Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तालुक्यात एकच केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) पदवीधर गटाची निवडणूक चार डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीची मतदारयादी विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी प्रसिद्ध केली. चार जिल्ह्यात ५५ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. अधिसभा शिक्षक व विद्या परिषद निवडणुकीच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने गुरुवारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेतली.

अधिसभा पदवीधर गटाची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने पुरेपूर खबरदारी घेतली आहे. अधिसभा शिक्षक व विद्या परिषद निवडणुकीत मतदारयादी तयार करण्यापासून ते निकालापर्यंत अनेक त्रुटी होत्या. मतमोजणी प्रक्रियेवर गदारोळ झाल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली होती. हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने पदवीधर निवडणुकीची पूर्वतयारी केली आहे. विद्यापीठाच्या नाट्यगृहात गुरुवारी दिडशे कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. साधना पांडे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे उपस्थित होते. मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या. प्रशासनाने पुरेपूर मार्गदर्शन केले असले तरी कर्मचाऱ्यांचा गोंधळ कमी झाला नाही. नियमावली, मतपत्रिका, मतदारयादी, मतपेटी, वेळेची मर्यादा अशा अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. दूरवरील मतदान केंद्रांवर वेळेत मतपत्रिका पोचत नसल्याने मतदानाला उशीर होतो. अशा वेळी वेळेची मर्यादा वाढवणार का असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. तर दूरच्या मतदान केंद्रावरही वेळेपूर्वीच मतपत्रिका पोहचतील असे प्रशासनाने म्हटले आहे. येत्या चार डिसेंबरला मतदान असून, तीन डिसेंबर रोजी कर्मचारी नेमलेल्या केंद्रावर पोचणार आहेत. प्रशासन निवडणुकीची तयारी दाखवत असले, तरी ऐनवेळी अनेक त्रुटी समोर येतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. निवडणुकीला जेमतेम तीन दिवस बाकी असताना विद्यापीठाच्या वेबसाइटवर मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदारांना ‘एसएमएस’ पाठवले जाणार आहेत. मागील निवडणुकीत अनेक मतदारांना ‘एसएमएस’ मिळाले नसल्याने उमेदवारांनी मतदान केंद्र आणि मतदार क्रमांकाची माहिती देण्यासाठी ‘टोल फ्री नंबर’ सेवा सुरू केली आहे. विद्यापीठ यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे सुविधा पुरवत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

जिल्ह्यांत १८ मतदान केंद्रे
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यांतर्गत प्रथमच पदवीधर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ५५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. औरंगाबाद शहरात दहा आणि प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १८ मतदान केंद्र आहेत. एकूण मतदार २९ हजार असून, तालुक्यातील एक केंद्र पुरेसे नसल्याचे उमेदवारांनी सांगितले. काही गावे तालुक्यापासून दूर असल्यामुळे तालुक्यात किमान दोन केंद्र देण्याची गरज आहे. अन्यथा, मतदानाची टक्केवारी लक्षणीय घसरण्याची शक्यता आहे.

यंत्रणा कामाला
पदवीधर निवडणुकीत पाच पॅनल रिंगणात उतरले आहेत. विद्यापीठ उत्कर्ष पॅनल, विद्यापीठ विकास मंच, शिवशाही पॅनल, परिवर्तन पदवीधर आघाडी आणि विद्यापीठ संघर्ष समिती प्रतिस्पर्धी आहेत. राजकीय पाठबळ असलेले उमेदवार व पॅनल ग्रामीण भागात स्वतंत्र यंत्रणा राबवून अधिक मतदारापर्यंत पोचत आहेत, मात्र स्वतंत्र उभ्या असलेल्या उमेदवारांना यंत्रणा राबवून मतदान करून घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे तालुक्यात अधिक मतदान केंद्र देण्याची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गेवराईत राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
गेवराई येथे राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विरोध करत तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात
आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
शेतकरी, शेतमजुर आणि युवकांनी मोर्चात शासन विरोधी प्रचंड घोषणा देऊन संताप व्यक्त केला. कर्जमाफी झालीच पाहिजे यासह विविध घोषणांनी गेवराई शहर दणाणुन गेले होते. तहसील कार्यालयावर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत होऊन राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचे वाभाडे काढले.

यावेळी बोलतांना आमदार अमरसिंह पंडित म्हणाले, ‘कपाशीच्या बीटी बियाणांच्या बाबत चार महिण्यांपूर्वी विधान परिषदेत सरकारला जाणिव करून दिली होती. वेळीच उपाययोजना केली असती तर बोंड आळीमुळे उद्धवस्त झालेल्या कापूस उत्पादक शेतकरी वर्गाचे नुकसान टाळता आले असते. नुकसानग्रस्तांना जाचक अटींचा मोठा जाच केला जात आहे. बिटी कपाशीचे वाण लावलेल्या सर्व शेतकरी वर्गास हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करुन बोगस बियाणे देत असलेल्या कंपनीवर कारवाई करा.’
त्यासोबतच राज्य सरकारने आरक्षणाच्या नावावर मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजाची फसवणूक केली आहे. कर्जमाफीची योजना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन सुरू केली असून वास्तविक अशा फसव्या योजनेला छत्रपतींचे नाव देऊन सरकारने बदनामी केली आहे. अद्याप कोणालाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. मराठवाड्यातील पाण्याचे नियोजन करून मोठे सिंचन प्रकल्प उभा करण्याची मागणी ही त्यांनी यावेळी केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, जालिंदर पिसाळ, सुभाष नागरे यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधव चाटे यांनी केले तर आभार आनंद सुतार यांनी मानले. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब नाटकर, जालिंदर पिसाळ, पाटीलबा मस्के, ऋषिकेश बेदरे, समाधान मस्के, दत्ता दाभाडे, आनंद सुतार यांच्यासह बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, खरेदी विक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, उपसभापती शाम मुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नांदेडमध्ये मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

नांदेड - विविध मागण्यांसाठी मुळ आदिवासी समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या विराट आक्रोश मोर्चाला नांदेडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या आधिनिस्त असलेल्या विभागीय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना स्वायत्त घोषीत करावे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीवर अध्यक्ष म्हणून उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधिशाची नियुक्ती करावी या अन्य मागण्यांसाठी गुरुवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नवामोंढा परिसरातून निघालेला हा मोर्चा शिवाजीनगर, कलामंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

या मोर्चात मन्नेरवारलु, कोळी महादेव ,राजगोंड, तडवी, ठाकुर, माना, हलबा, गोवारी समाजाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुरेश आंबुलगेकर, परमेश्वर गोणारे, रामचंद्र बोईनवाड, नागनाथ भिसेवाड, सोपानराव मारकवाड, लक्ष्मणराव ठक्करवाड, मधुकर उन्हाळे, व्यंकटराज मुदिराज, सुभाष निलावाड, दिपक शंकररवार, बाबुराव पुजरवाड, मंगाराणी आंबुलगेकर, सुलोचना मुखेडकर, दिपाली मोरे, माजी आमदार ठक्करवाड यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर तेथे त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी सर्वच मान्यवरांनी समाजांच्या मागण्याबाबत आग्रह धरला. राज्य शासनाने स्थापन केलेली एसआयटी रद्द करावी, शासकीय कर्मचारी वर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र त्वरेने मिळावे या मागण्या करण्यात आल्या.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन सादर केले. रास्त मागण्याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल अशा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चा दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मोर्चात महिला, विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या या मोर्चात मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बोंडअळीने दोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यात तीन लाख ७५ हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली. या कापसापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्र गुलाबी बोंडअळीने बाधित झाले आहे. त्यामुळे या बोंडअळीने कापसाच्या उत्पादनावर वीस टक्के पर्यंत परिणाम झाला आहे.
शेतकऱ्यांच्या पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या या पिकाची नगदी पैसे मिळवून देणारे पीक अशी ओळख आहे. त्यामुळे कापसाचे क्षेत्र बीडमध्ये वाढत आहे. गेल्यावर्षी कापसाला विक्रमी पाच हजार आठशे रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. यंदा सुरुवतीला पावसाने ओढ दिली व त्यानंतर अति पावसाने ही कापसाच्या उत्पन्नात घट आली. एवढे कमी की काय म्हणून यंदा शेतकऱ्यांपुढे गुलाबी बोंडअळीचे संकट उभे ठाकले आहे. बीड जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार हेक्टवर कापसाचा पेरा झाला होता. सुरुवातीला बोंडअळीने जिल्ह्यात ५० हजार ५०० हेक्टर क्षेत्र या किडीने व्यापले होते. मात्र, या गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यातील तब्बल एक लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैजीनाथ मिसाळ यांनी दिली. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून कापूस उत्पादनात पंधरा ते वीस टक्के नुकसान या बोंडअळीने झाले आहे.
बीड जिल्ह्याची कापसाची सरासरी उत्पादन सात क्विंटल असले तरी या बोंडअळीने याचे उत्पादन काही ठिकाणी खूपच कमी झाले आहे. कोरडवाहू मध्ये तीन ते चार क्विंटलपर्यंतची घट यामुळे आली आहे. या बोंडअळीचा जीवनक्रम तोडणे गरजेचे असून यासाठी शेतकऱ्यांनी फरदड धरू नये. त्यासोबतच कापूस पीक काढणी झाल्यानंतर कापसाच्या पळाट्या बांधावर न टाकता गाडून किंवा जाळून टाकाव्यात असे आवाहन ही मिसाळ यांनी केले आहे.
यात आणखी कहर म्हणजे कापूस वेचणीसाठीचा दर यंदा वाढला आहे. गेल्या वर्षी पाच रुपये असलेला वेचणीचा खर्च वाढला. आठ ते दहा रुपये प्रति किलो प्रमाणे कापूस वेचणी शेतकऱ्यांना करावी लागली. जेंव्हा बाजारात कापूस नेला तेंव्हा भाव ऐकून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. यावर्षी कापसाला दिवाळीत चार हजार तर सध्या चार हजार ३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वेचणीचा खर्च दुपटीने वाढला आणि भाव मात्र एक हजार पाचशे रुपये कमी मिळाला. त्यामुळे कापूस उत्पादक गुलाबी बोंडअळी आणि घसरलेला भाव यामुळे संकटात सापडला आहे. या बोंडअळीने बाधीत क्षेत्राला सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी आता जोर धरत आहे.


बीड जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार हेक्टवर कापसाचा पेरा झाला मात्र, या गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यातील तब्बल एक लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कापूस उत्पादनात पंधरा ते वीस टक्के नुकसान या बोंडअळीने झाले आहे.
वैजीनाथ मिसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड

वेचणीचे दर वाढले अन भाव घसरला
कापूस वेचणीसाठीचा दर यंदा वाढले आहेत. गेल्या वर्षी पाच रुपये असलेला वेचणीचा खर्च वाढला असून आता आठ ते दहा रुपये प्रति किलो प्रमाणे कापूस वेचणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे. जेंव्हा बाजारात कापूस नेला तेंव्हा भाव ऐकून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. यावर्षी कापसाला दिवाळीत चार हजार तर सध्या चार हजार ३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्तच्या कामामुळे राजुरी झाले पाणीदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील राजुरी (ता. उस्मानाबाद ) गावची वाटचाल गेल्या एक वर्षांपासून प्रगतीकडेच नव्हे तर श्रीमंतीकडे सुरू आहे. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत लोकसहभाग व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राजुरी येथुन वाहणाऱ्या नदीचे सुमारे ५ किलोमीटर अंतराचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्जीवन करण्यात आले. या नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. इतकेच नव्हे, तर या नदीपात्रात ८ केटी वेअर बंधारे आणि ३० माती बांध (डोह मॉडेल)निर्माण करण्यात आल्यामुळे सध्या या नदी पात्रात मोठा जलसाठा निर्माण झाला आहे.
गावातील व परीसरातील विहिरी तुडुंब भरल्या असून, येथील कुपनलिकांचे पाणीही वाढले आहे. परिणामी यंदा राजुरी परिसरातील शेती सिंचनाखाली आल्याने यंदा या भागातील शेतकरी चांगले उत्पन्न मिळण्याची आशा बाळगून आहेत. आता राजुरीची श्रीमंत गाव अशी ओळख होऊ लागली आहे. ही किमया केवळ जलयुक्त शिवार अभियानामुळे घडल्याचे येथील ग्रामस्थ सांगताहेत. आता येथील ग्रामस्थांना पाण्याचे महत्व कळले असून, त्या पाण्यातून येथील शेती ही बागायती झाली आहे. एकेकाळी रोजगार हमीच्या कामावर जाऊन पोटाची खळगी भरणारा येथील शेतकरी आता इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ लागला आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामातून आता या गावाला
सुबत्ता आली असून, येथील बळीराजाला लक्ष्मी प्रसन्न झाली आहे.
ग्रामस्थांचा सहभाग, तरुणांचा उत्साह आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे पाणी येथील नदी पात्रात थांबले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिलिंद कला महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

$
0
0

मिलिंद कला महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम
म. टा. प्र‌ति‌निधी, अाैरंगाबाद
मिलिंद कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे संविधान दिन आणि राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्त छात्रसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार, अजिंठा वसतिगृह आणि नागसेनवन परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात अाली.
स्वच्छता मोहिमेच्या सांगतेप्रसंगी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, उपप्राचार्य डॉ. एस. पी. बुरकुल, डॉ. एफ. एस. पठाण, लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले, भन्ते डॉ. एम. सत्यपाल, प्रा. आर. जी. पवार, प्रा. लिहिणार, अंडर ऑफिसर मोरे आणि गाडेकर सर्व प्राध्यापक, कर्मचारी व छात्रसैनिक या कार्यक्रमात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचे १६ कोटी वैजापूर तालुक्यात जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वैजापूर तालुक्यातील १६६२ व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शहर, परसोडा, महालगाव, खंडाळा व लोणी शाखेतील दोन हजार ३१ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा झाली आहे. जिल्हा बँकेच्या कर्जदारांचे तीन कोटी ६६ लाख ७७ हजार ८९७ रुपये, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्जदारांच्या खात्यात १२ कोटी ३६ लाख ८९ हजार १९१ रुपये जमा झाले आहेत.
जिल्हा बँकेच्या तालुक्यातील १५ शाखांमध्ये कर्जमाफीची रक्कम वर्ग केल्याची माहिती जिल्हा बँकेचे कर्ज अधिकारी उगले यांनी दिली. शासनाने कर्जमाफी साठी पात्र शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट (यादी) जाहीर केली आहे. त्यानुसार, जिल्हा बँकेच्या दहेगाव (३०), धोंदलगाव (१०), गारज (४७), खंडाळा (२२९), लाडगाव (५४), लासूरगाव (४०), लोणी (१४), वैजापूर (५६९), महालगाव (२२७), माळीघोगरगाव (११७), मनूर (३१), पालखेड (८०), परसोडा (२८), शिऊर (९६) व वीरगाव (९०) या १५ शाखेतील एकूण १६६२ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या तालुक्यातील २८ हजार सभासदांपैकी २५ हजार ३०० सभासद चालू थकबाकीदार आहेत. याशिवाय महाराष्ट्र बँकेच्या शहर व शिऊर शाखेतील ९२७ शेतकऱ्यांना सहा कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शहर, परसोडा, महालगाव, खंडाळा व लोणी शाखेतील दोन हजार ३१ थकबाकीदार शेतकऱ्यांना तब्बल १२ कोटी ३६ लाख ८९ हजार १९१ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या वैजापूर शाखेच्या चार हजार थकबाकीदार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले होते. पण शासनाकडुन अद्याप पात्र शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट प्राप्त न झाल्याने या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत प्रश्नचिन्ह आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थकबाकीदारांबद्दलही असाच प्रकार आहे.

संयुक्त खात्याचा गोंधळ

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेत अनेक सभासदांचे संयुक्त खाते आहे. त्यामुळे संयुक्त खाते असलेल्या खात्यात दोघांच्या नावावर कर्ज असून कर्जमाफीची रक्कमसुद्धा सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे दोघांच्या नावावर पडली आहे. त्यामुळे अशी खाती शोधण्याचे काम बँकांना करावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय भेटींमुळे तर्कवितर्क

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची सलगी वाढली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील दिग्गज नेते जयदत्त ‌क्षीरसागर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतलेल्या भेटीमुळे मराठवाड्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे ओबीसी समाजातील प्रबळ नेते आहेत. ते ‘राष्ट्रवादी’मध्ये छगन भुजबळ गटाचे मानले जातात, पण राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना बळ दिल्याने ते प्रचंड नाराज आहेत. धनंजय मुंडे यांना शह देण्यासाठीच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि क्षीरसागर यांची भेट घडवून आणली आहे. याआधी पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांची साथ घेऊन बीड जिल्हा परिषद ताब्यात घेतली आहे. मुख्यमंत्री आणि जयदत्त ‌क्षीरसागर यांनी शुक्रवारी मुंबई ते बीड असा एकत्र प्रवास केला आहे. बीडच्या राजकारणामध्ये क्षीरसागर काका-पुतण्यांचा वाद टोकाला गेलेला आहे. सध्या बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा जयदत्त यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली आहे. संदीप क्षीरसागरांना धनंजय मुंडे यांनी बळ दिले आहे. या भेटीमुळे मराठवाड्याच्या राजकारणात चर्चेला प्रचंड उधाण आले आहे.

फडणवीस-क्षीरसागर यांची शुक्रवारी सकाळी भेट झाल्यानंतर दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भाजप सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची भेट घेतली.

वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या मुलाच्या आणि लोह्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाचीच्या २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या विवाहसोहळ्यातही मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अज‌ित पवार यांनी मुंबई ते औरंगाबाद आणि परत मुंबई असा एकत्रित विमानप्रवास केला होता. विशेष म्हणजे २०१९च्या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री किंवा भाजपच्या कुठल्याही मंत्र्याला राष्ट्रवादी बोलवणार नाही अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. तरीही या लग्नसोहळ्यात मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकत्रित आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मुख्यमंत्री आणि अजित पवार हे एकत्र कसे आले? असा प्रश्नही विचारला जात आहे. एकाच विमानातून आणि गाडीतून हे दोघे नेते आल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे.

बीड शहरात मुख्यमंत्र्यांचा दौरा होता. मी या बीड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे ते माझ्या भेटीला आले होते. या भेटीत कोणत्याही राजकीय बाबींवर चर्चा झालेली नाही.
- जयदत्त क्षीरसागर, आमदार, बीड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शासकीय सेवेतील डॉक्टर होणार विशेष रोग तज्ज्ञ

$
0
0

मोतीचंद बेदमुथा, उस्मानाबाद
आरोग्य संदर्भातील समस्या दिवसेंदिवस वाढत असून, या आजारावर उपचार करण्यासाठी शासकीय आरोग्य सेवेत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. ही उणीव दूर करीत ग्रामीण भागातील रुग्णांना विविध आजारावरील सेवा तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून 'एमओपीसी' ( मेडिकल ऑफिसर सर्टिफिकेट प्रोग्राम) नावाचा एक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कार्य करणाऱ्या ग्रामीण भागातील एमबीबीएस डॉक्टर मंडळींना याचा लाभ प्राधान्याने घेता येणार आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागात ग्रामीण भागातील प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा उपकेंद्र येथे काम करणाऱ्या एमबीबीएस डॉक्टर मंडळींना त्यांचे ज्ञान वृद्धीगत
व्हावे, कौशल्य वाढावे त्यासोबतच त्यांना अवगत असलेल्या ज्ञानाचे बळकटीकरण व्हावे यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत इच्छुक अशा डॉक्टर मंडळींना सहा महिन्यांसाठी शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात अनुभव घेण्यासाठी पाठविण्यात येते. त्यानंतर त्यांना सेवा अनुभव प्रमाणपत्र देण्यात येते. त्या प्रमाण पत्राच्या आधारे व विकसित झालेल्या
ज्ञानावर ते ग्रामीण भागात रूग्णांना अत्यावश्यक सेवा देऊन, पुढील तपासणीसाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरकडे रुग्णाला पाठवू शकतात.
स्त्रीरोग, मेडिसीन, स्किन, मनोविकार, बालरोग आदी आरोग्याच्या संदेर्भातील समस्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत आहेत. या आजारांवर उपचार
करण्यासाठी लागणारी विशेष तज्ज्ञ मंडळी ग्रामीण भागातून उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागात शासकीय सेवेत बहुतेक डॉक्टर्स हे एमबीबीएस पदवी घेतलेले
आहेत. मात्र, ही मंडळी विविध आजारावर उपचार करण्यास कमी पडतात. राज्याच्या ग्रामीण भागात तज्ज्ञांची उपलब्धता नसल्यामुळे आता एमबीबीएस
उत्तीर्ण मंडळींना विविध आजारावरील प्रशिक्षण देण्याचा निर्णय आरोग्य संचालनालयाने घेतला आहे.
ग्रामीण भागात अशा प्रकारची मंडळी प्राथमिक उपचार करतील व त्या नंतर गरज भासल्यास त्याला शहरातील विशेष तज्ज्ञांकडे पाठवीतील. या प्रशिक्षणामुळे या डॉक्टरांना प्राथमिक टप्प्यात आजाराचे निदान करणे व त्यावर उपचार करणे शक्य होणार आहे. ज्या रुग्णांमध्ये आजाराची लक्षणे तीव्र
दिसतील त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी योग्यवेळी सूचना देण्यात येतील.
ग्रामीण भागातून विशेष तज्ज्ञांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी जाहिराती दिल्या जातात. परंतु विशेष तज्ज्ञ मंडळी ग्रामीण भागात जाण्यास उत्सुक नसल्याचे
दिसून आल्याने, 'एमओसीपी' चा पर्याय आरोग्य संचालनालयाने उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी दिली.

आता जिल्हा रुग्णालयातूनही पुरेशा व योग्य मानधनावर सेवा देण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भातील जाहिराती देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप यास फारसा प्रतिसाद नाही, अशी खंतही डॉ. माले यांनी व्यक्त केली.




ग्रामीण भागातील रुग्णसेवा मजबूत होणार
राज्य सरकार आरोग्यसेवेबाबत दिवसेंदिवस तत्पर होत चालले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एमबीबीएस डॉक्टर प्रशिक्षण कार्यक्रम आहे. याशिवाय १०४ व १०८ नंबर वरूनही आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध करून दिली जात आहे. आता एमबीबीएस डॉक्टरच्या माध्यमातून ग्रामीण भागातून आरोग्य सेवेचे जाळे अधिक मजबूत बनविण्याचे आरोग्य संचालनालयाचे धोरण आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसेवा अधिक मजबूत होईल, शिवाय जिल्हा शासकीय रुग्णालयावरील सामान्य रुग्णांचा ताण कमी होण्यास मदत होईल. जिल्हा रुग्णालयातील विशेष तज्ज्ञ मंडळी आपली सेवा त्या-त्या विभागातील गरजुंना
प्राधान्याने देऊ शकतील, असा विश्वास डॉ. माले यांनी 'मटा' शी बोलताना व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ चार महिन्यांत ३४ जण हद्दपार !

$
0
0

नांदेड : जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असलेल्या व पोलिसांसाठी ‘डोकेदुखी’ ठरत असलेल्या ३४ जणांना हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली. चार महिन्यांत ३४ जणांना हद्दपार करताना जिल्हा पोलिस प्रशासनाने आणखी काही समाजकंटकांचे प्रस्ताव तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३६ पोलिस ठाणे आहेत. राज्यात (आयुक्तालय वगळता) सर्वाधिक गुन्हे नांदेडात दाखल होतात. तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या नांदेडमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या गंभीर गुन्ह्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जीवघेणा हल्ला करणे, बिनदिक्कतपणे अवैध व्यवसाय चालवणे, दहशत निर्माण करणे, खंडणीसाठी धमकावणे आदी आरोप असलेल्यांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे.
संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनी हद्दपारीचा रीतसर प्रस्ताव तयार करून पोलिस उपअधिक्षकांमार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवायचा. त्यांनी सुनावणी घेऊन निर्णय घ्यायचा अशी ही प्रक्रिया आहे. पोलिस अधिकारी मोठ्या उत्साहात हद्दपारीचे प्रस्ताव तयार करतात; पण आवश्यक तो पाठपुरावा करीत नसल्याने अनेक महिन्यांपासून हे प्रस्ताव धूळखात पडून राहतात. पण सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका बैठकीत पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी अधिकारी वर्गाचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले होते. हद्दपारीचे प्रस्ताव मंजूर करणे किती आवश्यक असल्याचे उपविभागीय अधिकारी यांना पटवून सांगताना त्यांनी सर्व पोलिस अधिकारी यांनी पाठपुरावा करण्याचे आदेश दिले होते.
समाजात उपद्रवी ठरणारे, विशेषत: अवैध व्यवसाय करणार्यांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यातील मरगळ बाजूला सारत या कारवाईकडे लक्ष दिल्याने गेल्या चार महिन्यांत तब्बल ३४ जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली. यात वजिराबाद व धर्माबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी पाच जणांचा समावेश आहे. सिडको, इतवारा पोलिसांनी चौघांना तर अर्धापूर पोलिसांनी तिघांना हद्दपार केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हद्दपार होण्याची अलीकडच्या काळातील पहिलीच घटना मानली जाते.

आणखी काही जणांवर कारवाई ?
दरम्यान, ३४ जणांवर कारवाई झाली असली तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणखी काही प्रस्ताव करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक (गृह) विश्वासराव नांदेडकर यांनी दिली. अशी कारवाई करण्यासाठी महसूल व पोलिस अधिकारी यामध्ये समन्वय महत्त्वाचा असतो. प्रस्तावाला महसूलचे अधिकारी कायदेशीर व सकारात्मक प्रतिसाद देत असल्याने समाजकंटकामध्ये जरब निर्माण झाली आहे. आगामी काळात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याला प्राधान्य असून लवकरच आणखी समाजकंटकावर हद्दपारीची कारवाई होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रनगरात घरफोडीत ५५ हजारांचा ऐवज लंपास

$
0
0


मित्रनगरात घरफोडीत ५५ हजारांचा ऐवज लंपास
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मित्रनगर येथील सचिन कांतीलाल बांढीया (वय ३९, रा. साईप्रेम रेसीडेंसी, गुरूद्वाराजवळ) यांचे घर फोडून चोरट्यांनी ५५ हजारांचा ऐवज लंपास केला. २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेष्ठ नागरिक जखमी
अज्ञात टाटा सफारी कारने दिलेल्या धडकेत सुरेश बाळकृष्ण खिस्ती (वय ५९, रा. प्रतापनगर) हे जेष्ठ नागरिक जखमी झाले. सोमवारी रात्री साडेदहा वाजता मौलाना आझाद कॉलेज रोडवर हा अपघात घडला. या प्रकरणी दिलीप खिस्ती यांच्या तक्रारीवरून पसार टाटा सफारी कारचालकाविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी लांबवल्या
जावेद युनूस शेख (वय ४०, रा. रहीमनगर, दरबार हॉटेलमागे) यांच्या दोन दुचाकी चोरट्यांनी घरासमोरून लांबवल्या. यामध्ये २१ नोव्हेंबरच्या रात्री मोपेड तर बुधवारी रात्री हिरो ‌होंडा दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी बुधवारी जावेद शेख यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपा शहराध्यक्षावर हल्ल्याचा प्रयत्न करणारा गजाआड

$
0
0

भाजपा शहराध्यक्ष तनवाणींवर हल्ल्याचा प्रयत्न करणारा गजाआड
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भाजपा शहराध्यक्ष किशनचंद तनवाणीवर हल्ल्याचा प्रयत्न करणारा आरोपी तिलक भुरेवाले याला शुक्रवारी सिटीचौक पोलिसांनी अटक केली. रविवारी काचिवाडा भागात भाजपाच्या शाखा उद्‍घाटनाच्या वेळी हा वाद घडला होता.
या प्रकरणी भाजपाचे कार्यकर्ते अजय राजू चावरिया (वय ३८, रा. दलालवाडी) यांनी सोमवारी तक्रार दाखल केली होती. रविवारी काचीवाडा, चेलीपुरा भागात भाजपाच्या शाखेचे उद्‍घाटन, प्रवेश सोहळा तसेच मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होता. या ठिकाणी भाजपाचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, अनिल मकरिये यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमात तिलक भुरेवाले (रा. काचिवाडा, चेलीपुरा) नावाच्या तरुणाने ‌शिवीगाळ करीत तनवाणी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच चावरिया यांना देखील चाकुने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारित करण्यात आला आहे. या प्रकरणी चावरिया यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी तिलक विरुद्ध अश्लिल शिवीगाळ करणे, कारण नसताना हल्ला करणे, धमक्या देणे तसेच भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी तिलक भुरीवालेला अटक केल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवनेरीसह इतरांनाही कॅशलेस सुविधा

$
0
0


शिवनेरीसह इतरांनाही कॅशलेस सुविधा
म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद
औरंगाबाद-पुणे शिवनेरी बस व निमआराम बसने प्रवास करणारे प्रवाशांसाठी स्वाइप मशीनद्वारे तिकिटाचे पैसे देण्याची सोय एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी येथील मध्यवर्ती बस स्थानकात पाच स्वाइप मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात शिवनेरी बस बुकिंगसाठी एकच स्वाइप मशीन देण्यात आली होती. इतर बसच्या प्रवाशांना या सुविधेचा उपयोग होत नव्हता. निमआराम बसचे तिकिटसुद्धा स्वाइप मशीनद्वारे खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होती. त्यामुळे एसटी महामंडळाने काही दिवसांपूर्वी पाच स्वाइप मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यामुळे आता शिवनेरी व्हॉल्व्होसह, निमआराम, आगाऊ तिकीट आरक्षण, विविध सवलतीचे पास, पंढरपूर आणि शटल बस सेवेकरिता कॅशलेस व्यवहार करता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको एन ७च्या दत्त मंदिरात दीपालंकार

$
0
0

म. टा. प्र‌ति‌निधी, अाैरंगाबाद
सिडको एन सातमध्ये असलेल्या जागृत दत्त मंदिरात शुक्रवारी सायंकाळी सहानंतर सहस्त्र दीपालंकार सेवा करण्यात आली. यावेळी हजारो दीप लावण्यात आले. या कार्यक्रमास सिडको परिसरातील शेकडो भाविक उपस्थित होते, अशी माहिती दत्त जन्मोत्सव समितीचे समन्वयक गणेश जोशी यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ११पर्यंत दैनंदिन धार्मिक कार्यक्रम, साडेबारा वाजता आरती आणि सायंकाळी साडेसहा वाजता दीपालंकार कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर मुक्‍ता कुलकर्णी यांचा पंचपदीचा कार्यक्रम झाला. मंदिरातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सकाळी गुरूचरित्र पारायण, भीक्षा फेरी, महाप्रसाद, सायंकाळी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शनिवारी रात्री ८ वाजता संतोष तळेकर आणि सुधीर कोर्टीकर यांचा मिमिक्रीचा कार्यक्रम होईल. मार्गशीर्ष पौर्णिमेला रविवारी सकाळी दत्तजयंती होईल. त्यानिमित्त महाभिषेक, महापूजा, ५६ भोग नैवेद्य, दुपारी तीन ते सहापर्यंत दत्त जन्माचे कीर्तन हभप भरतबुवा रामदासी हे करणार आहेत. यानंतर फटाके, आतषबाजी व वेद मंत्रांसह जन्मोत्सव होईल. रात्री नऊ वाजता पालखी सोहळा होईल. मंगळवारी पाच डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद भंडारा होईल. यासह बक्षीस वितरण होणार आहे. यासाठी श्री जागृत दत्त सेवा मंडळ एन-७ सिडको परिश्रम घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोखीम पत्करा; सुरक्षित कोषातून बाहेर पडा

$
0
0

जोखीम पत्करा; सुरक्षित कोषातून बाहेर पडा

सीएमआयएच्या स्टार्टअप विकएंडचे उद्‍घाटन - राजीव वैष्णव

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पागल व्हा, अरे मी हा सल्ला खरोखरच देतोय... असे रोखून माझ्याकडे बघू नका... पागल म्हणजे वेडे व्हा, आपल्या उद्योगाच्या कल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी खरोखरच वेडे व्हा, सुरक्षित कोषातून बाहेर पडण्यासाठी अनेकजण ‌फक्त विचार करतात, पण होत काहीच नाही, स्टार्टअप तुमची वाट पाहतेय, ही संधी आहे याचा फायदा घ्या, असे आवाहन स्टार्टअप प्रचारक आणि रिलायन्सचे राजीव वैष्णव यांनी केले. सीएमआयए (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर) आणि जर्मनीच्या जीआयझेड या संस्थेच्या बंगळुरू येथील कार्यालयातर्फे आयोजित ‘स्टार्टअप विकएंड’ या अनोख्या कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्रसंगी वैष्णव बोलत होते.
शुक्रवारी (१ डिसेंबर) रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील सीएमआयएच्या या विकएंडच्या उद्‍घाटनप्रसंगी व्यासपीठावर सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योजक रणजित देशमुख, सीएमआयएचे मानद सचिव व्ही. एन. नांदापूरकर आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात ८० हून अधिक जणांनी सहभाग घेतला आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योगच्या कल्पना मांडलेल्या तरुणांचा, उद्योजकांचा समावेश होता. वैष्णव म्हणाले, एखाद्या पक्ष्याला उडायला सांगितल्यावर पक्ष्याची इच्छा असेल तरच तो आकाशात झेप घेईल. स्टार्टअपचे ही असेच आहे, इच्छा असणे आवश्यक आहे. सरकारी योजना, चेंबर्सची माणसे पाठीमागे उभी राहणे हे स्टार्टअपसाठी पोषक ठरत असलेले वातावरण आहे. या वातावरणाचा फायदा घेणे आवश्यक आहे. बँकेचे लॉकर जसे असते, तसे हे आहे. आपल्याकडील चावी आणि मॅनेजरकडील चावी अशा दोन्ही चाव्या लावल्या तरच लॉकर उघडते, हे कायम लक्षात घ्या. नशीब, पोषक वातावरण आणि मेहनत या स्टार्टअप लॉकरच्या दोन चाव्या आहेत. दोन्ही सोबत असतील तरच उद्योग उभा राहील आणि तेच मी तुम्हाला आज सांगयला आलो आहे. येथे स्टार्टअपच्या अनेक कल्पना आल्या आहेत. त्यांच्याविषयी आम्ही चेंबरच्या पदाधिकारी आणि उद्योजकांशी चर्चा केली आहे. यातून नक्कीच उद्योग उभारणीस फायदा होणार आहे.
मूळ औरंगाबादचे व सध्या पुण्यात असलेले उद्योजक रणजित देशमुख यांनी आपण तीन उद्योग या स्टार्टअपद्वारेच उभे केल्याचे सांगत आपल्या दोन उद्योग उभारणीची माहिती त्यांनी दिली. प्रसाद कोकीळ यांनी स्टार्टअप विकएंड आयोजनामागील भूमिका मांडली. आशिष गर्दे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परशुराम सेवा संघातर्फे ‘योग्य वर हवा’ संमेलन

$
0
0

परशुराम सेवा संघातर्फे ‘योग्य वर हवा’ संमेलन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परशुराम सेवा संघातर्फे ब्राह्मण समाजातील वधुंसाठी, त्यांच्या पालकांसाठी लवकरच ‘योग्य वर हवा, ब्रह्मगाठ’ या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी ९ डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी होणार आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष अनिल मुळे, दत्तात्रय पिंपळे, कमलाकर जोशी यांच्याशी संपर्क साधावा. या संमेलनात अतुल भगरे गुरूजी (नाशिक), हर्षद बरवे (पुणे), सुरेश केदारे (औरंगाबाद), मंजुषा कुलकर्णी (मुंबई) यांचे मार्गदर्शन करणार आहेत. विवाह जुळण्यासंबंधी समज-गैरसमज, वयोमर्यादा, अपेक्षा, शास्त्रीय दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी उल्हास अकोलकर, सागर खेरडेकर, अश्विन रातुळीकर, मंदार पाटील, त्यागराज देशमुख, वसंत किंणगावकर, मंजुषा कुलकर्णी मनिषा जोशी, सायली धर्माधिकारी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीसोबतच संस्काराची गरजः मंत्री पाटील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
‘देशाचा विकास होत असून भौतिक सुखाची पूर्तता होताना आज समृद्धीबरोबरच संस्काराची गरज आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी केले. वेरूळ येथील संत जनार्दन स्वामींच्या २८व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित जनशांती धर्म सोहळ्याच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शांतीगिरी महाराज, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, एम. के. अण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, कोपर्डी खटल्याच्या निकालामुळे कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. पणस त्यासोबतच संस्कारांची गरज निर्माण झाली आहे. पाश्चात्य देशात प्रचंड संपत्ती असली तरी तेथे मोठ्या प्रमाणात व्यभीचार देखील आहे. तेथे मातृत्व येणाऱ्या शालेय विद्यार्थिनींची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता वाढत आहे. अशा घटना संस्कार नसेल घटना घडतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले की, आपला देश कृषीप्रधानसोबतच ॠषीप्रधानही आहे. अध्यात्मिक ताकदच चांगले मन घडविते. मन अध्यात्मिक असेल, तर समाधानी आहोत हे समजेल. माणसाचं मन निर्मळ नसेल तर कोणताही साबण काहीच करू शकत नाही. मन स्वच्छ करणारा साबण जगात नाही. अध्यात्म, साधुसंतांचे मार्गदर्शन, कथा, कीर्तन यातून माणसांचे मन निर्मळ होते, माणूस सुसंस्कृत होतो, असे त्यांनी सांगितले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन विष्णू महाराज यांनी केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पवार, निवृत्ती कांडेकर, झुंबरशेठ मोडके, गणपत म्हस्के, हरिश्चंद्र सोनवणे, जनार्दन रिठे, राजू चव्हाण, भिकन आल्हाड, पुंडलिक बारगळ आदींनी परिश्रम घेतले.

महाप्रसादाचा लाभ (फोटो)

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंगतीत बसून मसाले भात, बुंदीचा महाप्रसाद घेतला. वेरूळमध्ये जय बाबाजी भक्त परिवारातर्फे शोभायात्रेत सामील हत्तीने लक्ष वेधून घेतले. सोहळ्यात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेश पाठवून वेरूळ आश्रमात येण्याची इच्छा व्यक्त केली. सात दिवस मौन धारण करून जपानुष्ठान केले. सात दिवस वक्तृत्व, कबड्डी, खो-खो, कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याचा निधी माजी महापौरांनी पळविला

$
0
0

रस्त्याचा निधी माजी महापौरांनी पळविला
शासनाचे रस्त्यांसाठीचे अडीच कोटी वॉर्डातील रस्त्यांच्या कामासाठी वळवले
क्रांतीचौक ते महावीर चौक रोडच्या कामाचे पैसे माजी महापौर भगवान घडमोडे यांनी वळवले.
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य शासनाने रस्त्यांच्या कामासाठी दिलेल्या निधीपैकी तब्बल अडीच कोटी रुपये माजी महापौर भगवान घडमोडे यांनी आपल्या वॉर्डातील कामांसाठी पळविल्याचे उघड झाले आहे. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे खोळंबली असून नागरिकांचे हाल होत आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून सहा रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यात सेव्हन हिल्स ते सूत गिरणीचौक, गजानन महाराज मंदिर ते जयभवानी नगर, कासलीवाल कॉर्नर ते संत तुकोबा नगर, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक आणि महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्यांचा समावेश करण्यात आला होता.
यापैकी महावीर चौक ते क्रांतीचौक हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी खर्च करण्यात येणारा साडेसहा कोटींचा निधी शिल्लक राहिला. शिल्लक राहिलेला हा निधी कैलासनगर ते एमजीएम या रस्त्यासाठी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले, परंतु शासनाने पाच महिन्यांपूर्वी रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांचे विशेष अनुदान महापालिकेला दिले. या अनुदानातून कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १०० कोटी रुपयांमधून करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची यादीच शासनाने महापालिकेला दिली आहे, त्यात या रस्त्याचा समावेश आहे.
कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे काम १०० कोटींच्या अनुदानातून होणार असल्यामुळे या रस्त्यासाठी वळविण्यात आलेला साडेसहा कोटींचा निधी तसाच शिल्लक राहिला. शिल्लक राहिलेल्या या निधीपैकी अडीच कोटी रुपये भगवान घडमोडे यांनी आपल्या वॉर्डासाठी वळते करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी ‘त्या’ साडेसहा कोटींचे काय झाले ? हा निधी आहे तसाच आहे की अन्यत्र वळविण्यात आला याची माहिती देण्याची मागणी केली. सभापती गजानन बारवाल यांनी या संदर्भात शहर अभियंता सखराम पानझडे यांना खुलासा करण्यास सांगितले. पानझडे म्हणाले, शासनाने रस्त्यांच्या कामांसाठी २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी दिला होता. त्यातून पाच रस्त्यांची कामे करण्याचे ठरले होते. महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्यासाठी या निधीतून साडेसहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, पण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेल्यामुळे साडेसहा कोटींचा निधी शिल्लक राहिला , त्यातील अडीच कोटी रुपये माजी महापौर भगवान घडमोडे यांनी त्यांच्या वॉर्डातील कामांसाठी वळते करून घेतले.
रस्त्यांच्या कामांसाठीचे पैसे माजी महापौरांनी आपल्या वॉर्डातील कामांसाठी वळते केल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्याचे काम रखडले असून त्याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ हजार रुपये मिळवा आमदार अब्दुल सत्तार यांचे आवाहन

$
0
0

कृषिमंत्री दाखवा

२५ हजार रुपये मिळवा आमदार अब्दुल सत्तार यांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी कापसावर पडलेल्या बोंडअळी रोगाने त्रस्त आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. बीटी बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध शेतकरी तक्रारी देण्यासाठी जात आहेत, पण त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. राज्यात एवढी गंभीर परिस्थिती असताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर मात्र गायब आहेत. ते कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे आम्ही ‘कृषीमंत्री दाखवा, २५ हजार रुपये मिळवा,’ असे आवाहन काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.
काँग्रेसने गुरुवारी बोंडअळी प्रश्नी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर करमाड पोलिस ठाण्यात काही शेतकरी बीटी बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेले, पण त्यांना नऊ तास वाट पाहावी लागली. पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रती सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिल्या आणि भूमिका मांडली.
ते म्हणाले, ‘कापसावर पडलेल्या बोंडअळी रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. कृषीखात्याकडे मागणी करूनही पंचनामे केले जात नाहीत. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे पिशवी खरेदी केलेली बिले आणि पिशवी आहे अशांनी जर पोलिसात तक्रारी दिल्या तर त्या नोंदवून घेतल्या पाहिजेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, कापूस बोंडअळी प्रश्नी जास्तीत जास्त तक्रारी नोंदविल्या जाव्यात, यासाठी शनिवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे आमदार सत्तार यांनी स्पष्ट केले.
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर मात्र राज्यात कुठेच दिसत नसल्याचे सांगून सत्तार म्हणाले, ‘शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, पण कृषिमंत्री दिसत नाहीत. मंत्रालयात नसतात, मंत्रिमंडळ बैठकीलाही नसतात, ते केवळ खामगावचेच मंत्री आहेत.’ कृषिमंत्री एवढ्या संवेदनशील विषयावर उत्तर देत नाहीत, याचा निषेध करत ‘ कृषीमंत्री दाखवा आणि काँग्रेसतर्फे २५ हजार रुपये मिळवा,’ अशी घोषणा केली.
बोंडअळी नव्हे भाजप अळी
बोंडअळीच्या रंगावर कोटी करताना आमदार सत्तार म्हणाले, की ही अळी कापसाच्या कैरीत लपलेली असते. कैरी फोडल्यानंतरच ती दिसते. रोग लागताना गायब झालेली ही अळी भाजपसारखी आहे. भाजप जसे अदृश असते. तशी ही अळी आहे. अळीचा एक भाग गुलाबी आहे. म्हणजे ती शिवसेनेचीही असल्याचे सांगून सत्तार म्हणाले की, सरकारविरुद्ध आता शिवसेनेने विरोधी पक्षांसोबत आले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री येताच शहाजीराजे भोसले स्मारकाची स्वच्छता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
वेरूळ येथे अपूर्णावस्थेत व प्रशासनाचे दुर्लक्ष असलेल्या शहाजीराजे भोसले स्मारकाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भेट दिल्यामुळे भाग्य उजळले. मंत्री येणार असल्याने परिसरातील गाजर गवत काढून स्वच्छता करण्यात आली.
वेरूळ येथील जनार्दन स्वामी आश्रमात आयोजित सोहळ्याच्या सांगता समारंभानिमित्त मंत्री पाटील हे आले होते. यानिमित्ताने त्यांनी शहाजीराजे भोसले स्मारकाला भेट दिली. स्मारकाचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला द्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी अलिकडेच दिले आहेत. मात्र ताबा न दिल्याने स्मारकाची देखभाल दुरुस्ती व साफसफाई कोणी करायची यावरून स्मारक परिसर अस्वच्छ आहे. येथे गाजर गवत, झाडेझुडपे वाढली आहेत. पण, मंत्री पाटील येणार असल्याने अग्निशमन वाहन आणून शहाजीराजे भोसले यांचा पुतळा व परिसर धुवून काढण्यात आला. परिसरातील गाजर गवत काढून फरशी पुसण्यात आली.
स्मारकाच्या पहिल्या टप्प्यात ३२ लाख खर्च करण्यात आले. हे काम मार्च २००५ मध्ये झाले. दुसऱ्या टप्प्यात ५० लाख रुपये खर्च करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात मराठ्यांचा इतिहास दाखवणारे संग्रहालय, मिनी सांस्कृतिक हॉल, संत तुकाराम सांस्कृतिक हॉल या कामांवर दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण, नऊ वर्षांपासून ४२ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पडून आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व दिवंगत तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २००८ रोजी शहाजीराजे भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. त्यानंतर स्मारकाचे काम रखडलेले आहे.

कृती आराखड्याची सूचना

गेल्या १० वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४२ लाखांचा निधी उपलब्ध असूनही विकास कामे ठप्प आहेत. मंत्री पाटील यांनी या भेटीत स्मारकाची माहिती घेतली. शिवाय, स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना दिल्या. स्मारकाच्या कामासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. स्मारक समितीचे सदस्य किशोर चव्हाण यांनी ध्वनी व प्रकाश योजना सुरू करून अपूर्ण कामे तातडीने करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images