Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शनिवार वाड्यातील पेशव्यांचा पुतळा हटवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सत्ताधारी भाजप सरकारने विषमतेचे प्रतीक हटविणे सुरू केले आहे. शनिवार वाड्यातील बाजीराव पेशवेंचा पुतळा ही दलित समाजावरील अन्यायाचे प्रतीक आहे. यामुळे तो हटवावा,' अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होण्यासाठी खरात औरंगाबादला आले होते. यावेळी खरात म्हणाले, 'कोरेगाव भीमाची घटना होऊन बरेच दिवस उलटले. आतापर्यंत एकबोटे आणि भिडे यांना अटक करण्यात आलेली नाही. या विरोधात मंत्रालयात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाने माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. सध्या सरकार दिल्लीत औरंगजेबाचे नाव असलेल्या रस्त्यांचे नाव बदलत आहे. तसेच वर्षा बंगल्यासमोरील जिना हाऊस तोडण्यात येणार आहे. ही विषमतेची प्रतिके आहेत. मग दलित समाजावर ज्या पेशव्यांच्या काळात अन्याय झाले. असे विषमतेचे प्रतिक असलेल्या शनिवार वाड्यातील बाजीराव पेशवेंचा पुतळाही त्वरित हटवावा. याविरोधात लवकरच आंदोलन पुकारणार आहोत,' असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मनोज शेजवळ, मनीष नरवडे, गणेश साळवे, विकी बोर्डे, योगेश साळवे, सचिन दाभाडे, रवी दांडगे, महेंद्र वाघमारे, आकाश गायकवाड, कांता अहिरे यांची उपस्थिती होती.

विचित्र आंदोलन करणार

'एकबोटे आणि भिडे यांना अटक करा या मागणीसाठी आगामी काळात आंदोलन सुरू केले जाणार आहे. हे आंदोलन कसे असेल? हे आताच सांगत नाही. मात्र ते विचित्र पद्धतीने करून झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे काम आपण करू,' असा इशाराही खरात यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संलग्न शुल्क गेले कुठे ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सहसंचालक कार्यालयाच्या चौकशी पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवहारांचा ताळेबंद तपासत प्रशासनाला फैलावर घेतले. लेखा विभागाला फटकारत 'तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये' अशी विचारणा समितीने केली. मागील वीस वर्षांपासून संलग्न शुल्क जमा झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत उघड झाला.

विद्यापीठात सहसंचालक कार्यालयाच्या चौकशी पथकाने दोन दिवसांपूर्वी ऑडिट तपासणी केली. काही महिन्यांपासून विद्यापीठातील आर्थिक व्यवहार चर्चेत आहे. या प्रकाराची पथकाने चौकशी केली. लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी यांना कायद्याचे उल्लंघन करून पैसे खात्यावर कसे वळवता अशी विचारणा सदस्यांनी केली. जवळपास शंभर कोटी रुपये संलग्न शुल्क जमा झाले नसल्यामुळे पथकाने आश्चर्य व्यक्त केले. याबाबत माहिती सादर करण्यासाठी विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे यांनी दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. वृत्तपत्रविद्या विभाग, प्राणीशास्त्र विभाग, तंत्र-रसायनशास्त्र विभाग, बायो केमिस्ट्री, पदार्थ विज्ञान विभागासह इतर काही विभागात लाखो रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली. साहित्य खरेदीला अनेक दिवस उलटूनही हिशेब सादरीकरण झाले नसल्यामुळे ऑडिट झाले नाही. वित्त व लेखा विभागाला संबंधित विभागांशी संपर्क साधून हिशेब सादर करण्याचे आदेश देण्यात आले. ही खरेदी पूर्वीच्या विभागप्रमुखांच्या काळात झाली असून जुनी बिले मिळत नसल्याचे सध्याच्या विभागप्रमुखांनी सांगितले.

कागदपत्रे देण्याची सूचना

विद्यापीठाचे संलग्न शुल्क, नवीन अभ्यासक्रम, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी, विद्यार्थी संख्यावाढ या प्रक्रियेचे शुल्क विद्यापीठाच्या खात्यात जमा झाले नसल्याची चर्चा आहे. बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांच्या कार्यकाळात शुल्क जमा करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, आतापर्यंत शुल्क जमा करण्यात आले नाही. चौकशी पथकाने या प्रकाराचे गांभीर्य ओळखून चौकशीवर भर दिला. वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी यांनी शुल्क संबंधित कागदपत्रे सादर करण्याची सूचना सरवदे यांना केली.

विद्यापीठात पुन्हा गोंधळ

विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात शनिवारी सायंकाळी अधिसभा सदस्य आणि महिला अधिकारी यांच्यात वाद झाला. ही खडाजंगी एकमेकांवर वस्तू फेकण्यापर्यंत गेल्यानंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना मध्यस्थी करावी लागली. या वादात दोन गट आक्रमक झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस दाखल झाल्याने वाद मागे घेण्यात आला. याबाबत सोमवारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अब्दुल हमीद कुरेशीचा जामीन फेटाळला

$
0
0

औरंगाबाद: जिल्हा कोर्ट परिसरामध्ये सोमवारी इम्रान मेहंदी व सलीम कुरेशी गँगमध्ये झालेल्या दगडफेक व मारहाण प्रकरणातील सलीम कुरेशी गँगच्या अब्दुल हमीद कुरेशी याने नियमित जामिनासाठी केलेला अर्ज मुख्य न्यादंडाधिकारी एस. बी. पवार यांनी फेटाळला. माजी नगरसेवक सलीम कुरेशी खून प्रकरणातील आरोपी इम्रान मेहंदी व त्याच्या साथीदारांमध्ये कोर्ट परिसरामध्ये हाणामारी झाली होती. यातील सलीम कुरेशी गँगच्या चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची जालना कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात यातील अब्दुल हमीद कुरेशी या आरोपीने वयाचा विचार करून जामीन देण्याची विनंती न्यायालयाकडे केली हेाती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाख लोकांपैकी दोघांना ब्रेन ट्यूमर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ब्रेन ट्यूमरबाबत अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. मेंदूमधील प्रत्येक गाठ ही कर्करोगाची असेलच असे नाही. तसेच यावरील उपचारही शक्य आहेत. एक लाखांमागे दोन रुग्ण असे आढळतात,' अशी माहिती मेंदूविकार विशेषज्ज्ञ डॉ. जीवन राजपूत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

कर्करोग दिनानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'भारतामध्ये सामान्यपणे एक लाख लोकांपैकी दोन ते तीन लोकांचे मेंदूच्या कर्करोगाबाबत निदान होते. रेडिएशन व कर्करोग याचा संबंध असल्याचे कोणतेही पुरावे संशोधनात सापडले नसले, तरी अती रेडिएशनच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा त्या व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्यावर नक्कीच गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे समस्येकडे दुर्लक्ष करू नये. एकूण १२० प्रकारचे ब्रेन ट्यूमर असतात. मेंदूचा कर्करोग हा ट्यूमरचा आकार, स्थान, पेशी व ग्रेड यावर अवलंबून असू शकतो. झोपताना डोक्याजवळ मोबाइल फोन ठेवल्यामुळे ब्रेन ट्यूमर अथवा कॅन्सर होतो. असे बोलले जाते परंतु तसे अद्याप पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे असे म्हणणे अयोग्य आहे,' असे राजपूत म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपवाले घरात घुसायला लागलेत: उद्धव

$
0
0

औरंगाबाद: 'तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो' या सूत्रानुसार आम्ही २५ वर्षे भाजपला जपले, जोपासले. त्यांना प्रत्येक वेळी मदत केली. पण हे आता आमच्याच घरात घुसायला निघालेत. आता त्यांना सोडणार नाही,' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 'येणाऱ्या निवडणुकीत एकटेच लढणार आणि जिंकणार,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पैठणमधील शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. 'केंद्रीय अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडण्यात आलाय. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना हे देणार, ते देणार, असं सांगितलं गेलंय. पण त्यासाठी तुम्ही राहणार आहात का? तुमचा निकाल जनताच लावणार आहे,' असा टोला उद्धव यांनी हाणला. 'नुसत्याच घोषणा केल्या जाताहेत. इतक्या घोषणा की त्यांची नावंही आठवतही नाहीत. अंमलबजावणीचा पत्ता नाही. याउलट शिवसेना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतेय. सरकारकडून जी काही मदत शेतकऱ्यांना मिळाली. ती शिवसेनेमुळेच,' असंही उद्धव यांनी ठणकावून सांगितलं.

आधी डल्ला, आता हल्ला!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारविरोधी मोर्चावरही त्यांनी टीका केली. 'सध्या काहीजण रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना सत्तेत असून विरोधाची भूमिका घेत असल्याची टीका करतात. पण आम्ही स्वतःसाठी नव्हे तर जनतेसाठी सरकारवर टीका करत आहोत,' असं सांगतानाच, 'आधी डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत आहेत,' असा सणसणीत टोला उद्धव यांनी राष्ट्रवादीला हाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी भिडेची पीएचडी तपासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कोरेगाव भीमा येथे दंगल भडकवण्याचा आरोप असूनही संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांना अटक होत नाही. संभाजी भिडे पीएच.डी.धारक आहे म्हणे, त्याची पीएच. डी. कुठली ते तपासा. आहे. त्याला कोणी पीएच. डी. कोणी विकली याचाही शोध घ्या,' अशी मागणी आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांनी केली.

'युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता' या पुस्तक प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, आजकाल वातावरण बिघडत चालले आहे. लोकशाही 'जातीसहित' राहावी हा विचार नांदत असून त्याला नाटकांतून विरोध झाला पाहिजे. सध्याचे सरकार ब्राह्मणांचे लांगूलचालन करत आहे. आजचे मुख्यमंत्री संभाजी भिडे व इतरांना पाठिशी घालत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या कार्यक्रमातून घेऊन जा, विचार करा, आणि प्रतिकार करा, असे आवाहन ढाले यांनी केले. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करण्याचा घाट घातला जात असून ते चूक आहे. हा देश भारत देश म्हणून ठेवायला हवा, त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आम्ही हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही. कोरेगाव भीमा येथे चुकीचा इतिहास सांगितला जात असून संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे सारखे लोक थापा मारत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. सध्याचे राजकारण, जनता, चळवळ आणि विविध विषयांवर त्यांनी परखड मतं मांडली. मी जातपात मानत नाही, माणूस म्हणून मला जगायला आवडते, असे ढाले यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्ला बोल कार्यक्रम : चाकू बाळगणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात धारदार चाकू घेऊन आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शनिवारी सायंकाळी दिल्लीगेट येथे हा प्रकार घडला. या आंदोलनाला अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी दिल्लीगेट येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन होते. या आंदोलनासाठी गुन्हेशाखेच्या पथकाचा बंदोबस्त नेमण्यात आला होता. सायंकाळी पावणेसहा वाजता दिल्लीगेट समोर गर्दीमध्ये एक संशयित तरुण हातामध्ये असलेला चाकू खिशात ठेवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी या तरुणाला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता फोल्ड होणारा चाकू त्यांना मिळाला. या संशयित आरोपीचे नाव सतीश प्रकाश नवगिरे (वय २३, रा. गल्ली क्रमांक १, आंबेडकरनगर) असे असून हा मजुरी काम करतो. आरोपी सतीशला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेशाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, विलास वाघ, सुनील धात्रक, गजानन मांटे व विशाल सोनवणे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्झरीच्या धडकेत दत्तक मुलाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

सुलीभंजन येथील हाफिज यांच्या दर्ग्यातील उरुसासाठी मालेगाव येथून आलेल्या लक्झरी बसच्या (एम. एच. १५ ए के १६२९) धडकेने बारा वर्षांचा मुलगा ठार झाला. या अपघातात दोन लहान मुलांसह तीन जण जखमी झाले. मृताचे नाव समीर बेग बाबर बेग (रा. कमान मोहल्ला खुलताबाद), असे असून तो दत्तक घेतलेला होता.

सुलीभंजन येथे हाफिज यांच्या दर्ग्यात उरूस भरला आहे. या उरुसासाठी मालेगाव येथील भाविका मोठ्या संख्येने येतात. उरुसासाठी आलेल्या लक्झरी बसने शनिवारी सायंकाळी रस्त्यालगत खेळणाऱ्या मुलांना चिरडले. या अपघातात समीर हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या अपघातात, अब्दुल रहेमान शेख अजीज (वय ६) व रज्जाक राजू बेग (वय ११) ही मुले व पाणीपुरी विक्रेता रवींद्र कुसवार (वय २५) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद खुलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.

चालकाला झोडपले

हा अपघात होताच संतप्त नागरिकांनी लक्झरी चालक सिराज अहेमद कुदबोद्दिन (वय ४०, रा. मालेगाव) याला चांगलेच झोडपून काढले.

दत्तक मुलाचा मृत्यू झाल्याने कमान मोहल्ल्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यघटना मोडीत काढण्याचा डाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शासन, प्रशासन, न्याय, शिक्षण व्यवस्था आणि माध्यमे निष्प्रभ करुन सामान्य जनतेला भयभीत करण्यात येत आहे. लोकशाही मूल्यांवरील सामान्य जनतेचा विश्वास उडवून राज्यघटनेला नख लावण्यात येत आहे. प्रस्थापित सरकारने संविधान मोडीत काढण्याचा डाव आखला आहे,' असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे यांनी केले. संविधान संवर्धन परिषदेत ते बोलत होते.

प्रबळ शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने संविधान संवर्धन परिषद आयोजित करण्यात आली होती. मौलाना आझाद संशोधन केंद्रात परिषद झाली. यावेळी प्रा. डोळे, प्रा. प्रतिभा अहिरे, डॉ. रफीक पारनेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्ताधारी सरकारच्या धोरणावर डोळे यांनी टीका केली. 'राज्यघटनेचा वापर करून दुसरे व्यासपीठ उभारण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी आलो असून, अभ्यासक्रमात वेद आणायचे आहेत, अशी सरकारमधील मंत्र्यांची भाषा आहे. एक मन, एक राज्य आणि एक समाज अशी जाहीरात सरकार करीत आहे. हे कशाचे द्योतक आहे? इथे रहायचे असेल, तर हिंदू म्हणूनच रहा हे जाहिरातीतून स्पष्ट करण्यात येत आहे. लोकशाही मूल्यावरील विश्वास उडेल असे अराजक निर्माण करण्यात येत आहे,' असे डोळे म्हणाले.

जातीच्या अस्मितांवर अहिरे यांनी भाष्य केले. 'भारत राष्ट्र नव्हते, तर जातीमध्ये विभागलेला भूभाग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्ष राज्यघटना लिहून देशाला राष्ट्रात रुपांतरित केले. सध्याची व्यवस्था जातीच्या अस्मिता टोकदार करीत आहे. या परिस्थितीत देशाला बांधून ठेवण्याचे काम राज्यघटना करील,' असे अहिरे म्हणाल्या.

'मूठभर पण सक्रिय प्रतिगामी लोकांनी राज्यघटना धोक्यात आणली आहे. बहुसंख्य लोकांनी सक्रिय होण्याची गरज आहे,' असे डॉ. रफीक पारनेरकर म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पांडे यांनी केले. प्रज्ज्वल कोळनूरकर, अथर्व जावळे, गायत्री तोडकर, तेजस्विनी नागरे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. मनोरमा तिजारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाविस्कर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचा कारभार चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीपुरवठ्यासाठी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याच्या प्रकारानंतर प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. ग्रंथालय व अभ्यासिका परिसरात दोन अतिरिक्त टाक्या बसवण्यात आल्या आहेत, मात्र विभागात पाण्याचा ठणठणाट कायम आहे. संलग्नता शुल्क अनियमिततेमुळे सहसंचालक कार्यालयाने प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. कोलमडलेला प्रशासकीय आणि आर्थिक कारभार टिकेचे लक्ष्य ठरला आहे.

मागील काही महिन्यांपासून विद्यापीठातील प्रशासकीय आणि आर्थिक कामकाज वादात अडकले आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या खात्यावर चार कोटी रुपये परस्पर वळवल्याचा आरोप गाजला होता. माझे काम पारदर्शी असून, सर्व काही इथेच सोडून जाणार आहे, असे कुलगुरूंनी स्पष्टीकरण दिले होते, मात्र दोन दिवसांपूर्वी सहसंचालक विभागाच्या चौकशी पथकाने लेखा परीक्षण केले. या चौकशीत आर्थिक अनियमितता उघड झाली आहे. विद्यापीठ संलग्नता शुल्क, नवीन अभ्यासक्रम, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी, विद्यार्थी संख्यावाढ या प्रशासकीय प्रक्रियेचे शुल्क विद्यापीठाकडे जमा करण्यात आले नाही. या शंभर कोटी रुपयांचे नेमके काय झाले याचा तपास सहसंचालक विभाग करीत आहे. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर या प्रकाराचा उलगडा होणार आहे. प्रशासनाने दोन महिन्यांची मुदत मागितली आहे.

विद्यापीठातील पत्रकारिता विभाग, प्राणिशास्त्र विभाग, केमिकल टेक्नॉलॉजी विभाग, बायो केमिस्ट्री विभाग आणि पदार्थविज्ञान विभागासह सात विभागांनी लाखो रुपयांची साहित्य खरेदी केली, मात्र अद्याप बिले सादर केली नसल्यामुळे गोंधळ वाढला आहे. तत्कालीन विभागप्रमुखांनी बिले दिली नसल्यामुळे याबाबत माहिती नसल्याचे विद्यमान विभागप्रमुखांनी सांगितले आहे. सहसंचालक विभागाच्या चौकशी पथकाने आर्थिक अनियमततेवर बोट ठेवले असल्याने सध्याच्या विभागप्रमुखांनी सांगितले आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात विद्यार्थ्यांनी पाण्यासाठी विद्यापीठात आंदोलन केले होते. कुलगुरूंनी भेट नाकारताच संतप्त विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली होती. या प्रकाराचे पडसाद उमटल्यानंतर पाणी पुरवठा यंत्रणा कार्यान्वित करण्याची घोषणा प्रशासनाने केली होती. ग्रंथालय व अभ्यासिकेत दोन हजार लिटर क्षमतेच्या दोन अतिरिक्त टाक्या बसवण्यात आल्या आहेत. साठवण क्षमता वाढवून आठ हजार लिटर पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, मात्र विविध विभागातील पाणी पुरवठा विस्कळीत असून वॉटर कूलर रिकामे आहेत. पाणी मिळत नसल्यामुळे विविध विभागाचे विद्यार्थी एकत्रित आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

'बीएचयू'तील नियुक्तीचे काय?

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची 'बीएचयू'च्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. मात्र, यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले नाही. चोपडे या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. देशातील तब्बल ४३ विद्यापीठातील कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर होण्यास अवधी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डल्ला मारणाऱ्यांचे आता हल्लाबोल मोर्चे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

देशभक्त असल्याचा सोंग घेणाऱ्या केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पाकिस्तानातून साखर आयात सुरू केली आहे. यामुळे साखरेचे भाव पडले असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. सत्तेत असताना डल्ला मारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता हल्लाबोल मोर्चे सुरू केल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानी रविवारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली.

शरद सहकारी साखर कारखान्याच्या दुसऱ्या गळित हंगामाचे उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे रविवारी तालुक्यातील विहामांडवा येथे आले होते. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, 'हिंदू मतांचे विभाजन होऊ नये यासाठी तुम्ही दिल्ली सांभाळा आणि राज्य आमच्या ताब्यात द्या या दोन मुद्द्यावरून आम्ही भाजपसोबत गेली तीन दशके युती केली होती, मात्र आता भाजपला सगळीच सत्ता हवी असल्याने आम्ही यापुढे स्वतंत्र लढणार व जिंकणार.'

शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलताना ठाकरे म्हणाले, 'शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठी शिवसेनेने सर्वप्रथम आंदोलन सुरू केले होते. राज्यात भाजपसोबत सत्तेत असतानाही आम्ही या शासनाला कर्जमुक्ती चा निर्णय घ्यायला भाग पाडले, मात्र कर्जमुक्तीच्या प्रक्रियेवर आम्ही समाधानी नाहीत.'

दरम्यान, ज्या कारखान्याचे नाव शरद आहे तो सुरळीत चालूच शकत नाही. यामुळे हा कारखाना आमच्या ताब्यात आल्यावर आम्ही शरद साखर कारखान्याचे नाव रेणुकामाता असे केल्याचे सांगत उद्धव ठाकरे यानी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. सध्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या हल्लाबोल आंदोलनाची त्यांनी खिल्ली उडवली. शेतकरी मेळाव्यात खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, राज्य मंत्री अर्जुन खोतकर व यांचीही भाषणे झाली.

उसाच्या भावाचा प्रश्न टाळला

उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना शरद साखर कारखाना उसाला काय भाव देणार याविषयी शेतकऱ्यांनी विचारणा केली. ठाकरे उसाच्या भावाविषयी माहिती देत असताना त्यांचा माइक बंद पडला. माइक सुरू झाल्यावर ठाकरे यांनी उसाच्या भावाचा विषय टाळला. शेतकऱ्यांनी जोरदार मागणी केल्यावरही उद्धव ठाकरे यांनी बोंडअळीविषयी काहीच भाष्य न केल्याने यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला.

सुरक्षेकडे दुर्लक्ष

उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना सात ते आठ वेळेस माइक बंद पडला. यामुळे, नाराज झालेल्या ठाकरे यानी अपेक्षित वेळेपेक्षा कमी वेळात त्यांचे भाषण संपवले. शेतकरी मेळाव्याचे नियोजन ढिसाळ होते. सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. व्यासपीठासमोर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'डी' क्षेत्रात नागरिक भाषण एकण्यासाठी घुसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले उधळून ‘राष्ट्रवादी'ची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलन हे जनतेची व्यथा मांडण्यासाठी होते. परंतु, सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी आमदार प्रशांत बंब व भाजप समर्थकांनी सभेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत रविवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंब यांच्या सिंधी कॉलनी येथील कार्यालयासमोर फुले उधळून निदर्शने केली.

राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती अहिंचेसी असल्याने दगड फेकण्याऐवजी फुले उधळून आंदोलन केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यापुढे आमदार बंब यांनी नाटकं थांबवली नाहीत व जाहीर माफी मागितली नाही, तर वेगळ्या पद्धतीने धडा शिकवू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अभय पाटील चिकटगावकर, दत्ता भांगे, रहीम पटेल, विनोद बनकर, श्रीकांत बोराडे, असीफ अली, मतीन पटेल, रमेश धोडगे, पवन बनकर, के. के. पाटील, धनंजय जाधव, कैलास खरात, सचिन जाधव, प्रकाश मावसकर, आनंद निकम उपस्थित असल्याची माहिती वसीम मणियार यांनी दिली.

रविवार असल्यामुळे कार्यालय बंद होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन झाले, मात्र कारखान्यासंदर्भात असलेला शेतकऱ्यांचा प्रश्नच सभेत काही लोकांनी विचारला. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही पटले असावे म्हणून त्यांनी कार्यालयासमोर फुले उधळली.

-प्रशांत बंब, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनील केंद्रेंकराची बदली रद्द करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव सुनील केंद्रेकर यांची बदली रद्द करावी, काही मंडळी सक्रिय झाली आहेत. त्यात राजकीय नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय दबाव आणला जात आहे. दरम्यान, केंद्रेकर सोमवारी रुजू होणार नाहीत, त्या आशयाचा निरोप मुंबईहून रविवारी केंद्रेकरांना दिला गेल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या. त्यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या जागी क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रेकर मूळचे मराठवाड्यातील आहेत. विक्रीकर सहआयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून केंद्रेकर यांनी काम पाहिले आहे. केंद्रेकरांच्या नियुक्तीचे आदेश धडकल्यानंतर ही बदली रद्द व्हावी, यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; राजकीय मंडळींनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. केंद्रेकर रुजू झाले, तर आम्हाला काम करणे अवघड असल्याचे मराठवाड्यातील काही अधिकाऱ्यांनी कळविले. दरम्यान, रविवारी सकाळपासून मुंबईत यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या. केंद्रेकर सोमवारी विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणार होते, पण आता त्यांना थांबण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.

घोटाळे उघड होण्याची धास्ती

या घडामोडींमागे नेमका कुणाचा काय उद्देश आहे, याबाबत मात्र राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कृषी आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. त्यानंतर क्रीडा खात्याचे सचिव म्हणून काम करतानाही केंद्रेकरांनी काही प्रकरणे उघडकीस आणली. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी केंद्रेकरांना विरोध होत असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचा पुढचा खासदार भाजपचाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

२०१९चा औरंगाबादचा खासदार भाजपचाच असेल, असा दावा भाजपचे केंद्रीय प्रभारी डॉ. महेंद्रसिंह यांनी केला. पक्षातील निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाळूज येथे रविवारी झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय पटलावर हालचालींना वेग येणार आहे.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महेंद्रसिंह यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. वाळूज येथे रविवारी झाले. यासाठी निवडक ५० पदाधिकाऱ्यांनाच बोलाविण्यात आले होते. बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. बूथरचना मजबूत करून 'वन बूथ २५ यूथ' ही रचना पूर्ण करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यावेळी संघटना विस्तारासाठी त्यांनी विविध योजना करून सरकारच्या केलेल्या कामांचा जनतेला होत असलेला लाभ सांगून जनता भाजपसोबत असल्याचा दावा केला. मोदी सरकारने थांबलेला विकास सुरू केला असून जनता भाजपसोबत आहे ज्यांनी भ्रष्टाचार केला ते आता हल्लाबोल करत असल्याचे सांगून त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. बैठकीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश चिटणीस मनोज पांगारकर, प्रदेश प्रवक्ते आमदार प्रशांत बंब, आमदार अतुल सावे, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतसंगासाठी गेलेल्या भाविकाचे घर फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सत्संगासाठी गेलेल्या भाविकाचे घर फोडून चोरट्यांनी ६१ हजारांचा ऐवज लंपास केला. मंगळवार ते बुधवारच्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद अरुण हुबे (वय ३०, रा. राजनगर, मुकुंदवाडी) हे मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घराला कुलूप लाऊन हनुमाननगर येथे महानुभाव पंथाच्या सत्संग कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते हनुमाननगर येथेच राहणाऱ्या मोठ्या बहिणीकडे मुक्कामाला थांबले होते. बुधवारी दुपारी तीन वाजता ते घरी परतले. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, बाळ्या व रोख तीन हजार रुपये असा ६१ हजारांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. याप्रकरणी हुबे यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नववधूचे दागिने विवाह सोहळ्याआधी लांबविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहसोहळा पार पडण्यापूर्वी मंगल कार्यालयात दाखल झालेल्या नववधूचे दागिने लंपास केल्याची घटना औरंगाबादेत घडली. बीड बायपासवरूल गुरू लॉन्समध्ये रविवारी एक विवाह होता. हळदी समारंभासाठी शनिवारी नियोजित नववधू नातेवाईकांसह दाखल झाली. हळद समारभांनंतर अंगावरील दागिने तिने बॅगेत काढून ठेवता असता ही बॅगच चोरट्यांनी लंपास केली. यात आठ तोळे सोन्याचे दागिने, पैंजण असा अडीच लाखांचा ऐवज होता. चिकलठाणा पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे, पण फुटेज अस्पष्ट असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले की, हर्सूल परिसरातील सेवानिवृत्त अधिकारी रमेश गुलाबराव घोडके यांचा मुलगा रोहित याचे मनोज दुरूगकर यांची मुलगी स्नेहा हिच्याशी रविवारी लग्न झाले. शनिवारी हळदीचा कार्यक्रम असल्याने ते बायपासवरील गुरु लॉन्स मंगल कार्यालयात गेले. हळदीच्या समारंभासाठी स्नेहाने चार तोळ्याचा हार, तीन तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याची कर्णफुले, शंभर ग्रॅमचे चांदीचे पैंजण आणि चांदीचा पट्टा घातला होता. कार्यक्रम संपल्यानंतर तिने दागिने काढून खोलीतील बॅगमध्ये ठेवले. रात्री दहाच्या सुमारास दोन अल्पवयीन चोरट्यांनी त्या खोलीत प्रवेश करून अडीच लाखांच्या दागिन्यांची बॅग लंपास केली. रात्री साडेअकरा वाजता स्नेहासह सर्व नातेवाईक खोलीत गेले असता त्यांना दागिन्यांची बॅग लंपास झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिव्हॉल्व्हरचा तपास बारगळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस कॉन्स्टेबलचे रिव्हॉल्व्हर व दहा काडतूस गहाळ होऊन तब्बल महिना उलटला आहे. मात्र, या रिव्हॉल्व्हरचा शोध घेण्यात शहर पोलिस सपशेल अपयशी ठरला आहे. महिन्यानंतर या गुन्ह्याचा तपास थंड बस्त्यात टाकल्याचे दिसत आहे.

आकाशवाणी चौकात एका रिक्षा उलटून ६ जानेवारी रोजी रात्री अपघात झाला होता. या अपघातात पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल अमित स्वामी व त्याचे दोन मित्र मद्यधुंद अवस्थेत आढळले होते. स्वामी हा पोलिसांच्या गणवेशात होता. त्याने त्याच्याजवळील शासकीय रिव्हॉल्व्हर व दहा काडतूस हरवल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या गंभीर घटनेनंतर स्वामी याला सुरुवातीला निलंबित व नंतर बडतर्फ केले आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. गुन्हे शाखेकडून या तिघांची कसून चौकशी करण्यात आली, परंतु, आपण मद्यधुंद असल्याने आपल्याला काही माहित नाही म्हणत हात त्यांनी वर केले आहे. तांत्रिक बाजू, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा देखील वापर तपासणीत करण्यात आला. पण पोलिसांच्या पदरी अपयशच पडले. सुरुवातीला वेगाने सुरू असलेला हा तपास आता बारगळल्यात जमा झाल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लाबोल आंदोलनात पाकिटमारांची टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात घुसलेल्या पाकिटमारांची टोळी गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी सहा वाजता पकडली. टोळीतील सदस्यांच्या ताब्यातून रोख १७ हजार ५०० रुपये, तीन मोबाइल व लेदर पाकिट जप्त करण्यात आले. त्यांना सिटीचौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दिल्लीगेट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात शनिवारी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत स्टेजजवळ काही संशयित तरूण नागरिकांचे खिसे चाचपडताना दिसले. पोलिसांनी संशयित आरोपी बाळू भागाजी मकळे (वय २२ रा. आंबेडकरनगर), प्रमोद उमेश प्रधान (वय २१ रा. मिसारवाडी), मंगेश रमेश तुपे (वय १९ रा. शताब्दीनगर) आणि प्रमोद दालचंद भुते (वय १८ रा. मिसारवाडी) यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, रोख १७ हजार ५०० रुपये, लेदर पाकिट, विविध नागरिकांचे एटीएम, आधार, मतदान कार्ड सापडले. या आंदोलनात विविध नागरिकांचे पाकिट चोरीला गेल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संशयित आरोपींचा या गुन्ह्यांत समावेश असल्याची शक्यता आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, विलास वाघ, सुनील धात्रक, गजानन मांटे व विशाल सोनवणे यांनी केली.

मकळे अट्टल गुन्हेगार

या संशयित आरोपींपैकी बाळू भागाजी मकळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासोबतच हे तिन्ही आरोपी सापडल्याने ते एकत्रितपणे गुन्हे करण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसविरोधात मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर नगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या नगर पालिकेवर गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसला टक्कर देण्यासाठी दलित-मुस्लिम आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यादृष्टीने वार्डावार्डात बैठका घेऊन सत्ताधाऱ्यांविरोधी वातावरण तयार केले जात असल्याची माहिती आहे.

वैजापूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. काँग्रेस व भाजपने नगराध्यक्षपदाचे उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत. शिवसेनेचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. दोन दिवसांपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारिप-बहुजन महासंघाच्या स्थानिक नेत्यांनी एका बैठकीत सत्ताधारी काँग्रेसच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नगर पालिकेवर ठराविक लोकांचेच वर्चस्व राहावे, तेथे दुसऱ्यांचा शिरकाव होऊ नये, अशी आखणी होत असल्याचा आरोप करण्यात आला. नगर पालिका हद्दीत दलित-मुस्लिम आघाडीचे मतदान निर्णायक असल्याने या आघाडीला निवडणुकीत फार महत्त्व आहे. त्यामुळे काँग्रेससह भाजप व शिवसेना ही वोट बँक काबीज करण्यासाठी सरसावली दिसत आहे. तिसऱ्या आघाडीबद्दल आगामी काही आठवड्यात चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.

मतदार यादी कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ९ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी १० जानेवारी २०१८ रोजी अस्तित्वात असलेली राज्य विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने १५ जून २०१६ रोजी दिलेल्या प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यक्रमानुसार १६ ऑगस्ट २०१६ रोजी प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभाग रचनेची कार्यवाही कार्यवाही पूर्ण झाल्याने आता निवडणुकीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

वेळापत्रक

प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी करणे

९ फेब्रुवारी

हरकती व सूचना

९ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी

अंतीम मतदार यादी

२१ फेब्रुवारी

मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी

२६ फेब्रुवारी

अंतिम मतदार याद्या प्रसिद्धी

३ मार्च

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रानडुकरांच्या हल्ल्यात २५ शेतमजूर जखमी

$
0
0

सोयगाव: शेती शिवारात रानडुकरांच्या कळपांनी धुडगूस घालून रब्बी व भाजीपाला काढणी करणाऱ्या शेतमजुरांवर हल्ले चढवले आहेत. रानडुकरांच्या कळपांनी आठवडाभरात तब्बल २५ शेतमजुरांना गंभीर जखमी केले आहे.

सध्या रब्बी पिकांची काढणी आणि भाजीपाल्याच्या लागवडी क्षेत्रावर तोडणीचे काम वेगात सुरू आहे. त्याचवेळी शेतातच दबा धरून बसलेल्या रानडुकरांचे कळप शेतमजुरांवर हल्ले चढवत आहेत. वनविभागाच्या पथकांकडून या घटनाचे पंचनामेही होत नसल्याने रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतमजुरांना स्वखर्चाने उपचार करून घ्यावे लागत आहेत. काही ठिकाणी शेतमालकांनाच मजुराच्या वैद्यकीय खर्चाचा भार सोसावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत. रानडुकरांना हुसकावून लावण्यासाठी फटाक्यांचे आवाज करण्याची शक्कल शेतकरी लढवत आहेत. दरम्यान, रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी झालेला शेतमजूर, शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचा कोणताही निकष वनविभागाकडून लावण्यात आलेला नाही. केवळ घटनेचा पंचनामा करणे एवढेच वनविभागाचे काम आहे. या पंचनाम्याचा काहीही उपयोग होत नसल्याने शेतकरी, शेतमजूर पंचनामा करून घेण्यात स्वारस्य दाखवत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images