Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘पीजी’ची यादी जाहीर

$
0
0

औरंगाबाद: पदव्युत्तर वर्ग प्रवेशाच्या पहिल्या यादीत पाच हजार ५४९ विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. यातील १९१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर २६८३ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या महाविद्यालयाचा पर्याय निवडला आहे. पर्यायांपैकी प्रवेश जाहीर झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा नसलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन दुसरा पर्याय ऑनलइन प्रक्रियेद्वारे नोंदवावा, असे आवाहन प्र-कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऐन पावसाळ्यात हजार टँकर सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निम्म्या मराठवाड्यामध्ये जून महिन्यातच पावसाची दमदार 'ओपनिंग' झाली. त्यामुळे टँकरसंख्येत घट होणे अपेक्षित होते. मात्र, औरंगाबाद, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील गावांना टँकरचा विळखा कायम आहे. ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील ७८५ गावे व १७८ गावांमध्ये ९८६ टँकर सुरू असल्याचे चित्र चिंताजनक आहे.

जून महिन्याच्या प्रारंभी उस्मानाबाद, लातूर तसेच बीड जिल्ह्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले, या भागात गेल्या वर्षीही चांगला पाऊस असल्यामुळे यंदा या जिल्ह्यांना पाण्याची अडचण झाली नाही. दुसरीकडे गेल्या वर्षीप्रमाणे यंदा औरंगाबाद जिल्ह्याला जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली असून आतापर्यंत जिल्ह्यात केवळ दोन टक्के, असा अत्यंत किरकोळ पाऊस झाला आहे. परिणामी, पावसाळ्यात टँकर बंद होण्याऐवजी औरंगाबाद जिल्ह्यात टँकरची संख्या कायम आहे. जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही अनेक गावांची तसेच वाड्यांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे.

सध्या मराठवाड्यातील ७८५ गावे व १७८ वाड्यांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असून विभागातील तब्बल १६ लाख १२ हजार नागरिकांची तहान ९८६ टँकरद्वारे भागवली जात आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ६३६ टँकर सुरू आहेत, तर उस्मानाबाद जिल्ह्याला टँकरची गरज पडली नाही. या शिवाय टंचाईवर मात करण्यासाठी विभागातील २२५३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

-----------.

जिल्हा............... टँकर........विहीरींचे अधिग्रहण........... टँकरवर अवलंबून लोकसंख्या

औरंगाबाद............६२३............५०४.........................१ लाख ९६ हजार

जालना.................१५२............३६९.........................२ लाख ८३ हजार

परभणी.................३२...............२२०.........................४३ हजार २०६

हिंगोली................२१................३२७.........................२७ हजार ८६८

नांदेड..................१२२...............४८२........................१ लाख ३० हजार

बीड......................२१................१७८........................३० हजार ८५

लातूर....................०२..................१२८......................९८६

उस्मानाबाद..............००..................००........................००

---------------------------------------------------------------.

एकूण....................९८६..................२२५३...............१६ लाख १२ हजार ४३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीतील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे असून, रुग्णालयातील ओल्या कचऱ्यापासून लवकरच बायोगॅसची निर्मिती होणार आहे आणि लवकरच हा प्रकल्प घाटीत उभा राहणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे ओल्याचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहेच. शिवाय घाटीच्या निम्म्या गॅसची बचतही होणार आहे. त्याचबरोबर आता सुका कचऱ्याचाही प्रश्न मार्गी लागला असून, सुका कचरा घेऊन जाण्यासाठी एका संस्थेला काम देण्यात आले आहे आणि हे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प यशस्वी झाल्यास तो राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. महापालिकेकडून कचरा उचलण्यामध्ये अनियमितता आल्यानंतर, तर हा प्रश्न जास्त तीव्र झाला होता. त्यामुळेच घाटी प्रशासन आणि मुख्यत्वे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या प्रयत्नातून बायोगॅस निर्मितीची चाचपणी करण्यात आली. त्यानंतर हा प्रकल्प उभा करण्याचा तातडीने निर्णयही घेण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे मंगळवारपासून (१९ जून) या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू होऊन येत्या दोन आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर काही आठवड्यांत हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे घाटीतील गॅसवर दर महिन्याला ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च होतो आणि हा प्रकल्प उभा राहिल्यानंतर घाटीच्या किचनला मिळणाऱ्या गॅसमुळेच खर्च निम्म्याने घटणार आहे. या प्रकल्पासाठी साडेतीन ते चार लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सद्यस्थितीत 'सर्जिकल बिल्डिंग'मधील सर्व वॉर्डांचा ओला कचरा एकत्र करून त्यातून बायोगॅस निर्मिती सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 'मेडिसिन बिल्डिंग'मधील इतर वॉर्डांचा ओला कचराही एकत्र केला जाणार आहे.

\Bसर्व वर्डांमध्ये जाळीच्या डस्टबिन\B

सद्यस्थितीत बहुतांश वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यात येत असून, सुक्या कचऱ्याच्या संकलनासाठी खास ५० जाळीच्या डस्टबिन तयार करण्यात आल्या आहेत. आता थेट वॉर्डांमध्येच ओला-सुका कचरा वेगवेगळा करण्यात येतो. त्यामुळे कचऱ्याच्या वाहतुकीपासून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुका कचऱ्याच्या संकलनासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर एका संस्थेला काम देण्यात आले असून, या संस्थेमार्फत सुका कचऱ्याचे संकलन करण्यात येत आहे.

बायोगॅस निर्मिती प्रकल्पाची निविदा प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होईल व दोन आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन लवककच प्रकल्प उभा राहील. त्यामुळे गॅसचे निम्मे शुल्क घटेल व पैशांची बचत होऊन ओल्या कचऱ्याचा प्रश्नही मिटेल.

- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

ओल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर होता आणि त्यामुळेच बायोगॅस निर्मितीचा प्रभावी पर्याय शोधण्यात आला. तसेच ८० टक्क्यांपेक्षा जास्त सुका कचऱ्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. वॉर्डा-वॉर्डांमध्येच ओला व सुका कचरा वेगवेगळा होत आहे.

- डॉ. कानन येळ‍ीकर, अधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुना मोंढा परिसरात रिक्षा, दुचाकीचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुना मोंढा परिसरात रिक्षाची चाके चोरण्याची तसेच दुचाकी जाळण्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुना मोंढा भागातील आसीफ लतिफ पठाण हे त्याच परिसरातील एका ब्रोकरकडे कामाला आहे. रविवारी रात्री पठाण त्यांची दुचाकी कार्यालयासमोर लाऊन घरी गेले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांची दुचाकी पेटवून दिली. तेथील जालना पिपल्स बँकेच्या वॉचमनने पठाण यांना कॉल करून हा प्रकार सांगितला. वॉचमनने आग विझवली मात्र तोपर्यंत दुचाकीचे नुकसान झाले होते. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याच परिसरात उभी असलेली (एमएच २० बीटी ९८६५) या रिक्षाचे अज्ञात माथेफीरूने नुकसान केले. शुक्रवारी चोरट्याने या रिक्षाची दोन्ही चाके चोरून नेली. त्यानंतर पुन्हा टफ फाडून या रिक्षाचे नुकसान करण्यात आले. दरम्यान, या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉटरीच्या नावाखाली चालणाऱ्या सोरट जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0

पान दोन मेनलीड

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या सोरट जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. छावणी भागातील दाणा बाजार येथे सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अड्डाचालकासह पाच जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ७५ हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

दाणा बाजार भागात ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये चित्रावर चालणारा सोरट जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली होती. या माहितीवरून या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी टेबलावर चित्रांचा चार्ट मांडून त्याभोवती जुगार सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी यावेळी अड्डाचालक अंकुश राजकुमार धानुका (वय ३३, रा. दाणा बाजार, छावणी), दिलीप लालू श्रीवास्तव (वय ४२), शेख याकुब शेख हुसेन (वय ३०), शेख युनूस शेख युसूफ (वय ३०, सर्व रा. छावणी), आनंद राजेंद्र वडमारे (वय २६) आणि शिवाजी कचरू तुरूकमाने (वय ५० दोघे रा. भावसिंगपुरा) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणावरून जुगाराचे साहित्य, रोख ७५ हजार, मोबाइल, कॅल्युलेटर आदी एक लाखांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल, राजेंद्र साळूंके, गजानन मांटे, सुनील धात्रक, प्रभाकर राऊत व विशाल सोनवणे यांनी केली.

चौकट

चित्रावर चालतो हारजीत सोरट जुगार

सोरट जुगारामध्ये पक्षी, प्राणी, वस्तू यांच्या चित्राचा एक चार्ट असतो. या चित्रावर रक्कम लावण्यात येते. यामध्ये या चित्राचा क्रमांक आल्यास लावणारा जुगारी विजेता ठरतो. या आरोपीमध्ये अंकुश धानुका हा जुगार अड्डाचालक असून दिलीप श्रीवास्तव हा नोकर त्याला या कामासाठी मदत करत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकडी प्रकरणामागील ‘कर्ता’ शोधावा : मलिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाकडी येथील झालेले प्रकरण मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातनू दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, या प्रकरणामागचा कर्ता शोधावा व त्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवारी कांग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलीक यांनी केली.

मलिक यांनी सोमवारी (१८ जून) वाकडी येथील पीडित मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकरण जाणून घेतले. यानंतर मलिक यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, दहा जून रोजी वाकडी येथील घटना घडल., १२ रोजी फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली, मात्र त्यानंतर मंत्री गिरीष महाजन या प्रकरणात तक्रार मागे घेण्यात आल्याची माहिती माध्यमांना दिली मात्र पीडित कुटुंबीयांना आम्ही भेटलो असता त्यांचे अपहरण करून प्रकरण मागे घेण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली.

कोऱ्या कागदावर अंगठे घेण्यात आले असल्याचे आम्हाला कुटुंबीयांनी सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान, जळगाव येथील समतानगरमध्ये एका लहान मुलीवर बलात्कार करण्यात आला, या प्रकरणातही पोलीसांनी आठ दिवसांपासून तपास करत नसल्याचेही मलिक यांनी सांगितले.

\Bसरकारच्या संरक्षणात माफियांचा कारभार\B

राज्यात सरकारच्या संरक्षणामध्ये गुटखा तसेच वाळूमाफियांचे कारभार सुरू असल्याचे सांगत मलिक यांनी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांची गुटख्याची गाडी सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत असल्याच्या व्हिडिओ क्लिपचे उदाहरण दिले; तसेच जळगाव येथेही भाजपचे जिल्हाध्यक्षांनी ड्रग माफियांकडून धंदा सुरू ठेवण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हरित मराठवाडा; सर्वांनी प्रयत्न करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यभरात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुनगंटीवार यांनी सोमवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वृक्षलागवड आणि मुद्रा योजनेविषयी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हा‌धिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील वृक्ष लागवडीच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली केली. नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत माझी शाळा, माझी टेकडी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, टेकडीसाठी संपर्क अधिकारी, तुती, फळबाग लागवड, बनांची निर्मिती, ग्रामनिहाय समिती, युवक, ज्ञान आणि ग्राम संकल्पना याबाबत सांगितले. या संकल्पनांचे वनमंत्र्यांनी कौतुक करून त्यापासून इतर जिल्ह्यांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

गरजू आणि नव उद्योजकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना राबविण्यात येत असून ती तळागाळातील घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धिविषयी बोलताना जिल्हधिकारी उदय चौधरी यांनी मुद्रा योजनेच्या लाभार्थ्याना प्रशिक्षण दिल्यास ते यशस्वी उद्योजक होतील, अशी संकल्पना मांडली. या संकल्पनेचे अर्थमंत्र्यांनी कौतुक करत याबाबत नियोजन विभागाला सविस्तर आराखडा पाठवावा जेणेकरून राज्यस्तरावर याचे नियोजन करणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदाच्या सरींनी औरंगाबाद चिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात दमदार पाऊस होत असताना पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या औरंगाबाद शहरातील नागरिकांना सोमवारी (१८ जून) पावसाच्या आनंदाच्या सरींनी चिंब केले.

दुपारनंतर वातावरणातील उकाडा वाढल्यामुळे पावसाची चिन्हे होती, सायंकाळी सव्वासात वाजता अचानक आलेल्या ढगांमधून पावसाचे टपोरे थेंब बरसल्याने शहरवासीयांना सुखद धक्का मिळाला. २० ते २५ मिनिटे बरसलेला हा पाऊस शहरात सर्वदूर पडला. दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना बरसलेल्या या पावसाने गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेला उकाडा दूर झाला. जवळपास दहा दिवसांनंतर शहरात पावसाने हजेरी लावली. गेल्या आठवड्यामध्ये औरंगाबादमध्ये पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने वर्तवला होता, प्रत्यक्षात मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने हे इशारे फोल ठरले.

सोमवारी बरसलेल्या पावसात भिजण्याचा आनंद अनेकांनी घेतला. सध्या बाजारामध्ये शालेय साहित्य घेण्यासाठी गर्दी उसळली असल्यामुळे विद्यार्थी-पालकांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून शहर व्यापून टाकणारे ढग वाऱ्यासोबतच वाहून जात असल्याचा अनुभव शहरवासी घेत आहेत, मात्र पडणारा हा पाऊस अल्पावधीचा ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीत आता अलार्म सिस्टिम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्व प्रकारची आपत्कालिन स्थिती, गोंधळ; तसेच हल्ल्यांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता घाटीसह राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये 'अलार्म सिस्टिम' तयार केली जाणार आहे. त्यामुळेच अशा कोणत्याही स्थितीत अलार्म वाजताच सुरक्षा रक्षक, कर्मचारी त्या त्या वॉर्डात धावून जातील आणि प्रश्न-समस्या यशस्वीपणे सोडवतील. विशेष म्हणजे १२ जून रोजी मार्ड संघटनेच्या सदस्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. घाटीमध्ये सोमवारी (१८ जून) 'अलार्म सिस्टिम'चे प्रात्यक्षिकही करण्यात आले.

घाटीसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडतात आणि सर्वांनाच नाहक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातच जेव्हा केव्हा अशी एखादी घटना घडते, तेव्हा त्या त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असले तरी कमी असतात आणि हल्लेखोर जास्त असल्यास त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते. त्यामुळेच संपूर्ण रुग्णालयात 'अलार्म सिस्टीम' असावी, अशी सूचना निवासी डॉक्टरांच्या 'मार्ड' संघटनेने १२ जून रोजी झालेल्या बैठकीत केली होती. त्यानंतर अशी 'अलार्म सिस्टिम' प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये तयार करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) वतीने देण्यात आले आहेत. त्यानुसार घाटीमध्ये सोमवारी 'अलार्म सिस्टीम'चा डेमो घेण्यात आला. आता या 'सिस्टिम'नुसार प्रत्येक वॉर्डामधून 'अलार्म' देण्याची सोय असणार आहे आणि कोणत्याही वॉर्डातून 'अलार्म' देताच त्याचा सायरन अपघात विभागातील पोलिस चौकीत वाजेल आणि कोणत्या वॉर्डातून सायरन वाजला हे अपघात विभागातील 'डिस्प्ले'वरून दुसऱ्याच क्षणी स्पष्ट होईल. त्यामुळे अलार्म वाजताच अपघात विगातील सुरक्षा रक्षक त्या त्या वॉर्डात धावतील आणि प्रश्न-समस्या सोडवतील, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्याची रस्ता कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागरी वसाहत वेगाने वाढत असलेल्या सातारा परिसरातील रस्त्यांच्या कामांना महापालिकेने ऐन पावसाळ्याचा मुहूर्त काढला आहे. त्यामुळे ही कामे सुरू झाल्यानंतर रखडण्याचीच शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही सातारा परिसरातील नागरिकांना येणाऱ्या पावसाळ्यातही खड्डे आणि चिखलमय रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागणार आहे. महापालिकेच्या प्रशासकीय दिरंगाईचा फटका या रस्त्यांच्या कामांना बसला आहे.

सातारा परिसरात गेल्या दशकात नागरी वसाहती वेगाने उभारल्या. या परिसराला बीड बायपास मार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. या सर्व रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्याच्या घोषणाही झाल्या, मात्र प्रत्यक्ष कामे सुरू करण्यात आली नाहीत. रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया लांबली. त्याचा फटका या परिसराला बसला आहे. सातारा परिसरातील नागरिकांकडून सिडकोने

भूखंड 'एनए-४७ ब' करण्यासाठी शुल्क वसूल केले होते. सिडकोकडे सातारा परिसरातून सुमारे साडेआठ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर सातारा, देवळाई परिसराचा समावेश महापालिकेत झाला. सातारा, देवळाई परिसराील नागरिकांनी शुल्कापोटी भरलेल्या सुमारे साडेआठ कोटी रुपयांतून रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.

रेणुका माता मंदिर कमानीपासून सातारा परिसरात जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार निधीतून या रस्त्याचे काम केले गेले. हा रस्ता एका वर्षातच उखडला. नागरिकांच्या तक्रारींनंतर या रस्त्यावर डांबरीकरणातून खड्डे बुजविण्याचे काम काम करण्यात आले. काही महिन्यांतच रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली. या पार्श्वभूमीवर सातारा - देवळाई संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने महापालिकेवर चार महिन्यांपूर्वी मोर्चा काढला होता. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेने रस्त्याच्या कामाचा निर्णय घेतला. रस्त्यांचे काम काँक्रिटीकरणातून करण्याचा नागरिकांचा आग्रह होता. परिसरात जलवाहिन्या, ड्रेनेज लाइन यांची कामे केलेली नाहीत. त्यामुळे रस्त्याचे काम डांबरीकरणातून करावे, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. यासंदर्भात मार्च महिन्यात नागरिकांची नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे आणि सायली जमादार यांच्या उपस्थितीत बैठकही घेण्यात आली होती. या बैठकीत नागरिकांनी डांबकीरकरणाला संमती दर्शविली. त्यावेळी रस्त्याचे काम काही दिवसांत सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली नाही. महापालिकेत आयुक्तांच्या बदलीमुळे निविदा प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यानंतर स्थायी समितीच्या सभापतींची मुदत संपल्यामुळेही काम लांबल्याचे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष काम कधी सुरू होते याची प्रतीक्षा आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्याचे काम सुरू होईल का, याबाबत परिसरातील नागरिकांना शंका आहे. एमआयटी महाविद्यालयापासून सातारा गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम काही आठवड्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. काही दिवसांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्याचबरोबर कमलनयन बजाज हॉस्पिटलपासून सुधाकरनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. हे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.

\Bचालढकल सुरू

\Bरेणुका माता मंदिर कमानीपासून अहिल्यादे‌वी होळकर चौकापर्यंत रस्त्याचे काम मंजूर केले आहे. त्यासाठी सुमारे दोन कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आठ दिवसांपूर्वी कंत्राटदाराने रस्त्याच्या लेव्हल तपासणीचे कामकेले. त्यानंतर चार दिवसांत काम सुरू होणार असल्याचे सांगिल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्याचे काम होईल काय, याबद्दल शंका आहे.

\Bदर्जेदार काम करावे

\B'रेणुका‌माता मंदिर ते अहिल्यादेवी होळकर चौक या रस्त्याच्या कामाचा गेल्या चार महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम करणे अपेक्षित होते. अद्यापपर्यंत काम सुरू करण्यात आलेले नाही. महापालिकेने लवकर काम सुरू करावे. काम चांगल्या दर्जाचे केले पाहिजे. त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांना काम सुरू असताना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा,' असे मत सातारा-देवळाई संघर्ष समितीचे सोमिनाथ शिरणे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलसचिवांच्या निलंबनाचा फार्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई 'फार्स' ठरला. व्यवस्थापन परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पांडे यांच्या निलंबनाची घोषणा केली. मात्र, ही कारवाई रेकॉर्डवर नसल्याने पांडे सोमवारी (१८ जून) रुजू झाल्या. 'मुप्टा' संघटनेने विद्यापीठात पांडे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले, तर तीन संघटनांनी पांडे यांच्या समर्थनार्थ निवेदन दिले.

व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीपूर्वी अधिसभा बैठकीत प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांचे भाषण वादग्रस्त ठरले. पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख 'आंबेडकर महाराज' केला. या शब्दाला आक्षेप घेत प्रा. सुनील मगरे यांनी पांडे यांच्या निलंबनाची मागणी केली होती. आंबेडकरांचे दैवतीकरण करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या डावाचाच हा भाग असल्याचे प्रा. मगरे यांनी म्हटले होते. पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा घेत मगरे यांनी ठिय्या आंदोलन केले होते. व्यवस्थापन परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया बाकी असल्यामुळे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यासमोर पेच निर्माण झाला. यावर अर्धा तास खल केल्यानंतर चोपडे यांनी प्रभारी कुलसचिव पांडे यांच्या निलंबनाची घोषणा केली. विशेष म्हणजे निलंबन झाल्यानंतरही पांडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. पांडे यांच्या निलंबनाची कारवाई रेकॉर्डवर घेतली नसल्यामुळे निलंबन निव्वळ फार्स ठरल्याचे समोर आले. अधिकाऱ्याचे निलंबन करण्यासाठी ठराव होणे अपेक्षित असते. तसेच अधिसभा फक्त सूचना करू शकते. निलंबनाची कायदेशीर प्रक्रिया झाली नसल्यामुळे निलंबनाचा फक्त धुरळा उठला. विद्यापीठ प्रशासन निलंबन प्रक्रियेला अनुकूल नसल्यामुळे डॉ. पांडे सोमवारी रूजू झाल्या.

दरम्यान, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या अधिसभा सदस्यांवर कारवाईची मागणी स्वाभिमानी मुप्टा संघटनेने केली. या निवेदनावर डॉ. किशोर साळवे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर वाघ, प्रा. प्रशांत वनंजे, डॉ. अरुण शिरसाठ आदींची स्वाक्षरी आहे. पांडे यांच्या समर्थनार्थ अधिसभा सदस्य योगिता तौर-होके यांनी निवेदन दिले. महिला अधिकाऱ्याला त्रास देणे निषेधार्ह असल्याचे होके यांनी म्हटले आहे.

विद्यापीठात शनिवारी नाट्य महोत्सव सुरू झाला. या महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेत डॉ. साधना पांडे यांचे नाव होते. त्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यामुळे निलंबन झाल्याची चर्चा होती. पण, त्याच दिवशी पांडे यांनी कुलगुरुंच्या चौकशीसाठी आलेल्या समितीला आवश्यक कागदपत्रे सादर केली. या गोंधळात निलंबन केवळ चर्चेपुरते मर्यादित राहिले.

\Bदोन गटांचे आरोप-प्रत्यारोप\B

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'महाराज' म्हणत डॉ. साधना पांडे यांनी दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांना पदावरून काढण्याची मागणी करीत महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) संघटनेने जोरदार निदर्शने केली. यावेळी प्रा. सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे, प्रा. भास्कर टेकाळे, डॉ. सुनील मेढे, प्रा. सुनील जाधव, राजेंद्र जाधव, शेख मुनीर, शिवराम मस्के, बाळू झारगड आदी उपस्थित होते. राजकीय स्वार्थापोटी वक्तव्याचा विपर्यास करून शैक्षणिक वातावरण खराब करणाऱ्या नेत्यांचा निषेध करीत असल्याचे निवेदन रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरशेनने प्र-कुलगुरुंना दिले. या निवेदनावर नागराज गायकवाड, लक्ष्मण हिवराळे, नितीन वाकेकर, प्रकाश पारदे, सतीश गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएमआयए कार्यकारिणी शनिवारी निवडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरची (सीएमआयए) ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (२३ जून) आयोजित करण्यात आली आहे. यावेळी २०१८ -१९साठी नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार आहे.

मराठवाड्यातील उद्योगांसाठी असलेली संघटना असून, तिची स्थापना १९६७-६८ मध्ये झाली. मराठवाड्यातील लघू, मध्यम, मोठे उद्योग आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधित्व सीएमआयए करते. 'सीएमआयए'चे ६००पेक्षा अधिक सदस्य असून, यामध्ये अनेक आघाडीच्या उद्योगांचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व उद्योगांना अनेक प्रकारे सहाय्य करत आणि मराठवाड्यातील उद्योगांच्या विकास व वाढीसाठी सीएमआयए उत्प्रेरक म्हणून कार्य करते. औरंगाबादला नवीन गुंतवणूक व्हावी तसेच नवीन उद्योग यावेत आणि एकूणच या विभागाचा विकास व्हावा यासाठी सीएमआयए विविध स्तरावरती गेली ५० वर्षे प्रयत्नशील आहे.

सीएमआयएच्या घटनेप्रमाणे ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि २०१८-१९साठी कार्यकारिणीवर सहा नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी शनिवारी निवडणूक होणार आहे. सीएमआयए कार्यालयात ही निवडणूक होईल. यासाठी विहित नमुन्यात अर्ज स्वीकारण्याची मुदत तारीख २० जून सायंकाळी पाचपर्यंत आहे. वार्षिक सर्वसाधारण झाल्यावर नवीन पदाधिकाऱ्यांची निवडणूक होईल. सभासदांनी सर्वसाधारण सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन सीएमआयए अध्यक्ष प्रसाद कोकिळ यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सालारजंगची मालमत्ता सील करण्यावरून भाडेकरू पोलिसात वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिन्सी पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या सालारजंगची मालमत्ता सील करण्यावरून पोलिस पथक व भाडेकरूत शाब्दिक वाद झाला. सोमवारी दुपारी दोन वाजता हा प्रकार घडला. या घटनेमुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हैदराबादच्या नवाब सालारजंगचे तिसरे वारस मीर युसूफअली खान यांच्या औरंगाबादसह भारतात विविध ठिकाणी मालमत्ता आहेत. महमंद नसरोद्दीन नावाच्या आरोपीने त्यांचा प्रशासक असल्याचे भासवत बनावट कागदपत्राआधारे एक मालमत्ता दोन कोटी रुपयांना विकली आहे. याप्रकरणी मालमत्तेचे वारस नवाब मीर मेहमूद अली खान यांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या मालमत्तेपैकी एक जिन्सी पोलिस ठाण्यासमोर ६ एकर २० गुंठे जागेवर काही गोडावून व रिकामे गाळे आहेत. सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक या जागेवर मालमत्ता सील करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची भाडेकरूसोबत चकमक उडाल्याने तणाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार दुभाजकावर

$
0
0

फोटो कॅप्शन : (फोटो तीन कॉलम लावणे)

भरधाव वेगाने जात असलेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर चढली. सोमवारी सायंकाळी पाच वाजता बसैयेनगर भागातील नावंदर हॉस्पिटलसमोर हा प्रकार घडला. बसैयेनगराकडून ही कार (क्रमांक एमएच १६, एबी ७५१) येत असताना हा विचित्र अपघात घडला. या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. क्रेनच्या मदतीने ही कार खाली उतरवण्यात आली. जिन्सी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून कारचालकाचे नाव उशिरापर्यंत समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या कार्यालयास सिंगल फेजसाठी कुलूप

$
0
0

वाळूज महानगर:  गंगापूर तालुक्यातील मौजाबाद, सुरेवाडी व बाबरगाव येथे सिंगल फेज वीज योजना कार्यान्वित करावी या मागणीसाठी येथील नागरिकांनी महावितरण कार्यालयाला सोमवारी कुलूप लावले.

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सिंगल फेज विजेसाठी चार दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदानाचा जाब विचारण्यासाठी शेतकरी सोमवारी सकाळी कार्यालयात आले. परंतु, येथे अधिकारीच नसल्याने शेतकरी संतप्त झाले़ त्यांनी  लासूर रोड वरील महावितरण कार्यालयाला कुलूप लावून महावितरणचे प्रशासन व राज्य सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही या मागणीवर शेतकरी ठाम असल्याचे पाहून कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलकांसोबत फोनवर चर्चा करून पंधरा दिवसात मागणी पूर्ण करू, असे लेखी आश्वासन दिले़ यावेळी यावेळी शेतकरी कृती समितीचे निमंत्रक संकेत मैराळ, समन्वयक भाऊसाहेब शेळके, कृष्णा दंडे, संदीप मैराळ, संदीप दंडे, गुलचंद लखवल, जीवन राजपूत, सुभाष सावंत, देविदास मैराळ, सचिन सातपुते, अरुण वाघ, योगेश जाधव, आनंद मैराळ, भगवान कहाटे, राजाभाऊ दंडे, सुरेश दंडे, महेश सावंत, लक्ष्मण बहिर, सुनील डुकरे, चांगदेव दंडे आदींसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाकीटमाराला अटक, रवानगी कोठडीमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी बसमध्ये चढताना खिशातील पाकीट मारणाऱ्या व पाकीटातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपी अमजद खान महेमूद खान याला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, मंगळवारपर्यंत (१९ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

या प्रकरणी डॉ. संदीप नारायण पंडितकर (४०, रा. रिसोड, जि. वाशीम) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा १५ जून रोजी रुग्णालयातील कामासाठी औरंगाबाद येथे आला होता व रुग्णालयातील काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास सिडको बसस्थानक येथून रिसोड बसमध्ये बसताना फिर्यादीच्या पँटच्या खिशातील पाकीट दोघांनी चोरून पळ काढला. पाकीट चोरल्याची चाहूल लागताच फिर्यादीसह त्याच्या मित्राने दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला व त्यातील आरोपी अमजद खान महेमूद खान (२७, रा. मिसारवाडी, औरंगाबाद) याला पकडण्यात यश मिळाले. आसपासच्या नागरिकांच्या मदतीने आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून मुद्देमाल हस्तेगत करणे व आरोपीच्या साथीदाराला अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपीने या प्रकारचे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता असून, याबाबत तपास करावयाचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांची कोर्टात धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन शस्त्र खरेदी विक्री प्रकरणात गुन्हे शाखेने फ्लीपकार्ट व इन्स्टाकार्टच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी कागदपत्रासह गुन्हे शाखेत हजर राहण्याची नोटीस बजावली होती. या दोन अधिकाऱ्यांनी या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी थेट कोर्टात धाव घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२८ मे रोजी गुन्हे शाखेने नागेश्वरवाडी व जयभवानीनगर येथील इन्स्टाकार्ट कुरियर एजन्सीच्या कार्यालयावर छापे मारले होते. यामध्ये ऑनलाइन खेळण्याच्या नावाखाली मागवण्यात आलेली ३१ शस्त्रे जप्त करण्यात आली. यामध्ये तलवारी, चाकू, गुप्ती आदींचा समावेश होता. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली हेाती. फ्लिपकार्ट या ऑनलाइन खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीमार्फत ही शस्त्रे बुक करून मागविण्यात आली होती. याप्रकरणी कंपनीच्या भिवंडी येथील गोडाऊनची देखील झाडाझडती घेण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेने इन्स्टाकार्टचे बेंगलोर येथील वेस्ट रिजनचे सिनीयन मॅनेजर चंद्रशेखर शर्मा यांना तसेच मुंबई येथील सिटी लॉजेस्टीकचे संचालक कमलदास यांना नोटीस बजावली होती. यामध्ये गुन्ह्या संदर्भात लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रासह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. गेल्या आठवड्यात ही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, या दोन अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेत हजेरी लावली नाही. अटकपूर्व जामिनासाठी या दोघांनी कोर्टात धाव घेतली असल्याची माहिती गुन्हे शाखेतील विश्वासनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही दिनाकडे महिलांची पुन्हा पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिला लोकशाही दिनाचा प्रचार केला जातो, असा दावा करणारा जिल्हा महिला व बालविकास विभाग पुन्हा तोंडघाशी पडला. लोकशाही दिनात सोमवारी एकही महिला तक्रार करायला आली नाही. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यात केवळ एक तक्रार विभागाला प्राप्त झाली.

महिला लोकशाही दिनात एकही तक्रार येत नाही याचा अर्थ महिलांच्या तक्रारी संपल्या का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या सुनिता तगारे यांनी विचारला. महिला तक्रार करत नाही यावर चर्चा करण्याऐवजी संबंधित विभागही नेहमीप्रमाणे लोकशाही दिनास अनुपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी विभागाचे विधी सल्लागार यू. एल. शिंदे, संरक्षण अधिकारी रीना भाकरे, पोलिस आयुक्तालयातील अनिल जोशी उपस्थित होते. जानेवारीपासून तक्रारकर्त्यांनी लोकशाही दिनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. २०१७ मध्ये विभागाला किमान २२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांत फेब्रुवारीतील केवळ एक तक्रार सोडली तर एकाही महिलेने तक्रार केली नाही; तसेच ग्रामीण अधीक्षक कार्यालय, समाजकल्याण विभाग व जिल्हा परिषद विभागातील अधिकार्यांनी लोकशाही दिनास पुन्हा दांडी मारली.

विभागाच्या लोकशाही दिनात महिलांना थेट तक्रार करण्याची सुविधा असूनही विभागाकडे एकही तक्रार प्राप्त होत नाही. यावर आश्चर्य व्यक्त करत विभाग खरच प्रचार करतो का, विभागाच्या लोकशाही दिनात खटले निकाली निघतात का? महिला व बालविकास विभागाने महिलांचा विश्वास तरी संपादन केला आहे, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा म्हणाल्या. एकीकडे पोलिस आयुक्तालय, महिला समुपदेशन केंद्रामध्ये महिलांना तारख्या द्यावा लागतात. कारण पोलिस किमान दखल घेतात एवढा विश्वास महिलांना असतो. महिला व बालविकास विभाग सोपस्कार पार पाडत असेल, तर तक्रारकर्त्या येतील तरी कशा, असेही त्या म्हणाल्या.

विभागाने वेळोवेळी जनजागृती कार्यक्रम घेतले पाहिजे. अन्यथा महिला विभागापर्यंत येतील तरी कशा, असे समाजिक कार्यकर्त्या सुनिता तगारे म्हणाल्या. विभागाच्या विविध माध्यमांच्या वतीने लोकशाही दिनाची माहिती दिली जात असते; तसेच तालुकास्तरावरचा लोकशाही दिन, महिलांसाठी असलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थांमुळे महिला लोकशाही दिनात महिला कमी येतात, असे विभागाकडून वारंवार सांगितले जाते. दीड वर्षात प्राप्त झालेल्या तक्रारी व त्या निकालात काढायला लागलेला उशीर पाहता प्रचाराची व्याप्ती किती मर्यादित आहे, हे प्रामुख्याने दिसून येते.

महिला लोकशाही दिनात आलेल्या तक्रारी

२०१७ : २२

२०१८: १

विभागाने महिलांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. पोलिसांविषयी कितीही ग्रह असला तरी महिला सहाय्य कक्षात महिलांची गर्दी असते. विभागाने याचे गांभीर्य लक्षात घ्यावे.

- मंगल खिंवसरा, सामाजिक कार्यकर्त्या

शासकीय योजनांचा प्रचार विभागाने करायलाच हवा. या दिनात महिला याव्या असे वाटत असेल तर सातत्याने प्रचार झाला पाहिजे.

- सुनिता तगारे, सामाजिक कार्यकर्त्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी मोफत योग कार्यशाळा

$
0
0

येत्या १९ ते २१ जूनदरम्यान आयोजन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

योगाचे महत्त्व संपूर्ण विश्वाने जाणले. उत्तम व आदर्श जीवनप्रणालीसाठी योग प्रचार, योग संवर्धन व्हायला हवे. प्रत्येकाने योग शिकावा हाच ध्यास घेऊन योग प्रचार होत आहे. योगाचा ध्यास घेतलेल्या संस्थांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही योगाने झपाटले आहे. या चळवळीत आपणही असायला हवे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने महिलांना योग शिकण्याची व आत्मसात करण्याची संधी देताना डॉ. हर्षदाज् योग सेंटरच्या वतीने महिलांसाठी योगवर्ग आयोजित केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहेत. होमोयोपॅथी फिजिशियन व डायटिशियन डॉ. हर्षदा शेलार मार्गदर्शन करणार असून, १९ ते २१ जूनदरम्यान सायंकाळी पाच ते सहा यावेळेत योगवर्ग होतील. योगवर्गात योगाचे महत्त्व, आसने, ओंकारचे महत्त्व, अनुलोम- विलोम, प्रार्थना शिकवल्या जातील. तीन दिवसाचे वर्ग महिलांसाठी खुले व मोफत आहेत, मात्र प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल. मग वाट कसली पाहताय. ज्या योगाने अवघ्या विश्वाला एकत्र आणले. त्या योगाचा वारसा जपण्यासाठी व संवर्धनासाठी योगा शिकायलाच हवा.

स्थळ : डॉ. हर्षदाज योग सेंटर, ५५ - बी, न्यू एसटी कॉलनी, ठाकरे नगर, पहाडे हेरिटेजसमोर, एन २

वेळ : सायंकाळी ५ ते ७

मार्गदर्शिका : डॉ. हर्षदा शेलार, होमोयोपॅथी फिजिशियन व डायटिशियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीचे प्लॉट विक्रीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने १५४ प्लॉट विक्रीला काढले आहेत. जुन्या मोंढ्यांचे जाधववाडीत स्थलांतर होण्यासाठी बाजार समिती कसोशीने प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्लॉट विक्रीत जुना मोंढ्यातील व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, प्लॉट खरेदीसाठी आतापर्यंत सुमारे ५० जणांनी संमती दर्शवली असून सर्व व्यापाऱ्यांची रक्कम जमा होताच लीजडीड केली जाईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

जाधववाडी येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात व्यापारी, शेतकरी तसेच ग्राहकांना सोईस्कर व्हावे, यासाठी समिती प्रशासनाने धान्य मार्केट, किराणा व जनरल शापिंग सेंटर, फळे -भाजीपाला मार्केट असे विभाग तयार केले आहेत. यात व्यापाऱ्यांना सातशेहून अधिक गाळे लीजवर दिले आहेत. बाजार समितीचा वाढता विस्तार लक्षात घेत समितीने पणन मंडळाची मंजुरी घेत नव्याने १५४ प्लॉट विक्रीला काढले आहेत. या प्लॉटचे वाटप दोन टप्प्यात करण्यात येणार असून होलसेल किराणा व्यापाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ११९ प्लॉटचे वाटप होईल, तर उरलेले प्लॉट दुसऱ्या टप्यात वाटप करण्यात येणार आहेत.

हे प्लॉट दीड हजार चौरस फुटाचे असून ४७० रुपये प्रती चौरस फूट असा दर आहे. प्लॉट व्यतिरिक्त व्यापाऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्लॉट खरेदीची इच्छा आतापर्यंत सुमारे ५० व्यापाऱ्यांनी व्यक्त करत रक्कम जमा केली आहे, अशी माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली. प्लॉटची संख्या लक्षात घेत सर्व इच्छुक व्यापाऱ्यांनी निर्धारित रक्कम जमा केल्यानंतर सर्व सहमतीने प्लॉटचे वितरण करत लीजडीड केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

\Bजुना मोंढा स्थलांतरचा प्रश्न

\B

या ना त्या कारणांनी जुना मोंढा जाधववाडी येथील नवीन जागेत स्थलांतर होऊ शकला नाही. जुना मोंढ्यातील व्यापाऱ्यांना जाधववाडीत यापूर्वीही गाळे देऊ केले होते. पण, विविध कारणांमुळे गाळे वाटप प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी, स्थलांतराचा प्रश्न निकाली निघाला नाही. दरम्यान, हा प्रश्न मार्गी लागवा, यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असून नवीन प्लॉट विक्रीत जुना मोंढ्यातील व्यापाऱ्यांनाच प्राधान्य देण्याची भूमिका बाजार समितीने घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images