Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जवानाचे घर फोडले

0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैन्यदलात जवान असलेल्या तरुणाचा बदनापूर येथे विवाह सोहळा सुरू असतानाच चोरट्यानी त्यांचे मुकुंदवाडी येथील लग्नघर फोडले. मुकुंदवाडी गावात बुधवारी हा प्रकार घडला. या घटनेत चोरट्यांनी रोख रक्कमेसह ९३ हजारांचा ऐवज लंपास केला. मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. दुसऱ्या दिवशी देखील उशिरा पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास जग्गनाथ चाबुकस्वार (रा. इच्छामणी हॉटेलजवळ, मुकुंदवाडी गाव) हे पुणे, औंध येथील मिलिटरी कँपमध्ये जवान म्हणून कार्यरत आहेत. चाबुकस्वार यांचा नाणेगाव (ता. बदनापूर) बुधवारी येथे विवाहसोहळा होता. या सोहळ्यासाठी सर्व चाबुकस्वार कुटुंब नाणेगावला गेले होते. विकासचा मोठा भाऊ व वहिनी सायंकाळी साडेसहा वाजता घरी परतले. यावेळी त्यांना घराचे कुलूप खाली पडलेले तुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी घरात जाऊन पाहीणी केली असता चोरट्यांनी कपाट उचकटून रोख २४ हजार, सोन्या-चांदीचे दागिने व बँकेच पासबुक चोरून नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी चंपाबाई जग्गनाथ चाबुकस्वार यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bसात दिवसांपूर्वी झाला भावाचा विवाह\B

विकास चाबुकस्वार यांचे मोठे बंधू प्रकाश यांचा विवाह १७ मे रोजी रामनगर येथे पार पडला. त्यानंतर सात दिवसांनंतर, बुधवारी विकासचा विवाह होता. मोठ्या भावाच्या लग्नातील ऐवज हा घरीच होता. चोरट्यांनी बंद असलेले लग्नघर लक्ष्य करीत या ठिकाणी चोरी केली. यामध्ये ९३ हजाराचा ऐवज त्यांच्या हाती लागला.

\Bमुकुंदवाडी पोलिसांची टाळाटाळ\B

चोरीची घटना कळाल्यानंतर जवान विकाससह सर्व कुटुंबाने मुकुंदवाडीत घर गाठले. यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून ही माहिती देण्यात आली. रात्री पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी जाण्याबाबत टाळाटाळ केली. सध्या वाहन नाही, गाडी आल्यावर येऊ, अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांना देण्यात येत होती. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दखल घेत पोलिसांना त्वरीत रवाना केले. पोलिसांनी चोरी झालेल्या खोलीला कुलूप लावून दुसऱ्या दिवशी बोटांच्या ठसे तज्ज्ञ व श्वानाला पाचारण करू, असे सांगत निघून गेले. दुसऱ्या दिवशी देखील दुपारपर्यंत पोलिस पथक तपासासाठी चाबुकस्वार यांच्या घरी गेले नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाचशे रुपये घ्या, नळ अधिकृत करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाचशे रुपये भरून घेऊन अनधिकृत नळ अधिकृत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांना दिले. आयुक्तांच्या मंजुरीनंतर ही योजना लागू होणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात एक लाख ३६ हजार अधिकृत, तर एक लाख २६ हजार नळ अनधिकृत आहेत. अनधिकृत नळांमुळे पाण्याची चोरी होऊन त्याचा विपरित परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. पाणीचोरी टाळण्यासाठी अनधिकृत नळ तोडण्यापेक्षा नाममात्र शुल्क आकारून त्या अधिकृत कराव्यात, अशी मागणी बहुतांश नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. त्यासाठी पाचशे रुपये शुल्क आकारल्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळेल, मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ अधिकृत होतील. पालिकेच्या तिजोरीत भर पडेल, अशी सूचना नगरसेवकांनी केली होती. ही सूचना मान्य करून पाचशे रुपयांत अनधिकृत नळ अधिकृत करण्याचा निर्णय महापौरांनी घेऊन तसे पत्र आयुक्तांना दिले आहे. या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजाणी करा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

\Bनिर्णय झाल्यास लगेच अंमलबजावणी

\B

पूर्वी शहरात ९७० किलोमीटरच्या जलवाहिन्या होत्या. समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीने शंभर किलोमीटर जलवाहिन्या टाकल्या व सात हजार नवीन नळ कनेक्शन दिले. जायकवाडीतून येणाऱ्या पाण्यात वाढ झाली नाही, पण नळांची संख्य ‌वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या हर्सूल तलाव आटल्याने पाच एमएलडी पाणी आता मिळत नाही. जायकवाडीच्या पाण्यात सहा एमएलडीची घट आली आहे. परिणामी, शहराचे पाणी ११ एमएलडीने कमी झाले आहे. पाचशे रुपये घेऊन नळ जोडण्या अधिकृत करण्याची परवानगी आयुक्तांनी दिली, तर त्या दृष्टीने लगेच काम सुरू केले जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सांगितले.

\Bतामिळनाडूचे पथक येणार

\B

शहरातील पाणीप्रश्न सोडवण्याकरिता महापालिकेला मदत करण्यासाठी तामिळनाडू येथील निवृत्त मुख्य अभियंत्यांचे पथक २९ मे रोजी शहरात येणार आहे. त्यांच्या सोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी राहणार आहेत. हे पथक जायकवाडीपासून शहरापर्यंत पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून उपाययोजना सूचविण्याची शक्यता आहे.

अधिकृत नळ : १ लाख ३६ हजार

अनधिकृत नळ: १ लाख २६ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबाद पालिकेला आली जाग

0
0

विजय चौधरी , खुलताबाद

शहरासह तालुक्यातील इतर १२ आणि फुलंब्री तालुक्यातील पाच गावांना पाणीपुरवठा करणारे येसगाव येथील गिरीजा धरण कोरडेठाक पडल्याने शहराला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्याची मंजूर असलेली येसगाव येथील गिरीजा मध्यम प्रकल्प योजना उपयुक्त ठरत नसल्याने नगरपालिकेने खुलताबाद शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजना तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मटाने 'पाणी पेटतेय' शीर्षकाखाली बातमी प्रकाशित केल्यानंतर पर्यायी पाणीपुरवठा योजना तयार करण्यासाठी पालिकेला जाग आली आहे.

नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना २३ मे रोजी पत्र दिले असून, खुलताबाद शहरासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजना तयार करण्याची मागणी केली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी योजना दोन ऑक्टोबर १९८७पासून कार्यान्वित करण्यात आली होती. येसगाव येथून १७ किलोमीटर अंतरावरून पाइप लाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यावेळी शहरात प्रति माणसी ७० 'एलपीसीडी'ने नऊ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. ही पाणीपुरवठा योजना कुचकामी झाली असून, येसगाव ते खुलताबाद १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या पाइपलाइनला ठिकठिकाणी गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या २०११च्या जनगणनेनुसार खुलताबाद शहराची लोकसंख्या १५ हजार ७४९ इतकी आहे. प्रतिवर्षी दहा टक्के लोकसंख्या वाढ गृहित धरून आजची अंदाजे लोकसंख्या २५ हजार आहे. शासकीय नियमाप्रमाणे १३५ 'एलपीसीडी'ने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. शहराला जनावरांची संख्या तीन हजार इतकी असून ४० लिटर प्रमाणे एक लाख २० हजार लिटर दररोज पाण्याची गरज आहे. शहरातील तीन झोन असून, प्रत्येकी नऊ लाख प्रमाणे २७ लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

शहरासह तालुक्यातील इतर १२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या या गिरीजा मध्यम प्रकल्पात अनेक वर्षे पावसाळ्यात पुरेसा पाणीसाठा होत नसल्याने शहरात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत आहे. गेल्यावर्षी उपलब्ध पाणीसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निष्काळजीपणा केल्यामुळे धरणातून परिसरातील काही शेतकरी जलसंपदा खात्याच्या दुर्लक्षाची संधी साधून रात्री पाणी चोरी केली होती. शहरावर गेल्या अनेक वर्षांपासून सतत पाणीटंचाईचे सावट येत आहे. यावर्षी मात्र शहरवासीयांना महिन्यात दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात आला. धरणात मुबलक साठा उपलब्ध असताना पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासन गाफील राहिले.

शहरासह १२ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. सध्या टंचाई परिस्थितीत धरणातील बुडित क्षेत्रातील चार विहिरीतील पाणी उपसा करून शहरात पाणीपुरवठा वितरित करण्यात येत होता. या चारही विहिरींना पाणी कमी झाल्याने जलसंकट उभे ठाकले आहे. भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खुलताबाद शहरासाठी ११ टँकर मंजूर केले आहे. ११ टँकरद्वारे अधिग्रहण केलेल्या विहिरी; तसेच साजापूर एमआयडीसी येथून दोन फेऱ्या टँकरने ४३ लाख दोन हजार लिटर एवढा दैनंदिन पाणीसाठा जलशुद्धीकरण केंद्रात करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता खुलताबाद शहरासाठी कायमस्वरुपी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी योजना तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासनाने या योजनेचा प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेण्यासाठी नगराध्यक्ष नगरसेवक किती प्रयत्न करतात त्यावर बरेच काही अवलंबून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तपदी चिरंजीवी प्रसाद ?

0
0

औरंगाबाद:

शहराला येत्या दोन दिवसात पोलिस आयुक्त मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिष्टमंडळास गुरुवारी दिली. या पदावर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

शहरात ११ मे रोजी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर तातडीने पोलिस आयुक्त नियुक्त करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवस्थापन परिषदेचे आरक्षण निश्चित

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेद्वारे भरण्यात येणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या चार राखीव जागांचा प्रारंभिक आरक्षण बिंदू सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात आला. प्राचार्य गट इतर मागासांचा प्रवर्ग (ओबीसी), प्राध्यापक गट भटक्या विमुक्त जमाती (एनटी), संस्थाचालक गट अनुसूचित जाती (एस.सी.) आणि पदवीधर गट अनुसूचित जमाती याप्रमाणे बिंदू निश्चित झाले आहेत.

व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सोडत काढण्यात आली. अधिसभेच्या प्राचार्य गटासाठी ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले एच. जी. विधाते एकमेव आहेत. प्राध्यापक गटातून निवडून आलेले फुलचंद सलामपुरे (एन.टी.), संस्थाचालक गट राहुल म्हस्के (एस.सी.) आणि पदवीधर गटाचे सुनील निकम (एस.टी.) यांनाही प्रतिस्पर्धी नाही. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापन परिषदेवरील निवडीची औपचारिकता राहिली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या राहिलेल्या चार जागांसाठी १५ जून रोजी निवडणूक होणार असून या जागा खुल्या प्रवर्गाच्या आहेत. अधिसभेच्या चार गटातून प्रत्येकी दोन याप्रमाणे आठ सदस्य व्यवस्थापन परिषदेवर निवडले जाणार आहेत. यातील चार जागा राखीव प्रवर्गांसाठी आहेत. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद कक्षात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली या जागांचा प्रारंभिक आरक्षण बिंदू सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नंदकुमार राठी, अधिसभा सदस्य प्रा. संभाजी भोसले, प्रा. लक्ष्मीकांत शिंदे, प्रा. राजेश करपे, प्रा. भगवानसिंह डोभाळ, प्रा. गोविंद काळे, प्रा. शंकर अंभोरे आदी उपस्थित होते.

\Bखापर्डे, मुळे, शिरसाठ यांची निवड

\B

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूंनी विभागप्रमुख गटातून ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. वैशाली खापर्डे यांची व्यवस्थापन परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून नेमणूक केली. आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठातापद डॉ. साधना पांडे यांच्याकडे होते. हा पदभार बी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजीवनी मुळे यांच्याकडे सोपविला. इनक्युबेशन सेंटरच्या प्रभारी संचालकपदी डॉ. एम. डी. शिरसाठ यांची निवड करण्यात आली. डॉ. शिरसाठ यांच्याकडे अंतर्गत गुणवत्ता हमी केंद्र, रुसा, नॅक आणि सिफार्ट आदी जबाबदाऱ्या आहेत.

\Bडॉ. दांडगे यांचा आक्षेप

\B

संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मागासवर्गीय प्रवर्गातील अधिसभा सदस्यांनी नागपूर खंडपीठात राज्यपालांनी काढलेल्या अध्यादेशाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका स्थगित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत व्यवस्थापन परिषद निवडणूक घेऊ नये, अशी मागणी अधिसभा सदस्य डॉ. सतीश दांडगे यांनी केली. याबाबत राज्यपाल व कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुगम संगीताचा उद्या कार्यक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे रविवारी प्रा. गजानन केचे यांच्या संगीत सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव अनिल चौधरी यांनी दिली. माजी उपाध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विश्वेश्वर विकास मंडळ सोसायटी, विश्वभारती कॉलनी येथे सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम सुरू होईल. सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चौधरी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा, पाण्याने नागरिक त्रस्त, महापौरांसाठी ‘रेड कार्पेट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साचलेला कचरा आणि पाणी मिळत नसताना नागरिक शहरातील नागरिक त्रस्त आहेत. मात्र महापालिकेत महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासाठी 'रेड कार्पेट' टाकण्याची लगबग सुरू आहे. त्यांच्या दालनाच्या जिन्यात 'रेड कार्पेट' अंथरण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते.

महापौरांना त्यांच्या दालनात जाण्यासाठी स्वतंत्र जिना आहे. त्यामुळे त्यांची आम जनतेच्या गराड्यातून सुटका होते. आजपर्यंतच्या बहुतेक सर्वच महापौरांनी या जीन्याचा वापर केला आहे. शिवाय महापौरपदी प्रतिष्ठा जपण्यासाठी जिन्याला संगमरवरी दगड वापरले आहेत. पालिका मुख्यालयातील इतर जिन्यांची अवस्था वाईट असली तरी या जिन्याीच निगा रोज राखली जाते. या

संगमरवरी जिन्यात 'मखमली रेड कार्पेट' अंथरले जात आहे. शहरातील नागरिक कचराकोंडी, पाण्याचा प्रश्न, रस्त्यावरील खड्डे, बंद पथदिवे यामुळे त्रस्त आहेत. या समस्या घेऊन नागरिकांच्या महापालिकेत खेट्या मारून चपला झिजल्या आहेत. मात्र महापौरांना त्रास होऊ नये याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेतर्फे आज, उद्या स्वच्छता अभियान

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आणि औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, रविवार असे दोन दिवस शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात प्रामुख्याने विविध भागात पडलेला मलबा (बांधकामाचे वाया गेलेले साहित्य, मातीचा ढिगारा) उचलला जाणार आहे. शहरात विविध ठिकाणी बांधकाम साहित्य पडलेले आढळते. माती, रेती, खडी चे ढीग दिसून येतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. ही बाब लक्षात घेवून महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी, शाळा - महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, व्यापारी - उद्योजकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले, स्वच्छतादूत भगतसिंग दरक, डेव्हलपमेंट फोरमचे संदीप नागोरी, रवी भट्टड, करण दरक, श्याम शिंदे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगररचनाच्या सहाय्यक संचालकपदी पुन्हा डी. पी. कुलकर्णी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकपदी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी डॉ. डी. पी. कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. आजारपणामुळे सुमारे दोन महिन्यांपासून सुट्टीवर असलेले डॉ. कुलकर्णी सहाय्यक संचालकपदी नियुक्ती झाल्याचे कळताच कामावर रुजू झाले.

टीडीआर प्रकरणावरून तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी डॉ. कुलकर्णी यांना पालिका सेवेतून निलंबित केले होते. त्यानंतर डी. एम. मुगळीकर यांनी निलंबन रद्द करून डॉ. कुलकर्णी यांना पालिकेचे सेवेत सामावून घेतले, परंतु त्यांच्याकडे नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकपदाची जबाबदारी दिली नाही. विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी डॉ. कुलकर्णी यांना नियुक्त करण्यात आले. शहरात कचराकोंडीचा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली. कचराकोंडीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्याच्या निमित्याने डॉ. कुलकर्णी यांच्या तीन - चार वेळा दिल्ली वाऱ्या झाल्या, त्यानंतर ते आजारी पडले. विद्यमान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी सायंकाळी एक आदेश काढून डॉ. कुलकर्णी यांची नियुक्ती नगररचनाविभागाचे सहाय्यक संचालक म्हणून केली. शासनाने सहाय्यक संचालकपदी नियुक्त केलेले पवन आलूरकर सतत गैरहजर रहात असल्यामुळे नगररचना विभागातील अनेक कामे खोळंबली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. या विभागाच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी डॉ. कुलकर्णी यांना सहाय्यक संचालकपदी नियुक्त करण्यात येत आहे असे डॉ. विनायक यांनी या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे. डॉ. कुलकर्णी यांनी थेट आयुक्तांना ' रिपोर्टिंग' करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हान शिबिरात ‘बेस्ट ऑफ फूड’चा फज्जा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आव्हान' शिबिरात विद्यार्थ्यांना 'बेस्ट ऑफ फूड' देत आहोत, असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी उद्घाटन कार्यक्रमात कौतुकाने सांगितले. मात्र, पहिल्याच दिवशी भोजन व्यवस्थेचा फज्जा उडाला. स्वयंपाक संपल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना जेवणासाठी दोन तास तिष्ठत बसावे लागले. काही विद्यार्थ्यांनी फक्त भात खाऊन वसतिगृह गाठले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी ऐनवेळी शिबिराकडे पाठ फिरवल्याने विद्यापीठ वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली.

राज्यपाल कार्यालयाच्या वतीने आयोजित दहा दिवसांच्या 'आव्हान' शिबिरासाठी ७० लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. राज्यातील १४ विद्यापीठाचे दीड हजार विद्यार्थी, स्वयंसेवक, प्रशिक्षक येणार असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विशेष नियोजन केल्याचा दावा केला होता. इंद्रधनुष्य शिबिर यशस्वी केल्यामुळे 'आव्हान'चे संयोजकपद मिळाल्याचा दावा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. मात्र, शिबिराच्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. बॅटमिंटन हॉल परिसरात मुलांसाठी स्वतंत्र भोजनव्यवस्था असून मुलींसाठी मुलींच्या वसतिगृहात वेगळी भोजनव्यवस्था आहे. मुलींच्या वसतिगृह परिसरात स्वयंपाक करून मुलांच्या कक्षात आणला जातो. या कामात बराच वेळ जात असल्यामुळे पदार्थ कक्षात येईपर्यंत विद्यार्थ्यांना वाट पहावी लागत आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता अचानक स्वयंपाक संपल्यामुळे विद्यार्थ्यांना जेवण मिळाले नाही. एक तासानंतर भात, पुऱ्या आणि भाजी आणली गेली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जेवण केले. विशेष म्हणजे स्वयंपाकाचा दर्जा साधारण असून भात कच्चा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. वसतिगृहात पाणी पुरेसे मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

\B..म्हणे संख्या वाढली \B

'आठशे विद्यार्थ्यांचा स्वयंपाक सांगितला होता. ऐनवेळी विद्यार्थीसंख्या वाढल्यामुळे स्वयंपाक कमी पडला. मात्र, ताबडतोब व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही' असे फूड कमिटीचे अध्यक्ष डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.

\Bदानवे यांनी फिरवली पाठ\B

'आव्हान' शिबिरासाठी विद्यापीठ प्रशासनाने राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले होते. मात्र, औरंगाबाद शहरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी येणे टाळले. त्यानंतर भाजपच्या काही मंत्र्यांनीही शहरात येणे तूर्तास शक्य नसल्याचे कळवले. अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निमंत्रण स्वीकारले. मात्र, दानवे यांनी ऐनवेळी शिबिराकडे पाठ फिरवल्यामुळे प्रशासनाचा फियास्को झाला. राजकीय श्रेयवाद टाळण्यासाठी दानवे आले नसल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसखाली चिरडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

महाराष्ट्र दर्शनच्या टेम्पो ट्रव्हल्स बसने चिरडल्याने बसची वाट पाहत थांबलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला व अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता औरंगाबाद रस्त्यावर शिऊर बसस्थानकाजवळ घडली.

शेख सुलतान शेख अहमद (वय ६९, रा. परसोडा) असे मृताचे नाव असून, वाल्मिक रंगनाथ पवार (वय ५०, रा. सुदामवाडी) हे या घटनेत जखमी झाले आहेत. हे दोघे दुपारी शिऊर बसस्थानकाजवळ बसची वाट बघत थांबले होते. त्यावेळी वैजापूरहून औरंगाबादकडे जाणाऱ्या महाराष्ट्र दर्शनच्या टेम्पो ट्रव्हल्स बसने (क्रमांक एमएच इएफ १११०) रस्त्याच्या बाजुला बसलेल्या दोघांना धडक दिली. या घटनेत शेख सुलतान यांच्या पायावरून गाडी गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वाल्मिक रंगनाथ पवार हे सुद्धा जखमी झाले. दोघांना ताबडतोब उपचारासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने वैजापूर येथील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण हॉस्पिटलमध्ये नेत असताना शेख सुलतान शेख अहमद यांचा मृत्यू झाला. वाल्मिक पवार यांच्यावर उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, अनेक एसटी बस शिऊर बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांना बसची वाट बघत रस्त्यावर थांबावे लागते. यातून अशा दुर्घटना घडून नागरिकांना नाहक जीव गमवावा लागतो. त्यामुळे राज्य परिवन महामंडळाने शिऊर बसस्थानकात बस थांबवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वामी समर्थ पादुका रविवारी वैजापुरात

0
0

वैजापूर : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी परिक्रमा मिरवणुकीचे रविवारी वैजापूर शहरात आगमन होत आहे. मागील २२ वर्षापासून या परिक्रमा सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त स्टेशन रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ भोजनालय येथे दुपारी बारा वाजता आरती होईल. त्यानंतर सांयकाळी पाच वाजता शहरातून पालखी पादुका मिरवणूक काढण्यात आल्यावर रात्री नऊ वाजता आरती होईल. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी सात वाजता पालखीचे औरंगाबादकडे प्रयाण होईल. यापादुका पालखी सोहळ्यास भावीक भक्तांनीमोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान विमलबाई पवार, सुनील पवार, अनील पवार, रांजेद्र पवार, अनील गुळस्कर भक्त मंडळीनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीची विश्वासार्हता टिकवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'घाटी हे गरिबांचे रुग्णालय आहे. अनेक अडचणीतून मार्ग काढून याठिकाणी रुग्णसेवेला प्राधान्य दिले जाते. याठिकाणी अधिकाधिक सुविधा पुरविण्यावर आमचा भर आहे. घाटीची विश्वासार्हता टिकवण्याचे काम झाले पाहिजे,' असे आवाहन वैद्यकीय शिक्षण खात्याचे सह संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी केले.

डॉ. लहाने यांनी घाटीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. यू. झिने यांची उपस्थिती होती. डॉ. लहाने म्हणाले, 'राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा मी घेत आहे. आतापर्यंत कोल्हापूर, सोलापूर, मिरज, पुणे, मुंबईतील महाविद्यालयांचा आढावा घेतला. तेथे काय अडचणी आहेत ? त्यावर काय उपाययोजना करता येतील ? नवीन कोणत्या गोष्टी देता येतील ? याची माहिती संकलित केली. औरंगाबादेतील रुग्णालय व महाविद्यालयाचा राउंड घेतला. मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याने आज माहेरात आल्याचा आनंद झाला आहे. बाह्य रुग्ण विभाग, सुपरस्पेशालिटी, वसतिगृहांमध्ये चांगल्या सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने काही गोष्टींचा आढावा घेतला. औषधी हा महत्त्वाचा घटक आहे. येथे दररोज २५०० रुग्ण येतात. वर्षाला २० हजारांहून अधिक प्रसुति होतात. साहजिकच औषधी मोठ्या प्रमाणावर लागते. एकत्र औषधी खरेदीसाठी दोन वर्षांपूर्वी हाफकिन मंडळ तयार केले होते. सद्यस्थितीला औषधीचा तुटवडा आहे. तो दूर करण्यासाठी एक जून रोजी ४० औषधींचे दरकरार होतील आणि दीड महिन्यात औषधी उपलब्ध होतील,' असा दावा त्यांनी केला. 'एमबीबीएसच्या १५० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १४० जागा झाल्या. विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा दिली, पण तिथे फर्निचर उपलब्ध नाही. पीडब्ल्यूडीने निविदा काढली पण त्यात त्रुटी आली. वाचनालयाच्या इमारतीच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. दोन्ही ठिकाणी फेरनिविदा होतील आणि लवकरच ही अडचण दूर होईल. गरीब रुग्णांची अडचण होऊ नये यासाटी घाटी रुग्णालयाची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे,' असे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.

\Bकचरा व पाणीप्रश्नावर चर्चा

\Bडॉ. तात्याराव लहाने यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी घाटीतील पाणीप्रश्न आणि कचरा याबाबत चर्चा केली. घाटीतील अंतर्गत जलवाहिनी नादुरुस्त आहे त्यामुळे पाणी पूर्ण क्षमतेने येत नाही. असे सांगितल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोलून दुरुस्ती करून घेतली जाईल, असे लहाने यांनी सांगितले. घाटीत सात ते आठ टन कचरा साठला आहे. ओल्या कचऱ्यावर घाटीने प्रक्रिया करावी, सुका कचरा महापालिका उचलून घेऊन जाईल, असे ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी दंगेखोर पोलिसांच्या रडारवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवाबपुरा, मोतीकारंजा भागात ११ मे रोजी रात्री झालेल्या दंगलीमध्ये पोलिसांच्या गोळीबारात रबरी गोळ्या लागून अनेक दंगेखोर जखमी झाले आहेत. यापैकी काही जखमींची ओळख पोलिसांना पटली आहे. हे जखमी दंगेखोर पोलिसांच्या रडारवर आहेत. दरम्यान, अनेक जखमी दंगेखोर उपचारासाठी शहराबाहेर पसार झाले असल्याची माहिती ‌विश्वसनीय सूत्रांनी दिली.

नवाबपुरा, राजाबाजार, मोतीकारंजा, शहागंज भागांत ११ मे रोजी दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. सुमारे सात तास हा प्रकार सुरू होता. दंगेखोरांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर व रबरी गोळ्यांचा वापर केला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेकजण जखमी झाले आहेत. या जखमीपैकी काही जणांनी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. पोलिसांच्या भितीने काही जखमी बाहेरगावी उपचार घेण्यासाठी रवाना झाले आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर असे २० जखमी आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे जखमी पोलिसांच्या रडार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

डीव्हीआर तपासणीसाठी पाठवले

दंगेखोरांचे चित्रिकरण मिळवण्यासाठी पोलिसांनी नवाबपुरा भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पाच डीव्हीआर जप्त केले आहेत. या डीव्हीआरमधील डेटा उडवून टाकण्यात आला आहे. हा डेटा पुन्हा मिळविण्यासाठी (रिकव्हर करण्यासाठी) मुंबईच्या कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत हे पाच डीव्हीआर पाठवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर खोदकामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली प्रशंसा

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी सिल्लोड नगर पालिकेने खेळणा प्रकल्पात सुरू केलेल्या चर खोदकामाची जिल्हाधिकारी उदय चौधरी प्रकल्पास भेट देऊन प्रशंसा केली.

भीषण पाणीटंचाईच्या काळामध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना सिल्लोड नगर पालिकेने खेळणा मध्यम प्रकल्पात चर खोदण्याचे काम हाती घेऊन टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केल्याबाबत प्रशंसा करीत इतरांनीही असे उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले.

सिल्लोड शहराची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे. या शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे ही तारेवरची कसरत ठरली असती. ही कसरत यशस्वी होण्याची शक्यता कमी असताना पाण्यासाठीचा वणवा पेटला असता, परंतु पालिकेने चर खोदण्याचा उपक्रम हाती घेऊन सिल्लोड शहरासह गावांच्या पाणी प्रश्नांवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, अशी प्रशंसा यावेळी केली.

यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय अधिकारी शिवाजी शिंदे, तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार संजय सोनवणे, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्ष शकुंतला बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, सलिम हुसेन, नगरसेवक रऊफ बागवान, सत्तार हुसेन, रईस मुजावर पठाण, संजय मुरकुटे, अकिल देशमुख, जगन्नाथ कुदळ, फईम पठाण, नगर पालिका मुख्याधिकारी सचिन तामखडे, प्रकाश बनसोड, रमाकांत बाच्छे, सुनील गोराडे, सय्यद सलिम, गोरख घाडगे, अताउल्लाह पठाण पंचायत समिती, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांची यावेळी उपस्थिती.

\Bगाळ शेतकऱ्यांनी न्यावा\B

'मोठ्या जिद्दीने व मेहनतीने चर खोदून गाळ वर काढण्यात आला आहे. वर काढण्यात आलेला गाळ पुन्हा चरात जाऊ नये व मेहनत वाया जाऊ नये, मेहनतीवर पाणी फिरू नये म्हणून हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांनी घेऊन जावे. यासाठी स्थानिक प्रशासन व नगर पालिकेने संयुक्तपणे जनजागरण करावे,' असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले.

\Bटँकरग्रस्त गावांतील कामांबाबत नाराजी\B

सिल्लोड तालुक्यात करण्यात येणारी जलसंचयाची कामे व शासकीय निमशासकीय योजनेच्या विविध कामाची पाहणी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी केली. शासकीय योजनेतील साहित्याचे लाभार्थींना वाटप करून टंचाई व सुरू असलेल्या कामांबाबत अधिकाऱ्याशी चर्चा केली. जिल्हाधिकारी चौधरी यांनी ११ गावांना भेटी देऊन विविध समस्याची प्रत्यक्ष माहिती घेतली. बुधवारी भवन येथून पाहणी दौरा सुरू झाला. पिंपळगाव पेठ, कायगाव, वरूड भवन, सिल्लोड, मंगरूळ, पालोद, भराडी, धावडा, पेंडगाव, धारला, घाटनांद्रा आदी गावांना भेटी देऊन जलयुक्त शिवार योजनेची कामे, पाणी टंचाईची परीस्थिती पाहून मिरची, डाळींब, सेंद्रीय शेती उत्पादक शेतकरी गटांतील शेतकऱ्यांशी चर्चा केली. या बरोबरच पॉलिहाउस, कांदाचाळ, शेडनेट, नर्सरी, साठवण तळे, शेततळे, कोरडवाहू शेती अभियान आदींच्या कामांना भेटी दिल्या. जलयुक्त शिवार योजनेची कामे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही गावांत कामे ही पूर्ण झाली आहेत. अशा गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील ११५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी महासंचालक खात्यातर्फे जारी करण्यात आले आहे. यामध्ये शहर व ग्रामीण पोलिस दलातून सहा निरीक्षक जिल्ह्याबाहेर गेले असून सात नविन निरीक्षक शहरात येणार आहेत.

शहरातून बदली झालेले अधिकारी; हेमंत कदम (बीड). अविनाश आघाव (दहशतवाद विरोधी पथक), सुशील जुमडे (अमरावती ग्रामीण), शिवाजी कांबळे (बुलडाणा), मारोती पंडित (गुप्तवार्ता पुणे), सुरेश वानखेडे (महामार्ग सुरक्षा पथक)

शहरात येणारे नवेन अधिकारी; संदीप गुरमे नांदेड ते औरंगाबाद शहर, अनिल गायकवाड नांदेड ते औरंगाबाद शहर, राजकुमार सोनवणे लातूर ते औरंगाबाद शहर, नईम पाशा अब्दुल हकीम हाश्मी नांदेड ते औरंगाबाद ग्रामीण, योगेश गावडे जालना ते जातपडताळणी औरंगाबाद, उद्धव जाधव ठाणे ते औरंगाबाद, घनश्याम पाळवदे बीड ते जातपडताळणी औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज एमआयडीसीत कामगाराचे उपोषण

0
0

वाळूजमहानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील व्हेरॉक कंपनीमधून कोणतीही पूर्वसूचना न देता एका कामगाराला कामावरून काढून टाकल्याने त्यांनी शुक्रवारी आपल्या परिवारासह कंपनीच्या गेटसमोर उपोषण सुरू केले.

यासंदर्भात रामकिसन आसाराम जाधव यांनी सांगितले की, ते मागील २१ वर्षांपासून व्हेरॉक इंजिनीअरिंग प्रा. लि. कंपनीमध्ये काम करत होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने २० नोव्हेंबर २०१७ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता जाधव यांच्याकडून राजीनामा घेतला. या प्रकारामुळे जाधव कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे जाधव यांनी व्हेरॉक कंपनीच्या व्यवस्थापनाकडे परत कामावर घेण्यासाठी विनंती केली, परंतु जाधव यांच्या विनंतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.

या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाचे रवींद्र काळे, अप्पासाहेब कुढेकर, शिवाजी मार्कंडे पाटील, अशोक मोरे, सचिन मिसाळ यांच्यासह छावा मराठा संघटनेने पाठिंबा दिला. रामकिसन जाधव यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून २४ एप्रिल २०१८ रोजी कामगार आयुक्त, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक, व्हेरॉक कंपनीचे उपाध्यक्ष यांना अर्ज करून कामावर परत घेण्याची विनंती केली होती, परंतु याची कोणीही दाखल न घेतल्यामुळे हे उपोषण करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कत्तलीसाठी नेणारी जनावरांरे पकडली

0
0

वाळूजमहानगर : औरंगाबाद पुणे महामार्गावर लिंबेजळगाव टोल नाक्यावर शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास जनावरे असलेला टेम्पो पकडला. वाळूज पोलिसानी १४ जनावरांसह तिघांना ताब्यात घेतले आहे. नेवासा गावाकडून ओरंगाबादकडे येणाऱ्या टेम्पोमध्ये (क्रमांक एमएच २० डीएस ५१२९) जनावरे असल्याचे तेथून जाणारे नंदकिशोर नितनवरे यांनी पाहिले. त्यांची याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे श्रीनिवास धुप्पड व सचिन राठोड यांना फोनवरून दिली त्यांनी. त्यांनी ही माहिती वाळूज पोलिसांना दिली. वाळूज पोलिस ठाण्याचे साहायक फौजदार दत्तात्रय साठे व सानप यांनी घटनास्थळी जाऊन गाडीसोबत असलेले सयद जबरअली असलम अली (वय ४२), शेख शेरू शेख महंमद (१९), शेख अरबाज शेख इकबाल (२०, सर्व रा. वाळूज ता. गंगापूर) यांची चैकशी केली असता ही जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती त्यांनी दिली. नंदकिशोर नितनवरे यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमित बागूल हे करत आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील पदनिर्मितीस मंजुरी देण्याची मागणी

0
0

औरंगाबाद : घाटी रुग्‍णालयातील मुत्रविकार व मुत्रपिंडविकार विभागातील पदनिर्मितीस मान्यता द्यावी, रुग्‍णांच्या औषधीसाठी अनुदान वाढवून मिळावे, अशी मागणी अभ्यासत समिती सदस्य नारायण कानकाटे यांनी वैद्यकीय सहसंचालकांकडे केली आहे.

घाटी रुग्‍णालयात मराठवाड्यासह, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातून मोठ्याप्रमाणवर रुग्‍ण उपचारासाठी येतात, मात्र घाटीमध्ये मूत्रविकार व मूत्रपिंडविकार तज्‍ज्ञ उपलब्‍ध नसल्यामुळे रुग्‍णांची गैरसोय होते. परिणामी रुग्‍णांना मुंबई व पुणे येथे उपचारासाठी धावपळ करावी लागते. घाटीमध्ये गेल्या काही वर्षांपासून नेफ्रॉलॉजी विभागाची इमारतही तयार असून, यंत्रसामग्रीही उपलब्‍ध आहे. केवळ विषयतज्‍ज्ञांअभावी रुग्‍णसेवेत अडचणी येत आहेत. यासह कार्डिओलॉल विषयाच्या पदाच्या निर्मितीचा प्रस्तावही संचालनालाया सादर करण्यात आला होता. या पदनिर्मिती प्रस्तावास मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासह रुग्‍णांच्या औषधांसाठी अनुदान वाढवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजसमोर तीन वाहनांचा अपघात

0
0

वाळूजमहानगर : औरंगाबाद-पुणे महामार्गावरील बजाज कंपनीसमोर शुक्रवारी (२५ मे) सकाळी आठच्या सुमारास तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला. या अपघातात छोटा हत्तीचालक जखमी झाला असून, तिन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर इतर दोन वाहनांचे चालक घटनास्थळावरून पसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक (क्रमांक एमएच२० एडब्ल्यू ४५७३) अहमदनगरकडून औरंगाबादकडे येत होता. बजाज समोरून पाटोदाकडे वळण घेत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच १२ एएफ ८२८६) आयशरला जोराची धडक दिली. या धडकेमुळे आयशर ट्रक चालकाने नियंत्रण सुटून तो आयशर ट्रक औरंगाबादकडून बजाज कंपनीत मेटरियल

घेऊन जाणारा छोटा हत्तीवर (क्रमांक एमएच २० एसी ५५४१) धडकला. या अपघातात छोटा हत्ती चालक किशोर एकनाथ राऊत (४०, रा. रांजणगाव शेणपुंजी ता. गंगापूर) हे जखमी झाले. अपघातानंतर ट्रक रस्त्यालगत असलेल्या पुलावर जाऊन धडकला. या पुलाच्या कठड्यात ट्रकचे टायर फसले असून, ट्रक चालक उडी मारून पसार झाला आहे. या अपघात आयशर ट्रकला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने हा आयशर छोटा हत्तीला समोरून धडकला. त्यामुळे आयशरच्या पाठीमागील व पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सतीश जोगस व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्याकडेला हलविली. यावेळी प्रवीण काकडे, लक्ष्मण पन्हाळे, राजू

महाजन, रामेश्वर राऊत, ज्ञानेश्वर राऊत, सतीश शिंदे, सचिन घोडके आदींनी मदत करीत छोटा हत्तीचालक किशोर राऊत यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखले केले. या अपघातात किशोर राऊत याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले आहे. या अपघाताची एमआयडीसी वाळूज पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जगदाळे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images