Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जनगणनेसाठी ओबींसींची निदर्शने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समितीतर्फे ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

देशभरातील ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू करा, स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना असलेल्या आरक्षणाची व्यापी लोकसभा व विधानसभा निवडणुकींमध्ये मतदारसंघ निर्माण करून वाढवण्यात यावी, फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशा विविध २२ मागण्यांसाठी प्राथमिक स्वरूपातील निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात आली.

फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, ओबीसींची जातनिहाय जनगणना होत कशी नाही, झालीच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स. सो. खंडाळकर, सुभाष महेर, रमेश धनेगावकर, रतनकुमार पंडागळे, संदीप घोडके, विष्णू वखरे, महादेव आंधळे, शिवाजी हुसे, सरस्वती हरकळ, संजिवनी घोडके, संजीवन घोडके आदींसह शेकडो बांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीच्या योगदानातून ‘लिम्का रेकॉर्ड’

0
0

घाटीच्या योगदानातून 'लिम्का रेकॉर्ड'

६ तासांत ३५ केंद्रांमध्ये १६ हजारांवर महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणीचा रेकॉर्ड; घाटीला प्रमाणपत्र प्रदान

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकाच दिवशी आणि एकाच वेळी केवळ सहा तासांत देशातील ३५ केंद्रांवर तब्बल १६ हजारांपेक्षा जास्त महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली होती आणि हा देशातील एक विक्रम ठरला आणि त्याची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे. मागच्या वर्षी पाच जून रोजी या विक्रमाची नोंद झाली होती आणि विशेष म्हणजे घाटीचा स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग हे एक महत्वाचे तपासणी केंद्र होते. यानिमित्ताने आज मंगळवारी (५ जून) एका छोटेखानी कार्यक्रमात घाटीला हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आणि अधिष्ठाता डॉ. कानन ये‍ळीकर यांनी हे मानाचे प्रमाणपत्र स्वीकारले.

या छोटेखानी कार्यक्रमाला डॉ. येळीकर यांच्यासह उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, पीजीआय-चंदीगढ येथील डॉ. ठाकूर आदींची उपस्थिती होती. देशाला भेडसावणाऱ्या अॅनेमिया या आजाराची नेमकी स्थिती जाणून घेण्याच्या हेतुने तसेच अॅनेमियाबाबत जनजागृती करण्यासाठी एका नामांकित औषधी कंपनीच्या वतीने हा उपक्रम मागच्या वर्षी घेण्यात आला होता. या उपक्रमात एकाच दिवशी आणि एकाच वेळी देशातील ३५ केंद्रावर केवळ सहा तासांमध्ये १६ हजारांपेक्षा जास्त महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली होती. या ३५ केंद्रांमध्ये घाटीचा स्त्रीरोग विभाग हे एक महत्वाचे व मराठवाड्यातील एकमेव केंद्र होते आणि एकट्या घाटीमध्ये दोन हजारांवर महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली होती. त्या उपक्रमासाठी घाटीने मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसारही केला होता. त्याचाच परिणाम म्हणून देशभरातील १६ हजार तपासण्यांपैकी २ हजार महिलांची तपासणी केवळ घाटीमध्ये झाली होती. हा देशातील पहिलाच विक्रम ठरला आणि त्याची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली. यानिमित्ताने मंग‍ळवारी घाटीच्या बाह्यरुग्ण विभागात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात डॉ. येळीकर यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला.

वर्षपूर्तीला ५४० महिलांची तपासणी

'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'च्या वर्षपूर्तीनिमित्त आणि प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमानिमित्त मंगळवारी पुन्हा हिमोग्लोबिन तपासणीचा उपक्रम घेण्यात आला. या प्रसंगी तब्बल ५४० महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यात काही पुरुषांचीही हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यानिमित्त ओपीडीमध्ये आलेल्या रुग्ण व नातेवाईकांची तपासणी करण्यात आली.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अॅनेमिया हा भारतीय महिलांना भेडसावणारा गंभीर आजार होता आणि स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही या परिस्थितीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळेच महिलांनी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असून, कुटुंबियांनीही महिलांच्या आहार व आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग विभागप्रमुख, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’साठी विशेष मोबदला परतावा पंधरवडा

0
0

औरंगाबाद : 'सीजीएसटी' आयुक्‍तालयातर्फे ३१ मे ते १४ जूनदरम्यान दुसऱ्यांदा विशेष मोबदला परतावा पंधरवडा मोहीम राबविण्यात येत आहे. प्रलंबित विशेष परतावाचे दावे या मोहिमेत मार्गी लावण्यात येत आहेत. यापूर्वी १५ ते ३० मार्चदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली होती. याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ३० एप्रिल किंवा त्यापूर्वी आलेल्या विशेष परतावा दाव्याचे अर्ज, अबकारी, केंद्रीय आणि राज्य वस्तू व सेवा कर अधिकारी हे दावे सोडवणार आहेत. अर्जदारांनी 'अर्ज जीएसटी आरएफडी-०१A' ही प्रक्रिया रिफंड अर्जाची प्रत, यासह महत्त्वाची कागदपत्रे हे कर अधिकाऱ्यांकडे दाखल करायचे आहेत. फक्‍त ऑनलाइन अर्जाबरोबर वरील सर्व महत्त्वाचे कागदपत्रे गरजेचे आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय वस्तू व सेवाकर आयुक्‍त श्रीकांत पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॅस्टिकचा वापर टाळा,जोशी यांनी केले आवाहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तामपानवाढ रोखण्यासाठी आतापासून योग्य खबरदारी, उपाययोजना करणे आ‌वश्यक आहे, अन्यथा अशीच परिस्थिती राहिल्यास मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. समुद्रकिनारी असलेली अनेक छोटी बेटे पाण्याखाली जातील, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञ एन. ए. जोशी यांनी व्यक्त केली. प्लास्टिकचा वापर टाळा, विजेचा वापर कमी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऊर्जा सहयोग आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सतर्फे भानुदास चव्हाण सभागृहात मंगळवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऊर्जा सहयोगी संस्थेचे उत्तम कळवणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जलतज्ज्ञ माधवराव चितळे, विलासचंद्र काबरा, सुधीर देशमुख, सुभाष मांगुळकर आदी उपस्थित होते.

'प्लास्टिक पोल्युशन आणि ग्लोबल वॉर्मिग' या विषयावर बोलताना एन. एन. जोशी म्हणाले, 'आपण अन्न, वस्त्र, निवारा या तीनच मुलभूत बाबींचा विचार प्राधान्याने करतो, पण, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, उर्जा हे निसर्गाकडून मिळेलच, असे गृहीत धरतो. आजची परिस्थिती पाहता खरंच शुद्ध हवा मिळते का, असा प्रश्न आहे. दूषित पाण्यामुळे देशभरात हजारो लोकांचा मृत्यू होतो. जगातील १६ टक्के लोक दूषित पाण्यामुळे आजारी पडतात. वातावरणातील बदलाचे (ग्लोबल वॉर्मिंग) मोठे दुष्परिणाम भोगावे लागतील.'

प्लास्टिक बंदीवर कायदा आहे. मात्र, कायद्यापेक्षाही नागरिकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळला तर प्लास्टिक पिशव्या बनविणारे उद्योगधंदे तोट्यात येतील. पर्यायाने तोट्यात आलेले उद्योग बंद पडतील व पर्यायवरणाच्या संरक्षणासाठी आपलाही हातभार लागेल. त्यामुळे पृथ्वीवरील आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञ डॉ. जोशी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांचा आज स्टार्ट अप उद्योजकांशी संवाद

0
0

औरंगाबाद : स्टार्ट अप योजनेतून उद्योग सुरू केलेल्या उद्योजकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता औरंगाबादेतील ३३ उद्योजक यात सहभागी होतील. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्टार्ट अप उपक्रमांतर्गत देशभरात अनेक ठिकाणी नवीन उद्योग सुरू झाले. या योजनेची फलनिष्पत्ती, अडचणी, भविष्यात काय केले जाणार आहे ? यासंदर्भात बुधवारच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये चर्चा अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बचत गटांमार्फत कागदी पिशव्या उत्पादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यामुळे जिल्हा परिषदेने बचतगटांमार्फत कागदी पिशव्या तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी दिली.

पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केली. त्यामुळे दैनंदिन वापरासाठी कॅरीबॅगऐवजी कापडी, कागदी पिशव्यांचा पर्याय विचारात घेतला गेला आहे. या पार्श्वभूमीवर कौर म्हणाल्या, की जिल्ह्यातील महिला बचतगटांमार्फत कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या बचतगटांचे उत्पादन सुरू झाल्यानंतर त्यांना बाजारपेठेशी जोडून दिले जाईल. त्यातून रोजगार उपलब्ध होईल आणि प्लास्टिकचा वापर टाळता येईल.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत जिल्ह्यात ५०४४ महिला बचत गट कार्यरत आहेत. या चळवळीच्या माध्यमातून शेळीपालन, दुग्धव्यवसाय, डेअरी, शिवण यंत्र, कटलरी दुकान आदी व्यवसाय थाटण्यात आले आहेत. त्यापुढे जात कौर यांनी बचत गट सक्षमीकरणासाठी कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्याचे ठरविल्याने बचतगटांना मोठ्या व्यवसाय संधी उपलब्ध होणार आहेत. 'डीआरडीए'च्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फतेलष्करावर हल्ला; तिघांना नगरमध्ये अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप कामगार आघाडीचे सरचिटणीस संजय फतेलष्कर हल्लाप्रकरणातील तीन पसार आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी घोडेगाव येथे करण्यात आली. फतेलष्कर यांच्यावर सहा मे रोजी विद्यापीठ परिसरात तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

संजय फकीरचंद फतेलष्कर (वय ४० रा. बेगमपुरा) हे गोगाबाबा टेकडी परिसरातून व्यायाम करून सायंकाळी घरी परत येत असताना त्यांच्यावर कारमधून आलेल्या आरोपींनी तलवारीने हल्ला केला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. प्रमुख आरोपी बाळू गायकवाड व त्याचे साथीदार पसार झाले होते. ते सोमवारी सायंकाळी घोडेगाव परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून बाळू कैलास गायकवाड (वय २५ रा. कैकाडीवाडा, बेगमपुरा), गिरीश बाबासाहेब जाधव (वय २४, रा. बजरंग चौक, पडेगाव) आणि शैलेश संदीप पटारे (वय २१ रा. ढिंबर गल्ली) यांना अटक केली. पोलिसांना हुलकावणी देऊन औरंगाबाद व अहमदनगर जवळील घोडेगाव शिवारात राहत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यांना बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई नगरचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर अधीक्षक घनश्याम पाटील, उपाधीक्षक अभिजित शिवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, डॉ. शरद गोर्डे, श्रीधर गुठ्ठे, सोन्याबापू, योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लीकार्जुन बनकर, रवींद्र कर्डिले, विशाल अमृते, दिनेश मोरे, विजय ठोंबरे, दत्ता गव्हाणे, योगेश सातपुते व बबन बेरड यांनी केली.

संदीप पहेलवान पसारच

या प्रकरणातील प्रमुख आरोपींमध्ये संदीप खरात उर्फ संदीप पहेलवानचा समावेश आहे. फतेलष्कर यांच्यावरील हल्ला प्रकरणाला एक महिना उलटला आहे. इतर आरोपी पकडण्यात आले असले तरी संदीप पहेलवान मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याला विजेच्या वाढत्या दराचा खोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडीच्या विना अडथळा पाण्याला सध्या विजेच्या वाढत्या दराने खोडा घातला आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा कायम ठेवण्यासाठी अॅटोमॅटिक चेंज ओव्हर स्वीच बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठीचे पैसे महापालिकेने भरले सुद्धा. मात्र, या ओव्हर स्वीचचे दर वाढल्याने निविदा प्रक्रियेनंतर आता पालिकेला आणखी १७ लाख रुपये भरावे लागतील. त्यासाठी ही प्रक्रिया तूर्तास थांबली आहे, अशी माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गणेशकर म्हणाले, फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे दुसऱ्या फिडरवरून मॅन्युअल वीज पुरवठा करावा लागत होता. यासाठी एक ते दोन तास लागत होते. यामुळे शहरातील पाणी पुरवठा बाधित होत होता. यामुळे या ठिकाणी चेंज ओव्हर स्वीच बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. पालिकेने स्वीच बसविण्यासाठी ५४ लाख १७ हजार रुपये नोव्हेंबरमध्ये महावितरण कार्यालयाकडे भरले. स्वीच बसविण्यासाठी निविदा काढण्यात आली. या निविदेत सदर स्वीचची किंमत ७३ लाख २६ हजार रुपये झाली आहे. चेंज ओव्हर स्वीचची किंमत वाढल्याने ही प्रक्रिया थांबलेली आहे. महापालिकेने १७ लाख रूपये भरल्यास स्वीच घेण्याबाबत कारवाई केली जाणार आहे. तसेच फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा मंगळवारी तांत्रिक कारणांमुळे दोन तासांकरिता खंडित करण्यात आला होता, अशी माहितीही गणेशकर यांनी दिली.

………

\Bघरभाडे घेणाऱ्या ६९३ जणांवर झाली कारवाई

\Bकामाच्या ठिकाणी न राहता मुख्यालयात राहून घरभाडे घेणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर महावितरण विभागाकडून कारवाई सूरू आहे. वर्ष २०१६ ते २०१८ या काळात ५६१ कर्मचाऱ्यांमधील ४८३ कर्मचारी अधिकारी यांचे घरभाडे थांबविण्यात आले. यात १३९ जणांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून सात कर्मचाऱ्यांना आरोपपत्र देण्यात आले आहे. तर २३ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या कारवाईतून २४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. २०१८च्या चालू वर्षात १३२ कर्मचाऱ्यांचे घर भाडे थांबविण्यात आले असून ११३ जणांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. दोन लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. या कारवाईत वर्ग दोनच्या १०७ कर्मचाऱ्यांचा समावेश असून वर्ग एकच्या आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विद्युत सहाय्यकांचा पगार कमी असल्याकारणाने त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले असल्याची माहिती गणेशकर यांनी दिली.

…………

\B२४ तास नियंत्रण कक्ष

\Bवादळी पावसामुळे शहरातील अनेकांनी संबंधित अभियंता, लाइनमन यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शहरासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ७०६६०४२४१० व ७०६६०४१२ या संपर्क क्रमांकावर नियंत्रण कक्षात आपली तक्रार २४ तास नोंदवू शकता अशी माहिती गणेशकर यांनी दिली

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'नालेसफाईत महापालिका अपयशी'

0
0

Unmesh.deshpande@timesgroup.com

Tweet - @UnmeshdMT

औरंगाबाद :

नाले सफाईच्या कामात महापालिका अपयशी ठरली आहे, अशी कबुली महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी 'मटा' शी बोलताना दिली. डॉ. निपुण विनायक यांनी १६ मे रोजी पालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर १५ ते २० दिवसात त्यांनी पालिकेतील विभागांचा आढावा घेतला, काही विभागांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी काम देखील सुरू केले. 'मटा'ला त्यांनी मंगळवारी मुलाखत दिली.

प्रश्न : नाले सफाईचे काम योग्य प्रकारे होताना दिसत नाही?

डॉ. विनायक : नाले सफाई वेळेवर झाली नाही हे महापालिकेचे फेल्युअर आहे. त्याबद्दल शहर अभियंत्यांना ताकीद दिली आहे. नाले सफाईचे काम दोन महिन्यांपूर्वीच व्हायला हवे होते, पण ते झाले नाही. आता गतीने काम होईल.

प्रश्न : पाणीपुरवठ्याची स्थिती देखील अद्याप सुधारलेली नाही?

डॉ. विनायक : पाणीपुरवठा विभागात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच हेमंत कोल्हे यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. नहरीचे पुनरुज्जीवन, जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यावर देखील चर्चा सुरू झाली आहे. या कामामुळे पाण्याच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल. नहरींचा ऐतिहासिक ठेवा देखील जतन केला जाईल. पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याबद्दल डॉ. संजय दहसहस्त्रे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांची दखल घेऊन काम करण्याचे ठरविण्यात आले आहे.

प्रश्न : शंभर सिटीबस खरेदीचा निर्णय एकदम कसा काय घेतला?

डॉ. विनायक : सिटीबस खरेदीचा निर्णय एसपीव्हीच्या पहिल्या बैठकीत सुमारे एक वर्षापूर्वी झाला होता, पण या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. विनाकारण हा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. शहरासाठी १५० सिटीबसची गरज असताना ५० सिटीबस खरेदी करण्याचा अनावश्यक निर्णय घेण्यात आला. शहरात २७ ते २८ हजार अॅटोरिक्षा आहेत. ७८ टक्के नागरिक दुचाकी वापरतात. सिटीबस सेवा सुरू झाली तर नागरिकांना दिलासा मिळेल, असे वाटले आणि पहिल्या टप्प्यात १०० सिटीबस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी स्मार्टसिटीच्या एसपीव्हीचे अध्यक्ष सुनील पोरवाल यांनी खूप मदत केली. ५० च्या ऐवजी १०० सिटीबस खरेदी केल्या तर नागरिकांना दुप्पट सेवा उपलब्ध होईल. सिटीबसच्या सेवेवरील एसपीव्हीचा खर्च वाचेल आणि देखभाल-दुरुस्तीच्या (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) कामावरील खर्च देखील कमी होईल.

प्रश्न : सिटीबसेस प्रत्यक्षात केव्हा उपलब्ध होतील?

डॉ. विनायक : ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यात प्रामुख्याने सर्व सिटीबसेस उपलब्ध होतील. डिसेंबर अखेर सर्वच्या सर्व १०० सिटीबस शहरातील रस्त्यांवरून धावू लागतील. यापैकी १५ ऑगस्ट रोजी काही बसेस सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सिटीबसच्या इच्छुक पुरवठादारांबरोबर प्रिबीड बैठक होणार आहे, त्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील.

प्रश्न : स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत आगामी काळात कोणकोणत्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे?

डॉ. विनायक : स्मार्टसिटीच्या कामात सिटीबस हा पहिला टप्पा आहे. त्यानंतर आता इ गर्व्हनन्समध्ये काम करण्याचे ठरविले आहे. नागरिकांना महापालिकेकडून ज्या सोईसुविधा अपेक्षित आहेत त्या सर्व सोई सुविधा ऑनलाइन उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी युद्धपातळीवर काम केले जाणार आहे. एक खिडकी योजना देखील लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. एखाद्या कामासाठी वारंवार चकरा मारण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. स्मार्टसिटी योजनेत ग्रीनफिल्ड हा एक घटक आहे. या घटकावर काम होईलच, पण त्यापूर्वी या शहरातील वारसा स्थळांचे जतन कसे करता येईल याचाही विचार केला जाणार आहे. जुन्या शहरातील रस्ते, वीज, पाणी, घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधांमध्ये सुधारणा करणे हे देखील स्मार्टसिटी प्रकल्पाचे काम आहे, त्या दृष्टीने येत्या काळात काम केले जाईल.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक अत्याचार: आरोपी शिक्षकाची माघार

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

लैंगिक अत्याचारप्रकरणात फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील शिक्षक सोहेल अब्दुल रऊफ पठाण याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल नियमित जामीन अर्ज मंगळवारी मागे घेतला.

न्या. संगीतराव पाटील यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. हा खटला जलदगतीने चालविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. आरोपी शाळेतील एका दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील वर्तन करत होता. तसेच त्याने पीडितेला मोबाइलवर अश्लिल व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केला होता. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून यावर्षी ८ जानेवारी रोजी वडोदबाजार पोलिस ठाण्यात आरोपी सोहेल अब्दुल रऊफ पठाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करण्यात आली. आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीने औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. वैद्यकीय अहवालात आरोपीने गैरकृत्य केल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता स्वप्नील जोशी यांनी जामिनाला विरोध केला. सुनावणीदरम्यान आरोपीने जामीन अर्ज मागे घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोंडदेखल्या कामामुळे जीव टांगणीला!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या विविध भागात सुरू केलेली नालेसफाईची कामे फक्त तोंडदेखली झाली असून जयभवानीनगरातून महापौरांनी पाठ फिरवताच तेथील काम अधिकारी व कंत्राटदारांनी तत्काळ थांबवले. त्यामुळे या भागात जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या भीतीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन आला दिवस ढकलावा लागत आहे.

नाल्यावरील बांधकामांमुळे जयभवानीनगरमध्ये नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी पावसामुळे या संपूर्ण भागात हाहाकार उडाला होता. सुमारे दोनशे घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसार पाण्यावर तरंगू लागले. तत्कालीन पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी जयभवानीनगरात भेट दिली आणि नाल्यावरची बांधकामे पाडण्याचे आदेश पालिकेला दिले. त्यानंतर वर्षभरात महापालिकेने नाल्यावरची मोजकी बांधकामे पाडून इतरांना अभय दिले. त्यातच भूमिगत गटार योजनेचे काम देखील याच नाल्यातून सुरू करण्यात आले. या योजनेअंतर्गत मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी नाल्यांचे खोदकाम करून नाले रुंद केले, परंतु नाल्याला संरक्षक भिंत मात्र बांधण्यात आली नाही. शिवाय ज्या ठिकाणी नाला उघड्यावरून वाहतो त्या ठिकाणी साफसफाईचे काम देखील वेळेत सुरू करण्यात आले नाही. भूमिगत गटार योजनेचे काम करताना चढ - उताराचे निकष देखील पाळण्यात आले नाहीत. त्यामुळे पहिल्याच पावसात नागरिकांची तारांबळ उडाली.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी फौजफाट्यासह जयभवानीनगरला भेट दिली. नालासफाईचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले. पाहणी करण्यासाठी महापौर येणार असल्याचे अगोदरच कळाल्यामुळे अधिकारी व कंत्राटदार तयारीत होते. जेसीबी मशीनसह संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. नालेसफाईचे काम देखील सुरू करण्यात आले होते, पण महापौरांनी पाठ फिरल्यानंतर काम बंद पडले. जयभवानीनगरात जैसे थे स्थिती निर्माण झाली. नाल्या काठच्या नागरिकांचा आपल्या घराशी संपर्क तुटला आहे. घरात ये जा करण्यासाठी त्यांनी नाल्याच्या दोन्हीही काठांना जोडणारी शिडी लावली आहे. शिडीवरून स्वत:चा तोल सांभाळत लहान मुले, महिलांना ये जा करावी लागत आहे.

जयभवानीनगरसारखीच शहराच्या अन्य भागातील नाल्यांची स्थिती आहे. महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नूर कॉलनीच्या नाल्यात जेसीबी मशीन नुसते उभे आहे. दिवसभरातून या मशीनच्या माध्यमातून थोडेफार काम करण्यात आले. नाल्यातून काढलेला गाळ नाल्याच्या काठावरच टाकण्यात आला. त्यामुळे पाऊस आल्यावर गाळ पुन्हा नाल्यात जाईल अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. महापालिका कार्यालयाजवळच्या नाल्याची अशी स्थिती असेल, तर अन्य नाल्यांची स्थिती काय असेल याचा विचारच न केलेला बरा.

जयभवानीनगरातील नालेसफाईच्या कामाबद्दल माहिती घेतली आहे. कंत्राटदाराकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे तेथे अडचणी आल्या आहेत. ज्या ठिकाणी काम करणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी काम सुरू झालेले नाहीत. त्यामुळे उद्या बुधवारी मी पुन्हा या भागाची पाहणी करणार आहे.

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिनाभरात पदवीचे निकाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या ३० दिवसात पदवी परीक्षेचे निकाल जाहीर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विक्रम नोंदवला. राज्यात प्रथमच मे महिन्यात पदवी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण तीन लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षी पदवीच्या निकालासाठी जुलै महिना उजाडल्यामुळे परीक्षा विभागावर जोरदार टीका झाली होती.

पदवी स्तरावरील बीएस्सी, बी. कॉम., बी. ए., बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीसीए, बीबीए, बीपीएड, डीटीएल, एलएलएम या अभ्यासक्रमांचे वेगवेगळ्या सत्रातील १३२ निकाल मे महिन्यात जाहीर झाले. परीक्षा विभागाने पदवी परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणपत्रिका तयार करण्यासाठी नियोजन केले होते. त्यामुळे फक्त ३० दिवसात निकाल जाहीर करण्यात यश आले. राज्यात मे महिन्यात पदवी परीक्षेचा निकाल लावण्याचा विक्रम 'बामू'च्या नावावर नोंदवला गेला. आतापर्यंत जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर झाला होता. मागील वर्षी परीक्षा विभागाचे कामकाज विस्कळीत झाल्यामुळे पदवीच्या निकालासाठी जुलै महिना उजाडला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक संघटनांनी विद्यापीठ प्रशासनावर टिकेची झोड उठवली होती. यावर्षी मे महिन्यात निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. बी. ए. अभ्यासक्रमाचे सर्वाधिक विद्यार्थी असल्यामुळे निकालासाठी ४५ दिवस लागले असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. डी. आर. नेटके यांनी सांगितले. एकूण तीन लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी पदवीची परीक्षा दिली होती. पदवीचा निकाल कमी वेळेत लागला असला तरी पदव्युत्तर वर्गाचे निकाल लावण्यास उशीर झाला आहे. सामाजिकशास्त्रे विषयात पाली अँड बुद्धिझम, लोकप्रशासन, राज्यशास्त्र, मराठी, उर्दू, अर्थशास्त्र, संगीत, समाजशास्त्र व हिंदी या विषयांचे निकाल जाहीर झाले आहेत. इतर विषयाचे निकाल रखडले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, फॉरेन्सिक सायन्स, हर्बल टेक्नॉलॉजी, प्लँट ब्रिडींग, बायोइन्फॉर्मेटीक्स, प्लँट बायोटेक्नॉलॉजी या विषयांचे निकाल जाहीर झाले आहेत. वाणिज्य शाखेच्या चार विषयांचे निकाल पूर्ण झाले आहेत. एलएलएम द्वितीय वर्षाचे बुधवारी निकाल जाहीर होणार आहेत.

दरम्यान, पदवी परीक्षेत कॉपीच्या दिड हजार प्रकरणात कारवाई करण्यात आली. कॉपीसाठी वापरले जाणारे बारा मोबाईल जप्त करण्यात आले.

------प्राचार्यांची बैठक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न सात अभियांत्रिकी महाविद्यालये आता 'बाटू'शी संलग्न झाली आहेत. प्रथम वर्षाचा विद्यार्थी दुसऱ्या वर्षाला 'बाटू'त प्रवेश घेणार आहे. दोन्ही विद्यापीठात परीक्षा आणि निकाल यांच्यात समन्वय राहण्यासाठी मंगळवारी विद्यापीठात प्राचार्यांची बैठक झाली. अॅसेसमेंटसाठी सहकार्य करण्याचे आवाहन परीक्षा विभागाचे संचालक डॉ. नेटके यांनी केले. रिक्त जागा आणि निकालात समतोल साधण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन प्राचार्यांनी दिले.

--------पदवी प्रमाणपत्र कॉलेजात घ्या

मार्च-एप्रिल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयात मिळणार आहेत. येत्या ११ जूनपासून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहन परीक्षा विभागाने केले. चार जिल्ह्यातील महाविद्यालयांकडे एकूण ६५ हजार प्रमाणपत्रे पाठवण्यात आली आहेत.

------कोट

पदवी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आहेत. पदव्युत्तर निकाल अंतिम टप्प्यात आहेत. परीक्षा ते निकाल असे काटेकोर नियोजन केल्यामुळे निश्चित कालावधीत निकाल जाहीर करणे शक्य झाले.

डॉ. डी. आर. नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर मराठमोळ्या संगीताचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अस्सल मराठमोळ्या संगीताची पर्वणी देणारा 'स्वराशिष' कार्यक्रम श्रवणीय ठरला. भूपाळी ते लावणी असा विविध कला प्रकारांचा आनंद घेत रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

श्री दत्तमाई संगीत विद्यालय आणि स्वराशिष ग्रुप यांच्या वतीने 'महाराष्ट्राची लोकधारा'वर आधारीत संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला. मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी सभागृहात मंगळवारी दुपारी कार्यक्रम झाला. यावेळी मराठमोळ्या गाण्यांचे सादरीकरण झाले. मराठी संस्कृतीचे पदर उलगडत गायकांनी रसिकांना खिळवून ठेवले. भूपाळी, वासुदेव, ओव्या, भक्तीगीत, भजन, अभंग, पावली, फटका, गोंधळ, वाघ्या मुरळी, जोगवा, कव्वाली, पोवाडा, भारुड, गवळण व लावणी अशा वैविध्यपूर्ण कला प्रकारांचे सादरीकरण झाले. अश्विनी देशपांडे, श्रेया उदगीरकर, हेमा उदगीरकर, साक्षी राखे, क्रांती राखे, क्षितीजा कुलकर्णी, अॅड. जयश्री काळे, प्रवीणा कन्नडकर, अपर्णा देवडीकर, शिल्पा जोशी, सिद्धी देशमुख, चैताली देशमुख व सारा परदेशी यांनी गाणी सादर केली. तर अश्विनी देशपांडे, मंदार देसाई व सोमनाथ भालेराव यांनी संगीत साथसंगत केली.

दरम्यान, या कार्यक्रमाला पं. विजय देशमुख, डॉ. वसुधा पुरोहित, चारुलता रोजेकर, श्रीकृष्ण चिंचोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या संगीत कार्यक्रमाला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंडो जर्मन टूल रुम’अभ्यासक्रमासाठी प्रथमच ऑनलाइन परीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंडो जर्मन टूल रुममधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा होणार आहे. १० जून रोजी ही परीक्षा होणार आहे. दोन अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी अकराशे विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयातंर्गत असलेल्या या संस्थेत विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीसाठी देशभरातून विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांना अडचण येवू नये या हेतुने प्रवेश प्रक्रिया ऑनलाइनचा निर्णय घेण्यात आला. यंदा प्रथमच ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेण्यात आला. पहिले वर्ष असल्याने परीक्षा सेंटर संस्थेचे मुख्य कार्यालयच असणार आहे. 'अॅडव्हॉन्स डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग' आणि 'डिप्लोमा इन मेकॉट्रॉनिक्स' या दोन अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा असणार आहे. तसेच यंदा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आलीकडे आणले. दरवर्षी दहावीच्या निकालानंतर ही प्रक्रिया होत असते. यंदा त्यापूर्वी प्रक्रियेत अर्ज मागविण्यात आले. १० जून रोजी परीक्षा होणार आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. दोन्ही अभ्यासक्रमाला साठ-साठ प्रवेश क्षमता आहे. या पुढे ही परीक्षा इतर शहरातील केंद्रावरही घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

0
0

औरंगाबाद - रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आंबेडकरनगर, आरतीनगर, भक्तीनगर, मिसारवाडी या परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर पिसादेवी व सिडको-हडको व वाळूज परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष के. व्ही. मोरे, अॅड. प्रशांत म्हस्के, अशोक कानडे, सिद्धोधन मोरे, सुरेश सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी कर्जमाफीची आठवी यादी आली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या नावांची आठवी यादी नुकतीच सहकार खात्याला प्राप्त झाली. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ३५२३ शेतकऱ्यांचा यात समावेश असून या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ५ कोटी ६२ लाखांची रक्कम दिली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत टप्प्याटप्प्याने याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. निकषप्राप्त शेतकऱ्यांची यादी सहकार खात्याकडे पाठविली जाते. तिथून ती जिल्हा बँकांना देऊन याद्या तपासल्या जातात. त्यात काही त्रुटी असेल तर ती दूर करून संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठव्या यादीमध्ये औरंगाबाद जिल्हा बँकेतंर्गत २१९७ सभासदांसाठी ३ कोटी ४५ लाख, जालना ५०५ सभासदांना ८८ लाख ६९ हजार, परभणी व हिंगोली जिल्ह्यातली ८२१ सभासदांना १ कोटी २८ लाख रुपये कर्जमाफी अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याशेजारच्या दोनशे टेकड्यांवर वृक्षलागवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड मोहिमेचा भाग म्हणून यंदा मराठवाड्यातील रस्त्यांच्या शेजारी असलेल्यास दोनशे मोठ्या टेकड्यांवरही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या झाडांचे संगोपन करण्यासाठी विविध गटांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी वृक्षलागवडीसंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीविषयी बोलताना डॉ. भापकर म्हणाले की, मराठवाडा विभागात यंदा वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दोन कोटी ९१ लाख आहे. मात्र विभागीय प्रशासनाने चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट सर्व यंत्रणांना दिले आहे. यावर्षी मराठवाड्याच्या विविध रस्त्यांच्या शेजारी असलेल्या टेकड्यांवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. येत्या १५ दिवसांमध्ये विविध गटांच्या माध्यमातून या टेकड्यांवर खड्डे खोदुन तेथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासह मराठवाड्यातील गायरान जमिनीवर वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे. या जमिनीवर 'नरेगा'तून शेततळे तयार करून या झाडांचे संगोपन करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.

\B'जिओ टॅगिंग'चे निर्देश \B

येत्या १५ जून रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षलागवडीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बैठकीपूर्वी विभागातील वृक्षलावगडीचे नियोजन करण्यात येणार असून १ जुलैपूर्वीच उद्दिष्टाच्या तुलनेत खड्डे खोदून 'जिओ टँगिंग' करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी डॉक्टरांच्या तोंडाला पालिकेचे कुलुप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साथीच्या आजारांची माहिती दडवण्याची चोख 'व्यवस्था' नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा महापालिकेने केल्याचे उघड झाले आहे. यंदाही 'साथीच्या आजारांची माहिती डायरेक्ट प्रेसला देऊ नये' असा अजब फतवा महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी (४ जून) समस्त खासगी डॉक्टरांना काढला आहे आणि अशी माहिती दिल्यास कारवाईचा गर्भीत इशाराही दिला आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांमध्ये अनामिक भीती व असंतोषाचे वातावरण असून, हा प्रकार लोकशाहीविरोधी असल्याचा सूर डॉक्टरांमधून उमटत आहे.

महापालिकेच्या अत्यंत अपुऱ्या व त्रोटक उपाययोजनांमुळेच दरवर्षी न चुकता साथीचे आजार बळावतात. त्याचाच परिणाम म्हणून डेंगी, चिकन गुनिया, मलेरिया, स्वाइन फ्लू व इतर आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. डेंगीने तर औरंगाबाद शहरात जणू कायमचा मुक्कामच ठोकला आहे. त्याचा फटका शहरातील बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच बसत आहे. मात्र तरीही योग्य ती साफसफाई, स्वच्छता व ठोस उपाययोजना काही होत नसल्याचे चित्र यंदाही अधोरेखित झाले आहे. पावसाळा येऊन ठेपला असला तरी शहरातील नालेसफाईला अजूनही मुहूर्तच लागलेला नाही आणि कचऱ्याच्या समस्येने तर गंभीर वळण घेतले आहे. जागोजागी दिसणारा व साचलेला कचरा, जाळण्यात येणारा व अर्धवट जळालेल्या कचऱ्यानेही शहरवासियांचा श्वास कोंडला जात आहे. अजूनही ठिकठिकाणी जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या धुरामुळे वेग‍ळीच समस्या उद्भवत आहे. केवळ महापालिकेच्या नाकर्तेपणामुळेच शहरात समस्यांची मालिका सुरू झाली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून साथीचे व इतर आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, ही भीती खरी ठरली तर त्यापासून नागरिकांना अनभिज्ञ ठेवण्यासाठीच पुन्हा महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही स्थितीसुद्धा दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खासगी डॉक्टरांना काढलेल्या फतव्यामध्ये, 'सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कुठल्याही साथीचा रुग्ण आढळल्यास प्रथम आरोग्य विभागाला कळविणे नर्सिंग होम अॅक्टनुसार बंधनकारक आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी साथरोग रुग्णविषयक माहिती डायरेक्ट प्रेसला देऊ नये' असे म्हटले आहे.

अधिकारी बदलले, फतवे कायम

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पूर्वीच्या अधिकाऱ्याच्या दहशतीमुळे खासगी डॉक्टर फार त्रस्त झाले होते. कोणत्याही कारणाशिवाय पूर्वीच्या अधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाच्या ढीगभर तक्रारी होत्या. पूर्वीचे अधिकारी गेले, नवीन अधिकारी आले; परंतु दहशतीची व फतव्यांची 'स्टाईल' कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांमध्ये असंतोष वाढत आहे.

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशी दारूच्या दुकानासमोरून रिक्षा चोरणाऱ्या संशयित चोराला गुन्हे शाखेने सोमवारी दुपारी मुकुंदवाडीमध्ये अटक केली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेचे पथक सोमवारी दुपारी सिडकोत गस्त घालताना मुकुंदवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ एक तरूण चोरीची रिक्षा विकरण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सापळा रचून संशयित आरोपी विनोद नारायण त्रिभुवन (वय २९, रा. गल्ली क्रमांक सात, मिसारवाडी) याला रिक्षासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कागदपत्राबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत ही रिक्षा हर्सूल टी पॉइंट जवळील दारूच्या दुकानासमोरून एका साथीदाराच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. त्याला रिक्षासह हर्सूल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई उपनिरीक्षक संजय बहुरे, सहाय्यक फौजदार शेख नजीर, तुकाराम राठोड, हिरासिंग राजपूत, संदीप क्षीरसागर, बबन इप्पर, प्रमोद चव्हाण, शिवाजी शिंदे व प्रभाकर राऊत यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडी कायद्याची सर्वत्र काटेकोर अंमलबजावणी करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माथाडी कायद्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही माथाडी कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. ९३ टक्के असंघटित कष्टकरी या कायद्याच्या लाभापासून दूर असून देशभरात या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी कामगारांनी एकत्र येत लढा पुकारावा, असे आवाहन मराठवाडा लेबर युनियनचे अध्यक्ष प्रा. सुधीर देशमुख यांनी केले आहे. माथाडी कायद्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी कामगार युनियन, मराठवाडा लेबर युनियन व हिंदू मजदूर सभेच्यावतीने मंगळवारी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये माथाडी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पटीयाल, बाजार समिती सभापती राधाकिसन पठाडे, आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हरीष पवार, किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय कांकरिया, ॲड. प्रकाश परांजपे, देवीदास किर्तीशाही, ॲड. मनोहर टाकसाळ, अली खान, सुभेदार मेजर सुखदेव बन, रंजन दाणी, कासम भाई आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना देशमुख यांनी माथाडी कामगारांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी आधी संघटित ताकद दाखविणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तर लोमटे यांनी सांगितले की, 'कायदा सर्व असंघटित कामगारांना देशपातळीवर लागू व्हावा, असा प्रयत्न होत असतानाच, राज्य सरकारमधील काही मंडळी हा कायदाच उखडून टाकू पाहात आहेत. त्याविरुद्ध कामगारांनी एकजूट करावी, असंघटित कामगारांच्या लढ्याचे नेतृत्व करावे.'

यावेळी वयोवृद्ध कामगार लक्ष्मण मंजुळे, रमेश नरवडे यांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र अंभोरे, देवचंद आल्हाट,छगन गवळी, प्रविण सरकटे, जगन भोजने, अरविंद बोरकर, कैलास लोखंडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images