Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्राणघातक हल्ला करून मजुराला लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरुणावर लोखंडी सळईने प्राणघातक हल्ला करून ३५० रुपये लुबाडले. टाउन हॉल भागात २६ जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल महमद वासमे (वय ४५ रा. काजीवाडा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. अब्दुल हे मजूर असून, मंगळवारी दुपारी टाउन हॉल परिसरातून जात होते. यावेळी गुड्डू सलीम नावाच्या आरोपीने त्याना आवाज दिला. गुड्डूने आवाज दिल्यानंतर घाबरून अब्दुल यांनी पलायन केले. यावेळी आरोपी गुड्डूने त्यांच्या पाठीमागून लोखंडी सळईने डोक्यात वार करून खाली पाडले; तसेच त्यांच्या खिशातील रोख साडेतीनशे रुपये घेऊन पलायन केले. या हल्ल्यामध्ये अब्दुल बेशुद्ध पडले. त्यांना नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी गुरुवारी अब्दुल यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गुड्डू उर्फ सलीम (रा. टाउन हॉल, काजीवाडा) याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीएसआय हरिश खटावकर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटिझन रिपोर्टर-२९जून

$
0
0

सिडको

केबल्स तुटून रस्त्यावर

शहरांमध्ये पथदिव्यांचे खांबांवरून अनेक ठिकाणी केबल्स टाकलेले आहेत, पण अनेक ठिकाणी हे केबल्स तुटून अशाप्रकारे रस्त्यांवर लोळताना दिसत आहेत. यामुळे पादचारी व वाहनचालक यांना त्रास होण्याची शक्यता आहे. महापालिकेने लक्ष द्यावे.

- शरद लासूरकर, औरंगाबाद

हर्सूल

पावसाचा 'योग'कधी?

जून महिना संपत आला, तरी अद्याप औरंगाबाद शहर, संपूर्ण मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने चक्क दडी मारली असून, दमदार पाऊस कधी येईल याची प्रतीक्षा बळीराजा करीत आहे. मध्यंतरी काही प्रमाणात पाऊस पडल्याने पेरणीच्या पिकांना संजीवनी मिळाली होती, परंतु भूजल पातळीमध्ये कसलीही वाढ झालेली दिसून येत नाही. पेरणीसाठी आवश्यक पाऊस येतो की नाही याची चिंता बळीराजाला वाटत आहे.

रवींद्र तायडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या ओळखल्यास पर्यावरण संवर्धन शक्य

$
0
0

प्रत्येकाने जबाबदारी ओळखल्यास पर्यावरण संवर्धन शक्य

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

पाणी टंचाई, प्रदूषण, कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज असते. आजघडीला महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर स्वच्छतेसह जलसंधारण, वृक्षारोपण, शौचालयाचे काम मोठ्या प्रमाणावर होते आहे. प्रत्येकाने समस्या सोडवणुकीसाठी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून कार्य केल्यास पर्यावरण संवर्धन शक्य आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. 'टाइम्स ग्रुप'च्या आयोजित 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री'सोहळ्यावेळी ते बोलत होते.

जालना रोडवरील खिंवसरा हेडक्वार्टर येथे शुक्रवारी (२९ जून) मोठ्या उत्साहात झालेल्या 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री' सोहळ्यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, महात्मा गांधी मिशनचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी, एनआयपीएमचे अध्यक्ष सुनील सुतवणे, 'टाइम्स ग्रुप'चे रिस्पॉन्स हेड संदीप कोल्हटकर, नागपूर सब ऑफिस हेड प्रसाद पुल्लीवार, ब्रँच व्हर्टिकल हेड (नागपूर) रूपेश भाईक, औरंगाबाद सब ऑफिस हेड महेश जहागीरदार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री' तसेच 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

'महाराष्ट्र टाइम्स', 'टाइम्स ऑफ इंडिया', 'इकॉनॉमिक्स टाइम्स'च्या सौजन्याने 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री' या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी आपापल्या परीने कार्य करणाऱ्या कंपन्या, उद्योग, शाळा, हॉस्पिटल्सचा सन्मान करण्यात आला. यावेळी पॅरासन मशिनरी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, रेयॉन इल्युमिनेशन्स, लोया प्री इंजिनीअर्ड बिल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, मॅट्रो मेटल इंडस्ट्रीज, पावरकॉन, विश्वा टुलिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड, लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल, अशोक पोरे- मृदुला टुर्स अँड ट्रॅव्हल्स, एम्स हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर, महात्मा गांधी मिशन, शिवाजी दांडगे, एएसआर इंडस्ट्रीज, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड, एमआर ग्रुप, रेन ड्रॉप आरओ सोल्युशन्स, पोरेज मृदुला टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रा. लि., नारायणा आयआयटी अँड पीएमटी अकॅडमी, वैद्य अकॅडमी, अमृत डेव्हलपर्स, आयसेन्स, खिंवसरा ग्रुप यांना 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री' पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

यावेळी 'क्लीन एनर्जी अॅवार्ड', 'इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन अॅवार्ड', 'एक्सलन्स इन वॉटर मॅनेजमेंट अॅवार्ड', 'एक्सलन्स इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अॅवार्ड' आणि 'सीएसआर अॅवार्ड' देऊन टाइम्सने सन्मानीत केले. पर्यावरणाप्रती जागरूकता निर्माण करत भरीव योगदानाबद्दल 'टाइम्स ग्रुप'च्या वतीने सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि आरोग्यदायी तुळशीचे रोप देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूजा मदनानी यांनी केले.

कौतुकास्पद उपक्रम-

बागडे यांनी पाठ थोपटली

'टाइम्स ग्रुप'च्या वतीने ठेवलेल्या 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री'उपक्रमाचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कौतुक केले. पर्यावरणपूरक काम करणाऱ्यांची संख्या वाढायला हवी. थोड्या आणि मोजक्याच लोकांनी यासाठी पुढाकार घेऊन भागणार नाही. सामूहिक सहभागाने पर्यावरण संवर्धन शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश देशभर प्रभावीपणे पोहोचला आहे. आज विविध संस्था, कंपन्या स्वच्छतेच्या बाबतीत भरपूर काम करत आहे. असंख्य गावकऱ्यांनी मनावर घेतल्याने आणि सरकारी पातळीवरून योगदान मिळाल्याने कितीतरी गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. सध्या आपल्या शहरात कचऱ्याची समस्या उग्ररूप धारण करत आहे, परंतु ही समस्या आज उद्धभवलेली नसून अनेक वर्षांपासूनची खदखद आहे. वेळीच त्यावर तोडगा काढता न आल्याने त्याने भीषण रूप दाखवले आहे. पाण्याची समस्या सुद्धा तशीच आहे. पाण्याचा योग्य वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन न झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली. एखादी गोष्ट कमी पडल्याशिवाय आपल्याला त्याचे महत्त्व ओळखता येत नाही. पाण्याचे योग्य नियोजन, गैरवापर टाळणे, गरजेपुरतेच पाणी वापरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, यासारख्या गोष्टी आवश्यक आहेत.

'त्या' लोकांचे मोबाइल नंबर झळकवा

आजघडीला शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झालेली असताना संबंधित कंत्राटदार, अधिकारी, नगरसेवक आपल्या जबाबदाऱ्या योग्यपणे पार पडताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात एक फलक लाऊन त्यावर कचरा निर्मूलनाची जबाबदारी असलेल्या कंत्राटदार, संबंधित अधिकारी आणि नगरसेवकाचे नाव आणि मोबाइल नंबर लिहायला हवा. जेणेकरून त्यांची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकेल, अशी लाखमोलाची सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. जर त्या फलकावरील मोबाइल नंबर बंद करून कामात कुचराई कोणी करत असेल, असे निदर्शनास आल्यास त्यावर प्रशासनाने कठोर कारवाई देखील करायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

-------------------------

'टाइम्स ग्रुप' ठरतोय मार्गदर्शक - महापौर

समाजाला काय हवे ते देण्याचे काम 'टाइम्स ग्रुप' करतो. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने विविध विषयांवर प्रकाश टाकून समाजाच्या हिताची जपवणूक केली जाते. आगळ्यावेगळ्या उपक्रमांचे आयोजन या ग्रुपच्या वतीने केले जाते. त्याला सर्व घटकांतून प्रतिसादही मिळतो. पर्यावरणाच्या संवर्धनाची जबाबदारी सगळ्यांची असली तरी त्या-त्या संस्थांना पुरस्काराच्या रूपाने सन्मानीत करणारा 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री' सोहळा समर्पक ठरला, असे प्रतिपादन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले.

निसर्गाने आपल्याला भरपूर गोष्टी दिल्या असल्या तरी नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर वाढल्याने प्रदूषण, पाणी टंचाईसारख्या समस्या उद्भवल्या आहेत. पाऊस मोठ्या प्राणावर व्हावा, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे. यंदा आम्ही ७० हजार झाडे लावण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी सर्वानी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आज कचऱ्याची समस्या सोडवणुकीसाठी राज्य शासनाकडून ९० कोटी रुपयांची तरतूद झालेली असली तरी प्रत्येकाने जबाबदारीने वागल्यास भविष्यात या समस्या इतक्या उग्ररूप धारण करणार नाहीत, असा विश्वास महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीतील रस्ते, पथदिव्यांना नाहरकत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिलकठाणा एमआयडीसीमधील रस्ते आणि पथदिव्यांचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेची कोणतीही हरकत नाही, असे प्रमाणपत्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी (२९ जून) दिली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महानगरपालिकेला जानेवारी महिन्यात पत्र देऊन चिकलठाणा एमआयडीसीमधील रस्ते आणि पथदिव्यांची कामे एमआयडीसी मार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याकरिता महानगरपालिकेकडून संमतीपत्रासह रस्त्यांची माहिती मागविण्यात आली होती. १९८७ या वर्षी चिकलठाणा एमआयडीसीमधील क्षेत्र महापालिकेकडे करण्यात आले होते, त्यानुसार या भागातील रस्ते व पथदिव्यांच्या देखभाल व दुरूस्तीची कामे मनपाकडून होणे अपेक्षित आहे. मात्र मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे मासिआ आणि एमईसीसी या औद्योगिक संघटनांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाकडून निधीची उपलब्धता होत नसल्यामुळे कामे झाली नसल्याचे सांगत विशेष बाब म्हणून औद्योगिक विकास महामंडळाकडूनच चिकलठाणा एमआयडीसीतील रस्त्यांची दुरूस्ती आणि पथदिव्यांची कामे करावीत, अशी मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासंदर्भातील निर्णयाकरीता एमआयडीसीच्या मुख्यालयास प्रस्ताव सादर केला होता.

\Bप्रस्तावाची छानणी \B

या प्रस्तावाची छानणी केल्यानंतर महामंडळाने चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची संपूर्ण माहिती आणि महापालिकेचे संमतीपत्र मागविले होते. त्यानुसार पालिकेने शुक्रवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता यांना नाहरकत प्रमाणपत्र पाठवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनवाढ करा, पेन्शनधारकांचे धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महागाई भत्त्यासह दरमहा कमीत कमी साडेसात हजार रुपये पेन्शन मार्च २०१४ पासून देण्यात यावे, यासह अन्य मागण्यासाठी ईपीएस ९५ - निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे शुक्रवारी येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. समितीचे नेते कमांडर अशोक राऊत व सरचिटणीस अॅड. सुभाष देवकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी पीएफ कार्यालयास टाळे लावण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून तो हाणून पाडला. एकट्या मराठवाड्यात ५७ हजार तर राज्यात साडेपाच लाखांच्यावर पेन्शनधारक आहेत. अनेक पेन्शनधारकांना महिन्याला ७५० रुपये पेन्शन म्हणून मिळते. तुटपुंज्या रक्कमेत घर कसे चालविणार, असा सवाल समितीचे नेते देवकर यांनी केला. एस. टी. महामंडळ, विद्युत महामंडळ, साखर कारखाने, सहकार बँक तसेच खासगी कारखान्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिच बाब लक्षात घेता पालक असलेल्या शासनाने पेन्शनमध्ये वाढ केली पाहिजे. वयोवृद्ध गेल्या अनेक वर्षांपासून त्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, शासनदरबारी त्यांची दखल घेतली जात नाही, म्हणून पुन्हा एकवार आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देविदास पाटील, ए. एन. अंबेकर यांच्यासह पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेन्शनमध्ये वाढ करा, कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करुन सर्व सभासदांना उच्च पेन्शन द्या, पेन्शनधारकांना पती पत्नीसह मोफत वैद्यकिय सुविधा द्या, मागण्या मान्य होईपर्यंत ५ हजार रुपये दरमहा महागाई भत्यासह पेन्शन देण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, पीएफ अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. न्यायहक्कासाठी एकवटलेल्या पेन्शनधारकांनी आता निर्णायक लढा हाती घेतला असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही समितीने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे सोमवारी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट या दोन कंपन्यांमध्ये होणाऱ्या करारामुळे देशभरातील छोट्या व्यापाऱ्यांवर संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या कराराविरोधात देशभरातील सर्व व्यापारी एकजूट झाले आहेत. औरंगाबादेतील व्यापारी महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७२ विविध संघटना एकत्र येत याविरोधात आवाज उठविणार असून येत्या २ जुलै रोजी जिल्ह्यातील व्यापारी गुलमंडी येथे धरणे आंदोलन करणार आहे.

सिडकोतील अग्रेसन भवन येथे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हा व्यापारी महासंघाशी संलग्नीत असलेल्या जिल्ह्याभरातील ७२ संघटनाचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते. फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टमध्ये होणाऱ्या करारामुळे लाखो छोटे व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद होतील़ हा करार सरकारने रद्द करावा या मागणीसाठी देशभरात सर्व व्यापारी एकत्र येत असून, या आठवड्यात आंदोलन, निदर्शने करून सरकारला हा निर्णय मागे घेण्यासाठी भाग पाडण्यासाठी व्यापारी योजना आणि धोरण आखण्यात आली. त्यानुसार २ जुलैला जिल्ह्यातील व्यापारी रस्त्यावर उतरणार आहे़ त्यानंतर निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त डॉ़ पुरुषोत्तम भापकर यांना देणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. या बैठकीत या करारामुळे होणारे व्यापाऱ्यांचे नुकसानावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँगेसने सुरू केली बूथनिहाय बांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाला बळकटीकरण करण्यासाठी बूथनिहाय अवलोकन करण्याचे काम हाती घेण्यात आलेले असून, त्यासाठी माजी आमदार डॉ. कल्याण काळे  प्रत्येक गावाचा दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन बैठका घेत आहे.

फुलंब्री तालुक्यात काँग्रेस पक्षाला गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत फारसे यश मिळाले नसले, तरी पक्षाच्या मताधिक्यात फारशी घट झालेली नाही; तसेच कार्यकर्ते पक्षाला धरून आहेत. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षांने गावागावांत संपर्क सुरू केला आहे. बूथस्तरावर कार्यकर्ता मजबूत करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. औरंगाबाद तालुका झाल्यानंतर ते आता फुलंब्री तालुक्यात प्रत्येक गावांत जात आहेत. त्यांचा २८ व २९ जूनला दिवसभर गावनिहाय दौरा आहे. 

मागील निवडणुकीत केलेल्या चुका, झालेले दुर्लक्ष याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, म्हणून बूथनिहाय कार्यकर्ते जोडण्यात येत आहे. ग्रामीण भागात सध्या सत्ताधाऱ्यांवर असलेल्या नाराजीचा फायदा काँग्रेस पक्षाला मिळावा, यासाठी प्रत्येक कार्यक्रमात डॉ. काळे शेतकरी, बेरोजगार, कर्जमाफी, बोंडआळी या विषयावर भर देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा साखर सहसंचालकांना ‘घेराओ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे उसाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून, माजलगाव येथील शेकडो शेतकऱ्यांनी याप्रश्नी शुक्रवारी क्रांती चौकातील प्रादेशिक साखर सहसंचालकांना 'घेराओ' घातला. जोपर्यंत पैसे मिळणार नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला. यावेळी सहसंचालक श्रीमती एन. व्ही़ गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात दुपारी एकच्या सुमारास सतंप्त शेतकऱ्यांनी उसाच्या बिलासाठी आंदोलन केले. 'शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळालेच पाहिजे','बघता काय सामील व्हा', अशा घोषणा देत त्यांनी अधिकाऱ्यांना 'घेराओ' घातला. माजलगावचे शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्त्वाखाली सायंकाळी सहापर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सरकारने तूर, हरभरा खरेदी केला, मात्र त्याचे अद्यापही पैसे शेतकऱ्याना मिळालेले नाही़; तसेच उसाची पहिली उचल अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपासाठी खत, बियाणे खरेदीसाठी पैशाअभावी पेरणी खोळंबल्या आहेत़ नियमानुसार शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस घातल्यानंतर १५ दिवसांच्या आत उसाचे पैसे देणे बंधनकारक असताना सहा महिने उलटूनही साधा छदामही मिळालेला नाही़ बीड जिल्ह्यातील माजलगाव सहकारी साखर कारखाना, जयमहेश शुगर इंडस्ट्रीज व छत्रपती सहकारी साखर कारखाना; तसेच शंभू महादेव शुगर इंडस्ट्रीज आदीसह मराठवाड्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी 'एसआरपी'नुसार शेतकऱ्यांना उसाचे बिलाचे तब्बल १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम थकविली आहे़ यात एनएसएल शुगर साखर कारखान्याकडे ६८ कोटी रक्कम थकित आहे, असा आरोपही आंदोलकांनी यावेळी केला.

दरम्यान सहसंचालक एन. व्ही़ गायकवाड यांनी शेतकऱ्यांचे पेमेंट बुधवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, असे आदेश सायंकाळी काढले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित केल्याने सांगितले.

सहकार मंत्री स्थगिती देताच कशी?

साखर कारखान्यांनी शेतकऱ्याना उसाचे पैसे न देण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली आहे. सहकार मंत्री स्थगिती कशी आणू शकतात़ स्थगिती मिळावी यासाठी ४० लाख रुपये दिले़ खासगी दलाला तीन हजार रुपये देईल, त्यालाच उसाचे पैसे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीक विम्यापोठी अवघे तीन रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

काही शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पीक विम्यापोटी अगदी नाममात्र रक्कम जमा  झाली आहे. तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात, तर केवळ तीन रुपयांचा पीक विमा जमा झाला आहे.

विम्यापोटी ४०६ रुपये भरून हाती केवळ ७० रुपये पडल्याने शासनाने थट्टा केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी त्यांचा आधार कार्ड क्रमांक न दिल्याने असे प्रकार घडल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेने सांगितले आहे. मागील वर्षी खरीप विमा भरलेल्या शेतकऱ्यांना कपाशी व मूग या दोन पिकांसाठी विमा मंजूर झाला असून, विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आहे. विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकेत लावण्यात आली आहे. यात अनेक शेतकऱ्यांना विम्यापोटी केवळ तीन, ७०, १०० रुपये अशा रकमा मंजूर झाल्याचे बघून शेतकऱ्यांना आश्चर्य वाटत आहे. विष्णू रंगनाथ मुंढे यांनी पिक विम्यपोटी १.५६ हेक्टर क्षेत्रासाठी ४०६ रुपये विम्याचा हप्ता भरला होता. त्यांना विमा कंपनीने केवळ ७० रुपये ९१ पैसे विमा मंजूर केला आहे; तसेच सुल्याबाई मुंढे यांना ३३२ रुपये भरल्यानंतर २१२ रुपयांचा विमा प्राप्त झाला आहे. वैजापूर तालुक्यातील ७९१८ कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी पाच कोटी आठ लाख ६५ हजार ८८६ रुपये मंजूर झाले आहेत. त्याचप्रमाणे ११ हजार ५१३  बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दोन कोटी ७२ लाख ५४ हजार ७४९ रुपये मंजूर झाले आहेत. या शेतकऱ्यांची विमा रक्कम जिल्हा बँकेच्या दहेगाव, धोंदलगाव, गारज, खंडाळा, लाडगाव, लासुरगाव, लोणी, महालगाव, माळीघोगरगाव, मनूर, वैजापूर, पालखेड, शिऊर, परसोडा व वीरगाव येथील शाखांमध्ये जमा करण्यात आली आहे, मात्र काही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्याऐवजी खुपच कमी रक्कम मिळाल्याने त्यांच्यात नाराजी आहे. पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी आधारकार्ड क्रमांक न दिल्याने त्यांचा ऑनलाईन अर्ज भरला गेला नाही, मात्र त्यांनी विम्यापोटी भरलेल्या रकमेच्या पावत्या व बँक खात्यात जमा झालेल्या रकमेवरून विमा वाटपात घोळ असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळाला वेगवेगळा विमा मंजूर झाला असून, लाडगाव सर्कलला सर्वाधिक विमा मंजूर झाला आहे. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक विम्यापोटी अवघे तीन रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

काही शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पीक विम्यापोटी अगदी नाममात्र रक्कम जमा झाली आहे. तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात, तर केवळ तीन रुपयांचा पीक विमा जमा झाला आहे.

विम्यापोटी ४०६ रुपये भरून हाती केवळ ७० रुपये पडल्याने शासनाने थट्टा केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी त्यांचा आधार कार्ड क्रमांक न दिल्याने असे प्रकार घडल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेने सांगितले आहे. मागील वर्षी खरीप विमा भरलेल्या शेतकऱ्यांना कपाशी व मूग या दोन पिकांसाठी विमा मंजूर झाला असून, विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आहे. विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकेत लावण्यात आली आहे. यात अनेक शेतकऱ्यांना विम्यापोटी केवळ तीन, ७०, १०० रुपये अशा रकमा मंजूर झाल्याचे बघून शेतकऱ्यांना आश्चर्य वाटत आहे. विष्णू रंगनाथ मुंढे यांनी पिक विम्यपोटी १.५६ हेक्टर क्षेत्रासाठी ४०६ रुपये विम्याचा हप्ता भरला होता. त्यांना विमा कंपनीने केवळ ७० रुपये ९१ पैसे विमा मंजूर केला आहे; तसेच सुल्याबाई मुंढे यांना ३३२ रुपये भरल्यानंतर २१२ रुपयांचा विमा प्राप्त झाला आहे. वैजापूर तालुक्यातील ७९१८ कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी पाच कोटी आठ लाख ६५ हजार ८८६ रुपये मंजूर झाले आहेत. त्याचप्रमाणे ११ हजार ५१३ बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दोन कोटी ७२ लाख ५४ हजार ७४९ रुपये मंजूर झाले आहेत. या शेतकऱ्यांची विमा रक्कम जिल्हा बँकेच्या दहेगाव, धोंदलगाव, गारज, खंडाळा, लाडगाव, लासुरगाव, लोणी, महालगाव, माळीघोगरगाव, मनूर, वैजापूर, पालखेड, शिऊर, परसोडा व वीरगाव येथील शाखांमध्ये जमा करण्यात आली आहे, मात्र काही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्याऐवजी खुपच कमी रक्कम मिळाल्याने त्यांच्यात नाराजी आहे. पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी आधारकार्ड क्रमांक न दिल्याने त्यांचा ऑनलाईन अर्ज भरला गेला नाही, मात्र त्यांनी विम्यापोटी भरलेल्या रकमेच्या पावत्या व बँक खात्यात जमा झालेल्या रकमेवरून विमा वाटपात घोळ असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळाला वेगवेगळा विमा मंजूर झाला असून, लाडगाव सर्कलला सर्वाधिक विमा मंजूर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात निम्मे दिवस पावसाचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जून महिन्यातच जवळपास संपूर्ण मराठवाडा चिंब झाला असून या महिन्यात तब्बल १७ दिवस पावसाने हजेरी लावली. दरम्यान, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मात्र मोठ्या पावसाची अपेक्षा कायम आहे.

कायम दुष्काळी असा ठपका असलेल्या मराठवाड्यात गेल्या दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. यंदाही पावसाची दमदार ओपनिंग झाली असून महिन्याअखेरपर्यंत विभागात वार्षिक सरासरीच्या २२ टक्के पाऊस झाला आहे. राज्याच्या तुलनेत सर्वाधिक २७ दिवस पाऊस कोकण विभागात झाला असून सर्वात कमी केवळ १३ दिवस पाऊस नागपूर विभागात बरसला.

मराठवाड्यात जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच पावसाची दमदार हजेरी असली तरी १२ जूनपासून पावसाने मोठी दडी मारली होती, मात्र त्यानंतर पुन्हा पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर २३ व २४ जून तसेच २७ जून रोजी लातूर, उस्मानाबाद तसेच नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. विभागात अतिवृष्टीचेही सत्र कायम सुरू असून लातूर, उस्मानाबाद तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. महिन्याभरात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक १७८ टक्के पाऊस लातूर जिल्ह्यात झाला.

मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना औरंगाबाद व जालना जिल्ह्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ७८.८ टक्के, तर जालना जिल्ह्यात ७७.६ टक्के पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात १४०.५, हिंगोली १५२.५, नांदेड १५९.७, बीड १०६.५, लातूर १७८.३, तर उस्मानाबाद जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत तब्बल १२८.१ टक्के पाऊस झाला.

----.

विभागनिहाय पावसाचे दिवस

विभाग.................. पावसाचे दिवस

कोकण.....................२६

नाशिक......................१२

पुणे...........................२०

औरंगाबाद.................१७

अमरावती...................१७

नागपूर.....................१३

---------------------------.

सरासरी ................२४ दिवस

--------------------------------.

१०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची जिल्हानिहाय मंडळे

जिल्हा.................मंडळे........ अधिक पाऊस

औरंगाबाद...............६५...........................२०

जालना..................४९...........................१३

परभणी..................३९............................२८

हिंगोली..................३०...........................२२

नांदेड....................८०............................६१

बीड......................६३............................२९

लातूर...................५३.............................४८

उस्मानाबाद............४२............................२६

----------------------------------------------.

एकूण...................४२१...........................२४७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुग्‍णालय परवाना धोरण ठरवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रुग्‍णालये, नर्सिंग होमसाठी महापालिकेकडून परवानी घ्यावी लागते, ही परवानगी घेताना नगररचना आणि आरोग्य विभागामध्ये समन्वय नसल्याने डॉक्टरांना परवानगीसाठी महापालिकेत खेट्या माराव्या लागतात यामुळे परवानगी नूतनीकरणाच्या दृष्टीने धोरण ठरवण्यात यावे यासाठी नगररचना आणि आरोग्य विभागाची संयुक्तपणे बैठक घेण्यात यावी, अशी सूचना स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी आयुक्त डॉ. निपूण विनायक यांना केली.

महापालिका क्षेत्रामध्ये रुग्‍णालयांना परवानगी मिळावी यासाठी डॉक्टरांकडून सादर केलेल्या संचिका महापालिकेत प्रलंबित आहेत, मात्र महापालिका नगरचना आणि आरोग्य विभागामध्ये समन्वय नसल्यामुळे परवानगी देण्यास अडचणी येतात. बांधकामाची परवानगी नगररचना विभागाकडून देण्यात आली असली तरी रुग्‍णालय असल्यामुळे चेंज ऑफ युज करिता नगररचना विभाग परवानगी देत नाही. त्यामुळे डॉक्टरांना आरोग्य विभागाकडे चकरा माराव्या लागतात. परवाना नूतनीकरण करून देण्याची प्रक्रिया सोपी करावी या करिता नगररचना आणि आरोग्य विभागाची संयुक्त नियमावली तयार करून परवानगी देण्याबद्दलचे धोरण ठरविण्यात यावे. जेणे करून शहरातील डॉक्टरांना त्रास होणार नाही, मनपाला उत्पन्न मिळेल, अशी सूचना सभापती वैद्य यांनी आयुक्तांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीला पळवून दोन वर्षे बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करणाऱ्या, तब्बल दोन वर्षे बेपत्ता असणाऱ्या आणि आता मात्र तिच्यापासून स्वतःला मुलगी झाली म्हणून अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती करणाऱ्या आरोपी सद्दाम उर्फ साहील पाशुभाई शेख याचा जामीन विशेष न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी शुक्रवारी (२९ जून) फेटाळला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या पित्याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची १६ वर्षांची मुलगी १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घरातून निघून गेली. शोध घेऊनही सापडली नाही. दरम्यान, गावातील तरुण सद्दाम उर्फ साहील पाशुभाई शेख (२१) याने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे स्पष्ट झाले; तसेच सद्दामची बहीण शेहनाझ हिनेही सद्दामला मदत केल्याचे समोर आले.

या प्रकरणी लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद दिल्यावरुन आरोपी सद्दाम यासह शेहनाझ यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेचे ३६३, ३६६ (अ) सह ३४, बाललैंगिक प्रतिबंधक कायद्याच्या (पोस्को) ८; तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या ३(१)(डब्ल्यू)(एक)(दोन), ३(२)(व्ही), ३(२)(व्हीए) कलमान्वये एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान, आरोपीची दुचाकी पाचोड परिसरात, तर मोबाइल अंबड परिसरात सापडला; तसेच आरोपी व पीडितेचा मुंबई, शिर्डीपासून अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला, परंतु दोघेही आजपर्यंत सापडले नाहीत. या प्रकरणात आरोपी सद्दाम याने २१ जून २०१८ रोजी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, मुलगी १६ वर्षांची असताना आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले आहे. त्याचवेळी पीडितेने स्वतःहून धर्मांतर केल्याचे आरोपीने जामीन अर्जात म्हटले असले, तरी तिने स्वखुशीने धर्मांतर केले का, याचाही तपास करावा लागेल. या प्रकरणात आरोपीविरुद्ध दोन्ही विशेष कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असल्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

\Bशरीरसंबंधही अल्पवयीन असतानाच\B

आता आम्हाला पाच महिन्यांची मुलगी आहे, याचा विचार करून अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी विनंती आरोपी सद्दाम याने जामीन अर्जात केली, मात्र त्याला विरोध करताना, दोघांना झालेली मुलगी ही पाच महिन्यांची आहे, याचाच अर्थ शरीरसंबंध झाला तेव्हा पीडितेचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी होते हे उघड होते आणि त्यामुळेच आरोपीवर 'पोस्को' कायद्याचे ३ व ५ कलम वाढवण्यात येऊ शकते आणि म्हणूनच आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यास लुटले, जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यापाऱ्यास लुटणाऱ्या कुख्यात आरोपी गुन्हेगार शेख वाजेद ऊर्फ बबला असद ऊर्फ मोसीन याचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी शुक्रवारी (२७ जून) फेटाळला. हडको एन-११ येथे राहणारे व्यापारी राजेंद्र हिरालाल खंडेलवाल हे हिमायतबाग परिसरात ५ एप्रिल २०१८ फिरण्यासाठी गेले असता, आरोपी बबला तिथे आपल्या साथीदारांसह दारू पित बसला होता. त्याने व्यापारी राजेंद्र खंडेलवाल यास अडवून शिविगाळ करत पिस्तुलाने जिवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल व रोख रक्कम असा ११ हजारांचे ऐवज लुटला, अशी तक्रार खंडेलवाल यांनी दिली होती. या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी खूनाच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी बबला याला लुटमारीच्या गुन्ह्यात हस्तांतर करून घेण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अधिकारी, कर्मचारी संवर्गातील प्रलंबित वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करा, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या (जीएसटी) कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी असहकार आंदोलन केले. यानिमित्त येथील कार्यालयासमोर असहकार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिकारी कर्मचारी समन्वय समितीतर्फे आंदोलनाचे हे हत्यार उपसण्यात आले आहे. वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करा, गट ड वर्गासह सर्व संवर्घातील रिक्त पदे भरा, जीएसटीच्या अनुषंगाने खात्याची पुनर्रचना करा, वरिष्ठ संवर्गातील कुंठितता दूर करा, सेवाभरती नियमातील अन्यायकारक बदल रद्द करा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. वारंवार सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. त्यामुळे निर्णायक लढा सुरू केल्याचे आंदोलकांनी सांगितले. जीएसटी विभागाचे उपायुक्त रवींद्र जोगदंड, आनंद पाटील, प्रकाश क्षीरसागर, ज्योती गायसमुद्रे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी कराड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या चार पदांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अतुल कराड यांनी नंदकुमार खंदारे यांचा २५७ मतांनी पराभव केला.

अध्यक्ष, सचिव, ग्रंथालय समितीचे सचिव आणि महिला सहसचिव या चार पदांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. शुक्रवारी मतदानानंतर मतमोजणी करण्यात आली. खंडपीठ वकील संघाच्या निवडणुकीसाठी १२६३ पैकी १०८७ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग दंडे व संगीता धुमाळ यांनी सांगितले. अध्यक्षपदासाठी अतुल कराड व नंदकुमार खंदारे यांच्यात सरळ लढत झाली. कराड यांना ६७२, तर खंदारे यांना ४१५ मते मिळाली. सचिवपदाची निवडणुक चुरशीची झाली. कमलाकर सूर्यवंशी यांनी ज्ञानेश्वर बागूल यांचा अवघ्या १४ मतांनी पराभव केला. सूर्यवंशी यांना ५५१, तर बागूल यांना ५३७ मते मिळाली. महिला सहसचिव पदासाठी अनुपमा गंगाखेडकर आणि अलमास अब्दुल कादर यांच्यात चुरस होती. या निवडणुकीत गंगाखेडकर (५३७ मते) यांनी अलमास (५२६ मते) यांच्यावर ११ मतांनी मात केली. ग्रंथालय समिती चेअरमनपदासाठी श्रीनिवास गणाचारी हे निवडून आले. गणाचारी (६६८ मते) यांनी कैलास जाधव (४२१मते) यांच्यावर २४७ मतांनी विजय प्राप्त केला.

नवीन कार्यकारिणी अशी : अध्यक्ष अतुल कराड, उपाध्यक्ष राम शिंदे व मंजुषा जगताप, सचिव कमलाकर सूर्यवंशी, सहसचिव महेश तौर, अनुपमा गंगाखेडकर, ग्रंथालय समिती चेअरमन विनायक सोळुंके, सदस्य सुश्मिता दौंड, सुनीता सोनवणे, साईसागर अंबिलवादे, ब्रह्मानंद धनुरे, दत्ता मडके, फय्याझ पटेल, अशोक राऊत, महेश शिंदे, प्रशांत सुकाळे.

वकिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य : कराड

औरंगाबाद खंडपीठामध्ये कार्यरत वकिलांचे प्रश्न आपल्या कार्यकाळात सोडविण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येईल. कार्यकारिणीची कार्यकाळ एक वर्षाचाच असतो, त्यामुळे प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवून त्या सोडवू, असे नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल कराड यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करून, मुंबईमध्ये कार्यरत ज्येष्ठ न्यायमूर्तींना रोटेशनप्रमाणे औरंगाबादलाही पाठवावे, अशी विनंती करण्यात येणार आहे. खंडपीठात कार्यरत तरुण वकिलांना याचा चांगला फायदा होऊ शकेल. वकिलांचे चेम्बर्स आणि पार्किंगचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून, तो सोडविण्यासही आपण प्राधान्य देणार आहोत. बार आणि बेंचमध्ये अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरण आहे. ते वृद्धिंगत होण्यासाठी आपले प्रयत्न असतील. खंडपीठाच्या माध्यमातून गोरगरीब पक्षकारांना न्याय मिळावा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

उमरावती (ता. फुलंब्री) येथील एका १७ वर्षांच्या तरुणीला गावातीलच दोन तरुणांनी, 'तुझे वडील हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत,' असे सांगून फूस लावून पळवून नेले आहे. याबाबत वडोदबाजार पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २८ जून रोजी दुपारी दोन वाजता दिलीप रंगनाथ पडेकर व विक्रम राजू पडेकर राहणार उमरावती या दोन तरुणांनी संगनमत करून गावातीलच एका १७ वर्षांच्या तरुणीला,'तुझे वडील आजारी पडल्याने त्यांना आळंद येथील हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत. तुला त्यांनी भेटायला बोलावले आहे,' अशी फूस लावून तरुणीला मोटार सायकलवर बसवून पळवून नेले. याबाबत वडोदबाजार पोलिस ठाण्यात पीडित तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक नारायण घुगे हे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधाऱ्यात बुडून विवाहितेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

पाल (ता. फुलंब्री) येथील २५ वर्षांची विवाहिता  बुधवारी (२७ जून)  रात्री दोन वाजता शौचास जाते म्हणून घरातून निघून गेली होती. पाल येथील कोल्हापुरी बांधाऱ्यात तिचा मृतदेह शुक्रवारी (२९ जून) आढळून आला. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

वंदना त्रिंबक वाहटुळे (वय २५, रा. पाल, ता. फुलंब्री) असे या कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मरण  पावलेल्या विवाहितेचे नाव आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, पाल येथील विवाहिता वंदना वाहटुळे बुधवारी रात्री दोन वाजता घरातून  शौचास जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांसह सर्वत्र तिचा शोध घेतला, परंतु ती  सापडली नसल्याने शेवटी फुलंब्री पोलिस ठाण्यात पती त्रिंबक वाहटुळे यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.  

दरम्यान  शुक्रवारी तिचा पाल गावात येण्या-जाण्यासाठी असलेल्या पूलवजा कोल्हापुरी बंधाऱ्यात मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन फुलंब्री ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन केले.  याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.  पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पाल येथे विवाहितेवर अंत्यंसंस्कार करण्यात आले. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत लोकप्रतिनिधींना डावलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याचे औद्योगिक धोरण जाहीर करण्यापूर्वी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी उद्योजकांसोबत चर्चा केली. जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात शिवसेना वगळता इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींना मुद्दाम डावलण्यात आले. सरकारचा कार्यक्रम असताना आम्हाला का डावलले गेले, असा सवाल भाजप आमदार अतुल सावे यांनी केला आहे. मात्र हा कार्यक्रम उद्योजकांशी संबंधित होता, कोणत्याच लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले नव्हते, असे उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या उद्योग धोरणाला जाहीर करण्यापूर्वी उद्योजकांकडून सूचना मागविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी औरंगबादेत मराठवाड्यातील उद्योजकांची बैठक बोलाविली होती. या कार्यक्रमासाठी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ उपस्थित होते. हा मुद्दा पकडून आमदार अतुल सावे म्हणाले, हा सरकारचा कार्यक्रम होता. सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणे अपेक्षित होते. पण डीआयसी, एमआयडीसीने केवळ शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना बोलाविण्यात आले. मी, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, सुभाष झांबड कुणालाच बोलाविले नाही. आम्हाला हेतुपुरस्सर डावलण्यात आले आहे. सरकारी कार्यक्रम होता. वैयक्तिक असता, तर आमचा कुठेच आक्षेप नसला असता, असे आमदार सावे म्हणाले.

हा कार्यक्रम उद्योजकांसाठी होता. उद्योग धोरणासंदर्भात चर्चा होती. आम्ही कुणालाही आमंत्रित केले नव्हते. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ तिथे आले. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा मान ठेवणे आवश्यक आहे. कुणाला डावलण्याचा प्रश्नच येत नाही.

-सुभाष देसाई, उद्योगमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकोदच्या प्रकल्पात पाच वर्षांनंतर पाणी 

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

वाकोद (ता. फुलंब्री) येथील मध्यम प्रकल्पात सुमारे पाच- सहा  वर्षांनंतर पाणी साचल्याने परिसरातील गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

फुलंब्री तालुक्यात मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण सतत अत्यल्प असल्याने पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत होता. दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या होत्या, मात्र तेव्हाही या प्रकल्पात पाणी साचले नव्हते. पाच-सहा वर्षांपूर्वी मोठा पाऊस झाल्याने या प्रकल्पात पावसाचे पाणी मुबलक प्रमाणात जमा झाले होते. वाकोद  प्रकल्पांतर्गत जवळपास २२ गावाच्या पाणीपुरवठा विहिरी आहे. त्यानंतरच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परिसरात दुष्काळाच्या सावटाखाली तीन वर्षे काढावी लागली होती. या प्रकल्पशेजारील वाकोद गावात तर 'धरण उशाला, अन् कोरड घशाला' अशी अवस्था झाली होती. यंदा सुरवातीलाच या धरणात बऱ्यापैकी पाणी आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मागील वर्षी ऑगस्ट - सप्टेंबरपासूनच तालुक्यातील अनेक  गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता, मात्र शुक्रवारी व शनिवारी परिसरात दमदार पाऊस पडल्याने सिमेंट बंधारे, नदी-नाले ओसंडून वाहिल्याने या प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी जमा झाले आहे. या प्रकल्पात साचलेल्या पाण्याचे नियोजन केल्यास वाकोद गावासह परिसरातील सुमारे १५ गावांची तहान सुमारे एक-दीड वर्षे सहज भागवू शकते. यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचे भाकित असल्याने पावसाळ्यातील पुढच्या येणाऱ्या पाण्याने या प्रकल्पात अजून वाढ होईल. त्यामुळे पाच वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करणारा हा परिसर आता हिवराईने नटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images