Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एसटीच्या ७७० फेऱ्या रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेतन वाढीच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून विभागात शनिवारी ८०२ फेऱ्यांपैकी जवळपास ७७० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे ५७ लाखांचा महसूल बुडाला. नव्वद टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.

औरंगाबाद विभागात मध्यवर्ती बसस्थानक, सिडको, पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव येथील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला. शनिवारी सकाळच्या सत्रात काही बस आगाराबाहेर पडल्या. या बस गेल्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्याचे आवाहन अन्य कर्मचाऱ्यांना केल्यानंतर ते ही संपात सहभागी झाले. यानंतर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनही केले. काही अज्ञात व्यक्तींनी एसटीच्या चाकातील हवा सोडली. एसटी महामंडळाच्या कराराच्या नियमांचा विरोध करण्यासाठी बस स्थानकाबाहेर अनेक कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. औरंगाबाद बसस्थानकाहून निघालेल्या औरंगाबाद सुरत या बसच्या काचा कन्नडजवळ तर औरंगाबाद वाशिम बसच्या काचा आंदोलकांनी केंब्रीज स्कूलजवळ फोडल्या. त्यावेळी प्रवासी भयभित झाले होते.

कारवाईची भीती नाही

आंदोलनाबाबत एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, 'रावतेंनी चांगले वेतन देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी केलेला वेतन करार हा भ्रमनिराश करणारा आहे. शिवाय वेतन करार नाकारणाऱ्यांना कॅमेऱ्यात लिहून देण्याचे, राजीनामा देण्याची प्रशासनाची भाषा चुकीची आहे. वेतन सन्मानजनक करावे एवढीच आधीपासून मागणी आहे. संपात सहभागी झाल्यामुळे आम्हाला कारवाईची भीती नाही.'

विशेष रेल्वे सोडली

एसटीच्या संपामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने नांदेड ते औरंगाबाद विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला. दहा जून रोजी ही रेल्वे नांदेडहून ११.२० वाजून मिनिटांनी सुटणार आहे. औरंगाबादला ही रेल्वे ४.३० वाजता पोहोचणार आहे. औरंगाबादहून ही पॅसेंजर ५.१५ वाजता सुटेल. ती रात्री दहा वाजता नांदेडला पोहोचेल. ही रेल्वे पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना आणि बदनापूरसह मुंकुंदवाडी येथे थांबणार आहे.

संप कशासाठी आहे हे माहित नाही, पण कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यास ते कशाला आंदोलन करतील. खासगी गाड्यांमधून प्रवास करण्याचा माझा या पूर्वीचा अनुभव वाईट आहे. त्यांनी प्रवाशांना अक्षरश:लुटले. आता पुण्याला जाण्यासाठी कसे जावे? हा प्रश्न आहे. खासगी गाड्याने प्रवास केल्यास अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणावर राहील.

- किशोर कुलकर्णी, प्रवासी

आम्हाला जळगावला जायचे आहे. आता बाहेरून खासगी गाड्यांनी जा, असे सांगण्यात येत आहे. खासगी वाहनाचालकांनी अव्वाच्यासव्वा तिकीट दर घेऊन नुसती लूट सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांचा संप मिटविल्यास आमच्या सारख्या नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील.

- सुकलाल बोंदरनेगे, प्रवासी

बुलडाण्याला आम्हाला जायचे आहे. बसस्थानकावर आल्यानंतर आम्हाला स्थानकाबाहेर जा असे सांगण्यात येत आहे. स्थानकावरून परिवहन विभागाचे अधिकारी प्रवाशांना हाकलून लावत आहे. हे चुकीचे आहे. ज्या काही मागण्या असतील त्याबाबत तुम्ही निर्णय घ्या, पण प्रवाशांना हकलण्याची पद्धत चुकीची आहे.
- मनोहर शिरसोले, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हॉट्सअॅपवरच्या सरल सूचना यापुढे बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

न्यायालयाने शिक्षकांना पाठवायची माहिती सरकारी अधिकाऱ्यांमार्फत पत्रव्यवहार साखळी पद्धतीने पोचविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे बदल्यांसह सरल प्रणालीबाबत व्हॉटसअॅपवरयेणाऱ्या सूचना आता बंद झाल्या आहेत.

शिक्षण व ग्रामविकास विभागाकडून गेल्या चार वर्षांपासून ई गर्व्हनन्स अंतर्गत ऑनलाइन सरल प्रणाली सुरू करण्यात आली होती. या प्रणालीतील शाळा पोर्टल, कर्मचारी पोर्टल, संचमान्यता पोर्टल, विद्यार्थी पोर्टल, मध्यान्ह भोजन योजना पोर्टल आदी पोर्टलवर शाळांना वेळोवेळी माहिती अपडेट करावी लागते. ही माहिती कशी भरावी, पोर्टलची स्थिती, मुख्याध्यापक ते मुख्य कार्यकारी अधिकारी लॉगिनवर करावयाची कार्यावही याबाबत शिक्षकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी मार्गदर्शन केले जात होते. सरकारच्या वतीने प्रदीप भोसले यांची सरल राज्य समन्वयक पदावर नेमणूक करण्यात आली.

चार वर्षांपासून प्रत्येक पोर्टलच्या मॅन्युअल, व्हिडिओ यासह जवळपास बाराशे सूचनांच्या माध्यमातून प्रदीप भोसले यांनी व्हाटसअॅपवरून शिक्षकांना मार्गदर्शन केले होते. शिक्षकांच्याच मागणीवरुन व्हाटसअॅपवर जवळपास १३०० ग्रुप तयार करून सर्व प्रकारच्या शाळातील शिक्षकांना समाविष्ट केलेले आहे. प्रदीप भोसले यांनी शिक्षकांना २४ तास माहिती उपलब्ध असावी ब्लॉग देखील तयार केला आहे. या ब्लॉग ला आतापर्यंत २८ लाख शिक्षकांनी भेट दिलेली आहे. परंतु गेल्या वर्षी सरल प्रणालीद्वारेच ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बदल्यांबाबतच्या काही अडचणी निर्माण झाल्या आणि चुकीची माहिती शिक्षकांमध्ये पसरविली गेली. दरम्यान यंदाच्या बदल्यानंतर काही शिक्षक न्यायालयात गेले. न्यायालयाने शिक्षकांना पाठवायची माहिती सरकारी अधिकाऱ्यांमार्फत पत्रव्यवहार साखळी पद्धतीने पोचविण्याचे आदेश दिले. परिणामी यापुढे बदल्यांसह सरल प्रणालीबाबत व्हॉटसअॅपवर शिक्षकांना प्रदीप भोसले यांच्या येणाऱ्या सूचना आता बंद झाल्या आहेत. यामुळे प्रशासनाला पत्रव्यवहारातील गतीमानता वाढविण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे शिक्षकांना महत्वाची माहिती व्हॉटसअॅपवर मिळणार नाही.

आजपर्यंत सरल प्रणालीबाबत तसेच बदली प्रक्रियेबाबतच्या सूचना, माहिती व मार्गदर्शन सहज घरबसल्या व्हॉट्सअॅपवर शिक्षकांना उपलब्ध होत असे. आता ही सुविधा बंद झाल्याने यापुढे प्रशासनावर अवलंबून रहावे लागेल. प्रशासनाकडून शिक्षकांना मार्गदर्शन मिळण्याबाबतचा यापूर्वीचा शालार्थ प्रणाली सारखा अनुभव वाईट असल्याने शिक्षकांच्याच अडचणीत वाढ होण्याची आता भीती वाटते.

- महेश लबडे, सहशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बळीराम पाटील विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या ग्रंथराज दासबोध सामुदायिक पारायण सोहळ्याची शनिवार हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. पाच हजारपेक्षा अधिक भाविकांनी सामुदायिक पारायण केले.

भक्तीमय आणि उत्साहवर्धक वातावरणात दोन जूनपासून हा पारायण सोहळा सुरू होता. प्रसाद महाराज अंमळनेरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज आठवले यांच्या संकल्पनेतून अंमळनेरकर महाराज सेवा संघ यांच्यातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान अंमळनेरकर महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत पाच हजार पेक्षाही अधिक भाविकांनी दासबोध ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले. समारोप कार्यक्रमाला सकाळी काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालिसा पठण करण्यात आले. सोहळ्याच्या समारोपाला दासबोध ग्रंथाची परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोक्यावर दासबोध ग्रंथ घेऊन हजारो भाविक शोभा यात्रेत सहभागी झाले. त्यानंतर ग्रंथाचे पूजन करण्यात आले. संयोजन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पदे यांच्याहस्ते यावेळी पारायणात सेवा करणारे कृष्णा महाराज आरगडे, समीहन महाराज आठवले, मीराताई नांदेडकर यांचा सत्कार करण्यात आला. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी काल्याचे किर्तन केले. प्रसाद महाराज यांनी दहिहंडी फोडून भक्तांना काल्याचे वाटप केले. पारायण सोहळा यशस्वीतेसाठी अध्यक्ष द. ल. पदे, अ. उ. ठाकूर, अ. सु. मोहखेडकर, म. दा. वैद्य, सु. दि. अडगावकर, राजू एकबोटे, विनोद दिवेकर, भगवान पटवर्धन, संतोष उदावंत, वैशाली नागापूरकर, अनुराधा पुराणिक, सरला विरेश्वर, सुनीता कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत पर्स चोरणारी महिला गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

धावत्या रेल्वेत महिलांची पर्स चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगार असलेल्या महिलेस लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले. त्या महिलेस शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी खतीब यांनी १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सहाना खान नादेर खान या १४ एप्रिल २०१८ रोजी मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेसने नांदेडला निघाल्या होत्या. तपोवन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे लिंबगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबविण्यात आली. दरम्यान पूर्णेहून नांदेडकडे जाणारी जयपूर एक्स्प्रेस स्टेशनवर थांबल्यावर लिंबगाव स्टेशनमास्टर ने तपोवनमध्ये बसलेल्या प्रवाशांनी जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसावे अशी सूचना देण्यात आली. त्यामुळे तपोवनमध्ये बसलेल्या सहाना खान ह्या आपल्या परिवारासह जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसण्यासाठी जात होत्या. ही संधी साधून त्याची पर्स चोरट्याने लांबवली. ६० हजार रुपयाचे गंठण, ४० हजार रुपयाचे जंजिर, ३० हजारांचा हार, १५ हजार रुपयांच्या रिंग, २५ हजार रुपयांच्या बाळ्या, रोख दोन हजार असा दोन लाख १२ हजारांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे तक्रारीत म्हटले होते. सहाना यांच्या तक्रारीवरुन नांदेड येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी तपास करून चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अक्तारी बेगम उर्फ समीना बेगम उर्फ ताहेरा बेगम शेख उस्मान (रा. देगलूर नाका, नांदेड) या महिलेस कारागृहातून ताब्यात घेतले.

\Bअट्टल गुन्हेगार; नाव बदलून राहते

\Bअटक केलेली अक्तारी बेगम ही अट्टल गुन्हेगार असून वेळोवेळी आपले नाव बदलून राहत असून तिच्यावर विविध पोलिस ठाण्यामध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्या महिलेस ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी गुन्हेगार प्रवृतीची महिला असून तिच्या ताब्यातून चोरीचा ऐवज जप्त करावयाचा आहे, धावत्या रेल्वे मध्ये चोरी करण्याच्या सवयीचे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने महिलेस १२ जूनपर्यंत कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान १ बातमी - एसटीचा चक्का जाम

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

सलग दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालु राहीला. शनिवारी (९ जुन) प्रवाशांचे हाल झाले. खासगी गाड्यांना प्रवासी वाहतूकीची परवानगी देण्यात आली. मात्र खासगी गाड्या चालकांने अव्वाचे सव्वा भाव आकारून प्रवाशांची चांगलीच लुट केली.

औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावर आलेल्या प्रवाशांचे शनिवारी हाल झाले. शुक्रवारी बंदच्या पहिल्या दिवशी सिडको आणि सिबीएस येथून बस सुरू होत्या. काही अपवाद वगळता शुक्रवारी प्रवासी वाहतूक सुरू होती. शनिवारी सिडको आणि सिबीएस येथून बस सुरू असल्याची अपेक्षा ठेवून बस स्थानकात प्रवासी आले होते.

शनिवारी सिबीएस आणि सिडको येथूनही बस बंद होती. या दोन्ही आगारातून बस बंद असल्याकारणाने आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी बस स्थानकात येऊन खासगी बसमधून प्रवासी वाहतूक सूरू असल्याची माहिती एसटीच्या प्रवाशांना दिली.

ग्रामीण भागात जाणारे तसेच पुणे किंवा अन्य शहरांना जाणाऱ्या प्रवाशांनी एसटी स्थानकाबाहेर जाऊन खासगी बस मधुन प्रवास करण्यासाठी आले. या ठिकाणी आल्यानंतर औरंगाबाद पुणेसाठी साध्या बस प्रवास हा सहाशे ते सातशे रूपयांपेक्षा अधिक करण्यात आला होता. तसेच औरंगाबाद ते भुसावळ यासाठी एसटीतून प्रवाशांना १७० रूपये दयावे लागत होते. तर खासगी वाहतूकदारांनी तीनशे रूपये प्रती प्रवासी दर आकारणी सुरू केली होती. औरंगाबाद सिल्लोडचा प्रवास एसटीतून ७० रूपयांमध्ये होत असताना, खासगी वाहतूकदारांनी १५० रूपयांपर्यंत प्रवाशांकडून आकारणी केली. अशी लुट अन्य मार्गावरही होत होती. याबाबत काही जणांनी संबंधीत आरटीओ अधिकाऱ्यांना सांगितले असता, त्यांनी सध्या तुम्ही प्रवास करा. तक्रारीच्या भानगडीत पडू नका. असा सल्ला प्रवाशांना देऊन त्यांच्या तक्रारी ऐकण्याचीही तसदी घेतली नाही.

खासगी वाहतूकदारांना नियमच नाही

खासगी वाहनांमध्ये प्रवासी संख्या किती असावी. याचा नियम असताना, सध्या एसटीचा संप तोडण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक खासगी वाहतूकदारांकडून केली जात होती. यामुळे प्रवाशांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. अम्ब्युलन्समध्येही प्रवासी वाहतूक करतानाचे दृश्यही पाहाण्यास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकाऱ्यांच्या दालन नूतनीकरणाची लगबग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बकाल महापालिकेत पदाधिकाऱ्यांच्या दालन नूतनीकरणाची लगबग सुरू झाली असून, महापौर दालनाच्या जिन्यात रेडकार्पेट टाकल्यानंतर अन्य पदाधिकारी देखील आपापले दालन सजवण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

आर्थिकदृष्ट्या महापालिकेची स्थिती फारच तोळामासा झाली आहे. मालमत्ता कराची वसुली जेमतेम होत असल्यामुळे तिजोरीत पैसे जमा होत नाहीत. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे. विकास कामे रखडल्यामुळे नागरिक आणि नगरसेवकांमध्ये नाराजीची भावना आहे. असे असताना पदाधिकारी मात्र आपली दालने सजवण्याच्या मागे लागले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या दालनासाठी असलेल्या संगमरवरी जिन्यावर रेड कार्पेट लावून घेतले. महापौरांचे सर्वपक्षीयांशी असलेल्या संबंधांमुळे याची चर्चा म्हणावी तशी झाली नसावी असे बोलले जात आहे. या प्रकरणानंतर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या दालनाचा विषय पुढे केला आहे. त्यानुसार सध्या पालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. दोन दिवसांपासून हे काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सभागृहनेते विकास जैन यांनी देखील प्रशासनाला पत्र देवून दालनाचे नूतनीकरण करा अशी सूचना केली आहे. गटनेत्यांच्या दालनापेक्षा सभागृहनेत्याचे दालन मोठे आहे. त्यामुळे नूतनीकरणाचे काम करताना प्रशासनाला ते मोठ्या प्रमाणावर करावे लागणार आहे. त्यात लाखो रुपये खर्च होतील असे मानले जात आहे.

\B७० हजारांची खुर्ची

\Bदंगलीप्रकरणी अटकेत असलेला महापालिकेतील विरोधीपक्ष नेता फेरोज खान याने काही महिन्यांपूर्वी आपल्या दालनाच्या अँटीचेंबरमध्ये मोठी खुर्ची तयार करून घेतली आहे. नवाबाची खुर्ची असावी अशा पद्धतीची ही खुर्ची आहे. सत्तर हजार रुपये या खुर्चीसाठी खर्च करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथपालांबाबत धारणा बदलावी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ग्रंथालयशास्त्र वेगाने बदलत असताना नवीन प्रवाहांबाबत जागरुकता आवश्यक आहे. ग्रंथापालाबाबत समाजात असलेली धारणासुद्धा बदलणे अपेक्षित आहे. या दृष्टिने 'असा मी घडलो' हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे' असे प्रतिपादन डॉ. धर्मराज वीर यांनी केले. ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

'असा मी घडलो - गाथा ग्रंथापालाच्या' या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन पार पाडले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन केंद्र सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. वराडे, डॉ. वि. ल. धारुरकर, ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. धर्मराज वीर, पुस्तकाचे संपादक रणजित धर्मापुरीकर व डॉ. मेधा धर्मापुरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुस्तक प्रकाशनानंतर मान्यवरांनी ग्रंथापालांच्या वाटचालीवर भाष्य केले. 'जगभरात दरवर्षी २५ लाख ५५ हजार ग्रंथ प्रकाशित होतात. त्यामुळे पेपरलेस सोसायटी जवळपास अशक्य आहे. ग्रंथालय क्षेत्रात चुकून आलेले ग्रंथपाल अधिक आहेत. समाजातही ग्रंथपालाबाबत स्पष्ट व्याख्या नाही. ग्रंथालय क्षेत्र झपाट्याने बदलत असताना हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. ग्रंथालयशास्त्र विषयात पीएच. डी. असते हे एका अधिकाऱ्याला माहिती नसल्याचे पाहून आश्चर्य वाटले होते. त्यामुळे धारणा बदलण्याची गरज आहे' असे डॉ. वीर म्हणाले. तर डॉ. रंगनाथन यांची ग्रंथाबाबत असलेली तत्त्वे धारुरकर यांनी सांगितली. 'प्रत्येक ग्रंथात विचारांचा गंध असतो. ग्रंथपाल हा माहिती देणारा प्रामाणिक कार्यकर्ता असतो. प्रत्येक ग्रंथासाठी वाचक आहेत आणि वाचकाला प्रत्येक पुस्तक मिळाले पाहिजे असे रंगनाथन यांचे तत्त्व आहे. ग्रंथपाल जीवनाकडे मागे वळून बघताना कसा विचार करतात याची प्रचिती या ग्रंथातून येते' असे धारुरकर म्हणाले. रणजित धर्मापुरीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रसिक, ग्रंथपाल उपस्थित होते.

\Bव्हॉट्सअॅप लेखाची प्रेरणा

\B'एका व्हॉट्सअॅप ग्रुपमधून ग्रंथाची कल्पना सुचली. ग्रंथपाल कसा झालो किंवा जीवनाला दिशा कशी मिळाली असा विषय दिल्यानंतर अनेकांनी लेखन केले. ग्रंथात मराठी आणि इंग्रजी भाषेतील ४० लेखरुपी अनुभवी आहेत. सोशल मीडियाचा खुबीने वापर करीत हा संपादन ग्रंथ आकारास आला आहे,' असे धर्मापुरीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुल्या निवडणुकांचा सरकारला विसर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नवीन विद्यापीठ कायद्यात खुल्या निवडणुकांचा समावेश आहे. मात्र, त्या घेतल्या जात नाहीत. प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळे शिक्षणाची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया त्वरित व्हावी यासाठी सरकार दरबारी आग्रह करू,' अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक औरंगाबादमध्ये पार पडली. त्यानंतर शैक्षणिक वर्षातील कार्यक्रमाबाबत पत्रकारांशी ते बोलत होते. डॉ. साठे म्हणाले, 'राज्यात ३० जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयांमध्ये 'सेल्फी वुईथ कॅम्पस'विशेष महाविद्यालयीन संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील प्राध्यापकांच्या, शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्या भरण्यात याव्यात. 'आयटीआय'मध्ये निदेशकांची नेमणुका करा. कषी शिक्षण हे कालसुसंगत व शेतकरीभिमुख व्हावे यासाठी ही सरकार दरबारी प्रयत्न करण्यात येतील,' असे डॉ. साठे म्हणाले. बैठकीत दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्याबाबत मागण्यांचे एक निवेदन सरकारला सादर करू असे असे प्रदेश मंत्री अभिजित पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रा. योगिता पाटील, ईश्वर अष्टेकर, स्वप्नील बेगडे, गोविंद देशपांडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विरोधीपक्षनेतेपदावरून सुंदोपसुंदी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतील विरोधीपक्षनेतेपदावरून 'एमआयएम'च्या नगरसेवकांमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. या पदावर वर्णी लावून घेण्यासाठी काही नगरसेवकांनी स्थानिक आमदाराला बायपास करून थेट हैदराबादपर्यंत धडक मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेतील विद्यामान विरोधीपक्षनेता फेरोज खान दंगल प्रकरणात हर्सूल जेलमध्ये आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेत्याची खुर्ची रिकामीच आहे. दरवर्षी विरोधीपक्षनेता बदलण्याचा प्रघात आहे. फेरोज खानची एक वर्षाची मुदत एक महिन्यापूर्वीच संपल्याचे 'एमआयएम'च्या गोटातून सांगितले जाते. शिवाय तो आता तुरुंगात आहे. त्यामुळे अन्य नगरसेवकाची वर्णी या पदावर लागावी यासाठी काही नगरसेवक प्रयत्न करीत आहेत. त्यात प्रामुख्याने पालिकेतील 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी आघाडीवर आहेत. विरोधीपक्षनेतेपदही आपल्याला मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यांच्या शिवाय जमीर कादरी, विकास एडके, अब्दुल नाईकवाडी हे देखील विरोधीपक्षनेतेपदाच्या शर्यतीत आहेत. अरुण बोर्डे यांच्या पत्नी सरिता बोर्डे या 'एमआयएम'च्या नगरसेविका आहेत. त्यांना विरोधीपक्षनेता पद मिळावे यासाठी बोर्डे प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.

\Bसोमवारची सभा विरोधीपक्षनेत्याविना?

\Bविरोधीपक्षनेतेपदाच्या शर्यतीमधील काही जणांनी हैदराबादला जावून 'एमआयएम'चे सर्वेसर्वा खासदार अससुद्दीन ओवेसी यांची भेट घेण्याचा देखील प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. हे करताना त्यांनी स्थानिक आमदार इम्तियाज जलील यांना दूर ठेवल्याची चर्चा आहे. दरम्यान महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (११ जून) अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. विरोधीपक्षनेत्याविना ही सर्वसाधारण सभा होईल असे चित्र आहे. सोमवारपर्यंत फेरोज खानला जामीन मिळण्याची शक्यता फारच कमी आहे आणि विरोधीपक्षनेता नियुक्त करण्याबाबत 'एमआयएम'मध्ये देखील एका दिवसात निर्णय होण्याची शक्यता नाही असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन २२ हजारांचा गंडा

0
0

औरंगाबाद : एका वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची २२ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानंद हिरालाल डोंगरे (रा. मिलकॉर्नर, डीआरडी क्वॉटर्स) यांना व्हिसा-पोस/मोबीकडब्ल्यूके मुंबई या वेबसाइटवर ४० रुपये भरून रजिस्टेशन करण्याचे होते. तेव्हा डोंगरे यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यावरून संबंधिताने ऑनलाइन २२ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणात डोंगरे यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘होळकरांचा इतिहास समजून घ्या’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'होळकर घराण्याचा इतिहास शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे. तो समजून घेवून धनगर बांधवांनी समाज परिवर्तनाची लढाई गतिमान करावी,' असे आवाहन अंबादास रगडे यांनी केले आहे.

गंगापूर तालुक्यातील टाकळी कदीम येथे संघर्ष ग्रामविकास संस्था व सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते 'होळकर घराण्याचा इतिहास व आजचा धनगर समाज' या विषयावर ते बोलत होते. यावेळी शिवाजी चंदेल, कैलास पाटील मोहरे, श्यामलाल बेडेकर, फकिरचंद चंदेल, प्रभाकर चंदेल, गणेश कसबे, प्रा. श्रीधर जाधव, प्रा. तुळशीदास कवचट आदींची विशेष उपस्थिती होती. रगडे यांनी विद्यमान शिक्षण व्यवस्थेचाही आढावा गेतला. 'आई-वडिलांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांना चांगले शिकवले पाहिजे,' असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वाघमारे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत आधार केंद्रावर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट ठसे वापरून आधार कार्डात बदल करणाऱ्या अनधिकृत केंद्रावर 'युनिक अडेन्टिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया'च्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मंगेश भालेराव व अशोक अशी या आधार केंद्रचालकाची नावे आहेत.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यूआयडीच्या दोन कर्मचाऱ्यांनी महाराणा प्रताप चौक, बजाजनगर येथे असलेल्या अरिहंत झेरॉक्स येथील आधार केंद्राची १६ एप्रिल रोजी तपासणी केली. या तपासणीत अशोक नावाचा व्यक्ती हा संगणकावर आधार कार्डात दुरुस्ती करताना आढळून आला. 'यूआयडी'च्या अधिकाऱ्यांनी केंद्राच्या परवान्याबाबत विचारले. तेव्हा हे केंद्र मंगेश सीताराम भालेराव याच्या नावे असून ते रा. वाहेगाव, गंगापूर येथे दिलेले आहे. आधार केंद्र ज्याच्या नावाने दिलेले आहे. त्याच्या अंगठ्याशिवाय आधारचे सॉफ्टवेअर चालू होत नाही. अशोक याच्या जवळ असलेल्या एका रबरी स्टॅम्पवर अंगठ्याचा ठसा चिटकावलेला आहे. नागरिकांकडून पैसे जमा करून तो आधार दुरुस्तीची कामे करित होता. या बाबत विचारले असता, हा स्टॅम्प मंगेश भालेराव याच्याकडून घेतल्याची माहिती त्याने दिली. या माहितीवरून अरिहंत झेरॉक्सचा अशोक आणि मंगेश भालेराववर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकृतीबंध शासनाकडे पाठवा

0
0

औरंगाबाद : कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध शासनाकडे लवकर मंजुरीसाठी पाठवा, अशी मागणी भाजपच्या कामगार मोर्चाचे नेते संजय केनेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे केली आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजूरीनंतरही सहा महिन्यापासून आकृतीबंध रखडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायकवाड यांचे आज व्याख्यान

0
0

औरंगाबाद : महाबिझीनेस नेटवर्क (एमबीएन) व रयत ट्रेडींग कंपनीच्या वतीने भारत विकास ग्रुपचे (बी.व्ही.जी.) प्रमुख हनुमंतराव गायकवाड यांचे 'शेती उत्पन्नवाढ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. एमजीएम कॅम्पसमधील आर्यभट्ट सभागृहात रविवारी सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी एमजीएमचे विश्‍वस्त अंकुशराव कदम, वित्त विभागाचे सहायक संचालक कल्याणराव औताडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे असे राम पवार, प्रदीप सोळुंके यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्लॅट’मध्ये देशामध्ये आर्या देशपांडे १०३ वी

0
0

'क्लॅट'मध्ये देशामध्ये

आर्या देशपांडे १०३ वी

...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'क्लॅट' या राष्ट्रीय पातळीवरील विधी सामायिक परीक्षेत देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आर्या अतुल देशपांडे हिने ११४.७५ गुण मिळवून देशात १०३ वा क्रमांक पटकाविला. तसेच बारावी बोर्ड परीक्षेतही तिने ९२.६ टक्के गुण मिळवले. यानिमित्ताने आर्या हिचे कौतुक होत आहे.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाळ्यात विजेपासून सावधानता बाळगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाळ्यात वादळ, वारा व अतिवृष्टीमुळे पोल पडून, तुटून किंवा शॉर्टसर्किटने दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी किंवा घरगुती वीज यंत्रणा, उपकरणापासून सावधानता बाळगून संभाव्य अपघात टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक आर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्कीट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावे. विशेष म्हणजे पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतीदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. त्यास लागून दुचाकी उभी करू नये. खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. घरावरील डिश किंवा अॅन्टिना वीज तारांपासून दूर ठेवावेत. ओल्या कपड्यावर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरू असलेल्या महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रांतील कॉल सेंटर्सचे १८००२३३३४३५ / १८००१०२३४३५ हे दोन टोलफ्री क्रंमाक उपलब्ध आहेत. तसेच औरंगाबाद शहर व ग्रामीणमधील वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा आपतकालीन परिस्थितीत महावितरण औरंगाबाद येथील नियंत्रण कक्ष मो. क्र. ७८७५७५६६५२ किंवा ०२४०-२३४३१२४ तसेच

कोणत्याही कंपनीच्या लँडलाइन किंवा मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रंमाकांवर वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. महावितरणच्या टोल फ्री सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉकटाइम - कला संवर्धनात रसिकाची भूमिका जबाबदारीची !

0
0

इंट्रो - कला, कलाकार आणि रसिक हा एक त्रिकोण असून रसिक तटस्थ असतो. रसिकाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आणि जबाबदारीची आहे असे मत प्रसिद्ध शिल्पकार प्रा. रवी क्रिष्णन यांनी मांडले. 'वेरूळ- एक शिल्प प्रवास' या कार्यशाळेनिमित्त शहरात आले असता 'महाराष्ट्र टाइम्स'ने त्यांच्याशी संवाद साधला.

Tushar.bodkhe@timesgroup.com

वेरूळ लेणीच्या शिल्प शैलीचे कोणते वेगळेपण जाणवले ?

यापूर्वी मी वेरूळ लेणी पाहिली नव्हती. या कार्यशाळेनिमित्त वेरूळ लेणी पाहिली. विशेषत: कैलास लेण्याने मनाला भारावून टाकले. या लेणीच्या निर्मितीबाबत अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. या कथांकडे दुर्लक्ष केले तरी लेणीची निर्मिती थक्क करणारी आहे. हे एक आध्यात्मिक स्थान आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या शिल्पाकृती कलाकाराला साद घालतात. इथे सकारात्मक ऊर्जा मिळते. अशा प्राचीन ठिकाणी गेल्यानंतर एक प्रकारची सकारात्मक कंपने तुम्हाला खेचतात. काही लेणीचे काम अर्धवट असेल, पण त्यात तांत्रिक चूक आढळत नाही. कारण मनापासून काम केल्यामुळे अशी चूक घडली नसावी. तुम्ही किल्ला किंवा राजमहाल पाहता, तेव्हा तिथे उदासवाणी छटा दिसते. हुकूमशहाचा वर्चस्ववाद किंवा गुलामांवरील दबाव अशा कामाचा अविभाज्य भाग असतो. इथे सांसारिक हेतू असतो. तर वेरूळ लेणी घडविण्यात आध्यात्मिक, पारमार्थिक हेतू आहे. एखाद्या कलाकारासाठी इतके उत्तम ठिकाण कोणते असेल ?

सद्यस्थितीत शिल्पकला शैलीवर हा प्रभाव दिसत नाही…

प्रत्येक काळाची स्वतंत्र शैली असते. वेरूळ लेणी ही तत्कालीन 'मॉडर्न आर्ट' होती. त्यापूर्वी सिंधू संस्कृतीची शैलीसुद्धा 'मॉडर्न आर्ट' होती. आपल्याला आज ती प्राचीन शैली वाटते. आजची मॉडर्न शैली काही काळानंतर जुनी शैली होईल. कलेच्या स्थित्यंतरात हा टप्पा असतोच. त्या-त्या काळातील जीवनशैली कलेत दिसते. समाज, निसर्ग आणि धर्म यांचे रेखाटन होते. अर्थात धर्म या शब्दाची सरधोपट व्याख्या मला अपेक्षित नाही. धर्म म्हणजे तत्त्वज्ञान या अर्थाने कला प्रकारात तिचे स्थान शोधतो. एका तत्त्वज्ञानातून उभे राहिलेले नवीन तत्त्वज्ञान म्हणजे दुसरा धर्म किंवा पंथ. कलासुद्धा काळानुसार बदलत जाते. कला एक खेळ आहे. त्यामुळे जुन्या शैलीचा आधुनिक काळातील कलेवर प्रभाव पडेलच असे सांगता येत नाही.

वैविध्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी शिल्पकलेला अनुकूल वातावरण आहे का ?

भारताला समृद्ध शिल्पकलेचा वारसा लाभला आहे. पाश्चात्य देशातही समृद्ध वारसा आहे. मात्र, त्यांनी हा वारसा जतन करताना नवीन पिढीतही पोहचवला. दुर्दैवाने, आपल्या देशात शिल्पकला दुर्लक्षित राहिली. विदेशातील शिक्षण पद्धती कलावादी दृष्टिकोन जपणारी आहे. युरोपीय देश किंवा शहरे समृद्ध वारसा जपण्यासाठी तत्पर असतात. अशा अत्यंत जागरुकतेचा भारतात अभाव आहे. जाणकार रसिकांचे प्रमाणसुद्धा नगण्य आहे. कला, कलाकार आणि रसिक हा एक त्रिकोण असून रसिक तटस्थ असतो. या रसिकाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आणि जबाबदारीची आहे. कारण रसिक व्यक्तींनीच कलाकारांकडून कलाकृती तयार करुन घेतल्या आहेत. रसिकाला आपली आवड व जबाबादारी उत्तम कळते. पण, फार कमी कलाकारांना रसिकांचे महत्त्व कळते. कलाकार आणि कला एवढेच विश्व नसते. तर त्यात रसिकाचे स्वतंत्र स्थान आहे.

कलेचे सामाजिक स्थान कसे आहे ?

दुय्यम दर्जाचे कलाकार विचाराच्या आधाराशिवाय चित्र, शिल्प तयार करीत आहेत. स्वस्तात मिळणारा पुतळा प्रत्येकाला हवा असतो. अशा ठिकाणी कलेशी तडजोड करणारे कलाकार आघाडीवर असतात. चौका-चौकात बेढब पुतळे या दुय्यम कामाचे प्रतीक आहेत. महापुरुषांच्या कामाचा आणि विचारांचा प्रभाव कामावर दिसला पाहिजे. एखाद्या लढवय्या राजाचा पुतळा कसा असावा, सामाजिक प्रबोधन करणाऱ्या महापुरुषाच्या पुतळ्यात कोणते भाव उमटावेत, पुतळ्याची उंची, बांधा, रंगछटा असा सर्वांगीण विचार करुन शिल्प घडते. दोन दिवसात उभारलेले पुतळे जाणकारांच्या मनाला वेदना देतात. स्थानिक प्रशासन टेंडर काढून काही पैशांसाठी अशा तडजोडी सर्रास करीत असल्याचे दिसते. त्यामुळे मोठ्या शहरातही विस्मयचकीत व्हावे असे नितांतसुंदर पुतळे अभावानेच दिसतात. ही कलेशी प्रतारणा नाही का ? शिल्पकलेचे सामाजिक स्थान इतके डळमळीत असल्यास नवीन पिढीला आत्मियता वाटण्याची शक्यता दुरापास्त आहे.

पाश्चात्य शैलीचे भ्रष्ट अनुकरणसुद्धा दिसत आहे…

आपली चित्र-शिल्प परंपरा आहे, तशी पाश्चात्य देशातही समृद्ध परंपरा आहे. या दोन्ही परंपरांचा आदर निश्चित करावा. मात्र, आपल्या कला परंपरेकडे दुर्लक्ष करण्याचा उद्देश कळत नाही. देवता रेखाटण्याची शैली प्रत्येक देशात काही प्रमाणात समान आहे. आपण इंद्र रेखाटतो, युरोपात इरॉस देवता रेखाटतात. पाश्चात्याकडून कला संवर्धन व वारसा शिकला पाहिजे. फक्त त्यांच्या देशातील प्रतिकृतींची सांगाडे उभारण्याला अर्थ नाही. जगाला अभिनामाने सांगितल्या पाहिजे अशा सुंदर कलाकृती आपल्या देशात आहेत. या कलेच्या प्रतिकृती उभारा आणि वारसा सर्वदूर पोहचवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात शेतकरी पेरणी संवाद अभियान राबवणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी तसेच त्यांनी काय पेरणी केली? कोणते बियाणे वापरले? आदींबाबत माहिती जाणून घेण्यासाठी राज्यभरात शेतकरी पेरणी संवाद हा उपक्रम मोठ्या प्रमाणात उत्सवाप्रमाणे राबविण्यात येणार आहे, या उपक्रमांतर्गत कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पेरणीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

या संवाद उपक्रमामध्ये शेतकऱ्यांनी खरिपात केलेले नियोजन, आतापर्यंत कोणते पीक घेतले आदी माहिती अधिकारी, कर्मचारी जाणून घेऊन शेतकऱ्यांना पेरणीसंदर्भात आलेल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करुन पेरणी संदर्भात शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली जाणार असल्याचे खोत यांनी सांगितले. रविवारी (१० जून) विभागीय आयुक्त कार्यालयात खरिप हंगाम नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीसाठी कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अपर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे तसेच मराठवाड्यातील महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

खोत म्हणाले की, 'बाजारात निकृष्‍ट दर्जाचे बियाणे, खत शेतकऱ्यांना विक्री करण्यात येऊ नये याची खबरदारी म्हणून कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून बियाणे, खतांची तपासणी करावी, मान्यता नसलेल्या बियाणे, खतांच्या विक्रीवर आवश्यक ती कारवाई तत्काळ करावी, शेतकऱ्यांना पेरणी करताना बियाणांची चणचण भासणार नाही याचीही कृषी विभागाने खबरदारी घ्यावी.'

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना यंदा तत्काळ पीक कर्ज द्यावे, तसेच बोंडअळीपासून झालेल्या नुकसानीची भरपाई, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मंजूर विमा रक्कम शेतकऱ्यांच्या मूळ खात्यात समाविष्ट करावी, कर्ज खात्यात सदरील रक्कम वर्ग करु नये अशा सूचनाही यावेळी खोत यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी कृषी आयुक्त सिंह यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी ३१ जुलै आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी २४ जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावे अशा सूचना दिल्या.

बोंडअळी नियंत्रणासाठी विद्यार्थ्यांची मदत

बोंडअळीवर नियंत्रण आणण्यासाठी कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कृषी सहाय्यकांसोबत जनजागृतीपर कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांमध्ये बोंडअळी निर्मूलनाबाबत जागृती करावी तसेच गावांमध्ये डिजिटल फलकावर बोंडअळी नियंत्रण उपाययोजनांची माहिती लावावी, अशा सूचनाही सदाभाऊ खोत यांनी केल्या.

पीककर्जाचा दररोज आढावा

मराठवाड्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी बँकानी ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत साध्य करावे आणि शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज उपलब्‍ध करून द्यावे यासाठी बँकांनी मेळावे आयोजित करावे यासह बँकांच्या उद्दिष्टांसंदर्भातील आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी दररोज घ्यावा व अहवाल विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त तसेच कृषी विभागाला पाठवावा अशा सूचना खोत यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी वर्धापन दिन उत्साहात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १९ वा वर्धापन दिन रविवारी (१० जून) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी पक्ष वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि एकदिलाने काम करू, असा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष काशिनाथ कोकाटे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसंदर्भात माहिती दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा दिल्या. यावेळी कार्याध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, रंगनाथ काळे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, शिवाजी बनकर, प्रसन्ना पाटील, सुरजितसिंग खुंगर, पंजाब माळवतकर, सोपान खोसे पाटील, सोहेल कादरी, चंद्रकांत ठोंबरे, राजेश पवार, राष्ट्रवादी युवकचे शहर अध्यक्ष दत्ता भांगे, महिला जिल्हाध्यक्षा अनुपमा पाथ्रीकर, मेहराज पटेल, प्रतिभा वैद्य, मंजूषा पवार, शोभा गायकवाड, जलील भाई, विद्यार्थी अध्यक्ष मयूर सोनवणे, रहीम पटेल, राजेश पवार, आदींची उपस्थिती होती.

ध्वजवंदन कार्यक्रमाचे व्यवस्थापन राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचय वतिने जिल्हाध्यक्ष बाबुराव खरात, फुलचंद जाधव, दशरथ मानवतकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाबुराव खरात यांनी केले तर आभार काशिनाथ कोकाटे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोक्या गँगच्या म्होरक्यासह दोघांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात दोन गुन्हेगारांना क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरंबद केले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकात करण्यात आली. या आरोपीत बोक्या गँगचा म्होरक्या अनीसचा समावेश असून त्याच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त करण्यात आला.

विविध गुन्हे दाखल असलेले मोहम्मद अनीस मोहम्मद हनिफ (वय ३० रा. पडेगाव) आणि हद्दपार केलेला जाकेर खान महेमूद खान (वय २८, रा. मिलकॉर्नर) हे मध्यवर्ती बसस्थानकात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी बसस्थानकात सापळा रचून संशयास्पदरित्या फिरणारे मोहम्मद अनीस व जाकेर खानला पकडले. अनीसची झडती घेतली असता त्याच्याजवळ लाकडी मूठ असलेला धारदार चाकू सापडला. दोघांना अटक करून अनीसविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जाकेर खानविरुद्ध हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुलाब पवार, राजेश फिरंगे, गजानन मांटे, अनिल इंगोले, संतोष रेड्डी, राजेश चव्हाण, सतीश जाधव, गणेश वाघ यांनी केली.

\Bबोक्याचा गँगचा सूत्रधार\B

मोहम्मद अनीस हा बोक्या नावाने ओळखला जातो. त्याला चार भाऊ असून तो सर्वात मोठा आहे. त्याच्या भावांची नावे रईस, अझहर व बबला, अशी आहेत. हे सर्व बोक्या गँग म्हणून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ओळखले जातात. या सर्वांवर चोरी, जबरी चोरी, घरफोडी आदी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. जाकेर खान हा त्यांचा मेहुणा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images