Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

संशयावरून पत्नीला पेटवले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने दारूच्या नशेत पत्नीला पेटविल्याची घटना शनिवारी सायंकाळी सिडको एन सात भागातील अयोध्यानगर येथे घडली. या घटनेत पती देखील भाजला आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्यानगर भागात अनिल वाघ हा तरुण पत्नी रेणुका (वय २८) व एका मुलासह वास्तव्यास आहे. अनिल एका मेडिकलच्या दुकानात कामाला आहे. शनिवारी दुपारी रेणुका मुलगा अंशला शिकवणीला सोडण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडली. त्याला सोडल्यानंतर ती बचत गटाच्या मीटिंगला निघाली. यावेळी रस्त्यात तिला पती ‌अनिल भेटला. अनिलकडे घराची चावी देत ती मीटिंगला गेली. दुपारी दोन वाजता रेणुका घरी परतली. यावेळी अनिलने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. सायंकाळी पाच वाजता अनिल दारू पिऊन घरी आला. त्याने रेणुकाला पुन्हा मारहाण केली. त्यानंतर ती स्वंयपाक करीत असताना तिच्या अंगावर कॅनमधील रॉकेल टाकून पेटवून दिले. रेणुका आरडाओरडा करीत घराबाहेर पडली. शेजाऱ्यांनी तीच्या मदतीसाठी धाव घेतली. तिच्या अंगावर पाण्याचा मारा करीत आग विझवण्यात आली.

दोघांवर घाटीत उपचार
घटनेमध्ये अनिल देखील गंभीर भाजला आहे. गंभीर अवस्थेत रेणुका व अनिलला घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रविवारी रेणुकाने दिलेल्या तक्रारीवरून पती अनिलविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय सागर कोते याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाबासाहेबांना समजून घ्याः नजूबाई गावित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
‘मी कुणापुढे झुकत नाही आणि धर्मास पूजत नाही, पण बाबासाहेबांच्या मार्गावरच मी चालते. कारण मी बाबासाहेबांना समजून घेतले. खरे बाबासाहेब समजून घेतले, तरच समाजाची प्रगती होईल,’ असे प्रतिपादन आदिवासी कार्यकर्त्या व साहित्यिक नजूबाई गावित (धुळे) यांनी केले. त्या सोमवारी भानुदासराव चव्हाण सभागृहात रमाई फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

आंबेडकरी महिला चळवळीचे मुखपत्र मासिक रमाईचा आठवा वर्धापन दिन व रमाई दिनदर्शिका २०१८चे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ‘मनूस्मृती दहन दिना’निमित्त भारतीय स्त्री मुक्ती दिन हा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी भीमराव बनसोड होते. सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौदरमल ( माजलगाव) व सत्यशोधक चळवळीचे के. ई. हरिदास प्रमुख वक्ते होते. व्यासपीठावर रमाई मासिकाच्या संपादक प्रा. रेखा मेश्राम होत्या. कार्यक्रमाच्या उद्घाटक नजूबाई गावित होत्या. नजूबाई यांचा ग्रामीण शैलीतील संवाद उपस्थितांना अधिक भावला. त्या म्हणाल्या, ‘देशात मनुवादी चळवळ सक्रीय झाली, पण आमचा समाज तरी कुठे एकत्र आहे. वैयक्तिक स्वार्थापुढे समाजहित गौण ठरते. काळमानेवर लढा देण्याची वेळ आली आहे, पण काळाची झडप पडल्यावरच आम्ही जागे होणार का? समाजाला संविधान माहित आहे, पण खैरलांजी घटनेकडे पाहले की लक्षात येते की संविधान अंमलातच येत नाही. दुसऱ्या बाजूने समाजातही मनूवादी विचार पक्के होत आहेत. समाजातील महिला हुंडा घेतात असे समजल्यावर तर वाईट वाटते. मातीतून, वेदनेतून जन्मलेल्या आमच्या साहित्यालाही जाणीवपूर्वक एकत्र येवू दिले जात नाही.’

सत्यभामा सौंदरमल म्हणाल्या, ‘ग्रामसभेत स्त्रीचे काय काम आहे?स्त्री सरपंच होते, पण झेंडावंदन करणे आणि घरीच सह्या करणे यापेक्षा तिच्या हाती काही नाही. बौद्ध धर्मात विवाहावेळी २२ प्रतिज्ञातील १७ वी प्रतिज्ञा 'मी दारू पिणार नाही' अशी आहे, पण पती दारू पितात आणि बायकांना सर्व सहन करावे लागते. दारूवर राजकारणाचे पट रंगतात. सरकारने नुकत्याच १३०० शाळा बंद केल्या. सरकारने पालावर येऊन पहावे. पालावर शिक्षण पोचले नाही, पण दारू पोचली. या देशात माणसापेक्षा धर्म जवळचा आहे. स्त्री पेक्षा गाय जवळची आहे. संविधानाचा आधार घेत स्त्रीने गुलामीचे बंधन झुगारायलाच हवे,’ असे आवाहन त्यांनी केले. भीमराव बनसोड यांनी अध्यक्षीय समारोप केला. दैवशिला गवंदे यांनी सूत्रसंचलन, ललिता खडसे यांनी आभार मानले. यावेळी भागवताबाई मेश्राम, बुद्धप्रिय कबीर, भारत शिरसाट, शोभा खाडे, बेबिनंदा पवार, सुनंदा जाधव, जयश्री सरवदे, स्नेहा बन्सोड, संध्या साळवे, राजकन्या गोंडाणे उपस्थित होत्या.

विद्यापीठात नतभ्रष्टता
के. ई. हरिदास म्हणाले, ‘विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या लढ्यात इतके कष्ट घेतले. आज त्याच विद्यापीठात जाताना त्यांच्या नावाचा गौरव होण्याऐवजी सगळी नतभ्रष्टता झाली. विचारांचे स्वातंत्र्य उरले नाही. त्यांच्या जयंतीला शांततेऐवजी आम्ही नाचतो. आम्ही बौद्ध धर्मियांनी तर शांतता, सदाचारी, निर्व्यसनी असायला हवे, पण तसे होत नाही. समाजाला मरगळ आली आहे व हे विचार जाणीवपूर्वक पेरले जात आहेत. बाबासाहेबांच्या भल्या मोठ्या मूर्ती उभारून त्यांचेच विचार गाडून टाकण्याचा प्रयत्न होतोय.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सवाची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सव’ म्हणजे मराठवाड्यातील रसिकांसाठीची पर्वणी. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात ६ व ७ जानेवारी रोजी महोत्सव होणार असल्याचे स.भु. शिक्षण संस्थेतर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आले. यंदा महोत्सवात ख्यातनाम शास्त्रीय गायक एम. व्यंकटेशकुमार यांच्यासह सारेगमप लिटिल चॅम्प विजेत्या नंदिनी आणि अंजली गायकवाड यांचे सुगम संगीत अनुभवता येणार आहे.
सरस्वती शिक्षण संस्थेतर्फे मागील १५ वर्षापासून ‘गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सव’ घेतला जातो. यंदाचे महोत्सवाचे १६ वे वर्ष असणार आहे. ६ व ७ जानेवारी असे दोन दिवस रसिकांसाठी ख्यातनाम गायकांना ऐकायचे संधी मिळणार आहे. महोत्सवाबाबत अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. पहिल्या दिवशी ६ जानेवारी रोजी पं. भीमसेन जोशी यांनी किराणा घराण्याचा बुलंद वारसा म्हणून ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो, असे ज्येष्ठ आणि नामवंत शास्त्रीय गायक एम. व्यंकटेशकुमार यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे. मराठवाड्यातील त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम असणार आहे. महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे सारेगमप लिटिल चॅम्प्स नंदिनी आणि अंजली गायकवाड यांचे सुगम संगीत. यासह सभु कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत आणि मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांचा ‘अभंग सरस्वती’ हा संगीतमय कार्यक्रमही सादर होणार आहे. महोत्सवाचा रसिकांनी महोत्सवाला हजेरी लावून संगीत मौफलीचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे. यावेळी सरचिटणीस अॅड. दिनेश वकील, डॉ. श्रीरंग देशपांडे, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार यांची उपस्थिती होती.

लिंगाडेचे तबलावादन

लहान वयात आपल्या तबला वादनाने राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केलेल्या जगमित्र लिंगाडे याचे एकल तबला वादनही सादर होणार आहे. संस्थेच्या परिसरात हा संगीत महोत्सव सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी झेडपी सदस्याचा खून

$
0
0



नांदेड : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर शेवाळे याचा सोमवारी सकाळी खून करण्यात आला. डॉक्टरने हा खून केला असून, गुन्हा केल्यानंतर तो साथीदारासह पोलिसांसमोर हजर झाला. आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असण्याची शक्यता आहे.
दिनकर शेवाळे मुखेड तालुक्यातील गडगा येथील रहिवासी असून, मांजरम गटातून तो जिल्हा परिषद सदस्य होते. तो पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता आणि आता त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, त्यामध्ये खुनाच्या प्रकरणाचा समावेश आहे. खून प्रकरणातून त्याची काही दिवसांपूर्वी निर्दोष मुक्तता झाली आहे. मात्र, आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे त्यांच्याविरोधात असून, त्यावर न्यायालयात खटले सुरू आहेत. कॅनॉल रोडवर असलेल्या देशमुख कॉलनीत त्यांचे घर असून, तेथे झोपलेले असताना कासरखेडा येथील डॉ. अविनाश शिंदे आणि साथीदाराने त्याची हत्या केली. आरोपींनी अतिशय थंड डोक्याने हा गुन्हा केला असून, वीस ते पंचवीस वार केले आहेत. रक्तबंबाळ झालेल्या शेवाळेचा मृत्यू झाल्याची खातरजमा झाल्यानंतर डॉ. शिंदेने त्याच ठिकाणी बसून एक पानाचे पत्र लिहिले. या पत्रामध्ये आपण हत्या का केली. शेवाळेने किती जणांना गंडवले, आपण हे पाऊल का उचलेले, शेवाळेची हत्या केली नसती, तर अात्महत्या करावी लागली असती, अशा आशयाचा मजकूर पत्रात असल्याचे सांगण्यात आले. हत्या केल्यानंतर तो स्वत:हून भाग्यनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. काही वेळानंतर त्याला मदत करणाऱ्या सखाराम कुंभकर्ण यानेही शरणागती पत्करली. या दोघांविरोधात लिंबगांव पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, उपाधीक्षक फसले, अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंबंधी अावश्यक सूचना केल्या. भाग्यनगर पोलिस ठाण्यातील जमादार संजय केंद्रे पथकासमवेत घटनास्थळी पोहोचून नाकाबंदीची तयारी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुरुंदकरांचे कार्य प्रेरणादायी’

$
0
0



नांदेड : नरहर कुरूंदकर यांचे कार्य अत्यंत मौलिक व प्रेरणादायी होते. जिल्हा परिषद त्यांच्या नावाचा पुरस्कार देवून त्यांच्या स्मृती जपत आहेे, ही अभिनंदनीय बाब आहे. कुरूंदकर हे स्वयंभू, विचारवंत व प्रज्ञावंत होते. त्यांनी मराठी भाषेला, महाराष्ट्राला सन्मान मिळवून दिला, असे गौरवद्वगार ग्रामीण कथाकार प्रा. रा. रं. बोराडे यांनी केले.
प्रा. बोराडे यांना मंगळवारी जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा नरहरराव कुरूंदकर पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘मी २००२पासून पुरस्कार स्विकारणेे बंद केले आहे. परंतु, माझ्या जिवनाचा अविभाज्य भाग असलेले नरहरराव कुरूंदकर यांच्या नावाचा पुरस्कार नाकारने माझ्यासाठी शक्य नव्हते. या पूर्वी मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, परंतु हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील कदाचित शेवटचा पुरस्कार असेल. मी ३० वर्षे प्राचार्य होतो, असे असले तरी मी शिक्षकच आहे. माणूस घडविण्याचे काम शिक्षक करीत आहेत आणि त्यांचा सन्मान माझ्यादेखत होत आहे ही बाब माझ्यासाठी अभिमानस्पद आहे. शिक्षक निर्व्येसनी असला तर विद्यार्थ्यांवर त्याचे सकारात्मक परिणाम होतात. शिक्षकांनी परिक्षार्थी घडविण्यापेक्षा विद्यार्थी घडवावा.’
या वेळी सावित्रीबाई फुले पुरस्कार मुंबई उच्च न्यायालयातील वकील व भटक्या विमुक्तांसाठी कार्य करणाऱ्या पल्लवी रेणके यांना प्रदान करण्यात आला. तसेच, जिल्ह्यातील ९२ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. पुरस्कार वितरण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, आमदार वसंत चव्हाण, यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंनगारे, उपाध्यक्ष समाधान जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, कृषी व पशु संवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, समाजकल्याण सभापती शिला निखाते, महिला व बालकल्याण सभापती मधुमती कुंटूरकर यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत औपचारिकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे डिसेंबर महिन्यात राज्यभर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील ३० वर्षांवरील व्यक्तींची मौखिक तपासणी ज्या व्यक्तिला पुढील उपचाराची आवश्यकता आहे, अशांसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दैनंदिन तपासणीचा वेग आता अधिक वाढवावा लागणार आहे. मोहीम पुढील चार दिवसांत संपणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार ३० डिसेंबरपर्यंत राज्यभर हा उपक्रम राबविला जाणार आहे. मौखिक आरोग्य तपासणीतून पुढील उपचाराची गरज भासणऱ्यांची स्वतंत्र यादी करून संदर्भसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्फे मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. २६ डिसेंबर अखेर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार ४६५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातून एक लाख ३८ हजार ४६५ व्यक्तींना संदर्भ सेवेची आवश्यकता असल्याचे नोंदवले आहे. मोहीम सुरू झाल्यापासूनचा कालावधी गृहित धरल्यास दररोज सरासरी १५ हजार व्यक्तींची तपासणी केली जात आहे. मोहीम संपण्याआधी अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान झेडपी आरोग्य विभागासमोर असणार आहे. काही भागात औपचारिकता म्हणून मोहीम राबविली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोहिमेचा हेतू साध्य करण्यासाठी मोहिमेत ट्रॅक झालेल्या व संदर्भ सेवेची गरज असलेल्यांना यंत्रणेमार्फत योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

मोहिमेच्या अंतिम टप्प्यानंतर संदर्भसेवेची गरज असलेल्या व्यक्तींची यादी यंत्रणेकडे दिली जाईल. त्यानंतर योजनेचा पुढचा टप्पा सुरू होईल. जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी प्रभावीपणे राबविली गेली. यासंदर्भातील दैनंदिन अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येत आहे.
- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओने काढले साडेतीनशे वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न

$
0
0

आरटीओने काढले साडेतीनशे वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न
नो हॉर्न प्लिज अंतर्गत आरटीओने केली कारवाई

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

शहराची शांतता भंग करणाऱ्या तब्बल साडेतीनशे कर्णकर्कश हॉर्नचा आवाज कामयस्वरुपी बंद झाला आहे. औरंगाबाद परिवहन कार्यालयाने सुरू केलेल्या शांत औरंगाबाद जनजागृती मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
शहरात काही वाहनधारकांकडून मॉडिफायच्या नावाखाली शेकडो वाहनांचे रूप बदलून हॉर्न आणि सायलेंसरचाही आवाज वाढविला जात आहे. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय ध्वनी प्रदूषण होते ते वेगळेच. वाहतूक पोलिसांकडूनही अशा वाहनांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता आरटीओ कार्यालयानेच अशा प्रकारच्या वाहनांवर अंकूश घालायला सुरुवात केली आहे. शहरातील विविध मार्गावर ‘शांत औरंगाबाद’ ही जनजागृती मोहीम आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून राबविली जात आहे. गेल्या चार दिवसांत या मोहिमेअंतर्गत तब्बल ३४५ कर्णकर्कश हॉर्नचा आवाज कायम स्वरुपी बंद करण्यात आला आहे. विनाकारण वेगवेगळ्या आवाजातील हार्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनाचालकांचे समूपदेशन करण्यात आले. तसेच त्यांच्या गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न काढून टाकण्यात आले.
हॉर्न केले नष्ट
कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण पसरते. याविरुद्ध गेल्या आठवड्यात जनजागृती मोहीम हाती घेतली. त्यात वाहन चालकांचे जनजागरण करण्यात आले. तसेच तब्बल तीनशे ते साडेतीनशे नियमबाह्य हॉर्न जागेवरच नष्ट करण्यात आले.
सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७८१ पोलिस कॉन्स्टेबल होणार पीएसआय

$
0
0

औरंगाबादः पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही आठ महिन्यांपासून ७८१ पोलिस कॉन्स्टेबलना प्रशिक्षणास बोलावलेलेच नव्हते. याबद्दल ‘म.टा.’ने लक्ष वेधल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यामुळे पोलिस महासंचालक कार्यालयाने या कॉन्टेबल यांना प्रशिक्षणास हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
खात्यांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१६मध्ये विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ घेण्यात आली. या ८२८ कॉन्स्टेबल व इतर पदावरील कर्मचारी उत्तीर्ण झाले. त्यानंतरही त्यांना पूर्वीच्याच पदावर काम करावे लागत आहे, याकडे १३ डिसेंबरच्या अंकात लक्ष वेधले होते. या उमेदवारांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवल्यास नवीन भरतीमधील उमेदवार रुजू झाल्यानंतर ज्येष्ठता मिळणार नसल्याकडे १४ डिसेंबरच्या अंकात लक्ष वेधले होते. त्यानंतर हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला जाईल, असे आमदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे आणि आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले होते.
‘म. टा.’मध्ये हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांसोबत आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याशिवाय नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार इम्तियाज जलील यांनी पदभरतीचा मुद्दा उपस्थित केला होता. आमदार संजय शिरसाठ यांनीही मुख्यमंत्र्यांकडे हा मुद्दा उपस्थित केला. परिणामी, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ८२८ उत्तीर्ण उमेदवारांपैकी ७८९ उमेदवारांना ५ जानेवारी २०१८ ते ७ जानेवारी २०१८ या कालावधीत नाशिक येथे महाराष्ट्र पोलिस अकादमी प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी काढले आहेत. हे आदेश २६ डिसेंबर २०१७ रोजी काढण्यात आले.

उमेदवारांत समाधान

पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेले कॉन्स्टेबल व कर्मचारी राज्यात विविध ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे आदेश मिळाल्यानंतर त्यांनी ‘म.टा.’ बोलताना समाधन व्यक्त केले. त्यांनी ‘म.टा.’चे आभार मानले आहेत.

‘म.टा’हे हा विषय उपस्थित केल्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच्या चर्चेत तो उपस्थित केला. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लक्ष वेधले होते. शासनाने या उमेदवारांबद्दल तातडीने निर्णय घेतल्याने आम्ही समाधानी आहोत.
- इम्तियाज जलील, आमदार

नागपूर येथील हि‍वाळी अधिवेशन काळात उत्तीर्ण उमेदवारांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा विषय लवकरच निकाली काढू, असा शब्द दिला होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे.
-अतुल सावे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आउटसोर्सिंगमुळे अडली शेतकारी कर्जमाफी

$
0
0

औरंगाबादः शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र अर्जदारांची माहिती संकलित करून वर्गीकरण करण्यासाठी आउटसोर्सिंग करण्यात आले आहे. त्यामुळे नियोजन कोलमडून त्याच कर्जमाफी योजना अडखळली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून करण्यात आलेल्या दोन लाख सहा हजार अर्जांपैकी आतापर्यंत ७७ हजार ७७४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. टप्प्याटप्प्याने येणाऱ्या याद्यांमध्येही प्रचंड त्रुटी असल्याने जिल्हा बँकेच्या यंत्रणेची भंबेरी उडत आहे.
राज्य सरकारने विशिष्ट निकष, नियम लावून त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरण्याची सक्ती केली होती. ग्रामीण भागात इंटरनेटचा वेग, वीज उपलब्ध होण्यातील अडचणी व इतर त्रुटींमुळे मुदतीच्या आधी ऑफलाइन अर्ज घेण्याची मुभा दिली गेली. औरंगाबाद जिल्ह्यातून दोन लाख सहा हजार शेतकऱ्यांचे अर्ज होते. त्यापैकी ४३ हजार शेतकरी थकबाकीदार, तर उर्वरित इंन्सेंटिव्हसाठीचे होते.
दिवाळीपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणे सुरू झाले आहे. पहिल्या यादीपासून त्रुटी येत असून २६ डिसेंबरपर्यंत ७७ हजार ७७८ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३८ कोटी रुपये जमा झाले आहेत. पण याद्यांमधील त्रुटी दूर करताना जिल्हा मध्यवर्ति सहकारी बँकेच्या यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लाग आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जाची माहिती संकलित करून ती एका पोर्टलमध्ये अद्ययावत करण्याचे काम मोठे होते. ते आउटसोर्सिंग केले गेले. त्यात नाव, आडनावाच्या स्पेलिंगमध्ये असंख्य चुका होत्या. काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड क्रमांक चुकीचे नोंदविले गेले. त्यामुळे सिस्टमध्ये या अर्जांना एकतर रिजेक्ट किंवा त्रुटी दर्शविल्या गेल्या. याचा फटका थेट कर्जमाफीचा निधी मिळण्यावर झाला आहे. जिल्ह्यातील ७७ हजार ७७८ अर्जांपैकी ४३९६ अर्जांमध्ये चुका आढळून आल्या. बँकेने त्या त्रुटी दुरूस्त करून अर्ज पुन्हा अपलोड केले. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजून रक्कम जमा होणे बाकी आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आहे.

चुकांची मालिका सुरूच

दोन दिवसांपूर्वी कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची आणखी एक यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आली आहे. अंदाजे २४ कोटींची कर्जमाफी त्यातून होणार आहे. पण या यादीमध्ये ७० टक्के चुका आहेत. या चुका कधी दुरुस्त होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार, हा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांचा महापूर; एसटी महामंडळ झोपेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वर्षअखेर व ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे दरवर्षी अजिंठा लेणीला हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. पण, एसटी महामंडळाकडून त्यांची वाहतूक करण्यासाठी योग्य नियोजन होत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. या मोसमातही हीच परिस्थिती उद्‍भवली.
शाळांना ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी गर्दी उसळली आहे. फर्दापूर टी पॉइंटपासून लेणीपर्यंतचा परिसर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी या मार्गावर एसटी महामंडळाच्याच प्रदूषणमुक्त बस धावू शकतात. पर्यटकांना त्यांची वाहने फर्दापूर टी पॉइंट येथेच ठेवावी लागतात. पण, हजारोंची वाहतूक करण्यासाठी हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढ्याच बस आहेत. त्यामुळे शेकडो पर्यटक बसची वाट पाहत रांग लावून ताटकळतात, तर शेकडो जण चार किलोमिटरचे अंतर पायी कापतात. या मोसमातही रविवारी हीच परिस्थिती कायम राहिली. ऐनवेळी वातानुकूलित बस सोडण्यात आल्या, पण ही संख्याही अपुरी ठरल्याने सिल्लोड आणि सोयगाव डेपोच्या बस येथे पाठवून एसटी महामंडळाने केवीलवाणा प्रयत्न केला.

जुनाट लाल बस

अजिंठा लेणी परिसरात कमी प्रदूषण करणारी वाहने चालवण्याचा नियम आहे. त्यामुळे काही विशेष बस देण्यात आल्या आहेत. पण, रविवारी गर्दी वाढल्याने एसटी महामंडळाने जुनाट लाल बस वाहतुकीसाठी वापरल्या.

सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची संख्या वाढते, त्यानुसार त्यांची वाहतूक करण्याचे नियोजन आवश्यक आहे. एसटी विभागाने जास्त बसगाड्यांची व्यवस्‍था करून पर्यटकांचा प्रश्न सोडविला.
-नितीन मुंडावार, विभागीय व्यवस्‍थापक, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ

पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने औरंगाबादचे विशेष पथक तेथे पाठवले होते. याशिवाय सोयगाव आणि सिल्लोड आगाराचे अधिकारीही उपस्थित होते. पुरातत्व विभागाकडून परवानगी घेऊन जास्त बसगाड्या सोडण्यात आल्या.
-रा. ना. पाटील, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेच्या २०९० शाळांची तपासणी पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील २०९० जिल्हा परिषद शाळांची मूल्यमापन तपासणी नुकतीच करण्यात आली. नऊ तालुक्यांमध्ये स्वतंत्र पथके निर्माण करून तीन दिवसांच्या अंतराने सर्व शाळा तपासण्यात आल्या. या तपासणीत अनेक शाळांतील शैक्षणिक दर्जा घसरल्याचे दिसून आले. तालुकास्तरावर सर्व अहवाल संकलित झाल्यानंतर जिल्ह्याचा एकत्रित अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जटवाडा येथील जिल्हा परिषद शाळेस नुकतीच भेट दिली होती. भेटीदरम्यान पाच शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले.याची गंभीर दखल घेत डॉ. भापकर यांनी शिक्षकांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर या शिक्षकांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी झेडपी प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अनेक अडचणी समोर आल्या. अनेक शाळांना इमारती, वर्गखोल्या, संगणक, विजेची अडचण, क्रीडांगण भौतिक सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांना चाचणीदाखल प्रश्न विचारल्यानंतर उजळणी येत नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. इंग्रजी शब्दांची अडचण, तर बहुतांश शाळांमध्ये आढळून आली. काही शाळांमधील शिक्षकांना जोडशब्द लिहिता आले नाहीत, असे खुद्द अधिकाऱ्यांच्या भेटीत दिसून आले.
संपूर्ण शाळा तपासणीचा अहवाल लवकरच मुख्यालयात येईल. त्यात दोषी असलेल्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे.

मी दहेगाव आणि सारंगपूर येथील शाळा तपासल्या. सारंगपूर येथील शाळेचा दर्जा चांगला आहे. द्विशिक्षकी शाळेला इमारतीची अडचण आहे. दहेगाव बंगला शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे देऊनही ते विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले नव्हते. यासंदर्भात मुख्याध्यापकांना नोटीस बजावली आहे. इंग्रजीच्या विषयात अधिक सुधारणेची आवश्यकता असून शिक्षकांना तशा सूचना दिल्या आहेत.
- आश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकल्याण विभागाचे नियोजन कोलमडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेचे प्रभारी समाजकल्याण अधिकारी मोकाटे दहा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. यंदा या विभागाच्या योजनांचे नियोजन दहा महिने उलटून गेले तरीही झालेले नाही. प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात दिलेले प्रभारी अधिकारीही रजेवर गेल्याने योजनांचे नियोजन कोलमडणार आहे.
झेडपीला गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरुपी समाजकल्याण अधिकारी मिळालेला नाही. प्रभारी अधिकाऱ्यांचा प्रयोग पाच ते सहा वेळा करण्यात आला. मात्र योजनांचे नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश आले. समाधान इंगळे, डॉ. सचिन मडावी, शेळके आणि आता हा अतिरिक्त कार्यभार खुलताबादचे अतिरिक्त गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांच्याकडे देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून समाजकल्याण विभागांतर्गत राबवायच्या योजनांची यादी निश्चित होत नाही, त्यामुळे लाभार्थी वंचित राहत आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजना, दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत राबविण्यात यावयाच्या योजनांच्या बाबत प्रचंड वेळकाढूपणा झाल्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सीइओंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनही केले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देऊन या याद्या अद्ययावत करण्यात आल्या. त्यानंतर काही योजनांचे पुनर्विनियोजन करण्याचा निर्णय झाला. दरम्यान, अतिरिक्त सीइओ अशोक शिरसे यांनीही उर्वरित योजनांच्या याद्या पूर्ण करून योजना मार्गी लावण्यासाठी यंत्रणा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. त्यादृष्टीने मोकाटे यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला होता. मोकाटे यांच्या कामाचा आवाका चांगला आहे. पण आता ते दहा दिवसांच्या रजेवर गेल्याने पुन्हा एकदा समाजकल्याण विभागाच्या योजनांचे नियोजन कोलमडणार आहे.

आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिने शिल्लक आहेत. प्रशासनाने आता कुठलीही चालढकल न करता त्वरित योजनांची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही केली पाहिजे. अतिरिक्त अधिकाऱ्याकडे कार्यभार देऊन पेंडिंग कामे पूर्ण केली पाहिजेत.
- धनराज बेडवाल, सभापती, समाजकल्याण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध वेषभूषांसह काँग्रेसचे आंदोलन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर

खोटे आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपने सात महिन्यांत काहीही विकास केला नाही, विकासच्या खोट्या गप्पा मारल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी शुक्रवारी विदूषक, फकीर, पोतराज, आराध्यांच्या वेषभूषा करून महापालिका इमारतीसमोर आंदोलन केले.
महापालिकेमध्ये सात महिन्याच्या काळात सत्ताधारी भाजपाने कोणतेही विकास काम केल नाही, एकही नवी योजना आणली नाही, विकासासाठी निधी मंजूर झाल्याचे फलक लावले. मात्र, हा निधी कोठे आहे, याकडे लक्ष वेधत महापौरांवर निष्क्रियतेचा आरोप करीत घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणांमुळे पालिकेचा परिसर दणाणून गेला होता. या वेळी विविध वेषभुषा करून जागरण गोंधळ घालणारे आंदोलन करण्यात आले. नगरसेवक कैलास कांबळे विदुषकाचा वेष करून गळ्यात महापौर अशी पाटी लावून आले होते, खुर्चीवर महापौर असे लिहिलेल्या फलकाच्या भोवती जागरण गोंधळ करण्यात आला. विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी पालिकेच्या प्रशासनाला निवेदन दिले. सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे यांनी ते स्विकारले. या आंदोलनात विक्रांत गोजमगुंडे, स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, पुनित पाटील, सचिन बंडापल्ले सहभागी झाले होते. पोतराजाची वेषभुषा युनुस मोमीन, सुरमा भोपालीची वेषभुषा अयुब मणियार, आराध्याच्या वेषभुषेत सपना किसवे, पप्पू देशमुख आले होते. अमृत योजनेतील कंत्राटदारावर आणि सेल्युलर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या आंदोलनावर महापौर सुरेश पवार म्हणाले, ‘जनतेने सत्ता दिली, त्यावेळी काँग्रेसने काहीही केले नाही. आज काँग्रेस त्यांचे खरे रुप सादर करून वैधानिक पदाचे अवमूल्यन करीत आहे. निधीविषयीचे आक्षेप त्यांनी पालिकेच्या सभागृहात लोकशाही पद्धतीने मागितले असते, तर त्यांना त्याचे उत्तर मिळाले असते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आठ जानेवारी रोजी रंगणार

$
0
0

आठ जानेवारी रोजी रंगणार

मराठवाड्याचा युवावक्ता स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ८ जानेवारी रोजी होईल. स्पर्धेच्या जिल्हानिहाय फेऱ्या होतील, अशी माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

चव्हाण म्हणाले, ‘मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वक्तृत्व कौशल्यासाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या या स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष आहे. स्पर्धेच्या माध्यमातून मराठवाड्यात अनेक युवावक्ते तयार झाले आहेत. या वर्षी जिल्हानिहाय फेरीसाठी ‘ऑनलाईन कर्जमाफी.. ऑफलाईन बळीराजा’, ‘ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू’, ‘क्रिकेटच्या फ्री हिटमुळे इतर खेळांचे मरण’ आणि ‘हा रस्ता अटळ आहे’ हे चार विषय ठेवण्यात आले आहेत. जिल्हानिहाय स्पर्धा ८ जानेवारी रोजी सुरु होईल. ही स्पर्धा देवगिरी महाविद्यालय (औरंगाबाद), जेईएस महाविद्यालय (जालना), शिवाजी ‌अभियांत्रिकी महाविद्यालय (परभणी), राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालय (हिंगोली), सायन्स कॉलेज (नांदेड), राजश्री शाहू महाविद्यालय (लातूर), तेरणा महाविद्यालय (उस्मानाबाद) आणि बलभीम महाविद्यालय (बीड) येथे होतील. प्रत्येक जिल्ह्याच्या विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे तीन, दोन व एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. आठही जिल्ह्यांतील २४ विजेत्या स्पर्धकांची १५ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात महाअंतिम फेरी होईल. महाअंतिम फेरीसाठी ‘सरकारी जाहिराती... कोण खरा लाभार्थी ?’, ‘समताधि‌ष्टित राजकारणाचे पुरस्कर्ते; शरद पवार’, ‘जीएसटी : काय घडलं काय बिघडलं’ आणि ‘स्वयंघोषित सेन्सॉरशिपच्या कात्रीत रुपेरी पडदा’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. महाअंतिम फेरीतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे एकवीस, पंधरा आणि अकरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल.’’

ही स्पर्धा मराठवाड्यातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी असून एका महाविद्यालयातून तीन विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी कुठलेच शुल्क नाही. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र, प्राचार्यांचे संमतीपत्र व पासपोर्ट फोटोसह स्पर्धेच्या दिवशी एक तास अगोदर स्पर्धा ठिकाणी नाव नोंदणी करावी, असे आवाहन सतीश चव्हाण यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्रासाठीही महापालिकेची अभय योजना

$
0
0

बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्रासाठीही महापालिकेची अभय योजना
२८ फेब्रुवारी पर्यंतची डेडलाईन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
मालमत्ता कराच्या संदर्भात अभय योजना जाहीर करण्याच्या तयारीत असलेल्या महापालिकेच्या प्रशासनाने आता बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रासाठी देखील अभय योजना जाहीर करण्याचे ठरविले आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान जे नागरिक या योजनेचा लाभ घेतील त्यांना दंडाची रक्कम भरावी लागणार नाही.
मालमत्ता कराची थकबाकी चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून कर भरावा म्हणून अभय योजना जाहीर करण्याची तयारी पालिकेने केली आहे. यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेतला असून आयुक्तांनी या योजनेला तत्वतः मान्यता दिल्याचे महापौर म्हणाले. ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेचा कर लाऊन घेतला नाही, अशा मालमत्ताधारकांनी कर आकारणी करून घेतल्यास त्यांना चालू वर्षाचाच कर भरावा लागेल. यासाठी विशिष्ट मुदत दिली जाणार आहे. या मुदतीच्या नंतर ज्या मालमत्ता कर आकारणीच्या क्षेत्राच्या बाहेर आहेत, असे लक्षात येईल त्या मालमत्तांसाठी दंडासह मालमत्ताकराची आकारणी केली जाणार आहे.
याच पद्धतीने नगररचना विभागातून दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्राबद्दल अभय योजना जाहीर करण्याचा निर्णय येत्या एक - दोन दिवसांत घेतला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ज्या मालमत्ताधारकांनी बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही त्यांनी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान नगररचना विभागातून प्रमाणपत्र घ्यावे. प्रमाणपत्रासाठी आवश्यक तेवढे शुल्क आकारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. २८ फेब्रुवारीच्या नंतर मात्र दंड आकारण्याची कार्यवाही केली जाणार आहे. शहरात किमान २५० ते ३०० मोठ्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नाही. भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या लहान इमारतींची संख्या तर हजारांच्या घरात आहे. अभय योजनेचा लाभ अशा इमारत मालकांनी घेतला तर पालिकेच्या तिजोरीत शंभर कोटी रुपये जमा होऊ शकतील, असा दावा महापौरांनी केला आहे.
प्रशासनाने जाहीर प्रगटनच दिले नाही
अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबद्दल शासनाने अध्यादेश काढला आहे. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंतची बांधकामे या अध्यादेशामुळे नियमीत होणार आहेत. परंतु शासनाचा अध्यादेश महापालिकेने जाहीर प्रगटनाच्या स्वरूपात प्रसिद्ध केला पाहिजे. ज्या तारखेला अध्यादेश काढण्यात आला त्या तारखेपासून सहा महिन्यांची मुदत देत महापालिकेने जाहीर प्रगटन दिले पाहीजे, परंतु तीन महिने झाले तरी पालिकेने अद्याप जाहीर प्रकटन दिले नाही. त्यामुळे अनधिकृत घरे अधिकृत करण्याबद्दलचे प्रस्ताव पालिकेच्या नगररचना विभागाला प्राप्त झाले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टंचाई कृती आराखडा मंजूर कराः आ. सत्तार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
मागेल त्याला काम, भविष्यातील पाणी टंचाईच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करा, पाणी टंचाई प्रस्ताव मंजूर करा अशा सूचना मंगळवारी झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या प्रांगणात आमसभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार संजय सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा आमदारांसमोर मांडला.

गेल्या आठवड्यात पानवडोद आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या उषाबाई गव्हाणे या महिलेची टाके काढताना तब्येत खालावली. त्यांचा सिल्लोड येथे आणताना वाटेत मृत्यू झाला. या प्रकरणी कॉँगेसचे तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे यांनी आमसभेत प्रश्न उपस्थित केला. आरोग्य अधिकारी रुग्णालयात नव्हते. त्यानंतर या महिलेची तब्यत खालावली. या प्रश्नावर उत्तर देताना तालुका आरोग्य अधिकारी चव्हाण म्हणाले, महिलेच्या मेंदुत गाठ होती. तेव्हा सत्तार यांनी तुम्ही शस्त्रक्रियेसाठी केस घेतली, तर तब्येतीची खातरजमा न करता वेळ मारून नेण्यासाठी प्रोव्हिजल पोस्टमार्टम रिपोर्टचा आधार देऊन यंत्रणा मोकळी होते, असे चालणार नाही. माणूस आणि जनावर यांच्यातला फरक ओळखण्याचा व त्यांना उपचार करा, असा सल्ला दिला. अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करा. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव पाठवा. महिलेच्या कुटुंबियाला मदत द्या, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

स्वच्छ भारत योजनेतून शौचालय बांधले. या शौचालयास १२ हजारांचा निधी मिळतो, मात्र लाभार्थ्थांनी तीन हजारांत जुजबी काम केले. शौचालय वापरात नाहीत. या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी उंडणगाव येथील अशोक सोनवणे यांनी केली. याप्रकरणी समिती स्थापन करा आणि तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या एमआरईजीएसच्या मंजूर असलेल्या ५०० विहिरींच्या कामांना वर्कऑर्डर द्या, अशा सूचना सत्तार यांनी बीडीओला दिल्या. केऱ्हाळा येथे चार महिन्यांपासून वीज नसल्याची तक्रार करण्यात आली. गावागावातून विजेच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. या तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता राजपूत यांना देण्यात आल्या. आमसभेचे प्रस्ताविक गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांनी केले. शिक्षणविस्तार अधिकारी संजय सिरसाठ यांनी आभार मानले.

सभापतींची दांडी
पंचायत समिती सध्या भाजपच्या ताब्यात आहे, तर आज कॉँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आमसभा घेतली. त्यामुळे भाजपचे सभापती ज्ञानेश्वर तायडे व भाजपच्या पंचायत समिती सदस्यांनी या आमसभेला दांडी मारणे पसंत केले. त्यांच्या गैरहजेरी चर्चा सदस्यांमध्ये रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजनांत पशुसंवर्धन विभाग अव्वल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेतील अनेक विभागांमध्ये योजना राबविण्यावरून अजूनही संभ्रमावस्था आहे. गेल्या काही दिवसांत विभागांमधून नियोजनाची धावपळ सुरू आहे, मात्र पशुसंवर्धन विभागाने २०० हून अधिक लाभार्थ्यांची निवड करून सध्या अव्वल क्रमांक पटकाविला आहे.

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यात जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांकडून नियोजन केले जाते. यामुळे निधी अखर्चित राहतो आणि लाभार्थ्यांपर्यंत तो निधीही पोहचत नाही, असा अनेकदा अनुभव येतो. यंदाही आतापर्यंत काही विभाग वगळता बहुतांश विभागांकडून वैयक्तिक लाभाच्या योजना रखडल्याची तक्रार सदस्यांनी केली होती. पशुसंवर्धन विभागाने मात्र नियोजन करून एक कोटी १७ लाख रुपयांच्या योजनांमधून जिल्ह्यातील २३२ लाभार्थी निवडले आहेत. झेडपी उपाध्यक्ष व विषय समिती सभापती केशवराव तायडे यांनी ही माहिती दिली. विशेष घटक योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना दुभत्या गायी, म्हशींचे वाटप केले जाते. यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी ८०१ जणांनी अर्ज केले त्यातून छाननीनंतर उरलेल्या ४३३ मधून ३९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आल्याचे तायडे यांनी स्पष्ट केले. शेळी गटांचे वाटप करण्यासाठी ९० लाख रुपयांची अर्थिक तरतूद करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना १० शेळ्या आणि एक बोकड देण्यात येणार आहे. या योजनेसाठी एक हजार ४१७ प्राप्त अर्जांतून छाननीनंतर ७३७ अर्ज पात्र ठरले असून, १६८ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. याशिवाय एकात्मिक कुक्कुट विकास योजनेअंतर्गत एक दिवसाच्या कोंबडीच्या पिल्लांचा गट वाटप करण्यासाठी २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेसाठी १०८जणांनी अर्ज केले होते. यापैकी ८२ अर्ज छाननीनंतर पात्र ठरल्याचे तायडे यांनी नमूद केले.

निवडीची पत्रे दिली
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे यांनी सांगितले, की पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन रँडमाइज पद्धतीने लाभार्थी निवडले आहेत. लाभार्थ्यांच्या याद्या पंचायत समित्यांकडे पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्या असून निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांना निवडीची पत्रेही दिलेली आहेत.

...अन् पोटपाणी मार्गी
- १ कोटी १७ लाखांचे बजेट
- २३२ लाभार्थी निवडले
- ९० लाख शेळी गटासाठी
- १० शेळ्या १ बोकड देणार
- १६८ लाभार्थ्यांना लाभ
- २५ जणांना कोंबड्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीच्या ‘पीआयसीयू’त रुग्ण दाखल होणे सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ‘पेडियाट्रिक इन्टेसिव्ह केअर युनिट’मध्ये (पीआयसीयू) बालरुग्ण दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. याच ‘पीआयसीयू’मध्ये मागच्या आठवड्यात अडीच लाखांचे १० बेड व पाच नेब्युलायझरची देणगी देण्यात आली होती.

मागच्या काही वर्षांत वॉर्ड क्रमांक २६ चे रूपांतर ‘पीआयसीयू’मध्ये करण्यात आले होते व या वॉर्डासाठी तब्बल २० ते २५ लाख खर्च करून वॉर्डामध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या; परंतु हा वॉर्ड काही सुरू झाला नव्हता. दरम्यान, याच ‘पीआयसीयू’साठी दहा बेड देणगी म्हणून देण्यात आले व निदान जनरल वॉर्ड म्हणून का असेना, हा वॉर्ड सुरू होण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांच्या पुढाकाराने हा वॉर्ड एकदाचा सुरू झाला आहे. या संदर्भात डॉ. पाटील म्हणाले, ‘आता या वॉर्डात गरजेनुसार बालरुग्ण दाखल होतील व जसाजसा वॉर्ड अद्ययावत होईल, तसेतसे त्याचे रूपांतर ‘पीआयसीयू’मध्ये होईल.’

‘मेडिसिन’मध्ये ‘एबीजी’ उपकरण
‘औषधवैद्यकशास्त्र विभागाला ‘असिड ब्लड गॅस अनालायझर’ (एबीजी) हे नवीन उपकरण मंगळवारी उपलब्ध झाले असून, वेगवेगळ्या आजारांमध्ये तसेच व्हेंटिलेटरवरील व किडनीविकारग्रस्तांची स्थिती जाणून घेणे शक्य होईल,’ असे विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेचा श्वास मोकळा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैठण गेट ते सिटी चौक परिसरात मंगळवारी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत जोरदार कारवाई करत शहर वाहतूक शाखा, महापालिका अतिक्रमण हटाव पथक आणि पोलिसांनी ‌अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यामध्ये फेरीवाल्यांच्या हातगाड्या, दुकानासमोरील अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आले.

पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, बाराभाई ताजीया, रंगारगल्ली, मछली खडक, औरंगपुरा, कुंभारवाडा आदी ठिकाणी फेरीवांल्यांनी ठाण मांडले होते. तसेच दुकानासमोर देखील तात्पुरते शेडचे अतिक्रमण, टेबल, पलंगावर स्टॉल मांडून अतिक्रमण करण्यात आले होते. वाहतूक शाखेने दोन दिवसांपूर्वी लाऊड स्पिकरवर या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या अ‌तिक्रमण हटाव पथकाला सोबत घेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यामध्ये सुमारे पाच टेम्पो साहित्य जप्त करण्यात आले. हे साहित्य पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईत शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह दोन अधिकारी व सतरा कर्मचारी, मनपा अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख सी. एम. अभंग, पाठक, भांगे व पथक तसेच सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पुलाखाली वाहनाला आग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेंद्रा जवळील टाकळी रेल्वे पुलाखालून गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एका छोटा हत्तीला वाहनाला आग लागण्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेत वाहनचालक जखमी झाला असून, गावकऱ्यांनी सिलेंडरला लागलेली आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

चिकलठाणा ते करमाड दरम्यान रेल्वे ब्रिज क्रमांक १४६ येथून छोटा हत्ती (एमएच २० ईजी ३४५९) २० सिलेंडर घेऊन जात होता. योगेश्वरी भारत गॅस कंपनी, योगेश्वरी कॉम्पलेक्स, चिकलठाणा एजन्सीचे हे एलपीजी गॅस सिलेंडर डिलेव्हरी व्हॅन आहे. यातील १५ सिलेंडर रिकामे, तर पाच एलपीजी गॅस भरलेले होते. हे वाहन रेल्वे पुलाखालून जात असताना अचानक आग लागली. आगीतून बाहेर पडताना वाहनचालक शेख अलीम शेख इस्माइल (रा. गांधेली, औरंगाबाद) भाजला. आग लागल्यानंतर गावकरी वाहनचालकाच्या मदतीला धावून आले. त्यांनी शेख अलीम याला बाजूला नेले. काही गावकऱ्यांनी जळत्या गाडीतून सिलेंडर बाहेर काढण्यासाठी मदत केली. वाहन चालकाला बेंबडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती चिकलठाणा अग्निशमन ‌दलाला देण्यात आली. त्यांनी गाडीची आग विझविली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक अरविंद शर्मा आणि अन्य कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले होते. घटनेत वाहनचालकाव्यतिरिक्त कोणीही जखमी झाले नाही. त्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताच परिणाम झाला नाही, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images