Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाटील यांचा मृत्यू हे सरकारचे पाप

$
0
0

धनंजय मुंडे यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
धर्मा पाटील हे दोन वर्षांपासून जमिनीच्या फेरमूल्यांकनाची मागणी करत होते, मात्र यांच्या मृत्युनंतर अवघ्या काही तासात फेरमूल्यांकनाचा निर्णय सरकारने घेतला. मग सरकार पाटील यांच्या मृत्यूची वाट पहात होते काय, असा सवाल करत पाटील यांचा मृत्यू हे सरकारचे पाप असून, ही सरकारने केलेली हत्या असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

धर्मा पाटील यांच्या प्रकरणात मुंडे म्हणाले की, संपादित जमिनीसाठी मंत्रालयाच्या खेट्या मारणाऱ्या पाटील यांनी जमिनीच्या फेरमूल्यांकनाची मागणी केली होती, मात्र त्यांच्या या मागणीकडे सरकारने विचार केला नाही. पाटील यांची शेती असलेल्या परिसरात पद्मसिंह गिरासे या शेतकऱ्याला ७८ गुंठ्यांसाठी एक कोटी ८९ लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला, मात्र धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीवर अंब्याची ५०० झाडे, विहीर, बोअर असतानाही त्यांना केवळ चार लाख रुपये मोबदला देण्यात आला होता. त्याच वेळेस पाटील यांनी हरकत घेतली होती. त्यांनी फेरमूल्यांकनाची मागणी केली होती. मूल्यांकन केले असते तर शेजारील जमिनीचेही मूल्यांकन करावे लागले असते व सरकारचे पितळ उघडे पडले असते. हे पाप सरकारला; तसेच अधिकाऱ्यांना दाबायचे होते. ७८ गुंठ्यांसाठी एक कोटी ८९ लाख रुपये मोबदला देण्यात येणारे शेतकरी कुणाचे नातेवाईक आहेत, याचा शोध घ्यावा.'

पर्यटन मंत्र्यांनी जमीन कशी घेतली

आमचे सरकार असताना २००९मध्ये प्रकल्प मंजूर झाला, मात्र हरकती आणि सुनवण्या प्रक्रिया २०१४मध्ये झाली. त्यानंतर निवाडे करण्यात आले. २०१५मध्ये भरपाईचा विषय सुरू झाला. या सरकारला तीन वर्षे काही करता आले नाही व मागच्या सरकारलाच दोष देण्याचा हा प्रकार सरकार करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. या प्रकल्पाला २००९मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर २०१३मध्ये सरकारमधील पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी जमीन घेतली कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुन्या मोंढ्यात दुकानाला आग, लाखोंचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाफरगेट जुना मोंढा भागात नीलेश इंटरप्रायजेस या दुकानाला आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळाल्याने अंदाजे २० लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.

सुजित सुरेश जैन (रा. एन ९, सिडको) यांचे जुना मोंढा भागात निलेश इंटरप्रायजेस नावाने वेल्डिंग व सेफ्टी टुल्सच्या साहित्याचे दुकान आहे. रविवारी रात्री जैन दुकान बंद करून घरी गेले होते. पहाटे साडेतीन वाजता त्यांच्या दुकानाला आग लागली. नागरिकांनी त्यांना फोन करून ही माहिती दिली. अग्निशमन दलाला हा प्रकार कळवण्यात आला. आग मोठी असल्याने पदमपुरा, चिकलठाणा व सिडको विभागाचा बंब रवाना करण्यात आला. दोन तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग लावण्यात आल्याचा संशय दुकानमालकाने व्यक्त केला असून संशयिताचे छायाचित्र पोलिसांना दिले आहे. या आधारे पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाड समिती भरती प्रकरण: १० अधिकाऱ्यांवर दोषारोप पत्र दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लाड, पागे समितीच्या शिफारशीनुसार महापालिकेत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या भरतीप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेल्या दहा अधिकाऱ्यांच्या विरोधात सरकारकडे दोषारोपपत्र सादर करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. दोषारोपपत्राच्या आधारे सरकारतर्फे आता या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होईल.

महापालिकेत २०१० ते २०१४ यादरम्यान अनुकंपातत्वावर लाड, पागे समितीच्या शिफारशीनुसार १८८ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या भरतीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याच्या तक्रारी होत्या. हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. या प्रकणाची चौकशी विशेष अधिकाऱ्यामार्फत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंडे यांनी औरंगाबाद महापालिकेत येऊन चौकशी केली. चौकशीअंती या भरती प्रकरणात ११ अधिकारी दोषी असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला व तसा अहवाल शासनाला सादर केला.

मुंडे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालावरून राज्य शासनाने १५ नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीसाठी दोषारोप पत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोषारोप पत्र तयार करून ते पुढील कारवाईसाठी शासनाकडे पाठवण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त मुगळीकर यांनी दिली. नियुक्त केलेल्या १८८ कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करायची, याबद्दल शासनाचे मार्गदर्शन मागवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

या अधिकाऱ्यांवर दोषारोप पत्र

तत्कालीन उपायुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त रवींद्र निकम, पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग, वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी, नाथा चव्हाण, तत्कालीन अस्थापना अधिकारी सपना वसावा, तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक विलास जाधव, तत्कालीन मुख्य लेखा परीक्षक धनंजय आंढळे, मो. रा. थत्ते, तत्कालीन विधी सल्लागार ओ. सी. शिरसाट यांचा दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. अन्य एक अधिकारी विजय जावरे यांचे निधन झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑलआऊट ऑपरेशनमध्ये दोन लाखांचा दंड वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांनी रविवारी राबविलेल्या ऑलआऊट ऑपरेशनमध्ये साडेतीन हजार वाहने तपासण्यात आली. यामध्ये ७३५ जणांवर कारवाई करीत दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच आठ अवैध दारू विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात आली.

रविवारी दुपारी तीन ते सायंकाळी सात या चार तासाच्या कालावधीमध्ये नाकाबंदी करण्यात आली. १७ पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध चौकात ही मोहीम राबविण्यात आली. तसेच शहरातील हॉटेल, लॉज, ढाबे आदी १३१ ठिकाणी देखील तपासणी करण्यात आली. विविध ठिकाणी छापे मारून आठ अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये साडेबारा हजारांची दारू जप्त करण्यात आली. तसेच दहा आरोपींना वॉरंट बजावण्यात आले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या वतीने शहरातील मल्टी प्लेक्स तसेच धार्मीक स्थळांची तपासणी करण्यात आली. पोलिस आयुक्त यशस्वी यादव, डिसीपी डॉ. दिपाली धाटे घाडगे, राहूल श्रीरामे, विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ७२ पोलिस अधिकारी व ३६२ कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखना धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याच्या विरोधात याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सुखना धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या विरोधात दाखल याचिकेत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. सोमवारी न्या. संभाजी शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

गारखेडा येथील सरपंच मनिषा शैलेश चौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ग्रामपंचायत गारखेडा १ आणि २ सह मंगरूळ, टाकळी भाली, चितेपिंपळगाव, हिवरा, लाडगाव, टोणगाव, जडगाव, चितेगाव, कुंभेफळ, आपतगाव येथील ग्रामपंचायतींनी सुखना धरणातील पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्याकरिता संबंधितांना वारंवार निवेदन दिले. मात्र, विरोध असूनही शाखाधिकारी, औरंगाबाद पाटबंधारे शाखा क्रमांक दोन यांनी १६ जानेवारी रोजी सरपंच तसेच ग्रामसेवक यांना एक पत्र देऊन, सिंचनाकरीता पाणी सोडण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्याने पाणी सोडण्यात येत आहे, असे कळविले.

या याचिकेवर गेल्या सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. जनहित याचिकेत माजी जि. प. सदस्य उदय पवार यांनी खंडपीठात हस्तक्षेप अर्ज दाखल केला. सुखना धरणात मोठ्या प्रमाणावर मत्स्यबीज सोडले असून, पाणी सोडल्यामुळे आर्थिक नुकसान होईल, असा अर्ज शासनाकडे केल्याने यात वैयक्तिक हितासाठी संपूर्ण शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचे हस्तक्षेप अर्जात म्हटले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे सिद्धेश्वर ठोंबरे यांनी बाजू मांडली. पवार यांची बाजू शरद नातू हे मांडणार आहेत. या याचिकेची सुनावणी १ फेब्रुवारीला होणार आहे.

याचिकाकर्त्यांचे पती व सासरे यांचा पाणी व धरणात मत्स्यबीज सोडण्याचा व्यवसाय आहे. पाटबंधारे विभागाने यापूर्वी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचिकाकर्त्यांतर्फे त्यास विरोध करण्यात आला. या विरोधामुळेच पाटबंधारे विभागास पोलिस संरक्षण घ्यावे लागले. ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांनी मागणी केली तेव्हा धरणात ५० टक्के साठा होता. शासनाने स्वत:हून वेळीच पाणी सोडण्याची गरज होती. डिसेंबरमध्ये पाणी सोडल्यानंतर कालव्यात क्रॉकीट टाकण्यात आले. यासंबंधी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविल्याचे अर्जात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सध्याच्या राज्यकर्त्यांकडून सत्य मारले जातंय'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सध्याच्या राज्यकर्त्यांकडून सत्य मारले जात आहे. वस्तुस्थिती लपवून ठेवून किंवा अर्धसत्य समोर ठेवत त्यांना हवे ते करण्याचा डाव साधला जात आहे,' अशी टीका विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी केली.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात मंगळवारी 'मंथन' उपक्रमात प्रा. डोळे हे 'महात्मा गांधीना आज कसे समजून घ्यायचे' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानप्रकाश मोदानी होते. कॉग्रेस नेते डॉ. रत्नाकर महाजन, सुभाष लोमटे उपस्थित होते. प्रारंभी महात्मा गांधी यांना आदराजंली अर्पण करण्यात आली. प्रा. डोळे म्हणाले, गांधी यांचे व्यक्तिमत्व हे सत्याचा शोध घेण्याचे साधन बनले आहे. परंतु, सध्याचे राज्यकर्ते हे सत्याला मारू पाहात आहे, लोकशाही ही विश्वासावर चालते, तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे करणारे राज्यकर्ते देशाचे शत्रू आहेत, अशी टीका त्यांनी केली. रत्नाकर महाजन यांनी यावेळी बोलताना सध्याच्या राज्यकर्त्यांना समतेचे वावडे आहे, असा आरोप केला. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

माध्यमावर शंका

'माध्यमातूनही पूर्ण सत्य येत नाही. कोरेगाव भीमा येथे काय झाले, हे समोर आले नाही, पण नंतर जे काही झाले ते समोर आले, असे का,' असा सवाल प्रा. डोळे यांनी उपस्थित केला. सत्य शोधणे, आग्रह धरणे हे परमकर्त्यव्य आहे, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्याच्या नावावर दहा वर्षे सरकारी नोकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट दस्तावेज तयार करून चक्क दुसऱ्याच्या नावावर तब्बल दहा वर्षे सरकारी नोकरी करणाऱ्या आणि सरकारी नोकरीचे सर्व फायदे उचलून संबंधित व्यक्तीसह शासनाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावली होती. या शिक्षेला आरोपीने जिल्हा कोर्टात आव्हान दिले असता, जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी आरोपीचे अपील फेटाळत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली.

या प्रकरणी शंकर श्यामा राठोड (४७, रा. खेर्डीतांडा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या नावाचे विविध बनावट दस्तावेज तयार करुन आरोपी शंकर देवा जाधव (४४, रा. खेर्डीतांडा, ता. पैठण) याने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प योजनेंतर्गत १३ सप्टेंबर १९९१ ते ८ एप्रिल २००१ या कालावधीत विविध आश्रमशाळेमध्ये शिपाईपदावर नोकरी केली व सरकारी नोकरीचे सर्व लाभ घेतले. मुलाखतीसह नोकरीची सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरही नोकरीसंदर्भात काहीही कळविण्यात आले नाही म्हणून फिर्यादीने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनंतर कलम १८२, ४२०, ४६७, १८१, ४१९, ४७१ अन्वये पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले होते. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कलम १८२ अन्वये सहा महिने सक्तमजुरी, ४१९ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुये दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावास, तर कलम ४२० अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने २३ ऑक्टोबर २००८ रोजी ठोठावली होती. त्याविरुद्ध आरोपीने जिल्हा कोर्टात अपील दाखल केले होते.

सबळ पुराव्यांची कोर्टाकडून दखल

अपिलाच्या सुनावणीवेळी, आरोपीचे सर्व्हिस बुक, विविध कार्यक्रमातील फोटो, कागदपत्रे व रहिवासी प्रमाणपत्र आदींवरुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध असून, गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने ठोठावलेली शिक्षा योग्य असून, आरोपीचे अपील फेटाळण्यात यावे, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचे अपील फेटाळत, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारी पित्याला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोटच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी दिले.

या प्रकरणी इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या पीडित मुलीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २६ जानेवारी २०१८ रोजी रात्री पीडित मुलगी आपल्या आई व लहान भावासोबत झोपली होती. मध्यरात्री तिच्या पित्याने तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. यापूर्वीही आरोपी पित्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता व ही बाब पीडितेच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात आल्यानंतर बहिणीने पित्याला काठीने मारले होते. या प्रकारानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन आरोपी पित्याला २७ जानेवारीला अटक करण्यात आली होती. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता, प्रकरणाची सखोल तपासणी करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फतियाबाद येथील शेतकऱ्यांचे वेट अॅण्ड वॉच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समृद्धी महामार्गासाठी जमिनीच्या दरातील तफावत दूर करा या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी फतियाबाद येथील शेतकऱ्यांनी आत्मदहनाची परवानगी मागितली होती. प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात निर्णय घेऊ, असे तोंडी आश्वासन देऊन बोळवण केल्यानंतर आता शेतकरी 'वेट अॅण्ड वॉच' या भूमिकेत आहेत. नुकत्याच झालेल्या धर्मा पाटील प्रकरणानंतर शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.

गंगापूर तालुक्यातील फतियाबाद येथे १२ लाख ७० हजार व केवळ दोन फूट अंतरावरील दौलताबाद गटातील बागायती जमिनीला ९२ लाख रुपये, माळीवाडा गटात ९० लाख रुपये भाव देण्यात आला. ही तफावत दूर करून शेजारील गावांप्रमाणेच भाव जाहीर करावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून फतियाबाद येथील शेतकरी करत आहेत. समृद्धी महामार्गासाठी फतियाबाद येथील ४४ शेतकऱ्यांच्या ७२ एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत मात्र दरातील तफावत दूर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जिल्हाधिकारी, आयुक्त, समृद्धी महामार्गाचे अधिकाऱ्यांकडे अनेकदा मागणी करुनही उपयोग झाला नाही. त्यामुळे फतियाबाद येथील शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाची परवानगी मागितली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात प्रकरण मार्गी लावू असे वैजापूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, आता नुकत्याच मंत्रालयाच्या दारात धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर गावातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे चित्र आहे.

शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात औरंगाबाद जिल्हा सर्वात पुढे आहे, असे प्रशासन छातीठोकपणे सांगत आहे, पण अनेक गावांमध्ये शेतकरी जमिनीच्या भावावरून प्रशासनावर नाराज आहेत. जमीन देण्यास शेतकऱ्यांनी तयारी दाखवली असली तरी भावातील भेदभाव दूर करण्याची मागणी आहे.

धर्मा पाटील प्रकरणानंतर न्याय मिळवण्यासाठी आत्महत्या हाच पर्याय आहे का? असा विचार गावातील समृद्धीबाधित शेतकरी करत आहेत. काही शेतकरी नैराश्यात गेले असून कुटुंबियांना त्यांची काळजी लागली आहे. प्रशासनाने दराची तफावत दूर करावी एवढीच आमची मागणी आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रकरण मार्गी लावू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आणखी काही दिवस वाट पाहू.

बाळू हेकडे, शेतकरी, फतियाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सरकारला जाब विचारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नोटबंदी आणि जीएसटी या दोन्ही अविचारी निर्णयाने अर्थव्यवस्थेवर घाला घातला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात नऊ टक्के असलेला विकासदर घसरुन आता ६.७ टक्क्यांवर आला. दीड लाख कोटी रुपये उत्पन्न घटल्यामुळे शिक्षण, रोजगार आणि उद्योगावर परिणाम झाला. सर्वसामान्यांचे जगणे अवघड केलेल्या भाजप सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे,' असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सागर लॉन्स येथे मंगळवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंत पुरके, प्रवक्ते रत्नाकर महाजन, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रवक्ते राजू वाघमारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार कल्याणराव काळे, विनायकराव देशमुख, पृथ्वीराज साठे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारूलता टोकस, शहराध्यक्ष सरोज मसलगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करीत नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

'देशाचे भवितव्य फक्त काँग्रेस उज्ज्वल करू शकते. राजकीय चढ-उतार अनुभवलेला काँग्रेस पक्ष कधीच मागे हटणार नाही. सध्या राज्यात जातीयवाद वाढवण्याचा शिस्तबद्ध कार्यक्रम सुरू आहे. विकासाची दृष्टी नसलेले सरकार फक्त घोषणा करीत आहे. शेतकरी मंत्रालयात विष पिऊन मरत असताना सरकारची संवेदनशीलता कुठे गेली' असा सवाल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. बेरोजगार, व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांचे प्रश्न जैसे थे आहेत. पण, सरकारला विधानसभा व लोकसभा निवडणूक एकत्र घेण्याची काळजी आहे. यांचे काम पाहून 'खोटारडे सरकार फसवणूक दमदार' असे म्हणण्याची वेळ आली. लोकांशी देणेघेणे नसलेल्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही,' अशी टीका चव्हाण यांनी केली.

'शिवसेना सत्तेवर लाथ मारणार नाही. स्वबळावर लढण्याची भाषणा करणारी शिवसेना आता इलेक्शनच्या कलेक्शनसाठी सत्तेत थांबली का,' अशी टीका वसंत पुरके यांनी केली. खोटे आकडे सादर करून आणि जाहिरातींचा मारा करून तरलेले सरकार खाली खेचण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे असे मोहन प्रकाश म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन डोंगरे व शाम उमाळकर यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

शिस्तबद्ध शिबिर

हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहून काँग्रेसच्या पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. तालुकानिहाय कार्यकर्ता नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष होते. प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखपत्र आणि गांधी टोपी देण्यात आली. सेवा दलाचे कार्यकर्ते शिबिराच्या व्यवस्थेसाठी परिश्रम घेतले. कार्यकर्त्यांना शिदोरी पुस्तिकेचे वाटप करून काँग्रेसची वाटचाल सांगण्यात आली. सोशल मीडियावरील सत्राला मोठा प्रतिसाद मिळाला. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणूक जिंकण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

दर्डा काँग्रेसच्या व्यासपीठावर

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मंत्री राजेंद्र दर्डा मागील साडेतीन वर्षांपासून पक्षापासून अलिप्त होते. कोणत्याही कार्यक्रमाला ते उपस्थित नसत, मात्र कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला अचानक एंट्री घेत त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 'तुम्हाला पक्षाने बोलावले आहे,' असे माणिकराव ठाकरे दर्डा यांना म्हणाले, तर आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या अपयशाचा पाढा दर्डा यांनी वाचला. औरंगाबाद (पूर्व) मतदारसंघात दर्डा यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्याय महागला याचिकेत विधी व सामान्य सचिवांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

न्यायालयीन शुल्कवाढीविरोधातील याचिकेत प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिले. प्रकरणात दोन फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होईल.

सामान्य पक्षकारांसह वकिलांना या शुल्कवाढीचा त्रास सहन करावा लागत असून, ही वाढ म्हणजे अन्याय असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष नितीन चौधरी यांनी महाराष्ट्र न्यायालयीन शुल्क सुधारणा कायदा २०१७ला आव्हान दिले आहे.

अन्यायकारक पाच पट वाढीव शुल्क रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. न्याय ही चैनेची नाही, तर मूलभूत अधिकाराची बाब आहे. शुल्कवाढीने पक्षकार व वकिलांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे न्यायपालिकेवर विश्वास असणाऱ्यांची अवहेलना होईल, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये विधी व न्याय व विभागाचे सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे . याचिकाकर्त्याची बाजू विष्णू मदन -पाटील मांडत आहेत. या याचिकेची सुनावणी दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएफ’साठी ‘देवगिरी’च्या मालमत्तेचा लिलाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कामागाराचा भविष्य निर्वाह निधीपोटी (पीएफ) थकित असलेले दोन कोटी ४१ लाख ८८ हजार ९०२ रुपयांची वसुली करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीचे कारवाई सुरू केली आहे. कारखान्याची जप्त केलेली यंत्रसामग्री लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे 'पीएफ' विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ज्या संचालकांच्या काळात पीएफची रक्कम थकविली, त्याच्यावर कारवाई का नाही, असा प्रश्न कारखान्याचे विद्यामान अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केला आहे.

कामगारांच्या हक्काचा भविष्य निर्वाह निधी थकविणाऱ्या कंपन्या, प्रतिष्ठाणे यांच्या विरोधात भविष्य निर्वाह निधी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. खासदार रंजनी पाटील व माजी मंत्री अशोक पाटील यांचे वर्चस्व असलेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, जालन्यातील मजूर छाप बीडी कंपनीनंतर विभागाने फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली आहे.

कामगाराचे 'पीएफ' व त्यावरील व्याज असे मिळून दोन कोटी ४१ लाख ८८ हजार ९०२ रुपये 'देवगिरी'कडे थकित आहेत. ही रक्कम सप्टेंबर २०१७अखेरची असून, वारंवार नोटीस देऊनही कारखाना व्यवस्थापनाने रक्कम भरण्यास समर्थता दर्शविली नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह विभागाचे आयुक्त एम. एच. वारसी यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्त वामन नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधिकारी सुभाष नंदनवार यांनी या कारखान्याची जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई नुकतीच केली. 'पीएफ'ची रक्कम वसुलीसाठी जप्त केलेल्या यंत्रसामग्री लिलावात काढण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरू केल्याचे 'पीएफ' विभागातर्फे सांगण्यात आले.

त्यांच्यावर कारवाई का नाही : काळे

दरम्यान, कामगाराच्या हक्काचा पीएफ थकित आहे. तो आमच्या कार्यकाळातील नाही, असे कारखान्याचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. ज्यांच्या कार्यकाळात ही रक्कम थकविली गेली, त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅँकांना वारंवार बुस्टर डोस अयोग्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशभरातील २१ राष्ट्रीयकृत बँकांना तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधीचे बुस्टर पॅकेज दिले. याचे स्वागतच आहे, पण आम्हाला बँकांची काळजी आहे. वारंवार बुस्टर देणे, एनपीए अकाऊंटला काहीही न विचारणे ही सरकारची भूमिका अयोग्य आहे,' असे परखड मत ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केले.

सार्वजनिक क्षेत्रातील अर्थात सरकारी बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने नुकत्याच नव्याने बँकिंग सुधारणा जाहीर केल्या. या विषयी बँक युनियनची भूमिका मांडताना तुळजापूरकर म्हणाले, 'बुस्टर देणे आणि दुसरीकडे एनपीए अकाऊंटवाल्यांची अर्धी कर्ज, थकबाकी माफ करण्यास सांगणे ही दुहेरी भूमिका चुकीची आहे. बँकांच्या एकूण परिस्थितीला ते घातक आहे. वारंवार बँकांना ती कर्जे माफ करा असे शासनाने सांगू नये. कारण बँकांचे किंवा सरकारचे पैसे हे कर दात्यांचे आहेत. यात सर्वसामान्य माणूस भरडला जाणार आहे. आधीच कर दात्यांची संख्या तीन ते चार टक्के आहे. हा त्यांचा पैसा आहे. यामुळे शासनाचे स्वागत असले, तरी बँकांबाबतीतील भूमिका अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. बुस्टरअंतर्गत सरकारतर्फे बँकांना ८८ हजार कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात येणार आहे. या शिवाय बँकांच्या सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोचाव्यात यासाठी बँकांना कृती आराखडाही देण्यात आला आहे. बँकांचे रुपडे पालटणार असताना एनपीए खातेदारांना व ठेविदारांना पैसा सरकारी बँकांमध्ये सुरक्षित राहिल, याची ग्वाही केंद्रशासनाने दिली आहे. चालू आर्थिक वर्षात स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदासह अन्य सरकारी बँकांना होणाऱ्या मदतीचा उपयोग सर्वसामान्य ग्राहकांना चांगल्या सुविधांच्या माध्यमातून होईल.'

सरकारने सार्वजनिक बँकांची परिस्थिती सुधारण्यासाठी सहा कलमी योजना आखली आहे. त्या अंतर्गत ग्राहकांप्रती जबाबदारी, एसएमई क्षेत्राच्या विकासासाठी मदत आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बँकांच्या सेवांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. बँकांकडून ठरवल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक धोरणांमध्ये सरकार हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बँकांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे.

- देविदास तुळजापूरकर, राष्ट्रीय सरचिटणीस, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखाच्या लाचप्रकरणी आयपीएसविरुद्ध गुन्हा?

$
0
0

नांदेड : अवैध वाळू वाहतुकीसंदर्भातील गुन्ह्यात आरोपींना सहकार्य करण्यासाठी आयपीएस अधिकारी जी. विजयकृष्णन यादव यांच्यावतीने दोन लाख रुपयांची लाच मागून एक लाख रुपये स्वीकारताना सन्नीसिंग इंदरसिंग बुंगई (वय ३४) याला पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती विभागातर्फे करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे विजयकृष्णन यांच्यावर पहिल्याच नियुक्तीवेळी ही कारवाई करण्यात आली आहे.

विजयकृष्णन हे २०१५च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून, १८ डिसेंबर २०१७ रोजी इतवारा उपविभागात रुजू झाले आहेत. प्रशिक्षण कालावधीत ते अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी वाळू तस्करांविरुद्ध कारवाई केली होती. या प्रकरणात सहा महिन्यांपूर्वी काही जणांवर गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यातील आरोपींना मदत करण्यासाठी त्यांनी मध्यस्थांमार्फत दोन लाख रुपयांची मागणी केली. संबंधिताने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तेथे तक्रारही नोंदवली; परंतु दरम्यानच्या काळात जी. विजयकृष्णन् प्रशिक्षणासाठी गेले होते. या प्रकरणात मंगळवारी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

पथकाने सापळा रचला. इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुना मोंढा परिसरात सन्नीसिंग इंदरसिंग बुंगई (वय ३४) याच्यामार्फत एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. सन्नीसिंग बुंगई याला अमरावतीच्या लाचलुचपत विभागाने पकडले. ही लाच विजयकृष्णन यांनीच मागितल्याचे तपास निष्पन्न झाले होते. या सापळ्यानंतर जी. विजयकृष्णन यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

निवासस्थानी छापा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीय विजयकृष्णन यांच्या तेलंगणमधील मूळ गावी व नांदेड येथील निवासस्थानी पथकाने छापा मारला. पण, छाप्यात काय मिळाले याची माहिती समजली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सन्नीसिंग बुंगई याला ताब्यात घेतले आहे. या दोघांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात टँकरची शंभरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याच्या चार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी इतर जिल्ह्यांना मात्र जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यातील ८६ गावांमध्ये तब्बल १०० टँकरद्वारे नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक टंचाईच्या झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसत आहेत. जिल्ह्यामधील औरंगाबाद, गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड या सात ७ तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ७८ गावांमधील तब्बल एक लाख ७५ हजार नागरिकांची तहान ८९ टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. औरंगाबादसह परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे या जिल्ह्यांना उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नांदेड जिल्ह्याच्या विविध भागात पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर वाढवण्याचे अनेक प्रस्ताव जिल्हाप्रशासनाकडे येत असल्यामुळे येणाऱ्या काळात टँकरसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के पाऊस झाला असला तरी भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात टँकर सुरू झाले आहेत. दोन्ही तालुक्यातील चार गावांमधील १२ हजार नागरिकांची तहान सहा टँकरद्वारे भागवण्यात येत आहे.

टँकर सुरू असलेले गाव, लोकसंख्या

तालुका.....................गावे.............. लोकसंख्या............ टँकर

औरंगाबाद..................३......................६३४८...............४

फुलंब्री.....................२०.......................५३२१०..........२८

गंगापूर......................४२...................१०२६५२............४५

वैजापूर.....................४....................११०१...................४

खुलताबाद...............४...........................५२७६...............३

सिल्लोड................३........................४५२८....................३

भोकरदन..............३.........................११२४१................५

जाफ्राबाद.............१........................८८२...................१

(नांदेड जिल्ह्यात ५ टँकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यात काँग्रेसची स्वबळाची भाषा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसने राज्यभर चाचपणी सुरू केली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत जिल्हानिहाय कार्यकर्ता शिबिर घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यावर पक्षाने भर दिला आहे. राज्यभरातील मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा निर्णय घेण्याचे पक्षाचे नियोजन आहे. आघाडीला विरोध नसला तरी आघाडी होईलच असे आताच सांगता येणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. जिल्हाभरातील मतदारसंघनिहाय काँग्रेस, युवक काँग्रेस आणि महिला आघाडीचे स्वतंत्र शिबिर झाले. या शिबिराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रभारी मोहन प्रकाश आणि उपसभापती माणिकराव ठाकरे उपस्थित होते. राज्यात काँग्रेसला बहुमत मिळण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. शेती, शिक्षण, उद्योग, रोजगार अशा सर्व पातळीवर भाजप-शिवसेना सरकार अपयशी ठरल्याची टीका अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी त्यात तथ्य नसल्याचे चव्हाण म्हणाले. 'सत्तेसाठी लाचार शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता नाही. सेनेची सत्तेवर लाथ मारण्याची भाषा इतक्या वेळेस झाली आहे की लोकांनी मोजणे सोडले. ती भाजपसोबत फरफटत जाणार आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होईलच असे सांगता येणार नाही. राज्यभर कार्यकर्त्यांशी चर्चा करून वरिष्ठ पातळीवर आघाडीचा निर्णय होईल' असे चव्हाण म्हणाले.

राज्यात बहुमत आणण्याचे पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, समविचारी पक्षांशी चर्चा करून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 'संघर्ष यात्रा, संविधान बचाव रॅलीत समविचारी पक्ष एकत्र आले होते. निवडणुकीतही त्यांच्यासोबत आघाडी करू' असे माजी चव्हाण म्हणाले. सध्या राज्यात पक्षाची ताकद लक्षात घेऊन बहुमत मिळवण्यासाठी नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गावपातळीवर पक्षाची यंत्रणा कार्यरत करण्याबाबत नेत्यांनी मार्गदर्शन केले.

आघाडीचा धर्म

'आघाडीचा धर्म पाळताना दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागते. ही कठीण गोष्ट असते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जागा लढवण्याच्या तयारीने कामाला लागा असे कार्यकर्त्यांना सांगण्याची गरज आहे. आघाडीला माझा विरोध नाही. मात्र, काँग्रेसने आपली ताकद लक्षात घ्यावी' असे विरोधी पक्षनेते विखे म्हणाले. विखे यांच्या स्वबळाच्या वक्तव्याचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

विषयप्रयोग करणारे सरकार

'धर्मा पाटील या शेतकऱ्याला मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करावी लागणे हे सरकारचे अपयश आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मंत्री उलटसुलट बोलून संभ्रम वाढवत आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी. कीटकनाशकाने शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याच्या प्रकरणातही कारवाई झाली नाही. हे सरकार जनतेवर विषप्रयोग करणारे आहे' अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन वर्षात ५६ शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सततची नापिकी, नुकसान, कर्जमाफीचा घोळ तसेच सावकारीपाशात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मराठवाड्यातील ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपवले.

यंदा मराठवाड्याच्या चार जिल्ह्यात दमदार पाऊस झाला, खरीपात पीकेही जोमाने आली. मात्र, बोंडअळीमुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तुलनेत कमी पाऊस झाला असून या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्या करत आहेत. नवीन वर्षांतही त्यात खंड पडलेला नाही. अत्यल्प व अनियमित पावसामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतीचे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले आहे. खरिपाचे उत्पन्न घटल्यामुळे हवालदिल झालेला बळीराजा आत्महत्या करीत असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. २०१८ वर्षाच्या प्रारंभीच जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील ५६ शेतकरी आत्महत्यांची नोंद सरकार दप्तरी झाली आहे. एकूण आत्महत्यांपैकी केवळ लातूर जिल्ह्यातील चार पात्र प्रकरणांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यात आली आहे. उर्वरित ४९ आत्महत्यांची प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत, तर तीन प्रकरणांना समितीने अपात्र ठरवले आहे.

जिल्हा आत्महत्या

उस्मानाबाद १२

जालना १०

लातूर ७

परभणी ६

बीड ६

औरंगाबाद ५,

हिंगोली ५

नांदेड ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेस आजपासून सुरूवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा गुरुवारपासून (एक फेब्रुवारी) सुरू होत आहेत. या परीक्षा १७ फेब्रुवारीपर्यंत चालतील. लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून होणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सूचना मंडळातर्फे संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत. या परीक्षेसाठी एक लाख ६४ हजार ८७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६६ हजार ६४८ विद्यार्थी कला शाखेचे, ७९ हजार विद्यार्थी विज्ञान शाखेचे, तर १३ हजार ६९४ विद्यार्थी वाणिज्य शाखेचे आहेत. एमसीव्हीसीचे पाच हजार ५३८ विद्यार्थी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरीय रेल्वे डब्यांची लातूरमध्ये निर्मिती

$
0
0

मुंबई: लातूर येथे उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोचे डबे निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बुधवारी झालेल्या भेटीत दिली आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

सह्याद्री अतिथीगृहावर रेल्वेमंत्री गोयल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत या निर्णयाची माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे मराठवाड्याच्या आर्थिक, औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या बालहट्टाने ‘एसटी’चा घाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी प्रकल्पातून सिटी बस सुरू करण्याची घोषणा हवेत विरून जावू नये म्हणून महापालिकेने मोठा आटापिटा करत, राजकीय पक्षाचा आधार घेत शहरात एसटी महामंडळाच्या तीन नव्या सिटी बस सुरू केल्या. मात्र त्यांना प्रवशांचा नगण्य प्रतिसाद भेटत असून, त्यामुळे एसटीचा दररोज किमान आठ हजांचा घाटा सहन करावा लागत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी म्हणजेच २३ जानेवारी २०१८ रोजी सिटी बस सुरू करण्याची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली. महापालिकेला स्वतंत्र बस सेवा सुरू करता आली नाही. त्यामुळे त्यांनी परिवहन मत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करून ऐन शेवटच्या क्षणी एसटी महामंडळाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हर्सूल ते नक्षत्रवाडी, केंब्रिज शाळा ते मिटमिटा आणि महानुभव आश्रम ते झाल्टा फाटा या मार्गावर तीन सिटी बस सुरू करण्यात आल्या. मागील आठ दिवसांपासून या मार्गांवर सिटी बसच्या प्रत्येकी तीन फेऱ्या होत आहेत, मात्र या बसला मिळणारा प्रतिसाद अत्यअल्प आहे. एका फेरीत दोन ते सात प्रवासी प्रवास करतात. या फेरीतून एसटीचा डिझेल खर्च आणि साधे चालक, वाहकाच्या पगाराचे पैसेही निघत नाहीत. या फेरीतून दररोज एकूण चारशे ते पाचशे रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तर बसच्या फेऱ्यांवर साडेआठ हजारांचा खर्च होतो. त्यामुळे एसटीचे आतापर्यंत ६४ हजारांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रसिद्धीसाठी पुढाकार नाहीच

महापालिकेच्या पुढाकाराने एसटी महामंडळाच्या तीन बस शहरात तीन मार्गांवर सुरू करण्यात आल्या. या बसच्या मार्गाबाबत आवश्यक तेवढी प्रसिद्धी महापालिकेकडून करण्यात आलेली नाही. यामुळे या बसची माहिती प्रवाशांना नाही. याचाच फटका एसटी विभागाला बसल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

...तर वरिष्ठांचे मार्गदर्शन

वरिष्ठ कार्यालयाकडून तीन सिटीबस सुरू करण्याचा आदेश आला. त्याप्रमाणे बस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या या बसला प्रतिसाद कमी आहे. आणखी काही दिवस आम्ही ही बस सुरूच ठेवू. त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही, तर वरिष्ठ कार्यालयाकडून जे निर्देश येतील त्या प्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती सिडको आगार एकचे व्यवस्थापक पी. ए. भोंडवे यांनी दिली.

...अन् गणित बिघडले

- २३ जानेवारी १८

- ३ सिटी बस सुरू

- ३ मार्गांवर फेऱ्या

- २ ते ७ प्रवासी एका फेरीत

- ४०० रुपयांचे उत्पन्न

- ८००० रुपयांचा तोटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images