Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पालिकेचा महावितरणला शॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणने भूमिगत केबलचे काम ३१ मार्चपर्यंत सुरू न केल्यास या कामासाठी मंजूर झालेला २४ कोटी २५ लाखांचा निधी वापस जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने खड्ड्यांच्या देखरेख दरात वाढ केल्यामुळे हे संकट ओढावले आहे.

शहरातील वीजेच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतंर्गत १०१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून शहरात ५६ किलोमीटर ओव्हर हेड वायरिंग अंडरग्रांऊड केबल टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यासाठी २४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला. महावितरणने भूमिगत केबलचे खड्डे खोदण्यासाठी महापालिकेकडून दरपत्रक मागविले होते. मात्र, पालिकेचे महागडे दर पाहून ते कमी करण्याची मागणी केली. याबाबत जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत महापौरांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. या चर्चेत कोणताही मार्ग निघाला नाही. हे काम मार्चपूर्वी सुरू करण्यासाठी महावितरणने महापालिकेचा प्रती मीटरमागे २२०० रुपये, असा खड्डे खोदण्याचा प्रस्ताव मान्य केला. बुधवारी महावितरणचे अधिकारी खड्ड्याबाबतचे कोटेशन घेण्यासाठी गेले असता, त्यावर ३०० रुपये देखरेख दर वाढवून देण्यात आला. त्यामुळे महावितरण कार्यालयाला ५६ किलोमीटर खड्डे करण्यासाठी आता नवीन प्रस्तावामुळे बाराऐवजी चौदा कोटी खर्च करावे लागणार आहेत. देखरेख दरामुळे दोन कोटी वाढल्याने महावितरणचे आर्थिक गणित कोलमडले असून, मार्चपर्यंत हे काम सुरू न झाल्यास हा निधी सरकार दरबारी जमा होणार आहे.

महापालिकेने ऐनवेळी खड्डयाच्या प्रस्तावावर देखरेख दर वाढविले आहेत. याबाबत चर्चा सुरू आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर भूमिगत केबल टाकण्याचा प्रस्ताव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

- दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता, औरंगाबाद

अशी होणार कामे

- नवीन वीज उपकेंद्र बांधणे

- रोहित्रांची क्षमता वाढविणे

- अतिरिक्त रोहित्र वाढविणे

- उच्च वाहिनीत वाढ करणे

- नवीन रोहित्र बसविणे

- रोहित्रांची क्षमतावाढ करणे

- सोलार पॅनल वाढविणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीतच मिळणार ‘युडीआयडी’ कार्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) बाह्य रुग्ण विभागामध्ये (ओपीडी) शनिवारपासून (१७ मार्च) वैश्विक अपंगत्व कार्ड (युडीआयडी) मिळणार आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत आयोजित छोटेखानी कार्यक्रमात या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. हे युनिक कार्ड कोणत्या संस्थेने वाटप करायचे, यावरुन घाटी तसेच आरोग्य विभागामध्ये पूर्वी टोलवाटोलवी झाली होती व अपंगांकडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

राष्ट्रीयस्तरावर सर्व प्रकारच्या अपंगांसाठी युडीआयडी कार्ड उपलब्ध केले जात असून, याच कार्डाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ अपंगांना मिळणार आहे. यापूर्वी राज्या-राज्यामध्ये अपंगांना वेगवेगळ्या माध्यमातून सेवा-सुविधा उपलब्ध होत होत्या. आता राष्ट्रीय स्तरावर एक समान पद्धतीने या सुविधा मिळणार आहेत. आता देशाच्या कोणत्याही भागातील अपंगाला एकाच युडीआयडी कार्डाद्वारे सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा घेता येतील. ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करावी, अशी मागणी अपंगांच्या वतीने वारंवार करण्यात आली होती. त्यासाठी संघटनांच्या माध्यमातूनही पाठपुरावा करण्यात आला होता. या कार्डचे वाटप कोणत्या शासकीय संस्थेने कराने, यावरुनही काही काळ पेटला होता. त्यानंतर मात्र या कार्डांचे वाटप घाटीमार्फत करण्याचे निश्चित झाले व शनिवारी या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

अन्न वाटपासाठी मिळाली रिक्षा

घाटीतील रुग्णांना अन्न वाटपासाठी एकदाची नवीन रिक्षा मिळाली असून, आमदार इम्तियाज जलील यांच्या आमदार निधीतून ही रिक्षा घाटीला प्राप्त झाली आहे. त्यामुळे ३५ वर्षांपूर्वीच्या जर्जर झालेल्या रिक्षातून होणारे अन्न वाटप एकदाचे बंद होणार आहे. या रिक्षाचे उद्घाटनही शनिवारी आमदार जलील यांच्या हस्ते होणार आहे.

'सेंट्रल लॅब'ला लागणार मुहूर्त?

घाटीच्या बाह्य रुग्ण विभागात पॅथॉलॉजी, बायोकेमेस्ट्री व मायक्रोबायोलॉजी या तिन्ही विषयांची एकाच छताखाली प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, उशिरा का होईना प्रयोगशाळेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचवेळी 'एचएमआयएस'शी प्रयोगशाळेला जोडण्याचे कामही पूर्ण झाले असून, या प्रयोगशाळेचे उद्घाटनही शनिवारी होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ही प्रयोगशाळा पेपरलेस असणार असून, सर्व रिपोर्ट हे त्या त्या विभागातील डॉक्टरांना ऑनलाईन उपलब्ध होणार असून, रुग्णांना रिपोर्ट देण्याची गरज राहणार नाही. परिणामी, कागदाची मोठी बचत होऊन संबंधित प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक रिपोर्ट रुग्णाचा विशिष्ट क्रमांक टाकताच उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहिजे तेव्हा एका क्लिकद्वारे उपलब्ध होणार आहे.

अपंगांच्या युडीआयडी कार्डचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शनिवारपासून सुरू होईल. तसेच आमदार जलील यांच्या हस्ते अन्न वाटपासाठी मिळालेल्या रिक्षाचे उद्घाटनही आमदारांचे हस्ते होणार आहे. 'सेंट्रल लॅब'चे काम पूर्ण झाले असून, शक्य झाल्यास 'सेंट्रल लॅब'चे उद्घाटनही याच दिवशी करण्याचा प्रयत्न असेल.

- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षण: सराटेंना काळं फासलं

$
0
0

औरंगाबाद: मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्व्हेचं काम दिलं म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सराटे यांना काळं फासलं आहे. सराटे हे मराठा आरक्षणाचे समर्थक असतानाही त्यांना काळं फासण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृह येथे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आरक्षणासंदर्भात निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेब सराटे यांच्या तोंडावर शाई फेकून काळं फासलं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सराटे हे मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत. त्यांची 'शिवाजी' नावाची संस्था असून या संस्थेला मराठा आरक्षणाच्या सर्व्हेचं काम देण्यात आल्याने त्याला विरोध म्हणून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतं.
63329383

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याण, औरंगाबादच्या आयुक्तांची बदली

$
0
0

औरंगाबाद: कचऱ्याची समस्या सोडविण्यात अपयश आल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू आणि औरंगाबाद पालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे नवे पालिका आयुक्त या दोन्ही शहरातील कचऱ्याचाप्रश्न सोडविण्यात यशस्वी होतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद पालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून पालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी नवल किशोर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वर्षभरापूर्वीच मुगळीकर यांनी पालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. मात्र गेल्या २९ दिवस पासून चिघळत असलेली कचऱ्याची समस्या त्यांना सोडविता आली नाही. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान कचराकोंडी प्रश्नी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यानंतर मुगळीकर यांच्या रुपाने आणखी एका सनदी अधिकाऱ्याचा बळी घेण्यात आल्याची चर्चा आहे.

तर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू यांनाही कचऱ्याची समस्या सोडविणयात अपयश आल्याने त्यांचीही आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद या दोन्ही महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असून दोन्ही ठिकाणी कचराकोंडी झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेत सुविधेचा बट्ट्याबोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा शनिवारपासून सुरू झाल्या. पहिलाच दिवस विद्यार्थ्यांसाठी असुविधेचा ठरला. अनेक केंद्र चक्क सेंटरमध्ये देण्यात आले. शहरातील मुकुंदवाडी केंद्रावर पालकांनी नाराजी व्यक्त करीत परीक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले.

विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या. औरंगाबादसह चार जिल्ह्यात २२८ परीक्षा केंद्राहून पावणेतीन लाख परीक्षार्थी पदवीच्या परीक्षा देत आहेत. परीक्षेसाठी देण्यात आलेले परीक्षा केंद्र कोणत्याच निकषांमध्ये बसत नाहीत. चक्क शटरमधील चालणाऱ्या कॉलेजांमध्ये परीक्षा केंद्र, तर अनेक कॉलेजांचे पत्तेही सापडत नाहीत अशी स्थिती आहे. अशा कॉलेजांना परीक्षा केंद्रामुळे परीक्षार्थींची फरफट झाली. शनिवारी पहिल्याच पेपरला मुकुंदवाडी परिसरातील एका केंद्रावर परीक्षार्थींसह पालकांनी गर्दी केली. परीक्षा केंद्रावर असुविधा अन् शटरमधील कॉलेज पाहून पालकांनी नाराजी व्यक्त केली. दोन मजली इमारतीत परीक्षा केंद्र आहे. ऐनवेळी कोणाकडे तक्रार करणार अन् त्यात वेळ जाईल या कारणाने पालकांनी तक्रार करणे टाळले. या परीक्षा केंद्रावर शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून परीक्षा देत आहेत. काही परीक्षार्थींना केंद्र माहिती नसल्याने शुक्रवारीच काहींनी कॉलेजला भेट देत पाहणी केल्याचे सांगितले. काहींनी गुगल मॅपवर कॉलेजचा नकाश पाहत परीक्षा केंद्र शोधले. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी, खाली बसून परीक्षा देण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा समोर आल्या. त्यानंरतही विद्यापीठाचा परीक्षा विभागाकडून सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले जाते.

आयोगाचे सगळेच निकष कागदावर

विद्यापीठ अनुदान आयोगाने कॉलेजस्थापनेवेळी निश्चित केलेले निकषांमध्येही अनेक कॉलेज बसत नाहीत. त्यात शटरमध्ये चालणाऱ्या कॉलेजमध्ये विद्यापीठही परीक्षा केंद्र देते कसे हा प्रश्न पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तर, या नाराजीबाबत परीक्षार्थींमध्ये नाराजी होती. तर, काही परीक्षा केंद्रावर उकाड्यामुळेही परीक्षार्थी वैतागले होते.

बीडमध्ये तोतया विद्यार्थी

बीड येथील बलभीम महाविद्यालयात दोन तोतया विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. बी. ए. तृतीय वर्ष आणि प्रथम वर्षाचे दोन विद्यार्थी उर्दू विषयाचा पेपर देत होते. हॉलतिकीटवर दुसरेच छायाचित्र असल्यामुळे संशयावरून दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघे तोतया असल्याचे उघड झाले. परीक्षा विभागाने तक्रारीची दखल घेऊन ज्यांच्या नावावर परीक्षा देण्यात येत होती त्यांचा पूर्ण वर्षाचा परफॉर्मन्स रद्द केला आहे.

डॉ. दिगंबर नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सोयी-सुविधांच्या बाबतीत परीक्षा विभागाने दिलेले निर्देश पाळले. परीक्षार्थींना शिस्त नको वाटते. विद्यार्थी मोबाइल घेऊन जाऊ द्या म्हणाले. इतर सोयी सुविधा आमच्याकडे आहेत.

अखिल अहमद, प्राचार्य, राधाई कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांसह पोलिसांचा सहभाग; पालिकेचे अधिकारी बेपत्ता

$
0
0

औरंगाबाद: शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी शनिवारी पोलिस रस्त्यावर उतरून त्यांनी स्वच्छता अभियान राबविले. प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. ४०० जवान, आठ पोलिस निरीक्षक व २० पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यापीठ परिसर, बीबी - का - मकबरा, नागसेनवन परिसर, शहानूरमिया दर्गा परिसराची स्वच्छता केली. दरम्यान, शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची आहे. या अभियानाकडे महापालिकेचे काही नामवंत अधिकारी फिरकलेही नाहीत. इतर अधिकाऱ्यांचीही तुरळक उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजचा राष्ट्रवाद पोकळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राष्ट्रवाद, राष्ट्रभक्तीबाबत आजचे बोलणे पोकळ आहे. आधुनिक आणि सक्षम भारत हवा असेल तर आमची बांधिलकी राज्यघटनेतील राष्ट्रवादाशी हवी. जो राष्ट्रवाद सर्वसमावेशक आहे. त्याच मार्गाने आज जाण्याची गरज आहे,' असे आवाहन अॅड. भगवानराव देशपांडे यांनी शनिवारी केले. बापू सुधा काळदाते प्रतिष्ठान आणि माणिकचंद पहाडे विधी कॉलेजतर्फे आयोजित संविधान परिचय अभ्यासक्रमाचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

कॉलेजच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्राचार्य प्रताप बोराडे, अॅड. कल्पलता भारस्वाडकर, प्राचार्य डॉ. सी. एम. राव, उपप्राचार्य प्रा. भाग्यश्री परांजपे, डॉ. अर्पणा कोतापल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. 'भारतीय राज्यघटनेस अभिप्रेत असणारा राष्ट्रवाद' विषयावर बोलताना अॅड. देशपांडे म्हणाले, 'राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान न्यायाची केलेली संकल्पना मांडली. त्यांनी मांडलेला राष्ट्रवादच देशाला सक्षम आणि आधुनिकतेकडे घेऊन जाणारा आहे. जनतेचे एैक्य हाच राष्ट्राचा आधार आहे. जाती, धर्मापलिकडे सर्वसमावेशकता आपल्याला आपली राज्यघटना देते. नवराष्ट्र संकल्पनेचे मूळ आपल्या घटनेत आहे. त्याच मार्गाने जाण्याची आपल्याला गरज आहे. राज्यघटनेशी बांधिलकी आजच्या काळात गरजेची आहे. ती आपण विसरत चाललो आहोत. आपल्या मनाप्रमाणे राष्ट्रवादाची संकल्पना मांडली जात आहे. आधुनिक भारतासाठी राज्यघटनेतील राष्ट्रवाद हाच गरजेचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जनता एकसंघ होऊन लढली. त्या चळवळीतील राष्ट्रातील नेत्यांनी सर्वसमावेशकता आणली आणि याच सर्वसमावेशकतेचे प्रतिबिंब राज्यघटनेत उमटले. जाती व्यवस्थेचे निर्मूलन होणे गरज आहे. ज्यामुळे एकसंघ राष्ट्र निर्माण होऊ शकते,' असे ते म्हणाले.

प्राचार्य बोरोडे यांचेही यावेळी भाषण झाले. बापू सुधा काळदाते प्रतिष्ठानच्या उपक्रमाची वाटचाल त्यांनी मांडली. मान्यवरांच्या उपस्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. अभ्यासक्रमाला एकही वेळा अनुपस्थित असलेल्यांचाही गौरव यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक अन् अभ्यासक्रमाचा आढावा डॉ. अपर्णा कोतापल्ले यांनी मांडला. सूत्रसंचालन अन् आभार अनघा पेडगावकर यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाऊसिंग अदालत केवळ एकच तक्रार

$
0
0

औरंगाबाद: सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र यांच्या सूचनेनुसार शनिवारी औरंगाबागेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शनिवारी गृहनिर्माण तक्रार निवारण दरबार (हाऊसिंग अदालत) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करूनही ठरलेल्या वेळेत केवळ एकच तक्रार प्राप्त झाली. जिल्हा उपनिबंधक एस. बी. खरे यांच्या कार्यालयात शनिवारी सकाळी साडेदहा ते दोन या काळात हाऊसिंग अदालतचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण - प्लॉट ओनर्स सभासदांच्या संस्थेसंबंधी या कार्यालयास प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या तक्रारीसंबंधी व शनिवारी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार होते. मात्र ठरलेल्या वेळेत केवळ एकच तक्रार आली ती सुद्धा पैठण तालुक्यातील होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेचे नियोजन चुकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिकेचे काम नगरनियोजनाचे आहे, परंतु कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी एकही जागा सोडलेली नाही. पालिकेचे नियोजनच चुकलेले आहे,' अशा शब्दात आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या कारभारावर तोफ डागली.

महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राम शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. 'महापालिकेत कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नारेगाव येथील कचरा डेपोमध्ये कचरा साचवला जात होता. त्या भागातील नागरिकांनी विरोध केल्यावर तेथे कचरा टाकणे बंद करावे लागले. कचरा डेपोमध्ये कचरा टाकणे बंद झाले असले, तरी पर्यायी जागा महापालिकेकडे नाही. वास्तविक पाहता झोन कार्यालयांच्या क्षेत्रात मोकळी जागा सोडायला हवी होती, पण महापालिकेने जागा सोडल्या नाहीत. महापालिकेचे नियोजनच चुकलेले आहे. कचराडेपो विरोधातील आंदोलनामुळे अपत्ती निर्माण झाली आहे. या आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रुपांतर करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. कचराकोंडीतून निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी रविवारी आपण स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत संस्थांच्या सदस्यांनी विधायक सूचना कराव्यात. मला प्रबोधनाची गरज नाही. कचरा समस्येवर नेमका तोडगा या संस्थांकडून हवा आहे. संस्थांचे प्रतिनिधी सहकार्य करण्यास तयार असतील, तर त्यांना कामात सहभागी करून घेऊ,' असे ते म्हणाले.

१०२ जागांची यादी

राम म्हणाले, 'ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध झोनमधून १०२ जागांची यादी तयार केली आहे. या सर्व जागांना आपण स्वत: भेट देणार आहोत. नागरिकांच्या सहकार्याने या सर्व जागांवर कंपोस्ट पीट तयार करण्याची योजना आहे. आतापर्यंत ५८ कंपोस्ट पीट तयार केले आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’ने उभरली गाजराची गुढी

$
0
0

वाळूज महानगर: सरकारने दिलेली आश्वसने पूर्ण केले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी शिवाजी महाराज चौकात गाजराची गुढी उभारून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत काठीला गाजर बांधून त्याची गुढी उभारली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतीसाठी मोफत वीज द्यावी, बेरोजगारांना त्वरित मुद्रा कर्ज द्यावे, मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण, औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर, गंगापूर सहकारी साखर कारखाना सुरू करावा, तसेच निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वसनाने पूर्ण करावीत, असी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष संपत रोडगे, मनीष नागापुरे, विजय वैद्य, कैलास काळे, भाऊसाहेब शेळके, परमेश्वर निकम, श्रीमंत फोलाने, सोमनाथ अमोल पंडित, योगेश दंडे, रावसाहेब खुडसाने आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची गुलमंडीवर ५१ फुटी विकासगुढी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप व भाजयुमो शहर शाखेच्या वतीने रविवारी गुलमंडी येथे गुढीपाडव्यानिमित्त ५१ फुटी 'विकासाची गुढी' उभारण्यात आली होती. भाजप सरकारने गेल्या चार वर्षांत देशाच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती याद्वारे देण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, महिला आयोग अध्यक्षा विजया राहटकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, सरचिटणीस कचरु घोडके, बाळासाहेब गायकवाड, हेमंत खेडकर, अशोक जगधने, भुपेश पाटील, रवी बलदवा, सुभाष साबळे, राजेंद्र स्नेही, गुलमंडी मंडळाध्यक्ष सुधीर नाईक, धीरज सिद्ध, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन जवेरी, सुनील शरणागत, नागनाथ कबाडे , ऋषिकेश ढंगारे, अजय वांगीकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गासाठी ८०० हेक्टर जमीन ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

राज्याच्या परिवहनात क्रांती घडवणारा राज्य शासनाचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग बांधकामाचे नियोजन पूर्ण झाले असून जिल्ह्यात लवकरच बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. १६ टप्प्यात पूर्ण करण्यात येणाऱ्या या बांधकामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७९२ हेक्टर (५९ टक्के) जमीनीचा ताबा घेण्यात आला आहे. दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाचे १६ टप्प्यात बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातही काही गावे वगळता भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे.

मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५९ टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून १३४७.७२ हेक्टरपैकी तब्बल ७९२.०३५९ हेक्टर जमिनीची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून थेट खरेदीने ६८६ हेक्टर ७९२ हेक्टर सरकारी जमीन संपादित करण्यात आली. एकीकडे शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे रस्ता बांधकामाचेही जोरदार नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. रस्त्याच्या बांधकामासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पॅकेज तयार करण्यात आले आहे. यानुसार औरंगाबाद व जालना जिल्ह्यामध्ये बांधकामच्या तीन पॅकेजमध्ये काम करण्यात येणार आहे. यामध्ये जालना- बदनापूर (पॅकेज क्रमांक ८), औरंगाबाद तालुका (पॅकेज क्रमांक ९) व गंगापूर-वैजापूर (पॅकेज क्रमांक १०) अशा तीन टप्प्यात जिल्ह्यामध्ये रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात भुसंपादनाची प्रक्रीया सुरु असली तरी गंगापूर तालुक्यातील फतीयाबाद येथे १२ लाख ७० हजार व केवळ दोन फूट अंतरावरील दौलताबाद गटातील बागायती जमिनीला ९२ लाख रुपये, माळीवाडा गटात ९० लाख रुपये भाव देण्यात आला असल्याने ही तफावत दूर करून शेजारील गावांप्रमाणेच भाव जाहीर करावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यातील भूसंपादनाची स्थिती

तालुका................. क्षेत्रफळ............ एकूण मिळालेले क्षेत्र............ टक्केवारी

औरंगाबाद................६२७.२४..................३३०.१४०४..................५३

वैजापूर....................४६६.६८..................२८८.३२७६...................६२

गंगापूर......................२५३.८...................१७३.५६७९.....................६८

--------------------------------------------------------------

एकूण......................१३४७.७२.................७९२.०३५९..................५९ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नास नकार; इन्स्टाग्रामवर अश्लील मॅसेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अल्पवयीन असल्याने लग्नास नकार दिल्याने मुलीच्या मोबाइलमधील इन्स्टाग्रामवर अश्लील व धमकीचे मॅसेज पाठवण्यात आले. हा प्रकार १० मार्च ते १३ मार्च दरम्यान सिडको भागात घडला. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या मुलीसाठी बीडच्या दीपक मुरकुटे याच्या कुटुंबाने लग्नाची मागणी घातली होती. मात्र या मुलीच्या कुटुंबाने दीपकसोबत लग्न लावून देण्यास नकार दिला. याचा मुरकुटे कुटुंबाला राग आला. त्यांनी या मुलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तब्बल १८ अश्लील व धमकीचे मेसेज पाठवले. या प्रकाराला कंटाळलेल्या मुलीने अखेर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संशयित आरोपी कैलास विष्णू मुरकुटे, सूरज कुसळकर व एका महिलेविरुद्ध (सर्व रा. बीड) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडून एनजीओंची चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालकमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोचलेल्या शहरातील कचराकोंडीचा प्रश्न महिन्याभरानंतरही कायम आहे. प्रशासनाच्या अद्यापही बैठकांवर बैठका सुरू आहेत. तोडगा काढण्यासाठी रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कचराप्रश्नी काम करणाऱ्या अनुभवी स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या कल्पना जाणून घेतल्या.

शहरातील कचराकोंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नुकताच महापालिकेचा कारभार देण्यात आलेले प्रभारी आयुक्त नवल किशोर राम हे कचऱ्याप्रश्नी उपाययोजना करण्यासाठी सर्व पर्यायांवर विचार करत आहेत. बैठकीसंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, शहरातील सर्वात मोठी समस्या बनलेल्या कचराप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व पर्यायांवर विचार करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कचराप्रश्नी उत्तम कार्य करणाऱ्या सात ते आठ अनुभवी सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमुखांना चर्चा करण्यासाठी बोलावले होते. गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे भेटण्यास येणाऱ्या संस्थांची संख्या जरा कमी होती, मात्र दोन तास चर्चा केल्यानंतर सेवाभावी संस्थांच्या कचराप्रश्न सोडवण्यासाठी विविध कल्पना जाणून घेतल्या. कचराप्रश्न पुढे करून कुणाचेही उद्योग चालावे म्हणून नव्हे, तर एक चांगला उद्देश घेऊन काम करण्यात येणार आहे, यासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या संस्थांना निधी देण्याची तरतूद करता येईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचशे किलो कॅरीबॅग आठवड्यात जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्लास्टिक बंदीला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर शहरात रविवारी त्याचे परिणाम फारसे दिसले नाहीत. तर, महापालिका सांगते शहरात आठवड्यापासून बंदीची प्रक्रिया सुरू आहे. आठवड्यात पाचशे किलो कॅरीबॅग जप्त केली आहे.

राज्यशासनाने सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आज पहिल्यादिवशी शहरात त्याचे परिणाम दिसतील असे वाटले परंतु तसे काही झाले नाही. अनेक दुकाने, टपऱ्यावर अन् गाड्यावर कॅरीबॅग ग्राहकांना देत होते. पालिकेकडून कोणतीही कारवाई सुरू नव्हती. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. तरी शहरात अशा कॅरीबॅगही उपलब्ध होत्या. पालिका प्रशासनाने आठवड्यापूर्वीच प्लास्टिक बंदीच्या अनुशंगाने पाऊल उचलल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी 'मटा'ला सांगितले. आठवड्यात ५०० किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुकाणू समितीचा सरकारविरोधात एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरकार आतापर्यंत दिलेली आश्वासने अपयशी ठरले आहे, त्यामुळे शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. समितीतर्फे सोमवारी (१९ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत सुभाष लोमटे यांनी दिली.

१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांनी कर्जबाजारीपनामुळे संपूर्ण कुटूंबासह आत्महत्या केली होती. करपे कुटुंबाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १९ मार्च रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग, असे लाक्षणिक सत्याग्रह करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

सरकारने सुकाणू समितीला दिलेली आश्वासने अद्याप पाळली नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय, शेतकरी आंदोलनाच्या काळात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे यासह इतर मागण्या मंजूर करूनही एकही मागणी सरकारने पूर्ण केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष धुमसत आहे. गेल्या आठवड्यातही लाँग मार्चच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर शेतकरी मंत्रालयावर धडकले. यावेळी विविध प्रश्नावर सरकारने लेखी आश्वासन दिले. मात्र मागचा इतिहास पाहता दिलेले आश्वासन पाळले जाईल हे कुणीही सांगणार नाही. त्यामुळे आजपर्यंत दिलेली आश्वासने कालमर्यादेत पूर्ण व्हावीत यासाठी महाराष्ट्र सुकाणू समितीने १३ मार्च रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. पत्रकार परिषदेसाठी सुकाणू समितीचे जिल्हा संयोजक सुभेदार मेजर सुखदेव बन, किसान सभेचे कॉ. भगवान भोजने, सदस्य सुभाष लोमटे, देविदास कीर्तीशाही, प्रा. पंडित मुंडे, शेख रसूल, अॅड. आसाराम लहाने आदींची उपस्थिती होती.

जागर यात्रा

समितीतर्फे २३ मार्च पासून २७ एप्रिलपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढून जनजागरण करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोंडअळी बाधितांना मदतीचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोंडअळीमुळे कापसाच्या नुकसानीचा केलेल्या पंचनाम्याच्या आधारेच ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत सरसकट मदत देण्याचे आदेश शासनाने १७ मार्च रोजी काढले आहेत. यानुसार आता मराठवाड्याला १२२१ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे बोंडअळीने मोठे नुकसान केले असून, अखेर संपूर्ण मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. काळात शासनाने नुकसानीबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानीचा अहवाल सादर करताना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र असे वर्गीकरण करावे, असे सरकारने सांगितले होते. त्यामुळे सरकार भरपाई देताना ३३ टक्क्यांचा निकष विचारा घेणार की ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रालाच भरपाई देणार काय, अशी चर्चा सुरू झाली होती. 'नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स'च्या (एनडीआरएफ) निकषांनुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते.

खरीप हंगामात मराठवाड्यातील एकूण ४७ लाख ७० हजार २०० हेक्टरपैकी १७ लाख ४२ हजार ४७५ हेक्टरवर कापसाचे पीक घेण्यात आले. काही वेचण्यानंतरच बोंडअळीने हल्ला केला व यातील बहुतांश कापूस पीक हातचे गेले. नुकसानीचे पंचनामे केल्यनंतर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित असलेल्या २६ लाख ९० हजार ९३९ शेतकऱ्यांसाठी १२२१ कोटी रुपये नुकसान भरपाईची आवश्यकता असल्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओव्हरलोड ट्रक घुसला पोलिस चौकीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फर्दापूर

उसाची मळी घेऊन जाणाऱ्या ओव्हरलोड ट्रकचे ब्रेक निकामी होऊन फर्दापूर पोलिस चौकीत घुसला. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या घटनेत एक ठार, तीन गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जळगाव, सोयगाव व औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

औरंगाबादकडून जळगावकडे उसाची मळी घेऊन जाणारा ओव्हरलोड ट्रकचे (एम. एच २८ बी ७६२५) ब्रेक निकामी झाले होते. या ट्रकने फर्दापूर बस स्थानकाजवळील पोलिस चौकीच्या ओट्यावर चहा पित असलेल्या चौघांना चिरडून ट्रक-चपला बुटाचे दुकान तोडत पोलिस चौकीत घुसला. या घटनेत युसुफ खान रशीद खान पठाण (वय ६५, रा. फर्दापूर) हे जागीच ठार झाले. असद खान उस्मान खान (वय ७०) व रामचंद्र मंगरुळे (वय ७०) व बुटाचे दुकानमालक प्रेमचंद भागचंद कोटी (वय ६१, सर्व रा. फर्दापूर) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नासा’च्या ‘पार्कर सोलर प्रोब’मध्ये औरंगाबादच्या अभिरचे यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी 'नासा' यान पाठविण्यासाठीची तयारी करीत आहे. सूर्याच्या एवढ्या जवळ जाण्याचा पहिल्यांदा होत असलेल्या प्रयत्नात 'नासा'ने 'पार्कर सोलर प्रोब' घेतली होती. त्यात औरंगाबादच्या अभिर मनिष गोधमगावकर याने यश मिळविले. देशभरातून दहा-अकरा विद्यार्थ्यांमध्ये अभिरचा समावेश आहे. हे यान जवळून पाहण्याचा त्याला संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नासा यावर्षी सूर्यावर स्पेसक्राफ्ट पाठविणार आहे. हे यान सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे. सूर्याचे तापमान लक्षात घेत आजपर्यंत कोणत्या देशाने यान पाठविण्याचा प्रयत्न केला नाही. 'नासा' पहिल्यांदा हा प्रयत्न करत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी समर २०१८ हॉट तिकीटअंतर्गत ऑनलाइन पार्कर सोलर प्रोब स्पर्धा घेण्यात आली. दहा प्रश्नांची प्रश्नावली सोडविण्यासाठी जगभरातून लाखो विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. यामध्ये औरंगाबादच्या अभिर गोधमगावकर याने यश मिळविले आहे. अवकाश आणि आकाशगंगा यांच्याशी संबंधित दहा प्रश्नांचा समावेश होता. अभिरने सर्व प्रश्नांची उत्तरे यशस्वीपणे दिली. त्यानंतर त्याला नासाकडून ई-मेलद्वारे ही बातमी सांगण्यात आली. अभिरचे नाव आणि त्याबाबतची माहिती यानमध्ये असलेल्या चीपमध्ये असणार आहे. जगभरातून सुमारे शंभरपेक्षा अधिक, तर देशभरातील १३ जणांचा यादीत समावेश आहे. त्यात अभिरला संधी मिळाली आहे. त्यामुळे अभिरचे कायमस्वरुपी यान प्रक्रियेशी जोडले जाणार आहे. एसबीओए हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी असलेला अभिरला लहानपणापासून अवकाश ज्ञानाची आवड आहे. चौथी, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत अभिर देशपातळीवरील गुणवत्तायादीतही चमकला आला आहे. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत ही दुसऱ्या क्रमांकापर्यंत त्याने मजल मारलेली आहे. नासाचे हे यान पाठवितानाची प्रक्रिया पाहण्याचा व्हीआयपी पासही अभिरला नासाकडून मिळाला आहे.

मी व माझ्या मित्रांनी स्पर्धेत सहभाग घेतला. ऑनलाइन परीक्षेत मला आकाशगंगा, अवकाशयाबाबतचे प्रश्न विचारण्यात आले होते. दहाही प्रश्नांची उत्तरेही मी दिली. त्यानंतर त्यांचा मेल आला अन् तुमची निवड झाल्याचे सांगण्यात आले. सूर्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या यानाशी मी जोडला गेलो याचा आनंद आहे. मला पुढील शिक्षण याच क्षेत्रात करायचे असे मी, पूर्वीच ठरविले आहे.

- अभिर गोधमगावकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचाऱ्याला चाकूच्या धाकाने लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नोकरी संपवून पहाटे घरी जात असलेल्या एसटीतील कर्मचाऱ्याला तिघांनी चाकूचा धाक दाखवत दीड हजार व मोबाइल लंपास केला. रविवारी पहाटे सव्वादोन वाजता एन आठ, बजरंग चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद गोपाळराव भालकीकर (रा. विश्वकर्मा हौसिंग सोसायटी, एन आठ) हे मुकुंदवाडी एसटी वर्क शॉप येथे कार्यरत आहेत. रविवारी पहाटे ड्युटी संपल्यानंतर ते दुचाकीवर घरी जात होते. बजरंग चौकाच्या थोडे पुढे 'एसबीआय' बँकेजवळ त्यांच्या दुचाकीला मोपेडवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी अडवले. त्यांनी भालकीकर यांना खिशातील पैसे देण्याची मागणी केली. भालकीकर यांनी नकार दिला असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच एकाने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील पाकीट व मोबाइल असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. या पाकीटात दीड हजार रुपये होते. जाताना आरोपींनी पोलिसात गेल्यास तंगडे तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी भालकीकर यांच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय पाचोळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images