Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नॅशनल टीचर्स काँग्रेसचे पुणे येथे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) पुणे आणि डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या वतीने १० ते १२ जानेवारीच्या दरम्यान दुसऱ्या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या उदार कला, विज्ञान व वाणिज्यचे अधिष्ठाता प्रा.डॉ. सुधीर गव्हाणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेत देशभरातून आठ हजार शिक्षक सहभागी होणार आहेत. भारतीय वंशाच्या विदेशातील किमान ५०० प्राध्यापक सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. गव्हाणे यांनी सांगितले.
पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात ही परिषद होणार आहे. शिक्षकांना प्रेरित करून सक्षम पिढी घडविणे हा या परिषदेचा उद्देश आहे. युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून ही परिषद होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिषदेचे मुख्य आश्रयदाते असून शिक्षण मंत्री विनोद तावडे आश्रयदाता आहेत. परिषदेच्या तीन दिवसांत भारतीय उच्च शिक्षणः आढावा आणि भावी दिशा, भारतातील उच्च शिक्षणाचे जागतिकीकरणः योजना आणि नियोजन, वैश्विक मुल्याधिष्ठित शिक्षणः विश्व शांतीचा पाया, उच्च शिक्षणातील गुणवत्ताः सत्य आणि सामोपचार, उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोगः फायदे विरुद्ध अडथळे, शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षणाचे अर्थशास्त्र या विषयांवर चर्चासत्र होणार आहे. याशिवाय ‘टीचर टू टीचर कनेक्ट’ अशी दोन सत्रे होणार आहेत. विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आध्यात्मिक गुरू दलाई लामा, जग्गी वासुदेव, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, डॉ. ए. बी. देशपांडे, डॉ. ए. के. सेनगुप्ता, डॉ. अनिल गुप्ता, डॉ. अनिल माहेश्वरी, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्यासह विविध वक्ते उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या नियमाक मंडळावर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे महासचिव डॉ. सुधाकर जाधवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठात पुन्हा ‘उत्कर्ष’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीच्या राखीव प्रवर्गाच्या पाच जागा जिंकत उत्कर्ष पॅनेलने प्रतिस्पर्धी विद्यापीठ विकास मंचचा दारूण पराभव केला. अनुसूचित प्रवर्गात विकास मंचचे उमेदवार व माजी नगरसेवक पंकज भारसाखळे यांचा उत्कर्ष पॅनेलचे प्रा. सुनील मगरे यांनी पराभव केला. खुल्या प्रवर्गाच्या पाच जागांवर ‘उत्कर्ष’चे उमेदवार आघाडीवर होते.
पदवीधर अधिसभा निवडणूक उत्कर्ष पॅनेलने लक्षणीय मतांनी जिंकली. निवडणुकीची मतमोजणी विद्यापीठाच्या क्रीडा विभागात गुरुवारी सकाळी दहा वाजता सुरू झाली. छाननी प्रक्रियेला वेळ लागल्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणी सायंकाळी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात अनुसूचित प्रवर्गाची मतमोजणी झाली. एकूण १६ हजार ९१० मतांपैकी दोन हजार ४६५ मते अवैध ठरली. तर १४ हजार ४४५ मते वैध ठरली. मतांचा कोटा सात हजार २२३ मतांचा होता. या प्रवर्गात प्रा. सुनील मगरे तब्बल आठ हजार ५०४ मते घेऊन विजयी झाले. विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार पंकज भारसाखळे यांचा त्यांनी पराभव केला. भारसाखळे यांना १९०४ मते पडली. अनुसूचित जमाती प्रवर्गात दोन हजार ६९७ मते अवैध ठरली. या प्रवर्गात उत्कर्ष पॅनेलचे सुनील निकम नऊ हजार ४२१ मतांनी विजयी झाले. राजू सूर्यवंशी यांचा निकम यांनी पराभव केला. सूर्यवंशी यांना दोन हजार ८३६ मते मिळाली. विमुक्त जाती प्रवर्गात उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार संजय काळबांडे आठ हजार ४१ मते घेऊन विजयी झाले. विद्यापीठ विकास मंचचे काकासाहेब शिंदे यांचा काळबांडे यांनी पराभव केला. शिंदे यांना दोन हजार ५४६ मते मिळाली. इतर मागास प्रवर्गात सुभाष राऊत विजयी झाले. राऊत यांना आठ हजार ९२३ मते मिळाली. तर राजीव काळे यांना तीन हजार ५३३ मते मिळाली. महिला प्रवर्गात उत्कर्ष पॅनेलच्या शीतल माने सात हजार ४०७ मते मिळाली. माने यांनी योगिता तौर यांचा पराभव केला. तौर यांनी चार हजार ९५ मते घेत चुरशीची लढत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण पुरस्कृत उत्कर्ष पॅनेल आणि भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच यांची थेट लढत असल्यामुळे चुरस वाढली होती. परिवर्तन पदवीधर आघाडी आणि शिवशाही पॅनेल यांनी लढत दिली. मात्र, सर्वाधिक मते घेत उत्कर्ष पॅनेलने पदवीधर अधिसभेत वर्चस्व मिळवले.
खुल्या प्रवर्गाची लढत

खुल्या प्रवर्गाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. प्रत्येक मतपत्रिका दाखवूनच मतमोजणी करा, अशी मागणी उमेदवारांनी केली. प्रत्येक मतपत्रिका दाखवत मोजणी झाल्यामुळे मतमोजणी प्रक्रियेला विलंब झाला. खुल्या प्रवर्गाच्या पाच जागांसाठी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. या गटात पहिल्या फेरीत उत्कर्ष पॅनेलचे डॉ. नरेंद्र काळे, प्रा. भारत खैरनार, रमेश भुतेकर, प्रा. संभाजी भोसले व पंडित तुपे आघाडीवर होते.

विद्यापीठाची यंत्रणा

पदवीधर अधिसभेची मतमोजणी शिस्तीत पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. तीनशे प्रशिक्षित कर्मचारी चार शिफ्टमध्ये मतमोजणीचे काम करीत होते. कुलसचिव डॉ. साधना पांडे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे यांनी प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले. मतमोजणी कक्षात १६ सीसीटीव्ही कॅमेरे, आठ चित्रीकरण कॅमेरे होते. एकूण २७ टेबलवर मतमोजणी पूर्ण झाली. प्रक्रियेसाठी दोन मोठे स्क्रिन लावले होते.

विजयी उमेदवार

- प्रा. सुनील मगरे
- सुनील निकम
- संजय काळबांडे
- सुभाष राऊत
- शीतल माने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गीत रामायणची रसिकांना मेजवानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वयें श्री राम प्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती..., शरयू तिरावरी अयोध्या..., उगा कां काळीज माझे उले..., ही सुश्राव्य गीते कानावर पडताच अवघे रामायण मराठी मनांच्या नजरेसमोर येते. ‘गीत रामायण’ या कार्यक्रमाची महतीच तशी आहे. महाराष्ट्र श्रेष्ठ कवी गदिमा यांचे शब्द आणि बाबुजी अर्था सुधीर फडके यांचं अद्वितीय संगीत आणि मधूर आवाज यामुळे ‘गीत रामायण’ची भट्टीच अशी काही सुरेख बनली की, त्याने अनेक वर्षांपासून मराठी मनांवर अधिराज्य केले आहे. हाच कार्यक्रम बाबुजींनंतर त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांनी तेवढ्याच तन्मयतेने सादर करीत त्याच उंचीवर नेला. महाराष्ट्र टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने औरंगाबादकरांना या कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.
वाचकांसाठी मटा नेहमीच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आला आहे. यंदा मटाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने श्रीधर फडके यांच्या ‘गीत रामायण’ कार्यक्रम येत्या १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. एमजीएमच्या रुख्मिणी हॉलमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी एमजीएम रुख्मिणी हॉल मटाचे व्हेन्यू पार्टनर आहेत. या कार्यक्रमासाठीचे पास वाचकांना उद्या दुपारी दोन वाजेनंतर मटाच्या कार्यालयातून मिळणार आहेत.

१३ डिसेंबरला नाटक

नाट्यरसिकांसाठी मटाच्या वर्धापन दिनानिमित्ताने बुधवारी (१३ डिसेंबर) वेलकम जिंदगी हे धमाल विनोदी नाटक आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रमही एमजीएम रुख्मिणी हॉलमध्ये होणार आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. नाटकाचे पास रसिकांना मटाच्या कार्यालयातून घेता येतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मिळणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी वाचकांनी लवकरात लवकर आपल्याला हवे असलेले पास मटा कार्यालयातून न्यावेत.

आज खेळाडूंचा सत्कार

मटा औरंगाबाद आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज (शनिवार, ९ डिसेंबर) राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडुंचा गौरव केला जाणार आहे. तसेच ‘मटा फेसबुक कवी संमेलन’ घेण्यात आले होते. या कवी संमेलनातील उत्कृष्ट कवींनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कलश मंगल कार्यालयात दुपारी ३ वाजत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टात दिलासा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
तांत्रिक मुद्यावरून शिवसेनेचे जालन्याचे नेते व राज्यमंत्री अर्जून खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते, या आदेशाला सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्या. दीपक मिश्रा, न्या. अजय खानवीलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांनी स्थगिती दिली आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत अर्जून खोतकर यांनी अवघ्या २९६ मतांनी काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. उमेदवारी अर्ज उशिरा दाखल करणे आणि उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी या दोन कारणांमुळे खोतकर यांची आमदारकी रद्द झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वीकारलेला उमेदवारी वैध अर्ज औरंगाबाद खंडपीठाने अवैध ठरविला आहे. उमेदवारी अर्ज वेळेत दाखल केला होता, तसे पुरावे देखील सादर केले होते, असा युक्तीवाद खोतकर यांचे वकील हरीश साळवे यांनी केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना व्हिडिओ चित्रीकरण होते. खंडपीठाने आयोगाकडून ही माहिती मागवली तेव्हा भिंतीवरील घड्याळात ३.५३ वेळ होती. दुसरीकडे खोतकरांनी २.२० वाजता अर्ज दाखल केल्याचे म्हटले होते. खोतकर यांनी उमेदवारी अर्ज दुपारी तीननंतर दाखल केला होता; तसेच त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी असूनही तो स्वीकारण्यात आला. निवडणूक आयोगाचे रेकॉर्ड पुरावे म्हणून कोर्टात सादर करण्यात आले होते, असा युक्तिवाद कैलास गोरंट्याल यांचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला. युक्तीवाद ऐकून कोर्टाने २४ नोव्हेंबरच्या निकालाला स्थगिती दिली. या याचिकेची सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर शिवसेनेचा; अन् नारा भाजपचा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नंदकुमार घोडेले शिवसेनेचे महापौर आहेत, पण ते ‘सबका साथ सबका विकास’ हा भाजपचा नारा अंमलात आणत आहेत,’ अशी टोलेबाजी एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी पालिका वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शुक्रवारी केली.

महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पालिकेच्या मुख्यालयात छोटेखानी कार्यक्रम झाला. यावेळी इम्तियाज जलील यांच्यासह महापौर घोडेले, आमदार विक्रम काळे, माजी महापौर प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, अनिता घोडेले, कला ओझा, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन, भाऊसाहेब जगताप, आयुक्त नवल किशोर राम, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. आमदार जलील म्हणाले, ‘आमदारापेक्षा महापौरपद मोठे आहे. त्यांना प्रथम नागरिकाचा दर्जा आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. महापालिकेत ऐनवेळच्या प्रस्तावांवरून खूप गडबड झाली. त्यामुळे ऐनवेळचे प्रस्ताव थांबवावेत,’ असे आवाहन त्यांनी केले.

किशनचंद तनवाणी यांनी सर्वांना सोबत घेवून काम करण्याचे आवाहन महापौरांना केले. महापालिकेच्या शाळांसाठी आमदार निधीतून दहा संगणक देण्याची घोषणा विक्रम काळे यांनी केली.

मंत्रालयात ‘वेगळीच’ दहशत
जलील म्हणाले, ‘खड्ड्यांचे शहर ही ओळख बदलावी. महापालिकेबद्दल मंत्रालयात ‘वेगळीच’ दहशत आहे. रस्त्यांसाठीच्या शंभर कोटींच्या निधीतून अद्याप काहीच काम झालेले नाही. यापुढे निधी देताना त्याचे काय होईल असे मंत्रालयातील अधिकारी बोलून दाखवतात. त्यामुळे पारदर्शक कारभार करा,’ असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूपट्ट्यांनाही ‘मायनिंग प्लान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रितसर वाळू लिलावात सहभागी न होता चोरट्या मार्गाने वाळू उपसा करुन शहरात गेल्या दोन वर्षांपासून धुमाकुळ घालणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळ्ण्यात प्रशासन नापास झाले असताना आता नवीन मंजुरी देण्यासाठी खदानींप्रमाणेच वाळूठेक्यांसाठीही मायनिंग प्लान (खाणकाम आराखडा) सादर करावा लागणार आहे.
या संदर्भात हरित लवादाकडून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाही वाळूठेक्यांच्या रितसर लिलाव प्रक्रियेलाही विलंब होण्याची चिन्हे आहेत. मायनिंग प्लान अंतर्गत वाळूपट्टा लिलावात घेणाऱ्या ठेकेदाराला वाळू उत्खनन करण्यासाठी दिलेल्या जागेच्या परिसरात पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, या जागेवरून नदीचे पाणी वाहून जाणार नाही, परिसरात वृक्षलागवड करणार असल्याचे प्रशासनाला लिहून द्यावे लागणार आहे. येत्या काही दिवसात हरित लवादाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. २ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत वाळूपट्टा लिलावाच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३१ पैकी ६ वाळूपट्ट्यांची प्रक्रिया रजिस्ट्रेशनपर्यंत पोचली असून वाळूपट्टाधारकाला मुदतीत चलन भरण्याची प्रक्रिया केवळ शिल्लक आहे. चलन भरण्यासंदर्भात प्रशासनाकडून संबंधितांना पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. चलन भरण्यापूर्वी हा निर्णय झाला तरा या वाळूपट्टेधारकांनाही मायनिंग प्लान सादर करावा लागणार आहे. ऑक्टोबर २०१७ ‌ते सप्टेबर २०१८ याकालावधीसाठी यंदा औरंगाबाद जिल्ह्यात ३१ वाळूपट्ट्यांची लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यातून जिल्हा प्रशासनाला ६० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

दुसऱ्या टप्प्यात २५ वाळूपट्टे

जिल्ह्यातील ३१ पैकी २५ वाळूपट्टे लिलावाची प्रक्रिया मायनिंग प्लानच्या निर्णयानंतर राबवण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यास किती लोक लिलाव प्रक्रियेसाठी सहभागी होतील, याबद्दल शंका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पर्यटन उद्योग विस्तारास मोठी संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘औरंगाबाद हा पर्यटन आणि औद्योगिक विकासाचा राज्यातील उल्लेखनीय जिल्हा असून या ठिकाणी पर्यटन विकास आणि संबंधित उद्योग विस्ताराच्या संधी मोठ्या आहेत,’ असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अजंठा-एलोरा कॉन्झर्व्हेशन अॅण्ड टुरिझम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट’च्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमबजावणी कार्यशाळेचे उद्‍घाटन डॉ. भापकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईचे व्यवस्थापकिय संचालक विजय वाघमारे, पोलिस अधीक्षक आरती सिंह, विनित सरीन, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीचे नारीहितो यांच्यासह पुरातत्व आणि पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. भापकर म्हणाले की, अजिंठा-वेरूळ पर्यटन स्थळांसोबत एकूणच औरंगाबादच्या पर्यटन विकासाकरिता १९२२ पासून सुरू असलेला अजिंठा-वेरूळ संवर्धन आणि पर्यटन विकास प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. २००२ नंतर उभारण्यात आलेल्या अजिंठा आणि वेरूळ अभ्यागत केंद्रामुळे देशी-परदेशी पर्यटकांना सुविधांयुक्त स्थळ उपलब्ध झाले आहे. दौलताबाद, गौताळा, पितळखोरा या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या दळणवळण सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. वेरूळ, अजिंठा येथे मोठ्या संख्येने विदेशी, देशी पर्यटक येतात, हे लक्षात घेऊन येथे अाणखी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, या ऐतिहासिक जागतिक वारशांचे जतन संवर्धनासाठी प्रशासन सर्व सहकार्य करेल, असेही भापकर यांनी सांगितले.
पर्यटकांनी अजिंठा, वेरूळ या मुळ लेण्यांसोबतच अभ्यागत केंद्रांनाही आवर्जून भेट दिली पाहिजे, असे सांगत व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी यादृष्टीने करावयाच्या नियोजनाबाबत चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसाची टाकी फुटल्याने नऊ कामगार जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील रसाची टाकी फुटून नऊ कामगार गंभीर भाजले आहेत. यापैकी सहा जण गंभीर जखमी असल्याने त्यांना लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले जणांची ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
वैद्यनाथ कारखान्यात गळीत हंगाम सुरू असताना शुक्रवारी दुपारी अचानक रस साठवलेली टाकी फुटली. या फुटलेल्या टाकीच्या खालच्या भागातून मोठ्या प्रमाणात उकळता रस बाहेर फेकला गेला. या टाकीत नेहमी १२० डिग्री सेल्सिअस तपमानावर उकळलेला रस साठवलेला असतो. हा तप्त रस अंगावर पडल्याने येथे काम करणारे तंत्रज्ञ आणि कामगार भाजले. गौतम घुमरे (वय ३०) महादेव मुंडे (वय ४५), अदनाक मधुकर (वय ४०), सुमित भांडारी (वय ३५),अभिमान डाके (वय ३०) अशी जखमींची नावे आहेत. एका कामगाराची ओळख पटलेली नाही. जखमींना उपचारासाठी परळी आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वैद्यनाथ कारखान्यात झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल कारखान्याच्या अध्यक्षा तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या घटनेची तातडीने दखल घेतली. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना देत जखमींना त्वरित रुग्णालयात हालविण्याची व्यवस्था केली शनिवारी सकाळी थेट लातूर व अंबाजोगाई येथील रूग्णालयात जाऊन त्या जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्मार्ट सिटी’चे पैसे यस बँकेतून काढा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी शासनाने दिलेला निधी यस बँकेतून काढून घ्या आणि तो राष्ट्रीयकृत बँकेत ठेवा, अशी स्पष्ट ताकीद स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्पेशल पर्पज व्हेकलचे (एसपीव्ही) अध्यक्ष व राज्य शासनाच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी महापालिका प्रशासनाला दिली आहे.

औरंगाबादच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेकडे २८३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी खर्च करण्याचे अधिकार स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या ‘एसपीव्ही’ला आहेत. एसपीव्हीची बैठक आठ - नऊ महिन्यांत न झाल्यामुळे शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्च करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. त्यामुळे पालिकेने हे पैसे यस बँकेत ठेवले आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एसपीव्हीचे तत्कालीन अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी ही रक्कम यस बँकेत ठेवण्याला आक्षेप घेतला होता. शासनाने दिलेला निधी खासगी बँकेत न ठेवता राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले होते, पण महापालिका प्रशासनाने अपूर्व चंद्रा यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. चंद्रा यांच्या जागी आता शासनाने पोरवाल यांची नियुक्ती केली आहे. पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली ३० नोव्हेंबर रोजी एसपीव्हीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी एसपीव्हीच्या कामाचा आढावा घेतला. शासनाकडून मिळालेल्या निधीची माहिती घेतली. शासनाकडून मिळालेला निधी यस बँकेत ठेवल्याची माहिती त्यांना देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोरवाल यांनी यस बँकेत शासनाचा निधी ठेवण्यास आक्षेप घेतला. हा निधी राष्ट्रीयकृत बँकेतच ठेवा अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

आदेशाचे पालन नाही
‘शहरातील राष्ट्रीयकृत बँका पहा, त्यांच्याकडून व्याज दराचे कोटेशन मागवा. त्यानुसार ज्या बँकेचा दर जास्त असेल, त्या बँकेत ठेव म्हणून शासनाने दिलेला निधी ठेवावा,’ असे आदेश पोरवाल यांनी दिले आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अजूनही या आदेशाचे पालन केले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनआक्रोश’साठी काँग्रेसची फिल्डिंग

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासाठी जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते घेऊन जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जिल्ह्यात फिल्डिंग लावली आहे. तालुकानिहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून त्यावर प्रमुख नेतेमंडळी लक्ष ठेवून आहेत.

नागपूर हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र येऊन राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. शेतकरी कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही, शेतकऱ्यांना वीजबिलासाठी त्रास होत आहे, कापूस बोंडअळी प्रश्नी झालेले दुर्लक्ष या मुद्यांवरून सत्ताधारी भाजप - शिवसेनेला विरोधी पक्षांनी चांगलेच घेरले आहे. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या आरोपावरून तसेच सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन १२ डिसेंबर रोजी नागपुरात मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्यभर काँग्रेसकडून नियोजन केले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून ५००० कार्यकर्ते मोर्चात नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिल्लोड, सोयगाव तालुक्याची जबाबदार जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर आहे. शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्याकडे औरंगाबाद शहराची जबाबदारी आहे. फुलंब्री व औरंगाबादमधील कार्यकर्त्यांचे नियोजन माजी आमदार डॉ. कल्याण काळे सांभाळणार असून कन्नडची जबाबदारी माजी आमदार नितीन पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तालुकानिहाय कंबर कसली
वैजापूर,गंगापूर आणि खुलताबादसाठी आमदार सुभाष झांबड, डॉ. दिनेश परदेशी, संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली बैठका सुरू आहेत आणि कार्यकर्ते नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पैठणची जबाबदारी विनोद तांबे यांच्यावर आहे. प्रत्येक तालुक्यातून ठराविक संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले पाहिजेत, असा वरिष्ठांचा आग्रह असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेते त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत.

प्रदेश काँग्रेसच्या सूचनेवरून आम्ही जिल्ह्यातून मोर्चात जास्तीत जास्त सहभाग कसा असेल, यावर भर देत आहोत. जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आजी, माजी आमदार तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेते याचे नियोजन करत आहोत. औरंगाबादचा सहभाग निश्चितपणे लक्षणीय असेल. - सुभाष झांबड, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्लास्टिक सर्जरी बुधवारपासून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा आणि महात्मा गांधी मिशन (एमजीएम), औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ ४२व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला १३ डिसेंबर बुधवारपासून प्रारंभ होत आहे. हे शिबिर १७ डिसेंबरपर्यंत चालेल. शिबिरात अमेरिकेतील सर्जन डॉ. राज लाला आणि डॉ. विजय मोराडिया हे रुग्णांवर शस्त्रक्रिया करतील, अशी माहिती लायन्स चिकलठाणाचे अध्यक्ष राजेंद्र लोहिया, प्रकल्प प्रमुख डॉ. मनोहर अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
गेल्या ४१ वर्षांपासून हा उपक्रम औरंगाबादेत राबविला जात आहे. शिबिराचे उद्‍घाटन बुधवारी सकाळी साडेआठ वाजता बीव्हीजचे चेअरमन एच. आर. गायकवाड यांच्या हस्ते आणि डॉ. राज लाला व डॉ. विजय मोराडिया यांच्या उपस्थितीत होईल. एमजीएमचे प्रमुख अंकुशराव कदम, औरंगाबाद ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप मालू, गाईड टू काऊन्सिल ऑफ गव्हर्नर एम. के. अग्रवल प्रमुख पाहुणे असतील.
सिडको एन - १ येथल लायन्स आय हॉस्पिटल येथे उद्‍घाटन समारंभ आणि रुग्ण तपासणी होईल. शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची निवड करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारीख दिली जाईल. गुरुवारीपासून एमजीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया होतील. डॉ. लाला, डॉ. मोराडिया, डॉ. ललिता लाला, डॉ. के. के. भाटिया, डॉ. अमित बसन्नवार हे शस्त्रक्रिया करतील. त्यांना एमजीएममधील डॉक्टर व अन्य स्टाफ मदत करेल. पत्रकार परिषदेला क्लबचे सचिव रवींद्र करवंदे, कोषाध्यक्ष विनय राठी, प्रकाश राठी, राजेश भारुका, राजेश जाधव, राजेश साकला, जयकुमार थानवी, राजेश लहुरीकर आदी उपस्थित होते.

४५० रुग्णांवर शस्त्रक्रिया
गेल्या ४१ वर्षांत शिबिरामधून १२ हजर ७०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, यंदा दीड हजार रुग्णांची तपासणी आणि ४५० रुग्णांवर शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट ठेण्यात आले आहे. औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनतर्फे शिबिरासाठी औषधींचा पुरवठा केला जाणार आहे. शिबिरात दुभंगलेले ओठ, पडलेली पापणी, चेहऱ्यावरील व्रण, नाकावरील बाह्य विकृती असलेल्या रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणी जिल्हा कचेरीवर शिवसेनेचा मोर्चा

$
0
0


परभणी - परभणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पिकांच्या योग्य भावासाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे शेतकरी नेते तथा उपनेते लक्ष्मण वडले यांच्या मार्गदर्शनाखाली तर आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात भाजपच्या पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री आणि राज्यातील विविध मंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले.
शहरातील शनिवार बाजारातून दुपारी १२ वाजता काढण्यात आलेला हा मोर्चा शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड, शिवाजी पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. तत्पुर्वी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानात या मोर्चाचे सभेत रूपांतर होवून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. तत्पूर्वी मोर्चामध्ये बोंडअळीने खाल्लेले कापसाचे पिक लावलेल्या बैलगाड्यांसह शेतकरी दिसत होते. तसेच सभेच्या व्यासपीठावर देखील हे कापसाचे पीक ठेवण्यात आले. या सभेचे सुत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले. तर मोर्चात आयोजक आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह उपनेनेते लक्ष्मण वडले, पक्षनिरीक्षक जगदिश चौधरी, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, संजय गाडगे, माणिक पोंढे, नंदकुमार आवचार व शेतकरी सहभागी होते.

विधीमंडळातही आवाज उठविणार
जनतेला थापा देवून सत्तेत आलेले भाजप सरकार जनतेच्या उरावर बसले आहे, असा आरोप करत मोर्चाचे आयोजन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी या सरकारकडून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी दिला. तसेच या फेकू सरकारने ६० वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करून सत्तेवर ताबा मिळवला. नोटाबंदी आणि जीएसटी सारखे चुकीचे धोरणे राबवून जनतेची पिळवणूक सुरू केली आहे. परंतु, शिवसेना जनतेची पिळवणूक थांबवण्यासाठी सत्तेत आहे. आमची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वयं’ कार्यक्रमाचे आज आयोजन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अमृतयात्रा आयोजित ‘स्वयं’ कार्यक्रमाचे आयोजन शहरात शनिवारी (नऊ डिसेंबर) करण्यात आले आहे. एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

प्रमुख वक्ते म्हणून डॉ. उदय निरगुडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आदिवासी समाजातील पहिले आयएएस अधिकारी व सोलापूर जिल्ह्याचे सीईओ डॉ. राजेंद्र भारूड, अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून एक लाख शेतकऱ्यांना जोडणारे प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके, फिटनेस क्षेत्रात मुव्हमेंट कल्चर रुजवणारे फिटनेस ट्रेनर नुपूर शिकारे हे आपला अनुभव सांगणार आहेत. पगारिया ऑटो प्रस्तुत स्वयं कार्यक्रमाचे महाराष्ट्र टाइम्स हे मीडिया पार्टनर आहेत. अधिक माहितीसाठी नीलेश सातोनकर, निखिल देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- स्थळः एमजीएम रुक्मिणी सभागृह
- वेळः सायंकाळी साडेपाच वाजता.
- वक्तेः डॉ. उदय निरगुडकर, डॉ. राजेंद्र भारूड
ज्ञानेश्वर बोडके, नुपूर शिकारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’चा वर्धापन दिन वाचकांसंगे!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाचकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाच्या बळावर औरंगाबाद महाराष्ट्र टाइम्स सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी हसतखेळत व्यायाम अर्थात झुंबा फिटनेस व पौष्टिक रेसिपीजसह होममेड केक कार्यशाळेत भाग घेण्याची संधी आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. यातील पहिली कार्यशाळा रविवारी (दहा डिसेंबर) ‘झुंबा फिटनेस’ या विषयावर होणार आहे.

झुंबा फिटनेसचा ट्रेंड अलीकडे खूपच प्रसिद्ध असून, ताण न घेता हसतखेळत व्यायाम म्हणून ओळखला जातो. संगीताची सोबत असल्याने हा फिटनेस ट्रेंड तरुणाईचा खास आवडीचा असून महिलाही अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी हा पर्याय निवडतात. कलश मंगल कार्यालय, उस्मानपुरा येथे रविवारी दुपारी चार वाजता आयोजित या कार्यशाळेत प्रशिक्षक चेतन पाटील मार्गदर्शन करतील. सोमवारी (११ डिसेंबर) डॉ. अलका कर्णिक यांच्या चविष्ट पण पौष्टिक रेसिपी शिकण्याची संधी मिळणार आहे. एन सातच्या गरवारे कम्युनिटी सेंटर येथे सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल. हिवाळा लागताच घरोघरी डिंक लाडू, उडिद लाडू हमखास होतात. तसेच या दिवसांमध्ये पालेभाज्याही मुबलक व स्वस्तात मिळतात. बाजारात मिळणाऱ्या चौफेर भाज्यांचा उपयोग आहारात कसा करावा व त्या-त्या भाज्यांचे महत्त्व यावर डॉ. कर्णिक विस्ताराने माहिती तर देतीलच. तसेच त्या हिवाळ्याचा सामना कसा करावा व आहार या विषयावर स्वतंत्र मार्गदर्शनही करतील. डिंक, उडीद व मेथी लाडूसह डाळवा, नाचणी लाडूसह चटपटीत लाडूही त्या शिकवतील. यातील कोणते लाडू कधी खावे व ते कुणासाठी अधिक उपयुक्त आहेत, याच्या शास्त्रोक्त पद्धतींचाही समावेश त्यांच्या मार्गदर्शनात असेल. सात दिवसांचे सात पराठ्यांचे प्रकार कार्यशाळेत शिकायला मिळणार आहेत. ओव्याची पाने, कडीपत्ता, मुळ्याचा पराठा अशा चमचमीत व्यंजनांचा समावेश पराठ्यांमध्ये असेल. तसेच लिंबू, ओली हळद, मिरची, आवळा यांची लोणची व हुरडा चटणी त्या शिकवणार आहेत. डॉ. कर्णिक यांच्यासोबत रेसिपी तज्ज्ञ संध्या पाटील या सुद्धा रेसिपी शिकवणार आहेत. पौष्टिक पण रूचकर पदार्थ शिकण्याची ही संधी तर अजिबात चुकवायला नको. मंगळवारी (१२ डिसेंबर) हॉटेल मॅनोर, उस्मानपुरा येथे दुपारी चार वाजता केक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये तज्ज्ञ रूपाली बाठिया केकचे विविध प्रकार दाखवतील. त्या फॉरेस्ट केक, मावा केक व पायनॅपल केक पेस्ट्री शिकवतील. नुसते केक नव्हे तर आइसिंग व डेकोरेशन टेक्निकसुद्धा या कार्यशाळेचे वेगळेपण असणार आहे. सर्व कार्यशाळा सर्व वयोगटासाठी खुल्या व निःशुल्क आहेत, मात्र प्रत्येक कार्यशाळेसाठी नोंदणी बंधनकारक आहे. तेव्हा वेळ न घालवता चटकन फोन उचला व आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठीः नदीम अहमद ९८२२६३०५५५ यांच्याशी संपर्क साधा.

सर्वोत्कृष्ट कवींचा आज सन्मान
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘मटा फेसबुक कविसंमेलन’ घेण्यात आले. या संमेलनातील कवितेतून सात सर्वोत्कृष्ट कवितांची निवड करण्यात आली. या कवीत रोहीत देशमुख (सोलापूर), सुनील उबाळे, गणेश घुले, संदिप भदाणे (औरंगाबाद), स्वप्नील चौधरी (सोयगाव), भाग्यश्री शिंदे (धुळे) आणि स्वप्नील इंगोले (अकोला) यांचा समावेश आहे. या कवींना शनिवारी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कलश मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पणन मंत्र्यांनीच तपासले सोयबीन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
शेतमाल हमीभाव खरेदी केंद्रावर जाऊन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी मालाची तपासणी करून सर्वासमक्ष ग्रेडरची खरडपट्टी केली. देशमुख यांनी शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील शेतमाल खरेदी केंद्र, तारण योजनाचा जागेवर जाऊन आढावा घेतला.
पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी लातूरात जिल्ह्यातील बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, संचालक, सहकार विभाग, वखार महामंडळ, पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बाजारसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी पणन मंडळ करीत असलेल्या अडवणुकीचा पाढाच वाचला. यावेळी मंत्री देशमुख यांनी बाजार समितीच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्याच्या योजनाची, सहकार विभागाच्या हलगर्जीपणामुळे योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाहीत हे उघड झाले. त्यावेळी त्यांनी सरकारच्या योजनाचा फज्जा उडवू नका शेतकऱ्यांपर्यत योजनाची माहिती पोहचवा असे आदेश दिले. या बैठकीला आमदार सुधाकर भालेराव, आमदार विनायकराव पाटील, लातूर बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, महापौर सुरेश पवार, जिल्हा उपनिबंधक बी. एल. वांगे, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदि उपस्थित होते.
लातूर बाजार समितीच्या शेतमाल खरेदी केंद्रावर नाफेडच्या मार्फत खरेदी केली जात आहे. परंतु, नाफेडच्या ग्रेडरच्या चुकीच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे दस्तुरखुद्द मंत्र्यांनीच लक्षात आणून दिले. वखार महामंडळाने नकार दिलेल्या शेतमालाची देशमुख यांनी पुन्हा तपासणी करण्यास अतुल पटवारी या ग्रेडरला भाग पाडले. त्यावेळी तपासलेला माल खरेदी योग्य असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी मात्र, त्या ग्रेडरची खरडपट्टी काढून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. हमी भावने खेरदी आणि शेतमाल तारण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वखार महामंडळ, पणन महामंडळ, नाफेड यांच्यात योग्य तो समन्वय असला पाहिजे, नाफेडने ग्रेडर देऊन खरेदी केलेला माल वखार महामंडळाने परत पाठविता कामा नये असे आदेश ही यावेळी त्यांनी दिले.
लातूर बाजार समितीने सुरू केलेल्या शेतमाल तारण योजनेची माहिती यावेळी सुभाष देशमुख यांनी घेतली. लातूर जिल्हा या योजनेत राज्यात पथदर्शी ठरावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी ऑईल सीड नियमन मुक्त करू नये अशी मागणी केली. बाजार समितीच्यावतीने उपसभापती मनोज पाटील, संचालकांच्या वतीने मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

हिवाळी अधिवेशनानंतर समस्या सोडविण्याचे आश्वासन
शेतकऱ्यांच्या मालाची काळजी पणन मंत्र्यांनी थेट खरेदी केंद्रावर येऊन घेतली याचा शेतकरी म्हणून आनंद होत आहे. मंत्र्यांच्या या भेटीतून अधिकारी काही बोध घेतली अशी आमची अपेक्षा आहे. बाजार समितीचा संचालक म्हणून पणन महामंडळाकडून होणाऱ्या अडवणुकीची सविस्तर माहिती देता आली आणि जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीच्या समस्या विधानसभेची हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सोडविण्याचे देशमुख यांनी दिलेले आश्वासन खुप काही देऊन गेले, अशी प्रतिक्रिया लातूर बाजार समितीचे संचालक विक्रम शिंदे यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छावणी जलवाहिनीसाठी २०१८ उजाडणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंतच्या नवीन जलवाहिनीचे काम एक डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश छावणी परिषदेच्या मावळत्या अध्यक्षांनी बैठकीत दिले होते व त्यासाठी ४० लाखांचा निधी ताताडीने मंजूर केला होता, मात्र आता या जलवाहिनीचे काम डिसेंबरअखेरपर्यंत सुरू होण्याचे प्रशासकीय संकेत असून, प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी गॅस्ट्रो उद्रेकाची चौकशी करून चार डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही अध्यक्षांनी याच बैठकीत दिले होते. ही चौकशीदेखील अजून झालेली नाही.

छावणी परिसरात गॅस्ट्रोचा उद्रेक होऊन दहा नोव्हेंबरपासून २४ नोव्हेंबरपर्यंत तब्बल सहा हजार रुग्णांवर एकट्या छावणी परिषदेच्या रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली होती. त्याशिवाय तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णांनी खासगीत उपचार घेतल्याचेही समोर आले. खाम नदीतून पुढे आलेल्या छावणीच्या दूषित जलवाहिनीतूनच गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झल्यानंतर उशिरा का होईना तेवढीच जलवाहिनी बदलण्यात आली व याच काळाच कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत जमिनीपासून आठ ते दहा फुटांवरून व पुलाशी समांतर अशी सुमारे ४०० मीटरची नवीन जलवाहिनी तयार करण्याचा निर्णय परिषदेच्या नगरसेवकांनी परिपत्रक काढून घेतला. तसेच २४ नोव्हेंबर रोजी छावणी परिषदेच्या बैठकीमध्ये या नवीन जलवाहिनीला तात्काळ मान्यता देत ४० लाखांचा निधीदेखील मावळते अध्यक्ष ब्रिगेडिअर अनुराग विज यांनी मंजूर केला. महत्त्वाचे म्हणजे छावणीवासियांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे व असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून मावळत्या अध्यक्षांनी या जलवाहिनीचे काम एक डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे स्पष्ट आदेशही दिले होते. तसेच या संपूर्ण गॅस्ट्रो उद्रेकाची चौकशी करून चार डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे त्यांनी आदेशात स्पष्ट केले होते. मात्र दोन्ही आदेशांची पूर्तता झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणी नवीन अध्यक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘शासकीय अभियांत्रिकी’कडून डिझाइन
या संदर्भात छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल म्हणाले, ‘नवीन जलवाहिनीचे डिझाइन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून करून घेतले जाणार आहे आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. निविदा प्रक्रियेनंतर सुमारे १५ दिवसांनी म्हणजेच डिसेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू होईल.’

तीन दिवसांनी चौकशी
गॅस्ट्रो उद्रेकाची चौकशी करण्यासाठी उपाध्यक्ष गारोल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीची बैठक मंगळवारी (१२ डिसेंबर) होणार असून, याच दिवशी या प्रकरणाची चौकशीदेखील पूर्ण होण्याची शक्यता गारोल यांनी व्यक्त केली.

रणगाडा ठरणार आकर्षण
बाबा पेट्रोल पंपापासून छावणीच्या दिशेने जाताना लागणाऱ्या लोखंडी पुलाजवळच वेधक रणगाडा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी जमिनीपासून पाच ते सहा फुट उंचीवर खास ‘बेस’ तयार करून त्यावर रणगाडा बसविला जाईल आणि हा परिसर सुशोभित केला जाईल. त्यामुळे छावणीच्या सौंदर्याच्या भर पडून येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी हा रणगाडा आकर्षण ठरेल. एखाद्या महिन्यात याचे काम पूर्ण होईल, असेही परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

गॅस्ट्रो प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त समितीमध्ये दोन सदस्य हे लष्कराचे आहेत आणि हे सदस्य मागे उपलब्ध नव्हते. तसेच काही दिवस ‘सीईओ’देखील शहरात नव्हते. त्यामुळे चौकशी लांबली. मात्र १२ डिसेंबरला चौकशी होईल व दोषींवरील कारवाईबाबतचा निर्णयदेखील बैठकीत होऊ शकेल. – संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘सिद्धार्थ’मध्ये बालगोपाळांसाठी उंट सफर सुरू!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या ३५व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी सिद्धार्थ उद्यानात बालगोपाळांसाठी उंट सफर सुरू करण्यात आली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सफरीचे उदघाटन केले. आता दररोज सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मुलांना उंटावरून फेरफटका मारण्याचा आनंद लुटता येईल.

पालिकेच्या वर्धापन दिनापासून सिद्धार्थ उद्यानात उंट सफर सुरू करण्याची घोषणा महापौरांनी केली होती, त्यानुसार हा उपक्रम वर्धापनदिनी (आठ डिसेंबर) सुरू करण्यात आला. या सफरीसाठी राजस्थानातून उंट आणण्याचे ठरविण्यात आले होते, पण तेथून उंट आणण्याचा खर्च जास्त असल्यामुळे व उंट आणल्यानंतर त्यांचे पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी पालिकेवर पडणार असल्यामुळे उंट विकत न आणण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात विविध वसाहतींमधून उंट फिरवून लहान मुलांना फेरफटका मारणारे उंटवाले असतात. त्यांच्यापैकीच कुणाचे तरी उंट उद्यानात ठेवण्याचा निर्णय नंतर घेण्यात आला. त्यानुसार राजस्थानातून धुळे जिल्ह्यातील शिरपुरात आलेल्या आणि त्यानंतर व्यवसायासाठी औरंगाबादेत आलेल्या एका उंटवाल्याला महापालिकेची योजना समजावून सांगून त्याचे दोन उंट उद्यानात आणण्यात आले. झुल पांघरलेले, मानेला, पायाला गोंडे लावलेले उंट सजून धजून सकाळीच उद्यानात दाखल झाले. त्यानंतर अकराच्या सुमारास महापौरांच्या हस्ते उंट सफरीच्या उपक्रमाचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी.एस. नाईकवाडे आदी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी बालगोपाळांना उंटावरची सफर मोफत करण्यात आली. उंट फिरविण्याचा दिवसभराचा खर्च महापौरांनी उंटाच्या मालकांना दिला. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उंट फिरवल्यानंतर उद्यानाच्या परिसरातच असलेल्या कोंडवाड्यात उंटांना ठेवले जाणार आहे. सोमवारपासून उंट फेरीसाठी शुल्क आकारले जाणार आहे. शुल्क किती असावे याचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल असे डॉ. पाटील यांनी सांगितले. उद्यानात लहान मुलांचे आकर्षण ठरणारी मिनीट्रेन देखील आहे. क्लचप्लेट तुटल्यामुळे सध्या ही ट्रेन बंद आहे. मेकॅनिकला बोलावून घेवून मिनीट्रेन देखील सुरू करून घेतली जाणार आहे.

वाहतूक बेटाचे सुशोभीकरण
सिद्धार्थ उद्यानाच्या समोर असलेल्या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. शेतकऱ्याचा पुतळा ज्या वाहतूक बेटात आहे, ते बेट सुशोभीत करण्यात आले असून, रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे. त्याशिवाय वाहतूक बेटातील धबधबा सुरू करण्यात आला आहे. धबधब्याला देखील रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकन्यायालयात लाखोंना वेळेत न्याय

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सर्वसामान्यांना तत्काळ आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना आहे. गेल्या काही वर्षांत त्याच्या प्रभावी वापराने लाखो लोकांना वेळेत न्याय मिळाला. हजारो कोटींचे दावे निकाली निघाले,' असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्या. विजया कापसे - ताहिलरामानी यांनी शनिवारी केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी मुख्य न्या. श्रीमती ताहिलरमानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या लोकन्यायालयाचे उदघाटन झाले. व्यासपीठावर या वेळी औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती न्या. आर. एम. बोर्डे तसेच खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अॅड. देशमुख उपस्थित होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे चेअरमन न्या. आर. एम. बोर्डे यांच्या आदेशावरून या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.

‘हजारो वर्षांच्या आपल्या वैदिक परंपरेमध्ये लोकन्यायालयाची संकल्पना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडून ती प्रभावीपणे राबविण्यातही यायची. आज लोकांचे, लोकांनी चालविलेले लोकांच्यासाठीची लोकन्यायालये त्या समृद्ध परंपरेचाच भाग आहे,’ असे न्या. ताहिलरामानीयांनी सांगितले.

न्या. ताहिलरामानी लोकन्यायालयाचे महत्व विशद करताना म्हणाल्या, ‘सामंजस्याने, परस्पर संमतीने आणि तडजोडीने निकाली निघणाऱ्या लोकन्यायालयात प्रकरणांमुळे सर्वच पक्षांना खरा न्याय मिळाल्याचे समाधान मिळते. मोठ्या प्रमाणावर या माध्यमातून प्रकरणे निकाली निघत असल्याने कायद्याचे राज्य आणि लोकशाहीला ही बाब अत्यंत पूरक आहे,’ असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती, लोकन्यायालयात सहभागी झालेले निवृत्त न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, वकीलवर्ग, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय पातळीवर उच्चांक
न्या. रवींद्र बोर्डे यांनी लोकन्यायालय आयोजन आणि त्याला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. औरंगाबादमध्ये गेल्या वर्षभरात आयोजित लोकन्यायालये आणि त्यात दाखल प्रकरणे तसेच निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारीही त्यांनी सादर केली. आजपर्यंत आयोजित चार लोकन्यायालयांत एकंदर २५६३ प्रकरणे दाखल होऊन एक हजार २५६ प्रकरणे निकाली निघाले. येथील आयोजनाने राष्ट्रीय पातळीवर उच्चांक केल्याचेही त्यांनी सांगितले. आज झालेल्या लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणे तसेच भूसंपादन केल्यापोटी व शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी दाखल प्रकरणांवर सुनावणी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘गेल्या दशकभरात औरंगाबादबरोबरच मराठवाड्यातील खेळाडू विविध खेळांमध्ये आघाडीवर झळकत आहेत. खेळाडूंच्या कठोर मेहनतीला पालकांची तोडीसतोड साथ मिळत असल्यानेच हे चित्र निर्माण झाले आहे,’ असे प्रतिपादन साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी शनिवारी केले.

महाराष्ट्र टाइम्सच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादचे नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंचा प्रातिनिधीक गौरव ‘मटा’तर्फे करण्यात आला. या प्रसंगी भांडारकर बोलत होते. या प्रसंगी प्रकाशक साकेत भांड, कवी रवी कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गौरव सोहळ्यात औरंगाबाद विभागाला बॅडमिंटन खेळात प्रथमच राज्य विजेतेपद व उपविजेतेपद मिळवून देणारे एसबीओए पब्लिक स्कूलचे बॅडमिंटनपटू प्रथमेश कुलकर्णी, सुधांशू शिंदे, उत्कर्ष होळंबे, श्रेयस पाठे, भार्गवराम पेडगावकर, सोनाली मिरखेलकर, समीक्षा नलावडे, गौरी कुलकर्णी, आर्या चव्हाण, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमध्ये औरंगाबादचा ठसा उमटवणारे जिम्नॅस्ट रिद्धी हत्तेकर, सिद्धी हत्तेकर, श्रीपाद हराळ, अथर्व जोशी, सुधन्व बोर्डे, जागतिक पातळीवर बुद्धिबळाच्या पटावर आपले नाणे खणखणीत वाजवणारी बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे व तनीषा बोरामणीकर यांचा भांडारकर, साकेत भांड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना भांडारकर म्हणाले, ‘पू्र्वीच्या तुलनेत क्रीडा सुविधांचे आधुनिकीकरण झालेले आहे. सध्या क्रीडा क्षेत्र ही मोठी बाजारपेठ झाली आहे. प्रशिक्षक, सुविधा अशा अनेक गोष्टी पूर्वी नव्हत्याच. आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही क्रीडा सुविधा निर्माण होत आहे. अनेक प्रश्न, अडचणी असतानाही खेळाडू कठोर मेहनत घेऊन पुढे येत आहेत. याचे मुख्य श्रेय हे त्यांच्या पालकांना द्यावेच लागेल. पालक आज मुला-मुलींच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहात असल्याने खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावताना दिसत आहे. ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. ‘खेलो इंडिया’ या योजनेचा खेळाडूंनी लाभ घेतला, तर त्यांना अधिक फायदा होईल,’ असे आवाहन भांडारकर यांनी यावेळी केले. वरिष्ठ सहसंपादक प्रमोद माने यांनी प्रास्ताविक केले. दिलीप वाघमारे, सुधीर भालेराव यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. गिरिधर पांडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. मकरंद जोशी, दिनेश चितलांगे, रेणुका देशपांडे, सागर बोरामणीकर, एसबीओए पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका मनीषा यादव, प्रवीण हत्तेकर, रवींद्र मिरखेलकर यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती.

खेळातही करिअरची संधी
‘डॉक्टर, इंजिनीअर असे स्वप्न सर्वांनीच पाहिले तर खेळाडू म्हणून कसे पुढे येणार हा प्रश्न आहे. शंभर ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू कसे निर्माण होणार,’ असा प्रश्न उपस्थित करून भांडारकर म्हणाले, ‘पालकांनी आपला मुलगा-मुलगी क्रीडा क्षेत्रात आघाडीवर राहिल असे स्वप्न पाहण्याची गरज आहे. शिक्षणाइतकेच खेळालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळातही उत्तुंग करिअर करण्याची संधी आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ प्रेरक संघर्षगाथेचा सन्मान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रत्येक माणूस आकांक्षा बाळगतो. काहीजण ऊर्मीच्या बळावर स्वप्नांचा पाठपुरावा करतात. ध्येयवादी व्यक्तींची ही प्रेरक यशोगाथा ऐकताना उपस्थित भारावून गेले. ‘स्वयं’ संस्थेने डॉ. राजेंद्र भारूड, ज्ञानेश्वर बोडके आणि नुपूर शिखरे यांच्याशी दिलखुलास संवाद आयोजित केला होता. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी या तिघांशी मोकळा संवाद साधत त्यांची बलस्थाने जाणून घेतली. या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स होते.

स्वतःचा शोध घेतलेल्या व्यक्तींचे अनुभव, संघर्ष, जिद्द आणि ध्येय ऐकण्याचा ‘स्वयं - परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून’ कार्यक्रम संस्मरणीय ठरला. एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. आदिवासी समाजातील पहिले आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, अभिनव फार्मर्स क्लबद्वारे एक लाख शेतकऱ्यांना जोडणारे प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके आणि फिटनेस क्षेत्रात मुव्हमेंट कल्चरचा नवा विचार रूजवणारे फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी संवाद साधला. प्रत्येकाने आपला प्रवास सांगत योग्य संदेश दिला. ‘कोणत्याही जीममध्ये न जाता योग्य व्यायामाने शरीरसौष्ठव कमावले. महागडी जीम आणि सप्लिमेंटस खाऊन प्रकृती सुधारत नाही. चालत असाल तर पळा, पळत असाल तर उड्या मारा, उड्या मारत असाल तर डान्स करा. अर्थात, भरपूर हालचाल केल्याने शरीर निरोगी राहते,’ असा मंत्र युवा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांनी दिला. दोन हातांवर चालत नुपूर यांनी रंगमंचावर प्रवेश केला. ध्येय निश्चित केल्यास काहीच अशक्य नसल्याचे शिखरे म्हणाले.

धुळे जिल्ह्यातील लहानशा खेड्यातून प्रवास सुरू करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचा प्रवास सर्वांना भावूक करणारा ठरला. भिल्ल समाजात जन्मलेले राजेंद्र यांनी अत्यंत गरिबीत दिवस काढले. नवोदयची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे सहावी ते बारावी त्यांचे मोफत शिक्षण झाले. एमबीबीएसच्या परीक्षेत दोनशेपैकी १९४ गुण घेतले. ‘मुंबईच्या केईएम महाविद्यालयात गेल्यानंतर हा कोण खेडूत म्हणून उपेक्षेची वागणूक मिळाली, पण अभ्यासाच्या जोरावर त्याच कॉलेजचा ‘बेस्ट स्टुटंड’ अॅवॉर्ड घेतला. आई-मावशी दारू गाळून विकायच्या. झोपडीसमोर लोक दारू पित असत. मी अभ्यास करीत असताना शेंगदाणे-फुटाणे आणायला पाठवत. माझी परीक्षा आहे असे एकदा सांगितले. तर ‘भिल्लाचा मुलगा शेवटी दारूच गाळणार. शिकून डॉक्टर-कलेक्टर होणार नाही,’ असे प्रत्युत्तर त्याने दिले. तेव्हा माझी आई म्हणाली, माझा मुलगासुद्धा डॉक्टर-कलेक्टर होईल. योगायोग की मी दोन्ही परीक्षा पास झालो,’ असे भारूड म्हणाले. हा प्रसंग सांगताना ते काही काळ स्तब्ध झाले. डोळ्यातील पाणी पुसत त्यांनी मनोगत पूर्ण केले. मनोगत संपले तेव्हा पाच मिनिट टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना एक एकरात उत्तम चरितार्थ चालवण्याचे कसब ज्ञानेश्वर बोडके यांनी ‘अभिनव फार्मर्स क्लब’च्या माध्यमातून रूजवले. घरच्या दहा एकर शेतीत घरातील आठ माणसे राबूनही वर्षभर पुरेल एवढे पिकत नव्हते. कंटाळून नोकरी करू लागलो. मात्र, बारा तास राबल्यानंतरही पुरेसे पैसे मिळत नसल्यामुळे पुन्हा शेतीकडे वळलो. मार्केटचा अभ्यास करून फुलशेती केली. हॉटेल्सला पाश्चात्य भाजीपाला पुरवला. आता एकात्मिक शेती विकास प्रकल्पातून शेतकऱ्यांना स्वावलंबी केले,’ असे बोडके म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवीन काळे यांनी केले.

व्यायामात भक्ती
‘व्यायाम करताना मंदिरातील शांतता अनुभवतो. अगदी कमी व्यायाम करून मोठ्या व्यायामाकडे वळले पाहिजे. सप्लिमेंटस खाऊन कमावलेली कृत्रिम बॉडी लवकर ‘जैसे थे’ होते. आमिर खान, सुश्मिता सेन यांना प्रशिक्षण देताना खूप काही शिकलो. हिरोची बॉडी पाहून लोक व्यायाम करतात, पण सातत्य नसल्यामुळे उत्साह मावळतो,’ असा अनुभव नुपूर शिखरे यांनी सांगितला.

संकुचितता घातक
‘शासकीय अधिकाऱ्याला घटनेने भरपूर अधिकार दिल्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत भरपूर काम करता येते, पण राजकीय नेत्यांना काम करताना मर्यादा पडतात. आदिवासी, वंचित घटकातील मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले असते तर आरक्षणाची गरज राहिली नसती. जातीय संकुचितता समाजासाठी घातक आहे,’ असे स्पष्ट मत डॉ. राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांसाठी संशोधन नाही
बाजार समितीचे तोंड पाहिले नाही म्हणून आमच्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांसाठी कोणतेही संशोधन होत नाही. फक्त पैसे संपवायचे असतात. शेती शिकवणाऱ्यांनी आधी शेती करावी. पुस्तकं वाचून शेती करता येत नाही. अनुभवातून शेती कळते. ग्राहकांनी दलालाकडून भाजीपाला न घेता शेतकऱ्यांकडून घेतला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही,’ असे आवाहन ज्ञानेश्वर बोडके यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images