Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दोन दुकाने फोडणारा मूकबधीर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वडोदबाजार येथे सलग दोन दिवस एकच दुकान फोडणाऱ्या आरोपीला ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाला होता. विशेष बाब म्हणजे हा आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून मूकबधीर आहे.
वडोदबाजार येथे सुनील दत्तात्रय तांबट (वय ५२) यांचे किराणा दुकान आहे. २८ ऑक्टोंबर रोजी चोरट्यानी त्यांच्या दुकानाचे कुलूप टॉमीने तोडून रोख ४० हजार रुपये लांबवले होते. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याप्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी २९ ऑक्टोंबर रोजी चोरट्याने पुन्हा दुकान फोडत रोख सात हजार रुपये, सीसीटीव्ही कॅमेरे व पॉवर बॉक्स घेऊन पसार झाला होता. याच दिवशी गावातील अजून एक किराणा दुकान व घर फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा शोध सुरू केला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी जालना येथील घरफोड्या दगडूबा मुकुंदा बोर्डे (वय २० रा. पेरजापूर, ता. भोकरदन) हा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली. दोन साथीदाराच्या मदतीने त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी वडोदबाजार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधिक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय सचिन कापुरे, जमादार रंगराव बावस्कर, रमेश अपसनवाड, विनोद तांगडे व ज्ञानेश्वर मेटे यांनी केली.

अट्टल गुन्हेगार

आरोपी बोर्डे हा जालना पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. मूकबधीर असला तरी साथीदारांच्या मदतीने तो गुन्हे करतो. त्याच्याकडून माहिती काढण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. इशारे करून त्याने ही मा‌हिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्य संमेलनासाठी पुढील आठवड्यात नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखिल भारतीय साहित्य संमलेनाची तयारी सुरू झाली आहे. फेब्रुवारी २०१७मध्ये १६ ते १८ असे तीन दिवस हे संमेलन होत आहे. साहित्य महामंडळाशी संलग्न असलेल्या औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषद या संमेलनाच्या नोंदणीच्या तयारी लागली आहे. परिषदेकडून साहित्य संमेलनाला जाणाऱ्यांची नोंदणी पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.
शहरातील विविध साहित्य मंच, चळवळ, संघटना, प्रतिष्ठान आणि ग्रंथप्रकाशक यांच्या वर्तुळात या साहित्यसंमेलनाची चर्चा सुरू झाली आहे. याचे नियोजनही करण्यात येत आहे. शहरातील विविध साहित्यिक प्रवासाचे आरक्षण, करण्याच्या तयारीत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांचा दरवर्षीचा मेळाच असतो. या साहित्यमेळ्यासंबंधी शहरातही आता उत्साह आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. डॉ. दादा गोरे म्हणाले, महामंडळाकडून मसापला पुढील आठवड्यात नोंदणी फॉर्म आणि पावत्या येतील. नियोजित स्थळावर असलेल्या संमेलनासाठी जाताना हा फॉर्म भरणे आवश्यक आहे. यासाठी शुल्कही असेल.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक वीरा राठोड म्हणाले, संमेलन हा तर सोहळाच आहे मेळा आहे, येथे सगळ्याच साहित्य‌िकांना जाण्यास आवडतेच. यंदा बडोद्याला होत असलेल्या संमेलनास नक्कीच जाणार आहे. प्रगतीशिल लेखक मंडळाच्या पदाधिकारी आणि क‌वयत्री प्र‌िया धारूरकर म्हणाल्या, आम्ही या संमेलनाला जाणार आहोत. अजून निमंत्रण आलेले नाही पण आमच्या साहित्य वर्तुळात याची चर्चा होईल आणि आम्ही संमेलनाला जाण्याचा विचार करत आहोत.
या संमेलनात शहरातील काही प्रकाशकही जाणार आहेत. त्यांचे नियोजन सुरू झाले आहे. याविषयी साकेतचे संचालक साकेत भांड म्हणाले, ‘आम्ही याचे नियोजन लवकरच करत आहोत बडोद्याला होत असलेल्या या यंदाच्या संमेलनास आम्ही जाऊ.’ एकंदरीतच साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर औरंगाबादच्या साहित्य वर्तुळात उत्साह आहे.

मसापमध्ये अर्ज

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून हे फॉर्म आल्यानंतर ते मसापमध्ये उपलब्ध होतील, ज्याची इच्छा आहे त्यांनी ते फॉर्म भरण्यासाठी मसापकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. साधारणतः १००-१५० जण बडोद्याला जातील, असा अंदाजही कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही बंद राहिल्यास निलंबन

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, औरंगाबाद
रेल्वे आल्यानंतर फलाटावर गर्दी होते. त्यावेळी सीसीटीव्ही केंद्र बंद असल्यास चोरी कशी रोखणार? सीसीटीव्ही केंद्र बंद असल्यास ‌संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (डीआरएम) डॉ. ए. के. सिन्हा यांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांना दिला.

डॉ. सिन्हा यांनी रविवारी औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा विशेष दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत एडीआरएम विश्वनाथ इरय्या वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, वाहतूक व्यवस्थापक विक्रमादित्य हे अधिकारी होते. त्यांनी रेल्वे स्थानकावरील, फूडप्लाझा, कॅन्टीन, पाणी स्टॉल, स्टेशनरीसह परवानाधारक विक्रेत्यांच्या स्टॉलची तपासणी केली. फूडप्लाझावर कमी पदार्थ असल्याने, तर दुग्धजन्य पदार्थ विक्रीस्टॉलवर पाणी बाटलीचे दरफलक नसल्याने दोन्हीं विक्रेत्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड केला. स्टेशनवर पेटीएम, स्वॅपिंगचा जास्तीत जास्त वापर करून ऑनलाइन व्यवहार वाढवावा, अशाही सूचना डॉ. सिन्हा यांनी केली.

फलाट क्रमांक एकच्या सीसीटीव्ही केंद्राची त्यांनी भेट दिली. सकाळी केंद्र बंद असल्याची तक्रार मिळाल्यानंतर आरपीएफ अधिकाऱ्यांना डीआरएमने फैलावर घेतले.

सीसीटिव्ही केंद्र बंद दिसल्यास संबधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी रेल्वे पोलिस दलास दिला.

१५ रुपयांत जनता जेवण
रेल्वेने केवळ १५ रुपयांत रेल्वे प्रवाशांसाठी जनता जेवणाची सुविधा दिली आहे. रेल्वे कॅन्टीनमार्फत ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध असून, या प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डीआएम डॉ. सिन्हा यांनी कन्टीनची पाहणी करताना उपस्थिती ग्राहकांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणीतील पाणी पिण्यास अयोग्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणीतील गॅस्ट्रोचा उद्रेक दूषित पाण्यामुळेच झाल्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (घाटी) छावणी परिसरातील प्रादेशिक प्रयोगशाळेच्या अहवालामुळे शिक्कामोर्तब झाले. विशेष म्हणजे दोन्ही प्रयोगशाळांच्या अहवालामध्ये एकच जिवाणू आढळला आहे. छावणीतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

छावणीतील सर्व वॉर्डांतील वेगवेगळ्या भागातील पाच ते दहा पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते व तपासणीसाठी प्रादेशिक प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते. या सर्व पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘इकोलाय’ जिवाणू आढळला आहे आणि हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट शब्दांत नोंदविण्यात आले. त्याचवेळी घाटीच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये नऊ ते दहा शौच नमुने (स्टूल कल्चर) पाठवण्यात आले होते. या सर्व नमुन्यांच्या अहवालामध्येही ‘इकोलाय’ हाच जिवाणू सापडला आहे.

या नमुन्यांमध्ये कॉलरा किंवा
इतर आजारांचे जंतू आढळलेले नाहीत, असेही घाटीच्या सूत्रांनी सांगितले. ‘इकोलाय’ हे जिवाणू पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आल्यास ते पाणी दूषित मानण्यात येते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

नाल्याच्या पाण्यामुळेच
सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील तज्ज्ञांनुसार, माणसांच्या, प्राण्यांच्या विष्ठेमध्ये ‘इकोलाय’ हा जिवाणू असतोच, मात्र हा जिवाणू जेव्हा पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून येतो, तेव्हाच ते पाणी पूर्णपणे दूषित मानण्यात येते. त्याचबरोबर नाल्याच्या पाण्यामध्ये हे जिवाणू असतातच आणि जेव्हा नाल्याचे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळले जाते, तेव्हा असे पाणी हमखास दूषित होण्याची शक्यता असते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जामुळे शेअर ट्रेडरची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑनलाइन शेअरची खरेदी विक्री करणाऱ्या ट्रेडरने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजीनगर भागात रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. जितेंद्र दामोदर शहा (वय ४९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शहा यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये, कर्जाच्या तगाद्यामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहा यांचा ऑनलाईन शेअर्स ट्रेडिंगचा व्यवसाय होता. त्यांच्या पत्नी नातेवाईकासोबत शनिवारी रात्री हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. शहा यांची आई व मुलगा हे दोघे घरी होते. रात्री जेवण झाल्यानंतर शहा बेडरुममध्ये झोपण्यास गेले. पहाटे साडेपाच वाजता त्यांची आई त्यांन उठवण्यासाठी गेली. यावेळी शहा यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शहा यांच्या घरातून आक्रोश एकू आल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. शहा यांना तात्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक एकनाथ चव्हाण याप्रकरणी तपास करीत आहेत.

जाचामुळे आत्महत्या
शहा यांनी मृत्यूपूर्वी पत्र लिहून ठेवले होते. ते पोलिसांनी हस्तगत केले आहे. डॉ. बिंद्रा यांच्या कर्जाच्या तगाद्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत नमूद असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ फटाका उद्योगातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

$
0
0

म. टा. उस्मानाबाद
वाशी तालुक्यातील इंदापूर येथील फटाक्याच्या कारखान्यात शनिवारी झालेल्या स्फोटानंतर इंदापूरसह तेरखेडा येथील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा
ऐरणीवर आला आहे. नियम धाब्यावर बसवून फटाका निर्मिती करणारे कारखाने आणि अवैधपणे होणारा फटाक्यांचा साठा याकडे पोलिस व जिल्हा
प्रशासनाकडून वेळीच लक्ष दिले जाणार का, असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील ‘शिवकाशी’ अशी ओळख असलेल्या तेरखेडा जवळील इंदापूर येथे शनिवारी सकाळी फटाका निर्मिती करणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. या घटनेत एका कामगाराला प्राण गमवावे लागले तर एकजण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर महसूल पथकाने व पोलिसांनी इंदापूर येथील या कारखान्याला भेट दिली आणि तपासणी करीत चौकशी केली. तेरखेडा येथे फटाका निर्मिती करणारे सुमारे २० कारखाने आहेत. तर वाशी तालुक्यात २३ उद्योजक फटाक्यांची निर्मिती करतात. यामध्ये इंदापूरचाही समावेश आहे. याशिवाय फटाक्यांची विक्री करणारे ५० हून अधिक परवानाधारक तेरखेडा येथे आहेत. तेरखेडा येथील फटाका उद्योग हा गावाला खेटून आहे. तेरखेडा हे गाव सोलापूर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर आहे.
८ जुलै २०१४ रोजी तेरखेडा येथे दोन कारखान्यावर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला. मे २०१६ मध्ये तेरखेडा येथे
फटाका कारखान्यातील एका गोदामात स्फोट झाला. मात्र, यावेळी जीवितहानी झाली नाही. मात्र, यावेळी या कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
१९८५ पासून १८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत तेरखेडा व इंदापूर येथील विविध फटाका कारखान्यात १८ जणांना जीव गमवावा लागला. स्फोटासारखी एखादी घटना घडली की एक-दोन दिवस चर्चा होते. त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न
अशी येथील स्थिती आहे. शिवकाशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तेरखेडा येथील फटाका उद्योगाचा विस्तार व्हावा यासाठी तेरखेडा येथे २००८ मध्ये औद्योगिक वसाहतीची घोषणा करण्यात आली. मात्र,यानंतर ही औद्योगिक वसाहत विकसित करून येथील उद्योजकाना उद्योग वाढीसाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न करण्यात आले नाही.
या औद्योगिक वसाहतीचा लाभ फटाके उद्योगांना व्हावा यासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा उद्योग केंद्राने देखील फारशी मेहनत घेतल्याचे दिसून येत नाही.
तेरखेडा येथे फटाका उद्योगातील कामगार राहात असलेल्या वसाहतीत तर सर्वच घरातून बेकायदेशीर व अनधिकृतपणे हा व्यवसाय चालतो. दिवाळीतील उत्सवी वातावरणाला अधिक दणाणून आणि झळाळून सोडणारे फटाके म्हणून तेरखेडा
येथील फटाक्यांचा खास उल्लेख केला जातो. तेरखेडा व इंदापूर येथे मोठ्या प्रमाणात हँडमेड फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथील फटाक्यांना महाराष्ट्रासह
परप्रांतातून मोठी मागणी असते. फटाके उद्योगाचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारने २००८ मध्ये तेरखेडा येथे औद्योगिक वसाहत जाहीर केली.या घोषणेला आता सुमारे दहा वर्षाचा कालावधी लोटला, परंतु यानंतर पुढे कोणतीही
हालचाल झाली नाही. शिवाय यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणाऱ्या मंडळींनीही फारशी तसदी घेतलेली नाही.
तेरखेडा येथील व परिसरातील वाढता फटाका उद्योग पाहाता येथे फटाका उद्योगाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे
आहे. याशिवाय नागरी वस्तीतील हा उद्योग येथील औद्योगिक वसाहत विकसित करून, तेथे स्थलांतरित करणे गरजेचे आहे. तसेच अनधिकृतपणे फटाक्यांची
निर्मिती व साठा करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. तरच तेरखेडा व परिसरातील नागरिक चिंतामुक्त झोप घेवू शकतील. तेरखेडा येथील फटाका उद्योग हा सोलापूर-औरंगाबाद या महामार्गावर उस्मानाबाद पासून सुमारे ४२ किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय हा फटाका उद्योग या महामार्गावरच रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या नागरी वस्तीतच उभारलेला आहे. या नागरी वस्तीत फटाका कामगारांची लहान-मोठी शिवाय झोपडीवजा
दीडशेहून अधिक घरे आहेत. या सर्व घरातून विनापरवाना फटाक्यांची निर्मिती व साठा केला जातो. या वसाहतीत स्फोटासारख्या घटना अधूनमधून घडत असल्याने येथील कुटुंबियांना आणि तेरखेडावासीयांना सतत जीव मुठीत घेऊनच वावरावे लागते. तेरखेडानजीक असलेल्या इंदापूरमध्ये सुद्धा आता फटाका निर्मितीचा विस्तार होऊ लागला असून, तेथेही तेरखेडा सारखीच परिस्तिथी बनत चालली आहे.

आर्थिक मदतीचा अभाव
फटाका स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे मदत देण्यात कंजूषपणा दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. कारखानदाराकडून देण्यात येणारी मदतही तुटपुंजी असते. अशा घटनांमध्ये शासनाकडून मदत देण्यात यावी. फटाका उद्योगातील धोकादायक कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना रोजगार व सुरक्षेची हमी देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सानिका, यज्ञ यांना विजेतेपद

$
0
0

सानिका, यज्ञ यांना विजेतेपद
औरंगाबादचा अर्णव पांगारकर उपविजेता
राष्ट्रीय टेनिस स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुजरातचा यज्ञ पटेल, अहमदनगरची सानिका भोगाडे यांनी बारा वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे मुलांच्या व मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले.
विभागीय क्रीडा संकुलातील एन्ड्युरन्स टेनिस सेंटरमध्ये रविवारी या स्पर्धेचा समारोप झाला. मुलांच्या एकेरीच्या अंतिम लढतीत यज्ञ पटेलने औरंगाबादच्या अर्णव पांगारकरचा ३-६, ६-३, ६-० असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत यज्ञने नाशिकच्या आर्यन काळेवर ९-८ (७) असा विजय नोंदवून अंतिम फेरी गाठली होती. अर्णवने उपांत्य फेरीत पुण्याच्या पार्थ देवरूखकरला ९-५ असे पराभूत केले होते.
मुलींच्या एकेरीत सानिका भोगाडेने मुंबईच्या उर्वी काटेला ६-०, ६-२ असे नमवून विजेतेपद पटकाविले. तत्पूर्वी, उपांत्य सामन्यात सानिकाने साताऱ्याच्या सैसा कारेकरवर ९-२ अशी सहज मात केली. उर्वी काटेने याग्मासिमी चक्रवर्तीविरुद्ध ९-७ असा विजय नोंदवला होता. विजेत्यांना सौरभ कटियार यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी आशुतोष मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपांत्यपूर्व फेरीचे निकाल : मुले - अर्णव पांगारकर (औरंगाबाद) वि. वि. नीरज रिंगणगावकर (औरंगाबाद) ८-२, पार्थ देवरूखकर (पुणे) वि. वि. अन्सुन पाटील (नाशिक) ८-२, आर्यन काळे (नाशिक) वि. वि. आदित्य भटेवरा (पुणे) ८-०, यज्ञ पटेल (गुजरात) वि. वि. लक्ष्य गुजराथी (नाशिक) ८-२.
मुली - सानिका भोगाडे (अहमदनगर) वि. वि. ऋषिका डोईफोडे (नांदेड) ८-२, सैसा कारेकर (सातारा) वि. वि. रिधिमा शॉ (नागपूर) ८-१, याग्मासिमी चक्रवर्ती (मुंबई) वि. वि. अद्वैती चव्हाण (औरंगाबाद) ८-०, उर्वी काटे (मुंबई) वि. वि. मृण्मयी जोशी (औरंगाबाद) ८-०.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायलसीमेची रॅक धूळ खात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड विभागातून औरंगाबाद मार्गे दिल्ली किंवा अन्य मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत मागणी केल्यानंतर रॅक नसल्याचा विषय पुढे केला जातो. मात्र, नांदेड विभागात गेल्या २० दिवसांपासून १८ डब्ब्यांची रेल्वे रॅक पडून आहे. या रेल्वे रॅकच्या वापराबाबत अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही.
सिकंदराबाद ते तिरूपती या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली रायलसीमा रेल्वेचा विस्तार करण्यात आला आहे. सिकंदराबादहून निघणारी रायलसीमा निजामाबादहून सुरू करण्यात आली आहे. निजामाबाद ते तिरूपती या मार्गासाठी रॉयल सीमा गाडीला नवीन रॅक देण्यात आला आहे. आता ही रेल्वे सुपर फास्ट झालेली आहे. रायलसीमासाठी नवीन रॅक आल्यानंतर नेहमीप्रमाणे जूना रॅक मराठवाड्यांच्या प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने पाठवून दिला आहे. साधारणतः वीस दिवसांपूर्वी आलेल्या रायलसीमा रेल्वेचे १८ डब्बे नांदेडच्या भोकरजवळील डिंबारी रेल्वे स्टेशनच्या चौथ्या फलाटावर उभी आहे.
रायलसीमेचा रॅक पुनवापराबाबत नांदेड विभागाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मराठवाड्यातून दिल्लीसाठी नवीन रेल्वेची मागणी केली जात आहे.
रॅक नसणे, परवानगी मिळाली नाही. या नावाखाली मराठवाड्यातील जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यात येत नाहीत. मात्र गेल्या २० दिवसांपासून विनावापर पडलेल्या रायलसीमा रेल्वेचा रॅकचा वापर होत नसल्याने, रेल्वेचे होत असलेल्या आर्थिक नुकसानाबाबत नांदेड विभागाकडून कोणतेही उत्तर मिळत नाही.
...........
आंध्राच्या प्रवाशांसाठी रॅकचा वापर होण्याचा अंदाज
रायलसीमा रेल्वेच्या पडलेल्या २८ डब्ब्याची रॅक मराठवाड्यातील प्रवाशांच्या मागणीनुसार न देण्याचा निर्णय दमरेच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ही रॅक शिर्डी ते तिरूपती या मार्गावर किंवा आंध्र प्रदेशाच्या प्रवाशांसाठी वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
..............
रायलसीमा रेल्वेची रॅक नांदेड विभागाकडे पाठविण्यात आलेली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून मंजूर झालेल्या मार्गावर ही रॅक चालविण्यात येईल. ही रॅक वापरण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती न दिल्याने, ही रॅक पडून आहे.
डॉ. ए. के. सिन्हा, विभागीय व्यवस्थापक, नांदेड रेल्वे विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तेजस्विनीची भारतीय संघात निवड

$
0
0

तेजस्विनीची भारतीय संघात निवड
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोईमतूर येथे झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या तेजस्विनी सागरने मुलींच्या गटात चौथे स्थान मिळविले. या कामगिरीमुळे तिची आशियाई बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
तेजस्विनी सागरने १७ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत गुजरात राज्याचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत ११ पैकी ८ गुण मिळवून ती चौथ्या स्थानावर राहिली. यांपैकी सहा डावांत तिने विजय मिळविले, तर चार डाव बरोबरीत सोडवले. एका डावात तिला पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी, ६५ दिवसांच्या स्पेन दौऱ्यामध्ये तेजस्विनी सात स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती. आशियाई बुद्धिबळ स्पर्धेच्या तयारीसाठी तेजस्विनी पुन्हा स्पेनमध्ये जाऊन विशेष प्रशिक्षण घेणार आहे. भारतासाठी पदक जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे तेजस्विनीने सांगितले. यापूर्वी २००८ व २०१० मध्ये तेजस्विनीने आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे ब्राँझ व रौप्यपदक जिंकले होते. या कामगिरीबद्दल व्हेरॉक उद्योग समुहाचे सहाय्यक उपाध्यक्ष सतीश मांडे व राहुल टेकाळे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पोकन इंग्लिश’चे शिक्षकांसाठी वर्ग

$
0
0

‘स्पोकन इंग्लिश’चे शिक्षकांसाठी वर्ग
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सरकारी शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी शिकविण्यासाठी शिक्षण विभाग या महिन्यात शिक्षकांचे खास वर्ग घेतला जाणार आहेत. फेसबूक, मोबाइल अॅपसह सोशल मीडियाचेही प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे. पुढच्या आठवड्यात हे प्रशिक्षण विभागवार घेतले जाणार आहे.
मराठी शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची भीती वाटते. या विद्यार्थ्यांनी इंग्रजी बोलावे या हेतुने अनेक शिक्षक प्रयत्न करतातही, परंतु पद्धतीत सुधारणा व्हावी या हेतूने शिक्षण विभाग या शिक्षकांचे वर्ग घेणार आहे. राज्य आंग्ल भाषा विभागाने त्यासाठी खास अभ्यासक्रम, अॅपही तयार केले. आता २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पाच विभागात राज्यस्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात इंग्रजी शिकविण्याची पद्धती, शिक्षणाबाबतचे अॅप, फेसबूक, ट्विटर, मोबाइल डिक्शनरीचा वापर याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंग बदल केल्यास 'तिला' नोकरी गमवावी लागणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

आपल्यात पुरुषी लक्षणं असल्याचं सांगत लिंग बदलासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागणाऱ्या बीड पोलिसाला दलातील महिला पोलिस कॉन्स्टेबलला परवानगी नाकारण्यात आली आहे. लिंग बदलल्यास नोकरी गमवावी लागेल, असं पोलीस दलाकडून या महिलेला सांगण्यात आल्यानं या महिलेसमोर पेच निर्माण झाला आहे.

आपल्यात पुरुषी लक्षणं असल्यानं आपण दीर्घकाळ महिला बनून राहू शकत नसल्याचं सांगत लिंग बदल करण्यासाठी परवानगी द्यावी आणि त्यासाठी आपल्याला सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवी यांनी राज्याचे उपमहाप्रबंधक सतीश माथूर यांच्याकडे केला होता. लिंग बदलानंतर नोकरीला कायम ठेवण्याची विनंतीही तिने या पत्रात केली होती. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी तिला लिंग बदल करण्यास परवानगी नाकारली आहे. 'या महिलेचा अर्ज रद्द करण्याचा आदेश आम्हाला मिळाले आहेत,' असं बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितलं.

'लिंग बदल करण्याचा निर्णय ही व्यक्तिगत बाब असली तरी ही महिला पोलीस खात्यात असल्यानं तिला परवानगी देणं शक्य नाही. पोलीस सेवा नियमातही ते बसत नाही. तसं केल्यास तिला नोकरी गमवावी लागू शकत असल्यानंच तिला ही परवानगी नाकारण्यात आली आहे,' असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिटेक्निक परीक्षेत ‘व्हॉटस्अॅप’ कॉपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पॉलिटेक्निक परीक्षेत सोमवारी व्हॉट्सअॅपद्वारे कॉपी करण्याचा प्रकार उघड झाला. सिव्हील शाखेचा ‘काँक्रिट टेक्नॉलॉजी’चा पेपर विद्यार्थी चक्क आलीशान गाडीत सोडवित होते. शरदचंद्र पवार कॉलेज पॉलिटक्निक परीक्षा केंद्रावर प्रकार घडला. वॉट्सअॅपवर परीक्षार्थी प्रश्नपत्रिका बाहेर पाठवायचे तर, गाडीमध्ये बसलेले उत्तरे परीक्षा केंद्रावर पोहचवायचे. हा प्रकार घडत असताना तंत्रशिक्षण मंडळाचे बडे अधिकारी दौऱ्यांमध्ये व्यस्त होते. या प्रकरणात पोलिसांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यासह एकाला अटक केली आहे.

औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या कॉलेजमध्ये आज पॉलिटेक्निक तृतीय वर्षाचा पेपर होता. हाच पेपर सोडविण्याचा ‘उद्योग’ बाहेरही सुरू होता. ही खबर पोलिसांना कळताच त्यांनी धडक कारवाई केली. सकाळी ९.३० ते १२.३० दरम्यान, हा पेपर होता. माहिती मिळताच पोलिस केंद्रावर गेले तेव्हा काही विद्यार्थी केंद्राबाहेर आलीशान गाडीत पेपर सोडविताना दिसले. मोबाइलमध्ये वॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रश्नपित्रकेचा फोटो बाहेर पाठवत होते आणि तो प्रश्न पाहून कॉलेजबाहेर कारमध्ये बसलेले काहीजण पुस्तकातून त्याचे उत्तर कापून ती चिठ्ठी आतमध्ये पाठवित होते. या प्रकरणी पोलिसांनी गाडीतील तीन जणांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर परीक्षार्थींपैकी दोन जण असे पाच जणांना सुरुवातीला ताब्यात घेतल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाल यांनी माहिती दिली. ताब्यात घेतलेल्यांत एका मुलीचा समावेश आहे. पोलिसांना कॉलेजमधील कर्मचाऱ्यांवरही संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. एवढे सगळे घडल्यावरही कॉलेजचे प्राचार्य शैलेंद्र अंभोरे यांनी मात्र हात वर करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनीच पोलिसांकडे याची तक्रार दिली. इंजिनीअरिंग पेपर नगरसेवकाच्या घरी लिहण्याचा प्रकार, महाजनको हायटेक कॉपी प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार आता समोर आला आहे.

तंत्रशिक्षण मंडळाचे अधिकारी दौऱ्यावर

हा प्रकार घडत असताना तंत्रशिक्षण मंडळाचे (एमएसबीटीई) उपसचिव डॉ. आनंद पवार, डॉ. मानकर हे दुसऱ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. परीक्षेच्या दरम्यान, एकाने विभागीय कार्यालयात असणे आवश्यक असताना दोघेही दौऱ्यावर निघून गेले. हा प्रकार उघड झाल्याच्या काही वेळानंतर मंडळाचे अध्यक्ष डॉ. अभय वाघ यांच्याशी संपर्क केला असता त्यांना यासंदर्भात काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले तर, सचिव डॉ. विनोद मोहितकर यांनी अधिकारी औरंगाबादमध्येच असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात अधिकारी दौऱ्यावर होते. या सगळ्या गोंधळात मंडळाचा गलथान कारभारही समोर आला. चौकशी समिती स्थापन करत, चौकशी केली जात असल्याचे विभागीय उपसचिवांनी ‘मटा’ला सांगितले.

दोघांना अटक, एक पसार

भालगाव शिवारातील शरदचंद्र पवार पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये सोमवारी सामुहिक कॉपी प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात विद्यापीठ अॅक्ट, फसवणूक, कट रचणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजचे प्राचार्य शैलेंद्र अंभारे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी परीक्षा देणारा विद्यार्थी रवींद्र उत्तम पवार आणि त्याला बाहेरून मदत करणारा साथीदार अक्षय त्र्यंबक सरकटे (वय २२, रा. देवखेडा ता. सिंदखेडराजा) याला अटक केली आहे. तसेच एका तरुणीला देखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा आणखी एक साथीदार अक्षय जोगदंड पसार झाला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. आरतीसिंह, अप्पर अधिक्षक उज्वला वनकर, डिवायएसी अशोक आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सत्यजीत ताईतवाले, पीएसआय सुधाकर चव्हाण, नारायण कटकुरी, थोटे, सुनील गोरे, दीपक इंगळे, संतोष टिमकीकर, नामदेव इजलकुंठे व छाया राठोड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी अभियंते वेतनाच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेत आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेले कंत्राटी तत्त्वावरील अभियंते तीन महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. कंत्राटदाराने वेतन न दिल्यास काम करणे कठीण होईल, अशी भावना काही अभियंत्यांनी व्यक्त केली आहे.

मनुष्यबळ कमी असल्यामुळे कंत्राटी पद्धतीने अभियंते नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेत घेण्यात आला होता. त्यानुसार तीन महिन्यापूर्वी सुमारे शंभर अभियंत्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. विशिष्ट वेतन त्यांच्यासाठी ठरविण्यात आले. विद्युत, बांधकाम, रस्ते विकास, घरकुल योजना यासह विविध विभागांसाठी या अभियंत्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नियुक्ती झाल्यावर एकच पगार अभियंत्यांना मिळाला आहे. त्यानंतर पगारच देण्यात आला नाही. कंत्राटी पद्धतीवर अभियंत्यांची नियुक्ती करणाऱ्या एजन्सीकडे वेतनासाठी दाद मागितली, तर त्याला प्रतिसाद दिला जात नाही. आम्ही आमच्या पद्धतीने वेतन देऊ. वेतनासाठी तुम्हाला वाट पहावीच लागेल, असे अभियंत्यांना बजावले जात आहे.

काही अभियंत्यांनी महापालिकेत सेवा करण्याची संधी मिळते म्हणून कंपनीमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली. काहीजणांनी उधारी करून कंत्राटी पद्धतीने सेवा मिळवली. आता पगारच होत नसल्यामुळे सर्वजण त्रस्त झाले आहेत. महापौर व आयुक्तांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार्ट-अप वीकएंडसाठी १२५ नवउद्योजकांचे अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील विद्यार्थी, बेरोजगारांना प्रोत्साहन देण्यासाठी जीआयझेड व सीएमआयएतर्फे आयोजित स्टार्ट-अप-वीकएंडमध्ये सामील होण्यासाठी १२५ अर्ज आले आहेत. हा उपक्रम एक ते तीन डिसेंबर होणार आहे. या अर्जांची छाननी करण्यात येऊन त्यापैकी ५० संकल्पनांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी दिली.
शहरातील इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निकसह इतर कॉलेजांमध्ये या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे. डिजिटायझेशन, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आदींसारख्या नवीन तंत्रज्ञानाची कल्पना सक्षम उद्योजकांना द्यावी; तसेच एक उद्योग निर्माण करून तो चालवण्यास त्यांना पाठिंबा, मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्य देता यावे, असा प्रयत्न आहे, असे कोकीळ यांनी सांगितले. जर्मन फेडरल एंटरप्राइज जीआयझेडचे सहकार्य लाभले आहे. स्टार्ट अपची उत्तम कल्पना मांडणीसाठी पुरस्कारही दिला जाणार आहे. नावनोंदणी २२ नोव्हेंबरपर्यंत आहे. निवडक ५० जणांना निमंत्रित केले जाणार आहे, असे कोकीळ यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्टसिटी’ला लवकरच गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्टसिटी योजनेतील सुमारे दहा प्रकल्प निविदा प्रक्रियेच्या उंबरठ्यावर आहेत. औरंगाबादच्या स्मार्टसिटी योजनेचे मार्गदर्शक सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली ३० नोव्हेंबर रोजी बैठक होणार असून, या बैठकीनंतर निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश झाल्यानंतर आता प्रथमच या योजनेतील विविध प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी पालिकास्तरावर तयारी केली जात आहे. स्मार्टसिटी योजनेचे मार्गदर्शक अपूर्व चंद्रा यांच्या जागी शासनाने उद्योग खात्याचे प्रधानसचिव सुनील पोरवाल यांची नियुक्ती केली आहे. पोरवाल यांच्या उपस्थितीत ३० नोव्हेंबर रोजी स्पेशल पर्पज व्हेकलची (एसपीव्ही) बैठक होणार आहे. या बैठकीत विविध कामांचे प्रस्ताव ठेवले जाणार आहेत. स्मार्टसिटी योजनेचे नोडल ऑफिसर सिकंदर अली यांनी याबद्दल सांगितले की, स्मार्टसिटी योजनेत मास्टर सिस्टीम इंटिरेटरअंतर्गत विविध उपक्रम सुरू केले जाणार आहेत. त्यात वायफायस किऑस, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, सेन्सरसह आधुनिक बसथांबे, एलईडी डिस्प्ले, स्मार्ट पार्किंग, सेक्युरिटी सर्व्हिसेस, सेंट्रल कमांड सेंटर, स्मार्ट ऑफिस, आयपी फोन्स या समावेश आहे. याशिवाय अर्बन ट्रांसपोर्ट मोबिलिटीअंतर्गत सिटीबस सेवा, चौकांचे सुशोभीकरण, स्मार्टरोड याचा समावेश करण्यात आला आहे. सोलार पॅनल्स, घनकचरा व्यवस्थापन यांचाही समावेश स्मार्टसिटी योजनेत असून, या सर्व कामांचे प्रकल्प अहवाल तयार आहेत. पोरवाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या एसपीव्हीच्या बैठकीत प्रकल्प अहवालांना मान्यता मिळाल्यावर लगेचच टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल. पुढील काही महिन्यात प्रत्यक्ष कामे सुरू झालेली असतील असा दावा त्यांनी केला.

दर आठवड्याला आढावा
स्मार्टसिटी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेतली जाईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. आढावा बैठकीमुळे कामांना गती येईल. कामांवर योग्य नियंत्रण देखील राहील, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपीचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेला शीतपेयातून मद्य पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना चिकलठाणा परिसरात घडली होती. या प्रकरणातील आरोपी बाळू उर्फ बाळासाहेब ठोंबरे (वय २७, रा. आडगाव) याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. एस. एस. नायर यांनी फेटाळला.
मुकुंदवाडी परिसरातील २२ वर्षीय विवाहितेला २ नोव्हेंबर रोजी तिचा मित्र व आरोपी अनिल ठोंबरे वाढदिवसाच्या पार्टीसाठी दुचाकीवर घेऊन गेला होता. आरोपीने त्याचे इतर तीन अनोळखी मित्र व विवाहितेसोबत शेंद्रा एमआयडीसीत एका ज्वारीच्या शेतात पार्टी केली. त्यानंतर पीडितेला मद्यपाजून चौघांनी तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी आरोपी अनिल ठोंबरे व आरोपी जगदीश प्रसाद ठोंबरे यांना अटक करुन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. तिसरा आरोपी बाळू उर्फ बाळासाहेब याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे, कपडे जप्त करणे बाकी असून, जामीन मंजूर केल्यास फिर्यादीवर दबाव आणू शकतो. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील अजित अंकुश यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीत ३० कोटींची कामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कृषी उत्पन्न बाजार समितीत पायाभूत सुविधांसह विकासाची सुमारे ३० कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. या कामांच्या प्रस्तावाला सोमवारी संचालक मंडळांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बाजार समितीतील अंतर्गत रस्त्यांसाठी पाच कोटींची आणि कमर्शिअल कॉम्प्लेक्ससाठी तब्बल १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बाजार समितीची संचालकांची मासिक बैठत समितीच्या सभागृहात सोमवारी दुपारी बैठक पार पडली. त्यात विविध विकास कामांसह मोंढा स्थलांतरावर चर्चा करण्यात आली. बैठकीत मांडलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये बाजार समितीतील अंतर्गत सर्व मुख्य रस्त्यांचे काँक्रिटिकरण, तर अतंर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कमर्शिअल कॉम्प्लेक्ससाठी तब्बल १७ कोटींची तरतूद करण्यात आली. यासह कांद्यासाठी नवे मार्केट, भाजीमंडई २४ तास सुरू रहावी म्हणून पत्र्यांचे शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली.

बाजार समितीत चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून सुरक्षा मंडळात बदल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे बाजार समितीची सुरक्षा असून, येथे असलेल्या कर्मचाऱ्यांऐवजी नवीन कर्मचारी भरण्यात यावेत, असा प्रस्ताव सभेत मंजूर झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती ठोंबरे, बाजार समितीचे सचिव विनोद शिरसाठ यांच्यासह संचालक उपस्थित होते.

बंद गाळ्यांचा लिलाव करणार
बाजार समितीत ड्रेनेज लाइन, स्वच्छतागृहांची उभारणी, भाजीमंडईत गट्टू बसविणे, किराणा मार्केट उभारणे, नव्याने कांदा मार्केट उभारणे आदी निर्णय घेण्यात आले. कांदा मार्केटमध्ये २५ गाळे उभारण्यात येणार आहे. फळेभाजीपाला मार्केटमधील एक ते २० दुकाने, पाठीमागील जागा भाड्याने देणे, मुख्य बाजार आवारातील बंद असलेल्या गाळ्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करणे, बंद गाळ्यांचा जाहीर लिलाव करणे, फुल मार्केटच्या उभारणीचे काम सुरू करणे आदींना मंजुरी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेभरणीचे थर्डपार्टी इन्स्पेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतर्फे सध्या शहराच्या विविध भागात रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे काम सुरू असतानाच त्याचे ‘थर्डपार्टी इन्स्पेक्शन’ करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना दिले. येत्या १५ डिसेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करण्याचा संकल्प देखील त्यांनी केला. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद शहरात रस्त्यांवर चार हजार ४८६ खड्डे असल्याचे समोर आले होते.

शहरातील बहुतेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. शासनाच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू होण्यास अवधी आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी पॅचवर्कच्या कामांचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेची नऊ वॉर्ड कार्यालयांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्यात आले. सध्या काही प्रमुख रस्त्यांवर पॅचवर्कची कामे केली जात आहेत.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी पॅचवर्कच्या कामाचा आढावा घेतला. कामे गतीने सुरू असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खड्डेमुक्त शहरासाठी यापूर्वी ३० नोव्हेंबर ही तारीख ठरविण्यात आली होती, पण तोपर्यंत हे काम पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे खड्डेमुक्तीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. शहर १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त होईल, असा दावा त्यांनी केला.

खड्डेमुक्तीची नागरिकांची मागणी आहे आणि हायकोर्टाचे देखील आदेश आहेत. त्यामुळे पॅचवर्कची कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. काम करताना दर्जामध्ये तडजोड केली जाणार नाही. निकषानुसारच पॅचवर्कचे काम केले जाईल. काम सुरू असतानाच त्याचे थर्डपार्टी इन्स्पेक्शन व्हावे, अशी कल्पना आहे. म्हणजे एखाद्या वॉर्ड कार्यालयाच्या अंतर्गत चुकीचे काम होत असेल, तर ते लगेचच दुरुस्त करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

थर्डपार्टी इन्स्पेक्शनसाठी तातडीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाशी संपर्क साधा, असे आदेश महापौरांनी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना दिले. या तपासणीचा खर्च महापालिका करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात पंधरा मिनिटांत घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पंधरा मिनिटात माजी सैनिकाचे घर फोडून ४७ हजारांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. हा प्रकार सोमवारी सकाळी सव्वाआठ ते साडेआठच्या दरम्यान सातारा परिसरात घडला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपूरचंद सांडू वाघ (वय ५१, रा. रोहिदास सोसायटी) हे माजी सैनिक पत्नी, मुलगा, सुनेसह वास्तव्यास आहे. त्यांची पत्नी, मुलांसह रविवारी सकाळी पंढरपूर येथे नातेवाईकाच्या लग्नाला गेली असल्याने घरी वाघ एकटेच होते. सकाळी सव्वा आठ वाजता घराचा समोरील दरवाजा लावून ते मेडिकलवर औषधी आणण्यासाठी गेले. मात्र, घराचा दुसरा दरवाजा चुकीने उघडाच राहिला. वाघ हे पंधरा मिनिटांनी परत आले, त्यांनी समोरचा दरवाजा उघडल्यानंतर दुसऱ्या दरवाज्याने कोणीतरी घरात शिरल्याची जाणीव झाली. त्यांनी पाहणी केली असता चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट उघडल्याचे दिसून आले. कपाटातील लॉकरला चावी देखील तशीच होती. चोरट्यांनी कपाटातील सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याचे नाणे, रोख साडेनऊ हजार रुपये आदी ४७ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड जवळ ट्रॅव्हल्स उलटली; आठ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर पालोदजवळील खेळणा फाट्यावर इंदूरहून औरंगाबादला जाणारी ट्रॅव्हल्स उलटल्याने आठ प्रवाशी जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता झाली.
इंदूर येथून औरंगाबादला जाणारी ट्रॅव्हल्सच्या (यू पी ७५ एम ८७१४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली. यावेळी बस तीन झाडांना धडकून रस्त्याखाली उलटली. या बसमध्ये १७ प्रवासी होती. या अपघातात नामदेव विठोबा देवकते (वय ७५, रा. इंदूर), शबाजा आय्युब खान (वय २७, रा. औरंगाबाद), वैभव महेश चोपडा (वय ३२, रा. इंदूर), मोहन सदाशिव देवळालीकर (वय ६५ रा इंदूर), दीपाली राहुल सोनार (वय २८, रा. औरंगाबाद), बाळासाहेब भगवान साबळे (वय ३४ रा. औरंगाबाद), रोहिनसिंग मुन्ना (वय २७ रा. इंदूर), श्रावणसिंह राजपूत (वय २३, रा. धामनोत) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमोपचार करण्यात आले. रोहिनसिंग मुन्ना व श्रावणसिंह राजपूत यांच्यावर प्राथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images