Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जयभवानीनगरात नालाच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगरातील नाला कागदावर अस्तित्वात नाही, मग तेथील घरे पाडणार कशी असा अजब खुलासा महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांनी केला. या खुलाशामुळे नगरसेवक अवाक झाले. महापौरांनी या प्रकरणात आयुक्तांना कारवाई करण्यास सांगितले, आयुक्तांनी स्वत: लक्ष घालण्याचे मान्य केले.

जयभवानीनगरातील नाल्यावर पाण्याचा प्रवाह आडविणारी दोन बांधकामे उभीच आहेत. वारंवार मागणी करूनही ती बांधकामे पाडण्यात येत नाहीत. त्यामुळे हीच मागणी त्या भागातील नगरसेविका मनिषा मुंडे यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत पुन्हा केली. बांधकामे पाडून नाला मोकळा केला नाही तर पावसाळ्यात मोठा त्रास होईल, असे त्या म्हणाल्या. मुंडे यांना प्रमोद राठोड व भगवान घडमोडे यांनी पाठिंबा दिला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी याबद्दल शहर अभियंता सखाराम पानझडे यांना खुलासा करण्यास सांगितले. पानझडे म्हणाले, 'जयभवानीनगरातील नाला कागदावर अस्तित्वातच नाही. नाल्याचा नकाशा नाही, त्यामुळे घरे कशी पाडायची हा प्रश्नच आहे.' यावर प्रमोद राठोड म्हणाले, 'पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पाहून कारवाई करा. त्या बांधकामांबद्दल काही तरी निर्णय घ्या. बांधकामे न पाडण्यात अधिकाऱ्यांचा काही तरी इंटरेस्ट दिसतो असा आरोप त्यांनी केला. ती दोन बांधकामे पाडली नाहीत तर पावसाळ्यात जयभवानीनगरात शेकडो जीव जातील, असा इशारा त्यांनी केला. महापौर अधिकाऱ्यांना आदेश देताना म्हणाले, 'पाण्याचा नैसर्गिक प्रवाह लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्तात बांधकामे पाडण्याची कारवाई करा. यासाठी त्यांनी पाच अधिकाऱ्यांच्या समितीची घोषणा केली. त्यात शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दिकी, अतिक्रमण हटाव विभागाचे सी. एम. अभंग, नगररचना विभागाचे डी. पी. कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला. आयुक्तांनी स्वत: या कारवाईत लक्ष घालावे, असे ते म्हणाले.

आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले, मला काही तासांचा वेळ द्या. या कामासाठी मी एक अधिकारी नियुक्त करतो, त्याला पूर्ण अधिकार देखील देतो. पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्तांशी देखील बोलतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन शाळा सुरू करण्यासाठी आता लागणार पालिकेची एनओसी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवीन शाळा सुरू करण्यासाठी आता संबंधिताना महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. सर्वसाधारण सभेत महापौरांनी या संदर्भातील आदेश दिले. या आदेशाचे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पालन करा, असेही ते म्हणाले.

महापालिकेच्या क्षेत्रात विविध शाळा सुरू केल्या जातात. त्याची माहिती महापालिकेला नसते. काही शाळा महापालिकेच्या शाळेजवळच सुरू केल्या जातात. त्यामुळे महापालिकेच्या शाळांवर त्याचा परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन के.जी. किंवा बालवाडीपासून दहावी पर्यंतच्या वर्गाची शाळा सुरू करायची असेल तर त्याला महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्षण विभागाला दिले होते. या आदेशाच्या पालनाचे काय झाले, असा सवाल त्यांनी सोमवारी शिक्षणाधिकाऱ्यांना केला. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच आदेशाचे पालन करा, असे ते म्हणाले.

इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन देखील करा, असे त्यांनी सांगितले. पुढील शैक्षणिक वर्षापासून या दोन्हीही माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही नवीन पिढीची गरज आहे, ती गरज आपण भागवली पाहिजे, असे ते म्हणाले.

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त औरंगाबाद शहरातील खेळाडूंचा सत्कार महापालिकेतर्फे १४ जून रोजी केली जाणार आहे. याचवेळी दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन केलेल्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करा, त्यांना व त्यांच्या पालक-शिक्षकांना सत्काराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्या, असे महापौरांनी प्रशासनाला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात शनिवारपासून ग्रीष्मकालीन नाट्य महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली यांच्या वतीने ग्रीष्मकालीन नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या १६ ते २० जून या कालावधीत विद्यापीठ नाट्यगृहात दररोज सायंकाळी साडेसहा वाजता महोत्सव होईल, अशी माहिती नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ग्रीष्मकालीन नाट्य महोत्सवाचे १६ जून रोजी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन होणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालय २५ लाख आणि विद्यापीठ दोन लाख रुपये खर्च करणार आहे. एकूण ३५ कलाकार आणि १२ तंत्रज्ञ येणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच विद्यापीठ स्तरावर 'एनएसडी'चा नाट्य महोत्सव होत असल्याचे शेवतेकर यांनी सांगितले. या महोत्सवात गजब तेरी अदा, ताजमहल का टेंडर, बांयेन, खामोशी सीली सीली व घासीराम कोतवाल या नाटकाचे प्रयोग होतील. या पत्रकार परिषदेला विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजीब खान, प्रा. स्मिता साबळे, प्रा. गजानन दांडगे, सुनील टाक, रमाकांत भालेराव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरुंना हटविण्याची मागणी

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी मराठवाडा कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी मंगळवारपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा समितीने दिला आहे. या निवेदनावर अॅड. सतीश साळवे, सतीश शिंदे यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमाणपत्रांसाठी सेतूमध्ये गर्दी वाढली

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होताच पुढील शिक्षणासाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये सोमवारी मोठी गर्दी झाली. येथून दररोज सुमारे ६०० प्रमाणपत्रे काढण्यात येत असून विद्यार्थ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन टेबल वाढवण्याचा विचार प्रशासन करत आहे.

दहावी, बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रहिवासी, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, राष्ट्रयत्व प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी सोमवारी विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही सेतूमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

दहावीच्या निकालानंतर दोन दिवस शनिवार, रविवार या शासकीय सुट्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र काढता आले नाही. त्यामुळेच सोमवारी सकाळपासूनच सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी झाली होती. गेल्या वर्षीपासून सेतू सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बँकेप्रमाणे टोकन सुविधा तसेच एसएमएस सुविधा उपलब्‍ध करून देण्यात आली आहे. दररोज अंदाज सातशे ते आठशे प्रमाणपत्र वितरित केले जात असल्याची माहिती नायब तहसीलदार एस. जी. पटवारी यांनी दिली. विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढली तर केंद्रात मंडप टाकून टेबल वाढवण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रासोबतच शहराच्या विविध भागांमध्ये असलेल्या शासनाच्या महा-ई सेवा केंद्रातूनही अशाच प्रकारच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेची आज मतमोजणी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी तात्काळ करून निकाल जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाला दिले आहेत. एकदा जाहीर करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया पुढे चालू ठेवणे घटनेनुसार बंधनकारक असल्याचे खंडपीठाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी आठ वाजता उस्मानाबाद तहसील कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.

लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी बीड नगरपालिकेच्या दहा सदस्यांना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरविले होते. नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याचा ठपका ठेवत एकतर्फी कारवाईस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. सुटीतील न्यायमूर्तींनी बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या नगरसेवकांना मतदान करण्यास परवानगी दिली होती. त्यांचे मत मोजावे, परंतु त्यांच्या मतांचा परिणाम निवडणुकीवर होत असेल, तर निकाल जाहीर करण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असता सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाच्या उन्हाळी सुटीतील न्यायमूर्तींनी दिलेल्या अंतरिम निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी बीड पालिकेच्या दहा सदस्यांना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरविले होते. निवडणूक आयोगाने मात्र त्यांना मतदार यादी यापूर्वी तयार झालेल्या असल्याने मतदानाचा अधिकार दिलेला होता. त्यांच्या मतपत्रिका आता वेगळ्या मोजल्या जाणार नाहीत. सर्व मतदारांच्या मतांबरोबरच या दहा मतांची मोजणी केली जाईल.

मूळ याचिकाकर्ते गणेश वाघमारे यांचे वकील नितीन गवारे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाला सुटीतील न्यायमूर्तींसमोर आव्हान देऊन दहा नगरसेवकांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेऊ, नये असा युक्तीवाद केला होता. त्यांचे म्हणणे कोर्टाने मंजूर केले नाही. प्रज्ञा तळेकर यांनी एकदा मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आणि नगरसेवकांचे मतदार म्हणून मतदार यादीत नाव असल्याने त्यांना मतदानापासून रोखता येणार नाही, असा युक्तीवाद केला. दाखल केलेल्या याचिकेत अपात्र नगरसेवकांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर त्यांच्या मतपत्रिका स्वतंत्र त्यांच्या नावाने वेगळ्या ठेवल्यामुळे गुप्त मतदान प्रक्रियेचा भंग झाल्याचे याचिकेत नमूद केले होते, परंतु अशा स्वरुपाचे आदेश देण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

नगरसेवक व उमेदवार अशोक जगदाळे यांची बाजू प्रज्ञा तळेकर यांनी मांडली. काही नगरसेवकांतर्फे एस. व्ही. कानिटकर, व्ही. डी. सपकाळ यांनी मांडली. निवडणूक आयोगातर्फे अलोक शर्मा यांनी बाजू मांडली.

म्हणून फेटाळली याचिका

राज्य घटनेतील तरतुदीनुसार; एकदा निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर त्यात हस्तक्षेप करता येत नाही. याचिकाकर्ता एकतर या प्रक्रियेशी संबंधित असयाला हवा. याचिकाकर्ता निवडणुकीत मतदार किंवा उमेदवार नसल्याने त्याला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याची याचिका फेटाळण्यात आली.

मुंडेंचे बंधु-भगिनींची प्रतिष्ठा पणाला

भाजपचे सुरेश धस व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यात लढत आहे. या निवडणुकीत कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता .

झालेले मतदान

बीड : ३६० (मतदार ३६१)

उस्मानाबाद : २९१

लातूर : ३५३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थानिक तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अॅड. शेलकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्थानिक तक्रार निवारण समिती ( विशाखा) अध्यक्षपदी अॅड. अभया शेलकर यांची निवड झाली आहे. विशाखा समितीच्या जिल्हा अधिकारी उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांसाठी नवी समितीची निवड झाली आहे. समितीमध्ये डॉ. वसुधा पुरोहित, डॉ. वनिता मोरे सदस्य असून शासकीय सदस्य म्हणून तहसीलदार छाया पवार यांचा समावेश आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती ढेरे सदस्य सचिव आहेत. ही समिती तीन वर्षांसाठी कार्यरत राहणार असून दहा किंवा दहापेक्षा कमी कर्मचारी असलेली कोणतीही आस्थापना, संस्था, कार्यालय किंवा असंघटित क्षेत्रातील महिलांना समितीला तक्रार करता येईल. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी स्थानिक तक्रार निवारण समिती महत्त्वाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाउन हॉल गोळीबार; संशयित अद्यापही पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकी काढण्याच्या वादातून तरुणावर गोळीबार करणारा संशयित मेहताब अली दहा दिवस उलटले तरी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ३१ मे रोजी टाउन हॉल परिसरात रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

रवी भास्कर भालेराव (वय ३५ रा. जयभीमनगर, टाउन हॉल) हा तरुण व्यवसायाने रिक्षाचालक आहे. रवी ३१ मे रोजी टाउन हॉल येथे त्याची दुचाकी आणण्यासाठी गेला होता. यावेळी दुचाकी काढण्यावरून त्याचा एका स्कुटीस्वारासोबत वाद झाला. सुरुवातीला स्कुटीस्वाराने त्याला तोंडात झापड मारली. रवीने जाब विचारल्यानंतर समोरील तरुणाने पिस्टल काढून त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने रवी बचावला. यानंतर गर्दी जमल्याने आरोपीने तीन गोळ्या हवेत झाडत काजीवाड्याच्या दिशेने स्कुटी सोडून पायी पलायन केले होते. पोलिसांच्या तपासात ही स्कुटी देखील छावणीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. गोळीबार करणारा संशयित आरोपी मालेगाव येथील मेहताब अली असल्याचा पोलिसांना संशय आहे. या संशयिताचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे. त्याच्या मागावर पथके असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपी समोर शिक्षकांचे धरणे आंदोलन

$
0
0

बदली झालेल्या शिक्षकांचे

जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये संवर्ग १ व २ मधील अनेक शिक्षकांनी बनावट कागदपत्र सादर करून लाभ घेतला आहे. ही सरकारची दिशाभूल असून इतर शिक्षकांवर अन्याय आहे. याची चौकशी करून नियमबाह्य बदल्या रद्द कराव्यात, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा परिषद शिक्षक कृती समितीने मंगळवारी जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. बदली प्रक्रिया राबविताना अनियमितता झाली. त्यामुळे शिक्षकांवर विनाकारण दुसरीकडे जाण्याची वेळ आली आहे. याबाबत शिक्षकांनी आपली मते मांडली. त्यानंतर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, सरकारने शिक्षकांच्या बदल्या करताना कागदपत्रांची खातरजमा करणे आवश्यक होते, परंतु ते न करता केलेल्या बदल्या या नियमबाह्य झाल्या आहेत. बदली प्रक्रियेपूर्वी बदलीपात्र व लाभार्थी शिक्षकांच्या संवर्ग निहाय सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करून यावर नोंदविण्याची मुभा देणे व त्यावर सुनावणी घेऊन निर्णय देणे आवश्यक होते, परंतु या सर्व बाबींना फाटा देत बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या सर्व बाबींची चौकशीची वारंवार मागणी करुनही प्रशासनने जाणीवपूर्वी दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने केला.

२९ मे २०१८ रोजी बदली आदेशप्राप्तीनंतर जिल्ह्यातील ५०० हून अधिक शिक्षकांवर, बोगस लाभार्थ्यांमुळे २७ फेब्रुवारीच्या सदोष शासन धोरणाच्या अंमलबजावणीत अनियमिततेमुळे अन्याय झाला आहे. या नियमबाह्य बदल्या रद्द कराव्यात व अन्यायग्रस्त शिक्षकांनी प्रशासनाकडे वारंवार वैयक्तिक अर्ज केले, परंतु सरकारने यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. यासाठी आंदोलन करण्यात आले. दिलीप ढाकणे, राजेश पवार, सदानंद माडेवार, संतोष ताठे, कृष्णा शिंदे, सुषमा राऊतमारे, सुषमा खरे, महेंद्र बारवाल, सचिन पोलास यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात विजेपासून सावधानता बाळगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाळ्यात वादळ, वारा व अतिवृष्टीमुळे पोल पडून, तुटून किंवा शॉर्टसर्किटने दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी किंवा घरगुती वीज यंत्रणा, उपकरणापासून सावधानता बाळगून संभाव्य अपघात टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक आर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्कीट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावे. विशेष म्हणजे पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतीदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. त्यास लागून दुचाकी उभी करू नये. खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. घरावरील डिश किंवा अॅन्टिना वीज तारांपासून दूर ठेवावेत. ओल्या कपड्यावर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरू असलेल्या महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रांतील कॉल सेंटर्सचे १८००२३३३४३५ / १८००१०२३४३५ हे दोन टोलफ्री क्रंमाक उपलब्ध आहेत. तसेच औरंगाबाद शहर व ग्रामीणमधील वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा आपतकालीन परिस्थितीत महावितरण औरंगाबाद येथील नियंत्रण कक्ष मो. क्र. ७८७५७५६६५२ किंवा ०२४०-२३४३१२४ तसेच

कोणत्याही कंपनीच्या लँडलाइन किंवा मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रंमाकांवर वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. महावितरणच्या टोल फ्री सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल उपायुक्‍त म्हणतात ‘ती कारवाई तर झिरो पेन्डन्सीमुळे’

$
0
0

म. टा .प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा विभागातील गौणखणिज, अतिक्रमणे, सातबारा फेरफार, वाळू तस्करी या संदर्भात तहसीलदारांविरुद्ध येणाऱ्या तक्रारींवर जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई न केल्यामुळे विभागीय प्रशासनाने तहसीलदारांना नोटीसा बजावल्या होत्या. ही कारवाई प्रशासनाचा भाग असला तरी केवळ केवळ झिरो पेन्डन्सी करण्यासाठी होती, असे महसूल उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाने काही दिवसांपूर्वी तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. या संदर्भात ‌महसूल उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांना विचारले असता ते म्हणाले की, '२०१२ पासून विभागीय प्रशासनाकडे मराठवाड्यातील ७८४ तक्रारी प्रलंबित होत्या. तहसील प्रशासनाविरुद्ध तक्रारी करणाऱ्यांमध्ये विविध संघटनांचाही सहभागी होत्या. मात्र, या सर्व तक्रारींवर कोणतीही कारवाई झाली नाही. यातील काही गंभीर तक्रारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे ठेवण्यात येऊन उर्वरित सर्व तक्रारींची खातरजमा करून पुढील कारवाईसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवण्यात आल्या आहेत. ही प्रशासकीय बाब असून कारवाई केवळ झिरो पेन्डन्सीसाठी आहे,' असे महसूल उपायुक्त टाकसाळे यांनी सांगितले. संबंधित तहसील प्रशासनाविरुद्ध प्रामुख्याने गौणखणिज, अतिक्रमणे, संजय गांधी निराधार योजना, वाळू तस्करी, बांधावरील भांडणे, नाला, जमीन बळकावणे आदी तक्रारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालरोग शल्यचिकित्सकांची २८ जुलैपासून राज्य परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बालरोग तज्ज्ञांमधील शल्यविशारद शाखेविषयी जनजागृती व्हावी आणि नवनवीन तंत्रद्यानाची माहिती बालरोग शल्यचिकित्सकांना व्हावी, या हेतुने २८ व २९ जुलै रोजी हॉटेल अजंता अ‍ॅम्बेसेडर येथे बालरोग शल्यक्रिया तज्ज्ञांची १५ वी राज्यस्तरीय परिषद होणार आहे. औरंगाबाद बालरोग शल्यक्रियातज्ज्ञ संघटनेतर्फे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जुलै रोजी परिषदेचे उद्घाटन होईल. दोन दिवसीय परिषदेत तज्ज्ञ वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड व सचिव डॉ. आर. जे. तोतला यांनी कळविली आहे. परिषदेत पदव्युत्तर विद्यार्थीदेखील सहभागी होऊ शकणार आहेत. परिषदेसाठी संयोजन समितीचे उपाध्यक्ष डॉ. रमेश बजाज, डॉ. विद्यानंद देशपांडे, डॉ. पिनाकीन पुजारी, डॉ. सय्यद कैसरोददीन, डॉ. रामदास नागरगोजे, डॉ. प्रदीप राठोड, डॉ. संदिप हंबरडे, डॉ, अर्जून पवार, डॉ. मुख्तदीर अन्सारी आदी मंडळी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील वसतिगृहाच्या फर्निचर कामाची फेरनिविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे वसतिगृह तसेच ग्रंथालयाच्या फर्निचरच्या कामाच्या निविदेला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढण्यात आली असून, फेरनिविदेची प्रक्रिया होऊन फर्निचरचे प्रत्यक्ष काम होण्यासाठी आणखी किमान तीन ते चार महिने लागणार असल्याचे समोर येत आहे. घाटीतील वसतिगृह तसेच ग्रंथालयाचे बांधकाम पूर्ण होऊन दीड ते दोन वर्षे लोटली आहेत. मात्र, फर्निचरअभावी दोन्ही इमारती धुळखात पडून आहेत. निधीअभावी हे काम रखडले होते. उशिरा का होईना या कामासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आणि निविदा प्रक्रियेला मुहूर्त लागला. मात्र निविदेला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे फेरनिविदा काढण्यात आली. आता फेरनिविदेची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष दोन्ही इमारतींचे फर्निचरचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किमान तीन ते चार महिने लागणार आहे व याचा फटका पुन्हा विद्यार्थ्यांनाच बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा लाख परस्पर जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या गोंदी पोलिसांनी परस्पर दहा लाखांची रक्कम जप्त केल्याचा प्रकार बीड बायपास रोडवर रविवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद न करता, पंचनामा न करता ही रक्कम जप्त केल्याचा आरोपी तक्रारदाराने केला आहे. या घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे.

गोंदी (जि. जालना) येथे वाळूच्या वादातून दोन गटात वाद निर्माण झाला होता. यावेळी राहुल राक्षे (रा. पुरण, ता. अंबड) याच्यावर विजय साळुंके, सुयोग साळुंके, अमोल मार्गे व रघुनंदन मार्गे यांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पीएसआय अमन शिरसाठ हे करीत आहेत. दरम्यान आरोपींचे काका सचिन साळुंके यांचा बीड बायपासवरील नंदिनी हॉटेलच्या मागे असलेल्या यशवंत स्वामी समर्थ अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला. पीएसआय शिरसाठ, एएसआय नसीर मुसा सय्यद, राक्षे व इतर पाच ते सहा अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात घुसले. या सर्वांनी फ्लॅटचा ताबा घेतला. पोलिसांनी साळुंके यांची चौकशी सुरू केली तर इतरांनी घरझडती घेणे सुरू केले. या झडतीमध्ये पोलिसांना दहा लाख आठ हजार रुपये आढळले. पोलिस ही रक्कम जप्त करीत घराबाहेर पडले. यानंतर खासगी कार (एमएच ११ एके ६३४६) मध्ये ते निघून गेले. साळुंके हे त्यांच्या मागावरच होते. गोंदी पोलिसांनी सुरुवातीला सातारा पोलिस ठाणे गाठले. या ठिकाणी पाच मिनिटे थांबल्यानंतर शहानूरमिया दर्गा चौकामार्गे जवाहरनगर पोलिस ठाणे गाठले. यानंतर तेथून पुन्हा बाहेर पडून त्यांनी गजानन महाराज चौकात एका ठिकाणी नाष्टा केला. नंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या पाठोपाठ साळुंके यांनी देखील पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

\Bदोन लाखांची मागणी

\Bगोंदी पोलिसांनी रक्कम जप्त केल्यानंतर साळुंके त्यांच्या मागावर होते. यावेळी दोन वेळा पोलिसांनी त्यांच्याशी तडजोडीची बोलणी केली. दहा लाख देतो दोन लाख रुपये आम्हाला द्या, अशी यापथकाची मागणी होती. मात्र साळुंके यांनी ही मागणी मान्य केली नाही. गोंदी पोलिस पुंडलिकनगर ठाण्यात नोंद न करता आले असून, रक्कम परस्पर जप्त करीत असल्याचे साळुंके यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

\Bपोलिसांची नोंद नाही \B

दरम्यान या प्रकरणी प्रसार माध्यमांना माहिती देताना पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे म्हणाले, 'गोंदी पोलिस आरोपीच्या शोधासाठी औरंगाबादला आले होते. मात्र, त्यांनी पोलिस ठाण्यात साळुंके यांच्या घरी छापा मारण्यापूर्वी कोणत्याही स्वरुपाची नोंद केली नाही. साळुंके यांनी गोंदी पोलिसांनी रक्कम जप्त केल्याची तक्रार दिली आहे. तसेच गोंदी पोलिस ठाण्याचे पीएसआय अमन शिरसाठ यांनी आम्ही केलेली कारवाई कायदेशीर असून आम्ही छापा मारल्यानंतर तेथून आरोपी पसार झाल्याचे अपार्टमेंटखाली उभ्या असलेल्या पोलिसांनी सांगितल्याची माहिती दिली. रक्कम जप्त केल्यानंतर पंचनामा करण्याइतका वेळ नव्हता. त्यामुळे ही रक्कम पुंडलिकनगरला नेलीपोलिसांवर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्पात ३८८ कोटींचा फुगवटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प तब्बल ३८८ कोटी ८० लाख रुपयांची फुगवला आहे. त्यांनी सोमवारी १८६४ कोटी ८० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेत मंजूरी दिली. महापौरांनी मंजूर केलेला अर्थसंकल्प एक कोटी ६० लाख रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प आहे.

महापालिकेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. पालिका प्रशासनाने स्थायी समितीला १२७४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीने त्यात वाढ करून १४७४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेला २९ एप्रिल रोजी सादर केला. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबद्दल अभ्यास करण्यासाठी नगरसेवकांनी वेळ मागून घेतला, त्यामुळे महापौरांनी नगरसेवकांना वेळ दिला आणि सोमवारी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेचे आयोजन केले.

यासभेत भाजपचे राजू शिंदे यांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, 'प्रशासनाने स्थायी समितीला १२७४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प प्रशासनाने कशाच्या आधारे सादर केला याचा खुलासा करण्यात यावा. प्रशासन याचा खुलासा करू शकले नाही. राजगौरव वानखेडे यांनी उत्पन्नाच्या स्त्रोताबद्दल खुलासा करण्याची मागणी केली. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उत्पन्न वाढीबद्दल विविध सूचना केल्या. येत्या दीड - पावणेदोन वर्षात निवडणूका होणार आहेत, त्यामुळे हे बजेट महत्वाचे आहे असे ते म्हणाले. अॅड. माधुरी अदवंत, अय्युब जहागिरदार, भाऊसाहेब जगताप, माजी महापौर भगवान घडमोडे, सायली जमादार, प्रमोद राठोड, सभागृहनेते विकास जैन यांनी देखील अर्थसंकल्पाच्या अनुशंगाने विविध सूचना केल्या. सर्वांच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर महापौरांनी अर्थसंकल्प सादर करून त्याला मंजुरी दिली.'

महापौरांनी स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात ३८८ कोटी ८० लाख रुपयांची वाढ करून १८६४ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. अर्थसंकल्प मंजूर करताना जमेच्या काही बाजूंमध्ये त्यांनी वाढ केली. स्थायी समितीने मालमत्ता कराच्या वसुलीचे टार्गेट ३५० कोटींचे दिले होते, त्यात महापौरांनी शंभर कोटींची वाढ केली. नगररचना विभागाच्या वसुलीचे टार्गेट १५० कोटींवरून २२० कोटी रुपये करण्यात आले, यात ७० कोटींची वाढ करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाचे टार्गेट तीन कोटींवरून सात कोटी ८० लाख करण्यात आले. अग्निशमन विभागातून महसुली उत्पन्नाचे टार्गेट सव्वातीन कोटींवरून सव्वासात कोटी रुपये करण्यात आले. विशेष शासकीय अनुदान २९१ कोटी २७ लाखांवरून ४९१ कोटी २७ लाख करण्यात आले, त्यात दोनशे कोटींची वाढ करण्यात आली. मालमत्ता विभागाच्या वसूलीचे टार्गेट दहा कोटींवरून वीस कोटी रुपये करण्यात आले.

\Bअर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये\B

- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे

- बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम करणे

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चौकाचे सुशोभिकरण करणे

- बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू करणे

- मीनाताई ठाकरे कन्या सुरक्षा योजना मुदतठेव योजना सुरू करणे

- नाना नानी पार्क, आजी-आजोबा पार्क, मनोरंजन पार्क उभारणे

- सफारी पार्क विकसित करणे

- बौद्ध लेणीमार्ग विकसित करणे

- चार आदर्श रस्ते विकसित करणे

- पाणीपुरवठ्याच्या संबंधित विविध कामांसाठी पन्नास कोटी रुपये

- मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरूकरणे

- पन्नास खाटांचे हॉस्पिटल सुरू करणे

- मोबाइल हॉस्पिटल सुरू करणे

- गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू करणे

- महापालिका शाळांच्या इमारती अद्ययावत करणे

\Bपालिकेच्या अर्थसंकल्पाची घसरण\B

वर्ष.................मूळ अर्थसंकल्प..........सुधारित अर्थसंकल्प

२०१६-१७..........१०७६.०८....................५८६.६०

२०१७-१८..........१११०.३०....................८१६.४३

(अर्थसंकल्प कोटी रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भविष्याच्या शेतीचे काम खोब्रागडे यांनी केले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रयोगशील शेतकरी ज्येष्ठ कृषी शास्‍त्रज्ञ दादाजी खोब्रागडे यांनी केलेले कार्य पुढच्या शतकामध्ये उपयोगाचे ठरणारे असून, येणाऱ्या काळात प्रयोगशील शेतकरी त्यांच्या कार्याची दखल घेतील, असे म्हणत मंथनतर्फे दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सरस्वती भुवन संस्था मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (११ जून) झालेल्या श्रद्धांजली सभेसाठी एच. एम. देसरडा, ज्ञानप्रकाश मोदाणी, अण्णासाहेब खंदारे, सुभाष लोमटे, बुद्धप्रिय कबीर, मेजर सुखदेव बन, सय्यद अमजद, रावसाहेब सोळुंके, डॉ. दीपाली मोरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रा. देसरडा म्हणाले की, खोब्रागडे यांनी अनेक वाणांची, बियाणांची बँक स्थापन केली, मात्र त्यांची सरकारने दखल घेतली नाही. त्यांची उपेक्षा झाली, मात्र येणाऱ्या काळामध्ये प्रयोगशील शेतकरी त्यांच्या कार्याची दखल घेतील.

सध्याच्या औद्योगिक-रासायनिक शेतीची सद्दी संपली असून, ही शेती फार काळ चालणार नाही कारण या शेतीसाठी पैशाची मोठी किंमत मोजावी लागण्यासोबतच उत्पादनातील सत्वही कमी होत असल्याचे देसरडा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही दिनात १६ अर्जांवर सुनावणी

$
0
0

औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (११ जून) आयोजित विभागीय लोकशाही दिनात १६ अर्जावर सुनावणी करण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी प्रलंबित अर्जांची माहिती घेऊन ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या. लोकशाही दिनास उपायुक्त महेंद्र हरपाळकर, वर्षा ठाकूर, सूर्यकांत हजारे, महानगर पालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम, सहायक पोलिस आयुक्त अनिता जमादार, भूजल सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. प. ल. साळवे, जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता श्री. तांबे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरच्या धडकेत एक जण ठार

$
0
0

वाळूज : मुंबई महामार्गावरील तीसगाव चौकात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला. धोंडीराम माणिकराव महापुरे (५५ रा़ तीसगाव) असे मृताचे नाव असून रामदास जाधव जखमी झाले आहेत़ हे दोघे शेत मजूर असून ते महामार्गावरील खवड्या डोंगराकडून तीसगावकडे स्कुटीने (एमएच २० डी डब्ल्यू १३६७) जात होते. लासूरकडून औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या कंटेरने (आर. जे. १४ जी. एच. ७३८०) त्यांना मागून जोराची धडक दिली. अपघातात धोंडीराम महापुरे हे कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाले. रामदास जाधव यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ अपघातानंतर कंटेनर चालक स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळवून नेऊन अत्याचार; दोघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कन्नड तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलीला राहत्या घरातून पळवून नेऊन आठ दिवस डांबून ठेवत अत्याचार केल्याच्या प्रकरणात तुषार प्रकाश धोरडे व भारत भीमराव खंडागळे यांना रविवारी (१० जून) अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, दोघांना शुक्रवारपर्यंत (१५ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी दिले.

या प्रकरणी पीडित मुलीच्या पित्याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १ जून रोजी पीडित मुलीचे आई-वडील बाहेरगावी गेले होते व त्याचदिवशी सायंकाळी परतले असता त्यांना त्यांची मुलगी आढळून आली नाही. शोधाशोध घेऊनही सापडली नाही म्हणून तक्रार दिल्यावरून कन्नड पोलिस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान मोबाइल लोकेशनवरून आरोपी तुषार प्रकाश धोरडे (१९, रा. गौतमनगर, ता. कन्नड) व आरोपी भारत भीमराव खंडागळे (३२, रा. सीतानायक तांडा, ता. कन्नड) यांना रविवारी (१० जून) निफाड तालुक्यातील बसवंत पिंपळगाव येथे अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींनी पीडितेला आठ दिवस डांबून ठेऊन अत्याचार केला असून, आरोपींची वैद्यकीय तपासणी करणे बाकी आहे. त्याचवेळी बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा असल्याने गुन्ह्याचा सखोल तपास करावयाचा आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील विनोद कोटेचा यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा विनयभंग, आरोपीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करणारा आरोपी भारत पंढरीनाथ रगडे याला दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी ठोठावली.

वाळूज औद्योगिक वसाहत परिसरामध्ये १९ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबासोबत राहते. २५ फेब्रुवारी २०१४ रोजी चिकलठाणा परिसरात राहणारा भारत पंढरीनाथ रगडे हा सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरात आला व त्याने आतून दरवाजा लावून विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याला विवाहितेने प्रतिकार केला असता आरोपीने पीडितेला मारहाण केली. या प्रसंगी विवाहितेचा हात जोरात दाबल्यामुळे बांगड्या फुटून पीडितेच्या मनगटात घुसल्या असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करुन भारत रगडे याच्याविरोधातील दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात पीडित विवाहितेची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भादंवि ३५४ (अ) कलमान्वये २ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरी, तसेच भादंवि ३२३ कलमान्वये ६ महिने सक्तमजुरी, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दंडापैकी ४ हजार रुपये विवाहितेला नुकसान भरपाईपोटी देण्यात यावेत, असेही कोर्टाने आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images