Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सीबीएसई’च्या त्या वेळापत्रकाने संभ्रम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अद्याप मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही, मात्र सोशल मीडियावर वेळापत्रकांनी विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

राज्यातून ‘सीबीएसई’ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. एकीकडे राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने आपले दहावी, बारावीचे वेळापत्रक पूर्वीच जाहीर केले. मात्र ‘सीबीएसई’चे वेळापत्रक अद्याप जाहीर नाही. या मंडळाच्या शाळांमधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी, पालकांना वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. मंडळानेही अद्याप वेळापत्रक जाहीर केव्हा होईल, असे स्पष्ट केलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विविध राज्यातील निवडणुकांमुळे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यास मंडळाला अडचणी आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावर तारखांचा गोंधळ अधिक संभ्रम निर्माण झाल्याने विद्यार्थी, पालक शाळांच्या मुख्याध्यापकांकडे वेळापत्रकाबाबत विचारणा करत आहेत. औरंगाबदमधून दरवर्षी ‘सीबीएसई’च्या दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दोन हजार असते. मंडळ वेळापत्रक जाहीर केव्हा करते याकडे आता शाळा व्यवस्थापनांचे लक्ष लागले आहे. मंडळाने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे मुलांनी अशा वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे प्राचार्य अभिजित दिवेंनी ‘मटा’ला सांगितले.

जुन्याच तारखा
मागील दोन-तीन वर्षांमध्ये विविध राज्यातील निवडणुका परीक्षा दरम्यान येत असल्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्याची प्रक्रिया लांबत असल्याचे सांगण्यात येते. सोशल मीडियावर जाहीर होत असलेल्या तारखांमध्ये नऊ मार्च ते दहा एप्रिल दहावी, तर बारावीची नऊ मार्च ते २९ एप्रिल असे वेळापत्रक दर्शविण्यात येत आहे. मंडळ अधिकृत वेळापत्रक जाहीर करत नाही तोपर्यंत विद्यार्थी, पालकांनी अशा वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असे शाळा व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नववीच्या विद्यार्थ्यांनी लिहिला घराण्याचा इतिहास!

$
0
0




औरंगाबादः सणावळ्यांची लांबलचक लक्षात न राहणारी यादी, तहातली कलमे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे डोके भंजाळून जाते, मात्र हाडाचा शिक्षक यावरही मात करतो आणि विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लावतो. ग्रामीण प्रशाला, माडज (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथील प्रयोगशील शिक्षक बालाजी मदन इंगळे यांनी असाच आगळावेगळा उपक्रम राबवला त्यामुळे विद्यार्थी इतके प्रेरित झाले, की त्यांनी चक्क आजी-आजोबांच्या मदतीने स्वतःच्या घराण्याचा इतिहास लिहिला.

साहित्यिक असणाऱ्या इंगळे गुरुजींनी अनेकदा शाळेतील मुलांच्या मनात इंग्रजीसारखाच इतिहासाचा धसका पाहिलेला. त्यांना इतिहासाबद्दल असणारी नाआवड आणि कंटाळा मनातून घालवण्यासाठी नामी त्यांनी युक्ती केली. नववीच्या इतिहासात एकूण नऊ धडे आहेत. त्यात १) इतिहासाची साधने २) भारतः १९६० नंतरच्या घडामोडी ३) भारतापुढील अंतर्गत आव्हाने ४) आर्थिक विकास ५) शैक्षणिक वाटचाल ६) महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण ७) विज्ञान व तंत्रज्ञान ८) उद्योग व व्यापार ९) बदलते जीवन यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी याच पद्धतीने आपल्या घराण्याचा इतिहास लिहायचा असा दीर्घ गृहपाठ त्यांनी दिला. यामध्ये आजोबा पणजोबा पासूनचा इतिहास लिहायचा होता. आधी पुस्तकातील प्रकरण समजून घ्यायचे. मग आपल्या घराण्याच्या इतिहासाचे प्रकरण लिहायचे. एक प्रकरण पुस्तकातल्या अभ्यासाचे आणि लगेच घराण्याचे एक प्रकरण लिहायचे. पहिल्या प्रकरणात मुलांनी आपल्या घराण्याचा इतिहास लिहिण्यासाठी जी साधने वापरली ती लिहिली. दुसऱ्या प्रकरणात घराण्यातील महत्त्वाच्या घडामोडी लिहिल्या. तिसऱ्यात घराण्यापुढच्या समस्या लिहिल्या. चौथ्या प्रकरणात घराण्यातील आर्थिक देवाणघेवाण व त्याचे मार्ग याबद्दल माहिती लिहिली. पाचव्यात घराण्यात कोण कोण शिक्षण घेतले, त्याचा उपयोग काय झाला याबद्दल लिहिले. सहाव्या प्रकरणात घरातील स्त्रियांच्या स्थितीबद्दल माहिती लिहिली. तर सातव्या प्रकरणात घराण्यामध्ये विज्ञान - तंत्रज्ञानाचा प्रवेश कधी व कसा झाला याबद्दलची माहिती लिहिली. आठव्या प्रकरणात घराण्यातील उद्योग आणि व्यापाराबद्दल माहिती लिहिली. तर शेवटच्या प्रकरणात पणजोबा पासूनचे जीवन कसे बदलत गेले, याबद्दल माहिती लिहिली. इतिहास लिहून झाल्यावर मुलांशी संवाद साधला तेव्हा त्यांना पुस्तकातला इतिहास पक्का लक्षात राहिला. स्वतःच्या घराण्याबद्दल खूप माहिती मिळाली. खूप दिवसानंतर आजी-आजोबांशी एवढे दीर्घ बोलणे झाले आणि चक्क त्यांची त्यांच्याशी मैत्री झाल्याचे अनेकांनी सांगितले.

वाईट प्रथा कळाल्या
आपल्याच घराण्याबद्दल आजी आजोबा/आई वडील भरभरून बोलत होते आणि घरातील भाऊ-भाऊ वेगळे कसे झाले, हुंडा देणे घेणे प्रथा वाईट आहे हे कळाले. आजी आजोबांच्या भाषेबद्दल काहींना कुतूहल वाटले. घराची आर्थिक घडी बसवताना आजोबा/वडिलांना कशी कसरत करावी लागते, स्रियांचे कमी शिक्षण व चूल आणि मूल एवढेच विश्व याबद्दल जाणीव झाली. घराण्याची प्रगती, अधोगती आणि मानसिकता लक्षात आली. किल्लारी भूकंपातील आठवणी ऐकायला मिळाल्या.

मुलांनी पुस्तकातला इतिहास आवडीने समजून घेतला. स्वतःच्या घराण्याचा इतिहास जाणून घेतला. इतिहास विषय त्यांना आवडला याचा आनंद झाला. यामुळे विद्यार्थ्यांची समजही वाढली. आपल्याच घराण्याच्या परंपरा, वैचारिकता, आचरणाच्या पद्धती कळाल्या. - बालाजी मदन इंगळे, शिक्षक, ग्रामीण प्रशाला माडज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘प्रदर्शनासाठी कायमस्वरुपी जागा देणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना ही उद्योग आणि व्यापाऱ्यांची भूमी आहे. येथील स्थानिक उद्योजकांनी स्वत;च्या कष्टातून उद्योगांची उभारणी केली आहे. बियाणे, स्टीलसह अन्य उद्योग व्यापारात जालन्याचे नाव जगाचे नकाशावर पोहचले आहे. रोटरी क्लब जालनाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून उद्योग आणि व्यापाराला चालना देण्यासाठी जालना एक्स्पोचे आयोजन करण्याची जी परंपरा सुरू केली आहे, ती पुढेही अशीच रहावी. प्रदर्शन भरवण्यासाठी कायमस्वरुपी जागा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अद्यावत प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावाचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रदर्शन सेंटर जालन्यात उभारले जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.
रोटरी क्लब ऑफ जालन्याच्या वतीने आयोजित जालना एक्स्पो २०१७ च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, महिको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र बारवाले, रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर व्यंकटेश चन्ना, अकलांक मिश्रीकोटकर, डॉ. दीपक बगडीया, उद्योजक सुनिलाभाई रायठठ्ठा यांची उपस्थिती होती. शीला रायठठ्ठा यांनी पसायदान सादर करून उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलताना खोतकर म्हणाले, ‘जालना एक्स्पोच्या माध्यमातून तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या क्षेत्रात नेमके काय सुरू आहे याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत होते. महिकोचे संस्थापक स्व. डॉ. बद्रीनारायण बारवाले तसेच सुनीलभाई रायठठ्ठा, विक्रम चहा, सीता मोहिते आदिंनी जालन्याचे नाव देश आणि परदेशात मोठे केले. दरम्यान, त्यांनी जळगाव येथील लक्ष्मीबाई यांनी लंडन येथे जाऊन जी खानावळ उघडली आहे. त्यातून त्यांनी भारताचे नाव मोठे केले आहे. लक्ष्मीबाई यांनी किती संघर्षातून लंडन येथे उद्योग स्थापन केला. बचत गटाच्या माध्यमातून सिताबाई मोहिते यांनी मोठे कार्य केले आहे.’
रोटरी क्लबने पोलिओ उच्चाटनानंतर आता साक्षरता अभियान तसेच मिशन इंद्रधनुष्य हाती घेतले आहे. त्यासाठी कुठलीही मदत लागल्यास आपल्याला हाक द्यावी, आपण तत्परतेने हावी ती मदत करु, असे आश्वासन व्यंकटेश चन्ना यांनी दिले.
जालन्यातील शंकर महाराजांचा चिवडा तसेच बप्पा, मामा यांचे पेढे अत्यंत दर्जेदार असतात. परंतु त्यांना ब्रँड नसल्याने ते मागे आहेत. त्यामुळे ग्लोबल मार्केटिंग प्रमाणे स्थानिक उत्पादनांनाही ब्रँड मिळवून द्यावा, असे आवाहन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले.
एक्स्पोमध्ये रोटरी क्लबच्या इन्नरव्हिल या महिलांच्या क्लबने बचत गटांसाठी जी जागा आणि त्यांना येथे आणण्यासाठी केलेले प्रयत्न हे प्रेरणादायी असल्याचे नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल म्हणाल्या. भविष्यात यंत्र मानव अर्थात रोबोटीक तंत्रज्ञान ही काळाची गरज असून सध्या एकट्या औरंगाबादेतील उद्योग जगतात पाचशे यंत्र मानव कार्यरत असून भविष्यात ती संख्या एक हजारापर्यंत जाईल, असे प्रसाद कोकीळ यांनी सांगितले.
पुढील दोन दिवसात जास्तीत-जास्त जालनेकरांनी भेट द्यावी, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष अकलांक मिश्रीकोटकर यांनी केले आहे. जालन्यात आयोजित या एक्स्पोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानांची जत्राच भरलेली आहे. त्याचे अकलन करुन काही नवीन युवक-युवती उद्योग, व्यापारात पुढे आल्यास या प्रदर्शनाचा हेतू साध्य होईल, असे सुनिलभाई रायठठ्ठा म्हणाले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांनी तर आभार रोटरीचे सचिव डॉ. दीपक बगडीया यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कोट्यवधीचा गंडा घालणारी टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
मल्टिस्टेट बँकांशी संगनमत करून बनावट चेकच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा उस्मानाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला. बंगरूळ येथील हर्बल लाईफ इंटरनॅशनल इंडिया या कंपनीचा २० कोटी रुपयांचा बनावट चेक आयसीआयसीआय बँकेत जमा करून ५ कोटी रुपये हडप करणाऱ्या टोळीतील ६ आरोपीना पोलिसांनी अटक केली. अत्यंत नियोजनपूर्वक राबविलेल्या या कटातील समाविष्ट असणाऱ्या आणखी आरोपींचा पोलिस तपास करीत असून, चेक देणारा मुख्य आरोपी संतोष राठोड फरार आहे.
उस्मानाबाद शहरातील फुलाई मल्टीस्टेट या बँकेच्या नावाने २० कोटी रुपयांचा बनावट चेक जमा करून ५ कोटी रुपये हडप केल्याप्रकरणी पोलिसांनी फुलाई मल्टीस्टेटचा चेअरमन मारुती खामकर, प्रदीप खामकर, सय्यद फरहान रशीद, नरेश राठोड, धीरज कोळी व वैभव उर्फ महावीर कोटेचा यांना अटक केली असून २० डिसेंबर पर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रदीप मारुती खामकर व संतोष राठोड यांसह इतर आरोपींनी संगनमत करून बंगरूळ येथील हर्बल लाईफ इंटरनॅशनल इंडिया या कंपनीचा २० कोटी रुपयांचा चेक बनावट कागदपत्र तयार करून तो आयसीआयसीआय बँकेत जमा केला. ५ कोटी रकमेपैकी ४ कोटी रोख उचलले. आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य शाखेला या व्यवहारबाबत संशय आल्याने या टोळीचा बनाव उघड झाला. विशेष म्हणजे या टोळीतील आरोपी हे बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहेत. हर्बल कंपनीचा चेक व त्यावरील सही आरोपींना कळाली कशी यावरून आयसीआयसीआय बँकेतील व हर्बल कंपनीचा कोणीतरी सहभागी असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२० कोटी रुपयांचा चेक आयसीआयसीआय बँकेत जमा केल्यानंतर तो मंजूर करून ती रक्कम फुलाई मल्टिस्टेटच्या खात्यात जमा करण्यामागे आयसीआयसीआय बँकेतील काही अधिकाऱ्यांचा हात असण्याची दाट शक्यता असून, पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. दरम्यान, या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारे गंडा घातला आहे का याचाही शोध सुरू आहे. या टोळीला अटक केल्यानंतर राज्यात एक मोठे रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे स्वतः या प्रकरणात जातीने लक्ष देत असून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक अंजुम शेख या करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन भाचीवर बलात्कार करणाऱ्या मामाला अटक

$
0
0


औरंगाबाद: अल्पवयीन भाचीला सख्ख्या मामाने फूस लावून पळवून नेऊन बलात्कार केल्याची संतापजनक घटना कांचनवाडीत उघडकीस आली. या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मामाला अटक केली. न्यायालयाने त्यास चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कांचनवाडीतील शफिक रहेमान पिंजारी याने १५ वर्षीय सख्ख्या भाचीस फूस लावून पळवून नेले. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या आईने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिस निरीक्षक भरत काकडे यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शफिक मनमाडला असल्याचे कळाले. पोलिस माघावर असल्याचे लक्षात येताच शफिकने भाचीला औरंगाबादच्या रेल्वेत बसून दिले. मुलगी घरी आल्यानंतर तिच्यावर मनमाड येथे अत्याचार केल्याचे सांगितले. शफिक शुक्रवारी कांचनवाडीत आल्याचे कळताच पोलिसांनी त्यास अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची माणुसकी; डॉक्टरांनी केले दुर्लक्ष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विष घेतलेल्या तरुणाला चार्ली पथकाच्या जवानांनी तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये पोचवले, मात्र डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार करण्याऐवजी पोलिसांनाच दुरुत्तरे दिली. या प्रकाराने रुग्णाचे नातेवाईक देखील अचंबित झाले. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला.

चिंचोली तांडा (ता. औरंगाबाद) येथील रो‌हिदास हरी राठोड या तरुणाने शनिवारी सकाळी घरगुती कारणावरून विषारी औषध घेतले. त्याला अत्यवस्थ अवस्थेत त्याचे भाऊ जगन राठोड व एकनाथ राठोड हे दुचाकीवर घाटी हॉस्पिटलात आणत होते. यावेळी आकाशवाणी चौकात त्यांना चार्ली पोलिस दिसले. त्यांनी तातडीने रोहिदासला घेत घाटी हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या रुग्णाकडे दुर्लक्ष केले. पोलिस त्यांना वारंवार लवकर उपचाराची मागणी करीत होते, मात्र डॉक्टर मंडळीनी त्यांना दुरुत्तरे देत तुम्ही तुमचे काम करा असा सल्ला दिला. याप्रकाराने रुग्णाचे नातेवाईक तसेच इतर नागरीक देखील आश्चर्यचकीत झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कानपिचक्यानंतर पोलिस कारवाई

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाहतूक पोलिसांसमोरून लोक दुचाकीवर ट्रिपल सीट जातात, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशा कानपिचक्या पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी दिल्या होत्या. त्याची दखल घेत शनिवारी वाहतूक पोलिसांनी शहरभर कारवाई सत्र राबविले. विनाहेल्मेट दुचाकीस्वार, ट्रिपलसीट जाणारे दुचाकीस्वार पोलिसांच्या रडारवर होते. शहरातील जवळपास सर्वच सिग्नलवर जोरदार कारवाई करण्यात आली.

क्रांतीचौक येथे शुक्रवारी ट्रॅफिक बूथचे उद्घाटन झाले. यावेळी खुद्द पोलिस आयुक्तांनी शहरात वाहतुकीची शिस्त नसल्याचे सांगितले होते. दुचाकीवर तीनजण सर्रास जातात त्यांच्यावर कारवाई होत नाही, असे त्यांनी म्हटले होते. दुसऱ्याच दिवशी वाहतूक पोलिसांनी सकाळी साडेआठपासून चौकाचौकात उभे राहून बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई केली. जालना रोडवरील सर्व सिग्नल, गजानन महाराज मंदिर, सिडको एन - दोन चौक, आंबेडकरनगर चौकात सकाळीच वाहतूक पोलिसांच्या टीम उभ्या राहिल्या. हेल्मेट नसलेले दुचाकीस्वार आणि ट्रिपलसीट दुचाकीस्वार विशेष ‘लक्ष्य’ होते. एरव्ही पोलिसांच्या जवळून बिनधास्त जाणाऱ्या दुचाकीस्वारांना आजच्या कारवाईमुळे चांगलाच वचक बसला. हेल्मेटसक्ती असूनही शहरातील बहुतांश दुचाकीस्वार वाहतूक पोलिसांसमोरून बिनधास्त विनाहेल्मेट गाडी चालवतात. आज पोलिसांच्या कारवाई सत्रात चौकाचौकात अनेक दुचाकीस्वार अडकले. नियमाचे उल्लंघन केलेल्यांना थेट दंडाची पावती सोपविली गेली. हे कारवाई सत्र रविवारपासून अधिक कडक पद्धतीने राबविणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कित्येक महिन्यांनंतर पुन्हा एकदा शहरातील वाहतुकीची घडी पुन्हा एकदा बसणार आहे.

सिग्नल तोडणारे आता टार्गेट
शहरातील अनेक सिग्नलवर लाल दिवा असूनही गाड्या दामटल्या जातात. पोलिसांना झोकांडी देऊन जाणाऱ्या या दुचाकीस्वारांवर आता पुढच्या टप्प्यात कडक कारवाई केली जाणार आहे. कित्येक वेळा या ‘सिग्नलतोड्यां’मुळे छोटे मोठे अपघात होतात. वाहतूक पोलिसांसमोरून बिनधास्तपणे जाणाऱ्या या दुचाकीस्वारांवर नजर ठेवण्यासाठी सर्व सिग्नलवर लवकरच विशेष व्यवस्था ठेवली जाण्याची शक्यताही या सूत्रांनी वर्तविली.

नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर आम्ही नियमानुसार कारवाई करतो. सिग्नल, चौकाचौकात वाहतूक पोलिस त्यासाठी कार्यरत असतात. भविष्यातही कारवाई सुरूच राहील. - सी. डी. शेवगण, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडे अध्यासनाला छदामही नाही

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू केलेल्या ग्रामविकास व संशोधन केंद्राला सत्ताधारी भाजप सरकारने एक छदामही दिला नाही,’ असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी केला.

विद्यापीठाच्या अधिसभा व विद्या परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांचा सत्कार सोहळा शनिवारी देवगिरी कॉलेजच्या रवींद्र टागोर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.

माजी उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे, निमंत्रक डॉ. शिवाजी मदन, मनिषा टोपे, राहुल म्हस्के, कपिल आकात आदी उपस्थित होते. प्रारंभी विद्यापीठ निवडणुकीत विजयी झालेल्या प्राध्यापकांचा सत्कार माजी मंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, ‘भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ग्रामविकास व संशोधन केंद्र स्थापन करावे, याबाबत पहिला ठराव शिवाजी मदन यांनी मांडला, पण आता त्याचे श्रेय इतर घेऊ पाहत आहेत. एकीकडे मोठ्या घोषणा सत्ताधारी भाजप करत असताना दुसरीकडे मात्र या केंद्राला एक रुपयाही दिला जात नसल्याचे वास्तव आहे. विद्यापीठाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे प्रश्न याविषयी शिक्षकांनी अधिक अपडेट राहावे. सेमिस्टर पद्धतीचे दुष्यपरिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे यात बदल झाला पाहिजे. विद्यापीठात अद्यापही अडीच लाख पदव्या पडून आहेत. त्या घरपोच द्या. सातव्या वेतन आयोगासाठी जानेवारीपासून संघर्ष सुरू करू,’ असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

स्पर्धेत विद्यार्थी टिकला पाहिजेः टोपे
टोपे म्हणाले, ‘विद्यापीठाचा दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता अधिक कशी वाढेल याकडे नवनिर्वाचित सदस्यांनी लक्ष द्यावे. विद्यापीठाचे भविष्य तुमच्या हातात आहे. अनेक कॉलेजमध्ये सर्रास कॉपी होतात. अनेक ठिकाणी नियमित वर्ग भरत नाहीत, तर कुठे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असते. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. उच्च शिक्षणातील गुंतवणूक पुढे रिर्टन देणारी असूनही पाहिजे तेवढा निधी शासनाकडून मिळत नाही. जगातील नामांकित विद्यापीठात संशोधनावर भर दिला जातो. ज्ञान निर्मितीचे ठिकाण असलेल्या आपल्या विद्यापीठातही यावर अधिक भर देण्याची गरज आहे. स्पर्धा तीव्र वाढली आहे. यात आपला विद्यार्थी कसा टिकेल, याकडे अधिक लक्ष द्यावे,’ असे आवाहनही टोपे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलांचे संगोपन एकत्र कुटुंबात चांगले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुले सुखाने नांदायची. आता अशी पद्धती नामशेष होत आहे. जे सामाजिक परिस्थितीला अनुकूल नाही,’ असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. छाया महाजन यांनी शनिवारी केले. त्या ‘द मदर डान्स’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या.

‘द मदर डान्स’चे मूळ लेखक हॅरिएट लर्नर असून डॉ. जयश्री गोडसे यांनी या पुस्तकाचा ओघवत्या शैलीत अनुवाद केला आहे. जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर डॉ. जयश्री गोडसे, सौख्यदा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे डॉ. महाजन म्हणाल्या, ‘एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करणे म्हणजे शब्दशः जशाच तसे लिहणे असे नाही. त्याचा आशय आपल्याला मांडता आला पाहिजे. या पुस्तकात तोच प्रयत्न करण्यात आला आहे. भाषांतरातून ज्ञानाची, संस्कृती, वैचारिक देवाण-घेवाण होते. तेथील सामाजिक परिस्थिती काय हे कळते. या पुस्तकात डॉ. गोडसे यांनी उत्तम शैलीत आशय मांडला आहे. तेथील स्त्रियांचे प्रश्न, अनुभव हे अतिशय उत्तम शब्दांत मांडण्यात आले आहेत. जे भारतीय स्त्रियांना अधिक चांगल्या रितीने समजण्यास मदत होईल. भारतीय स्त्रीचा विचार केला तर प्रत्येक स्त्रीचे अनुभव, सामाजिक स्थिती, आव्हाने हे वेगवेगळी असतात. सौख्यदा देशपांडे यांनी पुस्तकाचे अभिवाचन केले. डॉ. जयश्री गोडसे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सानिका गोडसे, तर आभार सचिन गोडसे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आकाशाशी जडले नाते!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्वयें श्री राम प्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती,’ गीतरामायणातील श्रीधर फडके यांच्या या पहिल्याच गाण्याने शुक्रवारी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आणि कार्यक्रमाची सुरुवात टाळयांच्या कडकडाटात झाली. महाराष्ट्र टाइम्सच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘एमजीएम’च्या रुक्मिणी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीधरजींनी गुरुवंदनेनंतर छोटेखानी प्रस्तावना केली. ते म्हणाले, ‘एक एप्र‌िल १९५५ पासून गीतरामायणाचे गारूड कायम आहे. आकाशवाणीवर पहिल्यांदा याचे सादरीकरण झाले. यानंतर विविध भाषांमध्ये भाषांतर झाले व त्या सर्व कार्यक्रमांना आजही पूर्वीइतकीच प्रसिद्धी मिळत आहे. संपूर्ण गीतरामायण बाबूंजींनी विविध शास्त्रीय रागांवर आधारित रचले आणि गदिमांच्या काव्यांतील शब्दांमुळे जादू केली. मी फक्त हे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे.’ रसिकांशी संवाद साधत, त्यांना एकरूप करत श्रीधरजींनी ‘बाबूजी आणि गदिमां’च्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर तुम्हीही गाणार का? असे विचारत ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला...’ हे गीत सादर करत रसिकांना गाण्यात सामावून घेतले. यानंतर राग वसंतबहार, एकताल, गोरख कल्याण, यांचा संगम गाण्यातून कसा केला याचे विवेचन केले. रामायणातील कथांचा गोषवारा सादर झाल्यानंतर राम-सीतेच्या विवाह सोहळ्यातील प्रसिद्ध गाणे ‘आकाशाशी जडले नाते..., स्वयंवर झाले सीतेचे...’ या गाण्याला रसिकांचा ‘वन्समोअर’ मिळाला. यानंतर ‘जय गंगे जय भागीरथी... जय गंगे..जय जय राम’ हे गाणे सादर करताना कोरस आणि रसिकांचा ठेका उत्कृष्ठ ठरला. रामायणातील सर्व प्रसंग निवेदिका सुकन्या जोशींनी ओघवत्या, मृदू आणि भावुक स्वरात रसिकांसमोर उलगडले. वनवासात गेलेले राम पाहून भरताचा आई कैकयीवर संतापण्याचा प्रसंग गदिमा आणि बाबूजींनी गाण्यातून कसा व्यक्त केला हे सांगितले. मग श्रीधरजींना ‘माता न तू वैरिणी... माता न तू वैरिणी...’ हे संताप व्यक्त करणारे गाणे अक्षरश: दमवून गेले. श्रीधरजींनी त्यानंतर मध्यांतर घेतला.

‘बाबूजी देखील हे गाणे मोठ्या तावाने आणि संताप व्यक्त करत गायचे आणि गाणे झाल्यावर डोकं चक्क हार्मोनियमवर ठेऊन द्यायचे आणि नंतर दहा मिनिटे कमालीची शांतता असायची,’ असा प्रसंग श्रीधरजींनी सांगितला. हे ऐकून रसिकांनी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट केला.

मध्यांतरानंतर ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे जीवनाचे सार सांगणारे गीत सादर केले. मग ‘सेतू बांधा रे...सेतू बांधा रे....’, ‘प्रभो मज एक वर द्यावा, या चरणाशी ठायी माझा निश्चय भाव राहावा’ ही हनुमंताची सुप्त इच्छा दर्शवणारे गीत गायले. मग भैरवी रागाचा साज चढलेले दोन गाणे सादर करत मैफलीची सांगता झाली. यानंतर निवेदक सुकन्या जोशींसह इतर कलाकारांचा परिचय करून देत सर्वांचे आभार मानले. मैफलीची सांगता होताच रसिकांनी पुन्हा या असे आवाहन केले व त्याला साथ देत पुढील वर्षी दोन दिवस गीतरामायणाचा कार्यक्रम करू, असे उत्स्फूर्त आश्वासन देत श्रीधरजी रसिकांसमोर नतमस्तक झाले.

गीतरामायण कार्यक्रम यशस्वी झाला तो हार्मोनियम, वाद्यवृंद आणि सहकलाकारांमुळेच. असे कृतज्ञतापूर्वक सांगताना श्रीधरजी म्हणाले, ‘संगीतकार-गायक अतुल दिवे आणि देशपांडे यांच्या सहकार्यामुळे मला हार्मोनियम मिळाले. येथील स्थानिक कलाकार अपूर्वा झोडगीकर आणि क्षीतिजा सहस्त्रबुद्धे यांनी कोरस दिला आहे. तालवादयावर राजेश भावसार आहेत. हे तिघेही औरंगाबादचे स्थानिक कलाकार आहेत. तबल्यावर तुषार आगरे आणि की बोर्डवर अतुल माळी असून, सुश्राव्य निवेदन सुकन्या जोशी यांचे आहे, हे तिघेही मुंबईचे आहेत.’ या सर्वांचा ‘मटा’तर्फे संपादकीय सहकाऱ्यांनी सत्कार केला. श्रीधरजी फडके यांचा सत्कार औरंगाबाद आवृत्तीचे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रमानव, थ्री डी प्रिटींग पाहण्यासाठी गर्दी

$
0
0


सुरेश कुलकर्णी, जालना
अकुशल कामाच्या मजुरांना पर्याय निर्माण झालेल्या दोन यंत्रमानवाचा वावर आणि भविष्यातील तंत्रज्ञानाची चुणूक दाखवणारे थ्री डी प्रिटींग जालन्यातील रोटरी एक्सपोचे मुख्य आर्कषण आहे. एक्स्पोमध्ये रोबोटीक तंत्रज्ञान आणि थ्रीडी प्रिटिंग या दोन नाविण्यपूर्ण व भविष्यातील तंत्रज्ञानाची वाट दाखवत आहेत. या दोन्ही स्टॉलवर जालनेकरांनी खूप मोठी गर्दी केली आहे.

अवजड उद्योगाच्या कारखान्यात मानवी हाताने होणाऱ्या कामाचा वेग आणि गतीला एक निश्चित अशी मर्यादा आहे. यंत्रमानव याबाबतीत मानवाच्या हजारो पटीने अधिक कार्यक्षम काम आणि कमालीच्या वेगाने अगदी अचूकपणे कामे करतोय. जालन्यातील रोटरी एक्स्पोमध्ये मराठवाडा अॅटोमोबाईल क्लस्टर मधील ‘रोबो’ आणि ‘टेल रोबो’ या टाटा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘रोबो’ला सहा हात आहेत. त्यांना जे काही काम सांगितले तो ते आपल्याला अपेक्षित वेगाने एकदम अचूकपणे करत आहेत. अर्थात रोबोटीक तंत्रज्ञान हे सर्व संगणकावर आज्ञावली सॉफ्टवेअर भाषेत सांगायचे असल्याने या ‘रोबो’ला काम सांगणारे अतिशय कुशल तंत्रज्ञ इंजिनिअर आहेत, हेच त्याच्यावर स्वार होऊन हव्या त्या वेगाने अचूकपणे पाहिजे ती कामे करून घेऊ शकतात. साधारणपणे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसरया ठिकाणी उचलून ठेवणे अर्थात आपल्या ग्रामीण भाषेत हमाली, रोजंदारीवर असलेल्या मजूराचे काम हा ‘रोबो’ विनातक्रार करतो याचा अर्थ मजुरांच्या कामाला आता कारखान्यात जागा नाहीत पण ‘रोबो’कडून ही कामे करून घेण्यासाठी कुशल इंजिनिअर यांना खूप मोठा वाव आहे.
आयटीआयमधील वेल्डर हा ट्रेड येत्या काही दिवसांत बंद होईल असे दिसते कारण हेक्टर ‘रोबो’ अतिशय शिस्तबद्ध रचनेत अत्यंत अचूक आणि प्रचंड वेगाने वेल्डिंग करतात येत्या काही दिवसांत अशी यंत्रणा कारखान्याच्या वतीने नक्की स्वीकारली जाणार आहे. काळाची पावले ओळखून या वेल्डर यंत्रमानव तंत्रज्ञान आयटीआयच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरज आहे. जालन्यातील रोटरी एक्स्पोमध्ये असे दोन ‘रोबो’चे स्टॉल सर्वाधिक गर्दी खेचत आहेत.
प्रसाद बोर्डे (औरंगाबाद), आदित्य वाडेकर (पुणे) आणि स्वानंद आनंदगावकर (मुंबई) हे तीन युवक कल्पक इंजिनिअरस् एकत्र आले. त्यांनी या थ्रीडी प्रिटिंग मशिनरीचे उत्पादन सुरू केले आहे. विविध प्रकारच्या वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत त्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी संबंधित वस्तूचा मोल्ड (साचा) तयार करणे अतिशय अवघड आणि खूप खर्चिक असते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या मोल्डमध्ये काही उणिवा राहिल्या तर त्यांची पुनरावृत्ती त्या वस्तूच्या उत्पादनात होतेच आणि समजा ती जी काही शिल्लक राहिलेली उणिव असेल ती दुरुस्त करण्यासाठी मोल्डला दुरूस्त करून घेण्याची मोठी लांबलचक आणि चौपट खर्चिक बाब असते. या सगळ्या आजपर्यंत चालत आलेल्या परंपरागत प्रक्रियेला थ्रीडी प्रिटींग मशिनरीने फाटा मारला आहे. जालन्यातील रोटरी एक्स्पोमध्ये थ्रीडी प्रिटींग मशिनरीच्या स्टॉलवर जरा काही वेळ उभे राहिले की आपण तंत्रज्ञानाच्या किती प्रगत काठावर उभे आहोत हे चटकन लक्षात येते.


वस्तूचे प्रतिरूप तयार करण्याची कला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करण्यापासून ते कमाल दोन फुट बाय दोन फुट आकार असलेल्या कोणत्याही वस्तूचे प्रतिरूप उत्पादन करण्याची अजब कला या थ्रीडी प्रिटींग मशिनरीमध्ये आहे. अर्थात संगणकाच्या कॅड सॉफ्टवेअर भाषेत त्या थ्रीडी प्रिंटरला आज्ञावली द्यावी लागते आणि येथे कुशल तंत्रज्ञ इंजिनिअरच्या प्रतिभेला खूप छान प्रतिसाद मिळत आहे.

फोटो ओळी..
एक्स्पोमध्ये रोबोटीक तंत्रज्ञानाच्या स्टॉलवर माहिती घेण्यासाठी जालनेकरांनी मोठी गर्दी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदूबाबाचा जामीन फेटाळला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुप्पट पैसे करून देण्याचे अमिष दाखवून गंडविणाऱ्या भोंदूबाबा समीर खान मज्जीदखान पठाण याचा नियमित जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला.

पुणे येथील मनिषा आदेश जुजगर यांच्याकडे घरकाम करणाऱ्या संगीता लोंखडे या महिलेने बाबा जादूने पैसे दुप्पट करून देतो असे अमिष दाखवले. घरकाम करणाऱ्या महिलेवर विश्वास ठेवून १२ एप्रिल २०१७ जुजगर यांची देशमुख नावाच्या व्यक्तींने जेवढ पैसे देणार त्याचे दुप्पट मिळेल असे अमिष दाखवले. दरम्यान १६ एप्रिल रोजी जुजगर यांना देशमुखने बुलढाणा येथील एका शेतात नेले असता मांत्रिक बाबाने एक साप दाखवत नोटांचा ढिग पाडला. त्यावेळी पैसे डबल मिळतील यासाठी आशेने जुजगर यांनी सात लाख रुपये बाबाकडे दिले. मांत्रीकबाबाने नमाज पडून येतो असे सांगत तो पसार झाला. भोंदूबाबा बराच वेळ झाला तरी परत आला नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जुजगर यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात धाव घेऊन भोंदूबाबा आणि घरकाम करणाऱ्या महिलेच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

अनेकांना गंडवले
भोंदूबाबा समीर खान पठाणने नियमित जामिनासाठी अर्ज केला. या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एच एस. महाजन यांच्या समोर सुनावणी झाली असता सहाय्यक लोकअभियोक्ता मधुकर आहेर यांनी आरोपीकडून रोख रक्कम जप्त करावयाची आहे, त्याने अनेकांना गंडविले असल्याचे तपासामध्ये समोर आले आहे, त्याला जामीन दिल्यावर त्याचे असा प्रकरचे गुन्हे करण्याचे मनोबल वाढेल, जामीन मिळाला तर गुन्ह्यातील साक्षीदारावर दबाव आणू शकतो. त्यामुळे जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती केली. न्यायालयाने ही विनंती ग्राह्य धरून भोंदूबाबाचा जामीन नामंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ समांतरच्या लवादालासहा महिने मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका आणि समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीतील वादाबाबत नियुक्त लवादाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लवादाने एक वर्ष काम केले, पण त्यातून काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे मुदतवाढ करावी लागल्याची माहिती मिळाली आहे.
समांतर जलवाहिनीसाठीचा पीपीपीतत्त्वावरचा करार महापालिकेने रद्द केला. त्यामुळे महापालिका व सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (स्पेशल पर्पज व्हेकल-औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनी) यांच्यात वाद निर्माण झाला. त्यावर तोडगा काढण्यासाठी लवादाची नियुक्ती केली पाहिजे असा उल्लेख करारात आहे. त्यानुसार लवाद स्थापन झाला. तो तीन सदस्यांचा असून त्यात पालिकेचे प्रतिनिधी म्हणून एस. आर. तांबे, कंपनीचे प्रतिनिधी म्हणून पी. एस. अंबिके यांची नियुक्ती करण्यात आली. दोघांनी मिळून जे. टी. नाशिककर यांची तिसरा सदस्य म्हणून नियुक्ती केली. नाशिककर यांचीच लवादाचे अध्यक्ष म्हणूनदेखील नियुक्ती करण्यात आली. वादातील मुद्यांच्या संदर्भात लवादाच्या समोर सुनावणी होऊन त्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले होते.
लवादाच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाले. वर्षासाठीच लवादाची स्थापना करण्यात आली होती. एक वर्षाच्या काळात कोणताच तोडगा निघाला नाही. वर्षभरात लवादाच्या सहा बैठका झाल्या, त्यात कंपनीने महापालिकेविरोधात सुमारे ८०० कोटींचा दावा लवादासमोर सादर केला. त्यानंतर महापालिकेने कंपनीच्या विरोधात १६०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला. परस्पर विरोधात दाखल दाव्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे लवादाची मुदत वाढवावी असा विचार दोन्हीही घटकांकडून आला आणि त्याला मान्यता देण्यात आली. लवादाला सहा महिन्याची मुदतवाढ दिल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सांगितले. सहा महिन्यात लवादाच्या समोर प्रकरण निकाली निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग करणाऱ्यास तीन वर्ष सक्तमजुरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या अल्पवयीन १४ वर्षीय मुलीस रस्त्यात अडवून हात धरून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या २१ वर्षीय तरुणास दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी हर्सूल परिसरामध्ये खासगी शिकवणीसाठी जाताना हर्सूल येथे राहणारा नीलेश सुनील चव्हाटे हा दुचाकी घेऊन आला. त्याने दुचाकी त्या मुलीसमोर उभी करून प्रपोज करण्यासाठी हात धरून ओढले आणि दुचाकीवर जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला. त्या अल्पवयीन मुलीने प्रतिकार करून रोडरोमिओ नीलेशच्या तावडीतून आपली सुटका करून घेण्यासाठी आरडाओरड केली असता नागरीक येण्याच्या भीतीने नीलेशने दुचाकीवरून पळ काढल्याचे हर्सूल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी नीलेशविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

एक हजाराचा दंड
खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्यासमोर झाली असता सहाय्यक लोकअभियोक्ता उदय पांडे यांनी चार साक्षीदार तपासले. न्यायालयाने नीलेश यास दोषी ठरवून तीन वर्ष सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, भादंवि ५०६ कलमान्वये एक वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलांखाली स्वच्छतागृह

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील आठ उड्डाणपुलाखाली रेडिमेड स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही स्वच्छतागृहे प्रामुख्याने महिलांसाठी असतील. या कामासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने पुढाकार घेतला आहे.

शहरात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न गंभीर आहे. ज्या ठिकाणी ही स्वच्छतागृहे बांधण्याचे महापालिकेच्या प्रशासनाने ठरविले आहे, त्या ठिकाणी रहिवाशांकडून, व्यावसायिकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे अ्दयाप स्वच्छतागृहांचे बांधकाम होऊ शकलेले नाही. त्यामुळे उड्डाणपुलांच्या खाली स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने सीएसआर फंडातून सहकार्य करण्याची भूमिका देखील घेतली होती, परंतु उड्डाणपुलाच्या खाली स्वच्छतागृह बांधताना पाणीपुरवठ्याची लाइन व ड्रेनेज लाइन टाकण्यात अडचणी निर्माण होणार असल्याचे लक्षात आले आहे. मुख्य रस्ते खोदून या दोन्हीही लाइन टाकाव्या लागणार आहेत. त्यामुळे रेडिमेड स्वच्छतागृहांची कल्पना पुढे आली.

साडेनऊ लाख किंमत
दहा सीटचे रेडिमेड स्वच्छतागृह उपलब्ध होऊ शकते. या स्वच्छतागृहासाठी एक हजार लिटरची पाण्याची टाकी जोडलेली असते. शिवाय सेफ्टीक टँक सारखी रचना देखील करण्यात आलेली असते. त्यामुळे ड्रेनेज लाइन आणि पाणीपुरवठ्याची लाइन टाकण्याचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. एका स्वच्छतागृहाची किंमत सुमारे नऊ लाख साठ हजार रुपये आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने स्वच्छतागृह बांधून देण्यापेक्षा रेडिमेड स्वच्छतागृह महापालिकेला द्यावे यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी त्यास तत्वतः मान्यता दिली आहे. लवकरच या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाईल. - नंदकुमार घोडेले, महापौर

येथे होणार सोय
- रेल्वेस्टेशन
- महावीर चौक
- टाउन हॉल
- संग्रामनगर
- क्रांतीचौक
- मोंढानाका
- सेव्हनहिल्स्
- सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफारी पार्क होणार दोनशे एकरात

$
0
0

. प्रतिनिधी, औरंगाबाद
मिटमिटा शिवारात दोनशे एकरात सफारी पार्क होणार असून वाढीव जागेची मोजणी सोमवारी केली जाणार आहे. मोजणीनंतर वाढीव जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला जाईल. पार्कसाठी आधी शंभर एकर जागा मिळाली आहे. मोजणीनंतर आणखी शंभर एकर जागा मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे प्राणिसंग्रहालय सध्या सिद्धार्थ उद्यानात आहे. आवश्यक जागेपेक्षा कमी जागेत हे प्राणिसंग्रहालय आहे. त्यामुळे एक तर ते बंद करावे किंवा त्याचे क्षेत्रफळ वाढवण्याची सूचना केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने केली होती. ‘सिद्धार्थ’चे क्षेत्र वाढवणे शक्य नसल्यामुळे सफारी पार्क करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी मिटमिटा शिवारात जागा पाहण्यात आली. या शिवारात सुमारे पाचशे एकर गायरान जमीन आहे. त्यामुळे त्यातून सफारी पार्कसाठी जागा मिळावी म्हणून पालिकेतर्फे प्रयत्न करण्यात आले. सुरूवातीला शंभर एकर जागेची मागणी करण्यात आली. ही जागा विनामोबदला मिळावी म्हणून पालिकेने शासन दरबारी प्रयत्न केले. औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यात पुढाकार घेतला आणि शंभर एकर जागा विनामोबदला मिळवून दिली.
शंभर एकर जागा सफारी पार्कसाठी कमी पडेल असा विचार त्यानंतर पुढे आला आणि आणखी शंभर एकर जागा त्याच ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीलादेखील पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नव्याने शंभर एकर जागा मिळाली तर दोनशे एकरात प्रशस्त सफारी पार्क होईल, त्याला जोडूनच मनोरंजन उद्यानदेखील विकसित करता येईल अशी कल्पना महापालिकेने मांडली आहे. त्यानुसार वाढीव शंभर एकर जागा सफारी पार्कसाठी देण्याच्या दृष्टीने सोमवारी जागेची मोजणी होणार आहे. ज्या शंभर एकर जागेची यापूर्वी घोषणा करण्यात आली होती, त्याची मोजणी करून अधिकृतपणे ताबा जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप महापालिकेला दिला नाही. मोजणीच्या वेळी त्या शंभर एकराची मोजणीदेखील केली जाणार आहे.
-
चौकट
-
पंधरा एकरांत अतिक्रमण
-
सफारी पार्कसाठी जी शंभर एकर जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेस देऊ केली आहे, त्या जागेवर सुमारे पंधरा एकर क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे. जागेच्या मोजणीनंतर या अतिक्रमणांवर बुलडोजर फिरवला जाणार आहे. मोजणीच्या वेळी भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी, महापालिकेच्या मालमत्ता विभाग, अतिक्रमण हटाव विभाग आणि प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अतिक्रमण निर्मूलनमोहिमेस सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्त्यांवरील हातगाड्या, फेरीवाले आणि टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेतर्फे शनिवारी सायंकाळपासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी संपूर्ण शहरात गाडी फिरवून व्यावसायिकांना इशारा देण्यात आला. रविवारपासून जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा जप्तीची कारवाई करण्याचा इशारा अतिक्रमण हटाव विभागाने अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना दिला आहे. कारवाईची माहिती लोकांना माहिती व्हावी, यासाठी वाहनावर ध्वनिक्षेपक लावून अधिकाऱ्यांनी माहिती दिली. शहागंज चमनपासून सुरु झालेली ही कारवाई सराफा, सिटी चौक, मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरा, निरालाबाजार, पैठणगेट, क्रांतीचौक या प्रमुख भागात राबवण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने व्यापाऱ्यांचे ३० लाख रुपये थकवले

$
0
0

नांदेड - पारदर्शक कारभाराचा दावा करीत असलेल्या भाजपने नांदेडमधील व्यापाऱ्यांचे २५ ते ३० लाख रुपये थकवल्याने वेगवेगळ्या व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणुकीत दिलेले काही व्यापाऱ्यांचे धनादेश बँक खात्यात शिल्लक नसल्याने वटत नसल्याचे सांगण्यात आले.
ऑक्टोबर महिन्यात नांदेड-वाघाळा मनपाची निवडणूक पार पडली. भाजपनेही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची कोली होती. बहुमत मिळवण्यासाठी हायटेक प्रचारयंत्रणा राबवली. प्रचारासाठी खास मुंबईची टीम बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्र्याचे काही विश्वासू मंडळी नांदेडात तळ ठोकून होती. निवडणुकीपूर्वी मुंबईच्या टीमने सर्वच प्रभागात फिरून तेथील नागरिकांशी संवाद साधत समस्या जाऊन घेतल्या. त्यानंतर शहरातील एका भव्य-दिव्य मंगल कार्यालयात मुख्य प्रचार कार्यालय थाटण्यात आले. पक्षाच्या वतीने शहराच्या सर्वच भागात भव्य होर्डिंग्ज लावण्यात आले होते. पोस्टर, बॅनर, पोलचिट, नाश्ता, जेवण यासाठी वेगवेगळ्या स्थानिक व्यापाऱ्यांना बोलावून ऑर्डर देण्यात आल्या. या ऑर्डर देताना अ‍ॅडव्हान्स म्हणून काही रक्कम रोखीने देण्यात आली तर उर्वरित रकमेचे धनादेश देण्यात आले होते.
रोखीने रक्कम दिल्यानंतर महानगराध्यक्षांच्या स्वाक्षरीने हे धनादेश मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी मोठ्या आनंदाने काम केले. निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष किंवा जिल्ह्याचे प्रभारी कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी हिशोबाबाबत कोणतीही विचारणा केली नाही किंवा उधारी देण्यासंदर्भात कोणतेही नियोजन करण्याचे सौजन्य दाखवले नाही. पक्षाचे महानगराध्यक्ष नांदेडमधील मोठे शिक्षणसम्राट असल्याने व्यापाऱ्यांना पैसे मिळतील अशी आशा आहे; पण कधी मिळतील याबाबत ते साशंक आहेत. पोलचिट, बॅनर, मंगल कार्यालय, जेवण व अन्य छोट्या-मोठ्या खर्चाचे तब्बल २५ ते ३० लाख रुपये थकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उधारीसाठी व्यापाऱ्यांनी तगादा लावल्याने महानगराध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व निवडणुकीतील मुख्य संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे धाव घेतली; पण त्यांनी टोलवाटोलवी केल्याचे सांगण्यात आले. मनपा निवडणुकीला दोन महिने उलटले तरी अद्याप उधारी न मिळाल्याने व्यापारी अस्वस्थ आहेत; तर दुसरीकडे नेत्यांनी हात झटकल्याने महानगराध्यक्ष हतबल झाले आहेत.


‘दिलेला शब्द तरी पाळावा’
प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी नांदेडकरांना वेगवेगळी आश्वासने दिली होती. भाजपच्या पारड्यात केवळ सहा जागा पडल्या होत्या. हायटेक प्रचार करून पक्षाने भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला तो सपशेल अपयशी ठरल्यानंतर आता आम्हाला दिलेला शब्द तरी पाळावा अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दधिची सन्मान पुरस्काराने आसावा कुटुंबीयांचा गौरव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये शनिवारी दिवंगत दिनेश आसावा यांच्या कुटुंबीयांना हॉस्पिटलतर्फे अतिविशिष्ट दधिची सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी (कै.) आसावा यांच्या पत्नी, तीन मुले उपस्थित होते. आसावा कुटुंबीय शहरातील नामांकित कुटुंब आहे. ज्येष्ठ चिरंजीव सोमेश्वर आसावा याप्रसंगी भावना व्यक्त करताना म्हणाले, की वडिलांच्या अवयवदानाचे समाधान वाटते. हे कार्य केल्यामुळे समाजातील गरजू पाच व्यक्तिंना जीवनदान मिळालेले आहे. रुग्णालयाचे विश्वस्त आणि मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी यांनी आसावा कुटुंबीयांना मानपत्र प्रदान केले.

त्रिपाठी म्हणाले, की आमच्या संस्कृतीने आम्हाला त्याग करण्याचे ठरविले आहे. महर्षी दधिची हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. याठिकाणी आम्ही अवयव दानास समर्थन व उत्तेजन देऊ इच्छितो. मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक श्रीवास्तव म्हणाले, अवयवनदान हे सर्वात महान दान आहे. याप्रसंगी झेडटीसीसी औरंगाबाद विभागाचे सदस्य डॉ. रवींद्र भट्टू यांची विशेष उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ उस्मानाबाद जिल्ह्यातील खड्डेमुक्त रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून राज्य खड्डेमुक्त करण्यात येणार असल्याची
घोषणा केली होती. त्या प्रमाणे राज्य सरकारचा हा कार्यक्रम उस्मानाबाद जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डेमुक्तीचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून ९८ टक्के इतके काम पूर्ण झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्य महामार्गाची एकूण लांबी सुमारे ९७८ किलोमीटर इतकी आहे. यापैकी ६९२ किलो मीटर रस्त्यावरील खड्डे भरणे अपेक्षित होते. यापैकी ६६४ किलो मीटर रस्त्यावरील म्हणजेच सुमारे
९८ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. तर, जिल्ह्यातील एकूण प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या १३४३ किलो मीटरपैकी ६४८ किलो मीटर रस्त्यावरील खड्डे
भरणे अपेक्षित होते. हे काही जवळपास ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. उर्वरित काम २२ डिसेंबर अखेर पूर्ण होईल.
उस्मानाबाद विभागाच्या अंतर्गत उस्मानाबाद, लोहारा, उमरगा व तुळजापूर हे चार तालुके येतात. या विभागातील राज्य महामार्गातील खड्डे भरण्याचे काम
सुमारे ९५ टक्के तर प्रमुख जिल्हा मार्गाचे काम सुमारे ९० टक्के इतके झाले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात यांनी दिली. आता जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख रस्ते खड्डेमुक्त झाल्याने वाहनचालकांना तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय या रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याचे काम दोन वर्षापर्यंत संबंधित ठेकेदाराला करावे लागणार आहे. त्यामुळे रस्त्याची निगा चांगली राखली जाण्यास
मदत होणार असल्याचे अनिल कुलकर्णी यांनी यानिमित्ताने बोलताना स्पष्ट केले.

निधीची चणचण असल्याची ओरड कायम
जिल्ह्यातील राज्य महामार्गावरील तसेच जिल्हा प्रमुख मार्गाचे खड्डे भरण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील काम पूर्णत्वाकडे आले असले तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले रस्ते शिवाय शहरातील नगरपालिकेच्या देखरेखीखाली असलेले रस्ते मात्र खड्डेमुक्त करण्यात आलेले नाहीत. निधीची चणचण ही त्यांची ओरड कायमच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images