Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जिल्ह्यातील १७९० गावांवर दुष्काळछाया

0
0

म. टा .प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील १७९० गावांवर दुष्काळाचे सावट आहे. या गावांसह जिल्ह्यात संभाव्य टंचाईची परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने जून अखेरपर्यंत ७४ कोटी २२ लाख रुपयांचा टंचाई आराखडा शासन दरबारी सादर केला आहे.

धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था औरंगाबाद जिल्ह्याची झाली असून एकीकडे जायकवाडी धरण भरलेले असताना पैठण तालुक्यातील २७२ गावे टंचाईच्या छायेखाली आहेत. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ८३ टक्केच पाऊस झाला असल्याने पावसाळ्यानंतर काही दिवसातच जिल्ह्यातील गंगापूर, फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले. सध्या जिल्ह्यातील दोन लाख नागरिकांची तहान १०० टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यावर मात करण्यासाठी उपाय योजना करण्यास सुरुवात केली असून त्यासाठी ७४ कोटी २२ लाख ६६ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये चार नगरपालिकांचाही समावेश आहे. दुष्काळछाया असलेली जिल्ह्यातील तालुकानिहाय गावे पुढीलप्रमाणे: औरंगाबाद २७३, पैठण २७२, गंगापूर ३१८, वैजापूर १४७, कन्नड २२२, खुलताबाद १०२, सिल्लोड २३०, सोयगाव ७०, फुलंब्री १५१. यासह चार नगरपालिकाअंतर्गत ५ गावे.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या २५१५ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या टंचाईच्या काळात कृती आराखड्यानुसार नवीन विंधन विहीर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना, टँकर, तसेच बैलगाडीने केलेला पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विहीर खोल करणे, गाळ काढणे अशा विविध उपाय योजना करून पाणीटंचाई मात करण्याचे नियोजन प्रशासनने केले आहे.

खर्चाचे नियोजन

प्रशासनाने शासनदरबारी पाठवलेल्या टंचाई कृती आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ९५२ गाव-वाड्यांना टंचाईची झळ बसेल अशी शक्यता गृहित धरून त्यावर ५६ कोटी ८३ लाख ४६ हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यानंतर त्यानंतर एप्रिल ते जून २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत ९४५ गावांमध्ये ८३३ योजना प्रस्तावित करून यासाठी १४ कोटी ९ लाख ७६ हजार खर्च करण्याचे नियोजन आहे.

जानेवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यातील १ हजार ७८५ गावात २३०० योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून यासाठी ७० कोटी ९३ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यात शहरीभागातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. त्यानुसार कन्नड, खुलताबाद, सिल्लोड आणि वैजापूर या चार नगरपालिका क्षेत्रातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सहा महिन्यांत २१५ योजना प्रस्तावित केल्या असून त्यासाठी ३ कोटी २९ लाख ४४ हजार रुपये निधी खर्च करण्याचे नियोजन राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राप्तिकर विभागाची अडीच हजार जणांना नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी आणि करचुकेवेगिरीविरुद्ध प्राप्तिकर विभागाने हाती घेतलेल्या ऑपरेशन क्लिन मोहिमेंतर्गत मराठवाड्यातील सुमारे अडीच हजार संशयित खातेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती शुक्रवारी मुख्य आयकर आयुक्त असीमकुमार यांनी दिली.

आयकर दात्यांची संख्या वाढावी, लोकांनी कर भरणा करावा, काळा पैशांला रोख लागावा यासाठी आयकर विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी 'ऑपरेशन क्लिन मनी' मोहीम हाती घेण्यात आली आहे. 'ऑपरेशन क्लिन मनी' संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, याद्वारे लाखो खात्यांची तपासणी करण्यात आली आहे. या माहितीचे विश्लेषण करून यात खातेदाराची पूर्वीची कर विवरणपत्रे व इतर कागदपत्रे यांचा अंदाज घेऊन ज्यांनी अचानक मोठा निधी जमा दाखवला असेल, असे खातेदार आता रडारवर आले आहेत. या पैशांचा स्त्रोत जाणून घेण्यासाठी संशयित खातेदारांना नोटीस बजाविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव रंग मारलेला वाघ

0
0

नितेश राणे यांची टीका; काँग्रेस केवळ नांदेडपुरती मर्यादित

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्यातील काँग्रेस नांदेडपुरती मर्यादित आहे. उद्धव ठाकरे रंग मारलेला वाघ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडेंना मोठे केल्याने तिथेही मोठी नाराजी आहे. अशा परिस्थितीत जनतेसमोर आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पर्याय घेऊन जात आहोत. आमच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यातून विविध पक्षांतील नाराज नेते, कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. त्याची झलक रविवारी पाहायला मिळेल,' अशी टोलेबाजी आमदार नितेश राणे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची रविवारी (११ फेब्रुवारी) औरंगाबादेत सभा होणार आहे. पक्षस्थापनेनंतर राणे प्रथमच मराठवाड्यात येत असल्याने त्यांच्या सभेला राजकीयदृष्ट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सभेच्या पूर्वतयारीसाठी शहरात आलेल्या आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय क्षमता आहे, हे सर्वांना माहित आहे. बाळासाहेबांसारखी त्यांच्यात हिंमत नाही. ते केवळ रंग मारलेला वाघ आहेत. काँग्रेसची परिस्थितीही अत्यंत बिकट आहे. त्यांनी स्थानिक लोकांना महत्व न दिल्याने काँग्रेस लयास चालली आहे. किंबहुना प्रदेश काँग्रेस नांदेडपुरतीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंना मोठे करत असल्याने प्रचंड नाराजी आहे. पक्षस्थापनेपासून सक्रिय असलेले नेते अजित पवारांवर नाराज आहेत. शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडल्याचे सांगते आणि दुसरीकडे बैठकांना उपस्थित राहते. उद्धव ठाकरे ठोस भूमिका घेत नसल्याने पक्षातील अनेकजण अस्वस्थ आहेत़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा चांगली आहे. भाजप सरकारने धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करायला हवी,' असे सांगून त्यांनी भाजपची पाठराखण केली.

अन्यथा तिसरा डोळा उघडू

'अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे़ कोर्टात हे प्रकरण आहे़ नेहमीच चर्चा आणि प्रतीक्षा यात वेळ वाया जात आहे़ राजकीय इच्छाशक्ती असल्यास मराठा समाजाला आरक्षण एका दिवसात मिळू शकते़ आशावादी असलेल्या मराठा समाजाला सरकारने तिसरा डोळा उघडायला भाग पाडू नये. आरक्षण हे सहजासहजी मिळणे शक्य नाही, याची जाणीव आहे़ त्यामुळे आगामी काळामध्ये एकजुटीने लढा देण्याचे नियोजन सुरू आहे,' असे राणे यांनी सांगितले़

आज सभा

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची जाहीर सभा रविवारी सायंकाळी पाच वाजता होत आहे. सिडको एन - सात येथील रामलीला मैदानावर होणाऱ्या या सभेत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह काही संघटनांचे पदाधिकारी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. एमआयएमचे काही नगरसेवकही पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा राणे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये 'अमित शाह पकोडा सेंटर' सुरू

0
0

औरंगाबाद

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सिडकोतील हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मागे 'अमित शाह पकोडा सेंटर' सुरू करण्यात आले आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज या सेंटरला भेट दिली व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या व्यक्तव्याचा भजे तळून निषेध व्यक्त केला.

नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर सहा कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात लाखावरही रोजगार दिला नाही. यामुळे हेच बेरोजगार आता सरकारला त्यांची जागा दाखवतील. अमित शहा यांनी बेरोजगार तरुणांचा अपमान केला आहे. या सरकारमध्ये केवळ अमित शहा यांचा मुलगा जय शहालाच रोजगार मिळाला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नऊ फेब्रुवारीला सिडकोत अमित शहा पकोडा सेंटर सुरु करण्यात आले. याच सेंटरला आज विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना मराठा आरक्षणाच्या विरोधात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्कालीन सरकारने नेमलेल्या समितीचा मी अध्यक्ष होतो. राज्यातील १७ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले. ठिकठिकाणी मला अनेक पक्ष, संघटना, जाती, धर्माच्या संघटनांची शिष्टमंडळे भेटली आणि मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली. शिवसेनेचे एकही शिष्टमंडळ मला भेटले नाही. आरक्षणाचा बाजूने शिवसेनेची भूमिका नव्हती. मराठा क्रांती मोर्चांची भव्यता पाहिल्यानंतर शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी 'आम्ही आरक्षणाचा बाजूने आहोत,' असे जाहीर केले, असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला.

सिडको एन - सात येथील रामलिला मैदानावर राणे यांची रविवारी रात्री सभा झाली. पक्षस्थापनेनंतरची ही पहिलीच सभा होती. माजी महापौर सुदाम सोनवणे, जगदीश बाबर, निलेश भोसले, मनोज कदम, सम्राट महाडिक, संजय पाटील, संदीप कुरतडकर, संतोष पाटील, राजेश आठले, सिद्धार्थ वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राणे यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढविला. भाजपच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. राणे म्हणाले,'तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी एक समिती नेमली. त्याचा अध्यक्ष मी होतो. नियमात बसवून आरक्षण कसे देता येईल यासाठी देशभरातील तज्ज्ञांना भेटलो. शिवसेनेचे एकही शिष्टमंडळ भेटले नाही. शिवसेनेने मराठा समाजाचा द्वेष केला. त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये मराठा उमेदवार डावलले.'

तुम्ही ३४ टक्के आहात. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एकजूट दाखवा, आरक्षण मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला. राणे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांना शेतीतले काही कळत नाही. केवळ भावनेचे राजकारण केले. शिवसेनेने मराठवाड्यातील तरुणांना काय दिले? तुमचे खासदार चार टर्म निवडून कसे काय येतात, हे आश्चर्य आहे. अभ्यास आणि खैरे असे समीकरणच कुठे जुळत नाही. ते आमदार, मंत्री असताना कधीच अभ्यासपूर्ण वक्तव्य करत नव्हते. औरंगाबाद महापालिकेची काय अवस्था आहे. १२ कोटींचे वीजबिल थकित आहे. शहरात पाणी नाही, रस्ते खराब आहेत, २५ वर्षांपासून शिवसेना सत्तेत असून हे हाल आहेत. खैरे उठसूट ठाकरे कुटुंबीयांच्या पाया पडतात. त्यामुळेच कदाचित त्यांचे नेता म्हणून प्रमोशन केले.'

राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपचाही समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा समाचार घेताना राणे म्हणाले, की १५ वर्षे सत्तेत राहून यांनी काही केले नाही आणि आता मोर्चे काढत आहेत. अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील धरणांची उंची वाढवली, पण मराठवाड्यात पाणी मिळावे म्हणून काहीच केले नाही. पदावर असताना मराठवाडा का आठवला नाही? काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही मराठवाड्याशी काही घेणेदेणे नाही. १३ वर्षे मुख्यमंत्रिपद मराठवाड्याकडे होते, त्यांनी काय दिवे लावले? भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने आठवली पाहिजेत. शेतीमालाला हमीभाव, नोकऱ्या कुठे आहेत? कर्जमाफीवर लोक नाराज आहेत. सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. भाजपने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. मी एनडीएला पाठिंबा दिला, पण त्यांचा बांधील नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात गारपिटीने दाणादाण

0
0

- मराठवाड्यासह विदर्भात गारपिटीने हाहाकार

- गारपीट, अवकाळी पावसाने रब्बी संकटात

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्याच्या जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी तुफान गारपीट झाली. यामध्ये जालना जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, दहा मिनिटांच्याच या तडाख्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मोठमोठ्या आकारांतील गारपिटींमुळे चहूबाजूंनी पांढरी चादर अंथरल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. विभागात सुमारे १०७ गावांत गारपीट झाल्याचा प्राथमिक अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला असून, गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, फुलंब्री तालुक्यात रविवारी सायंकाळी गारपीट झाली.

जालन्यासह बीड, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये शेतीला गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने सरकारला गारपिटीचा प्राथमिक अहवाल सादर केला. विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करून नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

जालन्यात मोठा फटका

जालना जिल्ह्यामध्ये सकाळी आठ वाजता अचानक ढग दाटून आले आले आणि मोठ-मोठ्या गारांचा वर्षाव सुरू झाला. जालना जिल्ह्यातील बदनापूर, मंठा, घनसावंगी, जाफराबाद आणि जालना तालुक्यातील काही भागात गारपीट झाली. जिल्ह्यातील ५१ गावांत गारपीट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीत सर्वाधिक नुकसान गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले. द्राक्षासह मोसंबी, आंबा, पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील शेतकरी नामदेव लक्ष्मण शिंदे (वय ६५) जाफराबाद तालुक्यातील आसाराम जगताप (६५) यांचा यामध्ये मृत्यू झाला. परतूर, मंठा व अंबड तालुक्यात महसूल विभागाकडून स्थळपाहणी करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यात सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. रात्री उशिरा तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली.

बीडमध्ये रब्बीची हानी

बीड, माजलगाव, शिरूर आणि गेवराई या चार तालुक्यातील ३० गावांत रविवारी सकाळी गारपीट झाली. या वेळी काही ठिकाणी लिंबाच्या आकाराच्या गारांचा मारा झाला. त्यामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, ज्वारी, ऊस या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. पिंपळनेर, वायथटवाडी येथे गारपीट झाली. गेवराई तालुक्यातील पौळाची वाडी, खालेगाव, तांदळा खळेगाव येथे गारपीटीची नोंद झाली. शिरूर कासार तालुक्यातील आठ आणि माजलगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये गारपीट झाली.

परभणीत पिके जमिनदोस्त

जिल्ह्यातील सेलू, मानवत, पाथरी तालुक्यासह काही भागात रविवारी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीने उभी ज्वारी, गहू, हरभरा आणि बाजरीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल. अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला. अनेक शेतकऱ्यांची कापूस, सोयाबिन आणि तुरी सारखे पिक उघड्यावर होते. जे की गारपिट आणि पावसामुळे मातीस मिळाले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. परभणी तालुक्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जिंतूर तालुक्यातील असोला, धमधम, ओझर या ठिकाणी गारपीट व हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. सेलू तालुक्यातील शिराळा, ब्रम्हेवाडी,गोमेवाडी, हाडेगाव या ठिकाणीही गारपीट झाली.

हिंगोलीत जनावरांचा मृत्यू

हिंगोली तालुक्यातील मौजे इंचा येथे वीज पडून एक वासरू दगावले. सेनगाव तालुक्यातील वन, वजर येथे गारपीट झाली. कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे वीज पडून एक गाय ठार झाली. जिल्ह्यातील औंढा, कळमनुरी, हिंगोली या तालुक्यांतही पाऊस झाला.

लातूर तालुक्यात गारपीट

कुंटेफळ, माटेफळ, भिसेवाघुली (ता. लातूर) येथे गारपीट झाली. लातूर जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पाऊस पडल्याची नोंद आहे.

विदर्भालाही तडाखा

नागपूर : पश्चिम विदर्भाला रविवारी गारपिटीचा तसेच अकाली पावसाचा जबर तडाखा बसला. वेगवेगळ्या घटनांत गारपीट आणि वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला, तर सात जनावरे दगावली. बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती या चार जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला. पश्चिम विदर्भाला गारपिटीने तर पूर्व विदर्भाला वादळी पावसाने पार झोडपून काढले.

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दुपारी वातावरणाचा नूर एकदम पालटला. वाऱ्यासह पाऊस आणि काही वेळातच गारपीट असे चित्र होते. वाशीम जिल्ह्यात गारपिटीमुळे एका वृद्धेचा मृत्यू झाला. पूर्व विदर्भातही पावसाने हजेरी लावली. गोंदिया, अमरावती जिल्ह्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे वीज कोसळून सात जनावरे दगावली. गुराखी गंभीर जखमी झाला. आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील संत्र्याला या अस्मानी संकटाने मोठा फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील राजूरा बाजार, अमडापूर येथील राज्य मार्गावर वादळी पावसामुळे झाड कोसळल्याने या मार्गाची वाहतूक दोन तास बंद होती. दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुपरस्पेशालिटी’साठी साकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्लीतील 'मौलाना आझाद सुपरस्पेशालिटी सेंटर'प्रमाणे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या 'सुपरस्पेशालिटी सेंटर ऑफ एक्स्लन्स फॉर ओरल कॅन्सर, प्री-कॅन्सर सर्जरी क्रॅनिओ-मॅक्झिलो-फेशिअल, प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह हेड नेक सर्जरी अँड ट्रॉमा' या अतिविशेषोपचार केंद्राला मान्यता द्यावी, असे साकडे 'दंत'चे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांना घातले. त्यावर नक्कीच विचार करू, असे आश्वासन मंत्र्यांनी अधिष्ठातांना दिल्याचे डॉ. डांगे यांनी 'मटा'ला सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत दिल्लीत अतिविशेषोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचधर्तीवर शहरातील अतिविशेषोपचार केंद्राला मान्यता द्यावी. हे केंद्र राज्य कर्करोग संस्थेच्या (स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट) परिसरात प्रस्तावित असून या केंद्रासाठी २४ कोटी ५२ लाखांच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास एकाच परिसरात सर्वच प्रकारच्या कर्करुग्णांवर उपचार होऊ शकतील. तब्बल ४० टक्के कर्करुग्ण हे तोंडाच्या कॅन्सरचे आहेत व ही संख्या फार मोठी आहे. त्यामुळे 'स्टेट कॅन्सर'च्या परिसरात 'दंत'चे सुसज्ज अतिविशेषोपचार केंद्र उभे राहणे जास्त योग्य ठरेल, अशी मागणी डॉ. डांगे यांनी कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांना प्रत्यक्ष भेटून केली. या मागणीची दखल घेत याचा नक्कीच विचार करू, असे आश्वासन नड्डा यांनी दिल्याचे डॉ. डांगे यांनी सांगितले. या प्रस्तावित केंद्रामध्ये 'दंत'संदर्भातील सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार व अतिविशेषोपचार उपलब्ध होणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व चिकित्सालयीन ज्ञान प्राप्त होणे अपेक्षित आहे. 'स्टेट कॅन्सर'च्या इमारतीमागे दंत महाविद्यालयाचे वसतिगृह आहे आणि हे वसतिगृह लवकरच स्थलांतरीत होणार आहे. त्यामुळे त्या जागेवरील इमारतीचे नूतनीकरण व मजबुतीकरण केल्यास तिथे हे केंद्र उभे राहू शकेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

उपकरणे- मनुष्यबळासाठी गरज १२ कोटी

या संदर्भात १२ कोटी ३० लाखांचा प्रस्ताव १५ डिसेंबर २०१७ रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाला देण्यात आला आहे. या केंद्रातील उपकरणे व पदनिर्मितीसाठी १२ कोटी १३ लाखांची गरज असून, एकूण २४ कोटी ५२ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन डॉ. डांगे यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात दोन कॅन्सर सेंटर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हरियाणातील छज्जर व पश्चिम बंगालमधील चित्तरंजन येथे दोन 'नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट' होणार असून, त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक केली जाणार आहे. त्याचवेळी देशभरात २० 'स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट' उभे राहणार आहेत. औरंगाबादेतील संस्थेचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय देशभरात ५० 'टर्शरी कॅन्सर केअर सेंटर' उभे राहणार आहेत आणि त्यातील एक लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उभे राहात आहेत; तसेच देशभरातील दीड लाख 'वेलनेस सेंटर'मध्ये ३० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीचे पाच दुर्धर आजारांबाबत स्क्रिनिंग होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी (११ फेब्रुवारी) शहरात केली.

'स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट'च्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन, तर कर्करुग्णांना रेडिएशन देण्यासाठीच्या 'भाभा ट्रॉन टू' या उपकरणाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक (शैक्षणिक) डॉ. कैलाश शर्मा, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, डॉ. भागवत कराड, वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, अतिरिक्त सहसंचालक (दंत) डॉ. सुरेश बारपांडे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायवाड, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. नड्डा पुढे म्हणाले, 'देशातील दीड लाख 'वेलनेस सेंटर'मध्ये गर्भाशय, स्तन व मुख कर्करोगासह उच्च रक्तदाब व मधुमेहाबाबत ३० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींचे स्क्रिनिंग होणार आहे. 'पीपीपी' तत्त्वावर देशात ४०० डायलिसिस सेंटर कार्यान्वित होत आहेत आणि यामध्ये आतापर्यंत दोन लाख व्यक्तींचे १२ लाख डायलिसिस करण्यात आले आहे. त्याशिवाय दहा हजार शासकीय मेडिकलच्या जागा व साडेआठ हजार पीजी जागांना नुकतीच मान्यताही देण्यात आली आहे.'

२०२५ पर्यंत क्षयरोग मुक्तीचे उद्दिष्ट

क्षयरोगाच्या प्रत्येक रुग्णाला प्रत्येक महिन्याला ५०० रुपयांचा 'न्युट्रिशनल सपोर्ट' दिला जाणार आहे व २०२५ पर्यंत देशाला क्षयरोगापासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठीच क्षयरोगाचे निदान करणाऱ्या ७०० 'सीबीनॅट' मशीन उपलब्ध केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईमध्ये घराघरात जाऊन क्षयरोगाची चाचपणी केली जात आहे, असेही नड्डा म्हणाले.

बजेट नेणार अडीच टक्क्यावर

भारतापेक्षाही छोट्या-छोट्या देशांमध्ये आरोग्याचे बजेट हे पाच ते सहा टक्क्यांपर्यंत आहे, पण भारतात दीड टक्क्यांवर नाही, याबाबत विचारले असता, नड्डा म्हणाले, 'भारताच्या लोकसंख्येमुळे आपल्या देशाची तुलना इतर देशांशी करता येऊ शकत नाही. भारताचे आरोग्याचे बजेट 'जीडीपी'च्या दीड टक्का असले तरी भविष्यात अडीच टक्क्यांवर नेण्यात येणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चालू खात्यावरून परस्पर व्यवहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयसीआयसीआय बँकेच्या शाखा अधिकाऱ्याच्या संगनमताने आरोपीने गॅस एजन्सी मालकाच्या चालू खात्यातून व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देऊन तसेच पोलिस आयुक्तांना पत्र देऊनही कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे कोर्टात धाव घेतली असता, गुन्हा दाखल करून तीन महिन्यांत तपास करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्याला दिले.

या प्रकरणी तक्रारदार हे प्रयाग इंण्डेन गॅस एजन्सीचे मालक इंद्रकुमार जेवरीकर आहेत. त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या टिळकनगर शाखेमध्ये गॅस एजन्सीच्या नावाने चालू खाते उघडले होते. त्यात त्यांनी सुरुवातीला पाच लाख रुपये इतकी रक्कम भरणा केली होती. ऑक्टोबर २०१५ मध्ये गॅस एजन्सीच्या चालू खात्यामध्ये तक्रारदार हा व्यवहार करण्यासाठी गेला असता, बँकेचे शाखा अधिकारी ऋतुपूर्ण कुलकर्णी यांनी तक्रारदार यांचे हस्ताक्षर बँकेच्या रेकॉर्डप्रमाणे जुळत नसल्याचे सांगितले. तक्रारदाराने बँकेच्या रेकॉर्डची तपासणी केली असता, तक्रारदाराच्या नावासमोर कुंदन बाळकृष्ण देशमुख यांच्या हस्ताक्षराने बरेच व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता, तक्रारदाराला अपमानास्पद वागणूक देऊन कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास कुलकर्णी यांनी नकार दिला. दरम्यान, खात्यातून कुंदन देशमुख यांच्या हस्ताक्षराने बरेच मोठे व्यवहार करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदाराने २७ जून २०१७ रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस आयुक्तांना ३० जून २०१७ रोजी पत्र दिले. मात्र कोणतीच कारवाई न केल्यामुळे तक्रारदाराने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांच्या कोर्टात अॅड. राहुल जोशी यांच्या मार्फत तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत कोर्टाने फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जवाहरनगर पोलिस ठाण्याला दिले. तसेच तीन महिन्यांत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचेही आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यांची ८४ लाखांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लातूर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मल्टी स्टेट कॉ. ऑप क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाच्या व्यापाऱ्यांनी डीडी काढण्यासाठी दिलेल्या ८४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सोसायटीचा सरव्यवस्थापक चंद्रकांत बदकुलवार याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत त्रिमूर्ती चौक भागात घडला.

याप्रकरणी जयपालदास गिरधारीलाल साहित्या (वय ६१, रा. गायत्रीनगर, जळगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे होलसेल कापड व्यावसायिक आहेत. साहित्या यांचा मुलगा रवी याचे देखील कपड्याचे दुकान असून औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक व धुळे येथे त्यांचे ग्राहक आहेत. साहित्या हे नोव्हेंबर २०१६ मध्ये वसुलीसाठी शहरात आले होते. त्यांनी त्यावेळी साठ लाख रुपयांची वसुली केली होती. त्यांना इतर व्यापाऱ्यांना पैसे द्यायचे असल्याने त्यांना डिमांड डाफ्ट काढायचे होते. या कामासाठी त्यांचे जावई अमित गोकलानी यांनी त्यांची ओळख सावरकर क्रेडीट सोसायटीचा शाखा व्यवस्थापक रवींद्र जेसू जाधव (वय ४० रा. सिंधी कॉलनी) व सरव्यवस्थापक चंद्रकांत बदकुलवार यांच्यासोबत करून दिली. जाधव व बदकुलवार यांनी साहित्या यांच्याकडून ५३ लाख ४० हजार रुपये घेऊन १२६ डीडी आणून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर साहित्या यांनी पाठपुरावा केला असता त्यांना ही रक्कम लातूर येथील मुख्य कार्यालयात वर्ग केल्याची माहिती देण्यात आली. एक, दोन दिवसांत डीडी काढून देतो, असे सांगण्यात आले. यानंतर दहा दिवसांनी जाधव याने साहित्या यांना लातूर येथील अॅक्सेस बँकेचे १२६ धनादेश दिले. हे धनादेश इतर व्यापाऱ्यांना दिले असता ते वठले नाहीत. दरम्यान, साहित्या यांनी सोसायटीच्या त्रिमूर्ती चौक येथील शाखेची माहिती घेतली असता ती बंद झाल्याचे त्यांना समजले. लातूर येथे जाऊन त्यांनी रक्कम मिळवण्यासाठी पाठपुरावा केला, पण टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. साहित्या यांच्याप्रमाणेच दुसरे व्यापारी कैलास मनोहरलाल दलवाणी यांच्याकडून २५ लाख ३७ हजार रुपये, तसेच रोशन मुलचंद जैस्वानी यांच्याकडून चार लाख ३७ हजार रुपये घेऊन त्यांना देखील धनादेश देत फसवणूक करण्यात आली आहे.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी साहित्या यांच्या तक्रारीवरून सोसायटीचे चंद्रकांत बदकुलवार, रवींद्र जाधव, विजय त्रिंबकराव केंद्रे, भुजंग पवार, प्रमोद बालाजी निमसे, गणेश थोरात यांच्यासह सोसायटीचे इतर सदस्य व संचालकाविरुद्ध फसवणूक, अपहार, कट रचणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षणाचा निधी खात्यात जमा करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत झालेल्या व होऊ घातलेल्या सर्वच प्रशिक्षणाचा निधी प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्याच थेट खात्यावर जमा करावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.

संघाच्या शिष्टमंडळाने याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड,डायटचे प्राचार्य डॉ. सुभाष कांबळे व प्रभारी शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 'डायट'मार्फत (जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था) होणाऱ्या 'शिक्षण प्रशिक्षणां'तर्गत पहिली ते पाचवी १०० टक्के विद्यार्थ्यांना 'संख्येवरील क्रिया संबंध विकसन' या तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी प्रतिशिक्षक पाचशे रुपयांप्रमाणे निधी मंजूर आहे. हा निधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. परंतु, अनेक ठिकाणी जेवणाचा दर्जा खालावलेला असतो. काही ठिकाणी तर जेवणच दिले जात नाही. त्यासाठी अनुज्ञेय असलेली रक्कम ही डायट संस्थेमार्फत शिक्षकांच्या थेट वेतनाच्या खाती जमा करण्यात यावी. पुण्यातील विद्या प्राधिकरणाकडून प्राप्त सहा फेब्रुवारी २०१८च्या पत्रान्वये पुन्हा १४ फेब्रुवारी ते १४ मार्च २०१८ या कालावधीत विविध टप्प्यांत आयोजित करण्यात येणाऱ्या पुढील प्रशिक्षणाचा निधी देखील शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, कैलास गायकवाड, प्रशांत हिवर्डे, शमीम पठाण, संजय भडके, पुरुषोत्तम काळे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लंपास रक्कम प्रेयसीच्या खात्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगर येथील वीजबिल भरणा केंद्रातील रोखपालने सव्वा दोन लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या रोखपालाला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तपासामध्ये या बहाद्दराने अपहार केलेली रक्कम पुण्यात राहणाऱ्या प्रेयसीच्या खात्यावर जमा केली असल्याचे समोर आले आहे. तसेच ग्राहकांकडून बिलाची रक्कम घेतल्यानंतर त्यांना फक्त दहा रुपयांच्या पावत्या देण्यात आल्याचेही उघड झाले आहे.

जयभवानीनगर सहकारी पतसंस्थेच्या वीजबिल भरणा केंद्रात मंगेश लक्ष्मण जगताप (रा. एन २, मुकुंदवाडी) हा रोखपाल म्हणून कामाला होता. २३ आणि २४ जानेवारी रोजी मंगेश जगतापने एका ग्राहकाकडून वीज बिलाचे सात हजार रुपये घेतले, मात्र त्याला फक्त दहा रुपयांची पावती दिली होती. हा प्रकार पतसंस्थेच्या संचालक सुलोचना आकसे यांच्या लक्षात आला होता. त्यांनी तपासणी केली असता या दोन दिवसांत दोन लाख १३ हजार रुपये २६७ रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आले. मात्र मंगेशने या रक्कमेचा अपहार केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात मंगेश विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी मंगेशला अटक केली होती. रविवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.

आज प्रेयसीची चौकशी

संशयित आरोपी मंगेशची प्रेयसी पुणे येथे राहते. तिच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली शिवाय तिला प्रोझोन मॉलमधून डेबिट कार्डद्वारे २८ हजारांची खरेदी देखील दिल्याची माहिती दिली. पोलिस त्याच्या प्रेयसीची चौकशी करणार असून तशी नोटीस तिला बजाबली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिला सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. मंगेशच्या घराची झडती घेतली असता रोख एक लाख ३० हजार रुपये, पाच ग्रॅमचे दागिने, आयफोन व तीन लाख रुपयांची गुंतवणूक केलेली कागदपत्रे सापडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किती कोबाल्ट लावणार, डॉक्टर नेमणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तंबाखू, गुटखा, दारू व अन्य व्यसनांमुळे, चुकीच्या सवयींमुळे हळूहळू नव्हे तर झपाट्याने मृत्युकडे वाटचाल होते व हमखास होते. त्यामुळेच दोन राष्ट्रीय, २० राज्य व ५० टर्शरी कॅन्सर केअर सेंटर व ४०० डायलिसिस सेंटर उभे करण्यात येत आहे. मात्र शेवटी किती कोबाल्ट मशीन लावणार आणि डॉक्टर नेमणार, हा प्रश्न आहे. आजार झाल्यानंतर उपचार करण्याची जबाबदारी सरकारची आहे, परंतु आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे, असे स्पष्ट करीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी 'कॅच देम यंग'चा नारा दिला.

स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन व अणुउर्जा विभाग व टाटा म्मोरियल हॉस्पिटलने देणगी दिलेल्या 'भाभा ट्रॉन टू'च्या उद्घाटनप्रसंगी रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी नड्डा म्हणाले, आपल्याकडे सल्ला देणाऱ्यांची संख्या खूप आहे; परंतु स्वतःविषयी फार कमी माहिती असते. एका शिबिरात एका पहिलवानाचे रक्त घेतले जात होते, पण कितीतरी वेळ रक्त काढण्याची प्रक्रिया सुरूच होती. त्याचे रक्त खूपच घट्ट होते म्हणून काढणे त्रासदायक होत होते. तेव्हा त्याला आहाराविषयी विचारले तर रोज २० अंडे खातो म्हणून त्याने फुशारकीने सांगितले. तेव्हा त्याला कोलेस्ट्रॉल तपासून घे म्हणून सांगावे लागले. एक धट्टाकट्टा कमांडो रक्तदान करत होता, पण त्याचे हिमोग्लोबिन फार कमी भरले आणि त्याला रक्तदान करता आले नाही. ही अशी स्थिती आपल्या देशामध्ये सर्वदूर आहे आणि आपल्याला आपल्याच शरीराविषयी माहीत नसते. व्यसनांनाही कुठलाच लगाम नाही. या स्थितीमुळे आजार वाढत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उपलब्ध करतानाच स्थापन करण्यात येणाऱ्या दीड लाख वेलनेस सेंटरमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, गर्भाशय व स्तनाच्या कर्करोगाचे स्क्रिनिंग होणार आहे. त्यानंतरही आजार झाल्यास उपचारासाठी देशभरात ८२ कॅन्सर सेंटर, ४०० डायलिसिस सेंटर, दीड लाख वेलनेस सेंटरसह सात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणार आहेत. त्यापैकी चार महाराष्ट्रात, म्हणजेच औरंगाबाद, लातूर, यवतमाळ व अकोला येथे उभे राहणार आहेत. २४ नवीन मेडिकल कॉलेजांबरोबरच गोंदियासारख्या अनेक जिल्हा रुग्णालयांचे रुपांतर हे मेडिकल कॉलेजांमध्ये केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

'आयुष्यमान भारत' जगात सर्वांत प्रभावी

'विहिंप'चे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी देशाची आरोग्य व्यवस्था ही 'आयसीयू'मध्ये असल्याचा आरोप केल्याबाबत नड्डा यांना छेडले असता, 'आयुष्यमान भारत' ही योजना जगातील सर्वांत प्रभावी आरोग्य योजना असल्याचे ठणकावून सांगितले. कर्करोगाचा विस्फोट होताना सर्व तंबाखुजन्य उत्पादनांवर बंदी का आणली जात नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, 'प्रत्येक तंबाखुजन्य पदार्थावर कर्करोगाची वॉर्निंग दिली जाते व त्यामुळे सहा टक्के तंबाखू सेवन कमी झाले आहे. मात्र संपूर्ण बंदी हे एकट्या आरोग्य विभागाचे काम नाही, तर समाजानेही पुढे आले पाहिजे', असे सांगत त्यांनी अवघ्या चार ते पाच मिनिटांत पत्रकार परिषद गुंडाळली.

मोबाइल रिचार्जवेळी विम्याचे १२ रुपये कापा

अवघ्या १२ रुपयांत दोन लाखांची विम्याची योजना आहे. पण १२ रुपये खर्च करण्याची लोकांची तयारी नाही. मोबाइल रिचार्ज करायला, तंबाखू-गुटखा-दारूसाठी मात्र पैसे आहेत. त्यामुळे मोबाइल रिचार्ज करतानाच १२ रुपये कापून घ्या, अशीही सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. सीएम फंडातून गेल्या वर्षी २६४ कोटी रुपयांतून विविध उपचार झाले आणि आता रिक्त पदांची समस्याही दूर केली जाईल. मात्र लोकांचे व्यसन कमी होत नसल्याची खंत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी टाटा हॉस्पिटलमध्ये ६५ हजार कॅन्सरच्या नव्या केस होत्या, ही संख्या वाढत आहे. त्यामुळेच 'टाटा'च्या सहकार्याने ठिकठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल उभारले जात आहेत, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.

सिव्हिल हॉस्पिटलची जागा मिळावी

कॅन्सर हॉस्पिटल शेजारी असलेले 'एमयुएचएस'चे केंद्र व सिव्हिल हॉस्पिटलचे स्थलांतर अपेक्षित आहे. त्यामुळे त्या दोन्ही जागा मिळाल्यास कॅन्सर हॉस्पिटलच्या सर्वांगीण विस्तारासाठी मोठी जागा उपलब्ध होईल. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी सूचना विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी केली. गेल्या चार वर्षांत एक लाख ८० हजार कर्करुग्णांवर उपचार व दीड लाख कर्करुग्णांवर रेडिएशनचे उपचार करण्यात आल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर सांगितले. डॉ. रश्मी बेंगॉली यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हा घरच्या माणसांनी केलेला सत्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा साहित्य परिषदेचा आजचा सत्कार म्हणजे माझ्या घरच्याच माणसांनी केलेला सत्कार आहे, अशा शब्दात बडोदा येथील ९१व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सत्काराला उत्तर दिले.

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे त्यांचा रविवारी सायंकाळी न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील होते. देशमुख म्हणाले, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माझा पहिला सत्कार पुण्यात झाला. पुण्याची संस्था ही मातृसंस्था होती, तर औरंगाबादची संस्था माझ्या मातीतील मराठवाड्याची संस्था आहे. मी १६ तारखेला बडोद्याला जात आहे. आज येथे काय बोलावे याबद्दल गहिवरून आले आहे. लेखकाने साधे सोपे लिहावे. अधिक कुठल्याही क्लिष्ट प्रकारात पडू नये. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर काही ठोस पावले उचलायचे आहेत. त्याला तुमची साथ हवी आहे, असे त्यांनी सांगितले.देशमुख यांनी सुबोध लेखन, त्यांच्यावर असलेला प्रेमचंद यांचा ठसा, साहित्यात असलेले प्रकार, त्यांने लिखाण कसे झाले यावर भाष्य केले.

देशमुख यांचे लिखाण कुठल्याही एका प्रवाहात अडकून पडलेले किंवा एका शैलीत अडकणारे लिखाण नाही, असे सांगून डॉ. गणेश मोहिते यांनी देशमुखांचे लिखाण व व्यक्तिमत्व यावर भाष्य केले. त्यांच्यासह डॉ. रामचंद्र काळुंखे यांनीही देशमुख यांच्या वाङमयीन कर्तृत्वावर भाष्य केले. मधुकर मुळे, डॉ. ऋषिकेश कांबळे, कुंडलिक अतकरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्राचार्य ठाले पाटील यांनी १९७९च्या साहित्य संमेलन निवडणुकीत नरहर कुरुंदकर यांना कसे डावलले गेले, हे सांगून निवडणुकांच्या राजकारणाचे खुमासदार किस्से सांगत प्रास्ताविक केले. प्रशासकीय अधिकारी देखील चांगला साहित्यिक कसा असू शकतो, याची देशमुख, रा. गो. साळवी, विश्वास पाटील यांची उदाहरणे देऊन सांगितले. डॉ. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध साहित्यिक, मान्यवर, संस्था यांनीही देशमुख यांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाळकृष्ण’सह पॅरासनची कोट्यवधींची गुंतवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादमधील दोन आणि जालन्यातील तीन कंपन्या विस्तार करणार असून, यावर त्यांनी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'च्या निमित्ताने शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, यानिमित्ताने हजारो कोटींची गुंतवणूक होणार असून, सुमारे दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

औरंगाबाद शहरातील वाळूजमध्ये बाळकृष्ण इंडस्ट्रीज आणि पैठण येथील पेपर इंडस्ट्रीमधील पॅरासन व्हेंचर कोट्यवधींची गुंतवणूक करणार आहेत. या दोन्ही कंपन्या अनुक्रमे १०० व ९६ कोटींची गुंतवणूक करून सुमारे दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. वाळूजमध्ये बाळकृष्ण इंडस्ट्रीजने १०० कोटींच्या गुंतवणुकीतून १५०० जणांना, तर पॅरासॅन व्हेंचर्सतर्फे पैठणमध्ये ९५ कोटींसह ६०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक वाढीसाठी, विस्तारीकरणासाठी १८ फेब्रुवारीपासून मुंबईत 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे आयोजन करण्यात आले आहे. यात औरंगाबाद व मराठवाड्यात गुंतवणूक वाढ होण्यासाठी 'मराठवाडा पॅव्हेलियन तयार करण्यात आले आहे. सध्या औरंगाबाद एमआयडीसी प्रादेशिक कार्यालय सामंजस्य करारावर अधिक भर देत आहे. जालन्यात तीन स्टील कंपन्या गुंतवणूक, विस्तारीकरण करणार आहेत. जालना-अंबड औद्योगिक वसाहतीत एक, तर 'अॅडिशनल फेज थ्री'मध्ये दोन स्टील कंपन्या प्लांट उभारतील. या माध्यमातून सुमारे एक हजार जणांना रोजगार मिळणार आहे. यामध्ये जालना सिद्धीविनायक स्टील १३० कोटी १८ लाख, यथार्थ स्टील २१ कोटी ३५ लाख, तर शाश्वती पॉवर ही कंपनी जालन्यात १३०० कोटी रुपये गुंतविणार आहे.

सीटीआरचा विस्तार

सीटीआर कंपनीला विस्तारीकरणासाठी शेंद्र्यात सुमारे १५ एकर जमीन दिली आहे. कंपनी सात कोटींपेक्षा जास्त कोटींची गुंवतणूक करणार आहे. औरंगाबाद ऑटो अॅन्सलरीज ही कंपनी नऊ कोटींची, संगकाज १८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंत्रिमंडळ समावेशाकडे चार महिन्यांपासून डोळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी मला मंत्रिमंडळात समावेश करून घेण्याबाबत शब्द दिला आहे. मी चार महिन्यांपासून त्याची वाट पाहत आहे. या विधीमंडळ अधिवेशनात मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

राणे यांची रविवारी औरंगाबादेत सभा झाली. त्याआधी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात मी नवीन पक्ष स्थापन केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेपेक्षा वेगळ्या दिशेने पक्षाशी वाटचाल राहणार आहे. माझा पक्ष जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम करेल. दिलेला शब्द पाळण्यावर माझा भर असतो. राजकारणाचा ५० वर्षांचा अनुभव पाठिशी घेऊन नवीन वाटचाल केली आहे. मराठवाड्यात सध्या अनेक पक्ष 'हल्ला बोल' करत आहेत. विविध नेते येऊन एकमेकांवर टीका करत आहेत. सत्तेत असलेले आणि सत्ता भोगलेल्या पक्षांना ही टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. माझ्या दौऱ्यात अनेक पक्ष, संघटनांचे नेते मला येऊन भेटले. राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढची सभा सोलापूरमध्ये होणार आहे. पक्ष नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करू, असे राणे यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळाच्या समावेशाबद्दल काय, असे विचारले असता राणे म्हणाले, मीपण चार महिन्यांपासून वाट पाहत आहे. भाजप व मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. एनडीएत सामील झाल्यानंतर मला दिल्लीत मंत्री होण्याबाबत ऑफर होती. पण त्यामुळे राज्यातील प्रश्न दुर्लक्षित राहिले असते. परिणामी मी महाराष्ट्रातच राहण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचा माझ्या समावेशाला विरोध असला तरी मी त्याला जुमानत नाही. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारवर काही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप नेते दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांना भेटल्यामुळे त्यांच्यात युती होईल काय, असे विचारल्यावर राणे म्हणाले, शिवसेनेचे सगळे निर्णय मातोश्रीतून होतात. त्यामुळे त्या चर्चेतून काही साध्य होईल असे वाटत नाही. शिवसेना कधी कुणासोबत राहू शकत नाही, परिणामी त्यांना एकट्याला लढावे लागणार आहे.

मराठा आरक्षण आवश्यकच

मराठा आरक्षणाबाबत मी आग्रही आहे. किंबहुना त्यादृष्टीने मी प्रस्तावही दिला होता. या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघाले. मुंबईतील मोर्चाप्रसंगी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांचा निर्णय विचारला होता. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत अनुकूल आहेत. आता कोर्टात बाजू योग्य पद्धतीने मांडावी लागणार आहे, असे राणे म्हणाले.

ही राजकीय खेळी ?

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर रविवारी काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मंत्रालय परिसरातही असे प्रकार गेल्या काही दिवसांत झाले. या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले, की आत्मदहनास प्रवृत्त केले जात असावे. ही राजकीय खेळी असावी असे वाटते. मात्र जे होत आहे, ते महाराष्ट्राच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही, भूषणावह नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीटलाइनबद्दल रेल्वे मंत्री सकारात्मक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये पीटलाइन तयार करण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती मराठवाडा रेल्वे कृती समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. पीटलाइन तयार करण्याचा विषय महत्त्वाचा आहे का? असा प्रश्न रेल्वे मंत्र्यांनी केला होता. समितीच्या सदस्यांनी त्यांना महत्त्व पटवून दिल्यानंतर हे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, सचिव प्रल्हाद पारटकर, संतोष भाटिया, मोहन आहेर आणि डॉ. भागवत कराड यांनी मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. या भेटीत औरंगाबाद येथील पीटलाइन बाबत चर्चा करण्यात आली. पीटलाइन तयार झाल्यास मनमाड येथे उभी राहणारी रेल्वे औरंगाबादहून सोडता येईल, असे सदस्यांनी सांगितल्यानंतर रेल्वे मंत्र्यांनी हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यासह रोटगाव ते कोपरगाव कॅडलाइन सर्वेक्षण, या मार्गाचे शिर्डी संस्थानबद्दल असलेले महत्त्व मंत्र्यांच्या लक्षांत आणून दिले. सर्वेक्षणाला दोन वर्षे होऊनही औरंगाबाद ते चाळीसगाव प्रस्तावित रेल्वे मार्गाला अद्याप निधी दिलेला नाही, या मार्गासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली, असे बोरकर यांनी सांगितले. मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रश्न सोडविण्याबाबत रेल्वेमंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या सचिवांना या मागण्यात लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत, असे समितीचे सचिव पारटकर यांनी सांगितले.

मार्चमध्ये हायवेची निविदा

राष्ट्रीय महामार्ग २११वरील औरंगाबाद-चाळीसगाव रस्त्याचे काम प्रलंबित आहे. त्याबद्दल दळणवळण मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. हे काम बोगद्याच्या उंचीमुळे प्रलंबित होते, आता बोगद्याची उंची १४ मीटरवरून २८ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे आणि महामार्गाचे काम एकत्र करण्याचा प्रस्ताव रेल्वेला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्याची निविदा मार्चमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती दळणवळण मंत्रालयातील सूत्रांनी दिल्याचे पत्रकार परिषदे सांगण्यात आले.

खासदार खैरेच जबाबदार

संसदेत खासदार खैरे यांनी औरंगाबाद मेट्रो रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. त्याबद्दल डॉ. भागवत कराड यांनी खासदार खैरे यांच्यावर टीका केली. परिवहन मंत्री तुमच्या पक्षाचे, महापौरही तुमचा, मग शहर बस सेवा वाढवा, असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला. शिवाय रेल्वेबाबत मराठवाडा मागासलेला राहण्यास २० वर्षांपासून खासदार असलेले चंद्रकांत खैरे हेच जबाबदार आहेत. ते समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करत नाहीत, असा आरोप डॉ. कराड यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिन्सी परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिन्सी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी पहाटे तीन वाजता जिन्सी पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत अठरा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून रोख सात हजार रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शेख अनिस शेख अब्दुल, जावेद पटेल हाशम पटेल, शेख जावेद शेख युसूफ, शेख कदीर शेख बशीर, शेख अफीक शेख अहेमद, शेख पाशा शेख चाँद, शेख आसिफ शेख ईस्माईल, आरेफ अली खान, अब्दुल हमीद अब्दुल मुनीर, सय्यद शौकत सय्यद नियामततुल्ला, शेख मुनीर शेख तय्यब, शेख अजहर शेख अहेमद, शेख अस्लम शेख अहेमद, जावेदखान फिरोज खान, शेख मुश्ताक शेख महेमूद, शेख तौफीक शेख हमीद, शेख खालेद शेख तालेब, अब्दुल हमीद अब्दुल मुनीर, मुस्तगीमशाह आयाश शाह यांचा समावेश आहे. या आरोपींकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचिका तपासणीची धडकी

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये संचिका पेंडिंग राहण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहेत. किरकोळ त्रुटी काढून संचिका अडविल्या जातात. विभागप्रमुखही सोयीनुसार संचिकांचा प्रवास घडवतात. याबाबत सीईओ मधुकरराजे अर्दड यांच्याकडे थेट तक्रारी आल्या. त्याची दखल घेत त्यांनी संचिकांची धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागात ग्रामीण जनतेची कामे असतात. त्यासाठी तयार केलेली संचिका विविध टेबलवरून फिरते. त्यात काही त्रुटी असेल, तर ती विभागप्रमुख पातळीवर सोडविणे अपेक्षित असते. पण अलिकडच्या काळात जिल्हा परिषदेत कामे मोठ्या प्रमाणावर संचिका तुंबल्याच्या तक्रारी होत्या. सीईओ अर्दड यांच्याकडे काही तक्रारी गेल्या महिन्यात करण्यात आल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विभागप्रमुख गृहित धरल्यासारखे वागतात. किरकोळ कारणावरून संचिका अडविल्या जातात. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी अर्दड यांनी काही संचिका तपासल्या असता तथ्य आढळून आले. कारण नसताना १५-१५ दिवस संचिका अडविली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांची अडवणूक होत आहे. कहर म्हणजे लोकप्रतिनिधींनी सांगितलेल्या संचिकांबाबतही अशी अडवणूक सीईओंना अनेक विभागात पाहावयास मिळाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

या अडचणी सोडविण्यासाठी अर्दड यांनी जिल्हा परिषदेत संचिका तपासणी मोहीम सुरू केली आहे. विभागनिहाय आढावा घेतला जाणार असून विभागात किती संचिका येतात? किती प्रलंबित आहेत? किती कालावधी लागेल? याची माहिती घेतली जाईल. ज्या संचिका विनाकारण प्रलंबित ठेवल्या आहेत त्याची जबाबदारी निश्चित करून कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याची गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांना धडक भरली आहे.

जिल्हा परिषदेतील कार्यसंस्कृती सुधारण्याचा दृष्टीने आम्ही काही निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांच्या संचिका विनाकारण अडविल्या जाऊ नयेत, याची दक्षता घेतली जात आहे. मी विभागनिहाय तपासणी करत आहे. ज्या ठिकाणी चूक आहे तिथे कारवाई केली जाईल."

- मधुकरराजे अर्दड, सीईओ, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड, वाशिम, परभणीत गारपीट, महिलेचा मृत्यू

0
0

नांदेड: नांदेड, परभणी आणि वाशिम जिल्ह्यातील काही भागात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. भागीरथीबाई कांबळे असे या महिलेचे नाव असून ती पूर्णा तालुक्यातील (परभणी) चुडावा गावची रहिवासी असल्याचे समजते. यात एकूण ९ जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये ६ पुरुष, तर ३ महिलांचा समावेश आहे.

भागीरथीबाईंनी पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातील गोठ्याचा आश्रय घेतला होता. मात्र त्यांच्या अंगावर गोठा पडून त्यात त्यांचा मृत्यू झाला. गारपीट आणि वादळीवाऱ्यामुळे काही जनावरेही जखमी झाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील गौर, चुडावा, भाटेगाव, नरापूर, आलेगाव आणि धनगर टाकळी गावात सुमारे अर्धातास गारा आणि जोरदार पाऊस झाला. काही भागात तर वादळी वाऱ्यामुळे शेतात असलेल्या आखड्यांवरील पत्रेही उडून गेले.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याला गारपीटीचा फटका बसला. तालुक्यातील निवघा, नांदेड तालुक्यातील लिंबगाव भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली.

तर, विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही गारपिटीचा फटका बसला. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कारंजा तालुक्यातील भामदेवी परिसरात गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images