Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

संशयावरुन पत्नीला पतीची मारहाण, तिघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभक्त राहणाऱ्या आणि भाड्याचे घर पाहण्यासाठी एका व्यक्तीसोबत जात असलेल्या पत्नीला व तिच्यासोबतच्या व्यक्तीला चारित्र्याच्या संशयावरून गंभीर मारहाण करणाऱ्या पतीसह तिघांना सोमवारी (२५ जून) अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केले असता, तिघांना बुधवारपर्यंत (२७ जून) पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. चव्हाण यांनी दिले.

या प्रकरणी विभक्त राहणाऱ्या व कौटुंबिक कोर्टात वाद सुरू असलेल्या पत्नीने फिर्याद दिली होती. त्यानुसार, २१ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास ती आधीच्या ठिकाणी नोकरी करीत असलेल्या परिचितासोबत भाड्याचे घर पाहण्यासाठी जात होती. त्यावेळी पती व त्याचे दोन मित्र हे तिथे आले आणि त्यांनी चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला व तिच्यासोबतच्या व्यक्तीला शिविगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी व धारदार शस्त्राने मारहाण केली. या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तिघांना सोमवारी अटक करण्यात आली. आरोपींकडून धारदार शस्त्राची माहिती घेऊन जप्त करणे बाकी आहे, तसेच आरोपींना कोणी मदत केली, याचा तपास करावयाचा आहे. आरोपींना जामिनावर सोडल्यास ते फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील उद्धव वाघ यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने तिन्ही आरोपींना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांनी नगरसेविकांकडून जाणून घेतले प्राधान्यक्रमाचे विषय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नगरसेविकांकडून प्राधान्यक्रमाचे विषय जाणून घेतले. प्रामुख्याने कचरा, पाणी आणि शिक्षण या विषयावर नगरसेविकांनी आपल्या भूमिका मांडल्या.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुतांश नगरसेविकांना बोलण्याची, त्यांच्या वॉर्डातील समस्या मांडण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे दर सोमवारी नगरसेविकांची बैठक घेऊन त्यांच्या वॉर्डातील प्रश्न सोडविण्याचे आयुक्तांनी ठरविले आहे. त्यानुसार सोमवारी बैठक झाली. सकाळच्या सत्रात झोन क्रमांक १ ते ४ पर्यंतच्या नगरसेविकांची बैठक घेण्यात आली. दुपारच्या सत्रात झोन क्रमांक ५ ते ९ पर्यंतच्या नगरसेविकांची बैठक झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक घेण्यात आली. दुपारच्या सत्रातील बैठकीला माजी उपमहापौर स्मिता घोगरे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. माधुरी अदवंत, आरोग्य सभापती मीना गायके, जयश्री कुलकर्णी, अर्चना निळकंठ, मनिषा मुंडे, विमल कांबळे, सायली जमादार, सीमा चक्रनारायण, संगीता वाघुले आदी नगरसेविका उपस्थित होत्या.

कचऱ्याबद्दल नगरसेविकांनी आयुक्तांना माहिती विचारली. कचराकोंडी फोडण्यासाठी पालिका नेमके काय करीत आहे याची माहिती द्या, असे नगरसेविका म्हणाल्या. तेव्हा यंत्र खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच कचरा कोंडीतून मार्ग निघेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी नगरसेविकांना कामाच्या दृष्टीने प्राधान्य क्रम विचारले. कचरा प्रश्नाबरोबरच पाणी, शिक्षण, आरोग्य, महिला विकास हे मुद्दे नगरसेविकांनी मांडले. या मुद्दांवर टप्प्याटप्प्याने काम करण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक बंदी - पर्यावरणतज्ज्ञ प्रतिक्रिया

$
0
0

प्लास्टिकचा पुरेपूर वापर नाही, असे एकही क्षेत्र नाही. सहज आणि स्वस्त उपलब्धता त्याचे प्रमुख कारण आहे. प्लास्टिकचा फेरवापर करता येतो, मात्र सक्षम यंत्रणा नसल्यामुळे प्लास्टिकचा प्रश्न निर्माण झाला. उपयोगिता आणि आपत्ती अशा प्लास्टिकच्या दोन बाजू आहेत. या स्थितीत सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे. पॉलिथीन बॅग आणि रॅपर्स ही मुख्य समस्या आहे. या घटकांना काय पर्याय देता येईल याचा विचार करावा. किंवा वापरलेले प्लास्टिक अपवादानेही पर्यावरणात फेकले जाणार नाही, याची खबरदारी घेणारी यंत्रणा पाहिजे. प्लास्टिकच्या समस्येवरील उपायासाठी सक्षम यंत्रणेची गरज आहे.

- डॉ. एम. बी. मुळे, पर्यावरणशास्त्र विभाग, डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ

प्लास्टिक असेंद्रिय पदार्थ असल्यामुळे त्याचे विघटन होत नाही. प्लास्टिकबंदीचा निर्णय योग्य असला तरी सामान्य नागरिकांसाठी पर्याय उपलब्ध करावा. प्लास्टिकचे वेष्टणाला पर्याय काय असेल यावर विचार व्हावा. कारण हा कचरा पर्यावरणात जातो. सध्या प्लास्टिक विल्हेवाटीचे आणि फेरवापराचे शास्त्रोक्त तंत्र गरजेचे आहे. विज्ञान साक्षरता असेल त्या नागरिकांना प्लास्टिकचे गांभीर्य कळेल. अन्यथा, बेपर्वाईने वापर होईल. कागदी, कापडी पिशव्यांचा पर्याय अधिक व्यापक करण्यासाठी बचतगट, लघू उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. तसेच प्लास्टिक टाळणे ही वैयक्तिक जबाबदारी आहे. कायद्याच्या काटेकोर चौकटीत निर्णयाची अंमलबजावणी करावी.

- डॉ. क्षमा खोब्रागडे, पर्यावरणतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीसाठी आईने केला मुलाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठणखेडा येथे ड्रममध्ये मृतावस्थेत सापडलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा त्याच्याच आईने खून केल्याचे उघड झाले आहे. मुलीसाठी स्वताच्या मुलाचा खून करणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली असून, तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

चितेगाव येथील वेदिका परमेश्वर एरंडे ही विवाहिता शनिवारी सायंकाळी माहेरी, पैठणखेडा येथे तिच्या दहा महिन्यांच्या मुलासह आली होती. शनिवारी रात्री जेवण झाल्यावर वेदिका तिचा मुलगा प्रेम याला सोबत घेऊन झोपली होती. रात्री वेदीकाला जाग आली तेव्हा तिचा मुलगा प्रेम तिला दिसला नाही. तिच्या माहेरच्या मंडळींनी मुलाचा रात्रभर शोध घेतला, मात्र तो साडपला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात प्रेम एरंडे हा दहा महिन्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

बिडकीन पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पंडित सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना याप्रकरणाचे धागेदोरे मिळाले नाहीत. अखेर घटनास्थळी श्वानपथकाचे पाचारण करण्यात आले. श्‍वानाने सर्व गावात शोध घेतला. त्यावेळी गावातील लिबादास खैरे यांच्याच घराच्या बाजूला पाण्याच्या छोट्या ड्रमाभोवती श्वान घुटमळत होता. ड्रमचे झाकण उघडून पाहिले असता आत प्रेम मृतावस्थेत दिसून आला होता.

याप्रकरणाचा तपास करताना मृत मुलाची आई वेदिका ही विसंगत माहिती देत होती. त्यामुळे बिडकीन पोलिसांचा वेदिकावर संशय बळावला होता. तिची कसून चौकशी केली असता, प्रेम या दहा महिन्यांच्या बालकाचा आपणच खून केल्याचे तिने मान्य केले. याप्रकरणी वेदिका परमेश्वर एरंडे हिच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला पैठण न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने वेदिका हिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांसमोर केला गुन्हा कबूल

वेदिका हिला तीन वर्षांचा व दहा महिन्यांचा एक अशी दोन मुले होती. पहिला मुलगा झाल्यावर, दुसरी मुलगी व्हावी अशी वेदिका याची इच्छा होती, मात्र दुसराही मुलगाच झाल्याने आता आपली मुलीची इच्छा पूर्ण होणार नाही. दोनपैकी एका मुलाचा काटा काढल्यास आपली मुलीची इच्छा पूर्ण होईल या अपेक्षेने प्रेमचा खून केल्याची कबुली वेदिका हिने पोलिस तपासात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरमध्ये क्लास संचालकाची गोळ्या घालून हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

शहरातील स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण (वय ३५) यांची रविवारी रात्री एकच्या सुमारास अद्यात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्त्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून चव्हाण यांची हत्या व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन क्लासच्या संचालकांसह एक राजकीय स्पर्धक जबाबदार असल्याच्या संशय चव्हाण कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

अविनाश चव्हाण हे रविवारी रात्री एकच्या सुमारास कारमधून घराकडे जात होते. त्यावेळी सरस्वती कॉलनी भागातील श्री शिवाजी शाळेजवळ समोरच्या बाजूने त्यांच्या कारवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एक गोळी चव्हाण यांच्या उजव्या छातीत लागण्याने ते जागीच मरण पावले. कारचालक बाजुची काच गोळीबारात फुटली आहे. चव्हाण हे स्वत: कार चालवत होते व कारमध्ये ते एकटेच होते. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सोमवारी सकाळी पोस्टमार्टेम करण्यात आले. ही हत्या व्यावसायिक स्पर्धेतून करण्यात आल्याचा थेट आरोप चव्हाण यांचे मावस भाऊ अशोक पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक शिवाजीराव राठोड, उपअधीक्षक हिम्मतराव जाधव, गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सुधाकर बावकर तसेच केशव लटपटे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी हजर झाला.
पोलिस अधीक्षक राठोड यांनी हल्लेखोराने अगदी जवळून गोळ्या घातल्याने चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगून हल्लेखोराच्या शोधासाठी पाच पथके नेमल्याची माहिती दिली.
या घटनेची माहिती शहरात मध्यरात्रीच वाऱ्यासारखी पसरली आणि अनेक जणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, सोमवारी दिवसभर त्यांचे नातेवाईक, मित्रांनी आरोपीना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणास नकार दिला आहे. शासकीय रुग्णालय व शिकवणी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात काही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.

सनी लिओनीमुळे प्रसिद्धी

चव्हाण हे काही काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत होते. सामान्य कुटुंबातून आलेल्या चव्हाण यांनी स्टेप बाय स्टेप केमिस्ट्री क्लासच्या माध्यमातून अल्पावधीत आश्चर्यकारक प्रगती साधली होती. याशिवाय गेल्या वर्षी सुरू केलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेच्या उद्घाटनासाठी हॉलीवुड व बॉलीवुड अभिनेत्री सनी लिओनी यांना लातूरात आणल्याने ते चर्चेत आले होते.

एक कोटीचे बक्षीस वाटप

चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या क्लासमधील गुणवंत विद्यार्थ्याना तब्बल एक कोटी रुपयांची पारितोषिके वितरित केली होती. पुढील वर्षी यापेक्षा दुप्पट बक्षीस वाटप रण्याचे जाहीर केले होते. क्लासच्या नांदेड शाखेचे उद्घाटन सोमवारी ( २५ जून) होणार होते, ते त्याची तयारी करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमचे ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील व हजारोंच्या जमावाने मंगळवारी दुपारी तीन तास सिटीचौक पोलिस ठाण्यासमोर जोरदार आंदोलन करीत घोषणाबाजी केली. खुनाच्या गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात हस्तांतरित केलेले आरोपी सोडवण्याची यावेळी जमावाची मागणी होती. पोलिस आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर ही आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद केली होती.

शहागंज भागात ११ मे रोजी रात्री घडलेल्या दंगलीमध्ये जमावाने पेटवून दिलेल्या घरामध्ये जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. यामध्ये आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याच दंगलीच्या प्रकरणात पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जमावावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी १७ आरोपी निष्पन्न करीत त्यांना अटक केली होती. यापैकी सहा आरोपींना खुनाच्या प्रयत्नाच्या दुसऱ्या गुन्ह्यात सिटीचौक पोलिसांनी कोर्टाकडून हस्तांतरित करून घेतले होते. यापैकी चार आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने जामीन मंजूर केलेला असताना पोलिसांनी अटक केल्याने मंगळवारी दुपारी अडीच वाजता जमाव पोलिस ठाण्यासमोर जमा झाला. यावेळी एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील, गफार कादरी, अरुण बोर्डे, नासेर सिद्दिकी, मतीन यांच्यासह इतरांचा यावेळी समावेश होता. काही वेळातच जमाव वाढत गेला. जमावाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी व जमाव वाढत गेल्याने परिसरात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले. हा प्रकार पाहून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी वरूण, शीघ्र कृती दल, वज्र वाहनासह सिटीचौक गाठले. आरोपींना सोडून देण्याची मागणी करीत जमावाने ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्याशी बंद केबिनमध्ये आमदार जलील व शिष्टमंडळाने २० मिनिटे चर्चा केली. यामध्ये आरोपींच्या अटकेच्या तांत्रिक बाजूची माहिती शिष्टमंडळाला देण्यात आली. चर्चेनंतर आमदार जलील यांनी जमावाला मार्गदर्शन करीत आंदोलन संपल्याचे जाहीर केले.

\Bपोलिसांना दाखवल्या नोटा, फेकली चिल्लर

\Bआमदार जलील यांनी यावेळी बोलताना, सिटीचौक पोलिसांमुळे ११ मे रोजी दंगल झाल्याचा आरोप केला. येथील फेरीवाल्यांकडून पोलिस हप्ता घेत असल्याचा आरोप केल्यानंतर जमावाने खिशातून नोटा काढून त्या तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना दाखवल्या तर काही जणांनी पोलिस ठाण्याच्या दिशेने चिल्लर नाणी देखील फेकली.

पोलिस मुख्य सूत्रधाराला पकडण्याऐवजी किरकोळ तरुणांना पकडत आहे. किलेअर्क येथून एका तरुणाला पोलिसांनी दंगलीनंतर ताब्यात घेतले होते. त्याने ३२ दंगलखोरांची नावे सांगितली होती. यामध्ये अनेक बड्या मंडळीचा सहभाग होता. या यादीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहित होते. या यादीचे काय झाले ते समजले नाही. खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या गोरगरीबांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पोलिस एकतर्फी कारवाई करीत असून, दबावाखाली काम करीत असल्याचे दिसत आहे.

- इम्तीयाज जलील, आमदार

या दंगलीमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याची दोन्ही गटाचे म्हणणे आहे, मात्र असे काहीही नाही. पोलिसांकडून तपास पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. एमआयएमने केलेल्या आरोपाबाबत या गुन्ह्याची कागदपत्रे तपासून निर्णय घेण्यात येणार आहे. शहरात सध्या सर्वत्र शांतता असून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये.

- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लासचालक चव्हाण यांचे मारेकरी अटकेत 

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

येथील क्लासचालक अविनाश चव्हाण यांचा खून व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संशयित मारेकरी आणि खुनाची सुपारी देणारे संशयित आरोपी, अशा पाच जणांना मंगळवारी अटक करण्यात आली. चव्हाण यांचा पूर्वीचा भागिदार व कुमार मॅथ्स क्लासचा चालक प्रा. चंदन छोटेलाल शर्मा (मुळ रा. फरिदाबाद, हरियाणा) हा मुख्य सूत्रधार असून त्याच्या चार साथिदारांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी मंगळवारी दुपारी दिली.

क्लासचालक चव्हाण यांचा रविवारी मध्यरात्री गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. घटनेच्या ४८ तासांत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने पाच आरोपीना ताब्यात घेतले. शरद घुमे, करण चंद्रपालसिंह गहेरवाल, अक्षय शेंडगे, अशी अन्य तिघांची नावे आहेत. दरम्यान, मंगळवारी दुपारी ठाणे येथील नगरसेवक विजय चौगुले यांनी चव्हाण यांचे नातेवाईक आणि पोलिसांत मध्यस्थी करून मृतदेह ताब्यात घेण्यास मदत केली. चव्हाण यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी त्यांच्या क्लासच्या ठिकाणी ठेवला होता. त्यानंतर खाडगाव स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इतर क्लासच्या तुलनेत कमी शुल्कात शिकवणी मिळत असल्याने ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. कमी शुल्कामुळे इतर क्लासच्या विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला आहे. या पथकात रवी गोंदकर, रामहरी भोसले, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, प्रकाश भोसले, युवराज गिरी हे होते. पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांनी रोख बक्षीसे देऊन पथकाचे अभिनंदन केले.

\Bपरळीतून पिस्तुल खरेदी\B

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंदन शर्मा याने चव्हाण यांचा खून करण्यासाठी शरद घुमे याला २० लाख रुपयांची सुपारी दिली होती. घुमे यांने यासाठी त्याचा मित्र करण चंद्रपालसिंह गहेरवाल याला बोलावले. या कामासाठी घुमे याने गहिवार याला साडे आठ लाख रुपये दिले.  गहिरवार याने अविनाश याच्यावर काही दिवस पाळत ठेऊन त्यांच्या सवयी, रोजच्या प्रवासाचे मार्ग याची माहिती घेतली. खून करण्यासाठी वापरलेले पिस्तुल हे परळी येथून खरेदी करण्यात आले. गहिरवार याने अक्षय शेंडगे याच्या मोटारसायकल वरून अविनाश चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली. शिवाजी शाळेसमोर कार थांबताच शरद घुमे याने चव्हाण यांच्यावर तीन  गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी छातीत घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोंडअळी भरपाईच्या दुसऱ्या टप्प्यांची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात शासनाने बोंडअळी बाधितांसाठी दिलेल्या हप्त्याचे जवळपास ९६ टक्के वाटप करण्यात आले असून, अद्याप जिल्ह्यातील तब्बल चार लाख शेतकऱ्यांना मदत वाटप करायची आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने शासनाकडे दुसऱ्या टप्प्याची मागणी केली आहे.

बोंडअळी नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा शासनाने केलेली असून मराठवाड्यातील तब्बल २६ लाख ९० हजार शेतकऱ्यांना १२२१ कोटी ४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. ही मदत तीन हप्त्यांत मिळणार असून, यातील ३२५ कोटी ६० लाखांचा पहिला हप्‍ता मराठवाड्याला शासनाने दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाच लाख ७४ हजार शेतकऱ्यांना २९६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान वाटप करायचे आहे. यातील पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यासाठी ७९ कोटी रुपयांचे अनुदान आले असून, यातील सुमारे एक लाख ७८ हजार शेतकऱ्यांना ७६ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मदतीची रक्‍कम एकाच वेळी त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे काही शेतकरी तुपाशी, तर काही उपाशी असे चित्र जिल्ह्यामध्ये होते, आता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे उर्वरीत संपूर्ण अनुदानासाठी मागणी केली आहे.

तालुकानिहाय पहिल्या टप्प्यात अनुदान वाटपाची स्थिती

जिल्हा.................. अनुदान वाटप...................... शेतकरी संख्या................. टक्केवारी

औरंगाबाद...................७०६.६०............................१२५७१........................९९.९१

पैठण...........................१२९६.००.........................५१४५२.......................९९.३४

फुलंब्री........................५२०.०३............................१४००१......................९१.६५

वैजापूर.........................१४४९.९०.........................२९३११........................१००

गंगापूर.........................९८८.९५............................२९३११.......................८३.५१

खुलताबाद...................३१२.६२..............................६२४१.......................९९.९९

कन्नड.........................९८९.९३............................२०४६७.........................१००

सिल्लोड........................८५३.७१...........................१९४६८.........................१००

सोयगाव........................४८७.६८............................६३८२..........................१००

अपर तहसील क्षेत्र.............४२.५७..............................६३५...........................१००

एकूण...........................७६.४८...............................१७८५४८.....................९६.८१

(रक्कम लाख रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवक फेरोज खानचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात नुकत्याच उसळलेल्या दंगलप्रकरणामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला महापालिकेचा विरोधीपक्ष नेता व एमआयएमचा नगरसेवक फेरोज मोईनोद्दीन खान याने दुसऱ्यांदा सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी मंगळवारी (२६ जून) फेटाळला.

शहरात उसळलेल्या दंगलीच्या काळात दीपक मन्नालाल जैस्वाल यांच्या हॉटेलच्या गोडाऊनमधील विदेशी मद्याच्या साठ्याची तोडफोड करून पेटवून दिल्याच्या; तसेच जैस्वाल यांचे घर पेटवून दिल्यासंदर्भात दाखल गुन्ह्यात आरोपी फेरोजखान हा १५ मे रोजी पोलिसांना शरण आला होता. या प्रकरणी कोर्टाने त्याला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती व त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, त्याने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, तो ३१ मे रोजी फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फेरोज खान याने दुसऱ्यांदा नियमित जामीन अर्ज सादर केला असता, तो मंगळवारी फेटाळण्यात आला. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारेगावात पालिकेचा नाला सफाईवर जोर दुसऱ्या दिवशी फक्त दोन बांधकामे पाडली

$
0
0

सिंगल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

नारेगावात महापालिकेने नालासफाईच्या कामावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. मंगळवारी दिवसभर नाला सफाईचे काम सुरू होते. फक्त दोन बांधकामे पाडण्यात आली. गाळ काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शनिवारी रात्री झालेल्या धुवाधार पावसामुळे नारेगावात नाल्याकाठी असलेल्या सुमारे दीड हजार घरांमध्ये पाणी शिरले होते. तो नाला नसून सुखना नदी असल्याचा दावा देखील केला जात आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महापालिकेवर सोमवारी मोर्चा काढण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला होता. मोर्चा येण्यापूर्वीच पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नाल्याकाठची बांधकामे पाडण्यासाठी अतिक्रमण हटाव पथक नारेगावला पाठवले. सोमवारी या पथकाने चार बांधकामे पाडण्यात आली होती. मंगळवारीमात्र दोनच बांधकामे पाडण्यात आली. या बद्दल माहिती देताना अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख सी. एम. अभंग म्हणाले, बांधकामे पाडण्यापेक्षा नाल्यातील गाळ काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. त्यादृष्टीने मंगळवारी काम करण्यात आले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने नाला साफ करणे शक्य नव्हते, त्यामुळे पोकलेनची मदत घेण्यात आली. उद्या बुधवारी देखील अशाच प्रकारे काम सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्वेलरी व्यावसायिकांचे महापौरांना साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

बेनटेक्स ज्वेलरीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मंगळवारी महापौरांची भेट घेवून प्लास्टिक बंदीच्या कारवाईतून या व्यावसायिकांना वगळण्याबद्दल साकडे घातले. महापौरांनी मात्र शासनाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे, असे सांगून या व्यापाऱ्यांची बोळवण केली.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे शहरात प्लास्टिक बंदीची कारवाई केली जात आहे. या कारवाईचा धसका घेत बेनटेक्सचे दागिने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. बेनटेक्सचे दागिने विशिष्ट प्रकारच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होतात. पॅकिंगमधून दागिने काढल्यास ते खराब होतात. त्यामुळे प्लास्टिक बंदीच्या कारवाईतून बेनटेक्सच्या दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना वगळण्यात यावे, अशी विनंती व्यावसायिकांनी केली. दागिन्यांचे काही नमूने त्यांनी महापौरांसमोर सादर केले. महापौरांनी मात्र शासनाच्या आदेशानुसार कारवाई सुरू असल्याचे व्यावसायिकांना सांगितले. व्यावसायिकांना वगळण्याबद्दल शासनाने काही निर्णय घेतल्यास त्यानुसार महापालिका कार्यवाही करेल, असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॅलेंट सर्च परीक्षेत अजिंक्य देशमुखचे यश

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महाराष्ट्र राज्य टॅलेंट सर्च परीक्षेत (एमटीएसई) स्टेपिंग स्टोन शाळेचा विद्यार्थी अजिंक्य अविनाश देशमुख राज्य गुणवत्ता यादीत १९ वा आला आहे. राज्यस्तरावर त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्टीवर गेलेल्या अतिरिक्त आयुक्तांची मनधरणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

मारहाणीच्या घटनेनंतर सुट्टीवर गेलेले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची आयुक्त डॉ. निपुण विनायक आणि स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी मंगळवारी मनधरणी केली. त्यानंतर भालसिंग यांनी दोन दिवसात रुजू होतो, असे आयुक्तांना सांगितले.

सिडको एन ६ येथील नाल्यात पडून एका इसमाचा मृत्य झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या भालसिंग यांना एका व्यक्तीने मारहाण केली. या घटनेमुळे व्यथीत झालेले भालसिंग रजा घेऊन निघून गेले. सुरुवातीला त्यांनी दोन दिवसांची रजा घेतली, त्यानंतर त्यांनी रजा वाढवली. आयुक्तांनी आपल्या कारभाराने नुकतेच विकेंद्रीकरण केले आहे. त्यानुसार त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दहा विभागांचा प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. अभियांत्रिकी विभागाअंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांच्या फायली अंतिम मंजुरीसाठी भालसिंग यांच्याकडेच येतात. या फायलींचा आता मोठा ढिगारा साचला आहे. फायली निकाली निघाल्या नाहीत तर कामे होणार नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे या संदर्भात राजू वैद्य यांनी आयुक्त डॉ. विनायक यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयुक्तांनी भालसिंग यांना फोन लावला व त्यांना रुजू होण्यास सांगितले. वैद्य यांनीही भालसिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर दोन दिवसात आपण रुजू होऊ, असे आश्वासन भालसिंग यांनी दिले, अशी माहिती वैद्य यांनी दिली.

दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहिती भालसिंग बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. येत्या काही दिवसात त्यांची बदली होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनधारकांचे आज आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महागाई भत्त्यासह दरमहा कमीत कमी साडेसात हजार रुपये पेन्शन मार्च २०१४ पासून देण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी ईपीएस ९५ - निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व मुंडन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजात आंदोलन सुरू होणार असून पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे सरचिटणीस अॅड. सुभाष देवकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजना नदीवरील पूल वाहून गेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

उपळी गावाजवळील अंजना नदीवरील पूल पुरात वाहून गेला. नव्याने पूल बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उपळी येथील ग्रामस्थांशी बोलताना सांगितले.

पिशोर परिसरात शनिवारी (२३ जून) सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने झाल्याने अंजना नदीस पूर आला. त्यात उपळी नदीवरील पूल खचून वाहून गेला आहे. त्यामुळे उपळी, भराडी, लोणवाडी, पळशी, मांडगाव आदी गावांचा संपर्कच तुटला असून, या गावातील नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे.  आमदार सत्तार यांनी उपळी गावाजवळील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यासंबंधी सूचना दिल्या.

यावेळी बाजार समिती सभापतीचे  रामदास  पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, काकाराव  कळम, शांतीलाल अग्रवाल, सतीश ताठे, नाना कळम, सुखदेव जीवरग, गुलाबराव मिरगे, रतन मिरगे, सुभाष जाधव, जगन्नाथ कुदळ, काशीनाथ सुरडकर, जनार्धन शेजूळ, मच्छिंद्र शेजूळ, राजेंद्र सुरडकर, प्रवीण शेजूळ, योगेश फोलाने, गणपत औटे, ऋषिकेश शेजूळ, विठ्ठल गायकवाड, कल्याण पांढरे, सुभाष शेजूळ, शंकर शेजूळ, रामराव फोलाने, विठ्ठल पांढरे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकासाठी शाळेला सरपंचानेच ठोकले कुलूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

चिंचखेडा तांडा येथील सरपंचाने  शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शाळेला कुलूप ठोकले. यामुळे विद्यार्थ्यांची व्हरांड्यातच शाळाच्या भरली.

चिंचखेडा तांडा येथे जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत दोन शिक्षकी शाळा आहे. या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती असून, येथे ६६ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. दोनपैकी एक शिक्षक प्रतिनियुक्तीवर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून एकाच शिक्षकावर या शाळेचा भार आहे. दुसऱ्या शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शिक्षण विभागाकडे वारंवार  पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने शेवटी सरपंच वंदना राजू जाधव, लक्ष्मण जाधव, गोरख जाधव, स्थानिक पालक व ग्रामस्थानी मंगळवारी (२६ जून) सकाळी दहाच्या सुमारास शाळेला टाळे ठोकले. शाळेला कुलूप असल्याने एका शिक्षकास माघारी फिरावे लागले. याबाबत गट शिक्षण अधिकारी हुमेरा सिद्दिकी यांनी केंद्र प्रमुखांकडून अद्याप याबाबतचा अहवाल प्राप्त न झाल्याचचे सांगितले, तर ग्रामस्थांनी जोपर्यंत दुसरा शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रुती भागवत खुनाचा तपास गुंडाळला !

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सहा वर्षांपूर्वी शहरात झालेल्या श्रुती विजय भागवत खून प्रकरणाचा तपास गुंडाळण्यात येत असून सारांश अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती सीआयडीने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या पत्रात दिली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ मार्च २०१७ रोजी दिलेल्या आदेशानुसार, गेल्या सव्वा वर्षांपासून सीआयडी या खुनाचा तपास करत होते.

उल्कानगरी या उच्चभ्रू वसाहतीमध्ये रहिवासी असलेल्या श्रुती भागवत यांचा १७ एप्रिल २०१२ रोजी मध्यरात्रीनंतर अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला होता व मृतदेह एका गादीमध्ये गुंडाळून पेटवून दिलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यांचे पती विजय हे दुबईत नोकरीला असून, मुलगा पुणे येथील कंपनीत नोकरी करतो. त्यामुळे त्या श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या. जवाहरनगर पोलिस, गुन्हे शाखा व एसआयटीकडून उलगडा होत नसल्याने गेल्या वर्षी श्रुती यांचा भाऊ मुकुल करंदीकर यांनी प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांना वगळून अन्य तपास यंत्रणेकडे द्यावा, अशी विनंती करणारी याचिका केली. त्यावरून गुन्ह्याचा तपास तत्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करावा, हा तपास सीआयडीचे औरंगाबाचे पोलिस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली करावा, त्यावर सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक (पुणे) यांनी प्रत्येक १५ दिवसांचा आढावा घ्यावा, असे निर्देश कोर्टाने दिले होते.

या गुन्ह्याच्या तपासात पुरावे सापडत नसल्याने सारांश अहवाल (समरी रिपोर्ट ) दाखल केल्याचे पोलिसांनी खंडपीठाला कळविले आहे. सीआयडीच्या चार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी या खुनाचा तपास केला आहे. त्यात अधीक्षक शंकर केंगर यांचाही समावेश होता, असे खंडपीठात दाखल केलेल्या पत्रात म्हटले आहे. भविष्यात या खुनाचा तपास लागणार नसल्याचे करंदीकर यांचे वकील अभयसिंह भोसले यांनी सांगितले.

घटनाक्रम

१८ एप्रिल २०१२ पहाटे श्रुती भागवत यांची निर्घृण हत्या

एप्रिल २०१२ सजग महिला संघर्ष समितीचे आंदोलन

मे २०१२ पोलिस आयुक्तालयावर महिलांचा मोर्चा

जून २०१२ ते ७ मार्च २०१७ जवाहरनगर पोलिस, गुन्हे शाखा, एसआयटीमार्फत तपास, त्यांना मारेकरी शोधण्यात अपयश.

८ मार्च २०१७ खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. सहा महिन्यात तपास संपविण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश

ऑक्टोबर २०१७ ते एप्रिल २०१८ तब्बल तीन वेळा तपासासाठी मुदतवाढ

जून २०१८ सारांश अहवाल सादर करण्यात आल्याचे सीआयडीचे म्हणणे

मटा भूमिका

पोलिस अपयशी

सहा वर्षे उलटली तरी या हत्याकांडाचे गूढ उलगडण्यास पोलिसांना अपयश आले आहे. मारेकऱ्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला ५० हजार रुपयांचे बक्षिस तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी घोषित केले होते. त्यानंतरही कोणाकडूनही माहिती पोलिसांना मिळाली नाही. सायबर सेलच्या पथकाने मोबाइल टॉवरच्या डमडेटाद्वारे हजारो कॉल शोधून सुमारे एक हजार संशयितांची चौकशी केली. त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. जंगजंग पछाडूनही पोलिस अपयशी ठरले. त्यामुळे सीआयडी तपासाबद्दल उत्सुकता होती. पण त्यांनीही निराशा केली. शास्त्रीय, तांत्रिक तपास करूनही सीआयडी गुन्ह्याची उकल करू शकले नाहीत, ही शरमेची बाब म्हणावी लागेल. सीआयडीच्या कृतीत एक इंचभरही बदल आढळला नाही. लवकरात लवकर 'लॉजिकल एंड'ला येण्याचे सांगितले होते, परंतु कुठेच असा प्रकारे तपास जाणवत नसल्याने खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सीआयडीनेही हात टेकल्याने पोलिसांची विश्वासहर्ता कमी झाली असेच म्हणावे लागेल. हा खून कोणी व का केला या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मंगळवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध पक्ष, संघटनांतर्फे समतादिंडी, व्यसनमुक्ती फेरी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मिल कॉर्नर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर कार्यकर्ते, नागरिकांनी गर्दी केली.

\Bसमतादिंडी व व्यसनमुक्ती फेरी\B

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेतर्फे समतादिंडी व व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली.

भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर फेरीचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ अशोक शिरसे, प्रादेशिक उपायुक्त पी. बी. बच्छाव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. एस. शेळके, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी ज्योती राठोड, सामाजिक कार्यकर्ते विलास चदंणे आदी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फेरीची औरंगपुऱ्यात सांगता करण्यात आली. या फेरीत शारदा मंदिर प्रशाला, आ. कृ. वाघमारे शाळा, बाल ज्ञान मंदिर, सरस्वती भुवन, शिशू विहार माध्यमिक शाळा, संत तुकाराम वसतिगृह, गुणवंत वसतिगृह, जागरण फाउंडेशनचे विद्यार्थी सहभागी झाले.

\Bआदिवासी विकास कार्यालय

\B

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उप लेखापाल व्ही. बी. घेवंदे, राजू भंगारे, उल्हास चव्हाण, गोदावरी भाडेकर, व्ही. एम. महेंद्रकर, जे. के. दीक्षित, एस. के. भोपे, पी. एस. पाटील, के. एन. पालवे, एस. के. तडवी आदी उपस्थित होते.

\Bविभागीय आयुक्तालय

\B

विभागीय आयुक्त कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. उपायुक्त वर्षा ठाकूर, सूर्यकांत हजारे, पारस बोथरा, महेंद्र हरपाळकर, सरिता सुत्रावे, साधना सावरकर, उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत निंबाळकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ आदी उपस्थित होते.

\Bमराठवाडा विकास महामंडळ

\B

मराठवाडा विकास मंडाळ कार्यलात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी झाली. मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महामंडळाचे सचिव डी. एम. मुगळीकर आदींसह महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

\Bलहू प्रहार

\B

लहू प्रहार संघटनेतर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नितीन आव्हाड, राज्य प्रवक्ता मुकेश जाधव, राज्य कार्याध्यक्ष प्रमोद काळे, युवा नेते सिद्धार्थ मुकदल, ज्ञानेश्वर घोरपडे, संतोष वाघमारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलमध्ये गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हॉस्पिटलमध्ये पत्नीच्या उपचारासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. पद्मपाणी कॉलनी, वेदांतनगर भागात रविवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय पिराजी शिंदे (वय ४५, रा. पद्मपाणी कॉलनी) हे व्हिडियोकॉन कंपनीत कामगार आहेत. पद्मपाणी कॉलनीत ते एका खोलीमध्ये भाड्याने राहतात. त्यांची पत्नी शनिवारी रात्री एमजीएम हॉस्पिटलमध्ये प्रसूत झाली. शिंदे आई व मुलासोबत रविवारी दुपारी हॉस्पिटलमध्ये गेले होते. रविवारी रात्री चोरट्या्नी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख १५ हजार असा दोन लाख २३ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्याचे नेकलेस, कानातले दोन जोड, दोन अंगठ्या, बाळ्या, वेल, झुंबर, सेव्हनपिस, पोत, चांदीचे हातातील कडे आदी दागिन्याचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय वर्षाराणी आजले तपास करीत आहेत. घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देत पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९५ लाखांचे नियमबाह्य कर्ज; जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

७६ व्यक्तींना ९५ लाख ४८ हजार रुपयांचे नियमबाह्य कर्ज मंजूर करून शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील आरोपी व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या लेखापालाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रसकर यांनी फेटाळला.

२००४ ते २००७ दरम्यान महामंडळाच्या वतीने ७६ बेरोजगार लाभार्थ्यांना ९५ लाख ४८ हजार रुपयांची कर्ज मंजुरी देण्यात आली होती. नियमबाह्य कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकारात लेखापाल कमलेश म्हाळसाकांत भाले (५३, रा. जवाहर कॉलनी, औरंगाबाद) हा जबाबदार असल्याची तक्रार व्यवस्थापक अरूण वसंतराव ठवकर यांनी दिली होती. या तक्रारीवरुन क्रांतीचौक पोलिस ठाण्यात भालेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी भाले याने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, कर्जाच्या रकमेची खातरजमा करावयाची आहे, नियमबाह्य कर्ज मंजुरीची कागदपत्रे; तसेच दस्तऐवज त्याच्या ताब्यातून हस्तगत करावयाचा असल्यामुळे आरोपीला अटक करणे गरजेचे आहे. त्यामुळे भाले याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने भालेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images