Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निर्भया फंडांमधून २७ कॅमेरे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वेने प्रत्येक विभागात सुरक्षा व्यवस्थेचे नूतनीकरण, अद्यायावतीकरण यांसाठी निर्भया फंड हा विशेष निधी जाहीर केला होता, मात्र त्याचा खर्च करण्यात आला नव्हता. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अखेर हा निधी खर्च करण्यास सुरवात होणार आहे. या निधीतून औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे २७ सीसीटीव्ही कॅमेरे डिसेंबरअखेर पर्यंत बसविण्यात येणार आहेत.

औरंगाबाद स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्याबाबत रेल्वे सुरक्षा दलाकडून दक्षिण मध्य रेल्वेला प्रस्ताव पाठविण्यात आला. वर्षभरापूर्वी निर्भया फंडचा ६६ कोटीचा निधी दक्षिण मध्य रेल्वेकडे पडून होता. याबाबत ‘मटा’ने ३१ जुलैच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली होती. यानंतर दक्षिण मध्य रेल्वेला जाग आली आहे. त्यांनी ६६ कोटी रुपयांमधून विविध रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.

निर्भया फंडातून औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे २७ कॅमेरे बसविण्यात येणार आहे. हे कॅमेरे ३१ डिसेंबरपर्यंत बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

४० कॅमेरांची गरज
निर्भया फंडातून २७ कॅमेरे रेल्वे स्टेशन बसविण्यात येणार आहे. ‘आरपीएफ’कडून औरंगाबाद स्टेशनमध्ये ४० कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. याशिवाय आठ मेटल डिटेक्टरचीही मागणी करण्यात आली होती. मेटल डिटेक्टरबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपीमध्ये रेकॉर्ड वर्गीकरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य सरकारने सरकारी कार्यालये अद्ययावत राहावीत, यासाठी झिरो पेंडन्सी उपक्रम राबविण्याबाबत सरकारी कार्यालयांना सूचना केल्या आहेत. वर्षानुवर्षे कागदांचे पडून राहिलेले गठ्ठे कार्यालयातून काढून त्याचे वर्गीकरण करण्याबाबत आदेशित केले गेले होते. महिनाअखेर याचा आढावा घेतला जाणार आहे. त्या अनुषंगाने शनिवारी सरकारी सुटी असूनही जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात रेकॉर्ड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

झिरो पेंडन्सी उपक्रमांतर्गत सरकारी कार्यालयातील रेकॉर्डचे अ, ब, क आणि ड असे वर्गीकरण करण्यात येत आहे. ३० वर्षांपर्यंतचे रेकॉर्ड, दहा वर्षांपर्यंतचे रेकॉर्ड, एक वर्षाच्या आतील रेकॉर्ड आणि चालू फायलींचे रेकॉर्ड असे त्याचे वर्गीकरण आहे. जुन्या फायलींच्या रजिस्टवर नोंदी घेऊन त्या कार्यालयाच्या मुख्य रेकॉर्ड रुममध्ये जमा करणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून या कामाला सुरवात झाली आहे. पंचायत विभागात शनिवारी सुटीदिवशी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत बसून फायलींचे वर्गीकरण केले. दुपारच्या सत्रात सर्वांनी एकत्र बसून भोजन घेतले. कामात अधिक सुत्रबद्धता राहावी, यासाठी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशनच्या (मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक) सदस्यांना चर्चेसाठी बोलाविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘भाषण’ नाही, केवळ ‘कृती’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आता भाषणबाजी बंद कृतीवरच अधिक भर देणार असून, आगामी निवडणुका लक्षात घेता बूथ यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी खास उपाययोजना हाती घेतल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्यासाठी विभागीय बैठका घेण्यासाठी राज्याचा दौरा सुरू केल्याचे नमूद केले. दरम्यान, नॅशनल हायवेकडून मिळालेल्या पैशांतून थकित वीज बिल भरून करून जालना शहरातील बंद पथदिवे पुन्हा सुरू करणार, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे यांनी शुक्रवारी महाराष्ट्र टाइम्स कार्यालयात सदिच्छ भेट दिली. त्याप्रसंगी संपादकीय विभागाच्या सहकार्याशी त्यांनी संवाद साधला. काही अपवाद वगळता राज्यात सध्या तरी कोणत्याही निवडणुका नाही. आता थेट लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर असून, संघटनात्मक पातळीवरील राहिलेल्या कामावर आता पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. ‘भाषण’ बंद, केवळ ‘कृती’, असे त्यांनी नमूद केले.

राज्यात ९१ हजार बूथ असून, त्यापैकी ७० टक्के बूथ स्थापन करण्यात आहेत. ‘वन बूथ २५ यूथ’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, या बैठकांच्या माध्यमातून हे बूथ अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत पुढील तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले केले. विधान परिषद निवडणुकीचा उमेदवार लवकरच जाहीर करू, असे सांगत त्यांनी, काही नावे दिल्लीला पाठविल्याची माहिती दिली.

जालना होणार प्रकाशमान
जालना - अंबड नगर पालिकेची जुनी संयुक्त जलवाहिनी आहे. नवीन योजना कार्यान्वित झाल्यानंतर या जुन्या जलवाहिनीमधून पाणीपुरवठा बंद असून, येडशी-औरंगाबाद या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान रस्त्यालगत असलेली ही जुनी वाहिनी हटविणे आवश्यक होते. याप्रकरणी १२ कोटी ३४ लाख रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्राप्त झाले आहेत. या रक्कमेतून अंबड नगरपालिकेचा वाटा देऊन उर्वरित रक्कमेतून जालना शहरातील बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरू केले जातील. थकित वीज बिल अदा केले जाईल, अशी माहिती दानवे यांनी दिली. नगरपालिका सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे, त्यांची सहमती राहिल का, असे विचारले असता, ‘वीज बील थकित असल्याने गेल्या अनेक वर्षापासून शहर अंधारात आहे. त्यामुळे शहर प्रकाशमान करणे महत्त्वाचे असून वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आदेश आणू,’ असे त्यांनी सांगितले.

विपर्यास केला जातो
अनेकदा भाषण करताना स्थानिक संदर्भात, तेथील बोलीभाषा वापरुन बोलण्याचा प्रयत्न केला जात असतो. पण, बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून विपर्यास केला जातो, असेही दानवे यांनी नमूद केले.

थकीत वीज बिल ९ कोटी रुपये
जालना नगरपालिकेने दिलेल्या माहितीनूसार दिवाळी सणादरम्यान ४४ लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा पुर्ववत केला. थकीत बीलामुळे अनेक वर्षापासून वीज पुरवठा चालु - बंद अशी स्थिती आहे. देखभाल दुरुस्ती अभावी शहरातील बहुसंख्य पथदिवे बंद अवस्थेत असून सध्या मुळ थकबाकी सुमारे ५ कोटी रुपये असून त्यावरील व्याज ४ कोटी रुपये असे मिळून एकूण ९ कोटी रुपये थकीत बील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीकडून बीज बीलाची सरासरी आकारणी होते, असा आरोपही नगरपालिकेने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्ध वारशाचे प्रदर्शनातून दर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘हेरिटेज अँड अस’ प्रदर्शनामुळे अभ्यासकांना शहर व परिसरातील समृद्ध वारसास्थळांचा प्रत्यय आला. मॅरेथॉनच्या निमित्ताने धावण्याचे वातावरण निर्माण झाले आहे, पण ऐतिहासिक औरंगाबाद शहर व त्याचा परिसर बाराव्या शतकापासूनच धावत आहे. जागतिक वारशांच्या क्षेत्रात आपला ठसा अधिक उमटवत आहे, असा संदेशही या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाला.

एमआयटी कॉलेज आणि औरंगाबाद ब्लॅक बक्स (एबीबी) यांच्यातर्फे रविवारी (२६ नोव्हेंबर) हेरिटेज हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉननिमित्त साधून इंटॅक्ट या संस्थेने पुढाकार घेतला. एमआयटी कॉलेजच्या परिसरातच ‘हेरिटेज अँड अस’ हे प्रदर्शन भरविले आहे. हे प्रदर्शन तीन डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

या प्रदर्शनाबद्दल इंटॅक्टचे समन्वयक अजय कुलकर्णी यांनी सांगितले की, औरंगाबाद शहर व जिल्ह्यात १२व्या, १३व्या शतकापासून वारसा पाहण्यास मिळतो. सातवाहन, सुफी, नाथपरंपरा अशा धार्मिक परंपरांचा वारसा तर आहेच, त्याच बरोबर कला - शिल्पांचा देखील समृद्ध वारसा लाभलेला आहे. लेण्या, मंदिरे, मशिदी, दरवाजे, मुगल गार्डन अशी अनेक वारसास्थळे एकाच शहरात सापडणे दुर्मिळ आहे. औरंगाबाद शहर वारसास्थळांच्या दृष्टीने असे दुर्मिळ शहर आहे. त्याची माहिती अभ्यासकांना, सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वारसास्थळांबद्दल माहिती असलेल्यांनी किंवा माहिती नसलेल्यांनी हे प्रदर्शन पाहिल्यास, तर त्याच्या मनात वारसास्थळांबद्दल प्रेम निश्चित निर्माण होईल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. प्रदर्शनासाठी तीन बाय आठ फुटांचे २० पॅनल तयार करण्यात आले आहेत. सर्व क्षेत्रातील एकेक उदाहरण प्रदर्शनात ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम कंत्राटदाराची गळफास घेऊन आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काही कामानिमित्त औरंगाबादेत आलेल्या आलेल्या बांधकाम कंत्राटदाराने रेल्वेस्टेशन परिसरातील रणजित हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. लक्ष्मण बनवारीलाल सैकी (रा. पुणे) असे गळफास घेणाऱ्या कंत्राटदाराने नाव आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या आत्महत्येबाबत पोलिस निरीक्षक अनिल आडे यांनी सांगितले की, पुण्यातील कंत्राटदार लक्ष्मण सैकी दोन दिवसांपूर्वी काही कामानिमित्त औरंगाबादेत आले होते. रेल्वेस्टेशन परिसरातील रणजीत हॉटेलमध्ये त्यांनी १८ क्रमांकाची खोली घेतली होती. त्यांनी शुक्रवारी दुपारी खोलीची कडी आतून लावून घेतली व छताच्या पंख्याला बॅगची दोरी बांधून गळफास घेतला. काही वेळाने हॉटेलच्या कर्मचाऱ्याने त्यांच्या दरवाजा वाजवला असता सैकी यांनी प्रतिसाद दिला नाही. कर्मचाऱ्याने दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता, त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ वेदांतनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लक्ष्मण सैकी यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटीतील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. लक्ष्मण सैकी यांच्या खिशात असलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटविण्यात आल्याचे आडे यांनी सांगितले. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकुंदवाडी क्रॉसिंगवर लवकरच भुयारी मार्ग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड विभागातील ‘डी’ दर्जा प्राप्त झालेल्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी आठ ते दहा दिवसांत ते पूर्ण करण्याचे आदेश नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्‍थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी दिली. या शिवाय मुंकुदवाडी रेल्वे स्टेशनच्या पलिकडे राहणाऱ्या नागरिकांना धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडून जावे लागू नये म्हणून लवकरच भुयारी मार्ग तयार करण्याच्या निर्णय घेतल्याचीही माहिती सिन्हा यांनी दिली.

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकी, प्लॉटफॉर्मवरील लाइट, विश्रामगृहाचे काम तातडीने करण्याचे आदेश मार्चमध्ये देण्यात आले होते, मात्र संबधित कंत्राटदारांने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काम रखडले होते. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर कामन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. कमानीची रंगरोगोटी करून त्यावर तातडीने नाव लिहिण्यात येणार आहे. विश्रामगृहाचे बांधकाम पूर्ण झाले अाहे. रंगरागोटी पूर्ण झाली असून, अंतर्गत सोयी सुविधांचे काम शिल्लक राहिले आहेत. लाइट फिटिंग, फॅन, विश्रामगृहातील स्वच्छतागृहातील नळाची फिटिंग करण्याचे बाकी आहे हे काम येत्या १५ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात यावे, असे आदेश डीआरएम डॉ. सिन्हा यांनी दिले .

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या दक्षिण आणि उत्तर बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. या नागरी वसाहत असल्यामुळे त्या परिसरातील नगरिकांना लोहमार्ग ओलांडून ये-जा करावी लागते. सध्या या भागातील नागरिक दगडी पुलाचा वापर करत असून, तो वापर करणे धोकादायक आहे. कन्स्ट्रक्शनच्या विभागा प्रमुखांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो रेल्वे बोर्डाकडे त्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. सिन्हा यांनी स्पष्ट केले.

...तर स्टेशनला ‘बी’ दर्जा
मुदवाडी रेल्वे स्टेशनला सध्या ‘डी’ दर्जा आहे. या स्टेशनवर आरक्षण खिडकी आणि तिकीट खिडकीही सुरू करण्यात आली आहे. तेथे तिकीट विक्री आणि रेल्वे आरक्षणाचे प्रमाण वाढल्यास मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. उत्पन्न वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनाला प्रवाशांना सोयी सुविधा द्याव्या लागतील आणि नवीन रेल्वे गाड्यादेखील येथे थांबवण्यात येतील. त्याचबरोबर उत्पन्न वाढल्यावर पूर्णा रेल्वे स्टेशनसारखा थेट ‘बी’ दर्जा प्राप्त होईल. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचा दर्जा वाढल्यास या स्टेशनवर अधिक सुविधा देण्यात येईल.

‘आरपीएफ’चे जवानांची गस्त
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढत आहे. या गर्दीत चोरटे संधी साधून मोबाईल चोरी, पॅकेटमार, दागिणे, पर्स चोरणे यासारख्या घटना घडत आहेत. त्यांना अळा घालण्यासाठी औरंगाबाद स्टेशन येथील रेल्वे पोलिस दलाचे (आरपीएफ) दोन जवान दररोज सांयकाळी मराठवाडा हायकोर्ट एक्स्प्रेसने जातात. स्टेशनवर गस्त घालून परत येत असल्याचे सिंन्हा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुंड्यासाठी विवाहितांचा छळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हुंड्यासाठी विवाहितेच्या छळाच्या तीन घटना संबंधित पोलिस ठाण्यांत नोंदविण्यात आलेल्या आहेत.

खालिदा परवीन नवाब पठाण (२५, रा. भगतसिंगनगर, हर्सूल) यांचा नवाब पठाण याच्याशी विवाह झाला होता. लग्नाअगोदर गरोदर झालेल्या खालिदा यांचा त्यांच्यासंमती शिवाय गर्भपात करण्यात आला. याशिवाय लग्नानंतर नांदण्यासाठी पतीच्या घरी गेल्यानंतर अन्य आरोपींनी छळ सुरू केला. लग्नानंतर तीन वेळा गरोदर असल्यानंतरही पतीने पत्नीच्या मर्जीशिवाय गर्भपात करायला भाग पाडले. याशिवाय या महिलेला सासऱ्याकडून त्रास होताच. पतीच्या मित्रानेही अश्लील बोलून मानसिक छळ केला. याप्रकरणी नवाब खान, चांद पठाण, फेरोज खान, तीन महिला आरोपी आणि नंदोई शमीम सैय्यद यांच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरेफ कॉलनी येथील रहिवासी उजमा शेख शफिक हिचा विवाह शफिक शेख (रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) याच्यासोबत झाले होते. उजमा शेख हिला दहा महिन्यांची मुलगी अाहे. पतीसह सासऱ्याच्यांनी व्यवसाय करण्यासाठी ५० हजार रुपये आणण्यावरून छळ केला. या प्रकरणात शेख शफिक, शेख हबीब, दोन महिला आरोपींसह शेख रफिक यांच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तू आम्हाला पसंत नाहीस. तुला स्वयंपाक करता येत नाही. तुझी वागणूक चांगली नाही, असे म्हणत उषा शैलेंद्र सरदार (४३, रा. शिवशंकर कॉलनी) यांना पती शैलेंद्र आनंदराव सरदार, आनंदराव सरदार व महिला आरोपी यांच्याकडून त्रास सुरू होता. याशिवाय पती दररोज दारू पिऊन मारहाण करीत असल्याची तक्रार उषा सरदार यांनी हर्सूल पोलिसांकडे दाखल केली आहे. हर्सूल पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय नृत्याचे मनोहारी दर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मनमोहक शास्त्रीय नृत्याद्वारे ‘देवमुद्रा’ संस्थेच्या विद्यार्थिनींनी ‘सलंगई पूजा’ संस्मरणीय केली. एकल आणि सांघिक भरतनाट्यम नृत्यातून पारंपरिक रचना सादर करण्यात आल्या. पदलालित्य आणि भावमुद्रांनी शास्त्रीय नृत्यातून पैलू उलगडले.

देवमुद्रा नृत्य संस्थेने ‘सलंगई पूजा’ कार्यक्रम आयोजित केला होता. भानुदास चव्हाण सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम रंगला. भरतनाट्यम नृत्याच्या ‘पुष्पांजली’, ‘गणपती कौत्वकम’, ‘रंगाजली’ या पारंपरिक रचनांचे वेधक सादरीकरण विद्यार्थिनींनी केले. संपूर्ण नृत्याचा आनंद देणारे व उंची गाठणारे ‘अलारिपू’ नृत्य अधिक उठावदार झाले. नृत्याचा कळस गाठताना कलाकारांनी उत्कट नृत्य केले. या प्रकाराला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘मल्हारी शिवस्तुती’तून शिव-मदनाची गोष्ट सांगण्यात आली. नृत्यातून कथानक उलगडत कलाकारांनी कार्यक्रमाला वेगळी उंची मिळवून दिली. यावेळी मनाली सुधळकर, सेजल खाडे, सिद्धी तोरणाळे, आरूषी शिंदे व राधिका कुलकर्णी यांनी नृत्य सादर केले. अनुश्री काकणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला ‘देवमुद्रा’च्या संचालिका व्ही. सौम्याश्री यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रात्रीच्या सफाईला विद्यानगरातून सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रात्रीच्या साफसफाईला विद्यानगर वॉर्डातून शुक्रवारी प्रायोगिकतत्त्वावर सुरुवात करण्यात आली. विद्यानगरात रात्रीच्या सफाईचा प्रयोग यशस्वी झाल्यास, तर टप्प्याटप्प्यांने संपूर्ण शहरात साफसफाईची यंत्रणा रात्री राबवली जाणार आहे.

नंदकुमार घोडेले यांनी विविध वॉर्डांतील साफसफाईच्या कामाची पाहणी करण्याची मोहीम महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच सुरू केली. या मोहिमेदरम्यान त्यांनी विद्यानगर वॉर्डाला भेट दिली. त्यावेळी या वॉर्डाचे नगरसेवक व शिवसेनेचे विधानसभा पूर्व मतदारसंघाचे संघटक रेणुकादास (राजू) वैद्य यांनी रात्रीच्या वेळी साफसफाई सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) विद्यानगर वॉर्डच्या मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी साफसफाई करून कचरा उचलण्याच्या कामाचा प्रारंभ वैद्य यांच्या संपर्क कार्यालयाच्या समोरून करण्यात आला. या उपक्रमाची दखल घेऊन घोडेले यांनी तातडीने जास्तीचे कर्मचारी उपलब्ध करून दिले. याबद्दल त्यांचे आभार देखील मानण्यात आले. यावेळी वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी, स्वच्छता निरीक्षक कमलाकर ज्ञाते यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला.

रामदास गायके,गंगाधर कोट्टूरी, राजू जाधव, सुरेश सुराणा, गोविंद बरसाले, राजू मांडे,रोहित आहुजा, संदिप आहिरे,राम केकन,राजू चव्हाण,लक्ष्मण साळवे,बंटी सरोवर, पराग कोयाळकर, राजेश घालने,नानभाऊ कर्डिले,ज्ञानेश्वर तदाथे विलास काळे आभिजी मगरे, कैलास तीळकर, प्रवीण मूळे,गजानन लांडगे, संजय जाधव, किशोर जाधव, महेंद शिरसाठ, योगेश दिवेकर, सुमेर महाराज, नागेश देहाडे, अजय थोरात आदी नागरिक यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हैदराबादशी हवाई कनेक्शन संकटात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हैदराबाद-औरंगाबाद यांच्यातील विमान कनेक्शन कमी होण्याच्या मार्गावर आहे. येत्या एक डिसेंबरपासून ट्रूजेट विमान कंपनीने विमानाच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून तीनच दिवस औरंगाबाद हैदराबाद विमान चालविण्यात येणार आहे. पूर्वी ही सेवा रोज होती.

औरंगाबाद-हैदराबाद ते तिरुपती या मार्गावर विमान सेवा देण्याचा निर्णय ट्रूजेट कंपनीने घेतला होता. औरंगाबाद-हैदराबाद नियमित सेवा असल्याने या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादहून तिरुपतीसाठी जाणारे प्रवासी याच विमानाचा वापर करतात. हैदराबाद ते तिरुपतीला जाण्यासाठी साधारणतः दीड तासाचे वेटिंग असूनही अनेक प्रवासी या विमान सेवेला प्राधान्य देतात. तिरुपती येथून परताना तिरुपती ते हैदराबाद आणि हैदराबाद ते औरंगाबाद असे थेट विमान अाहे. त्यामुळे ट्रू जेटच्या विमानसेवेला प्रतिसादही आहे, तरीही कंपनीने एक डिसेंबरपासून आठवड्यातून तीनच दिवस औरंगाबाद हैदराबाद विमान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाचे वेळापत्रकही एक डिसेंबरपासून बदलण्यात आले आहे. पूर्वीचे विमान दुपारी अडीच वाजता औरंगाबादहून उड्डाण घेत होते. हे विमान एक डिसेंबरपासून सायंकाळी साडेसात वाजता औरंगाबादेत येऊन रात्री आठ वाजता हैदराबादकडे प्रस्थान करणार आहे. आता ही सेवा आठवड्यातून बुधवार, गुरुवार आणि शनिवार अशी तीनच दिवस असेल.

तांत्रिक कारण
नियमित चालणारी औरंगाबाद - हैदराबाद विमानसेवा आठवड्यातून तीनच दिवस चालविण्यामागे तांत्रिक कारण असल्याचे ट्रू जेट कंपनीने सांगितले. हा बदल महिनाभर असणार आहे. त्यानंतर विमान सेवा सुरळीत होईल, असे पत्र विमानतळ प्राधिकरणाला दिल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

‘शिर्डी’चा परिणाम?
शिर्डी विमानतळ सुरू झाल्यानंतर त्याचा थेट फटका औरंगाबाद विमानतळाला बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. ट्रू जेट विमान कंपनीने एक डिसेंबरपासून नवीन वेळापत्रकासह आठवड्यातून तीन दिवस विमान चालविण्याचा घेतलेला निर्णय हा शिर्डी विमानतळाचा परिणाम असल्याची चर्चा टूर ऑपरेटरमध्ये चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नात नवदाम्पत्यालाही राज्यघटनेची भेट

0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com
@tusharbMT
औरंगाबाद - राष्ट्रीय ऐक्य भक्कम करीत सामाजिक विकासाला गती देण्यास भारतीय राज्यघटना कारणीभूत ठरली. राज्यघटनेची वैशिष्ट्ये जाणून घेण्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे ‘राज्यघटना’ ग्रंथांची विक्री लक्षणीय वाढली आहे. शासकीय मुद्रणालय आणि खासगी प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या प्रतींची हातोहात विक्री होत आहे. विशेष म्हणजे लग्न व सार्वजनिक कार्यक्रमात राज्यघटनेची प्रत भेट देण्याचा पायंडा पडला आहे.
स्वातंत्र्यानंतर देशाने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० पासून घटनेची अंमलबजावणी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे स्वातंत्र्य आणि समतेचा अधिकार देत सामाजिक अभिसरणाला गती दिली. राज्यघटनेतील उद्देशिका, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, संघराज्य प्रणाली आदी महत्त्वाच्या बाबी मोजकेच लोक समजून घेत असत. एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टात विभागलेली राज्यघटना आदर्श रचना आहे. काही वर्षांपासून देशात आरक्षण आणि हक्कांबाबत गदारोळ वाढला आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मुद्द्यांवरील मतभेद विकोपाला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यघटना वाचून व समजून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत फक्त शासकीय मुद्रणालय राज्यघटना प्रकाशित करीत असत. या ग्रंथाची किंमत २५० रूपये आहे. मागणीच्या तुलनेत प्रती कमी असल्यामुळे खासगी प्रकाशकांनी छपाई सुरू केली. खासगी संस्था आणि शासकीय मुद्रणालय यांच्या ग्रंथ किमतीत जेमतेम ३० ते ४० रुपये फरक आहे.
‘राज्यघटनेला मागणी असल्यामुळे खासगी प्रकाशक वाढत आहे. लहान-मोठ्या आकारात राज्यघटना उपलब्ध आहे. लोकांमध्ये जागरूकता वाढल्यामुळे विक्री वाढली’ असे अजिंठा प्रकाशनाचे विनय हातोले यांनी सांगितले. परिवर्तनवादी साहित्याचे प्रमुख वितरक असलेले हातोले पूर्वी वर्षभरात राज्यघटनेच्या फक्त पाच ते सहा प्रती विकत असत. सध्या वर्षभरात किमान एक हजार प्रती विकत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘बार्टी’ने मराठी आणि इंग्रजी भाषेत एकत्रित प्रकाशित केलेल्या राज्यघटनेला विशेष मागणी आहे. जगातील मोठ्या राज्यघटनेपैकी एक असलेल्या भारतीय राज्यघटनेविषयी जनजागृती कार्यक्रम सुरू आहेत.
------राज्यघटनेची भेट
आपल्याप्रमाणे इतरांना राज्यघटनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेकजण लग्नात राज्यघटनेची प्रत भेट देत आहेत. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘समग्र महात्मा फुले’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चरित्रग्रंथ ही पुस्तकेही भेट दिली जात आहेत. अधिकारांबाबत जागरूक नागरिक आवर्जून खरेदी करीत असल्यामुळे राज्यघटनेची विक्रमी विक्री सुरू आहे.
-----------कोट
सेवानिवृत्तीचे कार्यक्रम किंवा लग्नात राज्यघटनेची प्रत भेट देतात. राज्यघटना जाणून घेण्याच्या जागृतीमुळे विक्री वाढली आहे. परिश्रमपूर्वक अभ्यास करून अनेक लोक घटना समजून घेत आहेत.
- विनय हातोले, ग्रंथ वितरक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा गड परत मिळविणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सोयगाव मतदारसंघातील झालेल्या चुका दुरूस्त करुन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हातात गेलेला भाजपचा गड परत घेतल्याशिवाय शांत बसणार नसून आता खरा सामना होणार असल्याचा एल्गार भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पुकारला.
सिल्लोड येथे शिवसेना नेते सुनील पाटील-मिरकर यांनी त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य वृषाली मिरकर, सरपंच राम मिरकर, प्रवीण मिरकर, शिवसेना उपतालुका प्रमुख गणेश लोखंडे, किसान सेना तालुका प्रमुख कैलास वराडे यांच्यासोबत शिवसेनेचे बहुतेक शाखा प्रमुख, सर्कल प्रमुख, सरपंच, उपसरपंचासह बसपाचे दादाराव आळणे, शंकरराव वानखेडे यांच्यासह असंख्य शिवसेनेचे सिल्लोड सोयगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाहित दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार दानवे बोलत होते.
यावेळी माजी मंत्री नामदेव गाढेकर, डॉ. भागवत कराड, उपमहापौर विजय औताडे, सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे, चेअरमन इदरीस मुल्तानी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कमलेश कटारिया, जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील यांची उपस्थिती होती.
दानवे यांनी यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर चौफेर फटकेबाजी केली. सत्तार हे मी नोटा बदलून दिल्याचा आरोप करीत आहेत, मात्र सत्तार यांनी आपल्या पवित्र धर्म ग्रंथ कुरआनची शप्पथ घेऊन सांगावे नाही तर मी शपथ खातो असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
सिल्लोड सोयगाव मतदारसंघात आता बदलाचे वारे वाहू लागले आहे. या मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकाविण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावणार आहे.
आमदार सत्तार हे खोटी आश्वासने देऊन मतदारसंघातील भोळ्या जनतेची दिशाभूल करीत आहेत. सत्तार यांनी मुर्डेश्वर संस्थानला तीन कोटी रुपये देतो, एक कोटी रुपये उंडणगाव येथील बालाजी संस्थानला देतो म्हणाले. परंतु, अद्याप एक रुपयासुद्धा या संस्थानाला दिला नाही. केवळ हिंदू समाजाची मते घेण्याचा हा सत्तार यांचा उहापोह आहे. सत्तार हे देवी देवतांच्या मंदिरांना निधी देवून देवता विकत घेण्याच्या प्रयत्न करीत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन दानवे यांनी केले.
यावेळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपवासी झालेले सुनील मिरकर यांनी येणाऱ्या विधानसभेचे तिकीट पक्षाने मला दिले तर निवडणूक लढविण्यास तयार आहे. नाही दिली तरीही प्रमाणिकपणे मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकाविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेला मतदान म्हणजे काँग्रेसला
शिवसेनेचे तालुक्यात काहीच कार्य नसताना पक्षबांधणी केली. येणाऱ्या काळात मतदारसंघात नवा बदल घडवायचा हे निश्चित केले होते. मात्र, आपल्याला निवडून यायचे नाही केवळ भाजपचा उमेदवार पडला पाहिजे अशी सेटिंग कॉँग्रेस व शिवसेनेने केली आहे. या दोन्ही पक्षाच्या सेटिंगमध्ये फक्त माझा वापर होत आहे लक्षात आल्याने मी भाजपात घर वापसी करीत असल्याचे मिरकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
आज देशात कुणीही सुरक्षित नाही. सरकारला मूलभूत प्रश्नांचा विसर पडला असून ते संविधान मोडायला निघालेत. एकीकडे शेतकरी फासजवळ करतो आहे. जवान सीमेवर गोळ्या खातोय. सरकारला मात्र, यामुळे काहीही फरक पडत नाही. विशेषतः कामगार वर्गासाठी हा काळ म्हणजे रात्र वैऱ्याची आहे. कामगारांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केला.
बीड येथे शनिवारी आयोजित पेन्शन परिषद व राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या अधिवेशनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार. डॉ. प्रीतम मुंडे, स्वागताध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार उषा दराडे, बापूसाहेब मकदूम, ज्येष्ठ समाजवादी नेते सुभाष वारे, हरीश धुवड, सुभाष लोमटे, अविनाश घुले, मार्केट कमिटी सभापती दिनकर कदम, उपसभापती गणपत डोईफोडे आदिंची उपस्थिती होती.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, ‘शेतकरी आंदोलन करतो की त्याच्या शेतीमालाला हमी भाव द्यावा. सरकार मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडत आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव, कष्टकऱ्याच्या घामाला दाम सरकार देणार की नाही ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आज देशभरात जाती-पातीचे, राजकारण केले जात आहे. त्यातून माणसांमाणसांमध्ये उभी फूट पाडली जात आहे. बाजार समित्यांमध्ये हमालांसाठी जे कायदे झाले त्यांची अवस्था खुळखुळ्यांप्रमाणे आहे. सामाजिक सुरक्षा कायदा झाला; पण त्याची अंमलबजावणी नीट झाली नाही.’
जीएसटी, नोटबंदीमुळे व्यवहार मंदावले आहेत. कामच नाही तर दाम कसा मिळेल. मात्र, हमालांनी संप कधी केला नाही. शेतकऱ्यांना वेठीस धरले नाही. शेतकरी, ऊसतोड मजूर व असंघटीत क्षेत्रात कार्यरत कामगारांना पेन्शन, हमीभाव व कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी जोरकसपणे केली. कामगारांच्या कामाच्या वेळा निश्चित नाहीत. त्यांच्या कुठे नोंदी नाहीत. त्यामुळे कष्टकरी म्हणवून घेण्यात लाज वाटू देऊ नका. राज्यात वेगवेगळ्या जातीचे मोर्चे निघाले, त्यापेक्षाही सर्वात मोठा मोर्चा कष्टकऱ्यांचा निघावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना आमदार जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ‘ डॉ. आढाव हे राज्यभरातून कामगारांना एकत्र करून लढा देत आहेत. वृद्धांना पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण राज्यात या सर्व लोकांची हालअपेष्टा होत असताना सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे. उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्न वाचविण्यासाठी अनोखा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्नसभारंभात होणारी अन्नाची नासाडी रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्न बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एका लग्नसमारंभात अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. भोजनप्रसंगी कार्यकर्त्यांनी, ‘ताटात अन्न उष्टे टाकू नका, हवे तेवढेच वाढून घ्यावे’ अशा पाट्या हाती घेऊन उपस्थितांचे प्रबोधन केले. त्यास वऱ्हाडमंडळीकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.

लग्नकार्य, अन्य कार्यक्रमांत अनेकदा मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. गरजेपेक्षा अन्न ताटात घेतले जाते व नंतर ते उष्टे अन्न फेकून देण्याची वेळ येते. दुसरीकडे अनेक गरजूंना एक वेळचे पोटभर अन्न मिळत नाही. या पार्श्वभूमीवर अन्न बचाव समिती गेल्या काही वर्षांपासून कार्य करत आहेत. लग्नकार्यातील उरलेले अन्न गरजूंपर्यंत पोचविण्याचे काम समिती रोटी बँकेच्या माध्यमातूनही करत आहे.

समर्थ नगर येथील वरद विनायक मंगल कार्यालयात धर्माधिकारी यांच्या मुलीचे लग्न होते. समितीचे प्रमुख अनंत मोताळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधत उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी होकार देताच कार्यकर्ते कामाला लागले. विवाहसोहळ्याला मोठ्या संख्येने वऱ्हाडमंडळी, पाहुणे उपस्थित होते. लग्न लागल्यानंतर वधू-वरांना शुभेच्छा दिल्यानंतर जेवणावळी सुरू झाल्या. त्यावेळी मोताळे यांच्यासह राजेंद्र वाहुळे, रुपाली वाहुळे, किरण शर्मा आदी कार्यकर्त्यांनी हातात घेतल्या पाट्याकडे साऱ्यांचाचे लक्ष वेधल्या गेले. ‘ताटात अन्न उष्टे टाकू नका, हवे तेवढेच वाढून घ्यावे’ असा संदेश देत या कार्यकर्त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.

उपस्थितांचा प्रतिसाद
त्याला वऱ्हाडींनी मोठा प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील काही लोकांनी गावी असा उपक्रम राबविला जाईल, असा शब्दाही समितीला दिल्याचे मोताळे यांनी सांगितले. काही तरुणांनी, ‘ताटात अन्न उष्टे टाकले नाही, हवे तेवढेच घेतले,’ असे सांगत समितीच्या स्वयंसेवकांसोबत सेल्फी काढून त्याचा पुरावाही दिल्याचे मोताळे यांनी सांगितले. लग्नसराई सुरू झाल्याने अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे जनजागृतीवर भर दिला जाणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड वर्षांत रस्ते चकाचक

0
0

औरंगाबाद ः राज्यभरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. केंद्र व राज्य सरकारने खड्डेमुक्त रस्ते करण्याबाबत पुढाकार घेत पुढील दीड वर्षांत राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे तब्बल २८ हजार ५०० किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याचा प्लॅन केला आहे. यासाठी केंद्राने एक लाख सहा हजार कोटी रुपये, तर राज्य सरकारने ३० हजार कोटींची तरतूद केली आहे. निविदा प्रक्रिया, रस्ते हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यांच्या कामांना सुरवात होणार आहे.

राज्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाळ्यानंतर संपूर्ण राज्यातील रस्ते उखडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांवर उपाययोजना करण्यासाठी पीडब्ल्यूडीने एक प्लॅन जाहीर केला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी एक लाख आठ हजार कोटींचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या काही महिन्यांत २२ हजार किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले आहेत. गडकरींनी जाहीर केलेल्या एक लाख आठ हजार कोटींपैकी २० हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गाच्या निकषाप्रमाणे एका किलोमीटरसाठी आठ कोटी रुपये प्रमाणे राज्याकडून केंद्राकडे हस्तांतरित झालेले रस्ते चारपदरी केले जातल. या रस्त्यांची बांधणी वेगळ्या पद्धतीने केली जाणार आहे. कंत्राटदाराला दर पाच वर्षांनी रस्त्याची डागडुजी करावी लागणार आहे, त्यामुळे रस्ता १५ वर्षे चांगला ठेवण्यात येईल, असा दावा सरकारी यंत्रणांनी केला आहे.

याच मालिकेत महाराष्ट्राती सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० हजार कोटी रुपये राज्य महामार्गांच्या मजबुतीकरणासाठी देण्याचे ठरविले आहे. राज्याच्या निकषानुसार प्रत्येक किलोमीटरच्या मजबुतीकरणासाठी तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातून साडेसहा हजार किलोमीटरचे रस्ते मजबूत केले जातील. जानेवारी महिन्यात निविदा प्रक्रियेला सुरवात होणार असून, एप्रिल अखेर कामे सुरू होतील, हे रस्ते तीन पदरी असतील, असा दावा ‘पीडब्ल्यूडी’तील सूत्रांनी केला आहे.

राज्यातील रस्ते अॅन्यूटी (डिफर्ड पेमेंट) मधून होतील. कंत्राटदाराला अपेक्षित रकमेपैकी ६० टक्के रक्कम पहिल्या दोन वर्षांत, तर उर्वरित ४० टक्के रक्कम दहा वर्षांत दिली जाईल. थोडक्यात पुढील दीड वर्षांत २८ हजार ५०० किलोमीटरचे रस्ते मजबूत होणार आहेत.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्त्यांसाठी एक लाख सहा हजार कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यातील पहिला टप्पा प्राप्त झाला आहे. राज्यानेही काही प्रमुख राज्य महामार्गांसाठी ३० हजार कोटींची तरतूद करण्याचे ठरविले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले की दीड वर्षांत २८ हजार ५०० किलोमीटरचे रस्ते मजबूत होतील.
- चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मॅरेथॉनमध्ये धावण्याचा थंडी, गर्दीत उत्साह

0
0

-डॉ. आनंद देशमुख, धावपटू

नोव्हेंबर महिन्याचे शेवटचे काही दिवस, त्यातही रविवारची पहाट. सगळीकडे दाटलेली थंडी, उबदार पांघरूणातून अंगावरील रजई बाजूला करून धावायला बाहेर पडणे म्हणजे एक धाडसच. पण रविवारी पहाटे, दौलताबाद घाटाच्या पायथ्याशी ‘औरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉन’ साठी निघालेले सारे पळणारे स्पर्धक एका वेगळ्याच उत्साहात होते, कारण मागील वर्षी सुरू झालेल्या या मॅरेथॉनने शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील चांगली मॅरेथॉन म्हणून नाव मिळवलेले आहे. जगात ही एकमेव मॅरेथॉन हेरिटेज परिसरात होते आणि धावपटूंना या संधीचा लाभ घेता येतो.
आज वटवृक्ष दिसत असला तरीही याचे रोपटे पाच सहा वर्षांपूर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये, धावत असताना डॉ. विवेक घारपुरे यांच्या मनामध्ये रुजले . त्याला मुकुंद भोगले, भूपेश मिश्रा, शीतल मिश्रा आणि सहकाऱ्यांनी एक मिशन म्हणून हाती घेतले आणि पुढे नेले. त्यावेळी तुरळक प्रमाणात लोक धावत असत पण त्यांच्यामध्ये एकसंघता नव्हती आणि त्यांना मोठ्या प्रमाणावरील असा प्लॅटफॉर्मही नव्हता. वारकरी ज्याप्रमाणे वारीमध्ये उत्साहाने सहभागी होतात, त्याप्रमाणे गतवर्षीपासून शहरातील सारे धावपटू अगदी उत्साहाने आणि आत्मियतेने, थंडीत पहाटे उठून या सोहळ्यामध्ये सहभागी होतात.
सहभागी स्पर्धकांसाठीचे ‘बीब’ आणि स्पर्धेची पूर्ण माहिती शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी एमआयटी कॉलेज मध्ये इत्यंभूत देण्यात आली. त्याचप्रमाणे दिलेल्या बॅगमध्ये ही पूर्ण रेस रुटची माहिती आणि पाणी आणि खाण्याचे पदार्थ याविषयी सर्व माहिती दिलेली होती. रविवारी भल्या पहाटे सकाळी पाचच्या सुमारास सारेजण दौलताबादच्या समोर, पायथ्याशी एकत्रित जमले पार्किंगची उत्कृष्ट अशी सोय होती कुठेही ट्रॅफिक ब्लॉक जाणवला नाही. स्पर्धक आणि आयोजक दोघांचाही उत्साह वाखाणण्याजोगा आणि वातावरण अर्थात खूपच भारावलेले. अंधार कमी कमी होत पूर्वेकडून झुंजूमुंजू होण्याची वेळ, स्टेजवरून झुंबाच्या माध्यमातून केलेल्या शारीरिक कवायती, नंतर शहीद दिवसानिमित्त मुंबईतील शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वांनी गायलेल्या राष्ट्रगीतानंतर देशभक्तीने भारावलेल्या रनर्सच्या तोंडून एकसुरात ‘भारत माता की जय’ चा जयघोष झाला आणि वातावरण उत्साहपूर्ण झाले.
पूर्वेकडून गुलाबी केशरी होणारे आकाश डाव्या हाताला म्हणजेच पश्चिमेला, गगन गवसणी घालणारा देवगिरी किल्ला आणि अगदी वेळेवर सुरू झालेली पहिली पंचवीस किलोमीटरची मॅरेथॉन, त्यानंतर थोड्या वेळानी एकवीस किलोमीटर आणि साडेसहाला दहा किलोमीटर्स चे स्पर्धक यांनी धावायला सुरुवात केली. या वातावरणात सगळ्या स्पर्धकांच्या धावण्याच्या पावलांचा आवाज एक वेगळीच लय उत्पन्न करत होता.
पहिला एक किलोमीटरचा चढण्याचा घाट सोडला आणि उजवीकडे पसरलेल्या पर्वत रांगा, खालील तलाव ,दूरवर दिसणारे औरंगाबाद आणि उगवणारा सूर्यदेव या सार्यानी देह सुखावला. या दृश्यांनी थकवा असा जाणवलाच नाही. वेळोवेळी आयोजकांकडून वाढवला जाणारा उत्साह, दोन दोन किलोमीटरला वाजणारे ढोल-ताशे, दिले जाणारे पाणी एनर्जी ड्रिंक्स यांच्यामुळे धावण्याचे सुख अगदी अवर्णनीय ! जिंकणारे लोक आणि शेवटी येणारे लोक यांच्यामध्ये काही तासांचा फरक होता पण, धावताना मिळणाऱ्या आनंदामध्ये मात्र तसूभरही नव्हता. त्यामुळे पहाटे थंडीमध्ये उठताना, रजेईमध्ये झोपलेल्या लोकांबद्दल मनात उत्पन्न झालेली असूया नाहीशी होऊन, उलट पहाटेच्या या एका अनोख्या हेरिटेज मॅरेथॉनमध्ये न येऊन ही मंडळी किती मोठ्या सुखाला दुरावली हे जाणून हळहळच वाटली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संभाजीराजे’साठी ‘देवगिरी’चा बळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
‘संभाजीराजे साखर कारखाना चालावा यासाठी देवगिरी कारखान्याचा बळी देण्याचे षडयंत्र अाखले जात अाहे. शेतकरी व कामगारांना आधार देण्यासाठी हायकोर्टात दाद मागण्यात येईल,’ अशी माहिती माजी अामदार डाॅ. कल्याण काळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘देवगिरी साखर कारखाना अवसानात नसतांना अवसानात अाणून अवसायक म्हणून अार. एस. शेख यांची नेमणूक केली. कारखाना विक्रीचा घाट घालून सर्व यंत्रसामुग्री लिलावात काढली अाहे,’ असा आरोप त्यांनी केला. फुलंब्री मतदासंघाचे अामदार हरिभाऊ बागडे हे विधानसभा अध्यक्ष अाहेत. त्यांचाच संभाजीराजे साखर कारखाना असून फुलंब्री व अाैरंगाबाद तालुक्यातून ऊस माेठ्या प्रमाणात मिळताे. देवगिरी साखर कारखाणा सुरू झाला, तर त्यांच्या कारखाना बंद पडू शकताे. त्यामुळे देवगिरी कारखाना संपवण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप डॉ. काळे यांनी केला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, उपाध्यक्ष नितीन देशमुख, संचालक पुंडलिकराव अंभाेरे, अजगर पटेल यांच्यासह कर्मचारी उपस्थित हाेते.
कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे २६ कोटी व बडाेदा बँकेचे १४ कोटी, असे ४० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखान्याकडे जवळपास २५९ एकर जमी आहे. बँकेसोबत बोलणी करून एकरकमी फेड केली तर ३० कोटीत कारखाना कर्जमुक्त होऊ शकतो. कारखान्याच्या सावंगी येथील जमिनीमधून समृद्धी महामार्ग जात अाहे. सुमारे १५ ते १८ एकर जमीन भूसंपादन झाल्यास २५ ते ३० कोटी रुपये मिळू शकतात. यातून कारखाना कर्जमुक्त हाेऊ शकतो. पण, यंत्रसामुग्रीचा ११ कोटीत लिलाव केला जात आहे. नवीन यंत्रसामुग्री घेतली तर शंभर कोटी रुपयेसुद्धा कमी पडतील, असे डॉ. काळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिसभेत ‘उत्कर्ष’ची आगेकूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनल’ने तीन गटांत आघाडी घेतली आहे. व्यवस्थापन प्रतिनिधी, प्राचार्य आणि विद्यापीठ अध्यापक गटात ‘उत्कर्ष’ने वर्चस्व प्रस्थापित केले, मात्र, ‘विद्यापीठ विकास मंच’ने प्राचार्य गटात चार जागा जिंकत ‘उत्कर्ष’ पॅनलची दमछाक केली. विद्या परिषद आणि महाविद्यालय अध्यापक गटाची रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.

विद्यापीठ अधिसभा आणि विद्या परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्या उपस्थितीत २० टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. काही मतदान केंद्रावर एकच मतपेटी ठेवल्यामुळे वेगवेगळ्या गटाच्या मतपत्रिका एकत्र झाल्या होत्या. या मतपत्रिका वेगळ्या करण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणी दुपारी साडेबारा वाजता सुरू झाली. अधिसभा व्यवस्थापन प्रतिनिधी गटात सहापैकी चार जागा जिंकत ‘उत्कर्ष’ पॅनलने बाजी मारली. प्राचार्य गटात दहापैकी सहा जागा जिंकून ‘उत्कर्ष’ने आघाडी घेतली. ‘विद्यापीठ विकास मंच’ने चार जागा जिंकल्या. तर ‘उत्कर्ष’चे एक उमेदवार अवघ्या एका मताने पराभूत झाले. विद्यापीठ अध्यापक गटासाठी १७२ मतदारांनी मतदान केले होते. या गटात ‘उत्कर्ष’ने खुला प्रवर्ग आणि महिला प्रवर्गात विजय मिळवला. एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. संख्याबळ वाढवण्यासाठी विद्यापीठ विकास मंचने संजय निंबाळकर आणि डॉ. सतीश दांडगे आपल्या पॅनलचे उमेदवार असल्याचा दावा केला, मात्र आपण कोणत्याही पॅनलचे उमेदवार नसून, अपक्ष आहोत, असे दोघांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाविद्यालय अध्यापक गट आणि विद्या परिषदेसाठी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी झाली. निकाल ऐकण्यासाठी चार जिल्ह्यांतील उमेदवार आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयी उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.

विजयी उमेदवार

व्यवस्थापन गट
१) डॉ. राहुल म्हस्के (उत्कर्ष पॅनल)
२) मनिषा टोपे (उत्कर्ष पॅनल)
३) कपिल आकात (उत्कर्ष पॅनल)
४) गोविंद देशमुख (उत्कर्ष पॅनल)
५) संजय निंबाळकर (अपक्ष)
६) भाऊसाहेब राजळे (अपक्ष)

प्राचार्य गट
१) डॉ. जयसिंगराव देशमुख (उत्कर्ष पॅनल)
२) डॉ. भारत खंदारे (उत्कर्ष पॅनल)
३) अली झाकीर (उत्कर्ष पॅनल)
४) अशोक पंडीत (उत्कर्ष पॅनल)
५) डॉ. शिवदास शिरसाठ (उत्कर्ष पॅनल)
६) डॉ. प्राप्ती देशमुख (उत्कर्ष पॅनल)
७) डॉ. सुभाष टकले (विद्यापीठ विकास मंच)
८) डॉ. कमलाकर कांबळे (विद्यापीठ विकास मंच)
९) डॉ. रामचंद्र इप्पर (विद्यापीठ विकास मंच)
१०) डॉ. हरिदास विधाते (विद्यापीठ विकास मंच)

विद्यापीठ अध्यापक गट
१) डॉ. सतीश दांडगे (अपक्ष)
२) डॉ. स्मिता अवचार (उत्कर्ष पॅनल)
३) डॉ. राम चव्हाण (उत्कर्ष पॅनल)

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सुविधा देण्यावर आणि प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार आहे. विद्यापीठाचे प्रशासन विद्यार्थीभिमुख राहण्यासाठी पाठपुरावा करील.
- डॉ. राम चव्हाण, विजयी उमेदवार

सध्या विद्यापीठ स्तरावर संथ चालेल्या कामकाजाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू असलेल्या शिक्षण व्यवस्थेत चांगल्या धोरणाची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा आहे.
- डॉ. स्मिता अवचार, विजयी उमेदवार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याची गरज आहे. शैक्षणिक सुविधा वाढवून या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिसभेत सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
- कपिल आकात, विजयी उमेदवार

कोणत्या पॅनलसोबत जाणार याबाबत अधिकृत भूमिका ठरलेली नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवली नाही. विद्यापीठ अधिसभेत सहाव्यांदा विजय मिळाला आहे.
- संजय निंबाळकर, विजयी उमेदवार

विद्यापीठातील राजकीय हस्तक्षेप थांबवून विद्यार्थ्याला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याची गरज आहे. मराठवाडा विभागातील पिढीचे भवितव्य ठरवण्यासाठी अधिसभा मोलाची भूमिका बजावेल. शैक्षणिक धोरणावरच सांगोपांग चर्चा झाली पाहिजे.
- भाऊसाहेब राजळे, विजयी उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’ भूसंपादनाची घोषणा हवेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाच्या पिछाडीचे खापर कार्यक्षम अधिकाऱ्यांवर फोडून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, १५ दिवसांत भूसंपादन पूर्ण करण्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी केली होती, मात्र आतापर्यंत केवळ २५ टक्केच भूसंपादन झाले आहे.

राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गासाठी सर्वप्रथम दरनिश्चिती करण्यात आघाडी घेतलेला औरंगाबाद जिल्हा जमीन खरेदी प्रक्रियेत मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागे आहे. त्याचे खापर जिल्हाधिकाऱ्यांनी कनिष्ट अधिकाऱ्यांवर फोडले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पावित्र्यानंतर कामामध्ये निश्चित वेग निर्माण झाला, मात्र जिल्ह‌ाधिकाऱ्यांनी नि‌श्चित केलेल्या वेळेत नियोजित उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. जिल्ह्यात २१ नोव्हेंबरपर्यंत ५५८ रजिस्ट्रींच्या माध्यमातून ३२७.४२ हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहेत.

गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची गाडी अडखळली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून कामाने वेग घेतला आहे. दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात ५५८ रजिस्ट्री करण्यात आल्या आहेत.

समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील ६२ गावांमधील तीन हजार ५४ शेतकऱ्यांच्या एक हजार २४७ हेक्टर जमिनीचे संपादन प्रशासनाला करायचे आहे. वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींची नोंद कोरडवाहू करण्यात आल्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे.

नोंदीतील चुका दुरुस्तीचे प्रशासनामोर मोठे आव्हान असून, यातील काही त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या आहेत, मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी कायम असून, त्यासाठी शेतकऱ्यांच्या जिल्हा प्रशासनाकडे खेट्या सुरू आहेत.

‘भूसंपादनात जिल्हा अव्वल’
यासंदर्भात औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादनाच्या कामाने वेग घेतला आहे. जिल्ह्यात ३० ऑक्टोबरा रोजी रजिस्ट्रीची संख्या केवळ ६० होती २४ नोव्हेंबर रोजी ही संख्या ६२१ झाली आहे. जिल्हा समृद्धीच्या रजिस्ट्रीमध्ये दहा जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्हा अव्वल आहे.

२१ नोव्हेंबरची स्थिती
तालुका........रजिस्ट्री.....हेक्टर
औरंगाबाद.....२३४.......१२१.६७
वैजापूर..........२४५......१४५.६५
गंगापूर..........७९........६०.०८
एकूण............५५८.....३२७.४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पसार ललिता खाडे पोलिसांच्या जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अवैध गर्भपात प्रकरणातील पसार परिचारिका ललिता रमेश मून उर्फ खाडे (वय ४०, रा. आपत भालगाव) हिला दोन दिवसानंतर अटक करण्यात पुंडलिकनगर पोलिसांना यश आले. खाडे हिला शिवशंकर कॉलनीतून नातेवाईकाच्या घरून ताब्यात घेण्यात आले. आपत भालगाव येथील अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला होता. त्याच्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन खाडे पसार झाली होती.

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात एका पीडित विवाहितेने पाच महिन्यांची गर्भवती असताना सासरच्या मंडळींनी अवैध गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आपत भालगाव येथील ललिता खाडे या परिचारिकेच्या घरी सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर हा प्रकार घडला होता. पोलिसांनी शुक्रवारी या केंद्रावर छापा टाकला होता. यावेळी गर्भपाताच्या गोळ्या, विविध वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले होते. रात्र झाल्याने खाडेला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले नव्हते. ती शनिवारी पसार झाली. दिवसभर शोध घेतल्यानंतरही खाडे सापडली नव्हती. दरम्यान, शिवशंकर कॉलनी येथे एका नातेवाइकाकडे ती लपून बसली. पोलिसांना रविवारी सकाळी ही माहिती मिळली. पोलिसांनी शिवशंकर कॉलनी गाठली, मात्र खाडे तेथून पुन्हा पसार झाली होती. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांच्या मुसक्या आवळल्यानंतर ती पोलिसांपुढे हजर झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images