Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रस्ते टेंडर मंजुरी ‘ऐनवेळी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या निविदा (टेंडर) मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी आणण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पालिकेचे प्रशासनाने देखील टेंडर मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. ही प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती मिळाली आहे.

औरंगाबाद शहरात दीडशे कोटी रुपये किंमतीची रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी शंभर कोटींचे रस्ते शासकीय अनुदानातून, तर ५० कोटींचे रस्ते डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून केले जाणार आहेत. या रस्त्यांच्या कामांची टेंडर प्रक्रिया महापालिकेने ऑगस्ट महिन्यापासून सुरू केली आहे. अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. दरम्यानच्या काळात दोन वेळा टेंडर पुन्हा काढावा लागले. आता टेंडरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्राप्त झालेले टेंडर दोन दिवसांत उघडले जाणार असून, त्यानंतर ते मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवले जाणार आहेत.

स्थायी समितीच्या नियमीत विषय पत्रिकेवर या रस्त्यांचा विषय आला तर त्याला अनेक पाय फुटतील, असे मानले जात आहे. त्यामुळे स्थायी समितीत ऐनवेळी रस्ते टेंडरचा विषय आणण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; एक मार्च रोजी स्थायी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत रस्त्यांच्या टेंडरचा विषय येणार नाही. दहा मार्चच्या सुमारास स्थायी समितीची पुन्हा एक बैठक होणार असून, त्यात टेंडरचा विषय मांडला जाणार आहे.

मार्चएंडमुळे घाई

शासनाच्या शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून ही कामे केली जाणार आहे. त्याची वर्कऑर्डर मार्चअखेरपर्यंत न दिल्यास शंभर कोटी रुपयांचे अनुदान परत जाऊ शकते. त्यामुळे स्थायी समितीची मंजुरी तात्काळ मिळवून संबंधित कंत्राटदाराला वर्कऑर्डर देण्यासाठी आता घाई केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोर समजून मारहाण; इज्तेमात तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लिंबेजळगाव येथे झालेल्या इज्तेमात चोर समजून संशयितांना मारहाण केल्याने एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. हा प्रकार रविवारी सकाळी घडला. जखमी तरुणांना घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

काही तरूण चोरी करण्यासाठी आले असून त्यांना पकडून ठेवल्याची माहिती इज्तेमामधील काही स्वंयसेवकांनी रविवारी सकाळी साडेअकरा वाजता वाळूज पोलिसांना दिली. त्यानंतर उपनिरीक्षक अमित बागूल यांनी घटनास्थळ गाठले. इज्तेमाच्या ठिकाणी पार्किंग क्रमांक ९९च्या तंबुमागील दोन पडक्या खोल्यांमध्ये चार तरुणांना ठेवले होते. बागुल यांनी त्यांना ते तरूण जखमी असल्याचे दिसले. त्यांनी अॅमब्युलन्स बोलावून त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता चौघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या मारहाणीत मुबारक हसन तांबोळी (वय ३४, रा. जोगेश्वरी, मुंबई), अन्वरखान इमामखान (वय ३९, रा. भवानी पेठ, पुणे) व शेख अकील शेख मोहम्मद इस्लाम (वय १८, रा. देवीचा मोहल्ला, मालेगाव, जि. नाशिक) या जखमी तरुणांवर उपचार करण्यात आले. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.

डांबून मारहाण

या तरुणांची चौकशी केली असता इज्तेमा मधील स्वंयसेवकांनी चोर समजून आम्हाला हातपाय बांधून पार्किंगमागील पडक्या खोलीमध्ये डांबून मारल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पऱ्हाट्यांच्या गंजी साठवू नका

$
0
0

औरंगाबाद : कापूस पिकांवर सेंद्रीय बोंडअळीने मोठे नुकसान झाले आहे. त्याचा पुढील हंगामात पुन्हा उद्रेक होऊ नये, त्यासाठी फरदड न घेता पऱ्हाट्या रोटाव्हेटरव्दारे जमिनीत गाडाव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होईल, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

मराठवाड्यात १६ लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर कापसांची लागवड झाली, पण बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे उभे कापूस पीक वाया आहे. आगामी खरीप हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहे. कापूस पीक वेळेवर म्हणजे डिसेंबरअखेर काढून टाकावे, शेत स्वच्छ करावे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत पऱ्हाट्या शेतातच उभ्या ठेवू नयेत. काढणीसाठी मल्टीक्रॉप श्रेडरचा वापर केल्यास किडग्रस्त बोंडांचा नायनाट करता येईल. बीटी कॉटन लावताना रेफ्युजी (नॉन बीटी) लावा, गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीला सरकार जबाबदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोंडअळी रोकण्यासाठी उपाययोजनांची पूर्व कल्पना असतानाही राज्य सरकारने ठोस कार्यवाही केली नाही, उलट तंत्रज्ञान आणि बियाणे कंपन्यांवर दोषी ठरविले जात आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले नसते. त्यामुळेच नुकसानीला बियाणे कंपन्या नव्हे, तर राज्य सरकारच जबाबदार आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. गुलाबी बोंडअळीचा प्रकोप रोखण्यासाठी तातडीने नवीन 'जीएम' वाणाला परवानगी देण्यात यावी, तसेच नैसर्गिक आपत्ती समजून गुलाबी बोंडअळीविरुद्ध प्रतिबंधात्मक प्रचार मोहीम राबविण्यासाठी सरकारने गुजरात पॅटर्न राज्यात राबवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारने आता बोंडअळी नियंत्रणासाठी व्यापक मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत. या मोहिमेत मदत करण्यासाठी शेतकरी संघटनाही पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. कृषी खाते, बियाणे कंपन्या, कृषी सेवा केंद्र, खत व औषध, शेतकरी संघटना, बाजार समिती यांचा सहभागाने प्रतिबंधात्मक प्रचार मोहीम राबविण्यासाठी सरकारने गुजरात पॅटर्न राज्यात राबवावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. यावेळी संघटनेचे नेते विजय निवल, अजित नरदे, कैलास तवार उपस्थित होते.

नवीन जीएम वाणाला परवानगी द्या

गुलाबी बोंडअळीसाठी रोकण्यासाटी जीएम तंत्रज्ञानातील बीजी-१ त्यानंतर बीजी-२ वाणांना २००६ मध्ये परवानगी मिळाली. त्यामुळे कपाशीचे उत्पादन १२० लाख गाठींवरून ४०० लाख गाठींवर गेले. देशात २००६नंतर अन्य काही पाच नव्या जीएम तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. बोंडअळीचा प्रकोप रोखण्यासाठी नवीन जीएम वाणाला परवानगी दिली जावी, अशी मागणीही या शेतकरी नेत्यांनी केली. प्रतिस्पर्धी देशात नवे तंत्रज्ञानाचा वापर होत असताना त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे उत्पादन प्रचंड वाढलेले असताना आपल्या देशातील शेतकऱ्यांना त्यापासून दूर का ठेवले जाते, असा सवालही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटा पुरवणारी टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या तिघांच्या टोळीला पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनच्या विशेष पथकाने मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटे विविध भागात छापे टाकून अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीनशे बनावट नोटा जप्त केल्या आहेत. दरम्यान, बुधवारी जालना येथील आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली.

सिडको कॅनाट प्लेस परिसरात दोघे जण पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून संशयित आरोपी अफसर पठाण (वय ३९, रा. नारेगाव) व भीका वाघमारे (वय ३९, रा. डबलजीन, जालना, सध्या रा. चिकलठाणा) यांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता अफसरकडे पाचशे रुपयांच्या ६६ बनावट नोटा, तर वाघमारेकडे शंभर व दुचाकीच्या डिक्कीत शंभर बनावट नोटा सापडल्या. वाघमारे याच्याकडे चौकशी केली असता या नोटा श्रीरामपूर येथील सुनील बोराडे हा देत असल्याची माहिती दिली. तसेच तो आज रात्री येणार असल्याचेही सांगितले. त्यावरून पोलिसांनी पंचवटी चौकात बोराडे याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ पाचशे रुपयांच्या ३४ बनावट नोटा सापडल्या. अधिक चौकशीत बोराडेने याने या नोटा ठाणे येथील एक जण पुरवत असल्याचे सांगितले. या तिघांना अटक करून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील एपीआय वामन बेले, जमादार प्रमोद पवार, इसाक पठाण, विनोद परदेशी, गणेश वैराळकर, विनायक गिते व महिला पोलिस कळे यांनी केली.

इज्तेमामध्ये साठ हजार चलनात

लिंबेजळगाव येथे झालेल्या इज्तेमामध्ये साठ हजार रुपयांच्या बनावट नोटा खरेदीच्या बहान्याने चलनात आणल्याची माहिती अफसर खान पठाण याने पोलिसांना दिली आहे. तसेच त्याला क्लबमध्ये पत्त्याचा जुगार खेळण्याची सवय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोठ्या रॅकेटचा समावेश

या गुन्ह्यात मोठे रॅकेट असल्याचे निष्पन्न होत आहे. अफसर खान हा भीका वाघमारेकडून खऱ्या पन्नास हजारांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा घेत होता. भीका वाघमारे हा सुनील बोराडे याच्याकडून तीस हजारांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट एक लाख रुपये घेत असल्याचे चौकशीत समजले आहे. या रॅकेटचे धागेदोरे परराज्यात असून पोलिसांचे एक पथक श्रीरामपूर येथे गेले असून जालना येथून एका संशयिताला अटक केली आहे.

शनिवारपर्यंत कोठडी

याप्रकरणी तिन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. हा गुन्हा गंभीर असून बनावट नोटा चलनात आणणारी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे. बनावट नोटा पुरवणारा पसार आरोपी प्रकाश वडितके (रा. नेवरगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद, ह.मु. ठाणे) याला अटक करायची आहे. या नोटा कोठे छापल्या, किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी आरोपीला शनिवारपर्यंत (३ मार्च) पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घरचे टीव्ही बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीच्या आपल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगली कामगिरी करावी यासाठी प्रियदर्शिनी इंदिरानगर येथील महापालिका शाळेच्या शिक्षकांनी शाळेचा उंबरा ओलांडला आहे. त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांचेही समुपदेशन केले. समुपदेशनामुळे बहुतेक विद्यार्थ्यांच्या घरचे टीव्ही परीक्षेच्या काळात बंद करण्यात आले आहेत. शिवाय शिक्षकांनी दिलेला सल्ला मनावर घेऊन विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी आपसातील भांडण कमी केले आहे.

महापालिकेच्या बारा शाळांत इयत्ता दहावीपर्यंत वर्ग असून त्यात एकूण ५७० विद्यार्थी आहेत. प्रियदर्शनी इंदिरानगर येथील महापालिकेच्या शाळेत दहावीचा वर्ग आहे. शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत यासाठी शिक्षकांनी वर्षभर लक्ष दिले. पण, त्यांच्या घरातूनही पाठिंबा मिळण्याची गरज होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरातून अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शिक्षकांनी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या शाळेतील दहावीचा अभ्यासक्रम २० ते २५ दिवसांपूर्वी संपला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी अभ्यास करावा, असे आवाहन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले. त्यानुसार विद्यार्थी अभ्यास करू लागले. पण, विद्यार्थी खरोखरच अभ्यास करतात का, त्यांना त्यांचे पालक सहकार्य करतात का हे पाहण्यासाठी व आवश्यक तेथे सहकार्य करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी शिक्षकांची पथके तयार केली.

अभ्यासक्रम संपला आता घरी अभ्यास करा, असे सांगितल्यामुळे विद्यार्थी घरातच अभ्यास करून लागले. विद्यार्थ्यांच्या या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला. प्रियदर्शनी इंदिरानगर शाळेत दहावीच्या वर्गात ४१ विद्यार्थी आहेत, त्यापैकी २२ विद्यार्थिनी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जावून वस्तूस्थिती शिक्षकांनी जाणून घेतली. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांच्या घरातील टीव्ही परीक्षेच्या काळात बंद झाले आहेत. आई- वडिलांची भाडणे काही प्रमाणात कमी झाली, वडिलांचे मद्यप्राशन नियंत्रणात आले, शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे, असे मुख्याध्यापक सोनार यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या अडचणी

या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी संपर्क केल्या असता त्यांच्याकडून विविध अडचणींचा पाढा वाचला जाऊ लागला. एकाच खोलीत संपूर्ण कुटुंब राहते, खोलीत टीव्हीचा आवाज खूप मोठा केला जातो, त्यामुळे अभ्यास करता येत नाही, आई-वडील अनेकवेळा भांडतात, वडील आईला मारतात, त्यामुळे घरातले वातावरण खराब होते, वडील दारू पिऊन येतात त्यामुळे अभ्यास होत नाही, आदी अडचणींचा पाढा विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमोर वाचला. त्यामुळे शिक्षकांनी घरी जाऊन पालकांचे समुपदेशन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा बंद करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारने कमी पटसंख्येच्या राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ४१ शाळांचा समावेश आहे. या शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांना जवळपास जिल्हा परिषदेची दुसरी शाळा नाही. परिणामी सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती बैठकीत बुधवारी करण्यात आला. या शाळांमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी आहेत.

शिक्षण समितीची बैठक बुधवारी झाली. सभापती मीना शेळके, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल, बबन कुंडारे, मधुकर वालतुरे, सीमा गव्हाणे, पूनम राजपूत, पुष्पा काळे, मोनिका राठोड आदींची उपस्थिती होती. राज्य सरकारने कमी पटसंख्येच्या १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ४१ शाळांचा समावेश आहे. यापैकी अनेक शाळा दुर्गम भागातील असून, शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असा मुद्दा गव्हाणे यांनी उपस्थित केला. चिमुकल्यांची होणारी परवड सर्वांच्या लक्षात आणून देत, पर्यायी शैक्षणिक व्यवस्था प्रथम उपलब्ध होणार नाही तोपर्यंत एकही शाळा बंद करू नये, असा ठराव बैठकीत मांडला. या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. सभापती शेळके यांनी त्याला मंजुरी दिली. हा ठराव सरकारकडे पाठविला जाणार आहे.

वाभळेवाडी (जि. पुणे) येथे एका उद्योजकाने जिल्हा परिषदेची शाळा इमारत बांधून दिली. ही शाळा गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरत आहे. त्या शाळेचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण समितीच्या टिमने जावे, असा निर्णय घेण्यात आला. गारखेडा बीटमधील जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेचे केरळच्या टिमने कौतुक केले. याबद्दल शिक्षण विस्तारअधिकारी रमेश ठाकूर यांच्यासह मुख्याध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले.

मोडकळीस आलेल्या शाळांचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले. त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची मागणी करण्यासाठी हा अहवाल मागविला असल्याचे शेळके यांनी सांगितले.

शाळांची तपासणी करणार

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख व बाराखडी, उजळणी येणे आवश्यक आहे. यासाठी शाळा गुणवत्ता तपासणी मोहीम राबविली जात आहे. त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी आठवड्यातून एकदा शाळांना अचानक भेट देऊन तपासणी करण्याचे ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा गुरुवारपासून (१ मार्च) सुरू होत आहे. औरंगाबाद विभागातून ६०६ परीक्षा केंद्रावरून एक लाख ९७ हजार ४३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत येण्याची मुभा यंदापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

मंडळाने यावर्षी परीक्षेच्या नियमात काही बदल केले आहेत. एका कक्षात २५ विद्यार्थी राहणार आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे परीक्षेच्या ठरवून दिलेल्या वेळेतच परीक्षा कक्षात उपस्थित राहावे लागणार आहे. परीक्षा सुरू झाल्यापासून अर्धा तास उशिरापर्यंत प्रवेश देणे यंदापासून बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना वेळेतच पोहचावे लागणार आहे. याशिवाय प्रश्नपत्रिकेचे पाकीट परीक्षार्थींसमोरच उघडण्यात येणार आहे. औरंगाबाद विभागात औरंगाबाद, बीड, जालना, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. ही परीक्षा २४ मार्चपर्यंत घेतली जाणार आहे.

परीक्षार्थींना सूचना…

- परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या ३० मिनिटे आधी परीक्षगृहात उपस्थित राहणे आवश्यक

- सकाळी साडे दहा व दुपारी अडीच वाजता परीक्षागृहात उपस्थित रहावे लागेल

- अध्ययन अक्षमता असलेल्या परीक्षार्थ्यांना वेळेपेक्षा प्रती तास २५ टक्के जादा वेळ

- दिव्यांग विद्यार्थ्यांना २०, मुकबधीर विद्यार्थ्यांस ३० मिनिटांचा जादा वेळ

- परीक्षार्थींनी उत्तरपत्रिका व पुरवणी पुस्तिकेवरील ठराविक जागेवर बैठक क्रमांक अक्षरात व अंकात दोन्हीमध्ये बिनचूक लिहावा.

- परीक्षार्थींनी कोणतेही पुस्तक वा कागद तसेच प्रतिबंधित साहित्य परीक्षास्थळी आणू नयेत.

जिल्हानिहाय विद्यार्थी

जिल्हा……….. विद्यार्थी

औरंगाबाद…. ६८, २६८

बीड………….. ४५, ९१२

जालना………. ३२, ९७१

परभणी……… ३१, ३१०

हिंगोली……… १८, ९९५

एकूण १, ९७, ४३६

दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली. यंदा अनेक बदल करण्यात आल्या तशा सुचना केंद्रप्रमुखांना देण्यात आल्या. महसूल विभागाचे पथकांसह, मंडळाचे भरारी पथकही असणार आहे. विद्यार्थ्यांनी ताणतणाव न घेता परीक्षेला सामोरे जावे.

सुगधा पुन्ने, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैसे दुप्पटचे आमीष; जामीन तिसऱ्यांदा फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैसे दुप्पट करण्याचे आमीष दाखवून तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिसऱ्या फरार आरोपीने तिसऱ्यांदा कोर्टात सादर केलेला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी बुधवारी (२८ फेब्रुवारी) फेटाळला.

या प्रकरणी मनिषा आदेश जुगार (३६, रा. मोर्शी, पुणे) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचे पुण्यात फॅब्रिकेशनचे दुकान आहे. फिर्यादीकडे काम करणाऱ्या एका महिलेने पैसे दुप्पट करुन देणाऱ्या मांत्रिकाचे नाव सुचवले व त्यावरुन फिर्यादीने शेख अखिल शेख रफिक उर्फ मौलाना (रा. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) या मांत्रिकाला संपर्क साधला. त्यावर मांत्रिकाने फिर्यादीला परतूर एमआयडीसी येथे बोलावले. फिर्यादी तिथे पोहचताच मांत्रिकाने नोटांचा पाऊस पाडून दाखवला. त्यातील एक पाचशेची नोट फिर्यादीला देऊन बाजारात वापरण्यास सांगितले. फिर्यादीने ती नोट वापरुन पाहिली व फिर्यादीचा मांत्रिकावर विश्वास बसला. त्यानंतर फिर्यादीने मांत्रिकाला रक्कम दुप्पट करुन देण्याचे सांगितले. त्याला मांत्रिक तयार झाला; पण त्यासाठी सात लाखांचे औषध विकत घ्यावे लागेल, असे मांत्रिकाने फिर्यादीला सांगितले. २४ एप्रिल २०१७ रोजी मांत्रिकाने रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादीला जिन्सी परिसरात बोलावून सात लाख रुपये देण्यास सांगितले व त्यानुसार औषध आणण्यासाठी मांत्रिकाच्या साथीदाराला सात लाख रुपये दिले. पैसे घेऊन आधी मांत्रिकाचा साथीदार व त्यानंतर मांत्रिक पसार झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन मांत्रिक शेख अखिल शेख रफिक व त्याचा साथीदार शेख अजहर शेख अफसर यांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी रहीम खाँ मजीद खाँ पठाण उर्फ देशमुख हा फरार आहे. या प्रकरणी आरोपी रहीम खाँ याचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्ट तसेच जिल्हा कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर त्याने तिसऱ्यांदा जिल्हा कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता.

रक्कम जप्त करणे बाकी

आरोपीच्या तिसऱ्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीवेळी, आरोपीचा गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे. तसेच आरोपींकडून सात लाख रुपये जप्त करणे बाकी आहे. आरोपींनी या रकमेची कशी विल्हेवाट लावली, याचा तपास करणे बाकी आहे आणि आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला तर आरोपी तपासामध्ये अडथळा आणू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती अतिरिक्त जिल्हा लोकअभियोक्ता सतीश मुंडवाडकर यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास देऊ नका : खैरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज बिल थकित असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी. नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करून त्रास देऊ नका, अशा सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत दिल्या.

महावितरण कार्यालयात जिल्हा विद्युतीकरण समितीची बैठक झाली. या बैठकीत थकबाकीबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने गटानुसार जोडणी करून दिली आहे. गटातील अनेक ग्राहक रीतसर बिल भरतात, परंतु काही ग्राहक बिल भरणा करत नाहीत. अशा शेतकऱ्यांमुळे बिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचाही वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना बिल भरूनही त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन त्वरित खंडित करावे. थकबाकी वसूल करून त्यांचा पुरवठा सुरळीत करण्याची सूचना जिल्हा विद्युतीकरण समितीचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी अधिकाऱ्यांना केली. या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, मुख्य अभियंता गणेशकर, अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे, आदींची उपस्थिती होती.

तारांचा प्रश्न मार्गी लावा

शहरातील अनेक भागात लोंबकळणाऱ्या तारा आहेत. त्याचे नियोजन योग्य त्या परिस्थितीत करून शहराला अखंड वीजपुरवठा करावा. शहरी नागरिकांच्या वीज बिलासंदर्भातील तक्रारी त्वरित हाताळाव्या, अशा सूचना यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी असूनही अपंग विद्यार्थ्यांची परवड

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारने निधी मंजूर करूनही केवळ अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यास जिल्हा परिषद प्रशासनाने सात महिन्यांपासून टाळाटाळ केली आहे. त्यामुळे शासकीय प्रौढ अपंगांचे प्रशिक्षण केंद्रात असलेल्या २५ जणांची भूक कर्मचारी स्वत:च्या खिशातून पैसे टाकून भागवत आहेत.

हडको एन - १२ येथे शासकीय प्रौढ अपंगांचे प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. याठिकाणी राज्यभरातील २५ विद्यार्थी राहतात. सरकारी केंद्रात दैनंदिन अन्नपुरवठा करण्यासाठी वार्षिक तत्वावर कंत्राट दिले जाते. अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात कंत्राटदार निश्चित केला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात महिने उलटून गेले तरी कंत्राटदार निश्चित झालेला नाही. गेल्यावर्षी ई निविदा पद्धतीने कंत्राट दिले गेले. औरंगाबाद बाहेरील कंत्राटदाराला कंत्राट दिले गेले, पण याठिकाणी विद्यार्थी संख्या कमी असल्याने संबंधित कंत्राटदाराने अन्नधान्य पुरवठा केलाच नाही. वर्ष २०१७ -१८ चीही स्थिती तशीच निर्माण झाली. जूनपासून कुणीच कंत्राटदार समोर आला नाही. ई निविदा पद्धतीने कंत्राट भरण्यास एवढ्या कमी विद्यार्थीसंख्येस परवडत नसल्याचे कारण सांगून प्रतिसाद मिळाला नाही. केंद्रातील अधिकाऱ्यांनी जूनपासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अनेक निवेदन दिली आणि अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार नेमण्याची मागणी केली पण आजवर त्यावर काहीच निर्णय झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधोना टपाल कार्यालयात चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निधोना टपाल कार्यालयात झालेल्या पाच हजार २८० रुपयांच्या चोरी प्रकरणात आरोपीला बुधवारी (२८ फेब्रुवारी) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, शनिवारपर्यंत (३ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

सलग दोन सुट्यानंतर सोमवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी टपाल कार्यालय उघडताना कडीकोंडा उघडा दिसून आला. त्याबाबत पोस्ट मास्टरला कळविण्यात आल्यानंतर पोस्ट मास्टर व इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता, लॉक तोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले व पाच हजार २८० रुपयांची चोरी झाल्याचेही निष्पन्न झाले. या प्रकरणी वडोदहाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी कैलास नामदेव वाडेकर (३५, रा. निधोना, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) याला बुधवारी अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून मुद्देमाल जप्त करणे बाकी असून, आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर पाणीप्रश्नाकडे आमदारांचे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कायम दुष्काळी गंगापूर, वैजापूर तालुक्यासाठी गोदावरी खोऱ्यातील वाकी, भाम, भावली व मुकणे हे चार धरणे बांधली गेली. पाण्यावर आरक्षण टाकले गेले. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता आपल्या पाण्यावर दुसरे आरक्षण टाकले गेले आहे. हक्काचे पाणी दुसरीकडे वळविण्याचा डाव आहे. दुर्दैवाने या प्रश्नावर गंगापूरच्या आमदारांचे दुर्लक्ष आहे, असा आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचच्या वतीने मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले. मंचचे अध्यक्ष अॅड. संजय लाखे पाटील, निमंत्रक राजेंद्र दाते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, कृष्णा डोणगावकर, प्रा. प्रदीप पुरंदरे, प्रा. मनोहर लोंढे, विवेक जैस्वाल, विजय राऊत, शेख नावेद, विजय निकाळजे आदी उपस्थित होते.

औरंगाबाद नाशिकसाठी पिण्याच्या व उद्योगाच्या पाण्याचे २०४१ पर्यंतचे आरक्षण गंगापूर व दारणा समुहातील समप्रमाणात टाकण्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावात हरकती व अन्य बाबत निवेदन सादर करण्यात आले. दारणा धरण समुहात मुकणे, भावली, वाकी व भाम या धरणांची निर्मिती ही नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या सिंचनाच्या पाण्यासाठी करण्यात आली आहे. प्राप्त माहितीवरून नाशिक शहरासाठी २०२१ पर्यंत १७०.३१ आणि २४८.४ आणि २०४१ पर्यंत ३५९.९९ दलघमी व बाष्पीभवन गृहित धरून पाणी आरक्षण केले जावे असा प्रस्ताव जलसंपदा नाशिकने तयार करण्याचे काम सुरू केले आहे. जे बेकायदेशीर आहे. यामुळे मराठवाड्यावर अन्याय होणार आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेचे कुठलेही मत जाणून घेतलेले नसल्यामुळे या निर्णयास मंचने विरोध केल्याचे दाते पाटील यांनी सांगितले.

मंचच्या मिळालेल्या माहितीनुसार शहापूर (जि. ठाणे) येथील ९७ गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी भावली धरणात पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. तुटीच्या गोदावरी खोऱ्यात बाहेरून पाणी आणण्याऐवजी त्यातून उलट पाणी बाहेर नेले जात आहे, भावली धरण हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर या दुष्काळी तालुक्यात सिंचन करण्यासाटी बांधलेले आहे. पाणी उलट्या दिशेने पळवण्यामुळे सिंचन क्षेत्रात किमान ४७१ हेक्टर कपात होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

गंगापूर व वैजापूरच्या पाण्याकडे आमदारांकडून दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याचा विभागीय आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग २११च्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये अनियमितता करून मौजे करोडी येथील गट क्र. १३३ पैकी संपादित होणाऱ्या क्षेत्रामध्ये मोबदला वाटपात फेरबदल करण्यास जबाबदार अधिकारी व भूखंड माफियांवर कारवाई करा, या मागणीसाठी एका शेतकऱ्याने विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याचे नाव सुंदरलाल खरे असे आहे.

जमीन मालकी हक्कात महसूल प्रशासनाने फेरफार करून दुसऱ्यांची नावे सातबाऱ्यात नोंदवल्याचा आरोप सुंदरलाल खरे यांनी केला आहे. खरे वेळीच हस्तक्षेप करत त्यांच्या हातातून विषाची बाटली हिसकावून घेतली आणि ताब्यात घेतले. त्यानंतर खरे यांनी पोलिस बंदोबस्तात अप्पर तथा प्रभारी महसूल आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्याकडे कैफियत मांडली.

खरे यांनी टाकसाळे यांच्या केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ मध्ये त्यांच्या मालकीची ९० आर जमीन जात आहे. या जमिनीच्या मालकीत महूसल तसेच मोजणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून काही लोकांची नावे अचानक नावे घातली आहेत. यात उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, मंडळ अधिकारी राजेंद्र बागडे तसेच भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, असा आरोप केला. सध्या जमिनीवर काही लोकांनी बेकायदा ताबा घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 'हे मोजणीचे प्रकरण आहे. यामध्ये आक्षेप आल्यामुळे आता गुरुवारी (१ मार्च) फेरमोजणी करण्यात येणार आहे. माझी भूमिका मोजणी झाल्यानंतर येते, जमिनीवर ताबा कुणाचा आहे हे भूमिअभिलेख विभाग पाहील,' असे अपर विभागीय आयुक्त तथा प्रभारी महसूल उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले.

या प्रकरणात कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आक्षेप कागदावर आले असून मोबदला देण्याचे थांबवण्यात आले आहे.

- शिवानंद टाकसाळे, अपर विभागीय आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयव्हीएफ उपचार भारतात सर्वांत स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जगभरात आयव्हीएफ उपचार हे भारतामध्ये सर्वांत स्वस्त आहेत. हेच उपचार अमेरिकेसह युरोपामध्ये किमान २० ते २५ पट जास्त महाग आहेत. त्याचवेळी इतर देशांच्या तुलनेत भारतातील एंडोस्कोपिक सर्जनही अधिक कुशल असून, माझे मेंटॉर हे भारतातील नामांकित एंडोस्कोपिक सर्जन आहेत. त्यांच्यामुळेच मी एंडोस्कोपी शिकलो व आज माझ्या देशात मी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करत आहे,' असे मत दक्षिण अफ्रिकेतील प्रसिद्ध एंडोस्कोपिक सर्जन डॉ. स्टीफन जेफरी यांनी नोंदविले.

भारतीय स्त्रीरोग एण्डोस्कोपिस्ट असोसिएशन, औरंगाबाद स्त्रीरोग संघटना व एण्डोवर्ल्ड हॉस्पिटलच्या वतीने शहरात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्त्रीरोग एण्डोस्कोपी व वंधत्व उपचार परिषदेत ते सहभागी झाले होते. यानिमित्त त्यांनी 'मटा'शी संवाद साधला. 'वंध्यत्वाचे प्रमाण जगभरात सर्वत्र १० ते १५ टक्क्यांपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर 'आयव्हीएफ' ही फार मोठी देणगी ठरली आहे व त्यामुळेच पन्नाशीमध्येही मातृत्वाचा सर्वोच्च आनंद अनुभवता घेता येणे शक्य झाले आहे. तसेच करिअर व इतर अडचणींमध्ये स्त्री बिजांना उणे अंशांमध्ये गोठवून कालांतराने 'आयव्हीएफ'द्वारे अपत्यप्राप्ती होऊ शकते. अर्थात, दक्षिण अफ्रिकेमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण खूप असल्यामुळे आमच्या देशामध्ये अडचणी जास्त येतात. मात्र आमच्या देशामध्ये सरकारच्या वतीने 'आयव्हीएफ'चा निम्मा भार उचलला जातो व भारत सरकारही या संदर्भात काही प्रमाणात आधार देण्याचा विचार करू शकते. भारतामध्ये 'आयव्हीएफ'संदर्भातील सर्वांत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे, हे नमूद करावेच लागेल, असे स्टीफन म्हणाले. परिषदेत सहभागी झालेले अहमदाबाद (गुजरात) येथील प्रसिद्ध वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. संजय पटेल म्हणाले, 'वंध्यत्वाची समस्या आज नव्हे तर अगदी महाभारत-रामायणाच्या काळापासून होती, हे साहित्यातून स्पष्ट झाल्याशिवाय राहात नाही. गांधारी हिनेही 'सरोगसी'चा आधार घेतला होता, हे सहजपणे लक्षात येते. आज वंध्यत्वाचे प्रमाण कदाचित वाढलेले असू शकते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत असू शकते, असेही समोर आले आहे. इतर राज्यांमध्ये हेच प्रमाण ८ ते १५ टक्क्यांपर्यंत आहे. क्षयरोगाबरोबरच 'पीआयडी'मुळेही वंध्यत्वाचे प्रमाण जास्त असू शकते. सुदैवाने भारतामध्ये एक लाखात आयव्हीएफ उपचार होतात, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. इतर प्रगत देशांमध्ये याच उपचारांसाठी तब्बल २० ते २५ लाखांपर्यंत खर्च येतो. आता तर भारतातील 'आयव्हीएफ'चा 'सक्सेस रेट'ही ४५ टक्क्यांपर्यंत गेला आहे, जो नव्वदच्या दशकात ५ ते १० टक्के इतकाच होता. 'ईक्सी' हे तर आणखी अद्ययावत तंत्रज्ञान आहे,' असेही डॉ. पटेल म्हणाले.

गुजरातमध्ये २५ हजारांत आयव्हीएफ

'देशामध्ये आयव्हीएफ उपचारांसाठी एक लाखापर्यंत खर्च येत असला तरी गुजरातमधील 'किडनी इन्स्टिट्यूट'मध्ये केवळ २५ हजारांमध्ये हे उपचार होतात,' असेही डॉ. पटेल म्हणाले. सरकारने हे उपचार करावेत का, या प्रश्नावर, 'हे उपचार जीवनरक्षक नसल्याने सरकारने हे उपचार करावेत असे वाटत नाही,' असेही डॉ. पटेल 'मटा'ला म्हणाले.

केंद्रांचे प्रमाणीकरण गरजेचे

'सद्यस्थितीत देशामध्ये आयव्हीएफ सेंटर खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मोठ्या शहरांमध्ये किंवा महानगरांमध्ये असे सेंटर गल्लोगल्ली दिसतात. मात्र देशामध्ये उत्तम दर्जासह उत्तम सक्सेस रेट असणारे सेंटर हे अडीचशे ते तीनशेपेक्षा जास्त नाहीत. त्यामुळे प्रमाणिकरणाचा मुद्दा उपस्थित होत असून, उत्तम रिझल्ट्ससाठी सर्व केंद्रांचे प्रमाणिकरण होणे खरोखर गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर येणारे 'आयव्हीएफ बिल'मुळे काही सकारात्मक परिणाम होतील,' असे परिषदेत सहभागी झालेले मुंबईचे प्रख्यात एंडोस्कोपिक सर्जन डॉ. प्रकाश त्रिवेदी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठीला गेल्या वर्षीचेच प्रश्न ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मराठी विषयाच्या 'कृतिपत्रकेत' गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. पहिला पेपर मराठी विषयाचा होता. प्रश्नपत्रिकेची पद्धत बदलून ती कृतीपत्रिका झाली आहे. परंतु, मराठीच्या पेपरला मागच्याच पेपरची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. तर, व्याकरणावर आधारित प्रश्न सारखे असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे. गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका व यंदाची कृतीपत्रिका यांच्यात २५ ते ३० टक्के सारखेपणा असल्याने हा प्रकार झाला कसा याचा शोध मंडळ घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर्षी एन-१०१ व मागील वर्षीचा ६०१ कोड क्रमांकाच्या पेपरमधील काही प्रश्नांमध्ये साम्य असल्याचे शिक्षकांनी 'मटा'ला सांगितले. विभाग गद्य-१ मध्ये खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, हा प्रश्न मागील वर्षीसारखाच विचारण्यात आला आहे. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, या प्रश्नामध्येही साम्य असल्याची चर्चा आहे. नियामकांच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. कृतिपत्रिकेच्या संररचनेत प्रत्येक धड्याला ठराविक महत्त्व देण्यात आले. काही धडे, कविता छोट्या असल्याने कृतीपत्रिकेत साम्य असू शकते, असे काही शिक्षकांचे मत आहे. तर, काही प्रश्नांची तुलना केल्यास उत्तरे सारखी येतात, असे शिक्षकांनी सांगितले.

-----------
कृतिपत्रिकेची काठिण्य पातळी कमी होती. सर्वसमावेश असलेली कृतिपत्रिका सहज सोडविता येईल अशी होती. यामध्ये व्याकरणाच्या प्रश्नात सारखेपणा जाणवतो. - मोहिनी रोजेकर, जागृती हायस्कूल

कृतिपत्रिकेत थोडेफार साम्य असले तरी त्याची विद्यार्थ्यांना अडचण काही नाही. कृतियुक्त प्रश्नांमुळे प्रश्न सोडवणे कठीण जात नाही. हा पेपर अतिशय सोपा होता. -दीपा पवार, शिशुविहार हायस्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा विल्हेवाटीसाठी उद्योग क्रांतीचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी योजना तयार असून, त्यासाठी प्रती किलो २० रुपये प्रमाणे पैसे देण्यात यावेत, असा प्रस्ताव उद्योग क्रांती उद्योजक संघाने महापालिकेला दिला आहे, अशी माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष महेश गुजर यांनी दिली.

भागाठाण येथे खासगी जागा उपलब्ध असून, कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न उद्योग क्रांती संघ करू शकतो. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री संघ उभारले. कचऱ्यापासून कार्बन डाय ऑक्साइट, सेंद्रीय खत, प्लास्टिक तयार होईल. महापालिकेने शहरातील कचरा द्यावा व प्रती किलो कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी २० रुपये द्यावेत, असा प्रस्ताव निवेदनाद्वारे महापौर, आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती गुजर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकोंडीला हिंसक वळण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराकोंडीच्या चौदा दिवसांनतर शहरात कचऱ्याचा प्रश्न गुरुवारी अक्षरश: पेटला व या विषयाला हिंसक वळण मिळाले. मिटमिटा -जांभाळा भागातील नागरिकांनी कचऱ्याने भरलेला ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हनुमान टेकडी, हर्सूल तलावाच्या परिसरातून नागरिकांनी महापालिकेच्या पथकाला पिटाळून लावले. दिवसभरातील या घटनांमुळे पालिकेचे प्रशासन सैरभैर झाले आहे.

शहरातील कचराप्रश्नी दाखल याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये नारेगाव येथे कचरा टाकण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा मुद्दा महापालिकेतर्फे लावून धरण्यात आला होता. पण, त्याला उच्च न्यायालयाने मान्यता दिली नाही. त्यामुळे रस्त्यांवर व विविध भागात साचलेला कचरा कोठे टाकायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याने पालिकेसमोर गुरुवारी अधिक तीव्र झाला. त्यामुळे कचऱ्याने भरलेले ट्रक रिकामे करण्यासाठी जागांचा शोध सुरू झाला. कचरा टाकण्यासाठी पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांना प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार ट्रक रिकामे करण्याचा पहिला प्रयत्न मिटमिटा व जांभाळा येथे करण्यात आला. पण, या दोन्ही ठिकाणी कचऱ्याचे ट्रक पेटवण्याचा प्रयत्न संतप्त नागरिकांनी केला. कचऱ्याने भरलेला ट्रक (एम एच २० ए ३७७४) घेऊन चालक मिलिंद घाटे हे मिटमिटा-जांभाळा गावात गेले असता जांभाळा जवळ नागरिकांच्या जमावाने तो अडवून कचरा टाकण्यास विरोध केला. जमावातील काही जणांनी ट्रकमधील कचरा रॉकेल टाकून पेटवून दिला. हे चालक घाटे यांच्या लक्षात येताच त्यांनी जवळच्या हॉटेलातून पाणी आणून आग विझवली. दरम्यानच्या काळात पोलिस व महापालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा ट्रक पोलिस बंदोबस्तात छावणी पोलीस स्टेशनमध्ये आणून उभा करण्यात आला.

मिटमिटा येथे सफारी पार्कच्या जागेवर कचरा टाकण्यास या भागातील नागरिकांनी गुरुवारी पुन्हा विरोध केला. सफारी पार्कच्या मार्गावर नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पालिका अधिकाऱ्यांना कचऱ्याच्या ट्रकसह माघारी फिरावे लागले. कचरा विरोधी आंदोलनात भाजप शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, दीपक ढाकणे, बबनराव मुळे, संपत जाधव, रामा सिरसाट, बाबा मुळे, रंगनाथ साबळे, रफीक पठाण, विकास तुपे, राजू अप्पा गुजरे, साहेबराव चेताडे, लक्ष्मण बनकर, अण्णासाहेब वाकळे यांच्यासह मिटमिटा येथील अनेक नागरिक सहभागी झाले होते.

\Bहनुमान टेकडी परिसरातून पिटाळले \B

जागतिक पर्यचन स्थळ बीबी का मकबरा व औरंगाबाद लेणीजवळील हनुमान टेकडी परिसरात कचऱ्याचे ट्रक रिकामे करण्याचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला. महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर स्वत: या मोहिमेवर होते. कचऱ्याने भरलेल्या सुमारे पंधरा ट्रकसह ते हनुमान टेकडीच्या पायथ्याशी पोचले. आपल्या परिसरात कचऱ्याच्या ट्रक आणल्याची माहिती मिळताच ते अडवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे त्यांना कचऱ्याच्या ट्रकसह माघारी फिरावे लागले.

\Bपोलिस बंदोबस्तात टाकला कांचनवाडीत कचरा

\B

कांचनवाडी येथील एसटीपी प्लांट परिसरात पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आला. येथेही स्थानिक नागरिकांनी दगडफेक करत विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी बळाचा वापर करून सुमारे ४० जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर येथे ४० ट्रक कचरा टाकण्यात आला. यावेळी कांचनवाडी रस्त्याला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. या परिसरात पोलिसांच्या क्वीक रिस्पॉन्स टीमसह कमांडो तैनात करण्यात आले होते.

\Bपालिकेसमोर कचऱ्याचे ट्रक \B

जांभाळा आणि मिटमिटा परिसरात कचऱ्याचा ट्रक जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ट्रकचालकांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हे ट्रक थेट महापालिका कार्यालयासमोर आणून उभे केले. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना धावाधाव करत पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर चालकांची समजूत घालून त्यांना ट्रकसह मध्यवर्ती जकात नाक्याकडे रवाना करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी जनसुनावणी

$
0
0

औरंगाबाद

राज्य मागासवर्ग आयोग मराठा आरक्षणासाठी पाच ते १६ मार्च या कालावधीत नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात खुली जनसुनावणी घेणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ ते चार या वेळेत जनसुनावणी होईल, अशी माहिती आयोगाचे सदस्य डॉ. राजाभाऊ करपे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठवाड्यासह राज्यभरात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. मराठवाड्यातील १३६ गावात प्रातिनिधिक तत्त्वावर प्रश्नावली भरुन घेण्यात आली. या सर्वेक्षणानंतर पहिल्या टप्प्यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जनसुनावणी झाली. या सुनावणीत शेकडो निवेदने प्राप्त झाली, अशी माहिती करपे यांनी दिली.

पाच मार्च रोजी नांदेड, सहा मार्च परभणी, सात मार्च हिंगोली, आठ मार्च बीड, नऊ मार्च जालना आणि १६ मार्च रोजी औरंगाबाद येथे जनसुनावणी होणार आहे. औरंगाबाद येथील जनसुनावणी विभागीय स्तरावरची असून आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड, सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. राजाभाऊ करपे व रोहीदास जाधव उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीत मराठा संघटना, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि वैयक्तिक स्तरावरील निवेदने अधिक येण्याची शक्यता आहे. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आंबेडकरी संघटना, जमात-ए-इस्लामी, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे निवेदन आयोगाला दिल्याचे करपे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील पाच हजार गावांवर टंचाईचे मळभ

$
0
0

औरंगाबाद

निम्म्या मराठवाड्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांच्या काही भागामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे या जिल्ह्यांवर टंचाईचे सावट आहे. येणाऱ्या काळात संभाव्य टंचाईची परिस्थिती पाहता प्रशासनाने एप्रिल ते जून अखेरपर्यंत मराठवाड्यातील ५,११८ गावे आणि १२४६ वाड्यांसाठी ६७ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा शासनदरबारी सादर केला आहे.

यंदा मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरी लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये तुलनेत कमी पाणी आहे. उन्हाळ्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यात टँकर सुरू करावे लाले आहेत. प्रशासनाने जानेवारी ते मार्च आणि एप्रिल आणि एप्रिल ते जून या कालावधीसाठी टंचाई कृती आरखडा शासनाकडे पाठवला आहे. यामध्ये १५९ कोटी रुपयांचा एप्रिलपर्यंत, तर ६७ कोटी रुपयांचा एप्रिल ते जून या कालावधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण जानेवारी पासून फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यात टंचाईची मोठी स्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे प्रशासनाला काही भागात टँकर वगळता जास्त खर्च करण्याची गरज पडली नाही. आता एप्रिल ते जून या कालावधीसाठी टंचाई निर्माण झाल्यास आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनाला करावी लागणार आहे.

यावर्षी मराठवाड्यात सरासरी ७७९ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ६७३.८ मिलिमीटर (८६.४० टक्के) पाऊस झाला. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे या जिल्ह्यांची परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांच्या अनेक मंडळांमध्ये तुलनेत कमी पाऊस झाल्याने या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये जूनपर्यंत पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाला जूनपर्यंत सादर करण्यात आलेल्या टंचाई आराखड्यात जालना जिल्हा वगळता इतर सातही जिल्ह्यांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. हा आराखडा पुढे शासनाकडे पाठवला आहे. मराठवाड्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाने एप्रिल ते जून या महिन्यांपर्यंत पाणीटंचाई निवारणासाठी तयार करण्यात येणाऱ्या विविध योजनांवरील संभाव्य खर्चाची माहिती शासनाकडे पाठवली. कृती आराखड्यानुसार नवीन विंधन विहीर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना, टँकर तसेच बैलगाडीने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विहीर खोल करणे, गाळ काढण्याच्या कामांसाठी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय गावे

जिल्हा............................. गावे............... अपेक्षित खर्च

औरंगाबाद.......................८४३....................१५७०.८०

जालना............................अप्राप्त.....................अप्राप्त

बीड.................................७७४.....................११४८.३८

परभणी.............................९७५.......................११५८.६८

हिंगोली..............................६६०.......................५०९.५६

नांदेड...............................१०३८......................१५३३.८२

उस्मानाबाद........................४४६........................३६७.४९

लातूर.................................५६६.......................४५९.००

-------------------------------------------------------.

एकुण...............................५११८..........................६७४७.७३

(रक्कम लाखात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images