Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पोलिस भरतीच्या जागा वाढवण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाने गेल्या चार वर्षांत पोलिस भरती केलेली नाही. उलट यावर्षी १२ हजारांऐवजी पाच हजार २०० जागा भरण्याची घोषणा केली आहे. राज्यात ३० हजार जागांची भरती करावी, अन्यथा विद्यार्थ्यांसह मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा पोलिस भरती कृती समिती आणि पोलिस फॅमिली वेलफेअर असोसिएशनने दिला आहे.

पोलिस भरती २०१८मध्ये भरतीच्या जागा तत्काळ वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी पोलिस भरती कृती समिती आणि पोलिस फॅमिली वेलफेअर असोसिएशनतर्फे विभागीय क्रांती चौकातून आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आले. या निवेदनात राजयात २०१४पासून पोलिस भरती झालेली नाही. दरवर्षी १२ हजार जागा भरण्याचे आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. हजारो युवक चार वर्षांपासून भरतीची तयारी करत आहेत, मात्र सरकारने यावर्षी पाच हजार २०० जागांची भरती जाहीर केली आहे. जाहीर करण्यात आलेली भरतीही विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ केल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

राज्यात ३० हजार जागांची भरती करण्यात यावी, खुल्या प्रर्वगातील युवकांसाठी वयोमर्यादा २८वरून ३० वर्षे करण्यात यावी, भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात यावी आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. यावेळी दीपक गोफणे, विनायक भानुसे, सिद्धार्थ भालेराव, मोहम्मद शेख यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. याशिवाय पोलिस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आठ तास करावेत, अशीही मागमी यावेळी करण्या आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवजयंतीची सुटी न दिल्याने राविकाँचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची डॉ. हेडगेवार नर्सिंग महाविद्यालयामध्ये सुटी देण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन याचा जाब विचारला. कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेत प्रशासनाने सुटी दिली.

शासकीय, निमशासकीय खाजगी शिक्षणसंस्था तथा शासकीय कार्यालयांना महापुरुषांची जयंती साजरी करणे बंधनकारक असताना व १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज जयंती शासकीय सुटी जाहीर असूनही कॉलेजने सुटी दिली नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना बसण्याची सक्ती केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे धाव घेत प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेत, प्रशासनाने कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सोडून दिले. यावेळी राविकाँचे प्रदेश सचिव अक्षय पाटील, शहराध्यक्ष मयूर सोनवणे, राहुल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शासनाच्या आदेशाची पायमल्ली शिवाजी महाराजांची जयंती साजरी न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कार्यवाही करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पाठपुरावा करेल, असे अक्षय पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज देण्यासाठी लाखो उकळणारा अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाच्या विविध योजनांत बँकांकडून कर्ज काढून देण्यासाठी व्यवसायिकाकडून पैसे उकळणाऱ्या भामट्याला पोलिस विभागाच्या गुन्हे शाखेने रविवारी रात्री उशिरा अटक केली. कैलास शिंदे (रा़ बालाजीनगर) असे आरोपीचे नाव असून, त्याने अनेकांना गंडा घातल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

या प्रकरणात पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कैलास शिंदे याच्या प्रकरणात तीन जणांच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या होत्या. या तिघांकडून संबंधिताने ७५ हजार रुपये प्रोसेसिंग फी घेतली होती. छोट्या, मध्यम व मोठ्या व्यावसायिकांसाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत बँकांकडून कर्ज पुरवठा केला जातो़ हे कर्ज सहजासहजी गरजू व्यक्तींना मिळत नाही़ त्यामुळे कर्ज काढून देण्यासाठीही काही मध्यस्थांची टोळी शहरात निर्माण झाली आहे. हे मध्यस्थ छोट्या व्यावसायिकांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कर्जाची प्रक्रिया करून देत असतात. या व्यवसायिकांच्या वेळ कमी असल्याचा फायदा घेत कैलास शिंदे यांने घेतला. त्याने छोट्या छोट्या व्यावसायिक विश्वासात घेतले़ त्यांना कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखविले. बँकेसोबत आपले संबंध वाढविण्यासाठी कैलास हा बँकेसाठी कर्ज वसुलीची कामे करत होता़ बँकेतील कर्मचाऱ्यांशी जवळिक साधून कैलासने कर्ज मंजुरीचे प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली़ कैलास हा विविध राष्ट्रीयकृत बँकांचे फॉर्म घेऊन व्यावसायिकांकडे तो जात असे. त्या बँकांमधून कर्ज मंजूर करून देतो म्हणून विश्वास संपादन करत होता़ छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज मिळवून देतो, असे म्हणून प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली १५ हजार, ३० हजार अशी रक्कम घेत असे़

एकाच कुटुंबातील तीन नातेवाइकांकडून त्याने ७५ हजार रुपये उकळले़ त्यांनी दिलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार समोर आला आहे़ या तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कैलास शिंदे याला अटक केली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघ व त्यांच्या पथकातील पोलिस नाईक मनोज चव्हाण, शेख हकीम, पोलिस कॉन्स्टेबल संतोष सूर्यवंशी, सय्यद अशरफ यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिअरचा ट्रक उलटला; तळीरामांनी लांबविले बॉक्स

0
0

औरंगाबाद : चालकाचे नियंत्रण सुटून बियरची वाहतूक करणारा ट्रक उलटला़ या अपघातात चालक गंभीर जखमी झाला़ अपघातानंतर पोलिस घटनास्थळी येईपर्यंत तळीरामांनी बिअरचे बॉक्स गायब केले. हा अपघात सोमवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी सहाच्या सुमारास औरंगाबाद-बीड महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारात घडला.

ट्रक (क्रमांक टीएन ५६ जे ९०६३) भोपाळहून केरळकडे बियरचे दीड हजार बॉक्स घेऊन जात होता होता़ पिंपळगाव पांढरी शिवारातील वळणावर तो उलटला़ चालक विश्वानाधन भवानी (वय ३८) तामिळनाडू गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत आणखी एक चालक व क्लिनर होता़ त्यांना काही लागले नाही़ ट्रकमध्ये एकूण सुमारे २५ लाख रुपये किमतीचे ब्लॅक फोर्ट बियरचे बॉक्स होते. गावाजवळच ट्रक उलटल्याने नागरिकांनी; तसेच रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांनी पोलिस घटनास्थळी पोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात बियरने भरलेले बॉक्स लंपास केले. अक्षरश: बॉक्स पोत्यात भरून नेले. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीट जमादार चाबुकस्वार, सूर्यकांत पाटील, श्रीमंत भालेराव, पोलीस पाटील चिंतामण तवार यांनी घटनास्थळावरून तळीरामांना पिटाळले. घटनेची नोंद करमाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरेगाव भीमा दंगल राज्य सरकार पुरस्कृत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सरकार देवेंद्रच्या हाती आणि देवेंद्र 'आरएसएस'च्या हाती अशी राज्यात अवस्था आहे. कोरेगाव भीमा येथे आंबेडकर अनुयायांवर हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. ही दंगल राज्य सरकार पुरस्कृत होती,' असा आरोप जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी केला.

कवाडे २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील दादर चैत्यभूमी येथून राज्याच्या विधानभवनातील अर्थसंकल्पीय अधिवेशनावर संविधान परिवाराच्या वतीने काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश महामोर्चासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कवाडे म्हणाले, 'राज्यामध्ये संघ परिवाराचा उन्माद सुरू आहे. देशातील ब्राह्मणवादी शक्ती संविधान हटवण्याची भाषा करत आहेत. संपूर्ण देशात अस्वस्थता पसरली असून भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. कोरेगाव भीमा येथील दंगलीचे सूत्रधार संभाजी भिडे गुरुजी तसेच मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करावी. दंगलीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. महाराष्ट्र बंदमध्ये पोलिसांनी अनेक लोकांवर खोट्या केसेस दाखल केल्यायामुळे आंबेडकरी जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे मुंबई येथे संविधान परिवाराच्या वतीने जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाचा समारोप वरळी येथे होणार आहे.' पत्रकार परिषदेस गंगाधर गाडे, श्री. इंदिसे, राहुल डमाळे आदींची उपस्थिती होती.

आठवले हिंदुत्ववादी समर्थक

कवाडे म्हणाले, 'रामदास आठवले हे हिंदुत्वादी समर्थक आहेत. ते आंबेडकरवादी होऊच शकत नाहीत. जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे म्हणून आम्ही आनंदराज आंबेडकर आणि भारिप बहजून महासंघाचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली, मात्र अद्याप त्यांच्याकडून निरोप आला नाही.' त्यांनी या मोर्चाचे नेत्तृव करावे, असे आवाहन मनोज संसारे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडावर कार आदळली; दोन डॉक्टर मृत्युमुखी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना रोडवरील मुकुंदवाडी परिसरात रामनगर कमानीजवळ स्विफ्ट कार झाडाला धडकून दोघे जागीच ठार झाले असून, एकाला जखमी अवस्थेत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृत व जखमी डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात मध्यरात्री अडीच ते तीन दरम्यान घडला.

डॉ. गोविंदकुमार सतनाम सिंग (वय २५, रा. हरियाणा), डॉ. लक्ष्मीकांत दगडिया (वय २५, रा. रामनगर) अशी मृत डॉक्टरांची नावे आहेत. या गाडीतील अन्य एक प्रवासी डॉ. अरविंद पवार (रा. म्हाडा कॉलनी) हे गंभीर जखमी झाले आहे. हे तिघे मंगळवारी मध्यरात्री स्विफ्ट कारमधून (क्रमांक एम. एच. २० डी. व्ही. ४९३२) जालन्याकडे जात होते. त्यावेळी कारवरील ताबा सुटला आणि ती झाडावर आदळली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला.

मृत गोविंदकुमार आणि लक्ष्मीकांत दगडीया हे दोघे सावंगीकर हॉस्पिटल प्रॅक्टिस करीत होते. अरविंद कुमार हे अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिक्स करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातानंतर रामनगर भागात शोककळा पसरली आहे. गोविंदकुमार यांच्या हरियाणा येथील नातेवाइकांना अपघाताची माहिती देण्यात आली.

पोलिसांमुळे मिळाले उपचार

अपघाताची माहिती मुकुंदवाडी पोलिस ठाण्याला देण्यात आली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अरविंद पवार यांना कारमधून बाहेर काढले. तो जीवंत असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले. यामुळे त्यांच्यावर वेळेवर उपचार सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात पुन्हा एकदा पाणीबाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

सातारा गाव आणि सातारा तांडा येथे दोन विहिरींवरून पाणीपुरवठा केला जातो. पंधरा हजार रुपयांचे वीजबिल थकल्यामुळे महावितरणने एका विहिरीचा वीजपुरवठा नुकताच खंडित केला होता. हे बिल पालिकेने भरले. त्यानंतर आता दुसऱ्या विहिरीचा वीजपुरवठा खंडित असल्यामुळे गावातील सुमारे पाच हजार नागरिकांचे हाल होत आहेत. आश्चर्य म्हणजे या विहिरीला आतापर्यंत वीज मिटरच बसवलेले नाही. त्यामुळे बिलच देण्यात आले नव्हते, अशी माहिती मिळाली आहे.

सातारा तांडा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे वीजबिल भरण्यासाठी महावितरणने महापालिकेला वारंवार नोटीस पाठवूनही ते भरण्यात आले नाही. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, महावितरणतर्फे गाव व तांडा येथील दोन्ही विहिरींची वीज खंडित करण्यात आलेली आहे. महापालिकेने १५ हजार रुपयांचे वीजबिल भरल्यानंतर एका विहिरीचा वीजपुरवठा सुरळित करण्यात आला. त्यामुळे सातारा तांडा येथील नागरिकांचा प्रश्न सुटला आहे. सातारा गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरीचा वीज पुरवठा अद्याप सुरळित झालेला नाही. या ठिकाणी दोन वर्षांपासून मिटर नाही. त्यामुळे बिल दिलेच नसले, तर वीजपुरवठा खंडित का केला, असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत. दोन वर्षांत वीज खंडित करण्याची कारवाई झालेली नाही, याकडेही गावकरी लक्ष वेधत आहेत. वीजपुरवठा सुरळित असल्याने तेथे मिटर नसल्याचे लक्षात आले नव्हते. यात महापालिकेचा ढिसाळपणा समोर येत आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याने या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सुमारे पाच हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवीन कनेक्शनसाठी कोटेशन एमसीबीकडे पाठवलेले आहे. आजपर्यंत तेथे मिटर नव्हते, त्यामुळे कोणतीच कारवाई झालेली नव्हती. आता महापालिका प्रत्येक पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी मिटर बसवणार आहे.

-डी. पी. गायकवाड, कनिष्ठ अभियंता, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर टक्के शुल्काचा तगादा नको

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षण शुल्क भरण्याचा आग्रह करू नका, असे स्पष्ट निर्देश शासनाने कॉलेजांना दिले आहेत. शैक्षणिक शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने अनेक कॉलेज विद्यार्थ्यांकडे तगादा लावत असल्याने शासनाने हे पाऊल उचलले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ५० टक्के शिक्षण शुल्क शासनाकडून दिले जाते. शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ही रक्कम कॉलेजला भरावी, असे अपेक्षित आहे.

शैक्षणिक शुल्काची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने कॉलेज प्रशासन नाराज आहे. त्यामुळे अनेक कॉलेजांनी विद्यार्थ्यांना शंभर टक्के रक्कम जमा करण्याचा आग्रह धरत आहेत. कॉलेजांच्या आग्रहामुळे विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांना संस्थांकडून तागादा लावला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांन आग्रह करू नये, असे स्पष्ट निर्देश शआसनाने दिले. विद्यार्थ्यांनी ५० टक्के रक्कम भरणे गरजेचे असताना, कॉलेज शंभर टक्के रक्कमेची मागणी करीत आहे.

कारवाईचा इशारा

विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कापोटी देण्यात येणारी रक्कम पूर्वी थेट कॉलेजांना देण्यात येत होती. उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या कॉलेजांचे शुल्क लाखांच्या घरात आहे. अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्काबाबत तगादा लावला जातो. त्यामुळे हे पाऊल उचलावे लागल्याचे बोलले जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी, असा आग्रह धरल्यास, संस्थेविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसची निवडणूक मोर्चेबांधणी सुरू

0
0

औरंगाबाद: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने केंद्रीय पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुढच्या महिन्यातील १८ ते २० मार्च दरम्यान दिल्ली तीन दिवसीय खुले अधिवेशन व राष्ट्रीय शिबिराचे आयोजन काँग्रेसने केले आहे. राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या अधिवेशनाला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे.

राहुल गांधी यांची गुजरात विधानसभा निवडणुकादरम्यान काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाच्या धोरणानुसार अध्यक्षांची निवड झाल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी गठित करावी लागते. त्रिपुरा, कर्नाटक विधानसभा निवडणुकांमुळे काँग्रेसचे बडे नेते प्रचारात गुंतले आहेत. याच काळात आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीची सुरुवात करण्यासाठी एकत्रित कार्यक्रम घेण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यास विलंब होणार असल्याने पक्षाकडून गेल्या आठवड्यात सुकाणू समिती जाहीर करण्यात आली. या समितीची पहिली बैठक शनिवारी दिल्लीत झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत केवळ आढावा घेण्यात आला. मात्र राहुल गांधी यांच्या निवडीनंतर देशभरातील काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना एकत्र बोलावून राष्ट्रीय अधिवेशन घेण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार १८ ते २० मार्च दरम्यान दिल्लीत तीनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन घेण्याबाबत नियोजन करण्यात आले. त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. या खुल्या अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.

---

राज्यातले चार बडे नेते राष्ट्रीय कार्यकारिणीत

---

राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातील किमान चार बड्या नेत्यांना सामावून घेतले जाणार आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या दोघांचा समावेश नक्की मानला जात आहे. उर्वरित दोन नेते कोण असतील याबाबत मात्र अद्याप वरिष्ठ पातळीवर कुठलीच निश्चिती झाली नसल्याचे दिल्लीतील वरिष्ठ काँग्रेस सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यापाऱ्याच्या कुटुंबाला जबर मारहाण करून चोरट्यांनी १३ तोळे सोन्यासह एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे लासूर स्टेशन येथील गणपती मंदिर परिसरात घडली.

लासूर स्टेशन भागातील गणपती मंदिर परिसरात राहणाऱ्या विनोदकुमार जाजू यांच्या घरावर चढून मंगळवारी पहाटे दोन चोरट्यांनी गच्चीवरील दाराची कडी तोडली आणि आत प्रवेश केला. जाजू झोपलेल्या खोलीत चोर आले. जाजू यांनी उठण्याचे प्रयत्न करताच चोरट्यांनी त्यांच्या कानामागे लोखंडी रॉड मारला. त्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यानंतर जाजू यांच्या पत्नी सुषमा यांना चोरट्यांनी धाक दाखवत सर्व रोकड, सोने, बाहेर काढण्यास सांगितले. सुषमा यांनी त्वरित सर्व ऐवज काढून दिला. त्यानंतर चोरट्याने घरातील १३ तोळे सोने त्यात डायमंड सेट, अंगठ्या व एक लाख रुपयांची नगदी रोकड असा एकूण पाच लाख साठ हजारांचा ऐवज घेऊन पसार झाले. त्यानंतर सुषमा यांनी आरडाओरडा केली. आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी त्वरित शिल्लेगाव पोलिसांना माहिती दिली. जाजू कुटुंबीयांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.

पाच महिन्यातली पाचवी घटना


गेल्या पाच महिन्यातली धाडसी चोरीची ही पाचवी घटना असून, आतापर्यंत त्यात दोघांचा जीव गेला आहे. लासूर स्टेशन हे व्यापारी शहर आहे. या ठिकाणी पोलिस चौकी देण्यात आली आहे. पहिल्या घटनेनंतरच गावकऱ्यांनी शिल्लेगाव येथील पोलिस स्टेशन लासूर स्टेशनला हलवा, शिल्लेगाव येथे पोलिस चौकी करा. त्यामुळे सुरक्षेच्या उपाय योजना राबविण्यात सोपे होईल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

व्यापाऱ्यांचे आंदोलन

दरोड्याच्या घटनेनंतर व्यापारी व संतप्त ग्रामस्थांनी लासूर स्टेशनला बेमुदत बंदची हाक देत नागपूर-मुंबई महामार्गावर तब्बल पाच तास रास्ता रोको केला. या आंदोलनाने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद ठेवली. तातडीने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली. पोलिसांनी त्वरित १५ पोलिस हवालदार देऊ, तपास तातडीने करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

लासूर स्टेशन येथे व्यापारी कुटुंबाला मारहाण करून लुटल्याची घटना घडल्यानंतर मी स्वत: घटनास्थळी गेले होते. सर्वसामान्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर मी लासूर स्टेशनला मुख्यालयातून अतिरिक्त कर्मचारी नेमण्याचे आदेश दिले आहेत. घटनेचा तपास सुरू आहे.

- उज्वला वनकर, प्रभारी ग्रामीण पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कामगारांचा राज्यव्यापी संप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कार्यरत राज्यातील ७५० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १५ फेब्रुवारीपासून संप पुकारला आहे. या संपाला विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. कर्मचारी संपावर गेल्याने कामे ठप्प झाली आहेत.

पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राज्यात ७००० कोटींची कामे सुरू आहेत. काही कामे प्रस्तावित आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांसाठी केंद्र सरकारकडून राज्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या कामात कंत्राटी कामगारांचे योगदान मोठे आहे. राज्यभरातील विविध कार्यालयात या कर्मचाऱ्यांची संख्या ७५० आहे. हे कंत्राटी कर्मचारी गेल्या कित्येक महिन्यांपासून तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. आर्थिक विवंचनेत असलेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याची मागणी केली होती. २०१२ पासून या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झालेली नाही ती करावी, प्रवासभत्त्याची रक्कम वाढवावी आदी मागण्या वेळोवेळी करण्यात आल्या, पण त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. कनिष्ठ अभियंता ते चतुर्थश्रेणी कर्मचारी आदी संवर्गात हे कर्मचारी कार्यरत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू राहील, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. संप सुरू होऊन पाच दिवस झाले तरी सरकार, प्रशासनाने संपाची दखल घेतलेली नाही.

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या ठरावाची सरकारकडून दखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवासी अतिक्रमण व घरकुलासाठी सरकारी गायरान जमीन द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या बैठकीत मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने हा ठराव मान्य करून राज्यासाठी लागू केला आहे. ग्रामविकास विभागाने शासननिर्णय काढला आहे.

अनुसूचित जाती व जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच बेघरांसाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल व शबरी आवास योजनांमधून घरकुल देण्यासंबंधी जागेअभावी अंमलबजावणी होत नव्हती. १२ जुलै २०११ च्या शासन परिपत्रकानुसार शासकीय गायरान जमीन व गावठाण जमीन देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे घरकुल योजना ठप्प झाली होती. याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. यात दिलेल्या आदेशाने रमाई घरकुल योजना व पंतप्रधान आवाज योजना व शबरी घरकुल योजनेसाठी जागा देण्यासंबंधीचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे सदस्य रमेश गायकवाड यांनी मांडला होता. त्या ठरावास काँग्रेसचे किशोर बलांडे, शिवसेनेचे अविनाश गलांडे यांनी अनुमोदन दिले होते. हा ठराव संमत करून सरकारकडे पाठविला. हा ठराव राज्य सरकारने मान्य करून तो राज्यासाठी लागू केला आहे. १६ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने शासननिर्णय काढून त्याची अंमलबजावणी केली आहे. या निर्णयाचे जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, किशोर बलांडे, अविनाश गलांडे, रेखाताई नांदूरकर, एल. जी. गायकवाड यांनी स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकोंडी फोडण्यासाठी सहकार्य करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराकोंडी फोडण्यासाठी सहकार्य करा, प्रभाग कार्यालय निहाय जागा निश्चित करून वॉर्डातला कचरा वॉर्डात जिरवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले व आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी केले.

कचराडेपोमध्ये कचरा टाकण्यास नारेगाव-मांडकीसह सुमारे २० गावांच्या नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून विरोध सुरू केला आहे. मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या लोकप्रतिनिधी व वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना देखील नागरिकांनी परत पाठवले. बाभुळगाव, नक्षत्रवाडी व सफारी पार्कच्या जागेचा विचारही नागरिकांच्या व प्रामुख्याने शिवसेना आमदारांच्या विरोधामुळे पालिका प्रशासनाला सोडून द्यावा लागला. पाच दिवसांपासून कचराडेपोवर कचरा टाकणे बंद असल्यामुळे मध्यवर्ती जकात नाक्याच्या परिसरात कचऱ्याने भरलेल्या सुमारे ३० गाड्या उभ्या आहेत. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या मुख्य सभागृहात मंगळवारी सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, विरोधी पक्षनेता फेरोज खान, माजी महापौर त्र्यंबक तुपे, गटनेते प्रमोद राठोड, भाऊसाहेब जगताप, राजू शिंदे, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासह पालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात महापौरांनी कचराकोंडी फोडण्यासाठी केलेल्या गेल्या पाच दिवसांतील प्रयत्नांची माहिती दिली. कचराडेपोवर कचरा टाकणे शक्य होणार नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे मशिन्स खरेदी करावे लागतील. निविदा काढून खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिने लागणार आहेत. या काळात दररोज जमा होणारा कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभाग कार्यालयनिहाय कचरा जिरवण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे ते म्हणाले. यासाठी प्रभाग समितीच्या सभापतींनी आपापल्या प्रभागात बैठका घ्याव्यात व कचरा जिरवण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर म्हणाले, 'कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबद्दल आतापर्यंत विचार करण्यात आला नाही, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याशिवाय आता दुसरा मार्ग नाही. प्रक्रिया करणारे मशीन्स खरेदी करण्यासाठी अमरावती व मालेगाव येथील पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्हीपैकी कुठुनही मशीन खरेदी करायची असेल तर निविदा प्रक्रिया करावीच लागेल. त्यासाठी किमान दोन महिने लागतील, तोपर्यंत सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे.

यावेळी त्र्यंबक तुपे, गोकुळसिंह मलके, रावसाहेब आमले, एटीके शेख, शिल्पाराणी वाडकर, सुनीता आऊलवार, कीर्ती शिंदे, नितीन साळवी, सुभाष शेजवळ, शोभा बुरांडे, ज्योती मोरे, अब्दुल नाईकवाडी, सीमा खरात, भाऊसाहेब जगताप, अय्युब जहागिरदार आदी नगरसेवकांनी भूमिका मांडली. वॉर्डा वॉर्डात जनजागृती करून जीथला कचरा तीथे जीरवण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास या सर्वांनी महापौरांना दिला.

क्रांतीचौक वॉर्डात केलेल्या कामाची स्तुती

क्रांतीचौक वॉर्डात नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांच्या पुढाकाराने वॉर्डातला कचरा वॉर्डात जिरवण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यासाठी मोठी चर खोदण्यात आली आहे. त्यात कचरा टाकला जात आहे. क्रांतीचौक प्रभागांतर्गत १३ वॉर्ड आहेत. या वॉर्डांमधील कचरा खोदण्यात आलेल्या चरीमध्ये टाकला जात आहे. त्यातून खतनिर्मिती देखील शक्य आहे. वाडकर यांनी राबविलेल्या उपक्रमाची स्तुती महापौर व आयुक्तांनी केली. अन्य प्रभागात देखील अशाचप्रकारे काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याची दुर्गंधी नष्ट करण्यासाठी राम भोगले यांचा पुढाकार

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराडेपो विरोधातील आंदोलनामुळे शहराच्या विविध भागात कचरा साचला आहे. त्याचा परिणाम म्हणून दुर्गंधी निर्माण झाली आहे. विशिष्ट प्रकारची रासायनिक प्रक्रिया करून दुर्गंधी नष्ट करण्यासाठी प्रख्यात उद्योगपती तथा महापालिकेचे स्वच्छता दूत राम भोगले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकाराला महापालिकेच्या यंत्रणेने प्रतिसाद दिला आहे.

कचराडेपो विरोधातील आंदोलनामुळे शहरात पाच दिवसांपासून कचरा साचलेला आहे. मध्यवर्ती जकात नाक्याच्या परिसरात कचऱ्याने भरलेल्या सुमारे ३० गाड्या उभ्या आहेत. या गाड्यांमधील कचऱ्यामुळे जकात नाक्याच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी राम भोगले यांनी महापालिकेला मदत करण्याची भूमिका घेतली. या संदर्भात त्यांनी पालिकेच्या यंत्रणेशी संपर्क साधला. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासह त्यांनी मध्यवर्ती जकात नाक्याच्या परिसराला भेट दिली. नगरसेवकांच्या बैठकीत देखील त्यांनी मार्गदर्शन केले. जैविक तंत्रज्ञानाच्या मदतीने साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य आहे, या तंत्रज्ञानाला यांत्रिकीकरणाची देखील गरज लागते, असे ते म्हणाले. बायोट्रीट पावडर कचऱ्यावर टाकली तर दुर्गंधी नष्ट होते, असे ते म्हणाले. कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया जैविक असल्यामुळे या प्रक्रियेमुळे प्रदूषण होत नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विकेंद्रीकरणाची पद्धत अवलंबली पाहिजे. शहरात पाच-सात ठिकाणी कचरा गोळा केला पाहिजे व त्यावर तेथेच प्रक्रिया झाली, पाहीजे असे ते म्हणाले.

पाच टन पावडर मागवली

साचलेल्या कचऱ्यावर बायोट्रीट पावडर टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तात्काळ पाच टन पावडर मागविण्याचे ठरविण्यात आले. या पावडरचा दर ६६० रुपये प्रतिकिलो आहे. २४ हजार रुपयांची एक बॅग आहे. राम भोगले यांच्या माहितीतल्या कंपनीला पावडर पुरविण्याचे सांगण्यात आले. बाजारभावापेक्षा कमी दरात पावडर पुरविण्याचे त्या कंपनीने मान्य केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको एन ९ मधून पालिकेच्या पथकाला हुसकावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन-९ मधील महापालिका शाळेच्या आवारात खड्डा खणून त्यात कचरा टाकणाऱ्या महापालिकेच्या पथकाला नागरिकांनी हुसकावून लावले. पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला.

नारेगावच्या कचरा डेपोमध्ये कचरा टाकणे बंद झाले आहे. त्यामुळे साचलेला कचरा पालिकेच्या मालकीच्या जागेत खड्डा खणून पुरून टाकण्याचे काम केले जात आहे. यासाठी पालिकेचे एक पथक मंगळवारी सिडको एन ९ च्या महापालिका शाळेच्या परिसरात पोचले. या ठिकाणी जेसीबी मशीनच्या सहाय्याने दहा बाय पंधरा फुटाचा खड्डा तयार करण्यात आला. खड्डा तयार झाल्यावर कचऱ्याने भरलेली गाडी आणण्यात आली. खड्ड्यात कचरा टाकण्यात येणार असल्याचे लक्षात येताच नागरिक जमा झाले. त्यांनी पालिकेच्या पथकाला विरोध केला. कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. नागरिकांच्या विरोधामुळे पालिकेच्या पथकाला कचऱ्याने भरलेल्या गाडीसह माघारी परतावे लागले. ज्या जेसीबी मशीनच्या सहाय्याने खड्डा खणला होता. त्याच जेसीबीच्या सहाय्याने नागरिकांनी खड्डा बुजवला. कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी शिवसेना-भाजपबद्दल संताप व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकीत वेतनासाठी माथाडी कामगार रस्त्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

थकीत वेतन तातडीने मिळावे या मागणीसाठी शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास कीर्तीशाही, चिटणीस अलिखान, कोषाध्यक्ष प्रवीण सरकटे, राजकुमार घायाळ, जगन्नाथ भोजणे आदी उपस्थित होते. कामगारांचा पगार माथाडी मंडळात भरण्यास एक महिन्याचाही विलंब झाला तरी त्या मजूर संस्थेचा परवाना रद्द करावा, असे शासन आदेश आहेत. पाचोड, वैजापूर, बिडकीनसह सिल्लोड येथील शासकीय गोदामातील माथाडी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार मिळाला नाही. असे असताना कोणतीही ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल लोमटे यांनी केला. थकीत पगार तातडीने द्यावा, मजुरी व लेव्ही पुरवठा विभागाने थेट माथाडी मंडळात भरावा. पगार, लेव्ही मंडळात जमा न करणाऱ्या मजूर सहकारी संस्थांबरोबरच करार त्वरित रद्द करावे, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, असा इशारा माथाडी कामगारांनी दिला आहे. अण्णासाहेब घनघाव, किरण पगारे, सत्तार भाई, खालेद आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बारावी’च्या नियोजनाचा गोंधळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावीची परीक्षा काही तासांवर आली, तरी शिक्षण मंडळाचा नियोजनाचा गोंधळ सुरूच होता. सहकेंद्रप्रमुख कोण, प्रश्नपत्रिका घेऊन येणारे सहाय्यक परिरक्षकांच्या नेमणुका निश्चित झालेल्या नव्हत्या, तर मंगळवारी सायंकाळी चारपर्यंत शहरातील कस्टडीवर प्रश्नपत्रिकाच पोचल्या नव्हत्या.

बारावीची परीक्षा बुधवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. यंदा मंडळाने परीक्षा पद्धतीत अनेक बदल केले, परंतु त्यांच्या अंमलबजावणीसाठी मंडळाची तयारी नसल्याचे समोर आले. सहकेंद्रप्रमुख, सहाय्यक परिरक्षकांच्या नियुक्त्यांचा गोंधळ मंगळवारी दिवसभर सुरू होता. यंदा प्रश्नपत्रिकांची ने-आण करण्यासाठी सहाय्यक परीरक्षक नेमण्याचा निर्णय झाला. त्यात सरकारीच कर्मचारीच असतील, असे स्पष्ट करण्यात आले, परंतु या कामासाठी ऐनवेळी खासगी शाळांमधील शिक्षकांची नेमणूक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची यादी तयार करण्याचे काम मंगळवारी पूर्ण झालेले नव्हते. नेमणूक कोण करणार, यावरून गोंधळ सुरू होता. परीक्षा केंद्रावर सहकेंद्रप्रमुख मंडळ नेमते. त्याची माहिती संबंधित परीक्षा केंद्रांना देण्यात येते. अनेक केंद्रप्रमुख मंडळाला सहकेंद्रप्रमुख कोण दिले याबाबत माहिती घेत होते.

माध्यम बदलाचे काय

अनेक विद्यार्थ्यांचे माध्यम बदलाची प्रक्रिया मंगळवारपर्यंत सुरू होती. अनेक परीक्षार्थींचे हॉलतिकीट मंगळवारीही निश्चित करण्यात आले. एका परीक्षाकक्षात २५ विद्यार्थी बसविण्याचा नियम करण्यात आला आहे. अशावेळी ऐनवेळी आलेल्या विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकांचे पाकीट स्वतंत्र फोडायचे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

कस्टडीवर पेपर उशिराने

बारावी परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी मंडळाच्या ६१ कस्टडी आहेत. एकूण ३७४ परीक्षा केंद्रे आहेत. एका कस्टडीला आठ ते दहा शाळा जोडलेल्या आहेत. यंदा प्रथमच सहाय्यक परीरक्षकांवर संबंधित परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कस्टडीवर प्रश्नपत्रिकांची पाकिटे पोचविण्याची प्रक्रिया मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरूच होती. शहरातील कस्टडीवर प्रश्नपत्रिका पोचविण्याची व्यवस्था कोलमडल्याचे समोर आले. दुपारी चारनंतरही हा गोंधळ मंडळात सुरूच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका पुन्हा एकदा घालणार बागडेंना साकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाच दिवसांपासून निर्माण झालेली कचराकोंडी सोडवण्यासाठी महापालिका पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना साकडे घालण्याच्या तयारीत आहे.

महापालिकेत भाजपचा महापौर असताना नारेगाव-मांडकीवासियांनी चार महिन्यांपूर्वी कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन संपण्यासाठी त्यावेळी बागडे यांनी मध्यस्थी केली होती. बागडे यांच्या मध्यस्थीमुळे नागिरकांनी महापालिकेला कचराडेपो प्रश्न सोडवण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता. तीनच्या ऐवजी नागरिकांनी पालिकेला चार महिने दिले, पण चार महिन्यात प्रशासनाने काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले आहे. महापालिकेत शिवसेनेचा महापौर विराजमान झाल्यामुळे बागडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या आंदोलनात मध्यस्थी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मंगळवारी महापालिकेत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत आंदोलकांशी बोलून मार्ग काढण्याची जबाबदारी भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांच्याकडे देण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरिभाऊ बागडे पाटणा येथे एका परिषदेसाठी गेले होते. त्यांचे मंगळवारी शहरात आगमन झाले. दरम्यानच्या काळात पालिकेशी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. आता ते शहरात आल्यामुळे बुधवारी किंवा गुरुवारी त्यांची भेट घेऊन कचऱ्याच्या प्रश्नाबद्दल पालिका प्रशासन करीत असलेल्या कामाची माहिती त्यांना देण्याचे नियोजन केले जात आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेचे प्रशासन आता गंभीर बनले असून आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी चर्चा करून बागडे यांनी पुन्हा एकदा दोन महिन्यांचा वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती बागडे यांना केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक केल्याने उपकुलसचिव अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सहाय्यक कारकून या पदावर नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी उपकुलसचिव ईश्वर मंझा याला पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; ईश्वर मंझा सध्या विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील सबसेंटर येथे उपकुलसिचव पदावर कार्यरत आहे. त्याची २०१५मध्ये माणिकराव चव्हाण (रा. चिकलठाण, ता. कन्नड) या तरुणाची भेट झाली. त्याला मंझाने, 'मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उप कुलसचिव या पदावर कार्यरत आहे. माझी विद्यापीठ व विद्यापीठाबाहेरील महाविद्यालयांमध्ये मोठी ओळख आहे. पुढील काही दिवसांमध्ये विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात सहायक कारकुनाच्या जागा भरल्या जाणार आहेत. तेथे मी तुमच्या भावाच्या नोकारीच काम करून देतो, परंतु त्यासाठी तुम्हाला मला सहा लाख रुपये द्यावे लागतील,' असे आमिष दाखविले. फिर्यादी याने ऐवढ्या मोठी रक्कम तत्काळ देण्यास असर्मथता दर्शविली. मंझा यांनी त्यांना एक महिन्याच्या आत पैसे देण्याचे सांगितले.

यानंतर चव्हाण यांच्या भावाने ३० हजार रुपये गोळा करून ऑक्टोबर २०१५मध्ये दिले. उरलेले तीन लाख रुपये दिल्यानंतर २०१५च्या दिवाळीनंतर देण्याचे मान्य केले. दरम्यानच नोकरीची ऑर्डरही देण्यात येईल, असही ठरले. यानंतर जानेवारी २०१६मध्ये चव्हाण हे मंझाला भेटले असता, 'आम्ही तुम्हाला तीन लाख रुपये दिले आहेत. बाकीचे पैसे आमच्याकडे जमा आहेत. आमची ऑर्डर कधी निघेल,' अशी विचारणा केली असता मंझाने टाळाटाळ करून आणखी काही दिवस थांबण्यास सांगितले.

दरम्यान, फिर्यादीला आपण फसल्याचे लक्षात आले. त्यांनी मंझाकडे, 'आम्हाला नोकरी नको, आमचे पैसे परत द्या,' अशी वारंवार मागणी केली असता. मंझाने चव्हाण यांना वेळोवेळी धनादेश दिले, परंतु खात्यामध्ये रक्कमच नसल्याने ते वटलेच नाही. चव्हाण यांनी वारंवार फोनवरून व प्रत्यक्ष भेटून पैशाची मागणी केली असता मंझाने अरेरावीची भाषा करून, 'तुझे पैसे मिळणार नाहीत, तुला काय करायचे ते करून घे,' असे सांगितले. यानंतर माणिकराव चव्हाण यांनी छावणी पोलिस स्टेशन येथे ईश्वर मंझा यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल केल्यानंतर मंझा याला त्याच्या सातारा येथील घरातून अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक(आर्थिक गुन्हे शाखा) श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण वाघ यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पाच हजार वीज मीटर केले जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

महावितरण कार्यालयाने शून्य थकबाकी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत शहरातील ५०७९ वीज ग्राहकांचे वीज मीटर जप्त करण्यात आले आहे. औरंगाबाद मंडळात १३ हजार ३६८ वीज ग्राहकांचे मीटर जप्त करण्यात आले असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

औरंगाबाद परिमंडळ अंतर्गत औरंगाबाद जालना जिल्ह्यात वीज वसुली मोहीम सुरू केली आहे. यंदा वीज वसुली मोहीम ही घराघरापर्यंत राबविण्याची कारवाई सुरू आहे. औरंगाबाद परिमंडळात आतापर्यंत १३,१६६ वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तात्पुरते तोडण्यात आले आहे. या वीज ग्राहकांकडे ३४ कोटींची थकबाकी आहे. याशिवाय परिमंडळात एकूण १३,३६६ वीज ग्राहकांकडे ६५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या वीज ग्राहकांचे वीज पुरवठा खंडित करून त्यांचे वीज कनेक्शन काढून वीज मीटर जप्त करण्यात आले आहेत.

औरंगाबाद शहरातील पाच हजार वीज ग्राहकांचे वीज मीटर काढून घेण्यात आले असून या वीज ग्राहकांकडे ४९ कोटी रुपयांची वीज बील थकित आहे. वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांनी वीज कनेक्शन चोरून घेतल्यास अशावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

अशी झाली शहरात कारवाई

फिडरची नाव वीज मीटर

पावर हाऊस ४०९

छावणी २०१९

शहागंज १७५१

वाळूज २६

सिडको १०६

चिकलठाणा ७४३

गारखेडा २७३

क्रांतीचौक २५३

तर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करू

औरंगाबाद महानगर पालिकेकडे पाणी पुरवठा योजनेचे मागील तीन महिन्यांचे १३ कोटी रुपये थकले आहेत. यापूर्वी महापालिकेने १ कोटी रुपयांची थकबाकी भरलेली आहे. महापालिकेने वीज बील भरावे यासाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा सुरू आहे. पालिकेने पैसे भरले नाहीत तर पाणी पुरवठ्याचे फारोळा, नक्षत्रवाडी आणि जायकवाडी येथील वीज कनेक्शन खंडित केले जाईल असा इशारा सुरेश गणेशकर यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images