Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ ‘जालना एक्स्पो’चे आज उदघाटन

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
रोटरी क्लब ऑफ जालनाच्यावतीने शुक्रवारपासून तीन दिवस एक्स्पोची पर्वणी मिळणार आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ‘जालना एक्स्पो’चे उद्घाटन होणार आहे.
हे प्रदर्शन यंदा मंठा चौफुलीवर बेजो शीतल सीडसच्या मैदानावर भरविण्यात येणार आहे. यासाठी चार मंडप उभारण्यात आले असून, यातील बचत गटासाठी ४० टक्के स्टॉल राखून ठेवण्यात आले आहेत. या प्रदर्शनात रोबोचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक तसेच थ्रीडी टेक्नॉलोजी प्रिंटींगचे तंत्रज्ञान, शालेय विद्यार्थ्यांसाठी विमान उड्डानाचे प्रात्याक्षीक यासह अनेक महत्त्वपूर्ण दालनाचा यात समावेश राहणार आहे.
दरम्यान, एक्सोपोच्या नियोजित स्थळाला बुधवारी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, महावितरणचे मुख्य अभियंता गणेशकर, अधिक्षक अभियंता होमणे, वाहतूक शाखेचे संतोष पाटील तसेच गुरुवारी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर व इतरांनी भेटी दिल्या.
या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अकलांक मिश्रीकोटकर, सचिव डॉ. दीपक बगडीया, प्रकल्प प्रमुख सुनीलभाई रायठठ्ठा, सहप्रमुख अरुण अग्रवाल, भावेश पटेल, हेमंत ठक्कर, विनोद मोतीवाला, राजेश सोनी, डॉ. रमेश अग्रवाल, संदीप तोतला, जिग्नेश शहा, प्रतिम लोणगावकर, महेंद्र बागडी, प्रमोद झांझरी, अनिल गोयल, अभय नानावटी, सुरेश मगरे, अनिल कुलकर्णी, शरद लाहोटी आदींची उपस्थिती होती.
रोटरी जालना एक्स्पोची सर्व प्रकारची तयारी चांगल्या प्रकारे झाली आहे. हे एकप्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन होत आहे. त्यामुळे जालनेकरांनी याचा जास्तीत-जास्त संख्येने लाभ घ्यावा. या एक्स्पोसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असणार असल्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी सांगितले.


‘शेती, उद्योगाला चालना’
रोटरी क्लबचा हा चांगला उपक्रम आहे. अशाप्रकारे उपक्रमांना रोटरीने नेहमीच प्राधान्य दिले आहे. या उपक्रमातून शेतकरी तसेच उद्योजकांना एक वेगळी प्रेरणा मिळेल. शेती, उद्योगासाठी चालना देणारा हा एक्सपो ठरणार आहे. या एक्स्पोला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ऊस रिकव्हरीत सहकारी कारखाने सरस

0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या १० साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये दोन सहकारी व आठ खासगी साखर कारखान्याचा समावेश आहे.
गेल्या महिन्याभरात या साखर कारखान्याकडून सुमारे ८.५ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ७.५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
जिल्ह्याची रिकव्हरी पावणे नऊ टक्क्यांच्या आसपास असली तरी रिकव्हरीच्या बाबतीत सहकारी साखर कारखाने सरस ठरले आहेत.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील विठ्ठल साई साखर कारखान्याची रिकव्हरी ९.६५ आणि उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची रिकव्हरी ९.११ टक्के इतकी आहे. त्या तुलनेत खासगी साखर कारखान्याची रिकव्हरी ही कमी आहे. शिवशक्ती (वाशी) साखर कारखान्याची रिकव्हरी ही ८.६०, एन साई (शिराढोण) ८.९४, शंभू महादेव (कळंब) ५.६९, भीमाशंकर ८.१६, धाराशिव ८.७१, भैरवनाथ ८.२०, लोकमंगल ८.८० तर कंचेश्वर या साखर कारखान्याची रिकव्हरी ही ९.१९ इतकी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या गाळपात सर्वाधिक १ लाख ९४ हजार टन उसाचे गाळप हे एन साई या साखर कारखान्याने करून, १ लाख ७३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या पाठोपाठ आंबेडकर साखर कारखान्याने १ लाख ३६ हजार टन उसाचे गाळप करून १ लाख २४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विठ्ठल साई साखर कारखान्याने ८६ हजार टन उसाचे गाळप करून
८३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफ थकविल्याने ‘बीडी’ची मालमत्ता जप्त

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जालना येथील मजूर छाप बीडीच्या १५ भागीदारांनी बीडी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम ठराविक मुदतीत भरली नाही. त्यांच्याकडे दंड आणि व्याजाची रक्कम मिळून एक कोटी ८२ लाख ६३ हजारांची थकबाकी असून, ती वसूल करण्यासाठी कंपनीची मालमत्ता जप्त केली आहे,’ अशी माहिती भविष्य निर्वाह निधीचे विभागीय आयुक्त एच. एम. वारसी यांनी गुरुवारी दिली.

वारसी म्हणाले, ‘भविष्य निर्वाह निधीच्या विभागीय कार्यालया अंतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि बीड या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये पीएफअंतर्गत नोंदणीकृत कंपन्यांची संख्या सात हजार एवढी असून, त्यापैकी सुमारे २०० ते २५० युनिटच्या संचालक, भागिदारांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेत भरली नाही. त्यामुळे त्या युनिटच्या संचालक, व्यवस्थापनास वेळोवेळी नोटीस पाठविल्या आहेत. त्यापैकीच जालना येथे असलेल्या मजूर छाप बीडीच्या १५ संचालकांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या जवळपास ९५० ते एक हजार बीडी कामगारांचा १९९६ ते सप्टेंबर २०१५पर्यंत म्हणजेच १९ वर्ष भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळोवेळी निर्धारित कालवधीच्या आता जमा केली नाही. दंड व व्याज असे मिळून मजूर बीडीकडे एक कोटी ८२ लाख ६३ हजार ९१२ रुपयाची थकबाकी आहे. संचालकापैकी एका संचालकाने १० लाख १० हजार रुपयाचा भरणा बँकेत जमा केला आहे. उपायुक्त एस. के. नंदनवार व देवेन मानके यांनी उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी नोटीस बजावूनही संचालकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही कारवाई केली. कंपनीची रामनगर रस्त्यावरील १० हजार चौरस मीटर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. लवकर निविदा प्रक्रिया राबवून त्या जागेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्या जागेचा आजचा बाजार भाव काय आहे हे रेडिरेकनर दरानुसार काढण्यात येईल,’ असे वारसी यांनी सांगितले.

हे आहेत संचालक
- मेसर्स किसन व्यंकय्या अ‍ॅंड कंपनी
- रामल्लू नरसिंह गोरंट्याल
- लक्ष्मण किसन गोरंट्याल
- अशोक किसन गोरंट्याल
- प्रदीप नरसिंह गोरंट्याल
- प्रकाश व्यंकटेश गोरंट्याल
- सुरेश किसन गोरंट्याल
- नरेश व्यंकटेश गोरंट्याल
- रमेश व्यंकटेश गोरंट्याल
- हणुमंत नरसिंह गोरंट्याल
- गणेश व्यंकटेश गोरंट्याल
- पुरुषोत्तम किसन गोरंट्याल
- अभिषेक वसंत गोरंट्याल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाषक नसल्याने तपास खोळंबला

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रोझोनमध्ये सुरू असलेल्या स्पा सेंटरप्रकरणचा तपास आता थाई भाषेचा दुभाषक नसल्यामुळे खोळंबला असून पुणे विद्यापीठातून हा दुभाषक मागविण्यासंदर्भात हलचाली सुरू आहेत.

गेल्या आठवड्यात प्रोझोनमधील स्पा सेंटरवर छापा मारून पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी थायलंडच्या नऊ तरुणीसह अकरा जणांना बेड्या ठोकल्या. या सर्वांवर पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व तरुणी थाई आहेत. मुंबई येथील डेरेक मचदो आ‌णि फैजानखान यांच्या मार्फत त्या शहरात आल्या आहेत. या तरुणींची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास बुधवारी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या तरुणींना इंग्रजी कमी येत असल्याने त्यांची चौकशी करण्यामध्ये पोलिसांना अडचण येत आहे. या तरुणींची चौकशी करण्यासाठी अधिकृत दुभाष्याची गरज आहे, मात्र दुभाषी शहरात भेटत नसल्याने पोलिसांसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. थाई भाषा जाणणाऱ्या एका दुभाष्याला पोलिसांनी मदतीसाठी बोलावले होते, मात्र त्याचा काही जास्त फायदा झाला नाही. दरम्यान पुणे विद्यापीठाशी याबाबत पत्रव्यवहार करून तेथून दुभाषी मागवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

फ्लॅट मालकावर गुन्हा
‘दहशतवादी कारवायाच्या पार्श्वभूमीवर शहरातील घर, लॉज, हॉटेल मालकांना त्यांच्याकडे राहणाऱ्या भाडेकरूची माहिती संबधित पोलिस ठाण्याला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या थायी तरुणी प्रोझोन जवळील टाऊन सेंटर भागातील अल्ताफ नावाच्या व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. या तरुणीची माहिती लपवल्याप्रकरणी अल्ताफ विरुद्ध कलम १८८नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू व्यावसायिकांच्या मोर्चाला नकार

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळू वाहतूकदारांवरील अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी काढलेल्या महाराष्ट्र राज्य वाळू वाहतूक संघर्ष समितीच्या मोर्चाला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे समितीने क्रांती चौकात छोटेखानी सभा घेतली. तसेच समितीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

वाळू वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना पोलिस अधिकारी व महसूल अधिकारी त्रास देतात. शहरातील बांधकाम साहित्याचे भाव वाढण्यास हा त्रास कारणीभूत आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य वाळू वाहतूक संघर्ष समितीने केला. या पार्श्वभूमीवर समितीने गुरुवारी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत मोर्चा आयोजित केला होता. मोर्चासाठी जवळपास दीडशे व्यावसायिक क्रांती चौकात जमले. मात्र, पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह प्रमुख व्यावसायिकांनी क्रांती चौकात छोटेखानी सभा घेतली. ‘गौण खनिज कायद्याप्रमाणे परवाना असताना पोलिस अधिकारी वाहने अडवतात. दुसऱ्याच कायद्याखाली कारवाई करतात. या प्रकाराला व्यावसायिक कंटाळले असून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समस्या सांगणार आहे,’ असे आंधळकर म्हणाले. त्यानंतर आंधळकर, जिल्हा कार्याध्यक्ष शेख अश्फाक पटेल यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. पोलिस अधिकारी व महसूल अधिकारी यांच्या बेकायदेशीर कारवाईमुळे वाहतूकदार अडचणीत आले आहेत. अशी कारवाई फक्त औरंगाबाद जिल्ह्यात होते. ही बाब वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्यानंतरही कारवाई झाली नाही असे निवेदनात म्हटले आहे.

प्रमुख मागण्या
ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे वजन केले जात नाही. त्या धर्तीवर वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे वजन करू नये. वजन करायचे असल्यास रॉयल्टी वजनाच्या हिशोबानेच द्यावी, रॉयल्टीची मुदत आठ दिवसांपर्यंत वाढवावी, महसूल अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार कारवाई करावी, अशा मागण्या वाळू व्यावसायिकांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ला उपरती; आता लेटरहेडवर पत्र

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखेर ‘समांतर’ कंपनीला उपरती झाली असून, सर्वसाधारण सभेत बाजू मांडू द्या असे विनंती पत्र कोऱ्या कागदावर नव्हे, तर चक्क लेटरहेडवर देण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागाने यावर विधिसल्लागाराकडून अभिप्राय मागवला आहे.
समांतर जलवाहिनीचे काम पीपीपीतत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) करण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड कंपनीबरोबर करार केला. या कंपनीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची नियुक्ती जलवाहिनीच्या कामासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणून केली. महापालिकेने कंपनीबरोबरचा करार एक ऑक्टोबर २०१६ रोजी रद्द केला. त्यामुळे कंपनीने पालिकेच्या विरोधात कोर्टात धाव घेतली. लवादापुढेही सुनावणी सुरू आहे. असे असताना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बाजू मांडण्याची संधी द्या अशी, विनंती करणारे पत्र १४ नोव्हेंबर रोजी कंपनीने आयुक्तांच्या नावे कोऱ्या कागदावर डीटीपी करून दिले. त्या पत्रावर कंपनीचा शिक्का नाही, ज्या अधिकाऱ्याच्या नावे पत्रावर स्वाक्षरी केली आहे, त्या अधिकाऱ्याच्या वतीने (फॉर) दुसऱ्या कुणीतरी स्वाक्षरी केल्याचे एकूणच पत्राचे अवलोकन केल्यावर स्पष्ट होते. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पालिका वर्तुळात खळबळ उडाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी कंपनीने पालिकेला कोऱ्या कागदावर दिलेले पत्र मागे घेऊन, आता लेटरहेडवर पत्र दिले आहे. या पत्रातही सर्वसाधारण सभेत बाजू मांडण्याची संधी द्या अशी विनंती केली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हे पत्र अभिप्रायासाठी विधी विभागाकडे पाठवले आहे. या अभिप्रायानंतर सर्वसाधारण सभेत बाजू मंडण्याची संधी कंपनीला द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

दोन फेब्रुवारीपूर्वी निर्णय घ्यावा लागेल
समांतर जलवाहिनीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दोन फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कंपनीला सर्वसाधारण सभेत बाजू मांडू देण्याची संधी द्यायची की नाही, याचा निर्णय पालिकेला दोन फेब्रुवारीपूर्वी घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहिता आत्महत्या; तिघांना सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पती, सासू, सासऱ्याच्या छळास कंटाळून गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी त्या तिघांना दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

माळविहार (ता. जि. बुलडाणा) येथील अशोक शामराव ढमरे यांची कन्या रेणुका हिचे लग्न गोळेगाव (ता. सिल्लोड) येथील अनिल भिमराव बनकर (वय ३२) यांच्यासोबत २८ जानेवारी २०१३ रोजी झाले. लग्न झाल्यानंतर एक महिना रेणुकाला नांदवले, नंतर तिला ‘शेतजमीन घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये,’ म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. या त्रासाला कंटाळून रेणुका माहेरी गेली. त्यावेळी तिने आई - वडिलांना सासरची मंडळी पैशासाठी त्रास देत असल्याची कल्पना दिली. त्यानंतर रेणुकाचे आई - वडील आणि तिचे मामा गोळेगाव येथे आले. त्यांनी रेणुकाचे पती अनिल, सासरे भीमराव रामभाऊ बनकर आणि सासू शांताबाई भीमराव बनकर यांची समजूत काढली.

दरम्यान, रेणुकाचा छळ काही दिवस थांबला मात्र पती अनिल हा दारू पिऊन आल्यानंतर, ‘शेतीसाठी पैसे आणत नाहीस, तर तुला राहू देणार नाही, तू पैसे घेऊन ये,’ असे म्हणत मारहाण करू लागला. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून रेणुका हिने १६ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री आठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर रेणुकाच्या वडिलांना ‘तिची प्रकृती खराब झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात आणले आहे,’ असे मोबाइलवरून सांगण्यात आले. रेणुकाचे वडील अशोक ढमरे हे रात्रीच रुग्णालयात दाखल झाले. रेणुका मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुलीने पती अनिल, सासरा भिमराव आणि सासू शांताबाईच्या छळास कंटाळून आत्महत्या केली असल्याची तक्रार अजिंठा पोलिस ठाण्यात दिली.

पोलिस उपनिरीक्षक ए. एच. जगताप यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने पती अनिल, सासरा भीमराव आणि सासू शांताबाई या तिघांना दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या ३०६ कलमान्वये दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद. भारतीय दंड संहिते ४९८ अ कलमान्वे तीन वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली.

वडील, मामांची साक्ष ठरली महत्त्वाची
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली असता अॅड. बाळासाहेब महेर यांनी पाच साक्षीदार तपासले. यामध्ये रेणुकाच्या वडिलांची व मामांची साक्ष महत्त्वाची ठरवली. पोर्टमार्टेम अहवालामध्ये रेणुकाच्या गळ्यावर व्रण होते आणि ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याची साक्ष आणि अहवाल दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आसेगावच्या शाळेची तपासणी

0
0

वाळूजमहानगर ः आसेगाव (ता. गंगापूर) येथील जिल्हा पर‌िषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मेघा जोशी यांनी कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्ता विकास पथकाने नुकतीच शाळेला भेट दिली.

या वेळी त्यानी प्रत्येक वर्गातील उपस्थिती, गृहपाठ वह्या, विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन, शाळेच्या परिसराची स्वच्छता, शालेय पोषण आहार, गणवेश वाटप, पुस्तक वाटप, परिपाठ रजिस्टर, ई-लर्निंग प्रात्यक्षिक यांसह शाळेतील सर्व अभिलेख तपासले. विद्यार्थ्यांना विविध विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले; तसेच शाळेत वर्ग चालू असताना अध्यापनातले बारकावे त्यांनी जाणून घेतले. सर्व बाबी व्यवस्थित असल्याने त्यानी समाधान व्यक्त केले. प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे, सोडविलेल्या गणितीक्रिया पाहून पथक प्रभावित झाले. शालेय अभ्यासक्रमासोबतच सामान्यज्ञान, ज्ञानरचनावाद, शैक्षणिक साहित्याचा दैनंदिन अध्यापनात समावेश, विद्यार्थ्यांचे राहणीमान व संस्कार यांचे त्यांनी कौतुक केले.

लोकसहभागातून शाळेचा झालेला कायापालट यासाठी त्यानी शिक्षकांची प्रशंसा केली. शाळेच्या वतीने मेघा जोशी यांचा पुस्तक व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, राजेश हिवाळे, वंदना तारो, महेबुब शेख, परसराम धनेधर, बाबासाहेब जाधव, कैलास गायके, अनिता शेटे, शीतल सोनवणे, वंदना पवार, सुधा निकम, ज्योती सुरे, अनिता धोंडकर, विजय जाधव, सागर गायके, मुजीब सय्यद यांची उपस्थिती होती.

पथके समस्या सोडविण्यासाठी
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी प्रशासनाने तालुकानिहाय भरारी पथकांची निर्मिती करण्याचे जाहीर केले होते. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत अधिक वाढ व्हावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर काही उपाययोजना केल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक भरारी पथक नेमण्याचे जाहीर केले होते. ही पथके तालुक्यातील शाळांची तपासणी करून तेथील अडचणी जाणून घेतील. शाळेच्या प्रशासकीय पातळीवरील अडचणी सोडविण्यासाठी भरारी पथके नेमली असून, ११ ते १३ डिसेंबरच्या काळात या पथकांकडून पाहणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुगार खेळणाऱ्यांवर छापा; आसेगावात ११ जणांवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
पोलिसांनी तालुक्यातील घायगाव शिवारात गुरुवारी रात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ११ जणांविरुद्व गुन्हा नोंदविला. या प्रकरमी चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सात मोबाइल फोन, जुगाराचे साहित्य, पाच हजार रुपये किमतीचे कॅल्क्युलेटर व रोख रक्कम असा २३ हजार ७५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तालुक्यातील घायगाव येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरीन पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन सोनार, जालिंदर तमनार, जरहाड यांनी गुरुवारी रात्री घायगाव येथे छापा टाकला. या कारवाईत घायगाव शिवारात अनिल गायकवाड यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडुन जुगाराचे साहित्य, कॅल्क्युलेटर, रोख रक्कम असा २३ हजार ७५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सरबजीत सुधाकरसिंग पंजाबी, कमालदीप सुधाकरसिंग पंजाबी, संजय फकीरचंद प्रसाद व मोहन फकीरचंद प्रसाद (सर्व रा. वैजापूर), संंजय कोतवाल, धीरज कोतवाल (रा. येवला), राजू कवडे (रा.परसोडा), भोलया, सुभाष, माऊली पााटील (रा. नादी) व झुबेर अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संतोष पवार यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुुढील तपास हवालदार रज्जाक शेेख हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी पाससाठी वैजापुरात दोन खिडक्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूर बसस्थानकात विद्यार्थ्यांना मासिक पास देण्यासाठी दोन खिडक्या सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन आगार प्रमुख आर. एस. नेरकर यांनी दिले.

एसटीचे मासिक पास देण्यासाठी एकच खिडकी असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेज बुडवून रांगेत उभे राहावे लागत आहे. पास घेण्यासाठी बुधवारी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती.

पास घेण्यासाठी जमा झालेल्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी साई माउली फाउंडेशनचे मार्गदर्शक धोंडिरामसिंह राजपूत यांना अडचण सांगितली. त्यांनी ताबडतोब वैजापूर आगाराशी संपर्क केला, पण त्यांच्याकडुन प्रतिसाद न मिळाल्याने राजपूत यांनी औरंगाबाद येथील पी. जे. बोर्डे यांना विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत कळवले. त्यानंतर आगार प्रमुख आर. एस. नेरकर यांनी बसस्थानकाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी

संपर्क साधला यावेळी राजपूत व अमृत शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सांगितल्यावर दोन खिडक्या सुरू करण्याचे आश्वासन दिले.

मुलींना शाळेत पास मिळणार
पाससाठी मुलींचे अर्ज भरून आगारात जमा करावेत. त्यांना शाळेतच पास देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आगारप्रमुखांनी दिले. त्यामुळे मुलींची गैरसोय दूर झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर दक्ष राहा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
महिला व मुलींमध्ये कायदेविषयक जनजागृतीचा मोठ्या प्रमाणावर आभाव आहे. महिलामध्ये स्वंयसुरक्षिता बाळगण्याबरोबरच सद्यस्थितीत फसवणूक थांबवायची असेल, तर सोशल मीडियावर महिलांनी दक्ष राहण्याचे आवाहन औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी कन्नड येथे बुधवारी आयोजित महिला जनजागृती मेळाव्यात केले.

शाळा, महाविद्यालये या ठिकाणी महिला विषयक कायद्याच्या माहितीसाठी गटांच्या सहाय्याने समुपदेशन करण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी दामिनी पथकांची मदत घेण्याचे आवाहन करत, प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात मुंलीसाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष पथक, दामिनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक मनिषा लटपटे यांनी केले. यावेळी परीविक्षाधीन पोलिस उपविभागीय अधिकारी नयना आलूरकर यांनी मत व्यक्त केले. यावेळी फुलंब्री येथील सावता विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आत्मशोध पथनाट्य सादर केले. औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडून मुलींनी कराटेची प्रात्याक्षिके सादर केली. या कार्यक्रमासाठी कन्नडच्या नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, पंचायत समितीच्या उपसभापती रुबिनाबी कुरेशी, दक्षता समितीच्या महिला यांच्यासह विभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू, परीविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी आलूरकर, पोलिस निरीक्षक मारुती पंडित, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांची प्रमुख उपस्थिती होती. कन्नड शहर व ग्रामीण भागातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होती. पोलिस उपनिरीक्षक सूत्रसंचालन सुनिल पवार यांनी केले. उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक शाखेच्या दिमतीला दहा ट्रॅफिक बुथ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चौकाचौकांत उभ्या राहणाऱ्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची वणवण आता थांबली आहे. इंडियन ऑइल कंपनीच्या वतीने दहा ट्रॅफिक बुथ पोलिसांना देण्यात आले आहे. क्रांतीचौकात शुक्रवारी या बुथचे उद‍‍्घाटन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगाबाद शहरात प्रत्येक चौकात वाहतूक शाखेच्या पोलिसांचा पॉइंट आहे, मात्र या पोलिसांना थोडा वेळ देखील बसण्यासाठी हक्काची जागा नाही. एखाद्या झाडाखाली

किंवा ओळखीच्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी; तसेच थांबण्यासाठी यांना जावे लागत होते. पोलिसांची ही निकड लक्षात घेऊन इंडियन ऑइल कंपनीने हे बुथ दिले आहेत.

या बुथमध्ये वीज, पाणी; तसेच मोबाइल चार्जिंग पॉइंटची व्यवस्था देण्यात आली आहे. क्रांतीचौकात एका कार्यक्रमात शुक्रवारी या बुथचे उद‍‍््घाटन आयुक्त यादव यांनी केले. यावेळी पोलिस उपायुक्त परिमंडळ एकचे विनायक ढाकणे, परिमंडळ दोनचे राहुल श्रीरामे,यांच्यासह इंडियन ऑइल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक राजीव यादव, मुख्य व्यवस्थापक प्रवीण जाधव, विवेक उपासनिक यांच्यासह सर्व पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, वाहतूक पोलिस निरीक्षक, विशेष पोलीस अधिकारी आदींची उपस्थिती होती.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई
यावेळी आयुक्त यादव म्हणाले,‘शहराची लोकसंख्या १६ लाख असून, आठ लाख वाहनधारक आहेत. यामध्ये अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करतात. अशा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चितेगाव येथील कुंटणखाना उद्धवस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चितेगाव (ता. पैठण) येथे सुरू असलेला कुंटणखान्यावर ग्रामीण गुन्हे शाखेने गुरुवारी छापा टाकला. यामध्ये दलालासह दोन पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चितेगाव परिसरातील साईलिलानगरी येथे एक दलाल कुंटणखाना चालवत असल्याची माहिती ग्रामिण गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून हा छापा टाकण्यात आला. यावेळी दलाल आरोपी लियाकत हमीद पठाण (वय ३५, रा. तुळजापूर, ता. पैठण) हा दोन महिलांकडून हा व्यवसाय करून घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आरोपी लियाकतसह दोन्ही पीडित महिलांना ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक डॉ. आरतीसिंह, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर, डीवायएसपी स्वप्नील राठोड, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पंडित सोनवणे, पीएसआय सचिन कापुरे, गणेश जाधव, संजय काळे, नवनाथ कोल्हे, राहुल पगारे, गणेश गांगवे, पुष्पांजली इंगळे, रजनी सोनवणे, प्रकाश शिंदे आणि अभिजित सोनवणे यांनी केली.

३०० रुपये दर
दलाल लियाकत ३०० रुपये ग्राहकाकडून घेत होता. स्वतःकडे दीडशे रुपये दलाली ठेवून उर्वरित दीडशे रुपये तो या महिलांना देत असल्याची माहिती तपासात समोर आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदोन्नतीप्रकरणी कारवाई करावी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात गेल्या महिन्यात तीन कर्मचाऱ्यांना ग्रामविस्तार अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली होती. ही पदोन्नती नियमबाह्य असल्याची तक्रार सदस्यांनी सरकारकडे केली होती. त्यावरून सरकारने या पदोन्नती रद्द करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात जिल्हा परिषदेतील दोषी अधिकाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करावी, असा ठराव सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर अध्यक्षस्थानी होत्या. सीईओ अशोक शिरसे, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती धनराज बेडवाल, सर्व अधिकारी, सदस्य उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने गेल्या महिन्यात तीन कर्मचाऱ्यांच्या ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती दिली होती. राज्य सरकारने कुठल्याही पदोन्नती देऊ नये, असे आदेश दिले असतानाही पदोन्नती दिल्याबद्दल सदस्यांनी सरकारकडे तक्रार केली. सीईओ मधुकरराजे अर्दड यांनी, मात्र ही पदोन्नती नियमाने केली असल्याचे सांगितले होते. सरकारने या पदोन्नती रद्द करण्याचे आदेश नुकतेच दिले. या मुद्यावर काँग्रेस सदस्य किशोर बलांडे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले,‘आम्ही त्यावेळी पदोन्नती बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते, मात्र सीईओंनी आमचे ऐकले नाही. सरकारने आता पदोन्नती रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तशी कार्यवाही झाली. पदोन्नती समितीच्या बैठकाच कित्येक वर्षांपासून होत नाहीत. केवळ कागदोपत्री बैठका दाखविल्या जातात. यासंदर्भात बैठक कधी झाली, अशी विचारणा केली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी उत्तर दिले त्यावर बलांडे, अविनाश गलांडे यांचे समाधान झाले नाही. कारण बैठकीच्या वेळेबाबत संभ्रम निर्माण झाला. दरम्यान यावर अधिकचा मुद्दा मांडताना बलांडे म्हणाले,‘सीईओ मधुकरराजे अर्दड यांनी त्यांच्या अधिकारात या पदोन्नती केल्या होत्या. आता सरकारने ते रद्द केले आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.’

सीईओ शिरसे म्हणाले, की हा अधिकार सरकारला आहे. त्यावर अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव मंजूर करून सरकारकडे पाठवावा, असा मुद्दा उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी मांडला. त्यास रमेश गायकवाड यांनी अनुमोदन दिले.

नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासनाकडे असलेली साधने कळवावीत, असे पत्र राज्य सरकारने दिले आहे. त्यावर अविनाश गलांडे म्हणाले, की जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असावी, यासाठी दहा कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करावी. ग्रामपंचायतींमध्ये आपल सरकार सेवा केंद्रे स्थापन केली आहेत. तिथे कार्यरत संगणकचालकांना वेतन देण्याचा मुद्दा बलांडे यांनी उपस्थित केला. ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून बहुतांश निधी इकडेच खर्च होत असेल तर विकास कामे कशी होणार, संगणकचालक भरण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना द्यावा, कंपनीचा फायदा करून घेऊ नये, असा प्रस्ताव मांडला.

आर्थिक व्यवहाराचा आरोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य विजय चव्हाण यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर आर्थिक व्यवहार करत असल्याचे थेट आरोप केले. एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन फार्मासिस्ट कार्यरत आहेत, असे कसे काय, असा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात २०१४मध्ये बोगस डॉक्टर तपासणी मोहीम घेतली होती. त्यात २०० डॉक्टर बोगस आढळून आले. त्यांच्यावर अद्याप काहीच कारवाई केली नाही. यामागे मोठा आर्थिक व्यवहार आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी आक्षेप घेतला. सीईओ अशोक शिरसे यांनी त्यावर आक्षेप घेत वैयक्तिक आरोप करू नयेत, असे सुचविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसन्या पैशाच्या वादातून घरात घुसून मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उसन्या पैशाच्या वादातून चार गुंडानी घरात घुसून सामानाची नासधूस करीत कुटुंबाला मारहाण केली. हा प्रकार एन-दोन, म्हाडा कॉलनी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मनजीत रायभान कोळेकर (वय ४८, रा. म्हाडा कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली. कोळेकर यांचा मुलगा कुलदीप हा भारत बाझार येथील एमके कन्स्ट्रक्शन येथे कामाला आहे. याच कंपनीत त्याच्यासोबत आणखी एक तरुणी कामाला आहे. या तरुणीकडून कुलदीप याने काही रक्कम उसनी घेतली होती. ही तरुणी त्याला ही रक्कम वारंवार परत मागत होती. ही तरुणी चार तरुणासह कोळेकर मंगळवारी यांच्या घरी आली.

घराच्या बाहेरून तिने कुलदीपला आवाज दिला. त्यांच्यात बोलणे सुरू असताना चार तरुण कोळेकर यांच्या घरात घुसले. ‘तुम्ह‌ी पैसे का देत नाही,’ असे म्हणत कोळेकर व त्यांच्या मुलाला त्यांनी मारहाण केली; तसेच घरातील सामानाची नासधूस केली. यानंतर त्या तरुणीसह चौघे निघून गेले. याप्रकरणी कोळेकर यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अन्सार, जावेद, बाबर आणि नासेर (सर्व रा. चिकलठाणा) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय सांगळे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फसव्या घोषणेच्या निषेधार्थ लातुरात आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांवर सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे जाहीर केले होते. १५ तारीख उजाडली तरी रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नसल्याच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लातूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी ( दि. १५ ) अंबाजोगाई रोडवरील एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जाहीर आश्वासनानंतरही रस्त्यावरील खड्डे ‘जैसे थे’ अवस्थेत असल्याचे दृष्टिपथास येताच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव तथा माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांच्या हाती यावेळी ' कुठे आहे खड्डेमुक्त महाराष्ट्र राज्य ... इथे आहे खड्ड्यांचे साम्राज्य' अशा आशयाच्या उपहासात्मक घोषणा देणारे फलक लावले होते. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी यावेळी विद्यमान राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही केली.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी रस्त्यावरील खड्डा दाखवा एक हजार रुपये मिळवा अशी घोषणा दिली होती. रस्त्यावरील खड्डे आहे तसेच असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे एक हजार रुपये देण्याचीही मागणी केली. राज्यातील सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.
या आंदोलनांत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांच्यासह लातूर शहर मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, मनपा गटनेते तथा विरोधी पक्षनेते दीपक सूळ, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशसरचिटणीस प्रा. स्मिता खानापुरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाठ, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सपना किसवे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, नगरसेवक रविशंकर जाधव, विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, पप्पू देशमुख, युनूस मोमीन, इमरान सय्यद, सचिन बंडापल्ले, गौरव काथवटे, विक्रांत गोजमगुंडे, दत्ता मस्के, अॅड. समद पटेल, नरेंद्र अग्रवाल, व्यंकटेश पुरी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कंपनीत भागीदारीचे अामिष दाखवत सात जणांकडून ४८ लाख ७८ हजारांची फसवणूक करणाऱ्या सुरेंद्र परमानंद उर्फ बचनू झा (वय ३५, रा. शिवनगर घाट, जि. दरभंगा, बिहार, ह. मु. स्वस्तिक ट्रेडर्स, अहमदाबाद गुजरात) आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेख यांनी सोमवार १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात आली.

याबाबत धनेश राजेंद्र पाटील (रा. हर्सूल टी पॉइंट) यांनी एमआयडीसी वाळूज येथे तक्रार दिली होती. आरोपीची एस. के. प्रॉडक्टस या नावाने हाउस किपिंग मालाची कंपनी होती. या कंपनीत भागिदारी करण्याचे अमिष दाखवले होते. यासाठी माझ्याकडून विविध वेळी सुरवातीला पाच लाख ७० हजार रुपये घेतले. यातून सुदर्शन इंटरप्रायझेस या नावाने करारनामा करून नवीन व्यवसायास सुरुवात केली. त्यावेळी सर्व खर्च मीच केला यासाठी जवळपास विविध कामासाठी सुरेंद्र झा यांनी सांगितल्या प्रमाणे तीन लाख ९० हजार रुपये सुदर्शन इंटरप्रायझेस च्या खात्यात टाकले. याशिवाय शबाना शेख मजहरउद्दीन यांच्याकडून तीन लाख किरण कचरू डिके यांच्याकडून पाच लाख ६८ हजार त्रिरत्न गंगावणे यांच्याकडून एक लाख ६० हजार विशाल जोगदंडे यांच्याकडून तीन लाख २० हजार रोहित तायडे यांच्याकडून एक लाख दहा हजार राजेंद्र काळे यांच्याकडून २३ लाख आरडी प्लास्ट यांच्याकडून एक लाख २० हजार असे एकूण ३८ लाख ७८ हजार रुपयांची माझी व इतरांची फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले होते.

याबाबत अनेक वेळा हिशेबाची माहिती सुरेंद्र झा यांच्याकडे मागितली, मात्र त्यांनी ती दिली नाही. याप्रकाराने मी माझी गुंतवणूक केलेली दहा लाखांची मागणी केली असता त्यांनी मला न वटणारा चेक दिला. यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस गुजरात येथून ताब्यात घेऊन शहरात आणले.

गुंतवणुकीच्या तपासासाठी कोठडी
न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील योगेश तुपे पाटील यांनी आरोपी हा बिहार राज्यातील आहे. ही रक्कम त्याने कुठे गुंतवणूक केली काय, याचा तपास करायचा आहे. आरोपींनी याव्यतिरिक्त अजून कोणाची फसवणूक केली काय, याचा तपास करण्यासाठी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपीस सोमवार १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटकपूर्व जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रोझोन मॉलमधील स्पा सेंटरमध्ये देहविक्रय करणाऱ्या मुंबईच्या तीन मालकांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी नामंजूर केला.

प्रोझोन मॉलमधील दोन मसाज पार्लर सेंटरवर पोलिसांच्या विशेष पथकाने सात डिसेंबर रोजी छापा मारून देहविक्री करणाऱ्या विदेशी आणि देशी तरुणींसह ग्राहकास पकडले. त्या १८ जणांना केली. त्यात थायलंड येथील नऊ आणि दोन देशी अशा ११ मुली, चार ग्राहक आणि त्याठिकाणी काम करणारे तिघे अशा एकूण १८ जणांना अटक केली होती. यापैकी थायलंडच्या नऊ मुलींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. उर्वरित नऊ जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या गुन्ह्यातील स्पा मसाज सेंटरचा मालक डेरेक इलिस मायडो (रा. मालवण, मुंबई), फैजन रइस शेख (रा. कुर्ला) आणि विशाल कृष्णा शेट्टी या तिघांनी या गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जमीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्यासमोर दाखल करण्यात आला. या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी झाली असता तपास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी देशामध्ये स्पा, मसाज सेंटरच्या नावाखाली अंतरराष्ट्रीय स्तरावर चालविल्या जाणाऱ्या देह व्यापारामध्ये या तिघांचा सहभाग आहे. त्या तिघांचे देशातील हैदराबाद, बेंगळुरू येथे स्पा सेंटर सुरू आहेत. त्यांनी विदेशातून किती मुली आणल्या होत्या, याचा तपास करायचा असून, विदेशी मुलीकडे बनावट पासपोर्ट आढळून आल्यामुळे त्यासंदर्भात देखील चौकशी करायची आहे. एक विदेशी तरुणीकडे अद्यापही पासपोर्ट मिळाला नाही. ती कशी काय आली, याचा शोध घ्यायचा आहे. विदेशातून अन्य व्यक्तींना आणून यांनी काही देशविघातक कृत्य केले आहे काय, याची देखील चौकशी करावयाची असल्यामुळे त्या तिघांना अटक केल्याशिवाय या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांना अटकपूर्व जामीन दिला तर आरोपीचे मनोधौर्य वाढू शकते त्यामुळे त्याना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती कांबळे आणि मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून न्यायालयाने त्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

‘स्पा’चा व्यवस्थापक शशांक खन्नाने न्यायालयाकडे तपास अधिकाऱ्यांनी कोठडीदरम्यान मारहाण केल्याची तक्रार केली होती. न्यायालयाने वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पुन्हा पोलिस कोठडी दिली. दरम्यान, आज पोलिस कोठडी संपल्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शंशाक खन्नास १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची हर्सूल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली.

विदेशी तरुणी सुधारगृहात
थायलंडच्या विदेशी तरुणींना सुधारगृहात पाठविण्यात आले होते त्यांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्या तरुणीची चौकशी करायची आहे. दुभाषा मिळाल्यावरच त्या तरुणीची चौकशी करण्यात येईल, असे तपास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी न्यायालयात मांडल्यामुळे तरुणींची पुन्हा सावित्रीबाई फुले सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरवलेले ४० हजार त्यांना मिळाले परत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
प्रामाणिकपणा हरवल्याचा प्रत्यय जागोजागी येतो, परंतु माणुसकी, प्रामाणिकपणा अद्याप कायम असल्याचा अनुभव कन्नडकरांना आला. कन्नड शहरातील एकाने सापडलेले ४० हजार पोलिस ठाण्यात जमा केले आणि ते संबंधिताला पोलिसांसमक्ष देण्यात आले.

कन्नड शहरातील खिडकी का बंगला परिसरातील राहिवासी सय्यद सलीम सकाळी अकराच्या सुमारास बसस्थानका समोरून जात होते. त्यांना पान स्टॉलजवळ पैसे खाली पडलेले आढळून आले त्यांनी, पैसे कुणाचे आहेत, अशी तेथे विचारणा केली. या पैसाचा मालक कुणीही आढळून न आल्याने त्यांनी सरळ कन्नड शहर पोलिस ठाणे गाठून सर्व पैसे पोलिसांच्या स्वाधीन केले. नंतर घटनास्थळावर खातखेडा येथील किशोर मोहनराव पवार हे आले. त्यांनी पैशाबाबत चौकशी केली. पैसे पोलिस ठाण्यात जमा केल्याची माहिती त्यांना देण्यात आली. पवार यांनी पोलिस ठाण्यात जाऊन खातरजमा केली असता पैसे सुरक्षित असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

पोलिस उपनिरीक्षक सतीश दिंडे, पोलिस कर्मचारी बी. सी. आहेर, अंकुश सरोदे, संभाजी आंधळे यांनी पुढाकार घेत सय्यद सलिम यांना सापडलेले ४० हजार रुपये किशोर पवार यांच्याकडे दिले. पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मारवाडी आयडल स्पर्धेचे आयोजन

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सकल मारवाडी युवा मंचतर्फे मारवाडी समाजातील सर्व वयोगटासाठी मारवाडी आयडल सीजन दोन या मराठवाडास्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती सकल मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी गुरुवारी दिली.

अग्रवाल म्हणाले, ‘गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही समाजातील गायकांना व्यासपीठ मिळावे म्हणून स्पर्धेचे आयोजन केले आहे. १४ वर्षांखालील व १४ वर्षांवरील अशा दोन गटांत होणाऱ्या स्पर्धेसाठी २३, २४ व २५ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण सभागृहात ऑडिशन होईल. सात जानेवारीला भानुदास चव्हाण सभागृह, रेल्वे स्टेशन रोड येथे उपांत्यफेरी व १३ जानेवारीला संत तुकाराम नाट्यगृहामध्ये अंतिम स्पर्धा घेण्यात येईल. यावर्षी विजेत्यांना ५० हजारापर्यंतची रोख बक्षीसे आहेत.’ यावेळी मंचचे माजी अध्यक्ष व प्रकल्पप्रमुख संजय मंत्री, अॅड. जोगिंदरसिंह चौहान, संतोष तिवारी, औरंगाबाद मिडटाउन शाखेच्या अध्यक्ष सुप्रिया सुराणा व सचिव ममता तिवारी उपस्थित होत्या.

नोंदणीसाठी...
२० डिसेंबरपर्यंत नोंदणी करायची आहे. त्यासाठी सजावट हँडलूम, निराला बाजार, आशिष इलेक्ट्रीकल्स, औरंगपुरा, नक्षत्र शॉपी, कँनॉट मार्केट व बी. जी. सोलार सिस्टीम गुलमंडी येथे नोंदणी अर्ज उपलब्ध आहेत. WWW.SMYMAIRANGABAD.COM या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा smymaurangabad@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images