Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गुंतवणूकदारांची सव्वा दोन कोटींची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कळंब (जि. उस्मानाबाद) येथील शुभ कल्याण मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या १३ संचालकाविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील गुंतवणूकदारांची सव्वा दोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला. नोव्हेंबर २०१६ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत हा प्रकार घडला.

रितेश सतीश कृपलानी (वय ३३, रा. सिंधी कॉलनी) यांचे रंगोली कलेक्शन नावाने त्रिमूर्ती चौकात दुकान आहे. कृपलानी यांचा गुलमंडी येथील शुभ कल्याण क्रेडिट सोसायटी मध्ये दोन वर्षांपासून डिडी काढण्याचा व्यवहार होता. नोव्हेंबर २०११ मध्ये कृपलानी यांनी त्याच्या व कुटुंबीयातील सदस्यांच्या नावाने डिडी काढण्यासाठी सोसायटीचे प्रतिनिधी रविंद्र जाधव यांच्याकडे १४ लाख ९२ हजार पाचशे रुपयांची रक्कम देत डिडी तयार केले होते. सबंधित व्यापाऱ्यांना कृपलानी यांनी हे डिडी पाठविले. त्यांनी ते बँकेत टाकले असता ते वटले नव्हते. व्यापाऱ्यांनी कृपलानी यांना हा प्रकार कळविला. कृपलानी यांनी माहिती घेतली असता त्यांची रक्कम सोसायटीच्या दिलीपनगर, हावरगाव ता. कळंब येथील मुख्य कार्यालयात वळवण्यात आल्याची माहिती मिळाली तसेच संचालकांच्या सांगण्यावरून या डिडीचे पेमेंट स्टॉप केल्याचे समजले. कृपलानी यांनी संचालक मंडळाची भेट घेतली असता त्यांना रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र रक्कम न देता टाळाटाळ करण्यात आली. कृपलानी यांच्यासोबत शहरातील काही इतर गुंतवणूकदारांची देखील ठेव म्हणून घेतलेली एकूण सव्वा दोन कोटींची रक्कम सोसायटीच्या संचालकाने परत केली नसल्याचे समोर आले. या प्रकरणी अखेर रविवारी पोलिस ठाण्यात संचालक दिलीप शंकरराव आपेट, भास्कर बजरंग शिंदे, अजय आपेट, नागिनीबाई शिंदे, विजय आपेट, कमलाबाई बाबासाहेब नखाते, शालिनी आपेट, अभिजित आपेट, प्रतिभा अप्पसाहेब आंधळे, आशा रामराव बिराजदार, बापुराव ज्ञानोबा सोनकांबळे, शिवकुमार गंगाधर शेटे व राम महादेव रोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिल्लोड हॉस्पिटलमधून १ दिवसाचे बाळ चोरीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून एक दिवसाचे बाळ चोरीस गेल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. या मुलीचा जन्म बुधवारी पहाटे एक वाजता झाला होता. या मुलीची आई लघुशंकेला गेली असता सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

भोकरदन तालुक्यातील नळणी येथील असमा शेख असीफ शेख मियाँ यांची शासकीय उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी पहाटे प्रसुती झाली. त्या बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लघुशंकेसाठी जाऊन आल्या. तोपर्यंत त्यांची एक दिवसाची मुलगी गायब झाली होती. रुग्णालयात शोध घेऊनही ती सापडली नसल्याने आई व तिच्या नातलगांनी शहरभर फिरून शोध घेतला. पण, मुलगी सापडली नसल्याने शहर पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आहे.

सीसीटीव्ही बंद

रुग्णालयाच्या इमारतीलगतच शहर पोलिस ठाणे आहे. ठाण्याच्या शेजारी असलेल्या इमारतीमधूनच बाळ चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय रुग्णालयात तीन सुरक्षारक्षक तैनात असतात. सुरक्षारक्षक तैनात असताना हा प्रकार घडल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हॉस्पिटलचे सीसीटीव्ही कॅमेरे दोन वर्षांपासून बंद आहेत. येथील हॉस्पिटलमध्ये सिल्लोडसह कन्नड, सोयगाव, भोकरदन तालुक्यातील रुग्णांची संख्या अधिक असते. प्रसुती वार्डात पुरुषांना प्रवेश नसतांना ते बिनधास्त फिरतात.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ आटोपून आम्ही केबीनमध्ये बसलो होतो. यावेळी पाच वाजेच्या सुमारास बाळाची आजी बाळ चोरीस गेल्याचे सांगत आली. आम्ही शहानिशा करून तातडीने पोलिसांना कळवले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासास अडथळा येत आहे.

-डॉ. बाबुराव सपकाळ, वैद्यकीय अधीक्षक

मी लघुशंकेसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी माझे बाळ चोरीस गेले आहे. एक बुरखाधारी महिला माझ्या खाटेजवळ आली होती.

-असमा शेख, बाळाची आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्राद्वारे प्लॉट विकणार्यास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट मुख्त्यारनाम्या आधारे सातारा परिसरातील दोन प्लॉटची १७ लाख ९३ हजारांना विक्री करून व्यापाऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणातील आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांच्यासमोर हजर केले असता ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले. आजम खान अब्दुल रहेमान खान (रा. लोटाकारंजा मरकस मस्जीद) असे आरोपीचे नाव आहे.

सिडकोतील हाश्मी सय्यद शफी सय्यद बहादूर (६७, रा. प्लॉट क्र. १, जमजम हाऊस, एन-१२, नवलटाटा स्टेडियमजवळ) यांची प्लॉटिंगचा व्यवसाय करणारा दलाल आजम खान याच्याशी भेट झाली होती. त्याने सातारा परिसरातील सोनियानगरात आठ हजार स्क्वेअर फुटाची जागा असून हे प्लॉट मूळ मालक ओंकार गणपत गणवीर असल्याचे हाश्मी यांना सांगितले होते. दरम्यान हाश्मी सय्यद यांनी मुलगी नाझिया तबस्सुम अली सय्यद शफी हिच्या नावे त्याच जागेतील सोळाशे स्क्वेअर फुटांचा आणखी एक प्लॉट आठ लाख ९३ हजारात खरेदी केला. अशाचप्रकारे आजम खानने अनेकांना गंडविल्याचा प्रकार नुकताच समोर आल्यानंतर हाश्मी यांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेत तक्रार दिली. त्यावरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस बुधवारी न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी आरोपीने अशा प्रकारे अनेकांना फसवलेले आहे, यात इतर साथीदारांचा सहभाग आहे, त्यांना अटक करण्यासाठी आरोपीच्या कोठडीची मागणी केली न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पृथ्वीराज चव्हाण, खडसेंची भेट ?

$
0
0

औरंगाबाद: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मंगळवारी रात्री चिकलठाणा विमानतळ परिसरात भेट झाल्याचे समजते. त्यांनी काही वेळ एकांतात चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नाही.

काँग्रेसच्या शिबिरानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मंगळवारी शहरात आले होते. त्याचवेळी काही कामानिमित्त भाजप नेते खडसे देखील शहरात होते. सायंकाळी हे दोन्ही नेते विमानतळावर भेटल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना पक्षात येण्याचे जाहीर निमंत्रण नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात दिले आहे. खडसे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे, असे त्यांनी नमूद केले होते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व खडसे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वसामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे. महागाई कमी करण्याबाबत २०१८ मधील अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही. मोदी सरकारचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा नसल्यामुळे थेट कौटुंबिक बजेट कोलमडणार असल्याची सार्वत्रिक भावना आहे.

शहागंज परिसरातील गौरव जैस्वाल यांच्या कुटुंबात एकूण सात सदस्य आहेत. व्यावसायिक असलेल्या जैस्वाल कुटुंबाला केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाकडून भरपूर अपेक्षा होत्या. कर सवलत, महागाईवर ठोस उपाययोजना, शैक्षणिक-आरोग्य सवलती आणि व्यवसायाला अनुकूल धोरण याबाबतचे निर्णय अपेक्षित होते. मात्र, शेतकरी आणि गरीब वर्गासाठी सवलतींचा वर्षाव असलेल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांच्या हाताला फारसे काही लागले नाही. परिणामी, जैस्वाल यांच्यासारख्या हजारो कुटुंबांचा भ्रमनिरास झाला. 'या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने विविध राज्याची विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. विशेषतः शेतकऱ्यांना खूष करण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे कस्टम ड्यूटी वाढल्याने टीव्ही, मोबाइल या वस्तू महागणार आहेत. त्याची मध्यमवर्गाला सर्वाधिक झळ बसणार आहे' असे गौरव जैस्वाल यांनी सांगितले. प्रत्येक बिलावर अधिभार वाढवल्याने एक टक्का अधिक रक्कम आकारली जाणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना अधिक फटका बसेल असे त्यांना वाटते. अबकारी कर कमी केल्यामुळे पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. मात्र, हा निर्णय फारसा दिलासादायक नसल्याचे सर्वसामान्यांना वाटत आहे. कुटुंबाच्या खर्चात वाढ होईल आणि नव्याने महिन्याचे नियोजन ठरवण्याची चिंता आहे.

महागाईचे काय ?

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्यावर होतो. किरकोळ दरवाढ कमी करणे यावरील पुरेशी उपाययोजना नाही. सरकारने अर्थसंकल्पात महागाईबाबत उपाययोजना केली नाही. गरीब कुटुंब आणि शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळणार असला तरी मध्यमवर्गीय महागाईने होरपळतील, असे जैस्वाल यांना वाटते.


आगामी निवडणूक लक्षात घेऊन अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे. पण, महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना नाही. रोजगारात वाढ करण्याची घोषणा प्रभावी वाटत नाही. लघु व मध्यम उद्योगांना मुबलक कर्ज देण्याचा निर्णय योग्य वाटतो.

- गौरव जैस्वाल, व्यावसायिक

सात सदस्य असलेल्या जैस्वाल कुटुंबाचा दरमहा खर्च ३० हजार रूपये आहे. हा खर्च तीन प्रकारे विभागला जातो. किराणा ५० टक्के, दैनंदिन खर्च ३० टक्के, करमणूक १० टक्के आणि किरकोळ खर्च १० टक्के अशी विभागणी आहे. मागील वर्षी हा खर्च साधारणतः २२ ते २५ हजार रूपये होता. जीएसटी लागू झाल्यानंतर बजेट कोलमडले. डेली निड्सवर पाच टक्के जीएसटी असल्यामुळे ३५ रूपये किमतीचे ब्रेड पॅक ३८ रूपये झाले. या प्रकारे बहुतेक वस्तूंची दरवाढ झाली आहे. चार वाहने असलेल्या जैस्वाल यांना पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा सर्वाधिक फटका बसतो. सध्या हा खर्च सर्वाधिक असल्याने दरमहा खर्च ३५ ते ३७ हजार रूपयांवर पोहचेल असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांना वेग मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात एक लाख कोटी रूपये रेल्वे विकासासाठी निधी देण्यात आलेला आहे. या निधी अंतर्गत मराठवाड्याचे अनेक रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात मनमाड परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी बाराशे कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली. याशिवाय औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या इमारतीच्या कामही यंदाच्या वर्षी सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही रेल्वे अर्थसंकल्प हा सर्वसाधारण अर्थसंकल्पासोबतच सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात लातूर येथे रेल्वे कोच तयार करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय मनमाड मुदखेड दौंड रेल्वे मार्गासाठी ८६१ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय मुदखेड ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय चार हजार किलोमीटर इलेक्ट्रिफिकेशन होणार असून ६०० रेल्वे स्टेशन आधुनिक रेल्वे स्टेशन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मनमाड ते परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी बाराशे कोटी रूपयांपर्यंतची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे मराठवाड्यातील रखडलेले प्रकल्प वेगात पूर्ण होण्यास मदत होईल, अशी माहिती रेल्वे विभागाच्या सुत्रांनी दिली.

अर्थसंकल्पात रेल्वे विभागाने रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव निधीची व्यवस्था केली आहे. हा निधी कोणत्या कामांना दिला जाईल याबाबत आताच सांगता येत नाही. पीन बुक आल्यानंतर मराठवाड्याला काय मिळालं हे स्पष्ट होईल.

ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष मराठवाडा रेल्वे विकास समिती

मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी दिला आहे. बीड परळीसाठी दोन हजार कोटी, मुदखेड - मनमाड- दौंडसाठी ८६३ कोटी आणि जालना खामगावसाठी तीन हजार कोटी रूपये दिल्याची माहिती मिळाली आहे. अजूनही मराठवाड्याला यंदाही मिळेल अशी अपेक्षा आहे.

राज सोमाणी, रेल्वे सेना

यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची अपेक्षा पूर्ण करणारा आहे. रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यामुळे मनमाड ते परभणी या रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी निधी मिळलेला आहे. याशिवाय अन्य रेल्वे मार्गांसाठी भरिव तरतूद करण्यात आली आहे.

गौतम नाहटा, नमो हायवे, रेल्वे आर्गनाइजेशन

रेल्वे अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांची अपेक्षा रेल्वे सुरू करण्याबाबतची असते. यंदाच्या अर्थसंकल्पात एकही घोषणा झाली नाही. यामुळे या अर्थसंकल्पाकडून जास्त अपेक्षा करणे चुकीचे आहे. रेल्वे अर्थसंकल्पात नुसत्या आकडेवारीची घोषणा केली आहे. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या जनतेच्या अपेक्षांना पाने पुसली असेच म्हणावे लागेल.

अरूण मेघराज, रेल्वे संघर्ष कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायंकाळी सात नंतर झाले पेट्रोल पंप बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इॅथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत नागरिकांमध्ये ऑइल कंपन्यांकडून जनजागृती करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (एक फेब्रुवारी) सायंकाळी सातनंतर पेट्रोलची विक्री बंद करण्यात आली.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री केल्यामुळे नागरिकांकडून बऱ्याच तक्रारी येत आहे. या तक्रारी दूर करण्यासाठी, तिन्ही ऑइल कंपन्यांनी शहरात जनजागृती करावी, अशी मागणी औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास आणि अन्य सदस्यांनी पत्रकार परिषदेत केली होती. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलिस; तसेच संबंधित ऑइल कंपन्यांना पत्रही दिले होते. त्याची दखल घेतली नसल्याने अखेर असोसिऐशननं सकाळी सात ते सायंकाळी सात यादरम्यान पेट्रोल विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसारअखेर गुरुवारपासून पेट्रोल पंप सायंकाळी सातनंतर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारकांना पेट्रोल भरण्यासाठी शहराबाहेर जावे लागले. ऑइल कंपन्यांकडून जनजागृती केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी माहिती अखिल अब्बास यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जर्मनीतील शिक्षणसंधी;आज विशेष व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जर्मनीतील उच्च शिक्षणविषयक संधींबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 'जर्मन अॅकॅडेमिक एक्स्चेंज सर्व्हिसेस'तर्फे (डाड) या सत्रात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 'महाराष्ट्र टाइम'या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

हा कार्यक्रम विद्यापीठातील भूगोल विभागाच्या सभागृहात होणार आहे . जर्मनीमध्ये उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधी, संशोधन संधी आणि शिष्यवृत्त्या याबाबत 'डाड'च्या पुणे माहिती केंद्राचे मानद संचालक देवी आरांड, माहिती अधिकारी धनश्री देवधर आणि शुभदा चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जर्मनीमधील शिक्षणांच्या संधींची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवकांची कळसूबाईला गवसणी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातले माऊंट एव्हरेस्ट अशी ख्यात असणारे, गिर्यारोहकांना नेहमीच खुणावणारे कळसूबाई शिखर सर करत शहरातील सात युवकांनी त्याला गवसणी घातली.

गिर्यारोहण हा क्रीडा प्रकार खरा तर भन्नाटच. त्यात आपण गुंतलो, की मनाला वेगळेच वेड लागते. प्रदूषित व सततच्या कटकटमय जगण्यातून थोडा वेळ काढून निसर्गाच्या कुशीत, डोंगर रांगाच्या सानिध्यात सर्वस्व विसरून जावून मिळणारा आनंद वेगळाचा. त्यामुळे गिर्यारोहणाकडे सध्या अनेकांचा ओढा वाढला आहे. नामंकित कंपनीत नोकरीला असलेले कीर्तीकुमार वैद्य, सतीश कोल्हे, अनिल जठार, जमीर खान, त्र्यंबक सोनवणे, पवन साळुंके, अविनाश रणमले यांनाही निसर्गभ्रमंतीची आवड निर्माण झाली, ती कंपनीतर्फे आयोजित गौताळा भ्रमंतीमुळे. त्या वेळी त्यांची ज्येष्ठ गिर्यारोहक प्रा. सुभाष फासे यांच्याशी भेट झाली. चर्चेतून साहसी पर्यटन करण्याचा निर्णय या ग्रुपने घेतला. आणि ध्येय ठरले ते रतनगड ते कळसूबाई शिखर सर करण्याचे. फासे सरांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी पूर्व तयारी केली. त्यानंतर २५ जानेवारी रोजी सायंकाळी टिम रतनगडच्या पायथ्याशी पोहचली. तंबूत रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे मोहीम सुरू झाली, ती रतनगड सर करण्याची. प्रा. फासे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासांत सर्वांनी गड सर केला. रॅपलिंगचा थरार अनुभवत सदस्य पुन्हा खाली आले.

मध्यरात्री गाठले शिखर

'एक दिवस मुक्काम व परिसरातील निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर कळसबाई शिखराच्या दिशेने टीमने कूच केले. त्यानंतर निसर्गाचा, ट्रेकिंगचा आनंद घेत पथकाने सायंकाळी शिखर चढण्यास सुरुवात केली. जिद्द, चिकाटीच्या जोरावर मध्यरात्री शिखर गाठले आणि त्यानंतर सूर्योदयाचा असीम आनंद लुटता आला,' अशी माहिती अनिल जठार यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणीतील अनधिकृत क्लिनिकविरुद्ध उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी परिसरातील अनधिकृत क्लिनिक-हॉस्पिटलविरुद्ध मराठवाडा विक्रांद संघटनेच्या वतीने गुरुवारी उपोषण करण्यात आले. छावणीतील अनधिकृत क्लिनिक-हॉस्पिटलवर कारवाई करावी, त्यांचा परवाना रद्द करण्याचे पत्र मेडिकिल कौन्सिलला पाठवण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले.

'बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट १९४९'चे उल्लंघन करुन छावणी परिसरामध्ये परिषदेची स्थापना झाल्यापासून क्लिनिक-हॉस्पिटल अनधिकृतरित्या चालविण्यात येत आहेत. अशा क्लिनिक-हॉस्पिटलविरुद्ध कायदेशीरदृष्ट्या कारवाई करण्याची मागणी वारंवार करुनही कारवाई केली जात नसल्यामुळे संघटनेचे शहराध्यक्ष शेखर जगताप, अर्शद खान, रिझवान खान, सय्यद वसीम अली यांनी गुरुवारपासून परिषदेसमोर उपोषण सुरू केले. यानिमित्त अनधिकृत क्लिनिक-हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांचा परवाना रद्द करण्याचे पत्र महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पाठवण्यात यावे, अनधिकृत क्लिनिक-हॉस्पिटलवर कारवाई न करणाऱ्या जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, त्याचप्रमाणे छावणी परिषदेच्या आर्थिक नुकसानीसाठी जबाबदार अनधिकृत खासगी वैद्यकीय व्यावसायिक व त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून आर्थिक नुकसानीची भरपाई करावी, अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे शहराध्यक्ष शेखर जगताप यांनी सांगितले.

उपोषणास पवारांचा पाठींबा

माजी खासदार उत्तमसिंग पवार यांच्यासह युवक काँग्रेसचे छावणी विभाग अध्यक्ष अलमान अयुब खान, जिल्हा सरचिटणिस संजय धर्मरक्षक, वॉर्ड अध्यक्ष नईम बेग यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन उपोषणाला पाठींबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिल्लेगाव पोलिस ठाणे हद्दीतील लासूर स्टेशन व शिरेगाव येथे छापा टाकून २४ लाखांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई गुरुवारी भल्या पहाटे केली. यामध्ये हिरा, गोवा गुटखा व रॉयल तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.

लासूर स्टेशन आणि शिरेगाव परिसरात गुटखा माफियाकडून मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून सकाळी सापळा रचण्यात आला. शिरेगाव येथील दादासाहेब लक्ष्मण कऱ्हाळे याच्या घरातून ५७ गोण्या तसेच दिनेश कैलास गोटे याच्या घरातून ६३ गोण्या गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. तसेच लासूर स्टेशन येथील सलीम जाहेद बेग याच्या घरातून व पिकअप व्हॅनमधून एकूण १०९ गुटख्याच्या गोण्या जप्त करण्यात आल्या. या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, या गुटख्याचा मूळ मालक कल्पेश भरत सोनी (रा. लासून स्टेशन) हा किराणा दुकानाचा व्यापारी मात्र पसार झाला आहे. पोलिसांनी एकूण चोवीस लाखांचा गुटख्याचा माल अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे सुपूर्त केला.

यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक उज्वला वनकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय बी. जी. दुलत, व्ही.जी. जाधव, एएसआय गफार पठाण, गणेश जाधव, वसंतराव लटपटे, विठ्ठल राख, विक्रम देशमुख, रंगराव बावस्कर, संजय काळे, रतन वारे, नवनाथ कोल्हे, रमेश अपसनवाड, संजय भोसले, आशिष जमधडे, राहुल पगारे, सागर पाटील, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगिता थोरात, सुरेखा वाघ, पुष्पांजली इंगळे, रजनी सोनवणे यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोग्य’साठी भरीव योजना, अंमलबजावणीचे काय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशातील नागरिकांच्या आरोग्यासाठी भरीव योजना व तरतुदी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्या आहेत व त्याचे वैद्यकीय वर्तुळातून स्वागत करण्यात आले आहे; परंतु आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार तेवढा पैसा खर्च करणार आहे का आणि अर्थसंकल्पात म्हटल्यानुसार आरोग्य सेवा नागरिकांना खरोखर मिळणार आहे का, याबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याचवेळी वारंवार मागणी करुनही सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३ टक्के एवढ्या आरोग्यावरील खर्चाच्या तरतुदीची पूर्तता केलेली नाहीच, अशी टीका 'आयएमए'ने केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आरोग्यावरील तरतुदींचे स्वागत 'आयएमए'ने केले आहे. मात्र महत्वाच्या गोष्टी दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला परवडणारी, जरुरीच्या वेळी जवळपास उपलब्ध असणारी, जबाबदार व शास्त्रशुद्ध आरोग्य सेवा मिळण्यास अडचण तशीच राहणार असल्याचे 'आयएमए'ने म्हटले आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये काढण्याची मागणी अंशतः पूर्ण केली असली तरी ही महाविद्यालये ग्रामीण क्षेत्रात व जिल्हा रुग्णालयांशी संलग्न करण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील ५० टक्के जागा त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित करण्याची मागणी केली आहे. क्षयरोग नियंत्रणासाठी तरतुदीचे स्वागत करतानाच यापुढेही सरकारला मदत करणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. आयुष्यमान भारत योजनेत दीड लाख आरोग्य व स्वास्थ केंद्र उघडण्यात येणार असली तरी त्यासाठी १२०० कोटींची तरतूद म्हणजेच ८० हजार रपये प्रत्येकी ही फारच अपुरी तरतूद आहे. राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजनेत उपचारांसाठी रुग्णालयातील खर्चापोटी प्रती कुटुंब ५ लाखांपर्यंत रक्कम प्रत्येक वर्षी मिळण्याची तरतूद योजनेत आहे. मात्र या योजनेसाठी नेमक्या किती रकमेची तरतूद केली जाणार आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. एकट्या महाराष्ट्रात या योजनेसाठी १० हजार कोटी रुपये लागतील. मात्र मागील योजनेप्रमाणे या योजनेचा फायदा केवळ विमा कंपन्या व कॉर्पोरेट रुग्णालयांनाच न होता, छोट्या-मध्यम रुग्णालयांमध्ये ही सेवा उपलब्ध व्हावी आणि यात रुग्णांना डॉक्टर व रुग्णालयाची निवड करण्याचे स्वातंत्र मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा 'आयएमए'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी व्यक्त केली आहे.

महात्मा फुले योजनेच्या तब्बल साडेतीन ते चार पट जास्त तरतूद नवीन योजनेत करण्यात आली आहे व हे नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र यासाठी किती रकमेची तरतूद आहे हे स्पष्ट केलेले नाही. तसेच त्याची अंमलबजावणी किती प्रभावी होणार, यावर नवीन योजनेचे यश अवलंबून आहे.

- डॉ. अजित भागवत, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ

खरे म्हणजे १०० टक्के नागरिकांना उपचारांसाठी विमा संरक्षण मिळायला पाहिजे. तरीही जवळजवळ ५० कोटी जनतेला हा लाभ मिळणार आहे, ही नक्कीच आनंदाची बाब आहे. अर्थात, योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे.

- डॉ. उल्हास कोंडपल्ले, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

नवीन योजना नक्कीच स्वागतार्ह आहे व त्याचा लाभ ५० कोटी जनतेला होणार आहे. मात्र त्याचबरोबर आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर दिला जाणे तितकेच गरजेचे आहे. निर्यात होणाऱ्या फळांची गुणवत्ता उत्तम; परंतु आपल्या देशात मिळणाऱ्या फळांसाठी वाट्टेल त्या प्रमाणात पेस्टिसाईड वापरले जातात, त्याचे काय?

- डॉ. प्रवीण सूर्यवंशी, उपअधिष्ठाता, एमजीएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी सुविधेसाठी याचिकेत पालिका ,महावितरणला नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

राजीवगांधीनगर परिसरातील नागरीकांना किमान मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात, अशी विनंती करणाऱ्या याचिकेत केंद्र आणि राज्य शासनासह पालिका, पोलिस आयुक्त आणि विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी आहेत.

रेल्वे स्थानकाजवळ सैन्यदलाच्या जागेवरील (डिफेन्स एस्टेट) राजीवगांधीनगर परिसरातील नागरिकांना योग्य निवारा, मलनि:सारण व्यवस्था, अंतर्गत रस्ते, स्वच्छतागृह, कचरा व्यवस्थापन, स्वस्त धान्य दुकान, वीजपुरवठा आदी किमान मूलभूत सुविधा मिळाव्यात, अशी विनंती करणारी याचिका मनिषा लांडगे, रंजना थोरात, दामोधर खिल्लारे यांनी केली. याचिकाकर्त्याची बाजू रुपेश बोरा यांनी मांडली. या याचिकेची सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरेशी गँगच्या आरोपींची रवानगी जालना जेलमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा कोर्ट परिसरामध्ये सोमवारी (२९ जानेवारी) इम्रान मेहंदी व सलीम कुरेशी गँगमध्ये झालेल्या दगडफेक, मारहाण प्रकरणातील सलीम कुरेशी गँगच्या चार आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची रवानगी हर्सूल कारागृहाऐवजी जालना जिल्हा कारागृहात करण्याचे आदेश मुख्य न्यादंडाधिकारी एस. बी. पवार यांनी दिले.

माजी नगरसेवक सलीम कुरेशी खून प्रकरणातील आरोपी इम्रान मेहेंदी व त्याच्या साथीदारांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, दोन्ही गँगमध्ये कोर्ट परिसरामध्ये हाणामारी झाली होती. यातील सलीम कुरेशी गँगच्या चार आरोपींना गुरुवारपर्यंत (एक फेब्रुवारी), तर मेहेंदी गँगच्या सहा आरोपींना मंगळवारपर्यंत (सहा फेब्रुवारी) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. यापैकी कुरेशी गँगचे सलमान सलीम कुरेशी, फईम सलीम कुरेशी, अर्शद कुरेशी, अब्दुल हमीद कुरेशी या आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्याचे आदेश कोर्टाने दिले, मात्र मेहेंदी गँग व कुरेशी गँगच्या आरोपींना एकत्र हर्सूल कारागृहामध्ये ठेवले तर गँगवॉर होऊ शकते. त्यामुळे वरील चौघा आरोपींच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे चौघा आरोपींना जालना जिल्हा कारागृहात ठेवावे, अशी विनंती आरोपीचे वकील खिझर पटेल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन चौघा आरोपींची रवानगी जालना जिल्हा कारागृहात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टरची चोरी; दोघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल परिसरातून ट्रॅक्टर चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना बुधवारी (३१ जानेवारी) अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, शुक्रवारपर्यंत (दोन फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले.

याप्रकरणी इमरान इब्राहिम शेख (३६, रा. पटेलगल्ली, हर्सूल) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीने दहा डिसेंबर २०१७ रोजी रात्री घरासमोर ट्रॅक्टर उभे केले होते. फिर्यादी १४ डिसेंबर रोजी बाहेरून घरी आला असता ट्रॅक्टरची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे साडेपाचला तोंडाला रुमाल बांधलेली एक अनोळखी व्यक्ती ट्रॅक्टर घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ट्रॅक्टर चोरीची तक्रार दिल्यानंतर हर्सूल पोलिस कोठडीमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने एका व्यक्तीसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर शेख समीर शेख रज्जाक (२६, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) व अजित हनुमंत पवार (२५, रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड) या आरोपींना ३१ जानेवारी रोजी अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले असता, प्रकरणाचा सखोल तपास करणे, सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे जमा करणे, इतर आरोपींना अटक करणे तसेच चोरीचे ट्रॅक्टर विकून घेतलेले एक लाख रुपये आरोपीकडून हस्तगत करणे बाकी असल्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सैय्यद शेहनाझ नी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुप्रिम कोर्टाची आब राखली, तरच टिकेल विश्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुप्रीम कोर्टाच्या विशिष्ट न्यायमूर्तीचा निकाल म्हणून त्या त्या निकालाकडे बघितले जात नाही, तर तो सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची आब राखणे जास्त महत्वाचे आहे, तेव्हाच जनतेचा सर्वोच्च न्यायसंस्थेवर विश्वास टिकेल, असे मत सुप्रीम कोर्टाचे प्रख्यात विधिज्ञ व खासदार माजिद मेनन यांनी मागच्या महिन्यात सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी केलेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले. अर्थात, बंडाळी करणारे चार न्यायमूर्ती आज समाधानी आहेत का, अशी शंका उपस्थित करीत, हा प्रश्न निकाली निघण्यासाठी जितका उशीर लागेल तितका हा प्रश्न जास्त चिघळेल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.

शहरात शुक्रवारी (२ फेब्रुवारी) हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी हायकोर्टाचे अॅड. नितीन गवारे पाटील, संतोष लोखंडे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी, माजिद मेनन म्हणाले, सुप्रीम कोर्ट ही देशातील सर्वोच्च न्यायसंस्था आहे आणि सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल-निर्णय यांचे कायद्यात रुपांतर होते. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींची बंडाळी हा देशासाठी एक दुर्दैवी दिवस होता व हा एक चिंतेचा विषय ठरला. मात्र, न्यायमूर्तींनी सुप्रीम कोर्टाची आब राखली तरच जनतेची सर्वोच्च न्यायसंस्थेवरील विश्वासार्हता टिकून राहील, असेही ते म्हणाले. त्याचवेळी देशाला जलद न्यायदानाची अत्यंत गरज आहे. कुठल्याही जामीन अर्जावर दोन ते चार आठवड्यात निर्णय झाला पाहिजे आणि मुदत संपताच अंतरीम जामीन आपोआप मिळाला पाहिजे. आज कित्येक महिने, वर्ष जामीन अर्ज पडून राहतात. अर्थात, गंभीर गुन्ह्यातील आरोपींना किंवा मृत्युदंड किंवा जन्मठेपेला पात्र असलेल्या आरोपींना जामीन द्यावा, असा त्याचा अर्थ होत नाही, असेही ते म्हणाले.

घटनेचा मूळ ढाचा बदलणे अशक्य

भारतीय राज्य घटना बदलली जाणार असल्याबद्दल निरनिराळ्या शंका-कुशंका अलीकडे उपस्थित होत आहे. मात्र घटनेमध्ये सुधारणा झाल्या असल्या व पुढेही होणार असल्या तरी घटनेचा मूळ ढाचा बदलता येणार नाही, असे अॅड. गवारे पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत जाणार ?

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

Tweet@makarandkMT

औरंगाबाद: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीत काँग्रेसच्या गटात मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी अभ्यासू नेत्यांची फौज जमवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमिवर पक्षश्रेष्ठींच्या विश्वासू टीममधील अग्रणी, १९ वर्षे विविध पदांवर सक्रिय असलेल्या चव्हाणांवर विश्वास टाकला जाणार असल्याचे संकेत आहेत.

आदर्श सोसायटी प्रकरणावरून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज पाहून केंद्रात संसदीय कामकाज मंत्रालय सांभाळणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात पाठविले. २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेत राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. गेल्या तीन वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने उभे केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यभर दौरे करून भाजप सरकारविरोधात अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. शेतकरी कर्जमाफी, अर्थसंकल्पातील घोषणा, बेरोजगारी या मुद्यांवर चव्हाणांनी सरकारची कोंडी केली.

गुजरात निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली. याच काळात नांदेड महापालिकेत एकहाती सत्ता मिळविली. गुजरात विधानसभा व राजस्थानातील पोटनिवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. काँग्रेसला दिल्लीत मोदी सरकारविरोधात प्रभावीपणे मुद्दे मांडणाऱ्या नेत्यांची फळी निर्माण करावयाची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना अग्रमानांकन दिले जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाआधी काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. चव्हाणांना दिल्लीचा १९ वर्षांचा अनुभव असून केंद्रात विविध मंत्रालये सांभाळली आहेत. उच्चविद्याविभूषित असल्याने आगामी काळात पक्षबांधणी आणि केंद्रीय धोरणांना विरोध करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात, हे हेरून त्यांना दिल्लीत स्थिर होण्यासाठी पाचारण केले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राज्यात सक्रिय झाले असताना केंद्रासाठी पृथ्वीराज चव्हाणांची लागणारी वर्णी ही काँग्रेसमधील 'पॉलिटिकल अॅडजेस्टमेंट' ठरणार आहे.

राज्यसभेवर वर्णी ?

पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीत बस्तान बसवून देण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना राज्यसभेवर घेतले जाऊ शकते. हा निर्णय नजीकच्या काळात झाला, तर त्यांना विधानसभेचा राजीनामा देऊन दिल्लीत जावे लागेल. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून होणाऱ्या मोर्चेबांधणीत पृथ्वीराज चव्हाण महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएचयू’चे कुलगुरू होणे माझ्यासाठी अभिमानास्पद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे विद्यापीठ असा लौकिक असलेल्या 'बीएचयू'मध्ये काम करण्याची संधी महत्त्वपूर्ण आहे. अद्याप मला अधिकृत नियुक्तीपत्र आले नाही. त्यामुळे रूजू होण्याबाबत आताच सांगता येणार नाही असे डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले, मात्र सायंकाळी चोपडे मुंबईला तातडीने रवाना झाल्याने ते कुलपतींची भेट घेण्यासाठी गेल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू होती.

बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याचे कळल्यानंतर डॉ. बी. ए. चोपडे यांचे अभिनंदन करण्यासाठी दिवसभर विद्यापीठात वर्दळ होती. राज्यभरातून अभिनंदनाचे फोन सुरू होते. चोपडे यांनी पुष्पगुच्छ स्वीकारला. मात्र, फोटो काढण्यास नकार दिला. अगदी मोजक्याच व्यक्तींना त्यांनी नियुक्ती झाली असे ठामपणे सांगितले. या गोंधळामुळे 'बीएचयू'च्या कुलगुरूपदी चोपडे यांची नियुक्ती झाली की नाही अशी चर्चा रंगली. अर्थात, 'बीएचयू'च्या कुलसचिवांनी शुक्रवारी दुपारी कुलगुरूंशी दूरध्वनीवर चर्चा केली. नियुक्तीपत्र आल्यानंतर तातडीने तुम्हाला पाठवण्यात येईल, असा निरोप दिला. नियुक्तीपत्र हाती पडल्याशिवाय नियुक्ती जाहीर करणार नसल्याची भूमिका चोपडे यांनी कायम ठेवली. नियुक्ती राष्ट्रपतींनी केली असल्यामुळे पूर्वसंमती घेतली गेली आहे. नियुक्तीवर अंतिम शिक्कामोर्तब होऊनही चोपडे बोलणे टाळत होते. 'बीएचयू' आशिया खंडातील सर्वात मोठे विद्यापीठ असून या विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम करणे आवडेल' असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. १९१६ मध्ये स्थापन झालेले 'बीएचयू' भारतातील प्रमुख विद्यापीठ आहे. वार्षिक १२०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या विद्यापीठ कॅम्पसमध्ये २५ हजार विद्यार्थी आहेत. राष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठात नियुक्ती झाल्यामुळे चोपडे आनंदी आहेत. सप्टेंबर महिन्यात 'बामु'त नॅक मूल्यांकन आहे. तसेच इतर प्रशासकीय कामे प्रगतीपथावर आहेत. 'कुणी गेल्यामुळे काम अडत नाही. माझे सहकारी कामे पूर्ण करतील' असे चोपडे यांनी सांगितले. दरम्यान, 'बीएचयू'चा पदभार घेण्यापूर्वी कुलपतींची भेट घेणे आवश्यक असल्यामुळे चोपडे सायंकाळी मुंबईला रवाना झाले. प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर पुढील आठवड्यात ते रुजू होण्याची शक्यता आहे.

'यूजीसी'साठी प्रयत्नशील होते

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. चोपडे इच्छुक होते. या पदासाठी दिल्लीत त्यांनी मुलाखत दिली होती. तसेच अनेकदा दिल्लीच्या वाऱ्या केल्या होत्या, मात्र अध्यक्षपदी वर्णी लागली नाही. त्यामुळे 'बीएचयू'च्या कुलगुरूपदी त्यांची वर्णी लागल्याची चर्चा आहे. मागील काही महिन्यांपूर्वी 'बीएचयू'मध्ये आंदोलन भडकले होते. देशभर चर्चेत असलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झालेल्या चोपडे यांच्यासाठी हा कारभार आव्हानात्मक ठरणार आहे.

'बीएचयू'च्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याचे कळल्यानंतर देशभरातून फोन सुरू आहेत, मात्र अधिकृत नियुक्तीपत्र मिळाले नसल्यामुळे बोलणे उचित नाही. 'बीएचयू'मध्ये कुलगुरू होणे अभिमानास्पद आहे.

- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडाघरचे अवताण: शरद पवार

$
0
0

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेच्या सांगता सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवत आगामी आंदोलनांची दिशा स्पष्ट केली. राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम देण्याची सरकारची घोषणा देखील खोटीच आहे असे म्हणत पवार यांनी सरकारच्या 'खोटेपणा'चा पाढाच वाचला. एकूण काय तर, सरकारच्या या घोषणा म्हणजे 'लबाडा घरचे अवताण' आहे, अशा शब्दांत पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

पवार यांनी सरकारच्या कामावर बोट ठेवत त्यातील वैगुण्ये दाखवली. उत्पन्न खर्च कमी दाखवायचा आणि नंतर किंमत ठरवायची असा सरकारचा डाव आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्यावर मग पाऊल उचलायचे ही सरकारची नीती आहे. राज्यातील शेती उध्वस्त झाली आहे, या परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत असे मुद्दे मांडत पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. कापसाच्या पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचेही पवार म्हणाले. सरकारने मात्र अशा कापूसउत्पादक शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नसल्याचेही ते म्हणाले.

तिहेरी तलाक हा धार्मिक अधिकार

औरंगाबादेतील हल्लाबोल यात्रेच्या सांगता सभेत बोलताना पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीका केली. तिहेरी तलाक हा मुस्लिमांना धर्माने दिलेला अधिकार आहे. या अधिकारात सरकारने ढवळाढवळ करता कामा नये असा सल्लाही पवार यांनी केंद्र सरकारला दिला. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा उद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. याला पूर्णपणे सरकारच जबाबदार असल्याचे म्हणत पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणावरही टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत इंटरनेट सेवा खंडीत

$
0
0

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा समारोप शरद पवार यांच्या जाहीर सभेने झाला. सभा सुरू असताना इंटरनेट सेवा अचानक खंडीत झाल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टिका केली. पोलिस विनाकारण चौकशी करून सभेच्या ठिकाणी पत्रकारांना रोखण्याचा प्रकार सरकारची मागच्या दाराने आलेली हुकूमशाही असल्याचे अजित पवार म्हणाले. या प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी काही वेळ सरकारच्या विरोधात घोषणाबाजी झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाला मराठवाड्यात लक्षणीय प्रतिसाद मिळाला. समारोपाला आठ जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. मात्र, सभा सुरू असताना काही वेळ इंटरनेट सेवा बंद पडली होती. सरकार जाणीवपूर्वक प्रशासनाला हाताशी धरून हा उपदव्याप करीत असल्याची टिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारला खडे बोल सुनावले. 'फडणवीस साब आप नेट बंद करोगे, मगर आम आदमी की आवाज बंद करने की आप की औकात नही है' अशी टिका त्यांनी केली.

पोलिस विनाकारण चौकशी करून सभेच्या ठिकाणी येण्यास रोखत असल्याची तक्रार काही पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे केली. 'सभा शांततेत होण्यासाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे. पत्रकारांनी काय लिहायचे व काय करायचे हे त्यांना स्वातंत्र्य आहे. पत्रकारांना रोखणे सरकारची एक प्रकारची हुकूमशाही आहे' असे पवार म्हणाले. सोशल मीडियावर सभा 'लाइव्ह' होऊ नये म्हणूनच इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला. या प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images