अग्रेसर आहेत. घाटीतील देहदान समितीचे सदस्य, योग अभ्यासक तसेच ‘पीएसएम’ विभागातील निवृत्त प्रा. डॉ. जयंत बरिदे यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांनी देहदान केले आहे. देहदान केलेल्यांमध्ये डॉ. जयंत बरिदे यांच्या मातुःश्री कमल बरिदे, वडील पांडुरंग बरिदे, काका डॉ. नरहर बरिदे, काकू कुसुम बरिदे, भावाच्या सासू डॉ. वीणा पन्नालाल सुराणा यांचा समावेश होतो. त्याशिवाय स्वतः डॉ. जयंत बरिदे व त्यांच्या पत्नी डॉ. शोभना बरिदे यांनीही देहदानाचा संकल्प करून देहदानाचा अर्जही भरलेला आहे. त्याचबरोबर देहदान व नेत्रदानाविषयी जागृतता निर्माण करण्याच्या हेतुने १९९६ मध्ये ‘कृतार्थ’ ही संघटना स्थापन करण्यासाठीही डॉ. बरिदे यांनी पुढाकार घेतला होता. याच संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत २२ व्यक्तींनी देहदान केले असल्याचे डॉ. बरिदे यांनी बोस्टन (अमेरिका) येथून ‘मटा’ला सांगितले. त्याशिवाय घाटीतील पॅथॉलॉजी विभागातील निवृत्त सहयोगी प्रा. विद्याधर कुलकर्णी, ‘पीएसएम’चे विभागप्रमुख डॉ. मोहन डोईबळे यांच्या मातुःश्री भागनाबाई कोंडिबा डोईबळे, घाटीतील नेत्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांचे वडील डॉ. शरद शेषराव नांदेडकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे यांच्या मातुःश्री सीताबाई रामचंद्र बारपांडे, डॉ. नामदेव सोमराव खेडकर, डॉ. सुधाकर भगवानराव देशमुख, डॉ. रत्नाकर रणपतराव वैद्य, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांचे सासरे एकनाथ जाधव आदींनीही देहदान केले आहे.

आज ऋणनिर्देश सोहळा

देहदान केलेल्या कुटुंबियांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठीच मागच्या तीन वर्षांत देहदान केलेल्या ६० पेक्षा जास्त कुटुंबियांचा ऋणनिर्देश सोहळा शनिवारी (१८ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता घाटीतील महात्मा गांधी सभागृहात होणार आहे. या वेळी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा, ‘डीएमईआर’चे सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विभागप्रमुख डॉ. शिवाची सुक्रे यांनी केले आहे.

वैद्यकीय अभ्यासासाठी देहदान करण्याची मोठी गरज असून, नागरिकांनी देहदानासाठी पुढे आले पाहिजे. दात्यांच्या कुटुंबियांचा गौरव हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे.
-डॉ. जयंत बरिदे, देहदान समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्टः समई उद्यानाचे रूपडे पालटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन तीन व चार परिसरातील समई उद्यान परिसरात महापालिकेने स्वच्छतेला सुरुवात केली आहे. येथे बेसुमार वाढलेले गवत, केरकचरा साफ करण्यात आला असून यापुढे नियमित देखभाल, दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. हे उद्यान बकाल झाल्याचे वृत्त ‘म. टा.’ने १५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालिकेने कार्यवाही केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सिडको एन तीन व चार हा परिसर उच्चभ्रुंची वसाहत म्हणून ओळखला जातो. याच परिसरातील मोकळ्या जागेत महापालिकेने पुढाकार घेत समई उद्यान विकास केले आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी तेथे आकर्षक मोठ्या आकाराची समई बसविण्यात आली. त्यामुळे या उद्यानाची ओळख समई उद्यान अशी झाली आहे. मुलांसाठी खेळणी, नागरिकांसाठी खास आसन व्यवस्था, हिरवळ, वॉकिंगसाठी विशेष सोय या सोयींमुळे समई उद्यान मुलांसह नागरिकांचे आवडते ठिकाण झाले आहे. परंतु, मनपाच्या दुर्लक्षामुळे, देखभाल अभावी गेल्या काही महिन्यांपासून या उद्यानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. यासंदर्भात ‘म.टा.’ने वृत्त प्रकाशित केले.
या वृत्ताची नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी तातडीने दाखल घेत मनपा प्रशासनास जागी केले. उद्यान परिसरात तातडीने सफाई मोहीम हाती घेण्यात आली. वाढलेले गवत, केरकचरा काढून उद्यानाचे रूप बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वॉकिंग ट्रॅक परिसरात स्वच्छता करून ट्रॅक दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून उद्यानाच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

समई उद्यानात कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली. समईसह वॉर्डातील सर्व उद्यानात नियमित देखभाल दुरुस्ती करण्याचे नियोजन केले आहे. या उद्यानात मुलांसाठी खेळणी असून ओपन जीम उभारण्याचा प्रयत्न आहे.
- अॅड. माधुरी अदवंत, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठव्या दिवशीही गॅस्ट्रोचे १९० रुग्ण

$
0
0

औरंगाबाद : छावणीतील गॅस्ट्रोग्रस्तांचा आकडा साडेपाच हजारांवर पोहोचला असून, आठव्या दिवशीदेखील तब्बल १९० रुग्ण छावणी रुग्णालयाच्या ‘ओपीडी’मध्ये उपचारासाठी आले, तर यातील ३५ रुग्णांना दाखल करण्याची वेळ आली. त्यामुळे गॅस्ट्रोची साथ आटोक्यात येण्यासाठी आणखी काही दिवस नक्कीच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) शुक्रवारी छावणी रुग्णालयामध्ये येऊन पाण्याचे; तसेच शौच नमुने गोळा केले.

छावणीमध्ये शुक्रवारपासून (दहा नोव्हेंबर) गॅस्ट्रोचा उद्रेक सुरू झाला. आतापर्यंत छावणीच्या ओपीडीमध्ये किमान साडेपाच हजार रुग्णांनी उपचार घेतले, तर यातील दीड हजारांवर रुग्णांना दाखल करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तीनशेपेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे एकदा रुग्णाला सुटी दिल्यानंतर किंवा ओपीडीमध्ये उपचार केल्यानंतर अशा रुग्णांवर दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा उपचार करण्याची वेळ आल्याचेही आढळून आले आहे. या संबंधीची आकडेवारी रुग्णालयामध्ये सध्या उपलब्ध नसली तरी अशा रुग्णांची संख्या मोठी असल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, शुक्रवारी रुग्णालयामध्ये १९० रुग्ण ‘ओपीडी’मध्ये आले, तर ३५ रुग्ण ‘आयपीडी’मध्ये दाखल झाले.

‘एनआयव्ही’च्या रिपोर्टला प्रतीक्षा
यापूर्वी ‘एनआयव्ही’कडून १३ व १३ नोव्हेंबर रोजी पिण्याच्या पाण्याचे तसेच शौच्च नमुने गोळा करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारीही नवीन रुग्णांचे नमुने गोळा करण्यात आले. त्यासाठी ‘एनआयव्ही’तील एक डॉक्टर व एक सहाय्यक रुग्णालयामध्ये शुक्रवारी ठाण मांडून होते. आतापर्यंत रिपोर्ट प्राप्त झाले नसले तरी मंगळवार, बुधवारपर्यंत रिपोर्ट उपलब्ध होतील, असेही सांगण्यात आले.

गॅस्ट्रोची रुग्णसंख्या आता कमी झाली असून, काही प्रमाणात दुसऱ्यांदा येणाऱ्या रुग्णांची संख्या आढळून येत आहे, मात्र अजूनही नवीन रुग्णांची संख्या हीच दुसऱ्यांदा येणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे, यात शंका नाही.
- डॉ. गीता मालू, वैद्यकीय अधीक्षक, छावणी सामान्य रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आईची मिळकत लाटण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
आईच्या मिळकतीवर सहा जणांचा हक्क असताना एकटीच वारस असल्याचे खोटे सांगत नगर पालिका लोकसेवकांच्या संगनमताने मालत्ता स्वतःच्या नावावर लावून घेतल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने एका महिलेसह नगरपालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, कन्नड शहरातील ११/१७८ या क्रमांकाच्या मिळकतीच्या नमुना क्रमांक ४७वर महिलेने स्वतःचे नाव लावून घेतले. कन्नड नगर पालिकेकडे २८ जून २०१७ रोजी पांढरी मोहल्ला येथील आरोपी नाजिराबी नजमोद्दीन शेख या महिलेने आईची मिळकतचे आपण एकटेच वारस असल्याचे खोटे सांगून मिळकतीवर नाव लावून घेतले. प्रत्यक्षात या मिळकतीचे सहा वारस आहेत. नगर पालिकेतील कर्मचारी सुरेश कामटीकर, देविदास पाटील, प्रशांत देशपांडे यांनी संगनमत करून मिळकत क्रमांक ११/१७८वर संबंधित महिलेचे नाव लावून घेतले. यातील कागदपत्रावर आरोपी प्रशांत देशपांडेची सही असून, देविदास पाटीलची काउंटर सही आहे. सुरेश कामटीकरने ही महिला एकटीच वारस असल्याचे खोटे सांगून फिर्यादी अर्शद खान यांचे नुकसान केले व शासनाची फसवणूक करून बनावट नमुना क्रमांक ४७ तयार करून दिला.

या प्रकरणी प्रथमवर्गला न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने, अर्शद खान रशीद खान (रा. काजी मोहल्ला) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्या आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अस्मान शिंदे पुढील तपास करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेडपी’त योजना रखडल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून या योजना राबविण्यामध्ये प्रशासन व पदाधिकारी यांच्यात एकवाक्यता होत नसल्याने या योजनांची अंमलबजावणी रखडली आहे. नव्याने आलेल्या सभागृहातही जुन्याच पद्धतीने कामकाज सुरू असल्याने तब्बल ३० कोटींच्या योजनांना नियोजनाची प्रतीक्षा आहे. याचा फटका जिल्ह्यातील जनतेला बसत आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला राज्य सरकारकडून ३० कोटी रुपयांचा निधी प्राप्त आहे. यंदा नवीन आर्थिक वर्षाचे नियोजन अद्याप झालेले नाही, परिणामी हा निधी पडून आहे. तत्कालीन प्रभारी समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनी काही योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्लॅनिंग केले, मात्र त्यात तत्कालीन समितीने काही त्रुटी काढल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. नवीन सदस्य निवडून आले. पण झेडपी प्रशासनाने ठरविलेल्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत मात्र काहीच सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत. परंपरेने राबविण्यात येणाऱ्या समाजकल्याण विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनंमध्ये फेरबदल केल्यामुळे हा विलंब झाल्याचा आरोप समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल यांनी केला.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्गासाठी शैक्षणिक व आर्थिक प्रगती, सामाजिक संरक्षण करण्यासाठी समाजकल्याण विभागामार्फत राज्य सरकार विविध योजना राबविते. या योजनांच्या माध्यमातून नमूद प्रवर्ग तसेच दिव्यांग व्यक्तिंसाठी वैयक्तिक व कौटुंबिक लाभ दिला जातो. त्यात प्रामुख्याने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती; तसेच दलित वस्ती सुधार योजनांचा समावेश आहे. या योजनेच्या ग्रामीण लाभार्थ्यांच्या प्रगतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये फेरबदल केले. त्यात हवाई सुंदरी, परदेशी भाषा प्रशिक्षण अशा नवीन उपक्रमांचा समावेश केला गेला होता. मात्र त्याच्या अंमलबजावणीस विलंब झाला. तसेच सर्वसाधारण सभेत या फेरबदलाला सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे योजनांचे नियोजन रखडले. फेरबदल झाला नसता तर योजना मार्गी लागल्या असत्या, असा दावा बेडवाल यांनी केला.

उपकराचे नियोजन
समाजकल्याण विभागाकडे गेल्यावर्षीचे ७ कोटी रुपये शिल्लक आहेत. चालू वर्षात ३० कोटींचा निधी प्राप्त आहे. ३७ कोटी रुपयांची रक्कम सुधार योजनेतील १४१ कामांबरोबर अनुसूचित जातीच्या वस्त्यांमधील स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिव्यांची सोय, समाजमंदिर, जोडरस्ते, शौचालये, पिण्याच्या पाण्याची विहीर आदींवर खर्च केली जाणार आहे. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेकडून उपकरातून दिल्या जाणाऱ्या लाभाचे १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या विषय समितीच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. त्यानुसार टीनपत्र्यासाठी २७ लाख, ताडपत्री २५ लाख, झेरॉक्स मशीन ३० लाख, कम्प्युटर ५० लाख, सायकल ५० लाख, विद्युत मोटार ५० लाख, ऑईल इंजिन १५ लाख, कडबा पुरवणे ४५ लाख, पीव्हीसी पाईप ४० लाख, पिठाची गिरणी २५ लाख, पिको फॉल ३० लाख आदीची तरतूद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमीभावाने मका खरेदी कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे हमी भावापेक्षा कमी दराने माल विकावा लागत असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

वैजापूर तालुक्यातील डोणगाव येथील शेतकरी धनंजय धोर्डे, लक्ष्मण मुकिंद, बाबासाहेब पानसरे, अशोक मतसागर, बाळासाहेब जगताप, संभाजी तुरकणे आदींनी शुक्रवारी तहसीलदर यांना निवेदन देऊन शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. हे केंद्र लवकर सुरू न झाल्यास तहसीलच्या आवारात मका उभारण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष साहेबराव औताडे यांनी मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी तहसीलदारांना पत्र दिले आहे. खरेदी केंद्रासाठी ग्रेडर व इतर मनुष्यबळ उपलब्ध आहे, पण केंद्र सुरू करण्यासाठी जागा नसल्याने केंद्राचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार मका प्रती क्विंटल एक हजार ४२५ रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी आर्द्रतेची कमाल मर्यादा १४ इतकी आहे. हमीभाव एक हजार ४२५ रुपये असताना खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून ९५० ते एक हजार १५० रुपये या भावाने मका खरेदी करत आहेत. व्यापाऱ्यांकडून मका खरेदीत लूट होत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेने मका साठवण करून ठेवली आहे, पण १५ दिवस उलटूनही केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

गोदाम नसल्याने विलंब
दरम्यान, वखार महामंडळाचे गोदाम लवकर उपलब्ध होत नसल्याने खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असल्याची माहिती आहे. हे गोदाम उपलब्ध झाल्यास खरेदी विक्री संघाचा करारनामा करून गोदाम देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात केंद्र सुरू होण्याची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर, मशिदीची सफाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हिंदू व मुस्लिम समाजातील एेक्य जोपासण्यासाठी जिन्सी पोलिसांनी शुक्रवारी अनोखा उपक्रम राबविला. पोलिस अधिकारी हिंदू, मुस्लिम धर्मीय आणि विशेष पोलिस अधिकारी यांनी एकत्र येऊन राम मंदिर व गंजे शाहिदा मशिदीची सफाई मोहीम राबविली.

पोलिस निरीक्षक फहीम हाश्मी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी दोन या कालावधीत ही मोहीम घेण्यात आली. श्रमदानातून राबवण्यात आलेल्या उपक्रमामध्ये हिंदू बांधवानी मशिदीत, तर मुस्लिम बांधवांनी किराडपुरा येथील राम मंदिरात सफाई मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये निरीक्षक हाश्मी, पीएसआय रफीक शेख, भदरगे, शेळके; तसेच प्रतिष्ठित नागरिक संजय जाइबहार, आयुबखान, सय्यद खलील, फय्यादखान, शेख इम्रान, गणेश कुलकर्णी, सोमनाथ कसबेकर, अशोक लोखंडे, हाफीज बेग, बसैये बंधू, कन्हैयालाल सिद्ध, संदीप सरीन, कैसर पटेल, तय्यब पटेल, श्रीखंडे यांच्यासह विशेष पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनता की सन्मानमें, काँग्रेस मैदानमें’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
शेतकरी, सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी शुक्रवारी काँग्रेसने ‘जनता की सन्मानमें, काँग्रेस मैदानमें’ अशी जोरदार घोषणा देत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. जनआक्रोश मोर्चा जुना बस स्थानक, कुरेशी मशीद, साळीवाडा, मोठी आळीमार्गे तहसील कार्यालयानर धडकला. श्री भद्रा मारुती भक्त निवास येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी माजी आमदार कल्याण काळे यांनी नोटा बंदीवर टीका केली. ‘या काळात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली न वाहता त्याचा जल्लोष केला,’ असा आरोप त्यांनी केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी, ‘जनआक्रोश मोर्चाद्वारे जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोचविणे हाच उद्देश असून, सर्व स्तरावरील विदारक माहिती सरकारला समजली पाहिजे. तालुक्यातील पैसेवारी काढताना शेतकऱ्यांचे हित लक्षात न घेता विमा कंपन्यांना झुकते माप देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात सर्वात जास्त विमा औरंगाबाद व बीडमध्ये उतरविला गेला. पैसेवारीबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून, राज्यातील पैसेवारी जाहीर करून टंचाईसदृश्य गावे जाहीर न केल्यास, शेतकऱ्यांना सरसकटपणे कर्जमाफी न दिल्यास १३ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल,’ असा इशारा दिला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. काळे, माजी आमदार नामदेव पवार, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हा बँकेचे संचालक किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब काळे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा पानकडे, तालुकाध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे, माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे, नगराध्यक्ष अॅड. मुकिमोद्दीन कमर, माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन, आबेद जहागीरदार, नंदकिशोर सहारे, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा अर्चना वेताळ, शहराध्यक्ष अब्दुल समद उपस्थित होते. मोर्चात काँग्रेसचे कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खुलताबाद तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, वीज बील वसुली थांबवावी, पिक पैसेवारी पारावर न काढता प्रत्यक्ष शिवारावर जाऊन काढावी, शेती उपयोगी वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा.

रावसाहेब दानवेची नार्कोटेस्ट करा
नोटाबंदीच्या काळात आपल्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नोटा बदलून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे खरे आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी दानवे यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी. त्यांच्या सोबत आपलीही नार्कोटेस्ट करण्यास तयार असल्याचे आव्हान आमदार सत्तार यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images