Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पालिका सभेत ‘डीपीआर’ मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

७३ कोटी ३६ लाख ९४ हजार रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. हा अहवाल शासनाच्या मंजुरीच्या आधीन राहून मंजूर केला जात असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केले. या ७३ कोटींपैकी ३० कोटी रुपयांचा स्वत:चा हिस्सा पालिकेला द्यावा लागणार आहे. त्यामुळे तीस कोटीं कोठून उभे करायचे, असा प्रश्न प्रस्ताव मंजूर करतानाच निर्माण झाला आहे.

शहरात दररोज जमा होणारा कचरा व नारेगाव कचरा डेपोत साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठीचा प्रकल्प यासाठीचा डीपीआर राज्य शासनाने निवड केलेल्या इंदूर येथील इको प्रो इनव्हारमेंटल चेंबर्स या कंपनीकडून पालिकेने करून घेतला आहे. या अहवालाचे सादरीकरण कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वसाधारण सभेत केले. हा अहवाला पुढील दहा वर्षांचा विचार करून तयार करण्यात आलेला आहे. हा डीपीआर कंपनीतर्फे यापूर्वीच राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटींची पुर्तता करून ९ मार्च रोजी तो पुन्हा सादर करायचा आहे. प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर तो राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर तो केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यावर राज्य शासन निधीतील स्वत:च्या वाटा पालिकेकडे वर्ग करेल. त्यानंतर केंद्र सरकारचा निधी प्राप्त होणार आहे. त्यात पालिकेला तीस कोटी रुपयांचा वाटा टाकावा लागणार आहे.

'तीस कोटी रुपयांचा हिस्सा पालिकेसाठी खूप मोठा असून त्यात काही सुट मिळेल का,' अशी विचारणा महापौर घोडेले यांनी कंपनीच्या प्रतिनिधींकडे केली. 'शासनाकडे महापालिकेने तशी मागणी केली तर सुट मिळेल, तसा प्रयत्न पालिकेने करावा किंवा स्मार्ट सिटी प्रकल्पाचा निधी यासाठी वळवावा,' अशी सूचना कंपनीच्या प्रतिनिधींनी केली.

\Bअसा आहे 'डीपीआर' \B

वाहन खरेदी २२ कोटी

नारेगाव कचरा डेपोतील कचऱ्यावर प्रक्रिया २३ कोटी

दररोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया २८ कोटी

'डीपीआर'नुसार काम पूर्ण करण्याची मुदत १२ महिने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धनादेश न वटल्याने तीन महिने शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

धनादेश न वटल्याप्रकरणी येथील मिल्लतनगर भागातील समीर गफ्फार शेख यास प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. आर. जांभुळे यांनी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.

समीर याने छोट्या व्यापारासाठी अल्ताफ बशीर शेख या व्यापाऱ्याकडून घरगुती साहित्य खरेदी केले होते, पण या साहित्याची किंमत अडीच लाख रुपये देण्यास समीर चालढकलपणा करत होता. त्यानंतर अल्ताफ शेख यांनी समीर याने दिलेला धनादेश बँकेत भरला, पण तो वटला नाही. त्यामुळे अल्ताफ शेख यांनी वकिलांमार्फत समीर याला नोटीस पाठवली, मात्र त्याचा कुठलाही परिणाम न झाल्याने त्याच्याविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्यात आली. सुनावणीच्या वेळी कागदपत्रे व साक्षीदारांची साक्ष तपासल्यानंतर समीर गफ्फार शेख यांच्याविरुद्वचा गुन्हा सिद्व झाल्याने प्रथम वर्ग न्यायाधिश व्ही. आर. जांभुळे यांनी समीर गफ्फार शेख यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली; तसेच अल्ताफ शेख यांना तीन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाई न दिल्यास आणखी एक महिना शिक्षा भोगावी लागेल असे न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारदाराची बाजू अॅड. राफे हसन पीरजादा यांनी मांडली. त्यांना अॅड. जावेद नबाब बेग यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी खून प्रकरण: आरोपीच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणीतील जमीन व्यावसायिक हुसेनखान उर्फ शेरखान अलियारखान यांच्या खून प्रकरणातील आरोपी शेख सरताज उर्फ अज्जीदादा शेख नसीर (५५, रा. युनूस कॉलनी, कटकटगेट, औरंगाबाद) याच्या पोलिस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत (१२ मार्च) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी गुरुवारी (आठ मार्च) दिले.

आरोपी अज्जीदादा याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींनी खून करण्यासाठी कोणते हत्यार, कोणते वाहन वापरले व कुठे-कुठे लपवले, याचा शोध घेणे तसेच फरार आरोपी शेख बशीर उर्फ बोचरा मुन्ना शेख करीम याला अटक करणे बाकी आहे. त्याचवेळी सीडीआर रेकॉर्डची तपासणी करणेही बाकी आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन मालकासोबत खासदारांची खलबते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण शहर कचऱ्याच्या समस्येने त्रस्त असताना खासदार चंद्रकांत खैरे मात्र महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह महापौर बंगल्यावर एका जमीन मालकासोबत खलबते करण्यात व्यस्त होते. ही खलबते गुरुवारी सुमारे तीन तास सुरू होती.

खदानी पाहण्यासाठी जायचे असल्याने खासदार चंद्रकांत खैरे हे सकाळी अकरा वाजता महापौर बंगल्यात दाखल झाले. त्यांच्यासोबत आमदार संजय शिरसाट, महापालिकेचे पदाधिकारी व काही नगरसेवक होते. यावेळी आयुक्त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली उपस्थित होते. यावेळी एक बडा जमीन मालक चर्चा करण्यासाठी आला होता. त्या जमीन मालकाने औरंगाबाद महापालिकेत रस्त्यांची अनेक कामे केली आहेत. कचरा टाकण्यासाठी आपली जमीन खरेदी करा, असा त्याचा प्रस्ताव आहे, त्याशिवाय ते काही खदानींशी देखील संबंधित आहेत. जमीन खरेदी करणे शक्य नसेल तर खदान तरी घ्या, असा त्याचा आग्रह होता. सुरुवातीला महापौर बंगल्याच्या मुख्य हॉलमध्ये ही चर्चा सुरू होती, पण गर्दी वाढत असल्याने खैरे त्या जमीन मालकासह आतील खोलीत गेले. सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत ही चर्चा सुरू होती. या चर्चेतून आयुक्त मुगळीकरांना दूर ठेवण्यात आले. त्याचवेळी शहर अभियंता सखाराम पानझडे व कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना 'चर्चेत' सहभागी करून घेतले जात होते. त्याचवेळी सावंगी नाका येथे महसूल व पोलिसांचे पथक ताटकळले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकिटाचा पत्ता नाही; दौरे मात्र जोमाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणूक केव्हा होणार, हे अद्याप स्पष्ट नसतानाच भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये मात्र उमेदवारावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी मशागत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले, तर तिकिटाचा पत्ता नसतानाच या नेत्यांनी जिल्ह्यात दौरे सुरू केल्याने कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.

युतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खेचून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव, उत्तरप्रदेशचे मंत्री महेंद्र सिंह यांनी दोन वेळा बैठका घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामालाही लावले आहे. एकीकडे पक्ष पातळीवर काम सुरू असतानाच प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर दिल्यानंतर त्यांनी चार मार्चपासून मतदारसंघात खास दौरे सुरू केले आहेत. २१ ऑक्टोबरपर्यंत ९११ गावांचा दौरा पूर्ण करण्याचे त्यांचे नियोजन आहे. गायकवाड जय्यत तयारी करत असतानाच प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कराड यांनीही जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यावर भर दिला आहे. कन्नड, वैजापूरसह अनेक गावांत आयोजित कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती वाढली आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयातही कार्यकर्त्यांची उठ-बस वाढल्याचे चित्र आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दोन्ही नेते उघडपणे बोलत नसले, तरी त्यांची इच्छा लपून मात्र राहिली नाही.

यांचीही नावे चर्चेत

लोकसभा निवडणूकीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब यांची नावे चर्चेत आहेत, पण जिल्हा दौरा गायकवाड व कराड यांचाच सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने निश्चित तयारी सुरू केली आहे. जिल्हाचा प्रभारी म्हणून जिल्ह्यात पक्षीय कामानिमित्त जावेच लागते.

- डॉ. भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष

लोकसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने मशागत सुरू केली आहे. मी ९११ गावाचा दौरा ऑक्टोबरअखेर पूर्ण करणार आहे.

- जयसिंगराव गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपीप्रकरणी ३८ जणांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर झाला. इंग्रजीच्या पेपरला विविध जिल्ह्यांमध्ये भरारी पथकाला ३८ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. दहावी परीक्षेत आजपर्यंत कॉपी प्रकरणी एकूण ६६ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये कॉप्या रोखण्यात परीक्षा मंडळाला अपयश आले आहे. अनेक केंद्रावर सर्रास कॉपी करताना विद्यार्थी आढळत आहेत, तर काही ठिकाणी शिक्षकच विद्यार्थ्यांना उत्तरे सांगत असल्याचे चित्र होते. कॉपीमुक्त परीक्षा अभियान मोडित निघाल्याचे कॉपी प्रकरणांवरून समोर आले आहे. मंडळाने परीक्षेसाठी २८ भरारी पथक तयार केले आहेत. या पथकाने विविध जिल्ह्यांमध्ये कॉपी प्रकरणांमध्ये कारवाई केलेला आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे. गुरुवारी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये कॉपी करताना ३८ विद्यार्थी भरारी पथकाला आढळले. त्यामध्ये सर्वाधिक हे परभणी जिल्ह्यातील २६ एवढे आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात आठ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. जालना तीन व हिंगोलीत एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू झाली आहे. आजपर्यंत दहावीच्या परीक्षेत एकूण ६६ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, बारावी परीक्षेत कॉपी प्रकरणांने दोनशेचा पल्ला गाठला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाराशे जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराप्रश्नी बुधवारी झालेल्या आंदोलनात नागरिकांनी पडेगाव, मिटमिटा भागात पोलिसांवर दगडफेक केली. कचऱ्याच्या गाड्या जाळल्या. याप्रकरणी तब्बल बाराशे आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी, तर तीनशे जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी धरपकड करत दगडफेक करणाऱ्या २७ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी छावणीचे पीएसआय सचिन मिरधे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाराशे अनोळखी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगल करणे, दगडफेक करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये २४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच महापालिकेचे उपअभियंता देविदास पंडित यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीनशे अनोळखी आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, रस्ता अडवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी पडेगाव मिटमिटा भागात नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.

राजकीय हात असल्यास कारवाई: पोलिस आयुक्त

'पोलिसांनी बुधवारी संयमाने परिस्थिती हाताळली. दगडफेकीच्या प्रकरणातील सत्तावीस आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींची ओळख पटवून शोध घेणे सुरू आहे. या दगडफेकीमागे राजकीय व्यक्तीचा हात असल्यास सबंधित व्यक्तीवर देखील कारवाई करण्यात येणार आहे,' अशी माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळफास घेऊन तरुणाची आत्म्हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी राजनगर भागात २४ वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला. रेवणनाथ लक्ष्मण गंगाधर असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेवणनाथ बुधवारी सायंकाळी दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये गेला होता. त्याच्या नातेवाईकाने काही वेळाने त्याच्या खोलीमध्ये जाऊन पाहिले असता त्याने साडीने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. रेवणनाथला घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्भवती हरिणीचे शिकारी गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा येथून मादी गर्भवती हरीण पकडून आणत घरातील मोरीमध्ये ते कापताना दोघाना सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. नारेगाव माणिकनगर गल्ली क्रमांक आठ येथे गुरुवारी सकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन भावांना अटक करण्यात आली असून, मृत हरिणीचे अवशेष व मृत पाडस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात शिकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना सकाळी सात वाजता खबऱ्याने माणिकनगर भागात चांदभाई यांच्या घरात हरीण कापण्यात येत असल्याची माहिती दिली होती. या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने चांदभाई यांचे घर गाठून छापा टाकला. यावेळी घरातील मोरीमध्ये चाकूने दोनजण हरीण कापत असल्याचे दिसून आले. हे मादी हरीण असून, त्याच्या पोटातील पाडस देखील मृत झाले होते. पोलिसांनी हरीणीची शिकार करणारे शेख आसीफ शेख चांद (वय २१) व शेख साजीद शेख चांद (वय २०) या दोघांना अटक केली. शेंद्रा येथे आपल्याला ते हरीण सापडले असून, आसीफच्या रिक्षातून त्याला घरी आणल्याची माहिती या दोघांनी दिली. त्यांच्या ताब्यातून हरिणीचे अवशेष, धारदार चाकू व रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सीताराम केदारे. गाडगे, वाघ, सोनूने व साबळे यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खदानी पाहणी : खासदारांच्या ताफ्याला पिटाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचरा टाकण्यासाठी खदानी पाहण्यास गेलेल्या खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले. 'तुमच्या कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा, आमच्या शिवारात कचरा आणू नका,' अशी भूमिका घेत गावकऱ्यांनी या नेते व अधिकाऱ्यांना सुनावले. सावंगी टोलनाका व देवळाई तांड्यांजवळून या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या ताफ्याला माघारी फिरावे लागले.

शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्पुरत्या स्वरुपात खदानींचा वापर कचऱ्यासाठी करता येईल, असे शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळात खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट यांचा समावेश होता. खदानींच्या वापराबद्दल मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे ठाकरे यांनी खासदार खैरे व आमदार शिरसाट यांना खदानीची पाहणी करण्यासाठी औरंगाबादला पाठवले. त्यानुसार खासदारांनी गुरुवारी काही खदानींची पाहणी केली. यावेळी त्यांच्या बरोबर शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली आदी उपस्थित होते.

जळगाव रोडवरील सावंगी टोल नाक्याजवळ शासनाच्या चार खदानींची पाहणी करण्यासाठी खासदार खैरे यांच्यासह ताफा दाखल झाला. खासदार येत असल्याची माहिती समजल्यामुळे गावकऱ्यांनी खदानीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ट्रॅक्टर उभे रस्ता बंद केला. शिवाय रस्त्यावर मोठे दगड आणि काटे टाकले होते. त्यामुळे खासदार खैरे व आयुक्त मुगळीकरांना मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करावी लागली. मुख्य रस्त्यावर वाहने उभी करून खदानीकडे जाताना गावकऱ्यांनी सर्वांना अडवून खदानीमध्ये कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका घेतली. काही महिन्यांसाठी कचरा टाकू द्या, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र आम्ही लावणार आहोत, यंत्र लावल्यानंतर तुम्हाला कचऱ्याचा त्रास होणार नाही, असे सांगत खासदार खैरे व महापौर घोडेले यांनी गावकऱ्यांना पटवण्याचा प्रयत्न केला. पण, गावकऱ्यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही, 'तुमचा कचरा तुम्हीच सांभाळा, आमच्याकडे तो आणू नका,' असे ठणकावले खासदारांना माघारी फिरावे लागले. रस्ता बंद केल्याने खदानीपर्यंत जाता आले नसल्याने आयुक्तांनी वाहने स्टेपिंग स्टोन शाळेत नेली. शाळेच्या परिसरातून खदान जवळ असून नेहमीचा रस्ता गावकरी वापरू देत नसतील, तर शाळेजवळून नवीन रस्ता तयार करण्याचा पर्याय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचवला.

गोल्फ कोर्टाची जमीन

खासदारांनी जटवाडा रोडवरील गोल्फ कोर्टच्या जागेची पाहणी केली. शासनाने एमटीडीसीला गोल्फ कोर्टसाठी ७५ एकर जागा दिली आहे. पण, गेल्या दहा वर्षांत या जागेवर एमटीडीसीने काहीच काम केले नाही. त्यामुळे ही जागा पालिकेला मिळावी अशी भूमिका खैरे यांनी मांडली असून त्या संदर्भात एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

देवळाई तांड्यात विरोध

देवळाई तांडा येथील साई टेकडीकडे जाताना उजव्या बाजुला खदान आहे. येथे पाहणी करताना ती खासगी असल्याचे स्पष्ट झाले. ती खासगी असली तरी काही हरकत नसून या खदानीचा विचार करता येईल, असे मत यावेळी व्यक्त झाले. पण, देवळाई तांड्यांच्या नागरिकांनी खासदारांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोध केल्याने तेथूनही माघार घ्यावी लागली.

जमीन खरेदीचा प्रस्ताव

दोन ठिकाणी विरोध झाल्याने खासदार खैरे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी महापौर बंगल्याकडे रवाना झाले. आयुक्त मुगळीकर, शहर अभियंता पानझडे व कार्यकारी अभियंता सिकंदर अली हे सातारा तांडा डोंगरावरील करीम पटेल यांच्यासोबत जमीन पाहण्यासाठी रवाना झाले. येथे शंभर एकर खासगी जमीन असून ती खरेदी करून कचरा डेपोसह प्रक्रिया प्रकल्प उभारावा, असा प्रस्ताव पटेल यांच्यामार्फत पालिकेला देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवणार

महापालिका आयुक्त हे खदानी पाहणीचा अहवाल विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सायंकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. या अहवालाची एक प्रत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे. येत्या एक, दोन दिवसात कचऱ्याचा प्रश्न सुटेल, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिटमिटाप्रकरण; २६ आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याच्या प्रश्नावरून बुधवारी मिटमिटा येथे झालेल्या हिंसक प्रकारातील २६ जणांना अटक करुन गुरुवारी (८ मार्च) कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना सोमवारपर्यंत (१२ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले.

या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अरुण आसाराम बानुसे (३५, चालक), महेश रंगनाथ साबळे (२१, शिक्षण), ज्ञानेश्वर बबनराव साबळे (२७, चालक), आदित्य ज्ञानेश्वर कदम (१९, शिक्षण), राहूल नारायण अल्हाड (२०, शिक्षण), रमेश आसाराम मुळे (४३, शेती), सुभाष बबनराव बिडे (३३, किराणाचालक), सचिन मारुती सोमदे (२१, चालक), देविदास साहेबराव साबळे (३१, मजुरी), सय्यद अजब सय्यद अजीज (२२, चालक), एकनाथ दशरथ मुळे (३५, शेती), सचिन नारायण आल्हाट (२२, शेती), उमेश विश्वनाथ चव्हाण (३७, इलेक्ट्रिकल्स), यसय्यद इब्राहिम सय्यद इब्राहिम (२४, गुराखी), सय्यद सयदुसय्यद अब्दुल (४५, शेती), गणी भाई बशीर पठाण (२५, शेती), गणेश अंबादास सालोदे (३८, इलेक्ट्रिकल्स), विष्णू कल्याणराव मुळे (३०, शेती), भिकाजी पुंजाजी खोतकर (६०, शेती), प्रद्युम्न श्रीपाद जोशी (१८, शिक्षण), लक्ष्मण मुरलीधर कापसे (३९, शेती), ऋषीकेश दगडू मुळे (२१, शिक्षण), सुकेश चंद्रकांत लखपती (१८, खासगी नोकरी, सर्व रा. मिटमिटा) या २३ जणांविरुद्ध एका गुन्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पोलिस ठाण्यात दाखल दुसऱ्या गुन्ह्यात गणेश जगन्नाथ जाधव (३६, शेती, रा. मिटमिटा), गमेश दामोदर भवर (३१, चालक, रा. फारोळा, ता. पैठण. जि. औरंगाबाद) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील २३ आरोपींविरुद्ध कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३३३, ३४१, ४३५, ४३६, ३५३, ४२७ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसानीच्या कायद्यान्वये, तर इतर ३ आरोपींविरुद्ध ३५३, १४३, १४९, ३३२, ३४१, ४२७, ४३५, ५०४ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसानीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.

अनेकांना जखमी केल्याची फिर्याद

फिर्यादीनुसार, महापालिकेने भाडेतत्वावर घेतलेली दहा वाहने अप्पावाडी येथे सात मार्च रोजी शहरातील कचरा टाकण्यासाठी आल्या असता, आरोपींनी त्याला विरोध केला, दगडफेक केली. यात अनेक पोलिस व इतर कर्मचारी जखमी झाले. आरोपींविरुद्ध बळाचा वापर करण्यात आला असता, आरोपींनी महापालिकेसह एसआरपी व शहर पोलिसांच्या सहा वाहनांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, सर्व २६ जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटकेच्या भीतीने पुरूष परागंदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस व महापालिकेच्या निषेधार्थ पडेगाव, मिटमिटा भागात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यासोबत धरणे आंदोलनही करण्यात आले. पोलिसांनी रात्री केलेल्या धरपकडीमुळे या भागात प्रचंड भितीचे वातावरण असून त्यांच्या अटकेच्या भीतीने पुरुष मंडळी परागंदा झाली आहेत.

कचऱ्याची वाहने अडवल्याने पडेगाव व मिटमिटा भागात बुधवारी नागरिक व पोलिसांत जोरदार धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी बळाचा वापर करत नागरिकांना पांगवले. त्यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याने रात्रीतून धरपकड करताना पोलिसांनी घरात घुसून मारहाण केली, साहित्याची तोडफोड केल्याचा आरोप नागरिकांनी केला. याच्या निषेधार्ध या व्यापाऱ्यांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळून निषेध केला. बंदमुळे या भागात अघोषित संचारबंदीसारखे वातावरण दिसले. दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

अटकेची भीती

पोलिस मारहाण करत अनेकांना ताब्यात घेत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पडेगाव, मिटमिटा भागातील अनेक घरातील पुरुष व तरुण अटकेच्या भीतीने पसार झाली असून घरांमध्ये फक्त महिला आहेत.

तीसगाव चौफुलीवर जमाव

तीसगाव परिसरातील खदानीमध्ये कचरा टाकणार असल्याची माहिती समजल्याने गुरुवारी सकाळी तीसगाव परिसरातील महिला व पुरुषांनी तीसगाव चौफुली ठाण मांडले. यामुळे या भागातील तणाव होता. ही परिस्थिती दुपारनंतर निवळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हैदराबादी बिर्याणी महोत्सव बुधवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरवर्षीप्रमाणे एम.जी.एम. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीतर्फे १४ ते १८ मार्च या कालावधीत हैदराबादी बिर्याणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या संचालिका हर्षा पोलकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सॉल्ट हॉटेल येथे होणाऱ्या या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, विविध प्रकारच्या बिर्याणी तयार करण्यासाठी खास हैदराबादहून शेफ येणार आहेत. महोत्सवामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी खाद्याचा आस्वाद खवय्यांना आस्वात घेता येणार आहे. महोत्सवामध्ये हैदराबादी वस्तूंचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. त्यात बांगड्या, हैदराबादी अलंकार, मेहंदी, अत्तर आदींचा समावेश आहे.

खाद्य महोत्सवात हैदराबादी संस्कृती आणि आठ प्रकारच्या पारंपारिक बिर्याणीची अस्सल चव चाखायला मिळणार आहे. हा संपूर्ण महोत्सव विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आला आहे. हैदराबादला न जाता औरंगाबादकरांना आता एमजीएम परिसरातच हैदराबादची अनुभूती मिळणार आहे. परिसरात असलेल्या जलतरण तलावाशेजारी संस्थेच्या वतीने हैदराबादी कव्वाली, नृत्याचाही आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोलकम यांनी केले. पत्रकार परिषदेसाठी रुपेश भाावसार, कपिलेश मंगल, पुष्पा गोरे, प्राणेश झोटे, निलेश वाघमारे, श्रेया शेट्टी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिणीची शिकार; दोघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नारेगावातील घराच्या मोरीमध्ये गर्भवती हरिणीची व तिच्या पोटातील पाडसाची कत्तल करणाऱ्या दोघा भावांना सोमवारपर्यंत (१२ मार्च) पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सीताराम भगवंता केदारे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नारेगावातील चाँद भाई (रा. माणिक नगर, गल्ली क्रमांक ८, नारेगाव) याच्या घरात हरिणीची कत्तल केली जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन ८ मार्च रोजी सकाळी छापा मारला असता, घरातील मोरीमध्ये हरिणीची व तिच्या पाडसाची कत्तल केल्याचे दिसून आले. या प्रकरणी आरोपी शेख आसिफ शेख चाँद (२१) व आरोपी शेख साजीद शेख चाँद (२०, दोघे रा. माणिकनगर, गल्ली क्रमांक आठ, नारेगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलम ५१, ४८ (अ) अन्वये एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सात दिवस कोठडीची मागणी

आरोपींनी शिकारीसाठी काही साधनांचा वापर केला का, आरोपींनी यापूर्वी काही वन्य प्राण्यांची शिकार केली आहे का, आरोपी कोणाला मांस विक्री करणार होते व आतापर्यंत त्यांनी कोणाला मांस विक्री केली आहे का आणि आरोपींचे कोणी साथीदार आहेत का, आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. डी. वरपे यांनी कोर्टात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका बरखास्तीसाठी काँग्रेस रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा कचराप्रश्न गेल्या बावीस दिवसांपासून धुमसत असून पोलिसांनी मिटमिटा येथे आंदोलकांवर लाठीहल्ला केला. महापालिकेचे कारभारी हतबल झाले आहेत. या स्थितीत नागरिकांच्या जीवाशी खेळणारी महापालिका पालिका बरखास्त करावी, अशी मागणी करत काँग्रेसने शुक्रवारी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने केली. आंदोलकांनी अचानकपणे रास्ता रोको आंदोलनही केले.

शहरातील कचराप्रश्न तीन आठवड्यांपासून धुमसत आहे. नारेगाव, पडेगाव, मिटमिटा यासह शहरालगतच्या जागांवर कचरा टाकण्याचा पर्याय चाचपूनही महापालिका अपयशी ठरली आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. या आंदोलनवेळी शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, बाबा तायडे, सरोज मसलगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. निदर्शनानंतर आंदोलक अचानक रस्त्यावर उतरले आणि रास्ता रोको केल्याने वाहतूककोंडी झाली. आंदोलनस्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात असूनही हा रास्ता रोको सुमारे २० मिनिटे सुरू होता. यावेळी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, सायली जमादार, डॉ. जितेंद्र देहाडे, बबन डिडोरे, अनिता मंत्री, अनिता भंडारी, रॉबिन बत्तीसे, हरचरणसिंग गुलाटी, अविनाश काळे, अशोक चक्रे, माजी नगरसेवक रेखा जैस्वाल यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना-भाजप युती अपयशी

मागील २५ वर्षांपासून औरंगाबाद महापालिका शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात असून त्यांना कचऱ्याचा प्रश्न सोडविता आला नाही. केंद्र, राज्य आणि पालिकेतही युतीचेच सरकार असूनही औरंगाबादचे नागरिक त्रस्त आहेत. याची जबाबदारी घेऊन महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीडशे ट्रकमधील कचरा टाकायचा कोठे ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नारेगाव, मिटमिटा व पडेगाव या परिसरातील जागांवर कचरा टाकायचा नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यामुळे महापालिकेची कोंडी झाली आहे. कचऱ्याने भरलेल्या सुमारे दीडशे ट्रक आयुक्तांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत. खदानींमध्येही कचरा टाकण्यास विरोध होत असल्यामुळे हा कचरा कोठे टाकायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील कचराकोंडी शुक्रवारी बावीसव्या दिवशीही कायम आहे. या बावीस दिवसांत कचऱ्याची विल्हेवाट लावणे पालिकेला शक्य झाले नाही. त्यामुळे रस्त्यांशेजारी, चौका-चौकात, दुभाजकांमध्ये कचरा साचला आहे. याशिवाय पालिकेच्या सुमारे दीडशे वाहनांमध्ये कचरा भरून ठेवलेला आहे. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यासोबतच या वाहनांमधील कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे.

कचऱ्याने भरलेली वाहने पडेगाव, मिटमिटा भागात रिक्त करण्याची योजना पालिका प्रशासनाने आखली होती. संधी मिळेल त्यानुसार त्या रिकाम्या करण्यात येणार होत्या. परंतु ही योजना प्रशासनाने बाजुला ठेवली आहे. कचऱ्याने भरलेली काही वाहने मध्यवर्ती जकात नाका व काही वाहने ठिकठिकाणी मोकळ्या जागांवर उभ्या केल्या आहेत.

\Bकचरा वाहनातच राहणार \B

साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने पडेगाव, मिटमिटा व नारेगावचे रस्ते कचऱ्यासाठी बंद केल्याने पर्यायी जागा मिळेपर्यंत आहे त्याच स्थितीत कचरा ठेवावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यपालांनी साधला विद्यापीठांशी संवाद

$
0
0

औरंगाबाद : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यभरातील विद्यापीठांशी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. विद्यापीठाची धोरणे आणि वाटचाल यावर त्यांनी काही सूचना केल्या. या चर्चेत शिक्षण सहसंचालक डॉ. धनंजय माने, सचिव सिताराम कुंटे सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरु डॉ.अशोक तेजनकर आणि कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी संवाद साधला. प्रत्येक विद्यापीठाला काही योजना राबवण्याबाबत राज्यपलांनी विशेष सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीर सावरकर पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न

$
0
0

औरंगाबाद:

देशभरात सुरू असलेल्या पुतळा विटंबनाच्या घटनांचे लोण औरंगाबादपर्यंत पोहोचले आहेत. समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला काल, शुक्रवारी रात्री अज्ञातांनी डांबर लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. त्यामुळं परिसरात तणाव निर्माण झाला होता. अग्निशमन दलाला पाचारण करून पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली.

या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासाठी शिवसेना, भाजप आणि ब्राह्मण समन्वय समितीच्या वतीने रास्ता-रोकोही करण्यात आला. भाजपचे आमदार अतुल सावे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, राजू वैद्य, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, भाऊ सुरडकर, आशिष सुरडकर, लक्ष्मीकांत थेटे हेही घटनास्थळी दाखल झाले. समाजकंटकांना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. आरोपीला अटक करा; अन्यथा शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलिसांची जबाबदारी असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शहरातील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडला. महापौर नंदकुमार घोडेले यांनीही घटनास्थळी भेट दिली. सध्या समर्थ नगर भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगर चौकातील स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या पुतळ्यावर डांबर, काळे ऑइल ओतून शनिवारी पहाटे समाजकंटकांनी विद्रुपीकरण केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

सावरकरांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण झाल्याचे समजताच भारतीय जनता पक्ष तसेच ब्राह्मण महासभेचे कार्यकर्ते चौकात जमा झाले. त्यांनी घोषणा बाजी सुरू केली. रास्ता रोको करून घटनेचा निषेध केला. त्यामुळे उपायुक्त विनायक ढाकणेंसह अन्य पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. घटनास्थळी ब्राह्मणवादाला विरोध करणारी पत्रके पुतळ्याजवळ भिरकावलेली सापडली. सावरकरांचा पुतळा धुवून दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर सावरकर मित्र मंडळाने पुतळा फुलांच्या माळांनी सजवला. यावेळी आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक समीर राजूरकर, पृथ्वीराज पवार, नगरसेवक राजू वैद्य, सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, माजी नगरसेवक समीर राजूरकर, आनंद तांदुळवाडीकर, गोपाळ कुलकर्णी, अनिल मकरिये, महेंद्र शिंदे, सुरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

---

सेफ सिटी प्रकल्प कुठे?

---

सेफ सिटीसाठी इतका निधी घेता. त्याचे काय करता. सीसीटीव्ही कॅमेरे का सुरू नाहीत. पोलिस कंट्रोल रूमसमोर आणि शहरात मध्यवर्ती ठिकाणी अशी घटना घडते याला जबाबदार कोण, अशी प्रश्नांची सरबत्ती कार्यकर्त्यांनी पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांना केली. त्यांना या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता अली नाहीत. संतप्त खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना महापुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहिणींची छेड काढणाऱ्यांकडून धमक्या

$
0
0

वाळूज महानगर: बहिणींचा छेड काढणाऱ्यांकडून धमक्या येत असल्याने तणावाखाली असलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी सात वाजता उघडकीस आले. आशिष धोंडीराम चोपडे (रा. गल्ली नं. १ देवगिरी कॉलनी, दत्तनगर, रांजणगाव शेणपुंजी), असे या तरुणाचे नाव आहे. तो एका कंपनीत हेल्पर होता. त्याने क्लिप्टन वाइन शॉपच्या मागील रिकाम्या जागेवरील झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली.

मृत आशिषला दोन बहिणी असून त्यांना घराशेजारील बाळू भालेराव व अमोल भालेराव त्रास देत असल्याने याचा जाब विचारला होता. त्यावेळी त्याला भालेराव व त्यांचे साथीदार विजय कोळसे, राजू तुपे, वाकोडे यांनी, तू कसा कामावर जातो ते बघतो तसेच तुझे हात पाय तोडू, अशी धमकी दिली होती. यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी भालेराव व त्यांच्या साथीदाराने आशिषला दारू पिऊन मारहाण केल्याची माहिती त्याने वडिलांना दिली होती. मात्र त्यांच्या दहशतीमुळे मारहाणीची तक्रार पोलिसांत देण्याचे टाळले होते. यामुळे त्यांची हिम्मत वाढल्याने त्यानी मुलीना जास्त त्रास देण्यास सुरूवात केली होती. या प्रकारामुळे आशिष तणावात राहत होता. तसेच निराश झाल्याने तो घरातही कोणासोबतही बोलत नव्हता, असे त्याच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक आरती जाधव या करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images