Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

काम करा, अन्यथा कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'काम करा, नाही तर कारवाईला सामोरे जा,' असा निर्वाणीचा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला. कचऱ्याचा प्रश्न पाच महिन्यांनतरही सुटत नाही ही खरोखरच खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले. इंदूरला एक हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यावर तेथे घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात शिस्त आली. आता हे शहर स्वच्छतेत देशात पहिल्या क्रमांकाचे शहर आहे. इंदूरमध्ये जशी कारवाई झाली, तशीच कारवाई येथेही करावी लागेल, असे महापौरांनी सूचित केले.

सतत पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे गंभीर झालेला कचऱ्याचा प्रश्न याची दखल घेत महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सोमवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला महापौरांसह स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अनिल पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. प्रदीप बेंजरगे, डॉ. हिमांशू गुप्ता, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एम. डी. शहा, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची उपस्थिती होती.

या बैठकीतील चर्चा आणि घेतलेल्या निर्णयांबद्दल महापौर घोडेले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'पाच महिन्यांनंतरही कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही, ही खेदाची बाब आहे. आता पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आणि घरोघर जाऊन कचरा गोळा करण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडत आहे, हे लक्षात आले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही, ओला आणि सुका कचरा एकत्र करून संनियंत्रण समितीने ठरविलेल्या जागांवर कचरा टाकला जातो, त्याला नागरिकांना विरोध आहे. घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला कचराच गोळा केला जावा, अशा सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी डेडलाइन देखील त्यांना देण्यात आली आहे. डेडलाइननुसार काम न केल्यास आता त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल.'

प्रत्येक वॉर्डात पालिकेचे पाच ते दहा कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. कचरा वर्गीकरण व कचऱ्याचे संकलन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. वर्गीकरण केलेला कचराच संनियंत्रण समितीने ठरविलेल्या जागांवर पाठवला जाईल आणि तेथे कचऱ्यावर लगेचच प्रक्रिया केली जाईल, असा दावा महापौरांनी केला. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन येईपर्यंत बायोट्रिटची प्रक्रिया केली जाईल, असे ते म्हणाले. रस्त्यावरचा कचरा उचलणे सुरू आहे. कचरा उचलण्यासाठी जास्तीचे परिश्रम घ्या. कचऱ्यावर सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांत फवारणी करा, असेही त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगितले.

\Bऔषधी पालिकेची, उपचार घाटीचे\B

पाऊस आणि साचलेला कचरा यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. या आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाने (घाटी) यासाठी पुढाकार घ्यावा. महापालिका त्यांना औषधी उपलब्ध करून देईल, असे आवाहन महापौरांनी केले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. हिवताप विभागाला देखील महापालिकेतर्फे फवारणीची औषधी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या विभागाने माशा आणि डासांवर औषधींची फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या माशांचा त्रास खूप वाढला आहे. त्यामुळे हिवताप विभागाने औषधी फवारणीचे काम युद्ध पातळीवर करावे, असे आवाहन करण्यात आले. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्यास तयारी दाखवली.

\Bरमानगरात झाला विरोध\B

कचरा टाकण्यास रमानगरात सोमवारी विरोध झाला. तेथे मिश्र कचरा टाकण्यात येत असल्यामुळे व त्यावर कोणतीच प्रक्रिया करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करून कचऱ्याची वाहने थांबवली. अधिकाऱ्यांनी हा विरोध मोडून काढला. मिश्र कचरा या ठिकाणी आणून टाकण्यात येतो. त्यावर प्रक्रिया होत नाही अशी नागरिकांची तक्रार होती. यानंतर केवळ वर्गीकरण केलेला कचराच रमानगरच्या जागेवर टाकण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचऱ्याचा कन्नड प्रयोग फ्लॉप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागरिकांचा विरोध आणि त्यापुढे नमलेली महापालिका, यामुळे कचऱ्याचा कन्नड प्रयोग बारगळला आहे. परिणामी, महापालिकेने शहराबाहेर कचरा टाकण्यासाठी नवीन जागेचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, बंदोबस्तासाठी पालिका प्रशासनाने पोलिसांना पत्र दिले आहे.

शहरात निर्माण झालेली कचराकोंडी पाच महिन्यांनंतरही फोडण्यात महापालिका पदाधिकारी व प्रशासनाला यश आलेले नाही. कचराप्रश्नी मार्ग काढण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले, पण योग्य नियोजन नसल्यामुळे ते फसले. नागरिकांचा रोष देखील त्यामुळे वाढू लागला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्र खरेदी करण्यातही महापालिकेला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे कचराकोंडी फोडण्यासाठी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुढाकार घेऊन पिशोर (ता. कन्नड) जवळ सुमारे शंभर एकर गायरान जमिनीवर कचरा टाकण्यास पालिकेला परवानगी मिळवून दिली. पालिकेने रविवारी सकाळी सुमारे ४० ट्रक कचरा तेथे टाकला. मात्र, दुपारनंतर तेथील नागरिकांनी विरोध केल्यामुळे कचऱ्याने भरलेली वाहने पाठवणे थांबवण्यात आले. सोमवारी देखील वाहने पाठवली नाहीत. नागरिकांच्या विरोधामुळे पिशोर येथे यापुढे कचरा पाठवणे अशक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सोमवारी शहराच्या विविध भागात साचलेला सुमारे दोन हजार मेट्रिक टन कचरा कुठेही नेण्यात आला नाही.

संनियंत्रण समितीने चिकलठाणा, हर्सूल-सावंगी, पडेगाव आणि कांचनवाडी या जागा कचरा टाकण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी निवडल्या. या जागांवर कचरा टाकण्यास विरोध होत असल्यामुळे महापालिकेने आता पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. चारही ठिकाणी कचरा टाकण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून पत्र देण्यात आले आहे.

\B७० एकर जागा प्राप्त ?\B

कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाने नेमलेल्या संनियंत्रण समितीने शहरातील चार जागा निश्चित केल्या. या जागांवर देखील कचरा टाकण्यास विरोध होऊ लागला. त्यामुळे या जागांवर देखील कचरा टाकणे पालिकेला बंद करावे लागले आहे. दरम्यान, कचरा टाकण्यासाठी पालिकेचे प्रशासन नवीन जागेच्या शोधात होते. शहराजवळ सुमारे ७० एकर जागा कचरा टाकण्यासाठी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी रात्री या ठिकाणी कचरा टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता : सिंधुताई दीक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा जवळील गुरुकृपा हौसिंग सोसायटी येथील रहिवासी सिंधुताई रामदास दीक्षित (वय ८३) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर प्रतापनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. गुरुकृपा हौसिंग सोसायटीसह आौरंगाबादच्या सामाजिक कार्यात त्या हिरीरीने भाग घेत. पूर्वीचा जनसंघ ते भारतीय जनता पक्षाच्या जुन्या महिला कार्यकर्त्यांपैकी त्या होत. त्या बऱ्याच काळ विश्व हिंदू परिषद, शिवसेनेशीही संलग्न होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अर्ज नोंदणीला मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार सोमवारपर्यंत अर्ज भरणे व निश्चितीची मुदत होती. आजपर्यंत सहा हजार २८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

राज्य प्रवेशपूर्व सामाईक परीक्षा कक्षाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकात अर्ज नोंदणी व निश्चितीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी २१ जून ते १६ जुलैपर्यंत यासाठी मुदत होती. आता आणखी चार दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. जातवैधता प्रमाणपत्र सुरुवातीला बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे राज्यभर गोंधळ उडाला. शाळा, महाविद्यालय स्तरावरून प्रस्ताव आल्यानंतर वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया होते. मात्र, सुरुवातीला याचा विसर 'सीईटी सेल'ला पडला होता. विद्यार्थी, पालकांच्या विरोधानंतर ही अट मागे घेण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी निर्माण झालेली अडचण दूर झाली होती. यानंतर आता मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठवाड्यात तंत्रशिक्षणच्या ६१ संस्था आहेत. त्यांच्यामध्ये १९ हजार ४९५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. यंदा विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांकडील कल कमी झाल्याचे समोर आले आहे. मुदतवाढीमुळे ही संख्या कितीने वाढणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटल परवाना नूतनीकरण झाले सोपे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हॉस्पिटलच्या परवान्याचे नूतनीकरण करणे आता सोपे झाले आहे. आता 'फायर एनओसी' आणि मालमत्ता कर भरल्याची पावती दाखवल्यावर परवान्याचे नूतनीकरण केले जाणार आहे.

महापालिकेच्या हद्दीत खासगी हॉस्पिटलला दरवर्षी महापालिकेकडून परवान्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागते. नूतनीकरणासाठी महापालिकेचे काही जाचक नियम, अटी आहेत. त्यात प्रामुख्याने नगररचना विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट आहे. जाचक अटींमधून सवलत मिळावी यासाठी शहरातील काही डॉक्टरांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची बैठक झाली. यावेळी आयुक्तांनी जाचक अटींची सक्ती न करण्याचा शब्द दिला. फायर एनओसी आणि मालमत्ता कर भरल्याची पावती संबंधित हॉस्पिटल संचालकांनी अर्जासोबत जोडल्यास परवान्याचे नूतनीकरण करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केल्याचे राजू वैद्य यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतर्फे दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे तीन दिवसाआड म्हणजे चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात होता. सुमारे अडीच महिन्यानंतर पुन्हा दोन दिवसआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

शहराची वाढती पाण्याची गरज आणि जायकवाडीतून उपसले जाणारे पाणी याची सांगड बसत नसल्यामुळे पालिकेने २०११पासून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. दरम्यानच्या काळात दोन वेळा जायकवाडी धरणाची पाणी पातळी मृत जलसाठ्याच्या खाली जाऊनही पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बदलले नव्हते. यंदा जायकवाडी धरणात मुबलक पाणी व उपसा देखील नेहमीप्रमाणे होत असताना उन्हाळ्यात पाण्याची ओरड झाली. प्रामुख्याने सिडको, हडको आणि जुन्या शहरात पाच ते सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होऊ लागला. त्यामुळे नगरसेवक व नागरिकांचा रोष वाढला. परिणामी, सर्वांना समान पाणी देण्यासाठी पालिकेने अडीच महिन्यांपूर्वी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही विस्कळीतपणा कायम राहिला.

पावसाळा सुरू झाल्यामुळे पूर्ववत दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी दिले. त्यानंतर आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी देखील आदेश दिले. याबद्दल बोलताना वैद्य म्हणाले, दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे कसे शक्य आहे हे आम्ही आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यानंतर दोन दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय प्रत्यक्षात आला. रविवारपासून शहराच्या विविध भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकांच्या पत्नींचा आत्मदहनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमच्या पतींनी लष्करात राहून देशसेवा केली. त्याची दखल घेत शासनाने त्यांना जमीन दिली, पण त्यावर आमचा ताबाच नाही. आमची जमीन १५ ऑगस्टपर्यंत आमच्या ताब्यात द्या. अन्यथा विभागीय आयुक्तालयात आम्ही सामूदायिक आत्मदहन करू. असा इशारा माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी सोमवारी दिला.

या तक्रारींचे गांभीर्य ओळखत उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी संबंधित महसूल विभाग, तहसिलदारांसह पोलिस आयुक्तांना पत्र देणार असल्याचे सांगितले. लष्करात १७ वर्षे सेवा दिलेल्या भगवान खरात १९७१च्या युद्धात भाग घेतला होता. लष्करात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव झाला. पतीचे शौर्यापदक स्वतः लावून त्यांच्या पत्नी कमल खरात जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या. तेव्हा प्रत्येक व्यक्ती कौतुकाने पाहत होता. खरात यांच्यासोबत माजी सैनिकांच्या पत्नी होत्या. सर्वांकडे दाद मागितल्यावर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी जिल्हा महिला बालविकास विभागाच्या लोकशाही दिनात दाद मागितली. त्यांनी आपली तक्रार उपजिल्हाधिकारी धानोरकर यांना सांगितली, तेव्हा शहिदांच्या पत्नींना महिला लोकशाही दिनात यावे लागले याचे उपस्थित अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले.

लोकशाही दिनात खरात यांच्याबरोबर पुष्पा नलावडे, लता भालेराव व कमल पवार यांनी तक्रार दिली. लष्करात चांगली सेवा बजावली म्हणून भगवान खरात यांना शासनाने १९९७मध्ये लासूरगावजवळील राजुरा येथे चार एकर दहा गुंठे जमीन दिली. शासनाचे पत्र, ताबा देण्याचे पत्र असूनही तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांनी ताबा पत्र भगवान खरात यांना न देता शासनास परस्पर पत्रव्यवहार केला. ताबा देण्यास गेल्यावर भगवान खरात उपस्थित नव्हते, असे कळवण्यात आले. १९९७पासूनच भगवान खरात यांचा जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाला. कारण जमिनीवर शेजूळ यांचा ताबा होता. संघर्ष करता करता २०००मध्ये भगवान खरात यांचे निधन झाले. २०१०मध्ये वारसाहक्काने ती जमीन कमल खरात व त्यांच्या दोन मुलांच्या नावावर झाली, पण लक्ष्मण शेजूळ, रमेश शेजुळ व गणेश शेजुळ आम्हाला त्रास देतात, जमिनीवर येऊ देत नाही, असा आरोप खरात यांनी केला. अशीच व्यथा अन्य तिघींची होती.

अंजली धानोरकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली. 'मटा'शी बोलताना त्या म्हणाल्या, 'याविषयी निवासी उपजिल्हाधिकारी यांना पत्र देणार असून, संबंधित तहसिलदार व पोलिस आयुक्त यांना त्याची प्रत देण्यात येईल.'

लोकशाही दिनात आलेल्या अर्जावर विमल रगडे, विजया पगारे, शोभा बिरारे, कांता जैस्वाल, कमल मानकापे, संघमित्रा दाभाडे, केशरबाई सपकाळ, शोभा गिल्लेवार, चंद्रकला पवार आदींच्या स्वाक्षरी आहेत.

माजी सैनिक पत्नींना महिला लोकशाही दिनात दाद मागावी लागते, हे पाहून खूप चीड आली. त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला तेव्हा त्यांच्यासोबत झालेला अन्यायाची कल्पना मला आली. सैनिक पत्नींसाठी आमचे संपूर्ण सहकार्य असेल.

- अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस, संजय केणेकर, भाजप नेते


एटीएम फोडणारा गुन्हेगार ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानपुरा परिसरात शुक्रवारी सकाळी फोडण्यात आलेल्या एटीएम फोडण्याच्या प्रकरणात उस्मानपुरा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील जानेवारी २०१६ मध्ये दशमेशनगर भागातील एटीएम फोडल्याचा गुन्हा दाखल आहे.

शुक्रवारी सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडीयाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सायरन वाजल्याने चोरट्याने पलायन केले होते. चोरटा एटीएम सेंटरमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी उस्मानपुरा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पीएसआय कल्याण शेळके यांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. ३१ जानेवारी २०१६ रोजी दशमेशनगर भागात एसबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडल्याची घटना घडली होती. याप्रकरणी या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी घडलेल्या घटनेमध्ये या आरोपीचा समावेश आहे का याची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपीची गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीधारकांकडून अतिरिक्त शुल्क नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची रक्कम प्रवेशाच्यावेळी आगाऊ स्वारूपात घेऊ नये, असे निर्देश कॉलेजांना देण्यात आले आहेत. तंत्रशिक्षण विभागाने याबाबत स्पष्ट निर्देश देत, नियंत्रणासाठी नोडल ऑफिसर नेमले आहेत.

तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित अभियांत्रिकी, औषधनिर्माण, संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र पदवी, पदव्युत्तरसह विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीला विलंब होत असल्याने अनेक संस्था विद्यार्थ्यांकडे प्रवेशावेळीच संपूर्ण शुल्क भरण्याचा तगादा लावतात. मात्र, शिक्षण शुल्क, शिष्यवृत्तीची रक्कम आकरणी होत असल्याने, अतिरिक्त शुल्क आकारणी करू नये असे आदेश तंत्रशिक्षण विभागाने काढले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांकडूनही या प्रकारे आकारणी करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आल्याने हे निर्देश देण्यात आले आहेत. इतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असणार आहे.

\Bतर, कॉलेजवर कारवाई \B

तंत्रशिक्षण संचालनालयाने पत्रात म्हटले की, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी शुल्क नियामक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या शिक्षण शुल्काच्या केवळ ५० टक्के इतकी रक्कम संस्थांनी घ्यावी. यापेक्षा जास्त शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये. प्रवेशावेळी ५० टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्या संस्थांविरूद्ध नियमानुसार कारवाई तत्काळ करण्यात येईल.

\Bसंस्थांना भेट देऊन पाहणी

\B

या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागवार नोडल अधिकारी नेमून त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागातील विद्यार्थ्याकडून शिक्षण शुल्क शिष्य़वृत्तीची रक्कम आगाऊ स्वरूपात घेऊ नये व विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही याची खात्री करण्यासाठी वेळोवेळी संस्थांना भेट द्यावी. प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तक्रारीबाबत त्यांच्या स्तरावर चौकशी करून संबंधित संस्थेवर कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत.

नोडल ऑफिसर

विभाग......... अधिकारी.... फोन नंबर

औरंगाबाद....... जी. आर. संगवई... ९८९०१८५०७०

मुंबई..............जी. आर. निखाडे.... ९८२१२८६५०८

पुणे................सी. टी. कुंजीर........ ९०११०३६६९२

नाशिक............एस. पी. पगारे........ ९४०४२१३१५८

अमरावती.........एम. ए. अली......... ९८२२३७८७३७

नागपूर............एस. आर. कुक्कडपवार..९८८१०००८०४

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपानानंतर मारहाण, दोघांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मद्यपानानंतर वादातून गंभीर स्वरुपाची मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आरोपी मिर्झा रोमानेबेग उर्फ सोहेल मिर्झा फरोजबेग व आरोपी शेख जावेद शेख कलीम यांच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत (१८ जुलै) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी सोमवारी (१६ जुलै) दिले.

या प्रकरणी मोहम्मद नफीस अहमद मोहम्मद याकुब शेख (२२, रा. सहारा पार्क, जटवाडा रोड, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी तसेच आरोपी मिर्झा रोमानेबेग उर्फ सोहेल मिर्झा फरोजबेग (२०, रा. रोशनगेट) व आरोपी शेख जावेद शेख कलीम (२६, रा. शहाबाजार) यांनी १७ जून २०१८ रोजी दुपारी फिर्यादीच्या घराच्या गच्चीवर मद्यपान केले. जेवण करण्यासाठी आरोपी हे फिर्यादीला दुचाकीवर रोशनगेटच्या बाजुने घेऊन जात असताना आरोपी व फिर्यादीमध्ये वादविवाद झाला. त्यातून आरोपींनी फिर्यादीला गंभीर स्वरुपाची मारहाण करीत फिर्यादीच्या पोटात चाकू भोसकण्यात आला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध भादंवि ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये हर्सूल पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन आरोपींना ९ जुलै रोजी अटक करुन करण्यात आली. आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (१६ जुलै) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील सय्यद शेहनाज यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार प्रयत्न

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात झोपलेल्या आठ वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केला. रविवारी रात्री साडेनऊ वाजता छोटा मुरलीधरनगर भागात हा प्रकार घडला. मुलगी ओरडल्याने तिची आई आल्याने आरोपी पसार झाला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली. ही ३० वर्षांची विवाहीता पती व चार मुलांसह राहत असून मजुरी काम करते. ही महिला रविवारी मुलींसह उस्मानपुरा परिसरातील छोटा मुरलीधरनगर भागात वडिलांकडे राहण्यास आली होती. रात्री नऊ वाजता जेवण करून सर्वजण झोपी गेले. रात्री साडेनऊ वाजता मुलीची आई समोर राहत असलेल्या काकाकडे गेली होती. यावेळी मुली झोपलेले घर त्यांनी दरवाजा ओढून बंद केले होते. काही वेळातच आईला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी धावत जाऊन घर गाठले. यावेळी त्यांच्या आठ वर्षाच्या मुलीसोबत संशयित आरोपी गुड्डू प्रताप रिडलॉन (रा. छोटा मुरलीधरनगर) हा अतिप्रसंग करताना दिसला. मुलीच्या आईने त्याच्या तोंडात मारत मुलीची सुटका केली. यावेळी हाताला झटका देत आरोपी गुड्डू पसार झाला. याप्रकरणी सोमवारी सकाळी उस्मानपुरा पोलिस ठाणे गाठून मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पसार आरोपी गुड्डू रिडलॉन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय राहुल चव्हाण याप्रकरणी तपास करीत आहेत. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रल्हाद घोडके यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याच्या वाहनांवर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/पडेगाव

पडेगाव येथे नागरिकांनी मंगळवारी कचऱ्याने भरलेल्या महापालिकेच्या वाहनांवर दगडफेक केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. महापालिकेने पोलिसांच्या मदतीने नागरिकांचा विरोध मोडून काढला. त्यानंतर दिवसभर पडेगावात कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या करण्यात आल्या. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारासही दोन गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. पडेगाव आणि चिकलठाणा या ठिकाणी दिवसभरात शंभर ट्रक कचरा टाकण्यात आला.

शहरातील कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या संनियंत्रण समितीने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथील जागा निश्चित केल्या आहेत. महापालिकेतर्फे या जागांवर कचरा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पडेगाव येथील कत्तलखान्याच्या शेजारी कचरा टाकण्यासाठी जागा निश्चित केली आहे. मंगळवारी सकाळी कचऱ्याने भरलेल्या गाड्या तेथेर नेल्या जात असताना नागरिकांनी या गाड्या थांबवल्या. नुसता कचरा टाकू नका, त्यावर प्रक्रिया करा अशी मागणी करीत त्यांनी गाड्या पुढे जाऊ न देण्याची भूमिका घेतली. जमावातील काही नागरिक संतप्त झाले. महापालिकेच्या विरोधात त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. तेवढ्यात कचऱ्याने भरलेल्या गाड्यावर दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत तीन गाड्यांचे नुकसान झाले. नागरिक संतापले व त्यांनी गाड्यांवर दगडफेक केल्याचे समजल्यावर पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली.

दरम्यान, पोलिस बंदोबस्त देखील मागण्यात आला होता. पोलिसांचा ताफा पडेगावात दाखल झाला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा करताना प्रक्रिया करण्यासाठीच्या मशीनची निविदा काढली आहे. लवकरच या निविदा अंतिम होतील आणि मशीनची खरेदी केली जाईल. त्यानंतर दररोज कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे, असे सांगितले. मशीनची खरेदी होईपर्यंत महापालिकेला सहकार्य करा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले. तगडा पोलिस बंदोबस्त पाहून नागरिकही बॅकफूटवर आले. महापालिकेला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली. नगरसेवक सुभाष शेजवळ यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांचा विरोध मावळल्यानंतर पोलिस बंदोबस्तात पडेगावच्या कत्तलखान्याच्या शेजारी असलेल्या जागेवर कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात आली. दिवसभरात सुमारे ५० गाड्या या ठिकाणी रिकाम्या करण्यात आल्या. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास पुन्हा काही जणांनी कचऱ्याच्या दोन गाड्यांवर दगडफेक केली. चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवर देखील पोलिस बंदोबस्तात सुमारे ५० ट्रक कचरा टाकण्यात आला. शहराच्या विविध भागात साचलेला सुमारे शंभर ट्रक कचरा उचलण्यात आल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

स्क्रिनिंग मशीन बसवले

पडेगाव येथील नागरिकांचा विरोध कमी करण्यासाठी महापालिकेने त्या ठिकाणी स्क्रिनिंग मशीन बसवले. या मशीनमुळे वर्गीकरण केलेला कचराच तेथे टाकला जाईल, असा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध संकलनात दीड हजारांची घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दूध आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील दूध संकलनावर परिणाम झाला. सोमवारी सुमारे ७ हजार लिटर संकलन कमी झाले होते तर मंगळवारी दूध संकलनात दीड हजार लिटरची घट झाल्याचे जिल्हा औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईला पोलिस बंदोबस्तात दुधाचे टँकर पाठविण्यात येत आहेच. दूध संकलनात फारशी घट नसून इतर जिल्ह्यातूनही पुरवठा सुरळीत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उर्दू भाषक विद्यार्थ्यांनी मराठीवर प्रभुत्व मिळवावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'उर्दू भाषकांनी मराठी भाषेचा देखील तेवढ्याच प्रमाणावर प्रसार करावा, उर्दू भाषक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांत इतर विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान व भाषा कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. मराठीवर प्रभुत्व असणे, अत्यंत आवश्यक आहे,' असे मत विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी उर्फ बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा उम्मीद कल्चरल फाउंडेशनतर्फे मंगळवारी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम सिल्क मिल कॉलनीमध्ये पार पडला. या सत्काराप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मंजूर खान, डॉ. मकदूम फारुकी, डॉ. जाहेद जहीर, झकिऊद्दिन सिद्दिकी, असीफ खान, अझहर खान, एजाज खान, हारेस सिद्दिकी, मीर मोहताशीम, अब्दुल रहमान, अश्फाक खान, मुजाहिद खान व सोहेल झकिऊद्दिन यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंजूर खान यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट आमदारांसमोर मांडले. 'उर्दू हा प्रेमाची भाषा आहे. शायरीची भाषा आहे. उर्दू संस्कृती व भाषेच्या प्रसार व जतनासाठी 'उम्मीद' तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. मुशायरे, गजल, परिसंवाद व चर्चासत्राच्या माध्यमाने 'उर्दू सर्वांसाठी' हा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येईल, असे मंजूर खान यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस उपायुक्त श्रीरामेच्या जामीनावर सुनावणी पुर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

२२ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करणारे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश एस. एस. भिष्मा यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला असून अटकपूर्व जामिनावर निर्णय अपेक्षित आहे.

या पीडित तरुणीने व्हॉटस्अॅपवर पोलिस आयुक्त श्रीरामे विरुद्ध पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. पोलिस आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेत आदेश दिल्याने सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात श्रीरामे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यामध्ये अटक होऊ नये म्हणून श्रीरामे यांनी ७ जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश एस. एस. भिष्मा यांच्यासमोर सुनावणी झाली. मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी अटकपुर्व जामिनाला विरोध केला. पीडिताने व्हॉटस्अॅपवर केलेल्या तक्रारीनंतर तिला २२ जून रोजी आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात बोलावण्यात आले. या ठिकाणी सुरक्षा समिती सदस्य, विधी अधिकारी, महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलिस निरीक्षक, बाल न्याय मंडळाच्या सदस्या, सहायक पोलिस आयुक्त यांच्यासमोर पीडिताने व्हॉटसअप तक्रार स्वत: दिली असल्याचे मान्य करत त्यावर असलेली सही आपलीच असल्याचे या पीडितेने सदस्यांसमोर सांगून त्यावर सही केली. त्यानंतर इतर सदस्यानी बी फोर मी म्हणत सह्या केल्या. हे सर्व झाल्यानंतर २७ जून रोजी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात श्रीरामे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे मुख्य सरकारी वकील देशपांडे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. श्रीरामेंनी पीडितेला आणि पीडितेने श्रीरामे या दोघांनी एकमेकाला १ हजार ३५० व्हॉटस्अॅप संदेश पाठवले तर ५५० वेळा चॅटिंग संदेश केले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. श्रीरामे यांना अटक केल्याशिवाय तपास करणे शक्य नसल्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती सरकारी वकील देशपांडे यांनी न्यायालयाला केली. दरम्यान, बचाव पक्षाच्या वतीने अॅड. गोपाल पांडे यांनी बाजू मांडली. यामध्ये माझा मोबाइल तपासणी करण्यासाठी देण्यास तयार आहे. माझ्या घराची झडती घेण्यात यावी, माझी वैद्यकीय तपासणी करण्यास तयार आहे. पोलिस दलात उच्चपदस्थ अधिकारी असल्यामुळे मला चालक, दोन गार्ड कायम सोबत असताना लपून छपून असे कृत्य करणे अशक्य आहे. तपासासाठी अटकेची गरज नाही. पोलिस तपासात सर्व सहकार्य करण्यास तयार असल्यामुळे अटकपूर्व जामीन देण्यात यावा, अशी विनंती श्रीरामे यांच्या वतीने अॅड. पांडे यांनी केली. या प्रकरणी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद मंगळवारी पुर्ण झाला असून या अटकपुर्व जामीनावर निर्णय अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रिया मशीनच्या टेंडरला अखेर मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्यावरील प्रक्रियेसाठीच्या मशीनच्या टेंडरला अखेर मुहूर्त लागला आहे. प्राप्त झालेल्या निविदेच्या टेक्निकल बिड उघडण्यात आल्या. बुधवारी कमर्शियल बिड उघडून येत्या शनिवारपर्यंत निविदा अंतिम केली जाणार आहे.

प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात एक श्रेडिंग मशीन, एक ग्रेडिंग मशीन आणि एक स्क्रिनिंग मशीन देण्यासंदर्भात महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. नऊ झोन कार्यालयाच्या क्षेत्रांत एकूण २७ मशीन खरेदीसाठीची या निविदा होत्या. शासनाच्या निकषाप्रमाणे महापालिकेला निविदा प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या निविदांचे टेक्निकल बिड मंगळवारी उघडण्यात आले. बुधवारी कमर्शियल बिड उघडल्यावर मशीनच्या दराची माहिती समोर येईल. त्यानंतर मशीन खरेदीची निविदा अंतिम केली जाईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

हर्सूल, पडेगाव आणि चिकलठाणा येथे बसविण्यात येणाऱ्या १५० टन क्षमतेच्या मशीनसाठी बांधकाम करण्याच्या निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. या निविदा देखील आठ ते दहा दिवसांत अंतिम होतील, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक बलात्कार प्रकरणात दोघांना वीस वर्षे सक्तमजुरी

$
0
0

(पान दोन मेनलीड) (कोठडीचे कार्टून वापरावे)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तिसगाव शिवारात १७ वर्षाच्या मुलीच्या मित्राला मारहाण करीत मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना २१ सप्टेंबर २०१५ रोजी घडली होती. या प्रकरणी दोन आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश एस. एस. भिष्मा यांनी २० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

तिसगाव शिवारातील ही मुलगी आपल्या मित्रासोबत सिद्धार्थ उद्यानात फिरण्यासाठी आली होती. गावाकडे जात असताना तिसगाव शिवारातील एका शेतात सायंकाळच्या सुमारास हे दोघे गप्पा मारीत उभे होते. यावेळी चारजण त्यांच्या दिशेने आले. या मुलीला व तिच्या मित्राला या चौघांनी मारहाण सुरू केली. मुलीच्या मित्राने प्रतिकार केला असता त्याला देखील बेदम मारहाण करीत त्यांचा मोबाइल हिसकावून घेण्यात आला. यापैकी एकाने मुलीला फरफटत नेले. मुलीने त्या आरोपीच्या हाताला चावा घेत प्रतिकाराचा प्रयत्न केला, मात्र तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनेचे गांर्भीय ओळखून घटनास्थळी भेट देत तातडीने आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास करीत अत्याचार करणारे रुपचंद टेकचंद तिरछे (वय ३२), मच्छिंद्र गुलाब उर्फ विलास गायकवाड (वय २७), बबन छबु सोनवणे (वय ४०) आणि शेख सत्तार शेख गफार (वय ३४ सर्व रा. तिसगाव) यांना अटक केली. तपास अधिकारी चंद्रकांत सावळे यांनी याप्रकरणाचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश एस. एस. भिष्मा यांच्या समोर झाली. सहायक लोकअभियोक्ता शरद बांगर यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये पीडित मुलीची व तिच्या मित्राची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने सामूहिक बलात्कार भा.द.वी. ३७६ ड या कलमाखाली आरोपी रुपचंद तिरछे व मच्छिंद्र गायकवाड यांना दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी, लुटमार करणे कलम ३९४ नुसार दोघांना दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड मारहाण करणे, कलम ३२३ नुसार सहा महिने शिक्षा, कलम ५०४ नुसार एक वर्ष सक्तमजुरी, बाल लैंगिक अत्याचार कलम ३ आणि ४ नुसार रुपचंद याला दोषी ठरवत ७ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. वसूल झालेल्या दंडापैकी एक लाख रुपये पीडित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पैरवी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दीपाली निकम व बी. वाय. किरड यांनी विशेष सहकार्य केले. सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार आरोपीपैकी बबन सोनवणे याचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला, तर शेख सत्तार यास सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात कल्ल्याचा वाल्मीकी होण्याचा प्रयत्न

$
0
0

(पासपोर्ट फोटो येणार आहे) मेनलीड शेजारी तीन कॉलम लावणे

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुख्यात घरफोड्या कल्ल्या उर्फ कलीमखान हे नाव पोलिस दलात चांगलेच परिचित आहे. बाल गुन्हेगार असल्यापासून कल्ल्या कुख्यात आहे. शेकडो घरफोड्यामध्ये तो आरोपी आहे. तीन महिन्यांपूर्वी जेलमधून सुटलेला कल्ल्या आता कुटुंबासोबत जीवन जगायचे आहे, असे सांगत आहे. सध्या उस्मानपुरा पोलिस ठाण्यात त्याची सकाळ संध्याकाळ हजेरी लावण्यात आली आहे.

कलीमखान शब्बीरखान पठाण उर्फ कल्ल्या (वय ३२ रा. छोटा मुरलीधरनगर) हे घरफोड्याच्या गुन्हेगारांच्या यादीतील अग्रगण्य नाव आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार ७० घरफोडीचे गुन्हे कल्ल्यावर दाखल आहेत. २० वर्षांपूर्वी पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेला कुख्यात गुन्हेगार ढिसम्या सिरसवाल याच्या मार्गदर्शनाखाली बालपणातच कल्ल्याच्या गुन्हेगारीला सुरुवात झाली होती. २००२ साली सोळा वर्षांचा असताना त्याने गोडावून फोडून पहिली भंगाराची चोरी केली. यानंतर त्याच्या गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढतच गेला. इतर कोणत्याही गुन्ह्यावर भर न देता कल्ल्याने केवळ चोरी व घरफोडीवर लक्ष्य केंद्रीत केले. काही काळातच कल्ल्याची टोळी नावारुपाला आली. भर कोर्टात न्यायधीशांना चप्पल मारणे, कोर्टाच्या आवारातून पीएसआयला मारहाण करीत पलायन करण्याचे देखील गुन्हे कल्ल्यावर नोंद आहेत. दोन वेळेस कल्ल्याच्या टोळीला मोक्का कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. पाच वर्षांची शिक्षा देखील त्याने दोन वर्षापुर्वी भोगून बाहेर आला आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात छोट्या मोठ्या मिळून १५ वेळेस शिक्षा भोगल्या असल्याचे कल्ल्या आता खेदाने सांगतो. गेल्या वर्षी वाँटेड असलेल्या कल्ल्याला परभणी येथून जेरबंद करण्यात आले होते. तीन महिन्यांपूर्वी त्याची कारागृहातून सुटका झाली आहे. विवाहित असलेल्या कल्ल्याला आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात त्याला सकाळ संध्याकाळ हजेरी लावण्यात आली आहे. गुन्हेगारी आता मनातून काढून टाकली आहे. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार असल्याचे त्याने सांगितले. उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पीएसआय कल्याण शेळके यांनी आपले वारंवार समुपदेशन केल्याची माहिती कल्ल्याने दिली.

चौकट

पुनरावृत्ती नको

२००६ साली कोर्टाच्या आवारातून पीएसआयला मारहाण करून पलायन केल्यानंतर कल्ल्या शोधण्यासाठी विशेष पोलिस पथक निर्माण करण्यात आले होते. यामध्ये सध्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती त्यावेळी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात एपीआय म्हणून कार्यरत होते. त्यांची तपास पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत गुन्हे शाखेचे पीएसआय जनार्दन गायकवाड यांचा देखील समावेश होता. त्याला पकडण्यात यश देखील आले होते. यानंतर देखील कल्ल्याने उस्मानपुरा पोलिस ठाण्याची साफसफाई करीत गुन्हेगारी सोडल्याचे पोलिसांना भासवले होते. त्यानंतर देखील तो गुन्हेगारी कृत्ये करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. सध्या कल्ल्या जरी गुन्हेगारी सोडत असल्याचे सांगत असला तरी त्याच्यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्याच खात्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध अभ्यासक्रमांसाठी मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्याच खात्यात जमा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्य़वृत्ती जमा होणार असली तरी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची रक्कम संबंधित कॉलेजांनाही मुदतीतच परत द्यायची आहे. १५ दिवसात ही रक्कम कॉलेजकडे वर्ग न केल्यास विद्यार्थ्यांना पुढील वर्षीच्या सवलतीपासून वंचित रहावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची प्रक्रियेसाठी स्वतंत्र पोर्टल करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया यंदा होऊ शकली नाही. त्यासह विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्काची रक्कम कॉलेजांना थेट मिळायची यंदा ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली. त्यावरून राज्यभर वादंग उठले. कॉलेज प्रशासन व शासन यांच्यातील वादानंतर या प्रक्रियेचे काय, असा प्रश्न होता. अखेर याबाबत शासनाने सर्व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्याच बँक खात्यावर जमा करण्याचे निश्चित केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे त्याबाबतचा अद्यादेश काढण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असली तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची रक्कम वेळेतच कॉलेजकडे वर्ग करावी लागणार आहे. यंदा अनेक विद्यार्थ्यांनी ती विलंबाने जमा केल्याचे प्रकार समोर आले होते. नव्या नियमानुसार विद्यार्थ्याला मंजूर झालेली शिष्यवृत्तीची रक्कम खात्यावर जमा होईल. त्यानंतर शिल्लक राहिलेली व न भरलेली संस्थेची शिक्षण शुल्काची रक्कम म्हणून संबंधित संस्थेकडे १५ दिवसांच्या आत जमा करायची आहे. तसे केले नाही तर, पुढील शैक्षणिक वर्षी त्यांच्या शिष्यवृत्तीच्या नुतनीकरणाचे पुढील वर्षासाठीचे अर्ज संस्थेकडून स्विकारण्यात येणार नाहीत. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images